Friday, November 22, 2024

सर्वाधिक श्रीमंत कोण ?

 १५ ऑगस्ट १९४७ला आपला देश स्वतंत्र झाला तेंव्हा या देशात पाचशेहून जास्त संस्थाने होती.  या संस्थानांचे राजे, महाराजे, नवाब वगैरे लोकांकडे अमर्याद सत्ता आणि साधनसंपत्ती होती. सरदार वल्लभभाई पटेलांनी जोर लावून या सगळ्या संस्थानांचे भारतात विलिनीकरण करून घेतले तेंव्हा प्रत्येक संस्थानिकाबरोबर एक करार केला गेला. या करारानुसार त्यांची राज्ये खालसा केली गेली त्यामुळे त्यांची राजकीय सत्ता शिल्लक राहिली नाही, ते सत्ताधीश राजे न राहता या देशाचे सामान्य नागरिक झाले, पण त्यांची बरीचशी संपत्ती मात्र त्यांच्याकडेच राहिली. संस्थानातल्या अनेक वास्तू, जमीनी, कपडेलत्ते, दागदागीने वगैरे मालमत्ता त्यांनी स्वतःच्या किंवा आपल्या कुटुंबियांच्या नावांवर त्यांची खाजगी मालमत्ता करून आपल्याच ताब्यात ठेवली. शिवाय त्या लोकांना चैनीत राहता येण्यासाठी सरकारकडून प्रीव्हीपर्स नावाचा घसघशीत तनखा सुरू झाला. यामुळे त्या वेळी बरेचसे संस्थानिक चांगले गडगंज श्रीमंत होते. या लोकांचे राजवाडे, जमीनजुमला, त्यांच्याकडचे सोनेनाणे, हिरे, माणके, मोती  वगैरेंची गणनाही केली नसेल आणि त्यांची किंमत कशी ठरवणार? कुठलीही वस्तू जर विकली असेल तरच त्या खरेदी आणि विक्री व्यवहारात त्याची किंमत ठरते. राजवाडे आणि हिरे माणके अशा गोष्टी सहसा खुल्या बाजारात विकल्या जात नाहीत, त्यांची नेमकी किंमत सांगता येत नाही. यामुळे  ते संस्थानिक लोक खूप खूप धनाढ्य होते एवढेच सांगता येईल.


त्यांची एकमेकांशी तुलना करून कोण सर्वात जास्त श्रीमंत असे ठरवणे कठीण असले तरी असे सांगितले जाते की हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खान हा त्या काळातला सर्वात जास्त श्रीमंत होता. त्याचे अनेक राजवाडे आणि महाल तर होतेच, दोनतीनशे वर्षांपासून जमवलेली अपार संपत्ती होती, शिवाय त्याच्या राज्यात गोवळकोंड्याला हिऱ्याची खाणच होती आणि त्यातून निघालेले एकेक हिरे अनमोल होते. हा निजाम लाखों रुपयांचा एक मोठा हिरा पेपरवेट म्हणून वापरत होता असे म्हणतात. १९३७ साली टाइम मासिकाने त्याचा फोटो संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून त्याच्या मुखपृष्ठावर छापला होता. १९४७मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालेले नसल्यामुळे त्याच्याच मालकीचे होते. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचा विचार करता ते संस्थान युरोपमधल्या एकाद्या देशाइतके मोठे होते. त्यामुळे त्या काळातला हैदराबादचा निझाम हा  निःसंशय सर्वाधिक श्रीमंत होता. काश्मीर, म्हैसूर, जयपूर, बडोदा यासारख्या इतर ठिकाणचे संस्थानिकसुद्धा श्रीमंतच होते, पण ते निझामाइतके श्रीमंत नसतील. 


ब्रिटिश राजवटीतच भारतातले काही यशस्वी व्यापारी आणि उद्योगपती हे सुद्धा खूप श्रीमंत झाले होते. यात टाटा आणि बिर्ला आघाडीवर होते. तेंव्हाही वालचंद, किर्लोस्कर, साराभाई, वाडिया, गोदरेज, बजाज यांच्यासारखे आणखी काही उद्योगपती होते पण ते टाटाबिर्लांच्या तोडीचे नसावेत. त्यामुळे मी लहानपणापासूनच टाटाबिर्ला या जोडीचेच नाव ऐकत होतो. जमशेदजी टाटा यांनी ब्रिटिशांच्या काळातच भारतात पहिला लोखंडाचा मोठा कारखाना काढला होता आणि त्या गावालाच जमशेदपूर हे नाव दिले होते. त्याच्याही आधी त्यांनी मुंबईत कापडाची गिरणी काढली होती. पुढे टाटा कंपनीने लोणावळ्याजवळ धरण बांधून खोपोलीला विद्युतकेंद्र बांधले आणि मुंबईला वीजपुरवठा सुरू करून दिला, मुंबईत भव्य ताजमहाल हॉटेल बांधले, तेलसाबणाचे, मिठाचे, आगगाडीच्या इंजिनांचे तसेच ट्रक्स, बसेस वगैरेंचेही कारखाने काढले होते, टाटांनीच भारतातली पहिली विमान कंपनी काढली होती. अशा सगळ्या कंपन्या अत्यंत कार्यक्षमतेने चालवून त्यांनी 'टाटा' या नावाला एक उत्कृष्ट गुणवत्तेचे प्रतीक असा लौकिक मिळवून दिला होता.  सर जमशेदजी टाटा यांच्यानंतरच्या काळात कोण कोण या समूहाचे संचालन करत होते त्यांची नावे आज त्यांच्याइतकी प्रसिद्ध नाहीत. माझ्या लहानपणीच्या काळात त्या समूहाचे प्रमुख असलेले श्री.जे आर डी टाटा हे भारतातले सर्वात मोठे उद्योगपती होते. श्री.नवल टाटाही प्रसिद्ध होते. 


श्री.घनश्यामदास बिर्ला यांनीही कापडाच्या गिरण्या, मोटारीचा कारखाना, सिमेंटचे कारखाने, कागदाचे कारखाने यासारखे अनेक उद्योग धंदे यशस्वीपणे सुरू करून ते नावारूपाला आणले होते, पण त्या कंपन्यांच्या नावांमध्ये किंवा उत्पादनांच्या नावातही सहसा कुठे 'बिर्ला' असा उल्लेख नसल्यामुळे 'टाटा'सारखा 'बिर्ला' ब्रँड तयार झाला नव्हता. घनश्यामदास बिर्ला महात्मा गांधीजींचे अनुयायी आणि निकटवर्ती होते. महात्मा गांधींचा दुर्दैवी अंत दिल्लीच्या बिर्लामंदिराच्या आवारातच झाला होता.

आमच्या लहानपणी घरातला कोणी मुलगा उजाडल्यानंतरही खूप वेळ अंथरुणात झोपून रहात असला तर त्याला "संस्थानिक" म्हणत असत कारण त्या काळातले संस्थानिक त्यांच्या अत्यंत ऐदीपणासाठी प्रसिद्ध होते. आणि कोणी एकादी अनावश्यक आणि महाग अशी वस्तू विकत घेतली तर तो "आता टाटाबिर्ला झाला आहे का?" असा टोमणा मारला जात असे. त्या काळात टाटाबिर्ला म्हणजे अगदी भयंकर गडगंज इसम समजले जायचे. सगळे संस्थानिक, राजे महाराजे, नवाब वगैरे लोक तर श्रीमंत असणारच, पण हे टाटाबिर्ला कुणी राजे, महाराजे किंवा नवाब नसूनसुद्धा त्यांच्यासारखे श्रीमंत मानले जात होते. 

संस्थानिकांच्या सगळ्या स्थावर आणि जंगम संपत्तीची मोजदाद करून त्यांचे आकडे प्रसिद्ध केले जात असण्याची फारशी शक्यता नव्हतीच, त्यामुळे त्यांच्यातले कोण किती श्रीमंत होते ते सामान्य जनतेला कळणे अशक्य होते. पण पब्लिक लिमिटेड कंपन्यांना दर वर्षी त्यांचे ताळेबंद प्रकाशित करावे लागतात. वर्षाच्या सुरुवातीला  त्यांची एकूण मालमत्ता किती होती आणि वर्षभरात त्यात किती वाढ किंवा घट झाली यांचे आकडे त्यात दिलेले असतात. जमीनी, इमारती, यंत्रसामुग्री वगैरेंचे अचूक मूल्यांकन दरवर्षी किंवा त्याच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या दिवसांच्या बाजारभावाने करणे व्यवहार्य नसते, पण अशा संपत्तीची कागदोपत्री नमूद केलेली मूळ किंमत आणि वर्षभरात त्यात केलेली वाढ किंवा झालेली घट यांचा हिशोब दिला जातो. त्याशिवाय त्या कंपनीने एकंदर किती कर्जे घेतलेली आहेत ते सुद्धा दिले असते. ते वजा करून त्यावरून त्या कंपनीची निव्वळ संपत्ती (Net worth) ठरवली जाते. टाटा आणि बिर्ला उद्योगसमूहाच्या कंपन्यांचे अशा प्रकारचे अहवाल उपलब्ध असल्यामुळे त्यांचेवरून त्या कंपन्या किती श्रीमंत आहेत ते समजत होते आणि अधूनमधून त्यांचे आकडे वर्तमानपत्रांमध्ये येत असत. ते सर्वसामान्य लोकांच्या आकलनापलीकडे इतके मोठे असत. मी जेंव्हा वर्तमानपत्रे वाचायला सुरुवात केली त्या काळात टाटांच्या उद्योगसमूहाची संपत्ती सर्वात जास्त होती. त्यानंतर बिर्ला उद्योगसमूह होता. म्हणून ढोबळ मानाने टाटांना सर्वात जास्त श्रीमंत समजले जात होते.

पण अशा मोठ्या कंपन्यांची संपूर्ण मालकी एक माणूस किंवा कुटुंब यांच्याकडे नसते. त्या कंपन्यांचे कोट्यावधी समभाग (शेअर्स) जगभरातील लक्षावधी लोकांनी विकत घेतलेले असतात आणि त्यातला प्रत्येक समभागधारक (शेअरहोल्डर) त्याच्याकडे असलेल्या समभागांच्या प्रमाणात त्या कंपनीचा मालक असतो. आणखी एक गंमत म्हणजे शेअरमार्केटमध्ये रोजच शेकडो किंवा हजारो शेअर्सची खरेदीविक्री होत असते, त्यामुळे या कंपन्याची मालकी रोजच्या रोज तितक्या प्रमाणात बदलत असते. पण तसे होत असले तरी ते नवे मालक कंपनीच्या रोजच्या व्यवहारात थेट हस्तक्षेप करू शकत नाहीत. वर्षभरातून एकदा किंवा अधिक वेळा सगळ्या  समभागदारांची मीटिंग घेऊन त्यात कंपनीचे निदेशक (डायरेक्टर्स) बहुमताने निवडले जातात आणि त्यांना कंपनी चालवण्याचे सर्वाधिकार दिले जातात, तसेच कंपनीच्या कामासंबंधित महत्वाचे निर्णय घेतले जातात. हे कंपनीचे संचालक लोक आपल्यातलेच किंवा आपल्या मर्जीतले असावेत, त्यांनी आपले हितसंबंध जपावेत  या दृष्टीने  कंपनीचे मूळ मालक बरेचसे समभाग आपल्याकडे ठेऊन घेतात. त्यामुळे त्यांना तितके जास्त मताधिकार मिळतात आणि बहुमताने आपल्याला हवे तसे प्रस्ताव ते पास करवून घेऊ शकतात. अशा प्रकारे ते अप्रत्यक्षपणे त्या कंपनीचे मालक समजले जातात. 

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात संपूर्ण जगातच  प्रचंड प्रमाणात आणि झपाट्याने यांत्रिकीकरण वाढत गेले. स्वातंत्र्यानंतर आधुनिक भारतालाही समृद्ध होण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मार्गाने जाण्यावाचून गत्यंतर नव्हते हे पं.नेहरूंनी ओळखले होते आणि त्यानुसार वैज्ञानिक संशोधन आणि कारखानदारी यांना प्राधान्य देण्याचे धोरण ठेवले. त्यांच्या सरकारने त्या दृष्टीने मूलभूत शास्त्रीय संशोधन करणाऱ्या  तसेच अभियांत्रिकीचे शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था स्थापन केल्या, अनेक नद्यांवर बहुउद्देशीय धरणे बांधली, पायाभूत अवजड उद्योगांचे मोठे कारखाने सरकारी क्षेत्रात उभारले, अशा अनेक महत्वाच्या गोष्टी केल्या. 

पण त्यांना आणि त्यांच्यानंतर आलेल्या काही राज्यकर्त्यांना भारताचा विकास मुख्यतः  समाजवादी समाजरचनेतून व्हावा असे वाटत होते. खाजगी क्षेत्रांमधल्या कंपन्यांनीसुद्धा कुठल्या वस्तूंचे जास्तीत जास्त किती उत्पादन करावे आणि ते उत्पादन त्यांनी किती किंमतीला विकावे अशासारखे सरकारी निर्बंध त्यांच्यावर आणले. त्यामुळे कारखाने जास्त कार्यक्षमतेने चालवून किंवा अधिक आधुनिक यंत्रसामुग्री बसवून कुठल्याही वस्तूचे जास्त उत्पादन करायला वाव नव्हता किंवा तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीमधून जास्त नफा मिळवायलाही परवानगी नव्हती. मग नवीन कारखाने उभे करायचा उत्साह कुणाला वाटेल? उलट काही व्यवसायांमधल्या सगळ्या खाजगी कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून त्या सरळ सरकारच्या ताब्यात घेतल्या गेल्या. महात्मा गांधीजींच्या चळवळीत चरख्याला फार मोठे स्थान होते. चरख्यावर सूत काढून हातमागावर विणलेले खादीचे कापड  हे महावस्त्र झाले होते. सर्व राजकीय पुढारी खादी धारण करीत असत. त्यामुळे खादीची निर्मिती आणि यासारख्या पारंपरिक ग्रामोद्योगांना सरकारकडून विशेष संरक्षण आणि उत्तेजन मिळत होते. हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाशी थोडे विसंगत होते. अशा काही कारणांमुळे त्या सरकारांच्या काळात खाजगी उद्योगक्षेत्राची वेगाने वाढ करण्यासाठी सरकारांकडून मिळायला पाहिजे होते तेवढे प्रोत्साहन मिळाले नाही. 

प्रत्येक गावांमध्ये इनामदार, जहागीरदार, जमीनदार, सावकार यांच्यासारखे थोडे सधन लोक असतात आणि इतर बहुसंख्य लोक गरीब असतात. हे ज्याचे त्याचे नशीब किंवा पूर्वजन्मीचे प्राक्तन असे समजून बहुतेक सगळे लोक शांत राहतात. सधन लोक बलवान असतात आणि काही वेळा ते गरीबांवर अन्याय करतात तेंव्हा त्यांना तो सहन करावा लागतो. पण तो असह्य झाला तर त्यातून संघर्ष सुरू होतो. रॉबिनहूडसारखे वीर तयार होऊन काही प्रमाणात त्या अन्यायाचे परिमार्जन करतात. युरोपातल्या मार्क्स नावाच्या विचारवंताने कम्युनिझम (साम्यवाद) नावाचा सगळी समाजव्यवस्था बदलून टाकायचा एक स्फोटक विचार मांडला. त्याच्या प्रभावामधून रशियामध्ये रक्तरंजित राज्यक्रांती झाली. तिथल्या गरीब जनतेने सामूहिक उठाव करून तिथल्या झार नावाच्या जुलुमी राजाला मारून टाकले आणि देशातल्या सगळ्या श्रीमंत लोकांच्या मालमत्तेची सर्रास लुटालूट केली.  

त्यानंतर कम्युनिस्ट नेत्यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर मार्क्सच्या विचारांवरून असे ठरवले की त्यांच्या देशात कुणाच्याही व्यक्तिगत मालकीची काही मालमत्ताच राहणार नाही. देशातली सगळी जमीन, सगळ्या इमारती, दुकाने, कारखाने आणि सगळी स्थावर जंगम संपत्ती फक्त सरकारच्या मालकीची असेल. म्हणजे त्यानंतर देशात कुणी गरीबही राहणार नाही किंवा कुणी श्रीमंतही राहणार नाही. सगळे लोक समान राहतील. पण त्यानंतर जर कुणी मालकच नसेल तर  कुठल्या जमीनीत कुठले पीक घ्यायचे, कुठल्या वस्तूचे किती कारखाने उभारायचे, त्यात कुणी कोणते काम करायचे, कुठल्या दुकानातून कुठला माल विकायचा वगैरे सगळे कोण ठरवणार? फक्त सरकारच ते सगळे ठरवेल, सगळ्या नागरिकांनी त्यांना नेमून दिलेली कामे आपापल्या कुवतीप्रमाणे करावीत आणि त्यांना अन्न, वस्त्र, निवारा देण्याचे काम सरकारच करेल असे सांगितले गेले. पण हे सर्व लोकांच्या अनुमतीने वास्तवात आणणे अशक्य होते. कम्युनिस्ट सरकारांच्या सैन्याने बंदुकीच्या धाकाने त्याची अंमलबजावणी केली. यामुळे तिथे कम्युनिस्ट पुढाऱ्यांची दडपशाही सुरू झाली. सुरुवातीला काही वर्षे हा प्रयोग यशस्वी होत आहे आणि त्यातून त्या देशाची झपाट्याने प्रगती होत आहे असा प्रचार केला गेला. पण सर्वसामान्य जनतेवर जुलुम जबरदस्ती करून तिला अमानुषपणे  वागवले जात असल्याच्या बातम्याही बाहेर येत राहिल्या. तिथल्या दोन तीन पिढ्यांनी हे पाहिल्यानंतर त्यांचा असंतोष वाढत गेला आणि गेल्या शतकाच्या अखेरीस साम्यवादी विचारसरणीला थोडी मुरड घालून नागरिकांना स्वतःची मालमत्ता राखायचे आणि त्या मालमत्तेचा आपल्या इच्छेनुसार उपयोग करून घ्यायचे स्वातंत्र्य साम्यवादी देशांमधील जनतेलाही मिळाले.

भारतातही साम्यवादी चळवळ सुरू केली गेली होती, पण त्यात अभिप्रेत असलेला हिंसाचार करायची इथल्या सहनशील लोकांच्या मनाची तयारी होत नव्हती आणि प्रबळ इंग्रज सरकारने तसली हिंसक चळवळ निर्दयपणे चिरडून टाकली असती. त्यामुळे इथल्या अत्यंत गरीब जनतेनेही साम्यवादी चळवळीला  प्रतिसाद दिला नाही. देशातले सगळे उत्पादन आणि वितरण सरकारच्या हातात असावे, म्हणजे समाजात गरीब-श्रीमंत असे वर्ग असणार नाहीत अशा प्रकारच्या समतावादी विचारसरणीला 'डावी' आणि सगळ्या लोकांना उद्योगव्यवसाय करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असावे आणि मुख्य म्हणजे त्यात भांडवल गुंतवणाऱ्यांना त्यापासून चांगला लाभ मिळावा या भांडवलशाही विचाराला 'उजवी' विचारसरणी असे समजले जाते. भारतातल्या महात्मा गांधींच्या अनुयायांमध्ये दोन्ही प्रकारच्या विचारसरणीचे लोक होते. त्यातल्या डाव्या लोकांनी समाजवाद नावाचा अहिंसक मार्ग पत्करला. त्यांचेही उद्दिष्ट समाजातली विषमता नाहीशी करणे हेच  होते, पण त्यांना ते सनदशीर मार्गाने घडवून आणायचे होते. काँग्रेसमध्ये दोन्ही विचारसरणी मानणारे लोक होते म्हणून राज्यकर्त्यांनी सर्वसमावेशक असा मध्यममार्ग निवडला. पण तो काहीसा डावीकडे झुकणारा होता.  

श्रीमंत आणि गरीब यांची संपत्ती आणि उत्पन्न यातली तफावत कमी करण्याच्या दिशेने आर्थिक धोरण असे ठेवले गेले की व्यक्तीचे किंवा कंपनीचे उत्पन्न जसजसे वाढत जाईल, तसतसा त्याला अधिकाधिक दराने आयकर भरावा लागेल. समजा उत्पन्न दुप्पट झाले तर त्यावरील कर फक्त दुप्पट न होता तो चारपाच पट इतका वाढेल. हे दर वाढत वाढत ७०-८० टक्क्यांवर गेले. संपत्तीकर (वेल्थटॅक्स) नावाचा कर लागू करून करदात्याकडे जितकी संपत्ती असेल त्यातला काही भाग त्याने दर वर्षी कररूपाने सरकारला द्यावा असे नियम केले गेले. करदात्याची संपत्ती त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाकडे जायच्या आधी त्यातला काही भाग इस्टेट ड्यूटी म्हणून सरकारला द्यावा लागत असे. त्याने जिवंत असतांनाच आपल्या संपत्तीचा काही भाग आपल्या मुलांना दिला तर त्यावरही सरकारला गिफ्ट टॅक्स द्यावा लागत असे. लँडसीलिंग कायद्याने कमाल जमीन धारणा ठरवली गेली. कुणाकडे त्याहून जास्त जमीन असेल तर ती सरकारच्या मालकीची व्हावी असे कायदे केले गेले. अशा प्रकारे निरनिराळ्या कायद्यांखाली धनाढ्य लोकांची संपत्ती कमी करून ती सरकारकडे वळवली जायला लागल्यामुळे त्याचा एक परिणाम असा झाला की  शेती, व्यापार किंवा व्यवसाय करणारे आणि इतरही बरेचसे लोक कर वाचवण्यासाठी आपले उत्पन्न आणि संपत्ती दडवून ठेवायला लागले. ते करण्यासाठी निरनिराळे मार्ग शोधायला लागले. त्यामुळे चलनातला काळा पैसा वाढत गेला. त्याची मोजदादच होत नव्हती. आपल्याकडे किती संपत्ती आहे हे कोणी सांगायलाच तयार होत नव्हता. मग त्यांच्यातला सर्वात श्रीमंत  कोण हे कसे ठरवणार ?

देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी हैद्राबादचा निझाम मीर उस्मान अली खान ही भारतातली सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होती. त्याच्याकडे अपरंपार मालमत्ता होती. पण त्याच्या अनेक बेगमा, त्यांची मुले, त्या मुलांच्या अनेक  बेगमा आणि त्यांची मुले वगैरे सर्वांची मोठी संख्या होती. त्या सगळ्यांनाच छानछोकीने ऐषोआरामात राहण्याची सवय होती. पुढील काळात त्यांची संख्या आणखी वाढत गेली. त्या सगळ्यांनी निझामाची संपत्ती जमेल तशी वाटून घेतली, त्यातली काही संपत्ती उधळपट्टीमध्ये खर्च झाली, काही  सरकारजमा झाली, काही देशाबाहेर पाठवली गेली, काहीजण स्वतःही परदेशांमध्ये रहायला गेले  असे होत होत आजच्या अतिश्रीमंतांच्या यादीत निजामाचे वंशज दिसत नाहीत. इतर संस्थानिकांपैकी सुद्धा कोणी परदेशी जाऊन तिकडेच स्थाइक झाले आणि काही इथेच राहिले. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी सगळ्या संस्थानिकांचे तनखे बंद केले. त्यांच्या उत्पन्नाचा एक मुख्य मार्ग बंद झाला. पुढील पिढ्यांमध्ये त्यांच्या संपत्तीच्याही  वाटण्या होत गेल्या. दानधर्म, उधळपट्टी, कर आणि वाढत गेलेली महागाई यातून तिला ओहोटी लागत गेली. त्यांच्यातलाही कोणी आजच्या अतिश्रीमंतांच्या यादीत दिसत नाही.

काही संस्थानिकांनी राजकीय पक्षांमध्ये प्रवेश घेतला. बहुतेक सगळ्याच संस्थानिकांची पूर्वीची प्रजा त्यांना देव मानणारी होती. तिने या राजांना निवडणुकींमध्ये भरघोस मते देऊन निवडून दिले. त्यांना नव्या सरकारांमध्ये महत्वाची स्थाने मिळाली. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतलेल्या नेत्यांनी निवडणुकांच्या राजकारणात हिरीरीने भाग घेऊन सत्ता मिळवली. पुढल्या काळात नवे नेते उदयाला आले. नवी सत्ताकेंद्रे स्थापन झाल्यानंतर त्यांच्या आधाराने एक नवश्रीमंत वर्गही तयार होत गेला. पण या लोकांनी त्यांच्या व्यक्तिगत मालमत्तांबाबत विशेष काळजी घेतली. त्यांनी त्या मालमत्ता आपल्या स्वतःच्या नावावर न ठेवता कुटुंबामधल्या किंवा मर्जीतल्या एकनिष्ठ अशा दुसऱ्या लोकांच्या नावावर करून ठेवल्या. अनेक सहकारी संस्था आणि धर्मादाय संस्था उभारून त्यांच्या नावाने आर्थिक व्यवहार केले आणि त्या संस्थांचे संचालक किंवा विश्वस्त या नावाखाली त्या आपल्या नियंत्रणाखाली ठेवल्या. यामुळे त्यांच्यातलाही कोणी आजच्या अतिश्रीमंतांच्या अधिकृत यादीत दिसत नाही.


टाटा, वाडिया, दस्तूर, गोदरेज यासारख्या काही पारशी लोकांनी इंग्रजांच्या काळातल्या भारतात मोठ्या प्रमाणावर व्यापार आणि उद्योगव्यवसाय सुरू केले आणि त्यांना चांगले नावारूपाला आणले. अनेक मोठमोठे उद्योग चालवणारा टाटा उद्योगसमूह हा १९४७ साली भारतात अग्रगण्य होता. स्वतंत्र भारताच्या समाजवादी धोरणामधून खाजगी उद्योगधंद्यांवर काही बंधने घातली गेली होती. अशा वातावरणातही जे.आर.डी.टाटांनी टाटा उद्योगाचा ध्वज फडकत ठेवला आणि त्यात वाढ केली. नंतरही अनेक वर्षे टाटा उद्योगसमूहच अग्रगण्य मानला जात राहिला. पुढे रतन टाटा यांनी तर त्यात घसघशीत भर टाकली. आजसुद्धा टाटा उद्योगसमूहच बहुधा सर्वात जास्त श्रीमंत आहे. पण त्यांच्या संपत्तीची मालकी कोणा एका व्यक्तीकडे किंवा कुटुंबाकडे नसून ती समूहातल्या सगळ्या कंपन्यांच्या सर्व भागीदारांकडे विभागलेली आहे. 

नवा उद्योग सुरू करायच्या वेळी आधी प्रस्थापित असलेली एकादी कंपनी किंवा काही कंपन्या मिळून किंवा काही धन्नासेठ त्यात काही भांडवल गुंतवतात, त्यात बँका, एलआयसी, प्रॉव्हिडंट फंड, म्यूच्युअल फंड्स यासारख्या वित्तसंस्था भर घालतात आणि आणखी काही शेअर्सचा पब्लिक इश्यू काढून ते बाजारात विकले जातात. ते विकत घेणार्‍यांमध्ये पुन्हा व्यक्तींशिवाय अनेक संस्था, कंपन्या, ट्रस्ट, फंड असतात. हे सगळे त्या कंपनीचे शेअर होल्डर किंवा मालक असतात. मोठ्या उद्योगसमूहातल्या  कंपन्यांनी एकमेकांमध्ये भांडवल गुंतवलेले असते. काही प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या, धर्मादाय संस्था (ट्रस्ट्स) यांनी कंपन्यांचे शेअर्स घेतलेले असतात. अशा गुंतागुंतीच्या व्यवहारामध्ये कुठल्याही कंपनीमध्ये कुणा व्यक्तीची नेमकी किती भागीदारी असेल हे सांगणे कठीण असते. टाटा उद्योगसमूहाने कित्येक पिढ्या पाहिल्या असल्याने ते जास्तच जटिल होत गेले असणार. श्री.रतन टाटा हे त्या समूहाचे अध्वर्यू भारतातले सर्वश्रेष्ठ कारखानदार समजले जात होते, पण सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव येत नव्हते. त्यांच्या व्यक्तिगत नावावर बहुधा फार जास्त शेअर्स नसावेत.


स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतातला चित्रपट उद्योग खूप भरभराटीला आला. हिंदी तसेच दक्षिणेतल्या चित्रपटांमधले नायक नायिका एकेका सिनेमासाठी कोट्यवधि रुपये मिळवायला लागले. त्यांचे आलीशान बंगले, गाड्या, त्यांनी दिलेल्या पार्ट्या वगैरेंची रसभरित वर्णने फिल्मी मासिकांमध्ये वाचून कुणालाही असे वाटेल की नेहमी झगमगाटात राहणारे ते लोकच सर्वाधिक श्रीमंत असणार. नटनट्याच जर इतके श्रीमंत असतील तर अशा अनेक नटनट्यांना ते मागतील तेवढे पैसे देणारे चित्रपटनिर्माते किती श्रीमंत असतील?  पण त्या लोकांची नावेही देशामधील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये येत नाहीत.

मी लहानपणापासून सगळ्यात जास्त श्रीमंत या अर्थाने 'टाटाबिर्ला' अशा जोडीचे नाव ऐकत आलो होतो. इंग्रजांच्या काळात जसे काही पारशी उद्योगपती पुढे आले होते तसेच काही मारवाडी उद्योगपतीही तयार झाले होते. त्यांच्यामध्ये बिर्ला कुटुंब आघाडीवर होते. त्या काळातल्या बिर्लांनी व्यापारामधून गडगंज कमाई केली आणि त्यातून व्यापाराच्या जोडीला कारखानदारी आणि इतर व्यवसाय सुरू केले. त्यात ज्यूट आणि कापडाच्या गिरण्या, सिमेंटचे, साखरेचे आणि कागदाचे कारखाने, हिंदुस्थान टाइम्स हे वर्तमानपत्र वगैरे व्यवसाय येतात.  श्री.घनश्यामदास बिर्ला हे महात्मा गांधींचे अनुयायी होते आणि त्यांनी स्वराज्याच्या चळवळीलाही मदत केली होती. काँग्रेसमधल्या नेत्यांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. स्वतंत्र भारतात केंद्रात तसेच सगळ्या प्रांतांमध्येही काँग्रेसची सरकारे होती. त्या काळात बिर्ला उद्योगाचीही वेगाने भरभराट होत गेली  त्यामुळे बिर्लांचे नावही टाटांच्या सोबत घेतले जात राहिले होते.  


ज्याप्रमाणे टाटांच्या नावाने काही प्रसिद्ध संशोधन संस्था आणि हॉस्पिटले आहेत तशीच अनेक धर्मादाय कामे बिर्लांनीही केली आहेत. त्यांच्या राजस्थानमधल्या पिलानी या गावी उभारलेली बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बिट्स पिलानी) प्रसिद्ध आहे, देशभरातल्या अनेक शहरांमध्ये भव्य आणि सुंदर अशी बिर्ला मंदिरे बांधली आहेत, पुण्यात आदित्य बिर्ला हॉस्पिटल आहे वगैरे. पुढील काळात बिर्ला कुटुंबात वाटण्या झाल्या आणि वेगवेगळे ग्रुप झाले, पण त्यातल्या आदित्य बिर्ला ग्रुपने आपली यशस्वी वाटचाल पुढे चालू ठेवली. बिर्लांच्या कंपन्यांचेही लक्षावधी समभागधारक असले तरी त्यांनी नियंत्रक समभाग (कंट्रोलिंग शेअर्स) आपल्या नावावर ठेवले आहेत. गुगलच्या आधी माहिती मिळवण्याची साधने कमी होती. काही वर्तमानपत्रे माहिती गोळा करून कोण सर्वात श्रीमंत आहे त्याची बातमी कधी कधी देत असत. त्यात काही वेळा बिर्लांचे नाव घेतले जात असे. आजही श्री.कुमारमंगलम बिर्ला यांचे नाव पहिल्या दहा सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये आहे. 

स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वालचंदनगर आणि किर्लोस्करवाडी या दोन उद्योगनगरी उभ्या राहिल्या होत्या. त्या अनुक्रमे शेठ वालचंद हिराचंद आणि श्री.शंतनुराव किर्लोस्कर यांच्या होत्या. वालचंद ग्रुपकडे याशिवाय प्रीमियर ऑटोमोबाइल्स हा मोटारींचा कारखाना, कूपर मशीन टूल्स, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन ही बांधकाम व्यवसायातली प्रमुख कंपनी असे अनेक उद्योग होते आणि किर्लोस्करांकडे किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, कमिन्स, किर्लोस्कर इलेक्ट्रिक आदि मोठे कारखाने होते. त्यांच्या वंशजांनी हे उद्योगधंदे पुढे चालवत ठेऊन त्यात वाढही केली असली तरी श्रीमंतीच्या शर्यतीत ते थोडे मागे पडलेले दिसतात. त्यांची नावे आजच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये दिसत नाहीत.


स्वातंत्र्यानंतरच्या काळात धीरूभाई अंबानी नावाच्या एका विलक्षण धडाडी असलेल्या कल्पक माणसाने औद्योगिक क्षेत्रात चमत्कार घडवून आणला. त्याने एक कापडांचा व्यापारी म्हणून सुरुवात केली आणि  जेंव्हा देशात लायसेन्सपरमिट राज्य चालले होते त्या काळात राजकारणी आणि नोकरशहा यांच्याशी संगनमत करून अनेक लायसेन्से आणि परमिटे मिळवली. रिलायन्स नावाची भरपूर फायदा देणारी कंपनी काढली. जेंव्हा शेअर्स विकत घेणे हे फक्त श्रीमंतांचे आणि जुगारी वृत्तीच्या सट्टेबाजांचे काम समजले जात होते त्या काळात मध्यमवर्गीय लोकांना शेअर्समध्ये गुंतवणूक करायला प्रवृत्त करून शेअरबाजाराचे रूपच बदलून टाकले. सर्वसामान्य लोकांना निरनिराळी प्रलोभने दाखवत त्यांच्याकडून अधिकाधिक पैसे गोळा करून त्यातून निरनिराळे मोठमोठे कारखाने उभे केले आणि त्यातून मिळालेल्या नफ्याचा काही भाग लाभांशामधून वाटून टाकून लोकांचा विश्वास संपादन केला. त्यांनी रिलायन्समध्ये केलेली गुंतवणूक बुडाली नाही, तिचे मूल्य वाढतच गेले.  पुढे आर्थिक धोरण बदलून मुक्त अर्थव्यवस्था सुरू झाल्यानंतर तर रिलायन्सला पंख फुटले आणि तो जागतिक पातळीवरील उद्योग झाला, त्याची गणना जगातील उद्योगांमध्ये आणि अंबानींची गणना जगातील अब्जाधीशांमध्ये व्हायला लागली.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचा विकास होण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रात मोठमोठ्या संशोधनसंस्था, प्रयोगशाळा स्थापन केल्या गेल्या, धरणे बांधली गेली, वीजकेंद्रे उभारली गेली, तसेच अवजड उद्योगांचे जंगी कारखाने सुरू करण्यात आले. या सर्वांनी भरपूर नफा कमावून सरकारच्या तिजोरीत भर घालावी अशी अपेक्षा ठेवली गेली नव्हती. जनतेच्या उपयोगाचे पदार्थ आणि वस्तू आपल्याच देशात तयार केल्या जाव्यात आणि त्या जनतेला रास्त भावात मिळाव्यात एवढ्या उद्देशाने ही गुंतवणूक करण्यात येत होती आणि तिचा चांगला उपयोग होतांना दिसत होता. शिवाय प्रत्येक संस्थेत किंवा कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधली गेली, त्यांच्या कुटुंबियांसाठी दवाखाने, शाळा, क्रीडांगणे, बागबगीचे वगैरे सोयी करून ठिकठिकाणी काही आदर्श वसाहती तयार केल्या गेल्या. समाजासाठी या सगळ्या चांगल्याच गोष्टी होत्या.

ही सगळी सरकारच्या मालकीची संपत्ती होती म्हणून त्यांचे व्यवस्थापन करण्याचे काम प्रशासनातले अधिकारी किंवा राजकीय पुढारी अशा या बाबतीत अननुभवी लोकांना दिले जात होते. ते लोक एकाद्या जागी दोन तीन वर्षे राहून दुसरी चांगली पोस्ट मिळाली की तिकडे निघून जात. त्यांना त्या क्षेत्रांमधले ज्ञान नसायचे आणि त्यामध्ये जास्त रसही नसायचा. त्या व्यवसायासाठी लागणारी खरेदीविक्री करायचे कौशल्य त्यांच्याकडे नव्हते. बदलत्या जगात कुठल्या नवनव्या प्रक्रिया उपलब्ध होत आहेत, कुठल्या वस्तूंची किती गरज पडणार आहे हे ओळखून त्यांच्यासाठी नियोजन करण्याची दूरदृष्टी त्यांच्याकडे नव्हती. त्यांनी तिथेही आपली सरकारी कचेऱ्यांमधली दीर्घसूत्री लालफीताशाही आणली. अशा कारणांमुळे या क्षेत्रामधील कार्यक्षमता कमी होत गेली. सार्वजनिक क्षेत्रातले बहुतेक उद्योग तोट्यात जायला लागले, ते पांढरे हत्ती बनले. त्यांना कसेबसे चालू ठेवण्यासाठी सरकारच्या तिजोरीमधून खर्च करायची गरज पडायला लागली आणि तिच्यावरचा ताण वाढत गेला. त्यांचेपासून समाजाचा फायदा होण्याऐवजी समाजावरच त्यांचा भार पडत आहे याविरुद्ध आक्रोश सुरू झाला. तीन चार दशकांच्या अनुभवानंतर समाजवादी विचारसरणीची ही दुसरी बाजू दिसायला लागली.

त्या काळात खाजगी उद्योगांवर काही कडक सरकारी बंधने घातली गेली होती. प्रत्येक कारखान्याने कुठल्या वस्तूंचे किती उत्पादन करावे आणि ते किती किंमतीला विकावे हे सगळे सरकार ठरवत असे आणि उद्योजकांना ते पाळावे लागत असे. पण अर्थशास्त्रातल्या नियमांनुसार बाजारातले भाव मागणी आणि पुरवठा यावरून ठरत असतात. काही वस्तूंसाठी ग्राहकांकडून जास्त मागणी होत असेल आणि कारखानदार / विक्रेत्यांकडून तितका पुरवठा होत नसेल तर काही ग्राहक त्या वस्तूसाठी जास्त किंमत द्यायला तयार होतात आणि त्या वस्तूंचा भाव वाढतो. ते ग्राहक अशा वाढलेल्या भावाने त्या वस्तू विकत घेतात पण उरलेल्या ग्राहकांना त्या वस्तू मिळत नाहीत. अशा वेळी चांगला भाव मिळत आहे म्हणून जास्त वस्तूंचे उत्पादन होऊन त्या बाजारात येतात, तसेच तितका वाढीव भाव द्यायला तयार नसलेले ग्राहक कमी झालेले असतात. यामुळे मागणी आणि पुरवठा यांच्यातली तफावत कमी होते. याच्या उलट काही वस्तूंचा जास्त पुरवठा होत असेल आणि तितक्या सगळ्या वस्तू घेणारे ग्राहक नसतील तर त्या सगळ्या वस्तू विकल्या जात नाहीत, काही वस्तू ग्राहकांची वाट पहात पडून राहतात. अशा वेळी काही विक्रेते भाव कमी करतात आणि त्या कमी केलेल्या किंमतीत ग्राहक त्या वस्तू जास्त प्रमाणात विकत घेतात. त्यानंतर त्या वस्तूंचे नवे उत्पादन कमी केले जाते. अशा रीतीने मागणी आणि पुरवठा यांच्यामधला समतोल साधला जातो. या गोष्टी सतत बदलत राहतात. त्यात एक डायनॅमिक समतोल असतो.

पण सरकारी बंधनांमुळे विक्रेत्याला भाव वाढवण्याची परवानगी नसेल आणि जास्त उत्पादन करून पुरवठा वाढवायलाही परवानगी नसेल तर त्या वस्तूची तीव्र टंचाई निर्माण होते, काही व्यापारी त्याचा फायदा घेऊन त्यांचा काळाबाजार करतात. या प्रकारच्या खरेदीविक्रीचे व्यवहार अनधिकृत असतात. त्यामधून मिळवलेल्या पैशांची कुठे नोंद केली जात नाही. असा पैसा काळा किंवा दोन नंबरचा म्हंटला जातो. इतर काही मार्गांनीसुद्धा काळा पैसा तयार होत असतो. काही व्यावसायिकांकडून आयकर वाचवण्यासाठी  कमी उत्पन्न दाखवले जाते, विक्रीकर वाचवण्यासाठी विदाउट रिसीट माल विकला जातो. जुगारी लोक मटक्यावर किंवा रेसमधल्या घोड्यांवर पैसे लावतात, क्रिकेटच्या सामन्यात कोणता संघ जिंकेल यावरही बेटिंग केले जाते आणि त्यासाठी मॅचफिक्सिंग केले जाते. गरीबांच्या भल्यासाठी रेंटअॅक्ट करून घरांची भाडी अत्यंत कमी दरावर कायमसाठी गोठवण्यात आली. पण त्यामुळे ज्यांना शक्य होते अशा पैसेवाल्या लोकांनी चाळी बांधून गरीब लोकांना खोल्या भाड्याने देणे सोडून दिले. गरीब लोकांना ते शक्य नव्हतेच. मोठ्या शहरांमध्ये भाड्याने घर मिळणे अशक्यप्राय झाले आणि अवाच्यासवा पागडी देण्याची पद्धत सुरू झाली. प्रचंड प्रमाणात अवैध झोपडपट्ट्या तयार होत गेल्या. नवे घर बांधतांना किंवा विकत घेतांना त्याच्या किंमतीचा काही भाग सर्रास दोन नंबरने मागितला जात असे. सिनेमा उद्योगातले अनेक व्यवहार  असेच गुपचुपपणे होत असतात असे सांगितले जाते. गुन्हेगारी जगात  चोरी, दरोडे, लूटमार, अपहरण यासारखे प्रकार आहेतच. लाचलुचपत, भ्रष्टाचार वगैरे मार्गांनी मिळवलेल्या कमाईचा कुठे हिशोब ठेवला जात नाही. अशा प्रकारांनी दोन नंबरचा किंवा काळा पैसा इतक्या जास्त प्रमाणात वाढत गेला की त्याची एक वेगळी समांतर अर्थव्यवस्था सुरू झाली. त्यात धनाढ्य झालेल्या व्यक्तींची नावे कुठेही सांगितली जाऊ शकत नाहीत. मग त्यातला सर्वाधिक श्रीमंत कोण हे कसे समजणार?

तीन चार दशके साचेबंद समाजवादाच्या मार्गाने वाटचाल करतांना त्याचे हे काही परिणाम दिसायला लागल्यावर सरकारच्या आर्थिक धोरणामध्ये काही बदल होऊन हळूहळू ते उदारमतवादी होत गेले, डाव्या बाजूकडून उजवीकडे सरकायला लागले. खाजगी  क्षेत्रामधल्या उद्योगव्यवसायांवरील काही बंधने शिथिल झाली. उद्योजकांना उत्पादन आणि विक्री यांच्या बाबतीत जास्त स्वातंत्र्य मिळत गेले. उद्योगधंद्यांमधून नवी संपत्ती निर्माण करून तिचा संचय करता येणे शक्य झाले. त्यामधून त्यांना नवनवीन उद्योगव्यवसाय सुरू करायला उत्तेजन मिळायला लागले. परदेशातल्या कंपन्यांनाही काही प्रमाणात भारतात कारखाने काढायला परवानगी मिळाल्यामुळे त्याला अधिक वेग आला.

विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील प्रगतीमधून जगासरतल्याच सगळ्या लोकांचे जीवन बदलत गेले. सुती आणि लोकरी कपड्यांबरोबर रेयॉन, नायलॉन, पॉलिएस्टर यासारख्या कृत्रिम धाग्यांची वस्त्रे आली आणि ती अधिकाधिक प्रमाणात लोकप्रिय होत गेली. निरनिराळ्या प्रकारच्या प्लॅस्टिक आणि कृत्रिम रबराच्या अनंत वस्तू तयार व्हायला लागल्या आणि लोकांच्या उपयोगात आल्या. स्वयंपाकघरात अॅल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टीलची भांडी आणि मिक्सर ग्राइंडर, ओव्हन, रेफ्रिजरेटर आले. रस्त्यावर स्कूटर्स, मोटरसायकल्स, कार्स, ट्रक्स वगैरे वाहनांची संख्या अनेकपटीने वाढत गेली. अनेक प्रकारची नवी औषधे आणि सौंदर्यप्रसाधने  निघाली. इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात तर विस्मयकारक बदल होत गेले. रेडिओ, टी.व्ही., टेपरेकॉर्डर, टेलीफोन या सगळ्यांची अधिकाधिक उपयुक्त आणि आकर्षक अशी नवनवी मॉडेल्स भराभर येत गेली. या सगळ्या वस्तू भारतात बनवण्यासाठी अनेक नवे कारखाने उभारले गेले त्यातले बहुतेक सगळे खाजगी क्षेत्रामध्येच उभारले गेले. त्यासाठी पहिल्यापासून अस्तित्वात असलेल्या कंपन्यांनीही आपापल्या क्षमता वाढवल्या आणि अनेक नव्या कंपन्याही सुरू होत गेल्या. त्यांनी भांडवल उभे करण्यासाठी अधिकाधिक शेअर्स विकायला काढले. 

त्यामुळे शेअरबाजारातल्या उलाढाली अनेक पटीने वाढत गेल्या. कमी किंमतीत शेअर्स विकत घ्यायचे आणि त्यांचे भाव वाढवून ते जास्त किंमतीला विकायचे असा झटपट श्रीमंत होण्याचा एक नवा मार्ग त्यामधून निघाला. हर्षद मेहता नावाच्या माणसाने अल्पावधीत अशा प्रकारे कोट्यावधी रुपये कमावले होते. पण त्याने केलेले गैर प्रकार उघडकीला आल्यामुळे तो स्वतः गोत्यात आला आणि शेअर बाजारही कोसळला. त्यानंतर असे प्रकार पुन्हा पुन्हा होऊ नयेत अशी काळजी सरकारतर्फे घेण्यात आली आणि शेअरबाजार सुरळित मार्गावर आला. तेंव्हपासून त्याची घोडदौड आजतागायत सुरू आहे आणि त्यामुळेही अनेक लोकांची संपत्ती वाढत गेली आहे, अनेकांनी श्रीमंतीची शिखरे गाठली आहेत. 

गेल्या शतकाच्या अखेरीला आलेल्या संगणक क्रांतीने जगभरातली परिस्थिती आश्चर्यकारक गतीने झपाट्याने बदलत गेली. संगणकांमुळे कारखाने, बँका, सरकारी ऑफिसे, व्यापार, पर्यटन, उद्योगव्यवसाय या सगळ्या क्षेत्रांमधले सगळे व्यवहार कमालीच्या वेगाने आणि अचूकतेने व्हायला लागले आणि त्यांची कल्पनातीत गतीने वाढ होत गेली. त्याच्या पाठोपाठ आलेल्या इंटरनेटने सगळे जग जवळ आणले. कुठेही न जाता हवी ती माहिती सहज मिळायला लागली. माहिती तंत्रज्ञान ही एक विज्ञान तंत्रज्ञानाची नवी शाखाच उदयाला आली.  त्याच्या बरोबरच संदेशवहनात क्रांतिकारक  प्रगती होत गेली. चित्र, शब्द आणि आवाज या तीन्ही प्रकारचे संदेश जगभरात कुठूनही कुठेही क्षणार्धात पाठवणे शक्य होऊ लागले. सेलफोन आल्यावर तर आपल्या खिशात ठेवता येईल इतक्या लहानशा उपकरणाने ते सगळे सहजपणे करता येऊ लागले आणि मुख्य म्हणजे हे सगळे अगदी सामान्य माणसाला परवडू शकेल इतक्या कमी खर्चामध्ये किंवा जवळ जवळ फुकट करता येऊ लागले. मोबाइल फोनमधून पैसे देता आणि घेता येऊ लागले, त्यामुळे रोख रकम जवळ बाळगायची आवश्यकता कमी होत गेली.

हे सगळे साध्य करण्यासाठी काँप्यूटर आणि कम्युनिकेशन या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक नव्या कंपन्या जगभर सगळीकडे सुरू झाल्या आणि त्यातल्या मायक्रोसॉफ्ट, अॅपल, गूगल यासारख्या कंपन्या तर सगळ्या जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्या झाल्या. भारतात सुद्धा या क्षेत्रात काम करणाऱ्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, टेकमहिंद्रा यासारख्या कंपन्या सुरू झाल्या आणि बघताबघता मोठ्या होत गेल्या, तसेच अनेक परदेशी कंपन्यांच्या शाखा भारतात उघडल्या गेल्या. बंगळूरू, पुणे, हैद्राबाद यासारख्या शहरांमध्ये खास आयटी पार्क उघडले गेले. या क्षेत्राने युवकांना नोकऱ्यांच्या भरपूर संधी दिल्या. त्यातले लक्षावधी युवक अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियाला जाऊन येत असतात. कित्येक लोक तिथे जाऊन राहिले. लक्षावधी युवक भारतातच राहून परदेशातली कामे करत आहेत.  या क्षेत्रात इतर क्षेत्रांच्या मानाने जास्त चांगले पगार मिळायला लागले. त्यात काम करणाऱ्या लोकांचे राहणीमान सुधारले, त्यांची क्रयशक्ती वाढली, त्यातून ठिकठिकाणी मोठमोठे मॉल्स उभे राहिले. सगळ्या मोठ्या शहरांमध्ये गगनचुंबी इमारती बांधल्या गेल्या आणि त्यात वाढ होतच आहे. चार चाकी वाहनांची गर्दी होऊन रस्ते अपुरे पडायला लागले आहेत. वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी अनेक उड्डाणपूल बांधले जात आहेत. महानगरांना जोडणारे प्रशस्त महामार्ग बांधले गेले, आणखी बांधले जात आहेत. अशा सगळ्या प्रकारे देश समृद्ध होत आहे आणि त्यात अब्जाधीश लोकांची संख्याही वाढत आहे.

पूर्वीच्या काळी गावात ज्या लोकांचे मोठे वाडे असत, आजूबाजूला अनेक शेते असत, गोठ्यात खूप गुरेढोरे असत, घरातली सगळी कामे करायला अनेक गडीमाणसे असत, हाताशी अनेक हुजरे असत आणि जे लोक समारंभांमध्ये उंची वस्त्रे आणि दागदागिने घालून तोऱ्यात मिरवत असत असे लोक गावातले श्रीमंत समजले जात असत. त्या लोकांच्या खापरपणजोबांनी लढायांमध्ये दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना मिळालेल्या जहागिरी पुढच्या पिढ्या काडीचेही कष्ट न करता मनसोक्त उपभोगत असत. मुंबईसारख्या शहरातले अतिश्रीमंत लोक मलबारहिलवरील बंगल्यात रहात,  रोल्सरॉइससारख्या महागड्या इंपोर्टेड गाड्यांमध्ये फिरत, पंचतारांकित हॉटेलांमध्ये पार्ट्या करत आणि अधून मधून मौजमजा करण्यासाठी परदेशी जात असत. सामान्य लोकांच्या मनात श्रीमंतांविषयी अशा प्रकारच्या ढोबळ धारणा असायच्या. त्यांच्यातला प्रत्यक्षात कोण किती जास्त श्रीमंत आहे हे कसे ठरवणार? 

सरकारने संपत्ती कर लावायला सुरू केल्यानंतर दर वर्षी सर्वात जास्त प्रॉपर्टी टॅक्स कुणी भरला याचे आकडे कधी तरी वर्तमानपत्रांमध्ये येत असतील. पण मला ते फार वेळा वाचल्याचे आठवत नाही आणि त्यातली नावेही लक्षात राहिली नाहीत. किंबहुना कोण कोण किती श्रीमंत आहेत हे समजून घेण्यातच मला काही इंटरेस्ट असायचे कारण नव्हते. त्यांचे जग वेगळे आणि आपले जग वेगळे, त्यांच्याशी आपला कधीच काही संबंध येणे अशक्य आहे. मग कशाला त्यांची चौकशी करायची? असे मला वाटत असे. त्यामुळे कोणत्या काळात कोण सर्वाधिक श्रीमंत होते याची मला काही सुसंगत अशी माहिती मिळाली नाही किंवा ती जमवावी असेही मला कधी वाटले नाही.

गेल्या शतकाच्या अखेरीला अमेरिकेतल्या फोर्ब्स नावाच्या मॅगेझिनने जगभरातल्या अब्जाधीशांची यादी प्रसिद्ध करायला सुरुवात केली. ही यादी ऑथेंटिक समजली जाते. काही वर्षांनंतर काही भारतीय नावे त्या जागतिक यादीत यायला लागली. भारतातल्या अब्जाधीशांच्या वेगळ्या याद्याही प्रसिद्ध व्हायला लागल्या. या याद्यांमधल्या  कुणाकडे किती संपत्ती आहे हे ठरवतांना त्यांच्या मालकीचे कुठल्या कंपनीचे किती शेअर्स आहेत आणि त्या शेअर्सचा बाजारभाव किती आहे हे ठरवून त्याप्रमाणे त्यांचे मूल्य काढले जाते. शेअर बाजारात रोजच उलाढाल चाललेली असते आणि शेअर्सचे भावही वरखाली होत असतात. त्यामुळे या यादीमधील अब्जाधीशांची संपत्तीसुद्धा रोज कमीजास्त होतच असणार.

मला असेही वाटते की अशा प्रकारचे संपत्तीचे आकडे आभासी असतात. एकाद्या माणसाकडे त्याच्या कंपनीचे प्रत्येकी दहा रुपयांचे दहा लाख शेअर्स असतील, तर त्यांचे मूल्य (फेसव्हॅल्यू) एक कोटी रुपये होईल, पण शेअरबाजारात त्या शेअरचा भाव हजार रुपये असला तर त्याची संपत्ती एक अब्ज रुपये समजली जाईल. तो अब्जाधीश आहे असे मानले जाईल. पण त्याच्याकडे प्रत्यक्षात इतके पैसे नसतातच. तेवढे पैसे जमवण्यासाठी त्याने आपल्याकडचे सगळे शेअर्स विकायला काढले तर त्यांचा बाजारभाव धाडकन खाली कोसळेल आणि त्याची आभासी संपत्ती एकदम कमी होऊन जाईल. मग अशा आकड्यांना काय अर्थ आहे? तरीही दुसरी कुठलीच अधिकृत माहिती उपलब्ध नसल्यामुळे मी फोर्ब्स कंपनीच्या आकड्यांचाच आधार घेऊन कोण सर्वात श्रीमंत आहे हे पहायचा प्रयत्न केला आहे.


फोर्ब्स कंपनीने दाखवलेले १९९६ पासून पुढील वर्षांमधील भारतीय अब्जाधीशांचे आकडे गूगलवर मिळाले. या आकड्यांनुसार १९९६चे सर्वात श्रीमंत कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडे त्या वर्षी दोनअब्ज डॉलर एवढी आणि दुसऱ्या क्रमांकावरील लक्ष्मी मित्तल यांच्याकडे दीड अब्ज डॉलर एवढी संपत्ती होती. या दोघांचीही संपत्ती वाढून आता अनुक्रमे पंचवीस आणि सोळा अब्ज डॉलर इतकी झाली आहे, पण क्रमवारीत ते आता अनुक्रमे आठव्या आणि पंधराव्या स्थानावर आहेत. नंतरच्या काळात काही वर्षे अझीम प्रेमजी, लक्ष्मी मित्तल आणि दिलीप शंघवी पहिल्या दोन नंबरांमध्ये होते, पण  गेल्या पंचवीस वर्षांमध्ये आधी धीरूभाई अंबानी आणि त्यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी सातत्याने पहिल्या दोन क्रमांकांमध्ये येत आहेत. 


२०१७ नंतर फक्त मुकेश अंबानी आणि गौतम अडानी हे दोघेच पहिल्या दोन स्थानांमध्ये दिसतात आणि या दोघांचीही संपत्ती कमीजास्त होत असली तरी सुमारे शंभर अब्ज डॉलर्सच्या आसपास असते. अझीम प्रेमजी, लक्ष्मी मित्तल आणि दिलीप शंघवी या तीघांच्याही संपत्तीमध्येही वाढ झाली आहेच आणि हे तीघेही पहिल्या वीसांमध्ये येतातच. त्यांच्याशिवाय शिव नाडार, सावित्री जिंदाल, राधाकृष्ण दामाणी, सुनील मित्तल, सायरस पूनावाला,  उदय कोटक, मंगलप्रभात लोढा वगैरे लोकांनी पहिल्या वीसांमध्ये स्थान मिळवले आहे. गोदरेज, बजाज, हिंदुजा वगैरे धनाढ्य कुटुंबे आहेतच. टाटांशी संबंधित असलेले शापूरजी मिस्त्री आहेत. 

यातील प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या एका किंवा अनेक उद्योगव्यवसायांशी निगडित आहेत. त्यांच्या कंपन्या माहिती तंत्रज्ञान, पेट्रोलियम, औषधे, रसायने, सिमेंट, स्टील, इमारतबांधणी, बँकिंग, रिटेल विक्री, वाहतूक, पर्यटन यांच्यासारखे उद्योग आणि सेवा पुरवण्यात  आघाडीवर आहेत. यांच्याशिवाय ज्यांची नावे मी कधी ऐकली नव्हती असे आणखी काही लोक आहेत. पण कुठलाही प्रसिद्ध नेता किंवा अभिनेता यांची नावे या यादीत दिसत नाहीत. या वर्षातल्या शंभराव्या क्रमांकावरील अब्जाधीशाची संपत्ती सुमारे तीन अब्ज डॉलर्सएवठी म्हणजे १९९६मधल्या सर्वात श्रीमंत माणसापेक्षाही जास्त आहे. या यादीतली बहुतेक नावे गुजराथी, मारवाडी, पारशी, सिंधी, पंजाबी अशा लोकांची आहेत. काही थोडे दाक्षिणात्यही आहेत, पण पहिल्या शंभर नावांमध्ये एकही मराठी नाव दिसत नाही. त्या यादीत महाराष्ट्रातले अनेक उद्योगपती आहेत, पण नावांवरून ते मराठीभाषिक वाटत नाहीत.

(समाप्त)


Wednesday, September 25, 2024

वॉशिंग्टन डी सी ची सहल

 मी २००८ मध्ये दिलेल्या माझ्या अमेरिकेच्या पहिल्या भेटीत मी वॉशिंग्टन डीसी या तिथल्या राजधानीला जाऊन आलो होतो. पण आता न्यूजर्सीमध्ये रहात असलेला माझा मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांनी अजून हे प्रेक्षणीय स्थळ पाहिले नव्हते.  एका रविवारी हवामान चांगले होते हे पाहून आम्ही एकदम वॉशिंग्टन डीसीला धावती भेट द्यायचे ठरवले. कारने जायचे असल्यास चार तासांचा रस्ता होता हे पाहिले आणि सकाळी उठून तयार होऊन बाहेर पडलो. रस्त्यावर नेहमीसारखाच बऱ्यापैकी ट्रॅफिक होता, तसेच ठिकठिकाणी टोलनाकेही होते. वाटेत एका फूडमॉलवर थांबून थोडे खाऊन पिऊन घेतले आणि दुपारी बारा वाजायच्या सुमाराला वॉशिंग्टन डीसीच्या आसमंतात जाऊन पोचलो. तिथला उंच मनोरा दुरूनच दिसायला लागला.


मागच्या वेळेला मी एका टूरिस्ट कंपनीबरोबर गेलो होतो, त्यामुळे तिथे गेल्यावर कुठकुठल्या जागा कुठल्या क्रमाने पहायच्या ते सगळे आमच्या गाइडनेच ठरवलेले होते. आमच्यासारखे पर्यटक फक्त बसमधून उतरायचे, ते ठिकाण बघायचे आणि पुन्हा बसमध्ये चढायचे एवढेच करत होते. मी त्या वेळचा सगळा सविस्तर वृत्तांत ब्लॉगवर लिहून ठेवला होता पण आमचे या वेळचे येणे इतके अचानक ठरले होते की ते लेख शोधून काढून वाचायलाही फुरसत मिळाली नाही. शिवाय पंधरा वर्षांमध्ये कितीतरी गोष्टी बदलल्या असण्याची शक्यताही होतीच. म्हणून मी या वेळी सगळे काही नव्याने पहायचे असेच ठरवले.

मला एवढे आठवत होते की तिथे मधोमध वॉशिंग्टन मेमोरियलचा उंचच उंच स्तंभ आहे आणि त्याच्या चार दिशांना दूर अंतरावर  कॅपिटाल बिल्डिंग, लिंकन मेमोरियल, जेफरसन मेमोरियल आणि व्हाइट हाउस या चार मुख्य प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय इमारती आहेत.  त्या चारी इमारतींना बाहेरच्या बाजूने जोडणारा रिंग रोड तेंव्हा तरी नव्हता. त्या भागात काही विस्तीर्ण तलाव होते आणि पोटॅमिक नावाची एक नदीही होती. आम्ही त्यांना वळसे घालत वेग वेगळ्या रस्त्यांनी जाऊन या चार इमारती पाहिल्या  होत्या. मध्यंतरीच्या काळात त्यात आणखी काही बदलही झाले असतील. नवे फ्लायओव्हर्स किंवा अंडरपास बांधले गेले असतील. त्यामुळे मी पूर्वीच्या अनुभवावरून काही मार्गदर्शन करणे योग्य नव्हतेच. पण आता सोबत जीपीएस असल्यामुळे आम्हाला रस्ते लक्षात ठेवायची काही आवश्यकताही नव्हती.

 आम्ही लिंकन मेमोरियलपासून सुरुवात करायचे ठरवले आणि जीपीएसला तशी आज्ञा केली. जीपीसने आज्ञाधारकपणे आम्हाला लिंकन स्मारकापर्यंत आणले. पण तिथे आसपास कुठेही मोटार उभी करायला जागाच दिसत नव्हती, अधिकृत असा पार्किंग लॉटही दिसत नव्हता.  तिथले मुख्य रस्ते सोडून लहान लहान रस्त्यांवरून फिरून पाहिले तर जिकडे तिकडे गाड्याच गाड्या पार्क करून ठेवलेल्या होत्या. पंधरा वीस मिनिटे उलटसुलट दिशांनी फिरल्यावर एक लहानशी मोकळी जागा दिसली. दुसऱ्या कुणी ती पटकवायच्या आधी आम्ही आमची मोटार तिथे उभी केली आणि बाहेर पडलो. 


तिथून लिंकन मेमोरियलची भव्य इमारत दिसतच होती. त्या दिशेने चालत चालत तिथपर्यंत गेलो आणि पंचवीस तीस पायऱ्या चढून वर गेलो. ग्रीक डोरिक टेंपलच्या धर्तीवर बांधलेल्या या इमारतीला ३६ खांब आहेत आणि त्यांच्या आधाराने सपाट आकाराचे छप्पर आहे. वेगवेगळ्या अमेरिकन संस्थानांची नांवे यातील प्रत्येक खांबावर खोदलेली आहेत आणि उरलेली नांवे वेगळ्याने एका फलकावर दिली आहेत. समोरची बाजू पूर्णपणे मोकळीच आहे. ही संपूर्ण इमारत पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांपासून बांधलेली आहे.


पायऱ्या चढून इमारतीत गेल्यानंतर समोर अब्राहम लिंकन यांचा भव्य पुतळा आहे. तसा तो अगदी दूरवरून दिसतच असतो. जवळ जाता जाता त्याची भव्यता आणि लिंकनच्या मुद्रेवरील भाव स्पष्ट होत जातात. "ज्या लोकांसाठी अब्राहम लिंकन यांनी आपल्या राष्ट्राची अखंडता टिकवून ठेवली त्यांच्या हृदयात आणि या मंदिरात त्यांची आठवण सतत तेवत राहील." असे शब्द या पुतळ्याच्या वरच्या बाजूला ठळक अक्षरात कोरून ठेवले आहेत. दोन हात बाजूच्या हँडरेस्टवर टेकवून ऐटीत खुर्चीवर विराजमान असलेली लिंकन यांची सुटाबुटातली प्रतिमा विलक्षण लक्षवेधक आहे. सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने पहाता त्यांची गणना कांही देखण्या लोकांमध्ये होणार नाही. पण त्या पुतळ्याचा आकार, रेखीवपणा, समोरील वॉशिंग्टन स्मारक आणि कॅपिटांलच्या दिशेला वळवलेली करडी नजर वगैरे सारे पाहण्यासारखे आहे. लिंकन यांनी केलेल्या कांही महत्वाच्या भाषणांमधले उतारे दोन्ही बाजूंच्या भिंतींवर कोरून ठेवले आहेत.  तिथे आलेले पर्यटक अब्राहम लिंकन यांच्या पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर आपापले फोटो काढून घेण्यात मग्न होते. थोडे लोक त्यांच्या भाषणांमधले उतारे तिथेच उभे राहून वाचत होते किंवा घरी जाऊन सावकाशपणे वाचण्यासाठी त्यांचेही फोटो काढून घेत होते. ती जागा प्रशस्त असली तरी तिथे खूप गर्दी होत असल्यामुळे जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते.

लिंकन स्मारकाच्या पायऱ्या उतरत असतांनाच समोर लांबच लांब चौकोनी रिफ्लेक्शन पाँड, त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवळीचे रुंद पट्टे, पलीकडे भव्य वॉशिंग्टन स्मारकाचा गगनचुंबी खांब दिसत होताच तसेच त्याच्याही पलीकडच्या बाजूला असलेली वस्तुसंग्रहालये आणि सर्वात मागे  कॅपिटॉल हिलची इमारत वगैरे  दिसत होतेच. त्या वेळेपर्यंत दुपारच्या भोजनाची वेळ झाली होती. आमच्या कारपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला काही खाद्यपदार्थांच्या मोठमोठ्या गाड्या उभ्या होत्या आणि तिथे आलेले पर्यटक त्यांच्या समोर रांगा लावून उभे होते. त्या गाड्यांमधून बर्गर, पिझ्झा, पाश्ता, नूडल्स अशासारखे पदार्थ मिळत होते. आम्ही चांगला पोटभर नाश्ता घेतलेला असल्यामुळे कुणालाही जास्त भूक लागली नव्हती, शिवाय वाटेत चघळण्यासाठी आम्ही काही खुसखुशित पदार्थही आणलेले होते. त्यामुळे तिथले पदार्थ घेऊन न खाता आम्ही सरळ मोटारीकडे गेलो आणि आणलेले एक दोन पदार्थ तोंडात टाकून चघळत पुढच्या मार्गाला लागलो. 


तिथून दुसऱ्या कुठल्याही प्रेक्षणीय स्थळाकडे जातांना वाटेत वॉशिंग्टन मेमोरियल लागणार होतेच, ते पहात पहात व्हाइट हाउसकडे जायचे असे आम्ही ठरवले. वॉशिंग्टन मॉन्युमेंट ही एक प्राचीन काळातल्या युरोपीय पध्दतीतील ओबेलिस्क प्रकारची इमारत आहे. हा एक प्रकारचा चौकोनी खांब असतो आणि तो वरच्या बाजूने निमूळता होत जातो. हे मॉन्यूमेंट संगमरवर, ग्रॅनाइट आणि सँडस्टोन या जातींच्या दगडांमधून उभारले आहे. तो जगातील सर्वात मोठ्या आकाराचा प्रचंड ओबेलिस्क आहे, तसेच ते जगातील सर्वात उंच दगडी बांधकाम आहे.

पॅरिसचा आयफेल टॉवर उभा होण्यापूर्वीची कांही वर्षे वॉशिंग्टन मेमोरियल ही जगातील सर्वात उंच इमारत होती. सुमारे ५५५ फूट उंचीचा हा मनोरा एकाद्या पन्नास मजली इमारतीइतका उंच आहे. आजकाल यापेक्षाही उंच अशा कित्येक इमारती अमेरिकेतच नव्हे तर मलेशिया, दुबई यासारख्या देशातल्या शहरांमध्येही पहायला मिळतात, पण त्या सिमेंटकाँक्रीटच्या असतात. वॉशिंग्टन मेमोरियल बाहेरून खांबासारखे वाटत असले तरी ते आंतून पोकळ असून त्यात साडेआठशे पायऱ्यांचा जिना आहे, तसेच लिफ्टची सोयसुध्दा आहे. पण ११-७ च्या घटनेनंतर आंत जायला मनाई करण्यात आली आहे असे काहीसे आम्हाला पूर्वीच्या भेटीत सांगितले गेले होते. या वेळीही आम्हाला तिथे कुणी आत जाणारे, बाहेर पडणारे किंवा त्यासाठी रांगेत उभे असलेले लोक दिसले नाहीत. मॉन्यूमेंटच्या सभोवती प्रशस्त हिरवळ आहे आणि त्यात फुलांचे सुंदर ताटवे लावलेले दिसत होते. तिथे अनेक लोक बसले होते किंवा रमतगमत फिरत होते. त्या स्मारकाच्या जवळच्या रस्त्यावरून जात असतांना आम्ही आपल्या गाडीत बसूनच या स्मारकाचे दुरून दर्शन घेतले. जवळ जवळ दीडशे वर्षांपूर्वी आतासारखी यांत्रिक साधने उपलब्ध नसतांना त्या काळातल्या कामगारांनी जिवाचा धोका पत्करून एवढी उंच इमारत कशी बांधली असेल याचे आश्चर्यही वाटते आणि त्यांची खरोखरच कमाल वाटते.

चाळीस पन्नास वर्षांपूर्वी मी कुतुबमिनारमधल्या गोल जिन्याच्या पायऱ्या चढत आणि देव आनंद व नूतनची आठवण काढत वरपर्यंत गेलो होतो आणि एकदा टोरोंटोच्या उत्तुंग सीएन टॉवरमध्ये लिफ्टने वर गेलो होतो. पण पिसाच्या मनोऱ्यातही आम्हाला आतल्या जिन्याने वर चढून जायची संधी मिळाली नाही तशीच वॉशिंग्टन मेमोरियलमध्येही मिळाली नाही.  एखाद्या पर्वताच्या शिखरावर किंवा उंच इमारतीवर चढून दूरवर क्षितिजापर्यंत पसरलेला भाग पहाण्यात एक प्रकारचे थ्रिल असते. पूर्वीच्या काळातल्या लोकांना ती संधी क्वचितच मिळत असल्यामुळे त्याचे मोठे अप्रूप असणार.  पण जगातल्या सर्वात उंच पर्वतशिखरांच्याही वरून उडत जात असणाऱ्या विमानांमध्ये बसायची संधी मला कित्येक वेळा मिळाली आहे, शिवाय माझे अर्धे आयुष्य एकोणीसाव्या मजल्यावरच्या घरात गेले आहे आणि सध्याही मी सव्वीसाव्या मजल्यावर रहात आहे. त्यामुळे रोजच असे विहंगम दृष्य पहायची मला सवय झाली आहे.


अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेले व्हाइटहाउस एकदा आत जाऊन पहावे असे कुणालाही वाटेल. पण सुरक्षेच्या कारणामुळे पूर्वीच्या भेटीतही आम्हाला त्या इमारतीच्या गेटपर्यंतसुद्धा नेले नव्हते. मधले दोन तीन रस्ते सोडून लांबवर असलेल्या एका रस्त्यावर उभे राहून आम्हाला दुरूनच ती इमारत पहावी लागली होती. आजूबाजूला असलेल्या उंच झाडांमागे तिचा बराचसा भाग झाकलेलाच होता आणि जेवढा दिसत होता तो फारसा आकर्षक वाटला नाही. अर्थात व्हाइटहाउस ही अमेरिकेतली एक सर्वात जुनीपुराणी इमारत आहे आणि बांधायच्या वेळीच ती एकादे चर्च किंवा स्मारक म्हणून बांधलेली नसून माणसांच्या वास्तव्याचा विचार करून बांधली आहे. त्यात सौंदर्याचा जास्त विचार केला नसेल. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणजे आजच्या जगातला सर्वाधिक प्रभावशाली राजकारणी पुरुष त्या वास्तूत निवास करतो  आणि खुद्द राष्ट्रपतीचे कार्यालयसुद्धा याच इमारतीच्या परिसरात आहे. या कारणांमुळे तिला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे एवढेच. व्हाइट हाउसपासून दुरूनच जाणाऱ्या ज्या रस्त्यांवरून वाहतुकीला परवानगी होती अशा रस्त्यांवरून हळू हळू जात आम्ही गाडीतच बसूनच त्या वास्तूचे दर्शन घेतले, एका ठिकाणी थांबून आमच्या आठवणींसाठी फोटोही खेचले.


तिथून आम्ही मॉल भागात आलो. कॅपिटॉल बिल्डिंगसमोरील वॉशिंग्टन मेमोरियलच्या दिशेने पसरलेल्या प्रशस्त जागेला नॅशनल मॉल असे नाव दिले आहे. विविध प्रकारची अनेक वस्तुसंग्रहालये आणि इतर महत्वाच्या वास्तू या मॉलवरील हमरस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या केलेल्या आहेत. या मॉलच्याच वॉशिंग्टन स्मारकाच्या पलीकडल्या बाजूला एक लांबलचक रिफ्लेक्टिंग पाँड आहे आणि त्याच्या पलीकडे लिंकन मेमोरियल आहे. अमेरिकेच्या केंद्रीय सरकारचा कारभार कॅपिटॉल बिल्डिंग या इमारतीतून चालवला जातो.  अर्थातच तिथेसुद्धा अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असते. फक्त तिथे काम करणारे कर्मचारी आणि ज्यांना ऑफिशियल कामासाठी तिथे जाण्याचा परवाना मिळाला आहे असे लोकच तिथे जाऊ शकतात. आमच्याकडे त्या बिल्डिंगच्या जवळपास कोठेही जाण्याचा परवाना नव्हता. गाडीतच बसून जेथपर्यंत जाणे शक्य होते तेथवर जाऊन आम्ही दुरूनच त्या सुंदर इमारतीचे दर्शन घेतले आणि तिच्या आजूबाजूचा रम्य परिसर पाहून घेतला. ही वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुंदर आणि भव्य इमारत आहेच, तिचे शिखर वॉशिंग्टन मेमोरियल इतकेच उंच आहे. या दोन इमारतींसारखी तिसरी कोणतीही उंच इमारत या भागात बांधली गेली नाही. या इमारतींचे महत्व राखण्यासाठी तिथे यांच्यापेक्षा भव्य अशी नवी उंच इमारत बांधायला परवानगी मिळत नसेल.

आतापर्यंत पोटातली भूक जागृत व्हायला लागलेली असल्यामुळे नॅशनल मॉलवरच्या एखाद्या चांगल्या क्षुधाशांतिगृहात जाऊन जेवण करावे असे आम्हाला वाटत होते. तिथे तर रस्त्यावरून फिरणाऱ्या असंख्य लोकांची गर्दी होती, त्या सर्वांच्या खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था होत असणार अशी आमची खात्री होती. पण तिथेही कुठेच आमची मोटार उभी करायला जागाच सापडत नव्हती. तिथल्या गजबजलेल्या रस्त्यांवरून इकडून तिकडून चकरा मारत फिरत असतांना आम्ही व्हार्फ भागात आलो. त्या भागाला व्हार्फ म्हणतात हे ही आम्हाला माहीत नव्हते.  माझ्या पूर्वीच्या प्रवासात आम्हाला ही जागा दाखवली नव्हती.  तिथे कुठेतरी एका भूमीगत पार्किंग लॉटचा बोर्ड दिसला आणि आम्हाला हायसे वाटले. मी मोटारीतून उतरून रस्त्याच्या कडेला फुटपाथवर उभा राहिलो आणि मुलगा कार पार्क करायला आत घेऊन गेला. तो पाच मिनिटात बाहेर येईल अशी आम्हा दोघांचीही अपेक्षा होती. सून आणि नाती तिकडचा भाग पाहून एखादे चांगले हॉटेल शोधायला गर्दीतून पुढे चालल्या गेल्या आणि दिसेनाशा झाल्या. 

दहा मिनिटे होऊन गेली, पंधरा मिनिटे झाली, वीस मिनिटेही होऊन गेली तरी मुलगा बाहेर येतच नव्हता. मी आपला एकटाच रस्त्याच्या कडेला सावलीत उभा राहून किंवा एक दोन मिनिटे रस्त्याच्या कडेला एकाद्या बाकड्यावर टेकून इकडे तिकडे बघत वेळ घालवत होतो. त्या वेळेला माझ्याकडे पासपोर्टही नव्हता, खिशात एक डॉलरही नव्हता की क्रेडिट कार्डही नव्हते कारण सतत ग्रुपमध्येच रहायचे असल्यामुळे मला यातल्या कशाची गरज पडेल असे घरातून निघतांना वाटलेच नव्हते. माझा मोबाइल फोन खिशात होता, पण  मी इंटरनॅशनल रोमिंग घेतले नसल्यामुळे त्याचा तिथे काही उपयोग नव्हता. घरी असतांना मी वायफाय वरून जगभर वॉट्सॅप कॉल करू शकत होतो, पण इथे ती सोयही नव्हती. त्यामुळे मला अनोळखी लोकांच्या गर्दीत पण एकटा आणि असुरक्षित वाटायला लागले. मनातून थोडी चुळबुळ होत असली तरी कुणीतरी येऊन मला तिथून घेऊन जाणारच याचीही मनोमन खात्री होतीच. पण मी अधीर होऊन त्या लोकांना शोधण्यासाठी आपली जागा सोडली असती तर मात्र मी तिथल्या गर्दीमध्ये कदाचित हरवून गेलो असतो. म्हणून मी त्या एका जागेवरच थांबून राहिलो. तिथे मी असा का उगाचच एका ठिकाणी थांबलो आहे असे कदाचित पहाणाऱ्या कुणाला वाटलेही असते, पण बहुधा तिथल्या कुणाचेच माझ्याकडे लक्ष नसावे, मला काहीही विचारायला कुणीही जवळ आला नाही. अखेर माझी नात तिथे परत आली आणि मला आपल्यासोबत घेऊन गेली. 

त्या रस्त्याच्या कोपऱ्यावरच असलेल्या ऑयस्टर बार नावाच्या हॉटेलात त्यांना कसेबसे एक टेबल मिळाले होते. तिथेही लोकांची तुडुंब गर्दी होतीच, पण हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला जास्तीच्या टेबलखुर्च्या मांडून त्यांनी सोय केली होती. ऑयस्टर म्हणजे शिंपल्यातला प्राणी किंवा किडा जे काही असते तो जीव. त्यांचेही अनेक प्रकार असतात आणि त्यातल्या एका प्रकारच्या शिंपल्यात मोती तयार होतात. या ऑयस्टर्सना कच्चेच किंवा उकडून, भाजून किंवा तळून तयार करण्यात येणारे पदार्थ हे या हॉटेलचे वैशिष्ट्य होते आणि अशा पंधरावीस पदार्थांची यादी मेनूत दिलेली होती. मला तर ती वाचून त्यातले शब्दही समजत नव्हते. असले काही तरी चमत्कारिक पदार्थ खायच्या विचारानेच मला मळमळायला लागते. पण त्या हॉटेलात चिकन, फिश, प्रॉन्स, फ्राइड राइस  यासारखे ओळखीच्या नावांचे काही पदार्थ मिळत होते ते आम्ही मागवले. आपल्याकडच्या उडुपी हॉटेलांच्यासारखी तत्पर सर्व्हिस तिकडे सहसा नसते. बरेचसे लोक आधी एकादे पेय मागवून ते सावकाशपणे घोट घोट घेत बसलेले असतात. आम्ही सरळ जेवण मागवले असले तरी तिथले नोकर चेंगटपणा करतच होते.  एखादी वेट्रेस हातात ट्रे घेऊन आतून बाहेर आली की आम्हाला वाटायचे ती आपलेच जेवण घेऊन आली आहे, पण ती आम्हाला हुलकावणी देऊन दुसऱ्याच टेबलाकडे जायची.

अखेर एकदाचे आम्ही मागवलेले खाद्यपदार्थ टेबलावर आले आणि आम्ही ते खायला सुरुवात केली तेंव्हा कुठे माझा मुलगा धापा टाकत तिथे येऊन पोचला. त्याला यायला इतका वेळ का लागला याचे त्याने सांगितलेले कारण थक्क करणारे होते.  ज्या ठिकाणी पार्किंग उपलब्ध आहे असे सांगणारा मोठा बोर्ड होता आणि मी उभा राहिलो होतो त्याच्या बाजूलाच एक  डेस्क होता आणि एक लहान बोर्ड होता. त्यानुसार तिथे वॅले पार्किंगची व्यवस्था केलेली होती, पण त्यासाठी साठ सत्तर डॉलर भरायचे होते. आम्हाला जेमतेम अर्धा पाऊण तास थांबून थोडेसे खाऊन पिऊन लगेच पुढे जायचे होते. तेवढ्या वेळासाठी उगाच इतके पैसे कशाला खर्च करायचे आणि आपली गाडी अनोळखी माणसाच्या ताब्यात द्यायची का? अशा विचाराने मुलाने तिकडे दुर्लक्ष करून गाडी स्वतःच चालवत आत नेली. पण आत शिरल्यावर तिथून पुढे जाणारे एक मोठे भुयार होते आणि मैलभर अंतरावर त्या बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला गाड्या पार्क करायची जागा होती. तिथे आपली गाडी लावून तो दुसऱ्या बाजूने बाहेर पडला होता आणि हॉटेल शोधत शोधत आमच्यापर्यंत येऊन पोचला होता. 

जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्रच बाहेर पडलो आणि चालत चालत कार पार्किंगच्या दिशेने निघालो. तो रस्ता वॉशिंग्टन डीसीच्या फेरी व्हार्फचा  मुख्य रस्ता होता. हे शहर पोटोमॅक या अमेरिकेतल्या एका मोठ्या नदीच्या काठी वसवले गेले आहे. तिथून काही मैल पुढे वहात गेल्यावर ही नदी अॅटलांटिक महासागराचा भाग असलेल्या एका आखाताला जाऊन मिळते. या ठिकाणीच त्या नदीचे पात्र चांगले रुंद आहे आणि पुढे ते अधिकाधिक रुंद होत जाते. मासेमारी करण्यासाठी किंवा जलविहार करण्यासाठी इथून जाणाऱ्या येणाऱ्या लहानमोठ्या नौकांसाठी या बंदराचा उपयोग केला जातो. आम्हाला रस्त्याच्या पलीकडल्या बाजूला नदीच्या काठाशी उभ्या केलेल्या शेकडो नौका दिसत होत्या आणि बहुधा तितक्याच किंवा जास्तच नावा पाण्यावर सफर करायला गेलेल्या असाव्यात. काही मोठ्या नावा जरा खोल पाण्यात नांगर टाकून उभ्या केलेल्या होत्या.  त्या नावांवर खाणेपिणे, नाचगाणे या सगळ्यांची व्यवस्था करून धमाल पार्ट्या केल्या जातात. आम्ही युरोपदर्शनाला गेलो होतो तेंव्हा वीस दिवसात असे तीन क्रूज अनुभवले होते. त्या भागात आणि त्या नौकांवरसुद्धा सगळीकडे खूप दिवे लावलेले होते आणि रात्री तिथे नक्कीच दिव्यांचा झगमगाट आणि वाद्यांचा गलबलाट होत असणार.

काही लोकांच्या मनात वॉशिंग्टन, जेफरसन, लिंकन यासारख्या इतिहासकाळातल्या महान लोकांच्याबद्दल खूप आदरभाव असतो, त्यांची स्मारके पहायची उत्सुकता असते, तर काही लोकांना निरनिराळी म्यूजियम्स पहायचा शौक असतो. जगभरातले असे उत्सुक आणि उत्साही लोक वॉशिंग्टन डीसीला येत असतात. पण या गोष्टी एकदा पाहिल्या की ती उत्सुकता कमी होते. त्यापेक्षाही जास्त लोकांना मौजमजा करायची आवड असते आणि ती कितीही वेळा करता येते. अमेरिका ही तर चंगळवादी राहणीमानाची जननी आहे. तिथे मौजमजा करण्यासाठी सगळ्या गावांमध्ये रेस्तराँ, पब्स, क्लब्स, पार्क्स,  रिसॉर्ट्स वगैरे तर असतातच, अनेक ठिकाणी खास प्रकारचे अॅम्यूजमेंट पार्क असतात. अमेरिकेतले लोक जरा मोकळा वेळ मिळाला की कुठे जाऊन कशी मौजमस्ती करायची याचा विचार करत असतात. 

माझ्या पहिल्या अमेरिकावारीत आम्ही ख्रिसमसला फ्लॉरिडामधील समुद्रकिनाऱ्यावरील सेंट ऑगस्टीन नावाच्या गावी गेलो होतो. तिथेही थोडी मौजमस्ती धमाल होती, पण ती एकाद्या खेड्यातल्या जत्रेसारखी होती. तिथे छोट्या छोट्या किरकोळ वस्तू विकणाऱ्या लहान लहान दुकानांची, खाद्यपेयांच्या ढाब्यांची आणि त्यामधून पायी चालत फिरणाऱ्या सर्वसामान्य लोकांची गर्दी होती. माझ्या दुसऱ्या अमेरिकाप्रवासात मी कॅलिफोर्नियातल्या लॉस एंजेलिस शहराजवळ असलेल्या सँटा मोनिकाचा समुद्रकिनारा पाहिला होता. तिथेही  जगभरातून जिवाची अमेरिका करायला आलेल्या टूरिस्टांची प्रचंड गर्दी नेहमीच असते. तिथे चांगला लांबलचक आणि सुंदर असा बीच तर आहेच, शिवाय बीचवरच एक मोठा अॅम्यूजमेंट पार्क आहे. तिथे अनेक प्रकारच्या राइड्स आहेत, अनेक प्रकारच्या मनपसंत खाद्यंतीसाठी भरपूर ठिकाणे आहेत. तळलेले चविष्ट खेकडे आणि मासे यांचे पदार्थ ही तिथली स्पेशॅलिटी आहे. शिवाय गाणी गाणारे, वाद्ये वाजवणारे, जादूचे किंवा सर्कससारखे खेळ दाखवणारे, तिथल्या तिथे रेखाचित्र काढून देणारे वगैरे कलाकारही रस्त्याच्या कडेला आपल्या करामती दाखवत असतात. त्यामुळे एक जत्रा भरल्यासारखे मनमौजी वातावरण असते. तशीच किंवा त्याहूनही जास्त गजबज मी सॅनफ्रान्सिस्कोच्या फेरी व्हार्फवर पाहिली होती.  

त्यांच्या तुलनेत लास व्हेगास म्हणजे तर एक मोठा जागतिक कुंभमेळा होता. तिथे सगळ्या खंडांमधले निरनिराळ्या वंशाचे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक निरनिराळ्या चित्रविचित्र पोषाखांमध्ये दिसत होते. त्यात कोणी लालबुंद गोरे, कोणी काळे कुळकुळित, कोणी पीतवर्णीय, कोणी ताडमाड उंच तर कोणी अतीशय बुटके, कोणी गलेलठ्ठ, कोणी काटकुळे, कोणी म्हातारे, कोणी तरुण, कुणाबरोबर लहान लहान मुले अशा सगळ्यांचा त्यात समावेश होता, पण सगळ्यांच्या अंगातून बेदरकार वृत्ती, पुरेपूर उत्साह आणि उत्सुकता ओसंडून वाहतांना दिसत होती. आम्हीसुद्धा कधी दुकाने आणि कधी माणसे यांच्याकडे पहात पहात आणि त्यांच्यावर कॉमेंट्स करत पुढे पुढे जात होतो. काही रस्त्यांवर म्हणजे फुटपाथवर ऐसपैस मोकळी जागा होती. तिथे गाणी म्हणणारे, वाद्ये वाजवणारे, नाच करणारे, जादूचा खेळ करणारे, हसवणारे विदूषक असे नाना प्रकारे मनोरंजन करणारे कलाकार आपापले खेळ दाखवत होते. 

या सगळ्या अनुभवांची आठवण येईल असे वातावरण  वॉशिंग्टन डीसीच्या फेरी व्हार्फ भागात दिसत होते. तरीही आम्ही दुपारच्या वेळी तिथे फिरत होतो त्या वेळी जरा सुस्त वातावरण होते. संध्याकाळी तिथे तुफान गर्दी होईल आणि रात्री दंगा मस्ती धमाल होईल अशी लक्षणे दिसत होती. आपल्या रोजच्या जीवनातल्या रामरगाड्यापासून दूर जाऊन चार घटका निव्वळ मौजमस्ती करण्यासाठी काही लोक आपापल्या कोंदट घरट्याबाहेर पडून  स्वच्छंद, धुंद हवेत तरंगत असतात, पण आम्हाला रात्रीपर्यंत आपल्या घरी परत जायलाच हवे होते. त्यामुळे आता नॅशनल मॉलवरील एकादे म्यूझियम पाहून परत फिरायचे असे आम्ही ठरवले. वॉशिंग्टनमधल्या रस्त्यांवरून फिरत असतांना मला अचानक एका रस्त्याच्या कडेला चक्क स्वातंत्र्यदेवतेचे दर्शन घडले. पूर्वी मी न्यूयॉर्कच्या लिबर्टी स्टॅच्यूच्या परिसरात एक दिवस घालवला होता.  या वेळी तिच्या या प्रतिकृतीसोबत मिनिटभर उभा राहून पटकन एक फोटो काढून घेतला.


माझ्या मागच्या भेटीत मी तिथले एरोस्पेस म्यूझियम पाहिले होते. राइट बंधूंनी उडवलेल्या पहिल्या विमानापासून ते सुपरसॉनिक जेटपर्यंत निरनिराळ्या प्रकारची विमाने आणि निरनिराळी रॉकेट्स, सॅटेलाइट्स वगैरेंची संपूर्ण सचित्र माहिती आणि त्यांची पूर्णाकृति मॉडेल्स यांचेसह एक अत्यंत आकर्षक असे प्रदर्शन या ठिकाणी होते.  मी आतापर्यंत भारतात आणि परदेशांमध्ये जितकी वस्तुसंग्रहालये किंवा प्रदर्शने पाहिली आहेत, त्यात मला हे प्रदर्शन सर्वात जास्त आवडले होते.  पंधरा वर्षांनंतर ते पुन्हा पहायलाही माझी हरकत नव्हती आणि दुसरे एकादे प्रदर्शन पहायलाही मला आवडलेच असते. त्या ठिकाणी याशिवाय नॅचरल हिस्टरी, आफ्रिका, आशिया आणि अमेरिकन (रेड) इंडियन लोकांच्या कलाकृती यासारखी काही म्यूझियम्स आहेत. आम्ही हातातल्या मोबाइलवर त्यांची माहिती वाचत आणि त्या इमारतींना बाहेरून पहात हळूहळू जात होतो, पण कुठल्याही इमारतीच्या आवारात किंवा बाहेरच्या रस्त्यावर मोटार उभी करता येण्याची कणभरही शक्यता नव्हती. मागच्या वेळेस आमची टूरिस्ट बस आम्हाला एका ठिकाणी सोडून दूर निघून जायची आणि ठराविक वेळेनंतर पुन्हा त्याच ठिकाणी येऊन आम्हाला दुसऱ्या स्पॉटकडे घेऊन जायची. या वेळची परिस्थिती वेगळी होती. आमची मोटरगाडी कुठे उभी करून ठेवायची हीच सगळ्यात मोठी अडचण होती. म्यूझियम्सच्या माहितीमध्ये असेही समजले की त्यातली काही म्यूझियम्स साडे चार वाजताच बंद होणार होती. त्यामुळे आम्ही दूर कुठेतरी गाडी पार्क करून तिथे परत येण्यासाठी वेळही नव्हता आणि ते करण्यासाठी  तिथे कशा प्रकारचे पब्लिक ट्रान्स्पोर्ट उपलब्ध असतील हेही माहीत नव्हते.

निराश होऊन  इकडेतिकडे पहात  फिरत असतांना अमेरिकन आर्ट सेंटरजवळ उजव्या दिशेला वळून थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक रिकामी जागा दिसली.  ते म्यूझियम संध्याकाळी साडेसातपर्यंत उघडे राहणार होते.  मग तेच पहायचे ठरवले, गाडी तिथे उभी केली आणि काठी टेकत टेकत दहा पंधरा मिनिटे चालत त्या सेंटरमध्ये गेलो. त्या तीन मजली बिल्डिंगच्या प्रत्येक मजल्यावर दोन्ही बाजूंना अनेक हॉल्समध्ये अनेक सुरेख कलाकृती मांडून ठेवल्या होत्या. एकाद्या कलाप्रेमी रसिकाला किंवा कलांच्या विद्यार्थ्याला त्या सगळ्या नीट निरखून पहायला पूर्ण दिवस लागला असता, पण आमच्या ग्रुपमधल्या कुणालाही ते पाहण्यात दीडदोन तासाहून जास्त इंटरेस्ट आणि पेशन्स असेल असे मला वाटत नव्हते. दिवसभर फिरण्यामध्ये बरीच शक्ती खर्च झाली असल्यामुळे माझ्या अंगात तोपर्यंत तेवढेही त्राण उरले नव्हते. आत गेल्यावर मला एक वेटिंग रूमसारखी खोली दिसली, तिथे काही बेंच आणि खुर्च्या ठेवल्या होत्या. मी त्यातल्या एका जागी बसून घेतले आणि बाकीच्या लोकांनी ते प्रदर्शन बघून यावे असा प्रस्ताव मांडला.

दोन मिनिटांमध्येच माझा मुलगा त्या म्यूझियममधलीच एक व्हीलचेअर घेऊन आला आणि मला त्यात बसवून सगळ्यांनी आळीपाळीने ढकलत सर्व मजल्यांवरील बहुतेक सगळ्या खोल्यांमध्ये फिरवून आणले.  या अमेरिकन आर्ट सेंटरमधल्या सगळ्या कलाकृती अमेरिकन कलाकारांच्याच होत्या आणि मला तर त्यातल्या कुणाचीही नावेही माहीत नव्हती. पोर्ट्रेट्स सेक्शनमध्ये अमेरिकेतले पुढारी, शास्त्रज्ञ, नटनट्या, खेळाडू वगैरेंच्या सुरेख तसबिरी होत्या. मला त्यांच्यातले फक्त एडिसन आणि टेसला यांच्यासारखे थोडेच महान लोक माहीत होते. 

प्रत्येक चित्राबरोबर त्या व्यक्तीची माहितीही दिली होती, त्यांनी कुठकुठल्या क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक अशी कामगिरी केली होती ते लिहिले होते. अमेरिकेतल्या रहिवाशांना त्याच्याबद्दल आदरभाव वाटत असेल, पण मला अमेरिकेचा इतिहास किंवा तिथली संस्कृति यात फार रस असण्याचे कारणच नव्हते कारण मी तिथला 'दो दिनका मेहमान' होतो. मी यापूर्वी लॉसएंजेलिसमधले गेट्टी सेंटर म्यूझियम पाहिले होते. तिथे मुख्यतः युरोपमधल्या जुन्या काळातल्या प्रसिद्ध कलाकारांच्या दुर्मिळ कलाकृती पाहिल्या होत्या. त्यांच्या मानाने मला या अमेरिकन आर्टिस्टांच्या कलाकृती तितक्या आकर्षक वाटल्या नाहीत.  तरीही त्या पहात आणि त्यांचे कौतुक करत दीडदोन तास कसे गेले ते समजलेही नाही. तिथून बाहेर पडल्यानंतर मात्र आम्ही सरळ घरचा रस्ता धरला. तोपर्यंत सूर्यास्तही होऊन गेला. त्यामुळे रस्त्यातही येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांखेरीज आणखी काही पाहण्यासारखे नव्हतेच.  


Tuesday, September 03, 2024

प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी


इंग्रजांनी भारतात जी शिक्षणपद्धति सुरू केली होती त्यात मराठी, कानडी यासारख्या स्थानिक भाषांमधून प्राथमिक शिक्षण देणाऱ्या व्हर्नाक्युलर स्कूल्सपासून ते उच्च शिक्षण देणाऱ्या युनिव्हर्सिटीजपर्यंत एक मनोरा उभारला होता. युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठ हा त्यातला सर्वात वरचा मजला होता. त्या काळात पहिली चार वर्षे मराठी प्राथमिक शाळा शिकल्याानंतर इंग्रजी शाळेत प्रवेश मिळत असे. ज्यांना इंग्रजी शिकायचे नसेल त्यांच्यासाठी सलग सात वर्षे मराठी शाळेत शिकल्यानंतर व्हर्नाक्युलर फायनल नावाची परीक्षा दिली की त्यांचे शालेय शिक्षण संपत असे. इंग्रजी शाळेत सात वर्षे शिकल्यानंतर मॅट्रिक्युलेशनची परीक्षा असे. ती पास करणे फार कठीण समजले जात असे आणि मॅट्रिक पास झालेल्यांना सरकारी नोकरी मिळत असे. ज्यांना ही पायरी ओलांडता आली नाही ते लोक नॉनमॅट्रिक अशी पदवी लावून घेत असत. मॅट्रिक पास झालेल्या विद्यार्थ्यांमधले थोडे विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश घेत असत आणि एफवाय, इंटर, टीवाय अशा पायर्‍या चढून अखेर ग्रॅज्युएट होत असत. शंभर वर्षांपूर्वीच्या काळात बहुतेक लोक बीए हीच पदवी घेत असत. बीए पास झालेले लोकही अभिमानाने आपल्या नावापुढे बीए ही पदवी लावत असत. थोडे विद्यार्थी विशिष्ट कॉलेजांमध्ये शिकून डॉक्टर, वकील वगैरे होत असत. या सगळ्या परीक्षा युनिव्हर्सिटीज घेत असत. फारच थोडे हुषार विद्यार्थी त्यानंतर युनिव्हर्सिटीजमध्ये जाऊन एमए, पीएचडी वगैरे उच्च पदव्या घेत असत.

इंग्रजांच्या काळात त्यांनी मुंबई,  कलकत्ता, मद्रास अशासारख्या काही मोठ्या शहरांमध्ये युनिव्हर्सिटीज स्थापन केल्या होत्या आणि त्यांना त्या शहरांची नावे दिली होती. ती अजूनही तशीच राहिली आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्रात पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ यासारखी अनेक नवी विद्यापीठे स्थापन झाली. अलीकडच्या काळात अनेक कॉलेजांना डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाल्यामुळे आता देशात एक हजारांपेक्षा अधिक विद्यापीठे झाली आहेत. 

 मी कॉलेजच्या शिक्षणासाठी मुंबईला आलो तेंव्हा तिथली राजाबाई टॉवरच्या नावाने प्रसिद्ध असलेली फोर्ट भागातली प्राचीन इमारत पाहिली होती.  तिच्या आजूबाजूला इतर मोठमोठ्या इमारती होत्या, त्या आवारात कँपससाठी मोकळी जागा नव्हती. कित्येक वर्षांनंतर सांताक्रूझजवळ कलीना भागात मुंबई विद्यापीठाचे प्रशस्त कँपस बांधण्यात आले. मी इंजिनियरिंग शिकायला पुण्याला आलो तेंव्हा तिथले गणेशखिंडीतले विद्यापीठ पाहिले. ते सुरुवातीपासूनच खूप विस्तीर्ण भागात एका वनराईत पसरलेले होते. आता या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. आमच्या पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजलाच आता विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.  गुजरातमधील गांधीनगरजवळ पंडित दीनदयाल उपाध्याय एनर्जी युनिव्हर्सिटी आहे. मला एकदा तिथे जाऊन काही व्याख्याने देण्याचा योग आला होता. एवढी सोडून भारतातली आणखी कुठली विद्यापीठे मी आतून पाहिल्याचे आठवत नाही.

 एका विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्रामध्ये अनेक कॉलेजेस असतात असा माझा इथला अनुभव होता. मी अमेरिकेत पहिल्यांदा गेलो होतो तेंव्हा तिथे रस्त्यावरून जातायेतांना एकाच  शहरामध्ये अनेक युनिव्हर्सिटीजच्या पाट्या पाहिल्या, पण त्या मानाने कॉलेजेसच्या कमी पाट्या पाहिल्या. तिकडे कशाला स्कूल म्हणतात, कशाला कॉलेज म्हणतात आणि कशाला युनिव्हर्सिटी म्हणतात याचे एक गौडबंगाल मला तेंव्हा वाटले आणि ते अजूनही पूर्णपणे समजलेले नाही. 

मी मागच्या वर्षी  न्यूजर्सीमध्ये रहात असतांना एकदा त्या भागातली सुप्रसिद्ध प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी पहायला गेलो होतो. भारतात ब्रिटिश राजवट सुरू होण्याच्याही आधी आणि जेंव्हा अमेरिकेत  ब्रिटिशांचे राज्य होते त्या काळात म्हणजे इसवी सन १७४६मध्ये न्यूजर्सी भागात एक कॉलेज सुरू झाले होते. पुढे रक्तरंजित क्रांति होऊन अमेरिकेतली काही संस्थाने स्वतंत्र झाली आणि त्यांनी अमेरिकन संघराज्य (यूएसए) स्थापन केले.  त्यानंतर सन १८९६मध्ये त्या कॉलेजचे रूपांतर होऊन प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी स्थापन झाली. ती आजतागायत यशस्वीपणे चालत आली आहे आणि अमेरिकेतली एक प्रतिष्ठित शिक्षणसंस्था  म्हणून नावारूपाला आली आहे. या विद्यापीठातील अनेक शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे आणि इथे शिकलेले विद्यार्थी निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर जाऊन पोचले आहेत.  

आपल्याकडे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर अशा सहा ऋतूंचे सहा सोहळे साहित्यामध्ये रंगवले गेले आहेत, पण प्रत्यक्षात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा (थंडी) हे तीन ऋतु चांगले जाणवतात.  अमेरिकेत स्प्रिंग, समर, ऑटम किंवा फॉल आणि विंटर असे चार सीझन्स सांगतात, त्यातले समर आणि विंटर हेच मुख्य असतात आणि बाकीचे दोन संधीकाल आहेत. मी जून महिन्यात अमेरिकेला गेलो तेंव्हा पुण्यात पावसाळ्याला नुकतीच सुरुवात होत होती तर अमेरिकेतला स्प्रिंग सरून समर हळूहळू रंगात येत होता. सगळीकडे हिरवीगार झाडे आणि गवत पसरले होते आणि विपुल प्रमाणात फुलांना बहर आल्यामुळे प्रसन्न वातावरण होते. इथल्या मानाने बराच गारवा होता त्यामुळे तिथे गेल्यावर उन्हात बसायला मजा वाटत होती आणि मी आमच्या बागेतच खुर्च्या ठेऊन दिवसातला बराच वेळ तिथे घालवत होतो. तिथे पावसाळा असा वेगळा ऋतु नसतो, वर्षभरात केंव्हाही पावसाची सर येते आणि थांबून जाते. अर्थातच पाऊस आला की मी घरात येत होतो. काही दिवस असे गेल्यानंतर एकदा सलग चारपाच दिवस रोजच कमालीचे ढगाळ वातावरण असायचे आणि अधून मधून पावसाची पिरपिर सुरू व्हायची असे झाले. त्यानंतर वीकएंडला एकदम निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाला. त्यामुळे आम्हालाही घराबाहेर पडून फेरफटका मारायला उत्साह आला.


मी मुलासह त्याच्या गाडीत बसलो, आम्ही दक्षिणेच्या दिशेने प्रयाण केले आणि तासाभरात प्रिन्स्टनच्या परिसरात जाऊन पोचलो. जीपीएसने आम्हाला त्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचवून आमचे गन्तव्य स्थान आले असल्याची खबर दिली. पण आता तिथे गाडी कुठे उभी करायची हा प्रश्न पडला. आजकाल पुण्यातही हा प्रश्न पडतो, अमेरिकेत तर कुठल्याही रस्त्याच्या कडेला मोटारगाडी उभी करणे हा एक मोठा गुन्हा समजला जातो, त्याला जबर दंड असतो आणि तो भरायला कुणीही तयार होत नाही. आम्ही पार्किंग प्लेसच्या शोधात इकडे तिकडे हिंडत असतांना एका गल्लीतल्या एका इमारतीच्या तळघरात जागा सापडली. तिथे गाडी उभी करून आम्ही बाहेर पडलो आणि त्या गल्लीच्या खाणाखुणा बघून ठेऊन मी आपली काठी टेकत टेकत विद्यापीठाकडे चालायला सुरुवात केली.



चारपाच दिवसांनंतर उघडीप मिळाल्यामुळे तिथेही सगळ्याच लोकांना घराबाहेर पडून त्या प्रसन्न हवेत फिरण्याचा उत्साह आला होता. रस्त्यांवर तर मोटारीची ही गर्दी होतीच, तिथल्या पदपथावरही लोकांचे घोळके रमतगमत फिरतांना दिसत होते. त्यात बरेचसे तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दिसत होत्या, तसेच मध्यमवयीन आणि माझ्यासारखे उतारवयातले अनेक लोकही दिसत होते.  ते कदाचित त्या विद्यार्थ्यांचे आप्तस्वकीय असतील, तिथले प्राध्यापक किंवा शास्त्रज्ञ असतील, गावातले रहिवासी असतील किंवा आमच्यासारखे पर्यटक असतील. त्यांच्यामध्ये काळे, गोरे, करडे, पिवळे अशा सगळ्या रंगांची सरमिसळ होती. दर चार पाच लोकांमधला एक तरी दक्षिण आशियातला म्हणजे भारतीय उपखंडातला दिसत होता, तसेच एक तरी पूर्व आशियातला म्हणजे चीन, जपान, कोरिया या भागातला होता आणि दहा बारांमधला एखादा कृष्णवर्णीय आफ्रिकन होता. त्यामुळे आपण मुख्यतः गोऱ्या इंग्रजांच्या देशात आलो आहोत असे वाटत नव्हते. तो एक आंतरराष्ट्रीय मेळावा वाटत होता.


विद्यापीठाच्या परिसरात शिरताच तिथले वेगळेपण जाणवते. सगळीकडे रुंद अशा फरसबंद वाटा होत्या आणि त्यांच्या बाजूला हिरवेगार लॉन पसरलेले होते. मध्ये मध्ये सावली देणारे डेरेदार वृक्ष होते.  काही खूपच जुन्या दगडी इमारती होत्या तर काही त्या मानाने नव्या विटांच्या किंवा सिमेंट कॉंक्रीटच्या इमारती होत्या.  त्या पदपथांवरून आणि गवतावरूनसुद्धा मुलामुलींचे घोळके गप्पा मारत किंवा एकटीदुकटी मुले सावकाशपणे तिकडे तिकडे चालत होती, कुणी हातात एक पुस्तक किंवा सेलफोन धरून ते पहात लॉनवर ऐसपैस बसली होती.


तिथली बहुधा सर्वात जुनी इमारत दोन अडीचशे वर्षांपूर्वी बांधलेली असेल. त्या दगडी इमारतीच्या भिंतीवर अनेक सुबक पुतळ्यांमधून काही दृष्ये दाखवली होती. ती कदाचित बायबल किंवा तत्सम धार्मिक पोथ्यांमधल्या घटनांची असावीत. तिथे मोठमोठ्या अक्षरांमध्ये कोरलेला मजकूर कुठल्या भाषेत लिहिला आहे हेच आम्हाला समजत नव्हते, त्यामुळे त्याचा काहीच बोध झाला नाही.

    


तिथली मुख्य वाटणारी चार मजली दगडी बिल्डिंग जुन्या काळातल्या इमारतींचा नमूना आहे. तिच्या प्रवेशद्वारापाशी एक सिंहांची जोडी रखवाली करतांना दाखवली आहे. मधोमध उंच मनोरा आहे. या इमारतीच्या तळाशी लावलेल्या वेली भिंतींवरून वाढत वाढत चौथ्या मजल्यापर्यंत पोचल्या आहेत आणि त्यांनी संपूर्ण भिंतीला हिरव्या गार पानांनी झाकून टाकले आहे. असे दृष्य क्वचितच पहायला मिळते.  दुसऱ्या एका बिल्डिंगवरही मोठा चौकोनी मनोरा आहे. 

प्रिन्स्टन विद्यापीठाच्या आवारात प्रसिद्ध शिल्पकार हेन्री मूर याचे  Oval with points नावाचे एक खूप मोठे अमूर्त (अॅब्स्ट्रॅक्ट) शिल्पही उभे करून ठेवले आहे. शिल्पकाराला त्या शिल्पामधून नेमके काय सुचवायचे आहे हे सुध्दा समजत नाहीच. ते पहायला येणारे लोक त्याच्या बाजूला उभे राहून किंवा आत बसून संस्मरणीय फोटो काढून घेत होते.


त्या भागातून फिरत असतांना रस्त्यातच एका अभ्यासू मुलाचे छान शिल्पही दिसले. हा पुतळा या विद्यानगरीला साजेसाच होता.


Tuesday, June 18, 2024

देवांचे अवतार आणि चमत्कृति

 यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ 

परित्राणाय साधूनां विनाशायच च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ 

असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे. "जेव्हां जेव्हां धर्माला ग्लानि येऊन अधर्म बोकाळतो तेव्हां तेव्हां तो अधर्म आचरणाऱ्या दुष्टांचा नाश करून आणि धर्म आचरणाऱ्या सज्जनांचे रक्षण करून अधर्माचा नाश व धर्माचे पुनःप्रस्थापन करण्यासाठी मी (परमेश्वर) युगानुयुगे वारंवार अवतार धारण करतो" असा त्याचा अर्थ आहे. पण चराचरात भरून राहिलेला विश्वंभर असा परमेश्वर तर अनादि अनंत आहे, तो सदासर्वकाळ सगळीकडे भरलेला असतोच, मग त्याने वेगळे अवतार घेण्याला काय अर्थ आहे? असा प्रश्नही पडतो. सर्वसामान्य बुद्धीमत्ता आणि आकलनशक्ती असलेल्या लोकांना निर्गुण निराकार परब्रह्म समजणे फार कठीण किंवा जवळ जवळ अशक्य असते. गरज पडते तेंव्हा हा देव अवतार घेऊन प्रगट होतो आणि ठराविक काम करून पुन्हा अदृष्य होतो असे समजणे त्या मानाने सोपे असते. गीता सांगितली किंवा लिहिली गेली त्या काळात आतासारखे हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम अशा नावांचे निरनिराळे धर्म नव्हतेच, त्यामुळे धर्म या संस्कृत शब्दाचा मूळ अर्थ नीतीमत्ता किंवा सर्वांनी योग्य प्रकाराने वागणे असा घेता येईल. सगळ्या समाजाची नीतीमत्ता रसातळाला जाते आणि समाज अधोगतीला लागतो तेंव्हा कुठल्या ना कुठल्या रूपाने देव अवतरतो आणि समाजाला पुन्हा रुळावर आणतो असा विश्वास माणसाला नकारात्मक विचारातून तग धरून राहण्याचा धीर देतो.

पुराणांमध्ये सांगितलेल्या निरनिराळ्या देवांच्या अवतारांच्या अनेक सुरस कथा पुराणिकबुवा आणि कीर्तनकारांनी रंगवून जनतेपर्यंत पोचवल्या आहेत. बहुतेक कथांची सर्वसाधारण गोष्ट अशी असते की एखादा दुष्टबुद्धि असुर खूप कठोर तपश्चर्या करतो, त्यावर प्रसन्न होऊन एक देव त्याला एक अद्भुत असा वर देतो, त्या वरामुळे त्या दानवाचे सामर्थ्य अचाट वाढल्याने तो सगळे जग जिंकून आपली मनमानी सुरू करतो. देवांनासुद्धा एकदा दिलेला वर परत घेता येत नाही, त्यामुळे सगळे देव, ऋषीमुनी वगैरे कोणा मोठ्या देवाकडे जातात आणि तो महान देव किंवा ती देवी प्रगट होऊन त्या राक्षसाचा संहार करते. यात कुठे शंकर (महादेव) हा सर्व देवांचा देव असतो, कुठे गणेश तर कुठे भगवान विष्णू . काहीवेळा  सगळ्या देवांची शक्ती असलेली आदिशक्ती दुर्गा, काली, चामुंडा अशा रूपामध्ये प्रगट होऊन त्या राक्षसाचा नायनाट करते. असुराला मिळालेले वरदान आणि त्याचा विनाश करण्याची पद्धत अशा तपशीलामध्ये थोडा थोडा फरक असतो, पण मुख्य कथानक लहानसे आणि सोपे असते. सत्याचा असत्यावर किंवा चांगल्याचा वाइटावर विजय होणारच अशा अर्थाचे असते.  अशा  बहुतेक अवतारांमधले देव युद्ध करण्यापुरते प्रगट होतात आणि काम झाल्यावर लगेच अदृष्य होतात. त्यांच्या बाबतीत जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य, देहावसान अशा अवस्था येत नसतात. 

  पण श्रीराम आणि श्रीकृष्ण या महाविष्णूच्या दोन अवतारांची विस्तृत चरित्रे मोठ्या महाकाव्यांमधून रंगवली आहेत. यातली कथानके या अवतारांच्या जन्माच्याही आधीपासून सुरू होतात आणि त्यांचे बालपण, तारुण्य, प्रौढावस्थांमधले अनेक प्रसंग त्यात तपशीलवार दाखवले आहेत. अर्थातच त्यासाठी इतर अनेक पात्रे त्यांच्या विशिष्ट व्यक्तीरेखांसह या कथानकांमध्ये येतात आणि त्या महाकाव्यांची रंगत वाढवतात. त्या कथानकांना सखोल बनवतात.


भागवतपुराणात भगवंतांच्या चोवीस अवतारांबद्दल लिहिले आहे असे म्हणतात, पण बहुतेक लोकांना फक्त दशावतार या नावाने प्रसिद्ध असलेले दहा अवतार माहीत असतात. उरलेले १४ अवतार बहुधा पुराण सांगणाऱ्या पुराणिकांना आणि कदाचित ते पुराण भक्तिभावाने ऐकणाऱ्या श्रोत्यांनाच माहीत असावेत. पहिल्या मत्स्य अवतारात प्रलय होऊन सगळी जमीन पाण्याखाली जाते तेंव्हा मोठ्या माशाच्या रूपाने आलेले विष्णू भगवान एक मोठी होडी घेऊन जमीनीवरील सकल प्राणिमात्रांना वाचवतात, तर दुसऱ्या कूर्मावतारात ते मंदार पर्वताला आपल्या पाठीवर आधार देऊन देवदानवांचे  समुद्रमंथन शक्य करून देतात. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपु नावाचे दोन दैत्य जगाला फार त्रास देत असतात म्हणून वराह आणि नरसिंह असे दोन अवतार घेऊन त्या राक्षसांचा वध करतात. बळीराजा दानव असला तरी धार्मिक वृत्तीचा आणि देवभक्त असतो, वामन अवतारात गोड बोलून त्याच्याकडून पृथ्वी आणि स्वर्गाचे दान मागून घेतात, पण त्याला चिरंजीवत्व आणि पाताळाचे साम्राज्य देतात.  पित्याच्या आश्रमातली दैवी गुण असलेली कामधेनु गाय सहस्त्रार्जुन हा मुजोर राजा बळजबरीने घेऊन जातो आणि त्याचा मुलगा पित्याला मारतो म्हणून सूडाने पेटलेले परशुराम त्या सर्वांना मारून टाकतात. अशा पहिल्या सहा अवतारांच्या संक्षिप्त कथा आहेत. गौतम बुद्धाला खरोखरच विष्णूचा नववा अवतार मानतात याबद्दल शंका आहे आणि दहावा कल्की अवतार अजून झालेलाच नाही. यातले मत्स्य, कूर्म, वामन आणि बुद्ध हे अवतार हातात शस्त्र धारण करतही नाहीत. बाकीचे अवतार दुष्टांचा नाश करतात.

विष्णूच्या या दहा अवतारांमधल्या नृसिंह आणि परशुरामाची मंदिरे काही थोड्याच ठिकाणी दिसतात, क्वचित कुठे वराहस्वामींची देवळे आहेत, पण मत्स्य, कूर्म, वामन या अवतारांची उपासना केलेली माझ्या पहाण्यात आली नाही. अनेक देवळांमध्ये प्रवेश करताच सुरुवातीलाच जमीनीवर एक दगडाचे कासव ठेवलेले असते, पण कूर्मावतार म्हणून कुणीही त्याला देवत्व दिलेले किंवा त्याची पूजा, अर्चना, प्रार्थना वगैरे करतांना दिसत नाही. बौद्ध धर्माचा प्रसार झाल्यावर जगभर अनेक ठिकाणी बुद्धाचे विहार किंवा देवळे बांधण्यात आली आणि तिथे गौतम बुद्धाच्या सुंदर किंवा भव्य मूर्तीही ठेवण्यात आल्या. पण मुळातच गौतम बुद्धाची शिकवण निरीश्वरवादावर भर देणारी आहे आणि हिंदू धर्मीय या मूर्तींकडे भक्तिभावाने पहात नाहीत.


 श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन अवतारांचे मात्र असंख्य भक्त आहेत.  उत्तरेतले संत तुलसीदास आणि महाराष्ट्रातले समर्थ रामदास यांनी श्रीरामाच्या भक्तीचा प्रसार केला, तर सूरदास, मीराबाई, चैतन्य महाप्रभू, नरसी मेहता आदींनी श्रीकृष्णाच्या भक्तीचा. त्यांनी सुरू केलेली भक्तीपरंपरा कित्येक शतके टिकून राहिली आहे आणि देशभऱ पसरली आहे. अलीकडच्या काळात ती वाढत असलेली दिसत आहे. मोठ्या गाजावाजाने अयोध्येत भव्य राममंदिर बांधले जात आहे आणि तिथल्या रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठानाचा सोहळाही देशभर भव्य प्रमाणावर साजरा केला गेला. इस्कॉन नावाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगभरात अनेक ठिकाणी श्रीकृष्णाची वैशिष्ट्यपूर्ण देवळे बांधली आहेत आणि ती पहायलाच पर्यटकांची गर्दी होत असते. 

विठ्ठल आणि व्यंकटेश या दशावतारांमध्ये नसलेल्या विष्णूच्या दोन रूपांचे कोट्यावधी भक्त आहेत. त्यांची सविस्तर चरित्रे नाहीत, पण त्यांच्या महात्म्याच्या अनेक कथा किंवा गाथा आहेत. यातला पंढरपूरचा विठोबा दोन्ही हात कंबरेवर ठेऊन स्वस्थ उभा आहे, त्याच्याकडे कुठलेही शस्त्र नाही. तो कुठल्या भक्तासाठी दळण दळतो, कुणाची गुरे राखतो, कुणासाठी चंदन उगाळतो अशी आपल्या भक्तांची चाकरी करतो, तसेच त्यांच्यावर संकट आले तर त्यांना त्यामधून सुखरूपपणे वाचवतो अशा अनेक कथा आहेत आणि भाविकांची त्यावर गाढ श्रद्धा आहे, पण त्या कथांमध्येसुद्धा विठोबाने कुठल्याही प्रकारची हिंसा केलेली दिसत नाही. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम यासारख्या अनेक संतमंडळींनी रचलेल्या अभंगांमधून विठ्ठलाविषयी अपार भक्ती प्रस्तुत केली आणि कित्येक शतके उलटून गेली तरी आजही हे अभंग भक्तिभावाने गायिले जातात. त्या संतांनी सुरू केलेली वारकरी परंपरा कित्येक शतके टिकून राहिली आहे. आजसुद्धा आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरला भरणाऱ्या यात्रेला लक्षावधी भाविक नेमाने नाचत गात जातात. महाराष्ट्रामध्ये रामकृष्णांपेक्षासुद्धा विठ्ठलाची जास्त देवळे आहेत आणि जास्त भक्त आहेत. विठ्ठल हा विष्णूचा नववा अवतार आहे असेही काही लोक मानतात.


आंध्रप्रदेशातील तिरुपति तिरुमल देवस्थानात श्रीव्यंकटेशाचे सुंदर मंदिर आहे. या देवाला उत्तर भारतात बालाजी असे म्हणतात. या तीर्थक्षेत्रात दर्शनाला येणाऱ्या भक्तांची नेहमीच प्रचंड गर्दी असते आणि हे भक्त तिथल्या हुंड्यांमध्ये इतकी दक्षिणा टाकतात की हे मंदिर भारतातले सर्वाधिक श्रीमंत देवस्थान समजले जाते. तिरुपती येथील चतुर्भुज व्यंकटेशाच्या दोन हातांमध्ये चक्र आणि गदा आहेत, पण या अवतारातही त्याने कुणा राक्षसाचे शिर छाटले किंवा दुष्टाचा चेंदामेंदा केला अशा प्रकारची कथा मी ऐकली नाही. व्यंकटेशस्तोत्र हे मराठीतले एक सुंदर स्तोत्र आहे. जुन्या काळात अनेक लोक हे स्तोत्र रोज म्हणत असत. "अन्नासाठी दाही दिशा", "उडदामाजी काळेगोरे" आणि "समर्थागृहीचे श्वान" अशासारख्या या स्तोत्रातल्या ओळी मराठी भाषेत वाक्प्रचार म्हणून वापरल्या जातात. तिरुपतीशिवाय इतर अनेक ठिकाणी श्रीव्यंकटेशाची मंदिरे आहेत. पुण्याजवळ केतकावली इथे बांधलेल्या मंदिराला प्रतितिरुपती असेही म्हंटले जाते. आमच्या जमखंडी गावाजवळ कल्हळ्ली नावाच्या जागी व्यंकोबाचे प्राचीन मंदिर आहे. त्या भागातल्या भक्तांना भेटण्यासाठी तिरुपतीच्या व्यंकटेशाने अवतार घेतला अशी मान्यता आहे.

ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिकुटाने एकत्र येऊन ते दत्तात्रेय या नावाने अवतीर्ण झाले. त्याच्या जन्माची सुरस कथा आहे, पण त्याच्या पुढील अवतारकार्याबद्दल मला तरी काहीच माहिती नाही. पुढे मध्ययुगाच्या काळात दत्तात्रेयांनी श्रीपादसरस्वति आणि नरसिंहसरस्वती या नावाने अवतार घेतले आणि अनेक भक्तांचा उद्धार केला याच्या कथा गुरुचरित्रात विस्ताराने सांगितल्या आहेत. स्वामी समर्थांनाही त्यांचा अलीकडच्या काळातला अवतार मानले जाते.  या निरनिराळ्या अवतारांच्या सहवासामुळे पावन झालेली पीठापूर, नरसोबाची वाडी,  गाणगापूर आणि अक्कलकोट ही देवस्थानेही प्रसिद्ध आहेत आणि अनेक भक्तजन तिथे दर्शनासाठी जातात.  अनेक लोक दर गुरुवारी घरीच किंवा देवळात जाऊन दत्ताचे भजन करतात. दत्तभक्तीची परंपरा मुख्यतः महाराष्ट्रात असली तरी ती कर्नाटक आणि आंध्रमध्येही काही प्रमाणात आहे. श्रीदत्तात्रेयाचे एक प्रसिद्ध मंदिर गुजराथमधील गिरनार पर्वतावर आहे, तर गाणगापूर कर्नाटकात आणि पीठापूर आंध्रप्रदेशात आहे

 

देवांच्या अद्भुत कृती : पर्वत उचलणे

आपल्या पृथ्वीवरील जमीन सपाट नाही, ती डोंगर, दऱ्या, खोरी आदिंनी भरलेली आहे. टेकड्या, डोंगर, पर्वत हे सगळे भूपृष्ठावरील उंचवटे असतात, तिथले खडक इतर ठिकाणच्या जमीनीपेक्षा उंच वर डोकावत असतात. तरी तेही जमीनीच्या खाली असलेल्या खडकांशी जोडलेलेच असतात. इतकेच काय तर समुद्राच्या खालीसुद्धा खडकच असतात. पृथ्वी तयार होत असतांना तिचे एक खडकांचे बाह्य कवच तयार झाले. त्यातल्या खोलगट भागात पाणी साठत गेले आणि महासागर तयार झाले, त्यांनी पृथ्वीचा सुमारे दोन तृतियांश पृष्ठभाग व्यापला वगैरे गोष्टी आपण भूगोलात शिकलो.  


पण पुराणातल्या काही गोष्टींमध्ये असे लिहिले आहे की कुणा देवाने एक पर्वत उचलून दुसरीकडे नेला किंवा जिथल्या तिथेच परत ठेवला.  त्यामुळे पटावर सोंगटी ठेवावी किंवा पानात भाताची मूद ठेवावी तसे हे डोंगर सुटे असतात असे मला लहानपणी वाटायचे. पुराणकाळात देव आणि दानव किंवा सुर आणि असुर जन्माला आले तेंव्हापासून त्यांचे एकमेकांशी वैर असायचे आणि ते सदैव युद्ध करत असायचे. पण कसे कुणास ठाऊक त्यांनी सर्वांनी मिळून सागराचे मंथन करायचे आणि त्याने दडवून ठेवलेली रत्ने बाहेर काढून वाटून घ्यायची असे ठरवले. त्यांनी मंदार पर्वताला उचलून आणले आणि समुद्रात ठेवले. पण तो बुडू नये म्हणून महाविष्णूंनी कूर्मावतार घेतला आणि त्या पर्वताला आपल्या पाठीवर तोलून धरले अशी कथा आहे. 

पुराणातल्या कथांमध्ये कैलासपर्वताचा उल्लेख अनेक वेळा येतो. ब्रह्माविष्णूमहेश या तीन मुख्य देवांमधल्या महेश किंवा शंकराचे कैलास हे वसतिस्थान आहे. ब्रह्म्याचा ब्रह्मलोक आणि विष्णूचा वैकुंठलोक यांचे पृथ्वीवर कुठे अस्तित्व नाही, पण कैलास नावाचा एक पर्वत हिमालयाच्या पलीकडल्या भागात म्हणजे तिबेटमध्ये आहे आणि चीनच्या ताब्यात आहे. पण काही भाविक किंवा उत्साही लोक चीनकडून परवानगी घेऊन कैलास मानससरोवराची यात्रा करतात. ती खूप कठीण असते असे तिथे जाऊन आलेले लोक सांगतात. आतापर्यंत एव्हरेस्ट या सर्वात उंच शिखरावर हजारो लोक चढून गेले असले तरी कैलासाच्या शिखरावर कोणीच चढून गेलेला नाही असे सांगतात. यात्रेकरू कैलासाच्या फक्त पायथ्यापर्यंत जाऊन परत येतात.


पण पुराणात अशी एक कथा आहे की दहा तोंडे आणि वीस हात असलेल्या रावणाने शंकरपार्वती यांच्यासह कैलास पर्वतालाच उचलून डोक्यावर धरले होते .हा प्रसंग दाखवणारे एक शिल्प वेरूळ इथे आहे. 


रामायणात एक असा प्रसंग आहे. रामरावणयुद्धामध्ये रावणाचा मुलगा इंद्रजिताने लक्ष्मणावर एक शक्ती किंवा अस्त्र टाकले ते लक्ष्मणाच्या वर्मी लागले आणि त्याला मूर्छा आली. त्यामधून  त्याचे प्राण वाचवण्यासाठी संजीवनी नावाच्या वनौषधाची आवश्यकता होती. ते वृक्ष द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर होते आणि ते ठिकाण युध्दस्थळापासून खूप दूर होते. तिथे जाऊन ते औषध घेऊन येण्याचे काम फक्त हनुमानच करू शकत होता. तो लगेच उड्डाण करून मनोवेगाने त्या पर्वतावर गेला, पण त्याला वनौषधींची माहिती नसल्यामुळे त्यातली संजीवनी कुठली हे समजेना. यात वेळ घालवण्याऐवजी त्याने सरळ तो अख्खा डोंगर उचलला आणि एका हाताच्या तळव्यावर त्याला अलगद धरून तो लंकेला घेऊन गेला.

श्रीकृष्णाचे बालपण गोकुळामध्ये गेले. गायी  पाळायच्या आणि त्यांचे दूध, दही, लोणी वगैरे मथुरेच्या बाजारात नेऊन विकायचे यावर तिथल्या गोपगोपिकांचा चरितार्थ चालत असे. आकाशातल्या इंद्रदेवाच्या कृपेने तो व्यवस्थितपणे चालतो अशी त्यांची श्रद्धा होती आणि इंद्राला प्रसन्न ठेवण्यासाठी ते लोक दरवर्षी इंद्राची पूजा आणि यज्ञयाग वगैरे करत असत. श्रीकृष्णाने लहानपणीच अनेक लीला दाखवून त्या लोकांच्या मनावर छाप पाडलेली होती. त्याने गोकुळवासियांना सांगितले की आपल्या गावाजवळचा गोवर्धन पर्वत  हा आपल्या समृद्धीचे खरे कारण आहे. आपल्या गायी, गुरे या डोंगरावर जाऊन चरतात आणि धष्टपुष्ट होऊन भरपूर दूध देतात. म्हणून आपण या वर्षी इंद्राची पूजा न करता या गोवर्धन पर्वताची पूजा करावी. गोकुळातल्या लोकांनी त्याचा शब्द मानला.


पण त्यामुळे इंद्राला राग आला आणि त्याने ढगांना आज्ञा दिली की गोकुळावर जाऊन अतिवृष्टी करा. त्यामुळे अचानक तिथे मुसळधार पाऊस पडायला लागला आणि तिथले लोक घाबरून श्रीकृष्णाकडे गेले. श्रीकृष्णाने त्यांना अभयदिले आणि गोवर्धन पर्वताला उचलून आपल्या करंगळीवर तोलून धरले. सगळे गोपगोपी आपापली मुलेबाळे आणि गायीवासरे यांना घेऊन त्या गोवर्धन पर्वताच्या छताखाली सुरक्षितपणे उभे राहिले. अशा प्रकारे इंद्रदेवाचे गर्वहरण झाल्यावर त्याने श्रीकृष्णासमोर येऊन क्षमायाचना  केली.  

-------------------------