Friday, February 08, 2013

मिसळपाव कट्टा २०१३ (भाग १ -४)

२०१३ साली झालेल्या मिसळपावकट्ट्यात मी सहभागी झालो होतो. मी आधी त्याचा सविस्तर वृत्तांत चार भागात लिहिला होता. माझ्या  एकंदर ब्लॉग्जची संख्या १००० वर मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतल्याने मी काही लेखांचे पूर्वीचे  निरनिराळे भाग एकत्र करायला घेतले आहेत. त्यानुसार आता हे सर्व भाग एकाच मथळ्याखाली पुन्हा प्रकाशित केले आहेत. नंतरच्या काळात मला मिसळपाववरच सहभाग घेणे जमले नाही. यामुळे आता या जुन्या आठवणीच राहिल्या आहेत. ....... २५.०३.२०१७
---------------------------------------------------------------

 February 08, 2013       मिसळपाव कट्टा २०१३ भाग १

मला मिसळ खूप आवडते, पण ती माझ्या रोजच्या आहाराचा भाग नाही, रुचिपालट म्हणून कधी तरी एकादी बशीभर मिसळच मी खाऊ शकतो. त्याचप्रमाणे मिसळपाव या संकेतस्थळाचा मी जवळजवळ सुरुवातीपासून सदस्य असलो तरी अधून मधूनच तिकडे डोकावतो. त्यातसुध्दा कधी माझ्या संगणकात शिरून बसलेले विषाणू (व्हायरस) किंवा स्वैपाकी (कुकीज) अडथळे आणतात, कधी मिपाचा सेवक (सर्व्हर) कामात अतीशय गढलेला असल्यामुळे माझ्याकडे लक्षच देत नाही आणि कधी आम्हा दोघांना जोडणा-या आंतर्जालावर सौर वादळ वगैरेंचे थैमान चाललेले असते. या सगळ्यांचा परिणाम एकच होतो, तो म्हणजे मला हवे तेंव्हा मी मिपाचे पान उघडू शकत नाही असेही वरचेवर होऊ लागले आहे. महिन्याभरापूर्वी एकदा माझ्या नशीबाने मी तिथपर्यंत पोचलो असतांना पाहिले की आजकाल काही गंभीर प्रकृतीचे किंवा माहितीपर लिखाणही तिथे प्रसारित होऊ लागले आहे. ते पाहून मीही उत्साहाने रक्ताभिसरण या विषयावरचा माझा एक नवा लेख चढवून दिला. त्यानंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रिया वाचून त्याला आवश्यक असल्यास उत्तर देण्याची नैतिक जबाबदारी माझ्यावर आल्याने मी रोज दहादा प्रयत्न करून एकाद्या वेळा मिपावर जाऊ लागलो. काही वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांना परस्पर कोणीतरी उत्तरे दिली होती तर काहींना मी उत्तरे दिली. (वाचकांना अशा लेखांनी पिडण्यापेक्षा) मिपाने वेगळा मिपापीडियाच काढावा असाही एक प्रतिसाद आला होता. त्यातल्या तिरकसपणाकडे दुर्लक्ष करून मी आपले बेअरिंग सांभाळत त्यालाही गंभीरपणे उत्तर दिले.

हे सगळे करत असतांना इनिगोय यांच्या नावाने मौजमजा या सदराखाली मिपाकट्ट्याबाबत एक धागा वाचनात आला. इच्छुक सदस्यांनी एका रविवारी सकाळी ११ वाजता चर्चगेट स्टेशनपाशी जमावे आणि सर्वांनी मिळून त्या भागात गप्पा मारत चालावे फिरावे किंवा चालता फिरता गप्पा माराव्या असे त्याचे स्वरूप होते. या कट्ट्याला ज्यांना यायचे असेल त्यांनी आपला इरादा व्यक्तीगत निरोपाने कळवायचा होता. या धाग्यावर पहिल्या दिवशी आलेले बहुतेक सगळे प्रतिसाद थट्टामस्करीने भरलेले होते. त्यामुळे त्या धाग्याच्या हेतूबद्दल मनात थोडी शंका आली. कदाचित हे सगळे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, त्यावर बोलाचीच फोडणी, वाटल्यास झणझणीत, वाटल्यास अळणी असा प्रकार असायचा. मिपाचे मालक वा चालक कोण आहेत हेच मला माहीत नसल्यामुळे त्यांच्या ऐवजी हा किंवा ही कोण इनिगोय हा असला कसला कट्टा भरवतेय् असा विचार मनात आला. कट्टा या शब्दाचा अर्थच मुळी पाय मोकळे करून निवांतपणे बसायची जागा असा होतो. खेडेगावांमध्ये वडापिंपळांचे पार असतात तसे शहरांमध्ये कट्टे. कट्टा म्हणताच शिवाजी पार्क मैदानाच्या सभोवती बांधलेला लांबलचक कट्टा आणि त्यावर घोळक्याघोळक्याने बसलेले मित्रमैत्रिणी डोळ्यासमोर येतात. कट्टा आणि चालताफिरता कसा असेल? हे विचार मनात आल्याने मला तेंव्हा त्याचे आकर्षण वाटले नाही. काही दिवसांनंतर पुन्हा मिपावर गेलो असतांना हा धागा टॉपला आलेला दिसला आणि हा चालताफिरता कट्टा खरोखरच भरणार असल्याची खात्री झाली. पण हा सर्वांसाठी आहे की उत्साही आणि धडधाकट तरुण मंडळींसाठी आहे? किती तास आणि किती किलोमीटर पायपीट करायचा त्यांचा विचार आहे? वगैरे शंका मनात येतच असल्यामुळे त्या विचारून टाकल्या. लगेच त्यांची उत्तरे मिळाली आणि त्याला हजर राहणे मलासुध्दा शक्य आहे हे समजल्यावर मी त्याला जायचा विचार केला.

बरेच वर्षांपूर्वी मी एकदा मनोगताच्या (अर्थातच बैठ्या) कट्ट्यावर गेलो होतो, तेंव्हा तो चांगला रंगला होता. मनोगतातली बहुतेक सगळी मंडळी मिसळपाववर आली आहेत हे माहीत असले तरी मला पूर्वी भेटलेल्यांची नावे काही यादीत दिसत नव्हती. तरीही मिपावरल्या नव्या मित्रांना पहावे, भेटावे, एक नवा अनुभव घ्यावा म्हणून मीही जायचे ठरवून टाकले आणि तसे कळवून दिले. एरवी आपण कोणाला भेटायला जातो तेंव्हा ती व्यक्ती आपल्या माहितीतली असते किंवा तिच्याकडे आपले काही काम असते. या वेळी यातले काहीच नव्हते. कट्ट्याला येणा-या संभाव्य सदस्यांची नावे फक्त अनोळखीच नव्हती तर त्यातली अनेक नावे त्यांनी स्वतःच धारण केलेली टोपणनावे होती. मनोगतवरसुध्दा हाच प्रकार होता त्यामुळे त्यातल्या एकेका मुखवट्यांच्या मागे असलेला चेहेरा पहायची उत्सुकता होती. उदाहरणार्थ विसोबा खेचर हे नाव धारण करणारा माणूस अंगापिंडाने चांगला भरलेला आणि शास्त्रीय संगीतातला दर्दी असेल असे कुणाला वाटेल? मी मिसळपावाचा नित्य वाचक नसल्यामुळे तिथल्या नव्या सदस्यांचे फारसे लिखाणही वाचलेले नव्हते. कट्ट्याला जाण्यासाठी मी कसलीच पूर्वतयारी केली नव्हती.

रविवारी सकाळी कट्टा भरणार होता, त्याच्या आदल्या दिवशी मिपावर गेल्यावर असे समजले की मिपाकरांनी एकत्र जमण्यासाठी चर्चगेट स्टेशन किंवा मुंबई सीएसटी स्टेशन असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत. माझे निवासस्थान मध्य रेल्वेवर असल्यामुळे दुसरा पर्याय मला नक्कीच सोयीचा वाटला. मी लगेच तसे कळवले आणि तिथे पोचणा-या लोकांसाठी असलेल्या सूचना मला मिळाल्या. त्या सर्वांनी किसनशी संपर्क ठेवायचे ठरले होते. रेल्वे स्टेशनपाशी भेटायचे असल्यामुळे रेल्वेनेच जायचे मी ठरवले होते, पण सकाळी टीव्हीवरच्या बातम्या पहातांना हार्बरलाईनवर मेगाब्लॉक असल्याची बातमी आली, पण त्याचा तपशील समजला नाही. घरापासून स्टेशनपर्यंत जाऊन तिथे ती माहिती मिळवायची एवढा खटाटोप करण्यापेक्षा मी घरापासून बसनेच प्रवास करायचे ठरवले आणि थोडे आधी घरातून निघालो. सुटीचा दिवस असल्याने बसलाही गर्दी नव्हती. स्टॉपवर पोचताच लगेच एक बस मिळाली आणि रस्त्यातली वाहतूकही रोजच्या मानाने विरळ असल्यामुळे ती जलदगतीने चालत राहिली. ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास आधीच ठरलेल्या जागेवर जाऊन पोचलो. एकट्यानेच इकडे तिकडे फिरत आणि एका बसस्टॉपवर बसून वर्तमानपत्र वाचत वेळ काढला.  

मला मिळालेल्या संदेशानुसार मी बरोबर ११ वाजता बृ.मुं.म.न.पा.च्या बहिर्गमनद्वारापाशी (एक्झिटगेटजवळ) जाऊन पोचलो. तिथे दोन तरुण उभे होते. त्यांच्या पाठीवरील हॅवरसॅकमुळे ते एमार किंवा आयटीवाले वाटत होते आणि मिपाचे सदस्य असण्याची दाट शक्यता होती.  त्यातला एकजण कानाला मोबाईल लावून बोलत होता आणि दुसरा ते लक्षपूर्वक ऐकत होता. ते बहुधा त्यांच्या मिपाकर मित्रांना ते केंव्हा पोचणार असे विचारत असतील असे मला वाटले. पण अचानक तो बोलणारा गृहस्थ एका दिशेला आणि दुसरा त्याच्या विरुध्द दिशेला चालले गेले. बहुधा त्यांना हव्या असलेल्या दिशा त्यांना फोनवरून मिळाव्या असाव्यात. मी बृ.मुं.म.न.पा.पासून तिथे येणार्‍या भुयाराच्या दारापर्यंत फेर्‍या मारत असतांना माझा भ्रमणध्वनी खणाणला. त्यावर किसनने माझी चौकशी केली. आणखी दोघांसह तो स्टेशनवर उतरला होता आणि लवकरच 'मीटिंग पॉइंट'ला पोचणार होता. आम्ही एकमेकांना पाहिलेले नसल्याने कसे ओळखणार हा एक प्रश्न होता. येतांना प्रत्येकाने पावाचा तुकडा सोबत आणावा आणि उंच धरावा असा एकादा आदेश किंवा एकादा कोडवर्ड दिलेला नव्हता. मग आम्ही एकमेकांच्या शर्टांचे रंग विचारून घेतले. त्यांची वाट पहात मी भुयाराच्या दारापाशी उभा राहिलो. किसनच्या सोबत रामदासही होते. मी त्यांना पूर्वी दोन वेळा भेटलेलो असल्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांना लगेच ओळखले. मग शर्टांच्या रंगांकडे पहाण्याची गरज उरली नाही.

.  . . . . . .  . . . . . . . . . . .  (क्रमशः)
----------------------------------------------------------------------------------------

February 11, 2013       मिसळपाव कट्टा २०१३ भाग २

मी रामदासबरोबर बोलत असतांना किसनला आणखी फोन येत होते. मिपाच्या 'आयडी'जची दुसरी तुकडी रेल्वे स्टेशनवर उतरली होती आणखी कोणी कोणी गाड्यांमध्ये प्रवासात होते वगैरे माहिती त्यातून मिळत होती. ते लोक लवकरच तिथे येऊन पोचणार होते. स्टेशनवर उतरल्यानंतर नेमके कुठल्याजागी भेटायचे, एकमेकांना कसे ओळखायचे वगैरे प्रश्न त्यांनाही पडलेले होतेच. समोरच एका उंच चौथ-यावर उभा असलेला फिरोजशा मेहता यांचा पुतळा दिसला. त्याच्या आसपास कोणी माणसे नव्हती, पण ती जागा सगळीकडून दिसण्यासारखी होती. तेंव्हा तिथे भेटायला सोपे जाईल असे वाटल्याने सगळ्यांना तिथे यायला सांगितले आणि त्यांना आपण दुरून लगेच दिसावे म्हणून आम्ही त्या पुतळ्यापाशी जाऊन उभे राहिलो. फेब्रूवारीचा महिना असला तरी मुंबईच्या हवेत मुळीच गारवा नव्हता आणि अकरा वाजून गेल्यानंतर सूर्याचे ऊन कोवळे राहिले नव्हते. तळपते ऊन आणि कडाक्याची थंडी वगैरे सोसत तो पुतळा वर्षानुवर्षे त्या जागेवर उभा होता, पण त्या पुतळ्याला ऊन सहन करण्याची जितकी सवय होती तेवढी मला नसल्यामुळे मी थोडासा वैतागलो. तिथून दहा पावलावरच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यद्वारापाशी (पोर्टिगोमध्ये) सावलीची जागा दिसली आणि माझे पाय तिकडे वळले. माझ्या सुदैवाने तिथे बसायला एक हातभर लांबीचा अगदी पिटुकला कट्टाही मोकळा मिळाला. मी तिथे एकटाच पेपर वाचत बसलो.

माझे साथीदार उन्हाची पर्वा न करता इतर लोकांच्या येण्याची वाट पहात पुतळ्याजवळ उभे राहिले होते, पण काही वेळानंतर मी एकदा वर्तमानपत्रातून मान वर करून पाहिले तर ते नजरे आड झाले होते. थोडे पुढे जाऊन पाहिले तर नव्याने आलेल्या आणखी काही सदस्यांसह ते भुयाराच्या दारापाशी जाऊन तिथल्या सावलीत उभे राहिले होते. त्यांच्यातल्या तीन चारजणांनी मिळून एक वर्तमानपत्र हातात धरले होते आणि ते त्यात लक्ष देऊन काही तरी पहात होते. ती इतकी इंटरेस्टिंग बातमी किंवा लेख पाहण्यासाठी मीही आपले डोके त्यात खुपसले तर त्यात माझ्या पूर्वीच्या ऑफीसचा लोगो दिसल्यामुळे माझी उत्सुकता अधिकच वाढली. लोगो पाहून ओळखण्याचे ते एक कोडे आहे असे समजले आणि त्यातले एक उत्तर तर मला पाहताक्षणी मिळाले होते. इतर कोड्यांची उत्तरे रामदास सांगत होते. त्यातल्या '3M' मधल्या तीन शिलेदारांची नावे त्यांनी सांगितली, ती माझ्या कानावर पडली खरी, पण मेंदूपर्यत पोचून त्यांची नोंद काही झाली नाही. माझ्या आयुष्यात मला त्यांची कधी गरज पडली नव्हती आणि पडण्याची शक्यताही नव्हती. मी त्यांच्या उपयोगी पडण्याची शक्यता त्याहून कमी होती. 'नेसले' 'अमुल' आणि 'आयडीडीबी' यासारखी काही ओळखीची नावेसुध्दा त्या कोड्यात होती. कोडे असलेला तो लेखच रामदास यांनी स्वतः लिहिला होता असे समजल्यावर कट्ट्याची एक आठवण म्हणून मी जवळच बसलेल्या विक्रेत्याकडून ते वृत्तपत्र लगेच विकत घेतले आपल्या पिशवीत ठेवले.

बोरीबंदरापासून काळा घोडा सर्कलपर्यंत सर्वांनी मिळून फिरत फिरत जायचे, थोडा वेळ 'काला घोडा फेस्टिव्हल'मध्ये घालवायचा आणि सर्वांनी एकत्र भोजन करायचे असा कार्यक्रम ठरला होता. चर्चगेटपाशी जमलेले लोक आधी आमच्याकडेच येणार असावेत अशी किसनची समजूत झाली होती. पण चर्चगेटहून काळा घोडा जवळ असतांना ते लोक उलट दिशेने सीएसटीकडे कशाला येत आहेत असे मला वाटले. कदाचित एकमेकांशी बोलण्यासाठी जास्त वेळ मिळावा असा त्यांचा विचार असेल, पण त्यांनी पुनर्विचार करून हुतात्मा चौकात आम्हाला भेटायचे ठरवल्याची बातमी मिळाल्यावर आम्हीही प्रस्थान केले. तोपर्यंत साडे अकरा वाजले होते आणि आणखी काही 'आयडी'ज आल्या होत्या. आधी आम्ही एकमेकांची ओळख करून घ्यायचे ठरवले, पण सर्वांची ओळख करून देऊ शकणारा कोणीही तिथे नसल्यामुळे प्रत्येकाने स्वतःची ओळख करून देण्यासाठी आपापला 'आयडी' म्हणजे मिसळपाववरचे नाव सांगितले.  त्यात कमालीची विविधता होती. एक पेशवाईतले 'घाशीराम कोतवाल' होते, त्यांच्यासोबतीला नाना फडणवीस नव्हते पण तिथे आलेल्या 'प्रथम'चे खरेच आडनाव फडणीस होते, सर्वज्ञ 'रामदास' काका तर होतेच, विलासराव, किसन, निखिल देशपांडे आणि 'मस्त कलंदर' आले होते, एक 'मिसळलेला काव्यप्रेमी' होता. 'निम' हा देखील बहुधा दुसरा निखिल असावा, कितीही डोके खाजवूनसुध्दा 'लिमाऊजेट' चा अर्थ काही लागला नाही. नंतर चर्चगेटहून येऊन मिळालेल्या ग्रुपमध्ये एक 'तीरशिंगराव माणूसघाणे' होते आणि एक 'प्रास' होता, 'आदिजोशी'ला सगळेजण 'अॅडी' म्हणत होते, 'सुझे' हा सुहास झेले होता. प्रमोद देव कधीकाळी 'अत्यानंद' होते, पण आता ते स्वतःच्या नावानेच वावरत होते. इनिगोयचा अर्थ लागायला मात्र फारसा वेळ लागला नाही. कस्तुरी आणि सुर(भी) होत्या. सुरच्या कडेवर लहानगी आर्या होती. या सदस्यांमधली काही टोपणनावे आणि त्यांची व्यक्तीमत्वे यांचा मेळ लागत नव्हता. ते पाहता 'झपाटलेला झंप्या', 'टकलू हैवान', 'सच्चिदानंदस्वरूप', 'ढ' असले कोठलेही नाव मी धारण केले असले तरी चालले असते. जिथे सगळे लोक स्वतःचे नावसुध्दा उघडपणे सांगत नव्हते, तिथे स्वतःबद्दल कोणी अधिक माहिती सांगेल अशी अपेक्षाही नव्हती. फक्त आपण कुठून आलो, कसे आलो वगैरे थोडीशी चर्चा झाली.

भुयारातून रस्ता ओलांडून पलीकडे जाताच तिथे एका स्टॉलवर मुंबईतला सर्वोत्तम 'काला खट्टा' मिळतो, तो प्राशन करून पुढे जायचा बेत रामदास यांनी सांगितला. माझ्यासकट सगळेजण तास दीड तास प्रवास करत दूरदूरच्या ठिकाणांहून आलेले होते. चालत्या फिरत्या कट्ट्याची पदयात्रा सुरू करायच्या आधी सगळ्यांनाच एका 'वेलकमड्रिंक'ची नितांत गरज होती. त्यामुळे कोणीही त्यावर उपसूचना मांडली नाही. ते पेय पिऊन आम्हाला थोडी तरतरी येईपर्यंत आणखी काही 'आयडी'ज येऊन आम्हाला मिळाल्या. त्यातल्या चिमुकल्या आर्याने लगेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

.  . . . . . .  . . . . . . . . . . .  (क्रमशः)

--------------------------------------------------------------------------------------------------

 February 15, 2013    मिसळपाव कट्टा २०१३ भाग ३

सीएसटी स्टेशन च्या समोर असलेल्या स्टॉलवर 'कालाखट्टा' पिऊन झाल्यानंतर तिथून आमचा 'हेरिटेज वॉक' सुरू झाला. अर्थातच रामदास हे आमचे मार्गदर्शक होते. त्यांनी एक चित्रमय पुस्तक आपल्या झोळ्यामधून काढून एका सदस्याला दिले. कदाचित ते पुस्तक मुंबईमधल्या ऐतिहासिक इमारतींबद्दल असेल आणि घरून निघण्याच्या आधी त्यांनी ते लक्षपूर्वक वाचले असेल, कदाचित त्यांनी ते स्वतःच लिहिलेही असेल. मुंबईचा फोर्ट भाग आणि तिथल्या इमारतींबद्दल त्यांना नक्कीच प्रचंड आणि सखोल ज्ञान होते. समोर दिसणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनची इमारत हाच वास्तुशिल्पाचा एक अद्वितीय असा नमूना होता. पूर्वीच्या काळातले सम्राट आणि बादशहा वगैरेंनी देवळे, मशीदी, राजवाडे वगैरेंसाठी भव्य इमारती बांधल्या होत्या पण रेल्वे स्टेशन यासारख्या काम करण्याच्या जागेसाठी आणि आम जनतेच्या रोजच्या उपयोगासाठी इतकी भव्य आणि सुंदर इमारत बांधली गेल्याचे हे आगळे आणि बहुधा भारतातले सुरुवातीचे उदाहरण असावे. या इमारतीवर असलेले घुमट निरनिराळ्या वास्तुशिल्पांच्या शैली दाखवतात, मध्यभागी असलेला सर्वात मोठा गोलाकार घुमट पौर्वात्य शैलीचा वाटतो, तर बाजूची लहान निमूळत्या आकाराची शिखरे जुन्या काळातील चर्चच्या टॉवरसारखी दिसतात असले बारकावे रामदास यांनी विशद केले. भारताचा राष्ट्रीय मयूरपक्षी इंग्लंडमध्ये सापडत नाही, पण त्याच्या आकृती खिडक्यांवरल्या जाळ्यांमध्ये कोरलेल्या असल्याचे त्यांनी दाखवले. या इमारतीचे बांधकाम चालले असतांना मध्येच त्याचा आर्किटेक्ट बदलला गेला असावा असा शेरा कोणीतरी मारला. इमारतीच्या मोठ्या कळसावरल्या मूळच्या लाइटनिंग अरेस्टरवर एकदा खरोखरच वीज कोसळल्यामुळे तो भग्न झाला होता. त्यानंतर जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या खाली असलेल्या पुतळ्यासकट नवा विद्युतनिरोधक तयार करून तिथे बसवला ही माहिती दिली. त्या चौकामधून मी हजारो वेळा गेलेलो असूनसुध्दा त्या इमारतीच्या शिखरावर एक बाई (पुतळा) हातात विजेच्या तारांना जोडलेले त्रिशूल घेऊन उभी आहे हे यापूर्वी माझ्या ध्यानात आले नव्हते.

तीन चारशे वर्षांपूर्वी जेंव्हा आधी पोर्तुगीज आणि नंतर इंग्रज गोरे लोक मुंबईत रहायला आले होते त्या काळात त्यांनी बांधलेल्या वास्तूंच्या संरक्षणासाठी तटबंदी केली. बोरीबंदरपासून अपोलोबंदरपर्यंत पसरलेल्या भागात त्यांनी किल्ला बांधला होता. त्या तटबंदीचा एकादा लहानसा तुकडासुध्दा आता शिल्लक राहिला नसला तरी त्याचे 'फोर्ट' हे नाव मात्र आजही प्रचलित आहे. मुंबईच्या या फोर्ट भागातच आम्ही फिरणार होतो. या किल्ल्याच्या तटबंदीला ठेवलेली प्रवेशद्वारेही नामशेष झालेली असली तरी ती जुनी नावे त्या भागांच्या नावाने आजही प्रचलित आहेत. फोर्टमधून बोरीबंदरच्या दिशेने बाहेर पडण्याच्या द्वाराजवळ पूर्वी बाजार भरत असे. आजही तिथे अनेक दुकाने दाटीवाटीने उभी आहेत. या ठिकाणी पूर्वी 'बझार गेट' होते, आता तिथे 'बझार स्ट्रीट' आहे. फ्लोरा फाउंटनपाशी पूर्वी एक मोठे चर्च होते आणि त्याच्याजवळ 'चर्च गेट' होते. अशी माहिती घेत घेत आम्ही पुढे सरकत होतो.

बोरीबंदरहून निघालेला आमचा दहा बारा जणांचा घोळका गजगतीने हुतात्मा चौकाच्या दिशेने चालत राहिला. रविवार असल्यामुळे रस्त्यात फारशी वाहतूक नव्हती. फुटपाथ तर ओस पडले होते, पण त्यावरून चाललो असतो तर आम्हाला आजूबाजूच्या इमारती दिसल्या नसत्या आणि 'हेरिटेज वॉक'चा उद्देश सफळ झाला नसता. त्यामुळे आम्ही रस्त्याचा थोडा भाग अडवून त्यावरूनच चालत राहिलो. आमची संख्या आणखी मोठी असती तर तो कदाचित एकादा 'मोर्चा' वाटला असता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या प्रत्येक इमारतीचे नाव, त्याचा मूळ मालक कोण होता, ती इमारत कधी आणि कशासाठी बांधली गेली होती, त्या काळात कोणत्या कामासाठी तिचा उपयोग केला जात असे, आता तिथे काय चालते वगैरे इत्थंभूत माहिती रामदास सांगत होते. बोरीबंदरपासून फ्लोरा फाउंटनपर्यंतच्या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या प्रत्येक इमारतीचे दरवाजे आणि खिडक्या यांना कमानी असल्याच पाहिजेत असा दंडक तत्कालीन सरकारने घातला होता आणि तो पाळला गेला होता. यातील अनेक इंग्रजांच्या काळातल्या खाजगी बँका आणि विमा कंपन्यांच्या मालकीच्या होत्या, काही कापसाच्या व्यापा-यांच्या किंवा गिरणीमालकांच्या होत्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्या बँका आणि विमा कंपन्या भारतीय उद्योगपतींच्या हातात आल्या आणि नंतर त्यांचे राष्ट्रीयीकरण झाले. तरीही अजून त्यातल्या काही संस्थांची ऑफिसे तिथे आहेत, इतर जागी दुसरी ऑफिसे आली आहेत. युरोपियन लोकांना राहण्यासाठी बांधलेले हॉटेल आता सरकारी पाहुण्यांसाठी उपयोगात येते आणि अत्यंत महत्वाचे खटले चालवणारे एक सुप्रसिध्द सरकारी वकील तिथे निवास करत होते. पूर्वी इंग्रजांना लागणा-या वस्तूंचे दुकान जिथे होते, त्या जागी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हँडलूम हाऊस आले. पूर्णपणे लाकडाने बांधलेल्या त्या इमारतीला आग लागल्याने ते जळून खाक झाले. त्याच्या बाजूला असलेली आणखी एक जुनी इमारत आगीत जळून गेली आहे, पण त्या जागेवर नवी बिल्डिंग बांधतांना जुन्या इमारतीच्या भिंतीचा थोडा भाग अवशेष म्हणून शाबूत ठेवला आहे. अशा प्रकारची खूप माहिती रामदास देत होते आणि माझ्यासह काही लोक त्यांची श्रवणभक्ती करत होते. काही लोक तत्परतेने त्या इमारतींचे किंवा त्यात दाखवलेल्या वैशिष्ट्यांचे सटासट फोटो घेत होते. काही जणांनी आपापले उपगट बनवून वेगळ्या चर्चा चालवल्या होत्या. काही मिनिटांच्या चालण्यानंतर आम्ही हुतात्मा चौकात येऊन पोचलो. चर्चगेटकडून आलेला मिपाकरांचा प्रवाह आमच्या प्रवाहात मिसळला.

एकमेकांना भेटून झाल्यानंतर आमचा थोडा मोठा झालेला घोळका 'काळा घोडा'च्या दिशेने चालू लागला. रामदासांचे ज्ञानसत्रही चालत राहिले. फ्लोरा फाउंटनला ज्या ठिकाणी आम्ही एकत्र आलो त्या जागी पूर्वी उघड्यावरच  शेअर बाजार भरत असे. त्यातल्या दलालांच्या आरडाओरड्याने सर्वांना त्रास होऊ लागला म्हणून त्यांना टाटांच्या बाँबे हाऊसच्या पलीकडे असलेल्या एका मोकळ्या जागेत हाकलण्यात आले. तिथेच पुढे 'दलाल स्ट्रीट' निर्माण झाली, बाँबे स्टॉक एक्स्चेंजची इमारत आणि नंतर त्याचा टॉवर उभा राहिला. रस्त्याच्या उजव्या अंगाला असलेल्या एचएसबीसीच्या इमारतीतील तळघरात हैदराबादच्या नवाबाच्या मालकीचा एक मोठा हिरा कडेकोट बंदोबस्तात ठेवला होता. तिथेच एक भिकारी रोज रात्री येऊन झोपत असे, पण पहारेक-यांना ते माहीतच नव्हते म्हणे. अशा काही सुरस गोष्टी त्यांनी सांगितल्या. मुंबई विद्यापीठाची (बाँबे युनिव्हर्सिटीची) दगडी इमारत बांधतांना तिथे बांधलेला क्लॉक टॉवर त्या काळात सर्वात उंच होता. ती इमारत बांधण्यासाठी ज्या शेठजीने अर्थसाह्य केले त्याने त्या मनो-याला 'राजाबाई टॉवर' असे नाव दिले. हा गृहस्थ भाटिया होता आणि मोठा व्यापारी होता. एका काळात मुंबईवर मालकी गाजवणारे हे भाटिया लोक आधी पंजाबकडून काठियावाडमध्ये आले आणि तिकडून मुंबईला आले. यामुळे त्यांची चेहेरेपट्टी इतर गुजराती लोकांपेक्षा वेगळी असते वगैरे वगैरे चौफेर माहिती रामदासजी सांगत होते. तोपर्यंत आमच्या पदयात्रेचा 'भोज्जा' म्हणजे काळा घोडा चौक आलाच.


.  . . . . . .  . . . . . . . . . . .  (क्रमशः)

--------------------------------------------------------------------------------------
 February 17, 2013     मिसळपाव कट्टा २०१३ भाग ४ (अंतिम)

मिसळपाववरल्या काही कट्टोत्सुक लोकांना सीएसएम किंवा चर्चगेट रेल्वे स्टेशनवर यायला उशीर झाला होता किंवा त्यांना पायी चालत जाण्याचा कंटाळा वाटला असावा असे काही जण थेट काळाघोडापाशीच आले. सगळे मिळून आता आम्ही वीस बावीसजण झालो होतो. कालाघोडा फेस्टिव्हलच्या संरक्षणासाठी आलेल्या पोलिसांची एक गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती, तिच्याजळच एक लहानसे कडे करून आम्ही सगळेजण उभे राहिलो. पुन्हा एकदा सर्वांनी आपापली ओळख करून दिली, म्हणजे आपला आयडी सांगितला. आलेल्या प्रत्येक व्यक्तीने या वेळी तरी फक्त एकच आयडी सांगितला. मिपावर नेहमी हजर असणा-या लोकांनी त्यांचे लेख वाचले असतील, त्यांचे वाद, विवाद, संवाद वाचले असतील आणि त्यावरून त्या प्रत्येक आयडीची एक जालीय प्रतिमा त्यांच्या मनात निर्माण झाली असेल. त्या मुखवट्याआड असलेला चेहेरा आणि एकंदर व्यक्तीमत्व पाहण्याची उत्सुकताही त्यांच्या मनात असणार. या दृष्टीने ही ओळखपरेड खूप महत्वाची होती. या बाबतीत माझी पाटी पूर्णपणे कोरी होती. कुठल्याही विशिष्ट आयडीबद्दल माझे कोणतेच मत किंवा पूर्वग्रह नव्हता. मिपावर रोजच्या रोज अक्षरे, विरामचिन्हे, स्मितके आणि छायाचित्रे यांचा जो धो धो पाऊस पडतांना दिसतो तो पाडणारे कोण अवलिये आहेत याची मला उत्सुकता वाटते. त्यातल्या काही मुंबईकर लोकांना पहायला मिळावे एवढी माझी माफक इच्छा होती ती सफळ झाली. ही मंडळी याहून जास्त संख्येने येतील अशी माझी अपेक्षा होती, तसे झाले नाही, ते का झाले नाही याच्या कारणांच्या गवताचा ढीग मिपावर झालेला मी पाहिला होता. चालताफिरता कट्टा म्हणजे काय असतो हे पाहण्याची उत्सुकता होती. सर्वांबरोबर घोळक्यात चालतांना मला मजा आली होती, माझ्या ज्ञानात भर पडली होती, पण तो 'कट्टा' वाटला नव्हता.

तिथे जमलेल्या मिपाकरांपैकी तीन चार जणांना दुसरी महत्वाची कामे असल्यामुळे लवकर निघायचे होते. त्यापूर्वी एकदा सगळ्यांचे ग्रुप फोटो घ्यायचे ठरले. पोलिसांच्या वाहनाच्या पार्श्वभूमीवरच आम्ही सगळे पोज देत उभे राहिलो. तीन चारजणांनी आपापल्या कॅमेरांमधून आमची छायाचित्रे टिपली. अर्थातच स्वतःला सोडून इतरांच्या छव्या त्यांच्या कॅमेरांमध्ये बंद झाल्या. त्यातले काही सुंदर फोटो नंतर मिपावर चढवले गेल्याने सर्वांना पहायला मिळाले. आम्ही काळाघोडापाशी पोचेपर्यंतच दुपारचे साडेबारा वाजून गेले होते. ओळख आणि छायाचित्रणात आणखी पंधरा मिनिटे जाऊन पाऊण वाजायला आले. कट्ट्याचा पक्का कार्यक्रम असा ठरलेला नव्हताच. आता थोडा वेळ फेस्टिव्हलमध्ये फिरून सर्वांनी एकत्र जेवण करायचे होते. कालाघोडा फेस्टिव्हल ज्या जागेत भरले होते तिला चहू बाजूंनी पत्र्याच्या शेडने झाकलेले असल्यामुळे आत नेमके काय पहायला मिळणार आहे याची बहुतेक जणांना कल्पना नव्हती आणि ज्यांना त्याची माहिती होती ते लोक मौन पाळून होते. "बरोबर अर्ध्या तासाने सर्वांनी बाहेर येऊन याच जागी जमायचे." असा आदेश एका मॅडमने अधिकारवाणीने दिला. माझ्या आजूबाजूच्या सात आठ लोकांनी माना डोलावून त्याला अनुमोदन दिले. इतरांना ते ऐकू गेले की नाही आणि पटले की नाही कोण जाणे. आम्ही सर्वजण भराभर कुंपणाच्या आत जाण्यासाठी रांगेत उभे राहिलो.

एअरपोर्टवर असतो तसा सिक्यूरिटी चेक झाल्यावर आम्ही आत प्रवेश केला. चित्रांचे प्रदर्शन किंवा वस्तूसंग्रहालय अशासारख्या बहुतेक जागी त्या वस्तू ओळीवार मांडून ठेवलेल्या असतात आणि तिथे आलेले प्रेक्षक रांगेमधून त्या पहात पहात पुढे जातात. या उत्सवात एका मोकळ्या जागेत अनेक गोष्टी इकडे तिकडे पसरून ठेवल्या होत्या आणि त्यांच्या सभोवती फिरून त्या पहायच्या असल्याने त्याला कसलाच क्रम नव्हता. आत भरपूर गर्दी होती आणि त्यातला प्रत्येक जण त्याला जे काही आकर्षक वाटेल त्या दिशेने जात होता. अशा परिस्थितीत आमचा ग्रुपसुध्दा एकत्र राहणे कठीणच नव्हे तर अशक्य होते. काही क्षणामध्येच आमची पांगापांग झाली.

काळाघोडा इथेच सुप्रसिध्द जहांगीर आर्ट गॅलरी असल्यामुळे आणि हा आर्ट फेस्टिव्हल असल्याने इथे मॉडर्न आर्टमधली चित्रेच मांडून ठेवलेली असावीत अशी माझी कल्पना होती.  तशी बरीच चित्रे होती, पण एकंदर प्रदर्शनात त्यांचा वाटा कमीच होता. ज्यांना शिल्प असे म्हणणे कदाचित धार्ष्ट्याचे होईल अशा अनेक त्रिमिती आकृत्यांनी इन्स्टॉलेशन्स या नावाने बरीचशी जागा व्यापली होती. आत जाताच सुरुवातीलाच एका जागी सात आठ आडव्या रांगांमध्ये प्रत्येकी शंभर दीडशे बांगड्या मांडून ठेवल्या होत्या. त्यातल्या प्रामुख्याने फिक्या रंगांच्या बांगड्यांमध्ये अधून मधून काही गडद रंगांच्या बांगड्या पेरलेल्या होत्या. फिक्या पार्श्वभूमीवर गडद रंगाने काही आकृत्या काढल्या असाव्यात. पण मला तरी त्यांचा अर्थ समजला नाही. जवळच उभ्या असलेल्या दाढीधारी मिपाकराला यातून काय बोध होतो असे विचारताच त्यानेही ते आकलनाच्या पलीकडे असल्याचे सांगितले. त्याची दाढी तो कलाकार असल्याचे द्योतक नसावी एवढाच बोध मला झाला. तिथे ठेवलेली काही इन्स्टॉलेशन्स हातभर, काही पुरुषभर तर काही मोठमोठ्या खोल्यांएवढ्या आकाराची होती. त्यांच्यामधली विविधता मात्र अपूर्व होती. बांगड्या, बाटल्या, बुचे, स्टूल, खुर्च्या आदि अगदी वाट्टेल त्या वस्तूंपासून ती बनवली होती, त्यात एक स्कूटर आणि ऑटोरिक्शासुध्दा निराळी रूपे घेऊन उभ्या होत्या. यातली काही रूपे नयनमनोहर होती, काही थक्क करणारी होती, काही विचार करायला लावणारी होती, तर काही हिडीस आणि किळसवाणी होती. अनाकलनीय आणि अमूर्त अशा इन्स्टॉलेशन्सची संख्या फार मोठी होती. याशिवाय तिथे मोठी जत्रा होती. निरनिराळ्या आकारांच्या अनेक वस्तूंची विक्री होत होती. त्यात शोभेच्या वस्तू होत्या तशाच उपयोगाच्या सुध्दा होत्या पण त्यांच्या किंमती मात्र अव्वाच्या सव्वा ठेवलेल्या होत्या. सुबक आकाराचे आणि सुंदर नक्षीकामाने सजवलेले चार पाच संपूर्ण टी सेट जेवढ्यात येतील तेवढ्या किंमतीत एक वेडावाकडा मग आर्टिस्टिक म्हणून विकत घेणारे धन्य महाभाग पहायला मिळाले.

बाहेरून वाटली होती त्याच्या मानाने ही जत्रा लांबवर पसरलेली होती. तिथल्या एकाही दुकानात न शिरता ती फक्त वर वर पहात पहात दुस-या टोकापर्यत पोचण्यातच अर्धा तास संपून गेला होता. मागे फिरून बाहेर जाण्याचा मार्ग शोधून ठरलेल्या ठिकाणी परत जाण्यात आणखी थोडा वेळ गेला. यामुळे मला बाहेर यायला उशीर झाला असे वाटले होते, पण माझ्याआधी फक्त तीन चारजणच तिथे पोचले होते. एक एक करून आणखी काही लोक येत गेले, पण मिपाच्या ज्या सदस्यांनी या कट्ट्याचे आयोजन केले होते त्यांचाच पत्ता नव्हता. मुख्य म्हणजे इथून पुढे कुठे जायचे हेच मुळी ठरले नव्हते. त्या भागाची चांगली माहिती रामदास यांना होती, त्यामुळे त्यांच्या विचारानेच ते ठरणार होते, त्यामुळे आम्ही सर्वजण चातकाप्रमाणे त्यांची प्रतीक्षा करत होतो. त्या गर्दीत पुन्हा प्रवेश करून त्यांची शोधाशोध करण्यात काही अर्थ नव्हता. अखेर आमच्यातला एकजण मोबाईल फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधू शकला. त्यांनी लगेच बाहेर येत असल्याचे सांगितले. पंधरा मिनिटे होऊन गेली तरी रामदास आणि त्यांच्यासोबत असलेले पाचसहा जण आलेच नाहीत. पुन्हा फोनवर बोलल्यानंतर कळले की ते परत यायला निघाले होते, पण तिथल्या चक्रव्यूहामधून बाहेर पडून आमच्यापर्यंत कसे पोचायचे या संभ्रमात होते. कारण बाहेर पडण्यासाठी असलेल्या वेगळ्या दरवाजामधून बाहेर पडल्यास तिथून आमच्याकडे येणारा रस्ताच नव्हता. या सगळ्या गोंधळातून निघून सर्वजण एकत्र गोळा होईपर्यंत दोन वाजून गेले होते.

फेस्टिव्हलच्या प्रांगणात खाद्यपेयांची अनेक दुकाने होती, पण सर्वांनी बाहेर आल्यानंतर एकत्र भोजन करायचे ठरले होते, शिवाय तिथे खाण्यापिण्यात वेळ घालवला असता तर आपल्याला बाहेर यायला उशीर झाला असता असा विचार करून बहुतेकजणांनी तो मोह टाळला होता. पण त्यामुळे पोटात कावळ्यांनी थैमान घातले होते. इतके सगळे लोक एका वेळी बसून जेवू शकतील अशी कोणती चांगली भोजनालये त्या भागात आहेत आणि त्यातली कोणती रविवारी उघडी असतील याचा विचार झाला. या बाबतीत आधीपासून काही ठरलेले नव्हते, टेबले राखून ठेवणे दूर राहिले, विचारविनिमयही झालेला नव्हता. त्यातल्या त्यात जवळ आणि सर्वांना ठाऊक असलेल्या सहकारी भांडाराच्या कँटीनमध्ये जाऊन पहायचे असे ठरले. तिथपर्यंत जाऊन ते चालू असलेले पाहिले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. रविवार असल्यामुळे ऑफीसे बंद असली तरी पर्यटकांची गर्दी असल्यामुळे ते बरेचसे भरलेले होते. सर्वजण एकत्र बसू शकतील एवढी सलग जागा रिकामी होण्यापर्यंत वाट पाहण्याएवढा धीर कोणाकडेही नव्हता. त्यामुळे दोन तीन ठिकाणी जी टेबले मिळाली ती आम्ही ताब्यात घेतली आणि वेटरला बोलावून दोन प्रकारच्या भाज्या आणि रोट्यांची ऑर्डर दिली. त्या येण्यापूर्वी कांदा, लोणचे वगैरे जे काही टेबलावर आले त्यापासून खायला सुरुवात केली. लवकरच जेवण आले. ते चवीलाही तसे चांगले होते आणि आम्हाला चांगल्या भुका लागलेल्या असल्यामुळे अमृतासारखे वाटले. चार घास पोटात गेल्यानंतर हळूहळू गप्पागोष्टींना सुरुवात झाली. आता आम्हाला कसली घाई नव्हती आणि आमच्यानंतर येणा-यांची गर्दी नसल्यामुळे कँटीनवाल्यालाही काही अडचण नव्हती. सावकाशपणे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत भोजन केले आणि कट्ट्याची यशस्वी सांगता झाली.

अर्थातच हा अनुभव प्रातिनिधिक नसणार. इतर वेळी याहून वेगळा अनुभव येत असेल. मी पहिल्यांदाच मिपाच्या कट्ट्यावर गेलो असल्यामुळे मला त्याची कल्पना नाही. आता पुढच्या कट्ट्याला बोलावले तर यायचे असे मी ठरवले आहे.

.  . . . . . .  . . . . . . . . . . .  (समाप्त)

No comments: