Saturday, September 08, 2012

सप्टेंबर




हाताची पाचही बोटे सारखी नसतात, त्याच प्रमाणे वर्षातले सारे महिनेही एकसारखे नसतात. प्रत्येक महिन्याची काही वैशिष्ट्ये असतात किंवा त्याला संलग्न अशा घटनांच्या आठवणी असतात. काही महिन्यांच्या बाबतीत या गोष्टी ठळकपणे जाणवतात, तर काहींच्या बाबतीत त्या मुद्दाम आठवाव्या लागतात. माझ्या लहानपणी सप्टेंबर महिना तशातला होता. तो गुपचुपपणे सुरू होत असे आणि काही गाजावाजा न करता संपून जात असे. पुढे येणारा ऑक्टोबर महिना दसरा दिवाळीसारखे सण आणि मुख्य म्हणजे त्यानिमित्य शाळेला मिळत असलेली लांब सुटी यामुळे हवाहवासा वाटायचा आणि त्याची प्रतीक्षा करण्यातच सप्टेंबर जायचा.

मी कॉलेजमध्ये शिकत असतांना 'कम सप्टेंबर' हा हॉलीवुडचा सिनेमा आला आणि त्याने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. रॉक हडसन आणि जिना लोलोब्रिजिडा ही जोडी आणि हा मनोरंजक सिनेमा त्या काळातील युवकांच्या गळ्यातले ताईत बनले. जिनाच्या मादक सौंदर्यावर सारे युवक फिदा झालेले होते आणि तिच्या लोलोब्रिगिडा अशा लांबलचक आणि चमत्कारिक नावाचा उच्चार एका दमात करू शकत होते. या सिनेमातले संगीत वाद्यसंगीतांवर वाजवले गेले नाही आणि त्याच्या तालावर मुले नाचली नाहीत असा एकही गॅदरिंगचा कार्यक्रम त्या काळातील कॉलेजांमध्ये होत नसेल. गन्स ऑफ नेव्हेरॉनसारखे युध्दपट आणि जेम्सबाँडचे रहस्यपट यासारख्या हाणामारीच्या चित्रपटांचीच चलती त्या काळच्या हॉलीवुडच्या सिनेमांमध्ये प्रामुख्याने होती. पण त्या सर्वांहून वेगळा असा कम सप्टेंबर हा हलका फुलका सिनेमा त्या सर्वांवर मात करून गेला. परगावी किंवा परदेशात रहात असलेल्या धनाढ्य व खडूस मालकाचा एकाद्या निसर्गरम्य स्थळी असलेला आलीशान बंगला नेहमी त्याच्या नोकराच्या ताब्यात असतो. मालकाच्या गैरहजेरीत तो नोकर त्या बंगल्याचे हॉटेल बनवून पर्यटकांना भाड्याने देऊन पैसे कमवत असतो. एकदा अचानकपणे हा माणूसघाणा मालक आणि पाहुण्यांचे टोळके यांची अमोरासमोर गाठ पडते. अशा प्रकारचा कथाभाग त्यानंतर अनेक हिंदी सिनेमांमुळे येऊन गेल्यामुळे आता जुना झाला आहे. पण पन्नास वर्षांपूर्वी तो खूप मजेदार वाटत असे. सप्टेंबर या महिन्यालाही या चित्रपटामुळे एक महत्व प्राप्त झाले.

त्याच काळात भारतात एक नवा पायंडा सुरू झाला. दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून पाळावा असे १९६२ साली ठरले आणि शाळांमधून तो साजरा करणे सुरू झाले. या दिवशी शाळेतली मुले शिक्षकांना हारतुरे देऊन त्यांचा मानसन्मान करतात, काही शाळांमध्ये मुलेच शिक्षक बनून खालच्या वर्गांचे अध्यापन करतात वगैरे ऐकले. पण मी त्याआधीच शाळेतून बाहेर पडलेलो असल्यामुळे मला काही हा दिवस साजरा करायला मिळाला नाही आणि त्या निमित्याने कोणाला शिकवायलाही मिळाले नाही. या दिवशी काही निवडक शिक्षकांचा सरकारतर्फे सन्मान केला जातो. प्रत्येक राष्ट्रांमध्ये निरनिराळ्या दिवशी शिक्षक दिवस साजरा केला जातो. ५ सप्टेंबर हा आपले दुसरे राष्ट्रपती स्व.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस आहे. ते एक अत्यंत विद्वान गृहस्थ होते आणि त्यांना शिक्षणाबद्दल खूप आस्था होती म्हणून या दिवसाची निवड शिक्षकदिनासाठी केली गेली. ती प्रथा पुढे चालत राहिली आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरूपौर्णिमा म्हणून साजरी करण्याची भारतीय परंपरा आहे. पण गुरू हा शब्द शिक्षक या शब्दाहून खूप व्यापक आहे. गुरुशिष्यपरंपरेनुसार गुरुचरणी लीन होऊन त्याच्याकडून मिळेव तेवढे ज्ञान, कला, विद्या घेणारे लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशी आठवणीने या दिवशी गुरूचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याच्याकडे जातात. वेळापत्रकाप्रमाणे रोज थोडा वेळ वर्गात येऊन शालेय पाठ्यक्रमातील विषय शिकवून जाणा-या शिक्षकांसाठी साजरा केला जाणारा ५ सप्टेंबरचा शिक्षकदिवस गुरूपौर्णिमेची भावनात्मक जागा कदाचित घेऊ शकणार नाही.

अकरा वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेला एक अतीशय अनपेक्षित अशी भयानक घटना घडली. सीएनएन, बीबीसी आदि परदेशी वृत्तवाहिन्यांचे प्रक्षेपण  भारतात घरबसल्या टेलीव्हिजनवर पहाण्याची त्या काळात नुकतीच सुरुवात झाली होती.  त्या दिवशी आपल्याकडल्या संध्याकाळी मी सहज म्हणून सीएनएन चॅनल लावले आणि पडद्यावर दिसत असलेले दृष्य पाहून हतबुध्द झालो. न्यूयॉर्कमधल्या पहिल्या वर्ल़्ड ट्रेड सेंटर टॉवरवर काही मिनिटांपूर्वीच हल्ला होऊन त्याची पडझड झाली होती. त्या ठिकाणी उडालेली तारांबळ, धुळीचे लोट आणि गोंधळ याचे प्रत्यक्ष दर्शन चाललेले असतांनाच अचानक एक विमान आले आणि आमच्या डोळ्यादेखत दुस-या टॉवरला धडकले. पाहतापाहता ती इमारतसुध्दा पत्त्याच्या बंगल्यासारखी खाली कोसळली. प्रत्यक्ष घडत असलेल्या घटना आपण बातम्यांमध्ये पहात आहोत की हॉलीवुडचा एकादा भयपट पहात आहोत असा संभ्रम पडावा असे चालले होते. इतक्या भयानक घटनेचे असे प्रत्यक्ष चित्रीकरण (लाइव्ह शूटिंग) त्यापूर्वी कधीही मी पाहिले नव्हते आणि नंतरही नाही. अमेरिकेसारख्या प्रगत देशातल्या चार विमानतळांवरून उडालेल्या प्रवाशांची वाहतूक करणा-या चार विमानांचे एकाच वेळी अपहरण होते आणि वैमानिकांच्या खुर्चीवर बसलेले खुद्द अतिरेकीच त्या विमानांना ठराविक मार्गाने नेऊन अत्यंत महत्वाच्या इमारतींना सरळ ठोकर मारतात. असे घडू शकेल असे कोणी सांगितले असते तर त्याला इतरांनी बहुधा वेड्यात काढले असते. पण अकल्पनीय असे काहीसे त्याक्षणी घडलेच त्यानंतर सप्टेंबर महिना किंवा ९-११ हा शब्दप्रयोग दहशतीचा पर्यायवाचक ठरला आहे.

नेमक्या त्याच दिवशी आमच्या नात्यातली एक नवविवाहित मुलगी गौरी एकटीने भारतातून अमेरिकेला गेली होती. ती कुठल्या विमानाने कुठे जाणार होती याचा तपशील आम्हाला ठाऊक नव्हता. त्या दिवशी अमेरिकेतील विमान वाहतूक व्यवस्था कोलमडून पडलेली होती आणि मोबाईल्सचे नेटवर्कही जॅम झाले होते. तिचे विमानसुध्दा नियोजित जागी न उतरता दुसरीकडे वळवण्यात आले होते, याचाही कोणाला पत्ता लागत नव्हता. संध्याकाळपासून मध्यरात्र उलटेपर्यंत आम्ही सतत सीएनएन आणि बीबीसी लावून अमेरिकेतल्या बातम्या पहात बसलेलो होतोच. अधूनमधून भारतीय चॅनेल्सही पहात होतो. या घटनेमध्ये हताहत झालेल्यांची नावे स्क्रीनवर स्क्रोल होत होती. काही वेळ उलटून गेल्यानंतर अमेरिकेत सुखरूप असलेल्या भारतीयांची नावेही दिसायला लागली. कोणी तरी त्यात गौरीचे नाव वाचले आणि टेलीफोनने इतर नातेवाईकांना कळवले. ते ऐकून आमचा जीव भांड्यात पडला. या सगळ्यामुळे त्या दिवसाची आठवण कधीच विसरली जाणे शक्य नाही.
चार वर्षांपूर्वी आम्ही अमेरिकेच्या सहलीवर तिकडे जाऊन पोचलो तेंव्हा सप्टेंबरची अखेर आली होती. सर्व वनराईवर लाल, पिवळा, सोनेरी, केशरी, जांभळा अशा विविध रंगांची उधळण झाली होती. हे दृष्य फारच मनोरम होते आणि मी पहिल्यांदाच पहात होतो. त्या वेळी तिकडे फॉल सीझन सुरू झाला होता आणि याला फॉलकलर्स असे म्हणतात हे नंतर समजले.
तर असा हा सप्टेंबर महिना. या महिन्यालाही आता काही खास वैशिष्टे आणि आठवणी चिकटल्या आहेत.


No comments: