Sunday, August 17, 2008

विठ्ठला तू वेडा कुंभार - भाग ३


या विठ्ठलाने निर्मिलेल्या घटांची रूपे खरेच किती आगळी वेगळी आहेत? इथे असंख्य त-हेच्या चराचर वस्तू आहेत, त्यामधील फक्त माणसांमध्ये केवढी विविधता आहे? कोणी गोरा तर कोणी काळा, कोणी उंच कोणी बुटका, कोणी स्थूल तर कोणी काटकुळा, कोण ह्सतमुख तर कोण सदानकदा रडतराऊत! जितकी
माणसे तितके वेगळे चेहरे, त्यांचे निराळे स्वभाव, विशिष्ट लकबी, भिन्न मते आपल्याला आढळतील. त्यातील प्रत्येकजण आपापले नशीब घेऊन येतो आणि वेगवेगळे आयुष्य जगतो. गदिमांनीच आपल्या दुस-या एका गीतामध्ये लिहिले आहे, "या वस्त्राते विणतो कोण । एकसारखी नसती दोन । कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकराचे ।। जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे ।।"

श्रीमंत घरातले मूल जन्मतःच चांदीचा चमचा घेऊन जन्माला येते असा इंग्रजी वाक्प्रचार आहे. कांही लोक तसे वैभवात जन्माला येतात आणि ऐषोआरामात वाढतात, तर कोणाला आयुष्यभर काबाडकष्टच उपसत रहावे लागते. कोणी हात लावेल त्याचे सोने होत जाते तर डोंगर पोखरूनसुद्धा कोणाला फक्त त्यातून उंदीरच निघालेला दिसतो. कोणी घामाने निथळून जाईपर्यंत ताक घुसळत राहतो आणि त्यातून निघालेला लोण्याचा गोळा भलताच कोणी गट्ट करतो. कोणावर यश, लौकिक, प्रेम वगैरेचा सुखद वर्षाव होतो तर अपयश, अवमान, नैराश्य यांची दाहकताच कोणा बिचा-याच्या पदरात पडते. "तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी ।" या शब्दांत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ही दाहकता त्यांच्या एका प्रसिद्ध काव्यामध्ये व्यक्त केली आहे, तर गदिमांनी "कुणामुखी अंगार" या शब्दांत.

एका अत्यंत सालस आणि निरागस कुटुंबाची दैवगतीमुळे कशी दुर्दशा होते याची हृदयविदारक कथा प्रपंच या चित्रपटात चितारली आहे. या कुटुंबामधील अगतिक अवस्थेत जगणा-या लोकांना "ईश्वरेच्छा बलीयसी।" म्हणत आलीया भोगासी सादर होण्यावाचून गत्यंतरच नसते. "तूच घडविसी तूच मोडिसी, कुरवाळिसी तू तूच ताडिसी ।" यापेक्षा वेगळे तो देवाला तरी काय सांगणार? मनुष्यजन्म दिलास, चांगले संस्कार दिलेस, आयुष्याला कांही अर्थ दिलास म्हणून त्याचे आभार मानायचे की त्यावर दुःखाचे डोंगर देऊन सगळ्याचा पार विस्कोट केल्याबद्दल गा-हाणे गायचे? तक्रार तरी आणखी कुणाकडे करायची? असला जीवघेणा खेळ खेळून त्याला तरी कसले समाधान मिळते म्हणायचे? यातना अगदीच असह्य झाल्यामुळे तो "देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार, विठ्ठला तू वेडा कुंभार।।" अशा शब्दात त्याचा निषेध करतो.

अंधार या शब्दाचा अर्थ या जागी काळोख किंवा उजेडाचा अभाव एवढ्यापुरता सीमित नाही. किती प्रकारचे अंधःकार या जगात दिसतात? कोणी अज्ञानाच्या अंधःकारात हरवलेले आहेत, बिचा-यांना आपली वाटच दिसत नाही. कोणी नैराश्याच्या खोल गर्तेत सांपडले आहेत, आशेचा एक किरण पाहण्याची आस धरून
आहेत. कोणी अन्यायाच्या अंधारकोठडीत तडफडत आहेत. किती लोकांनी डोळ्यांना झापडे बांधून घेतली आहेत, त्यातही कोणी मदांध, कोणी धर्मांध तर कोणी कामांध! कोणाला सत्तेचा माज चढलेला तर कोणाला संपत्तीचा.कोणी स्वार्थापोटी डोळ्यावर कातडे ओढून घेतल्यामुळे उघड्या डोळ्यांनी आंधळे झाले आहेत तर
कोणाला उपासमारीमुळे भोंवळ येऊन डोळ्यापुढे अंधेरी दाटली आहे किंवा भयापोटी डोळ्यासमोर काजवे चमकत आहेत. किती त-हेचे अंधार इथे निर्माण करून ठेवले आहेत?

या चित्रपटाच्या कथेच्या अनुषंगाने कवी देवाला विचारतो की जर चोहीकडे अंधारच पसरवायचा होता तर तो पहायला डोळे तरी कशाला दिलेस? जगाकडे पहाण्य़ाची, ते समजून घेण्याची दृष्टी दिलीस आणि दाट अंधाराचे असले कसले दृष्य डोळ्यासमोर आणलेस? हे असले कसले जग तू निर्माण केले आहेस? इथे तर लहरी राजा, प्रजा आंधळी अधांतरी दरबार असला अजब कारभार तू चालवतो आहेस. तुला कोण शहाणा म्हणेल? तू तर ठार वेडा आहेस. अशा उद्वेगपूर्ण उद्गाराने हे गीत संपते.


. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: