Wednesday, August 31, 2011

स्यमंतक मण्याची कहाणी

कहाणी भाद्रपद चतुर्थीच्या चन्द्र दर्शन दोष निवारणाची
ऐका परमेश्वरांनो, गणेश, चन्द्र व श्रीकृष्णांनो तुमची कहाणी.

चन्द्र हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचाच अवतार आहे, पण तो चन्द्रवंशी क्षत्रिय कुलाचा मूळ पुरुष मानला जातो. चन्द्रवंशी घराण्याचा सर्वांत उज्वल तारा म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तेंव्हा श्रीकृष्णाकडून भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी चन्द्राच्या दर्शनाचे अजूनही राहून गेलेले लांछन मिटवण्यावर एक उपाय निर्मिला गेला हेहि सर्वथा योग्यच झाले. हा उपाय काय म्हणजे 'स्यमंतक मण्याचे आख्यान श्रवण' करणे व त्यासंबंधित एका संस्कृत श्लोकाचे (सिंह: प्रसेनं अवधीत् सिंहो जांबवताहत: सुकुमारक मा रोदी तव हि एष स्यमंतक: ) पठण करणे. या कथेत भगवान श्रीकृष्णाच्या दोन प्रमुख बायकांशी (जांबवंती व सत्यभामा) त्याच्या विवाहांची नोंद पण गुंतलेली आहे. ती कथा अशी आहे.



'द्वापर' युगांती "उग्रसेन" राजाला सिंहासनाधिष्ठित करून भगवान श्रीकृष्ण व बलराम यांची जोडी द्वारकेला राज्यकारभार सांभाळीत होते. द्वारकेतील एक यादव श्रेष्ठ 'सत्राजित्' याने घोर तपश्र्चर्या करून सूर्याला प्रसन्न करून घेतले. वरदान म्हणून सूर्याकडून 'स्यमंतक' मणी मिळवला. हा मणि सूर्या सारखाच तेज:पुंज होता व रोज १२ भार सोने ओकीत असे. तसेच त्याला धारण करताना अत्यंत स्वच्छतेची, शुद्धतेची, पावित्र्याची काळजी घ्यावी लागे, अन्यथा अपवित्रपणे धारण करणारा घोर प्राण संकटात पडत असे.

स्यमन्तक मणी धारण करण्या मागच्या सर्व धोक्यांचा विचार करून श्रीकृष्णाने सत्राजिताला असा सल्ला दिला की हा मणी राजा उग्रसेनाकडेच योग्य प्रकारे सुरक्षितपणे सांभाळला जाईल. इतरांना ते फ़ारच कठीण काम आहे व संकटांना आमंत्रित करण्या सारखे आहे. पण कृष्णाचा हा मैत्रीचा व सद्भावनेने दिलेला सल्ला सत्राजिताला कांही आवडला नाही. मणी उग्रसेनाला दिला म्हणजे तो अप्रत्यक्षपणे कृष्णालाच वापरायला दिल्यागत होईल व त्या मण्याच्या लोभानेच त्याने हा सल्ला आपल्याला दिला असणार असे त्याच्या मनाने घेतले व त्याने तो मणी उग्रसेनाला देण्याचे साफ़ नाकारले.
पुढे काय झाले की एकदा सत्राजिताचा भाऊ प्रसेन भगवान श्रीकृष्णा बरोबर अरण्यांत शिकारीला गेला. अरण्यांत घुसल्यावर दोघे आपाआपल्या कोणत्या तरी पशूचा पाठलाग करता करता एकमेका पासून दूर गेले. त्या दिवशी अपवित्रपणे प्रसेनाने स्यमंतक मणी गळ्यांत घातला होता. त्याचा परिणाम असा झाला कि त्याने सिंहाला मारण्याच्या ऐवजी तोच सिंहाकडून मारला गेला. नंतर त्या झटपटीत तो मणी सिंहाच्या गळ्यांत पडला व तो सिंह जांबवंताच्या दृष्टीस पडला. तेंव्हा जांबवंताने त्या सिंहाला ठार मारून तो मणी मिळवला व आपल्या गुहेत नेऊन आपल्या लहान मुलाच्या पाळण्यावर बांधला. त्यानंतर तो मुलगा रडू लागला की त्या मुलाची बहीण 'जांबवंती' हा मणी पहा. रडू नको. म्हणून त्याचे सांत्वन करीत असे.
इकडे काय झाले कि भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पारधीचे काम आटोपून एकटेच द्वारकेला परतले. प्रसेन परत आला नाही व श्रीकृष्ण मात्र परत आला हे पाहून सत्राजिताला श्रीकृष्णाचा सल्ला आठवला. प्रसेनाजवळ मणी होता तेंव्हा, श्रीकृष्णानेच त्याला एकटा पाहून त्याचा खून करून मणी पळवला असणार असे त्याच्या मनाने घेतले आणि नीट विचारपूस व विचारही न करताच त्याने "श्रीकृष्णाने असे केलेच" म्हणून अपप्रचार करण्यास सुरुवांत केली. श्रीकृष्ण हा लहानपणापासूनच नटखट-कारस्थानी म्हणून सुप्रसिद्धच होता त्यामुळे लगेचच लोकांचा या खोट्या आळावर विश्वास बसला.

श्रीकृष्णाने ते ऐकल्यावर बरोबर अनेक पोक्त साक्षीदार माणसे घेऊन तो अरण्यांत प्रसेनाच्या शोधांस गेला. तेथे त्याने सर्वांना प्रसेनाचे प्रेत व त्याला सिंहाने मारले असल्याच्या खाणाखुणा दाखवल्या. नंतर ते सर्व त्या सिंहाच्या पावलांचा मागोवा घेत पुढे गेले तेंव्हा त्यांना तो सिंहही मेलेला आढळला. त्या सिंहाची अस्वलाशी झटापट होऊन त्यांत तो मेल्याच्या खुणाहि पाहून मंडळी त्या अस्वलाच्या पाउलांचा मागोसा घेत घेत जांबवंताच्या गुहेपाशी आली.
सिंहालाही मारू शकणारे अस्वल वास करते त्या गुहेत घुसण्याचे धाडस कृष्णाने "साक्षीदारकी" करण्याच्या उद्देशाने बरोबर आणलेल्या कोणलाही होईना. शेवटी त्या सर्वांना "तुम्ही इथेच माझी वाट पहा" असे सांगून त्यांना गुहेच्या दारातच ठेवून कृष्ण एकटांच गुहेत घुसला. खूप आंत गेल्यावर त्याला तो स्यमंतक मणी एका लहान मुलाच्या पाळण्यांवर शोभेकरिता व मुलाचे लक्ष वेधण्यासाठी बांधून ठेवलेला दिसला. त्या मुलाची मोठ्ठी बहीण त्याला अंगाई गीत गाऊन झोपवण्याचा प्रयत्न करीत होती. ते गीत होते "सिंह: प्रसेनं अवधीत् सिंहो जांबवताहत:
सुकुमारक मा रोदी तव हि एष स्यमंतक:” (हे एक श्लोकी गीतच चन्द्र दर्शनाचा दोष शमवण्याचा "मंत्र" झाला आहे.)

कृष्णाला अचानक गुहेत आलेला पाहून जांबवंतीला आश्चर्य वाटले व आनंदही झाला. तिने स्यमंतक मणी कृष्णाला देऊ केला व निजलेला जांबुवंत उठण्यापूर्वीच निघून जाण्यास सुचवले. तेंव्हा कृष्णाने शंख फ़ुंकून जाम्बवन्ताला जागे केले. मग जांबुवंताचे व कृष्णाचे जवळ जवळ महिनाभर घोर युद्ध झाले. शेवटी जांबुवंत थकला व आपल्याला हरवणारा दुसरा कोणी असणे शक्य नाही, हा प्रत्यक्ष श्रीरामच पूर्वी दिलेल्या वचनानुसार श्रीकृष्ण अवतारात आपल्याला भेटायला आलेला आहे हे त्याने ओळखले व त्याला नमस्कार करून त्याची स्तुती केली. श्रीकृष्णानेहि प्रसन्न होऊन त्याला "श्रीराम" दर्शन घडवले. नंतर जांबुवंताने आपल्या कन्येचे जांबवंतीचे कन्यादान त्याला करून 'स्यमंतक' मणी "वर दक्षिणा" म्हणून प्रदान केला. मग श्रीकृष्ण जांबवंतीला बरोबर घेऊन गुहे बाहेर आला.

इकडे गुहेबाहेरील माणसांनी जवळ जवळ तीन आठवडे श्रीकृष्णाची वाट बघितली. नंतर श्रीकृष्ण गुहेत अस्वलाकडून मारला गेला असणर म्हणून समजून ती मंडळी द्वारकेला परतली आणि त्यांनी श्रीकृष्णाच्या मृत्यूचे वृत्त सर्वांना सांगितले. सर्वाना फ़ार शोक झाला व त्यांनी श्रीकृष्णाचे श्राद्धादिक क्रियाकर्मही केले.

गुहे बाहेर कोणीच नाही हे पाहून श्रीकृष्णाला आश्चर्य वाटले पण ते लोक द्वारकेला परत गेले असणार हे ओळखून तो जांबुवंतीसह द्वारकेला आला. त्याला अशा प्रकारे परत आलेला पाहून सर्वांना आनंद झाला. पण सत्राजिताला आपल्या आततायी मूर्खपणाने आपण श्रीकृष्णावर घातलेल्या चोरीच्या खोट्या आळाचा पश्चात्ताप झाला. श्रीकृष्णाने सत्राजिताला दरबारांत बोलवून सर्वांच्या समक्ष तो स्यमंतक मणी त्याच्या हवाली केला तेंव्हा तर सत्राजिताला फ़ारच ओशाळे झाले. केलेल्या चुकीच्या प्रायश्चित्तासाठी त्याने आपली कन्या 'सत्यभामा' हिचे कन्यादान श्रीकृष्णाला केले व स्यमंतक मणीही देऊ केला. पण श्रीकृष्णाने सत्यभामेशी लग्न केले पण मणी घेण्याचे साफ़ नाकारले.
मण्याचे अपशकुनी अस्तित्व खरोखरच आपल्याला फ़ारच धोकादायक आहे हे सत्राजिताच्या लक्षांत आले व त्याने तो मणी गुप्तपणे अक्रूलाला दिला. अक्रूर तो मणी घेऊन गुपचुपपणे काशीस जाऊन राहिला व त्या मण्यांतून निघणारे सोने वापरून अनेक यज्ञ याग करीत लोकोपयोगी परोपकारी व धार्मिक कृत्ये करण्यांत आयुष्य घालवू लागला.
एकदा श्रीकृष्ण व बलराम पांडवांना भेटायला हस्तिनापुराला गेल्यावेळी वेळ साधून शतधन्व्याने सत्राजिताचा खून केला आणि स्यमंतक मणी त्याचे जवळ – घरी दारी शोधला पण तो त्याला मिळाला नाही. तेंव्हा तो श्रीकृष्णाच्या भीतीने द्वारका सोडून पळून जाऊ लागला. श्रीकृष्णाला सत्यभामेकडून शतधन्व्याने केलेल्या सत्राजिताच्या वधाची बातमी कळल्यावर श्रीकृष्ण व बलराम लगेचच द्वारकेला परतले व त्यांनी शतधन्व्याचा पाठलाग करून त्याला लाथा बुक्क्यांच्या प्रहारांनीच ठार मारले. त्यांनाही मणी अक्रूराकडे काशीत आहे हे माहीत नव्हते. शतधन्व्याकडे मणी नाही हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले व बलरामालाही या सगळ्या प्रकरणांत श्रीकृष्णाचाच कांहीतरी हांत असावा अशी शंका आली व तो श्रीकृष्णाची भर्त्सना करून विदर्भाला निघून गेला.

स्यमंतक मण्याच्या चोरीचे भूत पुन:पन: आपल्यावर सवार होते हे पाहून श्रीकृष्णाला फ़ार दु:ख झाले व तो अशा दु:खाने म्लानवदन होऊन बसला असताना नारद मुनींनी त्याला पाहिले. त्याच्या चिन्तेचे कारण समजून घेतल्यावर त्यांच्या लक्षांत आले की हे सर्व भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चन्द्रदर्शनाचा दोष लागल्यानेच घडत असणारं. त्यांनी यावर उपाय म्हणून गणेशाची व्रते उपवास जप तप होम हवन इत्यादिक मार्गाने गजाननाला प्रसन्न करून घेण्याचा मार्ग सुचवला. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने व्रतादिक तपश्र्चर्या करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. गणेशाने त्याला हे स्यमंतक मण्याचे आख्यान जे श्रवण करतील व "सिंह: प्रसेनं अवधीत् सिंहो जांबवताहत: सुकुमारक मा रोदी तव हि एष स्यमंतक:” हा मंत्र जे म्हणतील त्यांना यापुढे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चन्द्रदर्शनाचा दोष लागणार नाही असा वर दिला.

श्रीगणेश कृपेने स्यमंतक मण्याच्या काशीतील अस्तित्वाची खबरही श्रीकृष्णाला कळली व त्याने बलरामासही ही सर्व वास्तविकता पटवून दिल्यावर तो द्वारकेला परतला व दोघे सलगीने सुखासमाधानाने राहू लागले.

अशा प्रकारे श्रीकृष्णाला ज्याप्रमाणे गणेश प्रसन्न झाला तसाच तुम्हां आम्हांवरही होवो.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफ़ल संपूर्ण.

-----------------------------------------------------------------------------------

ही कहाणी माझे बंधू डॉ.धनंजय घारे यांनी मला पाठवली आहे. त्यांचे आभार

----------------------------------------------------------------------------------



निष्कर्ष



पन्नास वर्षांपूर्वी उडत उडत कानावर पडलेली किंवा अर्थ न समजता वाचन केलेली स्यमंतक मण्याची कहाणी (किंवा सुरस आख्यान) आता छान तपशीलवार वाचायला मिळाली. यामधल्या सत्राजिताने घोर तपश्चर्या करून हा मणी प्राप्त करून घेतला, पण त्याचा किती उपभोग किंवा उपयोग करून घेतला ते तोच जाणे. आधी तो मणी त्याच्यापासून दुरावला आणि अखेर त्यापायी त्याला स्वतःचे प्राण गमवावे लागले, प्रसेन आणि शतधन्वा हेही त्यांच्या प्राणांना मुकले. यावरून असे दिसते (बोध मिळतो) की अप्राप्य आणि अमूल्य अशी वस्तू सांभाळण्याचे सामर्थ्य अंगात नसेल तर तिचा हव्यास धरणे म्हणजे सर्वनाशाला आमंत्रण देणे असते. याशिवाय काही उपनिष्कर्ष काढता येतील. उदाहरणार्थ

१. आपल्याला न पेलेल असे वरदान घेऊ नये

२. आपल्याकडील खास वस्तू कोणालाही देऊ नये. (भावालासुध्दा)

३. बाहेर जातांना (विशेषतः ओसाड जागी) अंगावर दागीने घालू नयेत

४. जोखमीची वस्तू सांभाळण्याची जबाबदारी फार कठीण असते. त्यात प्राण गमावण्याची वेळ येऊ शकते.

५. मित्राच्या सल्ल्यावर विचार करावा

६. संशयाला कोणतेही निमित्य पुरते आणि त्याला औषध नाही.

..... वगैरे

या स्यमंतक मण्याच्या निमित्याने श्रीकृष्णाला दोन बायका मिळाल्या ... कशामुळे काय घडेल याचा काही नेमच नाही. या आख्यानामध्ये घडत जाणा-या अनेक चमत्कृतीपूर्ण घटनांचा सुसंगत व सुसंबध्द असा अर्थ लावणे माझ्या आवाक्याबाहेर आहे. जांबुवंतीने गायिलेल्या "सिंह: प्रसेनं अवधीत् सिंहो जांबवताहत:
सुकुमारक मा रोदी तव हि एष स्यमंतक:” या अंगाईगीताचा गणेशाशी किंवा चंद्राशी काय संबंध असू शकतो हे निव्वळ अतर्क्य आहे.



No comments: