Friday, August 01, 2008

कृतघ्न भारतीय लोक?

"अमक्या महान व्यक्तीला जनता विसरली, तमक्याच्या त्यागाची कोणाला आठवण आहे?, ह्याचे यथोचित स्मारक झाले नाही, त्याच्या तोंडाला पाने पुसली" अशा बातम्या आपण आजकाल वारंवार वाचतो किंवा पहातो. मागच्या वर्षी एका दिवशी तर कहर झाला होता. वृत्तपत्र, दूरचित्रवाणी आणि इंटरनेट या तीन्ही
माध्यमातून तीन वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी समोर आल्या. त्यामुळे वाटले की आपले भारतीय लोक खरेच अगदी उलट्या काळजाचे झाले आहेत की काय?
पुणे मुंबई यांमध्ये प्रवास करतांना अनेकांनी नेरळ ते माथेरान ही डोंगरघाट चढणारी छोटेखानी आगगाडी नेरळ स्थानकात उभी असलेली पाहिली असेल. कांही लोकांनी त्यात प्रवासही केला असेल. शंभर वर्षापूर्वी सर आदमजी पीरभॉय नांवाच्या गृहस्थाने पदरमोड करून हा लोहमार्ग बांधला, त्यासाठी लागणारे रूळ व
इंजिने इंग्लंडमधून आयात केली व गरीब भारतीय जनतेला या थंड हवेच्या ठिकाणी जायची सोय करून दिली. त्यांच्या या महान कार्याची आठवण जागी रहावी म्हणून माथेरान स्थानकाला त्यांचे नांव द्यावे या मागणीचा पाठपुरावा आदमजी यांचे पणतू करीत असून रेल्वेखात्याचे अधिकारी ती अमान्य करीत आहेत असे एका लेखात म्हंटले होते.
एका वाहिनीवरून प्रसृत केलेल्या बातमीत हुतात्मा राजगुरू यांच्या राहत्या घराची पडझड झाली आहे, त्यांच्या हौतात्म्यदिनाची योग्य ती दखल घेतली गेली नाही वगैरे सांगितले गेले होते. याबद्दल शासनाने कार्यवाही करून त्य़ांच्या स्मारकासाठी पैशाची तरतूद केली असल्याचीघोषणा केली असल्याचे दुसरीकडून समजले. पनवेलजवळील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे घर मोडकळीला आलेल्या अवस्थेत असल्याचे वृत्त दरवर्षी येतच असते.
२३ मार्च या हुतात्मा भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या बलिदालाच्या दिवसाची आठवण करून देणारा संदेश ई मेल वरून फॉरवर्ड करतांना या घटनेला त्या दिवशी ७५ वर्षे झाली नसून ७६ वर्षे झाली आहेत इतकी मोठी चूक लक्षात न आल्याबद्दल त्या संदेश पाठवणा-याबद्दल सात्विक संताप एका राष्ट्रभक्त महिलेने आपल्या ब्लॉगमध्ये व्यक्त केला होता.
एकापाठोपाठ एक समोर आलेल्या या तीन तक्रारी पाहिल्यावर मला काय वाटले ते आता पाहू. माथेरानप्रमाणेच दार्जीलिंग, उटकमंड या डोंगरमाथ्यावर वसवलेल्या गांवांना जाणा-या छोटेखानी खेळण्यातल्या गाड्या (टॉय ट्रेन) मी पाहिल्या आहेत. त्या सुरू करण्यासाठी सुद्धा कुणीतरी खटपट आणि पदरमोड केलेलीच असणार. एवढेच नव्हे तर आपल्या खंडाळ्याचा घाट बांधायला किती लोकांना किती परिश्रम करावे लागले असतील. त्या सगळ्यांची स्मारके कुठे आहेत? ज्या आदरणीय महापुरुषांची नांवे महत्वाच्या स्थानकांना दिलेली आहेत त्यांची स्मृती तरी त्या ठिकाणी गेल्यावर खरेच जागी होते कां? त्यांची लांबलचक नांवे रोजच्या बोलण्यात घेणे तर कठीण आहेच त्यामुळे सहसा त्यांचा संपूर्ण उल्लेख होत नाही. सीएसएम आणि एलटीटी असल्या आद्याक्षरांने कुठल्याच महान व्यक्तीची मूर्ती माझ्या
डोळ्यासमोर तरी उभी रहात नाही. असे असतांना एका इतिहासकाळातल्या अप्रसिद्ध माणसाचे नांव रेल्वे स्थानकाला दिल्याने तो गृहस्थ यापुढे प्रसिद्ध होईल याबद्दल मला शंका आहे. आणि त्याचे नांव माहीत झाल्यानेसुद्धा त्यापासून कोणाला स्फुरण प्राप्त होईल असे तर वाटतच नाही.
हुतात्मा राजगुरू यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली वास्तू त्या जागेला भेट देणा-या राष्ट्रभक्ताला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी वाटेल यात शंका नाही. त्या ठिकाणी एक भव्य स्मारक बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेतही. पण प्रेक्षणीय स्थळे पाहणा-यांचा दृष्टीकोन व त्यांची मनःस्थिती अगदी वेगळ्या प्रकारची असते हे मी अनेक वेळा पाहिलेले आहे. नुकतेच मी एकदा सिंहगडावर गेलो होतो. तिथे आलेल्या हजारो लोकांपैकी फारच थोडे लोक नरवीर तानाजीच्या समाधीकडे जात होते व तेथे गेल्यावर आदरभाव प्रकट करत होते. बहुतेक लोक तिथे एक पिकनिक, गिर्यारोहण, स्वच्छ हवा, मनोहर दृष्य वगैरेसाठी आलेलेच दिसत होते. त्यांच्या वागण्यात गाढ इतिहासप्रेम किंवा जाज्वल्य देशाभिमान कुठेच दिसत नव्हता.
हुतात्मा भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या बलिदानाच्या कथा आता इतक्या वर्षानंतरही लोकांच्या मनात ताज्या आहेत. त्यावर आधारित अनेक चित्रपट निघाले व ते लोकप्रिय झाले याचाही त्या कथा घरोघरी पोचवण्यात वाटा असू शकेल. पण त्यातील घटना तिथी तारखेसह तमाम लोकांच्या लक्षात रहाव्या अशी अपेक्षा करणे मला अवास्तव वाटते. त्यात चूक झाली तर त्यामुळे लगेच सात्विक संताप येणे वगैरे संवेदनशीलतेचा अतिरेक आहे.
माझ्या व्यक्तिगत आयुष्यात मला प्रत्यक्ष मदत देऊन व मार्गदर्शन करून ज्या लोकांनी उपकृत केले त्यांची आठवण माझ्या मनात जन्मभर राहील. पण त्या लोकांपैकी कोणाचाच जन्मदिवस वगैरे मला कधी कळला सुद्धा नाही, तर तो लक्षात कसा राहणार? म्हणजे त्यामुळे मी कृतघ्न ठरेन कां? देणा-याचा हात वर असतो असे म्हणतात, त्यामुळे तिथपर्यंत पोचून त्याची परतफेड करणे मला शक्य नव्हतेच. पण आपल्याला कोणीतरी मदत केली होती ही भावना मनात असल्याने मीही कळत नकळत कधी तरी, कुणासाठी तरी, कांही तरी केले असेल. पण त्या लोकांनी माझी आठवण ठेवून ती सतत काढत रहावी असे थोडेच आहे! त्यांनी तसे न केल्यास ते कृतघ्न ठरले कां? व्यक्तिगत आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तींबद्दल आपण जे करू शकत नाही ते इतिहासकाळात होऊन गेलेल्या महापुरुषांबद्दल इतरांनी करावे अशी अपेक्षा ठेवणे कठीण आहे. कोणाच्या जन्मदिनी किंवा पुण्यतिथीला लोकांची गर्दी झाली नाही, कुणाचे यथोचित स्मारक झाले नाही, त्या स्मारकाची व्यवस्थित निगा राखली गेली नाही, म्हणून "सगळा समाज कृतघ्न झाला आहे" अशी ओरड करणे मला अनाठाई वाटते. समाजातील सगळ्याच लोकांना सगळ्याच ऐतिहासिक व्यक्तींबद्दल आपल्याइतकाच आदरभाव असावा असे समजावे कां? तो नसल्यास ते कांही तरी भयंकर आहे अशी तक्रार करावी का?

1 comment:

आशा जोगळेकर said...

माहिती करून घ्यायला काय हरकत आहे कारण कृतघ्न नाही तरी बेपर्वा म्हणता येईल.