प्रत्येक नाशवंत गोष्ट उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्थांमधून जाते. ब्रम्हा, विष्णू आणि महेश ही परमेश्वराची तीन रूपे या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे संपूर्ण नियंत्रण करतात अशी हिंदू धर्मीयांची मान्यता आहे. यातील स्थिती म्हणजेच सांभाळ करणे हे महत्वाचे कार्य विष्णूभगवान एरवी आपल्या वैकुंठामधील निवासस्थानी राहूनच करीत असतात. ते कार्य आपल्याआपणच व्यवस्थितपणे चालत रहावे यासाठी अगणित निसर्गनियम करून ठेवलेले आहेत. त्यानुसार कालचक्राचे रहाटगाडगे फिरत असते. तरीही कधीकधी परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर चालली आहे असे वाटल्यास श्रीविष्णू स्वतः पृथ्वीतलावर अवतरतात. "यदायदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम् ।।" असे भगवंतांनीच गीतेमध्ये सांगून ठेवले आहे. याच कारणासाठी त्याने दहा अवतार घेतले असे सांगतात.
पण खरे तर मुळात याची त्याला काय गरज होती? उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन्ही गोष्टीवर नियंत्रण ठेवणा-या परमात्म्याने आधी कुठल्याही दुरात्म्याला जन्मालाच घातले नाही, चुकून तो जन्माला आलाच तर त्याचे हृदयपरिवर्तन करून त्याला संधीसाधूऐवजी साधूसंत बनवले किंवा त्याला कुठल्या तरी आधीव्याधी किंवा अपघाताने त्वरित नष्ट करून टाकले तर जगातील सज्जनांना त्याचा त्रासच होणार नाही. त्याने मनात आणले असते तर कांहीही करणे जर त्याला शक्य होते तर समजा जेंव्हा सीतेचे हरण करायला रावण आला तेंव्हा त्याला उलट्या होऊ लागल्या असत्या किंवा द्यूत खेळायला आलेल्या दुर्योधनाला लकवा मारला असता तर पुढचे सगळे रामायण आणि महाभारत सहजपणे टळले असते आणि लक्षावधी कां कोट्यावधी निरपराध सैनिकांचे प्राण वाचले असते. पण देवाने असला सोपा मार्ग अवलंबिला नाही, त्याची तशी योजना नाही, रामायण आणि महाभारत घडायला त्याला हवेच होते. चांगले वाईट, सुष्ट दुष्ट वगैरेंचे सगळे प्रकार त्याच्या अनुमतीने या जगात उपस्थिती लावत असतात. त्यात जास्तच असंतुलन व्हायला लागते तेंव्हा तो अवतार घेऊन त्यात हस्तक्षेप करतो असे फार तर म्हणता येईल.
मुळात या जगात देव आहे किंवा नाही हा प्रश्न इथे अप्रस्तुत आहे. कारण तो नसेलच तर या लेखाचे प्रयोजन उरत नाही. तेंव्हा घटिकाभरायाठी तो आहे असे गृहीत धरू. तरीसुद्धा अमूर्त असा परमेश्वर जेंव्हा मूर्त अवतार घेऊन या जगात येतो तेंव्हा तो या विश्वाच्या निसर्गनियमांचे पालनसुद्धा कटाक्षाने करणारच अशी माझी श्रद्धा आहे. ते नियम तोडून अशक्यप्राय असे चमत्कार दाखवण्यासारखा रडीचा डाव खेळण्याची त्याला गरज नाही. पण दशावतारांच्या सर्व कथा सुरस आणि चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेल्या आहेत, त्यामुळे त्या प्रत्यक्षात तशा घडल्या असणे केवळ अशक्य आहे असे मला तरी वाटते. "आपले महान पूर्वज खोटे कशाला बोलतील? त्यांना खोटे म्हणणारा हा दीडशहाणा कोण?" वगैरे म्हणत लगेच माझ्या अंगावर धांवून यायचे कांही कारण नाही, कारण मी तसे कांही म्हणतच नाही. "मुलांनी दंगा करून घर डोक्यावर घेतलं किंवा अमकी गोष्ट शोधण्यासाठी मी घर पालथं घातलं" असं कोणी म्हंटलं तर ते खोटे बोलणे झाले कां? ते मराठी भाषेतले वाक्प्रचार आहेत. आपण जेंव्हा लहान मुलांना पंचतंत्र किंवा इसापनीतीमधील गोष्टी सांगतो तेंव्हा थापा मारणे हा आपला उद्देश असतो कां? त्या गोष्टींच्या निमित्ताने त्यातील तात्पर्य त्यांच्या मनावर बिंबवावे हा चांगला हेतू मनात धरून आपण त्या मनोरंजक काल्पनिक गोष्टी त्यांना सांगतो. अगदी तशाच प्रकारे सर्वसामान्य वकूबाच्या माणसाला समजतील आणि आवडतील अशा सुरस कथा रचून त्या पुराणादिक वाङ्मयामध्ये सांगितल्या गेल्या आहेत. ज्या काळात त्या रचल्या गेल्या त्या वेळी त्यांचा मतितार्थ सुद्धा सांगितला जात असेल पण तो काळाच्या उदरात लुप्त होऊन गेला आणि मनोरंजक चमंत्कृतीपूर्ण कथा तेवढ्या आजच्या पिढीपर्यंत येऊन पोचल्या असणार. मधल्या काळातील लोकांनी, विशेषतः अनुवाद करणा-यांनी त्यांची रंजकता वाढवण्याठी त्यात भरपूर तपशिलांचा मालमसाला मिसळला असणारच. तेंव्हा आपण आता जाणून बुजून त्यांचा शब्दशः अर्थ कशाला घ्यायचा?
त्यामागील अर्थ शोधण्याचे प्रयत्न झाले आहेतच. दशावतारांचा अनुक्रम आणि डार्विनचा उत्क्रांतीवाद यांच्यात एक विलक्षण साम्य आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी प्रथम पाण्यात निर्माण झाली असावी असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. मत्स्यावतार हा विष्णूचा पहिला अवतारसुद्धा जलचर आहे. त्यानंतरचा दुसरा कूर्मावतार हा पाण्यामधून निघून सरपटत जमीनीवर येणा-या कासवाचा आहे. त्यानंतर वराह हा अरण्यात राहणारा पशु आहे आणि नरसिंह हा अर्धा पशू आणि अर्धा मानव अशी मधली अवस्था आहे. वामनावतारापासून मानवाच्या विकासाला सुरुवात झाली. त्यामधील पहिला वामन हा एक बुटकासा लघुमानव आहे. त्यानंतर परशुराम हा सशक्त शूर योद्धा आहे पण तो परशूसारखे साधे आयुध धारण करतो. त्यानंतर आलेल्या रामाकडे अनेक प्रकारची अमोघ अस्त्रे तर आहेतच, त्याशिवाय आदर्श जीवनाचे वस्तुपाठ तो आपल्या वागण्यातून घालून देतो. त्यानंतरच्या कृष्णावतारात तर त्याने अनेक प्रकारच्या लीला दाखवल्या, दुष्टांचा संहार केला आणि किंकर्तव्यमूढ झालेल्या पार्थाला गीतोपदेश करून कर्तव्याचा मार्ग दाखवला. मनाचा व बुद्धीचा विकास शारीरिक बलापेक्षा उच्च दर्जाचा असतो हे त्यानंतरच्या बुद्धावतारात दाखवून दिलेले आहे. कदाचित आता यापुढे काय हा प्रश्न पडल्यामुळे कल्की अवताराबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसावी.
दशावतारांचा हा क्रम पाहूनसुद्धा लगेच "उत्क्रांतीचा सिद्धांत आमच्या द्रविणमहर्षींनी कधीच लावून ठेवला होता. पाश्चात्यांनी तो चोरून आपल्या नांवावर खपवला पहा." अशी बाष्कळ बडबड करण्याचे धैर्य मी करणार नाही. निसर्गामध्ये रोज घडत असलेला बदल पाहून त्यामागील उत्क्रांतीचे तत्व आपल्या ऋषीमुनींच्या लक्षात आले असणे सहज शक्य आहे. पण त्या सिद्धांताला पार पाताळात गाडून टाकून "विश्वाची उत्पत्ती करतांना परमेश्वराने सगळे कांही उत्कृष्ट निर्मिले होते. त्यानंतर प्रत्येक युगात अवनती होत होत आता घोर कलीयुगात जगाच्या अधःपाताची परमावधी झालेली आहे." अशी एक उफराटी समजूत मधल्या काळातील आपल्याच विद्वानांनी पिढ्यान पिढ्या आपल्या समाजाच्या मनावर बिंबवून ठेवली आहे ते कशामुळे झाले हा अवघड प्रश्न समोर येईल. दुसरी मनोरंजक गोष्ट अशी आहे की ख्रिस्ती धर्मगुरूंनासुद्धा डार्विनचा सिद्धांत अजून मान्य नाही. तेंव्हा या बाबतीत धर्म आणि विज्ञान यांची गल्लत न करणेच श्रेयस्कर ठरेल.
समाजात चाललेल्या घटना आणि त्यांच्या मागे असलेल्या प्रवृत्ती पाहतांना मला नेहमी कोणत्या ना कोणत्या अवताराचे रूप त्यात दडलेले दिसते. त्याचा अनुक्रम कालानुसार न लावता दर्जानुसार लावला तर आपल्याला त्यातही दशावतार दिसतील. ते दाखवण्याचा एक प्रयत्न या लेखात केला आहे. मोठा मासा छोट्या माशाला खातो आणि त्याच्यापेक्षा मोठा मासा त्याला गट्ट करतो हे जलचरांच्या दैनंदिन जीवनातील वास्तव आहे. त्यामुळे आपल्या भक्षकापासून प्राण वाचवीत ते स्वतःचे भक्ष्य शोधत फिरत असतात. असे असले तरी त्या सगळ्यांना एकाच जलाशयात रहायचे असते. त्यातल्या मोठ्या माशांना खाणारा महाकाय देवमासा हा लहानग्या माशाला आपला रक्षक वाटतो. त्याच्याबद्दल तो एकाच वेळी भीती तसेच आदर बाळगून असतो. मानवी समाजाची परिस्थिती याहून फारशी वेगळी नाही. आदिमानवाच्या काळात बलिष्ठ माणूस दुर्बलाला जिवानिशी मारून टाकीत असे. आजकाल अगदी तसे केले नाही तरी त्याच्या क्षेत्रामधील त्याचे अस्तित्व नष्ट करणे सर्रास चालते. हीच गोष्ट विलीनीकरण आणि संपादन या माध्यमातून संस्था करतात. विजेत्या समाजाने पराजित समाजाला उध्वस्त केल्याच्या कितीतरी घटनांनी इतिहास भरलेला आहे. हा सगळा प्रकार मत्स्यावतार झाला. सर्वात तळातला, प्राणिमात्रांच्या निव्वळ जगण्याच्या सहजप्रवृत्तीवर आधारलेला.
त्यानंतर कूर्मावतार. कासव हा तसा निरुपद्रवी प्राणी असतो. तो कुणावर हल्ला करायला जात नाही. हळूहळू सरपटत पुढे जातो. पण निग्रहपूर्वक चालत राहून चंचल सशाबरोबर लावलेली शर्यत जिंकू शकतो. त्याच्या अंगावर एक संरक्षक कवच असते. गरज पडल्यास आपले सारे अंग तो त्याच्या आंत दडवून ठेवतो. ते त्याचे संरक्षण करतेच पण वेळ पडल्यास इतरांना आधार देते. समाजातला एक वर्ग असाच असतो. तो निमूटपणे आपला मार्ग चोखाळत असतो. विरोधाचे प्रहार त्याला प्रतिकार न करता सहन करतो पण त्यातून तो वाचतो. वाटल्यास स्वतःला कोषात गुरफटून घेतो. अप्रत्यक्षपणे तो अनेकांना आधार देत असतो. त्या आधाराच्या बलावर इतर लोक पुढे येतात. मेरू पर्वताचा भार स्वतःच्या पाठीवर पेलून घेऊन देवदानवांना समुद्रमंथन करणे शक्य करून देणा-या व त्यात मिळालेली रत्ने त्यांनाच वाटून घेऊ देणा-या कूर्मावताराची ती रूपे आहेत असे मला वाटते. सुरक्षितता आणि स्थैर्य या प्राणिमात्रांना हव्या असलेल्या प्रवृत्ती त्यात दिसतात.
पण सगळेच लोक अल्पसमाधानी वृत्तीचे नसतात. कांही जणांना वेगाने पुढे जायची इच्छा असते. इच्छित दिशेने एकाद्या वराहासारखी मुसंडी मारून त्यांच्या मार्गात येणारे अडथळे ते बाजूला करीत जातात. मुद्दाम कोणाला इजा करावी असा त्यांचा उद्देश नसतो. त्यांना फक्त आपला मार्ग सुकर करून घ्यायचा असतो. आपला शक्य तितका विकास साधण्याची इच्छा नैसर्गिक रीत्या प्रत्येक जीवाच्या मनात उत्पन्न होतच असते आणि ती पूर्ण करण्याची धडपड तो करीत असतो. कासवाला जे जमणार नाही ते आपल्या ताकतीच्या जोरावर वराह करू पाहतो. प्रगतीची ही पुढची पायरी वराह अवतारात दिसते. स्वतःचा हव्यास पुरवत असतांना राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचा तोल सुटतो. स्वतःला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी इतरांकडून त्या हिसकावून घेणे सुरू होते. त्यासाठी सत्ता मिळवणे आणि ती मुठीत ठेवणे यासाठी जरब बसवणे सुरू होते. दुर्बल जनता आधी कांही काळ ते अत्याचार एखाद्या निर्जीव खांबासारखे स्वस्थपणे पाहते, पण त्याचा अतिरेक असह्य होताच ती चवताळून उठते, अक्राळ विक्राळ रूप धारण करते. नृसिंहावतार हे या प्रकारच्या उत्स्फूर्त आणि हिंस्र उद्रेकाचे स्वरूप आहे. दुष्ट हिरण्यकश्यपूचे त्यात निर्घृणपणे निर्दाळण होते. फ्रान्स आणि रशीयामधील राज्यक्रांतीच्या घटना तसेच नागपूरच्या गोरगरीब महिलांनी कुख्यात गुंडाला लाथाबुक्क्यांच्या माराने चेचून टाकले त्यात समाजाचे तेच उग्र रूप दिसले. मानवी हक्कासाठी त्याने तात्पुरते पाशवी रूप धारण करणे या अवतारात दिसून येते.
बळी हा एक सज्जन राजा असतो. त्याच्या मनात आपल्या प्रजेवर अत्याचार करण्याची इच्छा नसते. प्रजेलासुद्धा त्याची जाणीव असते. पण आपल्या राज्याचा अनिर्बंध विस्तार करण्याच्या नादात तो अधिकाधिक प्रदेश पादाक्रांत करण्यात मग्न असतो. त्यामुळे त्याचा प्रजेबरोबर संपर्क रहात नाही. मात्र त्याच्या नांवाने कारभार हांकणा-या अधिका-यांचा जुलूम असह्य झाल्यामुळे प्रजा नाराज होऊन बळीराजाची लोकप्रियता नाहीशी होते. बटु वामन जेंव्हा राजाला भेटतो तेंव्हा तो उदार मनाने त्याला पाहिजे ते मागायला सांगतो. आपण त्याच्या मागण्या सहज पुरवू शकू असा मोठा आत्मविश्वास त्याला स्वतःच्या सामर्थ्यावर वाटत असतो. इथे बटु वामन हे त्याच्या राज्यामधील लहान (सामान्य) लोकांचे प्रतीक असावे. तो फक्त तीन पावलाइतकी जमीन मागतो. त्याचे पाऊल हे जनतेमधील असंतोषाचे प्रतीक धरल्यास पहिल्या पावलाने सर्व पृथ्वी व्यापून जाते याचा अर्थ सगळ्यांनाच तो राजा अप्रिय झालेला असतो. दुस-या पावलांने स्वर्ग व्याप्त होतो. तो तर त्याने जिंकून घेतलेला प्रदेश, तिथे कोणाला तो हवासा वाटणार? हा व्यापक असंतोष सत्तेच्या बडग्याखाली दडपून टाकल्यास तो हिंसक रूप धारण करून उसळी घेऊ शकेल याचा विचार करून बळी राजा तो जनादेश शिरसावंद्य मानून तिसरे पाऊल स्वतःच्या मस्तकावर ठेऊन घेतो. थोडक्यात आपल्या राज्यात कुठेच थारा न मिळाल्यामुळे त्याला अज्ञात पाताळात स्थलांतर करावे लागते. अशा प्रकारची रक्तहीन क्रांती हा निश्चितच पुढचा टप्पा म्हणता येईल.
राज्याचे संरक्षण करण्यासाठी त्याचा खड्गहस्त बनलेला समाजाचा एक वर्ग आपल्या बलाचा दुरुपयोग करून निःशस्त्र प्रजेला नाडू लागतो तेंव्हा त्याचा प्रतिकार करण्यासाठी कुणीतरी ठामपणे उभे रहावे लागते. ऋषीमुनींच्या कुळात जन्मलेला परशुराम जपतप करणे सोडून देऊन हातात परशु धारण करून त्या लढाईत उतरतो आणि त्या उद्दाम झालेल्या वर्गाला वठणीवर आणतो. या अवतारातसुद्धा मला पुरशुराम हा एक व्यक्ती न वाटता तो समाजाचा प्रतिनिधी असावा असेच वाटते. मात्र त्याचा लढा पूर्वीच्या दोन अवतारामधे होता तशासारखा क्षणिक नसून तो प्रदीर्घ काळ चालत राहतो. त्याची एकवीस आवर्तने त्याला करावी लागतात.
रामावतारामध्ये राजा विरुद्ध प्रजा असा संघर्ष नाही. अयोध्या आणि लंका या दोन्ही राज्यामधील प्रजा आपापल्या राज्यकर्त्यावर खूष असलेली सुखी जनता असते. रामायणाच्या कथेमध्ये राम आणि रावण या दोन भिन्न प्रकृतीच्या मुख्य व्यक्तीरेखा रंगवल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचे आईवडील, भाऊ, पत्नी, मुले, मित्र, भक्त वगैरे अनेक पात्रांची वेगवेगळ्या छटांनी युक्त व्यक्तीचित्रे रेखाटलेली आहेत. त्याचा चरित्रनायक राम हा एक आदर्श तत्वनिष्ट महामानव आहे. त्याच्या वागण्यामधील प्रत्येक कृती जगापुढे आदर्श वर्तनाचे उदाहरण झाले आहे. रामरावणयुद्धामधील रामाचा विजय म्हणजे सत्प्रवृत्तींचा दुष्ट प्रवृत्तीवर विजय असे दाखवले आहे.
कृष्णावतारामध्ये त्याच्या जीवनात कमालीचे वैविध्य दाखवले आहे. बालपणी सवंगड्यांबरोबर खेळणारा नटखट कान्हा तसेच गोकुळातील सर्वांना आपल्या वर्तनाने तसेच बॉँसुरीच्या सुरावर भुलवणारा मोहन अचानक त्या सगळ्यांना सोडून मथुरेला जातो आणि कंसाची अन्यायी राजवट उलथून टाकतो. रुक्मिणीहरण करून तिच्याशी प्रेमविवाह करतो. स्वतः चक्रवर्ती सम्राट वगैरे बनून सत्ताधीश व्हायचा विचारही करीत नाही. त्याऐवजी पांडवांचा मित्र व सल्लागार बनतो. त्यांचा दूत बनून कौरवांकडे शिष्टाई करायला जातो आणि ती सफल न होऊन युद्धाला तोंड फुटल्यानंतर "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार" असे म्हणत अर्जुनाचा सारथी बनतो. सुरुवातीलाच गुरुजनांना समोर पाहून किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला रणांगणावरच धर्मशास्त्राची मूलतत्वे सांगून कर्तव्यपालनाला प्रवृत्त करतो. भीष्मपितामहांपासून दुर्योधनापर्यंत कौरवसैन्याचे जितके सेनापती झाले त्या प्रत्येकाच्या पतनाचा मार्ग शोधून पांडवांना मदत करतो. अशा प्रकारे त्याचे एक परिपूर्ण व्यक्तित्व दाखवले आहे.
नवव्या अवतारातील गौतम बुद्ध आधी सिद्धार्थ या नांवाचा राजकुमार असतो. पण समाजातील दुःखे पाहून त्याला इतका कळवळा येतो की हातात येऊ घातलेल्या राजसत्तेला दूर लोटून तो वनात निघून जातो. बोधीवृक्षाखाली विचारमग्न असतांना त्याला तत्वबोध होतो आणि पुढील सर्व आयुष्य तो दया, क्षमा, शांती, समता, बंधुत्व वगैरे सद्गुणांचा प्रसार करण्यात घालवतो. "अभिलाषा ही दुःखाची जननी आहे" हे सांगून खरा सुखाचा मार्ग आपल्या मनावर ताबा ठेवण्यात आहे हे सत्य पुन्हा अधोरेखित करतो. शारीरिक सुखापेक्षा मानसिक शांती उच्च दर्जाची आहे असे मानणारा मतप्रवाह या अवतारात दिसतो. विठ्ठल हा नववा अवतार आहे असा पर्याय लक्षात घेतल्यास तो सुद्धा निःशस्त्र आहे. त्याने कोणा राक्षसाचे दमन केल्याची कथा नाही. त्याच्या भक्तजनांनी अवघ्या महाराष्ट्राला त्याच्या भक्तीमधून उन्नतीचा मार्ग दाखवला आहे.
कल्की अवताराबद्दल मला अस्पष्ट अशी किंचित माहिती सुद्धा नाही. त्यामुळे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे शक्य नाही. सध्या वाहणारे वारे पाहता विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावर विश्वाला थक्क करणारा अद्भुत चमत्कार त्याने करून दाखवणे कदाचित शक्य आहे. एका अधांतरी तर्कापलीकडे त्यात कांही अर्थ नाही.
सारांशात पाहता मत्स्य, कूर्म व वराह हे पहिले तीन अवतार माणूस व पशू यांच्यामधील समान अशा प्रवृत्ती दाखवतात. नरसिंह, वामन व परशुराम अवतारात मानवसमूहाच्या प्रवृत्ती आढळतात. राम, कृष्ण व बुद्ध अवतारात माणसाच्या व्यक्तीगत उत्थानाचे नमूने दिसतात. कल्की अवतार कधी झालाच तर तो त्याच पठडीतला होणार अशी माझी अपेक्षा आहे. हे सर्व अवतार कालातीत आहेत. यातील प्रत्येकाची उदाहरणे भूतकाळात होऊन गेलेली आहेत तसेच आज आपल्या डोळ्यासमोर घडतांना दिसतात. ती ओळखून त्यातून काय निष्पन्न होण्याची शक्यता आहे हे समजण्याइतके शहाणपण आले तरी खूप फायदा होईल.
1 comment:
I agree with you. I like this article.I Want more information about KALKI.
Post a Comment