Saturday, August 16, 2008

तू वेडा कुंभार - भाग १


"फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार । विठ्ठला तू वेडा कुंभार ।।" हे ग.दि.माडगूळकरांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी गायिलेले माझे अत्यंत आवडते गीत मी अगणित वेळा ऐकले असेल. वयाबरोबर माझ्या अनुभवांचे विश्व जसजसे विस्तारत गेले तसतसा या गीतातील शब्दांचा नवनवा अर्थ मला कळत गेला. त्यातून निघणा-या वेगवेगळ्या आशयांच्या निरनिराळ्या छटा दिसू लागल्या आणि विचारांचे तरंग मनात उठत गेले. गहन अर्थ असलेल्या अजरामर काव्याचे हेच तर वैशिष्ट्य असते.

आठवणींची पाने चाळता चाळता माझे मन थेट बालपणात जाऊन पोचले. त्या काळात शाळेतील पहिली दुसरीच्या वर्गांना पाठ्यपुस्तके नसायची. मुळाक्षरे, बाराखड्या, अंक, पाढे वगैरे गिरवून घेताघेतांनाच मास्तर लोक अधून मधून मनोरंजक पद्धतीने सामान्यज्ञानाचे मौखिक धडे देत असत. त्यातलीच एक कविता अशी होती. आधी मास्तरांनी विचारायचे, "चाक फिरवतो गरा गरा, मडकी करतो भराभरा, तो कोण?" त्यावर सगळी मुले एका सुरात ओरडत,"कुंभाssर!" लहान गांवातल्या सगळ्या मुलांच्या घरी गा़डगी, मडकी, माठ, कुंड्या यासारखी मातीची पात्रे सर्रास असत आणि ती आणण्याच्या निमित्ताने मोठ्या लोकांच्याबरोबर कुंभारवाड्यात चक्कर मारतांना कधी ना कधी ओल्या मातीमधून वेगवेगळे आकार निर्माण करणा-या त्या अद्भुत किमयागाराचे कसब सर्वांनीच डोळे विस्फारून पाहिलेले असायचे. रूपक अलंकार, प्रतीके वगैरे माहित नसण्याच्या वयात कवितेचा शब्दशः अर्थ जरी समजला तरी मिळवली अशी परिस्थिती असायची. तेंव्हा हे गाणे विठ्ठल नांवाच्या कुठल्या तरी कुंभाराला उद्देशून दुस-या कोणीतरी म्हंटलेले असणार असेच वाटायचे. पण त्याला वेडा कां म्हंटले असेल? त्याने कसला वेडेपणा केला असेल? आपणही सुरुवातीला या गाण्याचा वाच्यार्थ पाहू.

माती पाणी उजेड वारा । तूच मिसळशी सर्व पसारा ।
आभाळचि मग ये आकारा । तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पाऱ ।।
कुंभार जे काम करतो त्याचा थोडक्यात सारांश या ओळीत दिला आहे. आधी चिक्कण माती खणून आणायची, त्यातले खडे, कचरा वगैरे काढून टाकून ती बारीक चाळणीने चाळून घ्यायची, त्यात पाणी ओतून ती चांगली कालवायची, तिच्यावर नाचून नाचून ती चांगली तिंबायची, ती लोण्यासारखी मऊ झाल्यावर तिचा गोळा करून तो चाकावर मधोमध ठेवायचा. चाक फिरवता फिरवता हलक्या हाताने त्या गोळ्याला हवा तसा आकार द्यायचा. ते कच्चे मडके वा-याने थोडे हडकले की भट्टीत पक्के भाजायचे अशी सारी कुंभारकामाची प्रक्रिया असते. त्याने बनवलेल्या बहुतेक पात्रांचा मुख्य आकार आभाळासारखा घुमटाकार असतो म्हणून त्याच्या कामातून आभाळच आकाराला येते आहे असे म्हंटले आहे. हा विठ्ठल नांवाचा कुंभार इतका उद्योगी आणि कार्यक्षम आहे की त्याने बनवलेल्या घटांची संख्या अक्षरशः अगणित आहे. जागा वाचवण्यासाठी माठ, गाडगी, मडकी वगैरे एकावर एक रचून त्याची उतरंड बनवतात. या विक्रमी कुंभाराने बनवलेल्या घटांची विशाल उतरंड कुठपासून सुरू होते आणि कुठपर्यंत ती पसरली आहे तेथपर्यंत नजर सुद्धा पोचू शकत नाही. आता त्याने तरी इतकी मडकी कशाला म्हणून बनवून ठेवायची? वेडा कुठला?
घटाघटाचे रूप आगळे । प्रत्येकाचे दैव वेगळे ।
तुझ्याविना ते कोणा न कळे। मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार।।
या निष्णात कुंभाराने किती प्रकारचे म्हणून घट बनवावेत? कांही गोलमटोल तर कांही सडसडीत अंगाचे, कांही पसरट भांडी कोल्ह्याच्या कामाची तर कांही चिंचोळ्या तोंडाची उभट पात्रे करकोच्याच्या उपयोगाची, कोठे सुडौल शरीरयष्टी आणि घोटीव उंच मान असलेली सुरई तर कांही नुसतेच काळेकभिन्न माठ!
जसे या घटांचे आकार वेगळे तशीच त्यांची नशीबेही किती भिन्न त-हेची असावीत? पूर्वीच्या काळी मातीच्या पात्रांना खूपच महत्व असायचे. सकाळी उठल्यावर "करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेउनि कुक्षी" नदीवरून पाणी आणायला जायच्या. तिथे गेल्यावर "जळी वाकुनि घट भरतांना कुठून अचानक कान्हा" यायचा आणि हळूच पाठीमागून कुणाची वेणी ओढायचा. तर कधी "घट डोईवर घट कमरेवर" घेऊन ठुमकत चाललेल्या राधेचा पदर नंदलाला हळूच पकडायचा. मथुरेच्या बाजाराला निघालेल्या गोपिकांमधील कोणाला तरी एखादा वात्रट "ते दूध तुझ्या त्या घटातले कां अधिक गोड लागे न कळे" असे विचारायचा. मांजरांच्या आणि पोरांच्या हाती लागू नये म्हणून गवळणी आपले दही दूध हंडीत भरून उंच शिंक्यावर टांगून ठेवीत असत, पण कृष्ण आणि त्याचे बालगोपाल सवंगडी एकमेकांच्या खांद्यावर चढून ते फस्त करीतच असत. अशा त्या सुवर्णयुगात कुंभाला इतके अधिक महत्व प्राप्त झालेले होते की आकाशातील बारा राशींमध्ये त्यालाही स्थान मिळाले. हे सगळे नशीबवान कुंभ होते. त्यांचा उपयोग दही, दूध आणि लोणी ठेवण्यासाठी झाला आणि गोपिकांनी त्यांना कडेवर घेतले. तसेच कांही रांजण मोहोरांनी भरले जात असत तर कांही कलाकुसर केलेले चिनी मातीचे घट राजा महाराजांच्या वाड्यांना शोभा आणीत. आजसुद्धा चिनी मातीच्या फुलदाण्या घरोघरी सजावटीसाठी ठेवलेल्या असतात आणि पॉटरी, टेराकोटा वगैरे कलाकृती थोरामोठ्यांचे दिवाणखाने सजवतात.

पण फुटके नशीब घेऊन आलेल्यांचे काय? खेड्यापाड्यात जिथे चुलीवर स्वयंपाक केला जातो तिथे काम संपल्यावर चुलीमधील राख आणि धगधगते निखारे एका खापरामध्ये काढून ठेवले जातात. अंत्ययात्रेला जातांना एका मडक्यात निखारे घालून बरोबर नेण्याची प्रथा आहे. त्या बिचा-याची कहाणी मृत्तिकेपासून सुरू होते आणि मर्तिकाला संपते. त्यांच्या वाट्याला नुसताच रखरखाट ठेवलेला असतो. कांही विचारे घडे पालथेच पडून राहतात. पाणी साठवण्याचे भाग्यच त्यांना लाभत नाही. आजच्या स्टेनलेस स्टील आणि फिल्टरच्या युगात कोणीही स्वयंपाकासाठी किंवा साठवणीसाठी गाडगी मडकी वापरत नाहीत आणि पिण्याच्या पाण्यासाठी माठाचा उपयोगसुद्धा झपाट्याने नाहीसा होत चालला आहे. शहरात वाढलेल्या मुलांना 'मटका' या शब्दाचा अर्थ 'जुगाराचा एक प्रकार' एवढाच माहीत असावा हे केवढे दुर्दैव! अलीबाबाच्या गोष्टीमध्ये खजिना असलेल्या गुहेमधील रांजण जडजवाहिराने भरलेले असतात, तर चाळीस चोर मोठमोठ्या रांजणात बसून येतात आणि त्यांचे मरणसुद्धा त्यांतच ओढवते. कुणाचे दैव कसे आणि दुस-या कुणाचे कसे ते काय सांगावे?
. . . . . . . (क्रमशः)

No comments: