Saturday, December 31, 2011

नववर्षाच्या शुभेच्छा २०१२

हे नववर्ष सर्व वाचकांसाठी सुख, शांती, आयुरारोग्य, धनसंपदा वगैरे जो जे वांछील ते ते घेऊन येवो अशा हार्दिक शुभेच्छा.


आजचे सुविचार
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

फांदीवर बसलेला पक्षी ती तुटण्याची भीती बाळगत नाही कारण त्याचा स्वतःच्या पंखांवर जास्त विश्वास असतो.


यशाकडे जाणारा रस्ता नेहमीच तयार होत असतो.

Thursday, December 29, 2011

सोनेरी (पिकली) पाने





पिकल्या पानांनी गळून पडणे हा निसर्गाचा नियम आहे. यातली काही पाने सोनेरीच नव्हे तर ती बावनकशी सोन्याचीच असतात असे म्हणता येईल. अशा अनमोल पानांचा २०११ मध्ये नुसता पाऊस पडला. निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी सर्वोच्च स्थान संपादन केले किंवा सर्वोच्च पातळी गाठली अशा इतक्या व्यक्ती एका वर्षात जगाला सोडून गेल्याचे यापूर्वी कधी झाले नसेल. पूर्वी पंचावन्न वर्षे पूर्ण होताच सरकारी नोकरीमधून सेवानिवृत्त केले जात असे. त्याची मुदत आता वाढवून ५८ ते ६० वर्षांपर्यंत झाली आहे. सत्तरीला पोचेपर्यंत बहुतेक लोकांची क्रियाशक्ती क्षीण झालेली असे. चिकित्सा आणि औषधोपचार यात झालेल्या प्रगतीमुळे आता सत्तरीपार गेल्यानंतरसुध्दा गोळ्या इंजेक्शने घेऊन लोक टुणटुणीत राहतात आणि सौंदर्यप्रसाधनांचा उपयोग करून तुकतुकीत दिसतात. पिकल्या पानांचा देठच नव्हे तर ते पानच हिरवे दिसण्याची सोय झाली आहे. रोजच्या जीवनात करावे लागणारे श्रम कमी झाल्यामुळे ते सहजपणे सहन करता येतात. या सगळ्या गोष्टींमुळे आता सत्तरी आणि ऐंशीच्या पार गेल्यानंतरसुध्दा लोक क्रियाशील असतांना दिसतात. अशी पाने गळून पडायच्या वेळी त्यांचे पिकलेपण लक्षात येते.
संगीत जगतावर तर या काळात एकामागोमाग एक आघात होत गेले. भारतरत्न स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांच्यासारखा गायक पुन्हा दिसणार नाही. त्यांचे पट्टशिष्य माधव गुडी आणि श्रीकांत देशपांडे हे सुध्दा स्वर्गलोकांत त्यांची साथ करायला निघून गेले. पंडितजींच्या गडद सावलीत हे सुध्दा कधी पिकली पाने झाले होते हे समजलेच नाही.
स्व. सुधीर फडके, स्व.वसंत प्रभू, पं.हृदयनाथ मंगेशकर आणि श्री.यशवंत देव प्रभृतींबरोबरच श्रीनिवास खळे यांनी एकाहून एक सुरेल गाणी मराठी रसिक श्रोत्यांना दिली. या सर्व समकालीन संगीतकारांमध्ये खळे काकांनी सर्वाधिक काळ मराठी सुगमसंगीतावर अधिराज्य गाजवले असे त्यांच्याबद्दल सांगता येईल.
गजल म्हणजे जगजीतसिंग असे समीकरणच आजकाल बनले होते. गजल या प्रकारालाच त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती आणि गजलसम्राट असे मानाभिधान मिळवले होते.
आसाम या राज्यातील मधुर संगीत सर्व जगासमोर आणण्याचे काम पं.भूपेन हजारिका यांनी केले. त्यांच्याएवढा नावलौकिक आसाममधल्या दुस-या कोणीच कुठल्याही क्षेत्रात कमावला नसेल.
संगीताप्रमाणेच नाट्यक्षेत्रानेही दोन अनमोल हिरे गमावले. प्रभाकर पणशीकर हे काही दशके मराठी रंगभूमीचे निर्विवाद सम्राट होते. त्यांच्या हयातीतच त्यांच्या नावाने श्रेष्ठ रंगकर्म्यांना पुरस्कार देण्यात येत होते. सत्यदेव दुबे म्हणजे हिंदीच नव्हे तर जागतिक प्रायोगिक रंगभूमी म्हणता येईल. नाट्यक्षेत्रामधील कलाकारांच्या काही पिढ्या या थोर माणसाने निर्माण केल्या आणि प्रेक्षकांना दिल्या.
नाटकांपेक्षा आकाशवाणीवर ज्यांचा आवाज घरोघरी पोचला आणि सर्वांच्या ओळखीचा झाला असे करुणा देव यांच्याबद्दल म्हणता येईल.
नाटक आणि चित्रपट (नाटकसिनेमे) ही मनोरंजनाची जोडगोळी आहे. एका कालखंडातल्या तमाम तरुणींचा लाडका देव आनंद आणि सर्व तरुणांचा हीरो शम्मीकपूर या दोघांना सिनेमासृष्टीत त्यांच्या विशिष्ट स्पेशलायझेशनमध्ये या दोघांनाही तोड नव्हती.
पतौडीचे नवाब क्रिकेट जगतातसुध्दा नबाबाच्या रुबाबातच राहिले होते. वयाने जवळ जवळ सर्वात लहान असतांनासुध्दा त्यांना संघाचे कप्तानपद मिळाले आणि त्यांनी ते शानदार कामगिरी करून राखले. एकाक्ष असूनही धावांचे डोंगर रचले. शर्मिला टागोरसारख्या स्वरूपसुंदरीशी विवाह केला.
चित्रकलेच्या क्षेत्रात मकबूल फिदा हुसेन यांनी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. त्यांच्या चित्रांना लिलावांमध्ये कोट्यावधी डॉलर्स इतकी किंमत मिळाली, कधी अनवाणी फिरण्यामुळे, तर कधी लोकप्रिय नट्यांच्या चित्रांची मालिका आणि त्यांना घेऊन विचित्र प्रकारचे चित्रपट काढल्यामुळे किंवा वादग्रस्त विधाने करून ते सतत प्रसिध्दीच्या झोतात राहिले. तसेच ते अनेकांच्या तीव्र रोषालाही पात्र झाले. सर्वच बाबतीत त्यांच्यासारखे तेच होते.
व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांनी स्वतःची इतकी खास अशी शैली निर्माण केली की जिचे अनुकरणसुध्दा कोणी करू शकला नाही. मारिओने काढलेले चित्र पाहताच त्यानेच ते चित्र काढले आहे हे ओळखू येत असे.
डॉ.पी.के अय्यंगार यांनी भारताच्या अणुशक्ती विभागाचे प्रमुखपद सांभाळले होतेच, पण डॉ.भाभांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचा पाया घालणा-या शास्त्रज्ञांमधले ते एक होते. वैज्ञानिकांच्या निवडीपासून त्यांचे प्रशिक्षण आणि प्रगती या सर्वांमध्ये ते जातीने लक्ष देत असत.

इंदिरा गोस्वामी ज्ञानपीठविजेत्या महान साहित्यिक होत्या.

सत्यसाईबाबांच्या एवढा अनुयायीवर्ग कोणालाही मिळाला नसेल. या काळामध्ये त्यांचे इतके असंख्य भक्तगण तयार झाले हाच त्यांनी दाखवलेला सर्वात मोठा चमत्कार म्हणता येईल. दुसरा कोणताही बाबा किंवा स्वामी या बाबतीत त्यांच्या जवळपाससुध्दा येणार नाही.

स्व.पं.अशोक रानडे हे भारतीय संगीताचे ज्ञानकोश होते. संगीतशास्त्रावर त्यांनी केलेले संशोधन आणि लेखन, अध्यापन, व्याख्यान वगैरे माध्यमातून केलेले प्रबोधन अतुलनीय असेच होते.


उस्ताद सुलतानखान यांनी सारंगी या भारतीय वाद्याची प्रतिष्ठा राखून ठेवली होती. परदेशातून आलेल्या व्हायोलिनपुढे सारंगी आता मागे पडत चालली असून दुर्मिळ होण्याच्या मार्गावर चालली आहे. सारंगीवादनाच्या कलेवर प्रभुत्व गाजवणार्‍या कलाकारांमध्ये उस्तादजींचे नाव प्रमुख होते.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाची पदं भूषवलेल्या पी. सी. अलेक्झांडर यांनी एकेकाळी देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ते खास विश्वासातले होते. त्यांचे प्रधान सचिव म्हणून ही ते काम पहात होते . पी.सी. अलेक्झांडर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अत्यंत विश्वासू वर्तुळातील होते अन गांधी यांच्या महत्वाच्या निर्णयांवर पि.सी अलेक्झांडर यांचा प्रभाव होता. त्यांनी लिहीलेले 'My Years With Indira Gandhi' हे पुस्तक वाचण्यायोग्य आहे.
जहांगीर सबावाला : महान चित्रकार ! जे स्वतःबध्दल फार कमी बोलत पण त्यांची चित्रे हि बोलकी होती.

श्रीलाल शुक्ला : 'रंगदरबारी' चे लेखक ज्याचे अनुवाद १५ विविध भाषेत झाले ते हिंदी साहित्यातील महान लेखक यांचे ही निधन २०११ मध्येच झाले

मणी कौल : ज्यांनी बॉलीवूड मध्ये पैरलल सिनेमाचे पायाभरणी केली. त्यांची नाटक / चित्रपट ' दुविधा', 'उसकी रोटी' , 'आषाढ़ का एक दिन' यांनी कलेचे अतिउच्च शिखर गाठले होते
डॉ हरगोबिंद खुराना : भारतीय मूळ चे अमेरिकी वैज्ञानिक डॉ . हरगोबिंद खुराना यांनी नोबेल पारितोषिक मिळविले होते ज्यांनी जीव रसायन (बायोकेमेस्ट्री) मध्ये क्रांती आणली .
वर्ष सरता सरता अखेरच्या दिवशी ख्यातनाम कवियत्री वंदना विटणकर यांनी देखिल जगाचा कायमचा निरोप घेतला.


अशा इतक्या सगळ्या लोकांना २०११ या एकाच वर्षाने काळाच्या पडद्याआड नेले.

Monday, December 26, 2011

किरणोत्सार - मानवजातीवरील अरिष्ट की बागुलबुवा? (भाग १ -४)

चार भागात लिहिलेल्या या लेखाचे सर्व भाग एकत्र केले. दि. ३०-०९-२०२०
*********** 

किरणोत्सार - मानवजातीवरील अरिष्ट की बागुलबुवा? (भाग -१)

"पुस्तकामध्ये छापलेल्या प्रत्येक समीकरणामुळे त्याची वाचनीयता निम्म्याने कमी होते" असे काहीसे एका थोर शास्त्रज्ञाने त्याच्या एका विज्ञानविषयक जगप्रसिध्द पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लिहिले आहे. त्याचप्रमाणे कोष्टके, संदर्भसूची, अनोळखी पारिभाषिक शब्द यांचाही वाचनीयतेवर परिणाम होतो असा माझा अनुभव आणि अडाखा असल्यामुळे या सर्वांना टाळण्याचा प्रयत्न या लेखात मी केला आहे. मात्र विज्ञानासंबंधीच्या लेखात नेमकेपणासाठी त्याची परिभाषा येणारच, याला इलाज नाही. वाचकांच्या सोयीसाठी अनोळखी मराठी पारिभाषिक शब्दांच्या जोडीला मूळ इंग्रजी शब्द कंसात दिले आहेत.

रात्रीच्या वेळी आपण एकाद्या अंधाऱ्या खोलीतला दिवा लावतो तेंव्हा लगेच ती प्रकाशाने उजळून निघते आणि त्या खोलीमधील वस्तू आपल्याला दिसतात. दिवा बंद करताच पुन्हा अंधार गुडुप होऊन काही दिसेनासे होते. थोडेसे खोलात जाऊन पाहिल्यास प्रत्यक्षात असे घडते की आपण दिव्याचे स्विच दाबताच विजेला त्यातून जाण्याचा मार्ग मोकळा होतो आणि बल्बला जोडलेल्या तारांमधून विजेचा प्रवाह वाहू लागतो. तांब्याच्या जाड तारा या प्रवाहाला अत्यल्प विरोध करतात आणि फारशा तापत नाहीत, पण बल्बमधील नायक्रोम नावाच्या धातूच्या तलम तारां(फिलॅमेंट्स)मधून जातांना विजेच्या प्रवाहाला प्रखर विरोध होतो आणि त्यामुळे विजेमधील सुप्त ऊर्जा ऊष्णतेच्या रूपात प्रकट होते. त्याने तप्त झालेल्या फिलॅमेंट्समधून प्रकाश आणि ऊष्णता बाहेर पडते आणि सर्व बाजूंना पसरते. खोलीच्या भिंती, जमीन, छप्पर आणि खोलीमधील सर्व वस्तूंवर पडत असलेल्या प्रकाशाचा काही भाग त्या प्रत्येकात शोषला जातो आणि उरलेला परावर्तित होतो आणि पू्र्णपणे शोषला जाईपर्यंत तो पुनःपुन्हा एकमेकावरून परावर्तित होत राहतो, म्हणजे तो सर्व बाजूंनी पसरत जातो. त्यामुळे खोलीच्या एकाच कोपऱ्यात दिवा असला तरी आपल्याला सर्व बाजूंना उजेड दिसतो. वस्तूंवरून निघालेले जे परावर्तित किरण आपल्या डोळ्यात शिरतात त्यामुळे आपल्याला त्या वस्तू दिसतात. दिवा बंद होताच दिसण्याची क्रिया थांबते. पण त्यानंतर लगेच बल्बला हात लावून पाहिल्यास चटका बसतो कारण बल्बच्या काचेमध्ये प्रकाश साठवून ठेवला जात नाही, पण ऊर्जा साठवून ठेवली जाते आणि विजेचा प्रवाह वाहणे थांबल्यानंतरसुध्दा ती ऊष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडत राहते. बल्ब पूर्णपणे थंड झाल्यानंतरसुध्दा ती बाहेर पडत असतेच, पण जेवढी ऊष्णता बाहेर पडेल तेवढीच ऊष्णता आजूबाजूने त्याच्याकडे येत राहिल्यामुळे त्याचे तपमान स्थिर राहते.

प्रकाश आणि ऊष्णता या दोन्ही स्वरूपात बल्बमधून बाहेर पडणारी ऊर्जा एकाच मूलभूत पध्दतीने सर्व दिशांना बाहेर पडते. याला उत्सर्जन (रेडिएशन) असे म्हणतात. (त्याशिवाय वहन आणि अभिसरण या दोन वेगळ्या मार्गांनीसुध्दा ऊष्णता पसरत जाते). ऊर्जेचे हे रेडिएशन विद्युत चुंबकीय लहरींमधून (इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज) होत असते. कंपनसंख्या (फ्रिक्वेन्सी) आणि तरललांबी (वेव्हलेंग्थ) हे या लहरींचे मुख्य स्वभावधर्म (कॅरेक्टरिस्टिक्स) असतात. त्यानुसार त्यांचे इतर गुणधर्म ठरतात. सर्वात कमी कंपनसंख्या असलेल्या आणि अत्यंत सौम्य अशा रेडिओ लहरींपासून मायक्रोवेव्हज, अवरक्त(इन्फ्रारेड), दृष्य(व्हिजिबल), जंबूपार (अतीनील किंवा अल्ट्राव्हायोलेट), क्ष किरण (एक्सरे) असे करत करत सर्वाधिक कंपनसंख्येच्या अत्यंत रौद्र प्रकृतीच्या गॅमा रे पर्यंत विविध प्रकारच्या किरणांचा समावेश यात होतो. ३८० नॅनोमीटर ते ७६० नॅनोमीटर एवढी सूक्ष्म वेव्हलेंग्थ किंवा ७९० टेराहर्ट्ज ते ४०० टेराहर्ट्ज इतकी प्रचंड कंपनसंख्या या एवढ्या विशिष्ट अशा दृष्य वर्णपटामधील (visible spedtrum) लहरींपासून आपल्याला रंगांचा बोध होतो म्हणजे या पट्ट्यामधील किरणांमुळे ते जेथून आले असतील त्या वस्तू आपल्याला दिसतात. संपूर्ण वर्णपटाचा विस्तार जवळजवळ शून्यापासून अनंता(इन्फिनिटी)पर्यंत वेव्हलेंग्थ्स इतका आहे. विद्युत चुंबकीय लहरींच्या या एकंदर विस्ताराच्या मानाने दृष्य लहरींचा पट्टा (रेंज) अत्यंत अरुंद आहे. ऊष्णतावाहक लहरी म्हणजे मध्यम इन्फ्रारेड लहरींची कंपनसंख्या दृष्य प्रकाशलहरींहून कमी असते आणि क्ष किरण, गॅमा रेज वगैरेंची फ्रिक्वेन्सी खूप पटींनी जास्त असते. या किरणांपासून आपल्याला दृष्टीबोध होत नाही. म्हणजे अंधारात ठेवलेल्या कोणत्याही वस्तूपासून फक्त हेच किरण आपल्या डोळ्यापर्यंत येऊन पोचले तर ती वस्तू आपल्याला या किरणांमध्ये दिसत नाही. त्यांना अदृष्य किरण असेही म्हंटले जाते.

सूर्यापासून आपल्याला मुख्यतः प्रकाश आणि ऊष्णता मिळते आणि यावरच आपले सारे जीवन चालते. पण दृष्य प्रकाशकिरण आणि अदृष्य अशा ऊष्णतेच्या किरणांखेरीज इतर अनेक प्रकारचे अदृष्य किरणसुध्दा काही प्रमाणात सूर्यप्रकाशामधून आपल्याकडे येतच असतात. इन्फ्रारेडपासून गॅमारेजपर्यंत सर्वांचा त्यात समावेश असतो. पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणातून येतांना यातले बरेचसे किरण त्यात, विशेषतः त्यामध्ये असलेल्या ओझोन वायू आणि वाफ यांचेमध्ये शोषले जातात किंवा परावर्तित होतात, पण उरलेले आपल्यापर्यंत पोचतातच. दूरच्या ताऱ्यांपासून निघालेले प्रकाशकिरण आपल्यापर्यंत पोचल्यामुळेच आपण त्यांना पाहू शकतो. त्यांच्याकडून निघणारे काही अदृष्य किरण देखील आपल्यापर्यंत येऊन पोचतात. अशा प्रकारे वैश्विक किरणांमधून (कॉस्मिक रेज) आपल्यावर अनेक प्रकारच्या किरणांचा वर्षाव होतच असतो आणि आपल्यावर त्यांचे जे काही बरे वाईट परिणाम व्हायचे ते होतच असतात. विमानांचे उड्डाण अत्यंत विरळ हवेतून होत असल्यामुळे जे लोक विमानामधून प्रवास करतात ते प्रत्येक प्रवासात या किरणांचा जादा डोस घेऊन येतात.

कोणतेही पदार्थ प्रकाशाला साठवून ठेवत नसले तरी काही पदार्थ अंधारात चमकतांना दिसतात. त्यांना प्रस्फूरक (फ्लुओरसंट) असे म्हणतात. हे पदार्थ आधी त्यांच्यावर पडलेल्या प्रकाशातून त्यांना मिळालेल्या ऊर्जेचे नंतर हळूहळू एका वेगळ्या रंगाच्या प्रकाशकिरणांचे द्वारा उत्सर्जन करतात. अशा पदार्थांवर संशोधन करतांना शास्त्रज्ञांना असे दिसले की काही पदार्थ स्वयंप्रकाशमान असतात. त्यांच्यावर आधी प्रकाश पडलेला नसतांनासुध्दा त्यांचे उत्सर्जन चाललेले असते. हे प्रकाशकिरण अदृष्य अशा तीन वेगवेगळ्या प्रकारांचे असतात असे अधिक संशोधनावरून समजले. ग्रीक वर्णमालेमधील पहिली तीन अक्षरे अल्फा, बीटा आणि गॅमा अशी नावे त्यांना दिली गेली. रेडियम, युरेनियम, थोरियम, रेडॉन आदि काही मूलद्रव्यांमधून अशा प्रकारचे किरण उत्सर्जित होत असतात. या पदार्थांना किरणोत्सारक (रेडिओअॅक्टिव्ह) असे संबोधतात. यापैकी घनरूप पदार्थांचे साठे भूगर्भामध्ये आहेत, तर वायुरूप द्रव्ये आपल्या वातावरणात मिसळलेली असतात आणि काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळलेले असतात. त्यांच्यामधून निघणारे किरण आपल्यापर्यंत सारखे येतच असतात. शिवाय कर्ब (कार्बन), सोडियम, पोटॅशियम, लोह आदि ज्या पदार्थांपासून आपले शरीर बनलेले असते त्यांच्यातसुध्दा सूक्ष्म प्रमाणात त्यांची किरणोत्सारक समस्थानिके (आयसोटोप्स) असतातच. कोणत्याही प्राण्याच्या शरीरामधून किंवा वनस्पतीमधून बाहेर पडत असलेल्या किरणोत्साराचे अत्यंत संवेदनशील (सेन्सिटिव्ह) अशा उपकरणाने मापन केले तर ते मोजता येण्याइतके निघते. त्या मीटरची सुई सरकते किंवा डिजिटल असेल तर एकादा आकडा दाखवते.


या तीनांपैकी अल्फा रेज हे किरण नसून सूक्ष्म कण असतात. यातील प्रत्येक कणामध्ये दोन प्रोटॉन्स आणि दोन न्यूट्रॉन्स असतात, मात्र त्यांच्यासोबत एकही इलेक्ट्रॉन नसतो. अणूच्या अंतर्गत रचनेवर विचार करता असे मानले जाते की त्याच्या मध्यभागी एक अणूगर्भ (न्यूक्लियस) असतो आणि अनेक ऋणाणू (इलेक्ट्रॉन्स) निरनिराळ्या कक्षांमधून त्या अणूगर्भाला घिरट्या घालत असतात. ते नसल्यामुळे अल्फा कण (पार्टिकल) म्हणजेच हीलीयम या मूलद्रव्याचा अणूगर्भ (न्यूक्लियस) असतो. हीलियमच्या अणूमधले इलेक्ट्रॉन्स वगळले तर हा कण बनेल यामुळे त्याला हीलियमचा आयॉन असेही म्हणता येईल. बीटा रेज म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे कणच असतात. ते सुध्दा किरण नसतात. गॅमा रेज मात्र वर दिल्याप्रमाणे अदृष्य किरण असतात. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांचे वास्तव्य फक्त अणूच्या गर्भातच असल्यामुळे अल्फा रेजचा उगम तेथूनच होऊ शकतो. अणूगर्भाच्या सभोवती इलेक्ट्रॉन्स भ्रमण करत असले तरी बीटा रेजमधले इलेक्ट्रॉन्स मात्र अणूगर्भाच्या विघटनातून तयार होऊन तिथून बाहेर पडतात. अत्यंत शक्तीशाली असे गॅमा रेजसुध्दा अणूगर्भामधून बाहेर येतात.

हीलियम हा एक निष्क्रिय वायू (इनर्ट गॅस) आहे. तो एकलकोंडा रहात असल्यामुळे त्याचा कोणाशीच संयोग होत नाही आणि तसे पाहता तो निरुपद्रवी असतो. आपल्या शरीराच्या अणूरेणूंमध्ये इलेक्ट्रॉन्स भरलेले असतात. अनेक प्रकारचे किरण आपल्या आसमंतात सतत पसरतच असतात. मग या अल्फा, बीटा, गॅमामुळे एवढी दहशत का वाटावी ? याचे एकच समान कारण आहे, ते म्हणजे हे तीघेही महाशक्तीमान असतात. यांचेमुळे नासधूस होऊ शकते तसेच पदार्थांचे मूलकीकरण (आयोनायझेशन) होऊ शकते. मूलद्रव्यांच्या अणूमधला सर्वात बाहेरचा एकाददुसरा इलेक्ट्रॉन कमी झाला किंवा त्यांची संख्या वाढली तर त्या अणूचे रूपांतर आयॉनमध्ये होते. उदाहरणार्थ सोडियम आणि क्लोरिन यांच्या संयोगाने मीठ बनते, या क्रियेत सोडियमच्या अणूमधला एक इलेक्ट्रॉन क्लोरिनच्या अणूभोवती फिरू लागतो आणि दोघांचा मिळून सोडियमक्लोराइड हा रेणू होतो. एका इलेक्ट्रॉनशिवाय सोडियम अणू आणि एक जास्तीचा इलेक्ट्रॉन असलेला क्लोरिनचा अणू यांना त्यांचे आयॉन असे म्हणतात. हे आयॉन अत्यंत सक्रिय असतात आणि आजूबाजूच्या इतर रेणूंशी त्वरित संयोग साधतात. त्यामुळे नव्या प्रकारचे रेणू निर्माण होतात आणि पदार्थाची रासायनिक रचना बदलते. माणसाच्या शरीरामधील पेशीतील डीएनए, आरएनए वगैरेमध्येच बदल झाला तर त्यामुळे अनेक प्रकारचे गोंधळ होण्याची शक्यता असते. फक्त या तीन प्रकारच्या किरणांमुळेच कशाचेही आयोनायझेशन होते असे नाही. इतर अनेक कारणांनी ते निसर्गातसुध्दा होतच असते. आभाळात कडकडणारी वीज हवेतील वायूंचे आयोनायझेशन करण्यास कारणीभूत असते हे एक नेहमीच्या पाहण्यातले उदाहरण आहे. या तीन घातक किरणांखेरीज सुट्या न्यूट्रॉन्समुळेही आपल्या शरीराला अपाय होतो. त्याचाही समावेश किरणोत्सारात केला जातो.

वरील मजकुरावरून असे दिसते की विनाशकारी किरणोत्सार हा निसर्गात सर्वत्र अस्तित्वात असतो. जमीन, पाणी, हवा आणि आकाश या सर्वांमधून तो आपल्यापर्यंत येत असतो. तसेच आपण स्वतः सुध्दा सूक्ष्म प्रमाणात त्याचे उत्सर्जन सतत करत असतो. आपल्या शरीराला त्याची सवय झालेली असते. शरीरामधील सगळ्या पेशी कायम स्वरूपाच्या नसतात. दात, हाडे यासारखे थोडे अपवाद वगळल्यास रक्त, मांस, त्वचा आदि शरीराच्या इतर भागांमधील पहिल्या पेशी झिजून नष्ट होत असतात आणि त्यांची जागा नव्या पेशी घेत असतात. त्यामुळे त्यातल्या अल्पशा पेशी किरणोत्साराने नष्ट झाल्या किंवा त्यांच्यात काही फेरबदल झाला तरी त्याची भरपाई शरीरामधील दुरुस्ती यंत्रणे(रिपेअर मेकॅनिझम)कडून केली जात असते. त्यातून काही पेशींची भरपाई झालीच नाही तर त्याला इलाज नसतो. रोगराई, कुपोषण, हिंसा, प्रदूषण, विषबाधा वगैरे इतर असंख्य प्रकारच्या कारणांमुळे हे घडत असतेच, तशातलाच हा एक भाग असतो. यामुळे अणुशक्तीचा उदय होईपर्यंत कोणालाही किरणोत्साराची विशेष काळजी वाटत नव्हती.
*****

किरणोत्सार - मानवजातीवरील अरिष्ट की बागुलबुवा? (भाग -२)


अणुशक्ती आणि किरणोत्सार यांचा घनिष्ठ संबंध आहे.  अण्वस्त्रे आणि अणुविद्युतकेंद्रे या दोन्हींमध्ये अणूंचे विघटन किंवा भंजन (फिशन) या क्रियेमुळे त्यामधून ऊर्जा बाहेर पडते. या क्रियेमध्ये युरेनियम २३५ या मूलद्रव्याच्या अणूचा न्यूट्रॉनशी संयोग झाला तर तो मोठा अणू दुभंगला जाऊन त्यातून दोन लहान अणू निघतात, तसेच दोन किंवा तीन न्यूट्रॉन बाहेर पडतात आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे विमोचन होते. हे नवे अणू  किरणोत्सारी द्रव्यांचे असतात.  अल्फा, बीटा व गॅमा रे हे किरणोत्सर्गाचे तीन मुख्य प्रकार आहेतच, पण या सर्वाहून न्यूट्रॉन्स अधिक घातक असतात. ते थेट अणुगर्भातच प्रवेश करतात आणि चांगल्या अणूला उद्दीप्त (एक्साइट) करून त्याला किरणोत्सर्गी (रेडिओअॅक्टिव्ह) बनवतात. त्यानंतर तो अणू किरणोत्सर्ग करतच राहतो. अशा प्रकारे आण्विक विखंडनामधून सर्व प्रकारचे किरणोत्सार होतात.

आण्विक क्रियांमधून (न्यूक्लियर रिअॅक्शनमधून) होणा-या किरणोत्साराची कल्पना शास्त्रज्ञांना असल्यामुळे त्यापासून कोणाला इजा पोहोचू नये याची विशेष काळजी अगदी पहिल्या प्रायोगिक रिअॅक्टरपासून घेतली जात आली आहे. ती कशा प्रकारची असते हे पाहण्याआधी किरणोत्साराबद्दल थोडी माहिती घ्यायला हवी. निरनिराळ्या मूलद्रव्यांपासून होत असणारे किरणोत्सार एकसारखे नसतात. अल्फा, बीटा व गॅमा रे हे तीन प्रकारचे किरण आणि न्यूट्रॉन्स या चार मुख्य प्रकारांमध्ये पुन्हा असंख्य उपप्रकार असतात.



अल्फा रेमध्ये मोठी शक्ती असली तरी त्यांची भेदकता (पेनेट्रेशन) अगदी कमी असते. ते साध्या कागदाच्यासुध्दा आरपार जात नाहीत. बीटा रे त्या मानाने जास्त भेदक असले तरी ते सुध्दा अॅल्युमिनियमच्या पातळ पत्र्या(फॉइल)सारख्या लहानशा संरक्षक कवचा(शील्डिंग)ने थांबवले जातात. अल्फा रे निर्माण करणारा पदार्थ पुठ्ठ्याच्या खोक्यात आणि बीटा रे करणारा पदार्थ पत्र्याच्या डब्यात बंद करून ठेवला तरी ते किरण त्यांच्या बाहेर येत नाहीत. त्यामुळे रिअॅक्टरमधील समस्थानिकांमधून निघालेले अल्फा आणि बीटा रे त्याच्या आतच राहतात. गॅमा रे मात्र अत्यंत भेदक असतात. क्ष किरण आपली त्वचा व मांसपेशींना भेदून आरपार जातात पण हाडांमधून जाऊ शकत नाहीत, गॅमा रे त्यांच्यासुध्दा आरपार जातात. लोह, शिसे यासारख्या जड पदार्थांचे जाड कवच किंवा काँक्रीटच्या जाड भिंतीच त्यांची तीव्रता कमी करू शकतात. न्यूट्रॉन्स तर शिशासारख्या जड पदार्थाला जुमानत नाहीत, पण पाण्यासारख्या तरल पदार्थाने शांत होतात. त्यांना थोपवण्याचे काम काँक्रीटच्या जाड भिंतीच करतात.

न्यूट्रॉन्सचे उत्सर्जन फक्त युरेनियमच्या अणूंचे विघटन चालले असतांनाच होते. ते थांबले की काही सेकंदानंतर न्यूट्रॉन्सचा मागमूससुध्दा शिल्लक रहात नाही. पण रिअॅक्टर चालत असतांना त्यामधून निघणा-या न्यूट्रॉन्सना थोपवून धरून त्यांचे पूर्ण शोषण करण्यासाठी रिअॅक्टरच्या सर्व बाजूने खूप जाड भिंती बांधून भरभक्कम सुरक्षा कवचाची (शील्डिंगची) व्यवस्था केली जाते, तसेच रिअॅक्टर चालत असतांना कोणीही त्याच्या आसपास फिरकू शकत नाही.  रिअॅक्टर पात्रा(व्हेसल)च्या आजूबाजूचे सर्व भरभक्कम कप्पे (व्हॉल्ट्स) सीलबंद करून त्यांना कुलूप लावल्याखेरीज रिअॅक्टरमध्ये विखंडनाची साखळी क्रिया सुरूच होणार नाही असा पक्का बंदोबस्त (फूलप्रूफ इंटरलॉक्स) केलेला असतो. ती क्रिया चालत असतांना ती कुलुपे उघडून कोणीही आत जाऊ शकणार नाही याची इंटरलॉकद्वारा संपूर्ण काळजी घेतली जाते. रिअॅक्टरच्या कार्यात कसलाही बिघाड होण्याची नुसती शंका आली तरी साखळी क्रिया आपोआप ताबडतोब थांबवण्याच्या अनेक सुरक्षा प्रणाली (सेफ्टी सिस्टिम्स) प्रत्येक रिअॅक्टरमध्ये बसवलेल्या असतात. त्या सगळ्या कार्यान्वित न झाल्याची घटना आजतागायत घडलेली नाही आणि तसे घडण्याची शक्यता शून्याएवढीच आहे. अमेरिकेमधील थ्री माइल आयलंड आणि या वर्षीची फुकुशिमा या दोन्ही मोठ्या अपघातांमध्ये रिअॅक्टरमधील विघटनाची साखळी प्रक्रिया (चेन रिअॅक्शन) त्यांच्या नियंत्रण प्रणालीं(कंट्रोल सिस्टिम्स)कडून आपोआप बंद झालीच होती. सोव्हिएट युनियममधील चेर्नोबिलचा अपघात तेथील रिअॅक्टरमधील चेन रिअॅक्शन थांबवल्यानंतर घडला होता. त्यामुळे आतापर्यंत फक्त हिरोशिमा आणि नागासाकी या ठिकाणीच न्यूट्रॉन्सचा झोत माणसांना सहन करावा लागला आहे. अणूबाँबच्या चाचण्या घेतल्या जात असतांना त्यातून क्षणभरासाठी न्यूट्रॉन्सचा किरणोत्सार होतो, पण अशा चाचण्या निर्जन प्रदेशातच घेतल्या जातात. भविष्यकाळातील युध्दांमध्ये अण्वस्त्रांचा उपयोग होण्याची शक्यता मात्र आहे आणि तो झाला तर त्यात किरणोत्सारही होणार.

न्यूट्रॉन सोडून इतर तीन प्रकारचा किरणोत्सार त्या किरणोत्सारी (रेडिओअॅक्टिव्ह) समस्थानिका(आयसोटोप)च्या जन्माबरोबर सुरू होतो आणि तो कोणत्याही उपायाने थांबवता येणे अशक्य असते. मात्र त्याची तीव्रता आपोआपच कमी होत जाते. एका उंच व मोठ्या टाकीत पाणी भरून ठेवले आणि त्याच्या तळाशी असलेला नळ उघडला तर सुरुवातीला त्यातून अतीशय जोराने पाणी बाहेर येते. टाकीमधील पाण्याची पातळी कमी होत जाते तसतसा नळातून बाहेर पडणा-या पाण्याचा जोर कमी होत जातो. टाकीमधले पाणी तिच्या तळाशी गेल्यावर नळातूनसुध्दा पाण्याची बारीक धार येते आणि अखेर ती थांबते. हा नळ पूर्णपणे उघडून ठेवला तर पाणी जोरात येते आणि टाकी लवकर रिकामी होते, पण तो नळ बंद करून ठेवला आणि त्यानंतरही तो जरासा गळत असला तर ती टाकी हळूहळू रिकामी होते आणि तिच्यामधील पाण्याची गळती दीर्घ काळापर्यंत चालत राहते.

किरणोत्साराचेसुध्दा असेच आहे. तो करणारे समस्थानिक जन्माला येते तेंव्हा त्याच्या अणूगर्भात आवश्यकतेहून जास्तीची ऊर्जा ठासून भरलेली असते. किरणांच्या उत्सर्जनामधून ती कमी कमी होत जाते. पण जसजशी ती जादा ऊर्जा कमी होईल त्यानुसार तिच्या उत्सर्जनाचा वेग कमी होतो. एका क्षणी त्या उत्सर्जनाची जेवढी तीव्रता असते ती ठराविक कालावधीनंतर तिच्या अर्धी होते. या कालावधीला अर्धायु (हाफ लाइफ) म्हणतात. एकाद्या प्रकारच्या किरणांच्या उत्सर्जनाचे अर्धायु एक दिवस एवढे असेल, तर त्याची तीव्रता उद्या निम्मी, परवा पाव, तेरवा एक अष्टमांश अशा रीतीने कमी होत जाते. ज्या समस्थानिकांमधून अत्यंत तीव्र गतीने किरणोत्सार होतो त्यांचे अर्धायु कमी असते. काही बाबतीत ते काही मिनिटे एवढेच असते आणि एक दोन दिवसात त्याची तीव्रता नगण्य होऊन जाते. याच्या उलट काही समस्थानिकांचे अर्धायु लक्षावधी वर्षे असते. युरेनियम व थोरियम हे नैसर्गिक किरणोत्सारी पदार्थ कोट्यावधी वर्षांपासून उत्सर्जन करत आले आहेत. पण त्याची तीव्रता अत्यंत कमी असते.
नैसर्गिक युरेनियम हेच मुळात क्षीण किरणोत्सारी असते. त्यातून बाहेर पडणारे अल्फा किरण आपल्या अंगावरील कपड्यांनासुध्दा भेदू शकत नाहीत, त्वचेला तर नाहीतच.  "भारतातल्या युरेनियम खाणींच्या आसपासचे लोक लुळेपांगळे होत आहेत हो!" अशी खोडसाळ बातमी एकाद्या परदेशातल्या वर्तमानपत्राने दिली तर त्यामुळे आपल्याला भेदरून जाण्याचे काडीमात्र कारण नाही. अतीशय वेगाने प्रवास करणारे अत्यंत सूक्ष्म असे गॅमा रे एका बाजूने जसे शरीरात घुसले तसेच दुस-या बाजूने बाहेर पडले तर कदाचित त्याने फारसा काही अपाय होणार नाही. पण ते वाटेत कित्येक अणूंना धडक देऊन त्यांचे मूलकीकरण (आयोनायझेशन) करतात. त्यामुळे काही पेशी मरतात तर काही बदलतात, यामुळे घोटाळा होऊ शकतो. अणुविद्युत केंद्राच्या कोणत्या भागात कोणत्या प्रकारची किरणोत्सर्गी समस्थानिके केवढ्या प्रमाणात तयार होतात आणि साठत जातात याबद्दल आता भरपूर माहिती आणि अनुभव गाठीशी असल्यामुळे त्यांच्या सभोवती पुरेसे संरक्षक कवच उभारले जाते. त्या ठिकाणी काम करणा-या लोकांना चांगले प्रशिक्षण दिले जाते. किरणोत्सर्गापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे तीन मुख्य नियम आहेत. ज्या भागात असे किरण येतात त्या भागात कमीत कमी वेळ राहणे, किरणोत्साराच्या स्त्रोतापासून जास्तीत जास्त दूर जाणे आणि पुरेशा कवचाचा उपयोग करणे. यांच्या आधारे प्रत्येक कामाचे तरशीलवार नियोजन करून त्याची रंगीत तालीम (रिहर्सल) घेतली जाते आणि त्यानुसार ते केले जाते.

अणुविद्युतकेंद्रामध्ये ठिकठिकाणी, तसेच त्याच्या परिसरात, शिवाय पाच, दहा, पंधरा, वीस किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी किरणोत्सार मोजणारी उपकरणे बसवलेली असतात. त्यामधून सतत मिळत असलेल्या माहितीची छाननी केली जात असते आणि कोठेही अनपेक्षित वाढ दिसली तर त्यावर उपाययोजना केली जाते. वाढ नसली तरी या वर्षी जेवढे प्रमाण दिसत आहे त्यापेक्षा ते पुढील वर्षी कसे कमी करायचे यावर विचार करून उपकरणे आणि कार्यपध्दती यामध्ये सुधारणा केल्या जात असतात. त्यामुळे या केंद्रामधून प्रत्यक्ष होणारा किरणोत्सार अत्यंत अल्प असतो. पृथ्वीवरील अनेक जागी नैसर्गिक किरणोत्साराचे जेवढे प्रमाण असते तेवढेसुध्दा इतर ठिकाणच्या अणुविद्युतकेंद्रांच्या प्रवेशद्वाराजवळ नसते.

अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय नियामक संस्था या किरणोत्सारावर बारकाईने नजर ठेऊन असतात. याबद्दलची माहिती वेळोवेळी अहवालांमधून प्रसिध्द केली जाते. त्यामुळे "अणुशक्तीकेंद्रांमधून सतत मोठ्या प्रमाणात किरणोत्सार होत राहतो" असा अपप्रचार कोणी करत असेल तर तो धादांत खोटा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

. . . . . . .  . . . . . . . . 

किरणोत्सार - मानवजातीवरील अरिष्ट की बागुलबुवा? (भाग -३)

अणुशक्तीकेंद्रांमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्यक्ष किरणोत्सारावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले गेले असले तरी याला दुसरी एक बाजू आहे. रिअॅक्टरमधून बाहेर काढलेले वापरलेले इंधन (स्पेंट फ्यूएल) कमालीचे रेडिओअॅक्टिव्ह असते. शिवाय त्यामधून एवढी जास्त ऊष्णता बाहेर पडत असते की विद्युतकेंद्र बंद असले तरीही त्या इंधनाला थंड करण्यासाठी त्यामधून पाण्याचा प्रवाह चालत रहावा यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागते. एरवी रिअॅक्टरमधून ऊष्णता बाहेर काढण्यासाठी त्यामधून जाणारे शीतलक (कूलंट), तसेच वापरलेले इंधन (स्पेंट फ्यूएल) थंड करण्यासाठी वापरलेले वेगळे पाणी यांमध्ये रेडिओअॅक्टिव्ह द्रव्यांचे कण मिसळलेले आणि विरघळलेले असल्यामुळे तेसुध्दा किरणोत्सारी बनते. हे पाणी क्षेपक(पंप), उष्णता-विनिमयक(हीट एक्स्चेंजर्स) आदि उपस्करांमधून (इक्विपमेंट्समधून) फिरत असते. निरनिराळ्या गाळण्यां(फिल्टर)मधून तसेच आयॉनएक्स्चेंजर्समधून त्याचे शुध्दीकरण केले जाते, तेंव्हा हा रेडिओअॅक्टिव्ह कचरा त्यात जमा होतो. याखेरीज रिअॅक्टरच्या सान्निध्यात येणारी यंत्रे, उपकरणे, पाण्याचे पाइप, टाक्या वगैरे सर्वच गोष्टी रेडिओअॅक्टिव्ह द्रव्यांच्या संसर्गाने दूषित (काँटॅमिनेटेड) होत असल्याने त्यांना स्वच्छ (डिकाँटॅमिनेट) करावे लागते. कधी कधी त्या बदलाव्या लागतात. यातून उत्पन्न झालेल्या सर्व किरणोत्सारी कचऱ्याची विल्हेवाट अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. त्यासाठी प्रत्येक अणूशक्तीकेंद्रात एक मोठा वेस्ट मॅनेजमेंट विभाग असतो. केंद्रामधून बाहेर सोडल्या किंवा टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाची चाचणी करून त्याची उच्च, मध्यम आणि निम्न पातळीचा कचरा (हाय, मीडियम व लो लेव्हल वेस्ट) यात विभागणी केली जाते. त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची व्यवस्थित नोंद ठेवूनच नियमानुसार त्याची योग्य प्रकारे वासलात लावली जाते.

पण काही कारणाने त्यातून काही द्रव्ये पर्यावरणात मिसळली गेली तर ती हवा, पाणी, अन्न यामधून माणसांच्या शरीरात प्रवेश करू शकतात. शरीरात जाऊन त्याचा भाग बनलेली किरणोत्सारी द्रव्ये अल्फा किंवा बीटा रे यांचे प्रक्षेपण करत असतील तर ते किरण शरीराच्या आतल्या इंद्रियांवर प्रभाव टाकू शकतात. चेर्नोबिलच्या अपघातात रिअॅक्टर व्हेसल आणि बिल्डिंगचे छप्पर उडून त्यांच्या आतील किरणोत्सारी द्रव्ये मोठ्या प्रमाणात वातावरणात मिसळून इतरत्र पसरली आणि त्यांच्यामुळे बरीच हानी झाली. फुकुशिमा येथील अपघातात त्यांचे प्रमाण प्रत्यक्षात मर्यादेच्या फारसे पलीकडे गेले नव्हते, तिथे झालेल्या किरणोत्सारामुळे कोणीही दगावले नाही किंवा पंगू झाले नाही. पण कदाचित तसे होण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि प्रतिबंधक उपाय म्हणून लाख दोन लाख लोकांचे त्या भागामधून स्थलांतर करावे लागले होते. थ्री माइल आयलंडमध्ये यातले काहीच झाले नाही. बाहेर सारे आलबेल राहिले. फक्त रिअॅक्टरचा सत्यानाश झाल्यामुळे आर्थिक नुकसान तेवढे झाले. जगामधील इतर सुमारे चारशे रिअॅक्टर्समध्ये अशी आणीबाणीची वेळ कधी आली नाही. एकंदरीत पाहता अणुऊर्जाकेंद्रांचा सुरक्षेतिहास (सेफ्टी रेकॉर्ड) इतर कोणत्याही उद्योगापेक्षा खूप चांगला राहिलेला आहे.

वापरलेले इंधन (स्पेंट फ्यूएल) कुठे ठेवायचे हा एक सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे आणि त्याला अनेक बाजू आहेत. औष्णिक केंद्रांमधील कोळशाची राख पूर्वी एका मोठ्या उघड्या खड्ड्यात टाकून दिली जात असे, पण आता पर्यावरणावरील प्रभाव पाहता तिचा इतर कामांसाठी उपयोग करणे सक्तीचे झाले आहे. अणुऊर्जेमधले स्पेंट फ्यूएल अत्यंत किरणोत्सारी असल्यामुळे ते असे उघड्यावर टाकूनही देता येत नाही किंवा इतर कामांसाठी तिचा उपयोग करूनही घेता येत नाही. ते एका अभेद्य अशा कवचात गुंडाळून जमीनीखाली खोलवर पुरून ठेवणे हा एक उपाय आहे आणि काही प्रमाणात तो अंमलात आणला जात आहे. पण तो तरी किती सुरक्षित आहे ? शतकानुशतकानंतर ते कवच असेच अभेद्य राहणार आहे का ? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यांची खात्रीलायक तसेच व्यावहारिक (प्रॅक्टिकल) उत्तरे शोधण्यासाठी सर्वत्र संशोधन चालले आहे. कोळसा जळून गेल्यानंतर त्यातून धूर निघतो आणि राख शिल्लक राहते, त्यानंतर न जळलेला फारसा कोळसा शिल्लक रहात नाही. पण अणूइंधनाची गोष्ट वेगळी असते. सध्याच्या तंत्रज्ञानाप्रमाणे रिअॅक्टरमध्ये घातलेल्या इंधनापैकी एकादा टक्काच खर्च होते. त्यामधून बाहेर काढलेल्या इंधनातसुध्दा त्यातले निदान ९८ - ९९ टक्के इंधन शिल्लक असते आणि नवे तंत्रज्ञान विकसित झाल्यास भविष्यात त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. यामुळे आजचे स्पेंट फ्यूएल हा उद्याचा उपयुक्त असा कच्चा माल या दृष्टीने त्याच्याकडे पाहिले जाते. ते सांभाळून ठेवण्यात सध्या तरी काहीच तांत्रिक अडचणही नाही. ते जर अतिरेक्यांच्या हाती लागले तर त्याचा दुरुपयोग होईल वगैरे शंका इतर कित्येक गोष्टींच्या बाबतीतसुध्दा काढता येतील. सध्या तरी ते इंधन कडेकोट बंदोबस्तात सांभाळून ठेवणे एवढाच चांगला उपाय आहे.

मोटारीचा किंवा साखरेचा कारखाना चालत असतांना काही आपत्ती उद्भवली तर त्यातील सारी यंत्रे बंद करून ठेवता येतात, पण अणुविद्युतकेंद्र असे बंद करता येत नाही. त्यामध्ये चालत असलेली अणूंच्या विखंडनाची क्रिया कंट्रोल रॉड्सद्वारा पूर्णपणे थांबवली तरी आधीच्या विखंडनातून निर्माण झालेले नवे अणू अत्यंत उद्दीप्त (एक्सायटेड) झालेले असतात आणि त्यांच्या गर्भामधून ऊष्णता बाहेर पडतच राहते. ती हळू हळू शून्यावर येण्यास काही दिवस लागतात. तोपर्यंत अणुभट्टीला थंड करत राहणे अत्यंत आवश्यक असते. या वर्षी फुकुशिमा येथे झालेल्या अपघातात ते करता आले नाही. त्यामुळे रिअॅक्टरमधील पाण्याचे तपमान वाढत जाऊन त्याची वाफ झाली, त्याचा दाब वाढला, इंधनाचे तपमान वाढतच गेल्याने त्या पाण्यामधून हैड्रोजन वायू बाहेर पडला, तो रिअॅक्टर व्हेसलच्या बाहेर येऊन जमा झाला आणि त्याचा हवेशी संयोग होऊन स्फोट झाला. असे काही होऊ नये म्हणून इंधनाला थंड करण्यासाठी अनेक प्रकारच्या पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवलेल्या असतात आणि त्या आपले काम व्यवस्थित रीत्या सांभाळतात. गेल्या पन्नाससाठ वर्षांहून अधिक काळात शेकडो रिअॅक्टर हजारो वेळा सुरळीतपणे बंद आणि सुरू झाले आहेत. या काळात फक्त तीन दुर्घटना घडल्या. थ्री माइल आयलंडमध्ये एका चुकीच्या निर्णयामुळे ही पर्यायी यंत्रणा थांबवली गेली. कोणत्याही चालकाला (ऑपरेटरला) तसे करताच येणार नाही अशी तरतूद त्यानंतर करण्यात आली आहे. चेर्नोबिल या एका वेगळ्या प्रकारच्या रिअॅक्टरमध्ये ती यंत्रणा एरवी काम करायची, पण दुर्घटनेच्या वेळी निर्माण झालेल्या विशिष्ट आणि गंभीर परिस्थितीमध्ये ती अपुरी पडली. त्या प्रकारचे रिअॅक्टर आता उभारले जात नाहीत. फुकुशिमामध्ये आलेल्या ऐतिहासिक सुनामी आणि भूकंपानंतरसुध्दा आधी सारे रिअॅक्टर त्या धक्क्यातून वाचले होते पण सुनामीने माजवलेल्या अनपेक्षित हाहाःकारात रिअॅक्टर्सना थंड ठेवणारी पर्यायी व्यवस्था कोलमडल्यामुळे तो तापत गेला. एकाच वेळी चारही पॉवर प्लँट्स बंद पडले, डिझेल इंजिने आणि डिझेलचे साठे महापुरात बुडाले, बाहेरून वीज आणणारे विजेचे खांब पडले, रस्ते उध्वस्त झाले, यामुळे बाहेरून मदत मिळणे अशक्य झाले. अशी अनेक संकटे एकदम आल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती उद्भवत गेली. आतापर्यंत ज्या दुर्घटना घडल्या त्यांच्यापासून धडे घेऊन सुधारणा होत आल्या आहेत, आता फुकुशिमा येथील घटनाक्रमाचाही विचार करून भविष्यात यावरही मात केली जाईल.

मोटार किंवा साखर कारखाना जेंव्हा अखेर बंद पडतो तेंव्हा तिथली सगळी जुनी यंत्रसामुग्री काढून टाकून त्या जागी आणखी काही करता येते. पण अणुशक्तीकेंद्राच्या बाबतीत तसे करता येत नाही. त्या केंद्रामधील यंत्रसामुग्रीच नव्हे तर मुख्य इमारतीसुध्दा किरणोत्सारामुळे दूषित झालेल्या असतात. त्यातील प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक तपासून त्यांची योग्य त्या प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे असते. याला डीकमिशनिंग असे म्हणतात. यासाठी भरपूर खर्च तर येतो, पण त्यातून काहीच उत्पन्न मिळत नाही. इथल्या वस्तू भंगार म्हणूनसुध्दा विकता किंवा वापरता येत नाहीत. तिथल्या मातीतसुध्दा काही रेडिओअॅक्टिव्ह द्रव्ये मुरलेली असल्यामुळे ती जमीन सहजासहजी इतर कामासाठी उपयोगात आणण्यात अडचणी येण्याची शक्यता असते. पहिल्या पिढीमधील पॉवर स्टेशन्स आता या अवस्थेला पोचली आहेत. हा खर्च करण्यासाठी खाजगी कंपन्या तयार नसतील किंवा त्याच बंद पडल्या तर त्यासाठी कोण पैसे देईल ? या मुद्द्यावर वादविवाद चालले आहेत. भारतामध्ये आतापर्यंत बांधलेली सर्व अणुविद्युत केंद्रे सरकारच्याच किंवा सरकारी कंपनीच्या मालकीची असल्यामुळे ती सरकारचीच जबाबदारी पडते. पेन्शन फंडासारखी काही आर्थिक तरतूद सुरुवातीपासून केली तर त्यामधून भविष्यकाळात निधी जमा होऊ शकेल. असा निधि गोळा केला जात आहे. सध्या तरी जुनी केंद्रे चालतील तेवढी चालवत रहायची असे धोरण अवलंबले जात आहे.

अॅटॉमिक रिअॅक्टर आणि अॅटम बाँब या दोन्हींमध्ये अणूचे विघटन या एकाच क्रियेचा उपयोग होत असल्यामुळे अणुशक्तीकेंद्रात कोठल्याही क्षणी आण्विक विस्फोट होऊ शकतो अशी बेफाम विधाने काही लोक करतांना दिसतात. पण या दोन गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. त्यांच्या रचना संपूर्णपणे निराळ्या असतात. बिरबलाने झाडाच्या उंच फांदीवर टांगलेल्या मडक्यातली खिचडी कदाचित कधीतरी शिजेलही, पण अणुभट्टीचे रूपांतर अणूबाँबमध्ये होण्याची शक्यता तेवढीही नसते. अणुविद्युतकेंद्र सुरू केल्यानंतर त्याची शक्ती(पॉवर) शून्यापासून क्षमतेपर्यंत वाढवण्यासाठी विघटन क्रिया थोडी तीव्र करावी लागते आणि त्याची व्यवस्था केलेली असते. पण ती क्षमतेच्या पलीकडे जाऊ लागली, किंवा जास्तच वेगाने वाढायला लागली तर ती आपोआप आणि ताबडतोब पूर्णपणे बंद पडावी अशी व्यवस्था असते. रिअॅक्टर बंद पडला तरी चालेल, पण अनियंत्रित होता कामा नये या पायावर त्याची नियंत्रक यंत्रणा (कंट्रोल सिस्टिम) उभारलेली असते. त्यामुळे अपघाताने तर नाहीच, पण घातपाती कृत्याने सुध्दा असे होऊ शकत नाही.

एवढे गुणात्मक (क्वालिटेटिव्ह) विवरण झाल्यानंतर आता पुढील भागात थोडी महत्वाची आकडेवारी पाहू.



किरणोत्सार - मानवजातीवरील अरिष्ट की बागुलबुवा? (भाग -४)

खोलीमध्ये लख्ख उजेड आहे की अंधुक प्रकाश आहे, ताटातला भात ऊन ऊन आहे की गारढोण आहे हे आपल्याला कोणीही न सांगता समजते. मात्र आपल्या शरीरातून कितीही क्ष किरण आरपार गेले तरी आपल्याला त्यांचा पत्ता लागत नाही. प्रयोगशाळांमध्ये आढळलेल्या काही अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घटनांची कारणे शोधतांना अदृष्य किरणांचे अस्तित्व समजले आणि तशा प्रकारच्या परिणामांवरून त्यांचे मोजणे सुरू झाले. या किरणांमधील ऊर्जेचा विचार करून राँट्जेन नावाचे एकक (युनिट) पूर्वी ठरवले गेले. पण हे किरण कोणत्याही वस्तूच्या आत शिरले आणि पुन्हा बाहेर पडले तर त्यांच्याकडे बरीच ऊर्जा शिल्लक असते. अर्थातच त्यामधील जेवढी ऊर्जा या प्रवासात खर्च झाली तेवढ्याचाच परिणाम त्या पदार्थावर होणार. याचा विचार करून रॅड (radioactivity absorbed dose) हे वेगळे युनिट बनवले गेले. पण निरनिराळ्या प्रकारच्या रेडिएशनमुळे होणारे हे परिणाम प्रत्येक पदार्थांच्या बाबतीत वेगळे असतात. माणसाच्या शरीरावर होणारे परिणाम आपल्या दृष्टीने महत्वाचे असतात. यासाठी रेम (Roentgen equivalent man) हे एकक वापरले जाते. वरील अमेरिकन युनिट्सच्या ऐवजी आता ग्रे(Gy) आणि सीव्हर्ट(Sv) ही आंतरराष्ट्रीय एकके इतर देशांमध्ये सर्रास उपयोगात आणतात. पण अमेरिकेत अजूनही पौंड, मैल आणि गॅलन चालतात, त्याच प्रमाणे या बाबतीतसुध्दा ते आपली जुनीच युनिटे वापरतात. या दोन्हींमध्ये १०० पटींचा फरक आहे. १ ग्रे म्हणजे १०० रॅड आणि एक सीव्हर्ट म्हणजे १०० रेम होतात. पण ही मूल्ये उपयोगाच्या दृष्टीने फार मोठी असल्यामुळे मायक्रोसीव्हर्ट (μSv) आणि मिलिरेम (mrem) या युनिट्समध्ये नेहमीचे काम चालते. मायक्रो म्हणजे दहालक्षांश आणि मिनि म्हणजे सहस्रांश असल्यामुळे १ मिलिरेम (mrem) म्हणजे १० मायक्रोसीव्हर्ट (μSv) होतात.


आता या युनिट्समधील काही आकडेवारी पाहू.


नैसर्गिक किंवा पार्श्वभूमीवरील किरणोत्सारामुळे मिळालेला सरासरी वार्षिक डोस (The average 'background' dose of natural radiation)
जागतिक सरासरी २.४ मिलिसीव्हर्ट (mSv) - स्थानिक पातळ्या १ पासून १० मिलिसीव्हर्ट (mSv)
अमेरिका ३६० मिलिरेम mrem - ३.६ मिलिसीव्हर्ट (mSv) -- काही ठिकाणी १००० मिलिरेम - १० मिलिसीव्हर्ट (mSv)


जास्तीच्या डोससाठी आयसीआरपीच्या वार्षिक मर्यादा -
नेहमीसाठी - कामगारांसाठी २० मिलिसीव्हर्ट (mSv) - ५ वर्षांची सरासरी
जनतेसाठी १ मिलिसीव्हर्ट (mSv) - १००० मायक्रोसीव्हर्ट (μSv)

आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये - कामगारांसाठी १०० ते १००० मिलिसीव्हर्ट (mSv)
जनतेसाठी २० ते १०० मिलिसीव्हर्ट (mSv)

या मर्यादा फक्त अणुकामगारांसाठी नसून त्या इस्पितळे, कारखाने, खाणी, हवाई वाहतूक इत्यादी सर्व संबंधित क्षेत्रांसाठी आहेत.

भारतीय रिअॅक्टर्सचा अनुभव - जनतेसाठी
जुने रिअॅक्टर्स - प्रतिवर्ष ७ ते ३० मायक्रोसीव्हर्ट (μSv) सरासरी सुमारे १३
नवे रिअॅक्टर्स- प्रतिवर्ष ०.३ ते ७ मायक्रोसीव्हर्ट (μSv) सरासरी सुमारे २
एईआरबी मर्यादा १००० मायक्रोसीव्हर्ट (μSv)

कामगारांना मिळालेला सरासरी डोस - ०.३ ते ४ मिलिसीव्हर्ट (mSv)
एईआरबी मर्यादा २० मिलिसीव्हर्ट (mSv)

किरणोत्साराचा प्रभाव
० ते १००० मिलिसीव्हर्ट (mSv) - काही नाही - रेफरन्स डोस

१००० ते २००० मिलिसीव्हर्ट (mSv) - तात्पुरता थकवा
२००० ते ३००० मिलिसीव्हर्ट (mSv) - थकवा, उलट्या - महिना ते वर्षभरात पुन्हा ठीक
३००० ते ६००० मिलिसीव्हर्ट (mSv) - थकवा, उलट्या - मृत्यूची शक्यता
६००० ते १०००० मिलिसीव्हर्ट (mSv) - भीषण थकवा - निश्चित मृत्यू

अमूक इतक्या डोसमुळे कँसर होतो अशी काही आकडेवारी उपलब्ध नाही. किरणोत्सारामुळे, अगदी नैसर्गिक कारणामुळेसुध्दा, तो होण्याची टक्केवारी थोडीशी वाढते. प्रदूषण, रासायनिक खते, जंतूनाशके, वनस्पती तूप, सेलफोन, पिझ्झा, बर्गर वगैरेंमुळे सुध्दा ती वाढते असे सांगितले जात असते.
हिरोशिमा आणि नागासाकीवरील बाँबहल्ले आणि चेर्नोबिल येथील अपघात यामध्ये ज्या लोकांना एकाच वेळी खूप मोठा डोस मिळाला त्यामधील थोड्या लोकांना (प्रत्येकाला नाही) नंतर कँसर झाला. त्यामुळे असा तीव्र किरणोत्सार मात्र घातक आहे असे म्हणता येईल.

वरील डोसची आकडेवारी आणि परिणामांची माहिती यावरून असे दिसते की जनतेसाठी ठेवलेल्या मर्यादेच्या १००० पट डोस मिळाल्यानंतर त्याचा प्रभाव दिसतो.
कामगारांसाठी असलेल्या सामान्य मर्यादेच्या ५० पट डोस मिळाल्यानंतर त्याचा प्रभाव दिसतो.

भारतामधील जनतेला प्रत्यक्षात मिळत असलेला डोस वरील मर्यादांच्या एक शतांश इतका कमी आहे आणि नैसर्गिक डोसच्या मानाने १ ते ५ टक्के एवढाच आहे.
आणि कामगारांना मिळणारा डोस मर्यादेच्या एक पंचमांश ते एक पन्नासांश आणि सुमारे नैसर्गिक डोसच्या एवढाच आहे.

आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सुध्दा जनतेसाठी ठेवलेल्या मर्यादेच्या १० ते ५० पट डोस मिळाल्यानंतर त्याचा प्रभाव दिसतो.
कामगारांसाठी असलेल्या सामान्य मर्यादेच्या १ ते १० पट डोस मिळाल्यानंतर त्याचा प्रभाव दिसतो. त्याच्याही दोनतीनपटीवर गेल्यास तो घातक ठरतो.

पण अशी परिस्थिती चेर्नोबिलनंतर गेल्या पस्तीस वर्षात कधी आली नाही,

मला वाटते की हे आकडे पुरेसे बोलके आहेत. आता अणुशक्तीमुळे होत असणाऱ्या किरणोत्साराला घाबरायचे की नाही हे आपल्यावर आहे. आदिमानव आगीलासुध्दा भीत असे, आजसुध्दा आगीमध्ये होरपळून मरणाच्या बातम्या रोज वाचायला मिळतात, पण एकंदरीत पाहता मानवाने अग्नीच्या भयावर विजय मिळवला आहे. धीटपणे आणि सावधपणे त्याचा उपयोग करून त्याने आपले पूर्ण जीवन बदलून टाकले आहे. किरणोत्साराच्या बागुलबुवाला घाबरून अणुशक्तीचा उपयोग करणेच टाळायचे की आवश्यक तेवढी सावधगिरी बाळगून तिचा उपयोग करून घ्यायचा हे आपणच ठरवायचे आहे.

Friday, December 23, 2011

चल रे भोपळ्या टुणुक् टुणुक्




एक गरीब बिचारी म्हातारी होती. तिला खायला पुरेसे अन्न मिळत नसल्याने तिचे पोट पाठीला लागले होते, गालफडे खप्पड झाली होती आणि हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. एकदा तिने आपल्या मुलीकडे जायचे ठरवले. तिची वाट एका घनदाट अरण्यामधून जात होती. वाटेत समोरून एक वाघोबा आला. तो तिला खाणार हे पाहताच म्हातारी त्याला म्हणाली, "अरे वाघोबा, माझ्या अंगात आता फक्त हाडे आणि चामडी तेवढीच शिल्लक राहिली आहे, ती खाऊन तुझे पोट काही भरणार नाही. त्यापेक्षा तू थोडे दिवस माझी वाट पहा, मी माझ्या लेकीकडे जाईन, दूध, तूप, लोणी वगैरे खाऊन पिऊन धष्टपुष्ट होऊन परत येईन तेंव्हा तू मला खा." वाघाला तिचे सांगणे पटले आणि त्याने तिला सोडून दिले. पुढे त्या म्हातारीला सिंह, चित्ता, तरस, अस्वल, लांडगा वगैरे वन्य पशू भेटले, त्या सर्वांना हेच सांगून म्हातारी पुढे गेली.

लेकीकडे गेल्यावर लेकीने म्हातारीला चांगले चुंगले खायला घातले, खाऊन पिऊन तिचे गाल वर आले, पोट सुटले आणि सर्वांगाला चांगली गोलाई आली. धडधाकट झाल्यानंतर काही दिवसांनी म्हातारी आपल्या घरी परत जायला निघाली. पण पुन्हा त्या वाटेने जातांना वाटेत ती रानटी श्वापदे भेटतील आणि या वेळी मात्र ती तिला सोडणार नाहीत. आता काय करायचे हा प्रश्न पडला. म्हातारीच्या मुलीने एक जादूचा मोठ्ठा भोपळा आणला, त्यात एक खिडकी कापून म्हातारीला आत बसवले आणि पुन्हा बाहेरून झाकण लावून टाकले. हवा आत येण्यासाठी आणि बाहेरचे दिसण्यासाठी दोन लहानशी छिद्रे तेवढी ठेवली. "चल रे भोपळ्या टुणुक् टुणुक्" असे म्हंटले की तो भोपळा उड्या मारत पुढे जायचा. त्यात बसून म्हातारी निघाली. वाटेत कोणताही हिंस्र प्राणी दिसला की म्हातारी म्हणायची, "चल रे भोपळ्या टुणुक् टुणुक्, म्हातारीचे घर दूर". लगेच तो भोपळा जोरात टणाटण् उड्या मारू लागायचा. भोपळा हे काही त्यांचे भक्ष्य नसल्याने त्याला पाहूनते प्राणी पळून जायचे. असे करत ती म्हातारी आपल्या घरापर्यंत सुखरूप पोचली.

ही गोष्ट मी लहानपणी अनेक वेळा ऐकली होती आणि तीन पिढ्यांमधल्या लहान मुलांना असंख्य वेळा सांगितली आहे. जंगलात गेल्यानंतर म्हातारीला कोणकोणते प्राणी भेटले, ते कसे दिसतात, कसे आवाज काढतात वगैरे त्यांना विचारले आणि हावभाव करून सांगितले की त्यात ती रमतात आणि म्हातारीच्या मुलीने तिला काय काय खाऊ घातले याची चर्चा सुरू केली की मग विचारायलाच नको ! पेरू, चिक्कू, आंबे वगैरेंपासून थेट पास्ता, मॅकरोनी आणि नूडल्सपर्यंत सगळे स्वादिष्ट खाद्यपदार्थ त्या गोष्टीतल्या म्हातारीला खायला मिळतात. मग ती चांगली गलेलठ्ठ होईलच नाही का? बहुतेक मराठी मुलांनी ही गोष्ट लहानपणी ऐकलेली असते आणि कदाचित त्यातून त्यांना भोपळ्याची ओळख झालेली असते.

भोपळ्यासंबंधी आणखी काही मजेदार गोष्टी आहेत. एक नवी नवरी पहिल्यांदाच माहेरी जाऊन सासरी परत आली तेंव्हा तिच्या आईने पापड, सांडगे, लोणची, मुरंबे वगैरे भरपूर गोष्टी तिला बांधून दिल्याच, परसदारी असलेल्या वेलीला लागलेला एक भोपळा तिच्यासोबत पाठवून दिला. सुनेने दुस-या दिवशी तो चिरला आणि जेवणात भोपळ्याची भाजी केली. तिच्या नव-याला ती आवडत नव्हती, तरीसुध्दा उत्साहाच्या भरात असलेल्या बायकोचा हिरमोड होऊ नये म्हणून त्याने ती "छान झाली आहे" असे म्हणत खाल्ली. त्या काळात रेफ्रिजरेटर नव्हते आणि अन्न वाया घालवायचे नाही अशी शिकवण होती. त्यामुळे संध्याकाळी सुनेने भोपळ्याचे भरीत केले. या वेळी प्रशंसा न करता नव-याने त्यात आणखी दही मिसळून त्याच्या चवीने खाल्ले. दुस-या दिवशी सुनेला उपास होता. तिने शेंगदाण्याचे कूट मिसळून आणि तुपातली जि-याची फोडणी देऊन भोपळ्याची उपासाची भाजी बनवली. तीही नव-याने कशीबशी संपवली. रात्रीच्या जेवणात भोपळ्याची थालीपिठे आली. ती खाल्ल्यावर मात्र नव-याच्या रोमारोमात भोपळा भिनला, त्याच्या डोक्यात शिरला किंवा त्याच्या अंगात आला आणि तोच टुणुक टुणुक उड्या मारत सुटला.

त्याही पूर्वीच्या काळात बालविवाह रूढ होता. बारा तेरा वर्षांपर्यंतचा मुलगा आणि सातआठ वर्षांची मुलगी यांचे लग्न लावून देत असत. पण त्यानंतरसुध्दा ती मुलगी वर्षामधला बराचसा काळ माहेरी व्यतीत करत असे. दस-याला सोने किंवा संक्रांतीला तिळगूळ देणे अशा निमित्याने सणावारी जावई आपल्या सासुरवाडीला जाऊन येत असे. प्रत्येक वेळी परत जातांना त्याला एकादी चांगली भेटवस्तू दिली जात असे. पण एका लोभी वरमाईचे अशा मिळालेल्या भेटीतून समाधान व्हायचे नाही. पुढच्या वेळी काही अधिक चांगले घसघशीत पदरात पडेल अशा आशेने काही तरी निमित्य काढून ती आपल्या मुलाला पुन्हा पुन्हा सासुरवाडी पाठवायची. हे त्या सास-याच्या लक्षात आले. एकदा त्याचा जावई असा विनाकारण येऊन परत जायला निघाला तेंव्हा सास-याने एक भला मोठा भोपळाच त्याच्या हातात ठेवला. त्या काळात वाहने नव्हतीच. पायीच प्रवास करावा लागत असे. बिचारा मुलगा तो भोपळा घेऊन कधी या खांद्यावर, कधी त्या खांद्यावर, कधी डोक्यावर धरून आणि पुन्हा तिकडे फिरकायचे नाही असे मनोमन ठरवत घामाघूम होऊन आपल्या घरी परत आला. या वेळी जावयाला त्याच्या सासुरवाडकडून काय मिळाले याची चौकशी करायला शेजारच्या साळकाया माळकाया टपून बसलेल्या होत्या. त्या सगळ्या गोळा झाल्या. थोडीशी वरमलेली वरमाई त्यांना म्हणाली, "अहो, काय सांगू ? सासरा उदार झाला आणि हातात भोपळा दिला !"

हीच गोष्ट थोड्या फरकाने एका कंजूस राजाबद्दल सांगितली जाते. राजाकडून चांगले घबाड मिळेल या आशेने त्याच्याकडे जाऊन त्याची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणा-या एका भाटाला तो राजा खूष होऊन फक्त एक भोपळा बक्षिस देतो. कोणाकडून खूप मोठ्या आशा असतांना असा भ्रमनिरास झाल्यावर "राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला !" असे म्हंटले जाते. कधी कधी माणसे एका वेगळ्याच कल्पनेच्या जगात आनंदाने विहार करत असतात, त्यांना जेंव्हा वस्तुस्थितीची जाणीव होते तेंव्हा त्यांच्या 'भ्रमाचा भोपळा' फुटतो. "विळ्यावर भोपळा मारला काय किंवा भोपळ्यावर विळा मारला काय, परिणाम एकच !" अशा अर्थाची एक हिंदी म्हण आहे. भोपळ्याच्या दृष्टीने पाहता दोन्ही वाईटच ! त्यामुळे या दोघांमध्ये सख्य होण्याची शक्यताच नसते. तरीसुध्दा काही वेळा तसे दाखवावे लागते. अशा संबंधांना 'विळ्याभोपळ्याएवढे सख्य' असे नाव आहे.

वास्तविक पाहता लिंबू, संत्रे, मोसंबे वगैरे बरीच फळे भोपळ्यापेक्षाही जास्त गोलाकार असतात. पण शून्याचे प्रतिनिधित्व मात्र भोपळाच करतो. हिंदी भाषेच्या प्रभावामुळे काही लोक शून्याला 'अंडा' वगैरे अलीकडे म्हणायला लागले आहेत, पण बहुतेक लोकांना अजूनही 'शून्य' या शब्दाच्या पुढे 'भोपळा'च आठवतो. त्यामुळे गोष्टींमध्ये मजेदार वाटणारा भोपळा जेंव्हा परीक्षेमध्ये आपल्या उत्तरपत्रिकेत मिळतो तेंव्हा मात्र आपली धडगत नसते. तसेच क्रिकेटच्या मैदानात जाऊन 'भोपळा' काढून परतलेल्या बॅट्समनची प्रेक्षक हुर्रेवडी उडवतात. शून्याशी असलेल्या भोपळ्याच्या संबंधाचा मला मात्र भूगोल शिकतांना चांगला उपयोग झाला. कोणता 'अक्षांश' आणि कोणता 'रेखांश' यात आधी संभ्रम व्हायचा, पण पृथ्वी - गोल - शून्य - भोपळा - त्यावर दिसणा-या उभ्या रेषा - रेखांश अशी साखळी तयार झाल्यानंतर रेखांशाची संकल्पना मनात पक्की झाली.

भोपळ्याच्या चार पदार्थांचा उल्लेख वर आलेलाच आहे. ते तर निरनिराळ्या प्रकाराने बनवले जातातच, त्याशिवाय भोपळ्यांच्या पापडांपासून त्याच्या वड्यांपर्यंत अनेक पदार्थांचा समावेश माझ्या खाद्ययात्रेत झाला आहे. आजकाल शहरांमधल्या भाजीबाजारात अर्धा पाव किलो भोपळा कापून मिळतो, पण माझ्या लहानपणी अशा प्रकारे भोपळ्याची फोड विकत आणलेली मला आठवत नाही. अवजड अख्खा भोपळा बाजारापासून घरापर्यंत उचलून आणणे आणि तो सगळा खाऊन संपवणे या दोन्ही गोष्टी जिवावर आणणा-या असल्यामुळे त्याची खरेदी नैमित्यिकच होत असे. कधी कधी बागेमधून घरात आलेल्या भोपळ्याचे मोठमोठे काप शेजारी पाजारी सढळ हाताने वाटून दिले जात. लग्नसमारंभासारख्या जेवणावळीत भोपळ्याची भाजी हमखास असायची, पण भोपळ्याच्या मोठ्या फोडींचा उपयोग द्रोणाला आधार देण्यासाठी 'अडणी' म्हणूनच होत असे. एकदा मात्र नागपूरकडच्या आचा-याने भोपळ्याच्या फोडी भरपूर तेलावर चांगल्या खरपूस भाजून आणि त्याला खसखस, खोबरे, वेलदोडे वगैरेंचे वाटण लावून इतकी चविष्ट भाजी केली होती की भोजनभाऊ लोकांनी मुख्य पक्वान्नाऐवजी त्या भाजीवरच जास्त ताव मारला.

कोहळा नावाचा भोपळ्याचा एक पांढरा प्रकार आहे, त्याला कदाचित भोपळ्याचा गोरापान सावत्रभाऊ म्हणता येईल. त्यापासून पेठा नावाची खास मिठाई तयार करतात. आग्र्याला गेल्यावर पौर्णिमेच्या पिठूर चांदण्यातला 'यमुनाकाठी ताजमहाल' जरी पाहिला, तरीसुध्दा संगमरवराच्या कापांसारखा दिसणारा तिथला पेठा खाल्ल्याशिवाय त्या सहलीचे सार्थक होत नाही. दक्षिण भारतात मात्र कोहळ्याच्या फोडी हा सांभाराचा आवश्यक भाग समजला जातो. कोहळ्याला थोडा उच्च दर्जा (हाय स्टेटस) मिळाला आहे. एकाद्याला आधी लहानशी वस्तू देऊन त्याच्याकडून मोठे काम करवून घेण्याला "आवळा देऊन कोहळा काढणे" असे म्हणतात. दुधी भोपळ्याचा आकार लांबट असतो आणि व्यंगचित्रांमधील आदिमानवाच्या हातातल्या सोट्याची आठवण करून देतो. त्याला हातात धरून डोक्याभोवती मुद्गलासारखा फिरवावे अशी इच्छा होते. पूर्वी पांचट समजल्या जात असलेल्या या भाजीमध्ये हृदयविकारांसकट अनेक आजारांचा प्रतिबंध करण्याचे गुण असल्याचे समजल्यापासून तिला जरा चांगले दिवस आले आहेत. उत्तर भारतात मात्र कोफ्ता आणि हलवा हे दोन अत्यंत चविष्ट खाद्यपदार्थ दुधी भोपळ्यापासून तयार करतात. हिंदी सिनेमांमधल्या आयांनी उगाचच 'गाजरका हलवा'चे स्तोम माजवून ठेवले आहे. दुधी हलवाही चवीला तितकाच छान लागतो, तो चांगला शिजलेला असतो आणि खव्याबरोबर त्याचा रंग जुळत असल्यामुळे तो चांगला दिसतोसुध्दा.
'खाणे' आणि 'गाणे' या मला अत्यंत प्रिय असलेल्या दोन विषयांना जोडणारा भोपळा हा बहुधा एकमेव दुवा असावा. हिंदुस्थानी तसेच कर्नाटक शास्त्रीय संगीतातला षड्ज स्थिर रहावा आणि त्याच्या अनुषंगाने इतर स्वरांनी आपापल्या जागा व्यवस्थितपणे घ्याव्यात यासाठी तानपु-याच्या तारा छेडून निघालेल्या स्वरांचा संदर्भासाठी आधार घेतला जातो. तंबो-याच्या तारांमधला ताण कमीजास्त केल्याने आपल्याला हव्या असलेल्या कंपनसंख्या असलेले स्वर त्यातून निघतात. ते स्वर चांगले घुमवून त्यांना सुश्राव्य करण्याचे काम तानपु-याचा भोपळा करतो. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या भोपळ्यांचे उत्पादन करून, ते भोपळे चांगले वाळवतात, त्यावर अनेक प्रकारचे लेप लावून त्यांना मजबूत तसेच टिकाऊ बनवतात. त्याला विवक्षित आकारात कापून, त्याला लाकडी पट्ट्यांची जोड देऊन आणि तारा, खुंट्या वगैरे त्यावर बसवून तानपुरा (तंबोरा) तयार होतो. त्याच्या भोपळ्याला घासून पुसून छान भरपूर चमकवले जातेच, त्यावर चित्रविचित्र आकाराची नक्षी रंगवून त्याला सुशोभित केले जाते. मोठ्या गायकांच्या भारी तानपु-यांवर हस्तीदंताची नक्षीसुध्दा चिकटवलेली दिसते. ध्वनिवर्धकांचा शोध लागण्यापूर्वी दूरवर बसलेल्या श्रोत्यांना स्वर ऐकू जाण्यासाठी तंबो-याच्या भोपळ्याची आवश्यकता होतीच, आजसुध्दा त्याची उपयुक्तता संपलेली नाही. पुराणकाळातील 'वीणावादिनि वरदे'च्या चित्रातल्या वीणेला दोन बाजूंना दोन भोपळे असतात. भोपळ्याचा हा उपयोग पुरातनकाळापासून चालत आला आहे असे यावरून दिसते.

मी दिवाळीच्या सुमाराला अमेरिकेत गेलो असतांना तिथल्या स्थानिक बाजारात जागोजागी भोपळ्यांचे मोठाले ढीग रचून ठेवलेले दिसले. अमेरिकेत अशा प्रकारे उघड्यावर भाजी विकली जात नाही आणि ते लोक मुख्यतः मांसाहारी असल्यामुळे भाज्या खाण्याचे प्रमाण एकंदरीतच खूप कमी असते. भोपळ्याची भाजी ते खात असतील असे मला कधीच वाटले नव्हते. त्यामुळे अचानक एवढे मोठे भोपळ्यांचे ढीग पाहून मला खूप आश्चर्य वाटले. पण हे भोपळे खाण्यासाठी नसून 'हॅलोविन' नावाच्या त्यांच्या उत्सवासाठी आणलेले आहेत असे समजले. 'हॅलोविन डे' हा एक प्रकारचा भुतांचा दिवस, किंबहुना रात्र असते. आपण दिवाळीला सुंदर व मंगलमय आकाशकंदील घरावर टांगतो, त्याच सुमाराला तिकडे येत असलेल्या हॅलोविन डे साठी भीतीदायक आकारांचे दिवे करून ते घराच्या बाहेर टांगले जातात. वाळलेल्या भोपळ्याला निरनिराल्या भयावह आकारांची छिद्रे आणि खिडक्या पाडून हे दिवे बनवतात आणि त्यातल्या पोकळीमध्ये दिवा ठेवतात. शिवाय चिंध्या आणि गवतापासून बुजगावण्यांसारखे भुतांचे पुतळे करून तेसुध्दा घरांच्या दाराबाहेर उभे करून ठेवतात. त्यांना आणि त्या भोपळ्यातून कोरलेल्या भयानक दिव्यांना पाहून असतील नसतील ती खरोखरची भुते घाबरून पळून जातात आणि वर्षभर त्रास द्यायला येत नाहीत असा समज त्यामागे असावा. हॅलोविन डे च्या संध्याकाळी एकाद्या मॉलसारख्या ठिकाणी गावातले उत्साही लोक जमा होतात. त्या दिवशी तिथे एक प्रकारची फॅन्सीड्रेस परेड असते. विशेषतः लहान मुलांना चिज्ञविचित्र पोशाख घालून आणतात. त्यांच्या हातात एक गोलाकार परडी धरलेली असते. कोणालाही ती दाखवून "ट्रिक ऑर ट्रीट" म्हंटले की मोठी माणसे त्यात चॉकलेटे, टॉफी वगैरे टाकतात. त्या ठिकाणी एकंदरीत वातावरण जत्रेसारखे मौजेचे असते. त्यात भीतीदायक असे फारसे काही नसते. रंगीबेरंगी आणि चित्रविचित्र पोशाखांमधल्या गोड मुलांना पहायला माणसे तर गर्दी करतातच, देवांना आणि भुतांना सुध्दा (ती असतील तर) तिथे यावेसे वाटेल. त्या जागी करण्यात येणा-या सजावटीतसुध्दा भोपळ्यांच्या विविध आकारांना प्राधान्य दिले जाते. यामुळे कधी कधी हॅलोविनला 'भोपळ्यांचा उत्सव' असेसुध्दा संबोधले जाते.
अशी आहे भोपळ्याची चित्तरकथा ! तिने कोणाच्या मनातल्या मनात 'टुणुक टुणुक' उड्या मारल्या तर ठीक आहे, नाही तर शून्यभोपळा मार्क !

Monday, December 19, 2011

श्रीनिवास खळे रजनी

मला भेटलेल्या ज्या लोकांचा माझ्या मनावर खोल ठसा उमटला अशा व्यक्तींची शब्दचित्रे 'तेथे कर माझे जुळती' या लेखमालिकांमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्यातल्या काही व्यक्ती खूप प्रसिध्द आहेत. त्यांच्या कारकीर्दीविषयी आधीच उदंड लेखन झालेले आहे, त्यात भर टाकण्यासाठी आणखी काही माझ्याकडे नाही आणि त्यांच्या कार्यक्षेत्रासंबंधी लिहिण्याचा मला अधिकार नाही या दोन कारणांमुळे मी त्याबद्दल विशेष लिहिले नव्हते. पण नंतर असा विचार माझ्या मनात आला की मी जे काही या ब्लॉगवर लिहिण्याचा प्रयत्न करत आहे त्यातल्या इतर विषयांना सुध्दा हेच निकष लावले तर ते सगळे लेख बहुधा रद्दबातल होतील. कारण या ठिकाणी लिहिलेल्या प्रत्येक लेखाच्या विषयावर असंख्य तज्ज्ञानी अगणित ग्रंथसंपदा आधीच निर्माण करून ठेवलेली आहे. त्यातली दोन चार पाने वाचूनच तर मला त्याचे थोडे ज्ञान प्राप्त झाले. त्यातल्या कोठल्याच विषयावर माझे प्रभुत्व आहे असेही मी म्हणू शकत नाही. मग मला त्यावर तरी लिहिण्याचा काय अधिकार आहे? असे म्हंटले की मग काहीही लिहायचे प्रयोजनच उरत नाही. पण हा प्रश्न मी सहा वर्षांपूर्वी निकालात काढला होता. कोणत्याही विषयावर याआधी खंडीभर लिहिले गेले असले तरी माझ्या लेखांच्या वाचकांनी ते सगळे वाचलेले असले पाहिजेच असे नाही. मी जे काही लिहिणार आहे ते कदाचित त्यांनी वाचले नसेल, किंवा आधी वाचले असले तरी त्यांना ते पुन्हा माझ्या शब्दात वाचावेसे वाटेल. माझ्या स्वतःच्या पाटीवर काय आणि किती लिहिण्याचा मला अधिकार आहे हे अखेर मीच ठरवायचे आहे. मला जे लिहावे असे माझ्या मनात आले ते इथे लिहायला काय हरकत आहे? इतर कोणी त्यातली चूक दाखवून दिली तर ती मान्य करायची तयारी ठेवली म्हणजे झाले.
स्व.श्रीनिवास खळे यांच्यावरील लेखात त्यांनी दिलेल्या दिव्य संगीतावर मी काही लिहिले नव्हते. पण काल श्रीनिवास खळे रजनीचा एक सुश्राव्य कार्यक्रम पाहिला आणि त्यावर लिहावेसे वाटले या कार्यक्रमाची सुरुवात 'जयजयमहाराष्ट्रमाझा' या समूह गीताने झाली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सोहळ्यासाठी कवी राजा बढे यांनी लिहिलेले हे गीत श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द करून घेतले होते. त्याची सुवर्णजयंतीसुध्दा होऊन गेली असली तरी या गीताची जादू पहिल्याइतकीच टिकून राहिली आहे. इतके आवेशपूर्ण दुसरे महाराष्ट्रगीत गेल्या पन्नास वर्षांच्या काळात मी तरी ऐकले नाही. 'सह्याद्रीचा सिंह गर्जतो' ऐकतांना त्याचा दरीदरीतून गुंजलेला नाद आपल्या काळजापर्यंत जाऊन भिडतो. शाहीर साबळे यांच्याइतका तडफदार आवाज इतर कोणापासून अपेक्षित नसला तरी मंदार आपटे आणि अजित परब यांनी प्रयत्नांची शर्थ केली.

१९७३ साली श्रीनिवास खळे यांनी तयार केलेल्या अभंग तुकयाचे या गीत संग्रहामध्ये संत तुकारामांचे वीस अभंग अजरामर करून ठेवले आहेत. संत तुकारामाच्या गाथेतील शेकडो अभंगांपैकी हे वीस अभंग निवडण्याचेच काम किती कठीण आहे ? खळे काकांनी यासाठी खूप मेहनत करून त्यांचा अभ्यास केला. या कार्यक्रमाचे निवेदक भाऊ मराठे यांच्या शब्दात त्यांनी या अभंगांमागची हिस्टरीच पाहिली नाही तर त्यामधील मिस्टरीचासुध्दा वेध घेतला. त्यांनी आधी काही अभंग निवडले, त्यांवर इतर तज्ज्ञांबरोबर चर्चा करून अखेर त्यातले वीस ठरवले, केवळ वीसच दिवसात त्यांना अप्रतिम चाली लावल्या आणि लता मंगेशकरांनी गाऊन त्यांना अमरत्व प्राप्त करून दिले. त्यातील 'सुंदर ते ध्यान' या अभंगाने श्रीनिवास खळे रजनीच्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि मध्यंतराच्या आधी 'भेटीलागी जीवा' हा अभंग वाद्यसंगीतात सादर केला गेला. हे अभंग वारकरी सांप्रदायामध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. पारंपरिक भजनाची सुरुवात 'सुंदर ते ध्यान' पासून करून त्याचा शेवट 'हेची दान देगा देवा' ने करण्याची प्रथा काही देवळांमध्ये करण्यात येणा-या भजनात आहे हे मी लहानपणी पाहिले आहे. पण श्रीनिवास खळे यांनी लावलेल्या चाली मात्र परंपरागत पध्दतींपेक्षा आगळ्या वेगळ्या आहेत. 'सुंदर ते ध्यान' मधील वर्णनाने विठ्ठलाचे देखणे रूप डोळ्यासमोर उभे राहते आणि ते पाहणे हेची सर्व सुख आहे असे तुकारामांनी का म्हंटले आहे ते समजते. 'भेटीलागी जीवा' या गाण्यात लतादीदींनी जी आर्तता व्यक्त केली आहे, तिने लागलीसे आस या शब्दांचा अर्थ लक्षात येतो. 'हेची दान देगा देवा' मध्ये तुकारामांनी देवापाशी केलेले मागणे किती मनापासून केले आहे हा भाव खळे यांच्या स्वररचनेतून व्यक्त होतो. पण या कार्यक्रमाची सांगता खळ्यांनीच स्वरबध्द केलेल्या 'आनंदाचे डोही आनंद तरंग' या वेगळ्या भैरवीने झाली. लतादीदींची 'अगा करुणाकरा', 'कन्या सासुराशीं जाये', 'कमोदिनी काय जाणे तो परिमळ', 'वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें', 'खेळ मांडीयेला वाळवंटी घाई' यासारखी गाणी आणि पं.भीमसेन जोशींच्या आवाजातले 'सावळे सुंदर रूप मनोहर', 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा', 'जे का रंजले गांजले', सुरेश वाडकरांचा 'काळ देहासी आला खाऊ' यासारखे खळ्यांनी स्वरबद्ध केलेले अप्रतिम अभंग तरीही गायचे राहिलेच.

'भावभोळ्या भक्तिची', 'रामप्रहरी राम-गाथा', 'मीरेचे कंकण', 'जय जय विठ्ठल रखुमाई' यासारखी मधुर भक्तीगीते खळ्यांनी दिली आहेतच, शिवाय 'लाज राख नंदलाला', 'रुसला मजवरती कान्हा', 'निळासावळा नाथ' यासारखी पौराणिक काळामधील गोष्टींवरील गाणीसुध्दा कधीकधी भक्तीसंगीतात खपून जात असत. टेलिव्हिजन येण्यापूर्वीच्या काळात मराठी माणसांची सकाळ आकाशवाणीवरील मंगल प्रभात या कार्यक्रमात रंगलेली असे. श्रीनिवास खळ्यांनी स्वरबध्द केलेला एकतरी अभंग किंवा भक्तीगीत एकल्याशिवाय ती प्रभात पुरेशी मंगलमय होत नसे.

'श्रावणात घननीळा' या गाण्याची निर्मिती कशी झाली याची चित्तरकथा भाऊ मराठ्यांनी सांगितली. त्यांची बोलण्याची शैली अशी आहे की खळे, पाडगावकर, यशवंत देव, शिरीष पै वगैरे सगळी दिग्गज मंडळी त्यांच्या रोजच्या उठण्याबसण्यातली वाटावीत. पूर्वी प्राध्यापक असतांना मंगेश पाडगावकर मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनने रोज प्रवास करत असत. हे मात्र खरे आहे कारण सत्तरीच्या सुरुवातीला मीसुध्दा मानखुर्द ते बोरीबंदर (आताचे सीएसटी आणि पूर्वीचे व्हीटी) पर्यंत हा प्रवास लोकलमधून करत होतो. त्यावेळी कधीकधी पाडगावकर मला पहिल्या दर्जाच्या डब्यात दिसत असत. त्यांच्या जाड भिंगांच्या चश्म्यामुळे ते दुरूनही सहज ओळखू येत असत. तर एकदा म्हणे या प्रवासातच त्यांना या गाण्याचा मुखडा सुचला.

श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा।
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा ।।

पाडगावकर पूर्वीच्या कोळीवाडा (आताच्या जीटीबीनगर) स्टेशनवर उतरले. मागच्या गाडीने श्रीनिवास खळे आले आणि दोघेही एकत्र पुढील मार्गाला लागले. त्या काळात मी श्रीनिवास खळ्यांच्या नावाशी परिचित होतो, पण त्यांनाच काय, त्यांचा फोटोसुध्दा पाहिला नव्हता, त्यामुळे मी पाहिले असले तरी त्यांना ओळखले नसेल. व्हीटी स्टेशनपर्यंत काही बोलायचे नाही असे खळ्यांनी पाडगावकरांना बजावले आणि तोपर्यंत त्या मुखड्याला चाल लावून ती त्यांना ऐकवली. अशाच प्रकारे पुढील चार दिवसात चार कडवी तयार झाली. यातील प्रत्येक अंतरा त्यातील अर्थानुरूप निरनिराळ्या सुरावटींमध्ये बांधला असला तरी त्यांच्यात मुखड्याशी सलगता आहे. लताबाईंच्या आवाजातले हे गाणे अनेकांच्या टॉपटेनमध्ये असणार यात शंका नाही.
त्यानंतर एकापाठोपाठ एकाहून एक सरस अशा भावगीतांची मालिका सुरू झाली. श्रीनिवास खळे हे तर भावसंगीताचे बादशहाच होते. पं.हृदयनाथ मंगोशकरांच्या आवाजातली 'लाजून हासणे अन्‌' आणि 'वेगवेगळी फुले उमलली' ही गीते झाली, सुरेश वाडकरांचे 'जेंव्हा तुझ्या बटांना', अरुण दाते आणि आशा भोसले यांचे युगलगीत 'सर्व सर्व विसरु दे', सुमन कल्याणपूर व अरुण दाते यांचे द्वंद्वगीत 'पहिलीच भेट झाली' इत्यादि छान छान गाणी सादर केली गेली. पं. वसंतराव देशपांडे यांनी गायिलेले कवी वा. रा. कांत यांचे 'बगळ्यांची माळ फुले' हे गीत भावसंगीतातला एक मैलाचा दगड आहे म्हणता येईल, एरवी भावगीते मोजून मापून बसवली जातात, पण वसंतरावांसारख्या पट्टीच्या गायकाला या गाण्यात पहाडी राग खुलवायला मोकळीक दिली आहे. आता त्यांचा नातू राहुल देशपांडे सुध्दा हे गाणे मस्त रंगवून सादर करतो. टीव्हीवरील एका कार्यक्रमात शंकर महादेवन याने या गाण्याची एकच ओळ बहारदार गाऊन दाखवली होती. 'पाणिग्रहण' या एका नाटकाचे संगीत दिग्दर्शन श्रीनिवास खळे यांनी केले होते. त्यातली 'उगवला चंद्र पुनवेचा', 'प्रीती सुरी दुधारी' आणि 'प्रेम हे वंचिता' ही या नाटकातली शास्त्रीय संगीतावर आधारलेली नाट्यगीते आजही गायली जातात आणि कानावर पडतात.

श्रीनिवास खळे यांना मराठी चित्रपटश्रृष्टीने विशेष जवळ केले नाही, इतक्या मोठ्या आणि गुणवान संगीतकाराला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच चित्रपट मिळाले. पण त्यातील चित्रगीते सुध्दा अमर झाली आहेत. 'सोबती' या चित्रपटामधील लता मंगेशकर यांचे 'साऊलीस का कळे उन्हामधील यातना' आणि आशाबाईंचे 'पाण्यातले पहाता प्रतिबिंब' तसेच लतादीदींचे 'जिव्हाळा' सिनेमातले 'या चिमण्यांनो परत फिरा रे' ही गाणी या कार्यक्रमात सादर करून त्याची चुणुक दाखवली गेली. खळे यांनी चित्रपटसंगीत फारसे दिले नाही आणि ज्या चित्रपटांना दिले ते सोज्ज्वळ स्वरूपाचे होते. त्यामुळे त्यात लावणीसाठी जागा नसेल. पण 'कळीदार कपूरी पान' या एका लावणीने त्यांनी आपले या क्षेत्रातले प्रभुत्व दाखवून दिले. माधुरी करमरकरने ही लावणी इतकी फक्कड गायली आणि निलेश परब याने ढोलकीची इतकी अफलातून साथ दिली की प्रेक्षकांनी वन्समोअरच्या गजराने सभागृह दणाणून टाकले.

श्रीनिवास खळे यांनी बडोद्याला असतांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते आणि रागदारीचे उत्तम ज्ञान त्यांना होते. पण मुख्यतः भावगीतांना स्वरसाज चढवतांना त्यांनी त्यात फार लांबलचक पल्लेदार ताना गुंफल्या नाहीत. शब्दांचा अर्थ खुलवण्याइतपतच त्यांचा वापर केला. काही गाण्यांमध्ये मात्र त्यांनी बहारदार शास्त्रीय संगीत दिले आहे, याचे उदाहरणार्थ 'धरिला वृथा छंद' या सुरेश वाडकरांच्या गाण्यात ऐकायला मिळाले. 'गुरुकृपावंत पायो मेरे भाई' आणि 'एरी माई मोरी गगरिया छीनी' ही पूर्णपणे शास्त्रीय धाटणीची त्यांनी स्वर बध्द केलेली दोन गाणी भरत बळवल्ली या चांगल्या तयारीच्या गायकाने सादर केली आणि लता मंगेशकर व पं.भीमसेन जोशी या दोन भारतरत्नांना एकत्र आणून त्यांच्याकडून 'रामश्यामगुणगान' गाऊन घेण्याचा जो चमत्कार श्रीनिवास खळे यांनी घडवून आणला त्याची झलक बाजे 'मुरलिया बाजे' या गीतात मिळाली. या गाण्यामध्ये बांसरीवरील सूर अप्रतिम पध्दतीने आळवून त्या गाण्यातील मुरलीच्या वर्णनाचे सार्थ रूप वादकाने दाखवून दिले, अमर ओक हे या संचाबरोबर येतील अशी अपेक्षा होती. पण जो कलाकार आला होता, त्याने अमरची उणीव भासू दिली नाही. व्हायलिनवादकाने तर कमालच केली. 'भेटीलागी जीवा लागलीसे आस' आणि 'गोरी गोरी पान' हे अजरामर बालगीत त्याने सोलोमध्ये अप्रतिम वाजवले. 'आ.......स' मधील लता मंगेशकरांनी आळवलेला व्याकुळ भाव आणि 'गोरी गोरी' मधले 'तुल्ला दोन थाप्पा तिल्ला साख्खरेच्चा पाप्पा' या ओळींमध्ये आशा भोसले यांनी दाखवलेल्या खटकेदार जागा व्हायलिनवर ऐकवल्यामुळे त्यातील स्वरांसोबत व्यंजनेसुध्दा ऐकू आली.

'गोरी गोरी पान' आणि 'एका तळ्यात होती' या दोन गाण्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून ठेवले आहे. श्रीनिवास खळे यांची ही दोन गाणी आणि पु ल देशपांडे यांचे 'नाचरे मोरा' या गाण्यामुळे बालगीत म्हणजे आशा भोसले असे समीकरणच झाले होते आणि राणी वर्मा, सुषमा श्रेष्ठ, रेखा डावजेकर वगैरे गायिका येईपर्यंत ते टिकून होते. 'एका तळ्यात होती' हे खूप जुने आणि तरीही लोकप्रिय असे एकच बालगीत या कार्यक्रमात घेतले होते, पण 'किलबिल किलबिल पक्षि बोलती', 'मैना राणी चतुर-शहाणी', 'टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंय् चल पाहू', 'चंदाराणी चंदाराणी' यारखी कित्येक मजेदार बालगीते खळे काकांनी त्यांच्या लाडक्या बालगोपालांना दिली आहेत.

कवीवर्य मंगेश पाडगावकर कधीही ऑर्डरनुसार माल पुरवून देत नाहीत. त्यांच्या खूप कविता गेय आहेत, अर्थातच वृत्त, छंद वगैरेंची बंधने पाळूनच त्या लिहिलेल्या आहेत. त्यांना ठेक्याची आणि सुरांची चांगली जाण असल्याशिवाय ते करता येणार नाही. पण संगीतकाराने दिलेल्या स्वररचनेमध्ये शब्द गुंफून त्याचे गीत करणे त्यांना मान्य नाही. त्याचप्रमाणे अशी स्वररचना करून देणे श्रीनिवास खळे यांना मान्य नाही. आधी शब्द समोर असले तर त्याच्या अर्थानुसार चाल लावून तो अर्थ श्रोत्यांच्या मनापर्यंत पोचवणे किंवा त्याच्या काळजाला भिडवणे हे संगीतकाराचे काम आहे असे ते सांगत असत. यामुळे या दोघांची जोडी चांगली जमली. कदाचित तथाकथित हार्बर लाइनच्या एकत्र प्रवासाचासुध्दा त्यात काही भाग असेल. या दोघांनी मिळून मराठी रसिक श्रोत्यांना दिलेल्या गाण्यांची संख्या खूप मोठी आहे.

भावगीते हे खळे यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची गणना करणे शक्य नाही आणि त्यातली सारी लोकप्रिय गीतेसुध्दा एका कार्यक्रमात सामील करणे वेळेच्या बंधनामुळे शक्य नसते. त्यातली काही गाणी या कार्यक्रमात घेतली आणि बरीचशी राहून गेली. 'नीज माझ्या नंदलाला' सारखी गोड लोरी हिंदीमध्येसुध्दा मी ऐकली नाही. आकाशवाणीवर भावसरगम नावाचा कार्यक्रम तुफान लोकप्रिय झाला होता. थोडा गाजावाजा करून सुरू केलेल्या या मालिकेचा पहिला भाग मी आवर्जून पाहिला होता. त्या भागात अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी गायिलेले 'शुक्रतारा मंद वारा' हे गाणे देऊन पहिल्याच बॉलला सिक्सर मारला होता. 'हात तुझा हातातुन' यासारखी छान छान गाणी पुढील भागात येत गेली. श्रीनिवास खळे यांच्या गीतांचा कार्यक्रम शुक्रतारा शिवाय पुरा होऊच शकत नाही असे सांगून निवेदक भाऊ मराठे यांनी याबाबतचे दोन मजेदार किस्से ऐकवले. एका कार्यक्रमात 'अंतरीच्या स्पंदनाने अन्‌ थरारे ही हवा' ही ओळ '.... अंथरारे अशी ऐकू येत होती. समोर बसलेल्या खळेकाकांनी कपाळाला हात लावला. दुसरा एक गायक 'शूक्रतारा' असे म्हणत होता. समोर बसलेल्या पाडगावकरांना कोणीतरी "गाणे कसे वाटले?" असे विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले, "बाकी ठीक होते, पण गायक जरा जास्तच शू करत होता." असे काही सवंग किंवा पाचकळ विनोद सोडले तर भाऊ मराठे आपल्या निवेदनातून कार्यक्रमाला रंगत आणण्याचे काम चोख करत होते. विशेषतः त्यांचे कित्येक साहित्यिकांच्या रचनांमधील समयोचित ओळीच्या ओळी अस्खलित म्हणून दाखवणे थक्क करणारे होते.


टेलिव्हिजनवरील सारेगमप या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमामुळे प्रसिध्दी पावलेल्या सत्यजित प्रभू, निलेश परब यासारख्या गुणी वादकांचा समावेश वादकांच्या संचात होता. संगीत नियोजन सुध्दा टीव्हीस्टार कमलेश भडकमकर याने केले होते. श्रीनिवास खळे यांनी आधीच लावून दिलेल्या चालींवर गाणी म्हणवून घेण्यात त्याचा असा काय मोठा वाटा आहे? असे एकाद्या अनभिज्ञ माणसाला कदाचित वाटणे शक्य आहे. पण यात दोन महत्वाच्या गोष्टी येतात. सुमारे सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात खळे यांनी गाण्यांना संगीतबध्द करतांना त्या त्या काळातल्या उत्तमोत्तम वादकांचा उपयोग करून घेतला होता. ते सगळे वादकच नव्हे तर ती सारी वाद्येसुध्दा आज उपलब्ध असणे शक्य नाही. निवडक वाद्ये आणि वादक यांच्याकडून हुबेहूब किंवा तत्सम सुरांची निर्मिती करून घेणे अवघड असते. त्याचप्रमाणे निरनिराळ्या गायक आणि गायिकांनी निरनिराळ्या पट्ट्यांमधील आपापल्या स्वरांमध्ये गायिलेली ही गाणी नव्या कलाकारांकडून गाऊन घेतांना त्यांचे आवाज आणि आवाका (रेंज) लक्षात घेऊनच ती बसवावी लागतात. तसेच या सर्वांनी एकत्र तालीम करून ती गाणी चांगली घटवून घ्यावी लागतात. मोठ्या नामवंत कलाकारांच्या कार्यक्रमाचासुध्दा असा तयारीच्या अभावी विचका झालेला मी पाहिला आहे. हा कार्यक्रम मात्र व्यवस्थित झाला याचे श्रेय कमलेशलाच जाते. अजित परब, मंदार आपटे आणि माधुरी करमरकर यांनी या क्षेत्रात नाव मिळवले आहे, मधुरा कुंभार सारेगमपमधून पुढे आली आहे. या कार्यक्रमातील सर्वच गाणी रेडिओ, टेलीव्हिजन आणि रेकॉर्डरवर अनंत वेळा ऐकलेली असल्यामुळे मूळ गायकगायिकांचे स्वर स्मरणात ठसलेले आहेत, लता मंगेशकरांचा अपवाद सोडला तर इतरांची बहुतेक गाणी मी त्यांच्या कार्यक्रमांमधून प्रत्यक्ष सुध्दा ऐकली आहेत. त्या आठवणी पुसून टाकण्याइतके उच्च दर्जाचे गायन नवोदितांकडून अपेक्षित नव्हतेच. त्यांच्या आठवणी ताज्या करता येण्याइतपत चांगला प्रयत्न मात्र सर्वांनीच केला. त्यामुळे हा कार्यक्रम पैसे वसूल करणारा झाला यात शंका नाही.

Monday, December 05, 2011

सुसंस्कृत

सुसंस्कृत' या शब्दाचा अर्थ 'ज्याच्यावर चांगले संस्कार झाले आहेत' असा मानला जातो. लहान मुलांची वाढ होत असतांना सर्व मार्गांनी अधिकाधिक शिकण्याचा प्रयत्न ती मुले करत असतातच, शिवाय त्यांचे पालक, शिक्षक आणि इतर वडीलधारी मंडळी त्यांना काही गोष्टी समजावून सांगतात, शिकवतात, त्यांच्याकडून करवून घेतात, त्यांना वळण लावतात. या सगळ्यांमधून त्यांच्यात जो चांगला फरक पडत असतो त्याला 'संस्कार' असे नाव दिले गेले आहे. पहायला गेल्यास जीवंत असेपर्यंत आपल्यावर संस्कार होतच असतात, पण लहान वयातले मूल संस्कारक्षम असल्यामुळे त्याच्या मनावर संस्कार होणे सोपे आणि अधिक टिकाऊ असते. माणसाच्या मनावर झालेल्या संस्कारातून त्याचा स्वभाव, त्याची वागणूक वगैरेवर प्रभाव पडतो. विशेषतः ज्या गोष्टी त्याच्या नकळत तो करत असतो त्यांच्या मुळाशी त्याच्या अंगातले उपजत गुण असतात, तसेच त्याच्या मनावर झालेले संस्कार असतात. लहानपणी मनावर झालेले संस्कार इतके खोलवर रुजलेले असतात की ते त्या माणसाच्या व्यक्तीमत्वाचा भाग बनून जन्मभर त्याच्या सोबत राहतात. ते पुसायचे असल्यास त्यासाठी त्याला नंतर खूप प्रयत्न करावे लागतात.

'संस्कार' हा शब्द सर्वसाधारणपणे चांगल्या अर्थाने वापरला जातो. कोणतेही पालक किंवा शिक्षक सहसा मुद्दामहून मुलांना वाईट मार्गाला लावणार नाहीत. पण ती लागली तर बहुतेक वेळी त्यालासुध्दा वाईट संगतीमुळे झालेले चुकीचे संस्कार हे कारण दाखवले जाते. 'चांगले' आणि 'वाईट' या शब्दांचे अर्थ मात्र निरनिराळ्या परिस्थितींमध्ये वेगळे निघतात. खूप श्रीमंत कुटुंबांकडे स्वयंपाकपाणी करण्यासाठी नोकरचाकर असतात. घरातल्या प्रत्येक माणसाने त्याला आवडेल तो पदार्थ यथेच्छ खावा आणि कोणाला तो कमी पडता कामा नये असा हुकूम असल्यामुळे ढीगभर अन्न शिजवले जाते आणि घरातल्या माणसांची जेवणे झाल्यानंतर उरलेल्या अन्नाचे काय होत असेल याची फिकीर कोणीही करत नाही. अशा वातावरणात वाढलेल्या मुलांच्या मनावर तसेच वागण्याचे संस्कार होतात, त्यांना तशाच संवयी लागतात. याउलट दरिद्री माणसांच्या घरात अन्नाचा प्रत्येक कण मोलाचा समजला जातो आणि वाया जाऊ दिला जात नाही. मध्यमवर्गीयांची अन्नान्नदशा नसली तरी ती होऊ नये म्हणून "पानात वाढलेले अन्न संपवलेच पाहिजे", "शिजवलेले सारे अन्न खाल्ले गेले पाहिजे" वगैरे शिकवण दिली जाते. शरीराला आवश्यकता नसतांना खाल्ले गेलेले जास्तीचे अन्न अपायकारक असते आणि तेसुध्दा एक प्रकारे वायाच जाते हे अनेक लोकांना शरीरशास्त्राच्या अभ्यासातून कळले तरी वळत नाही. याला कारण लहानपणी मनावर झालेले संस्कार ! कोणते संस्कार चांगले आणि कोणते वाईट याबद्दल वेगवेगळी मते असू शकतात हे वरील उदाहरणावरून दिसून येते.

पूर्वीच्या काळी रूढ असलेल्या एकत्र कुटुंबांमध्ये आजोबापणजोबा आणि आज्यापणज्यांपासून नातवंडा पणतवंडांपर्यंत खूप माणसे एकत्र रहात असत. त्यांनी आपापसात कलह न करता सामंजस्याने रहावे यासाठी घराघरात एक प्रकारची शिस्त पाळली जात असे. घरातील प्रत्येक सदस्याने ती शिस्त लहानपणापासूनच अंगात भिनवावी या दृष्टीने मुलांच्या व मुलींच्या मनावर विशिष्ट प्रकारचे संस्कार प्रयत्नपूर्वक केले जात असत. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणकोणत्या वेळी काय काय करायचे आणि ते कसे करायचे याचे नियम ठरलेले असत. ते पाळण्याची सवय मुलांना जबरदस्ती करून लावली जात असे. त्यांच्याकडून परवचे आणि श्लोक वगैरेचे पाठांतर करून घेतले जात असे. प्रामाणिकपणा, विनम्रता, आज्ञाधारकपणा वगैरेंसारखे गुण शिकवले जात असत. त्यात आज्ञाधारकपणा हा सर्वात मोठा गुण समजला जात असे. मोठ्या माणसांनी सांगितलेले सर्व काही निमूटपणे ऐकून घ्यायचे, वर तोंड करून त्यांना उलट उत्तरे द्यायची नाहीत, त्यांची चूक काढायची नाहीच, त्यांच्या सांगण्याबद्दल शंकासुध्दा व्यक्त करायची नाही वगैरे बाबींचा त्या काळात थोडा अतिरेक होत असावा असे मला आता वाटते. सुमार वकूब असलेल्या मुलांसाठी हे पढवणे ठीक असेलही, पण स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आणि कल्पकता यांच्या वाढीमध्ये त्या प्रकारच्या संस्कारांचा अडथळा येत असे. संयुक्त कुटुंब पध्दतीच आता मोडीत निघाली आहे आणि टेलिव्हिजनच्या व इंटरनेट यांच्या प्रसारामुळे मुलांना लहानपणापासूनच बाहेरच्या जगात काय चालले आहे हे समजू लागले आहे. त्यामुळे कळत नकळत त्यांच्या मनावर होणारे संस्कार आता बदलले आहेत.

माणसाचा आचार, विचार आणि उच्चार या तीन्हीवर संस्काराचा प्रभाव पडतो. लहान मुलांना विचार करण्याएवढी समज नसते म्हणून विचारांवर जास्त भर न देता त्यांना चांगले वागणे आणि बोलणे यांचे वळण लावले जाते. ते सुधारले तर त्याच्या मागील विचार समजला नाही तरी त्या संस्कारांचा फायदाच होईल असे ही कदाचित वाटत असावे. पिढ्या न् पिढ्या असेच चालत राहिल्यास त्या उक्ती किंवा कृतींच्या मागे असलेले विचार हरवूनही जात असतील असे कधीकधी वाटते. अनेक रूढी, रीतीरिवाज वगैरे कधी आणि कशासाठी सुरू झाले ते आता नक्की सांगता येत नाही. त्याबद्दल तर्क करावे लागतात. शिस्त लावणे या उद्देशातून सहनशक्ती, संयम, चिकाटी यासारखे गुण वाढीला लागतात. स्वच्छता आणि नियमित व्यायाम व आहार यामुळे आरोग्य चांगले राहते. दुस-या व्यक्तीला विनाकारण त्रास देऊ नये, तिचा अपमान करू नये असे वागणे सगळ्यांनी ठेवले तर आपसात संघर्ष होत नाहीत, समाज सुसंघटित आणि बलवान होण्यास मदत होते. विनयशीलता बाळगल्यामुळेही चांगले संबंध राहतात, तसेच आत्मवंचना होत नाही. अशा अनेक प्रकारे संस्कारांचा लाभ व्यक्ती आणि समाजाला मिळतो.

काही विचित्र रूढी मात्र विशिष्ट स्थानिक किंवा तात्कालिक परिस्थितीतून केंव्हातरी सुरू झालेल्या असतात. ती परिस्थिती बदलल्यानंतरसुध्दा त्या तशाच पुढे चालत जातात किंवा अनिष्ट असे विकृत रूप धारण करतात. बहुतेक चालीरीती या विशिष्ट धर्म, पंथ, जात वगैरेंशी जोडल्या असतात आणि त्या समूहाला एकत्र ठेवण्यासाठी किंवा त्याची ओळख म्हणून त्या पाळल्या जातात. कोणालाही त्यांचा उपद्रव होत नसेल तर ठीक आहे, पण त्यांच्यामुळे कोणाला कष्ट होत असतील किंवा त्यातून वैमनस्य निर्माण होत असेल तर त्यांचा त्याग करणेच शहाणपणाचे ठरते.

संस्कार हा प्रकार वैश्विक आहे. स्थळकाळानुसार त्यांचा तपशील वेगळा असतो. चांगले संस्कार लाभलेला भारतीय मुलगा आल्यागेल्या मोठ्या माणसाला वाकून नमस्कार करेल, इंग्रज मुलगा हस्तांदोलन करून त्याची विचारपूस करेल किंवा "त्याची सकाळ, संध्याकाळ, किंवा रात्र चांगली जावो" अशी लांबण न लावता फक्त "गुड मॉर्निंग, गुड ईव्हनिंग, गुड नाईट" असे काही तरी उच्चारेल. जाता येता सारखे "थँक्यू, सॉरी" वगैरे म्हणणे हा देखील संस्कारांचाच भाग आहे. आधुनिक काळात हे संस्कारसुध्दा आपल्याकडील मुलांवर केले जात आहेत. कधी कधी ज्या स्वरांमध्ये ते शब्द म्हंटले जातात त्यात तो भाव मुळीसुध्दा दिसत नाही. कारण ते शब्द केवळ संवयीने उच्चारलेले असतात. त्यांचा अर्थ त्यात अपेक्षित नसतो आणि कोणी तो लावायचा प्रयत्नसुध्दा करत नाही.

माझ्या बालपणी आमच्या पिढीमधल्या मुख्यतः ग्रामीण भागातील मुलांवर जे संस्कार झाले होते, त्यातले काही रिवाज शहरामधील राहणीत चुकीचे, निरुपयोगी किंवा कालबाह्य वाटल्यामुळे आमच्या पिढीने ते आचरणात आणले नाहीत. जे चांगले वाटत राहिले ते आमच्या पिढीने पुढील पिढीमधील मुलांना दिले. शिवाय शेजारी व शाळांमध्ये वेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या आणि मुलांच्या संपर्कात आल्यामुळे आमच्या पिढीमधील लोकांच्या मुलांनी काही वेगळ्या चालीरीती पाहिल्या आणि उचलल्या. ती मुले मोठी झाल्यावर आता जगभर पसरली आहेत आणि त्यांच्या जीवनशैली आमच्यापेक्षा वेगळ्या झाल्या आहेत. त्यांच्या पुढील पिढीमधील मुलांवर वेगळे संस्कार होत आहेत हे उघड आहे. आमच्या आईवडिलांची पिढी आणि त्यांच्या पूर्वीच्या अनेक पिढ्या कदाचित एकाच प्रकारच्या चाकोतीत जगत आल्या असतील, त्यांच्यावरील संस्कारसुध्दा साधारणपणे तसेच राहिले असतील, पण त्यांची आणि आमची पिढी यात सर्वच बाबतीत खूप मोठा फरक होता. त्यामुळे मागील पिढीमधील लोकांना आमचे वागणे कधीकधी पसंत पडत नसे. त्या मानाने आमची पिढी व पुढील पिढी यांच्यातला फरक कमी झालेला असला तरी अजून तो जाणवण्याइतपत आहे. त्यामुळे आमच्या पिढीने पुढच्या पिढीवर केलेले संस्कार तसेच्या तसेच त्यांच्या पुढील पिढीला मिळण्याची शक्यता कमी आहे, निदान त्यांचे प्रमाण तर नक्कीच कमी होणार आहे.
आमच्या आधीच्या पिढीमधले खेड्यात राहणारे लोक शेणाने सारवलेल्या जमीनीवर फतकल मारून बसत असत, जेवायला बसण्यापूर्वी अंगातला सदरा काढून उघड्याने पाटावर बसत असत, टेबल मॅनर्स हा शब्द त्यांनी ऐकलेला नसे, ते लोक नैसर्गिक विधी उघड्यावर करत असत. परमुलुखात राहणार्‍या पुढच्या पिढीमधल्या काही लोकांना साधे श्लोक ठाऊक नसतात, त्यांच्या बायका चार चौघांसमक्ष नव-याला त्याच्या नावाने हाका मारतात, त्याच्याशी उरेतुरेमध्ये बोलतात, रोज अंघोळ करणे काहीजणांना आवश्यक वाटत नाही, सकाळीच ती करण्याची घाई नसते. आम्हाला सवय नसल्यामुळे अशा काही गोष्टी जराशा खटकतात. पण त्यामुळे त्यांच्या सुसंस्कृतपणाला बाधा येण्याचे कारण नाही. मी तर असे म्हणेन की आमच्या मागील पिढ्या, आमची पिढी आणि पुढील पिढ्या यातील लोकांच्या मनावर लहानपणी भिन्न प्रकारचे संस्कार झालेले दिसले तरी त्या सर्वांना सुसंस्कृतच म्हणायला पाहिजे. पूर्वीच्या पिढीप्रमाणे नवी पिढी वागली नाही तर तिला संस्कारहीन म्हणता येणार नाही.

स्वतःवर ताबा ठेवणे आणि दुस-यांचा विचार करणे अशा काही मूलभूत गोष्टी अंगी बाणवणे हे माझ्या मते एकाद्या माणसाला सुसंस्कृत होण्यासाठी पुरेशा असाव्यात. त्याने इतिहास, भूगोल, संस्कृत, गणित किंवा खगोलशास्त्राचा अभ्यास केला असणे वा नसणे हे गौण आहे.

Sunday, December 04, 2011

देव आनंद


कॉलेजशिक्षणासाठी मी मुंबईला आलो तेंव्हा आमच्या वसतीगृहात एकनाथ देव नावाचा एक मुलगा होता. आम्हा दोघांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमधील काही बाबतीत बरेच साम्य असल्यामुळे आमचे धागे लवकर जुळले आणि आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनलो. आम्हा दोघांच्या जोडीला इतर मित्र 'देव-आनंद' असे म्हणायला लागले. लहान गावातील सनातनी कुटुंबामधून आलेलो असल्यामुळे देव आनंदचे रोमान्सपूर्ण चित्रपट पाहण्याची संधी आम्हाला कधी मिळालीच नव्हती. त्याची आकर्षक छायाचित्रे तेवढी वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये आणि रस्त्यातील पोस्टर्सवर पाहिली होती. त्यामुळे त्याचा सिनेमा पाहण्याची आम्हालाही खूप उत्सुकता लागली आणि संधी मिळताच ती इच्छा पूर्ण करून घेतली. मी पाहिलेला देव आनंदचा पहिला सिनेमा बहुधा 'काला पानी' किंवा 'काला बाजार' असावा. माझे कॉलेजशिक्षण चालू असतांना घरातली आर्थिक परिस्थिती ओढाताणीचीच असल्यामुळे नाटक सिनेमा वगैरेंची चैन परवडण्यासारखी नव्हती. नोकरीला लागल्यानंतर मात्र या दोघांना अग्रक्रम देऊन तोपर्यंतचा सारा अनुशेष भरून काढला.

राजकपूर, दिलीपकुमार आणि देवानंद (बहुतेक लोक देव आनंद असा उच्चार न करता देवानंद असाच करतात) हे त्रिकूट त्याच्याही आधीच्या काळात हिंदी सिनेमाचे त्रिमूर्ती होते. त्यातला राजकपूर बहुधा शहरातला आणि दिलीपकुमार खेड्यातला गरीब बिचारा साधाभोळा, निरागस (किंचित बावळटपणाकडे झुकणारा) माणूस असायचा. त्या दोघांचे अभिनयकौशल्य वादातीत असले तरी सिनेमातली त्यांची पात्रे आकर्षत वाटत नसत. शिवाय ते दोघेही तोंवर वृध्दापकालाकडे झुकले होते आणि ते स्पष्टपणे दिसून येत असे. देवानंद मात्र चाळिशीत पोचलेला असला तरी अजून देखणा, स्मार्ट आणि स्टाइलिश हीरो शोभत असे. त्याने आपले दिसणे, चालणे, बोलणे, पाहणे वगैरे सगळ्या बाबतीत खास लकब निर्माण केली होती. त्याची केशरचना, वेषभूषा वगैरेंमध्ये खासियत असे. कदाचित त्यामुळेच नकला (मिमिक्री) करणा-या लोकांना देवानंदचे अॅक्टिंग करणे आवडत असावे. शिवाय देवानंदच्या चित्रपटात रडारडीचे प्रमाण कमी असायचे, छान छान गाणी असायची, बहुतेक वेळा उत्कट प्रेमकथा असायचीच, शिवाय उत्कंठावर्धक थरारनाट्य किंवा नर्म विनोदाची झालरही असायची. एकंदरीत 'नो टेन्शन, ओन्ली एंटरटेनमेंट' असल्यामुळे ते पहायला (विशेषतः त्या काळात) मजा येत असे. टेलिव्हिजन, व्हीडिओ किंवा सीडी प्लेयर वगैरे येण्यापूर्वीच्या त्या काळात सिनेमा पाहणे आणि सिनेमाची गाणी ऐकणे हीच मनोरंजनाची मुख्य साधने होती. या सगळ्या कारणामुळे त्या काळात देवानंदचा नवा पिक्चर आला की तो तर पहायचाच, शिवाय एकादा जुना चित्रपट मॅटिनीला लागला असेल तर तोही पहायचा असे ठरून गेले होते.
सिनेनायकांची नवी पिढी तोपर्यंत पडद्यावर आलेली होतीच. ते लोकसुध्दा पुढे वयोमानानुसार काका मामा वगैरे कामे करू लागले, पण देवानंद मात्र चित्रपटाचा नायकच राहिला. त्यामुळेच त्याला चिरतरुण, सदाहरित नायक (एव्हरग्रीन हीरो) असे संबोधले जाऊ लागले. त्याच्या चित्रपटांवर यापूर्वीच खंडीभर लिखाण होऊन गेले आहे आणि उद्या परवाच्या पेपरांमध्ये जिकडे तिकडे तेच पसरलेले दिसणार आहे. त्यामुळे त्यात आपली चिमूट टाकण्यात काही अर्थ नाही. माझ्या वैयक्तिक जीवनात मी कधीतरी कुठेतरी त्याच्या शूटिंगसाठी जमलेली गर्दी पाहिली असेल किंवा त्याला एकाद्या विमानतळावर इकडून तिकडे जातांना ओझरते पाहिले असले तरी अमोरासमोर आल्याचे आठवत नाही. त्याचे दर्शन सिनेमाच्या मोठ्या किंवा टीव्हीच्या (आणि आता संगणकाच्या) छोट्या पडद्यावरच झाले आहे. पण त्याची छबी कायमची स्मरणात राहणार आहे यात कणमात्र शंका नाही.
गाईड आणि हरे रामा हरे कृष्णा हे त्याचे दोन चित्रपट इतर रोमँटिक सिनेमांपेक्षा वेगळे होते. दोन्हींमध्ये उत्कृष्ट संगीत, छायाचित्रण, संकलन वगैरे तांत्रिक गुण होतेच, त्यातले कथा विषय हटके होते. गाईडची कथा निदान तत्कालीन सामाजिक परिस्थितीत पटण्यासारखी नव्हती, नायकाने चक्क एका विवाहित स्त्रीला तिच्या नव-यापासून दूर करण्याचा प्रयत्न करणे आणि तिने ते करणे हे तोपर्यंत चालत आलेल्या नायिकांच्या सती सावित्रीच्या परंपरेला जबरदस्त धक्का देणारे होते. अशा आधुनिक विचारांच्या नायकाने पाऊस पडावा म्हणून आमरण उपोषण करायला तयार होणे आणि देवाने प्रसन्न होऊन चक्क पाऊस पाडणे हे सुध्दा चमत्कारिक वाटणारे होते. तरीसुध्दा ती गोष्ट प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यात देवानंद बराच यशस्वी झाला होता. हरे रामा हरे कृष्णामध्ये थोडासा सामाजिक आशय होता. मोठ्या शहरांमध्ये नुकताच सुरू झालेला परदेशी हिप्पी लोकांचा शिरकाव आणि त्यांची मादक पदार्थांची व्यसनाधीनता वगैरे गोष्टी या सिनेमात प्रथमच दाखवल्या होत्या. या चित्रपटातून झीनत अमान ही नटी (बहिणीच्या रूपात) पुढे आली आणि एक नवी आणि वेगळी दिसणारी नायिका हिंदी सिनेमाला मिळाली. देव आनंद आणि त्याचे दोन बंधू चेतन आनंद व विजय आनंद या तीघांनी अनेक संस्मरणीय चित्रपट निर्माण करून ठेवले आहेत.

टेलीव्हिजनच्या माध्यमातून देव आनंद या व्यक्तीला पाहण्याची संधी अनेक वेळा मिळत गेली. नट व नायक देव आनंद म्हणून त्याची स्वतःची अशी एक इमेज तयार झालेली होतीच. माणूस म्हणून सुध्दा एक बुध्दीमान, विचारी, बहुश्रुत, हजरजबाबी आणि निर्भिड गृहस्थ अशी एक वेगळी आणि चांगली प्रतिमा मनात तयार झाली. बहुतेक मुलाखतींमध्ये तो आपली मते आणि विचार स्पष्टपणे आणि नेमक्या शब्दात व्यक्त करतांना दिसत असे. ती पटणे किंवा न पटणे हे वेगळे, पण मांडता येणेसुध्दा कौतुकास्पद वाटते. एक कुशल आणि कल्पक मनोरंजन करणारा (एंटरटेनर) यापेक्षा त्याच्या व्यक्तीमत्वाचा कॅनव्हास मोठा होता. सिनेमामधील त्याचे काम पाहून मजा वाटत असे, आता त्याच्याबद्दल मनात आदरभाव निर्माण झाला. अठ्ठ्याऐंशी वय झाल्यानंतर त्याचे निर्गमन कधीतरी होणार हे माहीत असले तरी आज सकाळी त्याची बातमी अचानक आल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्याला ही एक लहानशी श्रध्दांजली.