कोठलाही नवीन विचार, नवीन उत्पादन किंवा समाजातील बदल रूढ होण्यासाठी बराच काळ लागतो व त्या दरम्यान तो चार भिन्न अवस्थांमधून जातो असे म्हणतात. पहिल्यांदा उत्साह, त्यानंतर कुचेष्टा, मग विरोध आणि अखेरीस स्वीकृती असा हा प्रवास असतो. नाविन्याची आवड बहुतेक लोकांना असते त्यामुळे कुठल्याही नव्या कल्पनेचे कांही लोकांकडून उत्साहाने स्वागत होते. पण जर कांही ती फक्त नाविन्याच्याच आधाराने उभी असेल तर नव्याची नवलाई संपल्यावर आपोआप कोलमडून पडते. आधी उत्साहाच्या भरात अवास्तव अपेक्षा केल्या जातात व त्या पु-या न झाल्याने निराशा पदरी येते. त्यात उत्साहाचा फुगा फुटतो. हे याचे मुख्य कारण आहे. दुस-या अवस्थेत कांही वेळा केवळ अज्ञान व गैरसमजामुळे टिंगल होते. योग्य ती माहिती मिळाल्यानंतर ती थांबते. कल्पनेमधील दोष वा वैगुणे या अवस्थेत प्रकर्षाने समोर येतात. ती दूर करता आली तर आपोआपच कुचेष्टेमधील हवा निघून जाते. पण ते शक्य नसेल तर नंतर विरोधालाही धार येते आणि त्यामुळे ती कल्पना बारगळते. तिस-या अवस्थेमध्ये होणारा विरोध वेगवेगळ्या कारणांमुळे होतो. कोणाचे नुकसान होणार असल्याची भीती त्यामागे असेल तर त्यावर उपाय काढावा लागतो. कोणाच्या वैयक्तिक स्वार्थापोटी होत असेल तर कांही तडजोड करता येते. निव्वळ हट्ट, मत्सर, असूया, द्वेषबुद्धीने विरोध होत असेल तर त्याला उघडे पाडून एकाकी करावे लागते. पण तो सहसा पूर्णपणे संपत नाही. नवी कल्पना जर मुळात चांगली असेल तर या अवस्थेपर्यंत त्याला पुरेसे समर्थक मिळतात. त्यांच्या बळावर विरोधावर मात करावी लागते. तसे झाले नाही तर ती निदान कांही काळासाठी तरी ती बाजूला पडते. या तीन अवस्थेतून जातांना बहुतेक सारी कच्ची मडकी फुटून जातात व तावून सुलाखून निघालेसे रांजण अखेरीस सुवर्णमुद्रांनी भरले जातात.
जागतिक यांत्रिकीकरणाचा प्रत्येक पैलू या सर्व अवस्थांमधून गेलेला आहे. वाफेच्या इंजिनाची सुरस कथा आपण पुस्तकांतून वाचतो तर पर्सनल कॉम्प्यूटरची वाटचाल डोळ्यांनी पाहिली आहे. शेतीचे यांत्रिकीकरण सुद्धा मंदगतीने याच मार्गाने जात असलेले दिसते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात विकासाची सारी सूत्रे सरकारच्या हातात होती. कृषीक्षेत्राकडे त्याचे विशेष लक्ष होते. पण 'कसेल त्याची जमीन' या न्यायाने जमीनीची मालकी तिच्यावर काबाडकष्ट करणा-या शेतक-याकडे देणे आणि धरणे व कालवे यांमधून जिकडे तिकडे पाणीपुरवठा करणे या बाबींना आधी अग्रक्रम देण्यात आला. जमीन स्वतःच्या मालकीची झाल्यावर आणि मुबलक पाणी मिळू लागल्यावर शेतकरी आपण होऊन उत्पादन वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल अशी अपेक्षा होती. जमीनीची मालकी आणि पाणीपुरवठा यातील उद्दिष्टे कांही प्रमाणात साध्य केली गेली परंतु त्यामुळे कृषीक्षेत्रामधील उत्पादन मात्र वाढावे तितके वाढले नाही. या सुधारणा होऊनही आपल्या कृषीप्रधान देशाला बरीच वर्षे अन्नधान्य आयात करावेच लागत होते. या क्षेत्रात क्रांतीकारक बदल करणे अत्यावश्यक झाल्यानंतर कृषीक्षेत्राच्या आधुनिकीकरणाला गती मिळाली. सुधारित खते, बियाणे, जंतुनाशके आली, तसेच त्यासाठी लागणा-या यंत्रांची निर्मिती करण्याची परवानगी खाजगी क्षेत्रातल्या कारखानदारांना मिळाली.
परदेशी उत्पादकांच्या सहाय्याने ट्रॅक्टर व इतर यंत्रे तयार करणारे अनेक कारखाने उभे राहिले. पण त्यात तयार झालेले ट्रॅक्टर खेडोपाडी नेऊन शेतीकामासाठी त्यांचा वापर करण्यात सुरुवातीला अनेक अडचणी होत्या. ते चालवण्यासाठी लागणारे इंधन, त्यांची दुरुस्ती करणारे मेकॅनिक, त्यांचे सुटे भाग या सगळ्या गोष्टी खेड्यात उपलब्ध नव्हत्या. त्यांचा वापर कसा करायचा याचे ज्ञान व अनुभव नव्हता. त्यामधून होणारे फायदे स्पष्ट होत नव्हते. लहान आकाराच्या शेतातली कामे पटकन आटोपल्यावर तो विनाउपयोगाचा पडून रहाणार. त्यामुळे हा पांढरा हत्ती बाळगायला फारसे कोणी तयार होत नव्हते. त्या वेळी तात्विक विरोधाचेही अनेक सूर निघाले. विशाल लोकसंख्या आणि बेरोजगारांची प्रचंड संख्या असलेल्या भारतासारख्या देशाला माणसांची कामे करायला यंत्रांची काय गरज आहे? अत्यंत स्वस्त दरात मजूर मिळत असतांना ही महागडी यंत्रे परवडण्यासारखी नाहीत, ज्यांची कामे या यंत्रांद्वारे केली जातील त्या लोकांवर अन्याय होईल, ते लोक हा अन्याय सहन करणार नाहीत, यातून समाजात संघर्ष निर्माण होतील वगैरे बरेचसे मुद्दे माडले गेले. यामुळे या देशात शेतीचे यांत्रिकीकरण होण्याची आवश्यकताही नाही तसेच त्याची शक्यताही नाही असे मत त्या काळातील जुनी मंडळी प्रदर्शित करीत होती.
पण समाजजीवन स्थिर रहात नाही. त्यात बदल होतच असतात. पूर्वी खेड्यात उपलब्ध नसलेल्या सोयी हळूहळू होऊ लागल्या. पूर्वी खेड्यातील अशिक्षित मुले लहानपणापासून उन्हातान्हात उघडीवाघडी हिंडत असत. त्याची संवय त्यांना होत असे. आता त्यातली बरीचशी शाळेत जाऊ लागली. शिक्षण घेतल्यानंतर त्यांना ऑफीसच्या, दुकानाच्या किंवा कारखान्याच्या छपराखाली काम करणे बरे वाटू लागले. तशा संधी उपलब्ध होत गेल्या. तेवढ्या प्रमाणात शेतमजूरांची उपलब्धता कमी झाली. लोकसंख्या वाढली असली तरी लोकांची उन्हात कष्ट करण्याची मनाची तयारी कमी झाली. सिंचनाची सोय झाल्यानंतर वर्षातून अनेक पिके घेणे सुरू झाले. अर्थातच त्यामुळे कामसुद्धा दुपटीतिपटीने वाढले. त्यात एक पीक झाल्यानंतर लगेच दुसरे पीक लावायचे असते. त्यासाठी थोड्याच दिवसात खूप काम करायचे असते. ते करायला एकदम पुरेशी माणसे मिळत नाहीत. यंत्रांचा उपयोग करूनच ते शक्य होते. एकट्या शेतमालकाला चार आठ दिवसांच्या उपयोगासाठी महागडे यंत्र विकत घेऊन ठेवणे कदाचित परवडणार नाही. पण अनेकजण मिळून सहकारी तत्वावर ते घेऊन आपापल्या गरजेनुसार वापरू शकतात. त्यासाठी भूविकास बॅंकेमधून सुलभपणे कर्ज मिळू लागले. अशी यंत्रे आणून ठेऊन गरजू लोकांना ती भाड्याने देण्याचाच व्यवसाय सुरू झाला. मुख्य म्हणजे शारीरिक कष्ट कमी करणे प्रत्येकाला आवडतेच. घरोघरी पाटा वरवंटा जाऊन मिक्सर आला, कपडे धुवायची यंत्रे आली ही त्याचीच उदाहरणे आहेत. शेतक-यासासुद्धा दहा दिवस नांगराचा फाळ घेऊन बैलामागे उन्हात धांवण्याऐवजी यंत्राने ते काम एका दिवसात करून घेणे शक्य असेल तर तसे करायला कां आवडणार नाही? यामुळे वरील परिच्छेदात दिलेली बरीच कारणे आता शिल्लक राहिलेली नाहीत आणि तांत्रिक अडचणी न येता जितके यांत्रिकीकरण होऊ शकेल तेवढे ते आता होऊ लागले आहे.
हे सर्व निरीक्षण जरी मी एका विवक्षित ग्रामीण भागात केले असले तरी भारताच्या इतर भागात फिरतांना सगळीकडेच आता शेतकामाची यंत्रे दिसू लागली आहेत. युरोपमध्ये भ्रमण करतांना मला शेतात उभे राहून काम करणारा शेतकरी क्वचितच दिसला, बैल किंवा घोडे तर नाहीच. अधून मधून ट्रॅक्टर किंवा हार्वेस्टर चालतांना दिसत होते. त्यांचा फेरा होऊन गेल्यानंतर इस्त्री केल्याप्रमाणे सपाट झालेली एकसारखी हिरवी गार शेते जिकडे तिकडे क्षितिजापर्यंत पसरलेली दिसली. तिकडे आता शंभर टक्के यांत्रिकीकरण झाले आहे. आपल्याकडे ते आता कोठे सुरू झाले आहे. पण त्याला वेग येत असल्याचे दिसत आहे. देशाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे की नाही ते काळच ठरवेल.
No comments:
Post a Comment