Saturday, March 06, 2010

पंपपुराण भाग ९


पंपाची क्षमता तसेच कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक उपाय योजले जातात. इंपेलरला वेगाने फिरवण्यामुळे पाण्याला गती मिळून त्याचा प्रवाह सुरू होत असल्यामुळे इंपेलर हा पंपामधील सर्वाधिक महत्वाचा पार्ट आहे. वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे इंपंलरची रचना तीन प्रकारे केली जाते. फुलाच्या पाकळ्या जशा मुळाशी त्याच्या देठाला जोडलेल्या असतात, त्याप्रमाणे ओपन इंपेलरची पाती त्याच्या मध्यभागी असलेल्या रिंगला जोडलेल्या असतात. हा इंपेलर जेंव्हा फिरत असतो त्या वेळी परीघाच्या दिशेने फेकले जाणा-या पाण्यातला कांही भाग बाजूला ढकलला जातो आणि तिथल्या पोकळीतून केंद्राकडे परत येतो. यामुळे पंपाची एफिशियन्सी थोड्या प्रमाणात कमी होते. पूर्णपणे बंदिस्त असलेल्या इंपेलरची पाती त्यांच्या दोन्ही बाजूने जोडलेल्या वर्तुळाकार चकत्यांमध्ये बंद असतात. त्यामुळे इंपेलरने ढकललेले सारे पाणी परीघाकडेच जाते आणि पंपाची कार्यक्षमता वाढते. सेमीश्राउडेड इंपेलरची पाती एका बाजूला एका चकतीला जोडलेली असतात तर दुस-या बाजूला उघडी असतात. त्यामुळे पंपाची कार्यक्षमता इतर दोन प्रकारांच्या मध्ये असते.

हे तीन वेगळे प्रकार असण्याची गरज काय आहे असे वाटेल, पण तीन्ही प्रकारांचे कांही वेगवेगळे फायदेसुध्दा आहेत. फुल्ली श्राउडेड इंपेलरची रचना गुंतागुंतीची असल्यामुळे तो बनवण्यात अडचणी असतात, त्यासाठी जास्त कच्चा माल लागतो आणि त्याला जास्त खर्च येतो. त्यामुळे पंपाची किंमत वाढते. ओपन इंपेलर बनवणे त्या मानाने सोपे असते आणि आणि स्वस्त पडते. पंपाची कार्यक्षमता इतरही अनेक कारणांमुळे बदलते. त्यावर प्रभाव पाडणा-या इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर कार्यक्षमता वाढवण्याच्या बाबतीत महागड्या इंपेलरचा फारसा उपयोग होणार नाही.

एफिशियन्सी वाढणे याचाच अर्थ ते मशीन चालवण्यासाठी कमी ऊर्जा लागणे असा होतो. हा पंप दिवसातून जास्त वेळ चालवला जात असेल तर तितक्या प्रमाणात कार्यक्षमतेचा जास्त फायदा मिळून विजेची बचत होईल. पण त्याचा उपयोग कमी होत असेल तर ती बचत जाणवणार नाही. कांही ठिकाणच्या ग्रामीण भागात विजेच्या वापराचे मोजमाप करणारे मीटरच नसते. विजेच्या वापरासाठी दर महिन्याला एक ठराविक रक्कम द्यायची असते. कांही जागी विजेचा पुरवठा अल्प दराने केला जातो तर कधीकधी विजेची बिले माफ केली जातात. अशा ग्राहकांना कार्यक्षमतेची पर्वा असायचे कारण नसते. विजेची खपत कमी
करण्यापेक्षा पंपाची किंमत कमी असणे त्यांच्या दृष्टीने अधिक आकर्षक असते.

मूळ किंमत कमी असल्यामुळे ओपन इंपेलरला पसंती दिली जाते, तर चालवण्याचा खर्च कमी पडत असल्यामुळे बंदिस्त इंपेलर परवडतो. याशिवाय आणखी एक कारण आहे. इंपेलरच्या पात्यांना जोडलेल्या चपट्या पट्टीमुळे त्याला बळकटी येते. एका बाजूला पट्टी लावलेला सेमीश्राउडेड इंपेलर वापरला तर तुलनेने कमी किंमत, कमी खर्च आणि अधिक आयुष्य असे मिश्रण तयार होते. याखेरीज आणखी कांही गोष्टींचा विचार केला जातो. पंपातून जे पाणी जाणार आहे ते कितपत स्वच्छ किंवा गढूळ आहे, त्यात कोणत्या प्रकारचा कचरा वाहून येण्याची शक्यता आहे, पंप बराच काळ वापरात नसला तर कसला गाळ त्यात साचू शकतो वगैरे बाबींमुळे पंपाच्या चालण्यात पडणारा फरक वेगवेगळ्या इंपेलरच्या बाबतीत कमी जास्त असतो. त्या सगळ्यांचा विचार करून त्यानुसार निवड करणे फायद्याचे असते.. . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: