Saturday, March 31, 2012

स.दा.रडके आणि सदानंद

सदाशिव दामोदर रडके त्याच्या नावाला स्मरून सतत दुर्मुखलेलाच असायचा. सगळे जग चुकीच्या किंवा वाईट गोष्टींनी भरले आहे, त्यात रहाण्याच्या लायकीचेच ते नाही असे त्याचे मत होते. त्याबद्दल इतर माणसे तक्रार का करत नाहीत ही त्याची सर्वात मोठी तक्रार असे. सगळे लोक त्याच्या वाईटावर टपून बसले आहेत असेही त्याला कधी कधी वाटत असे. त्याचे रडगाणे ऐकून कंटाळलेल्या एका माणसाने त्याला सांगितले की जवळच सदानंद नावाचा नेहमी आनंदात राहणारा एक सुखी माणूस राहतो. सदाशिवाचा त्यावर विश्वासच बसेना. तेंव्हा तो माणूस त्याला सदानंदाकडे घेऊनच गेला. सदाशिवाची लहान मुलगीसुध्दा हट्ट धरून त्याच्या मागे मागे तिथे गेली.


सदानंदाने त्यांचे स्वागत करून त्यांना दारातून आत यायला सांगितले. त्याचे एका खोलीचे घर पाहून सदानंद उद्गारला, "आत येऊन काय करू? तुमच्या डोक्यावर बसू?"

सदानंदाने शांतपणे दोन घडीच्या खुर्च्या उघडून पुढे केल्या. कुरकुरतच सदाशिव एका खुर्चीवर बसत बोलला, "तुम्ही खूप सुखी आहात असे ऐकले होते, तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाहीत का हो?"

सदानंदाने उत्तर दिले, "अहो. तुम्ही आज माझ्याकडे पहिल्यांदाच आला आहात. आधी तुम्ही कोण ते सांगा. माझ्याबद्दल आपण नंतर बोलू."

"माझे नाव स दा रडके"

"तुम्ही कुठून आला आहात?"

"जवळच माझा बंगला आहे, पण कोणी त्याच्याकडे लक्षच देत नाही हो. सगळा घाणेरडा झाला आहे. पहावे तिथे धूळ, डाग आणि भेगा दिसतात."

"तुमच्या घरी आणखी कोण कोण असतात?"

"आई, बाप, बहीण, भाऊ, बायको, मुले वगैरे भरपूर लोक आहेत, पण कोणी माझे ऐकतच नाहीत. सारखी कटकट करत असतात."

"घराबाहेर तुमचे कोण मित्र वगैरे असतीलच."

"छे! इथले सगळे लोक इथून तिथून आप्पलपोटे आणि बिलंदर आहेत. शिवाय वर मलाच फिदीफिदी हसत असतात. इथे कोणाबरोबर संबंध ठेवायची मुळी कुणाची लायकीच नाही."

"परगावी तुमचे कोणी आप्त असतील. "

"हट्! पुण्याची माणसं भारी खंवचट, कोल्हापूरची ठसकेबाज आणि नागपूरची तर नेहमी आपलाच बडेजाव सांगणारी. त्यांच्याशी कोण संबंध ठेवेल?"

"बरं, आज माझ्याकडे कशासाठी आला आहात?"

"तुम्ही खूप मजेत राहता, नेहमी चांगल्या मूडमध्ये असता असं यांनी सांगितलं म्हणून तुम्हाला भेटायला यांनीच मला इथं आणलं आहे. पण इथं तर एवढ्याशा टीचभर जागेत इतकी अडगळ आहे, शिवाय सगळीकडे धूळ, डाग आणि भेगा. मला तर हे पहावतसुध्दा नाही. तुम्ही कसं काय इथं सुखाने राहू शकता हो?"

"ते माझं सिक्रेट आहे. एरवी मी कधी कुणाला सांगत नाही, पण तुम्हाला ऐकायचे असेल तर मी सांगेन, पण त्यासाठी आधी दोन मिनिटे तुम्हाला मी सांगेन ते करावे लागेल. घाबरू नका, तुम्हाला काहीही कष्ट पडणार नाहीत."

"सांगा."

"तुम्हाला माझं घर पहावत नाही ना? आपले डोळे मिटून घ्या आणि मी सांगतो ते मंत्र पाच पाच वेळा म्हणा."

"श्रीगणेशायनमः"

"श्रीग्णेशैन्म्ह"

"असे घाई घाईने म्हंटलेत तर ते त्या देवाला समजणार नाहीत, जरा सावकाश म्हणा श्री ग णे शा य न मः"

त्यानंतर ॐ नमःशिवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय वगैरे आणखी काही देवांचे मंत्र त्याने सदाशिवाकडून पाच पाच वेळा म्हणवून घेतले. तोपर्यंत त्याच्या डोळ्यावरचा चष्मा हलकेच काढला, त्यावर बसलेली धूळ, पडलेले डाग, रेघोट्या वगैरे पुसून तो स्वच्छ केला. तो त्याच्या डोळ्यावर पुन्हा चढवून खोलीतला दिवा मालवला आणि म्हंटले, "आता डोळे उघडलेत तरी चालेल."

"हे काय? सगळीकडे अंधार पसरला आहे."

"तुमच्या मनावरचं माझ्या खोलीचं तुम्हाला न आवडलेलं चित्र मी पुसून टाकलं आहे. आता मी दाखवतो ते पहा आणि लक्षात ठेवा."

असे म्हणून त्याने हातातल्या बॅटरीचा झोत एका मूर्तीवर टाकत विचारले, "कृष्णाची ही मूर्ती किती सुरेख आहे ना?"

"असेल, मग मी काय करू?"

"छान दिसते तरी आहे ना?"

"हो."

हातातल्या बॅटरीचा झोत भिंतीवर टांगलेल्या एका चित्रावर टाकून विचारले, "हा समुद्रकिना-याचा देखावा किती हुबेहूब काढला आहे ना?"

"असेल, पण आपल्याला त्याचा काय उपयोग आहे? त्या चित्रातल्या वा-यानं इथला उकाडा कमी होणार आहे का?"

"नाही, पण या चित्राकडे पहाणे तर चांगले वाटते तर आहे ना?"

बॅटरीचा झोत तिथे आलेल्या लहान मुलीच्या तोंडावर टाकून विचारले, "किती गोड मुलगी आहे ना? तुझीच आहे ही." असे म्हणत त्या मुलीला खुणेनेच सदाशिवाकडे पाठवले. त्यानेही तिला जवळ घेतले. घरातला दिवा लावून सदानंदाने सांगितले, "आता तुम्हाला दाखवलेल्या तीन्ही सुंदर गोष्टी या इथेच होत्या, पण मघाशी तुमचं लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही. तुम्हाला माझ्या घरातच नाही तर सगळीकडेच धूळ, डाग आणि भेगा दिसत होत्या, कारण त्या तुमच्या चष्म्याच्या काचेवर होत्या. इथे असलेले पेन, कागद, पुस्तके, कात्री, सुईदोरा, स्क्रू ड्रायव्हर, कुंचा, झाडू वगैरेसारख्या तुम्हाला अडगळ वाटणा-या या सगळ्या गोष्टी माझ्या उपयोगाच्या वस्तू आहेत. मुद्दामच मी त्या सगळ्या आपल्या नजरेला येता जाता सहज दिसतील अशा ठेवल्या आहेत. ज्या वेळी ज्या गोष्टीची मला गरज पडते तेंव्हा ती मला लगेच मिळते, तिला शोधावे लागत नाही की बाहेर जाऊन ती आणावी लागत नाही. सुंदर मूर्ती किंवा फ्रेम वगैरेंकडे पाहतांना मला आनंद मिळतो, त्यांचा मला किती उपयोग होतो याचा विचार मी करत नाही, त्याचप्रमाणे उपयुक्त वस्तूंमुळे माझी कामे लवकर होतात, त्यांच्याविना ती खोळंबून रहात नाहीत, यातूनही मला वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. त्या वस्तू दिसायला सुंदर असण्याची गरज नाही, त्या लगेच हाती येणे महत्वाचे असते. ज्याचा मला काही उपयोगही नाही आणि जो चांगला दिसतही नाही असा कचरा मी केराच्या टोपलीत टाकून देतो. नंतर मला त्याचा त्रास होत नाही.


माणसांच्या बाबतीतसुध्दा असंच असतं. काही काही माणसं खूप हुषार, जाणकार, विनोदी, अनुभवी, देखणी, प्रेमळ वगैरे असतात, त्यांच्या सहवासात आपल्याला आनंद मिळतो. आपल्या कामाच्या बाबतीत त्यांचा आपल्याला उपयोग होईलच असे नाही. तर अनेक माणसांकडे कुठलेही विशेष गुण नसले तरी ती आपल्या कामाची असतात. त्यांची आपल्याला खूप मदत होते. या सर्वांकडून आपल्याला आनंद मिळत असतो. वस्तू आणि माणूस यात एक फरक मात्र असतो. वस्तू आपण होऊन काही करत नाहीत. आपण त्यांचा उपयोग आपल्याला हवा तसा करून घेतो. माणसं मात्र दुस-याला आनंद किंवा मदत देऊ शकतात तसेच त्रासही देऊ शकतात. एवढे लक्षात ठेवले की आपल्याला काय करायचे ते ठरवता येते. ज्याच्याकडून जेवढा आनंद, सहकार्य, मदत वगैरे मिळेल तेवढे घ्यावे. त्याच्या इतर बाबतीतील उणीवांकडे जास्त लक्ष देऊ नये, आवश्यक वाटल्यास त्यापासून सावध रहावे एवढेच करायचा मी प्रयत्न करतो. त्यामुळे मला माझ्या सभोवतालचे जग वाईट आहे असे वाटत नाही. या जगातल्या आपल्याला आवडतील त्या आणि उपयोगाच्या वस्तू शोधाव्यात, त्या आणून ठेवून घ्याव्यात, न आवडणा-या सोडून द्याव्यात. त्याचप्रमाणे आपल्याला आवडणारी, प्रेम आणि मदत करणारी माणसे जोडावीत, कोणाबरोबर गहन विषयावर चर्चा करावी, कोणाशी थट्टामस्करी करावी, कोणाचे मजेदार अनुभव ऐकून घ्यावेत, कोणाकडून मनोरंजक माहिती घ्यावी. कोणाचे गाणे ऐकावे, कोणाचा अभिनय पहावा अशा असंख्य प्रकारे आपल्याला इतर लोकांकडून आनंद मिळत असतो. त्याचप्रमाणे आपल्या कामात असंख्य लोकांचे सहकार्य किंवा मदत आपल्याला मिळत असते. ती करणे हे त्यांचे कामच आहे, त्याची त्यांनाही गरज आहे किंवा त्यापासून त्यांचाही फायदा होतो वगैरे विचार करण्यापेक्षा आपल्याला लाभ झाला आहे याकडे लक्ष दिले तर त्यापासून समाधान मिळेल. माणसांचे आपसातले संबंध परस्परावर अवलंबून असतात. त्यामुळे समोरच्या माणसाने आपल्याला कसे वागवावे असे आपल्याला वाटते तसे आपण त्याच्याशी वागलो, तर तोही आपणास तशी वागणूक देण्याची शक्यता असते. दुस-यांकडून मदतीची अपेक्षा करायची असल्यास जे जे आपण त्यांच्यासाठी करू शकतो ते करत रहावे. ज्यांच्याशी पटत नसेल त्यांच्यापासून दूर रहावे. आपली दृष्टी स्वच्छ ठेवली, त्यावर धूळ बसू दिली नाही, डाग, चरे पडू दिले नाहीत तर आपल्याला ते सगळीकडे आणि सारखे दिसत राहणार नाहीत. एवढे केले तर या जगात आनंदी रहाणे शक्य आहे."



No comments: