Thursday, August 07, 2008

योगायोग की भाग्य?


दोन तीन दिवस निवांत वेळ मिळाला होता म्हणून एक जुनेच पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. पहिल्या प्रकरणातच "भाद्रपद वद्य द्वादशीला माझा जन्म झाला." अशा अर्थाचे एक वाक्य वाचले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. प्रत्येक तिथीला कितीतरी माणसे जन्माला येतात व त्यातली कांही प्रसिद्ध होतात, तेंव्हा त्यात नवल करण्यासारखे काय आहे असे कोणालाही वाटेल. पण जी गोष्ट मला पन्नास वर्षापासून माहीत असायला पाहिजे होती, ती इतक्या वर्षात कधीच कशी माझ्या लक्षात आली नाही याचे मला आश्चर्य वाटले तसेच स्वतःचाच थोडा रागही आला.
पन्नास साठ वर्षापूर्वीच्या काळात आमच्या घरी कोणाच्याही वाढदिवसाला केक कापून "हॅपी बर्थडे टू यू" म्हणावयाची पद्धतच नव्हती. मुलांचे वाढदिवस त्यांच्या जन्मतिथीनुसार वेगळ्या प्रकारे साजरे केले जात. ज्याचा वाढदिवस येणार असेल त्याला आधीपासूनच त्या दिवसाचे वेध लागलेले असत. त्या दिवशी तो आपण होऊन पहाटे लवकर उठून कधी नाही ती आंघोळीची घाई करी. सचैल स्नान करून झाल्यावर तो नवीन कपडे घालून देवाच्या व सर्व वडील मंडळींच्या पाया पडत असे. या संधीचा फायदा घेऊन मोठी भावंडे त्याच्या पाठीत कौतुकाने हलकासा धपाटा घालून घेत. त्या दिवशी जेवणात अगदी चटणीपासून ते पक्वांन्नापर्यंत सारे पदार्थ त्याच्या आवडीचे बनत. त्या दिवशी कोणीही त्याला रागवायचे, चिडवायचे किंवा रडवायचे नाही आणि त्यानेही कसला हट्ट न धरता शहाण्यासारखे वागायचे असा एक अलिखित संकेत होता. कोणाच्याही जन्मतारखेची चर्चाच घरात कधी होत नसे त्यामुळे घरातल्या लोकांच्याच नव्हे तर अगदी स्वतःची जन्मतारीख देखील कोणाच्या लक्षात रहात नसे, किंवा ती माहीतच नसे. आमच्या लहानपणच्या जगात जन्मतारखेला कांहीच महत्व नव्हते. घरी असेपर्यंत माझा वाढदिवससुद्धा प्रत्येक भाद्रपद वद्य द्वादशीला अशाच पद्धतीने साजरा होत गेला.
शालांत परीक्षा पास होऊन उच्च शिक्षणासाठी कॉलेजच्या प्रवेशाचा फॉर्म भरण्यासाठी स्कूल लीव्हिंग सर्टिफिकेटवरील माझी जन्मतारीख पहिल्यांदा पाहिली आणि जवळजवळ हर्षवायू झाला. चक्क एका अत्यंत महत्वाच्या तारखेला माझा जन्म झाला होता. दरवर्षी त्या तारखेला आम्हाला शाळेला सुटी तर असायचीच, त्याशिवाय त्या दिनानिमित्त शाळेत निरनिराळे कार्यक्रम व स्पर्धा वगैरे असायच्या. माझी जन्मतारीखसुद्धा त्याच दिवशी आहे हे् आधी समजले असते तर किती मजा आली असती! मित्रांवर रुबाब दाखवता आला असता, चार लोकांकडून कौतुक करून घेता आले असते. पण आता तर मी आपली शाळाच नव्हे तर गांव सुद्धा मागे सोडून शिक्षणासाठी शहरात आलेलो होतो. त्या काळातल्या आमच्या हॉस्टेलमधली बहुतेक मुले आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातून आलेली होती व आपापला न्यूनतम खर्च ओढाताण करून जिद्दीने कसाबसा भागवत होती. त्यात आपला वाढदिवस जाहीर करणे म्हणजे पार्टीचा खर्च अंगावर ओढवून घेण्यासारखे होते व ते कुवतीच्या पलीकडे असल्यामुळे कोणी करीत नसे. माझ्या वाढदिवसाला तर सार्वत्रिक सुटी असल्यामुळे सगळी मुले हुंदडायला मोकळीच असायची. त्यामुळे मीसुद्धा याबाबत मौनव्रत धारण करण्यात शहाणपण होते. फार फार तर गुपचुप एकाद्या मित्राला बरोबर घेऊन सिनेमा पाहून येत असे. अशा प्रकारे मधली कांही वर्षे जन्मतिथी किंवा जन्मतारीख यातला कुठलाच दिवस साजरा न करता येऊन गेली.
लग्न करून मुंबईला संसार थाटल्यावर मात्र दरवर्षी तारखेप्रमाणे वाढदिवस साजरा होऊ लागला. नव-याकडून चांगले घसघशीत प्रेझेंट मिळवण्याची ही संधी कोणती पत्नी हातची जाऊ देईल? आणि स्त्रीपुरुष समानता राखण्याकरता दोघांचेही वाढदिवस खाणे पिणे व खरेदी करून साजरे करणे क्रमप्राप्त होते. आजूबाजूच्या सगळ्या घरांतल्या लहान मुलांचे वाढदिवस फुगे व पताकांनी घर सजवून, कागदाच्या टोप्या व मुखवटे घालून, इतर मुलांना बोलावून, केक कापून, गाणी म्हणत, नाच करत मोठ्या उत्साहाने साजरे होत असत तसेच आमच्या मुलांचेही झाले. ती मोठी झाल्यावर बाहेरच्या लोकांना घरी बोलावण्याऐवजी आम्हीच त्या निमित्ताने बाहेर जाऊ लागलो. पण कांही तरी खाणे पिणे आणि मजा करणे या स्वरूपात घरातल्या सगळ्या व्यक्तींचे तारखेप्रमाणे येणारे वाढदिवस साजरे होत राहिले आणि कोणी दूरदेशी गेले तरी त्या दिवशी आठवणीने टेलीफोन व इंटरनेटवर संपर्क साधून शुभेच्छा पाठवल्याशिवाय रहात नाही.
पण या दरम्यानच्या काळात पंचांग, तिथी वगैरे गोष्टी जवळजवळ नजरेआड झाल्या आहेत. गणेशचतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे मुख्य सण त्या दिवशी ऑफीसला सुटी असते त्यामुळे वेळेवर साजरे होतात. इतर फुटकर सणवार कधी येतात ते समजतच नाही. त्याचप्रमाणे दर वर्षी भाद्रपद वद्य द्वादशीसुद्धा नियमितपणे येऊन जात असे पण ती कधी आहे हे जाणून घेण्याचे कष्ट घ्यावे असे मला कधीच वाटले नाही इतकी ती विस्मरणाच्या पडद्याआड गेली होती. आज अचानक एक पुस्तक वाचतांना त्यांत तिचा उल्लेख आला आणि ती एकदम मला भूतकालात घेऊन गेली. ज्या तिथीला त्या पुस्तकाच्या महानायकाचा जन्म झाला ती तर आपलीच जन्मतिथी आहे ही गोष्ट अचानक नजरेसमोर आली.
खरे तर यात आश्चर्य वाटण्याचे कांही कारण नव्हते. भारतीय पंचांग व इंग्रजी कॅलेंडर यातील कालगणनेचा तौलनिक अभ्यास करून पृथ्वी व चंद्र यांच्या भ्रमणकालानुसार येणारा १९ वर्षांचा कालावधी दोन्ही प्रकारात जवळजवळ सारखा असतो हे मी गणिताद्वारे एका लेखात यापूर्वी सिध्द करून दाखवले आहे. यामुळे दर १९ वर्षानंतर त्याच तारखेला तीच तिथी येत असते हे मला माहीत आहे. अर्थातच १९ च्या पाढ्यातील ३८, ५७, ७६ वगैरे वर्षानंतर तिथी व तारीख यांची पुनरावृत्ती होत रहाणार. पण ही सगळी थिअरी सांगतांना माझ्या स्वतःच्याच आयुष्यातले उदाहरण मात्र मला दिसले नाही. त्यामुळे माझ्या जन्माच्या बरोबर ७६ वर्षे आधी जन्माला आलेल्या महापुरुषाची जन्मतारीख व जन्मतिथी या दोन्ही माझ्या जन्माच्या वेळी त्याच असणार हे माझ्या लक्षातच आले नव्हते.
मीच लिहिलेल्या दुस-या एका लेखात योगायोगांचे गणित मांडून त्यांची शक्याशक्यता वर्तवली होती. माझ्या जन्मतारखेबद्दलचा योगायोग त्यावेळी मला माहीत होता. पण असे योगायोग फारसे दुर्मिळ नसतात असे मी त्या लेखात साधार प्रतिपादन केलेले असल्यामुळे त्याचा उल्लेख करायचे कारण नव्हते. मात्र माझी जन्मतारीख व जन्मतिथी या दोन्ही गोष्टी एका महान व्यक्तीच्या जन्मतारीख व जन्मतिथी यांबरोबर जुळाव्यात हा मात्र खराच दुर्मिळ योगायोग आहे किंवा हे माझे महद्भाग्यच आहे. २ ऑक्टोबर १८६९ रोजी भाद्रपद वद्य द्वादशीला जन्मलेल्या या महात्म्याचे नांव आहे मोहनदास करमचंद गांधी आणि मी वाचत असलेल्या पुस्तकाचे नांव आहे 'सत्याचे प्रयोग'!

1 comment:

D.V.Vishwaroop said...

फारच सुंदर !