Friday, February 29, 2008

माझे जेवण खाणे

मधु आणि मंजुळा एक अनुरूप जोडपे. मधूला खाण्याची आवड तर मंजुळेला स्वयंपाक करण्याची. त्यामुळे दोघांचं ब-यापैकी जमायचं. पण मंजुळेला दुसरी एक आवड होती ती म्हणजे सतत गाणी गुणगुणण्याची. ती कांही मधूला आवडत नसे. त्यानं मंजुळेला एक सवलत दिली की गाण्यात खाण्याचा उल्लेख असेल तर ते गाणे त्याला चालेल.
त्यांच्या आयुष्यातला असाच एक सुटीचा दिवस उजाडतो. गोड भूपाळी म्हणत मंजुळा दिवसाची मंगलमय सुरुवात करते.
"उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुख । ऋद्धी सिद्धीचा नायक, सुखदायक भक्तांसी ।। "
पुढचं कडवं ती गुणगुणत असते तेवढ्यात मधूला अंथरुणात चुळबुळ करतांना पाहून ती एकदम शेवटच्या कडव्यावर येते.
"कांसे पीतांबराची धटी, हाती मोदकाची वाटी। रामानंद स्मरता कंठी, तो संकटी पावतो ।।"
दारावरची बेल वाजते. ती उठून दूध घेते, तापवायला ठेवते, चहा करून आणते. मधू जागा होऊन लोळत पडलेला असतो. चहाचा कप त्याच्यापुढे धरून ती म्हणते.
"रात्रीचा समय सरुनि येत उषःकाल हा, घे रे चहा। कप भरला अति सुंदर । बशी ही किती नक्षीदार । अजून हवी का साखर, ढवळुनी पहा । घे रे चहा ।।"
चहापान आटोपल्यावर ते सकाळच्या कामांना लागतात. पेपर आल्यावर तो वाचणं सुरू होतं. थोड्या वेळानं मधूला वाटतं, आपण नुसताच पेपर काय वाचतोय्? त्याच्याबरोबर कांही नको? तो मंजुळेला हांक मारतो. हातात दुसरा कप घेऊन ती येते. आता तिचं शास्त्रीय संगीत सुरू झालेलं असतं. (राग काफी)
"कैसी ये कॉफी बनाई, बनाई, बनाई, बनाई, बनाआआई"
मधू म्हणतो "थांब. एक कप कॉफी बनाई बनाई किती वेळा सांगशील? एवढ्यानं माझं भागणार आहे काय?" तोपर्यंत तिनं हातात एक ट्रे आणलेला असतो. तो समोर ठेवीत ती अलहैया बिलावल रागात म्हणते,
"ब्रेड बटर ये, ले आयी हूँ मैं । ब्रेड बटर ये एएएए ........
ब्रेडको सेकके टोस्ट बनाय़ी, मक्खन जॅम उसे चुपडाय़ी । ये लो खाओ मोरे पिया मन भाय़ी ।
ब्रेड बटर ये एएएए....."
नाश्त्याचा कार्यक्रम झाल्यावर ती आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाते. शॉवर सुरू करताच वरून जलधारा कोसळायला लागतात.
"घनघनमाला नभी दाटल्या कोसळती धारा । आता भज्यांचा घाणा तळते, करी घेउनि झारा ।
कोसळती धारा ।
गरम चहाने भरली किटली । सवे भज्यांची रास मांडली ।
मस्त मजेने फस्त करू त्या, दिन ओला न्यारा । कोसळती धारा ।"
मेघ मल्हार, मिया मल्हार वगैरे गाऊन झाल्यावर मंजुळा बाहेर येते. पॉवडर, कुंकू, नीट नेटके कपडे वगैरे करून पुन्हा स्वयंपाकघरात जाते. आता तिची अभंगवाणी सुरू होते.
"कांदा मुळा भाजी, अवघी आणू ताजी ताजी ।
काकडी आणि गाजर, किसून करू कोशिंबीर ।
हिरवी मिरची लसूण, घेऊ बारीक वाटून ।
बटाट्याच्या या काच-या, त्यांना परताव्या ब-या ।
कोबी फ्लॉवर मटार, रस्सा त्यांचा चवदार ।
पालकाची पातळभाजी, करी नवरोबाला राजी ।। कांदा मुळा..."
सगळं चिरणं, खिसणं, वाटणं, कुटणं वगैरे झाल्यावर ती गॅसकडे येते. आता ओव्या सुरू करते.
"अरे संसार संसार, गॅसवरचा कुकर । आधी येतसे प्रेशर, डाळ शिजते नंतर ।।
अरे संसार संसार, नाही भांडण तंडण । एकीकडे टाकू भाजी, दुसरीकडे वरण ।।
अरे संसार संसार, खोटा कधी म्हणू नये । पोळी लाटाच्या लाटण्या, सोटा कधी म्हणू नये ।।
अरे संसार संसार, दोन जिवांचा विचार । एकमेकांच्या सांगाती, दुधामधील साखर ।।"
सगळा स्वयंपाक तयार होतो. आज मंजुळानं खास मधूसाठी त्याच्या आवडीची कढी बनवलेली असते. ती पाहून तो आनंदाने "कढी, मार उडी" म्हणेल या कल्पनेनेच ती सुखावते. ताटे मांडून दोघे जेवायला बसतात. एक मिनीट, दोन मिनिटं, तीन मिनिटं होऊन चांगली चार मिनिटे व्हायला आली तरी इतका वेळ मंजुळा अजून कांहीच बोललेली नाही, तिने गाणंही म्हंटलं नाही हे लक्षात येऊन मधू अस्वस्थ होतो. तिला त्याचं कारण विचारतो. आता मंजुळेच्या मौनाचे बांध फुटतात. ती गाऊ लागते,
"कांही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही । जेवणाच्या ताटामध्ये तुझ्या पाहणार नाही ।।"
मधूला अजूनही कांही समजत नाही. सगळं तर सुरळीतपणेच चाललंय्. तो विचारतो, "अगं,पण कां?" मंजुळा पुढे म्हणते,
"तुझ्यासाठी कटाक्षाने आले घातले ठेचून । साजूक तुपामध्ये रे दिली फोडणी वरून ।
पहिली कढीची वाटी ना रे संपणार कां ही? कांही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही ।"
झाली गोष्ट आता मधूच्या लक्षात येते. सारवासारव करीत तो सांगतो, "अगं, मी वाटीतली गरमागरम कढी पाहिली होती. पण बोटांना चटका बसेल म्हणून चटणी कोशिंबिरीच्या चवी घेत थोडा वेळ थांबलो होतो." तो कढीचे भुरके मारायला सुरुवात करतो. एक वाटी संपते, दुसरी संपते, तिसरी संपायला येते. ते पाहून मंजुळा तृप्त होते. तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. त्याला ऊत येऊन ओठावर शब्द येतात, "जेवणात ही कढी अशीच राहु दे । तुज भुरके घेतांना मला पाहु दे ।।
हळु बोटे चाटायचा छंद आगळा । आवडीचा त्याविण कां अर्थ वेगळा ।
ओघळ रे हातांवर, खुशाल वाहू दे । जेवणात ही कढी अशीच राहु दे ।।"
पोटभर जेवण झाल्यावर छान सुस्ती येते. दोघे वामकुक्षी घेतात. चार वाजतात.
"चार वाजले वेळ झाली, चहा करण्याची । चहा करण्याची, दुपारचा चहा करण्याची ।।"
असे म्हणत मंजुळा स्वयंपाकघरात जाते. तोंडाने भारुडे, गवळणी, जोगवा वगैरे पारंपारिक लोकगीते गुणगुणणे सुरू असते. थोड्या वेळाने कंटाळून मधू आंत जाऊन पाहतो. त्याला बघितल्यावर मंजुळा म्हणायला सुरू करते,
"चहाची किटअली, बिस्किटांचा डअबा । घेऊन मी येते थांबा । थोडा वेळ थांबा ।।
ग्लुको मोनॅको चविष्ट, खुसखुशीत मारी ।
क्रीम बिस्किटांच्या आंत व्हॅनिला स्ट्रॉबेरी ।
नव्या चवीही आणल्या, संत्रा आणि आंबा । थोडा वेळ थांबा, अगदी, थोडा वेळ थांबा ।।"
चहापान झाल्यावर दोघेही तयार दोऊन समुद्रकिना-यावर फिरायला जातात. ताज्या शुद्ध हवेबरोबरच पाणी पुरी, भेळ पुरी, पाव भाजी, दाबेली वगैरे खातात, मिक्स फ्रूट ज्यूस, ड्राय फ्रूट लस्सी पितात आणि सावकाशपणे घरी परततात. मंजुळाचे पोट गच्च भरलेले असते, आणखी कांही खाण्याची वासना तिला नसते. मधूने तर जास्तच हादडलेलें असल्याने त्यालाही इच्छा नसेल असं तिला वाटतं. पण फॉर्मॅलिटी म्हणून ती विचारून बघते. आता मधूलाही गाण्याची स्फूर्ती येते. तो गाण्यात म्हणतो,
"माझे जेवण खाणे, माझे जीवन खाणे ।
निशा असो वा दिवस असू दे । चमचमीत वा मधुर असू दे ।
भूक असो अथवा नसू दे । सततच चरत रहाणे । माझे जीवन खाणे ।।"
आता मात्र मंजुळाही कंटाळलेली असते. ती म्हणते,"ठीक आहे, दुपारचं थोडं अन्न उरलं आहे, त्याला ताजी फोडणी घालून देते. पण आता खूप उशीर झाला आहे, तुम्हाला थोडी मदत करावी लागेल." ती भैरवी सुरू करते,
"स्वैपाकघरा, याहो जरा । करि हा धरा, जपुनी सुरा ।
मी फोडणी, करिते तुम्ही । कोथिंबीर अन्, कांदा चिरा ।।"
कांदा चिरायच्या कल्पनेनंच मधूच्या डोळ्यात पाणी उभं राहतं. तो कांही म्हणायच्या आंत मंजुळा अंतरा सुरू करते,
"वस्त्रे जहाली, तंग ना । दम लागतो, चढता जिना ।
या ओळखूनी, लक्षणा । खादाडी आता, आवरा ।
उदरावरी, करुणा करा । स्वैपाकघरा, विसरू जरा ।।"

Thursday, February 28, 2008

लीड्सच्या चिप्स भाग १४ - रीसाचा बाप्तिस्मा

माझ्या २००६ या वर्षाची सुरुवात लीड्समध्ये अगदी वेगळ्या त-हेने झाली. मारिओ आणि नताशा या भारतीय जोडप्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस, त्यांच्या अपत्याचा, रीसाचा बाप्तिस्मा आणि नववर्षाचे स्वागत अशा त्रिवेणी निमित्त त्यांनी आपल्या घरीच एक छोटीशी लंच पार्टी ठेवली होती. क्रिस्टीना आणि बर्नार्ड हे एक स्थानिक वयस्कर जोडपं, ईव्हान हा चर्चमार्फत समाजकार्य करणारा युवक, मारिओचे ऑफीसमधील भारतीय सहकारी आणि त्यांचे कुटुंबीय अशी अगदी मोजकी मंडळीच होती. इथं लीड्सला आल्यापासून ख-या ब्रिटीश लोकांबरोबर गप्पा मारायची ही पहिलीच संधि मिळाली होती. बर्नार्डने बरीच वर्षे सैन्यदलात काढली होती. ते लोक कांही काळ सायप्रस व फॉकलंडलाही राहून आले होते पण तो त्याबद्दल किंवा एकंदरीतच फारसं बोलायला उत्सुक दिसला नाही. क्रिस्टीना मात्र खूपच बोलकी होती. जवळच्याच बीस्टन या गावात दोघांनीही घालवलेल्या रम्य बालपणापासून ते नुकत्याच तासाभरापूर्वी चर्चमध्ये घडलेल्या बाप्तिस्म्याच्या विधीपर्यंत अनेक विषयांवर रसभरीत भाष्य करीत तीच गप्पागोष्टींचं सूत्रसंचालन करीत होती. "हो ना"," कदाचित्"," नक्कीच" असे एक दोन शब्द बोलत बर्नार्ड मधून मधून तिला साथ देत होता.

समाजसेवेच्या निमित्ताने केलेल्या भ्रमंतीमध्ये आलेले कांही मजेदार अनुभव ईव्हानने सांगितले. तो वर्षभर बांगलादेशात राहून गेला होता त्यामुळे त्याल भारतीय उपखंडातील जीवनशैलीची थोडीफार कल्पना होती.क्रिस्टीना कुटुंबसंस्थेबद्दल खूपच भावूक होती त्यामुळे भविष्यकाळात आपल्या समाजाचं काय होणार याची तिला चिंता वाटत होती. कुणीतरी गंमतीनं म्हंटलं की आजकालच्या पालकांच्या मनात आपल्या वयात येत असलेल्या मुलांबद्दल एकच इच्छा असते की त्यांची लग्नं व्हावीत, ती ही मुलांची मुलीबरोबर आणि मुलींची मुलांबरोबर ! सगळ्या भारतीय लोकांनी जाहीर करून टाकलं की आपण बुवा मुलं मोठी व्हायच्या आत मायदेशी परतणार. इथलं वारं तिकडं पोचणारच नाही याबद्दल केवढा विश्वास ?