Wednesday, January 15, 2014

भीष्मपितामह, उत्तरायण आणि मकर संक्रांत


 मी लहान असतांना उत्तरायण हा शब्द फक्त भीष्मपितामहांच्या कथेमध्येच ऐकला होता. एरवी कधीसुद्धा कोणाच्याही बोलण्यातही तो येत नव्हता किंवा मी वाचत असलेल्या लिखाणामध्येही कधी डोकावत नव्हता. यामुळे भीष्मपितामह आणि उत्तरायण या शब्दांची जोडी झाली होती. हे उत्तरायण मकरसंक्रमणापासून सुरू होते एवढीच अधिक माहिती त्याच्या संबंधात समजली होती.

भीष्म हे महाभारतातले एक प्रमुख पात्र असामान्यांहून असामान्य असे आहे. सर्वसाधारण लोकांच्याच नव्हे तर लोकोत्तर अशा असामान्य माणसांच्या जीवनातसुद्धा आल्या नसतील इतक्या विचित्र घटना त्यांच्या खडतर आयुष्यात त्यांना पहाव्या आणि सोसाव्या लागल्या आणि कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळे काही वेगळ्याच वाटेने घडत गेले. त्यांची आई त्यांना जन्मतःच पाण्यात बुडवायला निघाली होती. "तू हे असं का करते आहेस बाई?" एवढासाच प्रश्न तिच्या नव-याने विचारल्यानंतर ती रुष्ट होऊन त्या बाळाला घेऊन तरातरा चालली गेली. त्या मुलाचे बालपण कसे गेले कोण जाणे, पण त्याला सगळी शास्त्रे आणि शस्त्रविद्या शिकवून सर्वगुणसंपन्न करून त्याच्या वडिलांच्या सुपूर्द केले गेले. त्यानंतर वडिलांना सुखी करणे एवढाच सिंगल पॉइंट प्रोग्रॅम घेऊन तो युवक देवव्रत त्यासाठी काय वाटेल ते करायला तयार झाला. आधी स्त्रीस्वातंत्र्याचा अतिरेक करणारी पत्नी आणि त्यानंतर तिचाही विरह यांच्याबरोबर सगळे आयुष्य घालवून झाल्यानंतर देवव्रताच्या पिताश्रींना उतारवयात प्रेम करावेसे वाटले. पण ते सफळ होणार नाही या विचाराने ते दुःखी झाले. त्यांना निदान आता तरी चार सुखाचे दिवस मिळावेत म्हणून तरुण देवव्रताने राजसिंहासनावरचा आपला हक्क तर सोडलाच, कधीही लग्नच न करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली. शिवाय हस्तिनापूरचा जो कोणी राजा असेल त्याच्याशी एकनिष्ठ राहीन असे वचन दिले. वडिलांच्या मृत्यूनंतर आलेले सगळे राजे एकाहून एक नालायक निघाले तरी भीष्माला मात्र आपल्या वचनपूर्तीसाठी त्यांना पाठीशी घालावे लागले, त्यांचेच संरक्षण करत रहावे लागले.

महाभारत युद्धात पांडवांचा पक्ष न्याय्य आहे हे मनापासून पटलेले असले तरी भीष्माला कौरवांच्या सेनेचे सेनापतीपद सांभाळून त्यांचाच विजय व्हावा यासाठी लढावे लागले आणि ते इतक्या निकराने लढले की अर्जुनाच्या रथाचा त्यांनी चक्काचूर केला. "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार" असे आश्वासन दिलेल्या श्रीकृष्णाला हातात रथाचे चाक घेऊन त्यांच्यावर धावून जावे लागले. अखेर श्रीकृष्णाच्या सूचनेनुसार अर्जुनाने शिखंडीला सारथ्याच्या जागी बसवले. तत्वनिष्ठ भीष्माचार्यांनी हातातले धनुष्य खाली ठेवले आणि शिखंडीच्या मागे दडून अर्जुनाने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले नाही की तो थांबवण्याचा प्रयत्न केला नाही की रणांगणामधून पळ काढला नाही. त्याने सोडलेले बाण त्यांच्या शरीरात घुसत राहिले.

आपले सारे जीवन अर्पण करण्याच्या मोबदल्यात भीष्माला काय मिळाले? तर इच्छामरण ! त्याला स्वतःला जोपर्यंत इच्छा होणार नाही तोपर्यंत तो मरणारच नाही असा वर मिळाला. त्यामुळे त्याला युद्धामध्ये कोणीही मारूच शकत नव्हता, हस्तिनापूरच्या राजाच्या बाजूने तो लढाया लढत होता, त्या जिंकत होता आणि त्यातून धन, दौलत आणि राजकन्यांनासुद्धा जिंकून राजांकडे आणून देत होता. राजांची सगळी मदार भीष्मावरच असल्यामुळे आपल्यानंतर त्या राज्याचे काय होईल या चिंतेमुळे तो मरणाची इच्छासुद्धा करू शकत नव्हता. इतर माणसांच्या मनात ज्या प्रकारच्या इच्छा रूढपणे येत असतात, तशा भीष्मालाही कधी झाल्या असल्या तरी त्यांची पूर्ती मात्र कधीच होऊ शकली नाही. अखेरच्या क्षणी त्याने एकच शेवटची इच्छा बाळगली ती म्हणजे कधी प्राण सोडावा ही. या बाबतीत फक्त तो स्वतःच ठरवू शकत होता. त्याची कुठलीही कर्तव्ये, प्रतिज्ञा किंवा वचने त्याच्या आड येत नव्हती.

शिखंडीच्या आडून अर्जुनाने मारलेले अनेक बाण भीष्माचार्यांच्या शरीरामधून आरपार गेले तरी त्यांचे प्राण मात्र गेले नाहीत, कारण त्यांच्या स्वतःच्या इच्छेशिवाय ते जाऊच शकत नव्हते. पण शरीराच्या तशा छिन्नभिन्न अवस्थेत किती वेदना होत असतील त्या सहन करीत त्यांनी आणखी काही काळ जगत रहायचे ठरवले. अंगात शिरलेले बाण बाहेर न काढता त्यांच्या शय्येवर ते पडून राहिले. कारण काय तर त्यावेळी दक्षिणायन चाललेले होते. ते संपून उत्तरायण सुरू झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला तर ते स्वर्गात जातील असा त्यांचा विश्वास होता. या घटनेच्या दहाच दिवस आधी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश केला होता, त्यात त्यांनी म्हंटले होते, "हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम्" म्हणजे "मृत्यू पावलास तर स्वर्गात जाशील." युद्धात मरण पावला तर क्षत्रिय स्वर्गात जातील असे त्या काळात मानले जात होते. म्हणजे तसा विचार केल्यास हे दक्षिणायन त्यांच्या स्वर्गात जायच्या आड येत नव्हते. ही गोष्ट सगळी शास्त्रे जाणणा-या भीष्माला माहीत नसेल का? दक्षिणायनात चाललेल्या त्या युद्धामध्ये जे लक्षावधी योद्धे मारले गेले ते सगळे नरकात गेले असतील का? त्यांनी जन्मभर केलेल्या पापुण्याचा हिशोब कुठे गेला? असले प्रश्न विचारायचे नसतात. यातला शाब्दिक अर्थ न घेता त्यात दडलेली रूपके किंवा अध्यात्म शोधायचे असते असे म्हणून ते टोलवले जातात. 

उत्तरायण आणि मकर संक्रांत यांचा संबंध कसा आणि कधी जुळला असेल हा सुद्धा संशोधनाचा विषय ठरेल. कोणत्याही वर्षातल्या मकर संक्रांतीपासूनच सूर्याने प्रत्यक्षात उत्तरेकडे सरकायला सुरुवात केली असे गेल्या दहा पिढ्यांमध्ये तरी झालेले नाही. पण प्रत्येक पिढीतल्या मोठ्या लोकांनी पुढल्या पिढीमधल्या मुलांना असेच सांगितले आहे. काल होऊन गेलेल्या संक्रांतीलासुद्धा असेच सांगितले जात होते. भूगोल किंवा खगोलशास्त्राच्या दृष्टीने या दोन निरनिराळ्या घटना असतात. दिवसांचे लहान किंवा मोठे होत जाणे यामुळे उन्हाळा आणि हिवाळा येणे हे चक्र दर वर्षी रिपीट होत असते. उत्तरायणामध्ये रोजचा सूर्योदय आदल्या दिवसाच्या मानाने थोडा आधी होतो आणि सूर्यास्त थोडा उशीराने होतो. यामुळे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. याचप्रमाणे सूर्योदयाच्या वेळी त्याचे बिंब क्षितिजावरील ज्या बिंदूमधून वर येतांना दिसते तो बिंदू हळू हळू उत्तरेकडे सरकत असलेला दिसतो. दुपारी बारा वाजता माथ्यावर आलेला सूर्य बरोबर डोक्यावर नसतो, तो किंचित दक्षिणेच्या किंवा उत्तरेच्या बाजूला असतो. पूर्वेला सूर्योदय होतो असे म्हंटले जात असले तरी ते वर्षामधून फक्त दोनच दिवशी घडते. इतर सर्व दिवशी सूर्योदयाची जागा पूर्व दिशेच्या किंचित डावीकडे म्हणजे उत्तरेला किंवा थोडी उजवीकडे म्हणजे दक्षिणेच्या बाजूला असते. तिथून उगवल्यानंतर तो थोडा उत्तर किंवा दक्षिणेच्या बाजूनेच आकाशामधून फिरून पुन्ः थोडा उत्तर किंवा दक्षिणेच्या बाजूनेच मावळतीला टेकत असतो. २१ डिसेंबरच्या दिवशी ज्या ठिकाणाहून सूर्योदय होतो हे त्याचे दक्षिणपूर्वेकडले टोक झाले. त्यानंतर २२ डिसेंबरपासून तो बिंदू उत्तरेकडे सरकू लागतो म्हणून उत्तरायण सुरू होते. २२ डिसेंबर २०१२ रोजीच तसे ते होऊन गेले आहे. हे उत्तरायण सहा महिने चालेल. तोपर्यंत रोजचा सूर्योदय, त्याचे माथ्यावर येणे आणि असत हे बिंदू उत्तरेकडे सरकत जातील, दिवस मोठे आणि रात्री लहान होत जातील. त्यानंतर जून महिन्यातले लाँगेस्ट डे होऊन गेला की दक्षिणायन सुरू होऊन ते पुन्हा सहा महिने चालेल, अशा प्रकारे दर वर्षी याची पुनरावृत्ती होत जाईल. हे चक्र पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे घडते हे आपण भूगोलात शिकतो.

सूर्य आभाळात असतांना त्याच्या प्रकाशात इतर तारे दिसत नाहीत, पण भल्या पहाटे किंवा रात्री केलेल्या निरीक्षणावरून सूर्य कोणत्या राशीमध्ये आहे हे अचूकपणे ठरवता येते. आकाशातल्या बारा राशींमधून त्याला फिरून मूळ जागेवर येण्यासाठीसुद्धा एक वर्षाचा काळ लागतो. याचे कारणसुद्धा पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला एक वर्षाइतका म्हणजे सुमारे ३६५ दिवसांचा काळ लागतो हे आता आपल्याला माहीत झाले आहे. सूर्य हा मध्यभागी असून मंगळ, बुध, गुरू, शुक्र या ग्रहांप्रमाणेच पृथ्वीसुद्धा त्याला प्रदक्षिणा घालत असते हे गेल्या काही शतकांमध्ये शिकवले जात आहे. पण जमीनीवरूनच सूर्याचे निरीक्षण करून त्यावरून केलेल्या कालगणना त्याच्याही आधी  कित्येक शतके किंवा हजार वर्षांपूर्वीपासून उपयोगात आणल्या जात आहेत. सूर्याची सारी निरीक्षणे एक वर्षानंतर पुनः जशीच्या तशीच रिपीट होत असतात हे पाहून त्यावरूनच वर्ष हा कालावधी ठरवला गेला. 

पाश्चात्य लोकांचे सौर वर्ष ठरवतांना फक्त सूर्याचा विचार केला जातो. इस्लामिक लोकांचे चांद्रवर्ष असते. त्याचा या विषयाशी काहीच संबंध नसल्याने ते बाजूला ठेवू. भारतीय पंचांगांमध्ये चंद्राच्या कलेकलेने मोठ्या आणि लहान होत अदृष्य होण्याच्या कालखंडाचा महिना ठरवला गेला आणि अशा बारा महिन्यांचे एक वर्ष. पण असे चांद्रवर्ष आणि सौर वर्ष यांची सांगड घालण्यासाठी अधिक महिना आणला गेला. प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला सूर्य आणि चंद्र दोघेही एका राशीत येतात. त्यात चंद्र पाठीमागून येतो आणि सूर्याला ओव्हरटेक करून पुढे जातो. असे दर महिन्यात घडत असते. सूर्याला एक राशी पार करायला सुमारे साडेतीस दिवस लागतात म्हणजे एक महिन्यानंतर तो पुढल्या राशीत असतो. तिथे असलेल्या सूर्याला गाठून पार करण्यासाठी चंद्राला सुमारे साडे एकोणतीस दिवस लागतात. यामुळे कधीकधी असे घडते की एका महिन्यातच ते दोन वेळा घडते. आधीच्या अमावास्येला ज्या राशीमध्ये सूर्य नुकताच गेलेला असतो त्याच राशीच्या दुस-या टोकाशी तो पुढल्या अमावास्येलासुद्धा असतो. त्यानंतरचा महिना अधिक ठरवला जातो. असा प्रकारे हा सांगड घातली जाते.

उत्तरायण आणि दक्षिणायन मिळून होणारा एका वर्षाचा कालखंड आणि सूर्याने बारा राशींमधून फिरून आपल्या मूळ जागी लागणारा कालखंड हे दोन्ही सुमारे ३६५ दिवस आणि सहा तास इतके असतात. स्थूलमानाने हे ठीकच असले तरी सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर असे दिसून येते की त्यात काही मिनिटांचा फरक असतो. वाढत वाढत ७०-७२ वर्षांमध्ये तो एका दिवसाइतका होऊ शकतो. दर वर्षी सूर्याचे मकर राशीत होणारे संक्रमण तीन चार वर्षांपूर्वी फक्त १४ जानेवारीलाच होत असे. आजकाल ते कधी १४ तर कधी १५ ला होते. या अनिश्चिततेचे कारण असे आहे की इंग्रजी कॅलेंडरमधला दिवस रात्रीच्या बारा वाजता सुरू होतो, तर भारतीय पंचांगांमधला दिवस सकाळी सूर्योदयाबरोबर होतो, शिवाय लीप ईयरमुळे इंग्रजी वर्ष कधी ३६५ तर कधी ३६६ दिवसांचे असते यामुळेही फरक पडतो. आणखी काही वर्षांनी ते फक्त १५ जानेवारीलाच होईल. सूर्याच्या राशीमधून फिरण्याच्या कालावधीवरून वर्ष ठरवण्याच्या पद्धतीला निरयन असे म्हणतात. भारतात ही पद्धत जास्त प्रचलित आहे. सूर्याचे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे सरकणे यावरून ठरवले जाणारे वर्ष हे काही मिनिटांनी मोठे असते. याला सायन पद्धती म्हणतात. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ही पद्धत वापरली जाते. पूर्वीच्या काळात तिकडेसुद्धा निरयन पद्धत होती, पण सातआठशे वर्षांपूर्वी ती बदलण्यात आली आणि कॅलेंडरमधल्या काही तारखा गाळून तोपर्यंत झालेल्या फरकाची पूर्ती करण्यात आली.  भारतीय विद्वानांना सायन पद्धत माहीत झाली होती, पण ऋतूचक्रापेक्षा सूर्याचे राशींमधले भ्रमण अधिक महत्वाचे वाटल्यामुळे त्यांनी निरयन पद्धतच चालू ठेवली.

अशा प्रकारे आता उत्तरायणाची सुरुवात आणि मकरसंक्रमण याच्यामध्ये आता २२-२३ दिवसांचे अंतर पडले आहे, पण कधी काळी ते एकाच दिवशी होत होते त्या काळातली समजूत मात्र अजून टिकून आहे.

Sunday, January 12, 2014

स्मृती ठेवुनी जाती - ११ विनय आपटे


सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले त्या काळात त्याचे कार्यक्रम रोज फक्त चार तासाएवढेच असायचे. तेवढ्यातच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये बातम्या, मुलाखती, चर्चा, समाजाचे प्रबोधन, माहिती देणे आणि मनोरंजन वगैरे सगळे चालत असे, शिवाय काही नियमित गुजराती कार्यक्रम आणि सिंधी, पंजाबी, बंगाली वगैरे अन्य भाषांमधले काही नैमित्यिक कार्यक्रम यांचाही समावेश असायचा. एकाहून जास्त भाषांमधल्या कार्यक्रमांचे नियोजन, निवेदन आणि त्यात प्रत्यक्ष सहभाग घेणारी काही चतुरस्र मंडळी त्या काळात दूरदर्शनवर काम करायची. सुहासिनी मुळगावकर, विजय राघव राव, तबस्सुम, टी पी जैन यांच्यासारखे मातब्बर कलाकार यातल्या काही कार्यक्रमांमध्ये जीव ओतून काम करायची. त्या काळाच्या सुरुवातीला भक्ती बर्वे आणि स्मिता पाटील ही नावे बाहेरच्या जगात फार मोठी नव्हती, पण पुढे त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात गरुडभरारी घेऊन यशाचे शिखर गाठले. अरुण काकतकर आणि विनय आपटे यांच्यासारखे उत्साही नवयुवक त्या काळात दूरदर्शनवर आले, त्यांना चांगल्या संधी मिळत गेल्या आणि त्यांनी त्याचे सोने करून या माध्यमावर आपला ठसा उमटवला. अरुणशी माझा आधीपासून परिचय होता, विनयचे नाव मी ऐकले नव्हते.

त्यापूर्वी मी जितक्या आपट्यांना पाहिलेले होते त्यातले बहुतेक सगळे गोरे पान, रूपाने सुरेख, मृदुभाषी किंवा गोडबोले, व्यवहारी, पॉलिश्ड, वेल मॅनर्ड वगैरे गुणांनी युक्त असे 'मोजून मापून कोकणस्थ' होते. नंतरच्या आयुष्यातसुद्धा या वर्णनात बसणारे काही आपटे माझ्या जीवनात आले. विनय आपटे मात्र त्या सगळ्यांपेक्षा खूपच वेगळा होता. मी त्याचे नाव पहिल्यांदा श्रेयनामावलीत वाचले तेंव्हा माझ्या वाचण्यातच काहीतरी गफलत झाली असावी असे मला वाटले होते. पण पुन्हा एकदा त्याचे नाव लक्षपूर्वक वाचल्यानंतर माझी खात्री झाली. विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे संयोजन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन वगैरे बाबतीत विनय आपटेचे नाव येत असेच, तो काही वेळा निवेदनही करत असे आणि नाटिकांमध्ये भूमिकाही करत असे. यामुळे तो 'पडद्याआडला कलाकार' न राहता छोटा पडदा चांगला गाजवत होता. नाटकातला 'चॉकलेट हीरो' किंवा त्याचा अतीप्रेमळ मित्र, भाऊ अशा प्रकारच्या सोज्ज्वळ भूमिकेत त्याला कधी पाहिल्याचे मला आठवत नाही. त्याने साकार केलेल्या भूमिकांमध्ये अनेक वेळा काही वेगळ्याच प्रकारची माणसे असायची. त्यांच्यात एक प्रकारचा रगेलपणा, उद्धटपणा, कावेबाजपणा, खुनशीपणा अशा प्रकारच्या गडद छटा असायच्या आणि विनय त्या अप्रतिम रंगवत असे. त्याचा रोल लहान असला तरी तोच अधिक प्रभावी होत असल्यामुळे लक्षात रहात असे. त्याने साकारलेल्या सज्जन माणसांच्या भूमिकांमध्येसुद्धा त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात प्रचंड इंटेन्सिटी दिसत असे. त्या भूमिकात असतांना तो जे काही बोलतो आहे तो नाटकाचा भाग असला तरी त्यातली तळमळ किंवा कळकळ अतीशय खरी वाटत असे. कदाचित त्या भूमिकांमधून त्याची जी प्रतिमा तयार झाली होती तिचा परिणाम 'विनय आपटे' या व्यक्तीची जी प्रतिमा मनात तयार होत होती त्यावर झाला असण्याची शक्यता आहे. त्याची भूमिका असो वा नसो, त्याचे दिग्दर्शन किंवा निर्मिती असली तरी ती कृती उच्च दर्जाची असणार याची खात्री असायची आणि तो कार्यक्रम आम्ही आवर्जून पहात असू. अनेक वर्षे दूरदर्शनवर नोकरी केल्यानंतर त्याने तिला रामराम ठोकला आणि स्वतःचे स्वतंत्र करीयर सुरू केले. त्यानंतर तो दूरदर्शनवर अगदी रोज दिसत नसला तरी नाटके, मुलाखती वगैरेंमधून दिसत होताच.  

श्री.सुधीर दामले त्या काळात 'नाट्यदर्पण' नावाचे एक मासिक चालवत होते. त्याला जोडून त्यांनी 'नाट्यदर्पण रजनी' सुरू केली. मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातल्या विविध कलाकारांना त्या सोहळ्यात पुरस्कार दिले जात. हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात 'फिल्मफेअर अॅवॉर्ड्स'चे जे स्थान आहे तेच मराठी कलाजगतात या 'नाट्यदर्पण सन्मानचिन्हां'ना मिळाले होते. त्या रजनीचा भव्य आणि दिमाखदार सोहळा दर वर्षी साजरा होत असे. मीसुद्धा तो कार्यक्रम सहसा चुकवत नव्हतो. माझा कलाक्षेत्राशी कसलाच थेट संबंध नव्हता, पण मराठ्यांच्या सैन्याबरोबर बाजारबुणगेही जात असत त्याप्रमाणे मीसुद्धा ओळखीच्या जोरावर त्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या घोळक्यात शिरत होतो. त्या रात्री आपापल्या नाटकांचे प्रयोग न ठेवता झाडून सारे कलाकार त्या सोहळ्याला हजर रहात. त्यांना जवळून आणि त्यांच्या नैसर्गिक पेहरावात आणि स्वरूपात पहावे एवढाच त्यात उद्देश असायचा. त्या घोळक्यात विनय आपटे असायचाच आणि हमखास आपल्याकडे लक्ष वेधून घेतच असे. कोणा समायिक स्नेह्याने आमची कधी औपचारिक ओळख करून दिली होती की नाही हे मला नीटसे आठवत नाही, आमची क्षेत्रे वेगळी असल्याने संभाषणही झाले नसावे, पण माझ्या दृष्टीने तो एक 'माहितीतला माणूस' ('नोन परसन') मात्र झाला होता.

अशा प्रकारच्या खाजगी मेळाव्यातलाच एक प्रसंग माझ्या लक्षात राहिला आहे. त्या काळात त्याने दूरदर्शनमधली नोकरी सोडून स्वतंत्र बस्तान बसवले होते, पण त्याचे काही सहकारी मित्र अजून तिथे काम करत होते किंवा त्याच्या भाषेत सांगायचे झाल्यास 'पाट्या टाकत' होते. नव्या जीवनात विनयचे कसे काय चालले आहे? असे त्त्यांच्यातल्या कोणी त्याला विचारताच विनयने सांगितले, "अरे माझे काय विचारतोस? तू सुद्धा ही नोकरी सोडून स्वतंत्र हो, आज तुला जितका पगार मिळतोय् तितका इनकम टॅक्स तू पुढच्या वर्षी भरला नाहीस तर मी नाव बदलीन." त्या कलाकर मित्राने लगेच दूरदर्शनमधली 'सरकारी नोकरी' सोडली की नाही याचा पाठपुरावा काही मी केला नाही, पण ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर दूरदर्शनवर नाव कमावलेले होते अशातली काही नावे गळत गेली एवढे मात्र खरे.

पुढल्या काळात विनयने केलेली काही नाटके गाजली, मराठी चित्रपटांमध्ये तो दिसायचाच, काही वेळा अवचितपणे हिंदी सिनेमातसुद्धा दर्शन द्यायचा तेंव्हा अभिमान वाटत असे. त्याने अनेक चांगल्या कलाकारांमधले गुण पारखून त्यांना संधी दिली होती, मार्गदर्शन केले होते आणि पुढे आणले होते. त्यांच्या मुलाखतींमध्ये ते विनयचा आदराने उल्लेख करतांना दिसत. या क्षेत्रात त्याने स्वतःचे एक वेगळे उच्च स्थान तयार केले होते आणि ते टिकवून ठेवले होते. त्याच्या फक्त नावातच 'विनय' आहे असा विनोद काही वेळा केला जात असला, तरी त्याच्या वागण्यात अत्यंत आपुलकी आणि सौजन्य असल्याशिवाय त्याने इतकी माणसे जोडून ठेवलेली असणे शक्यच नाही.

टीव्हीवर वर्षानुवर्षे लांबण लावत चालवलेल्या बहुतेक मालिका मला कंटाळवाण्या वाटतात, मी कुठलीच मालिका न चुकवता आवर्जून पहात नाही. पण काही दिवसापूर्वीच एका मालिकेतली खास व्यक्तीरेखा साकार करतांना विनयला पाहिले होते आणि त्या मालिकेत तो रंगत आणणार याची खात्री वाटत होती. त्यानंतर अगदी ध्यानीमनी नसतांना एकदम त्याच्या देहांताचीच बातमी आली. असे काही घडू शकणार असेल अशी पुसटशी कल्पना कधी मनात आली नव्हती. आपल्याहून वयाने लहान असलेल्या कोणालाही असे अचानक सोडून जातांना पाहिले तर त्याचा जास्त धक्का बसतो. त्यातही तो त्या काळात सक्रिय असला तर तो आणखी तीव्र होतो आणि तो जर विनय आपटेसारखा 'त्याच्यासारखा तोच' असला तर मग ते पचवणे असह्य होऊन जाते. अशी अद्वितीय माणसे जी स्मृती मागे ठेवून जातात ती कधीच पुसट होण्यासारखी नसते.

Thursday, January 09, 2014

बाबांचे अनर्थयोगशास्त्र

दहा वर्षांपूर्वी आस्था नावाच्या चॅनेलवर एक कार्यक्रम सुरू झाला आणि अल्पावधीत त्याला प्रचंड लोकप्रियता लाभली. त्या कार्यक्रमात योगासने आणि प्राणायाम वगैरे दाखवत असत. अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम मी ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शनच्या काळापासून अधून मधून पाहिले होते. त्यातले काही सुमार तर काही उत्तम असत पण "ज्यांना अमके अमके व्याधीविकार आहेत किंवा ज्यांचे वय इतक्याहून जास्त आहेत अशा लोकांनी यातली आसने करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा." असा इशारा अखेरीस दिला असल्यामुळे मला त्यातले काही करून पाहण्याचे धाडस होत नसे. पण आस्थावरल्या या कार्यक्रमात अशी भीती घातली जात नव्हती. माझे काही सहकारी आणि नातेवाईकसुद्धा तो कार्यक्रम पाहून त्याचे चाहते झाले. आमच्या घरी रहायला आलेल्या एका पाहुण्याने भल्या पहाटे उठून टीव्हीवरला तो कार्यक्रम सुरू केला त्या वेळेस आस्था या चॅनेलवरचा कार्यक्रम मी पहिल्यांदा पाहिला आणि बाबा रामदेव हे नावही मी पहिल्यांदा या कार्यक्रमामुळेच ऐकले.

साधू सत्पुरुषाचा वेश धारण केलेले बाबा ज्या प्रकारची कॉम्प्लेक्स आसने करून दाखवत होते ते कौतुक करण्यासारखे होते. विशेषतः पोटातल्या निरनिराळ्या स्नायूंना ओढून ताणून किंवा फुगवून ते जी काय करामत दाखवत होते ते पाहून माझ्या पोटात गोळा उठत असे. आपल्या पोटात इतके वेगवेगळे स्नायू आहेत तरी की नाही याचीच मला शंका वाटायला लागली होती कारण तिथे जे कोणते स्नायू होते ते चरबीच्या पडद्याच्या आत दडून त्यांचा एकच गोलघुमट झालेला दिसायचा. रामदेव बाबांची वाणी त्यांनी दाखवलेल्या योगासनांपेक्षाही जबरदस्त होती. "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टविती उपकारे।।" या संतवाणीचे जीवंत उदाहरणच आपण सादर करीत आहोत असा आव ते आणत होते. त्यांच्या सांगण्यात अचाट आत्मविश्वास होता. भसाभसा उछ्वास टाकत कपालभाती प्राणायाम दाखवतांना "साँस बाहर फेकते समय उसके साथ अपने शरीरमेसे सभी रोगोंको और रोगजंतुओंको बाहर फेक दो। जल्दही सभी बीमारियोंसे मुक्त हो जाओगे।" अशा प्रकारची त्यांनी केलेली फेकाफेक ऐकल्यानंतर तो कार्यक्रम पुन्हा पहाण्याची गरज नाही असे मी माझ्यापुरते ठरवले. पण इतर लोकांवर बाबांची जबरदस्त मोहिनी पडतच होती. त्यांचे टीव्हीवरले कार्यक्रम कमी होते की काय, लोकांनी त्याच्या सीडी आणल्या आणि त्या पाहणे सुरू केले. निरनिराळ्या शहरांमध्ये मोठ्या मैदानांवर त्यांची योगसाधनेची भव्य शिबिरे भरत आणि हजारो लोक त्यात भाग घेऊ लागले. योगाचे महत्व मला पटले असल्यामुळे मी सुद्धा जरी त्यांच्या शिबिराला गेलो नाही तरी त्यांच्या एका शाखेच्या रोज होणाऱ्या योगाभ्यासाची थोडी सुरुवात केली. पाहता पाहता बाबा रामदेव प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोचले. त्यांच्या नावाने अनेक आयुर्वेदिक औषधांची विक्री करणारी दुकाने देशभरातल्या सगळ्या शहरात तसेच निरनिराळ्या उपनगरांमध्ये उघडली गेली.

जवळ जवळ दररोज त्यांच्यासंबंधित एकादी तरी बातमी येतच राहिली. अत्यंत विवादास्पद (काँट्रोव्हर्शियल) विधाने करण्यात बाबा प्रवीण आहेत. ते जे काही बोलतील ते लगेच टिपून त्याला आणखी तिखटमीठ लावून त्याला मोठ्या मथळ्यासह प्रसिद्धी द्यायचीच असे अनेक वृत्तसंस्थांनी ठरवले असावे. त्यावर मग कोणी ना कोणी टीका करतात किंवा त्यांची तळी उचलून धरतात, त्यावर आणखी प्रतिक्रिया येतात, त्यामुळे बाबा रामदेवांचे नाव आणि फोटो सतत डोळ्यापुढे येतच राहिले. शिवाय त्यांच्या आश्रमाबद्दल, त्यांच्या पट्टशिष्याबद्दल काही ना काही छापून येतच असते, कांही वेळा ते गौरवास्पद नसले तरी "हुवे बदनाम तो क्या नाम नही हुवा?" अशा प्रकारे त्यांना मिळणाऱ्या प्रसिद्धीत भर पडतच राहिली. दोन वर्षांपूर्वी त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात चाललेल्या आंदोलनात मोठ्या दिमाखात उडी घेतली, त्यानंतर पोलिसांची कारवाई, बाबांचे पलायन, प्रकट होणे वगैरेंनी राजकीय रंगभूमीवरले एक प्रकारचे थरारनाट्य निर्माण केले होते. शिवाय परदेशात कस्टम्सने केलेली अडवणूक वगैरे आणखी काही अध्याय त्याला जोडले गेले.

दोन दिवसांपूर्वी बाबा रामदेवांनी एक नवाच बाँबगोळा टाकला. त्यांनी असे सांगितले की सध्या बत्तीस प्रकारचे डायरेक्ट टॅक्सेस आणि पन्नास साठ प्रकारचे इनडायरेक्ट टॅक्सेस यांनी नागरिकांना हैराण केलेले आहे. शिवाय या डोईजड करांमुळे कर चुकवण्याला प्रोत्साहन मिळते, त्यातून भ्रष्टाचार जन्माला येतो आणि काळ्या पैशाचे ढीग तयार होतात, पॅरलल इकॉनॉमी तयार होते. या सगळ्यावर जालिम उपाय म्हणजे सरसकट सगळे कर रद्द करून टाकावेत आणि फक्त एक नवा बँक ट्रँजॅक्शन टॅक्स सुरू करावा. बाबांच्या सांगण्याप्रमाणे सध्या सगळ्या प्रकारच्या करांमधून जेवढे उत्पन्न सरकारांना मिळते त्याच्या तिप्पट उत्पन्न या एका करामधून त्यांना मिळेल आणि नागरिकांनाही अगदी कमी कर भरावा लागेल. आता जनतेला कर द्यावा लागणार नाही पण सरकारला तो तिपटीने वाढून मिळेल. मग ते पैसे कुठून येणार आहेत? हे गूढ कोण जाणे किंवा ते बाबाच जाणोत. शिवाय ५०० आणि १००० रुपयांच्या सगळ्या नोटा सरळ रद्द कराव्यात. यामुळे देशातला सगळा काळा पैसा अदृष्य होईल. त्याच्या मालकांना परदेशातल्या बँकांमध्ये ठेवलेला पैसा देशात आणावा लागेल आणि तोही सरकारला मिळेल. वगैरे वगैरे.

या विषयावर एनडीटीव्हीवरील अँकर रवीशकुमार यांनी सलग दोन दिवस सकाळी चर्चा घडवून आणल्या. यात काही अर्थशास्त्री, राजकारणी, प्राध्यापक, पत्रकार वगैरेंनी भाग घेतला. खुद्द रामदेव बाबांनीही टेलिकॉन्फरन्सद्वारे त्यात सहभाग घेतला. त्यात त्यांच्या जिलबीसारख्या गोलगोल बोलण्यामधून मला एवढे समजले की त्यांना देशाच्या अर्थकारणात आमूलाग्र बदल करायचा आहे. मोठ्या रकमेच्या नोटा आणि सारे टॅक्स रद्द करायचे, त्यात एक्साइज ड्यूटी, कस्टम्स ड्यूटी, जकात, टोल वगैरे कशातले काहीही शिल्लक ठेवायचे नाही. यामुळे असे होईल की टॅक्सच नसले तर ते चुकवण्याचा प्रयत्नच कोणाला करावा लागणार नाही आणि त्यामुळे भ्रष्टाचार संपून जाईल. या सगळ्या करभरणीसाठी भरावे लागणारे निरनिराळे किचकट फॉर्म्स भरण्यात आणि त्यावर अपील करणे, कोर्टकचेऱ्यात खेटे घालणे वगैरेमध्ये जाणारा सगळ्यांचा वेळ वाचेल. सगळ्या वस्तूंच्या किंमती अर्ध्याहून खाली येतील. सगळे लोक सुखी आणि प्रामाणिक होतील. सुराज्य येण्यासाठी आणखी काय पाहिजे?

देशाचे इतके सगळे भले होऊ घालणारी अशी ही अफलातून सूचना असली तरी 'अर्थक्रांती' नावाची मोहीम चालवणाऱ्या संघाचे एक प्रतिनिधी सोडल्यास त्या पॅनेलमधल्या इतर कोणालाही बाबांचे सांगणे मुळीच पटलेले दिसले नाही. कारण सैन्यदल, पोलिस, न्यायदान, शिक्षण, आरोग्यसेवा वगैरे अनेक अत्यावश्यक कामांसाठी सरकारला पैसे कुठून मिळणार असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यासाठी बाबांच्या या सूचनेला एक पुरवणी होती ती अशी की भारतातल्या प्रत्येक माणसाच्या नावाने बँकेमध्ये खाते उघडायचे, त्याला चेकबुक आणि क्रेडिट किंवा डेबिट कार्ड द्यायचे आणि त्यानंतर त्याने पैशाचे सर्व व्यवहार फक्त बँकांमार्फतच करायचे. युरोपअमेरिकेत सध्या ही परिस्थिती बऱ्याच प्रमाणात अस्तित्वात आलेली आहे. आपला देश तितका प्रगत झाला तर ती इथेही येणे अशक्य नाही. रामदेवबाबांची सूचना अशी आहे की यातल्या प्रत्येक व्यवहारात (ट्रँजॅक्शनमध्ये) बँकेने दोन टक्के रकम ठेऊन घ्यावी आणि त्यातला काही भाग बँकांनी सरकारला देत रहावे. यामधून सरकारांना पुरेसे पैसे उपलब्ध होतील. समाजामधल्या प्रत्येक व्यक्तीचा पगार, मजूरी, फी, कमिशन वगैरे त्याचे जे काही उत्पन्न असेल त्यातले दोन टक्के वगळता उरलेले ९८ टक्के पैसे थेट बँकेत जाणार. ते खर्च करतांना घरमालक, रेल्वे, बसकंपनी, टॅक्सी ड्रायव्हर, धोबी, न्हावी वगैरेंना तो जितके पैसे देईल, वीज, पाणी, टेलिफोन वगैरेची जी बिले तो भरेल त्या सगळ्यामधले दोन टक्के बँक ठेवून घेईल, बाजारातून जे सामान, ज्या वस्तू तो विकत आणेल त्यांच्या किंमतीमधले दोन टक्के कापून उरलेले दुकानदाराला मिळतील. त्या माणसाने कोणत्याही कारणासाठी आपल्या मुलाला, पत्नीला, भावाबहिणींना किंवा आईवडिलांना पैसे द्यायचे असले तरी ते त्यांच्या खात्यात जमा करतांना त्यातले दोन टक्के बँक कापून घेईल.

म्हणजे नागरिकाने पैसे कमावतांना त्यातले दोन टक्के बँक घेईल त्याचप्रमाणे ते खर्च करतांना ती पुन्हा दोन टक्के घेईल असे असले तरी उरलेले ९६ टक्के त्याच्या खर्चासाठी उरले तरी काय हरकत आहे? इतर कुठलाच टॅक्स भरायचा नसला तर हा सौदा फायद्याचाच होणार हे ऐकायला बरे वाटते, पण ते तितके सरळ सोपे असणार नाही. जे लोक पंचवीस तीस टक्के आयकर भरतात अशा संपन्न लोकांना कदाचित त्याचा फायदा होईलही, पण त्यांची संख्या फक्त २-३ टक्केच असेल. बहुसंख्य जनता सध्या इनकमटॅक्स भरतच नाही, पण त्यांनासुद्धा आता हा बँक ट्रँजॅक्शन टॅक्स मात्र भरावाच लागेल, म्हणजे तो त्यांच्याकडून परस्पर कापून घेतला जाईल. व्यापार किंवा उद्योगधंद्यामध्ये कच्च्या मालाचा मूळ उत्पादक आणि पक्का माल विकणारा किरकोळ व्यापारी यांच्या दरम्यान अनेक मध्यस्थ कड्या असतात, अनेक वाहतूकदार असतात. यातल्या प्रत्येकाला स्वतःचे उत्पन्न कमी होऊ द्यायचे नसणार. यामुळे ते वसूल करून त्याखेरीज हा कराचा बोजा पुढल्या कडीवर ढकलावा लागणार. म्हणजे मालाच्या विक्रीची किंमत वाढत जाणार.

शेअर मार्केटमधले दलाल अगदी क्षुल्लक कमिशन आकारतात, पण खरेदीविक्रीच्या प्रत्येक व्यवहारामध्ये दोन दोन टक्के बँकेला द्यायचे असतील तर ते व्यवहार ठप्प होतील, निदान अगदी कमी होतील. बँकेकडून कर्ज घेतले तर त्यातले ९८ टक्केच हातात येतील आणि ते परत करतांना त्याने दिलेल्या रकमेच्या ९८ टक्केच बँकेला मिळतील. बँकेने दिलेले पूर्ण पैसे व्याजासह परत मिळायचे असल्यास तिला व्याजाचा दर जास्त लावावा लागणार. यामुळे उत्पादनखर्च वाढत जाणार. भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जमा आणि खर्चाचा प्रत्येक व्यवहार बँकेच्या माध्यमामधूनच होणार असल्यास बँकांच्या कामाचा व्याप आणि खर्च अनेकपटीने वाढेल. ते करणे शक्यतेच्या कोटीतले तरी आहे की नाही हा एक प्रश्न आहेच. शिवाय तो भागवण्यासाठी बँकेने कापलेल्या दोन टक्क्यामधले पुरेसे पैसे ठेवून घेणे तिला भाग पडेल. उरलेल्या पैशातला किती हिस्सा केंद्र सरकारला, किती राज्य सरकारला, किती स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यायचा हे कोण आणि कसे ठरवणार? त्या बाबतीत सबघोडे बारा टक्के करून कसे चालेल? प्रत्येक राज्याच्या आणि शहराच्या समस्या आणि गरजा वेगळ्या असतात, त्यासाठी लागणारा खर्च निराळा असतो. त्यासाठी लागणारा पैसा कसा उभा करायचा हे सध्या राज्य सरकारे किंवा महापालिका ठरवतात. रामदेवबाबांच्या योजनेत ते कसे बसवायचे?

याशिवाय आपल्या लोकल्याणकारी राज्याला समाजाच्या विकासासाठी बरीच कामे करावी लागतात. त्यासाठी धोरणे आखतांना त्यावर किती खर्च करायचा आणि तो निधी कुणाकडून आणि कसा गोळा करायचा याचा विचार करावा लागतो. या बाबतीत काही गैरव्यवहार होतात असे असले तरी ते थांबवून टाकणे हा त्यावर उपाय असू शकत नाही. हे आणि अशा प्रकारचे जे प्रश्न विचारले गेले त्यावर बाबांनी शुद्ध टोलवाटोलवी केली. "सध्या देशात इतका भ्रष्टाचार आहे, इतकी अनागोंदी आहे, इतका काळा पैसा देशात आणि देशाबाहेर आहे. परिस्थिती आताच इतकी वाईट आहे, याहून आणखी वाईट काय होऊ शकणार आहे?" अशा प्रकारची उत्तरे ते देत राहिले. अखेर ते सध्या ज्या भाजपाचे समर्थन करत आहेत तो पक्ष तरी त्यांची ही नवी अर्थनीती मान्य करून अंमलात आणणार आहे का? या प्रश्नालाही त्यांनी बगल दिली. सध्याच्या करप्रणालीत अनेक दोष आहेत, ते दूर करणे त्याची पुनर्रचना करणे आवश्यक आहे यात शंका नाही. त्या दृष्टीने काही पावले टाकली जात आहेत, आणखी बरेच करायला पाहिजे हे देखील मान्य करता येईल, पण ती चौकटच मोडून टाकायची हे भयानक वाटते.

करआकारणी करतांना तो भरण्याची केवढी कुवत कुणाकडे आहे आणि खर्च करतांना त्याचा लाभ कुणाला आणि किती मिळणार आहे याचा विचार करून निर्णय घेतले जातात आणि त्यांची अंमलबजावणी होते. असे आजवर जगभरात सर्व राष्ट्रांमध्ये होत आले आहे.  खनिज तेलापासूनच गडगंज पैसे मिळवणाऱ्या अरब राष्ट्रांना कदाचित नागरिकांकडून कर घेण्याची गरज वाटत नसेल. आपली परिस्थिती तशी नाही. आपल्या देशाच्या गरजा इथल्या नागरिकांनीच भागवायच्या आहेत. रामदेवबाबांनी सुचवलेला करमुक्तीचा प्रयोग याआधी कुठे केला गेला आहे का? किंवा सध्या केला जात आहे का? त्याचे काय परिणाम झाले? अशा प्रश्नांना बगल देतांना "तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते शोधून काढा. आपला देश स्वतंत्र आहे, आपण इतरांकडे कशाला पहायला पाहिजे?" अशी उत्तरे मिळाली. 'आउट ऑफ दि बॉक्स' विचार करणाऱ्यांबद्दल मलासुद्धा आदर वाटतो. पण इतक्या अव्यवहार्य योजना गंभीरपणे विचारात घेण्यायोग्य वाटत नाहीत. अर्थशास्त्राच्या प्रचलित सिद्धांतांना सरसकट मोडीत काढणारे हे 'अनर्थयोगशास्त्र' कुणाकुणाला पटणार आहे आणि ते  देशातल्या  कायद्याच्या चौकटीत ते कसे काय बसणार आहे हे पहायचे आहे.  या सगळ्यातून परदेशांबरोबर कसे अर्थव्यवहार करणे शक्य आहे हे तर वेगळाच मुद्दा आहे.     

Sunday, January 05, 2014

अग्नि आणि संस्कार

परवा रिमोटशी चाळा करतांना एका चॅनेलवर आयुर्वेदावर चर्चा होत असलेली दिसली. त्यात एक विदुषी सांगत होती, "आजकाल घरोघरी वॉटर फिल्टर बसवायचे एक फॅड निघाले आहे. हे अॅक्वागार्डचं पाणी फार शुद्ध असतं असं हे (मूर्ख) लोक समजतात. पण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहता ते पाणी अशुद्धच असते कारण त्यावर अग्निसंस्कार झालेला नसतो. पिण्याचे पाणी तापवून प्यावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. अग्नीमधली ऊर्जा, पावित्र्य आणि इतर गुणधर्म त्या क्रियेमध्ये पाण्याला मिळतात, ते संस्कार घेऊन ते पाणी पोटात गेल्यानंतर त्याच्यामुळे जठराग्नीला चालना मिळून अन्नाचे चांगले पचन होते. फिल्टरच्या पाण्यात हे अग्नीचे गुण तर नसतातच, शिवाय ते पाणी कोळशाबिळशामधून (अॅक्टिव्हेटेड कार्बन) जात कदाचित जास्तच दूषित होत असेल. वगैरे वगैरे... या बाई दिसायला तर माझ्या मुलाच्या वयाच्या वाटत होत्या, पण त्यांची भाषा मात्र माझ्या आईच्या काळातली होती, त्यातही खास आयुर्वेदातले काही 'शास्त्रीय' शब्द मिळवून त्या बोलत होत्या. 

माझी आई आयुर्वेद शिकलेली नव्हती, तिला सायन्सचा गंधही नव्हता, पण परंपरागत शिकवणींमधून ती योग्य अशा ब-याच गोष्टी करत असे. उदाहरणार्थ आजारी माणसाला किंवा लहान बाळांना द्यायचे पिण्याचे पाणी ती नेहमी तापवून देत असे. त्याच्यामागे कोणते शास्त्रीय कारण आहे याचा विचार ती करत नव्हती. तसे करायचे असते एवढेच तिला पक्के माहीत होते. मुळात 'शास्त्र' किंवा 'शास्त्रीय' या शब्दांचेच तिच्या शब्दकोषातले अर्थ फार वेगळे होते. "उपासाला रताळे चालते, पण बटाटा चालत नाही, सकाळी आंघोळ करूनच पाणी भरायला पाहिजे, पारोशाने भरले तर ते अपवित्र होते. स्वयंपाकाला ते चालत नाही, अनशापोटी किंवा उभ्याने पाणी पिऊ नये, जेवतांना फक्त उजव्या हाताच्या बोटांचा उपयोग करावा, अन्नाच्या पातेल्यालासुद्धा डाव्या हाताचा स्पर्शही होता कामा नये." असले कित्येक पारंपरिक नियम "असं शास्त्रात सांगितलंय्" असे म्हणून ती स्वतः पाळत असे आणि ते पाळायला आम्हाला सांगत असे. हे नियम शिकवणे मुलांना चांगले वळण लावण्यातला भाग आहे असे तिला वाटत असे.  तिच्याबरोबर त्यावर वाद घालण्यात अर्थ नसायचा.

"अग्नीमध्ये पावित्र्य असते, शिवाय तो इतर गोष्टींनाही पावन करतो म्हणून त्याला 'पावक' असेही म्हणतात." असे माझी आई सांगत असे. सोने अग्नीमध्ये तापवल्याने त्यात मिसळलेले अन्य हिणकस पदार्थ जळून जातात आणि शुद्ध बावनकशी सोने झळाळून उठते, यापासून ते सीतामाईच्या अग्निपरीक्षेपर्यंत बरीचशी उदाहरणे तिच्याकडे होती. शिवाय साधे दुधाचे उदाहरण घेतले तर ते वेळोवेळी उकळवून ठेवले नाही तर ते नासते. आमटी भाजी वगैरेंनाही तापवल्याने त्यांना अग्नी टिकवतो वगैरे वगैरे. पाणी उकळवल्यामुळे त्यातले रोगजंतू मरतात हे शास्त्रीय कारण मी शाळेत शिकलो होतो. पाण्याला रूम टेंपरेचरपासून बॉइलिंग पॉइंटपर्यंत तापवतांना दिलेली ऊर्जा ते थंड होईपर्यंत वातावरणात निघून गेलेली असते हे सुद्धा नंतर समजले. अग्नीच्या 'संस्कारा'मधून पाण्याला यापेक्षा जास्त काही मिळत असेल असे मला तरी वाटत नाही. अॅक्वागार्डमध्ये अत्यंत सूक्ष्म छिद्गांचे गाळणे असते. पाण्यात न विरघळलेला सगळा गाळ त्यामध्ये असलेल्या काही सूक्ष्म जीवजंतूंसकट त्या फिल्टरमध्ये अडकून राहतो आणि स्वच्छ पाणी बाहेर निघते. त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट किरणांचा उपयोग करून त्या पाण्याला निर्जंतुक करण्यात येते. उकळल्यामुळे केलेले पाण्याचे निर्जंतुकीकरण जास्त परिणामकारक होते, पण त्यासाठी जास्त खटाटोप करावा लागतो आणि इंधन जाळावे लागते. याचा विचार करता रोजच्या उपयोगासाठी ते सोयीस्कर वाटत नाही, त्या मानाने वॉटर फिल्टर खूप सोयिस्कर असतो आणि अगदी पूर्णपणे नसले तरी ब-याच चांगल्या प्रमाणात रोगजंतूंपासून संरक्षण देतो. काही विशिष्ट रुग्णांसाठी अत्यावश्यक असेल तेंव्हा मात्र त्यांना उकळलेले पाणीच दिले जाते. पण "आयुर्वेदाच्या काळात अॅक्वागार्ड नव्हते म्हणून ते सदोष, काही कामाचे नाही" असे त्या तज्ज्ञ विदुषींच्या तोंडून ऐकल्यामुळे तिचे विचार किंवा माहिती किती संकुचित होती हे लक्षात आले आणि मला आयुर्वेदाबद्दल वाटत असणारा आदर मात्र थोडा कमी झाला.

संस्कार या शब्दाचा सोपा अर्थ "चांगला बदल" असा करता येईल. नीतीमत्ता, प्रामाणिकपणा, विनम्रपणा यासारखे चांगले गुण मुलांच्या मनात रुजावेत आणि त्यांनी सुस्वभावी सज्जन बनावे असा चांगला बदल त्यांच्यावर केल्या जाणा-या संस्कारांमध्ये अपेक्षित असतो. पोरवयातल्या अल्लडपणाला थोडी मुरड घालून विद्याध्ययनाची सुरुवात करून देण्यासाठी मौंजीबंधन हा संस्कार केला जातो. अजाण बालकात चांगला बदल करून त्याला ज्ञानमार्गावरला विद्यार्थी करायचे असते. मुंजीच्या वेळी त्यासाठी त्या मुलाने काही प्रतिज्ञा करायच्या असतात. तसेच गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी आणि संसार सुखी व्हावा या उद्देशाने काही शिस्त पाळावी यासाठी त्या वर आणि वधूने विवाहसंस्कारात काही वचने द्यायची असतात. या दोन्ही धार्मिक विधींमध्ये होम आवश्यक असतो. यातल्या प्रतिज्ञा आणि वचने अग्नीच्या साक्षीने उच्चारायची असतात. यात अग्नि म्हणजे नुसता जाळ किंवा ऊष्णता नसते, तर तो ईश्वराचे दृष्य आणि परिणामकारक असे रूप असतो. अग्नीसाक्ष केलेली प्रतिज्ञा आणि दिलेले वचन पाळणे बंधनकारक आहे आणि त्याचे पालन न केल्यास देवाची फसवणूक केल्यासारखे आहे, असा धाक त्यातून घातला गेला तर त्याचे पालन अधिक चांगल्या प्रकारे होईल अशी कल्पना होती. यात प्रत्यक्ष अग्नीचा त्या बटूवर किंवा वधूवरांवर कसलाच परिणाम किंवा संस्कार होत नाही. तो फक्त साक्षीला असतो. पुढे या संस्कारांचे कितपत निष्ठेने पालन केले जाते हे आपण पहातोच आहोत आणि ते न करणा-याला जाब विचारायला अग्निनारायण कधीच पुढे येत नाही.

कडाक्याच्या थंडीत घेतलेली शेकोटीची ऊब सोडली तर माणूस अग्नीपासून दूर राहून तिची धग टाळतच असतो. पण निर्जीव वस्तू किंवा पदार्थावर त्याचे होणारे परिणाम पाहून त्यांचा उपयोग करून घेत असतो. बर्फाला आंच दिली तर त्याचे पाण्यात रूपांतर होते आणि पाणी उकळून त्याची वाफ होते. त्या वाफेला बंदिस्त जागेत कोंडले असेल तर ती थंड झाल्यावर तिचे पुन्हा पाणी होते आणि त्याला गोठवले तर बर्फ तयार होतो. अशा प्रकारचे बदल परिवर्तनीय असतात. तांदूळ शिजवल्यावर त्याचा भात होतो पण भाताला थंड करून पुन्हा तांदूळ तयार होत नाहीत. हा अपरिवर्तनीय बदल आहे. याला आपण अग्नीचा तांदळावर झालेला संस्कार म्हणू शकू.  पोलादासारख्या काही धातूंना गरम करून वेगाने थंड केल्याने त्यांचे गुणधर्म बदलतात. पण अग्नीच्या संस्कारामुळे अग्नीचे गुण भातात किंवा पोलादात उतरले असे म्हणणे हास्यास्पद आहे. कोणतीही तापवलेली वस्तू ऊष्ण असतांना तिला स्पर्श केल्यास चटका बसेलच, या अर्थाने अग्नीचा एक गुण त्या वस्तूमध्ये तात्पुरता येतो. आग विझल्यानंतर ती आग रहातच नाही, पण ती तापवलेली वस्तू थंड झाल्यावर शिल्लक राहते. तापवल्यामुळे तिच्यात झालेला बदल परिवर्तनीय असल्यास ती वस्तू थंड होताच मूळ रूपात परत येते आणि ते बदल अपरिवर्तनीय असतील तर एक नवी वस्तू जन्माला येते.

मनुष्याच्या जीवनातला शेवटचा संस्कार हिंदू धर्मानुसार अग्निसंस्कार किंवा दाहसंस्कार असतो. यात त्याचे निर्जीव शरीर नष्ट होऊन पंचत्वात विलीन झाल्यामुळे त्यातून बाहेर पडलेल्या आत्म्याला त्याची ओढ शिल्लक रहात नाही आणि तो मागे वळून न पाहता पुढच्या मार्गाला लागतो असे समजले जाते. मुळात आत्मा अस्तित्वात असतो की नाही आणि तो असलाच तर त्याचे पुढे काय होते किंवा होत नाही याची खात्री करायला काहीच मार्ग नाही.