Tuesday, December 30, 2008

योगायोग, पुनरुत्थान आणि पुनर्जन्म


बहुतेक नाटक सिनेमांमध्ये असे दाखवतात की त्यातली माणसे योगायोगाने भेटतात, कधी कधी योगायोगानेच ती नेमकी घटनास्थळी जाऊन पोचतात किंवा ठरवूनसुध्दा पोचू शकत नाहीत. त्यामुळे अनपेक्षित घटना घडतात आणि त्यातून कथानकाला कलाटणी मिळून ते रोचक आणि मनोरंजक होत जाते. प्रत्यक्ष जीवनात घडून येणा-या योगायोगांचे प्रमाण त्या मानाने कमीच असते. कांही गोष्टीतल्या एकाद्या पात्राचे नशीब एवढे बलवत्तर असते की ते पात्र मरणाच्या दारात, अगदी कोमात जाऊन निपचीत पडलेले असतांनासुध्दा कांही महिने किंवा वर्षे उलटल्यावर अचानकपणे ठणठणीत बरे होते आणि पटकन उभे राहून दुप्पट जोमाने ढिशुम् ढिशुम् करू लागते. प्रत्यक्षात असे क्वचितच घडत असेल. कांही कथानकातली पात्रे पुनर्जन्म घेऊन पुन्हा गोष्टीत प्रवेश करतात आणि त्यातला नेमका आपला धागा पकडतात. हल्ली चाललेल्या एका लोकप्रिय मालिकेत तर त्यातल्या भूतकाळातली पांच सहा
पात्रे पुनर्जन्म घेऊन वर्तमानकाळात आली आहेत एवढेच नव्हे तर त्यांच्या पूर्वीच्या जन्मातले आत्मे आपापले वेगळे अस्तित्व बाळगून आहेत आणि अधून मधून ते पीरियड कॉस्च्यूम परिधान करून वर्तमानात डोकावायला येतात असे दाखवले आहे. हे सगळे आपल्याला असंभव वाटते. माणसाच्या बाबतीत असे असले तरी या ब्लॉगने मात्र आतापर्यंतच्या आपल्या तीन वर्षांच्या अल्प आयुष्यात योगायोग, पुनरुज्जीवन आणि पुनर्जन्म या तीन्ही गोष्टींचा अनुभव घेतला आहे.


या ब्लॉगचा जन्मच मुळी एका योगायोगातून झाला. सन २००५ च्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस 'ब्लॉग' आणि 'युनिकोड' हे दोन नवे शब्द योगायोगाने माझ्या कानावर किंवा नजरेला पडले. त्यांच्याबद्दल कुतूहल वाटल्यामुळे त्यांची थोडी माहिती काढली आणि एकाद्या लहान मुलाच्या हातात एकदम दोन खेळणी मिळाली तर तो जसे चाळे करेल तशा प्रकारे त्यांच्याबरोबर खेळता खेळता त्यातून हा ब्लॉग तयार झाला आणि अपलोड पण झाला. लिपी किंवा आकृती यासारख्या सॉफ्टवेअरच्या मदतीशिवाय मराठीत चार शब्द लिहिणे आणि ईमेलखेरीज दुसरे कांहीही आणि तेसुध्दा देवनागरी लिपीमधील अक्षरांतून इंटरनेटवर पाठवणे, आपली वेबसाईट नसतांना आपली स्वतःची छोटीशी जागा नेटवर बनवून त्या जागेवर आपल्याला हवा तो मजकूर नेऊन तिथे तो साठवून ठेवणे अशा अनेक गोष्टी या एका प्रयोगातून साधल्या गेल्या होत्या. संगणक आणि आंतर्जाल यांबद्दल फारशी माहिती नसतांना मला हे जमले हासुध्दा कदाचित एक योगायोगच असेल. ही धडपड चालली असतांना सारखे मला दाट धुक्यात एकादी टेकडी चढत असल्यासारखे वाटत होते. जेंव्हा माझ्या या ब्लॉगचा पहिला भाग प्रसिध्द झाला आणि तो पुन्हा उघडून वाचला तेंव्हा मला त्या डोंगराच्या माथ्यावर पोचल्याचा आनंद पण मिळाला.


हे सगळे एकदाचे झाल्यानंतर त्यामागची उत्सुकता आणि नव्याची नवलाई तिथेच संपली. डोंगरावर चढलेला माणूस कांही तिथेच बसून रहात नाही. घरी माघारी गेल्यानंतर पुन्हा पुन्हा तोच डोंगर चढण्यासाठी वेगळी कारणे लागतात. त्याचप्रमाणे हा ब्लॉग तयार झाल्यानंतर तिथे काय लिहायचे, कशासाठी आणि कुणासाठी ते लिहायचे वगैरे प्रश्न समोर उभे राहिले. त्यांची उत्तरे शोधणे अजून चालले आहे. या शोधाशोधीमध्येच मी आपल्या कांही मित्रांना हा ब्लॉग वाचून पहायला सांगितले. त्या सगळ्या लोकांचे काँप्यूटर युनिकोडच्या बाबतीत निरक्षर निघाले. त्यांना त्यातली फक्त चित्रे तेवढी पहायला मिळतात आणि त्यांच्या खाली छोट्या छोट्या चौकोनांच्या रांगा दिसतात असे समजले. त्यामुळे हा ब्लॉग चित्रमय रूपात बनवायचे ठरवले आणि त्या दृष्टीने नवे प्रयोग सुरू केले.


आधी युनिकोड वापरून नोटपॅडमध्ये मजकूर लिहिला आणि पेंटमध्ये तो चिकटवून ते एक चित्र आहे असे काँप्यूटरला सांगून त्याची दिशाभूल केली. पण ते चित्र ब्लॉगवर चढवल्यावर खूप लहान झाले आणि त्यातल्या अक्षरांचे तुकडे पडून ते एक शिलालेखाचे चित्र वाटायला लागले. म्हणजे पुन्हा ते वाचणे अशक्यच. त्या लेखाचे चार भाग करून आणि मोठा फाँट वापरून बेताच्या आकाराची चार चित्रे बनवून पाहिली. ती ब्लॉगवर चढवल्यानंतर वाचता येत होती पण पहिला परिच्छेद शेवटी आणि चौथा परिच्छेद सुरुवातीला आल्याने त्या लेखाचा पार चुथडा झाला. ती चित्रे उलट क्रमानेच अपलोड करणे आवश्यक होते, पण एक दोन चित्रे चढवल्यावर लिंक तुटून जायची आणि त्या लेखाची सुरुवातच मागे रहायची. मग तो ब्लॉग पुन्हा पुन्हा उघडून त्यात ती चित्रे चढवावी लागत. हे सगळे काम किचकट आणि कंटाळवाणे तर होतेच, शिवाय निराशाग्रस्त करणारे असल्यामुळे ते माझ्या सहनशक्तीचा अंत पहात होते.


त्या काळात मराठी ब्लॉगविश्वाचा पत्ता लागला आणि त्यात भ्रमण करतांना युनिकोडमध्ये लिहिलेले कांही सुरेख ब्लॉग वाचायला मिळाले. माझ्या ओळखीच्या लोकांकडे युनिकोडसाक्षर संगणक नसला तरी असंख्य अनोळखी लोकांकडे ते आहेत आणि त्यांची संख्या वाढतच जाणार आहे याचा विचार करून पुन्हा युनिकोडकडे वळावेसे वाटले. त्याच सुमारास एका योगायोगाने याहू ३६० वर येण्याचे आमंत्रण मिळाले आणि युनिकोडमध्ये दुसरा ब्लॉग सुरू करून दिला. त्यानंतर जसे सुचेल, जमेल तसे लिहून लगेच त्या ब्लॉगवर टाकायचे आणि सवडीनुसार त्याचे चित्रमय रूपांतर करून या ब्लॉगवर ते चढवायचे असे करू लागलो. त्यामुळे अगदी सुरुवातीचे कांही भाग सोडून नंतरचे सारे भाग हे त्यांचे पुनर्जन्मच आहेत. या प्रक्रियेला लागणारा विलंब आणि त्यातल्या वाढत चाललेल्या तांत्रिक अडचणी यांमुळे ते काम संथगतीनेच होत होते. या ब्लॉगच्या मागाहून सुरू झालेल्या याहू ३६० वरील भागांची संख्या सन २००६ मध्ये सव्वाशेच्या वर गेली, पण त्यातले फक्त पंच्याहत्तर भागच या स्थळावर येऊ शकले.


हळूहळू कां होईना पण कसाबसा चालत असलेला हा ब्लॉग सन २००७ मध्ये जेमतेम पांच भाग झाल्यावर बंदच पडला. माझी किल्ली लावून तो उघडणे मलाच अशक्य होऊन बसले. विनामूल्य मिळत असलेल्या या सेवेत बाधा आली तर त्याची तक्रार तरी कुठे आणि कशी करणार? त्या सुमारास ब्लॉगस्पॉटचे हस्तांतरण झाले होते. त्यामुळे नव्या व्यवस्थापनेने फुकट्या लोकांची खाती बंद केली असावीत असे वाटले. सन २००७ संपून २००८ उजाडल्यावर या ब्लॉगची आठवण झाल्याशिवाय कसे राहील? दोन वर्षांपूर्वी या ब्लॉगद्वारे मराठी ब्लॉगविश्वात प्रवेश करतांना त्यानेच मला आनंदाचे दोन चार क्षण मिळवून दिले होते. पुन्हा प्रयत्न करून नवी किल्ली मिळवली आणि पहिल्याच प्रयत्नात त्याचे किवाड उघडले. आंतला खजिना किंवा अडगळ जे कांही असेल ते शाबूत असलेले पाहून हायसे वाटले.


पण आता पुढे त्याचे काय करायचे हा देखील एक प्रश्नच होता. लेखनाचे चित्रात रूपांतर करण्याची संवय मोडली होती आणि आता त्याची एवढी गरज उरली नव्हती. फक्त चित्रेच दाखवण्याएवढी गती मला चित्रकलेत किंवा छायाचित्रणात कधीच नव्हती. सर्व सुखसोयी असलेल्या फ्लॅटमध्ये रहायला गेल्यानंतरही जुन्या झोपड्याबद्दल आपुलकी वाटत असली तरी तिथे कोणी आपला मुक्काम हलवत नाही. फार तर तिचे हॉलिडे होममध्ये रूपांतर करण्याचा विचार करतो. तोच विचार माझ्याही मनात होता, पण पुढील दोन तीन महिन्यात परिस्थितीने पुन्हा कलाटणी घेतली आणि याहू ३६० वर प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्यामुळे तिकडले सामान या ब्लॉगवर हलवायचे ठरवले. पण यात एक प्रॉब्लेम होता.


आजचे वर्तमान उद्याची रद्दी असते असा एक प्रसिध्द (सु)विचार आहे. हे वचन ब्लॉग्जनासुध्दा लागू पडते. त्यात तीन वर्षांपूर्वी शंभराच्या आंत असलेली ब्लॉगकरांची संख्या वाढून हजारावर गेली होती. त्यातली बहुतेक मंडळी सळसळत्या रक्ताची होती. त्यांच्या ताज्या दमाच्या लेखनाच्या महापुरात माझ्या जुन्या लेखांकडे कोणाचे लक्ष कितपत जाईल अशी शंका मनात होती. तरीही थोडी जुनी पाने चाळून पाहिली. त्यात अजून थोडा दम आहे असे मला वाटले. त्यांच्यावरची धूळ झटकून थोडेसे पॉलिश करण्याइतपत दुरुस्ती आणि सुधारणा करून या ब्लॉगवर ते लेख चढवून पाहिले. माझी समजूत कितपत बरोबर आहे हे पाहण्यासाठी भेट देणा-या लोकांची मोजदाद करणारे यंत्र बसवले. त्याचा आकडा पुढे सरकतांना पाहून धीर आला आणि ते काम पुढे चालू ठेवले. यामुळे २००८ साली संपूर्ण वर्षात दुस-या जागी १६० भाग झाले तर या ब्लॉगचे नऊ महिन्यातच अडीचशे होऊन गेले आहेत.


आता २००९ वर्ष येत आहे. पण मागील तीन वर्षांचा अनुभव पाहिला तर पुढच्या वर्षी काय होणार आहे याची पुसटशी कल्पना देखील त्यातल्या कुठल्याच आदल्या वर्षाच्या अखेरीस आली नव्हती. त्यामुळे काय होणार आहे याचा विचार करण्यापेक्षा आपण काय करू शकतो ते पाहणे अधिक महत्वाचे आहे. जुन्या मालाचा साठा आता लवकरच संपून जाईल. त्यानंतर कोणती नवी निर्मिती करावी याबद्दल कांही कल्पना माझ्या मनात आहेत. वाचकांनी आपल्या कल्पना, सूचना, अभिप्राय, टीका वगैरे प्रतिसादातून द्यावेत अशी नम्र विनंती आहे. या वर्षी त्यांनी दिलेल्या आधारासाठी मी त्यांचा आभारी आहे. नव्या वर्षात सर्वांना सुखसंपत्ती, आयुरारोग्य यांचा बरपूर लाभ होवो अशा हार्दिक शुभेच्छा.

Tuesday, December 23, 2008

मेरि ख्रिसमस भाग २


आम्ही गोवा पाहण्यासाठी मुद्दाम ख्रिसमसच्या वेळेतच गेलो होतो. एक तर डिसेंबरमध्ये तिथले हवामान उत्तम असते, त्या वेळेस उकाडा किंवा पाऊस नसतो आणि शिवाय ख्रिसमसचा उत्सव. त्यामुळे अर्थातच पर्यटकांची तोबा गर्दी उडते. पण गोव्याचे लोक सगळे सांभाळून घेतात. आम्ही पणजी शहराच्या भरवस्तीत हमरस्त्यावर असलेल्या एका हॉटेलात मुक्काम केला होता. सागरकिनाऱ्यावरील निवांतपणात शांतपणे विश्राम करण्यापेक्षा गजबजलेला भाग पाहून लोकांच्या उत्साहात सहभागी होण्याची आम्हाला इच्छा होती. ती चांगल्या प्रकारे फलद्रूप झाली.

घराघरांवर चांदण्यांच्या आकाराचे आकाशकंदील लावलेले होते. कांही ठिकाणी सुंदर ख्रिसमस ट्री लावून त्यांना छानपैकी सजवले होते. कुठेकुठे बायबलमधल्या गोष्टीमधले देखावे मांडले होते. दुकाने आणि हॉटेले प्रकाशात झगमगत होती आणि गर्दीने फुललेली होती. सगळ्या चर्चेसमध्ये नाताळनिमित्य खास धार्मिक कार्यक्रम ठेवले होते. रस्त्यावर फिरत असलेल्या लोकांत फॅशनेबल आणि आकर्षक पेहराव घालण्याची चढाओढ लागली होती. एकंदरीत गोव्यातल्या वातावरणातच चैतन्य संचारले होते.

दोन वर्षे आम्ही नेमके ख्रिसमसच्याच दिवसांत इंग्लंडला गेलो होतो. त्यातल्या एका वर्षी त्या दिवशी हिमवर्षाव झाला आणि सगळीकडे बर्फच बर्फ झाले. याला तिकडे 'व्हाईट ख्रिसमस' म्हणतात, तोही पहायला मिळाला. त्यात पाहण्यापेक्षा थंडीने कुडकुडणेच जास्त होते. तिकडे घरांच्या सजावटीपेक्षा खरेदी आणि भेटवस्तू देणे यालाच जास्त महत्व दिसले. ज्या लोकांना शक्य असेल ते तर सुटी काढून कुठल्या तरी उबदार जागीच चालले जातात. शॉपिंग मॉल्समध्ये मात्र या सगळ्याची कसर भरून काढली जाईल इतकी प्रचंड सजावट आणि दिव्यांचा नुसता झगमगाट असतो. दोन तीन मजले उंचीचे अवाढव्य ख्रिसमस ट्री लावतात आणि हजारो शोभिवंत वस्तू त्याला टांगतात. कांही ठिकाणी सांताक्लॉजच्या वेषात पांढरी दाढी लावलेली माणसे हिंडत असतात आणि दिसेल त्याला "मेरि ख्रिसमस" म्हणत शुभेच्छा देत असतात, तर कांही जागी त्याला बसण्यासाठी पुरातनकाळाचा आभास निर्माण करणारी खास सजवलेली गुहा बनवलेली असते. त्याच्या आंत जाऊन त्याला भेटण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतात. सांताक्लॉजबाबाचे मुखवटे, लाल डगले आणि गोंडा सावलेल्या टोप्या या गोष्टींना या काळात प्रचंड मागणी असते. या वर्षी मी ख्रिसमसला अमेरिकेत आहे. इथले वातावरणसुध्दा साधारणपणे इंग्लंडमध्ये दिसले तसेच आहे. इथली दुकाने अवाढव्य आहेत आणि त्यांना साजेशी रोषणाई आहे. तसेच नवनव्या आकर्षक वस्तू मांडून ते खचाखच भरलेले दिसतात. खरेदी करून परतणाऱ्या बहुतेक लोकांच्या ट्रॉल्या भेटवस्तूंनी भरलेल्या असतात.

कांही हुषार लोक या सणाच्या दिवसांत बाजारात जाऊन कोणत्या नव्या वस्तू आल्या आहेत, कुठल्या गोष्टींना खूप उठाव आहे वगैरे बारकाईने पाहून घेतात आणि टूथपेस्ट, साबणासारख्या रोज लागणाऱ्या जिन्नसा घेऊन घरी येतात. उत्सव संपला की एक दिवस सुटी घेऊन बाजार उघडला की बहुतेक नव्या वस्तूंना 'मूळ किंमत २० पौंड, ख्रिसमससाठी १५ पौंड आणि आज घेतल्यास ४.९९ पौंड' अशा प्रकारची लेबले लावलेली असतात. त्यांच्या जोडीला 'त्वरा करा. ही सवलत साठा शिल्लक असेपर्यंतच' वगैरे सूचना असतात. जागा अडवणारी खेळणी आणि इतर शोभेच्या वस्तू तर 'टके सेर भाजी, टके सेर खाजा' विकणाऱ्या 'पौंड शॉप'मध्ये जाऊन पोचतात. या वेळेस मात्र ही हुषार माणसे बाजारावर तुटून पडतात आणि तिथला फुगलेला साठा संपवायला मदत करतात. त्यात आपले भारतीय वंशाचे लोक मोठ्या संख्येने दिसतात. एक दीड पौंडात मिळणाऱ्या वस्तू ते डझनांवारी नेतात. भारतात सुटीला गेल्यावर आपल्या आप्तांना वाटायला ती बरी पडतात. कुठे कुठे तर भारतीयांची गर्दी पाहून आपण कनॉट प्लेस किंवा कुलाबा कॉजवेला आलो असल्याचा भास होतो.

या सगळ्याचा येशू ख्रिस्ताच्या जन्माशी काय संबंध आहे? त्याला जन्माला येऊन दोन हजार वर्षे होऊन गेली. आता त्यात एवढा आनंद वाटण्यासारखे काय आहे? असे प्रश्न बुद्धीवादी किंवा खडूस वृत्तीचे लोक विचारतील. पण हे जगभर सगळीकडेच चालत आले आहे. रामनवमी, गोकुळाष्टमी वगैरे तिथी आपण उत्साहाने साजरे करत होतो, आजकाल गांधी जयंती, शिवजयंती आणि आंबेडकर जयंती यांचा सोहळा होतो. त्या दिवशी त्या देवाच्या मूर्तीची पूजा आणि त्या महात्म्याच्या पुतळ्याला किंवा तसबिरीला हार घालण्यची औपचारिकता आटोपण्यापलीकडे त्यांना किती महत्व दिले जाते आणि त्यांच्या जीवनापासून किंवा शिकवणीपासून पासून कोणता धडा आपण त्या दिवशी घेतो यावर विचार करावा लागेल.

पण त्याबाबतीत अगदीच निराश होण्याचे कारण नाही. गांधीजयंतीच्या दिवशी जर दहा लोकांनी दारू पिणे सोडायचे ठरवले तर त्यातला एकादा तरी पुन्हा त्या मार्गाने जात नाही आणि तीन चार लोकांना पुन्हा घेतांना कुठे तरी त्यांच्या मनाला त्याची टोचणी लागते आणि त्यावर थोडे नियंत्रण येते. त्यामुळे थोडा फरक पडतच असेल. दुसरे म्हणजे सगळ्याच लोकांना या ना त्या प्रकारे मनातला आनंद व्यक्त करायची एका प्रकारची हौस असते. ती पुरवण्यासाठी एक निमित्य मिळाले आणि एक सर्वमान्य पद्धत मिळाली तर त्यांना तो एकत्रपणे व्यक्त करता येतो. त्यात तो अनेकपटीने वाढतो.

या निमित्याने मनातला आनंद व्यक्त करणे असेच असेल तर आपल्यालासुद्धा ख्रिसमसच्या निमित्याने थोडीशी मौजमजा करायला काय हरकत आहे? आणि शुभेच्छा तर कोणालाही कधीही द्याव्यात. तेंव्हा सर्व वाचकांना माझ्याकडून ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
 'मेरी ख्रिसमस!'

मेरि ख्रिसमस भाग १




आमच्या लहान गांवात एकही ख्रिश्चन कुटुंब निदान माझ्या बालपणी तरी रहात नव्हते. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष पहाण्याचा प्रश्नच नव्हता. आमच्या घरात होणाऱ्या बोलण्यात कधी ख्रिश्चनांचा उल्लेख आलाच तर "त्यांचे आचार विचार आणि त्यांच्यातल्या चालीरीती आपल्याहून वेगळ्या असतात." असा एक अलिप्तपणाचा सूर तेवढा असायचा. त्यांच्याबद्दल मनात द्वेष निर्माण होईल असे त्यांच्याविरुद्ध कोणी बोलत नसे. फार फार तर कोणी आपली रूढी मोडून वागायला लागला तर त्याला 'साहेब' म्हणून हिणवले जायचे. त्या काळात शहरात राहणाऱ्या आमच्या नातेवाईकांची मुले सुद्धा मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकत असत. कॉन्व्हेंट शाळांचे एवढे प्रस्थ वाढले नव्हते. त्यामुळे कधी तरी मुंबईहून आलेल्या पाहुण्यांच्या बोलण्यातून देखील माउंट मेरी किंवा पोर्तुगीज चर्च अशा नांवापलीकडे ख्रिश्चनांचा फारसा उल्लेख होत नसे. गांवात वैद्यकीय उपचारांची अद्ययावत व्यवस्था नसल्यामुळे रक्त तपासणी, एक्सरे फोटो अशा चांचण्यासाठी किंवा रोग विकोपाला गेला तर बहुतेक लोक मिरजेच्या वानलेस मिशन हॉस्पिटलात जात असत. तिथे जाऊन आलेल्या लोकांच्या तोंडून त्या इस्पितळातील सुव्यवस्थेची प्रशंसाच ऐकायला मिळत असे. त्यामुळे माझ्या मनात ख्रिश्चनांविषयी कधीही पूर्वग्रह निर्माण झाला नाही.

शालेय पाठ्यपुस्तकांमधले धडे, मासिके आणि अवांतर वाचनामधूनच येशू ख्रिस्ताचे जीवन, त्याची शिकवण आणि ख्रिस्ती धर्म यासंबंधी माहिती मिळत गेली. त्यात आपला श्रीकृष्ण आणि येशू ख्रिस्त यांच्या नांवातल्या साम्याखेरीज आढळलेली इतर साम्यस्थळे पाहून नवल वाटत असे. दोघांच्याही जन्मापूर्वी त्याची भविष्यवाणी झालेली होती. दोघांचेही जन्म काळोख्या मध्यरात्री आणि घरात न होता वेगळ्या प्रकारच्या ठिकाणी झाले, कृष्णाचा जन्म  कारागृहात तर येशू ख्रिस्ताचा गोठ्यात. दोघांनाही नष्ट करण्यासाठी त्यांचे शत्रू टपून बसले होते. त्यामुळे त्यांचे बालपण त्या संकटाच्या छायेत गेले. दोघांचे बालपणचे सवंगडी अगदी जनसामान्यातले होते. पुढे मात्र श्रीकृष्णाने राजसी वैभवाचा आस्वाद घेतला तर येशूने आपले जीवन दीनदुबळ्यांच्या सेवेत घालवले. तरीसुद्धा कृष्णाने योगेश्वर होऊन मानवजातीला अखंड मार्गदर्शन करीत राहील असा गीतोपदेश केला आणि येशूने आपले जीवन व प्रवचने यांतून जगाला दिव्य संदेश दिला. या दोघांचीही शिकवण अनंत काळापर्यंत टिकून राहण्यासारखी आहे.

या दोन्हीमध्ये कांही समान धागा असला पाहिजे. श्रीकृष्णाच्या भारतात ख्रिस्ताच्या शिकवणीने चांगले मूळ धरले आहे. ती शिकवण देणाऱ्या संस्था इथे उभ्या राहिल्या असून देशोदेशीचे धर्मसेवक इथे प्रशिक्षण घ्यायला येतात असे ऐकले आहे. इथून शिकून निघालेला कोणी धर्मगुरू उद्या पोपच्या जागेवर निवडला गेला तर मला त्यात आश्चर्य वाटणार नाही. याच्या उलट ख्रिश्चनांच्या पाश्चिमात्य देशात अगदी अल्प स्वरूपात कां होईना, पण हरेकृष्ण मूव्हमेंट सुरू झाली आणि येशूच्या पायाशी मनःशांती न मिळाल्यामुळे कांही लोकांनी मुंडण करून संन्यास घेतला आहे आणि स्वामी अमूकानंद किंवा माँ तमूकमाता अशी नांवे धारण केली आहेत. आणखी काही स्वामींचे आश्रम अमेरिकेत सुरू झाले आहेत.

मी कॉलेजात गेल्यानंतर दरवर्षी ख्रिसमसच्या सुटीत घरी पळत होतो. त्यामुळे शहरांमध्ये  तो कसा साजरा केला जातो हे मी कधी पाहिलेच नाही. "आपली जशी दिवाळी असते ना, तसा त्यांचा ख्रिसमस!" असे नुसते मोघमात ऐकले होते. पण म्हणजे ते नक्की काय करतात?  दिवे लावतात, कां फराळ करतात कां फटाके उडवतात? मी नोकरीसाठी मुंबईला स्थाईक झाल्यानंतर मला हळू हळू त्याची कल्पना येत गेली. मी जरी धोबीतलाव किंवा बांद्रा यासारख्या ख्रिश्चन वस्तीत रहात नसलो तरी जातांयेतांना तिथली रोषणाई, सजावट वगैरे माझ्या नजरेला येत असे. एकंदरीत रस्त्यावरून दिसणारा उल्हास पाहिला तर दिवाळी आणि ख्रिसमस यांत खरेच विशेष फरक वाटत नाही. तपशीलात फरक असेल पण सेलेब्रेशनचे मुख्य स्वरूप सारखेच वाटते.

इंग्रजी सिनेमात अनेक वेळा ख्रिसमसचे सीन असतात. 'होम अलोन' या चित्रपटाचे कथानकच ख्रिसमसच्या दिवशी घडते. मागे मी एक इंग्लिश चित्रपट पाहिला होता. त्याचे नांव आता आठवत नाही. "सँताक्लॉज खरोखर अस्तित्वात असतो कां?" हा वाद या सिनेमामध्ये चक्क कोर्टात नेला जातो. अनेक विनोदी साक्षीपुरावे आणि मजेदार उलटतपासण्या झाल्यानंतर अखेर ज्यूरींना त्यावर निर्णय द्यायचा असतो. "ज्याची श्रद्धा असते त्याच्यासाठी सँताक्लॉज अस्तित्वात असतो." असा निर्णय देणे त्यांना भाग पडते असा त्याचा कथाभाग आहे. दूरदर्शन सुरू झाल्यावर त्यावर नाताळच्या निमित्याने खास कार्यक्रमांचे प्रक्षेपण सुरू झाले. ते आम्ही आवर्जून पहायला लागलो. टीव्हीवर इतर वाहिन्या आल्यावर प्रत्येकीने त्यात भर टाकली. त्यामुळे आता ख्रिसमसनिमित्य देशोदेशी होणारे सोहळे, सजावट, रोषणाई, कॅरॉल्स, पोपचे व्याख्यान वगैरे सगळे घरबसल्या पहायला मिळते.

ख्रिसमसच्या दिवशी मॉँजिनीजच्या दुकानात ठेवलेले आकर्षक केक पाहून आम्हीही ते आणून खायला सुरुवात केली. कधी गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला गेल्यावर मी ताज केकशॉपमधल्या केकची चंव घेऊन पाहिली तर कधी ख्रिसमसचे खास पुडिंग चाखून पाहिले. मला नववर्षासाठी येणाऱ्या कांही सदीच्छापत्रांत "मेरी ख्रिसमस" चा संदेश देखील जोडलेला असतो. अशा प्रकारे आमच्या नकळतच आम्हीसुद्धा थोडेसे "जिंगल बेल जिंगल बेल" करू लागलो.
. . . . . . . . . . (क्रमशः)

Monday, December 22, 2008

यॉर्क नगरी


उत्तर इंग्लंडमधील दोन छोट्या नद्यांच्या बेचक्यातली ही नैसर्गिक रीत्या सुरक्षित जागा बरोबर हेरून रोमन राज्यकर्त्यांनी या ठिकाणी आपले मुख्य ठाणे वसवले होते. अधिक सुरक्षेसाठी त्यांनी गांवाभोवती भक्कम तटबंदी बांधली आणि खंदक खणले. नंतरच्या काळातील यॉर्विक आणि नॉर्मन राज्यकर्त्यांनी ती सुरक्षाव्यवस्था आणखीनच मजबूत केली. इतिहासकालात बांधलेल्या या तटबंदीचा बराच भाग आजही चांगल्या अवस्थेत टिकून राहिलेला दिसतो.


व्हायकिंग्जच्या यॉर्विक या नांवावरूनच यॉर्क हे त्या शहराचे नांव पडले. नॉर्मन राजवटीमध्ये ते उत्तर इंग्लंडचे प्रमुख शहर झाले. त्या भागातल्या राज्यकारभाराची तसेच व्यापारउद्योगाची सूत्रे तिथून हलवली जात असत. यॉर्कचे हे वैभव कित्येक शतके टिकले. तो भाग इंग्लंडच्या राज्यात सामील झाल्यानंतरही यॉर्कचे महत्व टिकूनच होते. त्या काळात तिथे ज्या उत्तमोत्तम सुंदर इमारती बांधल्या गेल्या त्यातल्या कांही इमारती आजही सुस्थितीत पहायला मिळतात.


दोन्ही नद्यांच्या पलीकडल्या भागातसुद्धा आधुनिक काळात सगळ्या बाजूने वस्ती वाढत गेली. यॉर्कचे रेल्वे स्टेशन आणि नॅशनल रेल्वे म्यूझियम या नव्या भागातच प्रस्थापित झाले आहे. या नव्या भागात आधुनिक पध्दतीच्या रस्त्यांचे जाळे बांधले आहे. त्यावरील मोटारगाड्यांची रहदारी पाहून ते इंग्लंडमधील इतर कोणत्याही गांवासारखेच दिसते. पण तटबंदीच्या आंत बंदिस्त असलेला शहराचा बराचसा मूळ भाग अजून पूर्वीच्याच अवस्थेत राखून ठेवला आहे. तिथे अरुंद असे दगडी रस्ते आहेत. त्यावरून फक्त पायीच चालता येते. आजूबाजूला त-हेत-हेची दुकाने आहेत. अरुंद गल्लीबोळांच्या चौकाचौकात तिथून फुटणारा प्रत्येक मार्ग कोठे जातो याची दिशा दाखवणारे पुरातन वाटावेत असे सुबक फलक लावलेले आहेत. ते पाहून आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाता येते. हा भाग स्टेशनपासून किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही तिथे पायीच जाणे पसंत केले. तशा तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने जाणा-या सिटी बस दिसल्या, पण त्यांचे मार्ग आणि नेमके कुठे जायचे ते समजून घेणे कठीण होते. त्यापेक्षा इकडचे तिकडचे निरीक्षण करीत पायीपायीच फिरणे जास्त आनंददायी होते. ऊन पडल्यानंतर वातावरणातला गारवा कमी होऊन तेसुध्दा उत्साहवर्धक झाले होते.


औस नदीवरील पूल पार करून यॉर्क मिन्स्टरला गेलो. तिथले भव्य वास्तुशिल्प पाहून जुन्या गांवात शिरलो आणि गल्लीबोळातून फिरत फिरत जुन्या काळातल्या गांवाच्या दुस-या बाजूला असलेल्या क्लिफोर्ड टॉवरला पोचलो. या ठिकाणी वस्तीच्या मधोमध एक उंचच उंच बुरुज बांधला आहे. विल्यम द काँकरर या इंग्लंडच्या बलाढ्य राजाने आपल्या उत्तर दिग्विजयाचे प्रतीक म्हणून हा बुरुज बांधला. या बुरुजाचा उपयोग दूरवरच्या भागाचे निरीक्षण करून शत्रूसैन्याच्या हालचाली न्याहाळण्यासाठी होत होता. तसेच अत्यंत महत्वाच्या व्यक्तींना या बुरुजावर सुरक्षितपणे ठेवलेही जात असावे. त्यात कांही राजबंदीही असत. तत्कालिन राहण्याच्या खोल्या अजून पहायला मिळतात. या बुरुजावरून यॉर्क शहर आणि आसमंताचे विहंगम दृष्य दिसते.


क्लिफोर्ड बुरुजाच्या पायथ्यापाशी कॅसल म्यूजियम आहे. अनेक जुन्या काळातल्या वस्तू तिथे ठेवल्या आहेत. त्यातील जुन्या काळातील वस्त्रे प्रावरणे विशेष लक्षवेधी आहेत. त्यातल्या एका दालनात राणी व्हिक्टोरियाच्या काळातील एक लहानशी गल्ली उभी केली आहे. तत्कालीन घरे, दुकाने, त्यावरील पाट्या, त्यातली कपाटे आणि त्यात मांडून ठेवलेला माल हे सगळे आपल्याला भूतकाळात घेऊन जातात. रस्त्यावरून जाणारी घोड्यांची बग्गी आणि हातगाडी वगैरे तपशील देखील उभा केला आहे. अशा प्रकारची दृष्ये मी याआधी लीड्स आणि लंडनला पाहिलेली असल्यामुळे ती अप्रतिम असली तरी मला विशेष नाविन्यपूर्ण वाटली नाहीत.


कॅसल म्यूझियम बंद होण्याची वेळ होईपर्यंत संध्याकाळ झाली होती. पुन्हा हवेत बोचरा गारठा आला होता. आणखी फिरण्याची हौसही शिल्लक नव्हती आणि अंगात त्राणही उरले नव्हते. रेल्वे स्टेशनवरील उबदार वातावरणात येऊन थोडे खाऊन पिऊन घेतले. परतीच्या गाडीचे आगाऊ तिकीट काढून ठेवलेले असल्यामुळे त्याआधी लीड्सच्या दिशेने रिकाम्या गाड्या जातांना दिसल्या पण त्यासाठी वेगळे तिकीट काढून त्या गाडीतून जाणे परवडण्यासारखे नव्हते. तिथल्या दुकांनाच्या तावदानांतून विंडो शॉपिंग करीत व येणा-या जाणा-या प्रवाशांचे निरीक्षण करीत आपल्या ठरलेल्या गाडीची वाट पहात राहिलो. एक प्रेक्षणीय स्थान पाहिल्याचे समाधान मनात होतेच. त्यामुळे आता सोसावा लागणारा गारठा सुसह्य वाटत होता.

Sunday, December 21, 2008

यॉर्क मिन्स्टर


यॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूजियम फक्त तीस बत्तीस वर्षे जुने आहे आणि त्यात दाखवण्यात येत असलेला रेल्वेचा इतिहास सुमारे दोनशे वर्षांचा आहे, पण यॉर्क शहराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे आणि त्याच्या खुणा जागोजागी शिल्लक आहेत. यॉर्क मिन्स्टर हे त्यातील सर्वात भव्य आणि प्रेक्षणीय स्थान आहे. रोमचे सेंट पीटर्स बॅसिलिका, सिस्टीन चॅप्टर व कोलोनचे कॅथेड्रल यांच्या पठडीतील ही इमारत तशीच ऐतिहासिक, विशालकाय आणि सौंदर्याने नटलेली आहे.


मिन्स्टर हा शब्द मोनॅस्ट्री या शब्दावरून आला. एक प्रकारचा मठ किंवा पीठ असा त्याचा अर्थ होतो. धर्मगुरू, धर्मोपदेशक, धर्मप्रसार करणारे वगैरे लोकांचे प्रशिक्षण, धर्माच्या अभ्यासासाठी पुरातन ग्रंथांचे वाचन, त्यातील शिकवण अंगी रुजवण्यासाठी आचरण संहिता वगैरे सगळे अशा ठिकाणी योजण्यात येते. पण यॉर्क मिन्स्टरमध्ये पहिल्यापासूनच सर्वसामान्य लोकांना प्रार्थना व धार्मिक विधी करण्याची मुभा आहे. या अर्थी गेली कित्येक शतके ते एक कॅथेड्रलच आहे. नव्या बिशप व आर्चबिशप मंडळींना इथेच त्यांच्या पदाची दीक्षा दिली जाते. या जागेला आजही धार्मिक व ऐतिहासिक असे दोन्ही प्रकारचे महात्म्य आहे. त्यामुळे तिथे भाविक आणि पर्यटक या दोन्ही प्रकारच्या लोकांची सदैव गर्दी असते.


रोमन साम्राज्याच्या काळात या जागी त्यांचे लश्करी ठाणे होते. रोमन सम्राटाचे प्रतिनिधी इथून उत्तर इंग्लंडचा राज्यकारभार पहात. इसवी सन तीनशे सहा मध्ये तत्कालिन रोमन सम्राट खुद्द इकडे आला असता इथेच मरण पावला आणि त्याच्याबरोबर आलेल्या राजकुमार कॉन्स्टन्टाईनला सीजर घोषित केले गेले. त्याने रोमला जाऊन राज्यकारभार आपल्या हातात घेतला. पाचव्या शतकात रोमन साम्राज्याची इंग्लंडवरील सत्ता कमकुवत होऊन स्थानिक राज्यकर्त्यांनी सत्ता काबीज केली. सहाव्या शतकात तिथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव आला आणि एक प्रार्थनास्थळ बांधण्यात आले.


सध्या उभ्या असलेल्या इमारतीचे बांधकाम बाराव्या शतकात सुरू झाले आणि तब्बल अडीचशे वर्षे ते चालले होते. या दरम्यान कामगारांच्या किती पिढ्यांनी तिथे काम केला असेल! क्रॉसच्या आकाराच्या या इमारतीची लांबी १५८ मीटर इतकी आहे तर रुंदी ७६ मीटर इतकी. सगळेच हॉल निदान दहा पंधरा पुरुष उंच आहेत. छताकडे पहाण्यासाठी मान शक्य तितकी उंच करून पहावे लागते. याचा मध्यवर्ती टॉवर साठ मीटर इतका म्हणजे सुमारे वीस मजली इमारतीएवढा उंच आहे. अशा अवाढव्या आकाराच्या या इमारतीचा चप्पा चप्पा सुरेख कोरीव कामाने व रंगीबेरंगी चित्रांनी भरलेला आहे.


ही इमारत बांधतांना त्यापूर्वी तिथे असलेल्या वास्तू पूर्णपणे नष्ट केल्या नाहीत. तिचे बांधकाम चाललेले असतांना चर्चचे सगळे धार्मिक विधी तिथे अव्याहतपणे चालू होते आणि भाविक त्यासाठी तिथे येतच होते. त्यामुळे अगदी रोमन साम्राज्याच्या काळाइतक्या पूर्वीच्या इमारतींचे अवशेष आजही तळघरात पहायला मिळतात. त्यांच्या माथ्यावरच नवीन बांधकाम केले गेले. ते मात्र मध्ययुगातील अप्रतिम कलाकौशल्याने पूर्णपणे नटलेले आहे.


जागोजागी अनेक पुराणपुरुषांचे पूर्णाकृती किंवा त्याहून मोठे भव्य पुतळे ठेवले आहेत तसेच येशू ख्रिस्ताच्या जीवनातील विविध प्रसंगांची चित्रे किंवा प्रतिकृती आहेत. पूर्वेच्या टोकाला जमीनीपासून उंच छतापर्यंत उंचच उंच अशी कमानदार ग्रेट ईस्ट विंडो आहे. त्यावर ११७ स्टेन्ड ग्लास पॅनेल्स बसवली आहेत. त्यातील प्रत्येकावर वेगळे चित्र रंगवलेले आहे. हिच्या आकारावरून या खिडकीला यॉर्कशायरचे हृदय असेही म्हणतात. त्याखेरीज इतर बाजूंच्या भितीवरसुद्धा अशाच प्रचंड आकाराच्या अनेक खिडक्या आहेत. पश्चिमेची ग्रेट वेस्टर्न विंडो सुद्धा सोळा मीटर उंच आणि आठ मीटर रुंद आहे. इतकी मोठी साधी भिंतदेखील केवढी मोठी असते? त्यावर अनेक पॅनेल्स बसवून ती कांचकामाने मढवणे हे केवढे जिकीरीचे आणि मेहनतीचे काम आठशे वर्षांपूर्वी कसे केले असेल याची कल्पनाच करवत नाही. ते संपवायला अडीचशे वर्षे उगाच नाही लागली?


यॉर्क मिन्स्टरच्या विशाल सभागृहांमध्ये एका वेळेस चार हजाराहून अधिक लोक बसू शकतात. ख्रिसमस व ईस्टरला जी खास प्रार्थना केली जाते तेंव्हा इतक्या मोठ्या संख्येने भाविक इथे गर्दी करतात. रोजच्या रोज आणि दर रविवारी वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतातच. आपल्या देवळांमध्ये काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नाना विधी होत असतात त्याचाच हा पाश्चिमात्य प्रकार आहे. इथे मूर्तीदेखील असतात पण त्यांची पूजा न होता त्याच्या सान्निध्यात राहून परमेश्वराचे स्मरण केले जाते एवढेच. दुसरी गोष्ट म्हणजे चर्चमध्ये कोणालाही येण्यास प्रतिबंध नसतो. कोणी ख्रिश्चन असो वा नसो, तो तिथे येऊन दोन घटका बसू शकतो. त्याने तिथल्या वातावरणाचे गांभिर्य तेवढे पाळले पाहिजे.


यॉर्क मिन्स्टरमधील एक एक चित्र व शिल्प पहायचे झाल्यास कित्येक दिवस लागतील. आमच्याकडे इतका वेळ नव्हता आणि आम्हाला कांही त्याचा अभ्यास करायचा नव्हता. तरी वर वर पाहतांनासुद्धा दीड दोन तास कसे गेले ते समजले नाही.

Saturday, December 20, 2008

यॉर्कचे रेल्वे म्यूझियम (उत्तरार्ध)


नॅशनल रेल्वे म्यूझियमच्या मुख्य दालनात जॉर्ज स्टीफन्सन याचा भव्य पुतळा ठळकपणे दिसतो. त्याला रेल्वेचा जनक मानले जाते आणि ते ब-याच अंशी योग्य आहे. पण त्याने रेल्वे इंजिनाचा शोध लावला अशी जी समजूत आहे ती तितकीशी बरोबर नाही. ते सुद्धा जेम्स वॉटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला असे म्हणण्याइतकेच अर्धसत्य आहे. वाफेच्या शक्तीचा उपयोग करण्याचे प्रयत्न आधीपासून सुरू झालेले होते आणि या कामासाठी न्यूकॉमेन या इंजिनियरने तयार केलेल्या यंत्राची दुरुस्ती करून त्यात सुधारणा करण्यासाठी जेम्स वॉटला पाचारण करण्यात आले. त्याने त्या यंत्रात आमूलाग्र बदल करून त्याच्या कार्याची व्याप्ती वाढवली आणि त्याच्या द्वारे एक चाक फिरवण्याची व्यवस्था केली. चाक फिरवणारे पहिले इंजिन तयार झाल्यानंतर त्याचा उपयोग अनेक प्रकारच्या गिरण्यांमध्ये करता आला आणि यंत्रयुगाच्या प्रगतीला अभूतपूर्व वेग आला. यात जेम्स वॉटची हुशारी, कौशल्य, चिकाटी वगैरेचा सिंहाचा वाटा आहेच. त्याचे श्रेय त्याला द्यायलाच हवे. पण त्याचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे त्याच्या आधी होऊन गेलेल्या कामाचे श्रेयसुद्धा त्याच्याच पदरात पडले.


जेम्स वॉटचे वाफेचे इंजिन व बॉयलर आकाराने मोठे असल्यामुळे कारखान्यासाठी उपयुक्त होते. वाहनात वापरता येण्याजोगी त्याची लहान आवृत्ती त्याने नंतर बनवली सुद्धा. त्याच्याखेरीज इतर अनेक लोक या खटपटीला लागले होते. त्यातील कांहींना तांत्रिक अडचणी सोडता आल्या नाहीत तर कांहींचे आर्थिक नुकसान होऊन दिवाळे वाजले. अशा प्रकारची कोणतीही यंत्रसामुग्री सर्वांच्या आधी पहिल्यांदा सुरळीतपणे चालवणे अत्यंत कठीण असते. त्यात पदोपदी अनपेक्षित विघ्ने निर्माण होतात. त्यांचे ताबडतोब निराकरण करावे लागते. त्यामुळे ज्या लोकांना त्रास सहन करावा लागतो त्यांचे मनोधैर्य सांभाळावे लागते. कसलाच पूर्वानुभव नसल्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि जपून करावी लागते. जॉर्ज स्टीफन्सन या शर्यतीत यशस्वी ठरला. त्याने तयार केलेले इंजिन जोडलेली रेल्वे समाधानकारक रीतीने चालली आणि फायद्याची ठरली. त्यासाठी जॉर्जने केलेल्या परिश्रमाचे मोल कमी नाही. आपले सारे आयुष्य जॉर्जने या कामात घालवले आणि रेल्वे व्यवस्था नांवारूपाला आणली. त्यासाठी इंजिनात अनेक तांत्रिक सुधारणा केल्या. अनुभवामधून समजलेल्या अडचणी दूर केल्या. त्याने व्यावसायिक रेल्वेगाडी रुळावर आणली असे नक्की म्हणता येईल.


लिव्हरपूल हे बंदर आणि मँचेस्टर हे कापडगिरण्यांचे केंद्र या दोन शहरांना जोडणारी पहिली व्यावसायिक रेल्वेगाडी सुरू झाल्यानंतर लवकरच तिचे जाळे देशभर पसरत सर्व बाजूंनी लंडन शहराच्या वेशीपर्यंत येऊन पोचले. पण तोपर्यंत ते शहर जगातले सर्वात मोठे शहर होऊन बसले होते. तेथील जमीनीच्या किंमती आभाळाला जाऊन भिडल्या होत्या. तिथे अनेक सुंदर इमारती बांधून दिमाखाने उभ्या होत्या. त्या पाडणे कठीण होते. त्यामुळे लंडन शहराच्या केंद्रीय भागात रेल्वेसाठी लागणारी मुबलक जमीन उपलब्ध होणे दुरापास्त होते. त्याच वेळी तिकडे जाणा-या लोकांची रहदारी प्रचंड वाढली होती आणि त्यासाठी घोड्यांच्या गाड्या अपु-या पडत होत्या. या दोन्हींचा विचार करून जमीनीखाली भुयारातून रेल्वेमार्ग काढण्याची अफलातून कल्पना पुढे आली आणि त्या काळातल्या तंत्रज्ञांनी ती यशस्वी करून दाखवली. रेल्वेचा प्रसार होण्याच्या आधीच बहुतेक सर्व मोठ्या शहरातल्या रस्त्यांवर रूळ टाकून त्यावर ट्राम धांवू लागल्या होत्या. त्या मात्र घोडे जुंपून ओढणे सोयीचे आणि किफायतशीर होते. विजेवर चालणारी इंजिने तयार झाल्यानंतर आणि विद्युत उत्पादनाची व्यवस्था अस्तित्वात आल्यानंतर त्यावरील घोड्यांचा उपयोग थांबला. मुख्य मार्गावर देखील विद्युतीकरण झाल्यानंतर दूर जाणा-या आगगाड्या विजेवर धांवू लागल्या. कांही मार्गांवर डिझेल इंजिनांचा उपयोग होऊ लागला. आपल्याकडे अजून होत आहे. आता जगात सगळीकडेच वाफेच्या इंजिनांना रजा देण्यात आली आहे. तांत्रिक दृष्ट्या डिझेल इंजिनसुद्धा विजेवरच चालते. आधी डिझेल इंजिन वापरून जनरेटरमध्ये वीज निर्माण करतात आणि त्या विजेवर रेल्वेचे इंजिन चालते. मोटारगाडीप्रमाणे पेट्रोल किंवा डिझेलवर चालणा-या इंजिनाचा थेट उपयोग रेल्वेची चाके फिरवण्यासाठी करीत नाहीत.


ही सगळी माहिती नॅशनल रेल्वे म्यूझियममध्ये मिळतेच. पण हे फक्त पुराणवस्तूसंग्रहालय नाही. इंग्लंडमधील इतर वस्तूसंग्रहालयांकडे पाहता ते तितकेसे जुनेपुराणेही नाही. सन १९७५ मध्ये ते सुरू झाल्यापासून त्यात अद्ययावत गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जवळजवळ विमानाच्या वेगाने धांवणारे जपानमधील बुलेट ट्रेनचे इंजिनसुद्धा इथे आहे. ते तसे वेगाने चालवून मात्र दाखवत नाहीत. इथे फक्त रेल्वेची इंजिने आणि डबेच नाहीत. त्याची सिग्नलिंग व्यवस्था, त्यावरील नियंत्रण, रेल्वेमधील जेवण, टपालाची ने आण, कामगारांचे व अधिका-यांचे पोशाख, त्यांनी लावण्याचे बिल्ले, प्रवासाची तिकीटे आणि त्यांचे दरपत्रक, लाल व हिरवे बावटे, अपघात टाळण्यासाठी करण्यात येणारी व्यवस्था, अपघात झालाच तर त्यानंतर काय करायचे त्याचा तपशील, इत्यादी रेल्वेसंबंधित असंख्य गोष्टी या ठिकाणी पहायला मिळतात.
आपल्याकडे अगदी लहान मुलांना कोणी वस्तुसंग्रहालयात नेत नाहीत. शाळेतल्या वरच्या वर्गातल्या मुलांना नेले तरी त्यांच्यावर कडक शिस्तीचे बंधन असते. इकडे जायचे नाही,त्याला हात लावायचा नाही वगैरे नियम कधीकधी मुलांना जाचक वाटतात. बहुतेक जागी फोटोग्राफी निषिद्ध असते. परदेशात वेगळेच वातावरण आहे. तिथल्या वस्तुसंग्रहालयात गेल्यावर आपण वाटेल ते पाहू शकतो, वाटेल तितके फिरू शकतो, वाटेल त्याची छायाचित्रे काढू शकतो. यॉर्कच्या नॅशनल म्यूझियममध्ये तर लहान मुलांना बाबागाडीतून नेऊन सगळीकडे फिरवता येते. त्यांना वाटेल तेवढे बागडण्यासाठी भरपूर प्रशस्त जागा आहे. त्यांना जागोजागी खाण्यापिण्याच्या वस्तू मिळतात. ठिकठिकाणी बसून आराम करता येतो. कोठल्याही इंजिनात किंवा डब्यात चढण्या उतरण्यासाठी सोयिस्कर पाय-यांचे जिने लावून ठेवले आहेत. हाताळल्यामुळे खराब होण्यासारख्या नाजुक गोष्टी जाड कांचांच्या मागे बंदिस्त आहेत. उघड्या ठेवलेल्या गोष्टींना हात लावायला कसला प्रतिबंध नाही. टच स्क्रीन किंवा कीबोर्ड द्वारा पाहिजे ती माहिती मिळवून देणारे संगणक जागोजागी ठेवले आहेत. पर्यटकांचीसुद्धा विध्वंसक वृत्ती नसते. मुद्दाम कोणी तोडफोड
करण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे म्यूझियममध्ये लहान मुलांना घेऊन येणारे लोक खूप मोठ्या संख्येने दिसतात.
बीबीसी या वृत्तसंस्थेची सीबीबी नांवाची एक स्वतंत्र वाहिनी आहे. खास लहान मुलांसाठी तयार केलेले मनोरंजक आणि उद्बोधक कार्यक्रम त्यावर प्रसारित होतात. यावर दाखवल्या जाणा-या मालिकांमध्ये थॉमस नांवाचे रेल्वेचे इंजिन हे एक मजेदार पात्र आहे. रेल्वेच्या वस्तुसंग्रहालयात थॉमसची उपस्थिती तर हवीच. टीव्हीवर दिसणा-या थॉमसच्याच रूपाचे एक खेळातले मोठे इंजिन बनवून ठेवले आहे. त्यात एका वेळी दोन मुले बसून डॅशबोर्डवरील बटने दाबू शकतात, वेगवेगळ्या लीव्हर खेचू शकतात. त्यावर ते इंजिन आवाज काढते, धडधडते आणि त्याचे दिवे लुकलुकतात. थॉमसमध्ये बसण्यासाठी सर्व लहान मुले खूप उत्सुक असतात. त्यासाठी वेगळे तिकीट लावून म्यूझियमचीही कमाई होते. वृद्ध वा अपंग लोक बॅटरीवर चालणा-या व्हीलचेअरवर बसून सगळीकडे हिंडू शकतात आणि चढउतर न करता जेवढे पाहता येईल ते पाहू शकतात.
असे हे म्यूझियम आहे. त्यात बच्चेभी देखे, बच्चेका बापभी देखे, बच्चेका दादाभी देखे. सगळ्यांसाठी कांही ना कांही आहे. वाटले तर माहिती मिळवावी, वाटले तर तास दोन तास मजेत घालवावे. यामुळेच लक्षावधी लोक या ठिकाणाला भेट द्यायला येतात. लंडनच्या बाहेर इंग्लंडमध्ये सर्वात जास्त पर्यटक यॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूझियम पहातात. त्याला त्यासाठी अनेक बक्षिसेही मिळाली आहेत.

Friday, December 19, 2008

यॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूझियम (पूर्वार्ध)


यॉर्कच्या रेल्वे स्टेशनाला लागूनच खास रेल्वेचे संग्रहालय आहे. पण तिथे जाण्यासाठी स्टेशनाला बाहेरून वळसा घालून जावे लागते. हे संपूर्ण जगातील सर्वात मोठे रेल्वेचे म्यूजियम आहे असा तेथील लोकांचा दावा आहे आणि तसे असेलही. बोरीबंदरएवढ्या विस्तीर्ण आकाराच्या शेडमध्ये सात आठ प्लॅटफॉर्मवर दीडदोनशे तरी वेगवेगळी इंजिने आणि डबे सजवून मांडून उभे करून ठेवलेले आहेत. ते पाहता पाहता आपण थकून जातो पण त्यांची रांग कांही संपत नाही. त्याशिवाय लांबच लांब हॉल्स आणि पॅसेजेसमध्ये हजारोंच्या संख्येने चित्रे, छायाचित्रे, रेखाचित्रे, स्थिर व चालणा-या प्रतिकृती कलात्मक रीतीने मांडल्या आहेत. वेगवेगळ्या कॉंम्प्यूटर स्क्रीन्सवर आणि साध्या पडद्यावर सारखी दाखवली जात असलेली चलचित्रे वेगळीच! लीड्स येथे असलेल्या आर्मरीज या शस्त्रागाराप्रमाणेच यॉर्कचे हे नॅशनल रेल्वे म्यूझियम आपल्याला एका आगळ्याच अनुभवविश्वात घेऊन जाते.


'आधी कोंबडी की आधी अंडे' याप्रमाणेच आधी रेल्वेचे इंजिन आले की आधी त्याचे डबे हा प्रश्न कधीपासून माझ्या मनात होता. यॉर्कच्या म्यूझियममध्ये सारा इतिहासच चित्ररूपाने डोळ्यासमोर उभा ठाकल्याने या प्रश्नाचे उत्तर त्यात सापडले. रेल्वेच्याच काय पण कोठल्याही प्रकारच्या स्वयंप्रेरित इंजिनाचा शोध लागण्याच्या कित्येक वर्षे पूर्वीच रुळावरून गडगडत चालणा-या वॅगन अस्तित्वात आल्या होत्या. यॉर्कशायरमधील कोळशाच्या आणि लोखंडाच्या खाणींमधून खनिजांचा ढिगारा जमीनीवर उचलून आणण्यासाठी एक उतार तयार करून त्यावर लोखंडाचे रूळ बसवले होते. त्यावरून गडगडणा-या एका ट्रॉलीत खोदलेली खनिजे भरून मजूरांच्या सहाय्याने किंवा घोडे जुंपून ती वर ओढून आणीत असत. जेम्स वॉटने पहिले वाफेवर चालणारे स्वयंचलित इंजिन तयार करून दाखवल्यानंतर तशा प्रकारच्या इंजिनाचा पहिला व्यावसायिक उपयोग लीड्स येथील खाणीत करण्यात आला. घोड्यांऐवजी एक इंजिन जुंपून त्यांच्याद्वारे जमीनीतून खनिज पदार्थ बाहेर आणणे सुरू झाले. दोन, चार किंवा आठ घोडे जेवढे वजन ओढू शकतील तेवढे काम हे एक इंजिन करू शकते म्हणून इंजिनाची शक्ती अश्वशक्तीच्या परिमाणात मोजू लागले. त्या काळात 'दर सेकंदाला अमूक इतके फूटपाउंड' अशासारखी परिमाणे लोकांना समजणे शक्यच नव्हते. अजूनही तांत्रिक ज्ञान नसलेल्या किती लोकांना त्याचा अर्थ उमजतो यात शंकाच आहे. विजेचा शोध लागला नसल्यामुळे किलोवॉट तर अजून अस्तित्वात आलेले नव्हते. अश्वशक्तीचा उपयोग मात्र आजतागायत सर्वसामान्य लोक करतात.


त्यानंतर वर्षा दोन वर्षातच उतारूंना घेऊन जाण्यासाठी इंजिनाचा उपयोग करण्याची कल्पना पुढे आली. त्या काळात इंग्लंडमध्ये घोडागाडी हेच श्रीमंत लोकांचे वाहन होते. गरीब लोक पायीच चालत असत किंवा घोड्यावर स्वार होऊन जात असत. त्यांना रेल्वेचा पर्याय देऊन तिकडे आकर्षित करणे हे काम सोपे नव्हते. वाफेच्या इंजिनाचा आकार व त्याबरोबर त्याहून मोठा बॉयलर आणि कोळशाने भरलेली वॅगन नेण्याची जरूरी लक्षात घेता एक दोन माणसांना वाहून नेणारी बग्गी तयार करण्यात कांहीच अर्थ नव्हता. त्यामुळे खूप लोक एकदम प्रवास करू शकतील असे डबे बनवून ते एका शक्तीशाली इंजिनाच्या सहाय्याने ओढणे हेच शहाणपणाचे होते. पण लोकांना असा प्रवास करण्याची संवय नव्हती. तसेच सुरुवातीला या प्रचंड आवाज करणा-या धूडाची त्यांना भीतीही वाटायची. रेल्वे चालवायची म्हंटल्यास त्यासाठी आधी रूळ टाकायला हवेत. ते करण्यासाठी लागणारा खर्च भरून निघायला हवा. यामुळे कोठल्याही अजब अशा नव्या कल्पनेला होतो तसाच या कल्पनेला भरपूर विरोध झाला. ती मांडणा-या लोकांना मूर्खात काढण्यात आले. पण कांही दूरदर्शी लोकांना ती कल्पना पटली आणि नाविन्याचे आकर्षण तर त्यात होतेच. त्यामुळे त्यांनी ती उचलून धरली. निदान मालवाहतूक करणे तरी त्यामुळे जलद आणि स्वस्तात होईल याची त्यांना खात्री होती. सर्वसामान्य लोकांना मात्र रेल्वे प्रत्यक्षात आल्यानंतर इतकी आवडली की हां हां म्हणता जगभर रेल्वेचे जाळे विणले गेले. सैनिक आणि शस्त्रास्त्रे यांची जलदगतीने वाहतूक करण्याच्या दृष्टीने राज्यकर्त्यांना ती फारच सोयीची असल्यामुळे भारतासारख्या दूरच्या देशात देखील कांही वर्षांतच रेल्वे सुरू करण्यात आली.


अगदी प्राथमिक स्वरूपाच्या इंजिनाच्या व गाडीच्या उपयोगापासून आतापर्यंत त्याचा कसा विकास होत गेला याचे सविस्तर चित्ररूप दर्शन घडणारी एक चित्रमालिकाच यॉर्कच्या संग्रहालयात एका विभागात मांडली आहे. तिच्या बरोबर त्या प्रत्येक काळात घडलेल्या महत्वाच्या राजकीय घडामोडीसुद्धा दिल्या आहेत. युरोपातील युद्धे, इंग्लंडचे राजे किंवा राण्यांचे राज्याभिषेक, भारतातील स्वातंत्र्यसंग्राम (इंग्रजांच्या मते शिपायांचे बंड), अमेरिकेतील प्रसिद्ध राष्ट्राध्यक्षांची कारकीर्द, विजेच्या दिव्यांचा किंवा टेलीफोनचा शोध वगैरे गोष्टी कधी घडल्या ते रेल्वेच्या प्रगतीच्या सोबतीने पहावयास मिळते. दुस-या एका दृष्यात दोन तीन स्टेशने, त्यामधील रेल्वे ट्रॅक्स, बोगदे, पूल इत्यादीचे सुरेख देखावे मांडले आहेत. त्यात खेळण्यातल्या आगगाड्या सतत ये जा करीत असतात. त्यांचे सुरू होणे, वेग घेणे, स्टेशन जवळ येताच वेग मंदावत बरोबर प्लॅटफॉर्मवर उभे राहणे, सिग्नल पडणे व उठणे, रुळांचे सांधे बदलणे असे सर्व बारकावे या मॉडेलमध्ये दाखवले आहेत. कांचेला विशिष्ट प्रकारची गोलाई देऊन पलीकडची हिरवळ आभाळाला टेकल्याचा त्रिमिती भास निर्माण केला आहे. लहान मुलांना तर ते दृष्य टक लावून पहात बसावेसे वाटतेच, पण मोठ्यांनाही ते पहात राहण्याचा मोह होतो.


वाफेचे इंजिन, डिझेल इंजिन आणि विजेचे इंजिन यांचे सर्व अंतर्गत भाग दाखवणा-या पूर्णाकृती प्रतिकृती या प्रदर्शनात ठेवल्या आहेत. त्यासाठी त्यांचे विविध जागी छेद घेऊन आंतली रचना दाखवली आहे. तसेच प्रत्येक भागाचे कार्य विशद करणारे तक्ते बाजूला दिले आहेत. थोडे लक्ष देऊन पाहिल्यास सामान्य माणसालाही ते इंजिन कसे काम करते ते समजून घेता येते. इंग्लंडमधीलच नव्हे तर जगभरातल्या अनेक देशात इतिहासकाळात वापरली गेलेली इंजिने जमा करून आणि दुरुस्त करून या प्रदर्शनात ठेवली आहेत. प्रवाशांसाठी बनलेल्या डब्यांच्या अंतर्भागात कसकसा बदल होत गेला हे दाखवण्यासाठी अनेक ऐतिहासिक डबे गोळा करून ठेवले आहेत. सर्व सामान्य लोकांचा थर्ड क्लास आणि उच्चभ्रू लोकांसाठी आरामशीर पहिला वर्ग तर आहेतच, पण राजघराण्यातील लोकांसाठी निर्माण केलेले खास सुसज्ज डबेसुद्धा आहेत. कधी कधी तर महाराजा किंवा महाराणीच्या फक्त एका वेळच्या प्रवासासाठी असा खास डबा तयार केला जायचा आणि तो प्रवास होऊन गेल्यानंतर तो डबा बाजूला ठेवला जात असे. अशा खास डब्यामधील जेवणाचे टेबल, त्यावरील प्लेट्स, काटे, चमचे, नोकरांचे पोशाख, खिडक्यांना लावलेले पडदे अशा सगळ्या गोष्टी सुव्यवस्थितपणे मांडून तो काळ निर्माण केला आहे. पर्यटकांना आंत जाऊन ते सारे पाहून घेण्याची अनुमती आहे तसेच त्यादृष्टीने रांगेने आंत जाऊन बाहेर पडण्याची व्यवस्था केलेली आहे.

Thursday, December 18, 2008

यॉर्कला भेट - भाग १


न्यूयॉर्क या अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध शहराचे नांव मला समजायला लागल्यापासून मी ऐकत आलो होतो. सगळ्यांनीच ते ऐकलेले असते. या 'नवीन यॉर्क'चे नांव मूळच्या ज्या गांवाच्या नांवावरून ठेवले गेले ते जुने 'यॉर्क' कोठे असेल याबद्दल मनात कुतूहल वाटत होते. क्रिकेटच्या बातम्यांमध्ये 'यॉर्कशायर' नांवाच्या कौंटीचा उल्लेख यायचा. पण 'यॉर्क' या नांवाच्या गांवाची बातमी मात्र कधी वाचनात आली नव्हती. लीड्सला गेल्यावर आपण यॉर्कशायरमध्ये आलो असल्याचे समजले आणि 'यॉर्क' बद्दलचे कुतूहल अधिकच वाढले. आता प्रत्यक्ष तिथे जाऊन पहाणे आवश्यक होते तसेच ते सहज शक्य होते.


लंडनच्या उत्तरेला सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर 'यॉर्क' हे शहर आहे. 'यॉर्कशायर' हा परगणा बराच लांब रुंद पसरला आहे. औद्योगीकरण आणि व्यापार यांमुळे गेल्या तीन चार शतकांत इतर शहरांची झपाट्याने वाढ झाल्यामुळे ती आता अधिक प्रसिद्ध झाली आहेत आणि यॉर्क हे शहर आता मुख्यत्वे पर्यटनस्थळ बनले आहे. या शहराच्या जुन्या भागाचे ऐतिहासिक स्वरूप जाणीवपूर्वक राखून ठेवले आहे, तसेच पर्यटकांसाठी खास सुविधा व आकर्षणे तिथे निर्माण केली आहेत.


इसवी सनाच्या पहिल्याच शतकात रोमन साम्राज्याने इंग्लंडवर कब्जा मिळवला होता त्या वेळेस यॉर्क येथे आपले ठाणे प्रस्थापित केले होते. त्यानंतर रोमन सैनिक व सेनापती येथे येत राहिले. चौथ्या शतकात येथे आलेल्या कॉन्स्टन्टाईन याने यॉर्क इथूनच आपल्या सम्राटपदाची घोषणा केली आणि रोमला जाऊन सत्तेची सूत्रे हातात घेतली असे सांगतात. त्याने पुढे रोमन साम्राज्याचा अधिक विस्तार केला आणि कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर वसवले.


सातव्या का आठव्या शतकात नॉर्वे स्वीडनकडून व्हायकिंग लोक समुद्रातून या भागात आले. इथले हवामान त्यांना आवडले आणि मानवले यामुळे ते इथेच स्थायिक झाले. यॉर्क इथे त्यांनी भक्कम तटबंदी बांधून एक गढी बनवली. आजूबाजूचा बराच प्रदेश जिंकून घेऊन त्यांनी तेथे आपला अंमल सुरू केला. कित्येक शतके त्यांची राजवट तिथे होती आणि यॉर्क ही त्या प्रदेशाची राजधानी होती. हळूहळू वांशिक संकर होऊन त्यांचे वेगळे 'व्हायकिंग'पण राहिले नाही. तसेच इंग्लंडच्या बलाढ्य राजाने त्यांचे राज्य आपल्या राज्यात विलीन करून घेतल्यानंतर यॉर्कशायर हा एक परगणा उरला.


लीड्सहून यॉर्क अगदी जवळ आहे, तसेच दर दहा पंधरा मिनिटांनी तिथे जाणा-या रेल्वेगाड्या आहेत. इंग्लंडमध्ये रेल्वेचे खाजगीकरण झाले असल्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या तिथल्या रुळावरून धांवत असतात. त्यामुळे आपल्याला हवे तेंव्हा लीड्सहून यॉर्कला जाता येते. तिथे तिकीटांचे दर ठरलेले नसतात. कामाचा दिवस किंवा सुटीचा दिवस, सकाळची, दुपारची किंवा रात्रीची वेळ याप्रमाणे ते बदलत असतात. आयत्या वेळी तिकीट काढले आणि 'रश अवर' असेल तर ते सर्वात महाग पडते. त्यामुळे मला तरी गर्दीने भरलेल्या गाड्या कधीच दिसल्या नाहीत. दोन चार दिवस आधी तिकीट काढले तर त्यात अनेक प्रकारच्या 'डील्स' मिळतात. घरबसल्या इंटरनेटवरून बुकिंग करता येते आणि तिकीट देणा-या यंत्रामधून क्रेडिट कार्ड वापरून हवे तेंव्हा ते तिकीट छापून मिळते. आम्हीही सुटीचा दिवस पाहून यॉर्कला जाण्याचा प्रोग्रॅम आंखला आणि सोयिस्कर वेळेला जाण्यायेण्याची तिकीटे काढून ठेवली.


इंग्लंडमधल्या रेल्वेगाडीचा सामान्य दर्जाचा डबाच आपल्या राजधानी एक्सप्रेसच्या चेअरकारच्या तोडीचा असतो. त्याहून वेगळा वरच्या दर्जाचा डबा असला तरी मी कांही तो कधी पाहिला नाही. सर्वसामान्य गाड्यांना वेगवेगळ्या दर्जाचे डबे नसतातच. जवळच्या अंतरासाठी धावणा-या गाड्याच मुळी फक्त दोन किंवा तीन डब्यांच्या असतात. त्यांना वेगळे इंजिन नसते. मुंबईच्या लोकल ट्रेनप्रमाणे एक लहानशी केबिन असते. तिथे प्रत्येकाच्या घरी माणशी एक कार असतांना रेल्वेने जाणारे लोक थोडेच असतात. लंडन ते एडिंबरो अशा लांब टप्प्याच्या गाड्या मात्र मोठ्या म्हणजे दहा बारा डब्यांच्या असतात. भारतात दिसतात तसल्या वीस पंचवीस डब्यांच्या गाड्यांची तिथे गरज नाही.


तिकीटात दाखवल्याप्रमाणे आम्हाला दिलेल्या डब्यात आणि स्थानांवर आम्ही जाऊन बसलो. पण आजूबाजूला दुसरे तिसरे कोणी आलेच नाही. गाडीत गर्दी अशी नव्हतीच. हवेत थंडी असल्यामुळे आम्ही जरी स्वतःला कपड्यांमध्ये गुरफटून घेतले असले तरी धुके निवळले असल्यामुळे बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश होता. लीड्सपासून यॉर्कपर्यंतचा प्रवास अवघ्या अर्ध्या पाऊण तासात होतो. तेवढा वेळ इंग्लंडमधले रम्य 'कंट्रीसाईड', तिथली गालिच्यांसारखी पसरलेली यांत्रिक शेती, हिरवे गार डोंगर आणि त्यांच्या उतारावरले गवत, त्यात चरणारी मेंढरे, क्वचित दिसणारी गायी, गुरे वगैरे पाहिली आणि ईशा व इरा यांना ती दाखवली. यॉर्क स्टेशनात पोचलो तेंव्हा हवेत खूप गारठा होता. त्यामुळे स्टेशनाच्या इमारतीतच असलेल्या रेस्तरॉँमध्ये बसून न्याहरी केली आणि यॉर्क शहराचा फेरफटका करण्यासाठी बाहेर पडलो.
. . .. . . . . . . . . . . . .. . (क्रमशः)

Monday, December 15, 2008

झुकझुकगाडी - भारतातली आणि विलायतेतली - भाग१ ते ४


हा लेख मी २००८मध्ये चार भागांमध्ये लिहिला होता. ते चारही भाग एकत्र करून, त्यांचे संपादन करून आणि थोडी नवी भर टाकून हा लेख पुनर्प्रकाशित करीत आहे. दि. ०६-१२-२०१९
---------------

झुकझुकगाडी - भारतातली आणि विलायतेतली -(भाग १)

जगातले पहिले वाफेचे इंजिन इंग्लंडमध्ये तयार झाले तसेच त्यानंतर कांही वर्षातच पहिली रेल्वेगाडी इंग्लंडमध्ये सुरू झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर दोन तीन दशकातच मुंबई ते ठाणे ही रेल्वे सुरू झाली आणि लवकरच भारतभर रेल्वेमार्गांचे जाळे तयार झाले. भारत हा इंग्लंडपेक्षा आकाराने खूपच मोठा देश असल्यामुळे ते काम इंग्लंडमधल्या रेल्वेमार्गांपेक्षा नक्कीच मोठे असणार! या कामासाठी जी.आय.पी., बी.बी.सी.आय. यासारख्या अनेक खाजगी कंपन्या तयार झाल्या. त्यांनी आपापले मार्ग आंखून घेतले आणि त्यांवर त्यांच्या गाड्या धांवू लागल्या. मुंबईमध्ये काम करणा-या जी.आय.पी. आणि बी.बी.सी.आय. या कंपन्यांमध्ये फारसे सख्य नसावे. त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन मुंबईसाठी एक समाईक केंद्रीय स्थानक बांधायचा विचार केला नाही. फक्त दादर या एका ठिकाणी दोन्ही रेल्वेंची वेगवेगळी स्थानके पुलाने जोडली होती व त्यावरून प्रवाशांना इकडून तिकडे जाण्याची सोय होती. जी.आय.पी. ची मध्य रेल्वे आणि बी.बी.सी.आय. ची पश्चिम रेल्वे झाल्यानंतर त्या परिस्थितीत अद्याप फारसा बदल झालेला नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळून पंडित नेहरूंनी देशाचे नियोजन हांतात घेतल्यानंतर त्यांनी सगळ्या खाजगी रेल्वे कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले आणि त्यांचा सर्व कारभार भारत सरकारतर्फे चालू लागला. तसा तो आजतागायत सुरू आहे. कामाच्या विभागणीच्या सोयीसाठी रेल्वेचे स्थूल मानाने भौगोलिक पायावर विभाग करण्यात आले. रेल्वेचा व्याप जसा वाढला तसे दक्षिण मध्य, दक्षिण पूर्व असे नवे विभाग करण्यात आले. त्यातही मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वेंनी मुंबईतील आपली उपस्थिती कायम ठेवली आहे. मात्र आता वेगवेगळ्या विभागांतून आरपार जाणा-या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या धांवू असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.

इंग्रजी अंमलाच्या काळात रेल्वेगाड्यांमध्ये पहिला, दुसरा, इंटर आणि तिसरा असे चार वर्ग असत. मेल किंवा एक्सप्रेस आणि पॅसेंजर हे गाड्यांचे दोन प्रकार असत. त्यानुसार त्यांचे भाड्याचे दर असत. वेगवेगळ्या खाजगी कंपन्या एकाच दराने भाडे आकारत होत्या किंवा त्यांत फरक होता हे मला माहीत नाही. त्यांची वेगवेगळी तिकीटे काढावी लागायची असे ऐकल्याचे आठवते. मी माझ्या आयुष्यातला पहिला रेल्वे प्रवास केला तेंव्हा त्यांचे राष्ट्रीयीकरण झालेले होते. पण निदान मिरज स्टेशनवर तरी मीटरगेजच्या पूर्वीच्या एम.एस.एम. रेल्वेच्या स्टेशनातून पूर्णपणे बाहेर पडून पंढरपूरला जाणा-या बार्शी लाईट रेल्वेच्या वेगळ्या स्टेशनात आम्ही गेलो होतो हे नक्की.

भारतीय रेल्वेने लवकरच इंटर क्लास बंद केला. त्यानंतर दुसरा वर्गही बंद करून तिस-या वर्गाला बढती देऊन दुसरा बनवले. पण तांत्रिक प्रगतीमुळे एअरकंडीशनिंग शक्य झाल्यामुळे एअर कंडीशन्ड हा एक वेगळा उच्च वर्ग निर्माण केला. पहिली कित्येक वर्षे त्यात फक्त पहिला वर्गच होता आणि त्याचे भाडे प्रचंड होते. बहुतकरून रेल्वेचे उच्चपदस्थ अधिकारी आणि इतर मोठ्या हुद्यावरील व्ही.आय.पी. लोकच त्यातून प्रवास करीत असत. त्यापूर्वीच किंवा त्याच सुमारास दुस-या वर्गातल्या प्रवाशांना रात्री झोपण्यासाठी स्लीपर कोच बनवले गेले. दूर जाणा-या गाड्यांची संख्या जसजशी वाढत गेली त्यात अधिकाधिक संख्येने स्लीपर कोच लागू लागले. त्याचा खात्रीपूर्वक लाभ घेता येण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था सुरू झाली. आजकाल तर विना आरक्षण प्रवास करणे जवळजवळ अशक्यच झाले आहे. त्यासाठी अजून कांही गाड्यांमध्ये जनरल कंपार्टमेंट असतात, पण त्या शोधाव्या लागतात आणि त्यात प्रवेश करणेसुद्धा कर्मकठीण असते.

मध्यंतरीच्या काळात टू टियर स्लीपरला एअर कंडीशन्ड करून पहिल्या वर्गाचे भाडे त्याला आकारले जाऊ लागले. त्या वर्गाने जाणा-या प्रवाशांना वातानुकूलित थंडगार वातावरण किंवा पहिल्या वर्गाचा प्रशस्त डबा यांतून निवड करण्याची सोय ठेवली होती. ऋतुमानाप्रमाणे लोक आपापली निवड करीत असत. कांही वर्षांनी या दोन्हींची फारकत करण्यात आली. हळूहळू पहिल्या वर्गाचे डबे कमी कमी होत चालले आहेत आणि ते लवकरच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कांही वर्षांपूर्वी थ्री टियर स्लीपरलाही वातानुकूलित करून एक नवा वर्ग निर्माण केला गेला. याचे तिकीट पहिल्या वर्गापेक्षा कमी असल्याने त्याला मध्यम वर्गाकडून वाढती मागणी आहे. राजधानी एक्सप्रेस सारख्या अतिजलद गाड्या सुरू झाल्या. त्यासाठी चेअरकार हा नवा वर्ग केला गेला. त्यात प्रवासाबरोबरच जेवणखाण्याची सोय रेल्वेतर्फे होत असल्याने त्याचा समावेश भाड्यात करण्यात आला.

त्यामुळे आता पॅसेंजर, मेल एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट गाड्या, त्यातील वातानुकूलित किंवा साधा व पहिला किंवा दुसरा वर्ग, आरक्षित किंवा अनारक्षित असे अनेक प्रकार आहेत. त्यांसाठी तिकीटाचे वेगवेगळे दर आहेत. राजधानी किंवा शताब्दी एक्सप्रेस आणि पर्वतावरील रेल्वेगाड्या यांना वेगळ्या दरांची तिकीटे आहेत. पण एका प्रकारच्या गाडीतील एका वर्गातल्या प्रवासासाठी देशभरात कुठेही केंव्हाही समान दर आहेत. लहान मुलांना पहिल्यापासूनच अर्धा आकार होता. कांही वर्षांपूर्वी वृध्द व अपंग व्यक्तींना यात कांही टक्के सूट देण्यात आली आहे. वृध्द महिलांना देण्यात येणा-या सवलतीत अलीकडे वाढ केली आहे. त्यामुळे आता स्त्रीपुरुषांच्या भाड्यात फरक पडेल. गर्दीच्या आणि विनागर्दीच्या मोसमात वेगळ्या प्रमाणात भाडे आकारण्याचे सूतोवाच झालेले आहे. त्यामुळे एकाच प्रवासासाठी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या दराने शुल्क आकारण्याची सुरुवात होणार आहे. परदेशात हे आधीपासून अस्तित्वात आहे. भारतातल्या विमानप्रवासात हे पूर्वीच सुरू झालेले आहे.
. . . . . . . . . . . . .. . . .

झुकझुकगाडी - भारतातली आणि विलायतेतली -(भाग २)

आमच्या गांवापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन निदान पन्नास किलोमीटर दूर होते. आज मी अमेरिकेतल्या अल्फारेटा या गांवात बसून हे लिहितो आहे, इथेसुध्दा आगीनगाडीचे स्टेशन नाही ही एक योगायोगाची गोष्ट आहे. ज्यांनी आयुष्यात कधीही रेल्वेने प्रवास केला नव्हता अशी सुद्धा बरीच मंडळी आमच्या भारतातल्या लहान गांवात त्या काळी होती. त्यांचे सगळे आप्तेष्ट पंचक्रोशीतच रहात असल्यामुळे त्यांना रेल्वेने कोठे जाण्याची गरजच कधी पडली नव्हती. त्या मानाने आम्ही सुदैवीच म्हणायचे, कारण मला शाळेत असतांना पांच सहा वेळा रेल्वेने कोठे ना कोठे जाण्या-येण्याचा योग आला. त्यातले बहुतेक सगळे प्रवास कोळशाचे इंजिन जोडलेल्या 'कू'गाडीतूनच केले. "झुकझुक झुकझुक अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी " हे वर्णन त्याला अगदी 'फिट्ट' बसायचे. अर्थातच ते आमचे 'पेट्ट' गाणे होते. मनात धडकी भरवणारा आवाज करणारे कोळशाच्या इंजिनाचे ते अवजड धूड, त्याच्या धगधगणाऱ्या भट्टीत सारखे फावड्याने कोळसे टाकणारे कष्टाळू मजूर, धुराड्यातून उडणारे धुराचे लोट, मध्येच फुस्स करून इंजिनातून सोडलेली वाफ, इंजिनाला अधून मधून पाणी पाजण्यासाठी गाडीने एकाद्या स्टेशनात खूप वेळ उभे राहणे वगैरे सगळ्याच गोष्टींचे आमच्या बालमनाला मोठे अपरूप वाटायचे आणि एका प्रवासाचे रसभरीत वर्णन पुढला प्रवास घडेपर्यंत होत रहायचे.

त्या काळात रिझर्वेशन नांवाची भानगडच नसायची. आमच्या गांवाशी संलग्न असलेल्या छोट्या स्टेशनात गाडी जेमतेम दोन तीन मिनिटे उभी रहायची. त्यामुळे रेल्वे गाडीत चढणे आणि उतरणे हे एक दिव्य असायचे. त्या काळी डब्याच्या खिडक्यांना गज नसत. त्यामुळे आम्हा लहान मुलांना प्लॅटफॉर्मवरून उचलून सरळ खिडकीतून आंत टाकले जाई. आमच्या पाठोपाठ सामान येई आणि त्यानंतर बाईमाणसांना कसेबसे दरवाज्यातून कोंबून मोठी माणसे आंत उड्या मारत. तोपर्यंत गाडी सुटायची शिट्टी होत असे. आंत आल्यानंतर सामानाची मोजदाद करायची. कुणाची ट्रंक कुठे आहे ते पाहून त्यांना ताब्यात घेऊन आणि पिशव्या, बोचकी, टिफिनचा डबा, फिरकीचा तांब्या वगैरे सगळे आले याची खात्री करून होईपर्यंत पुढल्या स्टेशनवर उतरणाऱ्यांची हालचाल सुरू होत असे. त्यात चपळाई करून आपल्याला बसण्यासाठी जागा मिळवल्यावर शेजारी बसलेल्या काका, मामा, मावशी वगैरेंशी संवाद सुरू होत असे. कधीकधी रेल्वेत भेटलेल्या माणसांबरोबर झालेली मैत्री खूप काळ टिकत असे. "युद्धस्य कथा रम्याः" प्रमाणे रेल्वे प्रवासाच्या गोष्टी घोळवून घोळवून सांगतांना त्यात तल्लीन होणारे कित्येक लोक माझ्या लहानपणी मी पाहिले आहेत. आता रेल्वेच्या काय, विमानाच्या प्रवासाचे देखील फारसे कौतुक कोणालाच राहिलेले नाही.

मी मुंबईच्या प्रवासात विजेवर चालणारे इंजिन पहिल्यांदा पाहिले. खरे तर सगळ्या बाजूने बंद असलेल्या त्या इंजिनात बाहेरून पाहण्यासारखे कांहीच दिसत नव्हते. त्याचा "भों" करणारा कर्कश भोंगा तेवढा लक्षात राहिला. पुणे मुंबई प्रवासात खंडाळ्याचा घाट आणि त्यात येणारे बोगदे याचे खूप वर्णन ऐकले होते, वाचले होते आणि त्याबद्दल मनात मोठे कुतूहलही होते. त्यामुळे अगदी डोळ्यात जीव आणून खिडकीबाहेर दिसणारे निसर्गसौंदर्य टिपून घेतले. त्यानंतर कर्जतला मिळणारा दिवाडकरांचा गरमागरम बटाटा वडा म्हणजे अगदी मज्जाच मज्जा! पहिल्या प्रवासाची ती आठवण पुढे निदान पंधरा वीस वर्षे तरी मनात ताजी होती आणि दिवाडकरांचा बटाटा वडा सुद्धा त्या प्रवासाचा अविभाज्य भाग बनला होता. आता बहुतेक वेळा मुंबई पुणे प्रवास द्रुतगती मार्गानेच होत असल्यामुळे वाटेत फूडमॉलवर खाणे होते तेंव्हा दिवाडकरांचा बटाटा वडा आठवतोच, पण आता ती चंव असलेले वडे मात्र मिळत नाहीत.

मला पुढील आयुष्यात कधी कामाच्या निमित्याने आणि कधी पर्यटन करण्यासाठी म्हणून आपला देश काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत उभा आणि राजकोटपासून गाँतोक पर्यंत आडवा पहायची संधी मिळाली. त्यातला बराचसा प्रवास रेल्वेनेच झाला. त्यामुळे असतील नसतील त्या सगळ्या प्रकारच्या वर्गांचे डबे आतून बाहेरून पाहून झाले. फक्त 'पॅलेस ऑन द व्हील्स' सारखी खास परदेशी पर्यटकांसाठी तयार केलेली गाडी तेवढी अजून पहायची राहिली आहे. या प्रवासातल्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाच्या राजेशाही प्रवासापेक्षाही मेट्टूपळ्ळेयम यासारख्या अजब नांवाच्या स्टेशनपासून कुन्नूरपर्यंत गर्दीने खचाखच भरलेल्या दुसऱ्या वर्गातून केलेले नीलगिरी पर्वतारोहण माझ्या जास्त लक्षात राहिले आहे.
------------------

झुकझुकगाडी - भारतातली आणि विलायतेतली (भाग ३)


जॉर्ज स्टीफन्सनने तयार केलेल्या 'रॉकेट' नावाच्या इंजिनापासून ते जपानमधील 'बुलेट ट्रेन'च्या विजेच्या सुपरफास्ट इंजिनापर्यंत रेल्वेचा सारा इतिहास मी यॉर्क येथील नॅशनल रेल्वे म्यूजियममध्ये पाहिला आहे. त्याचे थोडक्यात वर्णन या ब्लॉगवर वेगळ्या लेखात दिले आहे. पंचवीस वर्षांपूर्वी मी जेंव्हा पहिल्यांदा इंग्लंडला गेलो तेंव्हाच विलायतेतली झुकझुकगाडी प्रत्यक्ष पहाण्याचा आणि अनुभवण्याचा योगही आला होता. खरे तर मी हीथ्रो विमानतळावरून इकडे तिकडे न जाता आधी थेट यूस्टन रेल्वे स्टेशनवर गेलो. मला पुढे कॉव्हेंट्री नांवाच्या गांवाला जायचे होते. लंडन यूस्टनहून तेथे जाण्यासाठी दिवसभर एकापाठोपाठ एक अशा अनेक गाड्या होत्या. सूर्य मावळून अंधार पडण्यापूर्वी तेथे पोचेल अशा एका गाडीची निवड केली आणि तिचे तिकीट काढले. त्यानंतर मी लंडनदर्शन घेऊन जिवाचे थोडे लंडन करून घेतले होते.

ते तिकीट विमानाच्या बोर्डिंग कार्डसारखे लांबट आकाराचे होते आणि त्यावर तारीख, वेळ, डबा क्रमांक, आसन क्रमांक वगैरे सगळा तपशील दिला होता. लंडन यूस्टन रेल्वे स्टेशनाची एकंदर रचना आपल्या सी.एस.टी.स्टेशनासारखीच असल्यामुळे आपली गाडी, तिच्यातला डबा आणि आसन शोधायला मला मुळीच त्रास पडला नाही. जागोजागी मार्गदर्शक फलक लावलेले होते. ते पहात कोणालाही न विचारता मी आपल्या जागेवर जाऊन बसलो. तिकडे फलाटावर प्रवेश करण्यापूर्वीच आपले तिकीट दाखवावे लागले. तेंव्हा आपण योग्य त्याच मार्गाने चाललो असल्याची खात्रीही पटली.

माझा डबा आपल्या डेक्कन क्वीनमधल्या कुर्सीयानासारखा सलग होता. त्यात कप्पे नव्हते. अमोरासमोर रांगांमध्ये खुर्च्या मांडलेल्या होत्या. त्या काळातल्या दख्खनच्या राणीमधल्या खुर्च्यांवर गडद हिरव्या रंगाच्या मेणकापडाचे वेस्टण असे आणि ती सीट मऊ बनवण्यासाठी तिच्यात काय भरत होते कोणास ठाऊक! विलायतेतल्या गाडीत सुटसुटीत आकाराच्या आणि हलक्या रंगाच्या फोमच्या छान मऊ सीट होत्या. खिडक्याना कांचेची भव्य तावदाने होती. डब्यातली स्वच्छता आणि लख्ख प्रकाश यामुळे अतिशय प्रसन्न असे वातावरण होते. कदाचित माझ्या मनातल्या भावनांचाही तो परिणाम असेल! नंतरच्या काळात आपल्याकडील कांही वातानुकूलित गाड्यांनासुद्धा साधारणपणे अशा प्रकारचे डबे लावले गेले आहेत.

आमच्या डब्याच्या दरवाजाजवळच एक छोटेसे उघडे केबिन होते. अवजड सामान तिथे असलेल्या रॅकवर ठेवायची व्यवस्था होती. बहुतेक लोकांकडे सुटसुटीत बॅगा होत्या. त्या आपल्या सीटच्या खाली ठेवून किंवा मांडीवर घेऊन सगळे स्थानापन्न होत होते. दोन्ही बाजूंच्या प्रवाशांना दिसतील असे स्क्रीन लावले होते. त्यावर ती गाडी कोणत्या मार्गाने कोठकोठल्या स्टेशनांवर थांबत कुठपर्यंत जाणार आहे ही माहिती दिसत होती. त्याचीच उद्घोषणा करणारे स्पीकरही डब्यात लावलेले होते. आमची गाडी सुटण्याची वेळ होताच ती सुटणार असल्याची घोषणा झाली, सर्व दरवाजे आपोआप बंद झाले आणि गाडीने वेग घेतला. सारे दरवाजे व खिडक्या बंद असल्यामुळे गाडीचा फारसा खडखडाट ऐकू येत नव्हता आणि ती चांगल्या वेगाने धांवत असतांनाही त्या मानाने तितकेसे धक्के बसत नव्हते. ती अगदी विमानासारखी हवेवर तरंगत नसली तरी विशेष हेलकावे खात नव्हती. रुळांची पातळी समांतर राखून त्यांमधील अंतर अगदी अचूक ठेवलेले असणार!

इंग्लंडमधली बेभरंवशाची समजली जाणारी हवा माझ्या सुदैवाने त्या दिवशी चांगली होती. बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश पडलेला असल्यामुळे निसर्गसौंदर्य पाहता येत होते. उघड्या खिडकीपेक्षा कांचेच्या मोठ्या तांवदानातून बाहेरचे दृष्य जास्त सुंदर दिसते असा माझा नेहमी येणारा अनुभव आहे. कदाचित थंडी, वारा, ऊन वगैरेपासून बचाव होत असल्यामुळे असेल. अधून मधून येणारी स्थानके, तिथे उतरणारे व चढणारे प्रवासी आणि खिडकीतून दिसणारी घरे, बागा, शेते वगैरे न्याहाळण्यात दीड दोन तास निघून गेले. "पुढचा थांबा कॉव्हेन्ट्री येथे आहे सर्व प्रवाशांनी उतरण्यासाठी सज्ज रहावे" अशी घोषणा होताच मीही आपले सामान घेऊन तयारीत राहिलो. स्टेशन येताच डब्याचा दरवाजा उघडला आणि मी आपल्या गंतव्य ठिकाणाला जाऊन पोचलो तो आपल्याबरोबर एक नवा अनुभव घेऊन!

परतीचा प्रवास साधारणपणे तसाच झाला. लंडन स्टेशन येण्यापूर्वी एक धिप्पाड तिकीट तपासनीस आमच्या डब्यात आला. त्याने तिकीट मागून घेतले आणि स्वतःकडेच ठेवले. "लंडनला पोचल्यावर मी काय करू?" असे विचारताच, "गाडीतून उतरा आणि सरळ चालायला लागा." असे उत्तर मिळाले. अंवतीभोवतीचे सगळेच प्रवासी त्याला आपापली तिकीटे देत आहेत हे पाहून घेतले तेंव्हा मला थोडा धीर आला. पण मनात धुकधुक वाटतच होती. लंडनला आमची गाडी पोचली तेंव्हा बाहेर पडण्याच्या एकमेव अरुंद मार्गावर तोच टीसी उभा होता आणि हात हलवून सर्वांना "गुडबाय" करत होता. लंडनला पोचल्यानंतर तिकीटे गोळा करण्यासाठी लागणारी कांही मिनिटे त्याने वाचवली होती.

. . . .. . . . . . . . . .

झुकझुकगाडी - भारतातली आणि विलायतेतली (भाग ४)


इंग्लंडमध्येही तिथल्या सगळ्या रेल्वे पूर्वीच्या काळात तिथल्या खाजगी कंपन्यांनीच सुरू केल्या होत्या. दुसऱ्या महायुध्दानंतर तिकडेही समाजवादाचे वारे वाहू लागल्यानंतर त्या कंपन्यांना एकत्र करून 'ब्रिटीश रेल्वे' ही सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी कंपनी बनवण्यात आली. पंचवीस वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा इंग्लंडमध्ये गेलो तोपर्यंत तिचे 'ब्रिटीश रेल' असे नामकरण झाले होते आणि रेल्वेची सारी व्यवस्था तिच्याकडेच होती. गंमत अशी की खिडकीत तिकीट विक्री करणारे, प्लॅटफॉर्मवर फिरतांना दिसणारे, तिकीट तपासणारे, खाद्यपदार्थांची ट्रॉली घेऊन रेल्वेमध्ये येणारे फिरस्ते वगैरे सगळ्याच रूपात रेल्वेचा गणवेश धारण केलेले पण भारतीय वंशाचे अनेक लोक मला दिसले. त्यांच्या खालोखाल आफ्रिकेतले होते. या कामातले गोरे लोक माझ्या अपेक्षेपेक्षा कमीच दिसत होते. ते लोक कदाचित ऑफीसमध्ये बसून वरच्या दर्जाचे काम करत असतील आणि कष्टाचे फील्डवर्क त्यांनी या आप्रवासी लोकांवर सोपवले असेल. तिथे दिसलेले भारतीय चेहेरे पाहून मला एकीकडे बरे वाटत होते आणि दुसरीकडे वाईटही वाटत होते. "आपले लोक इकडे परदेशातली रेल्वे व्यवस्था इतकी छान चालवू शकतात तर आपल्या मायदेशात ती अशी कां नाही?" असा विचारही मनात आला. ही पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता इकडची परिस्थितीसुध्दा बरीच बदलून जरा बरी झालेली आहे.

नंतरच्या काळात समाजवादाचे विचार मागे पडून ब्रिटनमधल्या अनेक सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण किंवा विकेंद्रीकरण केले गेले. अलीकडच्या काळात मी लीड्सला गेलो तोंपर्यंत ब्रिटिश रेल च्या ऐवजी अनेक खाजगी कंपन्यांनी रेल्वे वाहतुकीची सेवा हातात घेतली होती. जीएनईआर, अराइव्हा, व्हर्जिन ही त्यातली कांही महत्वाची नांवे आहेत. रेल्वेलाईन्स, स्टेशने वगैरेचे काम 'रेलट्रॅक' नांवाची एक केंद्रीय संस्था चालवते आणि इतर कंपन्या प्रवाशांची वाहतूक करतात. भारतातील एअरपोर्ट ऑथॉरिटी विमानतळावरील व्यवस्था सांभाळते आणि एअर इंडिया, इंडिगो, गोएअर आदि कंपन्या तेथून आपापली विमाने उडवतात तशातला हा प्रकार आहे.

लीड्ससारख्या स्टेशनवरूनसुध्दा तासाभरात निदान आठ दहा तरी गाड्या इकडून तिकडे जातात. गर्दीच्या वेळेत त्या याच्या दुपटीने असतील. म्हणजे मेन लाईनवर लोकलसारखा ट्रॅफिक असतो. पण या गाड्या फारच छोट्या असतात. त्यातल्या बऱ्याचशा गाड्या फक्त दोनच डब्यांच्या असतात. तरीही त्या पूर्णपणे भरलेल्या मला कधीच दिसल्या नाहीत. भरपूर गाड्या असल्या तरी उतारूंची एवढी गर्दी दिसत नाही. या गाड्यांनासुध्दा लोकलसारखे रुंद दरवाजे असतात आणि ते फक्त दोन तीन मिनिटांसाठीच उघडतात. तेवढ्या वेळात सर्व प्रवासी आरामात चढू किंवा उतरू शकतात. लंडनसारख्या सुरुवातीच्या स्टेशनातदेखील गाडी तासभर आधी प्लॅटफॉर्मवर येऊन उभी रहात नाही. फारफारतर दहा मिनिटे आधी येत असेल.

वेगवेगळ्या कंपन्या चालवत असलेल्या इतक्या गाड्या त्याच रुळांवरून व त्याच प्लॅटफॉर्मवर एकापाठोपाठ आणणे हे तांत्रिक दृष्ट्या फारच कठीण काम आहे. त्यासाठी गाड्यांचे अत्यंत काळजीपूर्वक वेळापत्रक तयार करणे आणि ते कसोशीने पाळणे फारच महत्वाचे आहे्. त्यातून कांही तांत्रिक बिघाडामुळे एक गाडी रखडलीच तर सर्व वेळापत्रक कोलमडून पडू नये यासाठी विशेष दक्षता घेणे व कठोर शिस्तीचे पालन करणे अपरिहार्य ठरते.

ही सेवा फायद्यात चालवणे हा विकेंद्रीकरणामागला मुख्य उद्देश होता. त्यामुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये प्रवाशांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा चाललेली असते. त्यासाठी गाड्या अंतर्बाह्य आकर्षक बनवल्या जातात. कोणी प्रत्येक प्रवाशाला लॅपटॉप चालवण्याची सोय करून देते तर कोणी इयरफोनवरून संगीत ऐकण्याची सुविधा उपलब्ध करते. प्रत्येक स्टेशनवर या कंपन्यांची तिकीटविक्री करणारी त्यांची आकर्षक केबिन्स असतात. त्यात बसण्याची सोय असते, उतारूंना वाटण्यासाठी त्या रेल्वेची वेळापत्रके ठेवलेली असतातच, इतर अनेक माहितीपूर्ण ब्रोशर्स तिथे ठेवलेली असतात. प्रवाशांना निरनिराळ्या खास सवलती उपलब्ध करून देणाऱ्या 'डील्स'ची रेलचेल असते. कोणी तर विशिष्ट दुकानांमध्ये चालणारी डिस्काउंट कूपन्स देतात. यॉर्कची दुकाने, हॉटेले, वस्तुसंग्रहालये वगैरेंच्या किंमतीत कांही टक्के सूट देऊ करणारी कूपन्स एका कंपनीने लीड्स स्टेशनवरल्या काउंटरवर ठेवली होती. आमची तिकीटे आधीच काढून ठेवलेली असल्यामुळे त्याचा लाभ आम्हाला मिळाला नाही. जर तो मिळाला असता तर आम्ही केलेल्या खर्चातले पांच पौंड वाचले असते किंवा सूट मिळवण्याच्या नादात पंचवीस पौंड जास्तच खर्चही झाले असते!

इंटरनेटवर कोठलेही तिकीट काढण्याची छान सोय आहे आणि बहुतेक लोक तसेच करतात. पाहिजे असल्यास ते तिकीट कूरियरने घरी मागवता येते किंवा कोणत्याही स्टेशनवरील यंत्रातून ते सवडीनुसार छापून घेता येते. परतीचे तिकीट बहुतेक वेळा फारच स्वस्त असते. जितके आधी तिकीट काढू तितके ते कमी दरात मिळते. शनिवार रविवारी किंवा अवेळी त्यांचे दर कमी असतात. "या" गांवाहून "त्या" गांवापर्यंत "अमूक" दिवशी अशी चौकशी केली की संगणकाच्या स्क्रीनवर एक लांबलचक लिस्ट येते. त्यातल्या वेगवेगळ्या स्कीमसाठी वेगवेगळे नियम असतात. कांही तिकीटे कुठल्याही गाडीला चालतात, कांहींची वेळ किंवा तारीख हवी असल्यास बदलून मिळू शकते आणि सर्वात स्वस्तातली तिकीटे अपरिवर्तनीय असतात, ती गाडी चुकली तर पैसे वाया जातात. त्या यादीतून आपल्याला हवे ते तिकीट बुक करता येते.


मी लीड्सच्या एका टॅब्लॉइडमध्ये या विषयावरील एक बातमी वाचली. त्यात लिहिल्याप्रमाणे लंडनहून ग्लासगोसाठी तिकीटांचे छत्तीस पर्याय आहेत तर शेफील्डला जाण्यासाठी पस्तीस! ग्लासगोचे तिकीट कमीतकमी साडेतेरा पौंड तर जास्तीत जास्त तीनशे चार पौंड इतके आहे. इतक्या खर्चात माणूस लंडनहून विमानाने मुंबईला येऊन परत जाऊ शकेल! शेफील्डसाठी तर फक्त सहा पौंड ते दोनशे सत्तावन पौंड इतकी मोठी रेंज आहे. ते पाहून सर्वसाधारण माणूस चक्रावून गेला आणि चुकीचा निर्णय घेऊन बसला तर त्यात काय नवल?

-------------
नवी भर दि. ०५-१२-२०१९

मी २००८मध्ये अमेरिकेला गेलो होतो तेंव्हा अॅटलांटाजवळील अल्फारेटा इथे राहिलो होतो.  तिथून सात आठ मैल अंतरावर नॉर्थ स्प्रिंग्ज नावाचे एक स्टेशन होते तिथून अॅटलांटा शहराच्या आरपार पलीकडे जात एअरपोर्टपर्यंत जाणारी रेल्वेलाइन होती. त्यावर दर दहा दहा मिनिटांनी एक लोकल गाडी सुटत असे. अॅटलांटा शहरापर्यंत कारने जाण्यासाठी लागणारे श्रम आणि पेट्रोल वाचवण्यासाठी तसेच तिथले ट्रॅफिक जॅम व पार्किंग प्रॉब्लेम्स यांचा विचार करता बरेच लोक नॉर्थ स्प्रिंगपर्यंत कारने जात आणि तिथल्या विशाल पार्किंग लॉटमध्ये कार पार्क करून पुढे लोकल ट्रेनने जात असत. या गाड्यासुद्धा मी इंग्लंडमध्ये लीड्सला पाहिल्या होत्या तशाच होत्या.  सध्या मी अमेरिकेतल्याच लॉसएंजेलिसजवळ टॉरेन्स इथे आलो आहे. इथे आमच्या घराच्या आसपास कुठे लोकल गाड्या दिसल्या नाहीत.  लॉसएंजेलिस शहरात मला दोन तीन डब्यांच्या ट्रॅमसारख्या लोकल गाड्या रस्त्याच्या जवळून जातांना दिसल्या, त्यात बऱ्यापैकी प्रवासीही बसले होते. याचा अर्थ त्या अजून अस्तित्वात आहेत, पण मला त्यात बसायची संधी अजून तरी मिळाली नाही किंवा त्याची गरजच पडली नाही.







Sunday, December 14, 2008

अब्जाधीश की गरजू ?

या गोष्टीला आता एक वर्ष होत आले आहे. मागच्या वर्षी याच दिवसात श्रेष्ठ भारतीय, त्यातही महाराष्ट्रीय चित्रकार कै.सदानंद बाकरे यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी वर्तमानपत्रात आली होती. त्यापाठोपाठच त्यांनी अब्जावधी रुपयांचा अनमोल खजिना मागे सोडला असून त्याची मालकी आता कोणाकडे जावी याबद्दल लगेच वाद सुरू झाले असल्याची बातमी आली होती. बाकरे यांचे सांसारिक आयुष्य रूढ अर्थाने सरळ मार्गाने गेले नाही. त्यांनी बरीच वर्षे परदेशात वास्तव्य केले. तिथेच एका युरोपीय महिलेशी त्यांचा विवाह झाला. उतारवयात त्यांनी मायदेशी, अगदी कोंकणातल्या छोट्या गांवात येऊन स्थाईक होण्याचा निर्णय घेतला आणि अंमलात देखील आणला. पण त्यानंतर त्यांची परदेशी पत्नी फार काळ त्यांच्यासोबत राहिली नाही. त्यांना सोडून ती परत गेली वगैरे मजकूर या निमित्याने प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे चार लोकांप्रमाणे त्यांचा निर्विवाद वारस नसावा असे वाटते. वेगवेगळ्या मृत्युपत्रांच्या आधारे त्यांच्या संपत्तीवर हक्क सांगणारे दावेदार त्यांच्या मृत्यूनंतर पुढे आले होते असे म्हणतात. या संधीचा लाभ घेऊन ती संपदा आता जनतेच्या मालकीची करावी, म्हणजे पर्यायाने आपल्या नियंत्रणाखाली यावी असे प्रयत्न राजकीय वर्तुळात सुरू झाले अशीही बातमी आली होती.

या बातम्या वाचल्यावर कांही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात आलेल्या वेगळ्या प्रकारच्या बातमीची आठवण झाली. श्री.बाकरे यांना एक चित्रकलेचे संग्रहालय उभे करायचे होते, पण त्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध नव्हता. या कार्यात त्यांची मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपल्या चित्रांचे एक प्रदर्शन भरवले होते. तो उद्देश सफल झाला की नाही कोण जाणे. बहुधा नसावा, कारण तसे चित्रसंग्रहालय उभे राहिले असते तर भरपूर त्याचा गाजावाजा झाला असता.

या सगळ्यावरून माझ्या मनात प्रश्न उठतो की अब्जाधीश माणसाला मदतीची गरज कां पडावी? चित्रकृतीसारख्या मौल्यवान गोष्टी ज्यांच्या संग्रहात असतात त्यांना खर्च करण्यासाठी त्या संपत्तीचा विनियोग करता येतो कां? हल्ली भारतीय चित्रकारांच्या कलाकृतींना खूप भाव आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या लिलावांमध्ये त्यांची किंमत कोट्यावधी रुपयांपर्यंत केली जाते वगैरे बातम्या वाचून आपण मनातल्या मनात सुखावतो. पण इतकी बोली लावून दिलेले हे पैसे नक्की कोणाला मिळतात? मूळ चित्रकाराने ते चित्र कधीच अगदी अल्प किंमतीला विकलेले असते किंवा कदाचित कुणाला तरी ते भेट म्हणून फुकटसुद्धा दिले असण्याची शक्यता आहे. ते चित्र हस्ते परहस्ते प्रवास करून आता लिलावांत येऊन विकले गेल्यावर अखेर ज्या माणसाने ते तिथे आणले त्यालाच त्याची किंमत मिळाली असणार.

असे असतांना एका चित्राची किंमत इतके रुपये तर तितक्या चित्रांची किती असेल असा हिशोब करून आपण त्या कलाकाराला अब्जाधीश ठरवू शकतो का? रिलायन्स कंपनीच्या एका शेअरचा आजचा बाजारभाव एवढा आहे म्हणून इतके शेअर धारण करणारा अंबानी आज जगातील सर्वात श्रीमंत माणसांच्या रांगेत विराजमान झाला आहे. पण समजा त्याने आपले सगळे शेअर एकदम विकायला काढले तर त्याचे मूल्य धडाधड कोसळल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे चित्रकाराची चित्रे त्याच्या संग्रहात असेपर्यंत त्याला मूल्य आहे पण ते खर्च करण्याच्या उपयोगाचे नाही, त्यासाठी त्याला अन्य मार्गाने पैसा उभा करावा लागतो. अशी किती विचित्र परिस्थिती आहे ना?
त्यांचे एक चित्र या दुव्यावर पहा. http://www.askart.com/AskART/photos/BOL20070521_4544/49.jpg

कपॅसिटर आणि इन्व्हर्टर

क्लिष्ट गणिताचा संदर्भ टाळून या विषयीची माहिती सोप्या शब्दात देण्याचा हा एक अल्प प्रयत्न आहे. ते करतांना तपशीलात कांही तांत्रिक त्रुटी आल्या असल्या तरी या विषयाचा मुख्य गाभा शक्य तो शाबूत ठेवण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे.
आपल्या घरी जो वीजपुरवठा असतो तो एसी (आल्टर्नेटिंग करंट) या प्रकारचा म्हणजे आलटून पालटून दोन्ही दिशांना वाहणारा असतो. विजेच्या ज्या दोन तारा आपल्या घरातल्या दिव्याला जोडलेल्या असतात त्यांचा उल्लेख 'फेज' व 'न्यूट्रल' असा करतांना आपण कदाचित इलेक्ट्रीशियनकडून ऐकले असेल. रेफ्रिजरेटरसारख्या यंत्रांना जोडलेल्या वायरीमध्ये तीन तारा असतात. त्या तिस-या तारेला 'ग्राउंड' असे म्हणतात. ती फक्त जमीनीशी जोडलेली असते आणि यंत्रात कांही बिघाड झाला तर त्याची तीव्रता कमी करण्याच्या उपयोगात ती येते. एरवी तिच्यातून विद्युतप्रवाह वहात नाही. 'फेज' व 'न्यूट्रल' या तारांमधून वाहणा-या विजेचा दाब (व्होल्टेज) व प्रवाह (करंट) सतत बदलत असतात. हा दाब शून्यापासून वाढत वाढत सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर तो कमी कमी होत पुन्हा शून्यावर येतो, त्यानंतर उलट दिशेने वाढत वाढत सर्वोच्च पातळी गाठतो आणि पुन्हा कमी कमी होत पुन्हा शून्यावर येऊन दिशा बदलतो आणि विरुध्द दिशेने वाढत वाढत वाहतो. अशा एका आवर्तनाला 'सायकल' म्हणतात आणि एका सेकंदात अशी पन्नास आवर्तने होतात. विजेचा दाब ज्या प्रमाणात वाढत किंवा कमी होत जातो त्याच प्रमाणात विजेचा प्रवाहसुध्दा कमी व जास्त होत असतो. पण ही आवर्तने इतक्या जलद गतीने होत असल्यामुळे
मानवी संवेदनांना ती समजत नाहीत.
दिवा, गीजर व शेगडी यासारख्या उपकरणात विशिष्ट धातूंपासून तयार केलेली फिलॅमेंट किंवा कॉइल बसवलेली असते. विजेच्या प्रवाहाला तिच्यातून जातांना कसून विरोध होतो आणि त्या विरोधाला न जुमानता त्यातून वीज वहात राहते. विजेच्या प्रवाहाला होणा-या विरोधामुळे त्यात जो संघर्ष होतो त्यातून ऊष्णता निर्माण होते. कोणत्याही दिशेने वीज वहात असली तरी त्याला तितक्याच निकराने विरोध केला जातो आणि या विरोधावर मात करून विजेचा प्रवाह होत राहिला तरी त्या विरोधाची धार यत्किंचितही कमी होत नाही. त्यामुळे दिव्याचा प्रकाश आणि इस्त्रीतली धग टिकून राहते. या भाराला 'रेझिस्टिव्ह लोड' म्हणतात. यात दाब आणि प्रवाह हे दोन्ही साथसाथच कमी व जास्त होत असतात. त्यातून जेवढी ऊर्जा तयार होते तेवढी वीज 'खर्च' झाली असे आपण समजतो आणि त्याचे बिल भरतो. प्रत्यक्षात जेवढी वीज एका तारेमधून आपल्या घरात येते तेवढीच वीज आपले काम करून दुस-या तारेने परत गेलेली असते.
पंख्यासारख्या फिरणा-या यंत्रांमध्ये 'इंडक्शन मोटर' चा उपयोग केला जातो. त्यात एक 'स्टेटर' म्हणजे स्थिर भाग असतो आणि दुसरा 'रोटर' म्हणजे फिरणारा भाग असतो. विजेच्या दाबामुळे 'स्टेटर' मध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि त्याची तीव्रता दाबातल्या बदलाबरोबर कमी जास्त होत राहते. 'स्टेटर' ची रचना अशा प्रकारे केलेली असते की ते चुंबकीय क्षेत्र एक फिरत राहणारे क्षेत्र (रोटेटिंग) तयार होते. त्याच्या प्रभावाखाली 'रोटर' आकर्षित होतो आणि तो ही गोल फिरतो. ( समजण्यासाठी हे थोडे सोपे करून लिहिले आहे.) रोटरवरील विद्युतवाहक एकाद्या डायनॅमोप्रमाणे चुंबकीय क्षेत्रात वावरत असल्यामुळे त्यात विजेची निर्मिती होते आणि ती वीज सर्किटमध्ये येते. अशा प्रकारे 'इंडक्शन मोटर'ला फिरवण्यासाठी जेवढी वीज तिला दिली जाते त्यातला बराचसा भाग परत मिळतो. मात्र पंख्याच्या फिरणा-या पात्यांना हवेकडून विरोध होत असतो, चुंबकीय क्षेत्रात होत असलेल्या बदलांना अंतर्गत विरोध होत असतो आणि वाइंडिंगमधून जाणा-या विद्युतप्रवाहाला थोडा अवरोध होत असतो या सर्वांसाठी कांही ऊर्जा लागते तेवढी वीज 'खर्च' होते. या सर्व क्रियेत अगदी किंचित असा विलंब होतो. त्यामुळे विजेच्या प्रवाहात होणारा बदल तिच्या दाबात होणा-या बदलाच्या थोडा मागे पडतो. अशा भाराला 'इंडक्टिव्ह लोड' असे म्हणतात.
कपॅसिटरचे गुणधर्म वेगळ्या प्रकारचे असतात. त्यात विजेचा प्रवाह सोडला की त्याच्या अंतर्गत विजेचा दाब वाढत जातो. पुरेशा क्षमतेचा कपॅसिटर घेतल्यास त्याला जोडलेल्या तारेमधील विजेचा दाब जास्तीत जास्त जेवढा वाढेल तेवढा तो कपॅसिटर 'चार्ज' होतो. पण 'एसी' विजेचा दाब त्यानंतर लगेच कमी व्हायला लागतो. तसे झाल्यावर तो कपॅसिटर 'डिसचार्ज' होऊ लागतो आणि त्यातून उलट दिशेने विजेचा प्रवाह वाहू लागतो. अशा प्रकारे तोसुध्दा सेकंदाला पन्नास वेळा दोन्ही दिशांनी चार्ज व डिस्चार्ज होत राहतो. यामुळे त्या सर्किटमध्ये जे विजेचे चक्र निर्माण होते त्यात आधी विजेचा प्रवाह वाहतो आणि नंतर तिचा दाब वाढतो त्यामुळे विजेच्या प्रवाहात होणारा बदल तिच्या दाबात होणा-या बदलाच्या थोडा पुढे असतो. अशा भाराला 'रिएक्टिव्ह लोड' असे म्हणतात.
'इंडक्टिव्ह लोड' आणि 'रिएक्टिव्ह लोड' या दोन्हीमध्ये दिलेल्या विजेचा बराच मोठा भाग परत मिळत असला तरी त्या उपकरणांना चालवण्यासाठी जास्तीची वीज आधी देत रहावे लागते. मुबलक वीजपुरवठा उपलब्ध असला तर आवश्यक तेवढी वीज सहज पुरवता येते, पण जेंव्हा पुरेशा प्रमाणात वीज तयारच होत नसेल तर ती कोठून देणार? घरगुती वापरात मुख्यत्वे 'रेझिस्टिव्ह आणि इंडक्टिव्ह लोड' असतात. त्यांचा उपयोग जो तो आपल्या इच्छेनुसार आणि सोयीनुसार करत असतो. त्यामुळे विजेची मागणी क्षणाक्षणाला बदलत असते. पण वीजकेंद्रांची क्षमता मर्यादित असते. एकंदर मागणी त्या क्षमतेपेक्षा जास्त झाली तर ती पुरवणे शक्य नसते यामुळे नाइलाजाने विजेचे भारनियमन करावेच लागते. पण हे नियमनसुध्दा उपलब्ध असलेल्या यंत्रणेमार्फतच करता येणे शक्य असते. ते क्षणाक्षणानुसार करता येत नाही किंवा एकेकट्या वेगवेगळ्या लोडसाठी करता येत नाही. त्यासाठी कोणता ना कोणता संपूर्ण विभागच काही काळ बंद करावा लागतो. मागणी आणि पुरवठा यात सारखाच तुटवडा येत राहिला तर ते रोजचेच होऊन जाते. हे काम करणारी माणसेच असल्यामुळे त्यात घोटाळे होण्याची शक्यता असते.
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय योजले जाऊ शकतात. विजेच्या वापरात काटकसर करून जेवढी वीज उपलब्ध असेल तेवढ्यावरच भागवणे हा सर्वात सरळ उपाय आहे, पण तो सोयीचा नाही. कमी पडणारी वीज जनरेटर लावून स्वतःच निर्माण करणे हा दुसरा उपाय खर्चिक आहे आणि सर्वांना ते शक्य नसते. 'इंडक्टिव्ह लोड' च्या जोडीला 'रिएक्टिव्ह लोड' लावले तर ते एकमेकांना पूरक बनू शकतात. 'इंडक्टिव्ह लोड' मधून 'रिएक्टिव्ह लोड' ला आणि 'रिएक्टिव्ह लोड' कडून 'इंडक्टिव्ह लोड' ला जास्तीची वीज मिळू शकते. यामुळे उपलब्ध असलेल्या विजेचा अधिक चांगल्या प्रकाराने वापर करता येतो. पण हे काम एकट्या दुकट्याने करून विशेष फरक पडणार नाही. त्यासाठी सहकार्याने सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यात कोणाचा प्रत्यक्ष फायदा होत आहे याचा संकुचित विचार बाजूला ठेवावा लागेल.
इन्व्हर्टरचा उपयोग करून विजेच्या टंचाईचा प्रश्न आपल्या घरापुरता सोडवता येतो. इन्व्हर्टर बरोबर येणारा आकाराने सर्वात मोठा आणि जड भाग म्हणजे मोटारीत बसवतात त्याच प्रकारची पण जास्त क्षमतेची एक बॅटरी असते. अशा बॅटरीमध्ये विजेचा संचय करून ठेवणे शक्य असते, पण ती एकाच दिशेने वाहणारी (डायरेक्ट करंट) 'डीसी' या प्रकारचीच असू शकते. घरातल्या एसी विजेचे रूपांतर डीसी मध्ये करण्यासाठी इन्व्हर्टरमध्ये एक रेक्टिफायरचे सर्किट असते. ज्या वेळी बाहेरून एसी वीज पुरवठा उपलब्ध असतो तेंव्हा हा रेक्टिफायर बॅटरीला चार्ज करून तिला सुसज्ज ठेवतो. जेंव्हा वीज 'जाते' तेंव्हा आपोआप बॅटरीमधून वीजपुरवठा सुरू होतो आणि ती डिसचार्ज होत जाते. या वेळी इन्व्हर्टरमधले दुसरे सर्किट डीसी विजेचे रूपांतर एसी मध्ये करून ती वीज आपल्या घरातील ठराविक उपकरणांना पुरवते. ही सारी उपकरणे एसी विजेवर चालत असल्याकारणाने हे आवश्यक आहे. बॅटरीमधून किती वेळ आणि किती प्रमाणात वीजपुरवठा करणे शक्य आहे हे तिच्या आकारावर अवलंबून असते. बँका, हॉस्पिटल्स वगैरेमध्ये अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय (यूपीएस) ची सोय ठेवतात. ती खूप वेळ चालू शकते. घरात तेवढी जागाही नसते आणि त्याचा खर्च परवडणार नाही. त्यामुळे अगदी अत्यावश्यक अशा मर्यादित उपयोगांसाठी
बेताच्या आकाराचा इन्व्हर्टर बसवला जातो. पण एसी मधून डीसी आणि परत एसी या परिवर्तनात बरीच वीज वाया जाते. त्यामुळे त्यात आपली सोय होत असली तरी त्याचे मूल्य द्यावेच लागते.

Friday, December 12, 2008

तेथे कर माझे जुळती - भाग २ - स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी


स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी


पं.भीमसेन जोशी यांचे नांव मी पहिल्यांदा ऐकले तेंव्हा मी चौथी किंवा पांचवी इयत्तेत शिकत होतो. त्या काळात टेलीव्हिजन आणि टेपरेकॉर्डर नव्हतेच, ट्रान्जिस्टरसुध्दा आले नव्हते. आमच्या लहान गांवात आमच्याच नव्हे तर माझ्या कोणा मित्राच्या घरी व्हॉल्व्हचा रेडिओ देखील नव्हता. त्यामुळे तोपर्यंत माझ्या कानावर शास्त्रीय संगीत कधीच पडलेले नव्हते. त्यातल्या सूर, ताल, लय वगैरे गोष्टी कशाबरोबर खातात ते ठाऊक नसले तरी मला गाणी ऐकण्याची व गुणगुणण्याची आवड मात्र होती. जात्यावरच्या ओव्या, मंगळागौर, हदगा वगैरेंच्या खेळांमधली गाणी, भजनातले अभंग, जोगवा, भारूड वगैरे प्रकार यासारखी लोकगीते आणि लाऊडस्पीकरवरून कधी कधी ऐकू येणारी मराठी, कानडी आणि हिंदी लोकप्रिय गाणी वगैरे जे कांही माझ्या कानांवर पडायचे ते आवडत असे आणि त्यांच्या चालीसह लक्षात रहात असे. पण संगीताचे एक गहन शास्त्र आहे आणि सगळी गाणी त्याच्या आधारावर रचलेली असतात याची जाणीव मात्र मला नव्हती. "गाणं गाण्यात असं काय असतं? कुणीही ते गुणगुणावं" अशीच त्या वयात माझी समजूत होती. त्यामुळे 'पंडित भीमसेन जोशी' असे भारदस्त नांव असलेले कोणी विद्वान फक्त दोन चार गाणी म्हणून दाखवण्यासाठी पुण्याहून इतक्या दूर आमच्या आडगांवात येणार आहेत हे ऐकून मला त्याचे नवलच वाटले.

त्यांच्या गायनाचा कार्यक्रम एका सार्वजनिक जागेत होता. त्यांचे गायन ऐकण्यासाठी किंवा अधिक करून त्यांना पाहण्यासाठी सारा गांव लोटला होता. त्या गर्दीतून वाट काढत मी स्टेजच्या जितक्या जवळ जाता येईल तितके जाऊन तिथे बसकण मारून घेतली. त्या काळात तिथला वीजपुरवठा मुळीच भरंवशाचा नसल्यामुळे दिवेलागणी होतांच जेवणे आटोपून झोपी जायची रीत होती. त्याचा विचार करता पंडितजींचे गायन रात्री थोडे उशीरानेच सुरू झाले. पहिला अर्धा पाऊण तास त्यांनी एका रागाची विलंबित लयीतील बंदिश नेहमीप्रमाणेच चांगली रंगवली होती, पण माझ्यासारख्या अज्ञ बालकांना आणि अननुभवी गांवक-यांना मात्र "हे गायक नुसतेच आ॥ऊ .. काय करताहेत? ते आपली गाणी म्हणायला केंव्हा सुरू करणार आहेत?" असे प्रश्न पडत होते. बरेच लोक डुलक्या घेऊ लागले होते हे त्यांच्या जांभयांवरून दिसत होते. द्रुत लयीमधली बंदिश सुरू झाल्यानंतर सर्व श्रोत्यांत चैतन्य आले. पंडितजींनी गायिलेली अभंगवाणी आणि संत पुरंदरदासांची पदे तर सर्वांनी टाळ्याच्या कडकडाटात डोक्यावर घेतली. ते गाणे ऐकून मला एका वेगळ्याच विश्वात जाऊन आल्यासारखे वाटले. गाण्याची एक ओळ इतक्या असंख्य वेगवेगळ्या प्रकाराने सुरेलपणे इतकी छान गाता येते हे पाहून मी थक्क होऊन गेलो होतो. शास्त्रीय संगीत ऐकण्याची सुरुवातच मी पं.भीमसेनांच्या गायनाने केली होती हे माझे केवढे सुदैव?


मोठा झाल्यानंतर शास्त्रीय संगीत ऐकण्याची थोडी गोडी लागली. शिकाऊ मुलामुलींच्या लहानशा घरगुती बैठकींपासून ते दिग्गज कलाकारांच्या मोठ्या मैफिलींपर्यंत आणि गणेशोत्सवाच्या मांडवांपासून ते टाटा थिएटरसारख्या अद्ययावत वातानुकूलित सभागृहांपर्यंत अनेक जागी अनेक कार्यक्रमांना श्रोता म्हणून हजेरी लावली. हा आपला प्रांत नव्हे हे लवकरच लक्षात आल्यामुळे ते शिकण्याचा निष्फळ प्रयत्न मात्र कधी केला नाही. पं.भीमसेन जोशी यांचे गाणे कुठे आहे ते समजले आणि तिथे जाणे मला शक्य असले तर आपोआपच माझी पावले तिकडे वळायची. कार्यक्रम झाल्यानंतर शक्य झाल्यास स्टेजवर जाऊन त्यांचे जवळून दर्शन घेण्याचा प्रयत्नही कधी कधी केला.



असाच एकदा दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये त्यांचे गायन ऐकून मध्यरात्री घरी परतलो होतो. दुसरे दिवशी ऑफीसच्या कामासाठी मला दिल्लीला जायचे होते. त्यामुळे पहाटे लवकर उठून विमानतळावर जाऊन पोचलो. चेक इन करून झाल्यावर पुढल्या अनाउन्समेंटची वाट पहात बसलो असतांना पंडितजींचे शिष्यवर श्री.माधव गुडी येतांना दिसले. ते सुध्दा त्याच काउंटरवर चेक इन करून गेले. त्यानंतर सिक्यूरिटी चेकची अनाउन्समेंट झाल्यावर मी लगेच गेटकडे जायची घाई न करता त्या रांगेशेजारी बसून राहिलो. अपेक्षेप्रमाणे श्री.माधव गुडी यांच्याबरोबर पं.भीमसेन जोशी सिक्यूरिटी चेकसाठी आले. शिताफीने पुढे जाऊन मी त्यांच्या मागे रांगेत उभा राहिलो. हळूच त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांचे कालचे गायन छान झाले असे त्यांना सांगणे म्हणजे "काल तुझा प्रकाश लख्ख पडला होता." असे सूर्याला सांगण्यासारखे होते. शिवाय त्यांनी कुठल्या तरी रागरागिणीबद्दल कांही उल्लेख केला तर माझी पंचाईत झाली असती. त्यामुळे मी हवापाण्याबद्दल कांहीतरी बोललो. त्यांनीही एकाद्या वडिलधारी माणसाप्रमाणे आपुलकीने माझी विचारपूस केली. रांगेमध्ये उभे असलेल्या समोरच्या एकाद्या माणसाबद्दल पोलिसांना जबरदस्त संशय यावा आणि त्यांनी त्याची चांगली कसून तपासणी करावी असे क्षणभर माझ्या मनात आले. पण तसे कांही झाले नाही आणि दोन तीन मिनिटात आमची 'सुरक्षा जाँच' आटोपून गेली. त्यानंतर पंडितजी एक्झिक्यूटिव्ह क्लासमध्ये जाऊन बसले आणि मी माझ्या जागेवर. विमान दिल्लीला पोचल्यानंतर मी बाहेर येऊन विमानतळाच्या इमारतीत जाईपर्यंत ते अदृष्य झाले होते आणि मला आपल्या कामाच्या ठिकाणी जायचे होते. ही ' छोटीसी मुलाकात' माझ्या स्मरणात मात्र कायमची राहिली.


पंडितजींच्या गायनाबद्दल इतके लिहिले गेले आहे की त्यात कांही भर घालण्याची पात्रता माझ्याकडे नाही. गायक मंडळी एकाद्या बुजुर्गाचे नांव उच्चारतांना आपला हात एका कानाला लावतात. मला तर दोन्ही हातांनी आपले दोन्ही कान पकडावे लागतील, पण मग मी हा लेख टाइप कसा करणार? मी त्यांचे कांही कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिले तसेच टी.व्हीवर पाहिले. त्यांच्या मुलाखतीसुध्दा आवर्जून पाहिल्या. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जे दर्शन मला घडले तेसुध्दा अत्यंत प्रभावशाली होते. कांही इतर मोठे कलाकार चालता बोलतांना आपला तोरा दाखवतात, नखरे करतात, कोणाच्या सतत तक्रारी चाललेल्या असतात, कांही लोक आपली बढाई करत असतात तर कांही लोक उगाचच "मी क्षुद्र, नगण्य आहे, माझी कांही लायकी नाही." वगैरे म्हणत विनयाचा कृत्रिम आव आणतात. पंडितजींनी कधीही यातले कांही केले नाही. त्यांनी ना कधी स्वतःची फुशारकी मारली ना कधी आपल्याकडे लटका कमीपणा घेतला. पुण्याला इतकी वर्षे राहूनसुध्दा 'पुणेरी' म्हणून (कु)प्रसिध्द झालेला खोचकपणा, तिरकसपणा, शिष्टपणा, बिलंदरपणा यातल्या कशाचाही स्पर्श त्यांच्या चित्तवृत्तीला झालेला मला कधी दिसला नाही. हुबळी धारवाडकडची मंडळी सर्वसाधारणपणे जशी आपुलकीने, साधेपणाने पण थेट बोलतात, त्यांच्या वापरातले मराठी शब्द आणि त्यांचे उच्चार जशा प्रकारचे असतात त्याची आठवण पंडितजींचे बोलणे ऐकतांना येते. त्यांचे संगीताबद्दलचे अथांग ज्ञान, त्यांनी केलेली खडतर संगीतसाधना, मोठमोठ्या लोकांबरोबर झालेल्या भेटी, जगाचा मोठा अनुभव व त्यातून केलेले मार्मिक निरीक्षण आणि शिवाय त्यांचा हजरजबाबीपणा याने त्यांची मुलाखतसुध्दा श्रवणीय होते. "मी (कै.)यशवंतरावांना सांगितलं की तुम्हाला ते दर पांच वर्षांनी इलेक्शनला उभं रहावं लागतंय् की नै बघा, पण माझं इलेक्शन एकदाच त्या भगवंताने करून सोडलं आहे." असे त्यांनी एकदा एका मुलाखतीत गंमतीने सांगितले होते ते माझ्या लक्षात राहिले आहे.
त्यांचे प्रत्यक्ष तसेच रेकॉर्ड केलेले गाणे मी अनेक वेळा ऐकले असले तरी सवाई गंधर्व महोत्सवात ते जसे गातात त्याला तोड नाही असे बरेच लोकांकडून ऐकले होते. पण कामाच्या व्यापात ते ऐकणे मला कांही जमले नाही. त्यामुळे अशा आयुष्यात राहून गेलेल्या आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर करायच्या कामांच्या यादीमध्ये सवाई गंधर्व महोत्सवाचे नांव बरेच वर होते. दोन वर्षांपूर्वी तो योग आला खरा, पण त्या वेळी पंडितजींची प्रकृती खूपच अस्वस्थ असल्यामुळे ते जवळ जवळ अंथरुणाला खिळून होते. तरीसुध्दा ते मोटारीत बसून स्टेजच्या जितके जवळ येता येईल तितके आले आणि माइकवरून त्यांनी श्रोत्यांना अभिवादन आणि संबोधन केले. त्यावेळी तिथे जमा झालेल्या जनसागराने त्यांना उत्स्फूर्तपणे दिलेली मानवंदना निव्वळ अविस्मरणीय म्हणता येईल.


पं.भीमसेन जोशी यांना असंख्य बक्षिसे, पारितोषिके, सन्मानचिन्हे वगैरे मिळाली आहेत. त्यांना मिळालेल्या या वस्तूंनी त्यांचे घर खचाखच भरून गेले आहे असे ऐकले. त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटण्याचे भाग्य माझ्या पत्नीला मिळाले. त्या वेळेस काढलेली छायाचित्रे या लेखाच्या अग्रभागी दिली आहेत. या सर्व सन्मानांचा मुकुटमणी असा 'भारतरत्न' हा भारतातला सर्वोच्च सन्मान जाहीर करण्यात आला तेंव्हा त्यांच्या सर्व चाहत्यांना अपार आनंद झाला. या निमित्यांना पंडितजींना सादर प्रणाम.

Thursday, December 11, 2008

तेथे कर माझे जुळती - भाग १ - स्व.पांडुरंगशास्त्री आठवले


आयुष्यभर अबोल असलेली माणसेसुध्दा उतारवयात बडबडायला लागतात असे म्हणतात. अनुभवातून त्यांच्याकडे थोडेसे शहाणपण गोळा झालेले असते आणि ते इतरेजनांना द्यावे असे त्यांना त्या वयात वाटत असावे. परमेश्वराने माणसाला दोन कान आणि एकच जीभ दिली आहे यामागे त्याचा कांही उद्देश असावा असे मला पूर्वी वाटायचे आणि मी त्यांचा उपयोग त्याच प्रमाणात करत होतो. पण आपणहून लोकांना चार नाही तर निदान दोन गोष्टी तरी सांगाव्यात असे मलासुध्दा जेंव्हा वाटायला लागले त्याच सुमारास ब्लॉगच्या तंत्राशी माझी ओळख झाली. यातून शक्यतो नवे अनुभव मांडायचा प्रयत्न मी गेली अडीच वर्षे करतो आहे आणि त्याबरोबर तुलनेसाठी पूर्वीच्या काळातले संदर्भ देणेही चालू आहे. पण साठी उलटण्यापूर्वीचे जे साठवण स्मृतीत सांचून राहिले आहे त्याचे काय करायचे?

 सहज घरातले जुन्या फोटोंचे आल्बम चाळतांना त्यात कांही सुप्रसिध्द चेहेरे दिसले. माझ्या मनात त्यातल्या ज्या मोठ्या लोकांच्याबद्दल नितांत आदर आहे आणि वयाने लहान असलेल्या ज्या गुणी लोकांचे कौतुक करावे असे वाटते त्यांच्याबद्दल या सदरात दोन शब्द लिहायचे ठरवले. यातल्या एकेका व्यक्तीबद्दल ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. त्या महान लोकांची समग्र माहिती थोडक्यात देणे मला शक्यही नाही आणि तसा उद्देशही नाही. "माझी या थोरांबरोबर ओळख होती." अशी शेखी मारण्याचे माझे वय आता राहिले नाही. फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी या निमित्याने मांडणार आहे. त्या कोणत्या क्रमाने येतील त्याला कांही महत्व नाही. जसे सुचेल व आठवेल तसे अधून मधून लिहीत जाईन.

आज या मालिकेची सुरुवात स्व.शास्त्रीजींपासून करीत आहे. दत्तजयंतीच्या शुभदिवशी मला गुरुस्थानी लाभलेल्या या आदरणीय व्यक्तीमत्वाला सहस्र साष्टांग प्रणाम.

परमपूजनीय स्व.पांडुरंगशास्त्री आठवले

माझा शालांत परीक्षेचा निकाल लागला आणि आमच्या घरात यापूर्वी कधी कोणाला मिळाले नव्हते एवढे घवघवीत यश मला मिळाल्याचे समजले. पण दैवदुर्विलास असा होता की आमची आर्थिक परिस्थिती पूर्वी कधीही झालेली नव्हती एवढी त्या वेळी नाजुक झाली होती. त्यामुळे आता पुढे काय करायचे याचा विचार चाललेला असतांना एक सुवर्णसंधी चालून आली. ठाण्याजवळील 'तत्वज्ञान विद्यापीठ' नांवाच्या संस्थेत कांही गरजू आणि हुशार विद्यार्थ्याची दोन वर्षे राहण्याजेवण्याची सोय केली जाईल अशी अगदी छोटीशी जाहिरात वाचनात आली. ताबडतोब प्रयत्न केले आणि मला तिथे प्रवेशही मिळाला.

मी तत्वज्ञान विद्यापीठात दाखल झालो ती आमची आठदहा मुलांची विज्ञानशाखेची पहिलीच बॅच होती. त्यापूर्वीपासून तेथे राहून तत्वज्ञान हा विषय शिकून बी.ए.चा अभ्यास करणारी तीन चार मुले तेथे होती. पित्याच्या मायेने आमची काळजी घेणारे आणि त्याबरोबरच तिथल्या सर्व नीतीनियमांचे कसोशीने पालन होत आहे याचीही सतत जातीने खात्री करून घेणारे अत्यंत मृदुभाषी असे दादाजी होते. स्वयंपाक करणारा एक 'महाराज' होता. फक्त एवढीच माणसे त्या परिसरात रहात होती. इतर कांही सज्जन तिथे येऊन थोडा वेळ त्या परिसरात घालवून आणि दादाजींशी बोलून परत जात होती. पण सतत कानावर पडणारे एक नांव तिथल्या अणुरेणूमध्ये भरलेले होते, तिथली प्रत्येक गोष्ट त्यांच्या इच्छेनुसार घडवली जात आहे, त्याची सर्व सूत्रे अप्रत्यक्षपणे त्यांच्या हातात असतात असे सांगितले जायचे, तो परिसरच त्या नांवाने भारला गेला असल्यासारखे वाटत होते, ते नांव होते 'शास्त्रीजी.' गुजराती मुले त्याचा उच्चार 'सास्त्रीजी'असा करीत.

आम्ही रहायला गेल्यानंतर दोन तीनच दिवसांनी "सास्त्रीजी आव्यो" अशी हाळी उठली आणि सारी मुले तसेच त्या वेळी उपस्थित असलेली सर्व मोठी माणसे एका दिशेने धांवत सुटली. तत्वज्ञान विद्यापीठाच्या परिसरातच एक छोटीशी सुरेख बंगली होती. तिथे आम्ही सारे जमलो. पांढरा स्वच्छ परीटघडीचा कुरता आणि धोतर परिधान केलेले शास्त्रीजी आंतून बाहेर येताच सगळेजण अहमहमिकेने त्यांच्या पाया पडले. मजबूत बांधा, भव्य कपाळ, तेजस्वी डोळे आणि प्रफुल्लित चेहेरा असे अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व त्यांच्याकडे होते. एक शब्दही न बोलता त्यांची मनावर खोलवर छाप पडत होती आणि ते बोलायला लागल्यावर त्यातला शब्द न शब्द सारे पंचप्राण कानात गोळा करून ऐकण्यासारखा होता. त्यापूर्वी मी कोणत्याही व्यक्तिमत्वाने एवढा प्रभावित झालो नव्हतो. तोंवर मी कधी 'मोठी' माणसे पाहिलीच नव्हती असेही म्हणता येईल.

आम्ही तिथे राहून काय करायचे आणि ते कां करायचे याचे मार्गदर्शन त्यांनी मोजक्या वाक्यात केले. आमच्यातली कांही मुले भुलेश्वर इथल्या'माधवबाग पाठशाळे'त जाऊन आली होती. प्रत्यक्ष शास्त्रीजींबरोबर 'वार्ता' करायला मिळाली म्हणून ती धन्य धन्य झाली.एकाद्या महान उस्तादाबद्दल बोलतांना गंवई लोक एका हांताच्या बोटांनी आपल्याच कानाला स्पर्श करतात. शास्त्रीजींच्याबद्दल बोलतांना त्यांचे नांव तिथे यापेक्षाही जास्त आदराने घेतले जात असे. त्यांचे पूर्ण नांव 'पांडुरंगशास्त्री आठवले' आहे, ते कोणी साधूसंन्याशी नसून संसारी गृहस्थ आहेत एवढी माहिती मिळायलासुध्दा आम्हाला खूप वेळ लागला.

 माधवबाग पाठशाळेत ते नियमितपणे प्रवचने करतात आणि त्यांचे विचार अनेक जागी चालणा-या स्वाध्यायकेंद्रातून लहानथोर सर्व वयोगटांतल्या मुलांमाणसांपर्यंत दर आठवड्याला पोंचवले जातात असे समजले. सोशल नेटवर्किंग हा शब्द मी तेंव्हा ऐकला नव्हता पण त्याचे प्रत्यक्ष उदाहरण समोर आले होते.शास्त्रीजींनी दिलेल्या व्याख्यानांच्या आधारावर कांही पुस्तके प्रसिध्द झाली होती. अनेक गुजराथी कुटुंबात त्यांचे भक्तिभावाने पठण केले जात असे. त्यांच्या प्रचंड संख्येने असलेल्या शिष्य किंवा भक्तपरिवारापुढे आम्ही नगण्य होतो. त्यामुळे आमच्यासाठी वेगळा वेळ देणे शास्त्रीजींना कठीण होते. पण माधवबाग पाठशाळेमार्फत अनेक स्तरावरील प्रशिक्षणशिबिरे तत्वज्ञान विद्यापीठात चालवली जात असत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जेंव्हा शास्त्रीजींचे प्रवचन असे तेंव्हा आम्ही ते आवर्जून ऐकत असू.

त्यांचे प्रवचन विद्वत्तापूर्ण असेच पण वाणी अत्यंत रसाळ होती रोजच्या जीवनाशी निगडित असलेली उदाहरणे देऊन ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत. विज्ञानाचा अभ्यास करतांना मला जी चिकित्सक दृष्टी प्राप्त होत होती त्याच्याशी शास्त्रीजींचे धर्मशास्त्रावरील विचार विसंगत वाटत नव्हते. ते तर्काला धरूनच सांगत असत. उच्चनीचता, भेदाभेद, कर्मकांड, उपासतापास असल्या गोष्टींचा समावेश त्यात नव्हता. पण रोज नित्यनेमाने देवाची आराधना, प्रार्थना वगैरे करण्याची जी संवय तत्वज्ञान विद्यापीठात राहतांना लावून दिली गेली होती तीच पुढील शिक्षणासाठी तिथून बाहेर निघाल्यानंतर लवकरच सुटली. त्यानंतर मी दुस-या कोणाला कसले संस्कार देणार?तिथे तयार होऊन बाहेर पडलेल्या मुलांनी समाजात मिसळून सर्व लोकांमध्ये चांगले संस्कार पसरवावेत अशी जी किमान अपेक्षा आमच्याकडून होती ती पूर्ण झाली नाही.

 शिक्षण संपवून नोकरीला लागल्यानंतर पुन्हा तत्वज्ञान विद्यापीठाशी संपर्क साधून स्वाध्यायकेंद्रांच्या कामाला देण्यासाठी वेळही नव्हता. त्यामुळे मी त्या कार्यापासून दूर राहिलो.शास्त्रीजींनी सुरू केलेले कार्य गुजरात आणि महाराष्ट्रच नव्हे तर देशाबाहेरसुध्दा किती विस्तारले आहे या संबंधी वर्तमानपत्रात येणारे लेख वाचून त्याबध्दल समजत होते आणि आनंद होत होता. पण स्वाध्यायपरिवार आणि इतर कांही महापुरुषांनी उभे केलेले अशासारखे संघ इतके चांगले कार्य करीत असतांना समाजातला वाईटपणा वाढतच कां चालला आहे हे कोडे कांही उलगडत नव्हते. कदाचित हासुध्दा प्रसारमाध्यमांनी उभा केलेला बाऊ असावा, प्रत्यक्षात समाजपुरुष इतका दुष्ट नाही असेच असेल. निदान मला तरी आयुष्यात त्रास देणारी जितकी माणसे भेटली असतील त्यापेक्षा मदत करणारी माणसे जास्त संख्येने भेटली आहेत.

मी तत्वज्ञान विद्यापीठात असतांना लक्षावधी लोकांना मार्गदर्शन करणारे परमपूज्य शास्त्रीजीं आणि पोरवयातला मी यांच्या आचारविचारांच्या स्तरांमध्ये जमीनीपासून आभाळापर्यंत इतके महद अंतर होते. त्यामुळे त्यांनी त्या वेळी नेमके काय सांगितले हे इतक्या वर्षानंतर मी आज शब्दात सांगू शकणार नाही. पण आपल्यातला चांगलेपणा सदैव जागृत असावा आणि आशावादी राहून नेहमी सकारात्मक दृष्टीकोण ठेवावा असे विचार करण्याची वृत्ती माझ्या कळत नकळत त्यातून निर्माण झाली असे म्हणता येईल. शास्त्रीजींच्या संपर्कात येण्याच्या पूर्वीसुध्दा लहानपणापासून माझ्या मनावर ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास आदींच्या उपदेशांचे विस्कळित असे संस्कार घरातून झाले होते, शास्त्रीजींना भेटल्यानंतर ते थोडे ऑर्गनाइज्ड झाले असावेत. प्रत्यक्षात भेट होऊनसुध्दा माझ्या मनातले त्यांचे स्थान खूप उंच आभाळात राहिले. फक्त माझ्या कॉलेजशिक्षणाची सोय ऐन वेळी केल्याबद्दल नव्हे तर मला एक चांगले जीवन दिल्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन.

Wednesday, December 10, 2008

दत्तजन्माची कथा


"तीन शिरे सहा हात" धारण करणा-या दत्तात्रेयाचे "सबाह्य अभ्यंतर" एक असलेले रूप मला फारसे उमगलेले नाही. परमेश्वराच्या विविध रूपांचे त्यात एकत्रीकरण केले असावे असे वाटते. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे ब्रम्हा, विष्णू आणि शिव या तीन्ही रूपांचे चेहेरे त्यात आहेत. विश्वाचे पालन व संगोपन करणा-या विष्णूचा मुखडा मध्यभागी आहे. एका बाजूला जटाधारी आणि माथ्यावर चंद्राला धारण केलेला शिवाचा चेहेरा आहे तर ब्रम्हदेवाला असलेल्या चार मुखांपैकी एक मुख दुस-या बाजूला धारण केले आहे. सहापैकी चार हांतात शंख, चक्र, गदा आणि पद्म या विष्णूने धारण केलेल्या वस्तू आहेत, पांचव्या हांतात शंकराचे त्रिशूल आणि सहाव्या हांतात कमंडलू धरलेला असतो. पाठीशी कामधेनु गोमाता उभी असते, चार वेद श्वानरूपाने त्याच्या पायापाशी घुटमळत असतात. दत्तात्रेयाची ही शांतचित्त मूर्ती कल्पवृक्षाखाली उभी असते असे सांगतात. सगळ्या अद्भुत गोष्टींचे सुरेख इंटिग्रेशन त्याच्या रूपांत आहे की नाही?


दत्तात्रेयाची जन्मकथा भाविकांना मोहित करणारी आहेच, आस्था न बाळगणा-यांनासुद्धा विचार करावा लावणारी आहे. पुराणकालात अत्रि ऋषींची पत्नी अनुसूया महान पतिव्रता आणि सर्वगुणसंपन्न तसेच सदाचरणी होती. अशा पुण्यवान व्यक्तींचे सामर्थ्य वाढत जाते आणि इंद्राला आपले आसन डळमळीत होण्याची भीती वाटते. त्यामुळे त्या पुण्यवान व्यक्तीला पापाचरण करण्यास उद्युक्त करण्याचे प्रयत्न सुरू होतात असा कथाभाग अनेक गोष्टींमध्ये आढळतो. कळीच्या नारदाने केलेल्या कुरापतीमुळे लक्ष्मी, पार्वती आणि सावित्री यांना अनुसूयेचा मत्सर वाटायला लागला आणि त्यांनी आपापल्या नव-यांना भरीला घातले अशीही एक कथा ऐकिवात आहे. खरे तर मत्सर, कपट वगैरे मानवी दोष देवांमध्ये सुद्धा असावेत हे माझ्या मनाला पटत नाही. पण सत्वपरीक्षा पाहण्यासाठी कांही कारण द्यायचे म्हणून अशा प्रकारची स्पष्टीकरणे त्यात दिली असावीत. सोन्याचा शुद्धपणा पारखण्यासाठी त्याला मुशीत घालून तापवावे लागते तसेच माणसाची पारख त्याच्यावर आलेल्या संकटांना तो कशा प्रकारे तोंड देतो यावरून होतो.


सती अनुसूयेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी ब्रम्हा, विष्णू व महेश हे तीघेही अतिथींची रूपे घेऊन तिच्या कुटीमध्ये गेले. अत्रि मुनी आपले तपाचरण करून अजून घरी परतलेले नव्हते. सती अनुसूयेने गृहिणीच्या तत्परतेने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. सायंकाळच्या वेळी आलेल्या पाहुण्यांना चार घास जेवण करूनच जायचा आग्रह केला आणि त्यांना जेवणात काय हवे याची पृच्छा केली.


आजकाल परिस्थिती बदलली आहे. अशा आगांतुक पाहुण्यांना सहसा कोणी घरातच घेत नाही. सख्खा भाऊ जरी अचानकपणे आला तर त्याला सुध्दा काय हवे ते विचारून जवळच्या हॉटेलांत ऑर्डर देऊन ते जिन्नस मागवले जातात. भावालाही आपल्या भगिनीच्या पाककौशल्याची चांगली कल्पना असल्याने तो सरळ मेनूकार्डच मागून घेऊन त्यात होम डिलीव्हरीसाठी कोणकोणते पदार्थ उपलब्ध आहेत ते पाहून आपली खाद्यंतीची हौस भागवून घेतो. असे बदललेले चित्र कधीकधी आपल्याला दिसते.


पुराणकालात अशी पद्धत नव्हती आणि सोयही नसावी. वनवासात द्रौपदीची सोय व्हावी म्हणून श्रीकृष्णाने तिला अक्षय थाळी दिली होती. तिच्यात सुग्रास जेवण आपोआप निर्माण होत असेल. तेवढा अपवाद सोडला तर इतर गृहिणी स्वयंपाकाला लागणा-या वस्तू आपल्या संग्रही ठेवत असत आणि स्वतःच पाकसिद्धी करीत असत. सती अनुसूयेने विचारणा केल्यावर त्या पाहुण्यांनी अजबच मागणी पुढे केली. ती आपणहून जे कांही अन्न देईल ते सुग्रासच असेल, पण ते वाढतांना तिच्या अनुपम सौंदर्याचे दर्शन घडावे यासाठी तिने ते निर्वस्त्र स्थितीत वाढावे अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली.


हे ऐकून कुठल्याही कुलीन स्त्रीच्या अंगाचा तिळपापड झाला असता आणि तशी मागणी करणा-या अतिथींना तिने लगेच घराबाहेर काढले असते. पण तसे केल्यामुळे "अतिथीदेवो भव।" या नियमाचा भंग झाला असता. आज आपल्याला त्याचे इतके महत्व वाटणार नाही, पण या नियमाचे पालन करण्यासाठी सीतामाईने लक्ष्मणरेषा ओलंडून स्वतःचा जीव धोक्यात घातला होता आणि चांगुणेने स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा बळी दिला होता अशा कथा आहेत. मात्र या नियमाचे पालन करण्यासाठी सती अनुसूया विवस्त्र होऊन पाहुण्यांपुढे गेली असती तर तिचे पातिव्रत्य भंग पावले असते. अशा रीतीने तिची 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशी दारुण अवस्था झाली होती.


पण ती महान स्त्री यामुळे डळमळली नाही. बाहेर प्रत्यक्ष ब्रम्हा, विष्णू व महेश उभे असतांना तिने आंत जाऊन आपल्या इष्ट दैवतांचे पूजन करून त्यांना आवाहन केले. "हा कठीण प्रसंग निभावून नेण्यासाठी आज माझ्या घरी आलेल्या अतिथींना माझी तान्ही बालके बनव आणि माझ्या सत्वाचे रक्षण कर." अशी प्रार्थना करून तिने निर्वाणीचा धांवा सुरू केला. परमेश्वराला तिचे म्हणणे मान्य करावेच लागले आणि त्या तीन्ही अतिथींचे रूपांतर तान्ह्या बालकांमध्ये झाले. मनात कसलीही पापवासना न बाळगता मातेकडे प्रेमाने आणि फक्त प्रेमानेच पाहणा-या त्या बालकांना तिने त्या अतिथींनी सांगितलेल्या अवस्थेत बाहेर येऊन छातीशी धरले आणि वात्सल्याने कुरवाळले.


नंतर त्या तीघांचे मिळून एक रूप झाले आणि हाच दत्तात्रेयाचा अवतार! त्याच्या हांतात इतकी शस्त्रास्त्रे असली तरी त्यांचा वापर करून त्यांनी खलनिर्दाळन केल्याच्या कथा नाहीत. त्यांनी मुनीरूपाने अनेक अवतार धरून शिष्यवर्गाला धर्मशास्त्रांचे आणि नीतीमत्तेचे धडे दिल्याची आख्याने आणि चरित्रे पारंपरिक वाङ्मयात प्रसिद्ध आहेत. त्यांची अवतारपरंपरा अगदी वीसाव्या शतकापर्यंत चालत आली आहे अशी भाविकांची श्रध्दा आहे. भगवान दत्तात्रेयांचे दत्तगुरू हे नांवच अधिक प्रचलित आहे आणि गुरुवार हा दत्ताचा वार मानला जातो. महाराष्ट्रात तरी त्याला बरेच महत्व दिले जाते.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माझी आई दत्ताची परमभक्त होती. तिच्या स्मरणार्थ तिने रचलेला एक अभंग आज खाली देत आहे.

कल्पवृक्षातळी अत्रीचा नंदनु, सवे कामधेनू शोभतसे ।।

शिरी जटाभार रुद्राक्षांचा हार, चंद्र शिरावर शोभतसे ।।

कटीसी शोभले भगवे वसन, चारी वेद श्वानरूपे आले ।।

शंख चक्र गदा पद्म नी त्रिशूल, शोभतसे माळ हांतामध्ये ।।

सुहास्यवदने पाहे कृपादृष्टी, अमृताची वृष्टी भक्तांवरी ।।

ऐशा या स्वरूपी मन रमवावे, शिर नमवावे पायी त्याच्या ।।

लक्ष्मी ऐशा मनी ध्याउनी स्वरूपा, रमे चित्ती सदा ऐक्यभावे ।।