Monday, January 31, 2011

संगीत साधना - पूर्वीच्या काळातली आणि आताची परिस्थिती (भाग १)

या महिन्यात दिवंगत झालेले स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी आणि नटवर्य प्रभाकर पणशीकर या दोघांनीही त्यांच्या घरातल्या वडीलधारी लोकांच्या विरोधात जाऊन, एक प्रकारचे बंड पुकारून कलेची साधना, किंबहुना त्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. याबद्दल बराचसा तपशील मी आतापर्यंत वेळोवेळी ऐकला किंवा वाचला होता. या वेळी तो पुन्हा छापून आला, तसेच मीडियावर झालेल्या चर्चांमध्ये सांगितला गेला. भीमसेनजी वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडून संगीतशिक्षणासाठी बाहेरच्या जगात निघून गेले होते हे आता सर्वांना माहीत आहे. पण त्यांना संगीताचे बाळकडू त्यांच्या घरीच मिळाले होते, घरात त्यांच्या कानावर पडलेल्या सुरांमुळेच त्यांना बालवयातच संगीताची गोडी लागली होती, ते शिकण्याची उत्कट प्रेरणा त्यातूनच मिळाली होती, मग त्यासाठीच त्यांना आपले ते घर सोडण्याचा एवढा टोकाचा धाडसी निर्णय कां घ्यावा लागला होता?

आजच्या जगात शहरातल्या कॉस्मोपॉलिटन वस्तीतल्या सेल्फकन्टेन्ड ब्लॉकमध्ये, म्हणजे स्व.पु.ल.देशांडे यांच्या भाषेत 'बंद दरवाजाच्या' पण खूप मोकळ्या विचारांच्या संस्कृतीत राहणा-या लोकांना या विरोधाभासाचा नीटसा उलगडा कदाचित होणार नाही. पण भीमसेनजींच्या उत्तर कर्नाटक प्रदेशातला साठ वर्षांपूर्वीचा कालखंड मी स्वतः अनुभवला असल्यामुळे मला तो निदान किंचित तरी समजू शकतो. त्या काळात घरात विजेचे दिवे नव्हते, पाण्याचे नळ नव्हते, रेफ्रिजरेटर, टेलीव्हिजन, वॉशिंग मशीन यासारख्या कसल्याच यांत्रिक सुखसोयी नव्हत्या. सर्वसामान्य माणसाचे जगणे आजच्या तुलनेत शारीरिक दृष्टीने कष्टमय होते. रोज पहाटे झुंजूमुंजू उजाडले की सारे जण उठायचे, दरवाजा उघडून अंगणात सडारांगोळी घालायची आणि कामाला लागायचे. त्यानंतर रात्र होईपर्यंत घराचा दरवाजा उघडाच असे. एकत्र कुटुंबातल्या घरात भरपूर माणसे असत आणि आजूबाजूच्या सगळ्या शेजा-यांचे दरवाजे उघडेच असल्यामुळे एका घरात खुट्ट झाले तरी ते सर्वांना समजत असे आणि काय झाले ते पहाण्यासाठी आणि गरज असल्यास मदतीसाठी सर्वजण धावून येत असत. गावातली सगळी माणसे ओळखीची असायची. त्यामुळे दिवसा ढवळ्या कोणी अज्ञात चोर घरात शिरेल अशी शक्यताच नव्हती. घरातला सगळा कारभार उघड असल्यामुळे तो सर्वांच्या समोर असे आणि "लोक काय म्हणतील?" या प्रश्नाला जबरदस्त महत्व होते.

त्या काळच्या समाजात टोकाचा जातीभेद होता. मात्र याचा अर्थ भिन्न जातींमध्ये वितुष्ट होते असा नाही. पण बहुतांश लोक आपापल्या जातीजमातीच्या लोकांमध्येच राहणे पसंत करत असत. त्यामुळे खेड्यापाड्यांमध्ये जातीनिहाय वस्त्या, वाडे, गल्ल्या किंवा आळी असत. परंपरागत लोकसंगीताचे सुध्दा ध्रुवीकरण झाले होते. ज्या भागात श्लोक किंवा स्तोत्रांचे पठण किंवा घंटानाद आणि झांजांच्या साथीने आरत्या म्हंटलेल्या ऐकू येत असत त्या भागात ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर उच्चारलेले लावणीचे शब्द कधीच ऐकू आले नसते. मराठी संतांची अभंगवाणी आणि कानडी संतांची पदे मात्र याला अपवाद होती. विठोबा पांडुरंगाच्या भजनात सगळे सामील होत असत. ग्यानबा तुकोबांचे अभंग घराघरात गायले जात असत. त्या काळातला स्त्रीवर्ग अजीबात घराबाहेर पडत नसला तरी घरातल्या घरात आणि शेजारणी-पाजरणींच्या घोळक्यात त्यांचे लोकसंगीत बहराला येत असे.

बाल भीमण्णांच्या आईला मधुर स्वरांची स्वर्गीय देणगी लाभलेली होती. संत पुरंदरदासादिकांची भजने ती तन्मयतेने गात असे. त्या गायनाचा सार्वजनिक प्रयोग करणे त्या काळात वर्ज्य असले तरी घरातल्या भीमण्णांच्या कानावर ते पडत होतेच आणि कुशाग्र बुध्दीमत्तेमुळे त्यांनी ती पदे आत्मसात केली होती. त्याशिवाय भजन, कीर्तन वगैरेंमधून त्याचे संगीताचे श्रवण होत होतेच. क्वचित कधी शास्त्रीय संगीत ऐकण्याची संधीसुध्दा मिळत असे. त्याने तो इतका भारावून गेला की असे दिव्य संगीत आपल्यालासुध्दा शिकायलाच पाहिजे असे त्याच्या मनाने घेतले.

लहान मुलाची इच्छा काय आहे ते पाहून ती पुरवायची पध्दत त्या काळी नव्हती. त्याच्या हिताच्या दृष्टीने त्याने काय शिकावे ते घरातली वडिलधारी मंडळीच पहात असत. परंपरागत रूढ समजुतींप्रमाणे जोशांच्या मुलाने संस्कृत शिकून वेदशास्त्रसंपन्न व्हावे, शास्त्री पंडित म्हणून मिरवावे ही अपेक्षा असेल. सत्तर ऐंशी वर्षापूर्वीच्या त्या काळातला नवा रोख पाहून त्या काळात तो इंग्रजी शिकून वकील किंवा सरकारी ऑफिसर झाला असता तर त्याने चांगले यश कमावले असते, शिक्षक झाला असता, रेल्वे, पोस्ट ऑफिस किंवा मामलेदार कचेरीत नोकरीला लागला असता तरी त्याला मान होता. गाणे बजावणे हे काही प्रतिष्ठित लोकांचे काम नव्हते. कलावंत या शब्दाला मान नव्हता, कलावंतीण हा तर अपशब्द होता. भीमसेन जर आधी व्यवस्थितपणे सरधोपट मार्गाला लागला असता आणि त्याने आपला शौक पुरा करण्यासाठी थोडे गायन वगैरे केले असते तर ते कदाचित त्याच्या घरच्यांना चालले असते. त्या काळातल्या समाजात देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणी त्याचे गुणगान संगीतामधून केले तर त्याचे कौतुक होते, पण माणसांचे मनोरंजन करणे अत्यंत कमीपणाचे मानले जात असे. गायक वादक वगैरे मंडळी संस्थानिक, सरदार, जहागिरदार वगैरेंच्या पदरी असत. फारशी प्रसारमाध्यमेच अस्तित्वात नसल्यामुळे त्यांना लोकाश्रय नव्हता. देवल किर्लोस्कर वगैरेंच्या प्रयत्नामुळे नाटक कंपन्या चालत होत्या. संगीत शिकलेला मुलगा फार फार तर गायक नट बनू शकेल एवढीच त्याची झेप अपेक्षित होती. पण त्यालाही नाके मुरडणारेच अधिक होते.

अशा त्या काळात लहानग्या भीमाला शास्त्रीय संगीत शिकायचा ध्यास लागला. त्यासाठी घरी कोणीही त्याला पाठिंबा दिला नसता, त्याची व्यवस्था करणे अशक्यप्राय होते. गावात राहून त्या शिक्षणाची सोय होणे शक्य नव्हते. त्यासाठी परगावी जाऊन रहायला परवानगी मागितली असती तरी ती मिळाली नसती, उलट त्यात नक्कीच खोडा घातला गेला असता. असा विचार केल्यानंतर गुपचुपपणे घरातून पळून जाणे हा एकमेव पर्याय त्याला दिसला आणि तो पत्करून त्याचे होतील ते सारे परिणाम भोगण्याचे अतुलनीय मनोधैर्य अकरा वर्षाच्या वयात त्यांनी दाखवले. ते जर जवळपासच्या गावात गेले असते तर लगेच सापडले गेले असते, म्हणून मुद्दाम दूरवरच्या गावांमध्ये फिरत राहिले आणि कणाकणाने संगीतविद्या वेचत राहिले. त्यात थोडेफार यश मिळाल्यानंतर आपल्या गावाजवळच असलेल्या कुंदगोळ गावी जाऊन ते पं.रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांचेकडे गेले आणि मनोभावे त्यांची सेवा करून त्यांचे पट्टशिष्य झाले.

. . . . . . . . . (क्रमशः)

No comments: