Tuesday, December 28, 2010

तेथे कर माझे जुळती - ६ अण्णाकाका गोखले



लहान मूल (म्हणजे त्याचे मन, बुध्दी, विचार वगैरे) ओल्या मातीच्या गोळ्यासारखे असते. त्याला जो आकार दिला जाईल तो घेऊन ते मोठे होत जाते असे म्हणतात. माणसाच्या घडण्याची ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालत असते आणि त्याच्या मातापित्यांच्या साथीने इतर अनेक लोकांचाही त्याला हातभार लागत असतो. हा सजीव गोळा संवेदनाक्षम असल्यामुळे त्याला या घडण्याची थोडी थोडी जाणीव होत असते आणि त्याला घडवणा-या बोटांचा स्पर्श त्याच्या चिरकाल लक्षात राहतो. माझ्या व्यक्तीमत्वाच्या घटावर ज्यांच्या बोटांचे ठसे खोलवर उमटलेले आहेत अशा एका व्यक्तीची ओळख या भागात करून देणार आहे. त्यांचे नाव आहे श्री.सदाशिव कृष्ण गोखले, म्हणजे माझ्या वडिलांचे मावस भाऊ आणि आमचे अण्णाकाका !

माझे सख्खे काका माझ्या जन्मापूर्वीच अकाली निवर्तले होते आणि माझ्या वडिलांचे चुलत, आते, मामे वगैरेंमधले जे बंधू हयात होते ते दूर पुण्यामुंबईकडे रहात असत. त्या काळात दळणवळणाच्या सोयी अत्यंत तुटपुंज्या असल्यामुळे आमचा त्यांच्याबरोबर संपर्क राहिला नव्हता. माझ्या लहानपणी तरी त्यातले कोणी कधी जमखंडीला येऊन गेल्याचे मला आठवत नाही. आम्हीही कधी त्यातल्या कोणाकडे गेलो नाही. त्यामुळे अण्णाकाका हे आमचे एकच जवळचे काका होते. तसे गावातल्या सगळ्याच वडीलधारी लोकांना आम्ही काका म्हणत असू, पण ते आपले फक्त म्हणण्यापुरतेच ! आमच्या अण्णाकाकांनी मात्र आम्हाला इतकी भरभरून माया, इतके प्रेम दिले की दुसरे कोणी काका नसल्याची आम्हाला कधीच उणीव भासली नाही.

अण्णाकाका माझ्या वडिलांपेक्षा पंधरा वीस वर्षांनी वयाने लहान होते. माझे आई, वडील आणि आत्या यांनी त्यांना अगदी लहानपणापासून पाहिले होते, खेळवलेसुध्दा असेल. त्यांच्या लाघवी स्वभावामुळे त्या सर्वांना ते अत्यंत प्रिय होतेच, आम्हा लहान मुलांना त्यांचे जास्तच आकर्षण वाटत असे. अण्णाकाकांची एक मोठी बहीण, आमच्या अंबूआत्या जमखंडीलाच रहायच्या. त्यांना भेटण्यासाठी किंवा आणखी काही कामानिमित्य ते जमखंडीला आले की आमच्या घरी यायचेच आणि थोरांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांशी मनमोकळ्या गप्पागोष्टी करत सर्वांची इतक्या आपुलकीने विचारपूस करत की ते मुद्दाम आम्हाला भेटण्यासाठी विजापूरहून जमखंडीला आले आहेत असेच मला वाटत असे.

माझ्या आधीच्या पिढीमधले थोडेच लोक कॉलेजात जात असत आणि गेलेच तर ते संस्कृत किंवा इंग्रजी अशा विषयात 'बी.ए.' करत असत. अण्णाकाकांनी मात्र विज्ञानशाखेची पदवी घेतली होती. माझ्या नात्यातले किंवा ओळखीतले ते पहिलेच सायन्स ग्रॅज्युएट होते. त्यानंतर शिक्षणशास्त्राचा अभ्यास करून ते त्या क्षेत्राकडे वळले होते आणि विजापूरच्या एका विद्यालयात अध्यापनाचे काम ते करत होते. कोणतीही गोष्ट समजावून सांगण्याची विलक्षण हातोटी त्यांनी साधली होती. विषयांवरील प्रभुत्व, विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्याची तयारी आणि त्या तिथल्या तिथे सोडवण्याचे त्यांचे कौशल्य, हंसतमुख आणि उमदे व्यक्तीमत्व, सर्वांबरोबर आपुलकीचे वागणे, विनोदबुध्दी या सर्वांमुळे अल्पावधीतच ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या गळ्यातले ताईत बनले होते. त्यांचे जे विद्यार्थी शालेय शिक्षण संपवून कॉलेजला गेलेले आणि नोकरी व्यवसायाला लागलेले होते त्यांच्या मनात सुध्दा या गोखले सरांच्यासाठी एक आदराचे अढळ स्थान तयार झाले होते.

मी अगदी लहान असतांना बराच अशक्त होतो, नेहमी आजारी पडत असे, वयाच्या मानाने उंची आणि वजन कमी असायचे, हातापायात त्राण नसायचे, दृष्टी अधू होती, त्यात बुजरा स्वभाव आणि मुलखाचा मुखदुर्बळही होतो. या सगळ्यामुळे देवाच्या कारखान्यातला एक 'डिफेक्टिव्ह पीस' चुकून पृथ्वीवर आला आहे असे कोणालाही वाटणे शक्य होते. माझ्या मनाच्या एका कोप-यात 'अग्ली डकलिंगने' घरटे बनवले होते. त्या काळामध्ये एकदा अण्णाकाका आमच्या घरी आले असतांना त्यांनी माझी बौध्दिक चाचणी घेतली आणि त्यावरून माझा बुध्द्यांक (आय क्यू) काढला होता. त्यांनी मला कसे काय बोलके केले, कोणते प्रश्न विचारले आणि मी काय उत्तरे दिली यातले काहीही मला आठवत नाही. 'इंटेलेक्चुअल कोशंट' या शब्दाचा अर्थ समजण्याचे माझे वय नव्हतेच. त्यामुळे तो आकडाही मला कळला नाही. खरे तर मला यातले काहीच कालपरवापर्यंत माहीत नव्हते. पण आमच्या घरी 'बुध्द्यांक' हा शब्दच टिंगल करण्याचा एक विषय झाला होता आणि 'दीड शहाणा' म्हणतात तसा त्याचा उपयोग होत होता असे अंधुकपणे आठवते.

अण्णाकाकांना मात्र त्यांच्या विद्येवर आणि शास्त्रीय पध्दतीने केलेल्या चाचणीतून निघालेल्या निकषावर पूर्ण विश्वास होता. मी चौथीत गेल्यानंतर स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसावे अशी त्यांनी शिफारस केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठी सरकारने ज्या नव्या योजना सुरू केल्या होत्या त्यातच शाळकरी मुलांना शिष्यवृत्ती देणे सुरू केले होते. पण ही बातमी आमच्या गावापर्यंत पोचलीच नव्हती. माझ्या आधी आमच्या गावातून कोणी या परीक्षेचा फॉर्मसुध्दा भरला नव्हता. जमखंडीला या परीक्षेचे केंद्र नसल्यामुळे त्यासाठी विजापूरला जाणे आवश्यक होते. आठ नऊ वर्षाच्या मुलाला त्या काळात कोणी एवढे महत्व देत नसत. मात्र अण्णाकाकाचे घर विजापूरला असल्यामुळे माझी राहण्याखाण्याची चांगली सोय होणार होती, त्याची काही काळजी नव्हती हे पाहून त्यांच्या शब्दाचा मान राखण्यासाठी मला त्या परीक्षेला बसवले गेले. मी मात्र प्रवासाला जाण्याच्या कल्पनेने बेहद्द खूष झालो होतो.

जमखंडी आणि विजापूर या गावांच्या मधून कृष्णामाई संथ वाहते आणि त्या काळात जमखंडीच्या जवळपास कोठेही त्या नदीवर पूल नव्हता. जमगी नावाच्या नदीकाठच्या एका गावापर्यंत एका वाहनातून किंवा पायी चालत जायचे, तिथे होडीत बसून नदी पार करायची आणि पलीकडे दुस-या वाहनात बसून पुढे विजापूरपर्यंतचा प्रवास करायचा असे करावे लागे. एका मोठ्या भावाच्या सोबतीने मला विजापूरला पाठवले. मी पहिल्यांदाच जमखंडीच्या पंचक्रोशीच्या बाहेर पाऊल टाकले असल्यामुळे मला या सगळ्यातच गंमत वाटत होती आणि शरीराला होत असलेला त्रास जाणवत नव्हता. आम्हाला उतरवून घेण्यासाठी अण्णाकाका बस स्टँडवर आले होते. त्यांना पाहूनच माझा सारा शीण नाहीसा झाला.

माझ्या शाळामास्तरांना या परीक्षेबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे त्यासाठी वेगळी तयारी करून घेण्याचा प्रश्नच नव्हता. अशी काही तयारी करायची असते किंवा करता येते हेच मुळात कुणाला माहीत नव्हते. नाही म्हणायला दौतीत टाक बुडवून त्याने पाटको-या कागदावर चार पाच ओळी लिहून पाहिल्या. एवढीच वेगळी तयारी केली, कारण तोपर्यंत शाळेत सगळे लिहिणे पाटीवरच होत असे. या स्कॉलरशिपच्या परीक्षेत 'पेपर' असतात एवढे ऐकले होते आणि 'पेपर' म्हणजे 'कागद' एवढा त्याचा अर्थ लागला होता. शाळेतल्या अभ्यासक्रमातल्या विषयांची मात्र माझी पूर्ण तयारी होती आणि चौकसपणामुळे थोडे फार सामान्यज्ञान गोळा झाले होते. एवढ्या तयारीनिशी मी परीक्षेला बसायला गेलो होतो.

आदल्या दिवशी अण्णाकाकांनी मला दहा वीस प्रश्न विचारले आणि त्यावरून मी नक्की पास होईन असे सांगून धीर दिला. शिवाय लेखी परीक्षा कशी द्यायची असते याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. ते स्वतः मला परीक्षेच्या केंद्रात घेऊन गेले आणि पेपर सुटल्यानंतर घ्यायला आले. माझ्या आयुष्यातली पहिलीच लेखी परीक्षा एका नवख्या गावात आणि अनोळखी वातावरणात मी दिली. अण्णाकाका माझ्या पाठीशी होते म्हणूनच मला ते शक्य झाले. परीक्षेची गडबड आटोपल्यानंतर त्यांनी आम्हाला विजापूरचे दर्शन घडवून आणले. प्रसिध्द गोलघुमट, जामा मसजिद, इब्राहिम रोजा, मुलुख मैदान तोफ, तासबावडी वगैरे सर्व प्रेक्षणीय स्थळे दाखवली. उपली बुरुज तर त्यांच्या घराजवळच होता. आम्हाला दाखवण्यासाठी तेसुध्दा रोज आमच्याबरोबर त्यावर चढउतर करायचे. अण्णाकाकांच्या सहवासात त्यांच्या घरी घालवलेले ते तीन चार दिवस मला अपूर्वाईचे वाटले. माझ्या मनातले बदकाचे वेडे कुरुप पिल्लू तेवढे दिवस गाढ झोपी गेले होते. विजापूरच्या त्या ट्रिपमध्ये मला जितका आनंद मिळाला तेवढा ती परीक्षा पास झाल्याचे कळल्यानंतरसुध्दा झाला नाही.

सातवीत असतांना मी पुढच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलो आणि त्या निमित्यांने पुन्हा एकदा तीन चार दिवस अण्णाकाकांकडे रहायला मिळाले. चौथीतल्या पहिल्या अनुभवाची ही सुधारलेली पुनरावृत्ती होती. त्यानंतर शालांत परीक्षा दिल्यानंतर पुन्हा एकदा अण्णाकाकांच्या घरी जाऊन रहायचा योग आला. त्या काळातल्या शिक्षणपध्दतीमध्ये छोट्या गावातील बहुतेक मुलांचा गणित हा विषय कच्चा रहात असे आणि सायन्स कॉलेजमधल्या पहिल्या वर्षातला गणिताचा इंग्रजी माध्यमातला कठीण अभ्यास त्यांना पेलवत नसे. आपल्या विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात आल्यानंतर अण्णाकाकांनी त्यासाठी क्लासेस सुरू केले. मुख्य इंग्रजी माध्यमात गणिताचे पाठ देतांना त्याचे स्पष्टीकरण ते मराठी व कानडी भाषेत देऊन ते सर्वांना सहज समजेल असे व्यवस्थितपणे सांगत असत. त्यामुळे सायन्स कॉलेजला जाऊ इच्छिणा-या मुलांची त्या विषयाची चांगली पूर्वतयारी होत असे. या क्लासेसचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांनी मला बोलावून घेतले. मी तर एका पायावर तयार होतो आणि त्या संधीचा पूर्ण लाभ घेतला.
शालांत परीक्षेला येईपर्यंत मला थोडे फार समजायला लागले होते आणि आता कॉलेजशिक्षणासाठी घर सोडून जायचे म्हणजे न समजून चालण्यासारखे नव्हते. त्या काळामध्ये घरी असतांनासुध्दा माझे सर्वांगीण शिक्षण चालले होते. विजापूरला अण्णाकाकांकडे गेल्यानंतर रोज क्लासमध्ये बसून गणित शिकत असे आणि त्यानंतर बाकीच्या वेळात सुध्दा सारखे काही ना काही पदरात पडतच असायचे. जमखंडीच्या मानाने विजापूर हे मोठे शहर होते. उत्तरेला सोलापूर व दक्षिणेला हुबळी धारवाड या महानगरांशी थेट संपर्क असल्यामुळे सगळ्या नव्या वस्तू आणि कल्पना तिथे लगेच येऊन पोचायच्या. अण्णाकाका कॉलेजशिक्षणासाठी पुण्याला राहिलेले असल्यामुळे त्यांच्या बोलण्याच्या भाषेत शुध्दपणा आणि वागण्यात सफाई आली होती हे मी जमखंडीला असतांनाच पाहिले होते. आता त्यांच्या सहवासात राहतांना ते शिकून घ्यायची संधी होती. त्यांच्या सौ.ना आम्ही 'मामी' म्हणतो, त्या बहुधा मुंबईच्या होत्या आणि माझ्या नात्यातल्या आधीच्या पिढीमधल्या काकू, आत्या वगैरे सर्वांच्या तुलनेमध्ये आधुनिक होत्या. अण्णाकाकांचे विजापूरचे त्या वेळचे घर आकाराने जमखंडीच्या आमच्या वाड्याएवढे मोठे नसले तरी ते छानसे सजवलेले असायचे. घरातल्या सगळ्या वस्तू मांडून ठेवल्यासारख्या दिसायच्या. 'कोणतीही वस्तू कामासाठी बाहेर काढली की काम झाल्यावर आपल्या जागी ठेवायची'. 'घराबाहेर पडतांना नीटनेटके कपडे अंगावर चढवायचे'. 'कुणाशीही बोलतांना अदबशीरपणे बोलायचे', 'एकादी गोष्ट पटली नाही तरी ते सौम्य शब्दात व्यक्त करायचे' अशा अनेक अगदी छोट्या छोट्या गोष्टी रोजच्या जीवनातच माझ्या लक्षात येत होत्या किंवा माझ्या नकळत मला शिकवल्या जात होत्या. आज कोणालाही यात काहीच वेगळे वाटणार नाही, पण शेणाने सारवलेल्या जमीनीवर उभी उसलेली ग्रामीण राहणी आणि घासून पुसून चकाचक बनवलेल्या लादीवर विकसित झालेले शहरी जीवन यांच्या वातावरणातला फरक समजून घेणे आणि स्वतःला तसे वळण लावायचा प्रयत्न करणे माझ्या दृष्टीने महत्वाचे होते. पुढील आयुष्यात मला त्याचा खूप फायदा झाला.

आमच्या घरातले वातावरण जरा जास्तच सनातनी होते. नाटक सिनेमा पाहणे म्हणजे काहीतरी भयंकर पाप करण्यासारखे होते. शाळा सोडेपर्यंत मी 'रामभक्त हनुमान' किंवा 'यल्लम्मा देवी' असले मोजून दोन किंवा तीन चित्रपट (ते सुध्दा फक्त धार्मिक) पाहिले असतील. आमच्या घरात सिनेमातली गाणी किंवा कोणतीही प्रेमगीते ऐकणे वर्ज्य होते, रेडिओच नसल्यामुळे त्याची सोयही नव्हती, गायची तर कुणाचीच बिशाद नव्हती. विजापूरला असतांना अण्णाकाकांनी मला दोन आठवड्यात दोन सिनेमे दाखवले, 'कोहिनूर' आणि 'घूँघट'. मामी स्वतःच 'सारी सारी रात तेरी याद सताये' वगैरेसारखी गाणी सहज गुणगुणत असत. त्यामुळे मलाही कानावर पडलेल्या नव्या गाण्यांच्या उडत्या चाली गुणगुणाव्याशा वाटू लागल्या आणि हळू हळू जमू लागल्या. त्यांच्या घरी अर्नाळकरांच्या रहस्यकथांनी एक कपाट भरले होते. मी त्यातली निदान दोन तरी पुस्तके रोज वाचून संपवत असे आणि ते सुध्दा अगदी राजरोसपणे ! सरांनी गणिताच्या क्लासमध्ये सांगितलेले होमवर्क पूर्ण केले की अन्य वाचन करायला मी मोकळा असे. ज्या दिवशी अण्णाकाकांना मोकळा वेळ असे तेंव्हा ते संध्याकाळी मला फिरायला आपल्याबरोबर नेत असत आणि आम्ही गावातून एक मोठा फेरफटका मारून येत असू. वाटेत ते खूप मनोरंजक गोष्टी सांगत असत. त्यांचे अनेक माजी शिष्य वाटेत भेटत असत आणि त्यांची आपुलकीने विचारपूस करणे, खबरबात घेणे वगैरे होत असे. विजापूरच्या नकाशात पाहून तिथले सारे मुख्य रस्ते एकदा समजून घेतल्यानंतर मी एकटाही फिरायला बाहेर पडून आणि मैल दीड मैल रपेट करून परत येऊ लागलो. उपली बुरुजासारखी मोठी खूण घराजवळ असल्यामुळे कुठे रस्ता चुकून हरवण्याची भीती नव्हती. आणि जरी वाट चुकलीच तरी घर शोधणे अवघड नव्हते. अशा रीतीने त्यांच्या घरी राहण्यात सगळ्याच दृष्टीने मजाच मजा होती. या काळात माझ्या मनातला अग्ली डकलिंग पार नाहीसा झाला आणि उंच भरारी घेण्यासाठी माझ्या मनाची तयारी झाली.

अण्णाकाकांचे मला आवडलेले वैशिष्ट्य म्हणजे ते स्वातंत्र्य देत असत पण त्यांचे सगळीकडे बारीक लक्ष असे आणि काही वावगे दिसले तर ते ती गोष्ट स्पष्टपणे पण न ओरडता किंवा न दुखवता दाखवून देत असत. त्यांना कधी आवाज चढवून बोलतांना मी पाहिले नाही, पण त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट इतर लोक ऐकत असत. किंवा ती ऐकायलाच हवी असे त्यांना मनातूनच वाटावे अशा पध्दतीने ते सांगत असत. मी पूर्वी ऐकलेल्या, वाचलेल्या किंवा पोपटपंची करून इतरांना सांगितलेल्या काही चांगल्या गोष्टी अण्णाकाकांच्याकडून ऐकतांना मला जास्त समजल्या किंवा उमगल्या असाव्यात. १९७१ सालच्या उन्हाळ्यातल्या सुटीतला तो अनुभव मला मनापासून इतका आवडला होता की दिवाळीची सुटी होताच मी हॉस्टेलमधल्या इतर मुलांप्रमाणे अधीर होऊन घराकडे धाव ठोकली नाही. काही तरी निमित्य काढून आधी विजापूरला गेलो. त्या अगांतुकपणाचा मला एक अनपेक्षित असा फायदा झाला. गणिताच्या क्लासला येणारा अण्णाकाकांचा एक विद्यार्थी तिथे भेटला. त्याला त्याच वर्षी सुरू झालेली नॅशनल स्कॉलरशिप मिळाल्याचे त्याच्याकडून समजले. मला तर त्याच परीक्षेत त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले होते. या गोष्टीचा छडा लावल्यावर मलाही ती शिष्यवृत्ती मिळाली. काटकसर करून राहिल्यास महिन्याचा सर्व खर्च भागण्यासाठी ती पुरेशी होती. त्यामुळे माझ्या पुढील शिक्षणाला तिचा मुख्य आधार मिळाला आणि ते पूर्ण करण्यात खूप मदत झाली.

माझे शिक्षण अर्धवट असतांनाच आमचे दादा (माझे वडील) गेले आणि आमचे जमखंडीचे घरच विस्कटले. त्यापुढे जमखंडीलाच जायचे कारण न उरल्यामुळे वाटेत विजापूरला मुक्काम करण्याची संधी मिळत नव्हती. लग्न करून स्थिरस्थावर झाल्यानंतर मुद्दाम त्या भागाचा धावता दौरा काढला आणि त्यातले दोन दिवस विजापूरसाठी राखून ठेवले. मधल्या काळात अण्णाकाकांनी विजापूरच्या नव्या भागात स्वतःचा बंगला बांधला होता आणि ते दत्तभक्त असल्यामुळे त्याला 'गुरुकृपा' असे नाव दिले होते. पूर्वीचा अनुभव आणि निरीक्षण यांच्या आधारावर त्यांनी खूप छान आणि सोयिस्कर असे घर बांधले होते. नेहमीप्रमाणेच त्यांच्या घरी गेल्यानंतर आमचे मनःपूर्वक आणि भरपूर आदरातिथ्य झाले. विजापूर हे ऐतिहासिक शहर अलका आणि उदय यांना दाखवायलाचे होते. या कामासाठी अण्णाकाकांना तसदी द्यावी असे मला वाटले नाही आणि आम्ही शहर पहायला निघालो. "मला विजापूर शहराची बरीच माहिती आहे", "टांगेवाला सगळीकडे फिरवून आणेल" वगैरे मी अण्णाकाकांना सांगून पाहिले. पण तरीसुध्दा एक एक करत ते स्वतः सर्व ठिकाणी आमच्याबरोबर आले आणि तेसुध्दा त्यांच्या सायकलवरून ! प्रत्येक गोष्ट जेवढी चांगली करता येणे शक्य असेल तशी करायची असा त्यांचा स्वभाव होता आणि त्यांच्याइतका चांगला मार्गदर्शक मिळणे अशक्य होते. यामुळे त्यात आमचा फायदाच झाला. पण ते येणार हे आधीच ओळखून सर्वांनी एकत्र फिरण्याची व्यवस्था मी करायला हवी होती ही रुखरुख मात्र मनाला लागून राहिली.

भावना, कर्तव्य वगैरे बाबतीतल्या रूढ विचारांच्या पलीकडे जाऊन योग्य वा अयोग्य याचा निर्णय घेण्याची पुरेपूर क्षमता मला अण्णाकाकांमध्ये दिसली. याची दोन उदाहरणे आठवतात. दादांच्या शेवटच्या आजारात त्यांना सोलापूरच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. सर्व वैद्यकीय तपासण्या झाल्यानंतर त्यांना झालेला असाध्य रोग अखेरच्या टप्प्याला जाऊन पोचला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचार चालले असतांनाच ते कोमामध्ये गेले. यावर कोणताच इलाज शक्य नसल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घेऊन जाण्याची सूचना डॉक्टरांनी दिली. त्यावेळी मी विद्यार्थीदशेतच होतो. माझी आई, मोठे बहीणभाऊ आणि इतर सारेच आप्त त्या धक्क्याने हादरले होते. काय करावे याबद्दल कोणालाच काही सुचत नव्हते. दादांना वाडिया हॉस्पिटलमधून बाहेर नेल्यावर त्यांना एकाद्या खाजगी शुश्रुषाकेंद्रात नेऊन ठेवावे असे वाटणे त्यावेळी साहजीक होते आणि त्या दृष्टीने चौकशी आणि तयारी सुरू केली होती. अर्थातच ते खूप खर्चिक होते. त्या काळात आमची सांपत्तिक परिस्थिती ओढाताणीचीच होती, तरीही भावनेच्या भरात कशीबशी पैशाची व्यवस्था करावी लागली असती. त्यावेळी भेटायला आलेल्या अण्णाकाकांनी सांगितले, "दुस-या इस्पितळात नेऊन ते बरे होण्याची शक्यता असेल तर ते करायलाच पाहिजे. यात काही दुमत नाही. पण आज कोणताही खाजगी डॉक्टरसुध्दा आपल्याला तशी आशा दाखवायला तयार नाही. त्यांच्या आयुष्यातले आता शेवटचे जितके दिवस शिल्लक असतील ते कुठल्या तरी अनोळखी खोलीत एकट्याने पडून राहण्यापेक्षा ते आपल्या मुलाबाळांमध्ये घालवतील तर त्यांना आणि तुम्हा सर्वांना बरे वाटेल. त्यांची जेवढी सेवा शुश्रुषा आपण मनोभावे करू शकू तशी पगारदार नर्स करणार नाही. तेंव्हा माझ्या मते त्यांना घरी घेऊन जाणेच योग्य होईल."

शालांत परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी अण्णाकाकांना एकदा बंगळूरला जाऊन काही दिवस तिथे मुक्काम करावा लागला. माझा भाऊ धनंजय तिथेच रहात होता आणि त्याचे घरही चांगले प्रशस्त होते. अण्णाकाकांनी त्याच्याकडेच रहावे अशी त्याची इच्छा असणे साहजीकच आहे. तशी विनंती त्याने केली आणि ती मान्य होईल अशी त्याची अपेक्षा होती. पण अण्णाकाकांनी वेगळा ऑब्जेक्टिव्ह विचार केला. धनंजयकडे जाऊन राहण्याची आणि घरच्या अन्नाची उत्तम व्यवस्था झाली असती, तसेच त्याच्या कुटुंबातल्या लोकांचा सहवास मिळाला असता, त्यांना खूप आनंद झाला असता हे सगळे प्लस पॉइंट असले तरी पेपर तपासण्याचे जे काम करण्यासाठी ते तिथे गेले होते ती जागा दूर होती आणि रोज तिकडे जाण्यायेण्याची दगदग करून ते काम करतांना कदाचित त्या कामाला पुरेसा न्याय देता आला नसता. त्यामुळे जवळच असलेल्या एका कामचलाऊ निवासालयात त्यांनी राहण्याचे ठरवले. पुढे ऑफीसच्या कामासाठी मला जेंव्हा निरनिराळ्या शहरांना जावे लागत होते तेंव्हा मला त्यांचे लॉजिक समजले आणि त्या शहरात असलेल्या नातेवाइकांकडे उतरण्याऐवजी मी कामाच्या दृष्टीने सोयिस्कर अशा जागी राहू लागलो आणि कामातून वेळ मिळाला तर त्यांना भेटायचा प्रयत्न केला.

अण्णाकाकांच्या मुलीच्या म्हणजे पद्माच्या लग्नाच्या वेळचा एक मजेदार प्रसंग आठवतो. हॉलच्या कुठल्याशा कोप-यात बसून लग्नाला आलेल्या इतर नातेवाइकांबरोबर गप्पागोष्टी करण्यात मी मग्न होतो. "आनंदा कुठे आहे? त्याला अण्णामामांनी बोलावलं आहे." असे कोणीतरी ओरडून सांगत होते. ते माझे काका असले तरी त्यांच्या भाचरांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्या परिवारात ते 'अण्णामामा' म्हणूनच ओळखले जातात. त्या ठिकाणी माझ्याहून ज्येष्ठ आणि अनुभवी अशी अनेक मंडळी होती आणि तरुण उत्साही व्हॉलंटीअर्सची मोठी फौज कोणतेही काम करण्यासाठी तत्पर होती. त्यामुळे माझी कशासाठी गरज पडली असेल ते मला समजेना. माझ्याकडे कोणती विशिष्ट जबाबदारीही दिलेली नव्हती. मी धावत पळत आत गेलो आणि अण्णाकाकांच्यासमोर जाऊन हजर झालो. तिथे गेल्यावर समजले की कोणाला तरी नेकटाय बांधायची होती आणि ते काम मी व्यवस्थित करू शकेन असा विश्वास त्यांना वाटला होता. आता मात्र ही माझ्या कसोटीची वेळ होती. मी स्वतः गरजेनुसार कधी गळ्यात टाय बांधली असली तरी ती परफेक्ट होईल इकडे लक्ष दिले नव्हते. आता मात्र त्यात चूक करून चालले नसते. देवाचे नाव घेऊन ती टाय हातात घेतली आणि सर्व लक्ष एकवटून तिच्या गाठीचा सामोशासारखा त्रिकोण कसाबसा तयार केला. लग्न समारंभ आणि जेवणखाण वगैरे संपल्यानंतर कार्यालयातून हळूच पळ काढायचा आणि मुंबईला परत जाण्यापूर्वी इतर एक दोन लोकांकडे जाऊन यायचे असा माझा विचार होता. अण्णाकाकांचा निरोप घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो तर म्हणाले, "एवढ्यात कुठे चाललास? सगळ्यांच्या भेटी तर इथे झाल्या आहेत ना!" त्यांचा मुद्दा बिनतोड होता. मुकाट्याने हातातली बॅग खाली ठेवली. मुलीला साश्रु नयनांनी निरोप देऊन झाल्यानंतर त्यांनी सर्व पाहुणे मंडळींना हॉलमध्ये बोलावले. आलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या नावाने भेटवस्तूचे वेगळे पॅकेट त्यांनी तयार करून ठेवले होते आणि प्रोटोकॉलनुसार त्या सर्वांची त्यांनी एक यादी बनवलेली होती. अण्णाकाकांनी एकेका कुटुंबाचे नाव घेऊन बोलावताच त्यांनी पुढे यायचे आणि आपल्या भेटवस्तू स्वीकारायच्या. लग्नसमारंभाचा हा शेवटचा भाग अशा प्रकारे अत्यंत सुनियोजित पध्दतीने केलेला मी पहिल्यांदाच पाहिला. त्यानंतर जेंव्हा मला आवश्यकता पडली तेंव्हा तेंव्हा मीसुध्दा तसे करण्याचा थोडा प्रयत्नही केला.

त्यानंतर फक्त एकदाच विश्वासच्या लग्नाच्या निमित्ताने माझे विजापूरला जाणे झाले, तेसुध्दा धावत पळत ! त्यावेळी त्यांच्याकडे रहाण्यासाठी सवड नव्हती. लग्नाच्या आदल्या रात्री सारे कार्यक्रम संपल्यानंतर कार्यालयात नुकतीच निजानीज झाली होती. मध्यरात्रीच्या सुमाराला मला कसलीशी चाहूल लागून जाग आली. डोळे अर्धवट उघडून पाहिले तर अण्णाकाका त्या खोलीत कोण कोण झोपले आहेत हे पहायला आले होते. ते खास त्यांच्या घरचे कार्य नसले तरीसुध्दा लग्नाला आलेल्या सर्वांना अंथरूण पांघरूण वगैरे नीट मिळाले आहे याची खात्री करून घेतल्यानंतर ते आपल्या जागेवर जाऊन झोपले.

पुढे अण्णाकाकांनीही विजापूर सोडले आणि ते आकुर्डीला स्थायिक झाले. कामाच्या आणि संसाराच्या व्यापात मी इतका गुंतत गेलो होतो की कारणाशिवाय कोणाकडे जाणे मला अशक्यच होऊन गेले होते. त्यामुळे अण्णाकाकांची भेट एकाद्या लग्नसमारंभातच झाली तर होत असे आणि त्यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळत असे. हळू हळू अशा भेटीही कमी होत गेल्या. त्यांच्या नातीच्या विवाहाला अगदी नक्की जायचे आमचे ठरले होते, पण आयत्या वेळी तब्येतीने असा दगा दिला की मला थेट हॉस्पिटलात दाखल व्हावे लागले. त्यानंतर त्यांच्या भेटीचा योग आला नाही. या वर्षी पुण्याला झालेल्या कौटुंबिक संमेलनाच्या वेळी अण्णाकाकांना तिथे 'गेस्ट ऑफ ऑनर' म्हणून बोलवायचे असा आमचा विचार होता, त्या दृष्टीने थोडी विचारणा केली, पण प्रकृतीअस्वास्थ्यामुळे ते आजकाल कुठेच जात नाहीत असे समजले. त्यावेळी हवामानही फारसे अनुकूल नव्हतेच. तेंव्हा मात्र पुढच्या पुण्याच्या दौ-यात आकुर्डीला जाऊन त्यांना भेटून यायचे असे मनोमनी ठरवले आणि त्यांचा टेलीफोन नंबर डायरीत लिहून घेतला.

मनात तीव्र इच्छा असली तर अचानक मार्ग सापडतो असे म्हणतात, अगदी तसेच झाले. अकस्मात काही कामानिमित्य मला चिंचवडला जाण्याचा योग आला. तिथले काम लवकर आटोपले तसा तिथूनच फोन लावून मी अण्णाकाकांना भेटायला येणार असल्याचे कळवले. त्यांचा आकुर्डीचा सविस्तर पत्ता लिहून घेतला, तिथे कसे पोचायचे ते समजण्यासाठी आजूबाजूच्या खाणाखुणा विचारून घेतल्या आणि त्याप्रमाणे त्यांच्या घरी जाऊन पोचलो. अनेक वर्षांनंतर त्यांना नमस्कार करतांना मनात जे समाधान वाटत होते ते शब्दात सांगता येणार नाही. वयोमानानुसार त्यांचे शारीरिक स्वास्थ्य नाजुक झाले असले तरी स्मरणशक्ती चांगली तल्लख दिसली. आमच्या परिवारातल्या प्रत्येकजणाची त्यांनी अत्यंत आपुलकीने नावानिशी चौकशी केली. बोलण्यामध्ये गेल्या पाच दशकातल्या आठवणी निघाल्या. त्यात एकदा धनंजयला नाराज करावे लागल्याचे त्यांनी सांगितले आणि मला अद्यापपर्यंत माहीत नसलेला माझ्या बौध्दिक चाचणीचा किस्सा त्यांनी सांगितला. जवळ जवळ साठ वर्षांपूर्वीची ती इतकी किरकोळ गोष्ट त्यांनी अजून लक्षात ठेवली होती याचे मला नवल वाटले.

पुण्याला झालेल्या कौटुंबिक मेळाव्याच्या निमित्याने मी परिवारातल्या सर्वांची छायाचित्रे गोळा करून ती सर्वांना दाखवली होती. अण्णाकाकांना भेटून घरी परत आल्यानंतर माझ्या लक्षात आले की त्यात त्यांचा फोटो नाही. त्यामुळे माझ्या संग्रहात मोठी उणीव राहिली आहे, मी घरातले बहुतेक सगळे आल्बम उघडून पाहिले, आमच्या विजापूरच्या भेटीच्या वेळी काढलेले दोन तीन फोटोसुध्दा सापडले, पण त्यात नेमका अण्णाकाकांचा चेहराच तेवढा कुठे मिळाला नाही. त्यामुळे विठ्ठलला फोनवरून विनंती केली आणि त्याने मला एक फोटो पाठवून दिला. त्यानंतर त्यांच्याबद्दल चार शब्द लिहावे असे वाटले म्हणून ते लिहिण्याचा हा प्रयत्न केला आहे. त्यांचे आशीर्वाद सतत आमच्या पाठीवर राहोत अशी इच्छा व्यक्त करून आणि परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो अशी प्रार्थना त्याचेकडे करून हा लेख संपवत आहे.

Saturday, December 25, 2010

मन - भाग ७ (अंतिम)



माणसाच्या आयुष्यात मनाचे स्थान सर्वात मोठे आहे हे सांगून झाले आहेच. आपल्या जीवनाच्या गाडीच्या ड्रायव्हरच्या सीटवर आपले मन बसलेले असते आणि रस्त्यामधले खड्डे किंवा अडथळे चुकवून, प्रसंगी वेग वाढवून किंवा धीमा करून आपल्या जीवनाला ते पुढे नेत असते. इतर लोक दहा मुखांनी दहा सल्ले देत असतात. त्यातला आपल्याला सोयीचा आणि लाभदायक असा सर्वात योग्य कोणता हे मनच ठरवते कारण सर्व परिस्थितीची पूर्ण जाणीव त्यालाच असू शकते. त्यामुळेच "ऐकावे जगाचे आणि करावे मनाचे." अशी एक म्हण आहे. कोणतीही गोष्ट "करू, करू" असे नुसते तोंडदेखले म्हणणारे लोक सहसा कधी कृती करत नाहीत, पण एकाद्याने ते काम मनावर घेतले तर मात्र तो माणूस ती गोष्ट पूर्ण करतो. त्यासाठी त्याच्या मनाने त्यात सहभागी होणे आवश्यक आहे. सांगाल तेवढेच काम करणा-या सांगकाम्याचा बैल रिकामाच राहतो तसेच यंत्रवत हालचालीमधून केलेल्या विचारशून्य कृतीमधून सहसा फारसे काही साध्य होत नाही. एकाद्या कार्यासाठी कायावाचामनसा वाहून घेतल्यानंतर ते सिध्दीला जाते. तनमनधन अर्पण करणे म्हणजे संपूर्ण समर्पण झाले. अर्थातच त्यात मनाचा वाटा फार मोठा आणि मोलाचा असतो. अनेक मार्गांनी धन मिळवता येते आणि दाम देऊन तन (मनुष्यबळ) विकत घेता येते पण मनावर मात्र दुसरा कोणीसुध्दा ताबा मिळवू शकत नाही. ते ज्याचे त्यानेच स्वेच्छेने अर्पण करावे लागते.

मनाचे हे अनन्यसाधारण महत्व ओळखूनच समर्थ रामदासांनी अनेक मनाचे श्लोक लिहून जनतेच्या मनातल्या सज्जनाला आवाहन केले आणि त्याला उपदेशामृत पाजून सन्मार्गाला जाण्यास उद्युक्त केले. भक्तीमार्गाचा मार्ग धरून अंती मोक्षप्राप्ती करण्याचा उपदेश त्यात आहे असे वर वर पाहता वाटते. पण परमार्थ साधता साधता त्याआधी या जगात कसे वागावे याची सोपी शिकवण त्यात दिली आहे. शतकानुशतके पारतंत्र्यात भरडलेल्या मनांची मरगळ झटकून त्यांना कार्यप्रवृत्त करण्याचा प्रयत्न या सोप्या पण मनाला भिडणा-या श्लोकांमधून समर्थांनी केला होता.

इतर साधूसंतांनीदेखील जनतेच्या मनालाच आवाहन करून भक्तीमार्गावर नेले. एकदा विठ्ठलाचे चरणी लीन झाल्यानंतर मनाला कोठेही जायला नको असे वाटते असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,

आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलीया ॥१॥
भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद ॥२॥
प्रेमरसे बैसली मिठी । आवडी लाठी मुखाशी ॥३॥
तुका म्हणे आम्हा जोगे । विठ्ठला घोगे खरे माप ॥४॥

संत एकनाथांनी हाच भाव वेगळ्या शब्दांमध्ये सांगितला आहे. एकदा त्या गोविंदाचा छंद लागला की दुसरी कसली काळजी नाही, दुसरा कसला विचारच मनात आणण्याची गरज नाही.
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥
तेणो देह ब्रम्हरूप गोविंद नि जसे रामरूप ॥२॥
तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ॥३॥
गोविंद हा जनी-वनी, म्हणे एका जनार्दनी ॥४॥

संत गोरा कुंभाराच्या जीवनावरील चित्रपटातल्या गीतात गदिमांनी या भावना अशा व्यक्त केल्या आहेत,

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम ।
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम ।।

देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्म ।
सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म ।
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम ।।

तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी ।
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी ।
दिसो लागली तू डोळा अरुपी अनाम ।।

तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा ।
उडे अंतराळी आत्मा, सोडुनि पसारा ।
नाम तुझे घेतो गोरा, म्हणूनी आठयाम ।।

तर गोरा कुंभार या नाटकातले अशोकजी परांजपे यांचे पद असे आहे,

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ।
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर ।।

बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले ।
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर ।।

जन्म-मरण नको आता, नको येरझार ।
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार ।।

चराचरापार न्या हो जाहला उशीर ।
पांडुरंग पांडुरंग मन करा थोर ।।

संत तुकारामाचे मन विठ्ठलाच्या चरणी रमले होते तर संत तुलसीदासाचे मन श्रीरामामध्ये विलीन झाले होते. खूप जुन्या काळातल्या तुलसीदास या नाटकातले गोविंदराव टेंबे यांचे पद असे आहे.

मन हो रामरंगी रंगले।
आत्मरंगी रंगले, मन विश्वरंगी रंगले ।।

चरणी नेत्र गुंतले, भृंग अंबुजातले ।
भवतरंगी रंगले ।।

मन या विषयावर असंख्य गीते आहेत. त्यातली माझी आवडती तसेच तुफान लोकप्रिय असलेली काही गाणी निवडून या लेखाचा प्रपंच केला आहे. संत ज्ञानेश्वरांच्या सगळ्याच रचना महान आहेत. त्यात गाठलेली विचारांची उंची आणि शब्दांमध्ये दडलेला गहन अर्थ समजून घेणे सोपे नाही. हे "विश्वचि माझे घर" किंवा "चिंता करतो विश्वाची" असे सहजपणे सांगून जाणा-या ज्ञानेश्वरांनी विश्वरूप परमात्म्याशी त्यांचे मन कसे एकरूप होऊन गेलेले आहे हे या अभंगात सांगितले आहे. यावर आणखी भाष्य करण्याची माझी योग्यताच नाही.

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले ।
अवघे चि जालें देह ब्रम्ह ॥१॥

आवडीचें वालभ माझेनि कोंदटलें ।
नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥

रखुमादेवीवरू सहज नीटु जाला ।
हृदयीं नीटावला ब्रम्हाकारें ॥३॥

. . . . . . . . . . . . . . (समाप्त)

Friday, December 24, 2010

मन - भाग ६

बहुतेक माणसे एका ठराविक चाकोरीतले जीवन जगत असतात, त्यांचे विश्व एका लहानशा चौकटीत सामावलेले असते. त्यातला उजेड कमी झाला की सगळे जग कायमचे अंधारात बुडाले आहे असे त्यांना वाटायला लागते. अतीव नैराश्य, वैफल्य आदींने ते ग्रस्त होतात. मनातली ही भावना टोकाला गेल्यास आत्महत्येचे विचार त्यात यायला लागतात. पण त्यांनी चौकटीच्या बाहेर जाऊन पाहिले तर सुख दुःख ह्या गोष्टी अशा सर्वसमावेशक नाहीत, स्थळकाळाप्रमाणे त्या सारख्या बदलत असतात ते त्यांना समजेल. ते पाहिल्यावर त्यांच्या मनाचा दुबळेपणा झटकून टाकू शकतात आणि जीवनाचा आनंद त्यांना दिसू लागतो. कवीवर्य गदिमांनी ही शिकवण या गाण्यात किती चांगल्या शब्दात दिली आहे पहा.

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा ।
फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा ।।

होईल ताप काही मध्यान्हिच्या उन्हाचा ।
अविचार सोड असला कोल्लाळ कल्पनांचा ।
आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणांचा ।।

पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे ।
आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे ।
हसुनी करी परि ते वर्षाव सौरभाचा ।।

का कालचा उद्याला देसी उगा हवाला ।
द्यावाच वाटतो ना मग जीव दे जिवाला ।
अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा ।।

काही महानुभावांचे मन इतके सुदृढ बनलेले असते की दुःखाचे चटके ते हंसत हंसत सोसतात. अंगाला ओरबडणारे कांटे फुलांसारखे कोमल वाटतात. सोबतीला कोणी नसला तरी एकला चलो रे या रवींद्रनाथ टागोरांच्या गीतानुसार आपल्या मार्गावर चालत राहतात. येशू ख्रिस्तासारखे महान लोक आपला क्रूस स्वतःच्या खांद्यावर वाहून नेतांनादेखील यत्किंचित कुरकुर करत नाहीत. असे महान लोक म्हणतात,

वाटेवर काटे वेचीत चाललो ।
वाटले जसा फुलाफुलात चाललो ।।

मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी ।
आपुलीच साथ कधी करित चाललो ।।

आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद ।
नादातच शीळ वाजवीत चाललो ।।

चुकली तालात चाल, लागला जिवास बोल ।
ढळलेला तोल सावरीत चाललो ।।

खांद्यावर बाळगिले, ओझे सुखदुःखाचे ।
फेकुन देऊन अता परत चाललो ।।

मनाने निर्मळ असणे अतीशय महत्वाचे आहे. अनेक दुर्गुणांच्या डागामुळे ते मलीन झाले असेल तर त्या माणसाच्या उन्नतीत त्याची बाधा आल्याशिवाय राहणार नाही. "नाही निर्मळ ते मन तेथे काय करील साबण ?" असे विचारून चित्तशुध्दी करण्याचा उपदेश संतांनी दिला आहे. मनात जर खोटेपणाचा अंश नसेल, त्यात कोणाबद्दल कटुता नसेल, कसला संशय नसेल तर तो माणूस आपले काम करतांना कचरणार नाही, आत्मविश्वासाने प्रगतीपथावर वाटचाल करत राहील आणि जगात यशस्वी होईल. सोप्या ग्रामीण भाषेत हा संदेश असा दिला आहे.

मन सुद्ध तुझं गोस्ट हाये प्रिथिविमोलाची ।
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची ।
पर्वा बी कुनाची ।।

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला ।
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला ।
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची ।।

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई ।
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई ।
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची ।

मन हे असेच बहुरंगी असते. कधी नैराश्याच्या गर्तेत खोल बुडेल तर कधी गगनाला गवसणी घालायला जाईल. संयम हे शहाणपणाचे लक्षण मनाला आवर घालण्याचा प्रयत्न नेहमी करत असते, पण कधी कधी त्याचा इलाज चालत नाही. वेडे मन त्याला न जुमानता पिसाट होतेच ! ते त्याच्या अडेलतट्टूपणावर ठाम राहते. त्यावेळी मनासारखे वागण्याखेरीज कोणताही पर्याय त्याला मान्य नसतो.

मन पिसाट माझे अडले रे,
थांब जरासा !

वनगान रान गुणगुणले;
दूरात दिवे मिणमिणले;
मधुजाल तमाने विणले रे,
थांब जरासा !

ही खाली हिरवळ ओली;
कुजबुजून बोलू बोली;
तिमिराची मोजू खोली रे,
थांब जरासा !

नुसतेच असे हे फिरणे
नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे,
थांब जरासा !

आजच्या पिढीतल्या गुरू ठाकूर यांनी मनाच्या अनेक रूपांचा सुरेख ठाव घेतला आहे. हळवेपणा, बेधुंद वृत्ती, स्वप्नरंजन, विगहाकुलता, आशा. निराशा अशा त्याच्या विविध त-हा त्यांनी किती छान रंगवल्या आहेत !

मन उधाण वा-याचे

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन्‌ क्षणात फिरुनी आभाळाला भिडते !

मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते,
कधी गहि-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते !
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते !

मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

पण मन या विषयावर मराठी भाषेतली जितकी गीते मी वाचली किंवा ऐकली आहेत त्या सर्वांमध्ये मला स्व.बहिणाबाईंनी लिहिलेल्या ओव्या जास्त आवडतात. मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्रत्यक्ष परमेश्वराला जागेपणी पडलेले स्वप्न आहे असे त्या सांगतात. कल्पनेची ही उंच भरारी आणि तिचे असे सुंदर शब्दांकन "माझी माय सरसोती, मले शिकयते बोली, लेक बहिनाच्या मनी किती रुपीतं पेरली।" असा सार्थ दावा करणा-या बहिणाबाईच करू शकतात. मनाबद्दल त्या सांगतात,

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर ।
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।

मन मोकाट मोकाट, याच्या ठाई ठाई वाटा ।
जशा वा-यानं चालल्या, पान्याव-हल्या रे लाटा ।।

मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन ?
उंडारलं उंडारलं, जसं वारा वहादनं ।।

मन पाखरू पाखरू, याची काय सांगू मात ?
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।

मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर ।
अरे, इचू, साप बरा, त्याले उतारे मंतर !

मन चपय चपय, त्याले नही जरा धीर ।
तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।

मन एवढं एवढं, जसा खाकसंचा दाना ।
मन केवढं केवढं ? आभायात बी मायेना ।।

देवा, कसं देलं मन, आसं नही दुनियांत !
आसा कसा रे तू योगी, काय तुझी करामत !

देवा आसं कसं मन ? आसं कसं रे घडलं ?
कुठे जागेपनी तूले, असं सपनं पडलं !

. . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Thursday, December 23, 2010

मन - भाग ५

सुखस्वप्ने पहात रहावे असे सर्वांनाच वाटते, पण ते संपल्यानंतर काय ? सावज हातात सापडल्यानंतर शिकारीतली मजा खलास होते, मुक्कामाला पोचल्यानंतर प्रवासातली गंमत संपते त्याचप्रमाणे स्वप्नपूर्ती झाल्यानंतर त्याचे काही वाटेनासे होते. एकादी गोष्ट विनासायास हाती लागली तर तिचे काहीच मोल वाटत नाही. हा मनाचा विचित्रपणा वाटेल पण तसेच असते. शेवट गोड असो किंवा नसो गोष्ट संपून जाते. तसे होण्यापेक्षा स्वप्न अर्धेच रहावे असे एका कवीला वाटते. या गाण्यात ते सांगतात,

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा ।
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा ।।

रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या ।
साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या ।
कधि सोशिला उन्हाळा कधि लाभला विसावा ।।

नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी ।
विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलोनि यावी ।
काट्याविना न हाती केव्हा गुलाब यावा ।।

सिद्धीस कार्य जाता, येते सुखास जडता ।
जडतेत चेतनेला उरतो न कोणि त्राता ।
अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा ।।

मनाला जाळणारी चिंता, व्याकुळ करणारी काळजी नेहमीच अनाठायी असते असेही नाही. अनेक वेळा मनातल्या शंका कुशंका ख-या ठरतात. एवढेच नव्हे तर कथेला अकल्पितपणे कलाटणी मिळते. सगळे काही मनाजोगे होत असते, पुढे मिळणा-या सुखाची कल्पना करून मनात मांडे खात असलेल्या माणसाच्या पुढ्यात नियती वेगळेच ताट वाढून ठेवते. त्याचे मन आक्रोश करते,

कधी बहर, कधी शिशिर, परंतू दोन्ही एक बहाणे ।
डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे ।।

बहर धुंद वेलीवर यावा ।
हळुच लाजरा पक्षी गावा ।
आणि अचानक गळुन पडावी,
विखरुन सगळी पाने ।।

भान विसरुनी मिठी जुळावी ।
पहाट कधि झाली न कळावी ।
भिन्न दिशांना झुरत फिरावे,
नंतर दोन दिवाणे ।।

हळुच फुलाच्या बिलगुनि गाली ।
नाजुक गाणी कुणी गायिली ।
आता उरली आर्त विराणी.
सूरच केविलवाणे ।।

जुळली हृदये, सूरहि जुळले ।
तुझे नि माझे गीत तरळले ।
व्याकुळ डोळे कातरवेळ.
स्मरुन आता जाणे ।।

काही दुर्दैवी व्यक्तींच्या बाबतीत तर करायला गेले एक आणि झाले भलतेच असे होत राहते. महाभारतातल्या सत्यवतीची कथा असेच काही सांगून जाते. सामान्य कोळ्याची देखणी पोर मत्स्यगंधा साम्राज्ञी होण्याचे स्वप्न पहाते आणि ते पूर्ण होतेसुध्दा. पण त्यानंतर मात्र सगळे विस्कळत जाते. एकामागोमाग एक एकापेक्षा एक अनपेक्षित घडना घडत जातात आणि तिला त्या पहाव्या लागतात. अखेरीस उद्वेगाने ती म्हणते,

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा ।
धर्म न्याय नीति सारा खेळ कल्पनेचा ।।

ध्यास एक हृदयी धरुनी स्वप्न रंगवावे ।
वीज त्यावरी तो पडुनी शिल्प कोसळावे !
सर्वनाश एकच दिसतो नियम या जगाचा ।।

दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचा ।
दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा ।
वाहणे प्रवाहावरति धर्म एक साचा ।।

याहूनही जास्त हृदयविदारक अनुभव आल्यामुळे अत्यंत निरोशेने ग्रस्त झालेले एक मन आक्रंदन करते,

लळा-जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई ।
कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही ।।

पिसे, तनसडी, काड्या जमवी, चिमणी बांधी कोटे ।
दाणा, दाणा आणून जगवी, जीव कोवळे छोटे ।
बळावता बळ पंखामधले, पिल्लू उडूनी जाई ।।

रक्तहि जेथे सूड साधते, तेथे कसली माया ?
कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया ।
सांगायाची नाती सगळी, जो तो अपुले पाही ।।

माणुस करतो प्रेम स्वतःवर, विसरुन जातो देवा ।
कोण ओळखी उपकाराते, प्रेमा अन्‌ सद्भावा ।
कोण कुणाचा कशास होतो या जगती उतराई ।।

आशा निराशा हे मनाचे विभिन्न भाव आहेत. आशा, अभिलाशा, अपेक्षा वगैरेंचा निरनिराळ्या प्रकारचा आविष्कार पहिल्या चार भागांमध्ये दिसला, तसेच निराशा, वैफल्य वगैरे भावांची निर्मितीदेखील मनातच होत असते. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःखांचा अनुभव सर्वसामान्य लोकांना येतो, पण महान लोक सगळ्या जगाची चिंता वहातात. एका विशिष्ट दुःखाकडे न पहाता एकंदरीत समाजाच्या कष्टांवर बोट ठेवतात. आजचेच जग वाईट आहे असातला भाग नाही. कित्येक दशकांपूर्वी कवीवर्य भा.रा.तांबे यांनी लिहिले आहे,

कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्याचे ? कुणाला काय सांगाव्या ?

उरी या हात ठेवोनी, उरीचा शूल का जाई ?
समुद्री चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही ।।

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्री एकही बिंदू ।।

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा ।
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौकडे दावा ।।

नदी लंघोनि जे गेले, तयांची हाक ये कानी ।
इथे हे ओढती मागे, मला बांधोनि पाशांनी ।।

कशी साहू पुढे मागे, जिवाला ओढ जी लागे ?
तटातट्‌ काळजाचे हे तुटाया लागती धागे ।।

पुढे जाऊ ? वळू मागे ? करू मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कुणी, हसे कोणी, करी हेवा !

मनासारखे चालले आहे असा कधीकधी भास होत असतो. निदान इतरांना तसेच वाटत असते. सगळे काही व्यवस्थित असतांनादेखील हा माणूस सुखी का नाही असा प्रश्न त्याला पडतो, त्याला त्याचे सुख दुखते आहे असे समजतो. अशा माणसाची व्यथा वेगळीच असते. त्याचे दुखणे त्याला मनातून सतत टोचत असते पण ते व्यक्त करायची सोय नसते. सांगून ते कोणाला कळणारच नाही, ऐकणारा त्याची टिंगल करेल, त्याला मूर्खात काढेल, त्यामुळे त्याला होत असलेल्या त्रासात आणखी भर पडेल याची त्याला जवळ जवळ खात्री असते. त्याचे मन स्वतःलाच सांगते,

काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी ।
मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे !

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ?
चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे !

काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे !

हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना ।
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे !

कदाचित अशा विचाराने म्हणा किंवा दुस-या कोणाची टीका सहन करून घ्यायची त्याच्या मनाची तयारी नसल्यामुळे असेल पण एकादा माणूस नेहमीच आपले ओठ घट्ट मिटून ठेवतो. कदाचित स्वभावानेच तो पक्का आतल्या गाठीचा असेल, आपल्या सुखातही कोणी वाटेकरी नको आणि दुःखातही नको अशी त्याच्या मनाची वृत्ती असेल. आणखीही काही कारणे असतील, तीसुध्दा तो कोणालाही सांगत नाही. कोणालाही काहीही सांगायला तो तयार नसतो. त्याला काही विचारायला कोणी गेला तर तो निर्धाराने म्हणतो,

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही ।
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही ।।

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे ।
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही ।।

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज ।
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही ।।

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला ।
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही ।।

दूर बंदरात उभे एक गलबत रूपेरी ।
त्याचा कोष किना-यास कधी लाभणार नाही ।।

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी ।
त्याच्या निखा-यात कधी तुला जाळणार नाही ।।

. . . . . . . . . . . . (क्रमशः)

Tuesday, December 21, 2010

मन (भाग ४)

आपली विवेकबुध्दी, तारतम्य, वास्तवाचे भान, संयमी वृत्ती वगैरे गोष्टी जागृत असतांना मनावर अंकुश ठेवतात. मनाला बुध्दीचा थोडा धाक असल्यामुळे ते जरासे सांभाळूनच विचार करत असते. पण निद्रावस्थेत जाताच स्वप्नांमध्ये ते मन स्वैर भरारी मारू शकते. वास्तवाचे दडपण नसल्यामुळे स्वप्नाच्या जगात आपले मन स्वच्छंदपणे मुक्त विहार करू शकते. लहानपणी सिंड्रेला आणि स्नोव्हाइट यांच्यासारख्या परीकथांमध्ये रमलेले बालमन यौवनाच्या उंबरठ्यावर पोचल्यानंतर स्वतःला त्या नायिका समजून त्या कथांमध्ये स्वतःला पाहू लागते. अशा सर्व परीकथांमध्ये अखेरीस श्वेत अश्वावर आरूढ होऊन एक उमदा राजकुमार दौडत येतो आणि खलनायकाचा पाडाव करून त्या नायिकांना आपल्या बरोबर घेऊन जातो. अखेरीस ते दोघे चिरकाल सुखाने राहू लागतात असा सुखांत केलेले असतो. असाच एकादा राजकुमार निदान आपल्या स्वप्नात तरी अवतरावा असे या मुग्धेला वाटते.

परीकथेतिल राजकुमारा,
स्वप्नी माझ्या येशिल का ?
भाव दाटले मनी अनामिक ।
साद तयांना देशिल का ?

या डोळ्यांचे गूढ इषारे ।
शब्दांवाचुन जाणुन सारे ।
'राणी अपुली' मला म्हणोनी ।
तुझियासंगे नेशिल का ?

मूर्त मनोरम मनी रेखिली ।
दिवसा रात्री नित्य देखिली ।
त्या रूपाची साक्ष जिवाला ।
प्रत्यक्षातुन देशिल का ?

लाजुन डोळे लवविन खाली ।
नवख्या गाली येइल लाली ।
फुलापरी ही तनू कापरी ।
हृदयापाशी घेशील का ?

लाजबावरी मिटुन पापणी ।
साठवीन ते चित्र लोचनी ।
नवरंगी त्या चित्रामधले ।
स्वप्नच माझे होशील का ?

अशाच दुस-या एका स्वप्नाळू मुलीलासुध्दा मनामधून असेच काहीतरी वाटत असते. तिच्या स्वप्नातल्या जगात सारे काही सुंदर असते. निसर्ग आपल्या सौंदर्याने मस्त वातावरणनिर्मिती करत असतो. अशा त्या स्वप्नामधल्या गावात तिचा मनाजोगता जोडीदार मिळाला तर तिच्या आनंदाला किती बहर येईल? याचे सुखस्वप्न ती पहात राहते.

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा ।
माझ्या मनातला का तेथे असेल रावा ?

जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले ।
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले ।
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा ।।

घे साउली उन्हाला कवळून बाहुपाशी ।
लागुन ओढ वेडी खग येति कोटरासी ।
एक एक चांदणीने नभदीप पाजळावा ।।

स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे ।
स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे ।
स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा ।।

वरील दोन्ही गाण्यामधल्या नवयुवतीला अजून प्रत्यक्ष जीवनात कोणी साजेसा साजण भेटलाच नसावा. त्यामुळे त्या एक गूढ आणि रम्य असे स्वप्नरंजन करत आहेत. पण एकाद्या मुलीला असा साजण डोळ्यासमोर दिसतो आहे पण तो तिच्यापाशी येत नाही. कदाचित त्याला तिची ओढ वाटत नसेल किंवा काही व्यावहारिक अडचणी असतील. अशा वेळी ती तरुणी त्याला निदान स्वप्नात तरी भेटण्याची इच्छा अशी व्यक्त करते.

स्वप्नात साजणा येशील का ?
चित्रात रंग हे भरशील का ?

मी जीवन गाणे गावे, तू स्वरात चिंब भिजावे ।
दोघांनी हरवून जावे, ही किमया नकळत करशील का ?

ही धूंद प्रीतीची बाग, प्रणयाला आली जाग ।
रोमांचित गोरे अंग, विळख्यात रेशमी धरशील का ?

प्रतिमेचे चुंबन घेता, जणू स्वर्गच येई हाता ।
मधुमिलन होता होता, देहात भरून तू उरशील का ?

या मुलीचे लग्न आता ठरले आहे, मुहूर्ताला अक्षता टाकायचा अवकाश आहे. पण मधल्या काळातला दुरावा तिला असह्य वाटत आहे. लोकलाजेनुसार तिला आपल्या भावी वरापासून दूर रहावे लागत असल्यामुळे ती त्याला स्वप्नातच भेटत राहते आणि भेटल्यानंतर काय काय घडेल याची सुखस्वप्ने पहाण्याचा छंद तिला लागतो.

स्वप्नांत रंगले मी, चित्रात दंगले मी ।
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी ।।

हे वेड प्रेमिकांचे गीतात गाइले मी ।
हे गीत भावनेचे डोळ्यात पाहिले मी ।।

या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची ।
पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची ।
माझ्या प्रियापुढे का, लाजून राहिले मी ।।

एकांत हा क्षणाचा, भासे मुहूर्तवेळा ।
या नील मंडपात, जमला निसर्गमेळा ।
मिळवून शब्द सूर, हे हार गुंफिले मी ।।

घेशील का सख्या, तू हातात हात माझा ?
हळव्या स्वयंवराला, साक्षी वसंत राजा ।
या जन्मसोबतीला सर्वस्व वाहिले मी ।।

दोघांचे मीलन झाल्यानंतर त्यांना पुढचे दिसायला लागते. ज्या मुख्य कारणासाठी निसर्गाने हे स्त्रीपुरुषांमधले आकर्षण निर्माण केले आहे त्याची पूर्ती होण्याला प्रत्यक्षात अवधी लागत असला तरी मनोवेगाने ती क्षणात करता येण्याजोगे स्थान म्हणजे स्वप्नच !

काल पाहिले मी स्वप्न गडे ।

नयनी मोहरली ग आशा ।
बाळ चिमुकले खुदकन हसले ।
मीही हसले, हसली आशा ।
काल पाहिले मी स्वप्न गडे ।।

भाग्यवतीचे भाग्य उजळले ।
कुणीतरी ग मला छेडिले ।
आणि लाजले, हळूच वदले ।
रंग सावळा तो कृष्ण गडे ।।

इवली जिवणी इवले डोळे ।
भुरुभुरु उडती केसहि कुरळे ।
रुणुझुणु रुणुझुणु वाजति वाळे ।
स्वप्नि ऐकते तो नाद गडे ।।

अशा प्रकारे मनात उठणा-या वेगवेगळ्या इच्छा, आकांक्षा, भावना वगैरेंची पूर्ती स्वप्नात होत असते अशी रूढ कवी कल्पना आहे. निदान असे गृहीत धरून कवीलोकांनी जागेपणीच अनेक प्रेमगीते लिहिली आहेत. मला स्वतःला मात्र अशा सुखद स्वप्नांचा अनुभव तसा कमीच येतो. कधी तो आलाही असला तरी जाग येताच मी ते सगळे विसरून जातो, त्यामुळे तो लक्षात रहात नाही. मला प्रत्यक्षात अप्राप्य वाटणारी कोणतीही गोष्ट कधी स्वप्नात मिळाली असे आठवत नाही. उलट काही वेळा मी स्वप्नातून खडबडून जागा होतो तेंव्हा मी किंचाळत उठलो असे बाजूचे लोक सांगतात. अर्थातच मी स्वप्नात काहीतरी वाईट किंवा भयावह पाहिले असते. कधी कधी मला स्वतःलासुध्दा असे वाटते की आपण एका अशक्यप्राय अशा कठीण परिस्थितीत सापडलो आहोत असे काहीतरी स्वप्नात दिसले असावे आणि जागा झाल्यानंतर कसलाच प्रॉब्लेम नसल्याचे पाहून मी समाधानाचा सुस्कारा सोडतो. अशा दुःस्वप्नांना इंग्रजीत 'नाइटमेअर' असे वेगळे नाव दिले आहे. चांगले आशादायक असे 'ड्रीम' आणि भीतीदायक ते 'नाइटमेअर'!

"मनी वसे ते स्वप्नी दिसे" अशी म्हण आहे. काही अंशाने ती खरी आहे. कारण एकादा विचार, एकादी कल्पना मनात आली तरच ती स्वप्नात येऊ शकेल. दक्षिण अमेरिकेतल्या कुठल्याशा जंगलातली झोपडी आंध्रप्रदेशात जन्म घालवलेल्या मुलाला स्वप्नात दिसली अशा भाकडकथांवर माझा काडीएवढा विश्वास बसत नाही. माणसाला पुनर्जन्म असतो आणि पूर्वीच्या जन्मातले मन किंवा त्याचा अंश तो या जन्मात आपल्याबरोबर घेऊन येतो असल्या गोष्टी शास्त्रीय कसोटीवर सिध्द झालेल्या नाहीत. या जन्मातच जे काही पाहिले, ऐकले, वाचले, अनुभवले त्याच्या अनुषंगाने मनात विचारांचे तरंग उठत असतात आणि ही क्रिया स्वप्नातदेखील चालत राहते, किंबहुना स्वप्नामध्ये तिला वास्तवाचा निर्बंध रहात नाही.

"मन चिंती ते वैरी न चिंती" अशी आणखी एक म्हण आहे. सध्याच्या परिस्थितीतून पुढे कसे अधिकाधिक चांगले घडेल याची सुखस्वप्ने जसे मन पहात असते, त्याचप्रमाणे अपेक्षित किंवा अनपेक्षित कारणांमुळे कोणते धोके उद्भवू शकतात याचा विचारसुध्दा मनच करत असते. निसर्गाने सजीवांना दिलेले हे एक वरदान आहे. धोक्याची कल्पना असल्यामुळे त्यापासून बचाव करण्याची तयारी ते करू शकतात. पण अनेक वेळा हा धोका अकारण दिसतो आणि त्यामुळे मनाला मात्र घोर लागतो. नाइटमेअर्स अशा प्रकारच्या विचारांमुळेच दिसतात. जास्त काळजीपूर्वक वागायचा प्रयत्न करणा-या लोकांना दुःस्वप्ने जास्त प्रमाणात दिसत असावीत आणि बिंदास वृत्तीचे लोक सुखस्वप्ने पहात मजेत राहात असावेत असा माझा अंदाज आहे.

. . . . . . . . . . . . (क्रमशः)

Monday, December 20, 2010

मन (भाग ३)

मनातल्या भावना शब्दात व्यक्त केल्या नाहीत, बोलून दाखवल्या नाहीत तरीसुध्दा त्या काही लपून रहात नाहीत. आपला चेहेरा मनाचा आरसा असतो असे म्हणतात. मनातले भाव त्यावर प्रकट होत असतात. शिवाय वागण्यातल्या छोट्या छोट्या बाबीत त्या कशा दिसून येतात हे या कवितेत दाखवले आहे.

लपविलास तू हिरवा चाफा,
सुगंध त्याचा छ्पेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?

जवळ मने पण दूर शरीरे ।
नयन लाजरे, चेहरे हसरे ।
लपविलेस तू जाणून सारे ।
रंग गालिचा छ्पेल का ?

क्षणात हसणे, क्षणात रुसणे ।
उन्हात पाउस, पुढे चांदणे ।
हे प्रणयाचे देणे घेणे ।
घडल्यावाचुन चुकेल का ?

पुरे बहाणे गंभिर होणे ।
चोरा, तुझिया मनी चांदणे ।
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे ।
केली चोरी छ्पेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?

पण एकादा माणूस मठ्ठ असतो, ही गोष्ट त्याच्या लक्षात येतच नाही. कदाचित त्याला प्रतिसाद द्यायचा नसतो, सगळे समजून उमजून तो आपल्याला काही न कळल्याचे सोंग आणत असतो. त्यामुळे अधीर झालेली प्रेमिका म्हणते,

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला !
रंग कधी दिसणार तुला लाजणा-या फुलातला ?

गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी ।
अर्थ कधी कळणार तुला, धुंदणा-या सुरातला ?

निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती ।
छंद कधी कळणार तुला, नाचणा-या जलातला ।

जुळता डोळे एका वेळी, धीट पापणी झुकली खाली ।
खेळ कधी कळणार तुला, दोन वेड्या जीवातला ।।

मनात येईल तसे वागणे आपल्याला बरेच वेळा शक्य नसते. या जगात रहायचे असेल तर कसे वागायचे हे बहुतेक वेळी बुध्दी ठरवत असते. तसेच अपेक्षाभंग झाला तर मन बेचैन होते त्या वेळी बुध्दी त्याची समजूत घालत असते. मन वेडे असते, अशक्य गोष्टींचा हव्यास धरते, पण बुध्दी शहाणी असते. ती मनाला था-यावर आणायचा प्रयत्न करते. खरे तर मन आणि बुध्दी या एकमेकींपासून वेगळ्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत की एकाच गोष्टीच्या दोन बाजू आहेत हे अजून नीटसे समजलेले नाही. वेगवेगळी कार्ये करणा-या भागांना आपणच ही नावे दिली आहेत. ज्ञानेंद्रियांकडून येणा-या संवेदनांचा सुसंगत अर्थ लावून त्यातून मिळणा-या माहितीचे संकलन बुध्दी करते. पण मन त्यावर विचार करते, तसेच स्वतंत्रपणेही मनात विचार उठत असतात. पण या विचारांचे मूल्यमापन बुध्दीकडून होत असते आणि आपण त्यानुसार निर्णय घेतो. मन स्वभावतः उच्छृंखल असते, पण त्याच्या मोकाट सुटू पहाणा-या वारूला वेसण घालायचे काम बुध्दी करत असते. कृतीवर बुध्दीचे नियंत्रण कदाचित असेलही, पण विचार करायला मन नेहमी तयार असते. श्रीरामाच्या गुणरूपाचे वर्णन ऐकूनच जानकी त्याच्यावर इतकी मोहित होते की त्याला कधी पाहीन असे तिला वाटू लागते. त्या काळातल्या समाजरचनेनुसार तिला प्रत्यक्ष मिथिलानगरीहून अयोध्येला जाणे शक्य नसते. ती कल्पनेनेच तिकडे जाण्यासाठी मनोरथाला आदेश देते,

मनोरथा, चल त्या नगरीला ।
भूलोकीच्या अमरावतिला ।।

स्वप्नमार्ग हा नटे फुलांनी ।
सडे शिंपीले चंद्रकरांनी ।
शीतल वारा सारथि हो‍उनि ।
अयोध्येच्या नेई दशेला ।।

सर्व सुखाचा मेघ सावळा ।
रघुनंदन मी पाहिन डोळा ।
दोन करांची करुन मेखला ।
वाहिन माझ्या देवाला ।।

एकाद्या प्रियकराच्या मनात जेंव्हा त्याच्या सुंदरा प्रियेची श्यामला मूर्ती भरते तेंव्हा ती सतत त्याच्या मनःचक्षूंना दिसायला लागते. तो मनातल्या मनात तिचे चित्र काढून ते रंगवू लागतो.

मानसीचा चित्रकार तो ।
तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो ।।

भेट पहिली अपुली घडता ।
निळी मोहिनी नयनी हसता ।
उडे पापणी किंचित ढळता ।
गोड कपोली रंग उषेचे, रंग उषेचे भरतो ।।

मम स्पर्शाने तुझी मुग्धता ।
होत बोलकी तुला नकळता ।
माझ्याविण ही तुझी चारुता ।
मावळतीचे सूर्यफूल ते, सूर्यफूल ते करतो ।।

तुझ्यापरि तव प्रीतीसरिता ।
संगम देखून मागे फिरता ।
हसरी संध्या रजनी होता ।
नक्षत्रांचा निळा चांदवा, निळा चांदवा झरतो ।।

. . . . . . . . . . . (क्रमशः)

Tuesday, December 14, 2010

मन (भाग २)

आपल्या मनात उठणा-या निरनिराळ्या भावनांमध्ये प्रेम ही सर्वात उत्कट असते. त्यामुळेच संवेदनशील कवीमनाला ती सर्वात जास्त भुरळ पाडते. या भावनेचीच अगणित रूपे त्यांनी आपल्या रचनांमधून दाखवली आहेत. प्रेमाचा अंकुर मनात कधी फुटला हे एका प्रेमिकेला समजलेसुध्दा नाही. ते जाणता अजाणता घडून गेले, कसे ते पहा. या ठिकाणी हृदय या शब्दाचा अर्थ फक्त मन असाच होऊ शकतो. शरीरविज्ञानातल्या हृदयात चार मोकळे कप्पे असतात आणि ते आळीपाळीने आकुंचन व प्रसरण पावून त्यातून रक्ताभिसरणाचे कार्य करत असतात. प्रीतीच्या किंवा कुठल्याही भावना अज्ञात अशा मनातच जागतात.

राजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा ।
हृदयि प्रीत जागते जाणता अजाणता ।।

पाहिले तुला न मी तरीहि नित्य पाहते ।
लाजुनी मनोमनी उगिच धुंद राहते ।
ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता ।।

दिवसरात्र ओढणी या मनास लागते ।
तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते ।
मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता ।।

निमंत्रणाविना पुन्हा हंस येइ तो वनी ।
नादचित्र रेखीतो तुझेच मंद कूजनी ।
वेड वाढवून तो उडून जाय मागुता ।।
हृदयि प्रीत जागते जाणता अजाणता ।।

पण तो अंकुर वेगाने वाढत जातो आणि त्यातून मन मोराचा सुंदर पिसारा फुलतो. तेंव्हा ती प्रेमिका म्हणते.

बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला।

रे मनमोरा, रंगपिसारा, अंगी रंगूनी जीव रंगला।
गोजिरवानी, मंजुळ गाणी, वाजविते बासरी डाळिंब ओठाला।
येडं येडं, मन येडं झालं, ऐकुन गानाला ।।

हे वेडावलेले मन आपल्या मनातले गुपित कुणाला तरी सांगून टाकायला आसुसलेले असते, पण तसे करायची त्याला लाजही वाटत असते. आपल्याला नक्की काय झाले आहे असा संभ्रमही त्याला पडत असतो. जे काहीतरी झाले आहे ते शब्दात कसे व्यक्त करायचे असा प्रश्नसुध्दा त्याला पडतो. ते स्वतःलाच विचारते,

काय बाई सांगू ? कसं गं सांगू ?
मलाच माझी वाटे लाज ।
काही तरी होऊन गेलंय आज !

उगीच फुलुनी आलं फूल ।
उगिच जीवाला पडली भूल ।
त्या रंगाचा, त्या गंधाचा ।
अंगावर मी ल्याले साज ।
काही तरी होऊन गेलंय आज !

जरी लाजरी, झाले धीट ।
बघत रहिले त्याला नीट ।
कुळवंताची पोर कशी मी ।
विसरुन गेले रीतरिवाज ?
काही तरी होऊन गेलंय आज !

सहज बोलले हसले मी ।
मलाच हरवुन बसले मी ।
एक अनावर जडली बाधा ।
नाहि चालला काही इलाज ।
काही तरी होऊन गेलंय आज !


हे तसे अजून तरी एकतर्फी प्रेम आहे. पण ते मनात नवीन इच्छा आकांक्षा निर्माण करते आणि त्यांची पूर्ती होण्यासाठी त्याला तसाच प्रतिसादही मिळायलाच हवा ना ! पण हे कसे घडणार ? आपल्या मनातल्या भावना दुस-या कोणाला सांगण्याआधी ते मन स्वतःलाच विचारते,

मी मनात हसता प्रीत हसे ।
हे गुपित कुणाला सांगु कसे ?

चाहुल येता ओळखिची ती ।
बावरल्यापरि मी एकांती ।
धुंद जिवाला डोळ्यांपुढती ।
नव्या नवतिचे स्वप्न दिसे ।।

किंचीत ढळता पदर सावरी ।
येता जाता माझि मला मी ।
एक सारखी पाहि दर्पणी ।
वेड म्हणू तर वेड नसे ।।

काहि सुचेना काय लिहावे ।
पत्र लिहू तर शब्द न ठावे ।
नाव काढिता रूप आठवे ।
उगा मनाला भास असे ।।

सांगायला जावे तर आवाज फुटत नाही, लिहायला शब्द सुचत नाही म्हणून प्रेमिका एक आगळा मार्ग शोधून काढते. आपल्या मनातल्या अस्फुट भावना प्रि.कराला कळाव्यात म्हणून प्रेमिका सांगते

डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे ।
साजाविना कळावे संगीत लोचनांचे !

मी वाचले मनी ते, फुलली मनात आशा ।
सांगावया तुला ते नाही जगात भाषा !
हितगूज प्रेमिकांचे, हे बोल त्या मुक्यांचे ।।

हास्याविना फुटेना ओठांत शब्द काही ।
कळले सखे तुला ते, कळले तसे मलाही ।
दोघांस गुंतवीती, म‍उ बंध रेशमाचे ।।

पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या ।
या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या !
गंधात धुंद वारा, वा-यात गंध नाचे ।।

थोडी धिटावलेली आणि कल्पक प्रेमिका काव्यमय भाषेत विचारते.

हृदयी जागा, तू अनुरागा, प्रीतीला या देशील का ?

बांधिन तेथे घरकुल चिमणे, स्वर्गाचे ते रूप ठेंगणे
शृंगाराचे कोरीव लेणे, रहावयाला येशील का ?

दोन मनांची उघडी दारे, आत खेळते वसंत वारे
दीप लोचनी सदैव तू रे, संध्यातारक होशील का ?

घराभोवती निर्झर नाचे, जाणुन अपुल्या गूढ मनाचे
झाकुन डोळे एकांताचे, जवळी मजला घेशील का ?



. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Friday, December 10, 2010

मन

मन म्हणजे काय हे कुणाला सांगायची काही गरज आहे कां? आपल्या सर्वांकडे मन असतेच. अनेक, किंबहुना असंख्य निरनिराळ्या कल्पना, विचार आणि भावनांचे तरंग त्यात सतत उठत असतात तसेच ते विरूनही जात असतात. पण त्यांना थारा देणारे हे मन आपल्या शरीरात नक्की कुठे असते? प्रीतीमुळे प्रेमिकांच्या 'हृदया'ची स्पंदने ('दिल'की धडकने) वाढतातच, शिवाय 'बहरुन ये अणु अणू, जाहली रोमांचित ही 'तनू' अशी त्यांची अवस्था होते. एकादी करुण घटना नेहमी 'हृदय'द्रावक असते आणि ज्याच्या 'काळजा'ला ती भिडत नाही त्या माणसाला आपण 'निर्दय' म्हणतो. आईचे मृदू 'काळीज' मायेने ओथंबलेले असते तर क्रूर कर्म करणा-या माणसाला उलट्या 'काळजा'चा म्हणतात. भीतीपोटी आपल्या 'पोटा'त गोळा उठतो, 'पाय' लटपटतात, चित्तथरारक गोष्टीने 'सर्वांगा'वर कांटा उभा राहतो, तर रागाने 'तळपाया'ची आग 'मस्तका'ला जाते. शरीराच्या वेगवेगळ्या भागावर असा परिणाम करणा-या भावना मात्र इथे तिथे निर्माण न होता फक्त मनातच निर्माण होतात. म्हणजे त्या नेमक्या कुठे उठतात?

या मनाला शरीरातल्या हात, पाय, हृदय, काळीज, मेंदू यासारख्या अवयवांसारखा विशिष्ट आकार नसतो, ते कधी डोळ्यांना दिसत नाही की कानाला ऐकू येत नाही. रंग, रूप, गंध, स्पर्श, चंव, भार, घनता असले जड वस्तूचे कोणतेच गुणधर्म त्याला नसतात. पण जरी त्याचे आकारमान सेंटीमीटर किंवा इंचात मोजता येत नसले तरी एकाद्याचे मन आभाळाहून मोठे असते तर कोणाचे अतीशय संकुचित, अणूरेणूहून तोकडे असू शकते. त्याचे अस्तित्व आपल्याला सतत जाणवत मात्र असते. कुणी तरी म्हंटले आहे,
"शरीराच्या नकाशात मनाला स्थान नाही, पण दुस-या कोणालाही मनाइतका मान नाही."
असे हे मन ! पाच ज्ञानेंद्रयांकडून आपल्याला सभोवतालच्या जगाची माहिती मिळते आणि आपल्या बुध्दीला त्यातून सगळे समजत असते. पण मनाचे अस्तित्व मनालाच जाणवते, ते समजले असे वाटते पण उमगले याची खात्री वाटत नाही. मग आपले मन कल्पनेनेच त्याचाच शोध घेत राहते. असाच एक शोध कवी सुधीर मोघे यांनी किती सुरेख शब्दात व्यक्त केला आहे !

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले ।
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले।
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा ।।

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ ।
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल ।
दुबळया, गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा ?

चेहरा, मोहरा ह्याचा कुणी कधी पाहीला नाही ।
धनी अस्तित्वाचा तरीही, ह्याच्याविण दुसरा नाही ।
ह्या अनोळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा ?

या अनिश्चिततेमधून मार्ग काढण्यासाठी सुधीर मोघे यांनीच आपल्या दुस-या एका सुरेख कवितेमध्ये थेट मनालाच असा प्रश्न विचारला आहे. पण हा प्रश्न विचारणारा 'मी' म्हणजे कोण असेल आणि त्याला मनाचे मनोगत कसे कळेल हा आणखी एक मोठा गहन प्रश्न आहे.

मना तुझे मनोगत मला कधीं कळेल का ?
तुझ्यापरी गूढ सोपे होणे मला जुळेल का !

कोण जाणे केवढा तूं व्यापतोस आकाशाला ।
आकाशाचा अर्थ देसी एका मातीच्या कणाला ।
तुझे दार माझ्यासाठी थोडेतरी खुलेल का !

कळीतला ओला श्वास पाषाणाचा थंड स्पर्श ।
तुझ्यामधे सामावला वारा, काळोख, प्रकाश ।
तुझे अरुपाचे रूप माझ्यापुढे फुलेल का !

कशासाठी कासाविशी कुणासाठी आटापिटी ?
खुळ्या ध्यास-आभासांचा पाठलाग कोणासाठी ?
तुझ्या मनांतले आर्त माझ्यामनी ढळेल का !
मना तुझे मनोगत मला कधीं कळेल का ?

असे हे मन ! भल्या भल्यांना न कळलेले, बुध्दीच्या आणि जाणीवांच्या पलीकडे असलेले पण तरीही सतत खुणावत राहणारे ! महान कवीवरांनी लिहिलेल्या विविध लोकप्रिय गीतांमधूनच त्यात डोकावून पहाण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.

. . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Saturday, November 27, 2010

२६ नोव्हेंबर २००८ (भाग १,२)



२६ नोव्हेंबर २००८  (पूर्वार्ध)


त्या दिवशी मी अल्फारेटाला मुलाच्या घरी बसून दुपारचे जेवण घेत होतो. अचानक टेलीफोन वाजला. अजय ऑफीसमधून बोलत होता. मला वाटले तो तिकडे डबा खायला बसला असेल आणि जेवण करता करता त्याला गप्पा मारायच्या असतील. पण तो भेदरलेल्या स्वरात म्हणाला, "तुम्हाला मुंबईचं कांही कळलं का?"

आम्हाला घराबाहेरच्या जगाचं भानच नव्हतं. सांगितलं, "नाही बाबा. काय झालं?"

"तिथे कसलातरी मोठा घोटाळा झालाय्."

एवढ्या मोठ्या मुंबईत लहान सहान दुर्घटना रोजच घडत असतात. "बडे बडे शहरोंमें छोटी छोटी बाते होती रहती है।" हे माननीय कै.आबा पाटलांनी काढलेले अज्ञानमूलक उद्गार खूप प्रसिद्ध झाले होते आणि त्यांना भारी महागात पडले होते.  अशा घटनांच्याबद्दल वर्तमानपत्रांच्या आतल्या पानांवर बारीक अक्षरात असलेल्या बातम्या न वाचताच ते पान मी अनेक वेळा उलटतो. एकादी इमारत कोसळणे, बस किंवा लोकलचा अपघात, दंगेधोपे, अलीकडल्या काळात होत असलेले बाँबस्फोट यासारख्या मुंबईच्या दृष्टीने मोठ्या असणाऱ्या घटना तिथल्या वृत्तपत्रात मुखपृष्ठावर असतात. पण अल्फारेटाला आल्यापासून रोज सकाळी वर्तमानपत्र वाचणे हा प्रकारच नव्हता आणि कधी न्यूजपेपर आणलाच तर तिथल्या पेपरमध्ये मुंबईतल्या या बातम्या येतही नव्हत्या. अधून मधून इंटरनेटवर मुंबईतली वर्तमानपत्रे वाचून त्याची तहान भागवून घेत होतो पण त्यात एवढे समाधान होत नसे. त्यामुळे मुंबईत घडलेल्या अशा मोठ्या स्थानिक घटनासुध्दा अनेक वेळा आम्हाला अमेरिकेत समजत नसत. मग माझ्या मुलाला एवढे अस्वस्थ करणारा हा मोठा गोंधळ कसला असेल? आम्हाला कांही सुचत नव्हते.

माझी पत्नी पटकन म्हणाली, "मी ललिताला फोन करून विचारते."

"नको, नको." अजय जवळजवळ ओरडला. पुढे त्याने सांगितले, "एवढ्याचसाठी मी फोन केला आहे. दोन चार दिवस कोणीही भारतात कोणाला फोन करायचा नाही आणि तिकडून आला तरी कसली चौकशी करायची नाही. कां ते मी घरी आल्यावर सांगेन. तोपर्यंत टीव्हीवर पहात रहा, पण ते मलासुध्दा फोनवर सांगू नका."

आमच्या मनातले गूढ वाढतच होते. मी लगेच टीव्ही सुरू करून बातम्यांचे चॅनेल लावले. सीएनएन, फॉक्स वगैरे सगळीकडेच मुंबईमधल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याची त्रोटक ब्रेकिंग न्यूज येत होती. पण लगेच पुन्हा अमेरिकेतल्या स्थानिक बातम्या दाखवत होते. आम्हाला त्या नीट समजतही नव्हत्या आणि त्यात स्वारस्यही नव्हते. तरीही मुंबईतली परिस्थिती जाणून घेण्यासाठी तिकडच्या बातमीची वाट पहात आम्ही टीव्ही लावून तो पहात बसलो होतो. त्या मानाने बीबीसीवर मुंबईला जास्त वेळ दिला जात होता. आम्ही पहायला सुरुवात केली त्या वेळेपर्यंत बोरीबंदरवरला हल्ला करून आतंकवादी तिथून पसार झाले होते. बातम्यांमध्ये तिथली काही दृष्ये दाखवत होते आणि ताजमहाल हॉटेल, ओबेरॉय हॉटेल व नरीमन हाउस या ठिकाणी ते त्यांच्या निर्घृण कारवाया करत होते. त्याबद्दल फारशी माहिती बाहेर आली नव्हती.

ऑफीसमधून घरी आल्यानंतर अजयने सांगितले की "अशा प्रसंगी टेलीफोन, ईमेल वगैरेंचे स्कॅनिंग चाललेलं असतं आणि भारतातल्या लोकांशी अमेरिकेतून ज्या ज्या कोणी संपर्क साधला असेल ते सगळेच संशयास्पद समजले जातात आणि मग त्यांच्या मागे चौकशीचं झेंगट लागू शकतं." असे त्याला ऑफीसमधल्या कोणीतरी सांगून सावध रहायचा सल्ला दिला होता. त्यामुळे या वेळी केवळ उत्सुकतेपोटी जास्त चौकशा करण्यापेक्षा सावधगिरी बाळगणे अधिक श्रेयस्कर होते. दक्षिण मुंबईत आमच्या ओळखीचे कोणी रहातच नाही आणि मुंबईच्या इतर भागात राहणाऱ्या लोकांनीही या बातम्या टीव्हीवरच पाहिल्या असतील. आम्हाला त्या ठिकाणीचा आँखो देखा हाल कोणाकडून समजण्याची शक्यता नव्हतीच. त्यामुळे आम्हाला भारतामधून कोणाचा फोन आलाही नाही आणि आम्हीही कोणाला फोन करून काही विचारले नाही की सांगितले नाही.

मुंबईतल्या बड्या हॉटेलमध्ये अनेक अमेरिकन नागरिक अडकले असल्याचे जेंव्हा बाहेर यायला लागले तसतसा तिथल्या बातम्यांना देण्यात येणारा वेळ वाढत गेला आणि अमेरिकेतल्या दिवसाअखेरीस (म्हणजे भारतात दुसरा दिवस उजाडला असतांना) सीएनएनवर सतत रनिंग कॉमेंटरी सुरू झाली. आम्हीही त्यानंतर टीव्हीकडे टक लावून ती पहात बसलो. बोरीबंदरवरील हल्ल्यानंतर लगेचच पोलिस मुख्यालयातले तीन बडे अधिकारी त्या जागेच्या जवळपास मारले गेले होते. पण ही बातमी मात्र निदान चार पाच तास जाहीर केली गेली नव्हती. हळू हळू टप्प्याटप्प्याने ती सांगितली गेली तेंव्हा तिच्यावर विश्वास बसत नव्हता. ज्या पध्दतीने ती तिकडे सांगितली जात होती त्यावरून अनेक प्रश्न मनात उठत होते. अजूनही त्यांना समर्पक अशी उत्तरे सापडलेली नाहीत.

गेटवे ऑफ इंडियाजवळील मोकळ्या जागेत अनेक वृत्तवाहिन्यांनी तंबू ठोकून ऑब्झर्वेशन पोस्ट बनवलेली दिसत होती. कधी तिथून दिसणारे दृष्य तर कधी त्या वार्ताहरांना दाखवत होते. त्यात अनेक महिला सुध्दा दिसत होत्या. ताजमहाल हॉटेलच्या वेगवेगळ्या भागातून धुराचे प्रचंड लोट उठत होतेच, अनेक वेळा ज्वालांचे लोळसुध्दा स्पष्ट दिसत होते. कुठल्या क्षणी कोणती बातमी आतून बाहेर येईल याचा नेम नव्हता आणि प्रत्येक वार्ताहर ती जाणून घेण्याच्या प्रयत्नात दिसत होता. हे लोक शिफ्ट ड्यूटी करत आहेत की सतत तिथे बसून आहेत हेच कळत नव्हते. जवळजवळ ती अमेरिकेतली संपूर्ण रात्र आम्ही बातम्या पहात जागून काढली. आम्ही जगाच्या दुसऱ्या टोकावर रहात असतांनासुद्धा मुंबईत चाललेले हे भयानक थरारनाट्य आम्हाला जागच्या जागी खिळवून ठेवत होते. यावरून प्रत्यक्ष ज्यांच्यासमोर ते उलगडत होते त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करावी.
-----------------

२६ नोव्हेंबर २००८  (उत्तरार्ध)

पुढील जवळजवळ दीड दोन दिवस मुंबईत घडत असलेल्या घटना आम्ही अमेरिकेतल्या अल्फारेटा या गावी घरात बसून श्वास रोखून टीव्हीवर पहात राहिलो. अखेरीस सर्व अतिरेक्यांचा पाडाव झाला, सर्व जागी लागलेल्या आगी विझल्या आणि सर्व जागा व्यवस्थितपणे तपासून त्या पूर्ववत सुरक्षित झाल्याबद्दलची घोषणा करण्यात आल्यानंतर हे खास प्रक्षेपण थांबले. या घटनांमध्ये मृत आणि जखमी झालेल्या व्यक्तींची, तसेच यातून सहीसलामत सुटलेल्या लोकांची आकडेवारी, त्यातले कोणत्या देशामधले किती होते वगैरेचे तपशील, ते लोक मुंबईला कशासाठी गेले होते वगैरे माहिती देणे, त्यातल्या अमेरिकन नागरिकांबद्दल जास्तच तपशीलवार खुलासे, अनेकांच्या मुलाखती, त्यांच्या भावना, अनेकजणांच्या प्रतिक्रिया आणि इतर अनेकांनी त्यांच्यावर केलेले भाष्य वगैरे आणखी चार पाच दिवस चालले. त्यानंतर भारतातल्या बातम्या येणे कमी कमी होत थांबले, तसे आम्हीही अमेरिकेतल्या टीव्हीवरल्या बातम्या पाहणे बंद केले.

ताजमहाल हॉटेल किंवा ओबेरॉय हॉटेल या जागी त्या वेळी जे लोक मरणाच्या सापळ्यात सापडले होते, त्यांत माझ्या जवळच्या आप्तांपैकी कोणी असण्याची शक्यता नव्हतीच, ओळखीतले कोणी असण्याची शक्यतासुध्दा अगदी कमी होती. प्रत्यक्षातसुद्धा तसे कोणी तिथे नव्हतेच असे नंतर समजले. नोकरीत असेपर्यंत मी काही वेळा या हॉटेलांमध्ये गेलेलो असलो तरी आता भविष्यात कुठल्याच पंचतारांकित हॉटेलात जाण्याचे योग दिसत नव्हते. यातल्या कोणत्याही हॉटेलचे शेअर मी विकत घेतलेले नव्हते. नरीमन हाउस किंवा खाबाद हाउस ही नावेदेखील मी कधी ऐकली नव्हती. थोडक्यात सांगायचे तर बोरीबंदर सोडता मुंबईत इतरत्र त्या वेळी घडत असलेल्या घटनांच्या जागांचाही माझ्या व्यक्तीगत आयुष्याशी तेंव्हाही काही प्रत्यक्ष संबंध नव्हता आणि माझ्या जीवनावर त्यांचा काही परिणामही होणार नव्हता. तरीसुध्दा मी त्यात एवढा का गुंतून गेलो होतो?

पण मी पूर्वी पाहिलेल्या असल्यामुळे त्या जागा माझ्या तशा चांगल्या ओळखीच्या होत्या. ताज हॉटेलच्या किबहुना गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात दहा वर्षांहून अधिक काळ माझे ऑफीस होते त्यामुळे त्या भागात माझे रोज जाणे येणे होत होते. मला त्या जागेबद्दल जास्तच आत्मीयता वाटत होती आणि बातम्यांचे मुख्य ठिकाण तेच होते. गेटवेजवळ ज्या ठिकाणी उभे राहून वार्ताहर मंडळी दुरून सारे दृष्य पहात होते तिथे मी स्वतः पूर्वी शेकडो वेळा उभा राहिलो होतो. यामुळे टीव्हीवर दाखवले जाणारे दृष्य मला पटकन समजत होते. या सर्वापेक्षा मोठे कारण म्हणजे दूरदेशी रहात असतांना भारतातल्या, त्यातून मुंबईतल्या व त्यात पुन्हा ओळखीच्या ठिकाणांची दृष्ये पाहण्याची वेगळीच ओढ होती. दुसरे कारण असे होते की यापूर्वी मी होऊन गेलेल्या घटनांची छायाचित्रे बातम्यांमध्ये पाहिली होती, अलीकडच्या काळात काही रेकॉर्डेड व्हीडिओ क्लिप्स पहात होतो, पण क्रिकेट किंवा फूटबॉलसारखे सामने सोडले तर मला त्यापूर्वी कोणतीच महत्वाची घटना प्रत्यक्ष घडत असतांना पहायला मिळाली नव्हती. "युध्दस्य वार्ताः रम्याः" असे म्हणतात. इथे ते प्रत्यक्ष पहायला मिळत होते आणि तेसुध्दा स्वतः मात्र हजारो मैल दूर अगदी सुरक्षित जागी बसून! त्यामुळे ते पहाण्याखेरीज दुसरे काही त्या वेळी सुचत नव्हते अशी परिस्थिती झाली होती. चारपाच दिवसांनी ती पूर्णपणे बदलूनही गेली.

भारतात परत आल्यानंतर मात्र रोजच्या वर्तमानपत्रात कुठे ना कुठे २६-११ चा उल्लेख यायचाच. हा क्रम पुढील अनेक वर्षे  चाललेला होता. आधी अनेक दिवस तपास, नंतर खटला भरला जाणे, तो चालतांना रोज न्यायालयात होणारे वादविवाद आणि (हे प्रकरण न्यायप्रविष्ट असूनसुध्दा) त्यावर राजकारणी आणि इतर प्रसिध्द लोकांच्या टीकाटिप्पण्या वगैरे चाललेले होते, अर्ध्याहून अधिक दिवस ते मुखपृष्ठावर येत होते, क्वचित कधीतरी आतल्या पानांवर यायचे. शिवाय हुतात्म्यांचा होणारा (किंवा काही वेळा न होणारा) गौरव, त्यांच्या नातलगांच्या संबंधातल्या बातम्या, त्यावर त्यांचे अभिप्राय वगैरेंना बरीच प्रसिध्दी मिळत असे. या घटनांमध्ये ज्यांचा बळी गेला त्यातल्या काही जणांनी प्राणपणाने लढत असतांना आधी अतिरेक्यांना मारले होते किंवा त्यांच्यापासून इतर लोकांचे प्राण वाचवले होते. काहीजण लढायला गेले होते, पण प्रत्यक्ष कृती करण्याआधीच स्वतः हताहत झाले होते. इतर बहुसंख्य निरपराध लोक मात्र त्यांना काही समजण्याच्याही आधीच अतिरेक्यांच्या गोळीबाराचे शिकार झाले होते. या सर्वांना सरसकट हुतात्मे म्हणणे कितपत योग्य आहे? पण तसे केले जाते खरे.

जो एक अतिरेकी जीवंतपणे पोलिसांच्या हाती लागला तो जबर जखमी झाला होता. त्याला महत्प्रयासाने बरे कशाला केले? तो अद्याप जीवंत का आहे? त्याला जीवंत ठेवण्यासाठी (किंवा त्याची बडदास्त ठेवण्यासाठी) करदात्यांचा कोट्यावधी रुपये एवढा पैसा का खर्च केला जात आहे? असे प्रश्न विचारून त्या निमित्याने सरकारवर अद्वातद्वा तोंडसुख घेणे हा तथाकथित सुशिक्षित लोकांचा अत्यंत आवडता छंद झाला होता. कोठेही कोणीही चार लोक भेटले की हा विषय निघायचा आणि जो तो यथेच्छ मुक्ताफळे उधळून आपले मन मोकळे करून घ्यायचा. देशाच्या पंतप्रधानापासून सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत सारे प्रवक्ते लोकसभेत किंवा इतरत्र जे सांगत असत ते कोणाही सर्वसामान्य माणसाला मुळी पटायचे नाही. या अतिरेक्यांनी केलेला अतिरेकाचा कहर लोकांच्या मनाला इतका भिडलेला आहे की ते काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत अजूनही आलेले नाहीत. मलासुध्दा कोणाचे समर्थन करावेसे वाटत नाही, पण सरकार म्हणजे कोणी एक व्यक्ती नसते आणि ते चालवणारी माणसे अधिकृतपणे गैरकायदेशीर मार्गाने वागू शकत नाहीत. 'अबतक छप्पन' एन्काउंटर्स वगैरे घडत असले तरी ते उघडपणे मान्य करणे किंवा त्यांचे समर्थन करणे कोणालाच शक्य नसते. न्यायालयात ज्या आरोपीला उभे केले जाते, त्यानेच गुन्हा केला आहे हे साक्षीपुराव्याच्या आधारावर सिध्द केले गेल्यानंतर फक्त न्यायमूर्तीच त्याला शिक्षा ठोठावू शकतात आणि पोलिसखात्यातील विशिष्ट हुद्दा धारण करणारी व्यक्तीच त्याची अंमलबजावणी करू शकते.

हा खटला उभा करण्यासाठी जेवढे (कदाचित शेकडो असतील) साक्षीदार आणि (कदाचित हजारो पाने) दस्तऐवज जमवले गेले, त्यात जेवढा वेळ गेला, त्याची गरज होती का? असे सामान्य माणसाला वाटणे साहजीक आहे. एका खुनासाठी एकच फाशी असते आणि अनेक गुन्ह्यासाठीसुध्दा फक्त एकदाच फाशी देता येते. मग इतका मोठा खटाटोप कशाला करायचा? त्यात वेळ आणि पैसा का घालवायचा? मुख्य म्हणजे न्यायनिवाडा करून गुन्हेगाराला शिक्षा करण्यात एवढा उशीर का लावायचा? असे अनेक प्रश्न सामान्य माणसाला पडतात. पण न्यायदानाच्या सध्याच्या व्यवस्थेचा विचार करता कदाचित ते आवश्यक असेल. हे करण्यामागे काही राजकीय उद्दिष्टेदेखील असू शकतात. ती उघड करणे हिताचे नसते.

प्रदीर्घ काळ चाललेला हा खटला अखेर संपला आणि हातात सापडलेल्या एकमेव गुन्हेगाराला अपेक्षेप्रमाणे फाशीची शिक्षा ठोठावली गेली. तरी त्यानंतरसुद्धा त्याची अंमलबजावणी लगेच झाली नाही. तो गुन्हेगार सरकारी खर्चाने बिर्याणी खात जेलमध्येच राहिला होता आणि त्याच्या सुरक्षेसाठी इतका कडक पोलिस बंदोबस्त केला गेला होता की आर्थर रोड जेलचा परिसरच एकाद्या किल्ल्यासारखा दिसत होता. अखेर राजकारणातली सोय पाहून एके दिवशी त्याला अत्यंत गुप्तपणे फांसावर लटकावले गेले आणि या विषयावर पडदा पडला.

तरीसुद्धा सन २००८ मधील २६ नोव्हेंबरच्या घटना आणखी बराच काळ आठवणीत रहाणार आहेत आणि वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याबद्दल बातम्या येत रहाणार आहेत.
...... संपादन दि. २६-११-२०१८

Tuesday, November 23, 2010

मोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे (भाग ५ - अंतिम)


माझ्या उजव्या डोळ्यामधला मोतीबिंदू अत्यंत मंद गतीने वाढत होता. सेवानिवृत्त होईपर्यंत त्याचे ऑपरेशन करण्याची आवश्यकता पडलीच नाही. त्यानंतर मनात एक प्रकारची विरक्तीची भावना निर्माण झाली होती. वर्षभरातच एक मोठे आजारपणही येऊन गेले. त्यात ती भावना वाढीला लागली. "जेवढ्या प्रयत्नसाध्य गोष्टी मला मिळवणे शक्य होते, त्यातल्या बहुतेक सगळ्या मिळून गेल्या आहेत, आता जे काही पदरात पडेल ते गोड मानून आलेला दिवस पुढे ढकलावा, कसला हव्यास धरू नये, आकांक्षा, अभिलाषा वगैरेंना मुरड घालावी" अशा प्रकारच्या विचारांचे ढग मनात जमायला लागले. नियमितपणे डोळ्यांची तपासणी होत होतीच. "उजव्या डोळ्यातला मोतीबिंदू पुरेसा वाढला असल्याने पाहिजे तर आता शस्त्रक्रिया करता येईल, पण ती नाही केली तरी त्यापासून धोका नाही" असे एकदा डॉक्टरांनी सांगितले. डाव्या डोळ्यातला मोतीबिंदू या अवस्थेत येण्यापूर्वीच काढून झाला होता, पण थोडी सावधगिरी, थोडी निश्क्रियता आणि थोडे औदासिन्य यांनी मिळून या वेळी दुसरा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला. डोळ्यातला मोतीबिंदू हळू हळू वाढत होता आणि दृष्टीला अंधुक करत होता, तरीही पुढे दरवर्षी याचीच पुनरावृत्ती होत राहिली आणि मी त्या डोळ्याचे ऑपरेशन पुढे ढकलत राहिलो.

दरम्यानच्या काळात मनात विचांरांचे मंथन चाललेले होते. मूळचा चळवळ्या स्वभाव आणि लहानपणापासून त्यावर झालेले प्रयत्नवादाचे संस्कार मला स्वस्थ बसू देत नव्हते. मोकळ्या वेळात काही नवे अवांतर उपद्व्याप सुरू केले आणि त्यांना थोडे फार यश मिळाल्यामुळे आशावादाला फुलोरा येत गेला. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पुन्हा किंचित बदलला, त्याला सामोरे जाण्यासाठी वेगळा पवित्रा घेतला गेला. हे सगळे माझ्या कळत नकळत होत होते. क्रिकेटच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी नवे कोरे पिच असते, ताज्या दमाचा फलंदाज त्यावर खेळतांना धावांचा ढीग जमवण्यासाठी मनसोक्त फटकेबाजी करतो. पण शेवटची पारी खेळण्याची वेळ येईपर्यंत पिच ढेपाळलेले असते, त्यावरून चेंडू अनिश्चित उसळ्या मारतात किंवा वेडेवाकडे वळायला लागतात, खेळाडू थकलेले असतात, कधी कधी थोडे जखमी झालेले असतात. त्यांना कदाचित पहिल्या पारीतल्यासारखा खेळ करता येणार नाही याची जाणीवही असते, पण या वेळी सामना जिंकण्याची जिद्द मनात असते. समोरचे आपले साथीदार एकामागोमाग एक तंबूत परतत असतांनासुध्दा एकादा खेळाडू नेटाने खेळत राहतो. "जीवनातल्या दुस-या इनिंगमध्येसुध्दा असेच खेळायचा प्रयत्न केला, फक्त 'शेवटचा दिस'च नव्हे तर तोपर्यंतचा प्रत्येक दिवस गोड व्हावा यासाठी अट्टाहास धरला तर त्यात काही गैर नाही." असे विचार मनात घर करायला लागले. तसे पूर्वी तिथे जमलेले ढग विरू लागले

या वर्षी डोळ्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टराने पहिल्यासारखा हो किंवा नाही असा मोघम अभिप्राय दिला तेंव्हा मी विचारले, "एक डॉक्टर म्हणून तुम्ही पेशंटला कोणता सल्ला द्याल?"
तो गृहस्थ सकारात्मक विचार करणारा आहे हे मला माहीत होते. त्याने सांगितले, "आता जेंव्हा तुम्हाला सोयिस्कर असेल त्या वेळी ऑपरेशन करून घ्या."
मी याबद्दल विचार केलेला होताच. रक्तदाब आणि मधुमेह हे विकार सध्या आटोक्यात होते, तांत्रिक सल्लागार म्हणून हातात घेतलेली सारी कामे मी मार्गी लावली होती, घरात कोणता कौटुंबिक कार्यक्रम ठरवलेला नव्हता की परदेशगमनाचा बेत आखला होता. थोडक्यात म्हणजे सध्या मी मोकळा होतो आणि परिस्थिती अनुकूल होती. त्यामुळे दिवाळीची धूमधाम संपल्यावर लगेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यायचे ठरवून टाकले आणि ते काम करवून घेतले.

मुंबईतले प्रख्यात नेत्रशल्यविशारद पद्मश्री केकी मेहता यांच्या रुग्णालयात हे ऑपरेशन झाले. फॅकोइमल्सिफिकेशन नावाच्या गुंतागुंतीच्या टेक्निकचा वापर यात केला गेला. त्यांनी सर्वात आधी डोळ्यावरील आवरणाला एक लहानसा छेद घेतला. त्यातून आत भिंगापर्यंत सुई घातली आणि तिच्यातून मोतीबिंदूच्या खड्याला अल्ट्रासॉनिक ध्वनीलहरींचे धक्के देऊन त्याचा चुराडा केला. हा 'मोतीचूर' आणि डोळ्याच्या नैसर्गिक भिंगामधला द्रवपदार्थ पोकळ सुईमधून शोषणाने बाहेर काढला. त्यानंतर एका खास प्रकारच्या इंजेक्शनच्या सुईमधून पारदर्शक कृत्रिम भिंगाची सुरळी डोळ्यात सोडली आणि तिला योग्य जागी फैलावून व्यवस्थित बसवले. हे सारे काम फार फार तर पंधरा मिनिटात झाले असेल.

ऑपरेशन टेबलवर गेल्यानंतर मला शिरेतून एक इंजेक्शन दिले गेले. त्याने मी बोलता बोलता स्वप्नाच्या जगात गेलो. पंधरा वीस मिनिटांनी कोणी तरी मला नावाने हाक मारताच उठून बसलो. तेंव्हा स्वप्नातून जागे झाल्यासारखे वाटले, पण त्या स्वप्नातला कसलाच तपशील मात्र आठवला नाही. अर्धवट गुंगीच्या अवस्थेत असतांना एका आज्ञाधारक मुलाप्रमाणे सांगितलेले ऐकत होतो. टेबलावरून उठून खाली उतरलो आणि व्हीलचेअरवर बसलो. मला ढकलत वॉर्डमध्ये नेले. तिथे गेल्यावर व्हीलचेअरवरून उतरून बेडवर जाऊन पडलो. माझी पत्नी तिथे माझी वाट पहात बसली होती. पाच मिनिटात पूर्णपणे जागा झाल्यानंतर कपडे बदलले आणि पत्नीबरोबर टॅक्सीत बसून घरी गेलो. मी नेहमीच बेशुध्द झाल्यासारखा गाढ झोपतो असे घरातले सांगतात. त्यामुळे यावेळी निद्रावस्थेत गेलो होतो की बेशुध्दावस्थेत ते मलाही नक्की सांगता येणार नाही. पण इतक्या झटपट बेशुध्द होणे आणि पुन्हा शुध्दीवर येणे बहुधा कठीण असावे. तेंव्हा ती झोपच असावी.

माझे पहिले ऑपरेशन झाल्यानंतर ज्या गृहस्थांनी मला फोल्डेबल लेन्सबद्दल छेडले होते ते आज कुठे आहेत कोण जाणे. त्यांना शोधून काढून मी आता 'भिंगाचे भेंडोळे (फोल्डेबल लेन्स)' डोळ्यात बसवली असल्याचे सांगावे असे एकदा वाटले. पण आता ती लेन्स 'मल्टीफोकस' आहे का असे ते कदाचित (किंवा नक्कीच) विचारतील.

. . . . . . . . . . (समाप्त)

Saturday, November 20, 2010

मोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे (भाग ४)

माझ्या ओळखीतल्या एका बहुश्रुत गृहस्थांचे सामान्यज्ञान दांडगे आहे. पण अमेरिकेच्या प्रेसिडेंटपासून कोप-यावरल्या पानवाल्यापर्यंत कोणत्याही माणसाने केलेली कोणतीही कृती चुकीचीच आहे असे सांगून "त्याने असे करण्याऐवजी तसे का केले नाही?" असे विचारायचे आणि त्यांच्याशी वाद घातला तर बारकाव्यात कुठेतरी शब्दात पकडून बोलणा-याला निरुत्तर करायचे हा त्यांचा आवडता छंद आहे. त्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सरळ उत्तर न देता टोलवत रहायचे असे मी ठरवले होते. माझ्याशी बोलतांना माझ्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचा विषय निघताच त्यांनी विचारले,"तुम्ही आपले ऑपरेशन इथेच कशाला करून घेतलेत?"
त्यांना कारणे सांगण्यात अर्थ नसल्यामुळे मी प्रतिप्रश्न केला, "मग मी ते कुठे करायला हवं होतं?"
"अहो ते मद्रासच्या एका डॉक्टरानं तिथं मोठे नेत्रालय उघडलं आहे ना, ते एकदम बेस्ट आहे म्हणतात."
"आपले राष्ट्रपती, पंतप्रधान वगैरे लोक तिथंच जातात, तेच ना?"
"हां, तुम्ही तिथंच का नाही गेलात?"
"त्यानं काय झालं असतं?"
"अहो तिथं लेजरनं ऑपरेशन करतात म्हणे."
"म्हणून काय झालं?"
"लेजर म्हणजे एकदम अद्भुत प्रकारचे किरण असतात. तुम्हाला ठाऊक नाही?"
"आहे ना. पण छान सरळ रेषेत कापली जाते म्हणून आता भाजी चिरायलासुध्दा लेजरगन वापरायची का?"
"अहो मी डोळ्याच्या ऑपरेशनबद्दल बोलतोय्."
"मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणजे त्यात काय काय करतात हो?"
"आधी डोळ्यात वाढलेला मोतीबिंदूचा खडा बाहेर काढतात आणि हल्ली त्या जागी एक कृत्रिम भिंग बसवतात." त्यांनी ऐकीव माहिती सांगितली, पण मला प्रत्यक्ष अनुभव होता.
त्यावर मी विचारले, "बरोबर. यात लेजरचा संबंध कुठे आला?"
ते किंचितसे गोंधळलेले पाहून मी सांगितले, "हे काम करण्यापूर्वी डोळ्यावरल्या आवरणाला एक बारीकशी भेग करायची असते. तेवढ्यापुरता लेजरचा उपयोग होतो."
"तेच तर महत्वाचे आहे ना?" त्यांनी लगेच मोका पाहून विचारले.
"असते ना, पण जुने खराब झालेले भिंग जपून बाहेर काढण्याची पुढची क्रिया जास्त महत्वाची असते आणि नवे भिंग व्यवस्थितपणे बसवणे सर्वात जास्त महत्वाचे असते."
"तुम्ही कसली लेन्स बसवून घेतलीत?" त्यांनी नवा विषय सुरू केला.
"ते सगळं डॉक्टरच ठरवतात."
"म्हणजे त्यांनी तुम्हाला विचारलं सुध्दा नाही का?"
"त्यात काँटॅक्ट लेन्ससारख्या निरनिराळ्या शेड्स, स्टाइल्स किंवा फॅशन्स नसतात. आपल्या डोळ्यात कोणत्या साइझची लेन्स फिट होईल ते डॉक्टरच ठरवतात आणि बसवतात. त्यात ते मला काय विचारणार आणि कसले ऑप्शन्स देणार?"
"म्हणजे तुम्ही साधीच लेन्स बसवलीत की काय?"
"मग फोडणीची बसवायला पाहिजे होती का?" मी वैतागून खवचटपणाने विचारले.
"फोडणीची नाही पण फोल्डेबल का नाही घेतलीत?"
"लेन्ससारखी लेन्स असते, तिला काय होल्डॉलसारखं गुंडाळून ठेवायचंय् की छत्रीसारखं मिटवून ठेवायचंय्? तिची घडी घालायची काय गरज आहे?"
"ते लेटेस्ट टेक्निक आहे. तुझ्या डॉक्टरला माहीत नसेल, नाहीतर तुला परवडणार नाही म्हणून तो बोलला नसेल."
"जाऊ दे. जी फिक्स्ड लेन्स आता माझ्या डोळ्यात बसवली आहे ती कुठे खुपत नाही, तिचा मला कसला त्रास नाही, तिनं मला सगळं काही छान स्पष्ट दिसतंय्. मला एवढं पुरेसं आहे. तुझ्या त्या भिंगाच्या भेंडोळ्यानं आणखी कसला फायदा होणार होता?"
"अहो, लेटेस्ट टेक्निकचा काही तरी लाभ असणारच ना? उगीच कोण कशाला ते डेव्हलप करेल?"
"?"
अखेर त्याने मला निरुत्तर केलेच!


. . . . . . . (क्रमशः)
--------------------------------------------------------------------------------------

Thursday, November 18, 2010

मोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे (भाग ३)

एकवीसावे शतक आल्यानंतर सेवानिवृत्तीचा दिवस नजरेच्या टप्प्यात आला. पण त्यापूर्वी होत असलेल्या पदोन्नतींच्या सोबतीने कार्यक्षेत्र, अधिकार, जबाबदारी, कामाचा व्याप, त्यातली आव्हाने वगैरेंच्या कक्षा विस्तारत होत्या, आपले कर्तृत्व सिध्द करण्याच्या संधी समोर येत होत्या आणि त्यांचा उपयोग करून घेण्याचे माझे प्रयत्न चालले होते. आयुष्यातल्या अशा महत्वाच्या टप्प्यावरून वाटचाल करतांना सुदृढ शरीराची साथ आवश्यक होती. पण नेमक्या याच वेळी मला डाव्या डोळ्याने अंधुक दिसू लागले. मोतीबिंदूची सुरुवात झाल्यामुळे हा बदल झाल्याचे समजल्यावर त्यावर काही उपाय नाही हे लक्षात आले. डाव्या डोळ्याची दृष्टी हळू हळू मंद होत असली तरी उजव्या डोळ्याने पाहून मी काम करू शकत होतो. दोन अडीच वर्षांनंतर डाव्या डोळ्याची क्षमता निम्म्यावर आली आणि लेखन वाचन वगैरेसाठी ती त्याहूनही कमी झाली. शिवाय मोतीबिंदूने उजव्या डोळ्यातही मूळ धरून विस्ताराला सुरुवात केली. तो डोळाही अधू व्हायला लागला तर मात्र काम करणे कठीण होणार होते.

कृष्णा कामत भेटल्यानंतर दहा वर्षात माझ्या ओळखीतल्या आणखी काही लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते. प्रत्यारोपण केलेल्या नव्या कृत्रिम भिंगाने त्यांना व्यवस्थित दिसत होते. एक दोन लोकांच्या बाबतीत मात्र काही गुंतागुंत झाल्यामुळे नव्या व्याधी उद्भवल्या होत्या. अशा एकाद्या अपवादांमुळे धोक्याची जाणीव होते आणि बहुतेक लोक अजूनही शस्त्रक्रियेमधला धोका न पत्करता मोतीबिंदू परिपक्व होण्याची वाट पहात असत. मला मात्र दोन्ही डोळ्यांमधली दृष्टी एकाच वेळी मंद झाली असती तर कामच करता आले नसते. पूर्वीच्या काळी यावर कसलाही उपायच नसायचा. आपले प्रारब्ध म्हणून ही गोष्ट मान्य करावी लागत असे. पण नव्या तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या सोयींमुळे परिस्थितीत बदल झाला होता. त्याचा उपयोग करून घेणे आता मला शक्य होते.

यावर मी स्वतः विचार केला, सर्व संबंधितांशी विचारविनिमय केला आणि सर्वतोपरी काळजी घेऊन डाव्या डोळ्याचे ऑपरेशन करून घेण्याचा निर्णय घेतला. शरीरात इतर कोणती व्याधी नसल्याने फिटनेसचा प्रश्न आला नाही. ऑपरेशनच्या आदल्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून घेसले आणि अँटीबायॉटिक्सचा कोर्स सुरू करून दिला. दुसरे दिवशी ऑपरेशन टेबलवर गेल्यावर आधी तुलनेने चांगल्या असलेल्या उजव्या डोळ्यावर पट्टी बांधली, डाव्या डोळ्याच्या आजूबाजूचा भाग बधीर केला आणि शस्त्रक्रिया सुरू झाली. सर्व वेळ मी संपूर्णपणे भानावर होतो. प्रत्यक्ष सूर्याकडे पहात आहे असे वाटण्यासारखा प्रकाशाचा प्रचंड लोळ डाव्या डोळ्यात उतरला आणि काय दिसते ते मला समजेनासे झाले. कुरकुर, खुळ्ळ असले आवाज कानावर पडत होते. काही मिनिटांनीच माझ्या उजव्या डोळ्यावरील पट्टी काढली आणि मला वॉर्डमध्ये पाठवून दिले. डावा डोळा मात्र बंद करून ठेवलेला होता. दर तासातासाने नर्स येऊन तो उघडायची आणि त्यात औषध घालून पुन्हा झाकून ठेवायची असे रात्री झोपेपर्यंत चालले. दुसरे दिवशी सकाळी डॉक्टरांनी तो डोळा तपासला आणि घरी जायची परवानगी दिली. त्याबरोबर वीस दिवस रजा घेण्याची शिफारसही केली.

माझ्या घरातल्यांना ही एक प्रकारची पर्वणीच वाटली असेल, कारण त्यापूर्वी कित्येक वर्षात सलग वीस दिवस मी घरी राहू शकलो नव्हतो. घरी गेल्यावरसुध्दा दोन प्रकारचे टेलीफोन आणि इंटरनेट यांनी मी जगाशी संपर्क साधून होतो, शिवाय घरापासून माझे ऑफीस हाकेच्या अंतरावर असल्यामुळे माझे सहकारी केंव्हाही घरी येऊन मला भेटू शकत होते. त्यामुळे घरी आल्यानंतर दुसरे दिवशीच मी माझ्या अखत्यारीतल्या कामाच्या तांत्रिक बाबतीत लक्ष घालायला सुरुवात केली आणि माझ्याविना कोणताही खोळंबा होणार नाही याची काळजी घेतली. माझ्या गैरहजेरीत घडणा-या घडामोडींची माहिती मला मिळत राहिल्यामुळे त्यात खंड पडला नाही.

आता चोवीस तास मी घरी उपलब्ध असल्याची खात्री असल्यामुळे अनेक आप्तेष्ट मला भेटायला येऊन गेले. त्यांच्याबरोबर निवांतपणे गप्पा मारता आल्या. त्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. नवीन घटना, वेगवेगळे अनुभव कानावर आले, या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याच्या निमित्याने चांगले चुंगले खायची चंगळ झाली, रिकाम्या वेळात माझी आवडती गाणी ऐकायला मिळाली, शरीराला भरपूर विश्रांती मिळाली आणि वीस दिवसांनी नवी दृष्टी घेऊन नव्या जोमाने कामाला लागलो. नको त्या वेळी येऊन दगा देणा-या मोतीबिंदूबद्दल मनात जी घृणा निर्माण झाली होती त्यातला कडवटपणा जरासा कमी झाला.


. . . . . . . (क्रमशः)

Tuesday, November 16, 2010

मोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे (भाग २)

एकोणीसशे नव्वदीच्या दशकातला एक प्रसंगः
आमच्या कॉलनीतल्या सरळसोट रस्त्यावरून मी चाललो होतो. रस्त्यात तुरळक रहदारी होती. माझा कॉलेजपासूनचा मित्र कृष्णा कामत समोरून येत असलेला मला दुरूनच दिसला आणि आश्चर्याचा लहानसा धक्का बसला. जन्मजात असलेल्या वैगुण्यामुळे त्याला बालपणीच चष्मा लागला होता आणि त्याचा नंबर वाढत वाढत उणे बारा तेरापर्यंत गेला होता. सोडावॉटरच्या बाटलीच्या तळाशी असते तशा पाच सहा मिलिमिमीटर जाड कांचेच्या भिंगाचा बोजड चष्मा हा त्याच्या चेहे-याचा आवश्यक भाग बनला होता. फारच कमी लोकांनी त्याचा चष्म्याविना चेहेरा पाहिला असेल. पण आज तो चक्क चष्म्याशिवाय अगदी व्यवस्थितपणे रस्त्यावरून चालत येत होता. त्याच्या चालण्यात चाचपडण्याचा किंवा ठेचकाळण्याचा किंचितही भाग दिसत नव्हता. क्षणभर मला ते खरेच वाटले नाही. पण तो माणूस कामतच होता यात जराही शंका नव्हती.

तरुण मुले आणि विशेषतः मुली काँटॅक्ट लेन्स लावून आपले वैगुण्य लपवतात हे मला माहीत होते, पण पन्नाशीकडे झुकण्याच्या वयात कामतला ते करण्याची गरज नव्हती. तसे करण्याची त्य़ाची प्रवृत्तीही नव्हती. शिवाय इतक्या जास्त पॉवरची स्पर्शभिंगे मिळतात की नाहीत याबद्दल मला शंका होती. "होमिओपाथी, आयुर्वेदिक किंवा लेजर तंत्र यांच्या सहाय्याने डोळ्याचा नंबर घालवून देऊ" असा दावा करणा-या जाहिराती मी वाचल्या होत्या, पण त्यावर माझा विश्वास बसला नव्हता की तसे उदाहरण मला प्रत्यक्षात आढळले नव्हते. न जाणो ते कदाचित खरे असेल आणि असा धन्वंतरी या कामताला भेटला असेल असा विचारही एकदा मनात डोकावून गेला.

तोपर्यंत कामत माझ्यापासून चारपाच पावलांच्या अंतरावर येऊन पोचला होता. झपाझप पुढे येऊन त्यानेच माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "अरे, असा काय पाहतो आहेस? मी कामतच आहे."
"पण तुझा चष्मा .... "
"तो गेला, त्याला पार अरबी समुद्रात टाकून दिला." आपल्या शैलीत कामत्याने सांगितले.
"ही जादू कुणी केली?" माझी उत्सुकता वाढत होती
"कुणी नाही. अरे, माझे कॅटॅरॅक्टचे ऑपरेशन झाले ... आणि मला साध्या डोळ्यांनी दिसायला लागले."
माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही. बहुतेक लोकांना चाळिशीनंतर चाळशी लागते. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर तर केवढा जाड भिंगांचा चष्मा लागतो. पण याला आधीपासून असलेली चाळशी चाळिशीमध्ये नाहीशी झाली होती ( वाचण्यासाठी त्यालाही भिंग लागत असणारच) आणि मोतीबिंदू काढल्यानंतरही जाड भिंगांशिवाय याला व्यवस्थित दिसते आहे हा काय प्रकार आहे याचा बोध होत नव्हता. कदाचित त्याच्या पूर्वी असलेल्या चष्म्याचा नंबर उणे बारा अधिक मोतीबिंदूनंतर लागणा-या चष्म्याचे अधिक बारा मिळून शून्य झाले असेल असा गणिती विचार माझ्या मनात आला. अखेर त्यानेच सांगितले, "आता कॅटॅरॅक्ट ऑपरेशन झाल्यानंतर डोळ्यात रिकाम्या झालेल्या जागी कृत्रिम लेन्स बसवून देतात. त्या लेन्समधून छान दिसायला लागते." हा शोध भारतात येऊन पोचला होता, पण मला माहीत नव्हता.
ऑपरेशननंतर नवे भिंग बसवतांना मूळच्या चष्म्याच्या नंबराला त्यात अॅडजस्ट करत असतील हा विचार मात्र मनात तसाच ठाण मांडून बसला होता तो अनेक वर्षे तसाच राहिला.

. . . . . . . (क्रमशः)

Monday, November 15, 2010

मोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे

एकोणीसाव्या शतकातल्या पन्नाशीत मी नुकताच शाळेला जायला लागलो होतो त्या काळात क्वचित कधी एक म्हाता-या सोवळ्या बाई आमच्याकडे यायच्या. कंबरेमध्ये काटकोनात वाकलेल्या त्या आजींच्या दोन्ही डोळ्यांमधला मोतीबिंदू भरपूर वाढला होता. त्यामुळे पांढुरकी झालेली त्यांची बुबुळे पाहून मुले त्यांना घाबरत असत. त्या काळात गांवोगांवी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांची शिबिरे भरत नव्हती. कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी निदान मिरजेच्या वानलेस हॉस्पिटलमध्ये जावे लागत असे, पण तिथे जाण्यासाठी वाहतुकीची चांगली सोय नव्हती. सर्व्हिस मोटर नावाच्या बेभरोशाच्या खटा-यात बसून पन्नास किलोमीटर अंतरावरले कुडची स्टेशन गाठायचे आणि तिथे दिवसातून एक दोनदाच अवेळी येणा-या एमएसएम रेल्वेच्या मीटरगेज गाडीची वाट पहात तिष्ठत बसायचे. ती आल्य़ानंचर कसेबेसे गर्दीतून घुसायचे आणि मिरजेला जायचे. अत्यंत गरजू लोकच नाइलाजाने असले दिव्य करत असत. त्या आजींच्या घरी आणखी कोण कोण होते ते आता मला आठवत नाही, पण त्यांना ऑपरेशनसाठी मिरजेला घेऊन जाण्याची कोणाची तयारी नसावी किंवा त्यांना हा प्रवास झेपणार नाही असे त्यांना वाटत असावे. आपल्या क्षीण झालेल्या दृष्टीसाठी त्या कधी दैवाला दोष लावत किंवा आणखी भलते सलते दृष्टीला पडू नये म्हणून परमेश्वरानेच दिलेली दृष्टी तो काढून घेतो आहे असे त्या विषण्णपणे म्हणत असत. त्यांचे मोतीबिंदू अखेरपर्यंत त्यांच्या डोळ्यांमध्ये राहिले आणि ते डोळे क्षीण होत होत एकदिवस कायमचे मिटून गेले. मोतीबिंदू या गोंडस वाटणा-या नावामागील हे विदारक सत्य मला त्या वृध्देच्या डोळ्यांध्ये पहिल्यांदा दिसले.

एकोणीसशे ऐंशीच्या घरात असतांनाची गोष्ट. त्या काळात माझी आई आमच्याकडे रहात होती. एकदा तिला चष्मा लावूनसुध्दा पोथी वाचतांना बरेच वेळा अडखळतांना पाहिले. पण तिने त्याचा काहीच उलगडा केला नाही. सहज बोलता बोलता खिडकीतून समोर दिसणा-या इमारतीच्या कठड्यावर बसलेल्या पक्ष्याबद्दल विचारले, पण तिला तो पक्षी तर नाहीच, पण बाल्कनी आणि कठडासुध्दा नीट दिसत नव्हता असे तिच्या उत्तरावरून माझ्या लक्षात आले. मग मात्र मी तिला नेत्रतज्ञांकडे घेऊन गेलो. त्यांनी तिचे डोळे तपासले आणि दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू झाला असल्याचे सांगितले. तो परिपक्व झाल्यावर लगेच काढला नाही तर तिची दृष्टी गमावून बसण्याचा धोका असल्याचे सांगितले आणि जास्त वाट न पाहता आताच ऑपरेशन करून घ्यावे असे सुचवले. काहीशा अनिच्छेनेच आई ऑपरेशन करून घ्यायला तयार झाली.

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आवश्यक असलेली तिच्या शारीरिक आरोग्याची तपासणी सुरू झाली. माझ्या आईला खूप पूर्वीपासून दम्याचा विकार होता. थोडा निसर्गोपचार, थोडे घरगुती उपाय आणि काही आयुर्वेदिक औषधे यांच्या आधारावर ती दम्यावर नियंत्रण ठेवत असे. अगदीच आणीबाणी आली आणि आवश्यकता पडली तरच ती डॉक्टरांकडे जात असे. पण ही वैद्यकीय तपासणी सुरू झाल्यावर डॉक्टरांनी त्यांच्या औषधांचे प्रयोग तिच्यावर सुरू केले आणि त्यांच्या दृष्टीने तो आटोक्यात आणला असे वाटल्यानंतर दंतवैद्याकडे पाठवून दिले. सत्तरी गांठेपर्यंत आईच्या सर्व दाढा निखळून गेल्या होत्या, समोरचे थोडे दात शिल्लक असले तरी त्यांची अवस्था फारशी चांगली नव्हती. त्यांचा चर्वणासाठी उपयोग होत नव्हता. ऑपरेशन करण्याआधी ते दात काढून टाकावे लागतील असे दंतवैद्याने सांगितले. सगळे दात काढल्यानंतर कवळी बसवून व्यवस्थित जेवण करता येईल हा फायदाही दाखवला. नको नको म्हणत निरुपाय म्हणून अखेर आई त्याला तयार झाली. एका दिवशी फक्त एकच दात काढायचा आणि ती जखम बरी झाल्यानंतर दुसरा दात काढायचा असे धोरण असल्यामुळे त्यात बरेच दिवस गेले. मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची संख्या बरीच असल्यामुळे आणि घाई करण्याची गरज नसल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी पुढच्या महिन्यातली तारीख मिळाली.

ऑपरेशन चालले असतांना आणि त्यानंतर त्याची जखम बरी होईपर्यंत शिंक, ठसका, खोकला, उलटी, उचकी अशा कोणत्याही क्रियेने धक्का बसू नये याची काळजी घ्यावी लागणार होती. या दृष्टीने आईला तीन दिवस आधीच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून घेतले आणि औषधे, वाफारे, इंजेक्शने, थेंब वगैरेंच्या सहाय्याने तिच्या शरीराचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्याशिवाय तापमान, रक्तदाब, नाडीचे ठोके वगैरेंची मोजणी रोज सकाळ संध्याकाळ केली जात असे. त्यापूर्वी ती कधीच अशा प्रकारच्या इस्पितळात राहिली नव्हती. त्यामुळे तिथल्या वातावरणानेच ती भांबावून गेली होती. ऑपरेशन होऊन वॉर्डमध्ये परत आल्यानंतर डोके स्थिर ठेऊन उताणे पडून राहण्याची आज्ञा झाली. असे आढ्याकडे पहात तास न् तास निश्चलपणे पडून राहणे तिला अशक्यप्राय वाटत असणार. असामान्य सोशिकपणामुळे ती तक्रार करत नव्हती, पण जे काही चालले आहे ते तिच्या मनाविरुध्द असल्याचे तिच्या देहबोलीतून स्पष्ट होत होते.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दहा पंधरा दिवस रोज डोळ्यात मलमे आणि थेंब घालणे चालले होते. त्यानंतर तपासणी होऊन ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाल्याचे सांगितले गेले. एक नेहमीच्या वापरासाठी आणि दुसरा वाचन करण्यासाठी असे दोन जाड भिंगांचे चष्मे आणले. त्यांच्या सहाय्याने आता आईला नवी स्पष्ट दृष्टी मिळाली होती. पण थोड्या दिवसांनी तिने आपला मुक्काम मोठ्या भावाकडे हलवला. त्यानंतर या नव्या दृष्टीचा किती उपयोग तिने करून घेतला आणि त्यातून तिला किती आनंद प्राप्त झाला याचा जमाखर्च कांही मला मांडता आला नाही. आमच्या दुर्दैवाने वर्षभरातच ती आम्हाला सोडून गेली. आपल्या मंद होत गेलेल्या दृष्टीबद्दल तिची तक्रार नव्हती आणि त्या अवस्थेत हा वर्षभराचा काळ तिने तिच्या मर्जीनुसार वागून कदाचित जास्त आनंदाने काढला असता असेही वाटायचे. पुढे घडणा-या गोष्टींची आधी कल्पना नसते आणि त्यांची चाहूल कधी लागेल याचाही काहीच नेम नसतो. कदाचित आईला ती लागली असल्यामुळे ती सारखा विरोध करत असेल. आपल्याला नक्की काहीच माहीत न झाल्यामुळे या जरतरला काही अर्थ नसतो एवढेच खरे.

. . . . . . . (क्रमशः)

Thursday, November 04, 2010

दिवाळीतला किल्ला


कल्पकता आणि निर्मितीची आवड या गोष्टी कमी अधिक प्रमाणात सगळ्या माणसांना जन्मजात मिळतात. बहुतेक लहान मुलांमध्ये त्या दिसून येत असतात, पण "इथे पसारा मांडू नकोस, गोंधळ करू नको" असे आदेश देत आणि "लागेल, इन्फेक्शन होईल, आजारी पडशील" अशी भीती दाखवून बरेचसे आईवडील, विशेषतः माता त्या गुणांना दडपून टाकतांना पाहून मला त्यांची कीव करावीशी वाटते. सुदैवाने माझ्या लहानपणी मला असले काही ऐकावे लागले नाही. तसे आमचे कुटुंब अत्यंत बाळबोध होते आणि धार्मिक परंपरा पाळण्याबद्दल कसलीही तडजोड चालत नसे. सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत करण्याच्या कामात एक शिस्त असायची. पण ती करून झाल्यानंतरही भरपूर मोकळा वेळ मिळत असे आणि तो सर्वस्वी आपला असायचा. मुले काय करताहेत यावर घरातल्या मोठ्या माणसांचे लक्ष असले तरी त्यात त्यांची अडकाठी नसायची. त्यात कुठे खरचटले, चटका बसला, बोट कापले, कपडे मळले, अंग घाण झाले असे व्हायचे. तरीही "नसते उपद्व्याप कशाला करायला गेला होतास?" असे विचारून त्यासाठी पाठीत धपाटा घातला जात नसे. असल्या उद्योगातून काही निष्पन्न झाले तर त्याचे कौतुकदेखील होत असे.

दिवाळीमध्ये करायचा किल्ला म्हणजे आमच्या निर्मितीक्षमतेचा परमोच्च बिंदू असे कदाचित म्हणता येईल. त्याची तयारी वर्षभर चालत असे. त्या काळात असल्या हौसेच्या कामाचे शाब्दिक कौतुक होत असले तरी त्यासाठी दिडकीचीसुध्दा आर्थिक मदत मिळत नसे. घरात किंवा आसपास उपलब्ध असलेला कच्चा माल वापरूनच जे काही करायचे ते करावे असा अलिखित नियम होता. रिकाम्या काडेपेट्या, खोके, डबे, बाटल्या, फ्यूज झालेले बल्ब असल्या टाकाऊ वस्तू गोळा करून आम्ही मुले त्यांना अडगळीच्या खोलीत ठेवत असू आणि त्यांचा उपयोग कसा करायचा यावर विचारचक्र सुरू होत असे. दिवाळीच्या आठवडाभर आधी त्या बाहेर काढून किल्ल्याच्या रचनेला प्रत्यक्ष सुरुवात होत असे.

आमचे घर पूर्णपणे दगडमातीचे होते. घरातली जमीन, भिंती, माळवद सारे काही मातीपासून बनवलेले होते. घराबाहेर तर जिकडे तिकडे मातीच माती असायची. त्यामुळे या पहिल्या पंचमहाभूताला बराच मान होता. मला तरी कधीच मातीबद्दल घृणा वाटली नाही. किल्ला तयार करण्यासाठी आधी दगड, माती, विटा वगैरे जमवून त्याचा ढीग रचायचा. दगडविटा जोडून मातीच्या चिखलाने त्यांना लिंपून घेऊन त्यातून हवा तसा आकार निर्माण करायचा. डोंगर, गडकोट, सपाट जमीन, पाण्याचे तळे वगैरे भूभाग तयार झाल्यानंतर त्यावर घरे, बंगले, रस्ते, वाहने, माणसे वगैरेंनी त्याला सजवायचे. दिवाळी सुरू होईपर्यंत जेवढा वेळ मिळेल तितका वेळ हे काम चालत असे. आपल्या संग्रहातली सारी चित्रे व खेळणी त्यावर मांडत असू. या किल्ल्याला स्थळकाळाचे बंधन नसायचे. कमळातल्या लक्ष्मीपासून महात्मा गांधींपर्यंत कोणत्याही देवदेवता व ऐतिहासिक व्यक्ती आणि हत्तीघोड्यापासून (न उडणा-या) विमानापर्यंत कोणतेही वाहन त्यात येत असे. त्यांच्या आकारमानात प्रमाणबध्दता किंवा रचनेत सुसंगती असण्याचा प्रश्नच नव्हता.

शाळेत असेपर्यंत आम्ही दरवर्षी दिवाळीला किल्ला बनवत होतो. त्यानंर ही प्रथा खंडित झाली ती झालीच. माझी मुले लहान असतांना ऑफीसला जाण्यायेण्यातच सारा दिवस संपून जात असल्याने मला वेळच नव्हता आणि कॉस्मोपोलिटन वस्तीत रहात असतांना इतरांकडेही किल्ला बनतांना दिसत नसल्यामुळे मुलांनीही त्याची मागणी केली नाही. आता पन्नास वर्षांनंतर यावर्षी पुन्हा एकदा किल्ला बनवायची संधी मला मिळाली. पुण्याला अजूनही मराठी संस्कृतीचा थोडा स्पर्श असल्यामुळे कुठून तरी माझ्या सात वर्षाच्या नातींना किल्ल्याचा सुगावा लागला आणि आपल्याकडे तो हवा असा हट्ट धरला. आजच्या पध्दतीनुसार किल्ला कुठे (तयार) मिळतो, त्याचे प्रदर्शन लागले असेल वगैरे वेगळ्या वळणाने चर्चा चालली असतांना चिमुरडी ईरा ठामपणे म्हणाली, "असा बाजारातून किल्ला विकत आणला तर त्यात आपलं काय आहे?"
लगेच तिची तळी उचलून धरत मी म्हणालो, "बरोबर बोललीस. आपण मिळून घरी किल्ला तयार करूया."

दिवाळीला जेमतेम दोनतीनच दिवस उरले असल्यामुळे त्या कामाची सुरुवात तत्परतेने करणे आवश्यक होते. सिमेंट काँक्रीटच्या जंगलातल्या फ्लॅटमध्ये दगड, माती, विटा, वाळू असले पदार्थ आणणे म्हणजे अब्रह्मण्यम्. थर्मोकोलपासून पर्यावरणाला असलेल्या धोक्यामुळे तोही नकोच. फक्त कागद, पुठ्ठे वगैरेंपासून जे काही करता येईल तेवढे करायचे ठरवले. लहानपणच्या संवयीनुसार घरातले रिकामे खोके, डबे, बाटल्या वगैरे टाकाऊ वस्तू जमवल्या, चित्रकलेसाठी आणि प्रिंटरसाठी आणलेले कागद घेतले. कात्रीने कापायचे आणि गोंदाने किंवा चिकटपट्टीने त्यांना जोडायचे असे करत किल्ल्याची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार, कमान, राजवाडा वगैरे सगळे भाग बनवून त्याला किल्ल्याचा आकार दिला. स्केचपेन आणि रंगीत खडूने त्यांना रंगवून टाकले. पाहता पाहता किल्ला तयारही झाला.

वयोमानाप्रमाणे अधू होत चालेली दृष्टी, थरथरणारी बोटे आणि त्यात पूर्ण ताळमेळ नसणे वगैरेंमुळे आमच्या किल्ल्याला सुबकपणा आला नसेल. ईशा इरा तर असली कामे पहिल्यांदाच करत होत्या. त्यांच्याकडून कौशल्याची अपेक्षा नव्हती. पण आजकालच्या एका जाहिरातीत येते त्याप्रमाणे "टेढा है, पर मेरा है।" या भावनेने आम्ही सारे या किल्ल्यावर खूप खूष आहोत.

Saturday, October 30, 2010

नव(ल)रात्री - भाग ४

परदेशभ्रमणाचा थोडा अनुभव माझ्या गाठीशी होता. पुढे अॅटलांटाला जाण्यासाठी आम्हाला कोणत्या गेटवर विमान मिळणार आहे हे विमानतळावरील फलकावर पाहून घेतले आणि कॉरीडॉरमधील पाट्या वाचून त्यात दाखवलेल्या खुणांनुसार डाव्या उजव्या बाजूला वळत आणि एस्केलेटर्सने वर खाली चढत उतरत आमचे गेट गाठले. विमान गेटवर लागायला बराच अवकाश होता. मुंबईतल्या ऑक्टोबर हीटमधून थेट अमेरिकेतल्या फॉल सीझनमध्ये आल्याने तपमानात पंचवीस तीस अंशांचा फरक पडला होता. त्याने सर्वांग गारठून गेले होते. थंडीचा विचार करून गरम कपड्यांची गाठोडी आणली होती आणि एक एक करून ते कपडे अंगावर चढवलेही होते. तरीही नाकातोंडामधून आत जाणारी थंड हवा तिचा हिसका दाखवत होती. त्यावर इलाज म्हणून गरम गरम चहा घेतला. आधी थोडी चंव घेऊन पहावी या विचाराने घेतलेला तिथला स्मॉल पेला, आमच्या नेहमीच्या कपाच्या दुप्पट आकाराचा होता. तो घशात रिचवल्यानंतर अंगात पुरेशी ऊब आली. ठरल्यावेळी आमचे विमान आले आणि त्यात बसून आम्ही अॅटलांटाला जाऊन पोचलो.

हे विमान लहानसे होते, तराही अर्धवटच भरले होते. त्यातलेही अर्ध्याङून अधिक उतारू अॅटलांटाला न उतरता पुढे चालले गेले. आमच्यासोबत वीस पंचवीस लोक तिथे उतरले असतील. स्टॉलवरून काही खरेदी करण्यासाठी आम्ही दोन तीन मिनिटे थांबलो तेवढ्यात ते लोक कुठे अदृष्य झाले ते कळलेही नाही. आमचे सामान घेण्यासाठी बॅगेजची पाटी वाचून त्यात दाखवलेल्या बाणाच्या दिशेने चालत राहिलो. तो एक लांबच लांब कॉरीडॉर होता आणि चालण्याचे कष्ट टाळायचे असल्यास सरकत्या पट्ट्यावर उभे राहून पुढे जायची सोय होती. पाचसहा मिनिटे पुढे जाऊनसुध्दा आमचे ठिकाण येण्याची लक्षणे दिसत नव्हती. कोणाला विचारावे म्हंटले तर नजरेच्या टप्प्यात कोणी नव्हते. आम्हा दोघांच्या आजूबाजूला, मागेपुढे कोणीही त्या मार्गाने जात नव्हते. पुढे चालत राहिल्यानंतर एक ठिकाण आले. त्या जागी थोडी माणसे नजरेला पडली. "सामान घेऊन विमानतळाबाहेर पडण्यासाठी ट्रेनने जायचे असते" असे त्यांनी सांगितले. "ट्रेनचे स्टेशन कुठे आहे?" हे विचारल्यावर बोटाने एक जागा दाखवली.

लिफ्टचा दरवाजा असावा असे काहीतरी तिथे होते आणि त्याच्या समोर चारपाच उतारू उभे होते. दोन तीन मिनिटातच आतल्या बाजूने हलकासा खडखडाट ऐकू आला आणि तो दरवाजा उघडला. पलीकडे एक अगदी पिटुकला प्लॅटफॉर्म होता आणि आगगाडीचा एकच डबा उभा होता. पटापट सगळे जण त्यात चढले, दरवाजे बंद झाले आणि त्या डब्याने वेग घेतला. हे लिफ्टमध्ये चढल्यासारखेच वाटत होते, फक्त ती उभ्या रेषेत वरखाली न करता आडव्या रेषेत धांवत होती. अॅटलांटाचा विमानतळ इतका विस्तीर्ण आहे की त्याचे ए, बी, सी, डी वगैरे विभाग आहेत आणि त्या सर्व विभागांना बाहेरून जाण्यायेण्याच्या वाटेशी जोडणारी शटल सर्व्हिस आहे. इथे असे काही असेल याची मी कल्पनाही केली नव्हती. सामान उतरवून घेण्याच्या जागी जाऊन पोचलो तो आम्हाला घेण्यासाठी आलेले अजय आणि किरणराव पट्ट्याजवळच उभे होते आणि आमच्या बॅगाही पट्ट्यावर फिरत होत्या. आपले सामान उतरवून घेतल्यावर त्यांच्याबरोबर गाडीत जाऊन बसलो. कोणता माणूस कोणते सामान घेऊन बाहेर जात आहे याची चौकशी करणारा कोणीच इसम तिथल्या दरवाज्यावर नव्हता.

अॅटलांटाचा विमानतळ शहराच्या दक्षिण टोकाला आहे, तर अजय रहात असलेले अल्फारेटा गाव अॅटलांटाच्या उत्तरेला पंचवीस तीस मैलांवर आहे. आधीचे निदान पंधरावीस मैलतरी आम्ही अॅटलांटा शहराच्या भरवस्तीमधून जात होतो. पण वाटेत एकही चौक लागला नाही की ट्रॅफिक सिग्नल नाही. कुठे जमीनीखालून तर कुठे जमीनीवरून सरळसोट रस्त्यावरून आमची कार सुसाट वेगाने धांवत होती. वाटेत जागोजागी उजव्या बाजूला फाटे फुटले होते. शहरातल्या आपल्या इच्छित स्थळी जाणारे लोक आधीपासून आपली गाडी उजवीकडील लेनमध्ये आणत होते आणि वळण घेऊन हमरस्त्याच्या बाहेर पडत होते. हा हमरस्ता अॅटलांटापासून पन्नास साठ मैल दूर गेल्यानंतर एका राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. वाटेत लागणा-या शहरांना जोडणारे एक्झिट्स होते. नऊ की दहा नंबराच्या एक्झिटमधून आम्ही एक्झिट केले आणि अल्फारेटा शहरातल्या अजयच्या घराकडे गेलो. या गावातल्या रस्त्यांवर मात्र जागोजागी ट्रॅफिक सिग्नल होते आणि रस्त्यात दुसरे वाहन असो वा नसो, लाल दिवा दिसताच लोक आपली गाडी थांबवून तो हिरवा होण्याची वाट पहात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे नवनवे अनुभव घेत आम्ही घरी जाऊन पोचलो.

जेट लॅगचे निमित्य करून दोन दिवस झोपून काढले आणि चौथ्या दिवशी आम्ही पर्यटनासाठी निघालो. आम्ही उभयता आणि किरणराव व विद्याताई अशा चार लोकांचे नायगराचा धबधबा, वॉशिंग्टन डीसी आणि इतर काही ठिकाणे पहाण्यासाठी तीन दिवसांच्या एका लघुसहलीचे रिझर्वेशन केलेले होते. ती न्यूयॉर्कहून सुरू होऊन तिथेच संपणार होती. न्यूयॉर्कला जाणेयेणे आपल्या आपण करायचे होते. आम्ही नेवार्कमार्गे अॅटलांटाला एकदा आल्याने त्या मार्गावरले तज्ज्ञ झालो होतो. नेहमीची सरावाची वाट असावी अशा आविर्भावात आम्ही अॅटलांटाहून निघालो आणि नेवार्कला सुखरूप जाऊन पोचलो. तो शनिवारचा दिवस असल्याने सौरभला सुटी होती. आम्हाला नेण्यासाठी विमानतळावर तो आला होताच. तिथल्या महामार्गावरून तो आम्हाला पर्सीपेन्नी या त्याच्या गावाला घेऊन गेला. खूप रुंद आणि सरळसोट रस्ते, त्यावरून कुठेही न थांबणारी वाहतुकीची रांग, एक्झिटवरून बाहेर पडणे वगैरे आता ओळखीचे झाले होते.

रविवारी सगळे मिळून बसने न्यूयॉर्कला गेलो. अर्थातच सर्वात आधी स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. "जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुताम् वंदे।" हे स्फूर्तीदायक गीत लहानपणापासून म्हणत आलो असलो तरी स्वतंत्रता ही एक मनाला जाणवणारी आणि बुध्दीला आकलन होणारी संकल्पना होती. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला पाहून ती दृष्य स्वरूपात नजरेसमोर आली. स्वातंत्र्यमातेच्या या मूर्तीचा भव्य आकार, तिची मुद्रा, तिच्या चेहे-यावर असलेले भाव या सर्वांमधून तिचे स्वरूप प्रकट होत होते. आदिशक्तीचे हे आगळे रूपसुध्दा नवरात्रातच पहायला मिळाले.

त्यानंतर तीन दिवस अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहून दसरा येईपर्यंत आम्ही नेवार्कमार्गे अॅटलांटाला परत आलो. या सफरीबद्दल मी पूर्वीच विस्तारपूर्वर लिहिलेले आहे. रोममध्ये असतांना रोमन व्हा अशा अर्थाचे एक सुभाषित आहे. थोड्या वेगळ्या अर्थाने गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास असे हिंदीत म्हणतात. अमेरिकेत गेल्यानंतरसुध्दा घरात आम्ही मराठीच राहिलो होतो, पण चिनी लोकांनी चालवलेल्या अमेरिकन यात्रा कंपनीबरोबर जातांना समझोता करावाच लागला. ज्या हॉटेलांमध्ये आमची झोपायची व्यवस्था झाली होती त्यातल्या खोल्या इतर सुखसोयींनी युक्त असल्या तरी त्यांमध्ये आंघोळीची सोय नसायची. विमानात असते तशा प्रकारचे एक छोटेसे टॉयलेट रूमला जोडलेले असले तरी त्यात टब किंवा शॉवरसाठी जागाच नसायची. पहाटेच्या वेळी तपमान शून्याच्या जवळपास असायचे आणि बदलण्यासाठीसुध्दा अंगावरचे कपडे काढणे जिवावर येत असे. त्यामुळे बाथरूमचे नसणे आमच्या पथ्यावरच पडत असे. त्या वर्षीच्या नवरात्रातले दोन दिवस पारोसेच राहिलो. जेवणासाठी आमची बस एकाद्या केएफसी किंवा मॅकडीच्या दुकानासमोर उभी रहात असे. आपल्याकडे मिळतात तसले उकडलेल्या बटाट्याचे व्हेजी बर्गर तिथे नसायचे. नवरात्र चालले असल्याची जाणीव बाजूला ठेवून नाइलाजाने थोडा मांसाहार करणे भाग पडत होते. गोडबोले की आठवले नावाचे एक तरुण जोडपे आमच्याबरोबर सहलीला आले होते. त्यांनी काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे वगैरे सुक्या मेव्याची मोठी पुडकी आणि खूप सफरचंदे आणली होती. शिवाय मिळतील तिथे केळी, संत्री, मोसंबी वगैरे ते घेत होते. ते मात्र शुध्द शाकाहारी राहिलेच, कदाचित त्यांना तीन दिवस उपवाससुध्दा घडला असेल. रक्तामधली साखर, कोलेस्टेरॉल वगैरे वाढण्याच्या भीतीने आम्ही तसे करू शकत नव्हतो आणि ते कमी होण्याच्या भीतीने उपाशीही राहू शकत नव्हतो. त्यामुळे जो काही पापसंचय होत होता त्याला इलाज नव्हता. हे नव(ल)रात्र नेहमीपेक्षा खूपच आगळे वेगळे असल्यामुळे कायम लक्षात राहील.