Thursday, October 29, 2009

डॉ.होमी भाभा - भाग २

डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म मुंबईतल्या एका धनाढ्य पारशी कुटुंबात ३० ऑक्टोबर १९०९ रोजी झाला. दक्षिण मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल, एल्फिन्स्टन कॉलेज आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या त्या काळातल्या अग्रगण्य शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेऊन १९२७ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी केंब्रिजला गेले. तेथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्राविण्य प्राप्त करून त्यांनी परत यावे आणि टाटा कंपनीच्या जमशेदपूर येथील कारखान्यांचा कारभार चालवण्यात लक्ष घालावे अशी त्याच्या घरच्यांची इच्छा आणि अपेक्षा होती. त्यानुसार त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले सुध्दा आणि १९३० साली त्या परीक्षेत ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले, पण त्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन करण्याची अतीव ओढ होती. त्यामुळे "नोकरी किंवा धंदा करणे हे माझ्या स्वभावाच्या विपरीत आहे. एक मोठा यशस्वी उद्योगपती म्हणून मिरवण्याची मुळीसुध्दा हौस नाही, फिजिक्समध्ये चांगले संशोधन करणे हीच माझी महत्वाकांक्षा आहे ....... " वगैरे त्यांनी आपल्या पालकांना निक्षून सांगितले आणि ते त्यांना पटवून दिल्यानंतर केंब्रिज विद्यापीठात आपले पुढील शिक्षण आणि संशोधनकार्य सुरू ठेवून डॉक्टरेटची पदवी मिळवली. विज्ञानाच्या क्षेत्रातील अनेक जगद्विख्यात विद्वानांच्या संपर्कात येण्याचे भाग्य त्यांना लाभले आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊन त्यांनी संशोधनाच्या कामात आपली घोडदौड चालू ठेवली. अतीसूक्ष्मकणांच्या विज्ञानात (पार्टिकल फिजिक्समध्ये) त्यांनी मांडलेले सिध्दांत आणि प्रसिध्द केलेले शोधलेख यांना विज्ञानाच्या जगात मान्यता प्राप्त झाली, त्यांना अनेक महत्वाची बक्षिसे आणि शिष्यवृत्या मिळत गेल्या आणि ते एक जागतिक ख्यातीचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले.

सन १९३९ मध्ये ते सुटीवर भारतात आलेले असतांना युरोपमध्ये दुसरे महायुध्द भडकल्यानंतर त्यांनी कायमचे इकडेच राहण्याचे ठरवले. बंगळूरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये डॉ.सी.व्ही.रामन यांच्या हाताखाली त्यांनी आपले संशोधनकार्य चालू ठेवले. कांही काळ तिथे काम केल्यानंतर स्व.जे.आर.डी.टाटा यांच्या मदतीने त्यांनी मुंबईला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना केली. प्रयोगशाळेत काम करणारा शास्त्रज्ञ या भूमिकेतून त्यानंतर ते संस्था चालवणारा आणि तिला ऊर्जितावस्थेला नेणारा या भूमिकेत शिरले आणि त्यांनी टी.आय.एफ.आर.ला अल्पावधीत चांगले नांवारूपाला आणले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं. नेहरूंच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचा जो कार्यक्रम सुरू झाला त्यात होमी भाभांचा अत्यंत सक्रिय सहभाग होता. पं.नेहरू आणि होमी भाभा हे दोघेही सधन उच्चभ्रू कुटुंबातून आले होते, उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये राहिले होते, त्या देशाने यंत्रयुगात केलेली प्रगती त्यांनी जवळून पाहिली होती, प्रगत देशातील सामाजिक सुस्थिती त्यांनी अनुभवली होती, पण स्वदेशाच्या उन्नतीची तीव्र तळमळ त्यांच्या मनात होती आणि विज्ञान तंत्रज्ञानामधूनच ती साधता येईल अशी त्यांची खात्री पटलेली होती. आचारविचारात असलेल्या साम्यामुळे आणि समान ध्येय असल्यामुळे त्या दोघात खूप जवळचे स्नेहसंबंध जुळले.

त्या काळात जगभर बाल्यावस्थेत असलेल्या अणुशक्तीचा भारतात विकास करण्याची जबाबदारी पं.नेहरूंनी डॉ.भाभा यांच्यावर सोपवली आणि त्या कार्यक्रमाला अग्रक्रम दिला. डॉ.भाभा यांच्याकडे भरपूर वडिलोपार्जित संपत्ती होती, त्यात आणखी भर टाकण्याची इच्छा त्यांना नव्हती तसेच भोगलालसाही नव्हती, सत्ता, प्रसिध्दी वगैरेची हांव नव्हती. अशा सर्व गुणांमुळे ते कोणताही निर्णय आपल्या व्यक्तीगत फायद्याचा विचार करून घेणार नाहीत याची पंडितजींना पुरेपूर खात्री होती. त्यांनी होमी भाभांना अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष नेमले, तसेच केंद्रीय सरकारच्या अणुशक्ती विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती केली आणि सरकारी नियम थोडेसे वाकवून त्यांना आपल्या कामात बरेच स्वातंत्र्य दिले. त्यामुळे सुरुवातीपासूनच या विभागाचे काम सरकारी खाक्यापेक्षा जरा वेगळ्या प्रकारे चालत आले आणि थोड्या प्रमाणात तरी लालफीताशाहीपासून मुक्त राहिले. होमी भाभांनी काय किमया करून ठेवली आहे कोण जाणे, पण त्यांच्यानंतर लगेच आलेल्या डॉ.विक्रम साराभाई यांच्यापासून सध्याचे डॉ.काकोडकरांपर्यंत सर्वच अध्यक्ष आणि सचिव हे त्या विभागात काम करीत असलेल्या निष्णात तज्ज्ञांमधूनच निवडले गेले आहेत आणि यापूर्वीचे सर्वजण सेवानिवृत्त होईपर्यंत त्या पदावर कार्यरत राहिलेले आहेत. इतर सरकारी महामंडळे, समित्या, आयोग वगैरेंप्रमाणे सनदी अधिकारी किंवा राजकारणी लोकांचा शिरकाव या ठिकाणी कधी झाला नाही आणि जास्त चांगली जागा मिळते असे पाहून कोणीही ही जागा सोडून गेला नाही. सुरुवातीच्या अणुशक्ती आयोगातून निघालेले अवकाश आयोग किंवा इलेक्ट्रॉनिक्स कमिशन आणि त्यांच्या अखत्यारीत येणा-या संस्थांबद्दलही असेच सांगता येईल.

भविष्यकाळात भारताने अणुशक्तीच्या क्षेत्रात कशा प्रकारे प्रगती करावी याचा एक सविस्तर नकाशा भाभांनी आंखून दिला होता, त्यांच्या मृत्यूनंतर नोकरीला लागलेली आमची पिढीसुध्दा सेवानिवृत्त होऊन गेली असली तरी अजूनही मुख्यतः भाभांनी आंखलेल्या आराखड्यानुसारच प्रगती होत आहे. वेळोवेळी प्राप्त परिस्थितीनुसार त्याच्या तपशीलात किरकोळ फेरफार केले जात असले तरी त्यामागील धोरणात्मक भाग आणि त्यामागे असलेली मूलतत्वे यांना धक्का लावण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही, किंबहुना तशी गरजच कधी निर्माण झाली नाही किंवा त्याहून जास्त चांगल्या कल्पना पुढे आल्या नाहीत असे म्हणावे लागेल. यावरून भाभांच्या दूरदर्शित्वाची कल्पना येईल.

. . . . . . . . . . (क्रमशः)
पुढील भागासाठी पहा  Newer post
https://anandghan.blogspot.com/2009/10/blog-post_29.html

No comments: