Monday, August 25, 2008

तुका आकाशाएवढा


विठ्ठलाच्या भक्तीच्या संप्रदायाचा "ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा" असे म्हंटले जाते. ज्ञानेश्वरांनी सुरू केलेल्या या कार्याचा नामदेव, जनाबाई, चोखा मेळा, गोरा कुंभार, सांवता माळी, सेना न्हावी, एकनाथ प्रभृती अनेक संतांनी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात प्रसार केला. तुकारामांनी आपल्या रसाळ वाणीमध्ये लिहिलेल्या अभंगातून भक्तीमार्ग घराघरात नेऊन पोचवला. त्यांनी रचलेल्या अभंगांची मोठी संख्या, उच्च दर्जा आणि अमाप लोकप्रियता यामुळे 'अभंग' हा शब्द ऐकताच तुकारामांचेच नांव लगेच डोळ्यासमोर येते, इतकी "अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची" झालेली आहे.

संत तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांमध्ये विषयांची भरपूर विविधता आहे. परमेश्वराची, मुख्यतः विठ्ठलाची भक्ती हा मुख्य उद्देश असला तरी त्यातसुद्धा "सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी । कर कटावरी ठेवोनिया ॥", "राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥" आणि "सावळे सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयी माझे॥" यासारख्या कांही अभंगामध्ये त्याचे वर्णन किंवा स्तुती केली आहे. "घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे।", "विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं घ्यावा । विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥" आणि "बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥" सारख्या अभंगात त्याच्या नामस्मरणाचा महिमा वर्णिला आहे. "जाऊ देवाचिया गावा । देव देईल विसावा ॥" अशा अभंगात त्याच्या गांवाला जाऊन त्याचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे तसेच त्यामुळे नक्की मनाला विसावा मिळेल असे सांगितले आहे. "अगा करुणाकरा करितसे धांवा । या मज सोडवा लवकरी॥" यासारख्या कांही अभंगात काकुळतीला येऊन त्याचा धांवा केला आहे. त्याला भेटण्याची मनाला लागलेली आस आणि त्यामुळे होणारी जिवाची तगमग खालील प्रसिद्ध अभंगात व्यक्त केली आहे.

भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसे माझे मन वाट पाहें ॥२॥
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥३॥
भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माऊलीची ॥४॥
तुका म्हणे मज लागलीसे भुक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥५॥

कन्या सासुराशीं जाये । मागे परतोनी पाहे ॥१॥
तैसे झालें माझ्या जीवा। केंव्हा भेटसी केशवा ॥२॥
चुकलिया माये । बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥
जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळे ॥४॥

विठ्ठलाची प्राप्ती झाल्यावर झालेली मनाची उन्मन अवस्था काय वर्णावी?

आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥१॥
काय सांगो झालें कांहीचिया बाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिता मुखा आला ॥४॥

विठोबाखेरीज इतर देवांची आराधनासुद्धा तुकारामांनी केली आहे. "ॐकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥" यात गणेशाची तर "कृष्ण माझी माता, तर कृष्ण माझा पिता । बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा।।" यात कृष्णाची प्रार्थना केली आहे. विष्णूची स्तुती करतांनाच भागवत धर्माचे मर्म खालील अभंगात विषद केले आहे.

विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥१॥
आइकाजी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा ॥२॥
कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ॥३॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥४॥

चांगल्या वागणुकीचा उपदेश करणारे अनेक अभंग आहेत. नरसी महेतांच्या "वैष्णवजन तो तेणे कहिये जो पीर परायी जाणे रे।" परदुःखे उपकार करे ते मन अभिमान न आणे रे।।" या सुप्रसिद्ध भजनामधील उपदेश तुकारामांनी "पुण्य पर‍उपकार पाप ते परपीडा । आणिक नाहीं जोडा दुजा यासी ॥" या अभंगात केला आहे. त्यांच्या खालील अभंगाचा उल्लेख आपल्या नव्या राष्ट्रपतींनी आपल्या शपथविधीमध्ये केला होता.

जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥३॥
ज्यासीं अपंगिता पाही । त्यासई धरी जो हृदयी ॥४॥
दया करणे जे पुत्रासी । तोचि दासा आणि दासी ॥५॥
तुका म्हणे सांगो किती । त्याचि भगवंताच्या मूर्ति ॥६॥

पंढरीला जाण्याची इच्छा, त्यासाठी लागलेली अतीव ओढ व्यक्त करून तेथे गेल्यावर काय पहायला मिळेल याचे सुंदर वर्णन "खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान गेला पावटणी, एकएका लागतील पायी रे ।।" या अभंगात तुकारामांनी केले आहे. पण त्यांना सुद्धा सर्व विश्वात भरून राहिलेल्या विश्वंभररूपाची ओळख पटली होती. एका अभंगात ते म्हणतात,
"जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती । चालविसी हाती धरुनियां ॥ चालों वाटे आम्हीं तुझाचि आधार । चालविसी भार सवें माझा ॥" दुस-या एका अभंगात भक्त आणि देव यांचे अद्वैत त्यांनी इतक्या सुंदर उपमा देऊन दाखवले आहे की त्या कोणालाही सहज समजाव्यात.

देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ॥१॥
जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ॥२॥
जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी ॥३॥
देव देहात देहात, का हो जाता देवळात ॥४॥
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ॥५॥
भक्तीरसपूर्ण रचना करतांनासुद्धा त्यातील विविध अलंकारांच्या प्रयोगातून आपल्याला तुकारामांच्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन घडते. सोप्या सब्दात अगदी रोजच्या जीवनामधील उदाहरणे देत ते आपला मुद्दा किती प्रभावीपणे मांडतात हे आपण वरील कित्येक उदाहरणात पाहिले आहे. त्यांच्या कल्पकतेचा एक आविष्कार खालील अभंगात कसा दिसतो हे पहा. "तुला स्वतःला तुझे महत्व कसे समजणार? ते तर आम्ही भक्तजनच जाणतो." असे ते देवालाच त-हेत-हेची उदाहरणे देऊन विचारतात.

कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥
कैसें तुज ठावें नाही तुझें नाम । आम्हीच तें प्रेमसुख जाणों ॥२॥
माते तृण बाळा दुधाचि ते गोडी । ज्याची न ये जोडी त्यासी कामा ॥३॥
तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाही त्याची भेटी भोगती ये ॥४।।

आजकाल पर्यावरणाला मोठे महत्व प्राप्त झाले असल्यामुळे आपले लक्ष वनस्पतींकडे गेले आहे. निवांतपणा मिळण्यासाठी अनेक लोक शहरापासून दूर निसर्गाच्या कुशीत जातात. तुकारामांनासुद्धा निसर्गरम्य वातावरण भावत होते. पण या एकांताचा सदुपयोग ते मनन, चिंतन आणि ईश्वराची आराधना करण्यासाठी करीत असत. ते म्हणतात,

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षीही सुस्वरें आळविती ॥१॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ॥२॥
आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥३॥
कंथा कमंडलु देह उपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥४॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥५॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणांसी ॥६॥

तुकाराम महाराजांनी जे लोकांना सांगितले तसेच वर्तन स्वतः केले. ते संसाराचा त्याग करून त्यापासून दूर गेले नाहीत. पण आपला प्रपंच करतांना "जोडावे धन उत्तम वेहारे" अशी सचोटी त्यांनी कठोरपणे पाळली. खरे तर त्यांच्या प्रामाणिक वर्तनामुळे त्यांनी फारसे "धन" गोळा केलेच नाही. ते एकदा एका जमीनदाराच्या शेताची राखण करीत असतांना त्या शेतात जनावरे घुसवण्यात आली. तरी देखील विठ्ठलाच्या कृपेने त्यात भरघोस पीक आले. त्यामुळे खजील झालेल्या जमीनमालकाने त्याच्या अपेक्षेहून अधिक आलेले धान्य तुकारामांच्या घरी पाठवून दिले. तुकारामांनी ते सरळ गोरगरीबांना वाटून टाकले. प्रत्यक्ष शिवाजी
महाराजांनी आपल्या सेवकांकरवी त्यांच्या कुटुंबियांसाठी वस्त्राभूषणांचा नजराणा पाठवून दिला. "न बोलावता आपल्या पायाने चालत आलेली ही लक्ष्मी आहे." असा लंगडा युक्तीवाद न घालता "आम्हाला ती विषासमान आहे." असे म्हणून त्यांनी तो नजराणा साभार परत करून दिला. अशा कित्येक घटना त्यांची सात्विकता आणि सत्याचा आग्रह दाखवतात.

त्यांचा मत्सर करणा-या सालोमालोमुळे तुकारामांना अनेक प्रकारचा त्रास भोगावा लागला. पण "निंदकाचे घर असावे शेजारी" असे म्हणत त्यांनी तो स्वखुषीने सहन केला. तुकारामाच्या अभंगाची गाथा नदीच्या पाण्यात बुडवून टाकण्यापर्यंत त्याची मजल गेली. इंद्रायणी नदीने स्वतः तिला तारून तुकारामाला ती परत आणून दिली अशी आख्यायिका आहं. "जनमानसाच्या अंतरंगात भिनलेले भाव कागद नष्ट केल्यामुळे नाहीसे होत नाहीत आणि अक्षर वाङ्मय अजरामर होण्यासाठी नश्वर कागदावर अवलंबून नसते." हा याचा मतितार्थ आहे.

तुकाराम महाराजांना जनसामान्यांकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असला तरी त्यांना त्याचा कधी गर्व झाला नाही किंवा त्याचे आकर्षणही वाटले नाही. त्यांनी अहंकारावर पूर्ण विजय मिळवलेला होता. त्यांना मोठेपणाचा बडेजाव नकोच होता. सगळे लोक आपल्या समृध्दीची मागणी देवाकडे करतांना दिसतात. तुकाराम महाराज त्याच्या उलट लहानपणाचे वरदान देवाकडे मागतात.

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥३॥
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥४॥
तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥५।।

पण लहान होणे याचा "किडामुंगीसारखे राहणे" असा अर्थ त्यांना अभिप्रेत नव्हता. त्याच्या जोडीला इतर अनेक गोष्टींची मागणी त्यांनी देवापुढे ठेविली आहे. "सगळ्या जगाचे भले होवो" असे दान त्यांनी मागितलेले नाही. स्वतःसाठी धनसंपदा तर त्यांना कधीच महत्वाची वाटली नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांना मरणोपरांत स्वर्गप्राप्ती किंवा मोक्षसुद्धा नको होता. या जन्मातच त्यांना ज्या गोष्टींची गोडी लागली होती त्या ईशभक्ती, संतसंग वगैरे देऊन "मला खुषाल पुन्हा जन्माला घालावे." असे वरदान त्यांनी देवाकडे मागितले. खालील अभंगांवरून हे स्पष्ट होते.

हेचि मज व्हावी आंस। जन्मोजन्मी तुझा ध्यास।।
पंढरीचा वारकरी। वारी चुको न दे हरी।।
संतसंग सर्वकाळ। अखंड प्रेमाचा कल्लोळ।।
चंदभागे स्नान। तुका मागे हेचि दान।।

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥२॥
नलगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखें घालावें आम्हांसी ॥४॥

परमेश्वराबरोबरचे अद्वैत त्यांनी साधले होते. त्या क्षणी ते सामान्य मानवी न राहता देवाशी मनोमन एकरूप झाले होते. अणुरेणूपासून ते अथांग अवकाशापर्यंत सगळे विश्व व्यापलेला परमेश्वरच त्यांच्या अंतरंगात नांदत असतांना शरीराच्या, मनाच्या, गुणदोषांच्या किंवा शंकाकुशंकांच्या विचाराच्या पलीकडे जाऊन ते म्हणतात,

अणुरेणिया थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुन सांडिले कलेवर । भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटी ॥३॥
तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता।।४।।
--------------------------------------------------------------
ऋणनिर्देश
गेल्या महिनाभरात विठ्ठल आणि संतमंडळीं यासंबंधात लिहितांना संतांनी रचलेल्या अनेक सुंदर रचना मी उद्धृत केल्या आहेत. त्यातील बहुतेक गीते अनेक वेळा ऐकल्यामुळे त्यातील ब-याच ओळी स्मरणात राहिलेल्या असल्या तरी त्यामधील अचूक शब्दरचना वाचून नीट समजून घेण्यासाठी 'आठवणीतील गाणी' आणि 'मराठीवर्ल्ड' या संकेतस्थळांचा भरपूर आधार मला मिळाला. या दोन्ही स्थळांनी लोकप्रिय तसेच कांहीशा अप्रसिद्ध पण उत्कृष्ट गाण्यांचा खजीना मराठी रसिकांसाठी मुक्तहस्ते उपलब्ध करून दिला आहे, तसेच आपल्याला हवे असलेले गाणे शोधण्याची उत्कृष्ट सोय करून दिलेली आहे. त्याबद्ल ही दोन्ही स्थळे चालवणा-या संयोजिकांचा मी शतशः ऋणी आहे. या संकेतस्थलांचे दुवे असे आहेत.

आठवणीतील गाणी http://www.aathavanitli-gani.com/
मराठीवर्ल्ड http://www.marathiworld.com/gani/gani.php

1 comment:

Anonymous said...

Pranam tya thora Santanna