Tuesday, December 31, 2013

नववर्षाच्या शुभेच्छा


सर्व वाचकांना नववर्ष २०१४ अत्यंत सुखकर, आनंददायी आणि यशदायी ठरो, सर्वांना भरपूर आयुरारोग्य, विद्या, ज्ञान, समृद्धी, मानसन्मान  वगैरे प्राप्त होवो अशा शुभेच्छा.

या वर्षी मला आलेल्या शुभेच्छांचा मराठीत अनुवाद काहीसा असा आहे. माझ्या सर्व मित्रांसाठी माझ्याकडून या शुभेच्छाः-
नववर्षात तुझ्या आणि तुझ्या प्रियजनांच्या सुखसमृद्धीसाठी शुभेच्छा
या नव्या वर्षात तुला अत्यानंद, उत्तम आरोग्य, मनःशांती आणि समृध्दीचे वरदान मिळो.
तू तुझी स्वप्ने, निर्धार आणि वचनांचा मनःपूर्वक पाठपुरावा करशील.
भूतकाळाचे विचार नको .. ते अश्रूंना आणतात
भविष्यकाळाचे विचार नको ... त्यातून भीती येते
वर्तमानकाळात जग ... त्यामधून आनंद घे
हे वर्ष आणि पुढील अनेक वर्षे तुझ्यासाठी आणू देत
अमर्याद आनंद
कल्पनातीत यश
आरोग्य हीच संपत्ती
संपत्ती हे आभूषण
आणि देव सदैव तुझा पाठीराखा असो

Wednesday, December 25, 2013

२०१३ च्या नवलकथा - अॅप्स आणि आप, सचिन, खजिना

१.अॅप्स आणि आप



इसवी सन २०१३ आता शेवटच्या आठवड्यात आले आहे. "नेमेचि येतो बघ पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा" या उक्तीप्रमाणे गेल्या वर्षातसुद्धा हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा येऊन गेले आणि आता पुन्हा थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. इतर वर्षांत होऊन जातात त्यासारख्या इतर सर्वसामान्य घटना घडून गेल्याच, त्यातल्या काही सुखद आणि काही दुःखद होत्या. उत्तराखंडामध्ये आलेला प्रलयंकारी महापूर ही नैसर्गिक आपत्ती आणि सिंधूरक्षक  या पाणबुडीवर झालेला भयानक अपघात या अत्यंत दुर्दैवी घटना घडून गेल्या. अशा प्रकारच्या घटना अधून मधून जगात कुठे ना कुठे घडत असतात, पण त्या दूरदेशी घडल्या तर आपल्याला त्यांची तीव्रता जाणवत नाही. विस्तवाचा चटका त्याच्या जवळ असलेल्याला अत्यंत दाहक असतो पण जसजसे दूर जाऊ तसतशी त्याची दाहकता कमी होते. याचप्रमाणे अशा घटना ज्या भागात घडतात किंवा ज्या लोकांचा त्यांच्याशी  निकटचा संबंध असतो त्यांना त्या सुन्न करून सोडतात, त्यांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करतात. इतरांना काही काळ वेदना, दुःख, हळहळ वगैरे वाटते आणि हळूहळू शांत होते. या वर्षात आपल्या देशाच्या किंवा देशवासीयांच्या दृष्टीने पाहता काही चांगल्या घटनासुद्धा घडल्या, पण त्या घटना सहसा क्षणार्धात घडत नाहीत. कित्येक दिवस, महिने, वर्षे चिकाटीने मेहनत केल्यानंतर एकादा टप्पा गाठल्याचा तो आनंद असतो. एकाद्या पर्वतशिखरावर चढून जाण्यासाठी खूप कष्ट आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर मिळाले तर त्याचे फलित मिळते, पण कुठेतरी पाय घसरून कडेलोट झाला तर त्याला एक क्षण पुरेसा असतो. तसेच हे आहे. गेल्या वर्षातल्या सगळ्याच मुख्य  घटनांची खूप चर्चा होऊन गेलेली आहे आणि या आठवड्यात त्यांची उजळणी होईल.

या भागात मला काही नवलकथांबद्दल सांगायचे आहे. निदान मला तरी ज्याची यत्किंचित अपेक्षा किंवा कल्पनासुद्धा नव्हती अशा काही नव्या गोष्टी या वर्षी समोर आल्या आणि त्यांच्या अनपेक्षित आगमनामुळे मला त्यांचे नवल वाटावे असे काही बाबतीत घडले. मराठीत अआइई प्रमाणे किंवा इंग्रजीत एबीसीडी कसेही पाहिले तरी 'अॅप्स' आणि 'आप' यांचाच अव्वल नंबर लागेल म्हणून आधी त्याच घेऊ. त्यातल्या अॅप्सने मोबाईल फोन्सच्या जगात विजयी घोडदौड केली आणि एकाद्या धूमकेतूसारखा आप पक्ष उदयाला आला आणि त्याने राजकीय क्षेत्रात हलकल्लोळ माजवला.

खिशात बाळगण्याजोगा पिटुकला सेलफोन किंवा मोबाइल बाजारात आला आणि त्याने माणसांचे जीवनच बदलून टाकले. तुम्ही घरी, ऑफिसात, बाजारात, प्रवासात कुठेही असला तरी तिथून कोणाशीही बोलणे शक्य झाले आणि नोकियाच्या जुन्या काळातल्या जाहिरातीप्रमाणे दिवसाचे चोवीस तास सतत 'कनेक्टेड' राहिला. साध्या परंपरागत टेलिफोनमधून फक्त बोलणे शक्य होते, त्याच्या पन्नास वर्षांनंतर आलेल्या टेलेक्समधून मजकूर (टेक्स्ट) पाठवणे सुरू झाले. आणखी वीस पंचवीस वर्षांनंतर फॅक्स करून चित्रे पाठवली जाऊ लागली. पण फॅक्सचे आयुष्यमान जास्त नव्हते कारण ते पूर्णपणे रुळायच्या आधी त्याच्या पाठोपाठ आलेल्या ई मेलने त्याला हद्दपार केले. टेलिफोन, टेलेक्स आणि फॅक्स यांचेसाठी वेगवेगळी यंत्रे लागत असत. पण काँप्यूटर आणि इंटरनेट आल्यानंतर ध्वनि, मजकूर आणि चित्रे या सर्वांना ई मेलमधून इकडून तिकडे पाठवण्यासाठी एकच यंत्र पुरेसे झाले आणि तेसुद्धा आपल्या घरी बसून करता येऊ लागले. हे बदल होण्यासाठी जवळजवळ शंभर वर्षांचा काळ लागला होता. पण मोबाईल फोनने मात्र आल्या आल्या काही वर्षांमध्ये हे सगळे आपल्यात सामावून घेतले.

सुरुवातीला आपल्या शहरात, मग देशभर असे करत करत काही वर्षांमध्येच मोबाईल फोनवरून जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या कोणत्याही माणसाशी मनात येईल त्या क्षणी बोलणे शक्य झालेच. त्याच्या जोडीला या सेलफोनवरून लिखित मजकूर (टेक्स्ट मेसेज) पाठवता येऊ लागला. त्यातही सुरुवातीला फक्त इंग्रजी भाषा असायची, नंतर मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीमध्येसुद्धा लिहिणे वाचणे शक्य झाले. मोबाईलला कॅमेरा जोडला गेला आणि मनात आल्या आल्या त्या क्षणी छायाचित्रे काढून ठेवता आली. त्यानंतर ध्वनि आणि अक्षरे एवढ्यावर न थांबता त्यांनाही इकडून तिकडे पाठवता येऊ लागले. आणखी प्रगती होऊन हालचाली आणि हावभावांसह चालती बोलती चित्रे (व्हीडिओ क्लिप्स) घेऊन पाठवता येऊ लागली. या सगळ्याचे मुख्य कारण म्हणजे ध्वनि, चित्रे आणि अक्षरे यांचे डिजिटल सिग्नल्समध्ये आणि त्याच्या उलट परिवर्नत करणे याच्या मागे असलेले सायन्स चांगल्या प्रकारे समजले होते आणि कमीत कमी ऊर्जेचा वापर करून ते काम करून घेण्यात यश आले होते. यामुळे तीन मोठ्या आणि महाग यंत्रांऐवजी एका पिटुकला मोबाईल फोनमधून हे सगळे होऊ लागले होते.

काँप्यूटरमध्ये एक शक्तीशाली आणि वेगवान प्रोसेसर (सीपीयू नावाचा त्याचा मुख्य भाग) असतो तो निरनिराळी असंख्य कामे चुटकीसरशी करू शकतो. ती कामे करण्यासाठी सिस्टम सॉफ्टवेअर असते, पण त्या प्रोसेसरला विशिष्ट काम सांगून त्याचेकडून ते करवून घेण्यासाठी अप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवले जातात. मोटार कार चालवणा-या माणसाला ऑटोमोबाईल इंजिनियरिंगचे ज्ञान असण्याची गरज नसते त्याप्रमाणेच काँप्यूटरचा वापर करणा-या सर्वसामान्य माणसाला या सॉफ्टवेअरबद्दल काही माहिती असण्याची गरज नसते इतके ते आता यूजर फ्रेँडली झाले आहे. स्क्रीनवर दिसणा-या सूचना वाचून आपल्या आपण कोणीही माऊस व कीबोर्डद्वारा आपले काम करून घेऊ शकतो.

या काँप्यूटर्सचा एक लहान भाऊ मायक्रोप्रोसेसर त्यातली काही कामे करू शकतो. तो आकाराने लहान अलतो आणि त्याला दिलेल्या कामांना जास्त वीज लागत नाही. अशा मायक्रोप्रोसेसरची चिप मोबाईल फोनमध्ये बसवली जाते. त्याच्या वापरासाठी जे खास अप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवले जाते त्याला अॅप्स असे म्हणतात. ही अॅप्स तयार व्हायला ३-४ वर्षांपूर्वीच सुरुवात झाली होती, पण त्यांचा उपयोग करता येण्याजोगे स्मार्ट मोबाईल फोन्स आणि त्यांच्यासाठी संदेशवहन करण्यासाठी आवश्यक असलेली थ्री जी सेवा सामान्य लोकांच्या आटोक्यात यायला वेळ लागला.  मी जरी अद्याप तिचा लाभ घेऊ शकलो नसलो तरी माझ्या परिचयाच्या काही लोकांकडे मला हा मोबाइल पहायला मिळाला तो या वर्षीच.

ध्वनि, चित्रे आणि अक्षरे यांची देवाण घेवाण करणे ही वर दिलेली कामे हा एक भाग झाला. यामध्ये कोणीतरी ही माहिती गोळा करून पाठवणारा असतो आणि दुसरा कोणी ती घेणारा असतो. याखेरीज अनेक कामे या अॅप्समधून करता येणे शक्य आहे. त्यातली मुख्य म्हणजे माहिती मिळवणे. यात ती देणारा कोणी हजर असण्याची आवश्यकता नसते. आधी कोणी ती माहिती जमा करून ठेवलेली असली तर ती शोधून उचलून घेता येते. दुसरे म्हणजे प्रवासासाठी किंवा सिनेमाची तिकीटे काढणे यावरून करता येते. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कवर हवे तेंव्हा जाता येते, यूट्यूबवरील गाणी पाहता आणि ऐकता येतात, मोबाईलवर अंगठा फिरवून एकाद्या ठिकाणचा पत्ता शोधता येतो इतकेच नव्हे तर जीपीएसच्या सहाय्याने तिथे कसे जाऊन पोचायचे हेसुद्धा समजते. बँकेमधल्या आपल्या खात्याचा हिशोब पाहता येतो आणि त्या खात्यामधून बिले भरता येतात. अॅप्सच्या आधारांनी काय काय करता येते याबद्दल ऐकावे तेवढे नवलच वाटते. अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यामधला राक्षस येऊन सांगेल ते काम क्षणार्धात करायचा असे सुरस कथांमध्ये वाचले होते. मोबाईलवरील अॅप्स हे त्याचेच नवे अवतार वाटतात. यातले काही अॅप्स विकत घ्यावे लागतात तर काही फुकट मिळतात. व्हॉट्सअॅप हे आता यात इतके लोकप्रिय झाले आहे की त्यामुळे फेसबुकवर कमी गर्दी होऊ लागली आहे. नव्या पिढीतली मंडळी प्रत्यक्षात कधी भेटतात आणि बोलतात की नाही? त्यांचे सगळे बोलणे व्हॉट्सअॅपवर चॅट करतांनाच संपून तर जात नसेल ना? असे वाटायला लागले आहे.


भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकपाल विधेयक आणण्यासाठी अण्णा हजारे यांनी जंतर मंतरवर उपोषण सुरू केले होते तेंव्हा त्यांच्या सभोवती जमा झालेल्या मंडळींमध्ये अरविंद केजरीवाल हे नाव पहिल्यांदा ऐकले. त्यानंतर त्यांच्यासंबंधी उलटसुलट बातम्या येत गेल्या. ते व्यक्तिशः अण्णांपासून आणि त्यांच्या सत्याग्रहाच्या मार्गापासून दूर जात असल्याचेही सांगितले जात होते. या वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर ते अचानकपणे प्रकट झाले आणि गेले काही महिने सतत प्रकाशझोतामध्ये राहिले. आम आदमी पार्टी (आप) या नावाचा एक नवा पक्ष त्यांनी स्थापन केला. दिल्लीच्या राज्यावर आळीपाळीने ताबा मिळवलेल्या दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पातळीवरील पक्षांवर घणाघाती प्रहार केले, त्यात त्यांनी काही वेळा राणा भीमदेवी वक्तव्ये केली, काही वेळा विनम्रतेची पराकाष्ठा केली, काही अवाच्या सव्वा आश्वासने दिली, दिल्लीमधल्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये सभा, मेळावे वगैरे घेतले. या सर्वांमध्ये ते आश्चर्य वाटावे इतक्या आत्मविश्वासाने वावरत होते आणि गर्दी खेचत होते. तरीसुद्धा मनसेप्रमाणे त्यांचीही कामगिरी मतांची विभागणी करण्याइतपतच होईल अशा अटकळी बहुतेक पंडितांनी बांधल्या होत्या. 

त्या सगळ्यांना खोटे पाडत त्यांच्या पक्षाने ७० पैकी २८ जागांवर विजय मिळवला. दिल्लीमध्ये अत्यंत लोकप्रिय समजल्या जाणा-या भूतपूर्व मुख्यमंत्री शीला दिक्षित यांनासुद्धा आम आदमीकडून पराभूत होण्याची वेळ आली. आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपलासुद्धा बहुमत मिळाले नाही. त्यामुळे दुस-या क्रमांकावर असलेल्या आम आदमी पक्षाला त्याने लढवलेल्या पहिल्याच निवडणुकीत सत्तेवर येण्याचीसुद्धा संधी मिळणार आहे. आता तिचा लाभ कशा प्रकारे आणि किती घ्यायचा किंवा घेता येईल हे मुख्यतः अरविंद केजरीवाल यांच्या परफॉर्मन्सवर ठरणार आहे. पक्षाची पुढील धोरणे आणि त्यावर होणारी अंमलबजावणी यांच्या आधाराशिवाय मुत्सद्दीपणाची खूप गरज पडणार आहे. पुढे जे होईल ते होईल आम आदमी पक्षाने (आपने) इथवर जी मजल मारली त्याचेच नवल वाटते.    
-------------------------------------------------------------------------------------------

२. सचिनचा संन्यास

तीन चार दशकांपूर्वीचे भारतातले क्रिकेट खूप वेगळे होते. ट्वेंटी ट्वेंटी, फिफ्टी फिफ्टी, ओ़डीआय वगैरेसारखे झटपट प्रकार आलेले नव्हते. पाच पाच दिवस रेंगाळणारे कसोटी सामने बहुधा अनिर्णितच रहायचे आणि जे कोणी महाभाग कंटाळवाणे वाटेल इतक्या चिवटपणे खेळून नाबाद रहात, त्यांना ती मॅच अनिर्णित ठेवण्यात 'यशस्वी' झाल्याचे श्रेय मिळायचे, त्यांचे तोंडभर कौतुकसुद्धा होत असे. गोलंदाज हा जीवघेण्या शस्त्रास्त्रांनी हल्ला करणारा कोणी महाभयंकर राक्षस असतो असे भासवले जात असे आणि त्याच्या तडाख्यापासून स्वतःचा फक्त बचाव करून घेण्यात फलंदाज स्वतःला धन्य मानत असत. यष्टीच्या (स्टंप्सच्या) डाव्याउजव्या बाजूने जाणारे चेंडू ओळखून सोडून देण्याला "वेल् लेफ्ट" असे म्हणत आणि यष्टीवर किंवा त्याच्या आसपास येणारा चेंडू बॅटने नुसता अडवला तरी त्याला "वेल प्लेड" म्हणत. त्यात कसले डोंबलाचे 'चांगले खेळणे' असते हे मला समजत नव्हते. फरुख इंजिनियर, पतौडीचे नवाब आणि काही प्रमाणात सुनील गावस्कर वगैरेंनी यात थोडा बदल घडवून आणायला सुरुवात केली असली तरी दिसभराच्या रटाळ खेळात दोन अडीचशे धांवांच्या पलीकडे सहसा मजल मारली जात नसे. अशा त्या काळात शारदाश्रम नावाच्या शाळेतल्या सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी नावाच्या दोन मुलांनी एकाच दिवसात धबाधब तीनतीनशे धावा काढून ६६४ धावांचा प्रचंड पहाड रचला ही बातमी वाचून सगळ्यांनी आश्चर्यमिश्रित कौतुकाने तोंडात बोटे घातली होती. मैदानांवरील सचिनच्या अशा प्रकारच्या महापराक्रमांची दखल त्या काळातल्या निवड समित्यांनीसुद्धा लगेच घेतली आणि अवघ्या १५ वर्षाच्या या मुलाची मुंबई संघासाठी आणि १६ वर्षाचा असतांना भारताच्या संघासाठीसुद्धा निवड झाली.

भारताच्या संघात गेल्यानंतरही तो अप्रतिम कामगिरी करत राहिला आणि कायमची जागा पटकावून बसला. फलंदाजीमधले सगळे विक्रम एका पाठोपाठ एक करत मोडीत काढून त्याने नवनवे विक्रम प्रस्थापित केले. माझा हा ब्लॉग क्रीडाविश्वापासून नेहमी दूरच राहिला आहे, पण सचिनचे पराक्रम पाहून मलासुध्दा 'विक्रमवीर रेकॉर्डकर' असा लेख लिहिण्याचा मोह झाला. सचिनच्या कामगिरीबद्दल आतापर्यंत अमाप लिहिले गेले आहे आणि मला त्यात आणखी कणभरही भर घालायला जागा उरली आहे असे मला वाटत नाही. खरे तर क्रिकेटमधले मला काहीच कळतही नाही. डॉन ब्रॅडमननंतर जगभरात फक्त सचिन तेंडुलकरच इतका श्रेष्ठ फलंदाज का झाला? इतरांहून वेगळे असे कोणते कौशल्य त्याच्याकडे होते? किंवा इतर कोणीही सचिनसारखे का खेळू शकत नव्हता? गुरुवर्य श्री.आचरेकर आणि वडील बंधू अशा ज्या दोघांनी त्याला घडवले असे सचिन नेहमी मुलाखतींमध्ये सांगत असतो त्यांना स्वतःला तसे चांगले का खेळता आले नाही? सचिन खूप चांगले खेळत होताच, पण आज विराट कोहली आणि शिखर धवन जितके तडाखेबाज खेळतांना दिसतात तसा त्याचा खेळ का होत नव्हता? मनात उठलेल्या अशा प्रकारच्या प्रश्नांना मला स्वतःलाच समाधानकारक उत्तरे देता येत नाहीत.

सचिनकडे जी कोणती जादू होती त्याच्या आधाराने तो वर्षानुवर्षे क्रिकेट खेळत राहिला. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने स्वतःच स्थापित केलेले सगळे रेकॉर्ड्स मोडून तो नवनवे विक्रम नोंदवत होताच, ट्वेंटी ट्वेंटी, फिफ्टी फिफ्टी, ओ़डीआय यांच्यासारख्या खेळाच्या झटपट प्रकारांमध्येसुद्धा त्याने प्राविण्य मिळवून त्या प्रकारांमध्येसुद्धा तो विक्रम करू लागला. त्याच्याबरोबर किंवा त्याच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये आलेल्या इतर अनेक फलंदाजांना संघातून वगळले गेले किंवा ते स्वतःहून निवृत्त झाले तरी सचिन खेळतच होता आणि चांगले खेळत होता. तो फक्त पंधरासोळा वर्षाचा असतांना त्याची निवड करण्याचे धाडस त्या काळातील निवडसमित्यांच्या सदस्यांनी केले होते, पण तो चाळिशीच्या जवळ पोचला तरी त्याला संघामधून वगळण्याचे धैर्य मात्र कोणापाशी नव्हते. कारण आम जनता त्याचे कौतुक करता करता केंव्हा त्याचा उदोउदो आणि जयजयकार करायला लागली होती ते समजलेच नाही. काही लोकांनी तर त्याची एकाद्या देवासारखी पूजा आणि आरतीसुद्धा करायचे बाकी ठेवले नव्हते. वयाने सर्वात लहान खेळाडू म्हणून त्याने केलेल्या विक्रमाच्या जोडीला वयाने सर्वात मोठा आणि सलग जास्तीत जास्त वर्षे खेळत राहिलेला खेळाडू असे आणखी काही विक्रम करेपर्यंत तो वाट पाहणार आहे का? असे वाटायला लागले होते. "सचिनलाच आणखी किती वर्षे निवडणार आहात?" असा प्रश्न कोणी निवडसमितीला विचारत नसला तरी "तुम्ही कधी निवृत्त होणार आहात? आणखी कोणते रेकॉर्ड्स मोडायचे शिल्लक राहिले आहेत?" असे काही लोक सचिनला विचारायला लागले होते. सचिनचे त्यावर ठराविक उत्तर असायचे, "मी कधीच विक्रम करण्याच्या उद्देशाने खेळलो नाही. मी फक्त मन लावून चांगले खेळायचा प्रयत्न केला आणि करत असतो. त्यातून आपोआप विक्रम होत असतात. मला संघात घ्यायचे की नाही ते सिलेक्टर्स माझा खेळ पाहून ठरवतात. त्यांच्याबद्दल मी काय सांगणार?"

गेली तीन चार वर्षे असेच चालले होते. लोक सचिनला कंटाळलेले होते असे नाही, पण त्याच्या स्वतःच्याच पूर्वीच्या खेळाइतकी उंची तो कदाचित गाठू शकत नव्हता आणि स्वतःच्या प्रतिमेच्या तुलनेत कमी पडायला लागला होता. त्यामुळे आता त्याने स्वतःहून सूज्ञपणे बाजूला होऊन नव्या दमाच्या युवा खेळाडूंना संधी द्यावी असे बरेच लोक कुजबुजायला लागले होते. या वर्षाच्या मध्याच्या सुमाराला नक्की काय झाले कोण जाणे, पण सचिनने निवृत्त होण्याचा मनोदय जाहीर केला. त्याला निरोप देण्याचा जंगी समारंभ करण्याचे ठरवले गेले आणि ते अंमलातही आणले गेले. जंगी जंगी म्हणजे ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर आखले गेले असेल किंवा करता येऊ शकेल असे मात्र मला वाटले नव्हते. यामुळे माझ्या दृष्टीने ही एक नवलकथाच ठरते.

तोपर्यंत सचिन १९८ कसोटी सामने खेळला होता, त्याचा अखेरचा सामना २००वा असावा, म्हणजे सामन्यांची डबलसेंच्युरी होईल असे ठरले. त्याच्या आईला जास्त कष्ट न घेता हा खेळ पहायला मिळावा तसेच ज्या मुंबईकरांचा तो अत्यंत लाडका होता त्यांनाही त्याला खेळतांना पहायची अखेरची संधी मिळावी म्हणून हा सामना त्याच्या आवडत्या मुंबईतच व्हावा असेही ठरवले गेले. भारतासकट जगातल्या अनेक देशांच्या क्रिकेटच्या संघांच्या दौ-यांची वेळापत्रके खूप आधीपासून ठरलेली असतात. त्यातून थोडीशी सवड काढून वेस्ट इंडीजच्या संघाला फक्त दोन टेस्ट मॅचेस खेळण्याचे निमंत्रण दिले आणि त्यांनी ते स्वीकारले. ते सामने गर्दीसाठी प्रसिद्ध असलेले कोलकाता आणि मुंबई इथेच खेळवले गेले. ते दोन देशांच्या संघामधले चुरशीचे  सामने आहेत आणि ते जिंकणे दोन्ही संघांना महत्वाचे वाटते असे त्या दोन्ही सामन्यांमध्ये एका क्षणासाठीदेखील वाटले नाही. तो  करमणुकीचा एकादा मोठा कार्यक्रम, सचिनच्या चाहत्यांचा मेळावा असावा असेच रूप त्यांना आले होते. "सच्चिन्, सच्चिन्, सच्चिन्, सच्चिन्, सच्चिन्, सच्चिन्, " असा सारखा घोष चालला होता. मैदानावर इतर कोण काय करत आहेत याची कोणाला चिंता किंवा महत्वच वाटत नव्हते. सामना संपताच सचिनला अत्यंत भावपूर्ण निरोप देण्याचा समारंभ झाला. इतर कुठल्याच क्षेत्रातल्या कुठल्याच मोठ्या व्यक्तीला जीवंतपणी इतक्या थाटामाटाने निरोप दिला गेला नसेल.

या प्रसंगी जी भाषणबाजी आणि लिखाण झाले ते तर कल्पनेच्या पलीकडे जात होते. सचिन आता कसोटी सामने खेळायचे थांबवणार आहे की सदेह समाधी घ्यायला निघाला आहे असा संभ्रम तिथली रडारड पाहून पडायला लागला होता. "सचिनशिवाय आता भारताचे कसे होणार?" अशी कोणाला काळजी वाटायला लागली होती आणि "सचिन नाही म्हणजे आता क्रिकेटच उरले नाही." असे सूर लावलेले ऐकून त्यांला हसावे की रडावे ते समजेनासे झाले होते. त्या दिवशीचा एकंदर नूर पाहून मनात असा विचार आला की सर्वसंगपरित्याग करून संन्यास घ्यायला निघालेल्या माणसाची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक निघाली तर ते कसे दिसेल!

सचिनने आता कसोटी सामने किंवा अशा मोठ्या स्पर्धांमधून भारताचे प्रतिनिधित्व करायचे थांबवले तरी तो काही नाहीसा होणार नाही किंवा दृष्टीआड जाणार नाही. त्याने जीवनामधून संन्यास घेतलेला नाही. क्रिकेटमध्ये खेळून मिळालेल्या पैशांवर तो जगत होता आणि आता ती मिळकत बंद झाल्यामुळे त्याचे हाल होणार असे नाही. त्याने याआधीच कोट्यावधी किंवा कदाचित अब्जावधी एवढी माया जमवून ठेवलेली आहे. खेळामधून भरपूर पैसे मिळवता येतात हेसुद्धा बहुधा सचिननेच पहिल्यांदा दाखवून दिले आणि ते आकडे गुप्त ठेवले असले तरी त्यातही बहुधा त्यानेच विक्रम केले असणार. सचिनला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढी क्वचितच आणखी कोणा खेळाडूला मिळाली असेल. कदाचित सिनेस्टार्सनासुद्धा नसेल. त्याचा पूर्णाकृती पुतळासुद्धा लंडनच्या मादाम तुसाद म्यूजियममध्ये उभा आहे आणि प्रेक्षकांना त्याची आठवण देत असतो. कसोटी सामन्यातला शेवटच्या दिवसाचा खेळ खेळून झाल्यानंतर लगेचच त्याला भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कारही जाहीर झाला. मानसन्मान, संपत्ती, प्रसिद्धी वगैरे सगळे काही त्याला वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्राप्त झाले आहे.

सचिन तेंडुलकरने केलेल्या भाषणांमध्ये आणि वार्ताहरांशी बोलतांना पुन्हा पुन्हा हेच सांगितले की त्याने क्रिकेट या खेळालाही रामराम म्हंटलेले नाही. या ना त्या स्वरूपात तो हा खेळ खेळत राहील आणि तो जनतेसमोर येत राहणारच आहे. आता ते केंव्हा आणि नेमके कशा प्रकारे हे ही लवकरच समजेल.  सचिनने क्रिकेटविश्वाला आणि जनतेने सचिनला अलविदा करणे याचा हा सोहळा मात्र या वर्षातली एक नवलकथा होती.
-------------------------------------------------------------------------------------

३. भूमिगत खजिना

उत्तर प्रदेशात एक आटपाट नगर होतं, त्याचं नाव दौंडिया खेडा. तिथे एक राजा होता, त्याचं नाव राव रामबक्षसिंग. त्याच्या राज्यात सुखसमृद्धी नांदत असे. त्याचा मोठा राजवाडा होता, त्यात एक खजिना होता. तो सोन्यानाण्याने खच्चून भरला होता. एकदा काय झालं, १८५७ साल आलं, मेरठ आणि कानपूर वगैरे ठिकाणच्या इंग्रजांच्या छावण्यांमधल्या सैनिकांनी उठाव केला, पहिलं स्वातंत्र्ययुद्ध पुकारलं. त्यांना मनुष्यबळ आणि त्यांच्या खर्चासाठी पैसे, रसद वगैरेची गरज ती. ते गोळा करण्यासाठी ते स्वातंत्र्यसैनिक गावोगांवी फिरू लागले. इंग्रजांच्या दृष्टीने ते शिपायांचं बंड होतं, इंग्रजांनी त्या बंडखोर शिपायांना शोधायचं निमित्य केलं, त्यांच्या फौजा गावोगाव हिंडू लागल्या, अनन्वित अत्याचार आणि लुटालूट करायला लागल्या. इतर चोर, लुटारू आणि दरोडेखोरांचंही फावलं, तेही त्या अंदाधुंदीचा फायदा घ्यायला लागले. बिचारा राजा घाबरला, त्यानं काय केलं, खोल खड्डा खणून आपला खजिना जमीनीखाली लपवून ठेवला. पुढे स्वातंत्र्ययुद्ध संपलं. इंग्रजांच्या विजयी फौजा सूडबुद्धीनं सगळीकडे धूळधाण करत सुटल्या. आटपाट नगराचीही त्यांनी वाट लावली. खुद्द राजालाच पकडून सुळावर चढवून दिलं. राजाचा आत्मा त्या खजिन्यापाशी भरकटत राहिला आहे अशी अफवा पसरली.

इथपर्यंतची कहाणी थोडी विश्वास ठेवण्यालायक वाटते. आमच्या जमखंडीतसुद्धा असेच काही तरी घडले होते असे मी माझ्या लहानपणी ऐकले होते. उत्तर भारतात झालेल्या उठावाच्या बातम्या ऐकून तिथला संस्थानिक संभ्रमात पडला होता. हे युद्ध स्वातंत्र्यसैनिकांनी जिंकले असते आणि सगळ्या इंग्रजांचा खातमा केला असता तर त्यांची नजर नक्कीच इंग्रजांना साथ देणा-या संस्थानिकांकडे वळली असती आणि त्यांचा बचाव करायला कोणीच वाली उरला नसता. त्यामुळे तिथला तत्कालिन राजा तळ्यात मळ्यात करत राहिला. पण उत्तरेतल्यासारखे दक्षिणेत काही झालेच नाही. राणी कित्तूर चन्नम्मासारखी एकादी ठिणगी पडली पण त्याचा वणवा व्हायच्या आधीच तिला निष्ठुरपणे विझवून टाकले गेले. उत्तर हिंदुस्थान पुन्हा आपल्या ताब्यात येताच इंग्रजांनी दक्षिणेकडेही लक्ष वळवले. त्यांच्या फौजा आता आपल्यावर चाल करून येणार हे तिथल्या सगळ्या हुषार राजांनी ओळखले. जमखंडीच्या राजाने त्याच्या खजिन्यातल्या काही मौल्यवान वस्तू रातोरात एका जुन्या पडक्या विहिरीत टाकल्या आणि तिला बुजवून वरती शंकराच्या पिंडीची स्थापना केली, तिच्यावर लगेच एक घुमटी उभारली आणि सभामंटप, गाभारा वगैरे बांधायला सुरुवात केली. हे कोणाला कळू नये म्हणून ज्यांनी हे काम केले त्या मजूरांनाही गाडून टाकले म्हणे, चेतसिंग नावाच्या एका उत्तर भारतीयाला पकडून बेबनावाचा सगळा आळ त्याच्यावर टाकला, त्याला सरळ गावाबाहेर नेऊन जाहीरपणे फासावर लटकावले आणि अशा प्रकारे इंग्रजांची मर्जी संपादन केली. अशी सगळी दंतकथा मी लहानपणी ऐकली होती. त्या चेतसिंगाची एक समाधी किंवा थडगेही त्या काळात गावाबाहेर होते आणि उमारामेश्वराचे जरी देवाचे देऊळ असले तरी त्याच्या आजूबाजूला रात्री भुते फिरतात अशी अफवा होती.

उत्तर प्रदेशातली ही कहाणी आता यासाठी आठवली कारण त्याचा पुढला भाग दीडशे वर्षांनंतर या वर्षी घडला. त्याचं काय झालं, शोभन सरकार नावाचा एक साधूपुरुष त्या गावाचा उद्धार करायला अवतरला. त्याला भूत, भविष्य आणि वर्तमानकाळाचे त्रिकाळ ज्ञान तर आहेच, मनुष्य, देव आणि पिशाच या तीघांमध्ये तो लीलया वावरतो. हा धर्मात्मा स्वतः नेहमी कुठल्यातरी भलत्याच काळात आणि कुठल्यातरी इतर प्रकारच्या योनींमधल्या (देव, पिशाच, आत्मा वगैरें) लोकात वावरत असतो. तो मधूनच कधीतरी भूलोकात येतो आणि त्याच्या शिष्याला काही खुणा करतो. स्वामी ओमजी नावाचा हा पट्टशिष्य त्यातला अर्थ समजून इतरांना सांगतो. तर काय झालं, देशाच्या वाईट परिस्थितीमुळे त्या साधूचा आत्मा फार कष्टात पडला, त्यानं त्याच्या आध्यात्मिक गुरूचा धावा केला. त्या गुरूंनी त्या दिवंगत राजा राव रामबक्षसिंगाच्या आत्म्याला त्या साधूच्या स्वप्नात पाठवून दिलं. त्या आत्म्यानं सांगितलं, "मी गेली दीडशे वर्षं इथे घुटमळत राहिलो आहे, मला आता मुक्ती पाहिजे. मी अमूक जागी पुरून ठेवलेलं हजार टन सोनं बाहेर काढून दिलं तर या गावाचं, या राज्याचं, या देशाचं भलं होईल. त्याच्या माथ्यावर असलेलं सगळं कर्ज फिटून जाईल, सगळीकडे आबादीआबाद होईल. तर मी शांत होईन, मला मोक्ष मिळेल."

शोभन सरकारनं आपलं स्वप्न स्वामी ओमजीच्या माध्यमातून सगळ्या लोकांना सांगितलं. त्यात महंत नावाचा एक केंद्रातला मंत्रीही होता. या मंत्र्याचाही शोभन सरकारच्या खरेपणावर आणि अद्भुत दैवी सामर्थ्यावर पूर्ण विश्वास बसला होता. शिवाय त्यानं म्हणे असंही भविष्य सांगितलं होतं की निवडणुकांनंतर महंतला छत्तिसगडचे मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. त्यात कसले विघ्न येऊ नये म्हणून त्यानं लगेच हालचालींना सुरुवात केली. पुरातत्व खात्याच्या माणसांची मोठी फौज त्या ठिकाणी उत्खनन करायला पाठवून दिली. या गोष्टीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सगळ्या वाहिन्यांचे वार्ताहर आणि फोटोग्राफर त्या ठिकाणी जाऊन पोचले. तिथल्या कामाचे लाइव्ह टेलिकास्ट होऊन जगभर ते दाखवले जाऊ लागले. आर्किऑलॉजी डिपार्टमेंटच्या लोकांना अवघड प्रश्न विचारायला लागले. "तुम्ही स्वप्नांवर विश्वास ठेवता का?", "याला किती खर्च येणार आहे?", "तो कोण करणार आहे?" तेसुद्धा मुरलेले सरकारी अधिकारी होते. त्यांनी नाना त-हेची यंत्रं बरोबर आणली होती. तिच्यावरून त्यांना समजलं म्हणे की जमीनीखाली अलोह (नॉनफेरस) धातूचे साठे दिसत आहेत. आता ते सोनं आहे की पितळ आहे की आणखी काही कोण जाणे. या जागी रामायण महाभारतकाळच्या पुरातन वस्त्यांचे अवशेषही कदाचित सापडतील असे धागे त्यांना मिळालेले आहेत. थोडक्यात म्हणजे "आम्ही काही अंधश्रद्ध नाही आहोत".

साधूबाबांनी आता आणखी काही कहाण्या रचल्या. हे हजार टन सोने म्हणजे मूळचे सोने मुळी नव्हतेच. त्याच्या गुरूंना चावलेल्या डासांनी त्याच्या शरीरातून जे रक्त बाहेर काढले त्यातल्या एकेका थेंबाचे रूपांतर म्हणे सोन्याच्या कणात झाले. आता किती गुरूंना किती डासांनी चावून हजार टन रक्त बाहेर काढले असले प्रश्न विचारणे म्हणजे त्यात आपल्या महान हिंदू धर्माचा अपमान होणार. त्यामुळे ते विचारायचे नसतात. हे सोने जरी सापडले तरी त्यासाठी शोभन सरकारची उपस्थिती हवीच कारण त्याला डावलले तर मग गुरूंची अवकृपा होणार आणि ते सोने पुन्हा मातीत मिसळून जाणार. शिवाय मिळालेल्या सोन्यातला वीस टक्के भाग गावाच्या विकासासाठी त्यालाच द्यायला हवा अशी अटही घातली होती. ती कोणी मान्य केली होती याबद्दल कोणी काही बोलत नव्हते.

हा सगळा तमाशा महिनाभर चालला आणि हळू हळू थंड झाला. या काळात काही मूर्ख लोकांनी तर तिथे आता खूप श्रीमंती येणार म्हणून दिल्ली आणि मुंबईमधल्या नोक-या सोडून गावाकडे धाव घेतली. काही लोकांनी तिथल्या आसपास जमीनी विकत घेतल्या. सगळ्या वाहिन्यांनी आपापला टीआरपी वाढवून घेतला आणि जाहिरातींमधून कमाई करून घेतली.

अशी ही या वर्षातली एक नवलकथा. असे काही होऊ शकेल यावरसुद्धा विश्वास बसत नाही. पण सत्य हे कल्पिताच्या पलीकडे असते असे म्हणतात त्याची प्रचीती आली.


Monday, December 16, 2013

अणुशक्तीचा शोध - भाग १ ते ४



हा लेख आधी चार भागात लिहिला होता. ते चार भाग एकत्र केले. दि,१२-०३-२०२५

अणुशक्तीचा शोध - भाग १ परंपरागत ऊर्जास्त्रोत

"या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता । नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमोनमः।।" असे देवीच्या प्रार्थनेतल्या एका श्लोकात म्हंटले आहे. "सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीच्या रूपाने निवास करणाऱ्या देवीला नमस्कार." असा या श्लोकाचा अर्थ होतो. वाघसिंहासारख्या हिंस्र श्वापदांच्या अंगात तर अचाट बळ असतेच, मुंग्या आणि डासांसारख्या बारीक कीटकांच्या अंगातही त्यांच्या शरीराच्या आकाराच्या मानाने भरपूर ताकत असते. प्राणीमात्रांकडे असलेली शक्ती त्यांच्या हालचालींमधून स्पष्टपणे दिसत असते. आपल्या स्वतःच्या तसेच सजीवांच्या शरीरातली शक्ती आणि ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, प्रवाह यांच्यासारखी निसर्गामधल्या ऊर्जेची रूपे आपल्याला रोजच्या पाहण्यात दिसत असतात, हे सगळे अगदी आपल्या दैनंदिन जीवनाचे भाग आहेत. 'शक्ती' या मराठी शब्दाचा रूढ अर्थ बराच मोघम आणि व्यापक आहे. मंत्रशक्ती, तंत्रशक्ती, दैवी शक्ती, इच्छाशक्ती वगैरेंचासुद्धा त्यात समावेश होतो. 'शक्ती' या शब्दाचा उपयोग 'सामर्थ्य' या आणखी एका मोघम अर्थाने केला जातो. अशा इतर प्रकारच्या शक्तींशी अणुशक्तीचा कसलाही संबंध नाही. हा लेख विज्ञानासंबंधी असल्यामुळे 'तशा' प्रकारच्या शक्तींना यात स्थान नाही. हे पाहता 'एनर्जी' या अर्थाने 'ऊर्जा' या शब्दाचा वापर मी या लेखात शक्यतोवर करणार आहे.

ऊन, वारा आणि नदीचा प्रवाह या निसर्गातील शक्तींचा उपयोग करून घेऊन आपले जीवन अधिकाधिक चांगले बनवण्याचे प्रयत्न मानव अनादिकालापासून आजतागायत करत आला आहे. उदाहरणे द्यायची झाल्यास कपडे किंवा धान्य वाळवण्यासाठी उन्हामधील ऊष्णतेचा उपयोग केला जातो, सोलर हीटर्स आणि फोटोव्होल्टाइक सेल्स वगैरेंचा वापर आता वाढत्या प्रमाणात होऊ लागला आहे. वाऱ्यामधील ऊर्जेवर पूर्वी शिडाची जहाजे चालत असत, आताही यॉट्स नावाच्या नौकांना शिडे असतात, हॉलंडमधले लोक पवनचक्क्यांचा उपयोग पाणी उपसण्यासाठी करत असत आणि विंड टर्बाईन्स हे आता जगभरात वीजनिर्मितीचे एक महत्वाचे साधन झाले आहे. लाकडाचे ओंडके आणि तराफे यांना पूर्वापारपासून नदीच्या पाण्याच्या सहाय्याने पुढे वहात नेले जात असे, मध्ययुगात काही ठिकाणी पाणचक्क्या बसवून त्यांच्या सहाय्याने यंत्रे चालवली गेली आणि आता हैड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन्समध्ये विजेची निर्मिती होते.

निसर्गामधील ऊर्जेच्या या साधनांचा उपयोग करून घेण्यासाठी ऊर्जेचे हे स्रोत (सोर्सेस) जिथे आणि जेंव्हा उपलब्ध असतील तेंव्हा तिकडे जाणे आवश्यक असते. उदाहरणार्थ रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात ढगाळ हवा असतांना कडक ऊन नसते आणि नदी ज्या भागामधून  वहात असेल तिथे जाऊनच तिच्या प्रवाहाचा उपयोग करून घेता येतो. दुसरी गोष्ट म्हणजे या नैसर्गिक स्रोतांवर माणसाचे कणभरही नियंत्रण नसते. जेवढे प्रखर ऊन पडेल, जेवढ्या जोराचा वारा सुटेल आणि ज्या वेगाने पाणी वहात असेल त्यानुसार त्याला आपले काम करून घ्यावे लागते. निसर्गामधील ऊर्जांचा फक्त अभ्यास करता येतो, ते कुठे, कधी आणि किती उपलब्ध आहेत हे समजून घेता येते, पण आपल्याला हवे असेल तेंव्हा किंवा हवे तिथे त्यांना निर्माण करता किंवा आणता येत नाही.

अग्नी चेतवणे आणि विझवणे याचे तंत्र मानवाने अवगत करून घेतल्यानंतर ऊर्जेचे हे साधन मात्र त्याला केंव्हाही, कोठेही आणि हव्या तेवढ्या प्रमाणात मिळवणे शक्य झाले. साधे भात शिजवणे असो किंवा खनिजापासून धातू तयार करणे आणि त्याला तापवून आणि ठोकून हवा तसा आकार देणे असो, गरजेप्रमाणे चुली, शेगड्या आणि भट्ट्या वगैरे बांधून आपण आपल्याला पाहिजे असेल तेंव्हा आणि पाहिजे त्या जागी अग्नीचा उपयोग करून घेऊ शकतो. त्यासाठी असंख्य प्रकारचे ज्वलनशील, ज्वालाग्राही आणि स्फोटक पदार्थ मानवाने शोधून काढले, तोफा आणि बंदुकांसारखी शस्त्रास्त्रे निर्माण केली, वाफेवर आणि तेलावर चालणारी इंजिने तयार केली. आता अग्निबाणांच्या सहाय्याने अवकाशात याने पाठवत आहे. अग्नि हे ऊर्जेचे प्रमुख प्राथमिक साधन (प्रायमरी सोर्स) झाले आहे.

आकाशात अचानक चमकणारी वीज हा ऊर्जेचा एक अद्भुत असा प्रकार आहे. कानठळ्या बसवणाऱ्या गडगडाटासह ती अवचितपणे येते, डोळ्यांना दिपवणाऱ्या प्रकाशाने क्षणभरासाठी आकाश उजळून टाकते आणि पुढच्या क्षणी अदृष्य होऊन जाते. एकाद्या घरावर किंवा झाडावर वीज कोसळली तर त्याची पार राखरांगोळी करून टाकते. तिच्या या रौद्र स्वरूपामुळे पूर्वी माणसाला विजेबद्दल फक्त भीती वाटायची. तशी ती अजूनही वाटते कारण आकाशातल्या विजेवर कसलेही नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. तिच्या तडाख्यामधून वाचण्याचे काही उपाय मात्र आता उपलब्ध झाले आहेत. याच विजेची कृत्रिमपणे निर्मिती करून तिच्यावर मात्र आता इतक्या प्रकारे नियंत्रण करणे शक्य झाले की त्यामुळे मानवाच्या जीवनात क्रांतीकारक बदल झाले. कारखान्यांमधली अवजड यंत्रे विजेवर चालतात आणि त्यातून आपल्याला रोज लागणाऱ्या बहुतेक सगळ्या वस्तू तयार होतात, विजेवर चालणाऱ्या रेल्वेच्या इंजिनांमुळे प्रवास सुखकर झाला आहे. विजेच्या उपयोगामुळेच टेलिफोन, काँप्यूटर्स, इंटरनेट वगैरे अनंत उपकरणे चालतात, आपले रोजचे जीवन आता जवळजवळ पूर्णपणे विजेवर अवलंबून असते. 

ऊन, वारा यासारखे ऊर्जेचे नैसर्गिक स्रोत पूर्णपणे निसर्गाच्या मर्जीनुसारच उपलब्ध होतात. इंधनाच्या ज्वलनातून मिळणारी ऊष्णता आणि प्रकाश काही प्रमाणात हवे तेंव्हा आपल्या नियंत्रणाखाली निर्माण करता येतात. पण ही ऊर्जा जिथे निर्माण होते तिथेच तिचा वापर करावा लागतो. खिचडी शिजवायची असेल तर पातेले चुलीवरच ठेवावे लागते, बिरबलाने केले त्याप्रमाणे ती हंडी उंचावर टांगून ठेवली तर तिच्यातली खिचडी कधीच शिजणार नाही. समईचा मंद उजेड खोलीच्या एका कोपऱ्यात पडेल, बाहेरच्या अंगणात तो दिसणार नाही. विजेच्या बाबतीत मात्र एका जागी असलेल्या वीजनिर्मितीकेंद्रात (पॉवर स्टेशनमध्ये) मोठ्या प्रमाणावर तयार झालेली वीज तारांमधून शेकडो किलोमीटर दूरपर्यंत नेता येते आणि तितक्या दूरवर पसरलेल्या शेकडो गावांमधल्या हजारो घरातले दिवे, पंखे वगैरेंना पुरवता येते. याच्या उलट पाहता मनगटी घड्याळासारख्या (रिस्टवॉचसारख्या) लहानशा यंत्राला लागणारी अत्यल्प वीज नखाएवढ्या बटनसेलमधून तयार करून त्याला पुरवता येते. विजेच्या या गुणामुळे तिचा उपयोग अनंत प्रकारांनी केला जातो.

वीज या प्रकारच्या ऊर्जेचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की तिचे ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, प्रवाह यांच्यासारख्या ऊर्जेच्या इतर रूपांमध्ये परिवर्तन करणे सुलभ असते. मायक्रोफोनमध्ये ध्वनी पासून विजेचा प्रवाह तयार होतो आणि स्पीकरमध्ये याच्या उलट होते, विजेच्या बल्बमधून प्रकाशकिरण बाहेर पडतात आणि सोलर सेलमध्ये याच्या उलट होते, ओव्हन, हीटर, गीजर वगैरेंमध्ये विजेपासून ऊष्णता निर्माण होते, विजेद्वारे चक्र फिरवता येते आणि त्या चक्राला पाती जोडून त्याचा पंखा किंवा पंप केला की त्यांच्या उपयोगाने हवेचा किंवा पाण्याचा प्रवाह तयार करता येतो. यांच्या उलट वॉटरटर्बाइन्समधील पाण्याच्या प्रवाहामुळे एक चाक फिरते आणि त्या चाकाला जोडलेल्या जनरेटरमध्ये वीज तयार होते. स्टीम टर्बाइन किंवा गॅस टर्बाइन्समध्ये ऊष्णतेचे परिवर्तन विजेमध्ये केले जाते. घरकामात, ऑफीसांमध्ये किंवा अनेक प्रकारच्या कारखान्यांमध्ये विजेचा वापर करणे सोयिस्कर आणि किफायतशीर असल्यामुळे अन्य मार्गांनी उपलब्ध झालेल्या ऊर्जेचे विजेमध्ये परिवर्तन करून तिचा उपयोग करणे आता रूढ झाले आहे. दुर्गम अशा अरण्यांमध्ये किंवा पर्वतशिखरांवर जिथे वीज पोचवणे फार कठीण आहे असे अपवाद वगळल्यास बाकीच्या सगळ्या जगात आता विजेचा उपयोग रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे. एकाद्या देशाचा किंवा विभागाचा किती विकास झाला आहे याचे मोजमाप आता तिथे होत असलेल्या विजेच्या वापराशी निगडित झाले आहे.

.  . . . . . . . . . 

अणुशक्तीचा शोध - भाग २  ऊर्जेचे उगमस्थान

आपल्या रोजच्या ओळखीचे परंपरागत ऊर्जेचे काही प्रकार आपण पहिल्या भागात पाहिले. पण आपल्याला यांच्याबद्दल कितीशी माहिती असते? आपल्या हातापायांमधले बळ आपल्याला खाण्यापिण्यामधून मिळते एवढे सगळ्यांना माहीत असते. लाकूड जाळल्याने जशी आग निघते त्याचप्रकारे पण एक सौम्य आग (जठराग्नि) आपल्या पोटात तेवत असते आणि त्या अग्नीला अन्नाची आहुती देतांना आपण एक यज्ञ करत असतो असे 'वदनि कवळ घेता .. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।।' या श्लोकात म्हंटले आहे. पण "आपण खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत होणारे रूपांतर कसे, केंव्हा आणि नेमके कुठे होते? लाकडाच्या जळण्यामधून तरी ऊष्णता आणि उजेड का बाहेर निघतात?" असले प्रश्न बहुतेक लोकांना कधी पडतच नाहीत. यासारखे "नदीच्या खळाळणाऱ्या पाण्याला कशामुळे जोर मिळतो? ती नेहमी पर्वताकडून समुद्राकडेच का वाहते? त्या वाहण्याच्या क्रियेसाठी लागणारी ऊर्जा तिला कुठून मिळते? वारे कशामुळे वाहतात?" असे अनेक प्रश्न असतात. "परमेश्वराची योजना किंवा लीला" असेच अशा प्रश्नांचे उत्तर बहुतेक लोकांकडून मिळेल. लहान मुलांनी जिज्ञासेपोटी असे प्रश्न विचारले असता ती वेळ निभावून नेण्यासाठी सगळी जबाबदारी देवबाप्पावर टाकली जाते आणि "देवबाप्पा जे काय करेल ते अंतिम, त्याच्यापुढे काही विचारायचे नाही." अशी ताकीद देऊन त्यांना गप्प केले जाते. नंतर असल्या प्रश्नांची उत्तरे माहीत नसली तरी त्यावाचून आपले काही अडत नाही असे म्हणून मोठेपणी त्यांचा सहसा कोणी विचार करत नाही.

सर्वसाधारणपणे असे असले तरी काही लोक याला अपवाद असतात. पूर्वी त्यांना तत्वज्ञ (फिलॉसॉफर) म्हणत, आता वैज्ञानिक (सायंटिस्ट) म्हणतात. "देवाची करणी" या उत्तराने त्यांचे समाधान होत नाही. उपलब्ध असलेली माहिती, आपली बुद्धी, विचारशक्ती आणि अनुभव यांच्या आधारे ते यापेक्षा वेगळे उत्तर शोधू पाहतात. त्यासाठी ते कष्ट घेतात, प्रयोग आणि निरीक्षण करतात, त्यावर मनन चिंतन वगैरे करून समर्पक आणि सुसंगत असे उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करतात. अशा विद्वान लोकांनी अग्नि, वायू, सूर्यप्रकाश यासारख्या ऊर्जेच्या निरनिराळ्या रूपांचा आणि निसर्गातल्या ऊर्जास्त्रोतांचा बारकाईने अभ्यास केला, त्यांच्यामागे असलेली शास्त्रीय कारणे शोधली, सिद्धांत मांडले, ते सगळे समजून घेऊन त्यांचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल याचे प्रयत्न केले. यातून विज्ञान आणि तंत्रज्ञानातली प्रगती होत गेली.

"झाडावरून वेगळे झालेले सफरचंद नेहमी खाली जमीनीवरच का येऊन पडते?" या प्रश्नावर विचार करता "जमीनच त्याला तिच्याकडे ओढत असणार." अशी न्यूटनची खात्री पटली आणि त्याने या आकर्षणाचे गणिती नियम समजून घेतले आणि जगाला सांगितले. सुप्रसिद्ध सफरचंदाप्रमाणे ढगातल्या पाण्याच्या थेंबांनाही पृथ्वी खाली खेचते आणि त्यामुळे आकाशातून जमीनीवर पाऊस पडतो. पण मग "पर्वतावर पडलेल्या पावसाचे पाणी जर पर्वताच्या आकर्षणामुळे ढगामधून खाली येऊन पडले असेल तर त्याच आकर्षणामुळे ते तिथेच का थांबत नाही? डोंगर हा सुद्धा पृथ्वीचाच भाग आहे ना? मग ते पाणी त्याला सोडून उतारावरून आणखी खाली का धावत येते आणि त्यातून तयार झालेली नदी वहात वहात पुढे जात अखेर समुद्राला का जाऊन मिळते?" असे काही प्रश्न उठतात. याचे कारण पृथ्वीचे आकर्षण त्या पाण्याला फक्त जमीनीकडे ओढण्यापुरते नसते तर ते त्याला पृथ्वीच्या गोलाच्या केंद्राच्या दिशेने खेचत असते. पर्वताचा भाग त्या गोलाच्या मध्यबिंदूपासून दूर असतो आणि समुद्राचा तळ त्यामानाने जवळ असतो. यामुळे पावसाचे पाणी डोंगरावरून जिकडे उतार असेल त्या दिशेने वाहू लागते आणि समुद्राला मिळेपर्यंत वहात राहते. नदीचे वाहणे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे घडत असते. याचाच अर्थ नदीमधल्या वाहत्या पाण्यामधली वाहण्याची शक्ती त्या पाण्याला पृथ्वीकडून मिळते.

पण मग त्या आधी ते पाणी समुद्रामधून उठून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध उंच पर्वतावर कसे जाऊन पोचते? याचे उत्तर असे आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याची सूर्याच्या उन्हाने वाफ होते. ही वाफ हवेपेक्षा हलकी असते. यामुळे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती हवेला अधिक जोराने आपल्याकडे ओढत असते आणि त्यामुळे तिच्या तुलनेने हलकी असलेली वाफ पृथ्वीपासून दूर (वातावरणात उंचावर) ढकलली जाते. म्हणजे या गोष्टीलासुध्दा पृथ्वी कारणीभूत असते. पण उंचावर गेलेली वाफ थंड होऊन तिच्यात पाण्याचे सूक्ष्म कण तयार होतात आणि त्यातून ढग तयार होतात. वाऱ्यामुळे हे ढग समुद्रापासून दूर दूर ढकलले जात राहतात. वाटेत एकादा डोंगर आडवा आला तर ते पुढे जाऊ शकत नसल्याने त्याला आपटून ते आणखी वर जाऊ पाहतात, पण तिथले तापमान कमी असल्याने ढगातली वाफ थंड होऊन पाण्याचे थेंब आकाराने वाढत जातात आणि ते हवेहून जड असल्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली येऊन जमीनीवर बरसतात. याचाच अर्थ जमीनीवरील किंवा समुद्रामधील पाण्याला आधी सूर्यापासून ऊर्जा मिळते. ती वाफेमध्ये सुप्त अवस्थेत (लेटेंट हीट) असते, उंच पर्वतावर पडलेल्या पाण्यातही  सुप्तरूपाने (पोटेन्शियल एनर्जी) असते. पृथ्वीच्या आकर्षणाने ते पाणी नदीमधून वाहू लागल्यावर त्याला गतिमान रूप (कायनेटिक एनर्जी) मिळते. अशा प्रकारे या ऊर्जेचा मूळ स्त्रोत सूर्य असतो आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्या ऊर्जेच्या रूपात बदल घडवून आणते असेही म्हणता येईल. याचप्रमाणे वाळवंटामधील हवा उन्हाने तप्त होऊन विरळ होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे या हवेचा तिच्यावर जो दाब पडत असतो तो कमी (हलका) होतो आणि जास्त दाब असलेली तुलनेने थंड हवा तिकडे धाव घेते. याला आपण वारा म्हणतो. म्हणजेच वाहत्या वाऱ्यामधील ऊर्जासुध्दा त्याला अप्रत्यक्षपणे सूर्याकडूनच मिळते. पण सूर्य आणि अग्नी यांची ऊर्जा कोठून येते? या प्रश्नाची उकल समजून घेण्यापूर्वी आणखी काही गोष्टी ठाऊक असणे आवश्यक आहे.

आपल्या समोर आलेली कुठलीही नवी वस्तू किंवा पदार्थ कशापासून तयार झाला असेल हा विचार पटकन आपल्या मनात येतो. व्यापक विचार करणाऱ्या विद्वानांना आपले विश्व कशापासून बनलेले असावे हे एक मोठे आकर्षक कोडे वाटत आले आहे. ते सोडवण्याचे प्रयत्न वैज्ञानिक लोक पूर्वापारपासून करत आले आहेत आणि पुढेही करत राहणार आहेत. जगातले सर्व पदार्थ सूक्ष्म कणांपासून तयार झालेले आहेत असे मुनिवर्य कणाद यांनी सांगितले  होते. या कणांसंबंधी त्यांनी आणखी काही तपशील सांगितला असला तरी तो मला माहीत नाही. पृथ्वी, आप (पाणी), तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांमधून प्रत्येक जड पदार्थ तयार झाला आहे असे आपल्या प्राचीन काळातल्या शास्त्रकारांनी सांगितले होते पण हे निदान ढोबळ मानाने झाले. पृथ्वीवरील दगडमाती सगळीकडे एकसारखी नसते, त्यात विपुल वैविध्य आहे, सागर, नदी, तलाव, विहिरी यांमधले पाणी वेगवेगळे असते, हवेतसुद्धा नायट्रोजन, ऑक्सीजन आणि काही इतर वायू मिसळलेले असतात. यामुळे याहून जास्त तपशीलात जाणे आवश्यक आहे. या विश्वामधील सर्व पदार्थ अतीसूक्ष्म अशा कणांपासून बनले आहेत ही कल्पना दोन तीन शतकांपूर्वी सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केली आणि सर्वांच्या मनात ती रुजली. त्यानंतर त्यांनी या कणांच्या गुणधर्मांचा कसून अभ्यास केला.

जगामधले पदार्थ जसे एकमेकांपासून वेगळे असतात त्याचप्रमाणे त्यांचे कणसुद्धा एकमेकांसारखे नसणारच. शास्त्रज्ञांनी सर्व पदार्थांचे तीन प्रमुख वर्ग केले आहेत. लोह (लोखंड), ताम्र (तांबे), कर्ब (कार्बन), गंधक (सल्फर). प्राणवायू (ऑक्सीजन), नत्रवायू (नायट्रोजन) यासारखी सुमारे शंभर मूलद्रव्ये असतात. ऑक्सीजन आणि हैड्रोजन मिळून पाणी तयार होते, सोडियम आणि क्लोरिनच्या संयोगातून मीठ होते, अशा प्रकारची असंख्य संयुगे (कॉम्पाउंड्स) असतात. पण दगड, माती, दूध, दही, पानेफुले वगैरे आपल्या ओळखीच्या बहुतेक पदार्थांमध्ये अनेक संयुगांचे किंवा मूलद्रव्यांचे मिश्रण (मिक्श्चर) असते. ऑक्सीजन आणि हैड्रोजन मिळून तयार झालेल्या पाणी या संयुगाचे गुणधर्म सर्वस्वी वेगळे असतात. पण पाण्यात मीठ विरघळले तर त्यात पाण्याचे आणि मिठाचे अशा दोन्ही द्रव्यांचे गुण असतात. यामुळे ते एक मिश्रण असते. पितळ किंवा स्टेनलेस स्टील हीसुद्धा संयुगे नसून मिश्रणे आहेत. हवा हेसुद्धा एक मिश्रण आहे आणि तिच्यामधील निरनिराळे वायू स्वतःचे गुणधर्म बाळगून असतात.

मूलद्रव्यांच्या सर्वात सूक्ष्म कणाला अणू (अॅटम) आणि संयुगांच्या सर्वात सूक्ष्म कणाला रेणू (मॉलेक्यूल) असे नाव दिले आहे. अर्थातच एका रेणूमध्ये दोन किंवा त्याहून जास्त (कितीही) अणू असतात, पण ते एकमेकांना रासायनिक बंधनाने (केमिकल बाँडिंगने) जुळलेले असतात.  हे रेणू साध्या डोळ्यांनी तर नाहीच, पण दुर्बिणीमधूनसुध्दा प्रत्यक्षात दिसत नसले तरी शास्त्रज्ञांनी त्यांच्या रचनेबद्दल काही काल्पनिक संकल्पना मांडल्या आणि पदार्थांच्या गुणधर्मांच्या निरीक्षणांमधून त्यांना अप्रत्यक्षपणे पण निश्चित स्वरूपाचा दुजोरा मिळत गेला. या सूक्ष्म कणांच्या अभ्यासातून त्यांचे जे गुणधर्म समजले, त्यात असे दिसले की हे सर्व कण चैतन्याने भारलेले असतात. याची अनेक सोपी उदाहरणे दाखवता येतील.

भरलेला फुगा फोडला की त्याच्या आतला वायू क्षणार्धात हवेत विरून जातो, त्याला परत आणता येत नाही. कारण त्यातील सूक्ष्म कण स्वैरपणे इतस्ततः भरकटत असतात. स्वच्छ पाण्याने भरलेल्या पेल्यात कोकाकोलाचा एक थेंब टाकला की तोसुध्दा सगळीकडे पसरतांना दिसतो, कारण द्रवरूप पदार्थांचे सूक्ष्म कण सुध्दा एका जागेवर स्थिर न राहता वायूंपेक्षा कमी वेगाने पण सतत संचार करत असतात. घनरूप पदार्थांचे तपमान वाढले की ते प्रसरण पावतात आणि कमी झाले की आकुंचन पावतात, कारण त्यांचे सूक्ष्म कण सुध्दा जागच्या जागीच हालचाल करत असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर जड वस्तूंच्या सूक्ष्म कणांमध्ये सुध्दा एक चैतन्य असते. सर्व अणुरेणूंमध्ये एक प्रकारची सुप्त ऊर्जा भरलेली असते. ज्या वेळी ती ऊर्जा ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, गतिमानता यासारख्या रूपामध्ये प्रकट होते तेंव्हा ती आपल्या जाणीवांच्या कक्षेत येते. तिला ओळखणे, तिचे मोजमाप करणे, तिचा उपयोग करून घेणे अशा गोष्टी आपल्याला अवगत असतील तर आपल्याला ती ऊर्जा प्राप्त झाली असे वाटते. प्रत्यक्षात कोणतीही ऊर्जा नव्याने निर्माण होत नाही किंवा ती नष्टही होत नाही असा काँझर्व्हेशन ऑफ एनर्जीचा नियम आहे. ती फक्त कधी आपल्याला जाणवते आणि तिचा उपयोग करणे शक्य होते आणि कधी ती सुप्त रूपात असते.

.  . . .  . . . . .  . . . . . . . . .  .

 अणुशक्तीचा शोध - भाग ३ ऊर्जेची निर्मिती







वैज्ञानिकांनी केलेल्या निरीक्षणांमधून आणि संशोधनामधून निसर्गातल्या ऊर्जेची रहस्ये कशी उलगडत गेली याचे एक उदाहरण मागील भागात दिले होते. अशा संशोधनामधून मिळत गेलेल्या ज्ञानाचा अधिकाधिक उपयोग मानव आपल्या फायद्यासाठी करत गेला. त्यातून तो नवनवी कार्यक्षम आणि अचूक (प्रिसिजन) उपकरणे आणि यंत्रेसुध्दा बनवत गेला आणि त्यांच्याद्वारे त्याने आपली निरीक्षणशक्ती अमाप वाढवली. माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांना ज्यांची जाणीव होऊ शकत नाही अशी निसर्गातली अनेक रहस्ये त्यातून उलगडली गेली. कानाला ऐकू न येणारे आवाज (अल्ट्रासॉनिक वेव्हज), डोळ्यांना दिसू न शकणारे प्रकाशकिरण (अल्ट्राव्हायेलेट, इन्फ्रारेड लाइट, क्षकिरण वगैरे) आणि बोटाला न जाणवणारी स्पंदने (व्हायब्रेशन्स) यांचे अस्तित्व मानवाच्या या वाढलेल्या सामर्थ्यामुळे समजले, त्यांची निर्मिती आणि मोजमाप करणे शक्य झाले. ज्ञानसंपादनाच्या अनेक नव्या खिडक्या उघडल्यामुळे नवनवे वैज्ञानिक शोध लागत जाण्याच्या प्रक्रियेला वेग आला.

निरनिराळ्या स्वरूपातील ऊर्जेचे अस्तित्व, तिचे एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे वहन, ऊर्जेचे एका रूपामधून दुसऱ्या रूपात रूपांतर होणे वगैरेंसाठी निसर्गाचे निश्चित असे स्थलकालातीत नियम आहेत. ते व्यवस्थित समजून घेऊन त्यांचा उपयोग करून घेण्याचे काम वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ करत असतात. त्यांच्या प्रयत्नांमधून ऊर्जेचे काही अद्भुत असे नवे स्रोत मानवाला मिळत गेले. आपली पृथ्वी स्वतःच एक महाकाय लोहचुंबक आहे आणि तिचे चुंबकीय क्षेत्र आपल्या संवेदनांना जाणवत नसले तरी ते आपल्या चहू बाजूंना पसरले आहे हे समजले. आकाशामधून धरतीवर कोसळणाऱ्या विद्युल्लतेकडे पाहून भयभीत होण्यापलीकडे काहीही करू न शकणारा मानव कृत्रिम रीत्या विजेचे उत्पादन करू लागला. यात त्याने इतकी विविधता आणली आणि इतके नैपुण्य संपादन केले की अत्यंत प्रखर अशी ऊष्णता निर्माण करणे, महाकाय यंत्रांची चाके फिरवणे, लक्षावधी गणिते चुटकीसरशी सोडवणे किंवा जगाच्या पाठीवरील दूर असलेल्या ठिकाणी आपले संदेश अतीशय सूक्ष्म अशा विद्युल्लहरींमधून कल्पनातीत वेगाने पाठवणे अशी निरनिराळ्या प्रकारची कामे तो विजेकडून करून घेऊ लागला आहे.

विश्वातील असंख्य पदार्थाची रचना असंख्य निरनिराळ्या प्रकारच्या रेणूंपासून झाली असली सुमारे फक्त शंभर एवढ्याच मूलद्रव्यांपासून हे असंख्य पदार्थ निर्माण झाले आहेत. मागील भागात दिल्याप्रमाणे या मूलद्रव्यांच्या सूक्ष्मतम कणांना अणु (अॅटम) असे नाव ठेवले गेले. अर्थातच दोन किंवा अधिक अणूंच्या संयोगातून रेणू (मॉलेक्यूल्स) बनतात हे ओघाने आले. या नव्या संयुगाचे (काम्पाउंड्सचे) आणि त्याच्या रेणूंचे गुणधर्म सर्वस्वी वेगळे असतात. हे मागील भागात उदाहरणासह सांगितले आहे. मी शाळेत शिकत असतांना मॉलेक्यूलला अणु आणि अॅटमला परमाणु असे म्हणत असत. आता त्या ऐवजी अनुक्रमे रेणू आणि अणु अशी नावे प्रचारात आली आहेत. गोंधळ टाळण्यासाठी इंग्रजी नावे कंसात दिली आहेत.

जेंव्हा कोळशाचा म्हणजे कार्बन या मूलद्रव्याचा प्राणवायू (ऑक्सीजन)शी संयोग होतो. तेंव्हा कर्बद्विप्राणिल (कार्बन डायॉक्साइड) वायू तयार होतो आणि त्याबरोबर ऊष्णता बाहेर पडते. या रासायनिक क्रियेमधून निर्माण होणारी ऊर्जा कोठून येते? असा प्रश्न पूर्वी अनुत्तरित होता. संशोधन, विचार आणि संवाद यामधून त्याचे उत्तर मिळाले ते साधारणपणे असे आहे. जेंव्हा दोन कमावत्या व्यक्ती एकत्र राहू लागतात, तेंव्हा त्यांचे काही आवश्यक खर्च समाईकपणे भागवले जातात आणि त्यामुळे पूर्वी त्यावर खर्च होत असलेले त्यांचे काही पैसे शिल्लक राहतात. त्याप्रमाणे जेंव्हा दोन वेगवेगळे अणु (अॅटम) किंवा रेणू (मॉलेक्यूल्स) अस्तित्वात असतात तेंव्हा त्यांना त्यासाठी काही ऊर्जा आवश्यक असते. पण ते एकत्र आले की त्या नव्या संयुगाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेली ऊर्जेची गरज कमी होते आणि ही उरलेली जास्तीची ऊर्जा ऊष्णतेच्या स्वरूपात त्या नव्या रेणूला (मॉलेक्यूलला) मिळते. वर दिलेल्या उदाहरणात कार्बन आणि प्राणवायू यांच्या अणूंना स्वतंत्रपणे राहण्यासाठी एकंदर जेवढी ऊर्जा लागते त्यापेक्षा कर्बद्विप्राणिलच्या रेणूला कमी ऊर्जेची गरज असते, उरलेली ऊर्जा त्याला मिळते आणि तापवते.  अर्थातच ही ऊर्जा आधीपासूनच कार्बन आणि ऑक्सीजन या पदार्थांमध्येच सुप्त रूपाने (केमिकल पोटेन्शियल एनर्जी) वास करत असते, ज्वलनाच्या रासायनिक क्रियेमुळे आपल्याला जाणवेल अशा ऊष्णतेच्या स्वरूपात ती बाहेर पडते. अग्नीमधून मिळणारी ऊर्जा कोठून आली या प्रश्नाला मिळालेल्या या उत्तराबरोबर ऊष्णता निर्माण करणाऱ्या असंख्य रासायनिक प्रक्रियांचे (एक्झोथर्मिक रिअॅक्शन्सचे) गूढ उलगडले.

एकाद्या रसायनामध्ये दोन भिन्न धातूंचे कांब (रॉड किंवा इलेक्ट्रोड्स) बुडवून ठेवले आणि त्या कांबांना तांब्याच्या तारेने जोडले तर त्यामधून विजेचा सूक्ष्म प्रवाह सुरू होतो हे प्रयोगांमधून सिद्ध झाले. त्यानंतर निरनिराळे धातू, अधातू आणि रसायने यांच्यावर प्रयोग करण्यात आले आणि त्यामधून एकापेक्षा एक चांगल्या बॅटरी सेल्स तयार करण्यात आल्या. या उपकरणामध्ये दोन्ही इलेक्ट्रोड्स आणि त्यांच्या बाजूला असलेले रसायन यांच्या दरम्यान रासायनिक क्रिया (केमिकल रिअॅक्शन्स) होतात. या क्रिया विद्युतरासायनिक (इलेक्ट्रोकेमिकल) अशा प्रकारच्या असल्यामुळे घन (पॉझिटिव्ह) आणि ऋण (निगेटिव्ह) इलेक्रोड्समध्ये विजेचा भार (चार्ज) निर्माण होतो आणि त्यांना तारेने जोडल्यास त्यामधून विजेचा प्रवाह वाहू लागतो. या ठिकाणी इलेक्ट्रोड्स आणि रसायने यामध्ये सुप्त रूपाने असलेल्या केमिकल पोटेन्शियल एनर्जीचे विजेत रूपांतर होते. अर्थातच यामुळे ते रसायन क्षीण होत जाते आणि ही क्रिया मंद मंद होत काही वेळाने थांबते. विजेची बॅटरी लावून ठेवली तर फार वेळ टिकत नाही हे आपल्याला माहीत असते. काही विशिष्ट रसायनांच्या बाबतीत याच्या उलट करता येते. त्यातल्या इलेक्ट्रोड्सना बाहेरून विजेचा पुरवठा केला तर क्षीण झालेले रसायन पुन्हा सशक्त होते. कार किंवा इन्व्हर्टरची बॅटरी चार्ज करतांना हे घडत असते. अशी चार्ज झालेली बॅटरी पुन्हा डिसचार्ज होत विजेचा पुरवठा करू शकते.

लोहचुंबकाच्या क्षेत्रात (मॅगेन्टिक फील्डमध्ये) तांब्याची तार वेगाने नेली किंवा तारेच्या वेटोळ्यामधून लोहचुंबक वेगाने नेला तर त्या तारेमध्ये विजेचा प्रवाह वाहतो. तसेच तांब्याच्या तारेच्या वेटोळ्याच्या मध्यभागी साधी लोखंडाची कांब ठेवली आणि त्या तारेमधून विजेचा प्रवाह सोडला तर तो लोखंडाचा तुकडा लोहचुंबक बनतो. याला विद्युतचुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटिक) परिणाम असे म्हणतात. याचे आकलन झाल्यानंतर कृत्रिम रीत्या वीज कशी निर्माण करता येते हे मानवाला समजले. त्यानंतर विजेचे उत्पादन जोरात सुरू झाले. सायकलला जोडता येईल इतक्या लहानशा डायनॅमोपासून ते हजारो मेगावॉट वीज तयार करून लक्षावधी लोकांच्या गरजा भागवू शकणाऱ्या मेगापॉवरस्टेशन्सपर्यंत अनेक प्रकारचे विद्युत उत्पादक (जनरेटर्स) तयार केले गेले आणि केले जात आहेत. या सर्वांमध्ये फिरणाऱ्या चाकामधील  कायनेटिक (मेकॅनिकल) एनर्जीचे रूपांतर विजेमध्ये होत असते.

एका चक्राला गरागरा फिरवून त्यातून वीजनिर्मिती करणे साध्य झाल्यानंतर ते चक्र फिरवण्यासाठी अनेक मार्ग शोधले गेले. पूर्वीच्या काळात गावोगावी वीजपुरवठा उपलब्ध झाला नव्हता तेंव्हा हाताच्या जोराने फिरवण्याचे एक चाक खेडेगावांमधल्या रेल्वेस्टेशनवर असायचे. ते फिरवून त्यातून निघालेल्या विजेमधून पुढच्या स्टेशनला संदेश पाठवले जात असत. पायाच्या जोराने मारायच्या पॅडलला जोडलेला डायनॅमो सायकलला लावला जात असे. स्कूटर आणि मोटार या वाहनांच्या मुख्य चक्रालाच एक वीज निर्माण करणारे यंत्र जोडलेले असते. त्यातून निघालेल्या विजेने बॅटरी चार्ज होत असते. नदीला धरण बांधून साठवलेल्या पाण्याच्या जोरावर हैड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन्समधल्या टर्बाईन नावाच्या यंत्राचे चाक फिरवले जाते. थर्मल पॉवर स्टेशन्समध्ये सुद्धा याच प्रकारचे एक अवाढव्य आकाराचे यंत्र असते. त्यात पुन्हा वाफेच्या जोरावर फिरणारे स्टीम टर्बाईन किंवा ऊष्ण वायूंच्या जोरामुळे फिरणारे गॅस टर्बाइन असे उपप्रकार आहेत.  विजेचा मुख्य पुरवठा काही कारणाने खंडित झाला तर अंधारगुडुप होऊ नये यासाठी आजकाल लहान डिझेल जनरेटर सेट्स सर्रास बसवले जातात.

विजेच्या वाढत्या उपयोगाचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये फार मोठा वाटा आहे. आभाळात चमकणारी निसर्गातली वीज जरी खाली आणून तिचा उपयोग करणे माणसाला शक्य झाले नसले तरी कृत्रिमरीत्या विजेची निर्मिती करण्याचे अनेक मार्ग त्याने शोधून काढले आणि ते त्याच्या जीवनात क्रांतिकारक ठरले.


.  . . . . . .  . . . . . . . . 

अणुशक्तीचा शोध - भाग ४ अणूपासून ऊर्जा - नवा स्त्रोत

"नदीच्या खळाळणाऱ्या पाण्याला कशामुळे जोर मिळतो? त्या वाहण्याच्या क्रियेसाठी लागणारी ऊर्जा तिला कुठून मिळते? वारे कशामुळे वाहतात?"  "सूर्याचे ऊन आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण" हे या प्रश्नांचे शास्त्रीय उत्तर विज्ञानाच्या अभ्यासामधून मिळत गेले. अग्नीमधून प्रकट होणारी ऊर्जा त्यात जळणाऱ्या पदार्थातच दडलेली असते आणि विशिष्ट रासायनिक क्रियेमध्ये ती प्रकट होते हे देखील समजले. वीज हे गूढ राहिले नाही. इतकेच नव्हे तर रासायनिक (इलेक्ट्रोकेमिकल) क्रिया आणि विद्युतचुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटिक) प्रभाव अशा दोन पद्धतींनी कृत्रिम रीतीने वीज तयार करता येऊ लागली. तरीसुद्धा सूर्य आणि आकाशातल्या ताऱ्यांमधून बाहेर पडत असलेल्या ऊर्जेचा स्रोत कोणता हे अजून गूढ होते.

सूर्यामधून सतत बाहेर पडत असलेली सगळी ऊर्जा टॉर्चचा एकादा झोत टाकावा त्याप्रमाणे थेट पृथ्वीकडे येत नसते. सूर्यमालिकेच्या विस्ताराचाच विचार केला तरी त्याच्या तुलनेत आपली 'विपुलाच पृथ्वी' धुळीच्या एकाद्या कणाएवढी लहान आहे. मोठ्या खोलीमध्ये पसरलेल्या प्रकाशाचा केवढा क्षुल्लक भाग धुळीच्या एका कणावर पडत असेल? सूर्यामधून निघालेल्या एकंदर प्रकाश आणि ऊष्णतेच्या प्रमाणात त्याचा तितपत भाग संपूर्ण पृथ्वीवर पडत असतो. त्यातलासुद्धा अत्यंत यत्किंचित भाग आपल्या वाट्याला येत असतो आणि तेवढेसे ऊनसुद्धा आपल्याला सहन करण्याच्या पलीकडचे वाटते. यावरून सूर्यामधून किती प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडत असेल याची कल्पना करता आल्यास करावी. इतकी प्रचंड ऊर्जा सूर्यामधून कशामुळे निघत असावी याचा अंदाज मात्र शास्त्रज्ञांनाही येत नव्हता. हा सर्वशक्तीमान देवाचा चमत्कार आहे असेच बहुतेक सगळ्या लोकाना पूर्वी वाटत असले तर त्यात नवल नाही. 

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीला मादाम मेरी क्यूरीने रेडिओअॅक्टिव्हिटीचा शोध लावला आणि पदार्थविज्ञानात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. रेडियम या मूलद्रव्याचा दुसऱ्या कशाशीही रासायनिक संयोग न होता आणि त्याच्या कोणत्याही गुणधर्मांमध्ये कसलाही बदल न होता विशिष्ट प्रकारचे प्रकाशकिरण त्या धातूमधून सतत बाहेर पडत असतात असे मादाम क्यूरीने दाखवून दिले. यामुळे हे कसे घडत असेल हे एक नवे गूढ जगापुढे आले. रेडियम या धातूपासून निघत असलेल्या या अदृष्य किरणांना रेडिओअॅक्टिव्हिटी असे नाव दिले गेले. अत्यंत सूक्ष्म प्रमाणातल्या अदृष्य अशा प्रकाशकिरणांचे अस्तित्व दाखवणारी, त्यांच्या तीव्रतेचे मापन करणारी उपकरणे तयार झाल्यानंतर त्यातही तीन प्रकार आढळले. त्यांना अल्फा रे, बीटा रे आणि गॅमा रे अशी नावे आहेत. रेडियमशिवाय तशा प्रकारे किरणोत्सार करणारे इतरही अनेक पदार्थ निसर्गामध्ये असतात. सर्वात हलक्या अशा हैड्रोजनपासून ते सर्वात जड युरेनियमपर्यंत ज्ञात असलेल्या बहुतेक सर्व मूलद्रव्यांना रेडिओअॅक्टिव्ह भावंडे असतात. या भावंडांना आयसोटोप म्हणतात. त्यांचे इतर सगळे गुणधर्म एकसारखे असतात, त्यामुळे ते एकमेकांमध्ये बेमालूमपणे मिसळलेले असतात. त्यातल्या रेडिओअॅक्टिव्ह आयसोटोपमधून अदृष्य असे किरण निघत असतात एवढाच त्यांच्यात फरक असतो.

मेरी क्यूरीच्या या शोधानंतर अनेक शास्त्रज्ञ रेडिओअॅक्टिव्हिटीचे गूढ उकलण्याच्या कामाला लागले. वस्तूच्या गतिमानतेमधली ऊर्जा (कायनेटिक एनर्जी) किंवा ध्वनिमधील ऊर्जा त्या पदार्थाच्या हलण्यामधून किंवा कंपनामधून (फिजिकल मूव्हमेंट्समधून) निर्माण होतात तर ज्वलनातून मिळणारी ऊर्जा रासायनिक (केमिकल) क्रियेमधून निर्माण होत असते. रेडिओअॅक्टिव्हिटी मात्र ऊर्जेच्या या इतर प्रकारांप्रमाणे निर्माण होत नव्हती. ती कुठून येत असावी यावर तर्क आणि विचार सुरू झाले. जगामधल्या सगळ्या पदार्थांच्या गुणधर्मांचा अभ्यास चाललेला होताच. मागील भागात दिल्याप्रमाणे अणू आणि रेणू यांचे अस्तित्व आणि त्यांच्या व्याख्या सर्वमान्य झाल्या होत्या. त्या व्याख्या पाहता अणू हाच सर्वात सूक्ष्म आणि अविभाज्य असा घटक असतो. पण शास्त्रज्ञांचे विचारचक्र मात्र तिथे न थांबता त्या अणूच्या अंतरंगात काय दडले असावे याचा शोध घेत राहिले.

अणूंची अंतर्गत रचना कशी असू शकेल याबद्दल अनेक प्रकारचे तर्क करण्यात येत होते. त्यावर विचारविनिमय आणि वादविवाद करू झाल्यानंतर सगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे तीन अतीसूक्ष्म मूलभूत कण वास करत असावेत हा सिध्दांत सर्वमान्य झाला, या तीन कणांचे काही प्रमुख गुणधर्म ठरवले गेले आणि अणूंच्या अंतरंगातल्या या अतीसूक्ष्म कणांची रचना कशा प्रकारे केली गेलेली असेल यावर अंदाज बांधले जाऊ लागले. या अतीसूक्ष्म कणांना कसल्याही प्रकारच्या दुर्बिणीमधून पहाणे कोणालाही शक्यच नसल्यामुळे यातली कोणतीही गोष्ट प्रत्यक्ष प्रमाणाने दाखवता येणेसुद्धा शक्य नव्हतेच. पण त्यांची रचना अशी असेल तर त्या पदार्थांमध्ये असे गुणधर्म येतील असे तर्क करून आणि ते गुणधर्म तपासून पाहून त्या सिध्दांतांची शक्याशक्यता तपासण्यात आली. त्यातले प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे कण एकमेकांना खेटून बसणे थिऑरेटिकली शक्यच नाही. त्यामुळे प्रत्येक अणूच्या केंद्रभागी प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांच्या समूहातून निर्माण झालेला एक न्यूक्लियस असतो आणि त्यांच्यापासून काही अंतरावरून इलेक्ट्रॉन्स गटागटाने सदोदित त्याच्या भोवती घिरट्या घालत असतात असे अणूचे मॉडेल सर्वमान्य झाले. त्यातसुद्धा घनविद्युतभार (पॉझिटिव्ह चार्ज) असलेले प्रोटॉन्स एकमेकांना दूर ढकलत असतात आणि न्यूट्रॉन्स त्यांना एकत्र आणत असतात. यासाठी ठराविक प्रमाणात ऊर्जेची गरज असते. त्याला बाइंडिंग एनर्जी म्हणतात. काही अणूंची रचना थोडी अस्थिर (अनस्टेबल) असते कारण त्यांच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा असते. तिला बाहेर टाकून देऊन तो अणू स्थैर्याकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असतो. अणूमधली ही जादा ऊर्जा रेडिओअॅक्टिव्हिटी या क्रियेमधून बाहेर पडत असते असे निदान करण्यात आले. सू्र्य आणि तारकांमध्ये असेच काही तरी पण फार मोठ्या प्रमाणात घडत असावे असा अंदाज त्यावरून करण्यात आला. पण ही अस्थिरता का यावी हा प्रश्न होताच.

आल्बर्ट आइन्स्टाइन याने शतकापूर्वी आपला सुप्रसिद्ध सापेक्षतासिध्दांत (रिलेटिव्हिटी थिअरी) जगापुढे मांडला. त्या सिध्दांताच्या धाग्याने विश्वाचा विचार केल्यानंतर वस्तुमान (मास) आणि ऊर्जा ह्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सिध्द होते. तसे असल्यास वस्तूमानाचे (मॅटरचे) परिवर्तन ऊर्जेमध्ये होणे सुध्दा शक्य असावे आणि ते झाल्यास लहानशा वस्तुमानाच्या बदल्यात E=mCxC एवढ्या प्रचंड प्रमाणात ऊर्जा मिळू शकेल असे भाकित त्याने केले. ही क्रिया नक्की कशा प्रकारे घडवता येईल हे त्या काळात तो सांगू शकत नव्हता कारण ते त्यालाही माहीत नव्हते. पण पुढील काळात झालेल्या संशोधनामधून ते रहस्य उलगडले गेले.



निरनिराळ्या प्रकारच्या किरणांचे निरनिराळ्या पदार्थांवर होणारे परिणाम यावर संशोधन करतांना शास्त्रज्ञांना असे आढळले की युरेनियम या धातूवर न्यूट्रॉन्सचा झोत सोडला तर त्यातून अचानक प्रचंड ऊष्णता निघते. अधिक संशोधनानंतर समजले की युरेनियम २३५ या मूलद्रव्याच्या अणूचा एका न्यूट्रॉनशी संयोग होताच त्यामधून युरेनियम २३६ हा नवा अणू तयार होतो, पण तो इतका अस्थिर असतो की जन्मतःच त्याची दोन शकले होतात आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते, शिवाय दोनतीन न्यूट्रॉन्ससुद्धा सुटे होऊन बाहेर पडतात. याला प्रभंजन किंवा विखंडन (फिशन रिअॅक्शन) असे म्हणतात. अणूचे हे दोन भाग (फिशन फ्रॅगेमेंट्स) म्हणजे दोन नवे अणूच असतात. या नव्या अणूंचे आणि सुट्या झालेल्या न्यूट्रॉन्सचे एकत्रित वस्तुमान (मास)सुद्धा आधीचा अणू आणि एक न्यूट्रॉन यांच्यापेक्षा किंचित कमी भरते. या दोन्हींमधला जेवढा फरक असेल तेवढे मॅटर या क्रियेत नष्ट होऊन त्याचे ऊर्जेत परिवर्तन होते. याला अणऊर्जा असे म्हणतात.

विखंडनामध्ये सुट्या होऊन बाहेर पडलेल्या न्यूट्रॉन्सचा युरेनियमच्या इतर अणूंशी संयोग झाला की त्यांचे विखंडन होते आणि त्यातून पुन्हा ऊष्णता आणि नवे न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. हे सगळे एका सेकंदाच्या हजारांश किंवा लक्षांश भाग इतक्या कमी वेळात होते. त्यामुळे ही साखळी पुढे चालत राहिली तर दोनाचे चार, चाराचे आठ किंवा तीनाचे नऊ, नऊचे सत्तावीस अशा प्रकारे न्यूट्रॉन्सची संख्या भराभर वाढत जाऊन त्या न्यूट्रॉन्सची संख्या अब्जावधी किंवा परार्धावधीमध्ये वाढत गेली तर त्यातून महाभयंकर इतकी ऊष्णता बाहेर पडते. पण पुरेशा प्रमाणात युरेनियमच उपलब्ध नसले तर ती साखळी खंडित होऊन विझून जाते. यामुळे प्रयोगशाळेत लहान प्रमाणात होत असलेल्या प्रयोगांमध्ये अशी दुर्घटना घडली नाही, फक्त थोडी ऊष्णता बाहेर पडली आणि प्रयोग संपला असे झाले. पण दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर टाकलेल्या अॅटमबाँबमध्ये मात्र मुद्दाम ठरवून अशा प्रकारचा अनर्थ घडवण्यात आला. तोपर्यंत या संशोधनाबद्दलही जगाला काही माहिती नव्हती. अणुशक्तीचा पहिली जाहीरपणे ओळख झाली ती अणूबाँबमुळेच. 

युरेनियमच्या अणूचे भंजन होऊन त्याचे दोन तुकडे का पडतात यावर संशोधन केल्यानंतर त्याचे रहस्य उलगडत गेले आणि त्यातून मिळालेल्या माहितीचा अभ्यास करतांना असे दिसले की याच्या बरोबर उलट ड्यूटेरियम आणि ट्रिशियम या हैड्रोजनच्या दोन आयसोटोप्सच्या दोन अणूंचा संयोग घडवून आणला तर त्यामधून हीलियमचा एक नवा अणू आणि ऊष्णता बाहेर पडते. याला फ्यूजन रिअॅक्शन (संमीलन) असे म्हणतात. या क्रियेमध्ये विखंडनाहूनही जास्त आणि फारच भयानक प्रमाणात ऊष्णता प्रकट होते. अर्थातच ही क्रिया अशी सहजासहजी घडत नाही, ती घडवून आणण्यासाठी ते वायू महाप्रचंड दाबाखाली आणि अतीउच्च तपमानावर असावे लागतात. त्या दृष्टीने प्रयत्न करून तेही घडवून आणण्याचे तंत्र शास्त्रज्ञांनी शोधून काढले आणि हैड्रोजन बाँब तयार करून त्याचे चाचणीस्फोट घडवून आणले. सूर्यामध्ये प्रामुख्याने असलेले हैड्रोजन आणि हीलियमचे अस्तित्व आधीच माहीत झालेले होते. यामुळे अशा प्रकारच्या क्रिया सूर्याच्या अंतरंगात होत असतात याची खात्री पटली. या संशोधनानंतर सू्र्य आणि तारकांमधील ऊर्जेचे रहस्य काही प्रमाणात उलगडले, तसेच अणुशक्ती किंवा अणुऊर्जा ही एक वेगळ्या स्वरूपातली ऊर्जा मानवाच्या हातात आली.

रिअॅक्टरमध्ये युरेनियमचे नियंत्रित विखंडन (फिशन) करून त्यापासून ऊर्जा निर्माण करण्याचे तसेच तिच्यावर कडक नियंत्रण ठेवून रिअॅक्टरला सुरक्षित ठेवण्याचे तंत्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पहिला अणूबाँब तयार करण्याच्या आधीच आत्मसात केले गेले होते. त्यानंतर त्यावर नाना तऱ्हेचे संशोधन झाले आणि अशी ऊर्जा मिळवून तिचे विजेमध्ये रूपांतर करणारी अणुविद्युतकेंद्रे (न्यूक्लियर पॉवर स्टेशन्स) अनेक देशांमध्ये उभारली गेली.

हैड्रोजनच्या सम्मीलनामधून (थर्मोन्यूक्लियर फ्यूजन) निघणारी ऊर्जा मात्र अजूनपर्यंत तरी माणसाच्या आवाक्यात आलेली नाही. या क्रियेसाठी आवश्यक असलेला प्रचंड दाब आणि तपमान सहन करू शकेल अशा प्रकारचे पात्र निर्माण करू शकणे हे सर्वात मोठे तांत्रिक आव्हान (चॅलेंज) आहे. हैड्रोजन बाँबमध्ये त्या पात्राच्या क्षणभरात ठिकऱ्याच होणार असतात पण वीजनिर्मिती करण्यासाठी ते टिकाऊ आणि विश्वासपात्र असणे अत्यंत गरजेचे असते. आंतरराष्ट्रीय सहयोगामधून अशा प्रकारचा फ्यूजन रिअॅक्टर तयार करण्यावर संशोधन चालू आहे, एक प्रकल्पही हातात घेतलेला आहे. तो यशस्वीरीत्या पूर्ण व्हायला दहा वीस पंचवीस तीस किती वर्षे लागतील याची कल्पना नाही. पण त्यानंतर मात्र ऊर्जेचा एक अपरिमित असा स्रोत हातात येईल.

Sunday, December 15, 2013

श्री दत्तगुरूंचे २४ गुरू

 श्री दत्तगुरूंचे २४ गुरू


बृहस्पती हे सर्व देवांचे गुरू होते असे सांगितले जाते. अत्यंत बुद्धीमान माणसाला बृहस्पतीची उपमा दिली जाते. पण ते नेमके कोणत्या देवांचे गुरू होते हे मात्र समजत नाही. गणपती, मारुती, महादेव, राम, कृष्ण, अंबाबाई वगैरे जितक्या देवतांच्या मूर्ती आपल्या घरातल्या देव्हा-यात किंवा गावातल्या देवळात असतात त्यातल्या कोणीही कधी बृहस्पतीकडे जाऊन शिक्षण किंवा मार्गदर्शन घेतले असा उल्लेख मी तरी ऐकलेला किंवा वाचलेला नाही. दत्तगुरूंना मात्र सर्व जगाचे गुरू असे मानले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींनी मिळून दत्तात्रेयाचे रूप घेतले त्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा होती. या दिवशी दत्तजन्माचा सोहळा केला जातो. या जगद्गुरू अवधूतांनी स्वतः २४ गुरू केले होते आणि त्यांच्याकडून काही गुण किंवा शिकवण घेतली होती असे त्यांनी यदुराजाला सांगितले होते अशी पुराणातली आख्यायिका आहे. दत्तगुरूंनी मानलेले हे २४ गुरू असे आहेत  
१.पृथ्वी. २.वायू, ३.आकाश. ४.पाणी, ५.अग्नी, ६.चंद्र, ७.सूर्य, ८.कबूतर, ९.अजगर, १०.समुद्र, ११.पतंग कीटक (मॉथ), १२.मधमाशी, १३.हत्ती, १४.भुंगा, १५.हरीण, १६.मासा, १७.पिंगला नर्तकी, १८.टिटवी, १९.बालक, २०.बांगड्या, २१.बाण तयार करणारा कारागीर, २२.साप, २३.कोळी (स्पायडर) २४. अळी. या यादीमधील नावे आणि त्यांचा क्रम यात काही पाठभेद आहेत. कोणी यात यमाचा समावेश केला आहे. मला जी एक यादी सहजपणे मिळाली ती मी या ठिकाणी दिली आहे. यातील प्रत्येक जीवंत व्यक्ती, प्राणी किंवा निर्जीव वस्तूपासून काही गुण शिकण्यासारखे आहेत तर काही वाईट गुण ओळखून ते टाळणे आवश्यक आहे. त्यांनाही दत्तगुरूंनी गुरूपद दिले आहे.

सूर्याचे तेज, चंद्राची शीतलता, पृथ्वीची सहनशीलता, अग्नीचे पावित्र्य, सागराचा अथांगपणा, स्त्रीची ममता, बालकताचे निरागसपण, मधमाशीची संग्रहवृत्ती वगैरे काही गुणविशेष प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे उल्लेख नेहमी होत असतात किंवा त्यांची उदाहरणे दिली जात असतात. यांचे यापेक्षा वेगळे काही गुण दत्तगुरूंना दिसले होते. समुद्र आणि त्यातले पाणी यांची वेगवेगळी गणती केली आहे. समुद्र त्याला मिळणा-या सर्व नद्यांना स्वतःमध्ये सामावून घेतो तर "पानी तेरा रंग कैसा? जिसमें मिलाओ वैसा" या उक्तीप्रमाणे पाणी कशातही मिसळून जाते. हे गुण भिन्न आणि थोडे परस्परविरोधी आहेत. दिव्याच्या ज्योतीवर झेप घेऊन स्वतःला जाळून घेणा-या पतंगाचे उदाहरण प्रेमाचे द्योतक म्हणून दिले जाते, पण क्षणिक मोहाने असा अविचार करू नये हे यातून शिकण्यासारखे आहे. हत्ती हा प्राणी मदांध किंवा कामांध होऊ शकतो. मासा अधाशीपणाने आमिशाला खायला जातो आणि स्वतःच गळाला लागतो. त्याचप्रमाणे हरीण संगीताकडे आकर्षले जाते आणि माणसाच्या (शिका-याच्या) जवळ येऊन त्याच्या तावडीत सापडते. ही सगळी काय करू नये याची उदाहरणे आहेत.

काही गुणविशेष आपल्या किंबहुना माझ्या समजुतीपेक्षा वेगळे दिसतात. यात अलिप्तपणा हा कबूतराचा (नसलेला) गुण सांगतला आहे. एका कबूतराच्या जोडीच्या पिल्लांना शिकारी घेऊन गेला, त्यांच्यासाठी आणलेला चारा घेऊन कबूतरी आणि तिच्या मागोमाग नर कबूतर त्या शिका-याकडे गेले आणि त्याच्या ताब्यात सापडले. त्यांच्याकडे अलिप्तपणा असला तर ते स्वतंत्र राहिले असते. या कथेमध्ये निर्भयपणा हा सापाचा गुण सांगितला आहे. त्या एक कारण तो निर्धास्तपणे मुंग्यांच्या वारुळात जाऊन राहतो आणि दुसरे म्हणजे आपल्या सर्वांगावरचे कात़डे (कात) काढून टाकतो. बांगड्या आणि एकांतवास यात काय संबंध असेल असे वाटेल. इथे हे लक्षात घ्यायचे आहे की एका हातात दोन किंवा जास्त बांगड्या असल्या तर त्या किणकिण करतात, पण एकच बांगडी असली तर ती आवाज करून कोणाचे लक्ष वेधून घेत नाही. कुंभारमाशीची गोष्ट मी लहानपणी ऐकली होती. ही माझी मातीचे लहानसे घर बांधते आणि त्यात अळी (किंवा अळ्या) नेऊन ठेवते. ही माशी येऊन आपल्याला खाईल या भीतीने ती अळी सारखा तिचा विचार करते आणि त्यात इतकी एकरूप होते की स्वतःच कुंभारमाशी होते अशी ती गोष्ट होती आणि यातल्या अळीप्रमाणे आपण परमेश्वराचे सारखे स्मरण केले तर आपणही त्याच्याशी एकरूप होतो अशी शिकवण त्यातून दिली होती. अंडे, अळी, कोष आणि कीटक असे त्याचे चार जन्म असतात हे  त्यावेळी मला माहित नव्हते.

या २४ गुरूंपैकी काही गोष्टींचे संदर्भ मला नवीन होते. पिंगला ही नृत्यांगना (तवाइफ) एका ग्राहकाची आतुरतेने वाट पहात बसते पण तो येत नाही. तेंव्हा तिला असे वाटते की याऐवजी आपण अंतर्मुख होऊन (देवाचे) ध्यान केले असते तर त्याचा फायदा झाला असता, आपला उद्धार झाला असता. एकाग्रचित्ताने बाण तयार करत बसलेला एक कारागीर (लोहार) आपल्या कामात इतका मग्न झाला होता की वाजत गाजत बाजूने जात असलेली राजाची मिरवणूकसुद्धा त्याच्या लक्षात आली नाही. मनाची एकाग्रता (कॉन्सेन्ट्रेशन) हा त्याचा गुण शिकण्यासारखा आहे.  एकदा एक टिटवी (लहानसा पक्षी) काही खाद्य खाण्यासाठी उचलून घेऊन आली, तिच्याकडून ते खाद्य  हिसकावून घेण्यासाठी कावळे, घारी वगैरे इतर मोठ्या पक्ष्यांनी तिच्यावर हल्ला केला. त्या टिटवीने शहाणपणा केला आणि चोचीमधले खाद्य जमीनीवर टाकून देऊन तिथून पोबारा केला. काळवेळ पाहून क्षुल्लक बाबींचा अशा प्रकारे त्याग करणे हिताचे ठरते.  हा बोध यावरून मिळतो.

ही काही उदाहरणे आहेत. माझ्या मते जगातल्या प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही शिकण्यासारखे असते आणि प्रत्येक प्रसंगातून काही बोध घेण्यासारखा असतो. फक्त आपली इच्छा आणि तयारी असायला हवी.



Wednesday, December 11, 2013

३ ४ ५ ..... ११ १२ १३


"एक दो तीन, चार पाँच छे सात आठ नौ, दस ग्यारा बारा तेरा" या गाण्यावर नाचत नाचत माधुरी दीक्षितने सिनेमाक्षेत्रात पदार्पण केले आणि थेट शिखरापर्यंत मुसंडी मारली. तिचे त्यापूर्वीचे काही चित्रपट येऊन गेले असले तरी ते मला माहीत नाहीत. "एक दो तीन" हे गाणे असलेला 'तेजाब' हा मी पाहिला तिचा पहिलाच चित्रपट होता आणि त्यानंतर केवळ तिची भूमिका आहे म्हणून मी अनेक सिनेमे पाहिले. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवत असतांनाच माधुरी लग्न करून सुगृहिणी (हाउसवाइफ) झाली आणि अमेरिकेला चालली गेली तेंव्हा अनेक लोकांना त्याची चुटपुट लागली होती. पण आता ती पुन्हा "आजा नचले" करत परत आली आहे आणि जाहिरातीतल्या भांडी घासणा-या गंगूबाईपासून ते स्टेजशोमधल्या प्रमुख पाहुण्यांपर्यंत अनेक रूपांमध्ये टीव्हीवर दिसू लागली आहे, मुख्य म्हणजे तिचे दिसणे आणि हंसणे पहिल्याइतकेच गोड राहिले आहे. असे असले तरी माधुरी दीक्षित हा या लेखाचा विषय नाही पण "तीन चार पाच" आणि "बारा तेरा" म्हणतांना तिची आठवण आल्याखेरीज राहणे शक्य नाही.

विसावे शतक संपून सन २००० सुरू होण्याच्या नेमक्या क्षणाला वायटूके (Y2K) असे नाव काँप्यूटरवाल्यांनी दिले होते. वर्ष दाखवणा-या ९७, ९८, ९९ अशा आकड्यांना सरावलेल्या त्या काळातल्या मठ्ठ काँप्यूटरांना २००० सालातला ०० हा आकडा समजणारच नाही आणि ते गोंधळून जाऊन बंद पडतील. त्यामुळे त्यांच्या आधारावर चालणार्‍या सगळ्या यंत्रणा एकाएकी पार कोलमडून पडतील. हॉस्पिटलमधल्या कुठल्या रोग्याला कोणते औषध द्यायचे किंवा कुणावर कसली शस्त्रक्रिया करायची हे कुणाला समजणार नाही. स्वयंचलित यंत्रांना कच्चा मालच मिळणार नाही किंवा चुकीचा माल त्यात घुसवला जाईल. नोकरदारांना पगार मिळणार नाही, त्यांची बँकांमधली खाती बंद पडतील आणि एटीएम यंत्रांमधून पैसे बाहेर येणार नाहीत. जमीनीवरली विमाने उडलीच तरी भलत्या दिशांना जातील आणि आकाशात भ्रमण करणारी विमाने दगडासारखी खाली कोसळतील. अशा अनेक वावड्या उडवल्या जात होत्या. असे होऊ नये म्हणून त्या दिवशी (म्हणजे रात्री) सर्व ऑफिसांमधल्या विजेच्या कनेक्शन्सचे फ्यूज काढून ठेवावेत, कोणतेही विमान उडवू नयेच, जमीनीवरल्या विमानांच्या इंधनाच्या टाक्या रिकाम्या करून ठेवाव्यात वगैरे सावधगिरीच्या सूचना अतिघाबरट लोकांनी दिल्या होत्या असे म्हणतात. त्या संबंधातली सर्वात भयानक अफवा अशी होती की वेगवेगळ्या महासत्तांच्या भूमीगत गुप्त कोठारांमधले अनेक अण्वस्त्रधारी अग्निबाण (न्यूक्लियर मिसाईल्स) बाहेर निघून ते आकाशात भरकटत जातील आणि इतस्ततः कोसळून संपूर्ण पृथ्वीवर हलकल्लोळ माजवतील.

असा अनर्थ घडू नये म्हणून सगळे संगणकविश्व कंबर कसून कामाला लागले होते. नव्या भारतातले संगणकतज्ज्ञ प्राचीन काळात भारताने शोधून जगाला दिलेल्या शून्याचा अर्थ जगभरातील संगणकांना नव्याने समजावून देण्याच्या कामाला लागले. त्या काळात ते रात्रंदिवस काम करून निरनिराळ्या सॉफ्टवेअर्सना 'वायटूकेफ्रेंडली किंवा कंप्लायंट' बनवत राहिले. कदाचित त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेही असेल, पण वायटूकेचा बार फारच फुसका निघाला. ती वेळ आली तेंव्हा त्यातून साधे फुस्ससुध्दा झाले नाही.

वायटूकेच्या सुमाराला आकडेवीरांची मात्र चंगळ सुरू झाली. वायटूकेच्या सुमारे तासभरानंतर १ जानेवारी २००१ साली १ वाजून १ मिनिटे आणि १ सेकंद ०१:०१:०१:०१:०१:०१ हा क्षण येऊन गेला, पण नव्या शतकाची सुरुवात झाल्याच्या जल्लोशात सगळे लोक बुडून गेलेले असल्यामुळे हा क्षण येऊन गेल्याचे त्या वेळी कोणाच्या लक्षातच आले नाही. त्यानंतर  ०२:०२..., ०३:०३... वगैरे विशेष वेळा दर वर्षी येत राहिल्या. त्याशिवाय ०१:०२:०३:०१:०२:०३ किंवा ०१:०२:०३:०३:०२:०१ अशासारखे काही विशेष क्षणही येऊन गेले. त्यातल्या बहुतेक सगळ्या वेळा रात्री झोपेच्या काळात असल्याने कुणाला जाणवल्याही नाहीत. २००७ साली जुलै महिन्याच्या ७ तारखेला युरोपातल्या स्पेन या देशात एक आंतरराष्ट्रीय संमेलन भरवून त्यात ०७:०७:०७:०७:०७:०७ या वेळी म्हणजे सकाळी ७ वाजून ७ मिनिटे आणि ७ सेकंद या क्षणाचा मुहूर्त साधून पुरातनकाळातील माणसांनी बांधून ठेवलेल्या जगातील सात जुन्या आश्चर्यांची नवी जगन्मान्य यादी जाहीर करण्यात आली.

त्यानंतर ०८:०८... ०९:०९... वगैरे क्षण येऊन गेले. दोन वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या ११ नोव्हेंबर २०११ या दिवशी ११ वाजून ११ मिनिटे ११ सेकंद या वेळेत ११ हा आकडा ६ वेळा किंवा १ हा आकडा १२ वेळा येऊन गेला होता. तो याहीपेक्षा जास्त येण्याची वेळ यापूर्वी सन ११११ मध्ये येऊन गेली होती, पण त्या काळात सेकंदांपर्यंत अचूक वेळ दाखवणारी घड्याळेच अस्तित्वात नसल्यामुळे तब्बल अकरा हजार वर्षांमध्ये एकदा येऊन गेलेल्या या क्षणाचे महत्व कोणाच्या ध्यानातही आले नसेल. मागील वर्षी १२-१२-१२ हा दिवस उजाडून त्या दिवशी दुपारचे १२:१२:१२ म्हणजे १२ वाजून १२ मिनिटे १२ सेकंद वाजून गेले. बारा बारा बारा ... वाजता कोणाकोणाचे बारा वाजणार आहेत अशी शंका काही लोकांच्या मनात आली होती, पण तसे काही झाले नाही. अशा प्रकारच्या गणिती योगायोगाची ती या शतकातली शेवटची संधी होती, इंग्रजी कॅलेंडर्समध्ये कधीच तेरावा महिना येत नसल्यामुळे गेली बारा वर्षे दर वर्षी येणारा अशा प्रकारचा योग आता यानंतर एकदम सन २१०१ मध्ये येईल  असे त्या दिवशी वाटले होते. 

पण आज आणखी काही असे विशिष्टसंख्यापूर्ण क्षण येऊन गेले. आजची तारीख ११ डिसेंबर २०१३ म्हणजे ११:१२:१३. त्यामुळे सकाळचे आठ वाजून नऊ मिनिटे दहा सेकंद म्हणजे ०८:०९:१०:११:१२:१३ झाले आणि सकाळी ११ वाजून १२ मिनिटे १३ सेकंद ही वेळ ११:१२:१३:११:१२:१३ झाली. आजचाच आणखी एक विशेष म्हणजे हा या महिन्यातला ३४५वा दिवस आहे. त्यातसुद्धा ३ ४ आणि ५ असा क्रम आहे. हा दुहेरी योगायोग म्हणायचा. एका वर्षामध्ये बाराच महिने असतात आणि घड्याळात बाराच तास दाखवले जातात यामुळे यानंतर मात्र अशी विशेष काँबिनेशन्स येण्याची शक्यता दिसत नाही.

गेली तेरा वर्षे हे विशिष्ट वेळांचे क्षण त्यांच्या त्यांच्या ठरलेल्या वेळी येऊन गेले. त्यातल्या कोठल्याही क्षणी नेमके काय घडले? खरे तर कांही म्हणजे कांहीसुद्धा झाले नाही. बाहेर अंधार, उजेड, ऊन, पाऊस वगैरे सगळे काही ऋतुमानाप्रमाणे होत राहिले. कुठे पावसाची भुरभुर आधीपासून सुरू असली तर त्या क्षणानंतरही ती तशीच होत राहिली. तो क्षण पहायला सूर्य कांही त्या वेळी ढगाआडून बाहेर आला नाही. वारा मंद मंद किंवा वेगाने वहात होता आणि पानांना सळसळ करायला लावत होता. सगळे कांही अगदी नेहमीसारखेच चाललेले होते. आणि त्यांत कांही बदल होण्याचे कांही कारण तरी कुठे होते?

निसर्गाचे चक्र अनादी कालापासून फिरत आले आहे. त्या कालचक्राची सुरुवात कशी आणि कधी झाली हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. माणसानेच कुठून तरी वेळ मोजायला सुरुवात केली आणि आपण त्यातल्या विशिष्ट आकड्यांपर्यंत पोचत राहिलो. तारीख, महिना, वर्ष, तास, मिनिटे, सेकंद हे सगळे माणसाच्या मेंदूतून निघाले आहे आणि त्याच्या सोयीसाठी तो ते पहात राहिला आहे. निसर्गाला त्याचे कणभर कौतुक नाही. गेल्या तेरा वर्षांत अगदी योगायोगानेसुध्दा त्यातल्या अशा प्रकारच्या विशिष्ट तारखांना विशिष्ट क्षणी कोठलीच महत्वाची अशी चांगली किंवा वाईट घटना जगात कुठेच घडली नाही. न्युमरॉलॉजी वगैरेंना शास्त्र समजणार्‍यांनी याची नोंद घ्यावी.

दक्षिण अमेरिकेतल्या कुठल्याशा जमातीच्या ऋषीमुनींनी प्राचीन काळात लिहून ठेवलेल्या भविष्याप्रमाणे सगळ्या जगाचेच २०१२ साली बारा वाजणार आहेत असा धाक काही लोक दाखवत होते. २००० साली वायटूकेमुळे होऊ पहाणारा अनर्थ किंवा त्याचा केला गेलेला बाऊ मानवनिर्मित होता आणि माणसांच्याच सावधगिरीमुळे किंवा हुषारीने तो तर टळला, 'दैवी' सिध्दी प्राप्त झालेल्या लोकांनी वर्तवलेले हे इंकांचे तथाकथित भविष्यही फुसकेच निघाले. तसे ते निघणार यात कसलीही शंका नव्हतीच, त्याने एक मनोरंजन होऊन गेले.

गेल्या काही वर्षात काही लोकांनी मात्र ठरवून हे क्षण संस्मरणीय केले. मुंबईच्या ब्रॅन्डन परेरा आणि एमिली डिसिल्वा यांनी साखरपुडा केला १०/१०/१० रोजी. कोर्टात रजिस्टर लग्न केले ११/११/११ रोजी. आणि चर्चमध्ये देवा-पाद्र्याच्या साक्षीने लग्न केले १२/१२/१२ रोजी! (पुढचे प्लॅनिंग समजले नाही). अशाच एका आकडेवीराने लग्नाचा मुहूर्त ठेवला होता ६ जुलै २००८ ला सकाळी ९ वा. १० मिनिटांचा म्हणजे ६-७-०८:९:१०. आजसुद्धा अनेक उत्साही लोकांनी अशा मुहूर्तांवर लग्नाच्या गाठी बांधल्या असल्याचे सकाळी एका चॅनेलवर दाखवले होते. 

Monday, December 09, 2013

विक्रांत, वस्तुसंग्रहालय आणि त्यावरील चर्चा

विक्रांतच्या लिलावाबद्दलचा लेख मी मिसळपाव या संकेतस्थळावर दिला होता. या वेळी माझ्या लेखाला बरेच वाचक लाभले आणि त्यांनी अनेक प्रतिसादसुद्धा दिले. आपल्या देशाच्या नौदलाच्या इतिहासातला मैलाचा दगड असलेली विक्रांत ही बोट भंगारात जाऊन तिची तोडमोड होऊ नये असेच बहुतेक सर्वांना वाटत असावे असे दिसले. त्यातल्या काही जणांनी 'कालाय तस्मै नमः' म्हणून प्राप्त परिस्थिती मान्य केल्याखेरीज गत्यंतर नाही हे मान्य केले तर काही जणांनी भारतातले केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातले राज्य सरकार व ते चालवणारे राजकारणी यांच्यावर तोंडसुख घेण्याची संधी साधून घेतली.  काही लोकांना 'जुने जाऊ द्या मरणालागुन' ही शिकवण आठवली. अशा एका वाचकाने लिहिलेः
"आता कधी तरी असल्या वस्तू नष्ट कराव्या लागतीलच की. ब्रह्मास्त्र , रामाचा बाण .... ते विक्रांत .. सगळं स्टोअर करत बसलं तर लोकाना समुद्रात रहायला जावं लागेल. "
त्यावर माझे उत्तर असे होतेः
ब्रह्मास्त्र , रामाचा बाण यासारखी शस्त्रास्त्रे एकदा वापर केल्यानंतर आपोआप नष्ट होत असतात. तोफेमधून उडालेले गोळे सुद्धा सहसा कोणी जपून ठेवत नाहीत. बंदुकीच्या किंवा पिस्तुलाच्या गोळ्या शोधून काढून मिळाल्या तर न्यायालयात पुरावा म्हणून दाखवण्यापुरत्या ठेवल्या जातात. विक्रांत त्या कॅटेगरीमध्ये येत नाही. त्याची एक्स्पायरी डेट निघून गेली असली तरी त्याच्या आठवणींचे आयुष्य अजून दहा वीस वर्षे शिल्लक असावे. त्यानंतर कदाचित कोणाला काही वाटणार नाही. पण माणसाचे मन थोडे विचित्र आहे. त्याला काल परवाच्या वस्तू जुन्या म्हणून फेकून द्याव्याशा वाटतात, पण दहा वीस हजार वर्षांपूर्वी जगून आणि मरून गेलेल्या अनामिक लोकांची गाडगी मडकी आणि लाखो वर्षांपूर्वी जगून आणि मरून गेलेल्या अनामिक लोकांची हाडे आणि कवट्या पाहून त्याल कसला आनंद मिळतो कोण जाणे.

डॉ.सुबोध खरे यांनी काही काळ विक्रांत या जहाजावर काम केले होते. त्यांनी अत्यंत सविस्तर आणि विचारपूर्वक असा प्रतिसाद दिले. त्यातला मुख्य भाग असा होता.

विक्रांतचे संग्रहालय बनवून एक इतिहासाचा वारसा जपून ठेवावा या बद्दल कोणतेच दुमत नाही. परंतु त्यात येणारे वेगवेगळे प्रश्न असे आहेत. नौदलाच्या गोदीत जागा नाही. नवीन येणाऱ्या विक्रमादित्य अगोदर असणा-या विराट या दोन युद्धनौका ठेवायच्या असतील तर विक्रांतला दुसरी जागा देणे आवश्यक आहे. ही जागा महारष्ट्र सरकारने देणे आवश्यक आहे. कारण मुंबई बंदरात किंवा न्हावा शेवा मध्ये जागा नाही. जर तिला दुसरी जागा तयार करायची असेल तर त्या जागेला जाण्यासाठी पायाभूत सुविधा म्हणजे गोदी/जेटी, त्याला जोडणारा रस्ता ई पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. यासाठी येणारा खर्च २००२ साली चारशे पन्नास कोटी होता हा पैसा उभा करणे आपल्या कल्याणकारी राज्याला (जे अगोदरच कर्जात बुडालेले आहे असे ऐकतो) शक्य झाले नाही. एवढा पैसा टाकून त्याचे संग्रहालय उभारणे हे खाजगी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले पण त्याला येणारा खर्च आणी त्यातून मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ जमेना म्हणून कोणतीही खाजगी संस्था त्याला तयार झाली नाही. नौदलाने आपला इतिहासाचा वारसा जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु काही दिवसात येणाऱ्या विक्रमादित्य या जहाज साठी जागा रिकामी करणे निकडीचे आणि तातडीचे झाल्याने ती भंगारात विकण्याचा निर्णय शेवटी घेतला गेला. नौदलाला विक्रांत केवळ चालू ठेवण्यासाठी वर्षाला बारा कोटी रुपये खर्च येत होता. आणि त्यावर कमीत कमी पस्तीस माणसे हिच्या बंद स्थितीतहि यासाठी लागतात. यात हे जहाज गेली कित्येक दशके समुद्राच्या खा-या पाण्यात उभे असल्याने गंजाचे प्रमाण अफाट आहे. त्यामुळे एवढ्या अवाढव्य जहाजाला दर सहा महिन्यांनी रंग लावावा लागतो. त्याच्या आतील कक्षात विजेचे दिवे चालू ठेवावे लागतात यासाठी वीज लागते. मध्येच वीज गेली तर ताबडतोब पर्यायी व्यवस्था उपलब्ध होण्यासाठी कमीत कमी एक जनित्र चालू ठेवावे लागते त्याल लागणारा डीझेलचा खर्च असे अनेक खर्च (आग लागली तर आग विझवायला लागणाऱ्या बाटल्या रिचार्ज करणे, पिण्याचे पाणी भरणे त्याच्या टाक्या साफ ठेवणे ई ई ) आणि शेवटी त्या पस्तीस माणसांच्या मनुष्यबलाचा खर्च. हे सर्व प्रकरण हाताबाहेर जाऊ लागल्याने नाईलाजाने ती भंगारात विकण्याचा निर्णय घेण्यात आला.

जहाज पाण्यात उभे असते तेंव्हा त्याला गंज लागणे ही कायम चालू असणारी प्रक्रिया आहे. पावसाळ्यानंतर पडणा-या पावसाने गंजाचे ओघळ जहाजाच्या बाह्य पृष्ठभागावर दिसतात. तसे दिसू नयेत म्हणून त्यावर लगेच रंग लावावा लागतो. दोन वर्षात रंगाचा एक थर जमा होतो तो ठोकून काढून टाकावा लागतो आणि नवा रंग लावावा लागतो. जहाजावर असणारे सगळे खिळे स्क्रू नट बोल्ट हे पितळेचे असावे लागतात कारण लोखंडाचे स्क्रू गंजून घट्ट होतात आणि नंतर उघडत नाहीत. आता हे पितळेचे स्क्रू सुद्धा त्यःची चमक जाऊ नये म्हणून त्यावर ब्रासो लावून दर एक दिवसा आड पॉलिश करावे लागते. पाण्याची टाकी लोखंडाची असल्याने तिच्या तळाशी गंज जमा होतो तो दर दोन वर्षांनी साफ करावा लागतो. असा रोजच करावा लागणारा मेंटेनन्स वर्षनुवर्षे करणे फार जिकीरीचे असते.

यानंतर एकदा मी स्पष्टपणे म्हटले होते कि विक्रांत संग्रहालय करणे महाराष्ट्र सरकारला झेपत नसले तर ती विकून टाकणे योग्य होईल. यावर तेथे गरमागरम चर्चा झाली. मी शांतपणे म्हटले कि आपले आपल्या वडिलांवर कितीही प्रेम असले तरी त्यांचा पार्थिव देह आपण कवटाळून ठेवत नाही. त्याचे योग्य अंत्य संस्कार करावेत आणि एक सुंदर स्मारक बांधावे. असेच विक्रांतचे स्मारक जमिनीवर बांधा म्हणजे त्याला अवाढव्य खर्च येणार नाही आणि त्याला सुस्थितीत ठेवण्यासाठीसुद्धा एवढा खर्च होणार नाही. त्यात विक्रांतचे असलेले सर्व फोटो किंवा स्लाईड शो दाखवावा. अंदमानच्या सेल्युलर जेल मध्ये दाखवतात तसा.
सैनिकांचे मोठे स्मारक बांधण्यापेक्षा त्यांच्या मुलांच्या पुढच्या शिक्षणाची सोय करून द्यावी. त्यांच्यासाठी वसतिगृहे किंवा तत्सम सोयी उपलब्ध कराव्यात. असा एक पर्यायही त्यांनी सुचवला होता.

श्री.खरे यांनी सुचवलेल्या स्मारक किंवा मुलांसाठी सोयी या कल्पनांना कांही वाचकांनी अनुमोदन दिले.

यावर मी थोडा विचार करून मला जे वाटले ते असे व्यक्त केले.
मुंबईतल्या लहान घरातसुध्दा ठेवायला जागा नाही म्हणून आपल्याला अनेक गोष्टी अनिच्छेने देऊन टाकाव्या लागतात आणि त्या घेणारा भेटला नाही तर त्या टाकून द्याव्या लागतातच. त्या वस्तूंबद्दल असलेले ममत्व त्या वेळी सोडून द्यावे लागतेच. याची मला कल्पना आणि भरपूर अनुभव आहे. मी सेवानिवृत्त होईपर्यंत अनेक वर्षे सरकारच्या कृपेने आलीशान निवासस्थानात रहात होतो. त्यामुळे हौसेने घेतलेल्या किंवा निरनिनिराळ्या ठिकाणांहून आणलेल्या अनेक शोभेच्या वस्तू, प्रियजनांनी दिलेल्या भेटवस्तू वगैरे वर्षानुवर्षे जमा करून ठेवलेल्या वस्तू तिथे पडून राहिलेल्या होत्या. त्या प्रत्येक वस्तूबरोबर काही सुहृदांच्या किंवा प्रसंगांच्या आठवणी निगडित होत्या. ती जागा सोडून टूबीएचकेच्या फ्लॅट्मध्ये येतांना सगळे सामान बरोबर आणले असते तर फक्त ते सामान ठेवायलासुद्धा पुरेशी जागा माझ्याकडे नव्हती. त्यामुळे पुढील जीवनासाठी आवश्यक तेवढ्याच वस्तू ठेवून घेऊन बाकीच्या सगळ्या वस्तू सोडून द्याव्या लागल्याच. याचप्रमाणे आता नेव्हीची मजबूरी मान्य व्हायलाच हवी.

लिलावात बोली करण्याएवढे पैसे ज्यांच्या कडे असतील ते काही योजना आखतीलच. समुद्रकिनार्‍यावर जागा घेऊन या जहाजाला पाण्यात ठेवणे महाग पडत असेल तर एकादी ड्राय डॉक बांधून तिथे ही बोट ठेवता येणे शक्य असावे. रेल्वेची ईंजिने आणि विमाने हॉलमध्ये मांडून ठेवलेली मी अनुक्रमे इंग्लंड आणि अमेरिकेत पाहिली आहेत. हे जहाज कोणाला विकायचे हे ठरवतांना तो बिडर त्याचे काय करणार आहे हे देखील पहायला हवे आणि चार पैसे जास्त मिळतील म्हणून ते शिपब्रेकिंगला देऊ नये. त्या बाबतीत आपल्या अकौंटंट आणि ऑडिट्वाल्या मंडळींनी सूट द्यायला हवी असे मला वाटते.

व्यवहारी जगामध्ये टिकून रहायचे असल्यास प्रत्येक कार्याचा ताळेबंद (बॅलन्सशीट) ठेवावाच लागतो. देशाचे संरक्षण करणे हे नौदलाचे मुख्य काम आहे. नेव्हल डे साजरा करणे वगैरे काही नैमित्यिक कामे त्याबद्दल जनतेला माहिती व्हावी यासाठी लहान प्रमाणात केली जातात. इतिहासाची जपणूक करणे हे काम नागरी संस्थांचे आहे. त्याचा आर्थिक तसेच प्रशासकीय बोजा संरक्षण दलावर पडणे योग्य नाहीच. या मुद्यावर दुमत असायचे कारण नाही.
मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे कुठल्याही यंत्राचा मेंटेनन्स थांबवून त्याची रिप्लेसमेंट करावी लागते आणि असे निर्णय घेणे त्या क्षणी भावनिक दृष्ट्या किंचित अवघड वाटले तरी तांत्रिक कारणांमुळे ते घेणे किती आवश्यक असते याचे मला भान आहे. विक्रांतच्या जागी विराट आली आणि तिचेही दिवस संपत आले आहेत, आता विक्रमादित्य आली आहे आणि नवी विक्रांत बांधायला घेतली आहे. हे सगळे आवश्यकच आहे आणि याला पर्याय नाही. याबद्दलही कसला वाद नाही.

निकामी झालेल्या विक्रांतचे पुढे काय करायचे यावरच मतभेद आहेत. मी नोकरीत असतांना कारखान्यातल्या जुन्या यंत्रांची कशी विल्हेवाट लावायची यावर सविस्तर अभ्यास करून त्यासंबंधी माझे विचार मांडलेले आहेत, वेळोवेळी त्यासंबंधी निर्णयसुद्धा घेतले आहेत. पण भावनात्मक कारणामुळे विक्रांतबद्दल 'डिस्पोजल' हा शब्द वापरायला मन थोडे कचरते. मृत व्यक्तींबद्दल बोलायचे झाल्यास अगदी अपवादास्पद परिस्थितीमध्ये त्यांचे शरीर ममी करून जपून ठेवले जाते, पण सामान्यपणे ते शक्य नसते. मानवाचे शरीर हा निसर्गाचाच भाग असल्यामुळे त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था निसर्गाने केलेली आहे. त्या प्रक्रियेमध्ये गिधाडांसारखे पक्षी (तेही आता दुर्मिळ झाले आहेत) त्या देहाचे लचके तोडतात, मुंग्यांसारखे कीटक त्यातले कण कण वेचून नेतात आणि काही सूक्ष्म जीवजंतू (बॅक्टीरिया) त्याला सडवून त्यातून मिथेन वायू निर्माण करतात वगैरे वगैरे. मृत व्यक्तीबद्दल आपल्या मनात असलेल्या भावनांमुळे (पारशी समाज वगळता) आपल्याला ते सगळे नैसर्गिक असले तरी पहावले जात नाही. त्यामुळे त्या व्यक्तीच्या निर्जीव देहाचे दहन, दफन वगैरे करून त्याला नजरेआड केले जाते.

विक्रांत हे जहाज निर्जीव असले तरी त्याच्याशी भावनात्मक धागेदोरे जुळलेले असल्यामुळे ते भंगारात विकले गेल्यानंतर त्याला गॅस टॉर्चने आडवे उभे कापून आणि त्याच्यावर घणाचे घाव घालून छिन्नविछ्छिन्न केले जाणे, ते तुकडे भट्टीत टाकून त्यांना वितळवणे वगैरेच्या विचाराने अस्वस्थता वाटणार. हे जहाज कुठल्या तरी सागर किना-यावर असेच सोडून दिले किंवा एकाद्या सुरक्षित जागी त्याला जलसमाधी दिली तर समुद्राच्या खा-या पाण्याने त्याचे जे काय व्हायचे ते होईल, पण ते डोळ्यासमोर असणार नाही. हजारो टन पोलाद अशा प्रकारे वाया घालवणे शहाणपणाचे नाही असा विचार कदाचित मनात येणार नाही.

या जहाजाला नष्ट न करता आहे त्या रूपामध्ये समुद्रात तरंगत ठेवणे, त्यावरील विमानांना उडतांना आणि उतरतांना पाहता येणे हे सर्वात चांगले. सैन्यदलाच्या कामगिरीसाठी नाही, पण पर्यटकांना पाहतांना आनंद देण्यासाठी हे करता येणे शक्य असल्यास उत्तमच. ते परवडण्यासारखे नसेल तर त्या जहाजाला जमीनीवर आणून ठेवले तर गंज लागून ते हळूहळू क्षीण होत जाईल, पण बुडण्याची भीती राहणार नाही. त्याला एकादा स्वस्तातला रंग लावला तरी काही दशके तरी ते टिकू शकेल. तोपर्यंत सध्याची माणसांची पिढी काळाआड जाईल. त्यानंतर त्या नौकेचे काही का होईना याचे सोयरसुतक तेंव्हाच्या पिढीतल्या लोकांना वाटणार नाही.
स्वर्गवासी झालेल्या महान व्यक्तींच्या स्मारकांची दुरवस्था पाहता त्यात निर्जीव वस्तूंच्या स्मारकांची भर घालावी असे मला तरी अजीबात वाटत नाही. स्मारक असे नाव न देता, विक्रांतचे फोटोग्राफ, मॉडेल्स वगैरे जतन करून ठेवावेत, त्याची प्रदर्शने भरवावीत, त्याची वेबसाईट बनवून ती अपडेट करत रहावे वगैरे अगदी कमी खर्चाची कामे करायला हरकत नाही. कदाचित ती होतही असतील तर त्यांना प्रसिद्धी मिळायला हवी.

विक्रांतचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात करावे या विचाराला बहुसंख्य लोकांचा पाठिंबा असावा असे दिसते. यासाठी लागणारा खर्च सव्वाशे कोटी आहे की पाचशे कोटी की अधिक हे तिथे नेमके काय काय करायचे यावर अवलंबून आहे. तसेच त्यासाठी लागणारी जागा कुठली घ्यायची यावरही आहे. सरकारच्या अंदाजपत्रांचे जे लक्षावधी करोडोंचे आकडे आपण वाचतो त्यामानाने हा खर्च फार जास्त वाटत नाही. पण नुसता खर्च केला आणि विक्रांतला भंगारात जाण्यापासून वाचवले तर त्याला फारसा अर्थ नाही. ते वस्तुसंग्रहालय प्रेक्षणीय झाले, ते पहावे असे लोकांना वाटले आणि काही काळ तरी ते पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली तर तो खर्च सत्कारणी लागेल आणि त्यातला काही भाग वसूल सुद्धा होईल.

मागे एकदा नेव्ही डेच्या दिवशी उन्हातान्हात तासनतास रांगेमध्ये उभे राहून मी एक युद्धनौका पाहिली होती. त्या वेळी आम्हाला फक्त डेकवरून पाच मिनिटे फिरवून परत पाठवले होते. इंजिनरूम, होल्ड्स, आर्मामेंट्स किंवा डेकवरल्या इतर खोल्यासुद्धा कुलुपात बंद ठेवल्या होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने हे आवश्यक होते. पण यामुळे मला तरी काहीच पाहिल्यासारखे वाटले नाही. या कारणानेच मध्यंतरी विक्रांत या मोठ्या जहाजाला पहाण्याची संधी ठेवलेली असतांना सुद्धा ती घ्यावी असे आवर्जून वाटले नव्हते. तो अनुभव आठवून या दृष्टीने विचार केला तर जाणवले की जहाजाची रिकामी डेक अजीबात आकर्षक नसते. पैसे आणि वेळ खर्च करून ती पहायला लोक येणार नाहीत आणि आले तरी निराश होतील, आणखी कोणाला तिकडे जायची शिफारस करणार नाहीत.

परदेशातली काही म्यूजियम्स पाहितांना मला जाणवले की पर्यटकांना रिझवण्यासाठी तिकडे किती गोष्टी केल्या जातात. तिथे ठेवलेल्या वस्तूंची निवड, त्यांची मांडणी, प्रकाशयोजना, त्यांच्या सोबत लावलेले स्पष्ट वाचता येण्याजोगे आणि थोडक्यात माहिती देणारे सुबक फलक, याशिवाय जागोजागी ठेवलेले काँप्यूटर टर्मिनल्स, त्यावर अधिक मनोरंजक माहिती देणारे इंटरअॅक्टिव्ह आणि ऑडिओव्हिज्युअल प्रोग्रॅम्स, काही जागी काही वेळा होत असलेले लाइव्ह शोज, फिल्म शोज, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खास व्यवस्था, थोडा वेळ बसून विश्रांती घेण्याच्या तसेच खाण्यापिण्याच्या उत्कृष्ट सोयी, फोटोग्राफीला बंदी वगैरे न घालता देण्यात येणारे प्रोत्साहन या सगळ्यामुळे तिथून बाहेर पडावेसे वाटत नाही आणि शक्य असल्यास तिथे पुन्हा पुन्हा जावेसे वाटते. बाहेर जाण्याच्या वाटेवर सॉव्हेनिर्सची दुकाने असतात आणि त्यात लहान लहान मॉडेल्सपासून ते चित्रमय रुमाल, पिशव्या, टोप्या, टीशर्ट्स आणि काहीकाही ठेवलेले असते. आठवण म्हणून त्यातले काही तरी विकत घेतले जाते आणि घरात ठेवले जाते.

विक्रांतचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात करण्याची संधी खरोखरच कुणाला मिळाली आणि त्यात अशा काही गोष्टी केल्या तर ते प्रेक्षणीय होईल आणि ते करण्यात घातलेले पैसे आणि श्रम कारणी लागतील.


डॉ.सुबोध खरे यांनी यावर लिहिले होते
मी विक्रांतवर असताना तेथील विजेच्या तारांची लांबी सत्तर हजार किमी आहे असे ऐकले होते. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेले तांबे शिवाय प्रत्येक पितळेचा नट बोल्ट ई गोष्टी काढून जर पुन्हा तशाच किंवा धातू म्हणून वापरता आल्या तर ते एका पिढीच्या दर्शनासाठी फुकट घालवण्यापेक्षा चांगले. केवळ पोलादच नव्हे तर अनेक उत्तम लाकडाच्या वस्तू आणी फर्निचर सुद्धा तसेच वाया घालवणे कदाचित बरोबर नाही.

पण हे मुद्दे मला तितकेसे महत्वाचे वाटत नाहीत. तांबे किंवा पितळ या धातूंपासून विजेच्या तारा (वायरी) किंवा नटबोल्ट वगैरे तयार करण्यात येणारा खर्च खूप जास्त असतो. या गोष्टी एका ठिकाणाहून काढून जशाच्या तशा दुसरीकडे वापरणे बहुतेक वेळा अशक्य किंवा असुरक्षितपणाचे धोकादायक असते. यामुळे इंडस्ट्रीमध्ये तसे कधीच केले जात नाही. त्यातल्या मूळ धातूची भंगारात मिळणारी किंमत अगदी नगण्य असते. हा अनुभव सर्वांनी घेतला असेल.

या लेखावर आलेले आणखी काही प्रतिसाद असे होते.

जगातली ५०% मोडीत निघालेली जहाजे ही भंगार स्वरूपात गुजरातमध्ये येतात. अलंग शिपयार्ड मध्ये त्यांना मोडीत काढून रिसायक्लींग, हॅझार्डस वेस्ट वगैरे वेगळे करणे चालते...

या बाबतीत इंग्लंड, फ्रान्स, इटली आदि युरोपियन देश आणि विशेषतः अमेरिका आपल्या खूप पुढे आहे. कुठलीही जुनी वस्तू आकर्षक रीतीने मांडून ती पहायला येणा-या लोकांच्या खिशामधून पैसे काढून घेणे त्यांना चांगले जमते पण आपल्याला ते तितकेसे जमत नाही. हे बरोबर आहे पण तरी देखील अमेरीकेसंदर्भात किंचीत असहमत. वॉशिंग्टन डिसी मधली स्मिथसोनियनची सगळी वस्तुसंग्रहालये ही जनतेसाठी मोफत आहेत. (माझ्या अमेरिका भ्रमणात मी तरी बहुतेक सगळ्या जागी १०-१५ डॉलर्स इतके प्रवेशमूल्य भरलेले आहे.) या सर्वच देशात (पक्षि: पाश्चात्यांमधे) इतिहासाचे दस्ताइवज अधिकृतपणे संग्रहीत करून ठेवायची पद्धतच नाही तर परंपरा आहे. दुर्दैवाने आपल्यातही ती जरी कधीकाळी असली तरी कुठेतरी वाटते की ब्रिटीशांच्या काळातील पारतंत्र्यात ती निघून गेली. जिथे वेगळी जागा न लागणारे किल्ले नीट ठेवले जात नाहीत तेथे विक्रांतची काय अवस्था

लिलावातून काय अगदी देशाच्या तिजोरीत फार मोठी भर पडेल इतके पैसे मिळतील असे नाही. त्यामुळे जर कोणी खरंच संग्रहालय करत असेल तर ते आर्थिकदृष्ट्या मानवण्यासाठी बोट कमी भावातही द्यायला हरकत नाही... किंबहुना तसेच करून संग्रहालयाच्या उत्तम असण्याबद्दलच्या अटी मान्य करून घ्याव्या असे मला वाटते. मात्र चलाखी करून आता कमी किंमतीत घेऊन नंतर अनावस्था करणार नाही किंवा भंगारात देऊन पैसे कमावणार नाही असे क्लॉजेस विक्री करारात टाकणे आवश्यक आहे.


"कोण मुर्ख ५०० कोटी गुंतवुन ५० वर्ष फीटायची वाट बघत बसेल?." ही गुंतवणूक किती आतबट्ट्याची आहे ?
विक्रांतचे स्मारक बनावे हा प्रश्न सुद्धा लाखो सैनिकांच्या श्रद्धेचा असू शकतो. मला असे कित्येक सैनिक माहित आहेत ज्यांनी आपल्या आयुष्याची तीस वर्षे विक्रांत आणि त्याची दुरुस्ती यार्ड यात सेवा करण्यात काढली आहेत.
-----------------------------------------------

Wednesday, December 04, 2013

अरेरे, विक्रांत लिलावात चालली


इंग्रजी भाषेत एक म्हण आहे, "The King is dead, Long live the King!" (आधीचा) राजा मरण पावला, (नवा) राजा चिरायु होवो. "विक्रांत या विमानवाहू नौकेचा लवकरच भंगार म्हणून लिलाव होणार आहे" अशी बातमी आज नौदल दिनाच्या दिवशीच वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर होती आणि नव्याने तयार होत असलेल्या विक्रांत या महाकाय जहाजाचा उल्लेख नौदल दिवसाच्या खास पुरवणींध्ये होता. त्यावरून या म्हणीची आठवण झाली.

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर १९६१ मध्ये या विमानवाहू नौकेचा समावेश भारतीय नौदलात दिमाखाने झाला होता. त्या वेळी मी कॉलेजमध्ये शिकायला सुरुवात केली होती. पण विक्रांतचे आगमन ही एक खूप मोठी घटना होती आणि तिचा प्रचंड गाजावाजा झाला होता हे अजून आठवते. दस्तुरखुद्द पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी या समारंभाला हजेरी लावली होती यावरून त्याला केवढे महत्व दिले गेले होते हे लक्षात येईल. या युद्धनौकेला ठेवलेले 'विक्रांत' हे नावही तेंव्हापासूनच कायमचे स्मरणात घर करून राहिले आहे. ही आगबोट इंग्लंडमधून आणली गेली होती आणि तिचे आय एन एस विक्रांत असे नामकरण व्हायच्या आधी तिला एचएमएस हर्क्युलस असे नाव होते असेही वाचले होते. त्यामुळे तिला बहुधा ब्रिटिश नेव्हीमधून त्यांच्या स्टँडर्डनुसार निरुपयोगी झाल्यामुळे रिटायर केल्यानंतर भारताच्या गळ्यात बांधले गेले असेल किंवा कदाचित तात्पुरते औदार्य दाखवून पुढे त्याचे स्पेअर्स वगैरेंचा व्यवहार करण्यासाठी बहाल केली असेल अशी अनेकांची कल्पना झाली होती. तो काळच असा होता की आधुनिक काळातली फारच कमी यांत्रिक उत्पादने भारतात होत असत आणि जी काही होत असत त्यातली बहुतेक उत्पादने परकीयांच्या सहाय्याने कोलॅबोरेशनमध्ये होत असत. येनकेनप्रकारेण काही तरी चांगल्या उपयोगी वस्तू पदरात पाडून घेणे एवढेच खूष होण्यासाठी त्या काळात पुरेसे असायचे. संरक्षण खात्याच्या सर्वच व्यवहारात कमालीची गुप्तता राखली जात असल्यामुळे त्याच्याकडे असलेल्या तोफा, रणगाडे, विमाने, आगबोटी वगैरेंच्या खरेदीच्या बाबतीत उघडपणे चर्चा होतही नसत आणि झाल्या तरी त्या समजून घेण्याइतपत मी मोठा झालो नव्हतो. त्यामुळे ही जुनी आठवण वर लिहिल्याइतपतच स्पष्ट होती. या आगबोटीवर विमाने ठेवलेली असतात आणि त्यांना हवेत उडवण्यासाठी किंवा खाली उतरण्यासाठी धावपट्ट्या (रनवे) तयार केलेल्या असतात यावरून तिच्या अवाढव्य आकाराची पुसटशी कल्पना येत होती. तोपावेतो मी कुठलेच विमानही पाहिलेले नसल्यामुळे ती कल्पनासुद्धा तशी धूसरच होती. नंतरच्या काळात अनेक वेळा बातम्यांमध्ये विक्रांतचे नाव आले आणि तिच्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळत गेली. 

या नौकेचा भारतात येण्यापूर्वीचा इतिहाससुद्धा मनोरंजक आहे. १९४३ साली म्हणजे दुसरे महायुद्ध जोरात चाललेले असतांना इंग्लंडमधल्या एका प्रसिद्ध कारखान्यात या नौकेची बांधणी सुरू झाली. त्या महायुद्धात नौदल आणि विमानदलांनी खूप महत्याची कामगिरी बजावली होती. ते युद्ध फक्त युरोपच्याच भूमीवर नव्हे तर इतर खंडांमध्ये तसेच महासागरांमध्येसुद्धा लढले जात होते. विमानवाहू जहाज समुद्रात दूर नेता येते आणि तिथून शत्रूवर हवाई हल्ला करता येतो अशा दुहेरी सागरी युद्धासाठीच या खास प्रकारच्या आगबोटीची रचना केली होती. पण ऑगस्ट १९४५ मध्ये हे महायुद्ध संपले आणि ही बोट सप्टेंबर १९४५ मध्ये तयार झाली. तोपर्यंत युद्ध संपलेले होते आणि त्यात इंग्लंड विजयी झाले असले तरी त्या देशाची आर्थिक स्थिती खस्ता झाली होती. मनुष्यबळ खच्ची झाले होते. ज्या साम्राज्यावर कधीच सूर्य मावळत नाही अशी प्रौढी इंग्रज लोक मारत असत ते पंचखंडात अस्ताव्यस्त पसरलेले साम्राज्य सांभाळणे त्यांना अशक्य झाले होते. यानंतर एका पाठोपाठ एक करून बहुतेक सगळ्या देशांना स्वातंत्र्य देणे भाग पडणार आहे याची स्पष्ट कल्पना आली होती. तसे होणार असेल तर विस्तारलेले साम्राज्य सांभाळण्यासाठी उभे केलेले अवाढव्य आरमार उगाचच कशाला ठेवायचे? असा सूज्ञ विचार करून तशा प्रकारचे धोरण आखले गेले. यामुळे एचएमएस हर्क्युलस असे नाव ठेवले गेल्यानंतरसुद्धा या बोटीला शस्त्रसज्ज करण्याची कारवाई केली गेलीच नाही. १९४६ साली तिला गुपचुप आडबाजूला नेऊन ठेऊन दिले गेले.

मोठ्या युद्धनौकांची बांधणी हे सुद्धा अचाट काम असते. ही जहाजे हजारो टन वजनाची आणि प्रचंड आकाराची असतात. सर्वसाधारण आकाराच्या कारखान्यात हे काम करता येत नाही. जहाजबांधणी करता येण्याजोग्या विशाल कारखान्यांना सुकी गोदी (ड्राय डॉक) असे म्हणतात. समुद्राच्या किंवा मोठ्या नदीच्या किना-यावर उभारलेल्या एका सुक्या गोदीत आधी जहाजाचा सांगाडा (स्ट्रक्चर) रचून उभा करतात. विशिष्ट प्रकारच्या पोलादाच्या जाड प्लेट्सचे शेकडो तुकडे विशिष्ट आकारांमध्ये कापून आणि त्यांना हवा तेवढाच बाक देऊन जोडणीसाठी तयार करतात. हे सगळे तुकडे एकमेकांना आणि त्या सांगाड्याला वेल्डिंग करून जोडतात. सगळ्या भागांची जोडणी आणि निरीक्षण (इन्स्पेक्शन) पूर्ण झाल्यावर त्या रिकाम्या जहाजाला हळूहळू पाण्यात ढकलत नेतात. याला लाँच करणे म्हणतात. हा पहिला महत्वाचा टप्पा असतो. त्याच्या अनेक चाचण्या घेऊन ती बोट खवळलेल्या समुद्राच्या पाण्यात सुद्धा सुरक्षितपणे चालू शकेल याची खात्री करून झाल्यानंतर तिला पुन्हा ड्राय डॉकमध्ये नेऊन तिच्यावर यंत्रसामुग्री, शस्त्रास्त्रे वगैरे चढवतात. समुद्रात गेल्यानंतर त्या नौकेला महिनोंमहिने तिथे काढायचे असतात. त्या कालखंडात त्या नावेवर काम करणा-या खलाशांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याच्या व्यवस्था ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे नौका चालवण्याची यंत्रसामुग्री, हल्ला किंवा बचाव करण्यासाठी ठेवलेल्या शस्त्रास्त्रांना चालवण्याची यंत्रणा आणि खलांशांना रहाण्याच्या द़ष्टीने ठेवलेल्या सुखसोयी या सगळ्या गोष्टी नीटपणे चालवून त्या व्यवस्थितपणे चालतात की नाही हे तपशीलवार पहावे लागते. त्यात ज्या बारीक सारीक त्रुटी आढळतात त्यांना दूर करणे आवश्यक असते. हे काम जिकीरीचे आणि वेळ खाणारे असते. याला कमिशनिंग म्हणतात. एचएमएस हर्क्युलस लाँच झाली असली तरी तिचे कमिशनिंग झालेले नव्हते.

दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच्या काळात भारतावर ब्रिटीशांची सत्ता असतांना त्यावर समुद्रमार्गे आक्रमण होण्याची शक्यता शून्याच्या जवळपास होती. त्यामुळे ब्रिटीश इंडिया सरकारला फार मोठी नेव्ही बाळगण्याची आवश्यकता नव्हती. व्यापारी किंवा प्रवाशांची वाहतूक करणा-या जहाजांना समुद्री चांच्यां(पायरेट्स)पासून संरक्षण देणे एवढीच गरज त्या काळात होती. पण स्वतंत्र भारताला मात्र संरक्षणाच्या सर्वच बाबतीत सुसज्ज होणे अत्यंत आवश्यक होते. त्या दृष्टीने नियोजन करतांना आरमारासाठी एक विमानवाहू जहाज घ्यायचे ठरवले गेले. त्याबद्दल विचारविनिमय, वाटाघाटी वगैरे होऊन १९५७ साली ब्रिटनबरोबर एचएमएस हर्क्युलसच्या खरेदीचा करार करण्यात आला. दहा अकरा वर्षे नुसत्या पडून राहिलेल्या या जहाजाला पुन्हा सुसज्ज करून आणि त्यात काही आवश्यक अशा सुधारणा (मॉडिफिकेशन्स) करून त्या बोटीचे कमिशनिंग करणे, त्यावर अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवणे, त्यावर ठेवण्यासाठी योग्य आणि सक्षम अशी विमाने निवडून त्यांची खरेदी करणे, या सगळ्यांची कसून चाचणी घेऊन पाहणे, तंत्रज्ञांचे आणि कामगारांचे प्रशिक्षण वगैरे करण्यात आणखी तीन चार वर्षांचा कालावधी लागला. मार्च १९६१ मध्ये सगळे काम पूर्ण झाल्यानंतर इंग्लंडमधील भारताच्या त्याकाळच्या राजदूत विजयालक्ष्मी पंडित यांना ती सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर आवश्यक अशा इतर बाबी पूर्ण करून आणखी काही महिन्यानंतर तिचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. 

हे अवाढव्य आकाराचे जहाज तब्बल २१३ मीटर लांब, ३९ मीटर रुंद आणि सात मीटर उंच (किंवा खोल) असून त्याचे पूर्ण वजन (फुल लोड) १९,५०० टन इतके होऊ शकते. यावरून अंदाज येईल. ४०००० अश्वशक्ती किंवा ३० मेगावॉट (३०००० किलोवॉट) इतक्या शक्तीची दोन टर्बाइन्स त्यावर बसवलेली असून त्यांना वाफेचा पुरवठा करणारे चार बॉयलर्स ठेवलेले आहेत. चार प्रकारची अनेक विमाने या जहाजावर ठेवली जात होतीच. शिवाय बारा मोठमोठ्या तोफा आणि दारूगोळ्याचा भरपूर साठा त्यावर ठेवलेला असे. १००० पासून १३०० पर्यंत नौसैनिक या जंबो जहाजावर तैनात केले जात.

पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धांमध्ये आय एन एस विक्रांतने अत्यंत महत्वाची कामगिरी केली आणि नावाला जागून विजय मिळवून दिला. पूर्व पाकिस्तानच्या (आताच्या बांग्लादेशातल्या) नेव्हीचा पुरा बीमोड केलाच, तिथल्या बंदरांची नाकेबंदी करून बाहेरून कसल्याही प्रकारची मदत मिळणे अशक्य करून ठेवले होते. काळाबरोबर नव्या प्रकारच्या अधिक शक्तीशाली आणि वेगवान विमानांची गरज पडली. त्यांचा उपयोग करता येणे शक्य व्हावे यासाठी विक्रांतमध्ये काही सुधारणा केल्या गेल्या. तिची जुनी झालेली इंजिने काढून त्यांच्या जागी चांगली नवी इंजिने बसवली गेली. असे करत करत आणखी पंधरा वीस वर्षे गेल्यानंतर मात्र या जहाजाचा वृद्धापकाळ सुरू झाला. त्यानंतर तिची डागडुजी होत राहिली असली तरी तिला खोल समुद्रात दूरवर पाठवणे धोक्याचे वाटायला लागले.

१९८७ साली एचएमएस हर्मिस ही विक्रांतहून मोठी विमानवाहू आगबोट खरेदी करून तिचे नाव विराट असे ठेवले गेले आणि विक्रांतला हळूहळू बाजूला करण्यात येऊन १९९७ मध्ये तिला नेव्हीच्या सेवेमधून मुक्त करण्यात आले. त्यानंतर या जहाजाचे काय करायचे हा प्रश्न गेली सोळा वर्षे विचाराधीन आहे. तिचा उपयोग प्रशिक्षण देण्यासाय़ी करावा असा एक विचार होता, तर त्या जहाजाचे रूपांतर सागरी वस्तुसंग्रहालयात (म्यूजियममध्ये) करावे हा विचार जवळ जवळ पक्का झाला होता. पण प्रदर्शनाचे काम नेव्हीच्या अखत्यारात येत नाही. ते राज्य सरकार करू शकते. पण एवढे अवाढव्य जहाज कुठे ठेवायचे? ते पहायला जाणा-या पर्यटकांना तिथे कसे न्यायचे? किती लोकांना ते पहायची उत्सुकता असेल? आणि ते म्यूजियम चालवायला येणारा खर्च कसा भागवायचा? वगैरे प्रश्न समाधानकारक रीतीने न सुटल्यामुळे त्यातले काहीच यशस्वी रीतीने होऊ शकले नाही. या बाबतीत इंग्लंड, फ्रान्स, इटली आदि युरोपियन देश आणि विशेषतः अमेरिका आपल्या खूप पुढे आहे. कुठलीही जुनी वस्तू आकर्षक रीतीने मांडून ती पहायला येणा-या लोकांच्या खिशामधून पैसे काढून घेणे त्यांना चांगले जमते पण आपल्याला ते तितकेसे जमत नाही. भारतातील एकादी खाजगी संस्था किंवा व्यक्ती ही कला आत्मसात करून घेईल आणि विक्रांतचे रूपांतर आकर्षक अशा प्रदर्शनात करेल अशी एक आशा अजूनही वाटते.

निकामी पडलेले जहाज आणि तिच्यावरील यंत्रसामुग्री यांचेसुद्धा मेन्टेनन्स तर करावे लागते आणि त्यासाठी मनुष्यबळ आणि पैसे खर्च होतात. "हा पांढरा हत्ती असाच पोसत राहणे आता आपल्याला शक्य नाही." असे सांगून नौदलाने आपले हात झटकले आहेत आणि म्हाता-या झालेल्या विक्रांतचा आता नाइलाजास्तव भंगार म्हणून लिलाव करण्यात येत आहे. तिला खरेदी करण्यासाठी कोणती गि-हाइके बोली लावणार आहेत? विकत घेतल्यानंतर ते तिला बाळगणार आणि जपणार आहेत की तिची तोडफोड करून त्यातले पोलाद वितळवून वापरणार आहेत? एके काळी भारताचा मानदंड असलेली ही नौका परदेशातला कोणी व्यापारी विकत घेऊन दुसरीकडे घेऊन जाणार आहे का? की ही नौका वस्तुसंग्रहालयाच्या रूपाने अनंत काळपर्यंत आपल्याकडे राहील? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात दडली आहेत.

सगळ्याच आगबोटी, मग त्या सामानाची वाहतूक करत असोत किंवा प्रवाशांची, त्यांची उपयुक्तता संपल्यानंतर मोडीत काढल्या जातात. युद्धनौकासुद्धा त्याला अपवाद नाहीत, पण विक्रांत ही भारताची पहिली विमानवाहू नौका होती आणि छत्तीस वर्षे आपल्या आरमाराचा महत्वाचा भाग होती, त्यातली सहवीस वर्षे ती एकमेव होती, युद्धामध्ये तिने अविस्मरणीय अशी कामगिरी केली होती. या सगळ्यामुळे तिने भारतीयांच्या मनात घर करून ठेवले आहे. आता तिचा काही उपयोग राहिला नसला तरी तिच्या नाहीशा होण्याची हळहळ तीव्रतेने वाटते, पण व्यावहारिक दृष्टीने त्याला काय मोल आहे? आणि अशा किती गोष्टी आपण सांभाळून ठेवू शकणार आहोत? त्यासाठी किती खर्च करणे परवडण्याजोगे आहे? असे अनेक प्रश्न आहेत.

जुनी विक्रांत बोट जरी आता कायमची नजरेआड जाण्याची शक्यता समोर ऊभी ठाकली असली तरी संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू नौका या वर्षीच लाँच झाली आहे. तिचेही नाव विक्रांत असेच ठेवून ते नाव पुढे चालत राहण्याची व्यवस्था केली आहे. विराट सुद्धा आता जुनी व्हायला आली असून नवी विक्रांत कार्यान्वित झाल्यानंतर तिलाही रजा द्यावी लागणार आहे. दरम्यान नौदलाने विक्रमादित्य ही आणखी एक मोठी विमानवाहू नौका घेतली गेली आहे. पण आता या प्रकारच्या आगबोटींची निर्मितीच आपल्या देशात कोची इथे होऊ लागली असल्यामुळे गरजेनुसार त्या तयार केल्या जात राहतील. पहिली विक्रांत लिलावात निघाली तरी तिचे नाव आणखी काही दशके तरी चालत राहील.