Sunday, September 03, 2017

गणेशोत्सव २०१७ - भाग ९ - जाहिराती(कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प १० च्या आधारे )

आजचे युग जाहिरातीचे आहे असे म्हंटले जाते. विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा यांच्या जाहिरातींनी वर्तमानपत्रांची पाने भरलेली असतात आणि टेलिव्हिजनच्या प्रत्येक कार्यक्रमातल्या कमर्शियल ब्रेक्समध्ये एकापाठोपाठ एक जाहिराती वारंवार आपल्या कानांवर आदळत असतात. त्या वस्तू विकत घ्याव्यात असे आपल्यालाही कधीकधी वाटायला लागते. गणेशोत्सवाच्या सुमारास या क्षेत्रावरसुध्दा गणपतीचे अधिराज्य प्रस्थापित झाले असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

नव्या गगनचुंबी इमारतींमधील महागड्या सदनिका (फ्लॅट्स) आणि आधुनिक सुखसोयीने परिपूर्ण मोटारगाड्या व दुचाकी वाहने यांच्या मोठमोठ्या जाहिराती बारा महिने येतच असतात. त्यांच्या गगनाला भिडलेल्या किंमती सर्वसामान्य ग्राहकांच्या आंवाक्याबाहेर असल्यामुळे त्यांना अर्थसहाय्य करायला पुढे सरसावलेल्या वित्तसंस्था तसेच महागडे दागदागीने विकणारे ज्युवेलर्स यांच्या जाहिरातीसुध्दा नेहमीच प्रामुख्याने झळकत असतात. मोठमोठ्या जाहिराती देण्यात त्यांच्या पाठोपाठ टी.व्ही., फ्रिज, म्यूजिक सिस्टिम्स वगैरेंचा क्रम लागेल. त्या देणा-यात कांही दुकानदार असतात तर कांही निर्माते. कधी कधी तर एकाच दुकानदाराने वा निर्मात्याने वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळ्या पानांवर जाहिरात दिलेली दिसते. गणेशोत्सव आला की यांतील बहुतेक जाहिरातदार आपल्या जाहिरातीत कुठेतरी गणपतीचे एक सुरेख चित्र घालून त्याला अभिवादन करीत त्याच्या नांवाने ग्राहकांना आवाहन करतात.

"गणपती बाप्पा मोरया" च्या जोडीला "आमच्या नव्या घरांत या" किंवा " नव्या गाडीत बसून या" असे कांहीतरी लिहिलेले असते. "मोअर या, मोअर घ्या, मोअर द्या" अशा प्रकारच्या दुस-या ओळी "ये दिल माँगे मोअर" ही ओळ हिट झाल्यावर येऊ लागल्या. कांही जाहिरातीत किंचित काव्य केलेले असते. "गणरायाचे करितो स्वागत, करून कमी किंमत", "प्रदूषणाचे विघ्न हराया, गणपती बाप्पा जरूर या", "स्मरणात ठेवा गणेशमूर्ती, होईल स्वप्नांची पूर्ती", "तू सुखकर्ता तू दुखहर्ता, तू विघ्नहर्ता तू कर्ता करविता" अशी याची कांही उदाहरणे आहेत.

वर दिलेली उत्पादने नेहमीचीच असली तरी गणेशोत्सवासाठी कांही भेटवस्तु किंवा सवलतींचे आमिष दाखवले जाते.  वर्तमानपत्रे मात्र या काळांत विशेष पुरवण्या काढून वेगळी माहिती पुरवतात आणि त्यामधून मोठमोठ्या जाहिराती सुध्दा करतात. गणपतीच्या आरत्या व गाणी यांच्या नवनवीन ध्वनिफिती निघतात त्यांची गजाननाच्या व प्रमुख गायकाच्या चित्रांसह जाहिरात केली जाते. याशिवाय साबण, कॅमेरे, मिठाई,  मोबाईल फोन, चहा, पुस्तके अशा अनेकविध वस्तू आणि बँका, लहान मुलांच्या शाळा यासारख्या संस्था सुध्दा या वेळी आपापल्या जाहिराती देतात. गणेशाच्या विविध आकारातील मूर्ती, चित्रे, त्याच्या प्रार्थनांची पुस्तके, पूजेचे साहित्य वगैरेंना या दिवसांत मोठी मागणी असते, त्यांचीही प्रसिध्दी होते.
इलेक्ट्रानिक्स व वाहनांच्या क्षेत्रातील प्रसिध्द जपानी व कोरियन कंपन्या आणि भूतान देशाची सोडत अशा परदेशी संस्थांना सुध्दा गणपतीचे नांव घेऊन भारतात जाहिराती कराव्या असे वाटते. इतकी त्याची टी आर पी आहे.

यातील कांही मोठमोठ्या कंपन्याद्वारे गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्या स्पर्धांची भरपूर जाहिरात होते. कांही ठिकाणी निवडसमिती स्पर्धांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आपला निर्णय ठरवते तर कांही ठिकाणी जनता जनार्दनाच्या बहुमताचा कौल लावला जातो. इंडियन आयडॉलच्या प्रचंड यशानंतर अशा कामासाठी एस.एम.एस. चा मोठा वापर केला जाऊ लागला. या रिअॅलिटी शोजचा अतिरेक झाल्यामुळे आता त्यांचे प्रमाण कमी झालेले दिसते.

काही वर्तमानपत्रे गणेशोत्सवाच्या सजावटींच्या स्पर्धा जाहीर करतात. आपापल्या घरामधील किंवा मंडळांमधील गणेशाच्या सुंदर मूर्ती, आरास आणि सजावट यांची छायाचित्रे मोबाईल फोनवरून पाठवली जातात. ती वर्तमानपत्रांत छापून येतात, तसेच त्यांना बक्षिसे दिली जातात. या स्पर्धा, त्यातील स्पर्धक व विजेते हे प्रसिध्दीच्या झोकांत येतात. या सगळ्यांच्या निमित्ताने गणपतीची विविध रूपे  वर्तमानपत्रांच्या पानांपानांवर आणि दूरचित्रवाणीच्या पडद्यावर झळकत राहतात आणि आपल्याला घरबसल्या पहायला मिळतात हा त्यांचा एक फायदा आहे.
       

Friday, September 01, 2017

गणेशोत्सव २०१७ - भाग ८ - देखावे(कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प ८ आणि ९  वरून विस्तारित)

गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणी केलेल्या सजावटीची आणि देखाव्यांची सचित्र आणि सविस्तर वर्णने रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये येत राहतात. जवळपास असेलेले काही उत्सव आपण प्रत्यक्षात जाऊन पाहूनही येतो. आता मला प्रकृतिला सांभाळून दूर जाणे जमत नाही. गेल्या कांही वर्षातील उत्सवांच्या आठवणीतील दृष्यांबद्दलच आता लिहू शकतो.

सजावट ही तर प्रत्यक्ष पहायची, अनुभवायची गोष्ट आहे. त्या चित्रविचित्र आकृत्यांच्या कमानी, कलाकुसर केलेले खांब,  आकर्षक झुंबरं, चमकदार पताका,  रंगीबेरंगी फुलं आणि पानं,  त्या सर्वांवर पडणारे धांवते प्रकाशझोत, फिरणारी चक्रे, डोळे मिचकवणारे मिणमिणते दिवे आणि आपले डोळे दिपवणा-या झगमगणा-या दिव्यांच्या माळा, कुठेकुठे आजूबाजूला आकर्षक चौकटीमधून सुंदर चित्रे वा शिल्पे मांडून ठेवलेली तर कांही ठिकाणी उदबत्त्यांचा किंवा हवेमध्ये फवारलेल्या अत्तराचा मंद मंद सुगंध आणि कर्णमधुर पार्श्वसंगीत यांनी सारे वातावरण भारून टाकलेले. या सगंळ्याचे शब्दांत वर्णन करणे कठिण आहे.

देखावे निर्माण करणे हे काम तर एकाद्या चित्रपटाचा सेट उभारण्यासारखे आहे. त्या व्यवसायातील कांही लोक इथे मदतीला येतात आणि इथे चांगले काम करणा-यांना तिकडे यायचे बोलावणे येते म्हणतात. मी एका प्रख्यात शिल्पकाराची मुलाखत टेलीव्हिजनवर पाहिली होती. त्याने सांगितले की त्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवातच मुळी प्रथम गणपतीच्या सजावटीपासून केली, तिथून पुढे शासनाचे वतीने महाराष्ट्रदिन, प्रजासत्ताक दिन वगैरेंसाठी चित्ररथ तयार केले, प्रसिध्द व्यक्तींचे पुतळे बनवले असे करत करत आता विविध माध्यमामध्ये अनेक उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती त्याने केली आहे व त्यांची ठिकठिकाणी प्रदर्शने भरवली आहेत.

पौराणिक देखाव्यांमध्ये रामायण व महाभारतातील प्रसंग हटकून असतात. सीतास्वयंवर, अहिल्योध्दार, शबरीची बोरे, जटायुयुध्द, लंकादहन, रामराज्याभिषेक वगैरे रामायणातील घटना आणि वनवासातील पांडव, लाक्षागृह, द्रौपदीस्वयंवर, वस्त्रहरण, भगवद्गीताकथन यासारखी महाभारतातील दृष्ये उभी करतात. कृष्णजन्म व त्याच्या गोकुळातील लीला, विशेषतः रासक्रीडा, दहीहंडी वगैरे विशेष लोकप्रिय आहेत.  इतर पौराणिक प्रसंगात नळदमयंती, गजेन्द्रमोक्ष यासारखी आख्याने, कुठल्या ना कुठल्या असुराचा देवाकडून संहार अशासारखे प्रसंग असतात. कधी नृत्य करणा-या रंभा मेनकांसह भव्य इन्द्रसभा तर चमत्कृतीपूर्ण मयसभा भरलेली असते. कधी कधी गरु़डाचे गर्वहरण यासारख्या सहसा न ऐकलेल्या गोष्टीसुध्दा शोधून काढून आपल्या कल्पनेने त्यांची मांडणी केलेली असते. गणेशाशी संबंधित पुराणातल्या कथा तर असतातच. बहुधा या सगळ्या घटना गणपतीचे समोर घडत आहेत व तो त्या पहात आहे असे दाखवतात. पण कमरेवर हात ठेऊन उभा विठोबा किंवा आशीर्वाद देण्याच्या मुद्रेतील कृष्ण भगवान असे एकएकटेच रूप गणेशालाच तसे बनवून सुध्दा दाखवतात.

ऐतिहासिक देखाव्यांची सुरुवात गौतमबुध्द व महावीर यांच्या जीवनातील प्रसिध्द प्रसंगापासून होते. त्यानंतर क्वचित कुठे अलेक्झँडरची स्वारी, सम्राट अशोक वगैरे आढळतील. पण त्यानंतर मधला दीड हजार वर्षांचा कालखंड ओलांडून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळांत येतो.  रोहिडेश्वरासमोर घेतलेली शपथ, अफजलखानाचा वध, पावनखिंडीतील बाजीप्रभूचे शौर्य, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट, आग्र्याहून सुटका, महाराजांचा राज्याभिषेक अशासारखे त्यांच्या जीवनातील बहुतेक सर्व महत्वाचे प्रसंग कुठल्या ना कुठल्या देखाव्यात पाहिलेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची संत तुकाराम व सद्गुरू रामदासस्वामी यांच्याबरोबर घडलेली भेट, त्यांची राजमाता जिजाबाई यांच्याबरोबर चाललेली चर्चा, भवानीमातेकडून तलवारीचा स्वीकार अशी द्रृष्ये समर्थपणे उभी केली जातात. या सगळ्या देखाव्यामागील नियोजन, त्या काळानुरूप पार्श्वभूमी, पोशाख, चेह-यावरील भाव यासह व्यक्त करणे वाखाणण्याजोगे आहे.आधुनिक काळातील कांही देखाव्यात स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाची पर्वे दाखवली जातात. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांनी केलेल्या स्वार्थत्यागाची आठवण त्यांतून करून दिली जाते. झांशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस वगैरे अग्रणींच्या आयुष्यातील निवडक प्रेरणादायक प्रसंग मंचावर उभे केले असतात. ब्रिटिश सरकारने लोकमान्यांवर घातलेला राजद्रोहाचा खटला व त्यांनी तेथे केलेले सुप्रसिध्द वक्तव्य आहेच, त्यांनी सुरू करून दिलेल्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचाही उल्लेख जागोजागी दिसतो. महात्माजींनी केलेल्या दांडीयात्रेसारख्या चळवळीची दृष्ये असतात तसेच सत्य, अहिंसा, निर्भयता, स्वावलंबन आदि त्यांची शिकवण त्यात व्यक्त केली जाते. कांही ठिकाणी शहीद भगतसिंगासारख्या देशभक्त क्रांतिकारकांच्या गौरवगाथा दाखवल्या जातात तर कुठे स्वातंत्र्यवीर सावरकरांची खडतर तपश्चर्या. भारतमातेचे देवतेच्या स्वरूपांत दर्शन घडवणारे आणि तिच्याबद्दल निष्ठा व्यक्त करणारे देखावे नेहमी पहायला मिळतात.

स्वातंत्र्यानंतरच्या काळातीन स्थितीवर आधारित देखाव्यात कांही जागी भारताची विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय प्रगति दाखवली जाते. त्यात मुख्यत्वे भाक्रा व कोयनेसारखी प्रचंड धरणे, मोठमोठे अवजड यंत्रांचे कारखाने, पृथ्वी, अग्नी यासारखी प्रक्षेपणास्त्रे, आर्यभट, इन्साट वगैरे कृत्रिम उपग्रह वगैरेची चित्रे दिसतात. कारगिलच्या लढाईतील आपल्या सैनिकांचा विजय हा एक अलीकडच्या काळांत बहुचर्चित विषय होता. बर्फाच्छादित डोंगराळ प्रदेशातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी दाखवलेल्या पराक्रमाचे त्यावर आधारलेले देखावे पाहिले. संगणकाच्या उपयोगाच्या क्षेत्रात आज सुरू असलेल्या घोडदौडीला दृष्य स्वरूपात दाखवणे तसे कठिणच असेल.

सद्यस्थितीत आ वासून पहाणा-या विविध समस्या अनेक देखाव्यांमध्ये दाखवल्या जातात. पांचवीला पूजलेली महागाई, सर्वभक्षक बेकारी,  भ्रष्टाचाराचा भस्मासुर, ढांसळत चाललेली नीतिमत्ता, कायदा आणि सुव्यवस्था, बंद पडत चाललेले कारखाने, कर्जबाजारीपायी होणा-या शेतक-यांच्या आत्महत्या वगैरे ज्वलंत समस्या या माध्यमातून व्यक्त करून त्यांच्या निरसनासाठी गणरायाला साकडं घातलं जातं. कधी कधी त्यांतून अपेक्षाभंगाचा व निराशेचा सूर उमटतांना दिसतो. त्याशिवाय एड्स सारखा भयानक रोग, शहरातील वाढते प्रदूषण, जंगलांची व वन्य प्राण्यांची होत असलेली कत्तल यांच्या भयावह परिणामांची जाणीव करून देण्याचा उपक्रमही या देखाव्यांमध्ये दिसतो.

भारतातील कांही वैशिष्ट्यपूर्ण व सुंदर इमारतींच्या प्रतिकृती व चित्रेसुध्दा या निमित्ताने पहावयास मिळतात. त्यांत म्हैसूरचा राजवाडा, सौराष्ट्रातील सोमनाथाचे मंदिर, अलीकडे प्रसिध्दी पावलेले अक्षरधाम वगैरे शिल्पकलेचे अद्भुत नमुने तर आहेतच पण कुणी नाशिकचे काळ्या रामाचे मंदिर नाहीतर अष्टविनायकामधील एखादे देऊळ अशी भाविकांची श्रध्दास्थाने तात्पुरती उभी करतात. थर्मोकोल आणि पुठ्ठ्यासारख्या माध्यमातून या भव्य वास्तूंचे बारकावे दाखवण्यासाठी सारे कौशल्य पणाला लागते आणि भरपूर मेहनत करावी लागते.

गेल्या वर्षदोन वर्षांत घडलेल्या घटना आणि सध्या समाजापुढे किंवा देशापुढे उभे असलेले प्रश्न यांची छाया अनेक देखाव्यांवर पडलेली असते. यात अतिरेकी, काळा पैसा, ड्रग्जच्या व्यसनापासून मुक्ती, नारीशक्ती तसेच अबलांची सुरक्षा, सीमेवरील तणाव यासारख्या अनेक विषयांवर आधारलेले देखावे मांडून यांचेपासून संरक्षण करण्यासाठी गणरायाला कांकडे घातले जाते किंवा तो आपल्या पाठीशी उभा असल्याचे दाखवले जाते. सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवणा-या या कलाकृती पाहिल्यावर गणेशोत्सवामधील प्रबोधनाचा भाग अगदीच कांही नाहीसा झालेला नाही असे वाटते.


Thursday, August 31, 2017

गणेशोत्सव २०१७ - भाग ७ - मूर्तीकार(कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प ७ च्या आधारावर विस्तारित लेख)

या वर्षी गणेशोत्सवासाठी अमूक इतक्या लक्ष गणेशमूर्ती बनल्या, त्यातून तमूक इतक्या कोटी रुपयांचा व्यापार व्यवहार झाला अशा प्रकारचे मोठमोठे आकडे आपण वर्तमानपत्रांत वाचतो, टेलीव्हिजनवरील चर्चांमध्ये ऐकतो आणि सोडून देतो. मुळांत हे आंकडे या लोकांना कळतात कसे हेच समजत नाही. आणि हा खर्च होतो तेंव्हा हे पैसे कुठे जातात?  गणेशाच्या मूर्ती बनवणारे, त्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवणारे, वाहतूक करणारे, व्यापारी, त्यासाठी भांडवल पुरवणारे वगैरे अनेक लोकांचा त्यांत वाटा असतो. त्यांतील अनेक लोकांची पोटे हातांवर असतात त्यामुळे त्यांना मिळालेले पैसे लगेच खर्च होऊन त्यांच्या गरजेच्या वस्तूंचे उत्पादन आणि पुरवठा करणा-यांच्या खिशात जातात. असा प्रकारे ते विस्तृत समाजामध्ये फिरत राहतात. पण एवढे करून सरतेशेवटी ते सगळं अक्षरशः पाण्यातच जाणार ना? त्यातून समाजाला काय मिळतं? एवढ्या पैशांत समाजासाठी दुसरं काय काय करता आलं असतं असा विसंवादी सूरही कांहीजण लावतात. यामागचं संपूर्ण अर्थशास्त्र कांही आपल्याला फारसं उमगत नाही आणि तो या मालिकेचा विषयही नाही.

पण ही विविध रूपे बनवणारे हात कुणाचे असतात याचं कुतुहल मात्र वाटतंच. मोठमोठे सार्वजनिक गणपती बनवणे तर विलक्षण हस्तकौशल्य आहे. पण घरोघरी जाणारी इतकी एकासारखी एक शिल्पे नुसत्या हातांच्या बोटाने आकार देऊन बनवणे कांही शक्य नाही. त्यासाठी साचे वगैरे निश्चितपणे वापरत असणार. मार्च एप्रिलपासूनच मुंबईत ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला आडोशाला बांधलेल्या शेड्समध्ये हालचाल सुरू झालेली दिसायला लागते आणि पहाता पहाता तिला वेग येतो. याशिवाय नजरेआड पक्क्या इमारती असलेले कारखाने सुध्दा असतीलच, पण हे काम जास्त करून अशा तात्पुरत्या छपराखालीच चालतं असं ऐकलं आहे. मुंबईत विकल्या जाणा-या मूर्तींपैकी फक्त पाव हिस्सा इथे बनतात व तीन चतुर्थांश बाहेरून येतात म्हणे. अर्थांत ही फक्त आकडेवारी झाली. मोठ्या आकाराच्या व अर्थातच तशाच भारी किंमतीच्या सा-या मूर्ती तर इथेच तयार होत असणार.  कांही मूर्तींचा आकार तर गणेशाचा दिसतो पण रंग मातकट असंही आपल्याला अनेक वेळा जाता येता दिसतं. अर्थातच त्यांच्या निर्मितीच्या कामाची विभागणी केली जात असणार. माती आणणे, कालवणे, मळणे, साच्यात घालून आकार देणे, त्याला थोडे सुकवणे अशी जास्त जागा व्यापणारी कामे बाहेरगांवी करून त्यावर शेवटचे रंगकाम करून सजवण्याचे कौशल्यपूर्ण काम इथे कुशल कारागीर करीत असतील. त्यांतही फक्त डोळे रंगवणारे, दागीन्याची कलाकुसर करणारे वगैरेचे तज्ञ विशेषज्ञ वेगळे.मुंबईपासून जवळच असलेल्या पेण गांवाने या उद्योगांत मोठी आघाडी मारली आहे. अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या या व्यवसायात वंशपरंपरागत हस्तकौशल्य आणि कारखानदारी, मार्केटिंग व वाहतुक यांची प्रगत तंत्रे यांचा सुंदर मेळ घालून या गांवाने मुंबई महानगरीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज केली आहे. येथील महिला कलाकार या उद्योगांत खंबीरपणे पाय रोवून उभ्या आहेतच पण इथल्या माहेरवाशिणींनी ही कला आपल्याबरोबर सासरी सुध्दा नेऊन तिचा प्रसार केला आहे. एवढेच नव्हे तर येथील कांही विशेषज्ञ अगदी परदेशांत सुध्दा जाऊन तेथील उत्साही लोकांच्या कार्यशाळा घेतात. येथील अनेक कारखान्यांमध्ये वर्षातील बाराही महिने काम चालते आणि देवाच्या प्रतिमा घडवण्याच्या मंगल कामात हजारोच्या संख्येने कारागीर तल्लीनतेने रत असतात. गेल्या कांही वर्षात आलेल्या अतिवृष्टी, महापूर, विजेचे भारनियमन वगैरेसारख्या भीषण संकटांना तोंड देऊनसुध्दा त्यावर यशस्वीपणे मात करता आली ही गणरायाची कृपा असे भाविक सांगतात. हे सुध्दा त्याच्या कृपादृष्टीचे एक रूपच नाही कां?

गणपतीचा आकार इतका आकर्षक असतो की प्रत्येक लहान बालकाला त्याचे चित्र काढावे असे वाटते. आमच्या लहानपणी आम्ही चिकणमातीच्या गोळ्याला गणपतीचा आकार देऊन पहात होतो, मग आमची मुलेही तेच करतांना पाहिले आणि थोडे मार्गदर्शन केले. आता आमच्या नातवंडांना शाळेतसुध्दा मातीचे गणपती करायचे धडे देतात. मोल्डिंग क्ले घेऊन खेळतांना सुध्दा नकळत त्यांची बोटे गणेशाचा फॉर्म घडवतात. या कच्च्या मूर्ती फक्त स्फूर्ती आणि आनंद देतात, पण कोणी ती पूजेला ठेवत नाहीत. कांही उत्साही लोक मात्र स्वतःच सुबक मूर्ती तयार करतात, त्याला रंगवून सजवतात आणि गणेशोत्सवामध्ये त्याच मूर्तीची पूजा करतात. अशी एक मूर्ती वर दाखवली आहे. 

Wednesday, August 30, 2017

गणेशोत्सव २०१७ - भाग ६ - सार्वजनिक उत्सव(कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प ६ चा विस्तार)

समाजातील सर्वसामान्य लोकांनी उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून एकत्र यावे,  करमणुकीच्या निमित्ताने त्यांचे सामाजिक तसेच राजकीय प्रबोधन करावे या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असे आतापर्यंत मानले जात होते. त्याला शंभरावर वर्षे होऊन गेली. इतर अनेक प्रसारण माध्यमे आल्यानंतर या उत्सवातल्या प्रबोधनाला फारसे महत्व राहिले नाही पण लोकांनी एकत्र येणे मात्र सहस्रावधी पटीने वाढत गेले. गणेशोत्सवापूर्वी गोकुळाष्टमीला गोविंदा, नंतर नवरात्रात शारदोत्सव, गरबा व दुर्गापूजा, त्याशिवाय नारळी पौर्णिमा, होली, ईद, ख्रिसमस, छटपूजा, नववर्षदिन,  महानिर्वाणदिन, अय्यप्पा उत्सव वगैरेसारखे अनेक सण हल्ली मोठ्या प्रमाणात सामुदायिक रीत्या साजरे होतात. स्वातंत्र्यदिन व गणतंत्रदिन हे राष्ट्रीय दिनही धूमधडाक्याने साजरे केले जातात, त्या दिवशी प्रशासनातर्फे सजवलेले चित्ररथसुध्दा निघतात. सा-याच समारंभांमध्ये प्रेक्षणीय आतिशबाजी, नेत्रदीपक रोषणाई वगैरे असतेच. पण महाराष्ट्रात तरी गणपतीच्या उत्सवाचा आवाकाच इतका प्रचंड असतो की त्याची सर मात्र दुस-या कशालाही येत नाही.

जसजशी लोकसंख्या वाढली आणि लोकांची आर्थिक स्थिती सुधारली तसतशी गणेशोत्सवाच्या आयोजनाची भव्यता वाढत गेली. बरीचशी  सभागृहे त्याने व्यापलेली असतातच. भरस्त्यात तसेच दोन बिल्डिंगमधील रिकामी जागा, ओसाड पडलेल्या जागा, मोकळी मैदाने वगैरे मिळेल त्या जागेवर मांडव घालून श्रींची स्थापना होते. गणेशमूर्तींची भव्यता व देखाव्याचा देखणेपणा यांत वेगवेगळ्या मंडळांमध्ये चांगलीच चुरस लागलेली दिसते. पूर्ण मनुष्याकृती प्रतिमा तर सर्वसामान्य होऊन गेल्या. आता वीस, पंचवीस फुटांचा प्रचंड आकार सर्रास दिसू लागला आहे. गणपतीच्या आजूबाजूला कलात्मक सजावट करण्याशिवाय प्रसिध्द स्थळांची व मोठ्या इमारतींची प्रतिकृती बनवून किंवा ऐतिहासिक, पौराणिक वा सामाजिक प्रसंगांचे दृष्य उभे करून एक तात्पुरती प्रतिसृष्टी निर्माण करण्याकडे कल दिसत आहे. तांत्रिक प्रगतीमुळे चालत्या बोलत्या चलनशील पुतळ्यांचा वापर करणे शक्य झाले आहे. त्यामुळे महत्वाचे प्रसंग डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडत असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुध्दा अनेक जागी होतो.

प्रचंड आकाराच्या मूर्ती बनवण्यामागे दूरवरून त्या दिसाव्यात, येणा-याजाणा-यांना दुरूनच तिचे आकर्षण वाटावे असा एक उद्देश असायचा. आता मात्र मुंबईत कित्येक जागी त्या मूर्तींना अनेक पडद्याआड झाकून ठेवतात. प्रवेश करण्यासाठी एक चिंचोळा मार्ग ठेवलेला असतो. त्यांत शिरून एखाद्या बोगद्यासारख्या अंधे-या वाटेने आजूबाजूचे इतर देखावे पहात आपण मुख्य उत्सवमूर्तीपर्यंत पोचतो. गेली काही वर्षे सुरक्षिततेसाठी सगळीकडे जास्तच कडेकोट बंदोबस्त असतो. साहजिकच यामुळे मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यात बराच वेळ जातो आणि रस्त्यांवरच दर्शनासाठी इच्छुकांच्या लांबलचक रांगा लागतात. अनेक वेळा इच्छा असूनसुध्दा प्रत्यक्ष दर्शन न घेता दूरदर्शन व वर्तमानपत्रातील वृत्तांवर समाधान मानावे लागते.

त्या मानाने पुण्याला शहराच्या मुख्य भागातल्या पेठांमधून एक फेरफटका मारला तरी अनेक ठिकाणचे सुंदर देखावे पाहिल्याचा आनंद व समाधान मिळते. या भागात देखावे पहायला येणा-यांची इतकी गर्दी उसळते की संध्याकाळनंतर सगळे रस्ते वाहतुकीला बंद ठेऊन फक्त पायी चालण्याची सोय करावी लागते. विसर्जनाच्या दिवशी रस्त्यातून जाणा-या मिरवणुकांमध्ये अनेक ठिकाणचे गणपती पहायला मिळतात. त्यातही मुंबईमध्ये विसर्जनाच्या अनेक जागा व तेथे जाणारे अनेक मार्ग असल्यामुळे गर्दीमुळे त्यातील एकादीच जागा धरून बसावे लागते. पुण्याला मात्र एका ठराविक मार्गाने आणि क्रमाने सर्व प्रमुख गणपतींची मिरवणुक निघते.

कांही लोकांना उपजतच समाजकार्याची आवड किंवा हौस असते. एकाद्या सोसायटी, वाडा किंवा गल्लीमधले असे उत्साही लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. त्यासाठी आपला थोडा वेळ देण्याची, धडपड करण्याची आणि गरज पडली तर पदरमोड करण्याची त्यांची मनापासून तयारी असते. यानिमित्य इतर रहिवाशांना भेटून ते अल्पशी वर्गणी गोळा करतात, कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचे आवाहन करतात आणि सगळे जमवून आणतात. शंभर वर्षापासून बहुतेक जागी असे चालत आले आहे. आमच्या कॉलनीत सुरू असलेला सार्वजनिक गणेसोत्सव अशा उत्साही लोकांच्या प्रामाणिक प्रयत्नातूनच साजरा होत आहे.


काही स्वार्थी लबाड लोक मात्र या निमित्याने आपला फायदा करून घेतात किंवा धांगडधिंगा करून घेतात. त्यांना गणपतीशी किंवा चतुर्थीशी काही देणे घेणे नसते. असे फंडगुंड नावापुरती एक समिति स्थापन करतात, तिच्या नावाने त्या भागातील रहिवाशी आणि व्यापारी यांच्याकडून खंडणी गोळा करतात आणि त्यातला काही भाग मूर्ती, आरास, कार्यक्रम वगैरेवर खर्च करून इतर पैसे चैनीवर उधळतात. या लोकांना समाजाची काही काळजी किंवा पर्वा नसल्यामुळे रस्ते अडवून स्टेज उभारणे, मोठ्या लाउडस्पीकरवर कानठळ्या बसवण्यासारखी गाणी वाजवणे यासारखे प्रकार घडतात. यांच्यामुळे आता नको तो गणेशोत्सव असे म्हणायची वेळ आजूबाजूला रहात असलेल्या लोकांवर येते.

याच्या उलट कित्येक मंडळे अजूनही या उत्सवात समाजप्रबोधनाचे काम करतात. काही तर वर्षभर सामाजिक कार्ये करत राहतात. मुंबईतल्या लालबागचा राजा आणि पुण्यातला दगडू शेठ हलवाई ट्रस्ट यासारख्या काही मंडळांचे नाव आता इतके मोठे झाले आहे की त्यांच्या उत्सवालाच तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भाविक लोक या गणपतींना नवस करतात आणि तो फेडायला येतात. अशा सार्वजनिक गणेशोत्सवाचे बजेट खूप मोठे असते आणि त्यांच्याकडे उत्पन्नाची अनेक साधनेही असतात.
गणेशोत्सव २०१७ - भाग ५ - गणपतीची आरास(कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प ५ आणि इतर कांही लेखांवरून )

गणपती म्हंटल्यावर एक उत्साहाने ओतप्रोत भरलेली उत्सवमूर्ती डोळ्यापुढे उभी राहते. कुठल्याही कार्याचा शुभारंभ आपण श्रीगणेशायनमः असे म्हणून गणेशाला वंदन करून करतो. नव्या निवासात प्रवेश केल्यावर आधी त्याची पूजा करून सारे कांही सुरळीत होवो अशी प्रार्थना करतो. सर्व विघ्नांचा नाश करणारा आणि सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी तत्पर असा आपला पाठीराखा अशी त्याची प्रतिमा आहे. प्रत्येक समारंभाचे पहिले निमंत्रण आपण त्याला देतो आणि कार्यक्रमामध्ये त्यालाच अग्रपूजेचा मान देतो. मग त्याचा स्वतःचाच उत्सव म्हंटल्यावर उत्साहाला किती उधाण येईल कांही विचारायलाच नको.

इतर वेळेस आपल्या देवघरांतील देवाच्या मूर्ती थोड्या घासून पुसून चमकवून पूजाविधीसाठी घेतात व पूजाविधी संपल्यावर पुन्हा आपल्या जागेवर नेऊन ठेवतात. पण गणपती उत्सवाला मात्र दरवेळी मूर्ती सुध्दा नवीनच हवी. ही मूर्ती कच्च्या मातीपासून तयार केली जात असे आणि हवेतला दमटपणा, धूळ, उंदीर, कीटक वगैरेंमुळे तिचे स्वरूप विद्रूप होण्याची शक्यता असायची. उत्सव संपल्यानंतर तिने कुठेतरी अडगळीत जाऊन पडून तसे होऊ नये म्हणून लगेच तिचे साग्रसंगीत विसर्जन केले जाते. नवीन मूर्तीला साजेशी आकर्षक सजावट सुध्दा दरवर्षी उत्साहाने नव्याने केली जाते. या सगळ्या खटाटोपामध्ये किती श्रम व पैसे वाया जातात अशी टीका कांही लोक करतात पण ती गोष्ट तर सा-याच समारंभांना व उत्सवांना लागू पडते. माणसाला समारंभ साजरे करण्याची एक अंतःप्रेरणा असते त्याची अभिव्यक्ती या ना त्या रूपाने होतच राहणार. त्यामधून मिळणारा आनंद अनमोल असतो.

गणपतीच्या आकारांमध्येच खूप आगळेपणा आहे, त्यात मूर्त आणि अमूर्त या दोन्हींचा समावेश होतो. सर्वसामान्य लोक निर्गुण रूपापेक्षा सगुण रूपच अधिक पसंत करतात. उत्सवांसाठी ज्या मूर्ती बनवतात त्यातसुध्दा पराकाष्ठेची विविधता येणारच. पहायला गेल्यास मनुष्याकृतीला चार हात व हत्तीचे मुख जोडणे हे फारसे वस्तुनिष्ठ नाहीच, शिवाय प्रतिभेचे पंख लाभलेले कलाकार साध्या आकृतीला सुध्दा कल्पकतेने अनेक प्रकारची वळणे देतात. वेगवेगळ्या मुद्रा, रंगीबेरंगी वस्त्रालंकार, त-हेत-हेची आभूषणे यांनी त्या आकारांना मनसोक्त नटवतात. ही विविध रूपे दाखवण्याचाच प्रयत्न मी या लेखमालिकेत करणार आहे. गजाननाची ही उत्सवमूर्ती फक्त थोड्याच दिवसांसाठी बनवायची असल्यामुळे तिच्यात जास्त  टिकाऊपणा आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नसते. सहज सुलभ मिळणारा कच्चा माल व कलाकुसरीचे सामान यांचा उपयोग सुध्दा करता येतो. त्यामुळे कलाविष्काराच्या मर्यादा अधिकच रुंदावतात. उत्सव खाजगी, व्यक्तिगत स्वरूपाचा आहे की सार्वजनिक यावरून त्याचे बजेट ठरते व त्याप्रमाणे मूर्तीचे व सजावटीचे आकारमान.


घरगुती उत्सवात एक माणूस सहजपणे उचलू शकेल, घरातील एकाद्या खोलीत ठेवू शकेल इतपत आकाराची, बहुधा पारंपरिक मुद्रा धारण केलेली मूर्ती पसंत केली जाते. त्यासाठी मखर, सिंहासन, पालकी, रथ, झोपाळा किंवा नुसतीच कोनाड्याची चौकट अशी साधी सजावट करतात. तयार केलेल्या सजावटी सुध्दा बाजारात मिळतात, पण निर्मितीचा आनंद घेण्यासाठी बहुतेक उत्साही लोक शक्यतोंवर स्वतःच सजावट निर्माण करतात. काही निर्मितिक्षम (क्रिएटिव्ह) लोक एकादा विषय (थीम) घेऊन त्यानुसार देखावा निर्माण करतात. विविध आकारातील थर्मोकोलच्या वस्तु व शीट्स, पुठ्टे, रंगीबेरंगी कागद, रंग वगैरे अनेक गोष्टी या कामासाठी बाजारात मिळतात. त्यांना उठाव आणण्यासाठी त-हेत-हेच्या माळा, पताका, तोरणे, झुंबर, कळस, कृत्रिम फुले वगैरे सुध्दा मिळतात. आजकाल विजेच्या रोषणाईचे सुध्दा अनेक प्रकार निघाले आहेत. या सगळ्यांची पहाणी करून निवड करण्यांत, आपल्या परीने नवनवीन आकृत्या बनवून त्यांची जुळवाजुळव करून एक कलाकृती तयार करण्यांत अद्भुत आनंद मिळतो आणि गणरायाच्या उत्सवाच्या निमित्ताने त्यासाठी प्रेरणा मिळते. या काळात बाजारात सहज फेरफटका मारतांनासुध्दा किती तरी सुंदर कलापूर्ण वस्तू दिसतात.


गणपतीची आरास आणि इतर तयारी करण्यात बराच वेळ खर्च केला जातो, सजावट करण्यात हौसेने कलाकुसरत केली जाते, नवनवीन कल्पनांना आकार दिला जातो. गावातली मित्र मंडळी, नातेवाईक वगैरे लोक या निमित्याने भेटायला येतात. चार लोकांनी येऊन आपले कलाकौशल्याचे काम पहावे, त्याचे कौतुक करावे असे वाटत असतेच. आपणही इतरांनी केलेली आरास पहात असतो. यामधून नवीन कल्पना सुचतात, सुरेख असे काही तरी करून पहाण्याची प्रेरणा मिळते. क्रिएटिव्ह असे काही तरी करण्याची हौस भागवून घेता येते. मी पूर्वी जमतील तसे केलेले काही देखावे आणि बाजारातून आणलेली मखरे यांची काही चित्रे या लेखासोबत दिली आहेत.


Monday, August 28, 2017

गणेशोत्सव २०१७ - भाग -४ - कलाकृतिप्रस्थापित किंवा हौशी अशा बहुतेक चित्रकारांना गणपतीच्या आकृतीचे आकर्षण असते आणि तिला आपल्या प्रतिभेचे पंख लावून सजवावेसे वाटते. लहान मुलांनासुध्दा गणपतीचे चित्र काढावे असे उत्स्फूर्तपणे वाटते आणि ते ब-यापैकी ओळखण्याइतपत जमते. गणेश ही कलेची देवता आहेच. याबद्दल मी पूर्वी लिहिलेला लेख नव्या चित्रांसह खाली दिला आहे. वर दिलेले सुंदर चित्र माझे कलाकार आणि कलाप्रेमी स्नेही श्री.यशवंत केळकर यांनी चितारले आहे.


कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प ४

मागच्या भागांतली दुकानांत विक्रीसाठी ठेवलेली चित्रे व मूर्ती या गोष्टी अज्ञात कलाकारांनी बनवलेल्या असतात,  त्यातील कांही वस्तु मोठ्या संख्येने कारखान्यांत यंत्राद्वारे निर्माण झालेल्या असतात. त्यांचे मूळ डिझाईन कोणी केले ही माहिती सहसा उपलब्ध नसते. खेड्यापाड्यातील हस्तकला पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या पारंपरिक पध्दतीने घडवली जात असते तशीच नवनव्या सामुग्रीचा व तंत्रांचा उपयोग करीत विकसित होत असते. व्यक्तिगत हस्तकौशल्यानुसार त्यात नवनवीन सौंदर्यस्थाने निर्माण होत असतात. कधी कधी ग्राहकांच्या मागणीनुसार सुध्दा त्यांत सुधारणा होतात. यामुळेच नवनवीन कल्पनांचे आविष्कार होत असतांना व बाजारांत नित्य नव्या वस्तु येतांना दिसतात.

प्रथितयश चित्रकार व मूर्तीकारांना सुध्दा गणेशाच्या रूपाचे मोठे आकर्षण वाटते. आपल्या असामान्य कलाविष्काराने आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त श्री.वासुदेव कामत यांचे नांव सर्वांनीच ऐकले असेल. जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्तीचित्रकार म्हणून त्यांची निवड होऊन नुकताच अमेरिकेत त्यांचा सन्मान करण्यात आला. मॉडर्न आर्टच्या जमान्यात व छायाचित्रांच्या स्पर्धेत वस्तुनिष्ठ व्यक्तीचित्रणाला त्यांनी उच्च स्थान मिळवून दिले आहे. अशा थोर चित्रकाराने गणेशाच्या सहजसुंदर रूपावर सुंदर लेख लिहिला आहे. ते लिहितात की "कलाक्षेत्रातील सर्व कलाकारांचे गणपती हे एक आवडते दैवत आहे. कुणीही कसेही काढले तरी सुंदर दिसणारे एकमैव दैवत. या भारतवर्षात असा एकही चित्रकार, शिल्पकार झाला नसावा, की ज्याने गजाननाचे चित्र साकारले नसेल." श्री कामतांनी स्वतः तर अगदी लहानपणी मातीचे गणपती बनवण्यापासून आपल्या कलासाधनेला सुरुवात केली. त्यांनी काढलेली द्विहस्त गजाननाची चित्रे अत्यंत सुंदर, प्रसिध्द व लोकप्रिय आहेत.


श्री अरुण दाभोळकरांची सर्व प्रकारची मनोहर चित्रे नांवाजली गेली आहेत. उपयोजित कलेचा मोठा उद्योग त्यांनी उभारला आहे. पण ते गणपतीवाले दाभोळकर म्हणूनच प्रसिध्द झाले. ते सांगतात की कलाकाराच्या दृष्टीने इतका बेसिक आणि तितकाच अलंकृत असा इतका मोठा आवाका फक्त गणपतीचाच आहे. एकाद्या कलाकाराची कला, ऊर्मी, चैतन्य व संकल्पना या सा-या गोष्टी एका मंगल क्षणी एकत्र एकत्र येऊन कागदावर उमटतात व गणपतीची कलाकृती साकारते. श्री.अच्युत पालव यांनी तर गणपतीच्या विविध नांवांची अक्षरे विशिष्ट प्रकाराने लिहून त्यामधून नांवाला समर्पक अशा आकृत्या तयार केल्या आहेत.

बहुतेक सर्व प्रसिध्द कलाकारांनी आपापल्या शैलीमध्ये गणपतीची चित्रे वा शिल्पे बनवलेली आहेत.  त्याचा आकार कुठल्याही कलावंताच्या प्रतिभेला  आवाहन करीत असतो व सर्जनशीलतेला एक आव्हान असते. बहुतेक प्रदर्शनात कोठेतरी एकादा गणपती दिसतोच. एका मोठ्या कंपनीच्या विश्रामगृहाच्या प्रशस्त दालनाच्या चारही भिंती जगप्रसिध्द तसेच विवादास्पद चित्रकार एम्. एफ्. हुसेन यांच्या अनेकविध गणेशप्रतिमांनी सजवलेल्या दिसल्या. त्यात कुणाला कांही वावगे दिसले नाही. या व्यतिरिक्त त्यांच्या इतर अनेक चित्रांत गजाननाची प्रतिमा डोकावतांना दिसते.

कशाही पध्दतीने काढले तरी सुंदर दिसणे हे एक गणेशाचे वैशिष्ट्य आहे. त्याचा आकार म्हंटले तर मूर्त आणि म्हंटले तर अमूर्त असा आहे. त्यामुळे पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही शैलीमध्ये काम करणा-या कलावंतांना त्याचे आकर्षण वाटते. त्याला कांहीही शोभूनच दिसते. धनुर्धारी रामाला कोणी लष्करी पोषाख चढवून त्याच्या हातात एके ४७ रायफल दिली तर कुणाला आवडेल?  त्या कृतीचा निषेध सुध्दा होईल. पण गणपतीला आपण कुठल्याही रूपांत प्रेमाने पाहतो. प्रभू रामचंद्राच्या आकृतीने हत्तीचे मस्तक धारण केले तर आपण ते गणपतीचे एक रूपच म्हणू, श्रीरामाचे म्हणणार नाही. अशा प्रकारे दत्तात्रेय, व्यंकटेश, श्रीनाथजी, गोपाळकृष्ण वगैरे विविध रूपातील गणपतींच्या मूर्ती बनवल्या जातात. कोणी कलाकार बालगणपतीला लडिवाळपणे साईबाबांच्या मांडीवर बसवतो तर कोणी साईबाबांनाच गणपतीचा चेहेरा देतो.

अशा नाना प्रकाराने गुणवंत कलाकार आपापल्या प्रतिभेचे आविष्कार गणपतीच्या विविध रूपांना नटवून दाखवत असतात. अशा अनेक सुंदर प्रतिमा या लिंकवर पहायला मिळतील.
https://www.artzolo.com/ganesha-paintings
http://www.fizdi.com/ganesha-paintings/

गणेशोत्सव २०१७ - भाग ३ - शोभेच्या प्रतिमाप्रसिध्द पुरातनकालीन मंदिरांमधली अंतर्गत सजावट अत्यंत प्रेक्षणीय असते. जुन्या काळातल्या वाड्यांच्या जाड भिंतींमध्ये कोनाडे ठेवलेले असत. त्यातल्या दिवाणखान्यांमधल्या कोनाड्यांमध्ये देवादिकांच्या सुरेख मूर्ती मांडून ठेवत आणि भिंतींवर देवांच्या किंवा पूर्वजांच्या तसबिरी लावत. अशीच एक जुनी मूर्ती आणि तसबीर मी मागील भागात दाखवली होती.

काळाप्रमाणे अंतर्गत सजावटीच्या (इंटिरियर डेकोरेशन) कल्पना बदलत गेल्या. आता घराला कोनाडे नसतात आणि भिंतींवर एकादेच मोठे कलात्मक चित्र लावले जाते, पण कांचेच्या शोकेसेसमध्ये निवडक शोभिवंत वस्तू मांडून ठेवून त्यावर प्रकाशझोताची योजना करतात. यात देशविदेशातून आणलेल्या खास गोष्टी तर असतातच, पण आयफेल टॉवर आणि बिगबेनसारख्यांच्या सोबतीला एकादी गणेशाची मूर्तीसुध्दा विराजमान झालेली दिसते. गृहप्रवेश किंवा आणखी एकाद्या समारंभाच्या निमित्याने ज्या भेटवस्तू दिल्या जातात त्यात एक दोन तरी सुबक गणपती असतातच. या प्रतिमांची पूजा अर्चा केली जात नाही, पण त्यांच्या असण्यामुळे त्या खोलीमधले वातावरण मंगलमय होते अशी श्रध्दा तर असतेच. यामुळे अशा भेटवस्तू आवर्जून हॉलमध्ये ठेवल्या जातात. मुंबईपुण्यातच नव्हे तर परप्रांतात व परदेशात जितक्या मराठी कुटुंबांच्या घरी मी गेलो आहे तिथल्या प्रत्येक घरात मला गणपतीबाप्पा ठळकपणे दिसलेच.
अशा काही प्रतिमांची छायाचित्रे या भागात देत आहे.


कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प ३

इंग्लंडमध्ये प्रत्येक प्रेक्षणीय स्थळ पाहून झाल्यावर बाहेर निघण्याच्या वाटेवर नेहमी दोन प्रशस्त दालने दिसतात. एका ठिकाणी उपाहारगृह असते तर दुस-यात अनेक प्रकारची स्मृतिचिन्हे (सोव्हेनीर्स) विकायला ठेवलेल्या असतात. त्या स्थळी असलेल्या कलाकृतींच्या प्रतिकृती, छायाचित्रे, ग्रीटिंग कार्डे व त्यांचेशी संबंधित चित्रे छापलेली त-हेत-हेची स्मृतिचिन्हे तेथे मांडून ठेवलेली दिसतात. वेगवेगळ्या आकारांचे शो पीसेस तर असतातच, लहान मुलांसाठी रबर, पेन्सिली, फूटपट्ट्या पासून ते मोठ्या माणसांचे टी शर्ट्स, थैल्या, चादरी, गालिचे व रोज वापरावयाचे मग्स, बाउल्स, डिशेस अशा विविध वस्तु तिथे असतात. अनेक ठिकाणी अंगठ्या, पदके, बिल्ले वगैरे अलंकारही दिसतात.

भारतात गणपतीचे चिन्ह असलेल्या अशा त-हेच्या वस्तूंचे मार्केटिंग प्रचंड प्रमाणात होते. मुंबईसारख्या शहरांत प्रमुख देवस्थानांच्या आजूबाजूला अशी दुकाने आहेतच, भेटवस्तूंच्या इतर दुकानांतसुध्दा गणपतीच्या प्रतिमा ठळकपणे दिसतात. गणेशचतुर्थीचे सुमारास मोठमोठाली खास प्रदर्शने भरतात व त्यात भारताच्या विविध राज्यामधून आणलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती विकतात. सिंहासनावर बसलेली रेखीव मूर्ती तर आहेच, त्यांतही गणपतीची मुद्रा, पीतांबर, अंगावरील दागदागीने, हातांत धरलेली शस्त्रास्त्रे, सिंहासनावरील नक्षीकाम यांत सूक्ष्म फरक करून वेगळेपण आणलेले असते. त्याशिवाय उभा ठाकलेला, कुशीवर झोपलेला, आपल्या लाडक्या वाहनावर आरूढ झालेला अशा कितीतरी अवस्थांमधील मूर्ती असतात. गणपती हा कलांचा देव आहे हे दर्शवणारी लेखक, वादक, नर्तक ही विलोभनीय रूपे आजकाल विशेष लोकप्रिय आहेत. तबला, पेटी, सारंगी, पांवा, झांजा वगैरे वादकांच्या रूपातील गणेशांचा संचच मिळतो तसेच आपली तुंदिल तनु सांवरीत अगदी कथ्थक ते दांडिया रास गरब्यापर्यंत नर्तनाच्या विविध मुद्रा दाखवणारी गोंडस रूपेही असतात. शिवाय क्रिकेटपटु, संगणक चालवणारा, शाळकरी मुलगा, रांगणारे बाळ अशी गोड चित्रे कुठे कुठे दिसतात.


ज्या पदार्थापासून ही चित्रे बनतात त्यात मोठे वैविध्य दिसते. आजकाल सर्वाधिक मूर्ती प्लॅस्टर आफ पॅरिस व प्लॅस्टिकमध्ये असतात, पूर्वी दगडाच्या किंवा लाकडाच्या असायच्या. आताही असतात, त्यांतही रोजवुड, चंदन, शिसवी वगैरे विविधता. चिकणमातीचे टेराकोटा आणि विशिष्ट मातीचे सिरॅमिक हे भट्टीत भाजलेले लोकप्रिय प्रकार आहेत. त्याशिवाय विविध धातु, पेपर मॅशे, कांच, पोर्सेलीन, फायबर, रेझिन, कापड, कापूस, काथ्या, ज्यूट वगैरे ज्या ज्या पदार्थापासून कोठलीही वस्तु बनवता येऊ शकेल अशा प्रत्येक पदार्थाचा गणेशाच्या प्रतिमा बनवण्यासाठी कोणीतरी वापर करतो. आणि या सा-याच वस्तु आपापल्या परीने अतीशय सुंदर दिसतात.  नऊ प्रकारची धान्ये किंवा फळभाज्या, पालेभाज्या यांपासून सुध्दा गणेशाची प्रतिमा बनवतात तर कांही मूर्तींवर वाळूचे बारीक कण चिकटवून एक वेगळाच लूक् आणलेला असतो. कांही मूर्ती नाजुक मीनाकारीने मढवलेल्या असतात.

या वस्तु अक्षरशः अगणित प्रकारच्या असतात.  शो केसमध्ये ठेवायच्या मूर्ती वेगळ्या आणि पेडेस्टलवर बसवायच्या वेगळ्या, मोटारीत डॅशबोर्डावर ठेवायच्या त्याहून निराळ्या. भिंतीवर लटकवायच्या संपूर्ण त्रिमिति आकृत्या असतात किंवा नुसतेच मुखवटे. कागद, कापड किंवा ज्यूटपासून बनवलेले वाल हँगिंग्ज वेगळेच.  त्यावरही रंगकाम, विणकाम व भरतकामाची वेगवेगळी कलाकुसर असते. कधी कधी कौशल्यपूर्ण विस्तृत बारीक काम केलेल्या पूर्णाकृती असतात तर कुठे फक्त चार पांच वक्र रेषांमध्ये किंवा साध्या त्रिकोण, चौकोनांच्या रचनेतून त्याचा आकार दाखवलेला असतो आणि कुठे फक्त सोंड व दात दाखवून त्याचा आभास केलेला. गजाननाचे चित्र असलेले खिशांत ठेवायचे किल्ल्यांचे जुडगे तसेच ते भिंतीवर टांगायचा स्टँड दोन्ही असतात. घड्याळे तर सर्रास दिसतात. सराफांच्या दुकानांत दागदागिन्यांबरोबर सोन्याचांदीच्या वस्तूही ठेवलेल्या असतात, त्यात देवदेवतांच्या प्रतिमासुध्दा असतात. दिवाळीमध्ये पूजेसाठी लक्ष्मीचे चित्रांची नाणी घेतात. तशीच गणपतीचे किंवा लक्ष्मी, सरस्वती, गणपती या त्रयींचे शिक्के पण असतात. गणेशाच्या विविध मुद्रांमधील मूर्तीसुध्दा ठेवतात. आजकाल गणपतीच्या हिरेजडित प्रतिमा निघाल्या आहेत. अशी कुठकुठली किती रूपे वर्णावीत?

Saturday, August 26, 2017

गणेशोत्सव २०१७ - भाग २ - गणेशाच्या प्रतिमामहादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांची भव्य मंदिरे आहेतच, शिवाय जेजुरीचा खंडोबा, कोल्हापूरजवळचा ज्योतिबा यासारखी अनेक पुरातन देवस्थाने आहेत. बद्रीनारायण, जगन्नाथ, व्यंकटेश, श्रीनाथजी, अनंतस्वामी, वगैरे नावांनी प्रसिध्द असलेली भगवान विष्णू किंवा त्याच्या अवतारांची अनेक मोठी देवळे आहेत. प्रत्येक देवळात प्रथमपूजेचा मान गणेशाला असला तरी फक्त गणपतीची मोठी पुरातनकालीन मंदिरे माझ्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आली नाहीत. गणेश हे पेशवे आणि त्यांचे सरदार, विशेषतः पटवर्धन यांचे कुलदैवत होते. त्यांनी आपापल्या राज्यांत गणपतीची देवळे बांधली किंवा जुन्या देवळांचे पुनरुज्जीवन केले. सांगली येथील गणपतीचे मंदिर सुंदर आहे. अष्टविनायक हा चित्रपट आल्यानंतर या देवळांची लोकप्रियता खूप वाढली. तिथे भाविकांची खूप गर्दी होत असली तरी ती भव्य म्हणण्यासारखी नाहीत.

जुन्या काळातसुध्दा दिवाणखान्यातल्या भिंती आणि कोनाडे सुशोभित केले जात असत आणि त्यामध्येही धार्मिक चित्रे व मूर्तींचा उपयोग सर्रास केला जात असे. अशीच एक सुंदर गणेशमूर्ती आणि रंगचित्र वर दाखवले आहेत.


कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प २

आपल्या देशांत जागोजागी पुरातन देवालये आहेत, नवी नवी बांधली जात आहेत. त्यातील प्रत्येक देवळांत मुख्य गाभा-यात नाहीतर एखाद्या वेगळ्या छोट्या गोभा-यात, निदान एका खास कोनाड्यात कुठेतरी श्रीगजाननाची मूर्ती अवश्य दिसते. आधी त्याला वंदन करूनच भक्तजन पुढे जातात. शिवाय खास गणपतीची वेगळी देवळे आहेतच.  पश्चिम महाराष्ट्रात ती जास्त करून दिसतात. सुप्रसिध्द अष्टविनायक आहेतच, त्यात गणना होत नसलेली पण तितकीच लोकप्रिय अशी टिटवाळा व गणपतीपुळे येथील देवस्थाने आहेत. मुंबईमधील प्रभादेवीच्या सिध्दीविनायकाचा प्रचंड भक्तसमुदाय आहे. त्याशिवाय पुण्याचे कसबा गणपती, तळ्यातला गणपती, सांगलीच्या संस्थानिकांचा गणपती वगैरेंची मंदिरे लोकप्रिय तसेच प्रसिध्द आहेत. ही सर्व जागृत व इच्छित फलदायी देवतांची स्थाने आहेत असा त्यांचा लौकिक आहे व या सर्व स्थानी श्रध्दावान भक्तांची मोठी गर्दी असते.

     श्री सिध्दीविनायक, प्रभादेवी, मुंबई

दोन तीन सन्माननीय अपवाद वगळता यातील बहुतेक ठिकाणच्या मूर्ती स्वयंभू आहेत, अर्थातच त्यांत कोरीव कामाचे कौशल्य नाही. गणपतिपुळ्याला अत्यंत विलोभनीय असा समुद्रकिना-याचा परिसर लाभला आहे. इतर ठिकाणे रम्य असली तरी सृष्टीसौंदर्यासाठी फारशी प्रसिध्द नाहीत. कांही मंदिरांच्या इमारती सुध्दा शिल्पकलेचे नमूने म्हणून पहाण्यासारख्या असल्या तरी मदुराई, रामेश्वरम् येथील मंदिरांसारख्या भव्य दिव्य नाहीत. त्यामुळे तेथे येणारे लोक भक्तीभावनेने येतात, कांहीतरी अद्भुत दृष्य पहायला मिळेल या अपेक्षेने प्रेक्षकाच्या भूमिकेतून येत नाहीत किंवा मौजमजा करण्यासाठी निघालेले प्रवासी इथे येत नाहीत.

बहुतेक सर्व आधुनिक देवळांत, विशेषकरून बिर्लांनी देशात ठिकठिकाणी बांधलेल्या सुंदर मंदिरांमध्ये गजाननाच्या मनोरम अशा प्रतिमा स्थापन केलेल्या दिसतातच पण अशा मंदिरांबाहेर सुध्दा कित्येक ठिकाणी गणपतीच्या सुबक मूर्ती पहायला मिळतात. बहुतेक सा-या पुराणवस्तु संग्रहालयात विनायकाच्या प्राचीन कालीन मूर्ती दिसतातच. कधीकधी एखाद्या मोठ्या होटेलांत, इस्पितळांत किंवा मंगलकार्यालयात  प्रवेशद्वाराजवळ त्याच्या आकर्षक व सुशोभित मूर्तीची स्थापना केलेली पाहून सुखद धक्का बसतो. संगमरवर किंवा गारगोटीच्या शुभ्र दगडामध्ये किंवा काळ्याभोर प्रस्तरात त्यांचे कोरीव काम सुबकपणे केलेले असते. कांही ठिकाणी मिश्रधातूंचे ओतीव काम करून हे शिल्प बनवलेले असते.

आजकाल शोभिवंत वस्तु विकणा-या सा-या दुकानांमध्ये विविध आकारांचे व विविध सामुग्रीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्ती प्रामुख्याने ठेवलेल्या दिसतात. त्यासंबंधी पुढच्या भागांत पाहू.

Friday, August 25, 2017

गणेशोत्सव २०१७ - भाग १ - प्रस्तावना
ब्रह्मा, विष्णू, शंकर आदि देवतांची एक दोन ठराविक रूपेच त्यांच्या बहुतेक सर्व चित्रांमध्ये किंवा मूर्तींमध्ये आपल्याला दिसतात. गणपती हा मात्र एक आगळा देव आहे, ज्याची अनंत रूपांमध्ये पूजा केली जाते. गजानन, एकदंत, वक्रतुंड, लंबोदर वगैरे नावांमधून त्याच्या साकार रूपाचे वर्णन दिले आहे, शिवाय हिरेजडित मुगुट, रुणझुणती नूपुर वगैरे त्यांचे अलंकारसुध्दा आरतीमध्ये दिले आहेत. तरीसुध्दा गणेशाची चित्रे आणि मूर्ती यांमधून त्याची अगणित वेगवेगळी रूपे दाखवण्याचे स्वातंत्र्य कलाकार घेतात आणि लोकांना ती आवडतात. गणेशोत्सवामध्ये तर कलाकारांच्या कल्पकतेला बहर आलेला दिसतो.

२००६ मध्ये मी हा ब्लॉग लिहायला घेतला त्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये गणपतीची काही वेगळी रूपे दाखण्याच्या विचाराने ' कोटी कोटी रूपे तुझी ' ही लेखमाला लिहिली. त्यानंतरच्या काळातसुध्दा गणेशोत्सवावर आधारलेले काही लेख मी दर वर्षी लिहित होतो. मला गणेशाच्या या विविध रूपांचा संग्रह करायचा छंदही लागला. आता ११ वर्षांनंतर जुन्या मालिकेमधील कांही लेखांमधला सारांश माझ्या संग्रहामधील  चित्रांसोबत या वर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत देण्याचा माझा मानस आहे.

कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प १

कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे । कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देव्हारे ।।
असे कवीवर्य यशवंत देव यांनी देवाला म्हणजे परमेश्वराला म्हंटलेले आहे. पण श्रीगणेशाला मात्र त्याचे भक्तगण अनेक रूपांत नुसते पाहतातच नव्हे तर त्याच्या विविध रूपांमधील प्रतिकृती बनवून त्याची आराधना करतात. अशाच कांही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीबद्दल मी आणि आपण जे रोज वाचतो त्यातलंच थोडे सांगणार आहे.

आपल्याकडे देवदेवतांच्या भिन्न प्रकारच्या मूर्ती असतात. कायम स्वरूपाच्या मूर्तींची देव्हा-यात व देवळांत स्थापना करून त्यांची पिढ्या न पिढ्या, वर्षानुवर्षे पूजा केली जाते. या मूर्ती दगडांपासून किंवा धातूंच्या बनवलेल्या असतात. वातावरणातील आर्द्रता आणि रोजच्या धुण्यापुसण्याने त्यांची झीज न होता त्या दीर्घकाळ टिकतात.  बहुतेक मूर्ती घडवतांना त्यांना सुबक आकार दिलेले असतात. कांही विवक्षित ठिकाणी सापडणा-या खड्यांना वा गोट्यांना विशिष्ट देवतांचे प्रतिनिधी मानले जाते तर कांही ठिकाणी सर्वसामान्य दिसणा-या दगडांना शेंदूर माखून देवत्व प्रदान केले जाते.  शेवटी "भाव तेथे देव" असतो म्हणतात. नैसर्गिक रीत्याच श्रीगणपतीचा थोडाफार भास होत असणा-या स्वयंभू मूर्तीसुध्दा अनेक जागी पहाण्यात येतात. कधीकधी तर त्या एखाद्या मोठ्या खडकाचा अभिन्न भाग असतात व त्यांच्या सभोवती देऊळ बांधलेले असते.

बहुतेक देवतांच्या वेगळ्या अशा उत्सवमूर्ती असतात. खास उत्सवप्रसंगी कांही काळासाठी त्यांना एका वेगळ्या ठिकाणी आकर्षक रीतीने मांडतात. त्यांना नवनव्या कपड्यांनी सजवतात व दागदागीन्यांनी मढवतात. आजूबाजूला नयनरम्य सजावट करतात. कुठे कुठे त्यांची पालखीमधून किंवा रथातून गाजावाजाने मिरवणूक काढण्यात येते.
मोठ्या देवळांच्या गाभा-यांतील मुख्य देवतेच्या मोठ्या मूर्तीशिवाय आजूबाजूला इतर अनेक देवतांच्या लहान लहान मूर्तींची स्थापना केलेली असते. या शिवाय देवळांच्या भिंती, कोनाडे, शिखरे वगैरेवर देवतांच्या तसबिरी वा प्रतिकृती काढलेल्या असतात. प्रवेशद्वारावर तर गणपतिबाप्पा बसलेले हमखास दिसतात. पूर्वीच्या काळी घरोघरी दिवाणखान्याच्या भिंतीवर मोठमोठी चित्रे लावून ठेवायची पध्दत होती. त्यात गजाननाशिवाय श्रीरामपंचायतन, गोपाळकृष्ण व भगवान शंकर पार्वतीसुध्दा त्या घराण्यातील दिवंगत झालेले पूर्वज, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, संत ज्ञानेश्वर, मेनकेसह ऋषि विश्वामित्र, महात्मा गांधी, पंडित नेहरू वगैरेंच्या सहवासात सुखेनैव विराजमान होत. कालानुसार ही प्रथा मागे पडत गेली असली तरी गणपतीच्या प्रतिमा मात्र अनंत रूपाने जागोजागी मांडलेल्या दिसू लागल्या आहेत. किंबहुना तो एक सजावटीचा भागच होऊन बसला आहे.

कुठलीही शुभकार्याची निमंत्रणपत्रिका गणपतीच्या चित्राला मुखपृष्ठावर घेऊन येते. त्याची महती सांगणा-या ध्वनिफिती धडाक्याने विकल्या जातात. अनेक प्रकारच्या वस्तूंच्या जाहिराती गजाननाच्या नांवाने केल्या जातात.
-----------------------------------------------------------
आजचे विशेष चित्र ः उडीशामधील प्राचीन गणेशमूर्ती

---------------------------------------------
गणपती आणि चंद्र

चन्द्र हा सौन्दर्याचे प्रतीक आहे किंवा मानदंड आहे. चन्द्रमुखी, मुखचन्द्रमा वगैरे शब्दांचा प्रयोग साहित्यामध्ये सढळपणे केला जातो. चन्द्राचे अस्तित्व, त्याचे दर्शन प्रेमभावनेला पोषक आहे. अशा प्रकारे गणपतिचा बुध्दीशी किंवा मेंदूशी संबंध आहे तर चन्द्राचा हृदयाशी आणि भावनांशी.

पुराणात अशी एक कथा आहे की एकदा आपले गणपती बाप्पा त्यांचे वाहन असलेल्या उंदरावर बसून कुठे लगबगीने निघाले असतांना तोल जाऊन पडले. त्या वेळी आकाशात असलेल्या चंद्राने ते पाहताच तो जोराने हंसायला लागला. यामुळे गणपतीला राग आला आणि त्याने चंद्राला असा शाप दिला की जो कोणी त्याला पाहील त्याच्यावर चोरीचा आळ येईल. चंद्राने खूप गयावया केल्यावर गणपतीने त्याला अशा प्रकारचा उःशाप दिला की गणेशचतुर्थीच्या दिवशी त्याला कोणी पाहू नये, पण संकष्टीच्या दिवशी अवश्य पहावे.
http://anandghan.blogspot.in/2011/08/blog-post_28.html


परंपरागत प्रथेप्रमाणे गणेशचतुर्थीचे दिवशी चन्द्राचे दर्शन एकदम वर्ज्य ठरवले आहे तर संकष्टी चतुर्थीच्या व्रचाची सांगता चन्द्रोदय झाल्यानंतरच होते. काय विरोधाभास आहे ना?  थोडा विचार केला तर त्यामागील सुसंगत कारण लक्षात येईल. गणेशचतुर्थीला भक्ताने स्वतःला गणपतिच्या आराधनेमध्ये वाहून घ्यावे. त्या दिवशी एकाग्र चित्ताने निव्वळ ज्ञानसाधना करावी. अत्यंत देखणी अशी चवतीच्या चन्द्राची कोर आकाशातून खुणावत असली तरी निग्रहाने आपले चित्त ढळू न देता तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून ज्ञानसाधनेवर चित्त केन्द्रित करण्याचा प्रयत्न करावा, बुध्दीने मनावर ताबा मिळवावा असा हेतु आहे.

संकष्टी चतुर्थीच्या संध्याकाळी भक्ताचे लक्ष विचलित करायला चन्द्र आकाशात हजरच नसतो. पण माणूस केवळ ज्ञानसाधनेच्याच मागे लागून वाहवत गेला तर तो भावनाशून्य होण्याची शक्यता असते.  माणसातील माणुसकी टिकवून धरण्यासाठी त्याला यापासून वेळीच सावध करणे आवश्यक आहे. चन्द्रदर्शन हाही व्रताचाच एक भाग करून बुध्दी आणि मन, ज्ञान आणि भावना यातील समतोल साधण्याचा सुंदर उपाय आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवला आहे. शुक्लपक्षामध्ये पौर्णिमेपर्यंत चन्द्राचे दर्शन सुलभपणे होत असते. पण कृष्ण चतुर्थीला मुद्दाम चन्द्र उगवण्याची वाट पहात उपाशी रहाण्याने  त्याचे महत्व चांगले लक्षात येते.