Thursday, June 10, 2010

नशीब आणि योगायोग (पूर्वार्ध)

बहुतेक सर्वसामान्य माणसे कांही प्रमाणात दैववादी आणि कांही प्रमाणात प्रयत्नवादी असतात. माझ्या बाबतीत प्रयत्नवादाचे प्रमाण जास्त असल्यामुळे माझे दैववाद्यांबरोबर खटके उडत असतात. अशाच एका चर्चेत एकाने मला विचारले, "तुमचा नशीबावर विश्वासच नाही कां?"
मी सांगितले, "म्हंटलं तर आहे, म्हंटलं तर नाही."
"म्हणजे?"
"कधी कधी एकादा हुषार, समजूतदार आणि कष्टाळू माणूस खूप धडपड करतो, पण त्याला मिळावे तेवढे यश मिळत नाही आणि बेताची बुध्दी आणि कुवत असलेला दुसरा आळशी माणूस सगळे कांही मिळवून जातो. एकाद्या गोष्टीसाठी आपण जीवतोड मेहनत करूनही ती प्राप्त होत नाही आणि दुसरी एकादी गोष्ट आपसूक पदरात पडते. कोणाला बंपर लॉटरी लागते तर कोणी विमान अपघातात सापडून दगावतो. हे सगळे नशीबामुळे घडले असेच इतर सगळ्यांच्याबरोबर मीसुध्दा म्हणतो. याचा अर्थ मी सुध्दा नशीबावर विश्वास दाखवतो असा होतो. पण खरे सांगायचे तर माझ्या मते या सर्व घटना परिस्थितीजन्य असतात आणि आपल्याला त्या परिस्थितींचे पूर्ण आकलन होऊ शकत नाही. ढोबळपणे विचार करतां लॉटरीमध्ये नंबर निघणे एवढे कारण बक्षिस मिळण्यासाठी पुरेसे असते आणि कोसळलेल्या विमानात तो प्रवासी बसला होता यापलीकडे त्याच्या मृत्यूसाठी दुसरे कारण असायची गरज नसते, पण आपण इथे थांबत नाही. लॉटरीतले नंबर काढण्याची पध्दत किंवा विमानाची रचना समजून घेणे आपल्याला शक्य नसते. त्यामुळे आपल्याला अगम्य असलेल्या गोष्टींच्या खोलात जाण्याऐवजी ईश्वरेच्छा, भाग्य, पूर्वसंचित वगैरे कारणे दाखवून आपण तो विषय आपल्यापुरता संपवतो."
"म्हणजे या गोष्टी नसतात कां?"
"ते मला माहीत नाही. पण त्या आहेत असे म्हणण्यात बरेच फायदे नक्की असतात. आपण भांडून मिळवलेली गोष्टसुध्दा नशीबाने मिळाली असे म्हणून विनयशील होता येते आणि आपल्या गाढवपणामुळे हातातून निसटलेली गोष्ट आपल्या नशीबातच नव्हती अशी मखलाशी करून तो लपवता येतो. तसेच दस-याच्या उत्कर्षाचे श्रेय त्याच्या भाग्याला देऊन त्याची मिजास उतरवता येते किंवा त्याच्या लबाडपणाकडे काणाडोळा करता येतो आणि त्याच्या नशीबाला दोष देऊन त्याच्या चुकांवर पांघरूण घालता येते, त्याची मर्जी राखणे किंवा त्याची समजूत घालणे वगैरे जमते. "
"लॉटरी लागण्यात आणि विमान अपघातात तर त्या माणसाचे कर्त़त्व किंवा चूक नसतेच. त्या गोष्टी तर निव्वळ दैवयोगानेच घडतात ना?"
"बहुधा नसाव्यात आणि तसे वेगळे कारण असण्याची कांही आवश्यकता नाही असे मला वाटते. आपले भाग्य जन्माच्या वेळीच सटवाई कपाळावर लिहून ठेवते, दुसरी कोणती देवता ते तळहातावरील रेषांमध्ये पेरून ठेवते, भृगुमहर्षींनी संस्कृत भाषेत, नाडीग्रंथात तामीळमध्ये आणि नोस्ट्रॅडॅमसने कुठल्याशा युरोपियन भाषेत ते आधीच लिहून ठेवले आहे आणि त्यानुसारच सर्व घटना घडत आल्या आहेत आणि पुढे घडणार आहेत वगैरे गोष्टी माझ्या बुध्दीला पटत नाहीत. ज्यांच्या अस्तित्वाबद्दलच मला शंका आहे अशा संकल्पनांचा अभ्यास करण्यात मी आपला वेळ वाया घालवत नाही. उलट जे लोक विधीलिखित अटळ आहे असे सांगतात आणि ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतात तेच लोक बोटात अंगठ्या आणि गळ्यात ताईत घालून, कपाळाला अंगारा लावून, नवससायास, उपासतापास करून ते भविष्य बदलायचा प्रयत्न करतांना दिसतात याची मला गंमत वाटते. अगदी मुंगीच्या पायाला जेवढी माती चिकटली असेल तेवढासुध्दा विश्वास मी असल्या गोष्टींवर ठेवत नाही. त्यामुळे नशीबावर माझा विश्वास नाही असेसुध्दा मीच सांगतो असेही म्हणता येईल."
"पण तुमच्याशिवाय बाकी सगळ्यांना त्याची प्रचीती येते म्हणून तर ते या गोष्टी करत असतील ना?"
"इतरांचे मी सांगू शकत नाही. कोणत्याही उपायाने कोणाचेही भले होत असेल तर मला त्याचा आनंदच वाटेल. शिवाय या तथाकथित उपायांचे इतर अनेक फायदे मला दिसतात. दुःखाने पिचलेल्या आणि अपयशामुळे निराश झालेल्यांना त्यातून दिलासा आणि धीर मिळतो, हताशपणाच्या अवस्थेत असलेल्यांना आशेचा किरण दिसतो, आपल्या पाठीशी कोणती तरी अद्भुत शक्ती उभी आहे असे वाटल्याने त्याच्या आधारामुळे आत्मविश्वास वाढतो, मनाला खंबीरपणा मिळतो, अंगात उत्साह संचारतो, काम करायला हुरुप येतो, दैववादी माणूससुध्दा आपण कांही प्रयत्न करत आहोत असे समजतो आणि त्याचे समाधान त्याला मिळते. या सगळ्या गोष्टींचा आयुष्यात प्रत्यक्ष लाभ मिळतोच. शिवाय उपास केल्याने पचनसंस्थेला विश्रांती मिळते, तीर्थक्षेत्राला जाऊन देवदर्शन करण्याच्या निमित्याने प्रवास घडतो, वेगवेगळ्या जागा पाहून होतात, चार वेगळी माणसे भेटतात, त्यातून अनुभवविश्व समृध्द होते. खास नैवेद्यासाठी तयार करण्यात येणारे खाद्यपदार्थ तर अफलातून असतात. तुम्ही मला साजुक तुपातला शिरा, खव्याचा कंदी पेढा किंवा गूळखोबरे असे कांही दिलेत तर मला त्याचा आनंदच वाटेल आणि मी ते आवडीने खाईन. माझ्या कपाळाला अंगारा लावलात तर मी तो पुसून टाकणार नाही याचे कारण मला तुम्हाला दुखवायचे नाही. इतरांचा विचार करूनही आपण कांही गोष्टी करत असतो. कोणा ना कोणाला बरे वाटावे म्हणून मी वर दिलेल्या अनेक गोष्टी केल्या आहेत. पण त्यामुळे माझ्या आधीव्याधी नाहीशा होतील, इडापिडा टळतील आणि माझा भाग्योदय होईल अशी अपेक्षा मी ठेवत नाही. तशा प्रकारचा अनुभव आजपर्यंत कधी मला आलेला नाही."
"तुमच्या मनात श्रध्दाच नसेल तर त्याचे फळ कसे मिळणार? नैवेद्य म्हणून खाल्लात तर त्याचा गुण येईल, खोबरे म्हणून खाल्लेत तर तो येणार नाही, फक्त कोलेस्टेरॉल वाढेल."
"प्रसाद म्हणून एकदम पंचवीस पेढे खाल्ले तर ते पचणार आहेत कां? माझे जाऊ द्या, पण इतरांना आलेली प्रचीती तरी दिसायला हवी ना."
"अहो, हांतच्या कांकणाला आरसा कशाला? आपल्या गाडगीळांच्या सुजाताच्या पत्रिकेतला मंगळ जरा जड होता. मागच्या गुरुपुष्यामृताला तिने बोटात लाल खड्याची अंगठी घातली आणि सहा महिन्यात तिचे लग्न जमले सुध्दा."
"अरे व्वा! ती एका नदीच्या रम्य किनारी उभी होती आणि तिच्या बोटातल्या अंगठीच्या प्रभावाने ओढला जाऊन एक उमदा राजकुमार अबलख घोड्यावर बसून दौडत तिच्यापाशी आला असे तर झाले नाही ना? आता सगळी राज्ये खालसा झाली आहेत आणि नद्यांचे पाणी दूषित झाल्यामुळे त्यांचे किनारे रम्य उरले नाहीत, अबलख घोडे आता रेसकोर्सवरच धांवतात, त्यामुळे अशी परीकथा कांही प्रत्यक्षात आली नसेल. ती एकाद्या मॉलमधल्या मॉडेलला निरखत असतांना एकादा तरुण कारखानदार तिथे आला आणि अंगठीमुळे तिच्यावर मोहित होऊन तिला आपल्या बीएमडब्ल्यूमध्ये बसवून घेऊन गेला असेही झाले नाही. पूर्वी ज्या स्थळांकडून तिला नकार आला होता, त्यांना उपरती होऊन आता ते सोयरीक करण्यासाठी गाडगीळांना शरण आले असेही ऐकले नाही. मुलीच्या बोटात लाल खड्याची अंगठी घातल्यानंतरही गाडगीळ तिच्यासाठी वरसंशोधन करत होतेच. मग त्या अंगठीने असा कोणता चमत्कार केला?"
"पण आधी तिचे लग्न जमत नव्हते आणि आता ते जमले याला तुम्ही काय म्हणाल, फक्त योगायोग?"

. . . . . . . . . . . . .(क्रमशः)

No comments: