Tuesday, February 28, 2012

शाश्वत ऊर्जा कार्यशाळा -भाग १

अलकासाठी औषधे घेऊन मी हॉस्पिटलकडे जात असतांना गेटजवळ समोरून भावे येतांना दिसले. आम्हा दोघांनाही थोडी घाई असल्यामुळे थोडीशी जुजबी विचारपूस करून आम्ही एकमेकांचे टेलीफोन नंबर विचारून घेतले आणि आपापल्या दिशांना चालले गेलो. दोन तीन दिवसांनी मला खरोखरच भाव्यांचा फोन आला. त्यांनी विचारले, "आता वहिनी कशा आहेत?"
"आता तिची तब्येत बरी आहे, उद्यापरवाकडे डिस्चार्ज मिळेल."
"तुम्हाला एक विचारायचं होतं, पण विचारावं की नाही असं वाटलं. "
माझी क्षमता आणि स्वभाव याबद्दल भाव्यांना साधारण कल्पना असल्यामुळे ते मला कसलाही अवघड प्रश्न विचारणार नाहीत याची मला होती. मी म्हंटलं, "विचारा ना. फार फार तर मला माहीत नाही असं सांगेन किंवा मला जमणार नाही म्हणेन."
" अणूऊर्जा या विषयावर चार शब्द बोलायचे आहेत."
"हा तर माझा आवडता विषय आहे. कुठं आणि कधी बोलायचं आहे?"
".... .... संस्थेचा एक कार्यक्रम आहे. त्यात त्यांना या विषयासाठी कोणीतरी जाणकार वक्ता पाहिजे आहे."  भावे त्या संस्थेचे नाव पटकन बोलून गेल्यामुळे माझ्या काही ते लक्षात आले नाही. बहुधा ती संस्था माझ्या परिचयाची असावी असे त्यांना वाटत असणार. मला त्यामुळे विशेष फरक पडणार नव्हता म्हणून मीही काही ते नाव विचारले नाही. त्यांना विचारले, "हा कार्यक्रम कुठं होणार आहे?"
"नाशिकला."
"जवळच आहे. एका दिवसासाठी अलकाची काळजी घेण्याची काही तरी व्यवस्था करता येईल."
"मग मी तुमचं नाव सुचवतो. संस्थेचे लोक तुमच्याशी संपर्क साधतील."
"ठीक आहे."

दोन दिवसांच्या आतच मला त्या कार्यशाळेच्या संयोजकांचा फोन आला. मला किती वेळासाठी, कुठल्या भाषेत आणि कोणासमोर बोलायचे आहे वगैरेचा अंदाज येण्यासाठी मी थोडी साधारण माहिती विचारून घेतली. पाठोपाठ त्यांचे ईपत्रसुध्दा आले.
"आमच्या विनंतीचा मान राखून आपली संमती दर्शवल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपला संक्षिप्त परिचय आणि व्याख्यानाचा सारांशही त्वरित पाठवावा." अशा अर्थाचे काही तरी त्यात लिहिले होते. मी विचार केला, कसली विनंती आणि कसली संमती? मग मी सुध्दा तसाच मानभावीपणा दाखवत उत्तर दिले, "मला ही संधी दिल्याबद्दल मीसुध्दा आपला अत्यंत आभारी आहे. माझा संक्षिप्त परिचय आणि व्याख्यानाचा सारांश सोबत पाठवत आहे. आपल्या संस्थेसाठी मी हा पहिलाच कार्यक्रम करत असल्यामुळे व्याख्यात्यांना कोणत्या सुविधा पुरवल्या जातात याचा अंदाज मला मिळाला तर फार चांगले होईल." (साध्या रोखठोक भाषेत सांगायचे झाल्यास यायचे की नाही ते मला ठरवता येईल.)

चार पाच दिवस झाले तरी माझ्या पत्राला उत्तर आले नाही. "याला आपण व्यासपीठ दिले आहे तेवढे पुरे नाही का? आणखी काय द्यायची गरज आहे?" असा विचार ते लोक बहुधा करत असावेत असा अंदाज मी केला आणि ती गोष्ट विसरून गेलो. नोकरीत असेपर्यंत मी माझ्या ऑफीसचा प्रतिनिधी म्हणून जात असल्यामुळे सगळी व्यवस्था आपोआप होत असे. सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्यांच्याकडून मला आमंत्रण मिळते ते करतात. याची संवय झालेली असल्याने मी त्यावर विसंबून होतो. योगायोगाने पुन्हा भाव्यांची भेट झाली. माझ्या पत्राची एक प्रत मी त्यांना पाठवली असल्यामुळे त्याचा मतितार्थ त्यांच्या लक्षात आला असावाच. तरीही चाचपून पहाण्यासाठी त्यांनी विचारले, "तुमचा कार्यक्रम नक्की झाला आहे ना?"
"मी त्यांच्या उत्तराची वाट पहातो आहे." मी सांगितले.
"आमची सेवाभावी संस्था असल्याकारणाने ती कोणाला मानधन वगैरे देऊ शकत नाही."
"मला त्याची अपेक्षाही नाही. मुंबईतल्या एकाद्या ठिकाणी कार्यक्रम असला तर मी तिथे सहज जाऊ शकलो असतो, पण नाशिकसारख्या नवख्या ठिकाणी मी कसा जाणार, कुठे थांबणार, तुम्हीच विचार करा."  तेसुध्दा माझ्यासारखेच सेवानिवृत्त अधिकारी असल्यामुळे आम्ही एकाच होडीतले वाटसरू होतो. संभाषणाचा चेंडू मी त्यांच्याकडे टोलवला.
"बरोबर आहे तुमचं, मी त्याबद्दल बोलून घेईन." भाव्यांनी आश्वासन दिले आणि ते पाळले.
त्या संस्थेच्या उच्च पदाधिका-यांकडून फोन आणि विरोप आला. त्यांची सेवाभावी संस्था असल्याकारणाने ते कोणाला मानधन वगैरे देऊ शकत नाहीत हा मुद्दा स्पष्ट करून माझा नाशिकला जाण्यायेण्याचा कार्यक्रम काय आहे याची विचारणा केली होती, तसेच माझ्या प्रेझेंटेशनची सॉफ्ट कॉपी २२ तारखेच्या आत पाठवून देण्याची विनंती केली होती. मीसुध्दा माझा मुद्दा स्पष्ट करून माझी जाण्या येण्याची तसेच राहण्याची सोय करण्याची विनंती त्यांना केली. (त्याखेरीज मी येणार नाही हे प्रच्छन्नपणे पण जवळ जवळ स्पष्ट केले.) त्यानंतर सारी चक्रे वेगाने फिरली. माझी सर्व सोय केली गेली असल्याची पुष्टी करण्यात आली, माझ्या प्रवासाची जबाबदारी एका कार्यकर्त्यावर दिली गेली तसेच माझ्या राहत्या घराचा पत्ता विचारून घेतला गेला.

त्यानंतर मात्र सारे काही कल्पनातीत सुरळीतपणे घडत गेले. कार्यशाळा सकाळीच सुरू होत असल्यामुळे आदल्या दिवशी दुपारी पुण्याहून निघून संध्याकाळी नाशिकला पोचणा-या वाहनामध्ये मला जागा दिली होती. दुपारी दीडच्या सुमाराला मला घेण्यासाठी ते वाहन आमच्या घराकडे येईल असे त्या कार्यकर्त्याने मला सांगितले आणि मी सुध्दा त्या वेळी प्रवासासाठी तय्यार होऊन बसलो असेन असे त्याला सांगितले.
तो दिवस नेहमीसारखाच उजाडला, पण अलकाची तब्येत ठीक दिसत नव्हती. दहा साडेदहाच्या सुमाराला तिला डॉक्टरांकडे नेले. तिचा रक्तदाब बराच वाढला असल्याचे निदान त्यांनी केले आणि तिला संपूर्ण विश्रांती घ्यायला सांगितले. माझी दुविधा मनःस्थिती झाली. नाशिकला जायचे की नाही हे ठरवता येत नव्हते. इतकी खटपट करून माझी जाण्यायेण्याराहण्याची व्यवस्था करून घेतल्यानंतर आता नाही म्हणणे मला बरे वाटत नव्हते. नोकरीत असतांना मी अशा वेळी एकाद्या चांगल्या सहका-याला पाठवून दिले असते, इथे आयत्या वेळी कोणतीही पर्यायी व्यवस्था करणे शक्यच नव्हते. शिवाय माझ्या मनातही इतर वक्त्यांची व्याख्याने ऐकण्याची इच्छा होतीच. दोन अडीच तासात अलकाला थोडे बरे वाटायला लागले. जवळच रहात असलेल्या एका पोक्त नातेवाइकांनी दिवसभर तिच्यासोबत राहण्याची तयारी दाखवली आणि मला निश्चिंत मनाने नाशिकला जायला सांगितले. मी आपली बॅग भरायला घेतली. दोन दिवसांचे कपडे आणि इतर आवश्यक गोष्टी बॅगेत कोंबेपर्यंत गाडी येत असल्याची सूचना आलीच. इतर सहप्रवासी आणि कार्यशाळेसाठी नेण्याचे साहित्य घेऊन नाशिकसाठी प्रस्थान केले आणि सुखरूपपणे तिथे जाऊन पोचलो.

माझ्या रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था केलेली होतीच. प्रख्यात संगणकतज्ज्ञ आणि वैज्ञानिक डॉ.विजय भटकर हे मुख्य पाहुणे आधीच येऊन पोचले होते. त्यांच्याशी माझी ओळख करून देण्यात आली. जेवणाच्या वेळी पंगतीला त्यांच्या बाजूला बसण्याचा मान आणि संधी मिळाली. इतरही अनेक सन्माननीय पाहुणे आणि यजमान मंडळी त्या खान्याला उपस्थित होती. जेवण तसे पाहता साधेच पण सात्विक व रुचकर होते. त्यात दिखाऊ बडेजावाचा भाग नव्हता, तसेच कोणाच्याही वागण्यात आढ्यता नव्हती. मनमोकळ्या गप्पागोष्टींनी भोजन रंगत गेले.. . . . . . . (क्रमशः)

Thursday, February 16, 2012

माधवन नायरदुसरे महायुध्द चालले असतांना मुंबईच्या रक्षणासाठी किंवा इथे बंडाळी झाली तर ती मोडून काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने फौजेच्या काही तुकड्या तैनात केल्या होत्या आणि त्यांच्या राहण्यासाठी राहुट्या बांधल्या होत्या. बांद्र्याच्या बँडस्टँडजवळ अरबी समुद्रात घुसलेल्या जमीनीच्या एका लहानशा सुळक्यावर अशीच एक तात्पुरती छावणी उभारली होती. युध्द संपल्यानंतरही त्या झोपड्या (निसान हट्स) रिकाम्या पडलेल्या होत्या. अणुशक्ती विभागात प्रशिक्षण घेण्यासाठी येणा-या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यात केली गेली.

प्रशिक्षण प्रशालेमध्ये (ट्रेनिंग स्कूल) माझी निवड झाल्यावर मीही तिथे रहायला गेलो. आमच्या बॅचमध्ये काश्मीर ते केरळ आणि गुजरात ते आसामपर्यंत पसरलेल्या भारताच्या सर्व भागांमधून मुले आली होती. हजर होऊन नेमणूक पत्र आणि प्रमाणपत्रे वगैरे दाखवली की लगेच खोलीचा क्रमांक मिळत असे. ते आधीपासून ठरवले होते की क्रमानुसार जो जो येत गेला त्याला त्याला देत होते वगैरेची काही चौकशी न करता मिळालेल्या खोलीत मी जाऊन आपले सामान ठेवले. माझा सहरहिवासी (रूममेट) बंगाली होता. आजूबाजूच्या इतर खोल्यांमधूनसुध्दा निरनिराळ्या राज्यातून आलेल्या आणि निरनिराळ्या भाषा बोलणा-या मुलांच्याच जोड्या तयार झाल्या होत्या. मात्र आमच्या शेजारच्या एका खोलीत दोन्ही केरळीय मुले होती. ती थेट केरळपासून एकमेकांसोबत येऊन एकत्रच दाखल झाल्यामुळे आपोआप एका खोलीत आली होती की त्यांनी त्यासाठी मुद्दाम प्रयत्न केले होते कोण जाणे. त्या काळातले आमचे प्राचार्य केरळीय होते आणि त्या काळात मुंबईत सगळीकडेच मोठ्या संख्येने मल्याळी स्टेनो असायचे, तसे ते ट्रेनिंग स्कूलमध्येही असावेत. त्यामुळे कदाचित त्यांची मदत झाली असेल असे बोलले जात होते.
मराठी आणि कानडी या दोन भाषा मी लहानपणी घरातच शिकलो होतो, शालेय शिक्षणात हिंदी व इंग्रजी आल्या, सायन्स कॉलेजात असतांना मुख्यत्वे गुजराथी भाषिकांचा भरणा असलेल्या हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे ती भाषा अवगत झाली होती. इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये काही पंजाबी मुले होती, काही तामीळ किंवा तेलुगूभाषीसुध्दा होती. सत्यजित रे, मृणाल सेन वगैरेंचे बंगाली सिनेमे पाहणे ही त्या काळातली फॅशन असल्यामुळे त्या भाषेतले शब्द कानावर पडत होते. या सगळ्या भाषा समजत नसल्या तरी मला त्या ओळखता येत होत्या. मल्याळी भाषा मात्र मी पहिल्यांदा ऐकत होतो. आमच्या केरळी शेजा-यांकडे नेहमी त्यांचे आणखी काही मित्र येत आणि त्यांचे वाद, विवाद, संवाद वगैरे जोरजोराने चालत असे. लयबद्ध आणि सुरांना हेलकावे देत बोलली जाणारी ही भाषा ऐकायला मजेदार वाटत होती.

त्या दोघांपैकी उन्नीकृष्णकार्ता मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या म्हणजे माझ्याच वर्गात होता आणि दुसरा माधवन नायर इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये होता. दोन्ही वर्गांना काही समाईक विषय होते, त्या क्लासला आम्ही एकत्र बसत असू. त्या काळात भारतात फारशी कारखानदारी नसल्यामुळे इंजिनियरांना कमी मागणी होती. परदेशी जाणे फार कठीण होते. अणुशक्तीखात्याचे जबरदस्त आकर्षण असल्यामुळे हजारोंनी अर्ज येत असत. त्यांच्यामधून निवडले गेलेले आमचे बहुतेक सगळेच ट्रेनी ए प्लस दर्जाचे होते. तरीसुध्दा प्रशिक्षण सुरू असतांना दर आठवड्यात होणा-या परीक्षांमध्ये त्यांना मिळणा-या मार्कांत खूप तफावत दिसत असे. फारच कमी गुण मिळवणा-या मुलांना एकादी ताकीद देऊन काढून टाकले जात असे. काही मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे असे किंवा ही नोकरी करण्याची इच्छा नसे. बाँडमधून सुटका करून घेण्यासाठी अशी मुले मुद्दाम नापास होत असत. उन्नी आणि नायर हे दोघेही टॉप रँकिंगमध्येही येत नसत किंवा तळाशी जात नसत. वर्गाच्या सरासरीच्या जवळपास असत. ते दोघेही बोलण्यात स्मार्ट होते, पण अभ्यासावर फार जास्त मेहनत करण्याची त्यांना गरज वाटत नसावी.

ट्रेनिंग संपल्यावर प्रशिक्षणार्थींनी नियुक्तीसाठी विभाग निवडायचा असे आणि गुणवत्तेनुसार जो उपलब्ध असेल तो दिला जात असे. त्या वेळी तारापूर आणि रावतभाटा येथे अणुऊर्जाकेंद्रांच्या उभारणीचे काम सुरू झाले होते आणि त्यांचे बरेचसे काम मुंबईच्या हेडऑफीसमधून केले जात असे. प्रकल्पाच्या जागी किंवा मुख्य कार्यालयात नेमणूक होण्याची प्रत्येकाला इच्छा असे. थुंबा इक्विटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशन नावाची अणुशक्ती खात्याची एक लहानशी शाखा केरळमधील थुंबा नावाच्या गावात स्थापन होत होती. तिथे नेमके काय काम आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. टेलीव्हिजन नसल्यामुळे वर्तमानपत्रे हाच माहिती मिळण्याचा एकमेव स्त्रोत होता आणि अग्निबाण, कृत्रिम उपग्रह वगैरेबद्दल कोणालाच विशेष माहिती नव्हती. अमेरिका, रशीया वगैरे देशातच असले काही काम चालते असे कधीतरी छापून आले तर आले. भारताकडे असल्या गोष्टी नव्हत्या. गरम वायूने भरलेले फुगे आभाळात उडवून विरळ वातावरणाचा अभ्यास करणे अशा प्रकारचे संशोधन त्या काळी थुंबा येथे चालते असे ऐकीवात होते. त्यामुळे कोणताही इंजिनियर तिथे जाण्यासाठी उत्सुक नव्हता. आमच्या केरळी मित्रांना काही खास माहिती समजली होती का हे माहीत नाही, पण घराशेजारी राहता येईल या उद्देशाने त्यांनी तिथे पोस्टिंग मागून घेतले. त्या काळात कोकण रेल्वे नव्हती आणि मुंबईहून केरळला जाणारी थेट रेल्वे गाडीसुध्दा नव्हती. मद्रास (चेन्नाई) मार्गे जावे लागत असे आणि चांगले दोन तीन दिवस प्रवासात जात. त्यामुळे त्यांना नोकरीसाठीच केरळला जाण्याचे किती आकर्षण वाटत असेल हे समजण्यासारखे होते.

त्यानंतरच्या काळात परिस्थिती आश्चर्यकारक झपाट्याने बदलत गेली. भारत सरकारचा स्वतंत्र अवकाश विभाग (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) स्थापन झाला. स्पेस कमिशन अस्तित्वात आले आणि प्रचंड वेगाने त्याचा विस्तार झाला. माझे दोन्ही मित्र त्या विभागातल्या पहिल्या वहिल्या मोजक्या अधिकारीवर्गात असल्यामुळे जसजसा त्यांच्या खात्याचा विस्तार होत गेला तसतशी त्यांना एकाहून एक चांगली अधिकारीपदे मिळत गेली. अणुशक्ती खात्यात आम्ही रुजू होण्यापूर्वीच हजारावर माणसे होती. आम्हाला त्यांच्या मागेमागे राहूनच प्रवास करायचा होता. त्यांच्यातले जे लोक होमी भाभांच्या काळापासून होते त्यांचीसुध्दा अशीच झपाट्याने प्रगती होत गेली होती असे फक्त ऐकले होते. आम्हाला ती संधी मिळण्याची शक्यता नव्हती. तिकडे विक्रम साराभाई आणि सतीश धवन यांच्या अधिपत्याखाली नव्या अवकाश विभागाचा पाया घातला गेला आणि अब्दुल कलामसारख्यांचे सारथ्य मिळाल्यावर त्या इवल्याशा रोपाचा वेलू गगनावरी गेला. त्याबरोबर त्या वृक्षांच्या शीर्षस्थानावर असलेल्या व्यक्तींची उंची देखील वाढत गेली.

डिपार्टमेंट ऑफ स्पेस निराळे झाल्यानंतर आमचा त्याच्याशी कसलाही संपर्क राहिला नाही आणि तिकडे काय चालले आहे याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. आमची नोकरी सुरू झाल्यानंतर पंधरासोळा वर्षांनी तिस-याच एका कारखान्यात अचानकपणे उन्नीकृष्णकार्ता भेटला. त्या वेळी मी माझ्या तिस-या बढतीची अजून अपेक्षा करत होतो. उन्नी आणि माधवन दोघांनाही चार चार प्रमोशन्स मिळून गेल्याचे त्याच्याकडून कळले आणि चाटच पडलो. माधवन तर एका संस्थेचा डायरेक्टर झाला होता असे त्याच्याकडून समजले. त्यांच्या प्रगतीच्या मार्गात तेच सर्वात पुढे असल्यामुळे जितक्या वेगाने त्यांना धावणे शक्य होते त्यानुसार तिचा वेग त्यांनीच ठरवायचा होता. या बाबतीत माधवनने आघाडी घेतली आणि सातत्याने ती सांभाळली. इस्रो आणि स्पेस कमिशनच्या अध्यक्षपदापर्यंत तो जाऊन पोचला आणि पद्मविभूषण पुरस्काराचा सन्मानही त्याला मिळाला. प्रशिक्षणाच्या काळात आमच्या शेजारच्या झोपडीत रहात असलेला हा आमच्यातलाच काहीसा अबोल आणि सामान्य वाटणारा मुलगा पुढे इतकी उंच भरारी घेणार आहे असे तेंव्हा कोणालाही वाटले नव्हते.

माधवन स्पेस कमिशनचा अध्यक्ष असतांनाच चंद्रयानाचे यशस्वी उड्डाण झाल्याने तो प्रखर अशा प्रकाशाच्या झोतात आला. त्याच्या सचित्र मुलाखती वर्तमानपत्रात आणि टेलीव्हिजनवर झळकू लागल्या. इतर व्हीआयपीजप्रमाणे तोसुध्दा जागोजागी व्याख्याने देऊ लागला, बक्षिससमारंभांमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून दिसू लागला. त्याचा उल्लेख ज्येष्ठ शास्त्रज्ञ असा होऊ लागला. हे वाचतांना गंमत वाटत असे आणि अभिमानसुध्दा वाटत असे.

काही दिवसांपूर्वी त्याचाही उल्लेख एका घोटाळ्याच्या संदर्भात आला. मग त्यावर त्याची आणि त्याच्यावर आरोप करणा-याची प्रतिक्रिया आली. त्या घोटाळ्याचे स्वरूप नीटपणे समजलेही नाही. त्यात अनियमितता दिसत असली तरी त्यामुळे कोणाला किती लाभ झाला असे काही छापून आले नाही. एका कंपनीबरोबर काही करार झाला होता, पण त्याची अंमलबजावणी न होताच तो रद्दबातल करण्यात आला असे काहीसे झाले असावे. स्पेस कमिशनच्या कारभारात सरकारी लाल फितीला अर्धचंद्र दिला आहे, निर्णयाची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक केली आहे असे ऐकले होते. त्यांचे उदाहरण इतरांना दिले जात होते. त्या फास्ट ट्रॅक प्रक्रियेमध्ये कदाचित काही रूढ पध्दतींना फाटा दिला असेल आणि हेच नडले असेल अशीही शक्यता आहे. याबद्दल कसलीच माहिती नसल्यामुळे तर्क करण्यात अर्थ नाही. पण माधवनचा वर वर जात असलेला पतंग एका झटक्यात खाली कोसळला याचे वाईट वाटले. सरकारी कारभाराबद्दल तितकेसे चांगले जनमत नसले तरी अवकाश खात्याची प्रतिमा उज्ज्वल होती, ती मलीन झाल्याचे जास्तच खटकले.

Monday, February 13, 2012

तेथे कर माझे जुळती - १० श्री.दा.रा.खडके

एकोणीसशे सत्तरच्या सुमाराला देवनारजवळ अणुशक्तीनगर या वसाहतीची उभारणी सुरू झाली, तसेच मुंबई दूरदर्शनच्या प्रसारणाला सुरुवात झाली आणि अस्मादिकांचे शुभमंगल झाले. माझ्या जीवनावर सखोल प्रभाव करणा-या या तीन्ही गोष्टींचा एकमेकींशी काहीही संबंध नसला तरी त्यांचे जे एकत्रित चांगले परिणाम झाले त्यातूनच श्री.डी.आर.खडके या अफलातून गृहस्थाशी माझा परिचय झाला. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ख्याल गायकीची विलंबित लयीमधील आलापांमधून होणारी सुरुवात नवख्यांसाठी कंटाळवाणी असते. त्यामुळे लग्नाच्या आधी मी सहसा त्या संगीताच्या वाटेला जात नसे. पण अलकाला संगीताची उपजतच विलक्षण आवड असल्यामुळे तिला शास्त्रीय संगीताचे जबरदस्त आकर्षण वाटते. मुंबई दूरदर्शनाच्या सुरुवातीच्या काळात पं.विजय राघव राव आणि सुहासिनी मुळगावकर हे निर्माते शास्त्रीय संगीताचे उत्तमोत्तम कार्यक्रम अत्यंत मनोरंजक पध्दतीने सादर करीत असत. ते सारे कार्यक्रम अलका न चुकता आणि तल्लीन होऊन पहात असे. त्यामुळे मलासुध्दा सूर, ताल, लय, राग वगैरेंची थोडी समज आली आणि शास्त्रीय संगीत ऐकण्यात गोडी निर्माण झाली. अणुशक्तीनगरमध्ये आम्ही रहायला गेलो त्या काळात के.एस.सोनी नावाचे एक सद्गृहस्थ तिथे रहात होते. त्यांनी स्वतःला शास्त्रीय संगीताच्या प्रसाराला वाहून घेतले होते. त्यात रुचि असणा-या लोकांना त्यांनी घरोघरी जाऊन शोधून काढले आणि त्यांना एकत्र आणून स्वरमंडल नावाची सार्वजनिक संस्था सुरू केली. थोडासा निधी गोळा करून आधी स्वतःच्या घरी आणि नंतर शाळेच्या हॉलमध्ये उदयोन्मुख गायक वादकांचे कार्यक्रम ठेवले. प्रतिष्ठित मंडळींना या कार्यक्रमाला आमंत्रित केले. एक उत्साही तरुण कार्यकर्ता म्हणून मी ही संगीताव्यतिरिक्त इतर किरकोळ कामे करून त्यात सहभाग घेत असे. अशाच एका कार्यक्रमात श्री.खडके हे सन्मान्य अतिथी म्हणून आले असतांना माझी त्यांच्याशी भेट झाली. ते एक रिटायर झालेले सी.आय.डी.चे मोठे अधिकारी आहेत आणि आता संगीताच्या क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे एवढेच तेंव्हा समजले होते.

त्या काळातले नाट्यसंगीतामधले सुपरस्टार श्री.रामदास कामत हे सुध्दा पोलिस अधिकारी असल्याचे ऐकले होते. रंगभूमीवर मत्स्यगंधेला "नको विसरू संकेत मीलनाचा" असे म्हणत तिची आर्जवे करणे आणि "रेडच्या टायमाला फोर्स घेऊन तिथं पोचायचंच" असे हाताखालच्या अधिका-याला दरडावून सांगणे या दोन्ही गोष्टी ते करत असत. श्री.खडके यांचे नाव मात्र मी संगीत किंवा नाटकाच्या कार्यक्रमात किंवा टीव्हीवर कुठेच ऐकले नव्हते. कॉलेजचे शिक्षण घेत असतांना त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला होता, पण पोलिसखात्यात रुजू झाल्यानंतर सर्व लक्ष तिकडेच पुरवले. अनेक उत्तमोत्तम कामगि-या यशस्वी रीतीने बजावून पदोन्नती तसेच पदके मिळवली. त्यात इंडियन पोलिस पदक आणि राष्ट्रपती पदक यांचा समावेश आहे. खुद्द माननीय यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी  यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
नोकरीच्या काळात संगीताची श्रवणभक्तीच करणे त्यांना शक्य होते, पण सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सारी कसर भरून काढली. पं.वामनराव सडोलीकर या जयपूर घराण्याच्या सुप्रसिध्द गायकांचे शिष्य होऊन बावीस वर्षे त्यांचे मार्गदर्शन घेतले. शंभर दीडशे श्रोत्यांसमोर शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम व्यवस्थितपणे सादर केला. पण गायक म्हणून मैफल गाजवणे हा त्यांचा उद्देश नव्हताच. शास्त्रीय संगीताचा स्वर्गीय आनंद स्वतः मिळवणे आणि अधिकाधिक लोकांना तो मिळवून देणे हे त्यांनी आपले जीवितकार्य ठरवले होते. चेंबूर येथील त्यांच्या राहत्या घराचा दिवाणखाना त्यांनी या कामासाठी उपयोगाला दिला. दर बुधवारी संध्याकाळी तिथे एक बैठक होत असे. कोणत्याही गायक किंवा वादकाने यावे आणि आपला कार्यक्रम त्यात सादर करावा अशी मुभा होती. असंख्य नवोदित कलाकारांना यामुळे एक मंच मिळाला. त्याशिवाय दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एकाद्या मुरलेल्या कलाकाराला ते आमंत्रित करत असत आणि त्यांच्या गायन वादनाचा आस्वाद रसिक श्रोत्यांना घेता येत असे. हे सर्व पूर्णपणे निःशुल्क असे. कलाकाराला किंवा श्रोत्याला त्यासाठी मूल्य देण्याची आवश्यकता नसे.
जयपूर अत्रौली घराण्याचे मूळ पुरुष पै.अल्लादियाखाँ यांच्या पुण्यतिथीनिमित्य एक संगीत सभा भरवण्याचे खडके काकांनी १९७६ साली ठरवले आणि आतापर्यंत ३६ वर्षे हा उत्सव चालवला. सुरुवातीच्या काळात पं.वामनराव सडोलीकर आणि त्यांच्या कन्यका श्रुति यांच्या मुख्य आधारावर हा कार्यक्रम चालत असे. खडके काका दरवाज्यापाशी एका खुर्चीत बसून येणा-यांचे आगत स्वागत करताहेत आणि मंचावरील सर्व व्यवस्था, आयोजन, निवेदन वगैरे बाजू श्रुति समर्थपणे सांभाळते आहे असेच चित्र अनेक वर्षे मी पहात होतो. स्व.वामनराव आणि श्रुति यांचे गायन हा या उत्सवातला एक परमोच्च बिंदू असे. पुढे श्रुति सडोलीकर काटकर हिने संगीताच्या क्षेत्रात स्वतःचे असे खास आणि उच्च स्थान निर्माण केल्यानंतर तिला इतर कामांसाठी वेळ मिळणे कठीण होत गेले असणार. हळूहळू ती अदृष्य होत गेली. चेंबूर येथील बालविकास संघाच्या हॉलमध्ये गुढी पाडवा किंवा गुड फ्रायडे या सुमारास हा कार्यक्रम होत आला आहे. पहिली कित्येक वर्षे तो सलग चोवीस तास चालायचा. त्यामुळे दिवसाच्या आठही प्रहरांमधील रागांचा समावेश त्यात होत असे. कालांतराने सरकारी नियमांप्रमाणे तो वेळेत संपवणे आवश्यक झाले. हल्ली तो तीन दिवस संध्याकाळी आणि अखेरच्या (रविवारच्या) दिवशी सकाळी असा चार दिवस असतो. स्व.भीमसेन जोशी, स्व.कुमार गंधर्व, स्व.मल्लिकार्जुन मनसूर, स्व.गंगूबाई हंगल, पं.जसराज, श्रीमती किशोरी आमोणकर, श्री.यशवंत देव यासारख्या बहुतेक सर्व आजी माजी मोठ्या कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. हा कार्यक्रमसुध्दा विनामूल्य असतो. श्रोत्यांनी स्वेच्छा दिलेल्या देणग्या स्वीकारण्याची व्यवस्था असते. त्यातूनच पुरेसा निधी बहुधा जमत असावा. या समारंभातले कार्यक्रम इतक्या उच्च दर्जाचे असतात की ते ऐकल्यानंतर कोणाचाही हात खिशात जावा आणि सढळ हाताने देणगी दिली जावी असे होते. ज्या मोठ्या नामवंत कलाकारांना टाटा थिएटर किंवा नेहरू सेंटरसारख्या ठिकाणी खूप दुरून पहावे लागत असे अशा दिग्गजांच्या अगदी पुढ्यात बसून त्यांचे गायन ऐकण्याची संधी या महोत्सवात मिळाली.

दर वर्षी होणा-या अल्लादियाखाँ संगीत समारोहामध्ये श्री.खडके यांचे थोडा वेळ भाषण असे. श्रेष्ट भारतीय संगीत, महान संगीतकार, त्यांचे गुरू, कार्यक्रमात भाग घेणारे कलाकार, रसिक श्रोते वगैरेंचे गुणगान करून झाल्यानंतर ते आपले मनोगत व्यक्त करत असत. आता आपले वय झाल्यामुळे तरुण लोकांनी पुढे येऊन या कार्यक्रमाची धुरा सांभाळावी असे आवाहन त्यात असे. हे मी निदान वीस पंचवीस वर्षांपासून ऐकत आलो आहे. पण त्या काळापासूनसुध्दा सगळे तत्कालीन तरुण लोक आपल्या उदरनिर्वाहाच्या कामातच इतके गुरफटलेले असायचे की त्यांच्या प्रापंचिक कामासाठीसुध्दा वेळ काढणे त्यांना कठीण व्हायचे. उतार वयाकडे झुकलेले अनेक लोक सहाय्य करतांना दिसत, पण ते दीर्घ काळ टिकत नसावेत. खडके काकांच्या अपेक्षांची पूर्ती करणे सोपे नसणार. या समारोहाची कायम स्वरूपाची काही व्यवस्था खडके काका करू शकले की नाही याबद्दल संदिग्धताच राहिली.

त्यांनी वयाची नव्वद वर्षे पूर्ण केली त्यावेळी त्यांचा सातारा या त्यांच्या गावी जाहीर सत्कार केला गेला होता, त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी त्यांच्या लहानपणात घडलेल्या अनेक गोष्टींबद्दल सविस्तर सांगितले होते. अखेरपर्यंत त्यांची स्मरणशक्ती चांगली होती. नोकरी आणि कार्य या निमित्याने असंख्य माणसे त्यांच्या सहवासात आली असतील. तरीही समोरच्या माणसाची ओळख पटताच ते त्याच्याशी सुसंगत असे बोलत असत. काही महिन्यांपूर्वीच माझ्या एका मित्राच्या घरी झालेल्या संगीताच्या बैठकीला ते आले होते. वयोमानानुसार आलेला अशक्तपणा आणि मंद झालेली दृष्टी यामुळे कोणाच्या आधाराची शारीरीक गरज त्यांना भासत होती, पण त्या जोरावर ते हिंडत फिरत होते, तसेच सर्वांबरोबर बोलत होते. मागल्या वर्षीपर्यंत ते अल्लादियाखाँ पुण्यतिथी समारंभात उपस्थित होऊन शक्य तेवढा सहभाग घेतच होते. त्यामुळे ते शऱदांचे शतक झळकवणार असे वाटले होते. पण तसे झाले नाही. ते आम्हाला सोडून गेल्याची बातमी अचानक येऊन थडकली. त्यांच्या स्मृतीला शतशः प्रणाम.

Thursday, February 02, 2012

मदत

आजकाल आपण आपली बहुतेक सगळी महत्वाची कामे कोणा ना कोणाच्या सहाय्याने करत असतो. इतर लोकांनी त्यांची स्वतःची गरज, कर्तव्य किंवा त्यांना मिळणारा लाभ वगैरे गोष्टी पाहून आपल्याला सहाय्य करणे काही वेळा अपेक्षितच असते, त्यामुळे त्याचे विशेष वाटतही नाही. आधी आवळा देऊन पुढे कोहळा काढायचा किंवा परोपकार करून पुण्यसंचय आणि पापक्षालन करायचा हेतू काही लोकांच्या मनात असतो. कोणालाही मदत करतांना त्या माणसाचा आपल्याला काही उपयोग आहे का असा विचार बहुतेक लोक करतात. तशा प्रकारे केलेली मदत ही एका प्रकारची गुंतवणूक (इन्व्हेस्टमेंट) असते, त्यातून पुढे मागे काही फायदा मिळण्याची शक्यता असते. एकाद्या माणसाने केलेल्या मदतीची लगेच दुस-या रूपात परतफेड मागितली तर तो सौदा ठरतो. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन निव्वळ माणुसकीच्य़ा भावनेनेसुध्दा इतरांना मदत करणारेसुध्दा अनेक लोक आढळतात. किंबहुना सगळेच लोक ते करत असतात. आपण दुस-याला मदत केली, तर तो तिस-याला, तो चौथ्याला अशी साखळी निर्माण होऊन एक चांगले सामाजिक वातावरण निर्माण होते आणि वेळप्रसंगी त्याचा आपल्यालासुध्दा फायदा होतो अशी मनोधारणा त्याच्या मागे असते. हे माणसांच्या अंतःप्रेरणेमधून घडते की त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळे याबद्दल नक्की सांगता येणार नाही. पण त्यामुळे त्यांना जमेल तेवढे ते दुस-यांच्यासाठी करत असतात. सहाय्य किंवा मदत या शब्दांचा आर्थिक आधार असा संकुचित अर्थ यात अभिप्रेत नाही. इतर अगणित प्रकारे आपण इतरांच्या उपयोगी पडू शकतो आणि पडतही असतो. दुस-याच्या कामाला हातभार लावणे, त्याला आवश्यक किंवा महत्वाची माहिती देणे, न समजलेले समजावून सांगणे वगैरेंपासून त्याला फक्त सोबत करणे किंवा त्याचे बोलणे ऐकून घेऊन त्याला आपले मन मोकळे करून देणे अशासारख्या लहान लहान गोष्टींची त्याला मदत होते.

व्यक्तीगत जीवन आणि व्यावसायिक जीवन यांना वेगळे ठेवावे आणि एकाचा उपसर्ग दुस-याला होऊ देवू नये असे बिझिनेस स्कूल्समध्ये शिकवले जाते. आपली व्यक्तीगत सुखदुःखे, राग, लोभ, चिंता वगैरेंचा परिणाम व्यावसायिक जीवनात घेतल्या जाणा-या निर्णयांवर होता कामा नये आणि ते घेतांना दया-माया, प्रेम-द्वेष वगैरेंना थारा न देता वस्तुनिष्ट विचार करायचा असतो. अर्थातच कामाच्या निमित्याने भेटणा-या माणसांशी कामापुरतेच संबंध ठेवायचे असतात. त्यांच्यात गुंतायचे नसते. पण प्रत्यक्षात मनाचे दरवाजे असे पाहिजे तेंव्हा उघडता किंवा मिटता येत नाहीत. निदान मला तरी तसे जमले नाही. ऑफीसात इतर चकाट्या पिटायच्या नाहीत हे पथ्य जरी मी कसोशीने पाळायचा प्रयत्न केला असला तरी न बोलून दाखवता सुध्दा आपुलकीचे बंध निर्माण होतच राहिले आणि निरोपसमारंभाच्या भाषणानंतर ते काही एकदम तुटले नाहीत. पूर्वी रोज भेटणारी माणसे भेटण्याची जागाच त्यानंतर राहिली नाही आणि एकंदरीतच त्यांच्या भेटीगाठी कमी कमी होत गेल्या, तसतसे ते बंध विरत गेले. माझ्या आधीपासून ऑफीसात असलेले ज्येष्ठ सहकारी तर आधीच सेवा निवृत्त झाले होते, माझ्या बरोबरीचे तसेच कनिष्ठ सहकारीसुध्दा एक एक करून निवृत्त झाले. माझ्याबरोबर प्रत्यक्ष काम करणारे कोणीच शिल्लक उरले नव्हते. त्यांच्या पुढच्या पिढीकडे सारी सूत्रे गेली होती आणि माझा त्यांच्याशी कधीच थेट संपर्क जुळला नव्हता. आमच्या बरोबर एका वसाहतीमध्ये राहणारे लोक पांगत गेले होते, कोणी दूरच्या उपनगरात रहायला गेले, कोणी परगावी किंवा परदेशी गेले आणि काही परलोकवासी झाले. टेलीफोन आणि इंटरनेटमुळे संपर्क साधणे शक्य असूनसुध्दा सगळेच जण संपर्कात राहिले नाहीत. जे ऑफीसात होत होते तेच काही प्रमाणात व्यक्तीगत जीवनातसुध्दा घडत गेले. मागली पिढी काळाआड गेली, पुढच्या पिढीमधील अनेक मंडळी परप्रांतात किंवा परदेशात चालली गेली आणि मुंबईत राहणा-या निकटच्या आप्तांची संख्या रोडावत गेली.

मागच्या आठवड्यात अलकाला बरे वाटत नव्हते म्हणून आमच्या इस्पितळाच्या बाह्यरुग्ण विभागात घेऊन गेलो. काही तपासणी करून झाल्यावर तिला उपचारासाठी अतिदक्षताविभागात (आयसीयू मध्ये) दाखल करावे लागले. पूर्वी केलेल्या काही चांचण्यांचे रिपोर्ट्स डॉक्टरांना हवे होते, पण ते घरी ठेवलेले होते. घरी जाऊन ते घेऊन येण्यासाठी निदान दोन तास वेळ लागला असता, पण आयसीयू मध्ये पेशंट असला तर त्याच्या जवळच्या आप्ताने बाहेर थांबणेही आवश्यक असते. या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा घालायचा? आमच्या घरात त्यावेळी तिसरे कोणी नव्हतेच. बोलावल्याबरोबर पटकन येऊ शकेल असे जवळ राहणारेही कोणी नव्हते. त्यामुळे जवळ राहणा-या अलकाच्या दोन मैत्रिणींना विचारले. त्या तयार झाल्या आणि त्यातली एक लगेच धावत आली. तिच्याशी बोलून मी घरी जायच्या तयारीत होतो, तेवढ्यात दुरूनच मला पाहून एक जुना मित्र प्रसाद तिथे आला. तोसुध्दा नुकताच निवृत्त होऊन खारघरला रहायला गेला होता, शिवाय त्याची नव्वदीला आलेली आई त्याच्याकडे असल्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी तिच्यासोबत राहणे त्याला आवश्यक होते. त्यामुळे इच्छा असूनसुध्दा मला मदत करणे त्या वेळी त्याला शक्य नव्हते.

"रात्री काय करणार आहेस?" या त्याच्या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हते. दिवसभराच्या दगदगीनंतर मीसुध्दा थकून गेलो होतो आणि रात्रभर थांबून राहण्याएवढे त्राण आणणे मला कठीण होते. पण रिपोर्ट्स आणून दिल्यानंतरच मी त्यासाठी काही करू शकत होतो, ते सुध्दा हॉस्पिटलमध्येच राहून फोनवरच करायला हवे होते, त्यासाठी कोणाला जाऊन प्रत्यक्ष भेटणेही मला शक्य नव्हते. "तोपर्यंत मी थोडे प्रयत्न करतो" असे सांगून प्रसाद त्याच्या घराकडे गेला. तो नुकताच सेवानिवृत्त झालेला असल्यामुळे या वेळी ऑफीसात कोणत्या हुद्द्यावर कोण आहे हे त्याला ठाऊक होते. एक दोघांशी फोनवरच बोलून मला मदत हवी असल्याचे त्याने त्या मित्रांना सांगितले.
रिपोर्ट्स घेऊन मी हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत भरत, जयपाल आणि त्यागी तिथे हजर होते आणि माझी वाट पहात उभे होते. तीघेही मला दहा ते पंधरा वर्षांनी कनिष्ठ असल्यामुळे ते कधीच माझ्या थेट संपर्कात आले नसले तरी कामाची चर्चा करतांना त्यात सहभागी होत होते. तेवढ्या सहवासामध्ये त्यांनी जे काही अनुभवले असेल आणि त्यांच्या वरिष्ठांकडून माझ्याबद्दल जे ऐकले असेल तेवढाच आमच्यातला दुवा होता. पण त्यांनी अत्यंत आपुलकीने अलकाची आणि माझी विचारपूस केली आणि मला स्वतःला विश्रांती घेणेसुध्दा किती आवश्यक आहे हे सांगितले. हॉस्पिटलजवळच वसाहतीत राहणा-या एका आप्तांकडे मी जाऊन झोप घ्यायची आणि भरतच्या खात्यातला कोणी युवक येऊन त्याने रात्रभर माझ्याऐवजी हॉस्पिटलमध्ये राहायचे असे ठरले. अलकाची प्रकृती तशी ठीकच असल्यामुळे रात्री कसली गरज पडायची शक्यता नव्हतीच, पण तशी वेळ आलीच तर हॉस्पिटलमध्ये राहणारा मला लगेच बोलावून आणू शकत होता. भरत आणि त्याच्या साथीदारांनी तिथल्या तिथे एकमेकांशी बोलून नितिनकुमारची निवड केली आणि त्याला बोलावून घेतले. मी सेवा निवृत्त होऊन गेल्यानंतर तो नोकरीला लागला होता. त्यामुळे आम्ही कधी एकमेकांना पाहिलेसुध्दा नव्हते. पण भरतने सांगताच यत्किंचित कुरकुर न करता किंवा आढेवेढे न घेता यावेळी तो माझ्या मदतीला आला. आम्ही दोघांनी एकमेकांचे मोबाईल फोन नंबर घेतले आणि हॉस्पिटलमध्ये भेटायची वेळ ठरवली.
ठरलेल्या वेळी नितिन तयारी करून आला आणि रात्रभर हॉस्पिटलमध्ये बसून राहिला. रात्रभर झोप झाल्याने ताजे तवाने होऊन सकाळी मी हॉस्पिटलला गेलो. नितिनचे आभार मानून त्याला मोकळे केले आणि घरी पाठवून दिले. पुढे दिवसभर मी हॉस्पिटलमध्ये राहिलो होतो, पण इतर कोणी कोणी मध्ये येऊन मला सोबत करत किंवा थोडा वेळ सुटी देत राहिले. पुण्याहून उदय यायला निघाला होता, पण त्याला काही अनपेक्षित अडचणी आल्या. तोपर्यंत दुसरी रात्र आली. भरत माझ्या संपर्कात होताच. त्याने दुस-या रात्रीची व्यवस्थासुध्दा केली. नितिनच्याच वयाचा, त्याच्याप्रमाणेच माझी ओळख नसलेला संदीप त्या रात्री आला आणि रात्रभर हॉस्पिटलमध्ये माझ्यासाठी बसून राहिला. तिसरे दिवशी सकाळी उदय येऊन पोचल्यानंतर आम्हाला बाहेरच्यांच्या मदतीची आवश्यकता उरली नाही.
पण जेंव्हा मला मदतीची आवश्यकता होती आणि ती कोठून मिळेल हे देखील ठाऊक नव्हते, तेंव्हा दोन अनोळखी तरुण पुढे आले आणि कसलाही आविर्भाव न आणता मला हवी असलेली मदत करून गेले हे विशेष!