Thursday, December 31, 2009

नववर्षाच्या शुभेच्छा


आज आणखी एक नवे वर्ष सुरू झाले. या वेळी पूर्वीच्या वर्षांच्या आठवणी जाग्या होणारच. आमच्या ऑफीसला १ जानेवातीला सुटी नसायची. पण त्या दिवशी फारसे काम असे होतच नसे. कांही धीट मुले ऑफीस सुरू होण्याच्या आधीच येऊन पोचून सर्वात मोठ्या साहेबाच्या केबिनच्या आसपास घुटमळत रहायची आणि साहेब एकटे असल्याचे पाहून आत घुसून त्यांना शुभेच्छा वगैरे द्यायची. इतरांच्या नजरेतून मस्का मारायची. माझ्यासारखी बुजरी मुले एकमेकांनाच विश करत असत आणि एकादा घोळका साहेबांकडे जायला निघाला तर त्यांत सामील होऊन त्यांच्याबरोबर जात असत. तिथे जाऊन काय बोलायचे? हेच मला समजत नसे. ते जरा जरा कळायला लागेपर्यंत मीच साहेब झालो होतो.

त्या दिवशी ऑफिसातल्या इतर सहका-यांना भेटून एकमेकांचे अभिनंदन करणे चालायचे. मित्रमंडळींच्या ग्रुपमध्ये आणि सेक्शनच्या पार्ट्या असायच्या. थोडी वरची जागा मिळाल्यावर इतर लोकांच्या पार्ट्यांमध्ये सामील व्हावे लागायचे. कँटीनमधले तेच तेच सामोसे आणि वेफर्स पुन्हा पुन्हा खाणे शक्य नसले तरी थोडे तोंड चाळवावे लागायचे. कांही कल्पक मित्र बाहेरून केक किंवा मिठाया आणायचे, त्यावर मात्र ताव मारायचा. या सगळ्याचे नियोजन करून ठेवले तर ते बरे पडायचे. शिवाय टेलीफोन सारखा घणघणतच असायचा. त्या दिवशी ऑफिसच्या खर्चाने आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना फोन करण्याची मुभा असते अशीच सर्वसामान्य समजूत असावी. त्यामुळे सख्ख्या भावापासून आऊच्या काऊपर्यंत सगळ्यांशी मनमुराद नाही तरी अघळपघळ गप्पा व्हायच्या.

ऑफिसमधल्या गुजगोष्टी खाजगी असल्या तरी त्या मुख्यतः ऑफिसमधल्या विषयांवरच असायच्या. गेल्या वर्षी कोणी कोणी कसकसला गाढवपणा केला होता याची उजळणी व्हायची आणि नव्या वर्षात काय करायचे याच्या योजना, विचार आणि अचाट कल्पना या सगळ्यांवर चर्चा व्हायची. त्यातून कांही कण मिळतच असतील आणि त्यांचा फायदाही पुढे होत असेल. कांही कल्पक साहेब लोकांनी त्या दिवशी वरिष्ठ सहका-यांबरोबर मीटिंगच ठेवली आणि त्या दिवशी मारायच्या गप्पा ऑफिशियल करून टाकल्या.

सेवानिवृत्त झाल्यानंतर आलेल्या २००६ च्या नूतन वर्षाच्या आरंभाला मी ऑफिसात तर नव्हतोच, पण भारताबाहेर गेलो होतो. घरात मला सोडून इनमिनतीन माणसे होती आणि घराबाहेर एकाचीही ओळख नव्हती. परदेशातून भारतातल्या आप्तांना फोन लावण्याइतका निर्ढावलो नव्हतो. त्यामुळे शुभेच्या द्यायच्या तरी कोणाला? हा प्रश्नच होता. "हे विश्वचि माझे घर" असे म्हणत नुकताच आंतर्जालावर प्रवेश केला होता. भारतातून निघतांना दहा बारा लोकांनी त्यांचा ईमेलचा पत्ता देऊन ठेवला होता. तेंव्हा एक ग्रीटिंग कार्ड तयार केले आणि सर्वांना पाठवून दिले.

आंतर्जालावरील विश्वाच्या कक्षा कशा रुंद करायच्या या विचारातून या ब्लॉगचा जन्म २००६ च्या नववर्षदिनाच्या शुभमुहूर्तावर केला. त्यानंतर इतर कांही संकेतस्थळे मिळाली आणि आता खरोखरच त्या बीजामधून निदान एक लहानसे रोपटे तरी वाढीला लागले आहे. ईमेलचा पसारासुध्दा अफाट वाढला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भेटून ज्यांना शुभेच्छा देता आल्या आणि येतील त्यांच्या अनेकपटीने अधिक लोकांबरोबर इंटरनेटवरून संपर्क होऊ लागला आहे.

मागील वर्षाच्या अखेरच्या महिन्यात अचानकपणे आलेल्या एका कामामुळे मला या स्थळावर यायला फारसे जमले नव्हते. पण तरीसुध्दा याला भेट देणा-यांची संख्या वाढतच होती हे पाहून खूप चांगले वाटले. आता नव्या वर्षात नव्या जोमाने ही कसर भरून काढायचा प्रयत्न करायची जबाबदारी माझ्यावर पडली आहे.

या नव्या वर्षात सर्व वाचकांना यश, कीर्ती आणि सुखसमृध्दी आणि भरभरून मिळो अशा शुभेच्छा !!!

Saturday, December 05, 2009

अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस


अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस -भाग १ - वॉशिंग्टन डीसी



अमेरिकेच्या लघुसहलीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नायगाराच्या धबधब्याच्या परिसरात भरपूर वेळ घालवून आणि दुपारी कॉर्निंग ग्लास म्यूजियम पाहून झाल्यानंतर रात्रीच्या मुक्कामाला आम्ही मेरीलँड राज्यामधल्या एका गांवी मुक्कामाला जाऊन पोचलो. तिसरे दिवशी सकाळी उठून लगेच पुढल्या प्रवासाला लागायचे होते. आम्ही ज्या हॉटेलात उतरलो होतो, तिथल्या खोलीतल्या छोट्याशा स्वच्छतागृहात व्यवस्थितपणे उभे राहून कपडे बदलण्याइतकीसुध्दा जागा नव्हती, हवेत चांगलाच गारठा होता आणि वेळही नव्हता, त्यामुळे स्नान वगैरे करायचा विचारही मनात आला नाही. या पँकेजमध्ये नाश्त्याचा अंतर्भाव नव्हताच. खोलीत ठेवलेल्या किटलीत पाणी उकळून कॉफी केली, ती बिस्किटांच्या सोबतीने प्यायली आणि आंघोळीच्या गोळ्या घेऊन बसमध्ये जाऊन बसलो. उजाडतांच आमची बस वॉशिंग्टन डीसीच्या मार्गाला लागलीसुध्दा. देशाची राजधानी असल्यामुळे तिथे अनेक सरकारी कार्यालये आहेत, तसेच पर्यटकांसाठी खूप प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे त्या ऑफीसात काम करणारे नोकर, तिथे आपापली कामे करवून घेण्यासाठी येणारे नागरिक, ते शहर पहायला येणारे टूरिस्ट आणि या सर्वांना विविध सेवा उपलब्ध करून देणारे व्यावसायिक अशा सगळ्या लोकांचीच सकाळ होताच वॉशिंग्टन डीसी कडे जाण्यासाटी धडपड सुरू होते. त्या शहराच्या दिशेने जाणारे सारे रस्ते वाहनांनी दुथडी वाहू लागतात. ही गर्दी टाळण्यासाठी आम्ही शक्य तितके लवकर निघालो होतो. तरीसुध्दा शहराच्या जवळ जाता जाता गर्दीचा मुरंबा (ट्रॅफिक जॅम) सुरू झाला आणि तो दाट होत गेला. अमेरिकेतल्या सगळ्याच मोठ्या शहरात अनेक उड्डाणपूल आणि भुयारी रस्ते बांधून ट्रॅफिक सिग्नल टाळण्यात आले असल्यामुळे वाहतूक सहसा बंद पडत नाही, पण वाहनांची संख्या फार जास्त झाल्यामुळे त्याची गती मात्र मंदावते. हळूहळू पुढे सरकता सरकता दुरूनच वॉशिंग्टन मेमोरियलचा उंच मनोरा दृष्टीला पडला आणि सर्वांना हायसे वाटले.

वॉशिंग्टन डीसी इथे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची राजधानी आहे एवढे तरी जगातील सर्वच सुशिक्षित लोकांना माहीत असते. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर वॉशिंग्टन नांवाचे एक राज्य आहे. त्याच्या नांवाबरोबर गल्लत होऊ नये म्हणून नेहमी 'वॉशिंग्टन डीसी' असा उल्लेख केला जातो. बहुतेक अमेरिकन लोक तर फक्त 'डीसी' एवढेच म्हणतात. अमेरिका (म्हणजे यूएसए) हे आजच्या जगातले सर्वाधिक बलशाली राष्ट्र आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही देशाच्या कारभारात हस्तक्षेप करायचा त्याला हक्क आहे अशी एक समजूत आहे. पूर्वीच्या काळातले बलिष्ठ सम्राट, ताकतवान बादशहा वगैरे लोक इतर राज्यांवर सरळ सरळ आक्रमण करीत आणि जिंकलेल्या देशाचा खजिना लुटून आणत असत. तो राजा शरण आला आणि त्याने गयावया केली तर त्याच्याकडून जबरदस्त खंडणी वसूल केली जात असे. आजकाल तसे करत नाहीत. मोठे देश लहान देशांना शस्त्रास्त्रे, यंत्रसामुग्री वगैरे विकत घ्यायला लावतात आणि ते पुरवणाऱ्या कंपन्यांकडून कररूपाने पैसे गोळा करतात. त्यामुळे तिथली सरकारे प्रत्यक्ष खंडणी वसूल करत नसली तरी जगभरातून संपत्तीचा ओघ त्या दिशेने वहात असतो. अमेरिकेच्या राष्ट्रीय धोरणांचा परिणाम जगभरातल्या इतर मित्र किंवा शत्रूराष्ट्रांच्या तसेच तटस्थ राष्ट्रांच्याही धोरणावर होत असतो. इतकेच नव्हे तर अमेरिकेच्या अंतर्गत कारभारामुळे तिथल्या बाजारावर त्याचा प्रभाव पडला तर त्याचे पडसाद जगभरातील बाजारांत उमटतात. अशा कारणांमुळे वॉशिंग्टन डीसी ही एका अर्थाने सध्याच्या जगाचीच राजधानी झाली आहे, निदान ती राजकीय दृष्ट्या जगाच्या केंद्रस्थानी आहे असे म्हणता येईल.

शेती, व्यापार, कारखानदारी वगैरे उद्योग व्यवसाय अमेरिकेत पहिल्यापासून पूर्णपणे खाजगी मालकीचेच आहेत. ते हातात घेण्याचा प्रयोग तिथल्या सरकारने कधी करून पाहिला नाही. रस्ते बांधणी, रेल्वेमार्ग उभारणे आणि त्यावर धांवणाऱ्या मोटारगाड्या, आगगड्या, इतकेच नव्हे तर आकाशात उडणारी विमाने आणि पाण्यातल्या आगबोटी वगैरे नागरी वाहतूकीची सारी साधने, तसेच शिक्षण, मनोरंजन आदि बहुतेक गोष्टी खाजगी क्षेत्रात आहेत. इतकेच नव्हे तर शस्त्रास्त्रे, लढाऊ विमाने आणि अग्निबाणसुध्दा खाजगी क्षेत्रात असलेल्या कारखान्यांत तयार होतात. राज्य सरकारांना बरीच स्वायत्तता असून कायदा आणि सुव्यवस्था, न्यायसंस्था वगैरे खाती त्यांच्या अखत्यारीत येतात. अर्थ, परराष्ट्रसंबंध आणि संरक्षण अशी मोजकीच क्षेत्रे केंद्र सरकारकडे आहेत. त्यातली परराष्ट्रसंबंध आणि संरक्षण ही फक्त खर्चाचीच आणि चांगलीच खर्चिक खाती आहेत आणि त्यांचा खर्च चालवण्यासाठी कररूपाने निधी गोळा करणे हे केंद्र सरकारचे मुख्य काम समजले जाते.

अमेरिकेतील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील संस्थानांना सोयिस्कर अशा ठिकाणची ही जागा प्रत्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टननेच राजधानीसाठी निवडली होती. त्या जागेवर अमेरिकेच्या राजधानीचे हे शहर तत्कालिन प्रसिध्द वास्तुविशारदाच्या देखरेखीखाली अत्यंत व्यवस्थितपणे नियोजन करून वसवले गेले आहे. या शहरात सुंदर इमारती, विस्तीर्ण उद्याने, तऱ्हेतऱ्हेची वस्तुसंग्रहालये, स्मृतीस्थाने वगैरेंची नुसती रेलचेल आहे. गेल्या दोन शतकांमधील वास्तुकलेचे उत्तमोत्तम नमूने इथे पहायला मिळतात. जिकडे नजर जाईल तिकडे कांही तरी सौंदर्यच पहायला मिळेल असे वाटत राहते.

. . . . . . . . . (क्रमशः)

अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस - २ - वॉशिंग्टन डीसी - २ - इमारती


अमेरिकेतील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील, पण दोन्हीकडील प्रामुख्याने पूर्व किनाऱ्यावरील, संस्थानांच्या संमतीने पोटोमॅक नदीच्या किनाऱ्यावरील या जागी त्या नव्या राष्ट्राची राजधानी वसवण्याचे सन १७९० साली ठरवले गेले. मेरीलँड आणि व्हर्जीनिया राज्यांच्या सीमेवरला आणि दोन्ही राज्यातला थोडा थोडा मिळून १० चौरस मैलाएवढा जमीनीचा भाग या कामाकरता निश्चित झाला आणि व्हाइटहाउस या इमारतीची कोनशिला १७९० मध्ये बसवली गेली. अमेरिकेच्या केंद्र सरकारच्या मालकीची ही सर्वात जुनी इमारत आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुरुवातीची कांही वर्षे त्या देशाचा कारभार फिलाडेल्फिया शहरातून चालवला जात असे. सन १८०९ मध्ये कॅपिटॉलच्या सिनेट चेंबरचे बांधकाम पुरे झाल्यानंतर अमेरिकेची काँग्रेस तिथे भरू लागली. त्यानंतर राजधानीचा विकास जोमात सुरू झाला होता, पण १८१२ मध्ये ब्रिटीशांनी केलेल्या हल्ल्यात त्यातील बहुतेक इमारती जळून खाक झाल्या. युध्द संपल्यानंतर पुन्हा नव्याने बांधणी सुरू होऊन ती १८२९ पर्यंत पूर्ण झाली. १८४८ मध्ये तत्कालीन तंत्रज्ञानानुसार अतिभव्य अशा वॉशिंग्टन स्मारकाचे काम सुरू झाले होते, पण कांही तांत्रिक अडचणी आणि राजकीय कारणांमुळे ते कांही काळानंतर बंद पडले. तीस वर्षांनंतर ते पुन्हा जोमाने चालू झाले आणि १८८५ मध्ये त्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.

नंतरच्या काळात प्रेसिडेंट लिंकन आणि प्रेसिडेंट जेफरसन या दोन महान विभूतींची स्मारके बांधण्यात आली. तसेच या मुख्य इमारतींच्या मधल्या जागेत बगीचे, तलाव, हमरस्ते वगैरे गोष्टी अत्यंत योजनापूर्वक रीतीने तयार करण्यात आले आणि त्या भागात अनेक सुंदर इमारतींची उभारणी करण्यात आली. मधोमध वॉशिंग्टन स्मारकाचा उंच स्तंभ आणि त्याच्या चार दिशांना पण दूरवर असलेल्या चार प्रमुख इमारती हा वॉशिंग्टन शहराचा मुख्य आराखडा शंभर दीडशे वर्षांपूर्वी तयार झाला होता. त्यांच्या आजूबाजूंच्या इतर इमारती नंतरच्या काळात काळानुसार विकसित होत गेलेल्या पध्दतीनुसार बांधल्या गेल्या, पण या पांच ऐतिहासिक इमारतींच्या सौंदर्याला बाधा येईल असे कोणतेही बांधकाम नंतर केले गेलेले नाही. अमेरिकेतील इतर सर्वच महानगरात दिसते तशी अवाढव्य पण सरळसोट गगनचुंबी इमारतींची गर्दी या शहरात नाही. वॉशिंग्टन स्मारक आणि कॅपिटॉल बिल्डिंगचे शिखर या दोन्हींची उंची जवळजवळ समान आहे आणि तिसरी कोणतीही इमारत इतकी उंच नाही. या पांच प्रमुख स्थळांना जोडणारा एकादा रिंग रोड दिसला नाही. कोणत्या क्रमाने त्यांना भेट द्यायची यालाही कांही महत्व नव्हते. टूर ऑपरेटरने त्याच्या सोयीनुसार सगळीकडे फिरवून आणले.

वॉशिंग्टन मॉन्युमेंट ही एक प्राचीन काळातल्या युरोपीय पध्दतीतील ओबेलिस्क प्रकारची इमारत आहे. हा एक प्रकारचा चौकोनी खांब असतो आणि तो वरच्या बाजूने निमूळता होत जातो. पूर्वीच्या काळात अशा आकाराचे शिलाखंड घडवून ते वाहून नेत आणि शोभेची वस्तू म्हणून सार्वजनिक ठिकाणी उभे करत असत. वॉशिंग्टन मॉन्यूमेंट मात्र संगमरवर, ग्रॅनाइट आणि सँडस्टोन या जातींच्या दगडांमधून उभारले आहे. तो जगातील सर्वात मोठ्या आकाराचा प्रचंड ओबेलिस्क आहे, तसेच जगातील सर्वात उंच दगडी बांधकाम आहे.

पॅरिसचा आयफेल टॉवर उभा होण्यापूर्वीची कांही वर्षे ही जगातील सर्वात उंच इमारत होती. सुमारे ५५५ फूट उंचीचा हा मनोरा एकाद्या ५५ मजली इमारतीइतका उंच आहे. आजकाल यापेक्षा उंच इमारती अमेरिकेच्याच नव्हे तर युरोपातील आणि मलेशिया, दुबई यासारख्या देशातल्या सुध्दा अनेक शहरांमध्ये पहायला मिळतात, पण त्या सिमेंटकाँक्रीटच्या असतात. वॉशिंग्टन मेमोरियल आंतून पोकळ असून त्यात साडेआठशे पायऱ्यांचा जिना आहे, तसेच लिफ्टची सोयसुध्दा आहे. आम्हाला मात्र कदाचित वेळेअभावी असेल पण वर जाऊन आजूबाजूचा पंचवीस तीस मैलावर पसरलेला भाग पहाण्याची संधी मिळाली नाही. ११-७ च्या घटनेनंतर आंत जायला मनाई करण्यात आली आहे असे कांहीसे सांगितले गेले. त्यातले खरे खोटे कोण जाणे. मॉन्यूमेंटच्या सभोवती प्रशस्त हिरवळ आहे आणि त्यात फुलांचे सुंदर ताटवे लावलेले दिसत होते. त्यांच्या पलीकडे दूर उभे राहूनच आम्ही या स्मारकाचे दर्शन घेतले.

कुतुबमीनार आणि पिसा येथील कलत्या मनोऱ्याला प्रत्येक मजल्यावर सुरेखसा सज्जा आहे आणि कलाकुसर केलेले खांब व कमानी यांनी ते नटलेले आहेत. तशा प्रकारची सौंदर्यनिर्मिती वॉशिंग्टन मॉन्यूमेंटमध्ये दिसत नाही. आजूबाजूला सगळी सपाट जमीन आणि मध्येच एक गगनचुंबी सरळसोट उभा उंचच उंच मनोरा पाहून जॉर्ज वॉशिंग्टनच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाची आठवण येऊन मन दडपून जावे आणि आपल्या खुजेपणाची जाणीव व्हावी असा उद्देश हे भव्य स्मारक बांधण्यामागे असावा. आमच्या बसमध्ये बहुतेककरून परदेशी पर्यटक होते. त्या सर्वांना, विशेषतः बहुसंख्येने असलेल्या चिनी लोकांना अमेरिकेचे स्वातंत्र्ययुध्द आणि त्याचे नेतृत्व करून सर्व जगातील स्वातंत्र्यप्रेमी लोकांना स्फुरण देणारा जॉर्ज वॉशिंग्टन या दोहोंबद्दल किती माहिती असेल किंवा कितपत आत्मीयता वाटत असेल याची शंकाच होती. ते आपले इकडे तिकडे पहात आपल्या कॅमेऱ्याने दिसेल ते टिपण्यात मग्न दिसत होते.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेले व्हाइटहाउस पाहून खरे सांगायचे झाले तर माझी थोडी निराशाच झाली. एक तर सुरक्षेच्या कारणामुळे आम्हाला त्या इमारतीच्या गेटपर्यंतसुध्दा नेले नाही. मध्ये दोन तीन रस्ते सोडून लांबवर असलेल्या एका रस्त्यावर उभे राहून दुरूनच ती पहावी लागली. आजूबाजूला असलेल्या उंच झाडांमागे तिचा बराचसा भाग झाकलेलाच होता आणि जेवढा दिसत होता तो फारसा आकर्षक वाटला नाही. शंभर दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटीश शासकांनी बांधलेले आणि आता पारशी किंवा गुजराती शेठांच्या ताब्यात असलेले कांही बंगले मुंबई, दिल्ली, कोलकाता वगैरे शहरांच्या जुन्या भागात दिसतात, तशातलाच एक बऱ्यापैकी मोठा आणि व्यवस्थित रंगरंगोटी करून चांगल्या वापरात ठेवलेला एकादा बंगला जसा दिसेल तसा हा बंगला वाटला. त्या मानाने आपले दिल्लीचे राष्ट्रपतीभवन किती तरी भव्य आणि सुंदर दिसते.

अर्थात व्हाइटहाउस ही अमेरिकेतली एक सर्वात जुनीपुराणी इमारत आहे आणि बांधायच्या वेळीच एकादे चर्च किंवा स्मारक म्हणून ती बांधलेली नसून माणसांच्या वास्तव्याचा विचार करून बांधली आहे हे लक्षात घ्यायला हवे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणजे आजच्या जगातला सर्वाधिक प्रभावशाली राजकारणी पुरुष त्या वास्तूत निवास करतो या कारणामुळे तिला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. पण तिथला एकादा व्हरांडासुध्दा जवळून पहायला मिळणार नसल्यामुळे त्या इमारतीत एकंदर किती खोल्या आहेत किंवा किती स्क्वेअरफूट बिल्टअप व कार्पेट एरिया आहे असली माहिती जाणून घेण्यात कोणालाच फारसे स्वारस्य नव्हते.

. . . .. . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)


अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस - ३ - वॉशिंग्टन डीसी - ३ स्मारके


कॅपिटॉल बिल्डिंगसमोरील वॉशिंग्टन मेमोरियलच्या दिशेने पसरलेल्या प्रशस्त जागेला नॅशनल मॉल असे नाव दिले आहे. विविध प्रकारची अनेक संग्रहालये आणि इतर महत्वाच्या वास्तू या वरील हमरस्त्याच्या दोन्ही बाजूंना ऊभ्या केलेल्या आहेत. या मॉलच्याच वॉशिंग्टन स्मारकाच्या पलीकडल्या बाजूला एक लांबलचक रिफ्लेक्टिंग पाँड आहे आणि त्याच्या पलीकडे लिंकन मेमोरियल आहे. अशा प्रकारे हे स्मारक, वॉशिंग्टन मॉन्यूमेंट आणि कॅपिटाल या तीन्ही मुख्य इमारती एका रांगेत आहेत आणि त्यांच्या मध्ये अडथळा आणणारी कोणतीही वास्तू नसल्याने मॉलवरून त्या तीन्ही दिसत राहतात.

अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना मानवी हक्कांसाठी लढा देणाऱ्या महानुभावांच्या यादीत खूप वरचे स्थान आहे. ब्रिटीशांच्या जोखडातून अमेरिका मुक्त झाल्यानंतरसुध्दा गुलामगिरीची पध्दत त्या देशात अस्तित्वात होती आणि मुख्यतः आफ्रिकन वंशाच्या लोकांना गुलामीच्या अवस्थेत अनन्वित जुलूम सहन करावे लागत असत. अब्राहम लिंकन हे जन्माने गौरवर्णीय असले तरी त्यांना ही अमानुष गुलामगिरी मान्य नव्हती. त्यांनी त्याविरुध्द लढा दिला आणि विरोधकांबरोबर अक्षरशः युध्द पुकारून त्यांना नामोहरम केले आणि गुलामगिरीच्या प्रथेचे अमेरिकेतून उच्चाटन केले.

अशा या महात्म्याचे संस्मरणीय असे स्मारक बांधायचा विचार सन १८६७ पासूनच सुरू झाला होता, पण १९११ साली त्याला अमेरिकन काँग्रेसची मंजूरी मिळाली (काँग्रेस हा अमेरिकेतला एक राजकीय पक्ष नसून तिथली लोकसभा त्या नांवाने ओळखली जाते) आणि १९१४ मध्ये त्याचे बांधकाम सुरू होऊन ते १९२२ पर्यंत पूर्ण झाले. ग्रीक डोरिक टेंपलच्या धर्तीवर बांधलेल्या या इमारतीला ३६ खांब आहेत आणि त्यांच्या आधाराने सपाट आकाराचे छप्पर आहे. वेगवेगळ्या अमेरिकन संस्थानांची नांवे यातील प्रत्येक खांबावर खोदलेली आहेत आणि उरलेली नांवे वेगळ्याने एका फलकावर दिली आहेत. ही संपूर्ण इमारत पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांपासून बांधलेली आहे.

पायऱ्या चढून इमारतीत गेल्यानंतर समोर अब्राहम लिंकन यांचा भव्य पुतळा आहे. तसा तो अगदी दूरवरून दिसतच असतो. जवळ जाता जाता त्याची भव्यता आणि लिंकनच्या मुद्रेवरील भाव स्पष्ट होत जातात. " ज्या लोकांसाठी अब्राहम लिंकन यांनी आपल्या राष्ट्राची अखंडता टिकवून ठेवली त्यांच्या हृदयात आणि या मंदिरात त्यांची आठवण सतत तेवत राहील." असे शब्द या पुतळ्याच्या वरच्या बाजूला ठळक अक्षरात कोरून ठेवले आहेत. दोन्ही हात बाजूच्या हँडरेस्टवर टेकवून ऐटीत खुर्चीवर विराजमान असलेली लिंकन यांची सुटाबुटातली प्रतिमा विलक्षण लक्षवेधक आहे. सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने पहाता त्यांची गणना कांही देखण्यांमध्ये होणार नाही. पण त्या पुतळ्याचा आकार, रेखीवपणा, समोरील वॉशिंग्टन स्मारक आणि कॅपिटांलच्या दिशेला वळवलेली करडी नजर वगैरे सारे पाहण्यासारखे आहे. लिंकन यांनी केलेल्या कांही महत्वाच्या भाषणांमधले उतारे दोन्ही बाजूंच्या भिंतींवर कोरून ठेवले आहेत.

लिंकन मेमोरियलच्या जागेवर अमेरिकेच्या इतिहासातल्या कांही ठळक घटना घडल्या आहेत. लिंकन यांच्यानंतरचे सर्वात प्रसिध्द मानवतावादी मार्टिन ल्यूथर किंग यांनी सन १९६३ मध्ये आपल्या सिव्हिल राइट्स मूव्हमेंटमधून जवळ जवळ अडीच लाख लोकांचा मोर्चा वॉशिंग्टनला नेला होता आणि "माझे एक स्वप्न आहे...." अशी सुरुवात करून त्यांनी केलेले भाषण अजरामर झाले आहे. "होंगे कामयाब.." ही त्यांनी दिलेली घोषणा जगभर प्रसिध्द झाली आणि तिचे प्रतिसाद उमटत राहिले. या वर्षाच्या सुरुवातीला लिंकनच्या या पुतळ्याच्या समोरच असलेल्या कॅपिटॉलच्या प्रांगणात सध्याचे अध्यक्ष बरॅक ओबामा यांनी दिवंगत नेते लिंकन यांच्या साक्षीने शपथविधी घेतांना जे भाषण केले तेंव्हा त्यांचा कंठ भावनेने भरून आला होता.

वॉशिंग्टन मॉन्यूमेंटपाशी उभे राहून नॅशनल मॉलच्या काटकोनात पाहिले तर एका बाजूला दूर व्हाइट हाउस दिसते. दुसऱ्या बाजूला टाइडल बेसिन नांवाचा एक तलाव आहे. त्या तळ्याच्या पलीकडे असलेल्या मोकळ्या जागेत थॉमस जेफरसन यांचे भव्य स्मारक बांधले आहे. याचे काम सन १९३९ साली सुरू झाले आणि १९४३ पर्यंत पूर्ण झाले. त्यामध्ये राष्ट्राध्यक्ष जेफरसन यांचा ब्राँझचा पुतळा सन १९४७ मध्ये बसवला आहे.

थॉमस जेफरसन हे अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले. ते जॉर्ज वॉशिंग्टन यांचे सहकारी होते. वॉशिंग्टन यांनी लढाईचे नेतृत्व करून ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवले होते ते अमेरिकेच्या नागरिकांसाठी मिळवले होते. त्या वेळी जाहीर केलेला स्वातंत्र्याचा जाहीरनामा मुख्यतः जेफरसन यांनी तयार केला होता. ते एक विद्वान आणि महान विचारवंत होते. हे लोकांसाठी, लोकांनी चालवलेले राज्य नेमके कसे चालवावे यासाठी योग्य अशी घटना बनवण्याचे काम थॉमस जेफरसन यांनी केले. त्यांना अमेरिकेचे फाउंडिंग फादर म्हणजे एका अर्थाने राष्ट्रपिता म्हंटले जाते. अमेरिकेच्या लोकशाहीचा भक्कम पाया जेफरसन यांनी घातला होता, त्याच आधारावर ती आजवर उभी आहे.

जेफरसन मेमोरियल ही सुध्दा एक प्रेक्षणीय इमारत आहे. गोलाकारात बांधलेल्या खूप पायऱ्या चढून वर गेल्यानंतर रांगेने उभ्या उंच खांबांवर आधारलेले प्रशस्त द्वार लागते. आंत प्रवेश करताच समोरच एका वर्तुळाकृती दालनात जेफरसन यांचा एकोणीस फूट उंच भव्य असा ब्राँझचा पुतळा उभारलेला आहे. दोन्ही बाजूच्या वर्तुळाकृती भिंतींवर अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यातील आमि इतर संदर्भावरून घेतलेली जेफरसन यांची सुवचने मोठ्या अक्षरात कोरली आहेत. छपरावरील घुमट या इमारतीची शोभा वाढवतो. जुन्या ऐतिहासिक पध्दतीच्या वास्तुशिल्पात नव्या काळातील कल्पनांची मिसळ करून आधुनिक तंत्राने बनवलेल्या या इमारतीत नव्याजुन्या शैलींचा संगम दिसतो. समोर विस्तीर्ण तलाव आणि आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याने ही वास्तू जास्तच उठून दिसते.

. . . . . . . . . . (क्रमशः)

अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस - ४ - वॉशिंग्टन डीसी - ४ युद्धस्मारके


जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन आणि अब्राहम लिंकन या अमेरिकेच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्षांची स्मारके त्या महान ऐतिहासिक विभूतींबद्दल मनात असलेला आदर वाढवण्यासारखीच भव्य आणि दिव्य आहेत. त्या स्थळांना भेट देत असतांनाच वाटेवर असलेल्या दोन वेगळ्या प्रकारच्या स्मारकांचे दर्शन घडले. पहिले स्मारक कोरियन युध्दात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांचे होते. दुसरे महायुध्द संपल्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या दोन महासत्ता उदयाला आल्या होत्या. जगातील सर्व कामगारांना एकत्र आणण्याचा झेंडा उभारून रशियाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. माओझेदोंगच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये सत्तापालट झाल्यावर त्या दोन कम्यूनिस्ट देशांनी कोरियाकडे मोर्चा वळवला आणि त्या देशांना सलग असलेल्या कोरियाच्या उत्तर भागात जम बसवला.

कम्युनिझमच्या विस्ताराला कोणत्याही परिस्थितीत पायबंद घालण्याचा निर्धार करून अमेरिकेने दक्षिण कोरियाला सहाय्य करण्याच्या निमित्याने आपले सैन्य त्या देशात उतरवले. या प्रश्नाला जागतिक स्वरूप देऊन संयुक्त राष्ट्रसंघातर्फे इतर सदस्य राष्ट्रांच्या फौजा देखील तिथे उतरवण्यात आल्या. दोन्ही बाजूच्या सैन्यांमध्ये दीर्घकाळ युध्द चालले, पण त्यात यश मिळवून कम्युनिस्टांना कोरियाच्या बाहेर पिटाळून कोरियाचा संपूर्ण भाग मुक्त करणे अमेरिकेला कांही जमले नाही. या अनोळखी प्रदेशात येऊन लढण्यासाठी अमेरिकेचे सैनिकही विशेष उत्सुक नसायचे आणि त्या भागातल्या निसर्गाशी जुळवून घेणे त्यांना कठीण होते. अखेर तह करून एक सीमारेषा आंखली गेली आणि उत्तर कोरियामध्ये साम्यवादी आणि दक्षिण कोरियामध्ये अमेरिकाधार्जिणे लोकशाही सरकार अशी दोन राज्ये अस्तित्वात आली आणि आजवर ती तशीच आहेत. कालांतराने खुद्द रशियातली कम्यूनिस्ट राजवट संपुष्टात आली आणि कम्यूनिस्ट चीनबरोबरसुध्दा आता अमेरिकेचे सलोख्याचे संबंध स्थापन झाले असले तरी पिटुकला उत्तर कोरिया मात्र अजूनसुध्दा अमेरिकेला बेजार करतांना दिसतो.

या कोरियन युध्दात शहीद झालेल्या अनामिक सैनिकांचे एक वेगळ्या प्रकारचे स्मारक वॉशिंग्टन डीसी इथे उभारले आहे. हातात बंदुका घेऊन युध्दासाठी सज्ज असलेल्या अनेक सैनिकांचे पूर्णाकृती पुतळे एका मोकळ्या जागेत मांडून ठेवले आहेत. "एका माहीतसुध्दा नसलेल्या देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या हांकेला आमच्या देशाच्या ज्या सुपुत्रांनी आणि सुपुत्रींनी प्रतिसाद दिला त्यांच्या स्मृतीचा आमचा देश आदर करतो" अशा अर्थाचा संदेश ठळक अक्षरात कोरलेला एक चिरा सर्वात पुढच्या बाजूला जमीनीवर बसवला आहे. जगातल्या ज्या ज्या देशांच्या सैनिकांनी या लढाईत भाग घेतला त्या सर्वांची नांवे त्या स्मारकाच्या ठिकाणी जाण्यायेण्याच्या वाटेवर बाजूच्या भिंतींवर कोरून ठेवली आहेत.

अशाच प्रकारचे दुसरे एक तथाकथित स्वातंत्र्ययुध्द अमेरिकेच्या सैनिकांनी व्हिएटनाममध्ये केले. अमेरिकेने या युध्दात घेतलेल्या पवित्र्यावर त्या काळात मोठे वादळ उठले होते आणि जगातला कोणताच दुसरा देश या लढाईत प्रत्यक्ष सामील झाला नाही. अमेरिकन सैनिकांनी दक्षिण व्हिएटनाम व्यापून त्या भागात आपले कळसूत्री सरकार स्थापन केले खरे, पण ते लोकप्रिय होऊ शकले नाही आणि कम्युनिस्ट स्वातंत्र्यसैनिकांनी गनिमी काव्याचा वापर करून अत्यंत कडवा प्रतिकार केला. अनेक वर्षे चाललेल्या या संग्रामात अखेर अमेरिकाच जेरीला आली आणि तिने कांहीच साध्य न होता व्हिएटनाममधून काढता पाय घेतला. त्यानंतर उत्तर व्हिएटनामच्या सैन्याने दक्षिण व्हिएटनाम काबीज करून त्या दोन देशाचे एकीकरण केले. आता त्या देशात काय चालले आहे याची वास्तपुस्तसुध्दा कोणी करत नाही. या लढाईत बळी गेलेल्या सैनिकांचे स्मारक म्हणजे नुसताच एक लांबलचक उतार आहे आणि त्या भुयारासारख्या वाटणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर त्या युध्दात शहीद झालेल्या सैनिकांची नांवे लिहिली आहेत. कांही अमेरिकन लोक आपल्या दिवंगत आप्तेष्टांची नांवे शोधत त्या भागात फिरत असतात. आमच्या बसमधल्या कोणत्याच पर्यटकाला त्याच्याशी कांही देणे घेणे नव्हते किंवा त्या मृतात्म्यांबद्दल आदरभावही वाटत नव्हता. त्यामुळे आम्ही दुरूनच मागे फिरलो आणि पुढल्या ठिकाणाकडे चालले गेलो.

सारी स्मारके पाहून झाल्यानंतर आमची बस मॉलवर आली आणि आम्हाला त्या ठिकाणी घालवण्यासाठी दोन अडीच तासांचा वेळ दिला गेला. या अवधीत कॅपिटॉल बिल्डिंगपासून तिच्या समोर असलेल्या विस्तीर्ण जागेत पाहिजे तेवढे फिरून घ्यावे आणि जेवणखाण वगैरे आटोपून ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी परत यावे अशी सूचना दिली गेली. या रुंद हमरस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनेक वस्तुसंग्रहालये आहेत. ती सारी पहायची झाली तर निदान आठवडा तरी लागेल. त्यामुळे त्यातल्या एकाच म्यूजियमची निवड करून ते थोडे व्यवस्थितपणे पाहणे श्रेयस्कर होते. आधी आम्ही कॅपिटाल बिल्डिंग पहायला गेलो. अमेरिकेच्या केंद्रीय सरकारचा कारभार या इमारतीतून चालवला जातो. खुद्द राष्ट्रपतीचे कार्यालय याच इमारतीत आहे. अर्थातच आम्हाला त्या बिल्डिंगच्या जवळपास कोठेही जाण्याचा परवाना नव्हता. जेथपर्यंत जाणे शक्य होते तेथवर जाऊन दुरूनच त्या सुंदर इमारतीचे दर्शन घेतले, तिच्या आजूबाजूचा रम्य परिसर पाहून तो कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतला आणि मागे वळलो. आम्ही वॉशिंग्टन पहायला गेलो तोंपर्यंत अमेरिकेतल्या निवडणुका झाल्यासुध्दा नव्हत्या, पण भावी राष्ट्राध्यक्षाच्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या शपथविधीसाठी स्टेज वगैरे बांधण्याची तयारी चालली होती. पूर्वनियोजन किती असू शकते याची कमाल पहायला मिळाली.

. . . . . . . . . . (क्रमशः)

अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस - ५ - वॉशिंग्टन डीसी - ५ म्यूजियम


कॅपिटॉल हिल समोर असलेल्या मॉलच्या दोन्ही बाजूंना ओळीने एकाहून एक सुरेख संग्रहालये आहेत. आमच्याकडे फक्त दोन तासांचाच अवधी असल्यामुळे उगाच धांवाधांव नकरता एकादेच म्यूजियम शांतपणे पाहून घ्यावे असा सल्ला आम्हाला आधीच मिळाला होता. अमेरिकेचा इतिहास किंवा भूगोल यात आम्हाला फारसा रस नव्हता आणि तशा प्रकारच्या जागा यापूर्वीही पाहिलेल्या होत्या आणि पुढेही दिसणार होत्या. रेड इंडियन लोकांचे चित्रविचित्र वेष पहायला मजा आली असली तरी ते पहायचा मोह टाळला. अशा प्रकारे एक एक कटाप करत अखेर दोन संग्रहालये शॉर्टलिस्टमध्ये आली. त्यातले एक नॅचरल हिस्टरीचे होते आणि दुसरे एअरोस्पेसबद्दल होते. डायनोसारसच्या हाडांचा सांगाडा अॅटलांटाच्या विमानतळावरच ठेवलेला पाहिला होता. तशाच प्रकारचे आणखी सांगाडे आणि नामशेष किंवा दुर्मिळ झालेल्या पशुपक्ष्यांची चित्रे पाहण्यापेक्षा विमाने आणि उपग्रह पाहण्याचे आकर्षण जास्त ठरले. माझ्यासाठी तर हा आवडीचा विषय होता. या विषयावर ऐकीव आणि वाचलेल्या माहितीच्या आधारावर मी दोन विस्तृत लेखमाला या ब्लॉगवर लिहिल्या आहेत. त्यामुळे मी जोर लावला आणि सहप्रवाशांना माझ्या बाजूने वळवून घेतले.

वॉशिंग्टन डीसी येथील स्मिथ्सोनियन नॅशनल एअर एँड स्पेस म्यूजियमला दिलेली भेट खरोखरच अपेक्षेइतकीच अविस्मरणीय ठरली. प्रवेश द्वारातून आंत शिरतांनाच अनेक विमाने, अग्निबाण आणि उपग्रह छताला टांगून ठेवलेले दिसतात. स्वागतिकेकडे जाऊन त्या जागेचे मार्गदर्शन करणारी पुस्तिका घेतली आणि मोहिमेवर निघालो, आकाशात उडणारी विमाने आणि अंतरिक्षात झेप घेणारे अग्निबाण व उपग्रह यांसाठी दोन वेगवेगळे विभाग केले आहेत. विमानांच्या विभागात राइट बंधूंनी सन १९०३ साली उडवलेले पहिले विमान पहायला मिळाले. वैमानिकासाठी बंद हवेशीर केबिन सोडा, बसायला साधी खुर्चीसुध्दा नाही, विमानाच्या सांगाड्याला धरून कधी उभे तर कधी आडवे होत रहायचे आणि झोंबणारा वारा अंगावर घेत स्वतःचा तसेच अवाढव्य आकाराच्या विमानाचा तोल सावरायचा हे केवढे मोठे दिव्य असेल याची कल्पना आली आणि 'दोज मॅग्निफिसेंट मेन इन देअर फ्लाइंग मशीन्स' या सिमेनात दाखवलेल्या त्या महापुरुषांबद्दल मनात असलेला आदर अनेक पटीने वाढला. त्यांच्यातल्या विल्बर आणि ऑर्विल या बंधूंची नांवे तरी इतिहासात अजरामर झाली. इतर अनेकांची कथा तर 'नाही चिरा नाही पणती' अशातलीच आहे. त्या सर्वच अनामिक साहसी वीरांच्या आठवणीने माझे कर आपोआप जुळले.

राइट बंधूंच्या पहिल्या वहिल्या उड्डाणानंतर २४ वर्षांनंतर चार्लस लिंडबर्ग या वैमानिकाने ३३ तास सलगपणे उडाण करून न्यूयॉर्कपासून पॅरिसपर्यंतचे अंतर कापले आणि अॅटलांटिक महासागरावरून एका दमात विमान उडवून नेणारा तो पहिला वैमानिक ठरला. त्याचे विमानसुध्दा या भागात पहायला मिळाले. आधी प्रोपेलर आणि नंतर जेट इंजिनांमध्ये आणि ते इंजिन वापरून तयार केलेल्या विमानांच्या रचनेत कशी प्रगती होत गेली याची सुरस कथा चित्रे, फोटो, मॉडेल्स आणि प्रत्यक्ष कांही विमाने यांच्या आधाराने या ठिकाणी सुरेखपणे मांडली आहेत. एका आधुनिक विमानाचे कॉकपिट कांचेच्या बंद दरवाजामागे मांडून ठेवले होते. तिकडे एक साधा दृष्टीक्षेपसुध्दा न टाकता "आपल्याला त्या खुर्चीवर बसून स्वतःचा फोटो काढायला मिळत नाही तर काय उपयोग? नुसता त्याचा फोटो कशाला काढायचा?" असे म्हणणारे एक सद्गृहस्थ दिसले. हे गृहस्थ बहुधा फक्त दिसेल त्या जागेच्या पार्श्वभूमीवर आपले किंवा आपल्या पत्नीचे छायाचित्र काढून घेणे एवढ्याच उद्देशाने तिथे आले असावेत. मायदेशी गेल्यानंतर आपण परदेशात काय काय पाहिले हे इतरांना दाखवणे यात धन्यता मानणाऱ्यांपैकी ते असावेत. मी मात्र पहाण्यातच एवढा रंगून जात होतो की मला गळ्यातल्या कॅमेऱ्याची आठवणच रहात नव्हती.

मानवाने अंतराळात झेप घेऊन केलेल्या प्रगतीची कहाणी संग्रहालयाच्या दुसऱ्या विभागात उलगडून दाखवली होती. सुरुवातीच्या काळापासून तयार केलेली रॉकेट्स, सॅटेलाइट्स आणि भविष्यकाळातल्या योजना वगैरे सारे कांही थोडक्यात पहायला मिळाले. नील आर्मस्ट्राँग, एड्विन आल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स अपोलो ११ मोहिमेवर जाऊन ज्या कोलंबिया मॉड्यूलमधून पृथ्वीवर परत आले ते या ठिकणी ठेवले आहे. शिवाय अंतराळवीरांच्या पूर्णाकृती प्रतिकृती ठेवून जीवंत देखावा उभा केला आहे. इतर अनेक मोहिमांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. चंद्रावरून आणलेल्या दगडाचा एक तुकडा शोकेसमध्ये ठेवला असून त्याला स्पर्श करण्याची मुभा आहे. अंतराळवीरांचे स्पेससूट, अंतराळात गेल्यानंतर त्यांना देण्यात येणारे अन्नपदार्थ वगैरे अनेक मनोरंजक गोष्टी पहायला मिळतात. आमच्याकडे असलेला दोन तासांचा वेळसुध्दा हे म्यूजियम पहाण्यासाठी अपुराच होता, पण घड्याळाकडे पहात पहात कुठे थांबून तर कुठे न थांबता फेरफटका मारून घेतला आणि भोजनासाठी फूडमॉलकडे वललो.


. . . . . . . . . . (क्रमशः)

अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस - ६ फिलाडेल्फिया


वॉशिंग्टन डीसी मधली अनेक स्मारके पाहतांना अमेरिकेच्या स्वातंत्र्यसंग्रामापासून ते व्हिएटनाममधल्या लढाईपर्यंतच्या इतिहासाची झटपट उजळणी झाली. त्या वास्तूंच्या आजूबाजूला पसरलेली रम्य हिरवळ, फुलांचे ताटवे आणि निर्मळ पाण्याने तुडुंब भरलेले तलाव पाहतांना मन मोहून गेले आणि राइट बंधूंनी हवेत केलेल्या पहिल्या उड्डाणापासून ते मंगळ, गुरू आणि शनी या ग्रहांच्या दूरवरच्या यात्रेला निघालेल्या व्हॉयोजरच्या अंतरिक्षातल्या मोहिमेपर्यंत साध्य केलेल्या गगनभरारीचे सम्यक दर्शन घेतांना मन उचंबळून आले. हा सगळा अनुभव गाठीला मारून आम्ही परतीच्या प्रवासासाठी बसमध्ये येऊन बसलो. या सहलीला निघण्यापूर्वी जी स्थळे पहायला मिळण्याची अपेक्षा होती ती सगळी पाहून झाली होती. आता परत घरी जायचे वेध लागले होते. आपला पुढचा आणि अखेरचा स्टॉप आता फिलाडेल्फियाला असणार असल्याचे टूर गाईडने सांगितले, पण त्यावर कोणीच टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिकेतली जी कांही सात आठ शहरे मला ठाऊक होती त्यातलेच फिलाडेल्फिया हे एक असले तरी ते नांव मी कोणत्या संदर्भात वाचले किंवा ऐकले होते ते आठवत नव्हते. डायवरदादाला थोडा आराम मिळावा आणि पर्यटकांनाही चहा कॉफी घेऊन थोडी तरतरी आणता यावी आणि पाय मोकळे करायला मिळावेत एवढ्याचसाठी हा थांबा असावा अशी समजूत करून घेतली.

दिवसभर पायपीट करून शरीराला किंचित थकवा आला होता. त्यानंतर या ट्रिपमधले अखेरचे जेवण खातांना बिनधास्त होऊन त्यावर जरा जास्तच आडवा हात मारला गेला होता. त्यामुळे बहुतेक प्रवासी सुस्तावून पेंगुळले होते. बस हलायला लागताच सारे डुलक्या घेऊ लागले. अधून मधून जाग आल्यावर बाहेर शहरातल्या वातावरणाऐवजी कुठे कंट्रीसाइड तर कुठे नागरी वस्त्या दिसत असल्याचे जाणवत होते. खेड्यातल्या जुन्यापुराण्या चर्चेसचे खांब, कमानी व चौकोनी उंच शिखरे आणि आता लहान गांवातसुध्दा दिसणारे शीशमहलासारखे कांचबंद मॉल्स दुरून पाहण्यात फारसे नाविन्य उरले नव्हते. असेच कांही वेळ पुढे गेल्यानंतर एका मोठ्या शहराची स्कायलाइन दिसायला लागली. त्याला बाजूला टाकून बायपासने न जाता आमची बस त्या शहरात शिरली आणि एका जुनाट पण छान दिसणाच्या इमारतीसमोर असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन थांबली. आम्ही पेन्सिल्व्हानिया राज्यातल्या फिलाडेल्फियाला येऊन पोचलो असल्याचे जाहीर केले गेले. रस्ता ओलांडून पलीकडे असलेल्या इमारतीमधली लिबर्टी बेल जवळून आणि जवळच असलेला इंडिपेन्डन्स हॉल मात्र बाहेरूनच पाहून सर्वांनी तासाभरात परत यायचे आहे अशी सूचना झाली. दोन तीनशे वर्षांपूर्वी बनवलेली, त्यानंतर भंग पावलेली आणि आवाज न करणारी एक घंटा कोणी जिवापाड जतन करून ठेवली असेल याची मला पुसटशी कल्पनाही नव्हती आणि ती पहायला आपण सातासमुद्रापलीकडे जाऊ असे स्वप्नातसुध्दा वाटले नव्हते. त्यामुळे लिबर्टी बेल हे नांव ऐकून त्यातून कांही बोध झाला नाही. अशा प्रकारच्या सहलीत मार्गदर्शकाच्या सोबत घोळक्यात राहणे फायदेशीर असते म्हणून कांहीशा अनिच्छेनेच उठून आम्ही त्याच्या मागोमाग गेलो.

लिबर्टी बेल सेंटरमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूच्या भिंतींवर अनेक सचित्र फलक लावलेले पहायला मिळाले. या ऐतिहासिक घंटेची कुळकथा आणि गेल्या अडीचशे वर्षांचा इतिहास सांगणारी खूप माहिती त्यात दिली होती पण त्यातले एकेक पॅनेल वाचण्याइतका वेळ आमच्याकडे नव्हता. त्यांचे मथळे वाचून आणि चित्रे पाहून साधारण कल्पना आली. सन १७५१ साली फिलीच्या (फिलाडेल्फियाचे संक्षिप्त नांव) स्टेट हाउसच्या इमारतीवर बसवण्यासाठी ही घंटा मागवली गेली. इंग्लंडमधल्या एका फाउंड्रीमध्ये तयार होऊन ती अमेरिकेत आली. पुढे ती भंग पावली, तिची दुरुस्ती करण्यात आली होती, पण ती पुन्हा जास्तच भंगली आणि वाजेनाशी झाली. तिच्या जागी तिच्याच आकाराची दुसरी घंटा टांगण्यात आली आणि ही घंटा प्रदर्शनार्थ वस्तू बनली. तिच्या आधारे अनेक दंतकथा रचल्या गेल्या आणि तिला अमेरिकेच्या जनमानसात एक अभूतपूर्व स्थान प्राप्त झाले. या कथांना ऐतिहासिक पुरावा नाहीच, त्यांच्या सत्यतेबद्दल शंका सुध्दा घेतल्या जातात, असे असले तरी बहुतेक लोक त्या खऱ्या मानतात आणि ही घंटा हे सगळ्या समतावादी विचारसरणीचे एक प्रतीक बनले आहे.

युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, स्पेन वगैरे विविध देशातल्या लोकांचे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आगमन झाले आणि त्यांनी आपापल्या वसाहती स्थापन केल्या. आधी त्यांच्या आपापसात लढाया होत असत. अखेर इंग्लंडने सर्वांवर विजय मिळवून आपली सार्वभौम सत्ता स्थापन केली. त्यानंतर फिलाडेल्फिया शहराची भरभराट होऊन ते ब्रिटीश साम्राज्यातले लंडननंतर दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले. अर्थातच ते अमेरिकेतले सर्वात मोठे आणि महत्वाचे शहर झाले होते. अमेरिकेतल्या या पुढारलेल्या राज्यांचा विकास झाला त्याबरोबर तेथील लोकांच्या मनात स्वातंत्र्याची इच्छा जागृत झाली. स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश राजवटीबरोबर संघर्ष करून तेरा राज्यांनी ते मिळवले. त्यात पेन्सिल्व्हानिया हे एक प्रमुख होते. १७७४ साली फिलाडेल्फियाच्या स्टेट हाउसच्या इमारतीवरील ही घंटा वाजवून तिथल्या नागरिकांना एकत्र करण्यात आले आणि त्यांच्या समोर अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा वाचून दाखवण्यात आला. अशा रीतीने संपूर्ण जगाच्या इतिहासाला नवे वळण लावणाऱ्या घटनेची ही घंटा एक साक्षीदार आहे असे समजले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या इमारतीचे नांव बदलून इंडिपेन्डन्स हॉल असे ठेवण्यात आले, तसेच या घंटेचे लिबर्टी बेल असे नामकरण करण्यात आले. आज या दोन्ही ठिकाणांना तीर्थस्थानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पुढे झालेल्या यादवी युध्दाच्या काळात ही घंटा म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याबरोबरच जनतेच्या व्यक्तीस्वातंत्र्याचीही प्रतीक बनली. "उच्चनीच कांही नेणे भगवंत" अशी शिकवण आपल्या संतांनी पूर्वापारपासून दिलेली आहे, पण अमेरिकेत वर्णभेदाचे भयानक स्वरूप अस्तित्वात असतांना सर्व माणसे समान आहेत (ऑल मेन आर बॉर्न इक्वल) या विचाराचा पुरस्कार तिथल्या कांही उदारमतवादी थोर विचारवंत राजकीय नेत्यांनी केला आणि त्यासाठी भीषण संघर्ष केला. त्या काळात समतेचे प्रतीक म्हणून या घंटेची निवड केली गेली. त्याला पडलेला तडा हा कदाचित तत्कालीन भेदभावसुध्दा दर्शवीत असेल. या घंटेची देशभर मिरवणूक काढण्यात आली आणि त्या यात्रेतून समतेचा संदेश गांवोगांवी पोचवण्यात आला. हा सगळा इतिहास सोडला तर या घंटेत फारसे प्रेक्षणीय असे कांहीच दिसत नाही.

हॉल ऑफ इंडिपेन्डन्सच्या आंत जाऊन तो पाहण्यासाठी आमच्याकडे अवधी नव्हता आणि त्यासाठी लागणारी परवानगीही नव्हती. त्यामुळे ती ऐतिहासिक इमारत बाहेरूनच पाहून अडीचशे वर्षांपूर्वी अमेरिकेची संसद तिथे कशी भरत असेल याची कल्पना करून घेतली. त्या इमारतीच्या माथ्यावर बसवलेल्या लिबर्टी बेलच्या प्रतिकृतीचे दर्शन घेतले आणि परतीच्या प्रवासाला लागलो.


. . . . . . . . . . (क्रमशः)

अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस - ७ परतीचा प्रवास


फिलाडेल्फियामधली लिबर्टी बेल आणि हॉल ऑफ इंडिपेन्डन्सचे दर्शन घेऊन झाल्यानंतर बस सुटायला बराच वेळ बाकी होता. आरामात बसून चहा कॉफी घ्यायचा विचार केला तर ते देणारे सोयिस्कर असे हॉटेलच जवळपास सापडले नाही. रस्त्याच्या कडेला असलेल्या अमेरिकन पध्दतीच्या ठेल्यावर उभ्या उभ्या चहापान केले. बाजूच्या एका गल्लीत असलेले एक डिपार्टमेंडल स्टोअर महिला मंडळाने शोधून काढले आणि त्यात प्रवेश केला. तिथली एकेक वस्तू पाहतांना "हा आयटम तर आमच्या एलेला पंधरा डॉलरला मिळतो.", "मागच्या वर्षी आम्ही फ्रान्समधून अगदी असाच पीस आणला होता, ते यूरो फ्यूरो कांही लक्षात नाही बाई.", "आमच्या बंगलोरला आता असल्या सगळ्या वस्तू मिळतात, आणि त्या ही रुपयांत आणि स्वस्तात." असे शेरे मारले जात होते. त्याबरोबरच "आता हा प्रवास संपलाच आहे, तेंव्हा उरलेले पैसे थोडे फार उडवायला हरकत नाही" असा विचार करून एकेक वस्तू शॉपिंग बास्केटमध्ये टाकली जात होती. प्रवाशांना शोधत आमचा वाटाड्या तिथे आला आणि "च्यला च्यला" करायला लागला तेंव्हा वेळेचे भान आले आणि बास्केटमध्ये गोळा केलेल्या सटर फटर वस्तूंचे दाम चुकवून आम्ही बसमध्ये येऊन बसलो.

बसमधले सारे प्रवासी आल्या नंतर "आता सगळ्या प्रेक्षणीय जागा दाखवून झाल्या आहेत आणि आपण थेट न्यूयॉर्ककडे कूच करणार आहोत." अशी घोषणा करून आमचा गाईड लगेच पुढील कामाला लागला. हे काम त्याच्या फायद्याचे होते. बसमधील प्रवाशांनी दर डोई दर दिवशी सहा डॉलर टिप द्यायची असल्याचे त्याने सुरुवातीलाच सांगितले होते. बहुधा तशी लेखी सूचना सुध्दा ब्रोशरमध्ये केली असावी. "साहेब, माझे काम बघून खुषी द्या" असे म्हणत कितीही खुषी दिली तरी चेहऱ्यावर "बस एवढेच का?" असा आविर्भाव आणणे वगैरे कांही नव्हते. गाईडवर कोणी सुध्दा नाखुष नव्हते. त्याने मागितली नसती तरी सर्वांनी चांगली टिप त्याला दिली असतीच.

त्या चिनी माणसाचे नांव त्याने सांगितले होते, पण ते आता लक्षात नाही. आपण चँग असे समजू. हा चँग एक उमदा, चपळ आणि हंसतमुख युवक होता. अत्यंत आदबशीर वागणे व बोलणे, स्पष्ट आणि पुरेशी सविस्तर माहिती देणे, कोणीही कसलीही शंका विचारली तरी तिचे शांतपणे निरसन करणे, प्रवाशांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणे वगैरे गुणांनी त्याने सर्वांवर चांगली छाप टाकली होती. अधूनमधून वेळ मिळाला तर तो आमच्याशी थोडे अवांतर बोलतही असे. पहिल्याच दिवशी त्याने "च्यला च्यला" म्हंटल्यावर आश्चर्यचकित होऊन तो मराठी कुठे शिकला असे मी त्याला विचारले. त्यावर त्याने सांगितले, "मी तर चिनी लोकांना आमच्या भाषेतून बोलावतो आहे." चिनी आणि मराठी भाषेत कणभरही साम्य असेल असे मला कधी वाटले नव्हते. चँगला पाहतांना युरोपच्या सहलीवर आमच्यासोबत आलेल्या संदीपची आठवण येत होती. जगातल्या सर्व एअरलाइन्समधल्या बहुभाषिक एअर हॉस्टेसेस जशा एकाच पध्दतीच्या अनाउन्समेट एकाच टोनमध्ये करतांना दिसतात त्याचप्रमाणे हल्ली इंटरनॅशनल टूरिस्ट गाईड्सना सारखेच प्रशिक्षण मिळत असावे.

चार माणसांचे दर डोई अठरा प्रमाणे बहात्तर डॉलर देतांना मनातल्या मनात गुणिले पन्नास करून ते थोडे जड जात होते. पण मागल्या तीन दिवसात अनेक वेळा पन्नासाचा गुणाकार केला गेला असल्यामुळे त्या वाटण्याची धार जरा कमी झाली होती. चँगला तेवढी टिप द्यायला फारशी हरकत वाटली नाही. न्यूयॉर्कला गेल्यानंतर आम्ही कुठे आणि कसे जाणार आहोत याची चँगने चौकशी केली. आम्हाला पार्सीपेन्नीला जाण्यासाठी टॅक्सी पकडून आधी पोर्ट ऑथॉरिटीच्या बस स्टँडवर जायचे आहे हे समजल्यानंतर त्याने आपल्या एका मित्राला मोबाईलवर फोन करून त्याच्याशी तो कांही तरी हाँहाँहूँहूँ केले आणि आमची सोय करून दिली असल्याचे सांगितले. न्यूयॉर्कच्या चायना टाउनमध्ये पोचल्यावर तो आमच्या बरोबर बसमधून खाली उतरला आणि "तुम्ही इथेच थांबा, पांच मिनिटात अमूक नंबरची सिल्व्हर कलरची टोयोटा गाडी येईल आणि माझा मित्र तुम्हाला बसस्टॉपपर्यंत सुखरूपपणे पोचवून देईल" असे आश्वासन दिले. त्यानुसार लगेच ती गाडी आलीच.

ती गाडी अर्थातच न्यूयॉर्कची कॅब नव्हती. त्याला मीटर बीटर कांही नव्हते. बस स्टेशनवर पोचवण्याचे पंधरा डॉलर पडतील असे त्याने सांगितले. येतांना आम्हाला तेवढेच लागले होते. त्यामुळे ते योग्यच होते. शिवाय परदेशी पाहुणे पाहून टॅक्सीवाला उगाचच इकडे तिकडे फिरवून मीटर वाढवेल अशी भीती नव्हती. संध्याकाळची वेळ असल्यामुळे रस्ते मात्र वाहतुकीने तुडुंब भरून वहात होते. त्यातून पुढे जाण्यासाठी चालकांची अहमहमिका लागली होती. गेले तीन दिवस अमेरिकेच्या रस्त्यावरून बसमधून फिरतांना रस्त्यात जी लेन पाळण्याची शिस्त दिसत होती ती पाळणारे अमेरिकन हेच का असे प्रश्न पडावा इतका अनागोंदी कारभार न्यूयॉर्कच्या त्या गजबजलेल्या भागात दिसत होता. "पुण्याच्या गर्दीतून जो गाडी चालवू शकेल तो जगात कुठेही ड्रायव्हिंग करू शकेल" असे पुणेकर अभिमानाने सांगतात. पुरान्या दिल्लीतले रहिवासी त्यांच्या गांवाबद्दल तसेच म्हणतात. अहमदाबाद आणि बंगळूरूचे लोक गुजराती आणि कन्नडमध्ये तसेच सांगत असतील. न्यूयॉर्कमधल्या त्या चिनी ड्रायव्हरने न्यूयॉर्कच्या ट्रॅफिकबद्दल अगदी नेमके तसेच उद्गार काढलेले ऐकून गंमत वाटली.

पोर्ट ऑथॉरिटीला पोचल्यानंतर बसस्टँडकडे कसे जायचे, कोणत्या नंबरची बस घ्यायची वगैरेची रंगीत तालीम तीन दिवसांपूर्वी एकदा झाली होती. त्यातल्या कांही गोष्टी लक्षात राहिल्या होत्या. ते तुकडे एकत्र करून आणि तिथले मार्गदर्शक फलक पहात पहात बसस्टँडपाशी पोचलो. इथे आत प्रवेश करण्यापूर्वीच प्रवासाचे तिकीट काढायचे होते. त्यासाठी रेल्वे स्टेशनांवर असतात तसे एक स्वयंचलित यंत्र ठेवले होते. त्यावरची वेगवेगळी बटने दाबून झाल्यावर कार्ड की कॅश असा पर्याय आला. आम्ही अॅटलांटाहून निघतांनाच अडीचशे डॉलर्सची कार्डे विकत घेतली होती. त्याचा उपयोग करायचे ठरवून कार्डचा पर्याय निवडला. त्यानंतर क्रेडिट कार्ड की डेबिट कार्ड असा पर्याय आला. कार्ड पाहिले तर त्यावर असा कोणता शब्दच छापलेला नव्हता. भारतातल्या अनुभवाप्रमाणे क्रेडिट कार्डचे पैसे बिल आल्यानंतर भरायचे असतात. इथे आम्ही ते आधीच दिलेले होते. त्यामुळे ते डेबिट कार्ड असावे असे समजून तो पर्याय निवडून झाल्यानंतर सोळा आकड्यांचा नंबर टाईप केला आणि तिकीटे येण्याची वाट पाहिली. पण ती आलीच नाहीत.
"तुमचे कार्ड स्वीकारले जाऊ शकत नाही. क्षमा असावी." अशा अर्थाचा संदेश आला. तीन दिवस सगळीकडे सुरळीतपणे चालत असलेल्या कार्डाला आता काय धाड भरली असे म्हणत पुन्हा एकदा सगळी बटणे दाबून रोख रकमेचा पर्याय स्वीकारला आणि सुट्या सुट्या नोटा एक एक करून त्या स्लॉटमध्ये सरकवल्या. पुढचे मिनिट श्वास रोखून वाट पहात होतो. आता जर त्या यंत्राने तिकीटे दिली नाहीत तर पंचाईतच होती. शिवाय आमचे पैसे गिळंकृत करून तो स्वस्थ बसला तर? भारतातसुध्दा आता रेल्वे स्टेशनांवर यंत्रे आली आहेत, पण त्यांच्या आजूबाजूला रेल्वेचे कर्मचारी असतात. इथे अमेरिकेत सगळा निर्मनुष्य कारभार होता. यंत्रात बिघाड झाला किंवा त्याने अपेक्षेप्रमाणे काम दिले नाही तर ते कुणाला सांगणार?

सुदैवाने तसे कांही न होता, सरसर करत चार तिकीटे त्या यंत्रतून बाहेर आली. त्यांवर छापलेली गाडीची वेळ आणि ठिकाण वाटून हायसे वाटले. पण आणखी एक गोची होतीच. ज्या बसने आम्ही आलो होतो त्या कंपनीचे नांव तिकीटावर कुठेच नव्हते. बस चालवणारी कंपनी वेगळी आणि तिकीट देणारी वेगळी असे कामाचे विभाजन असेल असे समजून घेऊन पुढे सरकलो. आमच्याकडे दुसरा मार्ग नव्हताच.

पुढे गेल्यानंतर कॉरीडॉरमध्ये तीन चार रांगा होत्या आणि त्या मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत होत्या. "ही बस कंच्या गांवाला जाती वं? आणि पार्सिपेन्नीची बस हितच मिळेल का?" अशी चौकशी करून त्यातल्या एका रांगेत उभे राहिलो. पुढे गेल्यावर गेटवर ओळखीचा नंबर दिसला, पण तिथे उभी असलेली बस दुसरीकडेच जाणार असल्याचे समजले. थोड्याच वेळात आमची बसगाडी आली आणि बाजूच्या गेटवर उभी राहिली. डायवर कम कंडक्टरने येऊन प्रवाशांना रांगेने तिकडे नेले. या वेळी बसमध्ये गर्दी होती, पण आम्हा चौघांनाही जागा मिळाल्या. तिकीट देणारे यंत्र तेवढी काळजी घेत असावे. मात्र सीट नंबर दिलेले नसल्यामुळे वेगवेगळे बसावे लागले. आपला स्टॉप आल्यावर उठवा बर का असे एकमेकांना सांगत मिळतील ती आसने पकडली.

रस्त्यातल्या कांही खाणाखुणा लक्षात होत्या, कांही लिहून घेतल्या होत्या. त्यातल्या एका खुणेच्या ठिकाणावर येताच सौरभला फोन लावून आम्ही तिथपर्यंत आलो असल्याचे सांगितले. आमचा स्टॉप येण्यापूर्वीच्या थांब्यावर बस अर्धी अधिक रिकामी झाल्यामुळे आम्हाला एकमेकांना ते सांगणे सोपे झाले होते आणि आम्ही आपले सामानसुमान घेऊन सज्ज झालो. आम्हाला उतरवून घेण्यासाठी सौरभ हजरच होता. त्याच्याबरोबर घरी जाऊन पोहोचेपर्यंत गरमागरम जेवण तयार होते. भारतातून आलेल्या पाहुण्यांसाठी सुप्रियाने ठेवणीतल्या खास पाककृती केल्या होत्या. तीन दिवस आंतरराष्ट्रीय खाणे पिणे झाल्यानंतर मराठी पध्दतीचे सुग्रास जेवण किती छान लागले याचे वर्णन शब्दात करता येणार नाही.

. . . . . . . . . (समाप्त)

Sunday, November 22, 2009

स्पर्धा आणि यश

काय गंमत आहे? एकादी गोष्ट मिळावी म्हणून आपण जीवतोड प्रयत्न करतो आणि ती हाताला लागत नाही आणि दुसरी एकादी गोष्ट कांहीसुध्दा प्रयत्न न करता आयती आपल्याकडे चालत येते. या ब्लॉगच्या बाबतीत हा अनुभव मला वारंवार येत गेला.

चार वर्षांपूर्वी ब्लॉग या प्रकाराचे अस्तित्वच मला माहीत नव्हते. खरे सांगायचे तर ईमेलच्या पलीकडे मी इंटरनेटचा वापरच करत नव्हतो. त्या काळी ज्या प्रकारचा संगणक आणि आंतर्जालाची सुविधा माझ्याकडे होती त्यावर यापेक्षा अधिक कांही करणे अशक्य नसले तरी ते कटकटीचे वाटायचे. सेवानिवृत्त झाल्यानंतर विश्रांतीसाठी मुलाकडे गेलो तेंव्हा माझ्याकडे भरपूर मोकळा वेळ असायचा आणि त्याच्याकडला लॅपटॉप चोवीस तास इंटरनेटशी जोडलेला असायचा, त्याची स्पीडसुध्दा मी पूर्वी कधीही अनुभवली नव्हती इतकी चांगली होती. त्यामुळे मनमुराद सर्फिंग करायचा नाद लागला. आंतर्जालावर इकडे तिकडे भटकत असतांना ब्लॉगिंगचा शोध लागला आणि आपणही ते करावे असे वाटायला लागले. पण ते सगळे इंग्रजीत असायचे आणि फारच व्यक्तीगत स्वरूपाचे असल्यामुळे दहा वीस वाचल्यानंतर आणखी वाचावेसे वाटले नाही. पण आपण या सुविधेचा उपयोग कांही वेगळ्या प्रकारे करू शकू असे वाटले आणि धडपडत हा ब्लॉग कसाबसा सुरू करून दिला. त्यापूर्वी मराठीत ब्लॉग लिहिणारे आणखी कोणी आहेत याची मला कल्पनासुध्दा नव्हती आणि आपण लिहिलेले कोण वाचणार आहे हेही ठाऊक नव्हते.

सुरुवात करून झाल्यानंतर माझ्या ओळखीच्या जेवढ्या मराठीभाषिक लोकांचे ईमेल आयडी माझ्याकडे होते त्या सर्वांना मेल करून माझा हा प्रयत्न पहाण्याची विनंती केली. पण त्या काळात ज्या प्रकारचे काँप्यूटर त्या लोकांकडे होते त्यात देवनागरी अक्षरे दिसतच नव्हती. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी मी लिहिलेल्या लिखाणाचा फोटो काढून ती अक्षरे चित्राच्या स्वरूपात द्यायला सुरुवात केली. ते थोडे कष्टाचे काम होते, शिवाय रोज उठून काय लिहायचे हा एक गहन प्रश्न होता. त्यामुळे नव्याची नवलाई चार दिवस झाली की हे बंद पडणार असे वाटले होते. त्या कालखंडात कांही अनोळखी मित्रांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी लिखाण चालू ठेवले. रोज अवांतर कांहीतरी लिहिण्याऐवजी एक विषय निवडून सलगपणे त्यावर कांही दिवस लिहायचे ठरवल्यामुळे मजकूर मिळत गेला. पण त्याच काळात ब्लॉगस्पॉटवर कांही तांत्रिक अडचण आल्यामुळे एक वर्षानंतर हा ब्लॉग चक्क बंदच पडला, म्हणजे मलाच तो उघडता येईनासा झाला. तोपर्यंत मी दुसरीकडे बस्तान बसवले असल्यामुळे लिखाण करायला वाव मिळत राहिला आणि तिकडे भेट देणा-या वाचकांची गर्दी हळूहळू वाढत गेली.

एक वर्ष सुषुप्तावस्थेत काढल्यानंतर मागच्या वर्षी या ब्लॉगला पुन्हा चैतन्य प्राप्त झाले आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी याहू ३६० आपला गाशा गुंडाळणार असल्याच्या वावड्या उठल्या. मधल्या काळात माझा काँप्यूटर आणि इंटरनेटसेवा या दोघांनीही कांत टाकून नवा जन्म घेतल्यानंतर त्यांची शक्ती वाढली होती आणि गूगलने ब्लॉगस्पॉटवर ताबा घेतल्यानंतर त्याची कार्यक्षमता वाढलेली दिसत होती या सर्व कारणांमुळे मला हुरूप आला आणि या ब्लॉगची दुसरी पारी मी उत्साहाने सुरू केली. आपल्याला कोणाशी स्पर्धा करायची आहे असा विचारही माझ्या मनात आला नव्हता. माझी स्पर्धा स्वतःशीच होती. आपणच पूर्वीपेक्षा वेगळे आणि वाचनीय असे कांही देऊ शकतो का यासाठी मी प्रयत्नशील होतो. ते करत असतांना इतर लोक काय करत आहेत हे पहायलासुध्दा मला फारसा वेळ मिळाला नाही.

अशातच अचानक एकदा ब्लॉगमाझाची जाहिरात समोर आली आणि आपले नांव देणे सोपे वाटल्यामुळे देऊन टाकले. आपली निवड व्हावी अशी इच्छा मनात होतीच हे नाकारण्यात कांही अर्थ नाही. पण त्यासाठी वेगळे काय करावे हे माहीतही नव्हते आणि ते जाणून घेऊन तसे करायचा प्रयत्नही केला नाही. या ब्लॉगस्पर्धेमध्ये कोणतेही निकष दिलेले नव्हते, त्यामुळे त्याचा विचार करून काही वेगळे असे कोणीच लिहिले नव्हते. पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना
म्हणतात त्याप्रमाणे कोणाला खरी माहिती आवडते, तर कोणाला कल्पनाविलास, कोणाला विनोद भावतो तर कोणाला भावनाविवशता, कोणाला छायाचित्रे मोहवतात तर कोणी हौसेने व्यंगचित्रे काढतात, काही लोकांनी इतर अनेक महत्वाच्या ठिकाणांना भेट देण्याची सोय करून दिली असते, तर जगभरातल्या उत्तमोत्तम साहित्याची ओळख कोणी करून देतात. अशा विविध प्रकारांची तुलना करणे कठीण असते. परीक्षक महोदयांनी त्यांच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे त्यांना जे पसंत पडले त्या ब्लॉग्जची निवड केली आहे. त्यामुळे मिळालेल्या यशाने म्हणण्यापेक्षा कोणीतरी आपल्या प्रयत्नांची नोंद घेतली आहे या जाणीवेने मनापासून आनंद झाला.

ज्या लोकांनी माझे अभिनंदन केले आहे त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि या स्थळाला भेट देत रहावे अशी सर्व वाचकांना नम्र विनंती आहे. आपण लिहिलेले कोणी तरी वाचते आहे हे समजल्यामुळे जे समाधान मिळते ते मला शब्दात सांगता येणार नाही. ते मिळत रहावे एवढीच इच्छा !

----------------
माझ्या दुसऱ्या विषयावरील ब्लॉगवर आलेले हे प्रतिसाद या स्पर्धेशी निगडित असल्यामुळे खाली उद्धृत केले आहेत.

कांचन कराई said...
काका, स्टार माझ्याच्या ब्लॉग स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळाल्याबद्द्दल आपलं अभिनंदन!

भुंगा said...
स्टार माझ्याच्या ब्लॉग स्पर्धेत यश मिळाल्याबद्द्दल मन:पुर्वक – हार्दीक -अभिनंदन – शुभेच्छा!!

Friday, November 20, 2009

स्टार माझा स्पर्धा

स्टार माझाने घेतलेल्या स्पर्धेत या वेळी या ब्लॉगचा समावेश रिमार्केबल पार्टिसिपेशन या यादीत केला आहे. म्हणजे उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले आहे. त्याबद्दल मी मला ज्यांनी ज्यांनी प्रोत्साहन दिले त्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. स्टार माझाने घेतलेल्या या स्पर्धेसंबंधी व्यक्त केलेले विचार आणि विजेत्यांची यादी खाली दिली आहे.

ऑसम! ‘ब्लॉग माझा-०९’ स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद, आशय, मांडणी, कल्पकता यांनी समृद्ध ब्लॉग पाहून पहिली प्रतिक्रिया हीच होती....ऑसम! मराठीत...भयंकर सुंदर! मराठी ब्लॉगॉस्फिअर केवळ आहेच असं नाही, तर ते विस्तारतंय, समृद्ध होतंय आणि त्याची व्याप्ती महाराष्ट्रातपुरताच नाही तर, जगभर आहे. हेच या स्पर्धेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय.
मुंबई-पुणे, नगर, नागपूर ते बेंगलोर आणि यु.ए.ई ते यु.एस.ए अशा सर्व ठिकाणांहून या स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या. यात जसे नवखे ब्लॉगर आहेत, तसे मुरलेलेही. पंचविशी-तिशीचे आहेत, तसेच पासष्ठीचेही. अहो, मधुसुदन काळे यांचा www.sobati-vileparle.blogspot.com हा तर काही आजोबा मंडळींनी एकत्रितरित्या सुरू केलेला ब्लॉगही स्पर्धेसाठी आला. इतकंच काय, पण पोलिस, क्राईम यांना वाहिलेला, व्यंगचित्रांना वाहिलेला असेही ब्लॉग या स्पर्धेसाठी आले. म्हणजेच, मराठी ब्लॉगॉस्फिअर असं विविधतेनं नटलेलं आहे. व्यक्ती ते समष्टी सर्वांना सामावणारं असं हे ब्लॉग नावाचं माध्यम. मराठीच्या जागतिक पातळीवरील प्रसारासाठीही याचा मोठा उपयोग आहे. याचीच दखल घेऊन ‘स्टार माझा’नं ही खास मराठी ब्लॉगर्ससाठी ही स्पर्धा सुरू केली. यंदा या स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे. मागील वर्षी प्रमाणेच या वेळीही संगणक तज्ज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले यांनी ब्लॉग्जच्या परिक्षणाचं अवघड काम आनंदानं स्वीकारलं. त्यांनी निवडलेल्या पहिल्या तीन आणि उत्तेजनार्थ दहा ब्लॉगर्स आणि त्यांच्या ब्लॉग्जना आम्ही प्रसिद्ध करत आहोत. दोन्ही कॅटेगरीजमध्ये क्रम महत्वाचा नाही.

तीन उत्कृष्ट ब्लॉग्ज

अनिकेत समुद्र http://manatale.wordpress.com

नीरजा पटवर्धन http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com

दिपक शिंदे http://bhunga.blogspot.com

उत्तेजनार्थ ब्लॉग्ज

हरिप्रसाद भालेराव www.chhota-don.blogspot.com

देवदत्त गाणार http://maajhianudini.blogspot.com/

मेधा सकपाळ www.medhasakpal.wordpress.com

सलील चौधरी www.netbhet.com

प्रमोद देव http://purvaanubhava.blogspot.com/

राज कुमार जैन http://rajkiranjain.blogspot.com

मिनानाथ धसके http://minanath.blogspot.com

विजयसिंह होलाम http://policenama.blogspot.com

दिपक कुलकर्णी http://aschkaahitri.blogspot.com/

आनंद घारे http://anandghan.blogspot.com

सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन! आणि हो, ज्यांचे ब्लॉग्ज या स्पर्धेत निवडले जाऊ शकले नाहीत, त्यांनी प्लीज प्लीज प्लीज आपले ब्लॉगिंग व्रत सोडू नये. कारण, पुढच्या वर्षी पुन्हा आहेच ‘स्टार माझा’ची स्पर्धा...... ‘ब्लॉग माझा’!!

चांगभलं!

बाकीच्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि स्टार माझा, श्री अच्युत गोडबोले आणि श्री.प्रसन्न जोशी यांचे मनःपूर्वक आभार

Friday, November 06, 2009

स्वाक्षरी संदेश

आमच्या सखाराम गटण्याच्या खिशात नेहमी एक लहानशी वही असायची. त्याच्या शाळेत कोणताही साहित्यिक पाहुणा आला की त्याला गांठून आणि त्यांच्याकडून एक संदेश आणि स्वाक्षरी मिळवून तो आपल्या संग्रहात भर टाकत असे. एकदा भाईकाकांनी दिलेल्या एका संदेशामुळे त्याच्या जीवनाचे वारू थोडे भरकटले होते आणि त्यांनीच त्याला छानशी पुस्ती जोडल्यावर ते मार्गी लागले याची चित्तरकथा सगळ्या मिसळपाव प्रेमींना माहीत (कदाचित तोंडपाठसुध्दा) असेल. पुढे सखारामाच्या पोराबाळांच्या संसारात ती वही गहाळ झाल्याचे ऐकले आणि आपण अशी एक वही बाळगावी अशी मनातली सुप्त इच्छा उफाळून वर आली. पण आता मला शाळेत प्रवेश द्यायला कोणी तयार होईना आणि मी लुब्र्यासारखा शाळेच्या फाटकापाशी ताटकळत उभा राहिलो तरी आताची लेखकूमंडळी अमेरिकेपासून इंडोनेशियापर्यंत चहूबाजूला दूरवर पांगली असल्यामुळे त्यांना आमच्या गांवातल्या शाळेला भेट द्यायला जमेल असे वाटेना. म्हणून मीच त्यांच्या ई-अड्ड्यांना भेट देऊन कांही मिळते कां ते पहायचे ठरवले. मिसळपावाचे हॉटेल हा सध्याचा अतीशय गजबजलेला अड्डा असल्याचे कांनावर आल्यामुळे इथूनच सुरुवात केली. कांही स्वाक्षरीसंदेश दुसरीकडे मिळाले.


या अड्ड्यांवर येणारी थोडी मंडळी स्वतःच्या ख-या नांवाने वावरत असावीत. म्हणजे मी कांही त्यांची फोटो आयडेंटिटीज वगैरे पाहिलेली नाहीत, पण तशा प्रकारची नांवे कधीतरी वाचनात किंवा ऐकण्यात येतात. त्यातल्या दोन तीन लोकांना प्रत्यक्ष भेटण्याचा योगही आला आणि ती त्याच नांवांची खरीखुरी माणसे असल्य़ाची खात्री पटली. पण इतरांबद्दल तसे सांगता येणार नाही. कधीही न ऐकलेली अफलातून नांवे मुलांना ठेवायची रुढी आजकाल पडत असली तरी मिपाच्या कट्ट्यावर दिसणारी कांही नांवे आपल्या मुलांना ठेवायला कोणतेही सूज्ञ आईवडील धजावतील असे वाटत नाही. त्यामुळे त्या सदस्यांनी स्वतःच ते बुरखे पांघरलेले असावेत असे दिसते. कांही सदस्य एक बुरखा पांघरून लिहीत असले तरी अधून मधून त्यातून बाहेर येऊन आपल्या एकाद्या टोपणनांवाने प्रतिसाद देतांना दिसतात. त्यामुळे त्यांचे नांव पुन्हा गुलदस्त्यातच राहते.


तसे पहायला गेल्यास "नांवात काय आहे" असे चारशे वर्षांपूर्वी कोणी साहेब सांगून गेला आणि आजही बरेच लोक तेच वाक्य उच्चारत असतात या अर्थी त्यात कांही तथ्य असावे. त्यामुळे कुठल्या नावाने कोणी सही केली आहे इकडे फार लक्ष न देता त्यांनी स्वाक्षरीबरोबर दिलेले संदेश तेवढेच गोळा करायचा एक अल्पसा प्रयत्न मी केला आहे. यातले कांही लोक एका ओळीच्या चर्चाप्रस्तावावर पानभर लिहून खाली आपली संदेशपूर्ण सही करतात, तर कांहीजण पानभर लांबीच्या लेखाला "वाः", "मस्त", "जियो", "+१", "?", "!", "." असे गर्भित अर्थपूर्ण प्रतिसाद देऊन खाली दोन ओळींचा संदेश देतात. मी त्यांच्यात भेदाभेद केला नाही. संदेश गोळा करतांना वर लिहिलेला मजकूर सविस्तर वाचायला वेळ तरी कसा मिळणार म्हणा. माझ्या या संशोधनाला कोणी प्रायोजक न मिळाल्यामुळे मी आपल्या कुवतीनुसार फक्त एक लहानसा सँपलसर्व्हे केला आहे. ज्या सदस्यांचे महान संदेश यात आले नाहीत त्यांनी कृपया राग मानू नये. तसेच ज्यांचे संदेश मी घेतले आहेत त्यांनी सुध्दा मनात राग न आणता मी केलेल्या अडाणीपणाच्या टिप्पणीवर (वाटल्यास) हंसून घ्यावे अशी त्यांना नम्र विनंती आहे. हे संदेश मी संकेतस्थळावरून जसेच्या तसे उचलले असल्यामुळे त्यातल्या व्याकरणाच्या चुका कृपया कोणी काढू नयेत आणि योगायोगाने त्या सापडल्याच तर मूळ लेखकाने जाणूनबुजून, कळून सवरून त्या केलेल्या आहेत असे समजून घ्यावे.



न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

हे वाक्य मालकांनी स्वतःच दिले आहे. संत तुकारामाच्या अभंगातला धनसंपदा हा शब्द त्यांनी हुषारीने टाळून संतसंगाऐवजी मिसळसंगाची आवड व्यक्त केली आहे. अलीकडच्या काळात त्यांना कार्यबाहुल्यामुळे मिसळपावसाठी पुरेसा वेळ मिळत नाही असे वाचनात आल्यानंतर मुक्ती आणि संपदा आता ज्याला नकोशा वाटायला लागल्या आहेत असा हा मिसळसाथी सदाभाऊ कोण असावा असा एक विकृत प्रश्न कांही लोकांच्या मनात उठतो म्हणे.

जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।

ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

"Great Power Comes With Great Responsibilities"

A witty saying proves nothing.- Voltaire.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अशासारखी कांही वेचक (पण गुळगुळीत झालेली) सुभाषिते वाचायला मिळाली, मात्र वर लिहिलेला मूळ लेख आणि त्याला आलेले कांही प्रतिसाद पहाता मिसळीत शिरा मिसळून खात असल्यासारखे वाटले.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत.

कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

हे संदेश नक्कीच अंतर्मुख करणारे आहेत.

मिसळपावसंस्कृतीला साजेसे कांही संदेश आहेत. उदाहरणार्थ,

Drink Beer,
Save Water !!

यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.

माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !

(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

यासारखे कांही खोचक संदेश दिसले. त्यातल्या तिस-या संदेशाचे

काय सांगावे .....,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच ते ...,बाकी सगळे शून्य !!

असे रूपांतरही केलेले पाहिले.

एका संदेशकाने संदेश न देण्याचे कारण असे लिहिले आहे,

आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.

Since 1984

तर दुस-या एकाने

प्रतिसादाचे सर्व अधिकार राखीव आहेत.

असे म्हणून सरळ सरळ मुस्कटदाबी केली आहे.

कुणी निंदा,कुणी वंदा!

आम्ही जोपासतो

चाली लावण्याच्या छंदा!!

असा एक संदेश आहे. त्यांनी लावलेल्या सुश्राव्य चालींचे कांही दुवे ते देत असतात, पण आमच्याकडे इंटरनेटचे अनलिमिटेड पॅकेज नसल्यामुळे यूट्यूबवरील गाणी पहातांना वेगाने वाढत जाणा-या मेगाबाईट्सकडे लक्ष जाते.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

यातली भाषा आणि आशय दोन्ही नीटसे समजत नाहीत. सगळी संस्थाने कधीची खालसा झालेली असल्यामुळे आता श्री सुध्दा त्याची इच्छा असली तरी कोणालाही शिवाशिवीच्या खेळातलेच राज्य तेवढेच देऊ शकेल असे दिसते.

(महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)

ही बिहारीकरणाची चाहूल दिसते. भविष्यकाळात इथे खरोखरीच यूपीबिहारवाल्यांचे राज्यवा आवतवा झाले तर मराठीचा हा अवतार राजमान्य होईल. मर्दमराठे ती वेळ येऊ देणार नाही ही गोष्ट वेगळी.
पण समजा ती आली आणि उत्तरेकडून येणा-या रट्ट्यामुळे मराठ्यांना दक्षिणेकडे सरकावे लागले तर त्यांची भाषा कशी होईल याचे उदाहरण खाली पहाता येईल.

तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

नागपूरकडच्या एकाने असे लिहिले आहे

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

यातला टेकमधला श्लेष थोडा समजला, पण रामटेकबद्दल कांहीच माहिती नसल्यामुळे उत्तरार्ध पार डोक्यावरून गेला, तसेच मी कुठल्याच बालाजीचा भक्त किंवा फॅन नसल्यामुळे या संदेशाचा अर्थ लागला नाही
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

एकाने असे लिहून जॉनी रावतची आठवण करून दिली.

न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

या गांवढळ भाषेच्या बरोबर उलट गीर्वाणभाषेत एक संदेश की सूक्त असे कांहीतरी आहे

प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l

प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

आपल्या संस्कृतप्रेमी विदूषी सध्या मिपावर दिसत नसल्यामुळे त्याचा अर्थ कुणाला विचारावा ते समजत नाही.


कांही सदस्य आपले बोधवाक्य बदलत असतात. माझ्या संशोधनात असे एक उदाहरण माझ्या चटकन लक्षात आले.

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

असे मनसे व्यक्त केल्यानंतर त्यांनी देवाकडे असे मागणे मागितले,

देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

मूळ इंग्रजी भाषेतील करेज आणि सिरीनिटी या दोन्ही शब्दांऐवजी शक्ती हा एकच सर्वसमावेशक शब्द वापरल्याने त्या वाक्याचा अर्थ पूर्णांशाने व्यक्त होत नाही असे वाटते. देवाकडे हे मागणे मागण्याची वेळ त्यांनी उर्दूमध्ये अशी सांगितली.

कटी रात सारी मेरी मयकदेमें

खुदा याद आया सवेरे सवेरे!

मला त्यांच्या भाग्याचा हेवा वाटतो. एकाद्या रंगलेल्या पार्टीत हातात जाम आणि लडखडाते कदम अशा अवस्थेत असतांना आमच्यासमोर नेमका कपाळाला गंधाचा उभा टिळा लावलेला एकादा साहेब हातात लिंबूपाण्याचा ग्लास घेऊन दत्त म्हणून उभा रहायचा आणि "व्वॉट्ट हॅप्पन्ड्ड इन् येस्ट्टरड्डेज मीट्टिंग्ग?" असले कांही विचारायचा तेंव्हा त्या क्षणी मला सारे त्यत्तीस कोटी देव आठवायचे.

गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

हे त्यांचे बोधवाक्य ठळक अक्षरात लिहून समोर टांगून ठेवण्यासारखे आहे.

इतर कांही सदस्यांनीसुध्दा उर्दू शायरीचा आधार घेतलेला आहे, उदाहरणार्थ

"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,

बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?

शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

हे शेर तसे सरळसोपे दिसतात, पण यांचा जास्त सखोल अर्थ समजून घेण्याची इच्छा कोणाला असल्यास तर त्यासाठी सध्या आंतर्जालावर एक वेगळा धागा उपलब्ध आहे, त्याचा लाभ इच्छुकांनी घ्यावा.

कांही प्रतिसादक आपल्या ब्लॉगचा दुवा आपल्या सहीच्या खाली देतात. त्यामागे एक थोडासा इतिहास आहे. जुन्या सदस्यांना तो माहीत असेलच. मिसळपावची स्थापना व्हायच्या आधीपासून कांही मराठी ब्लॉग सुरू आहेत, कांही नंतर उघडले गेले. आपल्या ब्लॉगवर लिहिलेले किंवा दुस-या एकाद्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेले कांही निवडक लिखाण मिसळपाववर द्यायला सुरुवात झाली होती. पण "इतर जागेचे उष्टे खरकटे इथे कशाला आणता?" असा हल्ला झाल्यामुळे त्यातील कांहीजणांनी कानाला खडा लावला. त्यातले कांही लोक वाचकांच्या माहितीसाठी आपला पत्ता आपल्या सहीच्यासोबत देऊ लागले. इतरांनी त्याचे अनुकरण केले. ही माहिती देण्यातसुध्दा प्रत्येकाने आपापले वेगळेपण कसे दाखवले आहे ते पहा.

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.

यातल्या शेवटच्या वाक्याचे असे विडंबनसुध्दा झाले आहे,

माझ्या या जागी चार ओळी रखडल्या आहेत, जमल्यास काढुन पहाव्यात.

अशी ही संदेशगाथा थोडक्यात दिली आहे.

Monday, November 02, 2009

आयुधे, औजारे आणि यंत्रे - (भाग १ -४)

हा लेख आधी चार भागांमध्ये प्रकाशित केला होता. आता तो एकत्र करून आणि थोडे संपादन करून पुनर्प्रकाशित केला आहे दि.१० डिसेंबर २०१८

आयुधे, औजारे आणि यंत्रे - (भाग १)


आदिमानवाने जेंव्हा पहिल्यांदा हातात एक दांडके धरून त्याने जोराचा दणका दिला असेल, तेंव्हा त्यातून दोन गोष्टी साध्य झाल्या. फक्त आपल्या हाताने तो जेवढ्या जोराने प्रहार करू शकला असता त्यापेक्षा जास्त परिणामकारक तडाखा त्याने दिला आणि दुसरी म्हणजे त्याचा हात जेथपर्यंत पोचू शकला असता त्याच्या पलीकडे त्याचा मारा पोचला. अशा दोन प्रकारांनी त्याची क्षमता वाढली. हिंस्र पशूपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी किंवा दुबळ्या प्राण्याला मारून त्याचे भक्षण करण्यासाठी त्याने हा वार केला असला तर ते त्याचे आयुध झाले आणि झाडाचे फळ तोडण्यासाठी किंवा काटेरी झुडुप बाजूला करण्यासाठी असेल तर ते त्याचे औजार झाले. क्षमतेपेक्षा जास्त परिणाम साधणे हाच या दोन्हीमागील मुख्य उद्देश असतो. ज्या कामासाठी संपूर्ण क्षमतेचा उपयोग करण्याची गरज नसते ती करतांना आयुधे आणि औजारांच्या वापराने आपले काम सोपे होते. या दोन्हीमधला हा अन्यौन्य संबंध अनादिकालापासून चालत आला आहे.

इतर प्राण्यांच्या मानाने मनुष्यप्राणी अधिक बुध्दीमान असल्यामुळे निरीक्षण, परीक्षण, आकलन वगैरेंद्वारे तो नव्या गोष्टी शिकत गेला आणि नवे प्रयोग करून आपली क्षमता वाढवत गेला. हातातले दांडके कठीण आणि बळकट असेल आणि त्याचे टोक अणकुचीदार किंवा धारदार असेल तर ते जास्त परिणामकारक ठरेल, ते फेकून मारले तर त्याचा मारा कांही अंतरावर असलेल्या लक्ष्यापर्यंत जाऊ शकेल वगैरे गोष्टींचा विचार करून तो वेगवेगळ्या प्रकारच्या आयुधांच्या सुधारित आवृत्या काढत गेला. इतर प्राणी मात्र निसर्गदत्त नखे, शिंगे, सुळे वगैरेंचाच उपयोग करीत राहिले. त्यामुळे त्यांना नामोहरम करणे माणसाला अधिकाधिक सोपे होत गेले, हिंस्र पशूंची भीती कमी झाली. गाय, बैल, घोडा आदि कांही पशूंना तर त्याने वेसण घातले आणि कधी त्यांच्या पाठीवर चाबकाचे फटकारे मारून तर कधी मायेचा हात फिरवून व प्रेमाने खायला चारा देऊन त्यांना आपल्या सेवेला जुंपले. सुरुवातीच्या काळात निसर्गात आपोआप वाढलेल्या अरण्यात अन्न शोधत फिरत असतांनाच माणसाने निरनिराळ्या वनस्पतींचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यातल्या आपल्या उपयोगाच्या वनस्पतींची मुद्दाम लागवड करून त्यापासून धान्य, भाजीपाला, फळफळावळ वगैरेंची पैदास करायला सुरुवात केली. अशा प्रकारे त्याचे जीवन इतर पशूंपेक्षा खूप वेगळे झाले. ते करण्यासाठी आयुधांची तसेच औजारांची निर्मिती करून तो त्यांचा उपयोग करत गेला.

आदिमानवाने हातात मिळालेल्या दांडक्याचा तडाखा दुसऱ्या माणसालाही मारलाच असणार. पण तोसुध्दा बुध्दीमान असल्यामुळे त्याने जास्त चांगले दांडके हातात घेऊन प्रतिकार केला असणार. अशा प्रकारे माणसामाणसांमधील शस्त्रस्पर्धा आदिमानवाच्या काळापासून सुरू झाली आणि अजून ती चाललेलीच आहे. माणसाची जसजशी प्रगती होत गेली तसतसा त्याच्या हातातील आयुधांच्या रूपात फरक पडत गेला. अग्नी कसा पेटवायचा, कसा प्रज्वलित ठेवायचा आणि कसा विझवायचा हे आत्मसात केल्यानंतर आणि त्यात कशाकशाची आहुती घालता येते याचे ज्ञान झाल्यानंतर त्याचा उपयोग करून पूर्वी अशक्य असलेली अनेक कामे तो करू लागला. खनिज पदार्थांपासून विविध धातू, मुख्यतः लोखंड आणि त्यापासून पोलाद तयार करण्याच्या कलेने त्याच्या जीवनात प्रचंड फरक पडला. त्यापासून तलवार, कट्यार, खंजीर यासारखी आयुधे तयार करता आली आणि त्याचे कणखर टोक अग्रभागी बसवल्यामुळे बाण आणि भाला यांची मारक शक्ती अपरंपार वाढली. त्याचप्रमाणे लाकूड तोडण्यासाठी कुऱ्हाड, जमीन खणण्यासाठी कुदळ व पहार, दगडमातीचा ढिगारा उपसण्यासाठी फावडे, ती वाहून नेण्यासाठी पाटी, स्वयंपाक करण्यासाठी तवा, परात, कढई वगैरे असंख्य आयुधे, औजारे व उपकरणे त्यापासून तयार करता येऊ लागली. प्राचीन इतिहासकाळाच्याही आधी या प्रकारच्या अनेक गोष्टी माणसाच्या वापरात आल्या होत्या. इतिहासातात नोंदल्या गेलेल्या सर्व लढाया अशा आयुधांचा उपयोग करूनच लढल्या गेल्या होत्या. ही आयुधे तयार करण्यासाठी विविध प्रकारची औजारे त्या काळात उपलब्ध झालेली असणारच. या दोन्हींचा विकास एकमेकांच्या बरोबरीने होत राहिला.

लोखंड तयार करण्याचे काम घरोघरी करता येत नाही. लोखंडाचे खनिज सगळीकडे सापडत नाही. ते अत्यंत उच्च तपमानापर्यंत तापवण्याचे काम घरातल्या चुलीत होऊ शकत नाही. ते खास प्रकारच्या भट्टीतच करावे लागते. त्यानंतर वितळलेल्या लोखंडाचा अती ऊष्ण रस साच्यात ओतायचे काम साध्या हाताने किंवा लाकडाच्या औजाराने करणे शक्य नसते. त्यासाठी खास प्रकारची साधनसामुग्री लागते. ती आधी तयार व्हायला हवी. प्राचीन काळात कुठल्याच प्रकारची स्वचालित यंत्रसामुग्री अस्तित्वात नसल्यामुळे सारी कामे माणसांच्या हातातले बळ आणि त्यांची सहनशक्ती यांच्या मर्यादेत राहूनच करावी लागत. त्यामुळे कांही थोड्या ठिकाणीच अल्प प्रमाणात लोखंड तयार केले जात असे आणि व्यापाराद्वारे ते इतरत्र पोचत असे. लोखंडाच्या गोळ्याला तो मऊ होण्याइतपत तापवून ऐरणीवर ठेवणे आणि घणाच्या घावाने त्याला हवा तसा आकार देणे ही कामे तुलनेने सोपी आणि अनेक ठिकाणी करता येण्याजोगी असल्यामुळे लोहारकाम मात्र गांवोगांवी होऊ लागले आणि त्यातून शस्त्रे आणि औजारे तयार होऊ लागली. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात कोठल्याही धातूचा उपयोग आजच्या मानाने कमीच असे. घरोघरी मातीच्या चुली तर असतच, पण मातीचीच गाडगी, मडकी असत. श्रीमंत लोकांकडे रांजण असतील. धान्यधुन्य ठेवण्यासाठी दगडामातीपासून बांधलेली कोठारे, हौद किंवा पेवे असत.

.. . . . . . . . . .(क्रमशः)

----------------------------------------------------

आयुधे, औजारे आणि यंत्रे - भाग -२

शस्त्र चालवण्यातली निपुणता, बाहूबल, मनाचा खंबीरपणा, जिद्द, समयसूचकता वगैरे अनेक वैयक्तिक गुणांचा युध्दात विजय संपादन करण्यात मोठा वाटा असतो हे जरी खरे असले तरी सैनिकाच्या हातात चांगले शस्त्र आले तर या सगळ्या गुणांचा परिणाम कांही पटींनी वाढतो. ज्या सैन्याकडे उच्च दर्जाची शस्त्रे होती, त्यांचीच युध्दात सरशी होत गेली असे इतिहासात बहुतेक वेळा घडले आहे. त्यामुळे सर्व शासनकर्त्यांना आपले सैन्य अत्याधुनिक शस्त्रास्त्राने सुसज्य ठेवणे आवश्यक असे. ज्यांनी तिकडे दुर्लक्ष करून विलासोपभोगाकडे अधिक लक्ष दिले त्यांची अधोगती होत गेली, कांहींची तर दुर्गती झाली.

माणसाने अग्नीवर नियंत्रण मिळवल्यानंतर त्याचा उपयोग प्रत्यक्ष संहार करण्यासाठी सुध्दा केला जाऊ लागला. सर्वसामान्य माणसाकडे लाकूड, कापूस, खाद्य तेल यासारखे जे ज्वलनशील पदार्थ असत त्यांचा संहारक उपयोग विरोधकांच्या घराला किंवा साठ्याला आग लावण्यापुरताच मर्यादित असे. अशा वस्तू युध्दभूमीवर वाहून नेण्यात विशेष फायदा नव्हता. पण कांही अत्यंत ज्वालाग्राही पदार्थांचा शोध लागल्यानंतर त्यांचा उपयोग लढाईसाठी होऊ लागला. शत्रूच्या खेम्याला आग लावणे, त्याच्या सैन्यातील जनावरांना बिथरवणे, त्याची शस्त्रास्त्रे उध्वस्त करणे, त्याच्या तटबंदीला सुरुंग लावून त्यात खिंडार पाडणे अशासारखी कामे करता येऊ लागली. एकाद्या नळीमध्ये हा स्फोट घडवून आणला तर त्यातून एकादे अस्त्र दूर भिरकावता येईल अशी कल्पना कुणाला सुचली असली तरी अशी भक्कम नळकांडी कुठून आणायची हा प्रश्न होता. निसर्गात उपलब्ध असलेली वेळूची नळी वापरली तर मोठ्या स्फोटामुळे तिच्या जागच्या जागीच ठिकऱ्या होऊन गेल्या असत्या. मात्र अशा छोट्याशा नळीत थोडीशी दारू भरून ती बाणाच्या टोकाशी ठेऊन ते बाण शत्रूवर सोडायचे प्रयोग चीनमध्ये झाले. लक्ष्यावर जाऊन आपटल्यावर ती दारू पेट घेत असे किंवा धनुष्यातून सोडल्यावर जळत जळत पुढे जात असे. त्याला एक प्रकारचे अग्नीअस्त्र म्हणता येईल.

माणसाला प्राचीन कालखंडातच चाकाचे महत्व समजले. लाकडापासून बनवलेल्या चाकांच्या आधारावर उभे असलेले गाडे त्याने बनवले आणि बैल, रेडे, घोडे, उंट यासारख्या पशूंच्या बलाचा वापर करून त्यावरून वाहतूक सुरू केली. अशाच तत्वावर बांधलेल्या रथात बसून राजे महाराजे युध्दभूमीवर आपल्या सैन्याचे नेतृत्व करू लागले. पराक्रमी वीरांना अतीरथी, महारथी यासारखी बिरुदे देत असत. औजारे बनवण्याच्या कामात चाकाचा चांगलाच उपयोग झाला. कुंभाराचे लाकडाचे चाक, विहिरीतून पाणी उपसण्याचा रहाट ही कांही उदाहरणे झाली. पण ती चाके तयार करण्यासाठी सुताराने चाकावर फिरणाऱ्या यंत्रांचाच उपयोग केला असणार. लेथ या प्रकारच्या यंत्रात लाकडाच्या ठोकळ्याला गोलाकार देता येतो आणि ड्रिल या प्रकारच्या यंत्राने त्यात गोल आकाराचे भोक पडते. त्या भोकात वर्तुळाकार दांडा बसवता येतो. या दोन प्रकारच्या यंत्रांचा उपयोग करून वेगवेगळ्या आकाराची आधी लाकडाची आणि नंतर लोखंडासह निरनिराळ्या धातूंची चाके आणि गोल आकाराचे दांडे यासारखे सिलिंडर तयार होऊ लागले.

पूर्वीच्या काळात ही यंत्रे माणसांनी हातानेच फिरवावी लागत हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे किती मोठ्या आकारमानाची व वजनाची वस्तू त्यातून निर्माण करता येईल यावर मर्यादा येत असे. एक मोठे चाक आणि एक लहान चाक पट्ट्याने एकमेकांना जोडून या मर्यादा वाढवण्याचे तंत्र तयार झाले. दाते असलेली चाके (गियरव्हील्स) तयार करून ती थेट एकमेकांना जोडली जाऊ लागल्यावर त्यांची मालिका करता येणे शक्य झाले. त्यांचा उपयोग करून एकादे लहान चक्र खूप वेगात फिरवणे तसेच अवाढव्य आकाराचे चक्रदेखील हाताच्या जोराने (हळूहळू) फिरवणे या दोन्ही गोष्टी साध्य करता आल्या. चाकाला विशिष्ट प्रकारचा दांडा जोडून चाक फिरवताच तो दांडा पुढे मागे किंवा वरखाली सरकवता येऊ लागला किंवा दांड्याला सरळ रेषेत गती देऊन त्याला जोडलेले चक्र गोल फिरवणे शक्य झाले. अशा अनेक प्रकारच्या सुधारणा होत होत औजारांच्या जोडीला यंत्रे आली. यंत्रांच्या सहाय्याने लोखंडाला अनेक प्रकारचे आकार देता येणे शक्य झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांची रचना करणे शक्य झाले. शेती, विणकाम, सुतारकाम, लोहारकाम वगैरे अनंत व्यवसायात लागणारी औजारे तयार करण्याचे काम सोपे झाले. या यंत्रांचा उपयोग आयुधे तयार करण्यासाठी प्रामुख्याने होऊ लागला. त्यातून चाकू, सुऱ्या, कात्र्या वगैरे बनू लागल्याच, पण कट्यारी आणि तलवारींना आकार देणे, त्यांना धार लावणे वगैरे कामे मोठ्या प्रमाणावर करता येऊ लागली. शस्त्रांचे कारखाने उभे राहिले.
. . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)
------------------------------------------------------

आयुधे, औजारे आणि यंत्रे - भाग - ३

धातूंपासून नळ्या तयार करता येऊ लागल्यावर लहानमोठ्या आकाराच्या तोफा तयार करण्यात यश मिळाले. अवजड तोफा वाहून नेण्यासाठी त्यांना गाड्यावर ठेवले जात असे किंवा चाके जोडली जात आणि जनावरांना जुंपून त्या ओढून नेल्या जात. तोफेच्या नळकांड्यात दारू ठासून भरत आणि त्याच्या पुढे दगडाचा किंवा लोखंडाचा गोळा ठेवला जाई. दारूच्या आतपर्यंत जाणारी एक कापसाची वात असे. ती पेटवली की जळत जळत तिची ज्वाला दारूपर्यंत पोचे आणि तिचा क्षणार्धात स्फोट होऊन त्या ज्वलनातून खूप वायू निर्माण होत. ते वायू मर्यादित जागेत कोंडले गेल्याने त्याचा दाब वाढत जाई आणि त्या दाबाच्या प्रभावाखाली तो गोळा वेगाने बाहेर फेकला जात असे. नळीतून जातांना मिळालेल्या दिशेने दूरवर जाऊन तो खाली पडत असे. आभाळातून अचानक आलेल्या या यमदूताचा प्रतिकार करणे शत्रूला शक्यच नसल्यामुळे त्याची दाणादाण उडत असे. शत्रूसैन्यावर दुरून मारा करण्यात तोफ अतीशय परिणामकारक असली तरी ती धनुष्यबाणाची जागा घेऊ शकत नव्हती. ती अवजड असल्यामुळे वेगाने वाहून नेता येत नसे आणि घनदाट जंगलात किंवा डोंगराळ भागात नेणे तर कठीणच असे. शिवाय एक बार उडाला की दुसरा बार भरायला वेळ लागत असे. त्यामुळे हातघाईच्या लढाईत तिची अडचणच होत असे. लहान आकाराच्या नळ्यांचा उपयोग करून हँडगन्स, बंदुका आणि पिस्तुलांची निर्मिती करण्यात आली. ही शस्त्रे आणि त्यांसाठी लागणारा दारूगोळा सैनिक आपल्या सोबत घेऊन जाऊ शकत. मोठ्या तोफांचा उपयोग खास कामांसाठी केला जाऊ लागला. युध्द चालले नसतांना फुरसतीच्या काळात या तोफा किल्ल्यांच्या तटबंदीच्या आड आणि बुरुजांवर नेऊन ठेवल्या जात. चालून येणाऱ्या शत्रूसैन्यावर दुरून गोळाफेक करून त्यांची वासलात लावली जात असे. तसेच किल्ल्याला वेढा घालून बसल्यावर त्याच्या लाकडी दरवाज्याला किंवा विटांच्या तटबंदीला तोफेच्या सहाय्याने खिंडार पाडून आंत प्रवेश मिळवला जात असे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होत राहिले. तोफेसारख्या लांब नळीतूनच वेगाने गोळा सोडण्याएवजी एक दट्ट्या हळूहळू पुढेमागे ढकलणे, त्याला दांड्याद्वारे चक्राला जोडणे, पाणी उकळून त्याची वाफ करणे, ती मजबूत पात्रात साठवणे, पाइपातून दुसरीकडे नेणे, तिच्या दाबावर आणि प्रवाहावर झडपांद्वारे नियंत्रण ठेवणे अशा निरनिराळ्या क्षेत्रातील प्रयोगातून मिळालेल्या माहितीची एकमेकींशी सांगड घालण्याचे प्रयत्न होत होते. अशा प्रयत्नांमधून वाफेच्या दाबाने सिलिंडरमधून पिस्टनला आतबाहेर ढकलून त्याला जोडलेले चाक फिरवण्यात यश मिळाले. त्या यंत्राची रचना अशी केलेली होती की एकदा हे इंजिन सुरू केले की जोपर्यंत बॉयलरमध्ये वाफ तयार होत राही तोपर्यंत तो पिस्टन सतत आतबाहेर करत राही आणि त्याला एका दांड्याने जोडलेले चक्र सतत फिरत राही. हे सगळे आज सोपे वाटत असले तरी त्यासाठी निरनिराळ्या आकारांच्या भागांची कल्पना करून त्याबरहुकूम त्यांची निर्मिती कार्यशाळेत करता येणे आवश्यक होते. यंत्रांच्या विकासाने एवढी मजल मारल्यानंतरच ते शक्य झाले. वाफेचे इंजिन बनवल्यानंतर त्याच्या रूपाने ऊर्जेचा एक नवा अखंड स्रोत सापडला. त्यापूर्वी अग्नीचा उपयोग फक्त ऊष्णता निर्माण करण्यासाठी होत असे. आता अग्नीच्या शक्तीवर चाके फिरू लागली. वाहत्या वाऱ्यावर फिरणाऱ्या पवनचक्क्या आणि पाण्याच्या प्रवाहाने फिरणारी जलचक्रे त्याआधी निघाली होती, पण अग्नीवर चालणारे इंजिन सोयिस्कर जागी ठेवणे आणि केंव्हाही हवा तितका वेळ चालवणे शक्य असल्यामुळे ते जास्त सोयीचे होते.

यंत्रांची चाके फिरवण्याचे काम हाताने करणाऱ्याच्या शक्तीला मर्यादा असत, तसेच तो माणूस थोड्या वेळात थकून जात असे. घोडे किंवा बैल यांच्या शक्तीचा उपयोग मुख्यतः गाडा ओढण्यापुरताच होत असे. उसाचा चरक, तेलाची घाणी यासारखी कांही थोडी यंत्रेच जनावरांकडून फिरवली जात असत. वाहता वारा, पाण्याचा प्रवाह वगैरेंच्या सहाय्याने चाक फिरवणे कांही थोड्या जागी कांही विशिष्ट परिस्थितीतच शक्य असल्यामुळे अशा यंत्रांचा उपयोग मर्यादित होता. पण वाफेच्या इंजिनाने या सगळ्या मर्यादा पार केल्या. जितक्या मोठ्या आकाराचे इंजिन तयार करता येतील, जितक्या प्रमाणात वाफ निर्माण करून तिचा दाब वाढवत नेता येईल आणि जितक्या वेगाने झडपांची उघडझाप करता येईल तितकी जास्त शक्ती त्या इंजिनात असेल. या सगळ्या बाबीत सुधारणा करत जाऊन अधिकाधिक जास्त अश्वशक्ती असलेली इंजिने तयार होऊ लागली. पूर्वी जितकी यांत्रिक कामे माणसांच्या बाहुबलाने होत असत ती इंजिनाच्या ताकतीवर अनेकपट जोमाने आणि वेगाने होऊ लागली. त्यामुळे अधिकाधिक सक्षम यंत्रे विकसित होत गेली. रुळावरून धांवणारी रेल्वेगाडी, पाण्यात चालणारी जहाजे, कापड विणण्याचे माग, खाणीतून खनिजांचे उत्खनन करून ते जमीनीवर आणण्याची यंत्रणा, त्यापासून धातू बनवण्याचे काम करणाऱ्या भट्ट्या आणि त्याला आकार देणारी यंत्रे अशी असंख्य उदाहरणे देता येतील. या सर्वांचा उपयोग करण्यात शस्त्रनिर्मितीला अग्रक्रम मिळाला. तोफा, बंदुका वगैरेंचे कारखाने धडधडू लागले तसेच त्यांच्या गुणवत्तेत सतत वाढ होत राहिली. युरोपमधील देशांनी या बाबतीत आघाडी मारल्यामुळे ते देश शस्त्रसज्ज झाले आणि त्याच्या जोरावर त्यांनी जगभर आपली साम्राज्ये स्थापन केली.
. . . ...... . . . . . . . (क्रमशः)
-------------------------------------------

आयुधे, औजारे आणि यंत्रे - भाग - ४

यंत्रयुग सुरू झाल्यावर यंत्रांचा विकास प्रचंड वेगाने होत गेला. त्यांच्या सहाय्याने जमीनीतून पेट्रोलियम तेल काढण्याला सुरुवात केल्यानंतर वाफेच्या अवजड इंजिनांच्या जागी तेलावर चालणारी सुटसुटीत इंजिने आली. त्यामुळे अधिक कारखाने सुरू झाले, रस्त्यावर मोटारी धांवायला लागल्या आणि आकाशात विमाने उडू लागली. वीजनिर्मिती आणि पुरवठा करणे शक्य झाल्यानंतर विजेवर चालणारी जास्तच सोयिस्कर यंत्रे घराघरात तसेच कारखान्यात आली. अधिकाधिक कणखऱ आणि बळकट अशा मिश्रधातूंचे उत्पादन, त्यांना ठोकून, लाटून, कापून आणि घासून हवा तसा आकार देणे, अशा विशिष्ट आकारांच्या तुकड्यांची जोडणी करून गुंतागुंतीची अवजड यंत्रे तयार करणे शक्य झाले. या सर्वांचा परिणाम अधिकाधिक प्रभावी शस्त्रास्त्रे तयार होण्यावर झालाच. अवजड तोफांच्या जागी वेगवान रणगाडे आले तसेच त्यांना निकामी करणारे बाँब आले. आगबोटींना बुडवण्यासाठी टॉर्पेडोज आले तसेच आगबोटीवरून मारा करण्यासाठी खास प्रकारच्या तोफा आल्या. साध्या बंदुकांऐवजी मशीनगन्स, रॉकेट्स वगैरे गोष्टी आल्या. अनेक प्रकारची अतीवेगवान आणि चपळ विमाने तयार झाली. त्यातून जमीनीवर बाँबहल्ले करणे, पॅराशूटमधून सैनिकांना खाली उतरवणे, अतीशय उंच जाऊन जमीनीवरील ठिकाणांचे निरीक्षण करणे अशी अनेक प्रकारची कामे करता येऊ लागली. ही सगळी शस्त्रास्त्रे म्हणजे खास स्वरूपाची यंत्रेच होती. माणूस हाताने जे काम करू शकतो त्याहून जास्त काम, अधिक वेगाने आणि सफाईने करणे हा प्रत्येक यंत्राचा उद्देश असतो. ही विनाशकारी यंत्रे हाताळणारे सैनिक प्रचंड प्रमाणात विध्वंस करण्याचे काम झपाट्याच्या वेगाने सहजपणे करू शकत होते. यामधील कांही आयुधे शांततेच्या काळात तयार झाली तर कित्येक शस्त्रे पहिल्या दोन महायुध्दांच्या काळात युध्दपातळीवर प्रयत्नांची शर्थ करून तयार केली गेली. ते साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानात भर घालावी लागत गेली हे ओघाने आलेच.


अणुबाँबच्या महाभयंकर विस्फोटाने दुसरे महायुध्द संपले. असे महाविध्वंसक अस्त्र आपल्याकडे असलेच पाहिजे अशा विचाराने अनेक राष्ट्रांनी ते तयार करण्याच्या कार्यक्रमाला प्राधान्य दिले. प्रगत तंत्रज्ञान आणि आर्थिक सुबत्ता ज्यांच्यापाशी होती अशा महासत्तांनी ते तंत्रज्ञान मिळवले, अधिकाधिक शक्तीशाली बाँब बनवून त्याच्या चाचण्या घेतल्या आणि आपले विध्वंसक सामर्थ्य जगाला दाखवून दिले. ही अस्त्रे शत्रूच्या ठिकाणांवर नेमकी नेऊन टाकण्यासाठी अधिकाधिक पल्ला आणि क्षमता असलेली क्षेपणास्त्रे तयार केली गेली. त्यासाठी शक्तीशाली अग्निबाण तयार होत असतांना त्यांच्या सहाय्याने अवकाशात कृत्रिम उपग्रह सोडण्यात आले. सुरुवातीच्या काळात टेहळणी करून माहिती मिळवणे हे त्यांचे मुख्य काम असे. या उपग्रहांबरोबर संपर्क साधण्यासाठी आणि त्यांनी पाठवलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी अत्याधुनिक संदेशप्रणाली आणि संगणक यांचा विकास करण्यात आला. अशा प्रकारे दुसऱ्या महायुध्दानंतरच्या काळात अणुशक्ती, अग्निबाण, उपग्रह आणि संगणक यांच्या तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने जी प्रगती झाली तिच्या मुळाशी शस्त्रास्त्रस्पर्धा हे एक प्रमुख कारण होते.

असे असले तरी या तंत्रज्ञानाचा माणसाला त्याच्या रोजच्या जीवनात अनेक प्रकारे फायदाही झाला. अणुशक्तीच्या सहाय्याने विजेची निर्मिती होऊ लागली, उपग्रहामुळे सर्वच प्रकारच्या संदेशवहनात क्रांती झाली. दूरचित्रवाणीमुळे जगभरातले कार्यक्रम घरबसल्या पाहता येऊ लागले आणि दूरध्वनीतून पृथ्वीच्या पलीकडल्या बाजूला असलेल्या माणसाबरोबर संभाषण करणे सहज शक्य झाले. घरोघरी संगणक आले आणि आंतर्जालाच्या माध्यमातून लेखी मजकूर, आवाज आणि चित्रे अशा सर्वांची देवाणघेवाण क्षणार्धात करता येऊ लागली. जेथे जाऊ तेथे सांगाती नेता येणाऱ्या मोबाईल फोनमधून असे संदेश जिथे असू तिथे मिळू लागले. वसुधैव कुटुंबकम् अशी मनाची तयारी झाली नाही पण आपण ग्लोबल व्हिलेजचे नागरिक झालो. ही सगळी कमाल या नव्या काळातल्या यंत्रांमुळेच होऊ शकली.

या उपयुक्त सुविधांचा दुरुपयोग करून कांही अतिरेकी विध्वंसक कृत्ये करत आहेत. यामुळे यंत्र आणि शस्त्र, औजार आणि हत्यार यांच्यामधील जवळीक अधोरेखित होते. शस्त्रास्त्रे उदंड झाल्यामुळे मानवजातच समूळ नष्ट होणार असल्याचे भाकीत डूम्सडेवाले कधीपासून करताहेत, त्याचप्रमाणे पूर्वी दिवसभर राबून जेवढे काम होत असे ते आता यंत्रांच्या सहाय्याने चुटकीसरशी होऊ लागले तर उरलेल्या वेळात माणूस काय करेल अशी काळजी काही लोकांना लागली आहे. प्रत्यक्षात मात्र जिकडे पहावे तिकडे माणसेही उदंड होतांना दिसत आहेत आणि तरीसुध्दा बालवाडीतल्या मुलापासून त्याच्या पेन्शनर आजोबापर्यंत कोणाकडेही मोकळा वेळ नसतो. माझ्यासारखा निरुद्योगीसुध्दा हा असला लेख लिहायला काढतो आणि डेडलाईन येईपर्यंत तो टंकत बसतो.

. . . . . . . . . . (समाप्त)

Sunday, November 01, 2009

भुताटकीचा सोहळा - हॅलोविन


मागल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात मी अमेरिकेत होतो. त्या वेळी दुकानांदुकानात चक्क भोपळे मांडून ठेवलेले दिसायला लागलेले पाहून गंमत आणि कुतूहल वाटले. त्यांची संख्या दिवसेदिवसे वाढतच होती. हे भोपळे भाजीपाला विभागात ठेवलेले नव्हते, तर मुख्य प्रवेशद्वारातून आंत शिरताच लक्ष वेधून घेतील अशा रीतीने चांगले सजवून मांडून ठेवलेले असत. चिरून त्यांची भाजी करण्यासाठी ते भोपळे मुळी नव्हतेच. खरे तर ते भोपळ्यासारखे दिसणारे लहान मोठ्या आकाराचे पोकळ ठोकळे असायचे. कांही ठोकळ्यावर काळ्या रंगात विचित्र चित्रे काढलेली होती, कांही भोपळ्यांच्या सोबत अशी चित्रे असलेले स्टिकर्स मिळत होते आणि कांही ठिकाणी तशी चित्रे कापून त्या भोपळ्याला तशा आकारांच्या खिडक्या केल्या होत्या आणि त्याच्या आंत दिवा लावून ठेवलेला असायचा. त्याच सुमाराला कपड्यांच्या विभागात खास प्रकारच्या ड्रेसेसचे पीक आले होते. फँटम, बॅटमॅन वगैरे कॉमिकमध्ये दाखवतात तसले अंगाशी तंग बसणारे काळे सूट आणि भुताखेतांची किंवा वटवाघुळांची भयानक चित्रे रंगवलेले टीशर्ट सगळीकडे विकायला ठेवले होते, शिवाय विचित्र प्रकारचे मुखवटे (मास्क) दिसत होते. ही असली कसली फॅशन आली आहे असे आधी वाटले, पण ही सगळी येणा-या हॅलोविन फेस्टिव्हलची तयारी आहे असे चौकशी करता समजले.

अमेरिकेत दर वर्षी ३१ ऑक्टोबरला हॅलोविन उत्सव साजरा केला जातो. कुठल्याच अतींद्रिय शक्तीचे अस्तित्व न माननारे लोकसुध्दा मोठ्या हौसेने या भुताटतीच्या सोहळ्यात भाग घेतात. येशू ख्रिस्ताच्याही जन्माआधीपासून युरोपातल्या कांही आदिवासी जमाती अशा प्रकारचा दिवस साजरा करत असत. वर्षातून एक दिवस सर्व मृतात्मे त्यांना वाटल्यास जीवंत माणसांच्या जगात येऊन वावरतात अशी समजूत होती. त्यांनी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून किंवा त्यांना बरे वाटावे म्हणून जीवित लोकसुध्दा त्या रात्री भुताखेतासारखा वेष धारण करून फिरत असत. त्यामुळे भूत कोणते आणि माणूस कोणता यातला फरक न समजल्यामुळे सुरक्षितता मिळावी अशी त्यांची धारणा होती. पुढे कांही वदंता या दिवसाला जोडल्या गेल्या. तसेच रोमन लोकांच्या कांही सणांची त्या आदिवासी सोहळ्याशी सांगड घातली गेली. ख्रिश्चॅनिटीचा प्रसार झाल्यानंतर क्रॉस धारण केल्यामुळे आपल्याला संरक्षण मिळेल अशी खात्री वाटू लागली. ईश्वर आणि सैतान या दोघांचाही समावेश त्या लोककथांमध्ये झाला. अखेर अमेरिकेत त्याचा जास्तच प्रसार झाला असे दिसते.

मागच्या वर्षी हा दिवस ऐन आपल्या दिवाळीच्याच सुमाराला आला होता. आकाशकंदील लावून आणि दिव्यांची आरास करून आम्ही आपले घर मंगलमय करण्याच्या प्रयत्नात होतो तर आजूबाजूला कांही ठिकाणी भेसूर दिसणारे जॅक ओ लँटर्न दिवे टांगले होते. आमच्या घराजवळच एका बंगल्यापुढे तर भुते, पिशाच्चे, हडळी वगैरेंचे संमेलनच भरले होते. यातले कोणी झाडांना लटकत होते, कोणी भिंतीवर ठोकलेल्या खिळ्यांना टांगले होते आणि कोणासाठी जमीनीवर खांब रोवले होते. त्यांच्यावर वटक ठेऊन त्यांच्यापासून माणसांचे रक्षण करण्यासाठी त्यातच एक क्रॉससुध्दा उभा करून ठेवला होता.



त्या दिवशी संध्याकाळी आम्ही अल्फाराटाच्या सर्वात मोठ्या मॉलमध्ये गेलो. मॉलमध्ये सगळीकडे हिंडतांना आपण मुलांच्या एकाद्या फँन्सी ड्रेसच्या पार्टीत गेल्यासारखेच वाटत होते. अगदी लहान मुलांना स्पायडरमॅन, हीमॅन वगैरेंसारखे थोडे सौम्य वेष घातले होते आणि त्या भलत्या वेषात ती कमालीची गोड दिसत होती. कांही मोठी मुले भयंकर वाटणारी रूपे घेऊन आली होती. भिन्न प्रकारच्या प्राण्यांचे मुखवटे घातलेली आणि मोठमोठे जबडे, सुळे, शिंगे वगैरे धारण करणारी माणसे शिवगण या नांवाने चित्रात दाखवली जातात तसे कांहीजण दिसत होते. या भागात आता आशिया आणि आफ्रिका खंडातल्या लोकांची मोठी संख्या असल्यामुळे त्यातल्या कांही लोकांनी त्यांच्या मुलांना त्यांच्या देशातल्या समजुतींप्रमाणे राक्षसी रूप दिले होते. कित्येकजण नुसतेच मजेदार कपडे परिधान करून आले होते. अर्थातच सगळेजण आपापल्या आणि ओळखीतल्या मुलांचे फोटो काढण्यात मग्न असल्यामुळे आजूबाजूला सारखे कॅमे-यांचे फ्लॅश चमकत होते. मॉलमधले सगळे वातावरण उत्साहाने नुसते ओसंडत होते. कांहीही निमित्याने चार घटका मौजमजा करायची एवढ्याच उद्देशाने सगळेजण त्या ठिकाणी गोळा झाले होते.


भुताखेतांच्या अस्तित्वावर खरोखरच विश्वास ठेवणारे लोक आता अमेरिकेत फारसे भेटणार नाहीत. तिथल्या खेड्यापाड्यांमध्ये सुध्दा सगळीकडे दिव्यांचा लखलखाट झाल्यामुळे आता भुतांना रहायला अंधारी जागाच उरलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी कोणाला कांही करायची गरज वाटत नसते, पण तरीसुधादा एक गंमत म्हणून असे सण साजरे केले जातात. या निमित्याने भोपळे कोरून त्याचे लँटर्न बनवण्याच्या स्पर्धा होतात, तसेच या दिवशी भीतीदायक गोष्टी सांगण्याची चढाओढ लागते. त्या एका दिवशी घालण्यासाठी मजेदार कपडे तयार केले जातात. यातले बरेचसे चीन किंवा भारतातून आले असल्यास त्याचे आश्चर्य वाटणार नाही.

Friday, October 30, 2009

डॉ.होमी भाभा - भाग ३


डॉ.होमी भाभा यांनी केलेली कांही वक्तव्ये आणि दिलेले संदेश त्यांच्या द्रष्टेपणाचे द्योतक आहेत. "No power is costlier than No power" हे त्यांनी दिलेले बोधवाक्य तर आमच्यासाठी केवळ ब्रम्हवाक्य होते. "कोणतीही शक्ती अशक्तपणापेक्षा जास्त महाग नसते" असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. शक्ती प्राप्त करण्यासाठी जेवढा खर्च येईल त्यापेक्षा अशक्तपणामुळे होणारे नुकसान जास्त असते, त्यामुळे शक्तीहीनता अखेर महागात पडते हे सत्य त्यात आहे. आरोग्य, राजकारण, व्यवसाय, संरक्षण वगैरे जीवनाच्या निरनिराळ्या पैलूंमध्ये त्याचे वेगळे अर्थ निघतील, पण आमच्या दृष्टीने त्या वेळी 'पॉवर' या शब्दाचा 'इलेक्ट्रिकल पॉवर' किंवा 'वीज' एवढाच अर्थ आम्हाला अभिप्रेत होता. अणुशक्तीपासून विद्युतनिर्मिती करण्याची संयंत्रे इतर प्रकारच्या केंद्रांच्या मानाने खूपच गुंतागुंतीची असल्यामुळे त्यासाठी अधिक खर्च येतो. त्यामुळे निदान सुरुवातीच्या काळात तरी ती वीज इतर स्रोतांच्या मानाने स्वस्तात उपलब्ध करून देणे शक्यच नव्हते. पण त्यामुळे नाउमेद न होता ती वीज निर्माण करत राहण्यासाठी सतत प्रयत्नशील रहाण्यात डॉ.भाभांच्या या वाक्याने दिलासा मिळत असे. इतर स्रोतांपासून मिळू शकत असेल तेवढी वीज तर निर्माण करून घ्यायची आहेच, इतर लोक त्या कामाला लागलेले आहेतच, पण ती घेतल्यानंतरसुध्दा आपल्या देशाला अधिक वीज लागणार आहे. त्यासाठी अणुशक्तीपासून तयार होणारी थोडी महाग वीज जरी तयार केली तरी त्यातून देशाचा फायदाच होणार आहे. कारण त्यामुळे अनेक घरांत प्रकाश पडेल, कारखान्यात तयार होणारा माल घरोघरी पोचेल, कामगारांना रोजगाराची संधी मिळेल, या सगळ्यांमुळे जास्त लोकांचे राहणीमान सुधारेल. अशा प्रकारे दर युनिटमागे कांही पैसे जास्त खर्च आला आणि त्यापासून कांही रुपयांएवढा लाभ मिळाला तर त्यातून देशातल्या समाजाचा फायदाच आहे. या भावनेने प्रेरित होऊन आम्ही ही वीज तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या प्रयत्नाला लागलो होतो. त्यात यश येऊन देशात अनेक जागी अणुविद्युत केंद्रे उभी राहिली आणि ती आता बाजारभावाने वीजनिर्मिती करू लागली आहेत.


ज्या काळात जगातल्या कोणत्याच देशात अणुशक्तीपासून व्यापारी तत्वावर विद्युतनिर्मिती सुरू झाली नव्हती त्या काळातच भविष्यात ती निश्चितपणे होणार असल्याचे डॉ.भाभांनी ओळखले होते आणि निदान या क्षेत्रात भारताने अगदी सुरुवातीपासून जगाच्या बरोबर रहावे, मागासलेले राहू नये यासाठी ते प्रयत्नशील होते आणि आपण प्रयत्न केले तर ते शक्यतेच्या कोटीत असल्याचा आत्मविश्वास त्यांना वाटत होता. ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या जमान्यात साधी टांचणीसुध्दा परदेशातून आयात करावी लागत असे. खादी ग्रामोद्योग सोडला तर तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणारे कारखाने अत्यल्प होते. तेंव्हा भारतात निघालेले बहुतेक कारखाने परदेशी कंपन्यांबरोबर कोलॅबोरेशनमधून उभे राहिले होते आणि ते चालवण्यासाठी परदेशी तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागत असे. असे असतांना जे तंत्रज्ञान पुढारलेल्या देशातसुध्दा अजून विकसित व्हायचे होते ते आपण पहिल्यापासून आत्मसात करू असे म्हणायला अंगात जबरदस्त धमक लागते. ती डॉ.भाभांनी दाखवली. अणुशक्तीविभाग सुरू करण्याचा प्रस्ताव मांडतांना त्यांनी असे सांगितले, "When nuclear energy has been successfully applied for power production in say a couple of decades from now, India will not have to look abroad for its experts but will find them ready at hand." आजपासून वीस एक वर्षांनंतर जेंव्हा अणुशक्तीचा उपयोग विजेच्या निर्मितीसाठी यशस्वीरीत्या करण्यात येईल तेंव्हा या क्षेत्रातल्या तज्ज्ञांसाठी आपल्याला परदेशांकडे पहावे लागणार नाही, ते आपल्याकडेच तयार झालेले असतील. डॉ.भाभांनी काळजीपूर्वक नियोजन आणि अथक परिश्रम करून आपले भाकित खरे करून दाखवले. हे त्यांनी करून दाखवले हे तर महत्वाचे आहेच, पण आपण हे करू शकू हे त्यांना माहीत होते याचेसुध्दा आश्चर्य वाटते.



भारतीय कारखानदारीबद्दल बोलतांना डॉ.भाभांनी असे सांगितले होते, "If Indian industry is to take off and be capable of independant flight, it must be powered by science and technology based in the country." जर भारतीय उद्योगक्षेत्राला स्वतंत्रपणे उड्डाण करायचे असेल तर त्याने या देशात विकसित झालेले विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या बळावर ते करायला हवे. हा संदेश त्यांनी उद्योगपतींकडे तर पोचवलाच, पण त्यांच्या अखत्यारीखाली असलेल्या विभागात स्वदेशीकरण हा मूलमंत्र त्यांनी सर्वांना पढवला. अणुशक्तीसाठी लागणारी खास द्रव्ये, यंत्रे आणि उपकरणे सुरुवातीच्या काळात परदेशी बाजारात विकत मिळत होती आणि आपण ती आयात करतही होतो, पण अगदी जमीनीखाली दडलेल्या खनिजाचा शोध घेण्यापासून त्यांचे उत्खनन, शुध्दीकरण, उत्पादन वगैरे करून त्या सर्वांचा वीज निर्माण करण्यासाठी उपयोग करण्यापर्यंत आणि त्यानंतर अखेर त्याची सुरक्षितपणे विल्हेवाट कशी लावायची यासकट त्या बाबतीतले संपूर्ण तंत्रज्ञान आपल्या देशात विकसित करण्यावर त्यांनी भर दिला आणि त्यासाठी सविस्तर योजना आंखल्या. हीच गोष्ट अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही केली. पुढील काळात जेंव्हा सर्व पुढारलेल्या देशांनी भारताला आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वाळीत टाकले होते तेंव्हासुध्दा अणुशक्ती आणि अवकाश या दोन्ही क्षेत्रात आपली प्रगती होतच राहिली यामागे डॉ.भाभा यांची दूरदृष्टीच कारणीभूत होती यात शंका नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील.


अशा या द्रष्ट्या महामानवाला आज त्याच्या जन्मशताब्दीच्या दिवशी त्रिवार मुजरा आणि सतशः दंडवत.