Monday, August 11, 2008

कोण गुन्हेगार? - भाग ३ (अंतिम)

. . . . (मागील भागातील . . "हो, खरंच! रविवारी सकाळी मेजर चर्चला गेला होता ना, तेंव्हाच आमचा मुलगा इथं आला होता. त्या दिवशी माझ्याशी किती लाडात बोलत होता?" गळ्यात आलेला आवंढा गिळत एल्मा बोलू लागली . . . . इथून पुढे )
"हो, खरंच! रविवारी सकाळी मेजर चर्चला गेला होता ना, तेंव्हाच आमचा मुलगा इथं आला होता. त्या दिवशी माझ्याशी किती लाडात बोलत होता?" गळ्यात आलेला आवंढा गिळत एल्मा बोलू लागली, "मला म्हणाला की त्या दिवशी त्याला माझ्या हांतचं मशरूम सूपच प्यायचंय्. मी त्याला म्हंटलं की अरे आताशा कुठे सकाळ होते आहे, मी गरम गरम कॉफी बनवते, तर नको म्हणाला. म्हणे तो आताच कॉफी पिऊन आला आहे. त्याला थोडीशी सर्दी झाल्यासारखी वाटते आहे आणि म्हणून मी लहानपणी त्याला बनवून देत होते तसं छान गरम सूपच पाहिजे. माझ्यापाशी अगदी हट्टच धरून बसला. मग मीही म्हंटलं की बरं बाबा, मी आणते करून. तू बैस इथं."
"तुम्हाला सूप बनवायला साधारण किती वेळ लागला असेल हो?" इन्स्पेक्टरने पृच्छा केली.
त्यावर एल्मा पुटपुटली, "आता मी काय हांतात घड्याळ लावून बसले होते कां? म्हणे किती वेळ लागला ते सांगा! अहो मशरूमचं सूप बनवायला वेळ लागणार नाही कां? आधी ते निवडा, वाफवा, सोला, चिरा. थोडा कांदा बारीक चिरून घेऊन परतून घातला चवीला, थोडं आलं पण किसून घातलं. माझे काम कांही आताच्या पोरींसारखं नाही हो. की बाजारातून एक कॅन आणा आणि गरम करून घशात घाला. पण मी तरी हे सगळं मेलं तुम्हाला कशाला सांगतेय्? तुमची बायको पण हेच करत असेल ना! पण मी सांगते इन्स्पेक्टर, तुम्हाला कधी वेळ मिळाला तर आमच्याकडे या. खरं मशरूमचं सूप कसं असायला पाहिजे त्याची चंव तरी तुम्हाला कळेल."
एल्माबाई वाहवत जात होत्या. त्यांना पुन्हा पहिल्या वळणावर आणीत इन्स्पेक्टरने विचारले,"तुमच्या मदतीला तुमचा मुलगा आला असेलच ना?"
"छे हो! तो बसला होता या इथे हॉलमध्येच. कसली तरी ती कर्कश रीमिक्सची टेप ढणाढणा लावून ऐकत बसला होता."
"सूप तयार झाल्यावर तुमच्याबरोबर कांही बोलला असेलच ना?"
"हो. त्याचं आपलं ते नेहमीचंच पुराण. त्याला म्हणे कसलासा बिझिनेस करायचाय् आणि त्यासाठी एकदम वीस हजार पौंड पाहिजेत. मी म्हंटलं, अरे आम्ही एवढे पैसे कुठून देणार रे? तर म्हणतो की डॅडींच्या फंडाचे आहेत ना? मी त्याला साफ सांगितलं की मी त्या पैशाला कुणालाही हात लावू देणार नाही. अरे हा फंड आहे म्हणून तर अडी अडचणीला आणि सणासुदीला त्याचा आधार आहे. नाही तर यांची ती जुन्या काळातली पेनशन कांही पुरणार आहे कां? त्यांत यांचं हे ढोसणं आणि खादाडी काय कमी आहे? मी त्याला अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की जरी तुझे डॅड तयार झाले तरी मी माझ्या जिवात जीव असेपर्यंत त्यांना त्यांच्या फंडाच्या पैशाला हांत लावू देणार नाही. त्यावर तो काय म्हणाला माहीत आहे? म्हणे तू मेल्यावर तरी मला पैसे मिळतीलच ना? काय मेल्याच्या जिभेला हाड तरी आहे की नाही? म्हाता-या आईची कोणी अशी थट्टा करतात कांहो?" एल्माला गलबलून आलं.
"बस्स, एवढं बोलला आणि चालला गेला हो. नेहमीसारखी खाऊ म्हणून पाच दहा पौंडांची चिरीमिरी पण घेतली नाहीन!" म्हातारीचा गळा पुन्हा दाटून आला.
मेजरकडे वळून इन्स्पेक्टरने विचारले,"माफ करा मेजर, पण तुमचं तुमच्या पत्नीबरोबर कधी भांडण व्हायचं कां?"
मेजरने उत्तर दिलं, "अहो तिची बोलण्याची पद्धत पहातच आहात तुम्ही. त्यावर आमचीसुद्धा अधून मधून वादावादी जुंपायची."
"आणि बरं कां इन्स्पेक्टर, हे मेजरसाहेब एकदा चिडले ना, की एकदम हांतात ते जुनं पिस्तुल घेऊन ओरडायचे!" एल्मा मिश्किलपणे पुढे म्हणाली, "आमचा बॉबीसुद्धा लहानपणी त्यांची छान नक्कल करायचा. आता एक छब्द बोललीस तल गोळी घालीन, ठो! ठो! ठो! आणि खाली पडल्याचं नाटक करायचा." बाईंचे ओले डोळे पुन्हा पाणावले.
"ओके, सगळा खुलासा झाला. हे रहस्य तर उलगडलं." इन्स्पेक्टरने निःश्वास टाकीत म्हंटले.
"हो, पण गुन्हेगाराला शिक्षा कधी देणार ?" एल्माने किंचाळत विचारले.
"तो तर आता कोणाच्या हाती लागणे शक्यच नाही, पण त्याच्या गुन्ह्याची फार मोठी शिक्षा त्याला आधीच मिळाली आहे." इन्स्पेक्टरने सगळ्यांना अधिकच बुचकळ्यात टाकले.
सर्वांच्या चेहे-यावरील प्रश्नचिन्ह पाहून त्याने खुलासा केला, "मेजर तुम्ही ते सांगितलं नाहीत पण आमच्या तपासात आम्हाला कळलं की रॉबर्टला म्हणजे तुमच्या मुलाला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं. त्यामुळेच त्याची नोकरी टिकायची नाही, त्याला बेकारीचा भत्ता पुरायचा नाही आणि नैराश्याचे झटकेही येत असत. तुमच्याकडे असलेल्या फंडाच्या रकमेवर त्याचा डोळा होता पण आई हे पैसे मिळू देणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं. कदाचित गुन्हेगारीवरील एखादी कादंबरी वाचून किंवा चित्रपट पाहून त्याच्या मनात एक दुष्ट विचार आला. हांतात पिस्तुल घेऊन बायकोला धांक दाखवायची तुमची संवय त्याला ठाऊक होती. त्यानेच जुन्या सामानाच्या बाजारातून त्या काळच्या गोळ्या शोधून काढून तुमच्या नांवाने विकत आणल्या. तुम्ही दर रविवारी ठरलेल्या वेळी निदान तासभरासाठी चर्चला जाता हे त्याला माहीत होतं. त्या दिवशी तुमच्यावर पाळत ठेऊन तुम्ही घराबाहेर पडतांच तो तुमच्या घरी आला, तुमच्या मिसेसना मशरूमचं सूप बनवायला सांगून स्वयंपाकघरात गुंतवून ठेवलं, बाहेर आवाज ऐकू जाऊ नये म्हणून मोठ्याने टेप वाजवली आणि गुपचुपपणे तुमच्या पिस्तुलात गोळ्या भरून ठेवल्या. कधी तरी तुमचं भांडण होईल, तुम्ही संवयीप्रमाणे पिस्तुल रोखाल. रागाच्या भरात अनवधानाने त्यातून गोळी सुटून एल्माचा प्राण जाईल असं त्याला वाटत होतं. त्यानंतर तुम्हाला त्यात गुंतवण्यासाठी तुम्ही एल्माचा नेहमी छळ करता, त्यातूनच तिचा जीव घेतलात असे दाखवणारे एक निनावी पत्रसुद्धा त्यानं लिहून ठेवलं होतं. घटना घडताच तो ते पोस्ट करणार होता. आम्हाला ते त्याच्या घरातल्या टेबलाच्या खणात सापडले आहे. पण जसजसा वेळ गेला तसतसा तो अस्वस्थ होऊ लागला. भांडण व्हायच्या आधीच पिस्तुलातल्या गोळ्या तुमच्या लक्षात आल्या तर आपलं बिंग फुटेल ही भीती त्याला वाटायला लागली. त्याचं मन तर त्याला खात होतंच. हांतात पैसे नसल्यामुळे त्याला ड्रग्ज मिळेनात. त्यामुळे त्याला अधिकच नैराश्य आलं. अशा परिस्थितीत सांपडलेल्या माणसाच्या मनात आत्महत्येचे विचार येतात. तसा त्याच्या मनात येताच त्याने वैतागाच्या भरात खिडकी उघडून आपला जीव देण्यासाठी दहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली. योगायोगाने नेमक्या त्याच वेळी तुम्ही हांतात पिस्तुल घेऊन पत्नीशी भांडत होतात व अनवधानाने त्यातून गोळी सुटलीसुद्धा होती. पण त्याच क्षणी खिडकीबाहेर झालेल्या आवाजाने दचकून मॅडम बाजूला झाल्या आणि पिस्तुलातून सुटलेली गोळी नेमकी खिडकीबाहेर वरून खाली पडत असलेल्या बॉबीच्या मस्तकात घुसली. तुमचे पिस्तुल असे अचानक फायर झाल्यामुळे तुम्हा दोघांनाही धक्का बसला. त्यामुळे खिडकीबाहेर काय झाले इकडे तुमचे लक्ष गेलं नाही. रॉबर्टने आत्महत्येचा प्रयत्न केला असला तरी तो खाली बांधलेल्या नायलॉनच्या नेटमध्ये पडल्यामुळे त्याचा प्रयत्न असफल झाला असता. पण ती पिस्तुलातली गोळीच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. ती तशा प्रकारे उडावी असा डांव मात्र त्याने स्वतःच रचला होता. दैवयोगाने त्याला तोच बळी पडला. तुमच्या मनात खून करण्याचा उद्देश नव्हताच त्यामुळे या घटनेला खून म्हणता येणार नाही. तेंव्हा आता अपघात या नांवाखाली हे प्रकरण संपवावे हे उत्तम
--------------------------------------------------------------------
या गोष्टीचे बीज शेरलॉक होम्सच्या एका पुस्तकात असून 'आत्महत्या की खून' अशा कांहीशा नांवाने एक ही संक्षिप्त गोष्ट ईमेलद्वारा माझ्याकडे आली होती. त्यातील पात्ररचना, संवाद आणि त्यांची रहस्यकथेच्या दृष्टीने तिची मांडणी व विस्तार करण्याचा प्रयत्न मी केला आहे. . .. ........... असे मी लिहिले होते. पण या मूळ गोष्टीची कुळकथा अनामिक या सुजाण वाचकाने माझ्या नजरेला आणून दिली आहे. त्यानुसार याचा शेरलॉक होम्सशी कांही संबंध नाही. या गोष्टीत प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कधी नव्हताच. ही गोष्ट फोरेन्सिक डॉक्टरांना सांगण्यासाठी डॉ.मिल्स यांनी रचली होती. कशी कोण जाणे, ती आंतर्जालावर अवतरली आणि जगभर पसरत गेली.

2 comments:

Anonymous said...

More on the origin of the story:
http://www.snopes.com/horrors/freakish/opus.asp
Seems that it is not a Holmes story.

Anand Ghare said...

या प्रतिसादातील माहितीनुसार ही गोष्ट डॉ. मिल्ल्स यांनी एका विशेषज्ञांच्या बैठकीत सांगण्यासाठी बनवली होती. पण ती इतकी चित्तवेधक होती की कोणीतरी आंतर्जालावर टाकतांच ती लक्षावधी लोकांपर्य़ंत पोहोचली.
या माहितीबद्दल मी अनामिक यांचा अत्यंत आभारी आहे. बहुतेक रहस्यकथा शेरलॉक होम्स, आर्थर कॉनन डायल किंवा आगाथा ख्रिस्ती यांच्या असत म्हणून शेरलॉक होम्सचे नांव अनवधानने या कथेला जोडले गेले असावे.