Thursday, August 14, 2008

वाटेवर .. फुलांफुलात चाललो


'रस्ता', 'वाट', 'मार्ग' आणि 'पथ' हे एकाच अर्थाचे शब्द असले तरी ते वेगवेगळ्या प्रकाराने उपयोगात आणले जातात. "मी तुझी वाट पाहिली.", " मला तुझा मार्ग दिसला." आणि "मी तुझा रस्ता पाहिला." या वाक्यांचे अर्थ वेगवेगळे होतात. "मी तुझा पथ पाहिला." असे कोणी म्हणतच नाही, कारण 'पथ' हा शब्द बोलीभाषेत येत नाही. हे सगळेच शब्द त्यांच्या वाच्यार्थापेक्षा अलंकारिक अर्थानेच अधिक वेळा आपण वापरतो.
'रस्ता' या शब्दाने त्याच्या प्रत्यक्षातल्या अस्तित्वाचे वर्णन करतात. रस्त्याची लांबी रुंदी किलोमीटर आणि मीटरमध्ये सांगितली जाते. कांही लोक अजून मैल आणि फुटात ती सांगतात. 'रस्ता' कच्चा आहे का पक्का, डांबरी आहे की काँक्रीटचा, सुस्थितीत आहे की पावसाळ्यात तो खड्ड्याने भरला आहे, त्याला चढउतार आहेत की तो सपाट आहे, वगैरे सगळे तपशील 'रस्त्या'चे असतात. मोठ्या 'रस्त्यां'ना फुटपाथ असतात, 'रस्त्यां'च्या कडेला घरे, दुकाने आणि देवळे असतात, कधीकधी तिथे पोचण्यासाठी 'रस्ता क्रॉस करून' पलीकडे जावे लागते. या गोष्टी सांगतांना आपण 'वाट' किंवा 'मार्ग' या शब्दांचा उपयोग सहसा करत नाही.
'वाट' या शब्दाला थोडी ग्रामीण पार्श्वभूमी आहे. तिथले बहुसंख्य लोक शेतावर जातात किंवा राहतात. रानात इकडे तिकडे जाण्यासाठी 'पायवाटा' असतात. रोजच्या जाण्यायेण्यातून 'वहिवाट' पडते. समोरून संकट येतांना दिसले तर 'पळवाटे'ने निसटून जाता येते आणि ते दत्त म्हणून पुढ्यात उभे ठाकलेच तर 'वाट फुटेल' तिकडे पळायचे! आता शहरात राहणा-यांच्या समोर या सगळ्या 'वाटा' प्रत्यक्षात नसतात, पण त्या शब्दांचा उपयोग अलंकारिक अर्थाने होतो. उदाहरणार्थ नियमांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी त्यातून 'पळवाटा' काढल्या जातात.
'वाट' या शब्दात त्यावरून जाणारे 'वाटसरू' असणार हे गृहीत धरलेले असावे. 'रस्ता' ओस पडू शकतो पण वाट नाही. घरासमोरच्या 'रस्त्या'त पाहण्यासारखे कांही नसते आणि आपण ते पाहण्याचा प्रयत्नही कधी करत नाही. आपले लक्ष त्या वाटेने येणा-या जाणा-यांवर असते. एकाद्या व्यक्तीने येणे आपल्याला अपेक्षित असते, तिच्या येण्यावर आपली पुढली कृती अवलंबून असते किंवा तिने यावे अशी आपली इच्छा असते तेंव्हा ती येईपर्यंत आपण तिची 'वाट पाहतो'. अनेक वेळा ती व्यक्ती येणार नसतेच, फक्त तिचा संदेश येणार असतो. तेंव्हा आपण त्या निरोप्याची 'वाट पाहतो'. अशा वेळी कोणता पोस्टमन तो घेऊन येईल याच्याशी आपल्याला कांही कर्तव्य नसते. आपण त्या पत्राची 'वाट पहात' असतो. आजकाल कोणीही ते प्रत्यक्षात आपल्या हांतात आणून देण्याची गरज उरलेली नाही. तरीही आपण टेलीफोन कॉल, टेक्स्ट मेसेज, ईमेल किंवा स्क्रॅपची 'वाट'च पाहतो. रुळावरून गडगडत येणारी आगगाडी आणि आभाळातून उतरणारे विमान यांचीसुध्दा 'वाट' पाहिली जाते. अनेक वेळा प्रत्यक्षात कोणीही येणारच नसते. एकादा प्रसंग घडणार असतो. तो खास आपल्यासाठीच असतो असेही नाही, तरी आपण त्याची 'वाट' पाहतो. परीक्षेचा निकाल, बढतीची बातमी, दिवाळीचा सण, नववर्ष ही याची उदाहरणे सांगता येतील. थोडक्यात म्हणजे कोणत्याही त-हेची 'प्रतीक्षा करणे' या अर्थाने 'वाट पाहणे' या वाक्प्रचाराचा उपयोग आपण करतो. या जागी 'रस्ता' किंवा 'मार्ग' हे शब्द चालत नाहीत.
'प्रतीक्षा' ही उत्कट भावना साहित्यकृतींमध्ये अनेकवेळा सुंदर शब्दांत रंगवली जाते. एका विरहिणीच्या मनातली व्यथा गीतकार योगेश आपल्या एका लोकप्रिय गीतात अशी व्यक्त करतात,
वाट पाहुनी जीव शिणला, दिसा मागूनी दिसं टळला ।
सुर्व्या आला, तळपून गेला, मावळतीचा खळीगाल आला ।।
या कवितेतली ग्रामीण भागातली विरहिणी दिवसभर कामाच्या रगाड्यात दमून रात्री तरी निवांत झोपत असेल, पण कवी आ. रा. देशपांडे ’अनिल’ यांनी ज्या विरहिणीचे मनोगत सांगितले आहे, तिची अवस्था जास्तच गंभीर आहे. रात्रीसुध्दा तिच्या टोळ्याला डोळा लागत नसल्याने तिचे डोळे शिणून गेले आहेत.
थकले रे डोळे माझे, वाट तुझी पाहता । वाट तुझी पाहता रे, रात्रंदिन जागता ।।
"जीवन हाच एक प्रवास आहे." अशी कल्पना करून नेहमीच त्या अनुषंगाने त्याची हकीकत सांगितली जाते. आपले बालपण, यौवन, शिक्षण, नोकरी, व्यवसाय या सगळ्यातून आपली 'वाटचाल' चाललेली असते. कधी कधी आपली 'वाट चुकते' आणि ते लक्षात आल्यावर आपण पस्तावतो. या वाटेवर चालतांना आपल्याला कोणाकोणाची सोबत मिळते. ती नसेल तरीही "एकला चॉलो, एकला चॉलो, एकला चॉलोरे" असे गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर सांगतात. एक उर्दू शायर म्हणतो,"मैं अकेलाही चला था .. मंजिलतरफ, लोग आतेही रहे, कारवाँ बनता गया। "
या वाटेवर आपल्याला अनेक प्रकारची दृष्ये दिसतात, बरेवाईट अनुभव येतात. ते आपण सकारात्मक अर्थाने घ्यायचे की नकारात्मक हे ज्याने त्याने ठरवायचे असते. कवी आ. रा. देशपांडे ’अनिल’ अशा एका कलंदर माणसाचे आगळे विचार या शब्दात सांगतात.
वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुलाफुलात चाललो ।
मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी, आपुलीच साथ कधी करित चाललो ।।
आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद, नादातच शीळ वाजवीत चाललो ।।
चुकली तालात चाल, लागला जिवास बोल, ढळलेला तोल सावरीत चाललो ।।
खांद्यावर बाळगिले, ओझे सुखदुःखाचे, फेकुन देऊन अता परत चाललो ।।

No comments: