Wednesday, February 20, 2013

काळा घोडा (पूर्वार्ध)मी सात वर्षांपूर्वी हा ब्लॉग सुरू तर केला, पण त्यावर काय लिहायचे हे ठरवले नव्हते. त्या काळात मी इंग्लंडमधील लीड्स या शहरात रहात असतांना आमच्या घरापासून जवळच एक 'ब्लॅक प्रिन्स'चा पुतळा होता. त्याला पाहून मला मुंबईच्या काळ्या घोड्याची आठवण झाली आणि त्या दोघांवर मिळून दोन परिच्छेद असलेला एक लहानसा लेख मी लिहिला होता. आज त्याच विषयावर विस्ताराने लिहिता येण्याएवढी माझी प्रगती झाली आहे.

मुंबईतला काळा घोडा तसा मला पन्नास वर्षांपासून ठाऊक आहे. मी शाळेत असतांना पहिल्यांदा मुंबईला आलो होतो तेंव्हा म्यूजियमजवळच्या हमरस्त्यात उभा असलेला हा 'काळा घोडा' दिसला होता आणि त्याचे विचित्र नाव ऐकून मला हंसू फुटले होते. त्याच्यावर आरूढ झालेल्या स्वारापेक्षा त्या घोड्यालाच जास्त महत्व मिळणे हे घोड्यांच्या शर्यतीत चालत असेल, पण या काळ्या घोड्यावर चक्क एक राजकुमार ऐटीत बसलेला होता हे त्या वेळी माझ्यासोबत असलेल्या कोणाच्या गावीही नव्हते! त्या गोष्टीला पन्नास वर्षे होऊन गेली.

मी नोकरीला लागलो तेंव्हा सुरुवातीला माझे ऑफीस गेटवे ऑफ इंडियापाशी होते. बोरीबंदर किंवा चर्चगेट यातल्या कोणत्याही बाजूने रोज ऑफीसला जातांना वाटेत काळा घोडा चौक पडायचाच, पण तिथे पूर्वी पाहिलेला 'काळा घोडा' मात्र तोपर्यंत अदृष्य झाला होता. त्याच्या पाठीवर स्वार झालेला एके काळचा 'प्रिन्स ऑफ वेल्स' मुंबईमधल्या कोणाच्याही मनातल्या आपल्या इतिहासातल्या चांगल्या आठवणींना उजाळा देत नसे किंवा उज्जवल भविष्यकाळ निर्माण कऱण्यासाठी कोणाला प्रेरणा देत नसे. त्यामुळे रस्त्यातून जाणा-या येणा-याला तो उमदा घोडाच उठून दिसत असे आणि त्या पुतळ्याला काळ्या रंगाच्या घोड्याच्याच नावाने ओळखले जात असे. तरीसुध्दा पारतंत्र्याच्या असल्या आठवणी लोकांच्या डोळ्यासमोर नकोत म्हणून त्याची रवानगी राणीच्या बागेजवळील भाऊ दाजी वस्तुसंग्रहालयाजवळच्या मोकळ्या जागेत झाली होती. त्या पुतळ्याच्या चौथ-यावर दुसरा एकादा पुतळा उभा करण्यापेक्षा तो पूर्णपणे काढून टाकून तिथे रहदारीसाठी मोकळी जागा केली होती. असे असले तरी त्या जागेला मात्र 'काळा घोडा' हे नाव चिकटून बसले होते ते कायमचेच. इतिहासकाळातल्या मुंबईच्या किल्ल्यातला एकादा बुरुज किंवा तटबंदीचा तुकडासुध्दा शिल्लक राहिलेला नसला तरीही मुंबईच्या त्या भागाला आजही 'फोर्ट' असेच म्हणतात, त्याचप्रमाणे त्याच 'फोर्ट'मधला 'काळा घोडा' हा नाका आजसुध्दा त्याच नावाने ओळखला जातो. अमराठी लोकांना 'ळ' म्हणता येत नसल्यामुळे ते 'काला घोडा' म्हणतात एवढाच फरक झाला आहे.

जहांगीर आर्ट गॅलरी ही या चौकातली सर्वांना माहीत असलेली इमारत होती. नवचित्रकलेच्या बाबतीत ती सर्वात प्रसिध्द म्हणण्यापेक्षा 'जगप्रसिध्द' जागा होती. जागतिक पातळीवरील मोठमोठ्या नामवंत चित्रकारांच्या कलाविष्कारांची प्रदर्शने तिथे भरत असत. एकाद्या नवोदित कलाकाराला आपली कला तिथे प्रदर्शित करण्याची संधी मिळणे हीच मुळी नव्या गायकाला पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात गायला मिळण्यासारखी अभिमानाची गोष्ट वाटत असे. ती चित्रे कोणी पाहिली आणि कोणाला आवडली वगैरेंबद्दल सांगायची त्यांना गरजच वाटत नसे. काही कलाकारांच्या यशस्वी कारकीर्दीमधली ही पहिली महत्वाची पायरी ठरली होती आणि तिथून त्यांनी पुढे अस्मानात भरारी मारली होती असे ऐकले होते. त्याच वास्तूमध्ये 'सॅमोवार' नावाचे मस्त रेस्तराँ होते. काही मोठे कलाकार दर सोमवारी तिथे येऊन भेटत असावेत असा पीजे त्या काळात प्रचलित होता. इतर खाद्यगृहांपेक्षा वेगळे असे वातावरण तिथे असायचे आणि तिथल्या रुचकर खाद्यपदार्थांच्या किंमती त्या काळातल्या उडपी किंवा इराणी रेस्टॉरंटपेक्षा जास्त असल्या तरी आटोक्यात वाटात असत. जवळच असलेल्या ताजमहाल हॉटेलच्या दरवानासमोरून आत जायची हिम्मत जेंव्हा आम्हाला होत नव्हती अशा काळात दोन तीन महिन्यातून एकाद वेळा मित्रांसमवेत सॅमोवारमध्ये जाऊन खाऊन येणे परवडायचे. पिंजारलेले केस, वाढलेली दाढी, अंगात खूप डगळ किंवा आखूड झब्बा असल्या अवतारातले एक दोन जण तिथे बसून आम्हाला अगम्य अशा भाषेत काहीतरी बोलतांना हटकून दिसायचे. त्यांचे फोटो कदाचित कुठेतरी पाहिले असल्याचे कुणाला तरी आठवायचे आणि मग तो " 'हा' आहे कारे?" किंवा "बहुतेक 'तो' असेल" अशा अटकळी बांधल्या जायच्या. या गोष्टींना आता चाळीस वर्षे उलटून गेली असली तरी यात काही बदल झाला आहे की अजून ती गॅलरी आणि ते रेस्तराँ यातले सगळे तसेच आहे कोण जाणे! त्यात एक नवी भर मात्र पडली आहे. जहांगीर आर्ट गॅलरीच्या फुटपाथवरच आता चित्रकलांचे वेगळे प्रदर्शन भरू लागले आहे.

काळ्या घोड्यालाच र्‍हिदम हाऊस नावाचे प्रसिध्द दुकान आहे. जेंव्हा मी त्या भागात रोज जात असे त्या काळात टीव्ही आणि टेपरेकॉर्डर अजून यायचे होते. एलपी डिस्कसुध्दा नव्हती. ताटाएवढ्या मोठ्या आकाराची गाण्याची रेकॉर्ड फक्त तीन मिनिटे वाजत असे. जुन्या किंवा नव्या कुठल्याही गाण्याची रेकॉर्ड र्‍हिदम हाऊसमध्ये मिळण्याची खात्री होती. र्‍हिदम हाऊसमध्ये असलेल्या साउंडप्रूफ खोल्या हे त्या दुकानाचे एक वैशिष्ट्य होते. बाहेर मांडून ठेवलेली कोणतीही रेकॉर्ड उचलून आपण आत न्यावी, तिथल्या फोनोग्रामवर ती वाजवून ऐकावी आणि पसंत पडली तर खरेदी करावी अशी व्यवस्था तिथे होती. या सोयीचा दुरुपयोग करून फुकट गाणी ऐकायला कोणी तिथे येत नसल्यामुळे आणि ही सोय त्या काळातल्या ग्राहकांच्या गर्दीला पुरेल एवढ्या प्रमाणात असल्यामुळे ते शक्य होते. पुढील काळात कॅसेट्स निघाल्यानंतरसुध्दा काही काळ तरी ती चालत होती. किती तरी कॅसेट्स मी अशा ऐकून विकत घेतल्या. मुंबईतल्या इतर भागामधल्या हॉलमध्ये होणा-या गायनाच्या किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमाची तिकीटे आणि पाससुध्दा काळा घोडा इथे र्‍हिदम हाऊसमध्ये किंवा त्याच्या आसपास मिळत असत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची कार्यालये मंत्रालयात आहेत, पूर्वी त्याचे नाव सचिवालय असे होते. लोकशाहीमध्ये जनतेपुढे असलेले प्रश्न आणि त्यांची गार्‍हाणी सादर करण्यासाठी तिने मंत्र्यांकडे जाणे साहजीक आहे. यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने जमा होऊन, मोर्चे काढून मंत्र्यांना भेटायला जाणे ओघाने आले. पण या समस्या इतक्या जास्त आणि गहन असतात की कोणी ना कोणी असे जाणे ही रोजची गोष्ट झाली. कधी गिरणी कामगार, तर कधी बँकेतले कर्मचारी, कधी बीईएसटीचे नोकर तर कधी टॅक्सी ड्रायव्हर्स, कधी दुकानदार तर कधी फेरीवाले, कधी भाडेकरू तर कधी झोपडीवाले, याशिवाय निरनिराळे राजकीय पक्ष, धार्मिक, जातीय, भाषिक किंवा इतर अराजकीय संघटना आपापली गार्‍हाणी, निषेधाचे खलिते, मागण्या वगैरे घेऊन येत असत. यात मुंबईतले लोक असतच, शिवाय संपूर्ण महाराष्ट्रामधून लोकांचे लोंढेच्या लोंढे येऊन थडकत असत. या सर्वांना थेट सचिवालयापर्यंत जाऊ देणे फारच अडचणीचे किंवा धोक्याचे झाल्यामुळे त्यांच्यासाठी ठराविक जागा आखून दिली गेली. या सर्वांनी काळा घोडापर्यंतच यावे, तिथे बसून किंवा उभे राहून घोषणा द्याव्यात, तिथे वाटेल तेवढा आरडाओरडा करावा, पण त्यांनी पुढे जायचे नाही असे निर्बंध घातले गेले. मोर्चामधील इतर सर्व लोक काळाघोडापाशी थांबून रहात आणि त्यांचे निवडक नेते किंवा प्रतिनिधी मंत्र्यांपर्यंत जाऊन त्यांना भेटून आपली निवेदने सादर करत असत. यामुळे अनेक वेळा या चौकात गोंधळ चाललेला असे, कधी कधी तो अनावर झाला तर लाठीचार्ज, अश्रूधूर वगैरे होत असे, क्वचित प्रसंगी गोळीबाराची वेळ येत असे. यामुळे सामान्य नागरिकांना दुरूनच अंदाज घेऊन वेगळ्या वाटेने जावे लागत असे. अशा कित्येक आठवणी या काळ्या घोड्याशी जुळलेल्या आहेत. गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये मला त्या बाजूला जायची फारशी गरज पडलेली नसली तरी या परिस्थितीत विशेष बदल झाला असेल असे वाटत नाही.

.  . . . . . . . . . . . (क्रमशः) 

No comments: