Sunday, October 03, 2010

पितृपक्ष आणि बेचाळीस पिढ्या

सध्या पितृपक्ष चालू आहे. भाद्रपद महिन्याच्या दुस-या पंधरवड्याला हे नाव दिले गेले आहे. आई आणि वडील यांचा मृत्यू ज्या तिथीला झाला असेल त्या तिथीला दरवर्षी त्यांचे 'श्राध्द' करायचे आणि त्यापूर्वीच्या सर्व पिढ्यांमधील पितरांसाठी पितृपक्षातल्या एकाद्या दिवशी 'पक्ष' घालायचे अशी पध्दत पूर्वीच्या काळी होती. त्या त्या दिवशी विशिष्ट मंत्रोच्चाराने करायचा एक खास विधी असे आणि पिंडदान केल्यावर ते भाताचे गोळे कावळ्यांना खायला दिले जात असत किंवा नदीत सोडून दिले जात असत. श्राध्दपक्षाला जेवलेल्या भटांच्या, कावळ्यांच्या, नदीतल्या जलचरांच्या पोटात गेलेले अन्न आपल्या स्वर्गवासी पितरांना मिळते आणि त्यावर त्यांचा वर्षभर निभाव लागतो अशी श्रध्दा होती.

आमच्या घरी परंपरेने तशी पध्दत चालत आली होती आणि दरवर्षी माझे वडील नेमाने श्राध्द पक्ष करत असत. मात्र हा विधी प्रत्यक्ष पहायला मुलांना बंदी असे. त्यामुळे तो विधी सांगणारे स्पेशॅलिस्ट पुरोहित घरात आले की आम्हाला घराच्या माडीवर पिटाळले जाई आणि हाक मारून बोलावीपर्यंत कोणीही जिना उतरायचा नाही अशी तंबी दिली जात असे. तसेच दंगा करायचा नाही, आमचा आवाज खाली येता कामा नये वगैरे कडक नियम असत. माडीवर बसून शक्य तितक्या शांतपणे पत्ते, सोंगट्या वगैरे खेळत आम्ही वेळ घालवत रहायचे. विधी एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर हाक मारली जाई. तेंव्हा आम्ही सगळे खाली उतरून तिथे एका पाटावर मांडून ठेवलेल्या गोष्टींना वाकून नमस्कार करत असू आणि पुन्हा माडीवर जाऊन आपला खेळ पुढे चालवत असू. जेवणखाण करून ब्राह्मण निघून गेल्यानंतर विधी केलेल्या जागेची पूर्ण सारव सारव करून झाल्यानंतर आमची पंगत मांडली जात असे. वर्षभरात एरवी कधीही खाण्यात न येणारे कांही पदार्थ जेवणात असत. ते चविष्ट असले तरी कुठल्याही मंगल प्रसंगी करणे निषिध्द होते.

लहान असतांना या सगळ्या गोष्टींबद्दल कुतूहल वाटत असे, पण कोणीच त्याच्याबद्दल काही सांगत नसे. मोठा झाल्यावर माझा अजीबात विश्वास नसल्यामुळे मी त्याबद्दल कधी समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही. आमच्या भावंडात मी लहान असल्यामुळे परंपरेने सुध्दा माझ्यावर ही जबाबदारी आली नव्हती आणि मोठे भाऊ काय करतात याची चौकशी करावी असेही मला कधी वाटले नाही. माझ्यासाठी हा विषय कायमचा बंद झाला होता. परवा मला एक मेल आली. या पितृपक्षामध्ये आपण आपल्या दिवंगत नातेवाइकांच्या आठवणी एकमेकांना सांगाव्यात आणि एक नव्या प्रकारची श्रध्दांजली त्यांना समर्पण करावी अशी सूचना त्यात होती. ही कल्पना मी लगेच उचलून धरली आणि काही व्यक्तींची शब्दचित्रे रंगवायला सुरुवात केली. एक वय होऊन गेल्यानंतर भूतकाळात जाऊन मन रमवणे बरे वाटते. घडून गेलेल्या घटनांपासून आपण फारसा बोध घेतला नसला, आपल्याला भेटलेल्या थोर व्यक्तींचे आपण फारसे अनुकरण केले नसले तरी इतरांनी (त्यांना वाटले तर) ते करावे, त्यासाठी त्यांना स्फूर्ती मिळावी वगैरे उद्देशसुध्दा त्याला जोडले जातात. यामुळेच भाराभर चरित्रे लिहिली जात असावीत.

या ठिकाणी मला त्याबद्दल लिहायचे नाही. एक वेगळाच मुद्दा मांडावयाचा आहे. पितरांचे पक्ष घालतांना माता आणि पिता या दोन्ही बाजूच्या बेचाळीस पिढ्यांमधील लोकांना त्यांच्या नावाने आवाहन केले जाते असे त्या मेलमध्ये लिहिले होते. 'बेचाळीस पिढ्यांचा उध्दार' हा वाक्प्रचार जरा वेगळ्या अर्थाने रूढ असला तरी त्यातही बेचाळीस पिढ्यांचा उल्लेख आहे. मी सहज विचार केला. माझ्या आई आणि वडिलांची पूर्ण माहिती मला आहे. पण त्यांच्या आईवडिलांना मी पाहिलेले नाही, फक्त त्यांच्याबद्दल ऐकले आहे. स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव या क्रमाने नाव लिहिण्याची पध्दत असल्यामुळे वडिलांच्या वडिलांचे नाव ठाऊक आहे. पण आईच्या माहेराचा उल्लेख कागदोपत्री कुठेच होत नसल्यामुळे तिच्या आई वडिलांची नावे सांगायला आज कोणीच उपलब्ध नाही. लाइफ एक्स्पेक्टन्सी वाढली असल्यामुळे आजकाल बहुतेक मुलांना त्यांचे आजी आजोबा भेटतात. काही सुदैवी लोकांची त्यांच्या पणजोबा आणि पणजीशी सुध्दा भेट होते. पण त्यापलीकडे काय?

दुसरी गोष्ट म्हणजे (निदान अजूनपर्यंत) प्रत्येकाला फक्त एक आई आणि वडील असतात. या दोघांचे आई व वडील म्हणजे दोन आजोबा आणि दोन आज्या असतात. या चौघांचे आई व वडील धरून चार पणज्या आणि चार पणजोबा होतात. चार पाच नातवंडे असलेले आजोबा माझ्या पाहण्यात आहेत. त्यातल्या काही जणांना एकाद दुसरे पणतवंडही झाले आहे. पण कोणालाही चार पणजोबा आणि चार पणज्या आहेत असे मूल मी अजून पाहिलेले नाही. त्यामुळे तिस-या पिढीमधली एकाददुसरी व्यक्तीच असली तर माहितीची असते. त्याच्या पलीकडे सगळा अंधार असतो.

बेचाळीस पिढ्या म्हणजे त्यात किती माणसे येतील? लहानपणी एक बोधकथा ऐकली होती. त्यात एक राजा खूष होऊन आपल्या भाटाला काय हवे ते मागायला सांगतो. तो हुषार भाट म्हणतो, "माझे लई मागणे नाही. आज मला फक्त तांदळाचा एक दाणा दे. उद्या दोन, परवा चार असे ते रोज दुपटीने वाढवत जा. असे फक्त एक महिना कर." राजाला वाटले की हा भाट मूर्ख आहे. त्याने भरसभेत त्याची मागणी मान्य केली. पण दोन, चार, आठ, सोळा, बत्तीस, चौसष्ठ असे करत हा आकडा इतका वाढला की महिनाअखेर राजाचे कोठार रिकामे करूनसुध्दा तेवढे तांदळाचे दाणे पुरवणे शक्य झाले नाही. त्याचप्रमाणे दोन गुणिले दोन असे बेचाळीस वेळा केले तर  43,98,04,65,11,104 एवढी मोठी संख्या येईल. ही जगाच्या आजच्या लोकसंख्येच्या सुमारे सहा हजारपट भरते. अख्ख्या जगाची इतकी मोठी लोकसंख्यासुध्दा कधीच अस्तित्वात नव्हती. अर्थातच हे सगळे पितर वेगळे होते ही कल्पनाच चुकीची आहे. तीन चार पिढ्यांनंतर संपर्क रहात नाहीत आणि एकाच व्यक्तीचे वंशज एकमेकांशी विवाहबध्द होतात. काही जातीजमातींमध्ये आतेमामेभावंडे किंवा मामाभाची यांची लग्ने ठरवतात. त्यामुळे त्यांचे पितर वेगवेगळे असायचा प्रश्नच नसतो.

थोडक्यात सांगायचे तर बेचाळीस पिढ्या वगैरे सगळ्या समजुतींना काही अर्थ नाही. आपण फार फार तर मागच्या आणि पुढच्या तीन पिढ्या पाहू शकतो. वैयक्तिक बाबतीत आपली माहिती तेवढीच असते. देशाचे राजघराणे वगैरेंचा इतिहास अनेक पिढ्यांपर्यंत पोचतो, पण तो सुध्दा फार फार तर दहा बारापर्यंत असेल. तेवढ्यात एकादी क्रांती होते आणि राजघराणेच बदलते. पूर्वीच्या राजघराण्यामधल्या पुढल्या वंशजांना कोणीही विचारत नाही.

आपण प्रत्यक्षात पाहलेले किंवा आपल्या माहितीमधले जेवढे दिवंगत पितर असतील त्यांची या पितृपक्षात आठवण करून त्यांना श्रध्दांजलि वाहणे ही कल्पना मात्र स्तुत्य आहे. 

No comments: