Tuesday, March 19, 2013

तेथे कर माझे जुळती १३ - ए.नटराजन (भाग २)

नटराजनसाहेबांच्या सोबत मी काम करायला सुरुवात केली त्या काळात यंत्रसामुग्रीच्या उत्पादनाच्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका या देशामधील परिस्थितींमध्ये जमीन अस्मानाएवढा फरक होता. मोटारी, पंखे, शिवणयंत्रे, रेफ्रिजरेटर यासारख्या ग्राहकांना उपयुक्त अशा वस्तू तयार करण्याचे कारखाने भारतात चालू झालेले होते. त्यातले बहुतेक सगळे फॉरेन कोलॅबोरेशनवर उभारलेले होते आणि परदेशी कोलॅबोरेटर्सच्या सहाय्याने ते चालवले जात होते. विशिष्ट वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामुग्री आयात केलेली असे आणि फक्त त्या उत्पादनांसाठी ती कशी चालवायची हे ठरवून दिलेले असे. आपली स्वतः बुध्दी चालवून नव्याने किंवा निराळे काही निर्माण करण्याची गरजही पडत नसे आणि त्यासाठी फारसा वावही नसे. यंत्रांच्या ठराविक कामात काही अडचण आली किंवा गरज पडलीच तर सहाय्य करायला परदेशी तज्ज्ञ.हजर असत किंवा त्यांना बोलावले जात असे.

आमच्या प्रॉजेक्टच्या पहिल्या युनिटची सारी यंत्रयामुग्री कॅनडामधूनच तयार होऊन आली होती आणि दुस-या युनिटसाठी डिट्टो तशीच यंत्रे आम्ही भारतात बनवून घेण्याची योजना होती. त्या यंत्रसामुग्रीची जी ड्रॉइंग्ज आम्हाला मिळाली होती ती कॅनडामधील कारखान्यांसाठी कदाचित पुरेशी असतील. तो देशसुध्दा तेंव्हा कारखानदारीमध्ये फार पुढारलेला नसला तरी त्याच्यापाशी अमेरिकेचे भक्कम पाठबळ होते. या ड्रॉइंग्जमधील प्रत्येक भाग 'अमुक अमेरिकन स्टँडर्डच्या तमूक ग्रेड'पासून बनवावा असे त्या ड्रॉइंगमधील 'बिल ऑफ मटीरियल'मध्ये लिहिले होते, काही बाबतीत तर 'अॅटलास सुपरइम्पॅक्टो' किंवा 'अल्टिमो' एवढे 'ट्रेड नेम'च लिहिले होते. एवढ्या वर्णनावरून तो नेमका कोणता मिश्रधातू आहे हेसुध्दा समजत नव्हते. अशा वर्णनाचा कच्चा माल भारतात निर्माण होत नव्हताच, त्या काळात इथल्या बाजारपेठेमध्येही तो उपलब्ध नव्हता. गीअर्स, मोटर, पंप, व्हॉल्व्ह, स्विचे वगैरे यंत्रे,  उपकरणे आणि नटबोल्ट, वॉशर्स, स्प्रिंग्ज, कपलिंग्ज यासारखे सुटे भाग सुध्दा 'अमूक कंपनीच्या कॅटलॉगमधले तमूक आयटम नंबर' अशा पध्दतीने ड्रॉइंगमध्ये दाखवले होते. त्यावरून काही बोध होत नसल्यामुळे त्या त्या कंपनीकडून किंवा तिच्या स्टॉकिस्टकडून ते विकत घेण्यावाचून गत्यंतर नव्हते. त्या काळात भारताची आयातनिर्यातविषयक नीती अत्यंत कडक होती. प्रत्येक परदेशी वस्तूसाठी इंपोर्ट लायसेन्स मिळवणे अत्यावश्यक असे. व्यापारी किंवा एजंट लोक अशा प्रकारचा माल इंपोर्ट करून त्याचा स्टॉक करून ठेवू शकत नसत. कॅनडामध्ये असे निर्बंध नसल्यामुळे या ड्रॉइंग्जनुसार जे काही आवश्यक असेल ते सारे तिथल्या कारखानदारांना स्थानिक बाजारातून सहजपणे मिळत असे, पण भारतातल्या कारखानदारांना ते फारच कठीण असल्यामुळे आम्हाला हवी असलेली यंत्रसामुग्री तयार करण्याचे काम हातात घ्यायला त्यातला कोणीच उत्सुक नव्हता. कोणत्याही वस्तूंच्या निर्मितीसाठी फॉरेन कोलॅबोरेशन असल्यास त्या कारखानदाराला त्या विशिष्ट उत्पादनांसाठी लागणारे परदेशी सामान मिळून जात असे, त्याचप्रमाणे या प्रॉजेक्टसाठी आवश्यक तेवढे सामान आम्ही कॅनडामधून आयात करू शकत होतो. हा सगळा विचार करून झाल्यावर आमच्या उपयोगासाठी सर्व कच्चा माल आणि विशिष्ट उत्पादने (प्रोप्रायटरी आयटम्स) आम्ही मागवून घ्यायची आणि येथील कारखानदारांना ती पुरवून त्यापासून आमच्या प्रॉजेक्टसाठी यंत्रसामुग्री तयार करवून घ्यायची असे ठरले.

ड्रॉइंग्जचा बारकाईने अभ्यास करून त्यातल्या प्रत्येक आयटमचा आकार शेवटी कसा असायला हवा ते समजते, पण तो कशापासून तयार करायचा हे त्यात दिलेले नसल्यास त्याबद्दल विचार करून ठरवावे लागते. उदाहरणार्थ बटाटेवड्याचा फोटो पाहून तो कसा तयार केलेला आहे, त्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज आहे हे समजत नाही, तो चाखून पाहिल्यानंतर थोडा अनुभव आणि विचार यातून त्याचा अंदाज करता येतो. अशाच प्रकारे विश्लेषण, विचार, कल्पना आणि चर्चा करून आमच्या यंत्रसामुग्रीसाठी लागणारा कच्चा माल आणि विशिष्ट उत्पादने यांच्या याद्या नटराजन यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करायच्या कामाला मी लागलो आणि त्याच्या पुढल्या पायरीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यांच्याहून वरिष्ठ अधिका-यांच्या बरोबर ते निरनिराळ्या मोठमोठ्या कारखान्यांना भेट देत आणि तिथल्या संचालक मंडळींशी चर्चा करून येत. पण बहुतेक वेळी आपल्यासमोर केवढ्या मोठ्या अडचणी आणि आव्हाने आहेत याचीच उजळणी होत असे. पण यातून होणा-या मनस्तापाची किंवा नैराश्याची झळ त्यांनी आम्हाला लागू दिली नाही किंवा आम्हाला निरुत्साही होऊ दिले नाही.

या ड्रॉइंग्जमधील प्रत्येक भाग अमुक अमेरिकन स्टँडर्डच्या तमूक ग्रेडच्या पदार्थापासून बनवावा असे लिहिले होतेच. या शिवाय "तो बनवण्यासाठी करायच्या वेल्डिंग, हीट ट्रीटमेंट, मशीनिंग, फिनिशिंग यासारख्या उत्पादनामधील प्रत्येक कृती अमक्या कोड किंवा स्टँडर्डच्या तमक्या सेक्शनमधील ढमक्या कलमानुसार केली पाहिजे", "त्याचे निरीक्षण (इन्स्पेक्शन) आणखी कुठल्या सेक्शननुसार केंव्हा आणि कुणी केले पाहिजे." वगैरे अनंत नियम संबंधित टेक्निकल स्पेसिफिकेशन्समध्ये लिहिलेले होते आणि ते सारे आम्हाला बंधनकारक होते. अशा प्रकारच्या अमेरिकन कायद्यांचे राज्य भारतात चालत नव्हते. त्यामुळे त्या काळी इथल्या कोणालाही ते नियम माहीत नव्हते. अशा परिस्थितीत कारखानदार तरी ते नियम पाळण्याचे आश्वासन कशाच्या बळावर आम्हाला देणार? त्यामुळे या बाबतीतसुध्दा आम्हीच त्यांना मदत करणे आवश्यक होते. आम्ही ती सगळी कोड्स आणि स्टँडर्ड्स मागवून घेतली, त्यांचा अभ्यास करून त्यातली जी कलमे आमच्या कामासाठी उपयुक्त, महत्वाची किंवा आवश्यक होती ती नीटपणे समजून घेऊन त्यानुसार कारखान्यांमधल्या लोकांशी चर्चा करावी लागत असे. नटराजन यांचे उच्च शिक्षण अमेरिकेत झालेले होते आणि बीएआरसीमधील कॅनेडियन रिअॅक्टरवर त्यांनी काम केलेले होते. त्यामुळे अशा प्रकारची डॉक्य़ुमेंट्स त्यांना माहीत होती. "आपण असे असे करून त्यामधून मार्ग काढू शकतो" हे ते आत्मविश्वासाने सांगू शकत.  

असे असले तरीसुध्दा ही सगळी यंत्रसामुग्री तयार करण्याची जबाबदारी घेण्यासाठी सुसज्ज असे कारखानदार सुरुवातीच्या काळात भारतात मिळत नव्हते. रिअॅक्टर व्हेसल, स्टीम जनरेटर यासारखी काही महत्वाची पण स्थिर स्वरूपाची (स्टेशनरी) इक्विपमेंट तयार करण्याचे आव्हान लार्सन अँड टूब्रो, बीएचईएल, वालचंदनगर इंडस्ट्रीज यासारख्या मोठ्या कंपन्यांनी स्वीकारले, पण गतिमान यंत्रसामुग्री तयार करण्याएवढी त्यांची क्षमता नव्हती. काही यंत्रे आम्ही बीएआरसीच्या वर्कशॉपमध्ये तयार करायचे ठरवले, तरीही आणखी काही महत्वाची यंत्रे अजून शिल्लक होती. एचएमटी या सार्वजनिक क्षेत्रामधील कंपनीचे कारखाने भारतातील अनेक ठिकाणी होते, त्यातल्या हैद्राबाद येथील कारखान्यात ते 'स्पेशल पर्पज मशीन टूल्स' तयार करत असत. आमची यंत्रेसुध्दा 'स्पेशल' असल्यामुळे त्यातली काही यंत्रे त्यांच्याकडून बनवून घेण्याचा विचार केला. त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी नटराजनसाहेब, त्यांचे बॉस, आणखी एक सहकारी यांच्यासोबत मीसुध्दा हैदराबादला गेलो. पुन्हा एकदा आम्ही एकत्र प्रवास करत होतो. तिथे गेल्यानंतर काय बोलायचे याची स्ट्रॅटेजी ठरवण्यावरच या वेळच्या प्रवासात चर्चा झाली.

एचएमटीच्या कारखान्यात गेल्यानंतर प्रथेनुसार त्यांनी आम्हाला त्याच्या महत्वाच्या विभागांमधून फिरवून आणले. ते करतांना आम्ही तिथे असलेली यंत्रे आणि इतर फॅसिलिटी पाहून घेतल्या, तसेच त्यातली किती यंत्रे काम करत होती आणि किती थंड पडलेली होती तेही पाहिले. त्यानंतर महाचर्चेला सुरुवात झाली. आमच्या कामाचे स्ट्रॅटेजिक महत्व, देशाची अस्मिता आणि इभ्रत, पायाभूत तंत्रज्ञानाचा विकास, दूरदर्शी धोरण, महत्वाकांक्षी योजना, स्वावलंबन, परस्परांचे सहकार्य वगैरेंबद्दल मोठ्या साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले. केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयामधून बहुधा यासंबंधीच्या सूचना एचएमटीलाही मिळालेल्या असाव्यात. त्यांनीही हो ला हो करीत सारे काही ऐकून घेतले. त्यानंतर "आमची कामे हातात घेण्यासाठी कोणकोणत्या फॅसिलिटीजची आवश्यकता आहे, त्यातल्या किती त्यांच्याकडे आधीपासून आहेत, त्यात कोणती भर टाकायची गरज कदाचित पडेल, त्यासाठी लागेल ती सर्व प्रकारची मदत आम्ही करूच." वगैरे गोष्टी नटराजन यांनी थोडक्यात पण नेमक्या शब्दांमध्ये सांगितल्या. शिवाय "सध्या बाजारपेठेत असलेल्या मंदीमुळे त्यांच्या कारखान्यात त्याच्या पूर्ण कार्यक्षमतेइतके काम चाललेले दिसत नाही. बरीचशी स्पेअर कपॅसिटी असल्यासारखे दिसते. यामुळे त्यांनी आमचे काम घेतले तर त्यापासून दोघांना फायदा होईल." वगैरे मुद्दे मांडले. ते त्यांना मान्य करावेच लागत होते, पण त्यांनी वेगळा मुद्दा पुढे केला. "अशा प्रकारचे काम इथे पहिल्यांदाच करायचे असल्यामुळे त्याला किती वेळ लागेल आणि त्यासाठी किती खर्च येईल याचा अंदाज आम्ही बांधू शकत नाही, मग त्याची किंमत आम्ही कशी ठरवणार?"

या प्रश्नाची अपेक्षा आम्हाला होतीच आणि त्यावर उपायही ठरवलेला होता. "तुमच्या कारखान्यातील प्रत्येक यंत्र रोज किती वेळ चालते याची नोंद ठेवली जात असणार, तसेच प्रत्येक कामगाराचेही टाईमकार्ड असणार. त्यांचेसाठी 'मॅनअवर' आणि 'मशीनअवर रेट्स'सुध्दा ठरलेले असणार. आमच्या कामावर ते किती खर्च होतात याचा वेगळा हिशोब ठेवावा आणि तेवढे बिल आमच्याकडे पाठवावे. आपल्या संस्था सार्वजनिक क्षेत्रामधल्या असल्यामुळे त्यांचे पेमेंट करणे म्हणजे केंद्र सरकारच्या एका खिशातले पैसे काढून ते दुस-या खिशात ठेवण्यासारखे आहे. त्यात काही अडचण येणार नाही. तुमचे आणि आमचे अकौंट डिपार्टमेंट मिळून ते पाहून घेतील." अशा प्रकारचा 'कॉस्टप्लस' फॉर्म्यूला पुढे केल्यावर त्यांनीही तो स्वीकारला आणि प्रयोगादाखल एक यंत्र तयार करणे मान्य केले. 

तापलेले लोखंड मऊ असतांना त्यावर कसा घणाचा घाव घालाया हे नटराजन यांना चांगले ठाऊक होते. त्यांनी लगेच सांगायला सुरुवात केली, "सर्व रॉ मटेरियल्स आणि प्रोप्रायटरी आयटम्स आम्ही कॅनडाहून आय़ात करून तुम्हाला देणारच आहोत, पण त्यांना इकडे येण्यासाठी वेळ लागेल. त्याआधी करण्यासारखी बरीच कामे आहेत. वेल्डिंग आणि हीट ट्रीटमेंटसाठी कोड्सप्रमाणे प्रोसीजर्स लिहून ती अॅप्रूव्ह करून घ्यायची आहेत. त्यासाठी ट्रायल्स कराव्या लागतील. काही काँपोनंट्स खूप काँप्लेक्स आकाराचे आहेत आणि त्यांची अॅक्यूरसी अत्यंत महत्वाची आहे. ते आकार कसे तयार करायचे याचा विचार करून त्यासाठी जिग्ज आणि फिक्स्चर्स तयार करावी लागतील. अशा सगळ्या ट्रायल्स आपल्या स्टॉकमधल्या मटीरियलवर केल्या तर महागडे इंपोर्टेड मटीरियल वाया जाणार नाही. त्यातून अनुभव मिळेल आणि अडचणी समजतील. त्यामुळे आपले मटीरियल कॅनडामधून येईपर्यंत आपण सज्ज झालेले असू" वगैरे वगैरे सांगून झाल्यानंतर "या कामासाठी आधी एक टीम तयार करायला हवी. त्यांना आमच्या प्रॉजेक्ट साईटवर नेऊन या प्रकारचे कॅनडामधून आलेले मशीन दाखवता येईल, आमच्या वर्कशॉपमध्ये होत असलेले अशा प्रकारचे काम आणि त्याचे क्वालिटी अॅशुरन्स वगैरे दाखवता येईल." वगैरे मुद्दे मांडून एचएमटीमधल्या दोन तीन जणांची एक लहानशी टीम तयार करून घेतली. आम्ही सगळी ड्रॉइंग्ज सोबत नेलेली होतीच. पुढील दोन तीन दिवस या टीमला त्या ड्रॉइंग्जमधले महत्वाचे मुद्दे दाखवले. ते इंजिनियर खरोखरच हुषार, कामसू आणि उत्साही होते. त्यांनी आम्हाला चांगले सहकार्य दिले त्याचप्रमाणे त्यांच्या कारखान्यातले काम कसे चालते याची सविस्तर माहितीही दिली.

त्यांच्या डिझाइन ऑफिसमध्ये ड्रॉइंग्ज तयार झाल्यानंतर ती प्लॅनिंग सेक्शनमध्ये जातात. तिथे त्यांचे प्रोसेसशीट्स तयार होतात. कारखान्यातल्या शॉप फ्लोअरवरील ज्या विभागात जेवढे काम होत असेल त्याचीच माहिती देणारी ड्रॉइंग किंवा वेगळी स्केचेस त्यांना दिली जातात. त्यात काही अडचण आली तर ते ड्रॉइंग आणि प्रोसेस शीट रिवाइज केले जाते वगैरे शिस्त त्यांच्याकडे होती. आमच्याकडील कॅनेडियन ड्रॉइंग्जमध्ये सगळ्या प्रकारच्या माहितीची खिचडी होती आणि त्यातली डायमेन्शन्स इंच आणि फुटांमध्ये दिलेली होती. अशा प्रकारचे ड्रॉइंग त्या कारखान्यातला कोणताही कामगार हातातसुध्दा धरणार नाही. त्यांना कळू शकतील अशी त्यांच्या पध्दतीची ड्रॉइंग्ज तयार करणे सर्वात आधी आवश्यक होते. ती तयार करून ते आमच्याकडे पाठवू लागले. त्या ड्रॉइंग्जचे पहिले एक दोन गठ्ठे पाहून झाल्यावर त्यात काही उणीवा आणि चुका सापडल्या. त्या सुधारण्यासाठी आणि सुधारलेली आवृत्ती पुन्हा तपासण्यासाठी ड्रॉइंग्जचे गठ्ठेच्या गठ्ठे इकडून तिकडे पुन्हा पुन्हा पाठवावे लागणार होते. त्यात बराच वेळ वाया गेला असता. हे पाहून नटराजनसाहेबांनी एक निर्णय घेतला. मीच महिनाभर हैद्राबादला जाऊन रहावे आणि सर्व ड्रॉइंग्ज व्यवस्थितपणे तयार करून घेतल्यानंतरच परत यावे असा आदेश मला दिला. आतापर्यंत त्यांचा विश्वास संपादन केला असल्यामुळे ती ड्रॉइंग्ज अॅप्रूव्ह करण्याचा अधिकारही मला दिला.

ड्रॉइंग्जनंतर प्रोसेस शीट्स आणि प्रोसीजर्स तयार केली, काहींच्या ट्रायल्स घेतल्या, प्रयोग करून पाहिले, बरेचसे मटीरियलही त्यांना दिले. पण त्यांच्या उत्साहाला मात्र ओहोटी लागली होती. आमच्याकडून सर्व प्रकारचे सहकार्य देऊनदेखील हे काम प्रगती करत नव्हते. दर दोन तीन आठवड्यात मी त्यांच्याकडे जाऊन काय चालले आहे हे पाहून येत होतो आणि नटराजनही महिन्यामधून एकादी भेट देऊन येत होते. पण दर वेळी अडचणींची नवी यादी समोर येऊ लागली. एचएमटीच्या ज्या उच्च अधिका-यांनी हे काम स्वीकारले होते ते बदलून किंवा नोकरी सोडून गेले होते आणि त्यांच्या जागी आलेल्या अधिका-यांना या कामात इंटरेस्ट नव्हता. सुरुवातीला जमवलेली टीमही त्यांनी मोडून टाकली आणि कोणी वाली नसल्यामुळे ते काम जास्तच रेंगाळायला लागले. याबद्दल जनरल मॅनेजरशी थोडे खडसावून बोलण्यासाठी नटराजन त्यांच्याकडे गेले तर त्यांनी भेटही दिली नाही. इतकी मिन्नतवारी करून आणि महाप्रयत्नाने एचएमटीबरोबर केलेले हे काँट्रॅक्ट रद्द करण्याचा निर्धार करून यावेळी ते परत आले. आल्यानंतर सविस्तर आकडेवारीसह या कामाचा संपूर्ण अहवाल तयार केला आणि त्यांच्या बॉसपुढे तो ठेऊन त्याला आपले म्हणणे पटवून दिले आणि त्यांच्यामार्फत उच्चपदस्थ अधिका-यांची मंजूरी मिळवली. अर्धवट केलेले काम आणखी कोणाकडून पुरे करून घेणे अत्यंत अडचणीत आणणारे होते आणि ते करण्यासाठी एकही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्या कामाचे अनेक लहान लहान भाग केले आणि निरनिराळ्या कंपन्यांकडून किंवा आमच्या वर्कशॉपमधून ते करवून घेतले. या सर्वांची जुळणी साईटवरच एक वेगळी शेड उभारून त्यात केली. हे करतांना त्यांनी दाखवलेले धाडस, आत्मविश्वास, चिकाटी, कौशल्य वगैरे गुण अशा कसोटीच्या क्षणांमुळेच लोकांना समजले. त्या कालखंडात त्यांना कोणाकोणाकडून काय काय ऐकून घ्यावे लागले होते, किती मनस्ताप झाला होता, किती टेन्शन निर्माण झाले होते, त्यांच्यावर किती प्रेशर आले होते, तरीसुध्दा ते आपले काम शांतपणे करत होते आणि आम्हाला त्या ज्यूनियर मंडळींना थोडीसुध्दा झळ लागू दिली नव्हती.. . . . . . . . .  . . . . . . . . (क्रमशः)
----------------------------------------------------------------------------

No comments: