Friday, April 01, 2011

फुकुशिमा येथील दुर्घटनेच्या निमित्याने (उत्तरार्ध)
११ मार्चपासून फुकुशिमा पॉवर स्टेशनमध्ये घडत गेलेल्या घटनांकडे पाहण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. माणसाच्या शरीरात जठर, यकृत, फुफ्फुसे वगैरे इंद्रिये असतात आणि त्यांचे कार्य कसे चालते वगैरे आपण पुस्तकातून शिकतो, पण केंव्हाही त्या इंद्रियांच्या आतमध्ये नेमके काय चालले आहे किंवा काय होऊन गेले हे आपल्याला बाहेरून समजण्याची कसलीही निसर्गदत्त सोय नाही. त्याचप्रमाणे रिअॅक्टरची रचना आणि कार्यपध्दती माहीत असली तरी त्याच्या अंतर्गत भागात नेमके काय घडत आहे याचे खडान् खडा वृत्त बाहेरून समजत नाही. त्यासाठी प्रेशर, टेंपरेचर यासारखी अनेक प्रकारची मोजमापे घेणारी आणि त्यांची नोंद ठेवणारी उपकरणे असतात, पण तीच बिघडून गेली तर त्यांच्यापासून मिळणारी माहिती मिळत नाही किंवा मिळालेली माहिती विश्वासार्ह रहात नाही. शरीराला आलेला ताप, सूज, मळमळ, जळजळ, खोकल्याची ढास, वेदना वगैरे बाह्य लक्षणांवरून ते व्याधीग्रस्त झाल्याचे समजते आणि नाडीपरीक्षा, रक्तदाब, रक्ताची तपासणी, क्ष किरण, सोनोग्राफी यासारख्या खास परीक्षणांमधून त्याचे निदान केले जाऊन त्यावर उपाययोजना होते. रिअॅक्टरमध्ये मोठा बिघाड झाला तर त्याची चिकित्सासुध्दा दृष्य, आवाज, तपमान यासारख्या बाह्य लक्षणांवरून आणि निरनिराळ्या ठिकाणी मोजलेली वेगवेगळ्या विकीरणांची तीव्रता यासारख्या काही मोजमापांवरून केली जाते आणि त्यावर उपाययोजना केली जाते. ती करतांना रिअॅक्टरच्या स्वास्थ्याची काळजी बाळगण्यापेक्षा त्यापासून माणसांना हानी पोचणार नाही किंवा ती कमीतकमी पोचावी याला प्राधान्य दिले जाते. या प्रयत्नांमध्ये रिअॅक्टरचे नुकसान झाले तर त्याची पर्वा केली जात नाही. रुग्णाला दिलेल्या औषधोपचारातून त्याचे जठर, फुफ्फुस, हृदय यांच्या काम करण्यात नेमका कोणता आणि किती फरक पडला हे शरीराच्या बाह्य लक्षणावरूनच ठरवावे लागते. त्याचप्रमाणे रिअॅक्टरमध्ये काय चालले आहे याचा अंदाजसुध्दा अशा बाह्य निरीक्षणावरूनच घ्यावा लागतो. हे काम करत असलेल्या तंत्रज्ञांना त्यातले जेवढे समजलेले असते त्यातला थोडासा भाग ते जाहीर करतात आणि त्यात स्वतःचे तिखटमीठ मिसळून वार्ताहर त्याला प्रसिध्दी देतात. यामुळे निरनिराळ्या वाहिन्यांवरील बातम्या आणि वर्तमानपत्रांमधले वृत्तांत यात तफावत आढळते. या विषयावरील जेवढी माहिती मला वेगवेगळ्या सूत्रांकडून घरबसल्या मिळाली, त्यातली जेवढी उमगली आणि सुसंगत वाटली त्याच्या आधारावर हा लेख लिहिला आहे. या घटनेची चौकशी करणा-या औपचारिक यंत्रणेशी माझा कसलाही संबंध नाही आणि कोणाचीही बाजू घ्यायचे मला कारण नाही हे आधीच नमूद करतो.

वर दिलेल्या पहिल्या चित्रात बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरवर चालणा-या वीजनिर्मितीकेंद्राचे रेखाचित्र आहे, दुस-या चित्रात रिअॅक्टर व्हेसलची अंतर्गत रचना आहे आणि तिस-या चित्रात रिअॅक्टर बिल्डिंगमधील रचना आहे. ही चित्रे प्रातिनिधिक आहेत. तंतोतंत फुकुशिमाची नाहीत. त्यामुळे तपशीलात थोडा फार फरक असू शकतो. माझ्या पहिल्या लेखात लिहिल्याप्रमाणे जेंव्हा हे केंद्र व्यवस्थित कार्य करत असते त्यावेळी इंधनातील भंजनक्रियेतून रिअॅक्टरमध्ये ऊष्णता निर्माण होते, त्यामधून प्रवाहित होत असलेल्या पाण्यापासून उच्च दाबाची वाफ तयार होते, त्या वाफेवर टर्बाइन चालते आणि त्याला जोडलेल्या जनरेटरमध्ये निर्माण झालेली वीज ग्राहकांना पुरवली जाते. टर्बाइनमधून बाहेर पडलेल्या वाफेचे कंडेन्सरमध्ये पुन्हा पाण्यात रूपांतर होते आणि ते पाणी बाष्पीभवनासाठी रिअॅक्टरमध्ये परत जाते.

फुकुशिमा दायची विद्युतकेंद्रात अशा प्रकारचे सहा रिअॅक्टर आहेत. त्यापैकी युनिट क्र, ४, ५ आणि ६ काही दिवसापासून इन्स्पेक्शन, मेंटेनन्स वगैरेंसाठी बंद होते. ११ मार्च रोजी १, २ आणि ३ क्रमांकांची केंद्रे चालत होती. भूकंपाचा जोराचा धक्का बसताच ती आपोआप बंद झाली. त्यामधील फिशन थांबले असले तरी रेडिओअॅक्टिव्ह डिकेमधून मोठ्या प्रमाणावर ऊष्णता बाहेर पडत होती आणि ती वाहून नेणे आवश्यक होते. युनिट बंद होताच टर्बाइनचे फिरणे थांबते. त्यामुळे ही वाफ थेट कंडेन्सरकडे किंवा दुस-या हीट एक्स्चेंजरमध्ये नेऊन थंड करावी लागते. वाफेची निर्मिती थांबल्यानंतर तापत असलेले गरम पाणी या हीट एक्स्चेंजरमध्ये फिरवून निववले जाते. या पाण्याचे तसेच त्याला थंड करण्यासाठी समुद्रातील किंवा कूलिंग टॉवरमधील पाण्याचे अभिसरण करण्यासाठी काही पंप चालवावे लागतात. बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरमधील वाफ रेडिओअॅक्टिव्ह असल्याकारणाने ती हवेत सोडून देता येत नाही. तिला थंड करून बंदिस्तच ठेवावे लागते. गरजेनुसार रिअॅक्टरचे बंद करणे आणि पुन्हा सुरू करणे या नेहमीच्या क्रिया असल्याने रिअॅक्टर बंद केल्यानंतर त्याला थंड करण्याची योजना सर्व ठिकाणी केलेली असते आणि एरवी ती सुरळीतपणे चालते. अशा वेळी पॉवर स्टेशनमधील इतर युनिट्स चालू असल्यास त्यांच्याकडून विजेचा पुरवठा उपलब्ध असतो. तो नसेल तर ग्रिडला जोडलेल्या तारांच्या जाळ्यामधून बाहेरची वीज मिळू शकते. ते सुध्दा शक्य नसेल तर पुरेशी वीजनिर्मिती करण्यासाठी मोठमोठी डिझेल जनरेटर्स तयार ठेवलेली असतात. त्याशिवाय मोठ्या बॅटरी बँक्स असतात. कंट्रोलरूममधील सर्व उपकरणे, त्यांना माहिती पोचवणारी सारी उपकरणे, काँप्यूटर्स, महत्वाच्या व्हॉल्व्ह्जची उघडझाप करणारी यंत्रे, महत्वाचे लहान पंप, यांत्रिक दरवाजे, लिफ्ट्स, उजेडाची व्यवस्था अशा सर्व अत्यावश्यक गोष्टी न थांबता (अनइंटरप्टेड) निदान आठ तास तरी चालत राहतील एवढी क्षमता या बॅटरी बँक्समध्ये असते.

फुकुशिमा येथे भूकंपामुळे तेथील सर्व युनिट्स एका क्षणात बंद झाली आणि विजेचे टॉवर्स व तारांना क्षति पोचल्यामुळे बाहेरील वीजपुरवठासुध्दा थांबला. पण अपेक्षेप्रमाणे डिझेल जनरेटर्स लगेच सुरू झाले आणि रिअॅक्टर्सना थंड करण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर तासाभरात सुनामीची १४ मीटर उंच अशी प्रचंड लाट आली आणि ७ मीटर उंच असलेल्या संरक्षक भिंतीला ओलांडून ती पॉवर स्टेशनमध्ये घुसली. स्टेशनमधील सर्व डिझेल जनरेटर्स तळमजल्यावर किंवा तळघरात ठेवलेले असल्यामुळे सुनामीच्या दणक्याने त्या सर्वांची मोडतोड होऊन ते निकामी झाले. गरज पडल्यास एका युनिटमधून इतर युनिट्सना मदत करता येण्याची व्यवस्था असते, पण सहा युनिटसाठी केलेली सर्व व्यवस्था अशी एकाच वेळी नष्ट होईल अशी कल्पना मात्र कोणी केली नसेल. तसेच देशभर सगळीकडेच हाहाःकार उडालेला असल्यामुळे बाहेरूनसुध्दा कसलीही मदत मिळणे अशक्य झालेले होते.

रिअॅक्टरची कूलंट सिस्टिम बिल्डिंगच्या अनेक भागात बरीच पसरलेली असते. त्यात पंप, व्हॉल्व्ह, हीट एक्स्चेंजर्स, फिल्टर्स, पाइप्स, फिटिंग्ज वगैरे बरीच इक्विपमेंट्स असतात. कोणत्याही कारणाने त्यातल्या कशामधूनही पाण्याची गळती झाल्यास रिअॅक्टरला होणारा पाण्याचा पुरवठा खंडित होतो आणि त्याचे तपमान वाढायला लागते. अशा आणीबाणीच्या वेळी उपयोगी पडण्यासाठी खालील व्यवस्था रिअॅक्टरमध्ये केलेल्या आहेत.
हाय प्रेशर कोअर स्प्रे
लो प्रेशर कोअर स्प्रे
लो प्रेशर कूलंट इंजेक्शन
स्टँडबाय लिक्विड कंट्रोल सिस्टिम
ऑटोमॅटिक डिप्रेशरायझेशन
यातील प्रत्येक सिस्टिमसाठी वेगवेगळ्या टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवले असते. जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे क्रमाक्रमाने त्या सिस्टिम्स कार्यान्वित होतात आणि रिअॅक्टरला थंड करण्याचे काम करतात. या कामासाठी कधीही पाण्याचा तु़टवडा पडणार नाही हे विश्लेषणातून तसेच प्रात्यक्षिकांमधून सिध्द करावे लागते. मात्र हे काम करतांना कुठली ना कुठली वीज उपलब्ध असेल असे गृहीत धरावे लागते आणि त्याचीही भरपूर योजना केलेली असल्यामुळे ती नाही असे यापूर्वी कधी झाले नाही. पण यावेळची परिस्थिती अकल्पनीय अशी होती.

डिझेल जनरेटर्स बंद पडल्यानंतर बॅटरी बँक्सचे नक्की काय झाले हे माहीत नाही, पण एकाच वेळी सर्व रिअॅक्टर्सना मोठ्या प्रमाणावर पाण्याचा पुरवठा करणे त्याच्या आवाक्याबाहेरचे काम होते याची कल्पना होती. त्यामुळे लगेच आणीबाणीची घोषणा केली गेली आणि २० किलोमीटरच्या परिसरातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले. तीनही रिअॅक्टरमधील तपमान वाढत गेले, त्यातून हैड्रोजन वायू तयार झाला आणि तो बाहेर पडून त्याचा स्फोट झाला हे माझ्या पहिल्या लेखात लिहिले होते. असा हैड्रोजन वायू कमी प्रमाणात तयार झाला असेल तर त्याला हवेत सोडण्यापूर्वीच एका बंद चेंबरमध्ये जाळून टाकण्याची व्यवस्था असते. इतर सारे सुरळीत चालले असते तर कदाचित हे काम सुनियंत्रित रीतीने करता येऊ शकले असते. पण हैड्रोजन वायूचा दाब इतका वाढला होता की त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. त्याने रिअॅक्टर व्हेसलला फोडून बाहेर पडण्यापूर्वी त्याला बाहेर पडण्याची वाट मोकळी करून देणे भाग होते. त्यातून झालेल्या स्फोटामुळे बिल्डिंग्जची छपरे उडाली आणि भिंती कोसळल्या.

रिअॅक्टर्समध्ये हे महाभारत चालले असतांना त्याच्या शेजारी असलेल्या स्पेंट फ्यूएल पूलमधील पाणी थंड करणे तर थांबलेले होतेच, त्या पाण्याची वाफ होऊन त्याची पातळी खाली जातच होती. रिअॅक्टर क्रमांक ४ मध्ये मुख्य रिअॅक्टरपेक्षा या स्पेंट फ्यूएल पूलने जास्त उग्र रूप धारण केले. हा ओपन टँक असल्यामुळे त्यात प्रेशर वाढण्याचा प्रश्न नसला तरी तपमान वाढत जाणे धोकादायक होते. त्यामुळे त्या बिल्डिंगमध्ये आग लागली. नेहमीची अग्निशामक व्यवस्था चालत नसल्यामुळे हॅलिकॉप्टरमधून पाण्याचा वर्षाव करण्यात आला. एका युनिटमध्ये आलेला प्रॉब्लेम इतर ठिकाणीसुध्दा येण्याची शक्यता असल्यामुळे सगळीकडे पाणी टाकण्यात आले.

रिअॅक्टर किंवा स्पेंट फ्यूएल पूल अशा महत्वाच्या जागी अत्यंत शुध्द असे डिमिनरलाइज्ड पाणी वापरले जाते. पण ते तयार करणारी यंत्रणा तसेच त्याला नियोजित जागी नेण्यासाठी लागणारे पंप वगैरे उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून तात्पुरते पंप आणि फायर इंजिन्स मागवून चक्क समुद्रातले पाणी उपसून सगळीकडे शिंपडण्यात येत होते. कारण काही केल्या रिअॅक्टरला होईल तितके निववायचे प्रयत्न करत राहणे भाग होते. या घाणेरड्या पाण्यामुळे सारी यंत्रे खराब होतील, त्यात मिठाचे थर साठतील, त्याचे भाग गंजतील, नंतर ती साफ करता येणार नाहीत वगैरेवर विचार करायलासुद्दा वेळ नव्हता इतकी तातडीची गरज होती.

जपानमधील परिस्थिती कोलमडलेली असल्यामुळे अमेरिकेतून मोठाल्या बार्जवरून पाणी आणले गेले आणि समुद्राच्या पाण्याऐवजी आता त्याचा वापर सुरू झाला आहे. तसेच अमेरिकेसह परदेशातून मोठमोठे पोर्टेबल पंप आले आहेत आणि ते पंप पाइपामार्फत जोडण्याचे प्रयत्न चालले आहेत. बेसमेंटमधले डिझेल जनरेटर्स सुरू करणे शक्यच नसल्यामुळे दोन तीन किलोमीटर नव्या केबल्स टाकून बाहेरून वीजपुरवठा करण्यात आला आहे. आता स्टेशनमधील सुस्थितीमध्ये असलेल्या पंपाना ती वीज पुरवण्यासाठी जोडणी करण्यात येत आहे. हे सगळे काम करण्यासाठी कामगारांना रिअॅक्टरच्या जवळ जावे लागते आणि रेडिओअॅक्टिव्हिटीच्या लेव्हल्स पाहून कमीत कमी वेळात होईल तेवढे काम करून परत फिरावे लागते. त्यामुळे त्यात अनपेक्षित असे अडथळे येतात.

रिअॅक्टरला थंड करण्यासाठी ओतलेले पाणी वाहून कुठे जाणार? एरवी संपूर्णपणे बंदिस्त अशा सिस्टिममध्ये त्याचे अभिसरण होत असते. पण आता बाहेरून टाकलेले पाणी खाली साचून त्याची डबकी बनणे अपरिहार्य आहे. आधीच सुनामीमुळे आलेले पाणी साठले होतेच त्यात नवी भर पडत आहे. या पाण्याला थेट समुद्रात नेऊन सोडता येत नाही. वाफ बनून हवेत आणि जमीनीतून झिरपत ते हळूहळू कमी होणार. रिअॅक्टरचे कंटेनमेंट अभेद्य राहिले तरी या मार्गाने काही रेडिओअॅक्टिव्ह द्रव्ये पर्यावरणात मिसळत आहेत. जसजसा वेळ जाईल तसतशी रिअॅक्टरमधील ऊष्णता कमी होत जाणार हे पाहता त्यावर पाणी शिंपडणे कमी करून त्याची डबकी साचण्यावर नियंत्रण केले जात आहे. अशा प्रकारचे अनेकविध प्रयत्न चालले आहेत.

देशभर जागोजागी रेडिओअॅक्टिव्हिटीची मोजणी करून तेथील पाणी किंवा अन्नपदार्थ खाण्यावर प्रतिबंध करण्यात येत आहेत. हवेमधून रेडिओअॅक्टिव्ह दूषित हवा शरीरात येऊ नये म्हणून तोंडावर मास्क लावणे, शक्य तोवर बंदिस्त घरातून बाहेर न पडणे यासारखे सुरक्षिततेचे उपाय योजले जात आहेत. आयोडीनच्या गोळ्या वाटल्या जात आहेत. या सगळ्यामुळे लोकांचे जीवन कठीण झाले आहे यात शंकाच नाही. पण सर्व अडचणींवर मात करून यातून बाहेर पडण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे.

. . . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)

2 comments:

धम्मकलाडू said...

अतिशय उत्तम माहितीपूर्ण लिखाण. न घाबरवता शहाणे करून सोडते. क्रिकेटज्वराने आजारी असल्यामुळे हा आणि आधीचा भाग थोडा उशिराच वाचला. घारेसाहेब, वाचनसंख्या बघून निराश होऊ नका. हे लिखाण एखाद्या मासिकात किंवा वर्तमानपत्राच्या पुरवणीत यायला हवे. असे लिखाण तर चांगल्या चांगल्या वृत्तपत्रांतही येत नाही.

Anand Ghare said...

धन्यवाद. मला सुध्दा नियतकालिकांमध्ये लिहायला आवडेल, पण तिथे प्रवेश मिळवणे कठीण आहे असे ऐकले. वाचकांचा पत्रव्यवहार यापलीकडे मी जाऊ शकलो नाही.