Saturday, August 09, 2008

आनंदघन

हा ब्लॉग लिहायला सुरुवात करण्यापूर्वी मराठी ब्लॉगविश्वाविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. मराठी भाषेत नंदनसारख्या अनेक लोकांनी सुंदर ब्लॉग्ज लिहायला सुरू केले आहे हे सुद्धा माहीत नव्हते. त्याआधी मी एकंदरीत जेमतेम दहा बारा ब्लॉग्ज वाचले होते, ते सारे इंग्रजीमध्ये होते. त्यामधील एकादा दुसरा अपवाद सोडल्यास बहुतेक सर्व ब्लॉग्जची शीर्षके निरर्थक तरी होती किंवा अनाकलनीय! त्यामुळे एक खुणेचा दगड याहून अधिक लक्ष त्यांच्याकडे दिलेच नाही. माझ्या ब्लॉगची नोंदणी करायला घेतल्यावर सुरुवातीलाच ब्लॉगचे नांव आणि माझे नांव अशी दोन नांवे द्यायची होती. त्या क्षणी आनंदघन हा शब्द सुचला आणि ते नांव मी या ब्लॉगला देऊन टाकले. आधी सगळे सोपस्कार तर होऊन जाऊ देत, ब्लॉगची सुरुवात तर होऊ दे, नंतर कधी तरी वाटल्यास नांव बदलून टाकू असा विचार त्या क्षणी मनात होता. पण नंतर कधी तसे करावेसे वाटलेच नाही कारण आनंदघन हेच नांव चांगले वाटायला लागले होते.

या शब्दाचा अर्थ काय असेल? माझ्या कल्पनेप्रमाणे घनदाट आनंद, आनंद बरसणारा मेघ असा कांही तरी तो असणार. गणित विषयात ज्यांना गोडी वाटते ते त्याचा अर्थ आनंद गुणिले आनंद गुणिले आनंद अशी बीजगणितातील व्याख्या किंवा भूमितीमधील त्रिमिति रूप असा काढू शकतील. आनंदघन म्हणजे आनंदाचा अर्क किंवा निर्भेळ आनंद असे परमेश्वराचे वर्णन आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये केले आहे. उदाहरणार्थ समर्थ रामदासांच्या दासबोधातील दोन ओव्या खाली दिल्या आहेत.
जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूतिऩ मधुसूदन। सम चरण देखियेले ॥
सांडून राम आनंदघन । ज्याचे मनीं विषयचिंतन । त्यासी कैंचें समाधान । लोलंगतासी ॥

भारतरत्न लता मंगेशकर यांनी ब-याच वर्षापूर्वी स्व.भालजी पेंढारकरांच्या कांही मराठी चित्रपटांना अत्यंत मधुर असे संगीत देतांना संगीत दिग्दर्शक म्हणून आनंदघन हे नांव घारण केले होते. त्या सिनेमातील लोकप्रिय गाण्यांसोबत हे नांवसुद्धा ज्याच्या त्याच्या तोंडावर झाले. अशा या नांवाचा उपयोग मी करू शकतो कां व ते कितपत योग्य आहे असे प्रश्न मनात येतात. त्यावर मला असे वाटते की लता, आशा, मीना व उषा ही मंगेशकर भगिनींची नांवे धारण करणा-या लक्षावधी स्त्रिया महाराष्ट्रात दिसतील. प्रसिद्ध व्यक्तींचे नांव आपल्या मुलाला ठेवण्याची आपल्याकडे पद्धतच आहे. तर मग मी आपल्या नवजात ब्लॉग बाळाला हे नांव ठेवणे तसे रूढीला धरूनच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काळांत पूजनीय लतादीदी आनंदघन या नांवाने चित्रपटसंगीत देत होत्या, तेंव्हासुद्धा एक आघाडीची गायिका व एक लोकप्रिय व्यक्ती म्हणून त्या लता मंगेशकर या मूळच्या नांवानेच प्रसिद्ध होत्या. गेल्या वीस पंचवीस वर्षात त्यांनी आनंदघन या नांवाने कांही कार्य केले असल्याचे मी तरी ऐकले नाही. त्यामुळे त्यांच्या नांवाचा उपयोग करून कांही फायदा मिळवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, किंवा त्यांच्या नांवावर मी आपला माल खपवण्याचा प्रयत्न करीत आहे असेही कुणाला वाटू नये. या सगळ्या कारणाने आनंदघन हेच नांव चालू ठेवले.

हा ब्लॉग लिहिण्यामागील माझा मूळ उद्देश आधी नाविन्याचा आनंद मिळवणे हा होता आणि नाविन्य संपल्यानंतर निर्मितीचा आनंद मिळवणे हा होता. त्याचप्रमाणे तो वाचणा-या लोकांनाही त्यापासून आनंद मिळणे आवश्यक आहे. तसाच प्रयत्न सुरू आहे.

1 comment:

Ashwini said...

सुंदरच आहे नाव..