Friday, August 01, 2008

डॉ.प्रकाश आणि मंदाकिनी आमटे


स्व.पु.ल.देशपांडे यांनी वरोरा येथील आनंदवन आश्रमाला भेट देऊन आल्यानंतर त्यावर एक विस्तृत लेख लिहिला होता. तो वाचून मला पहिल्यांदा स्व. बाबा आमटे तिथे करत असलेल्या महान कार्याची सविस्तर माहिती वाचायला मिळाली. त्यानंतर स्व. बाबा आमटे हे नांव त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे कार्य यांवरील आलेले लेख, मुलाखती आणि बातम्या यातून सतत डोळ्यासमोर येत होते आणि त्या नांवाला एक वलय प्राप्त झाले होते. पित्याच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे यांनीसुध्दा समाजसेवेचे व्रत घेतले आहे असे जेंव्हा वाचले तेंव्हा त्यांचे नांव अशा वलयांकित रूपातच समोर आले.
तोंपर्यंत स्व.बाबा आमटे यांच्या कार्याचा व्याप खूप वाढला होता. त्याचे व्यवस्थापन करण्याचे काम डॉ.प्रकाश करत असतील अशी माझी समजूत पूर्वी होती. नंदनवनाचीच एक शाखा भामरागड परिसरात कदाचित स्थापन केली असावी असे मला वाटले होते. ज्यावेळी त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळाली तेंव्हा मात्र आश्चर्य आणि आदर या दोन्ही भावनांनी मला भारून टाकले.
महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील हेमकलसा या अत्यंत दुर्गम परिसरातल्या गांवात जाऊन डॉ.प्रकाश यांनी आपले कार्य त्या जागी सुरू केले. या भागातील मारिया गोंड या जनजातीतल्या लोकांची अवस्था अतिशय दारुण होती. त्यांचे अनेक प्रकाराने शोषण होत होते. दारिद्र्य आणि उपासमार त्यांच्या पांचवीलाच पूजलेली होती. शालेय शिक्षणाचे नामोनिशान नव्हते. शाळा चालवायला तिथे येण्यासाठी मुले मिळत नव्हती आणि दवाखान्यात येण्यासाठी रुग्ण तयार नव्हते. शहरातून आलेल्या लोकांबद्दलचा त्या आदिवासी लोकांचा अनुभव चांगला नसल्यामुळे त्यांचा शहरी लोकांवर विश्वासच नव्हता. शिक्षणासाठी किंवा उपचारासाठी फी देण्याचा तर प्रश्नच नव्हता. पण मोफत मिळत असलेल्या सेवांचा उपयोग करून घ्यायला कोणी धजत नसत.
एकीकडे आदिवासी समाजाची अशी वाईट परिस्थिती होती तर दुसरीकडे शहरात मिळत असलेल्या कोणत्याही सर्वसामान्य सुखसोयी त्या भागात उपलब्ध नव्हत्या. वाहतुकीची साधने नसल्यामुळे रोजच्या अन्नाची पंचाईत असे, भाजीपाला तर दृष्टीला पडत नसे. सठी सामासी कोणा कार्यकर्त्याने सायकलवरून दुरून भाजी आणली तर त्या दिवशी दिवाळी मनवायची अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीत आपण कोणतीही तक्रार करायची नाही असे डॉ.प्रकाश यांनी ठरवले आणि पडतील तेवढे कष्ट सहन करून त्यांनी आपले खडतर काम चालू ठेवले.
डॉक्टर प्रकाश यांनी मारिया गोंड लोकांची बोलीभाषा शिकून आत्मसात केली. आपल्या शहरी पोशाखाला ते लोक घाबरतात हे पाहिल्यावर ते अंगात बनियान आणि अर्धी चड्डी एवढ्याच कपड्यावर राहू लागले. या बाबतीत फक्त पंचा गुंडाळून राहणा-या महात्मा गांधींचा आदर्श त्यांच्यापुढे असणार. त्यांची अत्यंत साधी, सौजन्यपूर्ण वागणूक, मदतीचा हात सतत पुढे करण्याची वृत्ती या सर्वांच्या जोरावर हळूहळू त्यांनी आदिवासी समाजाचा विश्वास संपादन केला. त्यांच्या दवाखान्याची कीर्ती आसमंतात पसरली आणि दूरवरून आजारी माणसे उपचारासाठी त्यांचेकडे येऊ लागली. त्यांच्या शाळेत मुलांची गर्दी होऊ लागली. दुर्गम भागातून रोज चालत येणे कठीण आणि धोकादायक असल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था केली. या सगळ्या कार्यासाठी लागणारा निधी गरीब आदिवासी समाजातून उभा राहणे शक्यच नव्हते. आपला खर्च कमीत कमी ठेऊन आणि उदार दात्यांकडून जे कांही मिळेल त्यात तो भागवून डॉ.प्रकाश यांनी आपले कार्य पुढे नेले.
शाळा चालवण्यामागील त्यांचा हेतू स्पष्ट होता. स्थानिक निरक्षर लोकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी, त्यांचे शोषण केले जाऊ नये, त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायविरुध्द उभे राहण्याचे धैर्य त्यांच्यात यावे एवढी किमान अपेक्षा ठेऊन त्या दृष्टीने त्यांना शहाणे करण्याचा यज्ञ त्यांनी मांडला आणि तेवत ठेवला. वेळोवेळी आदिवासी समाजाच्या समस्या प्रभावीपणे मांडून त्यांना सक्रिय पाठिंबा दिला. त्यांच्या सुविद्य आणि सेवाव्रती अर्धांगिनी डॉ.मंदाकिनी यांही या कामात त्यांना बरोबरीने साथ देत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव त्या दांपत्याला या वर्षाचे मॅगसेसे पुरस्कार देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जात आहे. हा पुरस्कार त्यांना समाजाच्या नेतृत्वासाठी मिळत आहे हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
आदिवासी लोकांचे शिक्षण, प्रबोधन आणि आरोग्य या गोष्टीवर काम करतांनाच त्यांनी आपल्या जागेत एक वन्य प्राण्यांचे संग्रहालय बनवले आहे. जंगलातले हिंस्र प्राणीसुध्दा त्यांना कांही इजा करत नाहीत. एकाद्या लहान मुलासारखे किंवा पाळीव जनावरासारखे त्यांच्यावर प्रेम करतात हे पाहून अचंभा वाटतो. अर्थातच डॉ.प्रकाश यांनी अत्यंत आपुलकीने आमि प्रेमाने त्यांना माया लावली आहे हे उघड आहे.
मागच्या महिन्यात राजू परुळेकर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत ईटीव्हीच्या 'संवाद' या लोकप्रिय कार्यक्रमात चार भागात प्रसारित झाली होती. या मुलाखतीचे एक वैशिष्ट्य असे की त्यात डॉक्टर प्रकाश नेहमीच्या स्टूडिओतील आरामशीर खुर्चीवर बसून गप्पा मारत नव्हते. त्यांची मुलाखत घेण्यासाठी श्री. परुळेकर हे हेमकलसा इथे गेले होते आणि वनराईच्या रम्य पार्श्वभूमीवर आपल्या नेहमीच्या पोशाखात असलेले डॉक्टर आमटे त्यांच्याशी अत्यंत विनयशील भाषेत सुसंवाद साधत होते. याच कार्यक्रमाचे पुनःप्रसारण सध्या होत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी हा अद्वितीय संवाद अवश्य पहावा.

No comments: