Sunday, December 04, 2011

देव आनंद


कॉलेजशिक्षणासाठी मी मुंबईला आलो तेंव्हा आमच्या वसतीगृहात एकनाथ देव नावाचा एक मुलगा होता. आम्हा दोघांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमधील काही बाबतीत बरेच साम्य असल्यामुळे आमचे धागे लवकर जुळले आणि आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनलो. आम्हा दोघांच्या जोडीला इतर मित्र 'देव-आनंद' असे म्हणायला लागले. लहान गावातील सनातनी कुटुंबामधून आलेलो असल्यामुळे देव आनंदचे रोमान्सपूर्ण चित्रपट पाहण्याची संधी आम्हाला कधी मिळालीच नव्हती. त्याची आकर्षक छायाचित्रे तेवढी वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये आणि रस्त्यातील पोस्टर्सवर पाहिली होती. त्यामुळे त्याचा सिनेमा पाहण्याची आम्हालाही खूप उत्सुकता लागली आणि संधी मिळताच ती इच्छा पूर्ण करून घेतली. मी पाहिलेला देव आनंदचा पहिला सिनेमा बहुधा 'काला पानी' किंवा 'काला बाजार' असावा. माझे कॉलेजशिक्षण चालू असतांना घरातली आर्थिक परिस्थिती ओढाताणीचीच असल्यामुळे नाटक सिनेमा वगैरेंची चैन परवडण्यासारखी नव्हती. नोकरीला लागल्यानंतर मात्र या दोघांना अग्रक्रम देऊन तोपर्यंतचा सारा अनुशेष भरून काढला.

राजकपूर, दिलीपकुमार आणि देवानंद (बहुतेक लोक देव आनंद असा उच्चार न करता देवानंद असाच करतात) हे त्रिकूट त्याच्याही आधीच्या काळात हिंदी सिनेमाचे त्रिमूर्ती होते. त्यातला राजकपूर बहुधा शहरातला आणि दिलीपकुमार खेड्यातला गरीब बिचारा साधाभोळा, निरागस (किंचित बावळटपणाकडे झुकणारा) माणूस असायचा. त्या दोघांचे अभिनयकौशल्य वादातीत असले तरी सिनेमातली त्यांची पात्रे आकर्षत वाटत नसत. शिवाय ते दोघेही तोंवर वृध्दापकालाकडे झुकले होते आणि ते स्पष्टपणे दिसून येत असे. देवानंद मात्र चाळिशीत पोचलेला असला तरी अजून देखणा, स्मार्ट आणि स्टाइलिश हीरो शोभत असे. त्याने आपले दिसणे, चालणे, बोलणे, पाहणे वगैरे सगळ्या बाबतीत खास लकब निर्माण केली होती. त्याची केशरचना, वेषभूषा वगैरेंमध्ये खासियत असे. कदाचित त्यामुळेच नकला (मिमिक्री) करणा-या लोकांना देवानंदचे अॅक्टिंग करणे आवडत असावे. शिवाय देवानंदच्या चित्रपटात रडारडीचे प्रमाण कमी असायचे, छान छान गाणी असायची, बहुतेक वेळा उत्कट प्रेमकथा असायचीच, शिवाय उत्कंठावर्धक थरारनाट्य किंवा नर्म विनोदाची झालरही असायची. एकंदरीत 'नो टेन्शन, ओन्ली एंटरटेनमेंट' असल्यामुळे ते पहायला (विशेषतः त्या काळात) मजा येत असे. टेलिव्हिजन, व्हीडिओ किंवा सीडी प्लेयर वगैरे येण्यापूर्वीच्या त्या काळात सिनेमा पाहणे आणि सिनेमाची गाणी ऐकणे हीच मनोरंजनाची मुख्य साधने होती. या सगळ्या कारणामुळे त्या काळात देवानंदचा नवा पिक्चर आला की तो तर पहायचाच, शिवाय एकादा जुना चित्रपट मॅटिनीला लागला असेल तर तोही पहायचा असे ठरून गेले होते.
सिनेनायकांची नवी पिढी तोपर्यंत पडद्यावर आलेली होतीच. ते लोकसुध्दा पुढे वयोमानानुसार काका मामा वगैरे कामे करू लागले, पण देवानंद मात्र चित्रपटाचा नायकच राहिला. त्यामुळेच त्याला चिरतरुण, सदाहरित नायक (एव्हरग्रीन हीरो) असे संबोधले जाऊ लागले. त्याच्या चित्रपटांवर यापूर्वीच खंडीभर लिखाण होऊन गेले आहे आणि उद्या परवाच्या पेपरांमध्ये जिकडे तिकडे तेच पसरलेले दिसणार आहे. त्यामुळे त्यात आपली चिमूट टाकण्यात काही अर्थ नाही. माझ्या वैयक्तिक जीवनात मी कधीतरी कुठेतरी त्याच्या शूटिंगसाठी जमलेली गर्दी पाहिली असेल किंवा त्याला एकाद्या विमानतळावर इकडून तिकडे जातांना ओझरते पाहिले असले तरी अमोरासमोर आल्याचे आठवत नाही. त्याचे दर्शन सिनेमाच्या मोठ्या किंवा टीव्हीच्या (आणि आता संगणकाच्या) छोट्या पडद्यावरच झाले आहे. पण त्याची छबी कायमची स्मरणात राहणार आहे यात कणमात्र शंका नाही.
गाईड आणि हरे रामा हरे कृष्णा हे त्याचे दोन चित्रपट इतर रोमँटिक सिनेमांपेक्षा वेगळे होते. दोन्हींमध्ये उत्कृष्ट संगीत, छायाचित्रण, संकलन वगैरे तांत्रिक गुण होतेच, त्यातले कथा विषय हटके होते. गाईडची कथा निदान तत्कालीन सामाजिक परिस्थितीत पटण्यासारखी नव्हती, नायकाने चक्क एका विवाहित स्त्रीला तिच्या नव-यापासून दूर करण्याचा प्रयत्न करणे आणि तिने ते करणे हे तोपर्यंत चालत आलेल्या नायिकांच्या सती सावित्रीच्या परंपरेला जबरदस्त धक्का देणारे होते. अशा आधुनिक विचारांच्या नायकाने पाऊस पडावा म्हणून आमरण उपोषण करायला तयार होणे आणि देवाने प्रसन्न होऊन चक्क पाऊस पाडणे हे सुध्दा चमत्कारिक वाटणारे होते. तरीसुध्दा ती गोष्ट प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यात देवानंद बराच यशस्वी झाला होता. हरे रामा हरे कृष्णामध्ये थोडासा सामाजिक आशय होता. मोठ्या शहरांमध्ये नुकताच सुरू झालेला परदेशी हिप्पी लोकांचा शिरकाव आणि त्यांची मादक पदार्थांची व्यसनाधीनता वगैरे गोष्टी या सिनेमात प्रथमच दाखवल्या होत्या. या चित्रपटातून झीनत अमान ही नटी (बहिणीच्या रूपात) पुढे आली आणि एक नवी आणि वेगळी दिसणारी नायिका हिंदी सिनेमाला मिळाली. देव आनंद आणि त्याचे दोन बंधू चेतन आनंद व विजय आनंद या तीघांनी अनेक संस्मरणीय चित्रपट निर्माण करून ठेवले आहेत.

टेलीव्हिजनच्या माध्यमातून देव आनंद या व्यक्तीला पाहण्याची संधी अनेक वेळा मिळत गेली. नट व नायक देव आनंद म्हणून त्याची स्वतःची अशी एक इमेज तयार झालेली होतीच. माणूस म्हणून सुध्दा एक बुध्दीमान, विचारी, बहुश्रुत, हजरजबाबी आणि निर्भिड गृहस्थ अशी एक वेगळी आणि चांगली प्रतिमा मनात तयार झाली. बहुतेक मुलाखतींमध्ये तो आपली मते आणि विचार स्पष्टपणे आणि नेमक्या शब्दात व्यक्त करतांना दिसत असे. ती पटणे किंवा न पटणे हे वेगळे, पण मांडता येणेसुध्दा कौतुकास्पद वाटते. एक कुशल आणि कल्पक मनोरंजन करणारा (एंटरटेनर) यापेक्षा त्याच्या व्यक्तीमत्वाचा कॅनव्हास मोठा होता. सिनेमामधील त्याचे काम पाहून मजा वाटत असे, आता त्याच्याबद्दल मनात आदरभाव निर्माण झाला. अठ्ठ्याऐंशी वय झाल्यानंतर त्याचे निर्गमन कधीतरी होणार हे माहीत असले तरी आज सकाळी त्याची बातमी अचानक आल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्याला ही एक लहानशी श्रध्दांजली.



No comments: