Thursday, July 09, 2009

जन्मतारीख - भाग १


लहानपणचा वाढदिवस
आजकालची लहान मुले आपले नांव सांगायला लागतात त्याच्यापाठोपाठच आपली जन्मतारीखसुद्धा सांगायला शिकतात असे दिसते. आमच्या ईशा आणि इरा यांना आपापल्या नांवांमधल्या श आणि र चा उच्चारसुद्धा नीट जमत नव्हता तेंव्हापासून त्या "सोळा जूनला माझा बड्डे आहे." असे सांगायच्या. 'सोळा' ही एक 'संख्या' आहे आणि 'जून' हे एका 'महिन्या'चे नांव आहे एवढेसुध्दा कळण्याइतकी समज त्यांना तेंव्हा आलेली नव्हती, कारण संख्या किंवा महिना या संकल्पनाच त्यांना कळलेल्या नसाव्यात, पण 'बड्डे' म्हणजे 'धमाल' एवढे त्यांना पक्के समजलेले होते. त्यामुळे ते नेहमी नेहमी येत रहावेत असे त्यांना वाटत असे. अधून मधून त्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या बर्थडे पार्ट्यांना जाऊन तिथे धमाल तर करायच्याच, इतर दिवशी आपल्या भातुकलीच्या खेळात मिकी उंदीरमामा, टेडी अस्वल किंवा बार्बी भावली यांचे वाढदिवस 'मनवत' असत.

मला मात्र शाळेतून बाहेर पडेपर्यंत माझी जन्मतारीख माहीत सुध्दा नव्हती. सर्व प्रसिध्द लोकांना असते तशी मलासुद्धा एक जन्मतारीख असायला हवी अशी अनामिक जाणीव मला दहा बारा वर्षाचा झाल्यानंतर झाली होती, पण ती तारीख नेमकी कोणती आहे हे मात्र कळले नव्हते. माझ्याच जन्मतारखेचे कांही गूढ होते अशातला भाग नाही, कारण त्या काळात घरातल्या कुणालाच कुणाचीच जन्मतारीख माहीत नव्हती. किंबहुना त्या काळात जन्मतारीख या विषयाचा बोलण्यात कधी उल्लेखच होत नसे. मोठ्या माणसांची वाढ होणेच थांबलेले असेल तर त्यांचा वाढदिवस कसला करायचा? लहान मुलांचे वाढदिवस तिथीनुसार येत. पण ते 'साजरे' केले जात असे म्हणणे आजच्या काळात धार्ष्ट्याचे होईल कारण त्या दिवशी घरात कसलाही समारंभ, गडबड, गोंधळ वा गोंगाट होत नसे.

तरीसुद्धा मला माझा वाढदिवस येण्याची खूप आतुरता वाटत असे. गणपतीचा उत्सव झाला की मला पक्षपंधरवड्याचे वेध लागत असत. हे दिवस मला कधीच 'अशुभ' वाटले नाहीत. मोठा झाल्यानंतरसुध्दा घरातल्या कित्येक वस्तू मी याच काळात विकत आणल्या आणि माझ्यासारख्याच त्यासुद्धा ब-यापैकी चालल्या ! जन्मतिथीच्या एक दोन दिवस आधी ट्रंकेतले नवे कोरे कपडे काढून त्यातले कोणते कपडे त्या दिवशी घालायचे ते ठरवायचे. एकत्र कुटुंबांमधील घरातल्या सगळ्या मुलांसाठी ऊठसूट नवे कपडे त्या काळात शिवले जात नव्हते. पुण्यामुंबईकडे रेडीमेड कपडे विकत मिळतात असे नुसते ऐकले होते. आमच्या गांवात ड्रेसेसचे दुकान अजून उघडले गेले नव्हते. एकेका मुलासाठी वेगळ्याने त-हेत-हेचे कपडे शिवणे कल्पनेच्या पलीकडे होते. घरातल्या सरसकट सगळ्यांसाठी नवे कपडे शिवून आणल्यावर ते ट्रंकेत भरून ठेवले जात. सणवार, लग्नकार्य अशा प्रसंगी कांही वेळा घालून झाल्यानंतर यथावकाश गरजेनुसार ते रोजच्या वापरात येत असत. वाढदिवस हा खास माझा असल्यामुळे त्यासाठी फक्त माझे नवे कपडे ट्रंकेतून बाहेर निघत, याचे अप्रूप वाटायचे.

वाढदिवसाच्या दिवशी सकाळी दिवाळीप्रमाणे अंगाला सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करायचे, कोरे कपडे अंगावर चढवायचे, कोणाच्या तरी मुंजीत घरी आलेली एकादी जरीची टोपी डोक्यावर ठेवायची आणि देवाला नमस्कार करून पाटावर बसायचे. प्रौक्षण वगैरे करून झाल्यावर घरातल्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडायचे. मोठी माणसे "मोठा हो, शहाणा हो, उदंड आयुष्यवंता हो." असे तोंडभर आशीर्वाद देत आणि मोठी भावंडे या निमित्याने पाठीत धपाटा घालून घेत. पण या दिवशी त्यावरून मारामारी करायची नाही, चिडायचे नाही, रडायचे नाही, हट्ट किंवा आक्रस्ताळेपणा करायचा नाही, शहाण्यासारखे चांगले वागायचे वगैरे ठरलेले असे.

सुसंस्कृत लोकांना बायकांमुलांसह एकत्र बसून जिथे खातापिता येईल अशा प्रकारचे हॉटेल आमच्या लहान गांवात अजून उघडलेले नव्हते. गरजू व शौकीन लोकांना चहा, चिवडा, भजी वा मिसळ वगैरे पुरवणा-या ज्या जागा होत्या तिथे फक्त उडाणटप्पू लोक वात्रटपणा करण्यासाठी जातात अशी आमची पक्की समजूत करून दिलेली असल्यामुळे लहानपणी कधीही तिथे पाऊलदेखील टाकले नव्हते. त्यामुळे आमचे खाद्यजीवन घरी तयार होत असलेल्या खाद्यपदार्थांपर्यंतच मर्यादित होते. कांही विशिष्ट बाबतीत ते आजच्यापेक्षा अधिक समृद्ध असले तरी त्याचा एकंदरीत आवाका लहान वयाला साजेसाच असायचा. त्या काळात ज्या मुलाचा वाढदिवस असे त्याच्या आवडीचे शक्य तितके पदार्थ जेवणात असत. जेवणात पंक्तीप्रपंच आणि मर्यादा नसल्याने ते सर्वांसाठी पोटभरच असत. वाढदिवस ज्याचा असेल त्याला अधिक आग्रहाने खाऊ घातले जाई एवढेच.पण हे सगळे घरातल्या घरातच होत असे. त्या दिवशी बाहेरच्या इतर कुणाला आमंत्रण वगैरे दिले जात नसे. त्यामुळे भेटवस्तू देणे घेणे वगैरे प्रकार नव्हतेच. दिवसभर घराचे दरवाजे उघडेच असल्याने या ना त्या निमित्याने कोणी ना कोणी येत असे. त्यांना त्या दिवशी बनवलेल्या खास पदार्थाचा वाटा अनायास मिळून जात असे. इतर लोकांना या वाढदिवसाची खबरबात समजणे जवळजवळ अशक्य होते. तरीसुद्धा आपला वाढदिवस हा 'खास आपला' असा इतर दिवसांपेक्षा वेगळा दिवस आहे या विचाराने तो हवाहवासा वाटेच!

. . . . . . . . . . . . . . . .(क्रमशः)

No comments: