Wednesday, June 28, 2023

ज्ञानयोग. कर्मयोग आणि भक्तियोग

 माणूस निवृत्त झाल्यानंतर अध्यात्माच्या मार्गाला लागतो किंवा त्याने त्या मार्गाला लागावे अशी अपेक्षा असते. माझे वडील ५५ वर्षाचे असतांनाच त्या काळातल्या नियमांनुसार सेवानिवृत्त झाले होते आणि खरोखरच पूर्णवेळ भजन, पूजन,कीर्तन, प्रवचन वगैरेंमध्ये  मग्न असत. पण मी साठ वर्षांनंतर निवृत्त झालो तरी तेंव्हा मला तशी बुद्धी झाली नाही. ७५ वर्षे उलटून गेल्यानंतर अध्यात्म म्हणजे नेमके काय आहे याचा शोध घेण्याचा अल्पसा प्रयत्न केला आणि मला समजले तेवढे मी एका लेखात लिहिले होते. हे काम करत असतांनाच मला तत्वज्ञान या शब्दाचा वेगळा अर्थ समजला, त्यावर मी दुसरा लेख लिहून प्रसिद्ध केला होता. या मालिकेतले हे तिसरे पुष्प ज्ञानयोग, कर्मयोग वगैरेंवर देत आहे. मी हा लेख फेसबुकवर पाच भागात दिला होता. त्याच क्रमाने तो इथे देत आहे.  


ज्ञानयोग. कर्मयोग आणि भक्तियोग  भाग -१

भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करायच्या निमित्याने सगळ्या जगाला ज्ञानयोग. कर्मयोग आणि भक्तियोग हे तीन मार्ग धरायला सांगितले आहेत. या तीन्हीपैकी आपल्या इच्छेप्रमाणे कुठलाही मार्ग धरला तरी तो अखेर त्याच शिखराकडे घेऊन जातो वगैरे गोष्टी मी अनेक वेळा ऐकल्या किंवा वाचल्या आहेत आणि इतरांना सांगितल्याही असतील. पण मला स्वतःला त्यांचा अर्थ कधीच नीट समजला नाही असे आता वाटायला लागले आहे.

बऱ्याच लोकांना असे वाटते की पहिली वीसपंचवीस वर्षे शाळाकॉलेजात शिक्षण घेतांना ज्ञानमार्ग धरावा, चाळीसपन्नास वर्षे काम करतांना कर्मयोग पाळावा आणि नंतर उरलेले आयुष्य हरीहरी करत भक्तियोगात घालवावे असे सांगण्याचा उद्देश असेल. पण ते तसे नाही.


भाग -२ ज्ञानयोग

आपण शाळाकॉलेजात अनेक विषयांचा अभ्यास करतो, घरातले मोठे लोक आणि इतर लोकही सतत काही माहिती देत असतात, उपदेश करत असतात, पुस्तके वाचून आणि टीव्ही पाहून माहिती आणि विचार मिळत असतात,  अलीकडे तर इंटरनेट आणि वॉट्सॅपमधून आपल्यावर माहितीचा भडिमार होत आहे. या सगळ्यामधले जे आपल्याला चांगले समजले आणि लक्षात राहिले त्याला आपण ज्ञान (नॉलेज) म्हणतो. या ज्ञानामधून आपल्याला शहाणपणा, हुषारी मिळेल, त्यातून काही प्रमाणात यश, कीर्ती आणि संपत्तीसुद्धा प्राप्त होईल, पण परमेश्वर कसा भेटणार? मोक्ष कसा मिळणार? असा प्रश्न मला पडला होता कारण  गीतेमधल्या तीन्ही मार्गांचे हे अंतिम लक्ष्य असावे असे मला वाटत होते.

अलीकडेच एका पंडिताने मला असे सांगितले की मी जन्मभर विज्ञानतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करून या विषयांमधले जे थोडेफार ज्ञान मिळवले असेल ते मुळी 'ज्ञान' नाहीच. हे विश्व म्हणजे मोहमाया आहे आणि त्याला खरे समजणे हेच अज्ञान आहे. आपल्या आत्म्यावर या अज्ञानाची अनेक पुटे चढलेली असतात. त्यांना बाजूला सारून जो आत्म्याची ओळख करून घेतो तो खरा 'ज्ञानी' आणि अंतरात्मा म्हणजेच परमात्मा हे अद्वैत समजून घेणे म्हणजे गीतेमधले 'ज्ञान'. हे ज्ञान मिळवण्यासाठी आधी मीपणा पूर्णपणे सोडून द्यायला हवा. मला, माझे असे काहीही मनातसुद्धा येता कामा नये. हे होण्यासाठी पूर्वसंचित असायला हवे आणि ज्ञानी सद्गुरु भेटला पाहिजे असेही म्हणतात.  यातले काहीच आपल्याला जमण्यासारखे नाही. ज्ञानमार्ग हा आपला मार्ग असू शकत नाही. त्या मार्गावर एक पाऊलसुद्धा टाकणे मला अशक्य वाटले.


भाग -३  कर्मयोग

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्माते संगोऽस्त्वकर्मणि ॥ 

हे गीतेच्या कर्मयोगाचे सूत्र आहे. "(हे माणसा), तुला कर्माविषयीच अधिकार आहे, फलाच्या ठिकाणी कधीही नाही. कर्माचा व फलाचा उद्देशही तुझ्या मनात असता कामा नये. इतके असूनही कर्म न करण्याची आसक्तीही तुला नको". असे या एका श्लोकात ग्रथित केलेले आहे. इथे कर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य असा घेतला आहे असे वाटेल. कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्या हितासाठी निरनिराळी कर्तव्ये ठरवलेली आहेत आणि सर्वांनी ती पाळावीत अशी अपेक्षा असते. कर्तव्य करतांना स्वतःच्या व्यक्तिगत नफातोटा पाहिला तर त्यामुळे इतरांचे नुकसान होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ बापाने आपले कर्तव्य पाळले नाही तर मुलांचे, शिक्षकाने कर्तव्य टाळले तर विद्यार्थ्यांचे आणि नागरिक बेपर्वा झाले तर देशाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कर्तव्यांच्या बाबतीत फळाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करायला हवेच. मग त्यात मोठा योग कसला आला  आणि  त्यातून मोक्ष कसा मिळणार किंवा ब्रह्म कसे भेटणार? असे वाटेल.

पण कर्तव्य हा कर्माचा एक लहानसा भाग आहे. त्याशिवायही माणूस सतत काही ना काही कर्म करतच असतो. हातापायांनी केलेले कामच नव्हे तर तोंडाने खाणेपिणे किंवा बोलणे, इतकेच काय पण मनात आलेले विचार, आखलेल्या योजना हेसुद्धा कर्मात येते. बहुतेक वेळा त्याला या कर्मांपासून काहीतरी लाभ मिळत असतो, पण कधीकधी तो मिळतच नाही. श्वास घेण्यासारखे कर्म नकळत होत असले तरी समजून उमजून केलेल्या कर्मांवर नियंत्रण ठेवावे, ते करतांना (सतत आणि फक्त) स्वार्थाचा विचार करू नये  किंवा "मी हे करून काय फायदा झाला?" असा विचारही मनात आणू नये असा कर्मयोगाचा अर्थ असावा असे मला वाटते. निरपेक्ष वृत्तीने काम करतांना हळूहळू आसक्ती कमी होते. मनासारखे न झाल्यामुळे होणारी निराशा, दुःख, राग वगैरेंचा त्रास होत नाही, मन शांत राहते, चित्तशुद्धी होते आणि त्यामुळे ज्ञानमार्ग सुकर होतो.  मानवी स्वभावानुसार त्याला काहीतरी आशा आकांक्षा असतातच, मोटिव्हेशनशिवाय काम करणे तसे सोपे नाहीच, पण तसा प्रयत्न करावा.


भाग ४  भक्तियोग 

ज्ञानयोगामध्ये अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करून स्वतःचा शोध घेणे असते, तर कर्मयोगामध्ये निरपेक्ष भावनेने निरासक्त वृत्ती बाळगून मनावर ताबा ठेवायचा असतो हे आधीच्या भागांमध्ये पाहिले आहे. या दोन्हींमध्ये कुठल्या देवाचा थेट संबंध यायची गरज नसते. पण भक्तीमार्गासाठी मात्र एकाद्या तरी देवतेवर अनन्य श्रद्धा असणे आवश्यक आहे. बहुतेक हिंदू लोकांच्या घरी दोनचार देवांच्या लहानशा मूर्ती, प्रतिमा, संतांच्या तसबिरी वगैरे असतात. ते त्यांना गंधफूलअक्षता हळदकुंकू वगैरे वाहून पूजा करतात, त्यांना निरांजनाने आणि उदबत्तीने ओवाळतात, नैवेद्य दाखवतात, अशा प्रकारचे काही उपचार करतात. अधूनमधून एकाद्या देवळात जातात, कधीकधी पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर यासारख्या तीर्थक्षेत्रांना जाऊन पाया पडून येतात. ही सगळी भक्तीमार्गावरली सुरुवातीची पाउले आहेत.  संसाराचा गाडा सांभाळता सांभाळता जमेल तेवढा भक्ती भाव दाखवलेला असतो.

संत ज्ञानदेव, रामदास वगैरेंनी संसार केलाच नाही, तर संत नामदेव, तुकाराम यांच्यासारख्या भक्तांनी निरासक्त भावनेने संसार केला, पण ते त्यात रमले नाहीत. त्यांचे चित्त सतत विठ्ठलाला वाहिलेले होते. संत एकनाथ महाराजांनी एका अभंगात सांगितले आहे, 

आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे || १ ||

नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्षुमीचा जाणतसे || २ ||

सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही || ३ ||

जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे || ४ ||

एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | हरिकृपे त्याचा नाश झाला || ५ ||


तर संत नामदेव म्हणतात,

देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥१॥

चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ॥२॥

वदनीं तुझे मंगलनाम । हृदयी अखंडित प्रेम ॥३॥

नामा म्हणे केशवराजा । केला नेम चालवी माझा ॥४॥


संत तुकारामांनी देवालाच असे दान मागितले आहे,

हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडी ।हेचि माझी सर्व जोडी ॥२॥

न लगे मुक्ति आणि संपदा ।संतसंग देई सदा ॥३॥

तुका ह्मणे गर्भवासी ।सुखें घालावें आह्मांसी ॥४॥

त्यांना तर या जन्मात धनसंपत्ती नको आहेच, पण मोक्षमुक्तीसुद्धा नको आहे.

ही संतमंडळी  समर्पण या भक्तीमार्गाच्या शिखरावर जाऊन पोचली होती.


भाग -५  समारोप

या तीन योगांशिवाय राजयोग नावाचा आणखी एक प्रकार आहे. त्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा पायऱ्यांमधून साधना केली जाते. भारतीय आणि हिंदू तत्वज्ञानामधील चार्वाक सोडून इतर सहा दर्शनांमध्ये मोक्षप्राप्ती हेच मानवाचे अंतिम ध्येय ठरवले आहे, किंबहुना त्यासाठीच मनुष्यजन्म मिळतो असे सांगितले आहे आणि त्यासाठी ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग वगैरे मार्ग सांगितले आहेत. या मार्गांच्या उपयोगाविषयी सगळ्या विद्वान आचार्यांमध्ये एकमत नाही.  व्यक्ती तितक्या प्रकृति असल्यामुळे सरसरकट सगळ्या लोकांना सगळे मार्ग शक्य, योग्य किंवा पुरेसे आहेत असे त्यांना वाटत नाही. मग सामान्य माणसाची काय कथा? जगद्गुरु शंकराचार्यांनी ज्ञानमार्गाला प्राधान्य दिले आहे तर नंतर आलेल्या मध्वाचार्य, रामानुजाचार्य आदींनी भक्तीमार्ग आवश्यक आहे असे सांगितले. सर्व संतांनी भक्तीमार्गच सांगितला आणि त्याचा प्रचंड प्रसार झाला.  

ज्ञानयोग हा ज्ञानाचा मार्ग आहे. सत् आणि असत् यांचा विवेक आणि शास्त्रविचार ही याची प्रमुख अंगे आहेत. अध्यात्मामधील 'ज्ञान' या शब्दाला तत्त्वज्ञानीय अर्थ अभिप्रेत आहे. त्याची सुरुवात बुद्धीवादापासून होते आणि शेवट साक्षात्कारात होतो. ज्ञानयोगात तीन प्रगतीपर साधना असतात: श्रवण (ऐकणे), मनन (विचार/चिंतन करणे) आणि निध्यासन (सदैव सखोल ध्यान करणे). उपनिषदांतील चार महावाक्ये या चिंतनाचा विषय आहेत: ‘प्रज्ञानं ब्रह्म,’ ‘तत्त्वमसि,’ ‘अयमात्मा ब्रह्म’ आणि ‘अहम् ब्रह्मास्मि.’ ‘विवेकबुद्धीने सत् आणि असत् यांच्यामधील फरक जाणून घेणे आणि शेवटी स्वत:चे आणि परब्रह्माचे रूप एकच आहे, याचे ज्ञान होणे' हेच ज्ञानयोगाचे ध्येय आहे. सर्वसामान्य कुवतीच्या संसारी माणसाला हे शक्य नाहीच. त्यासाठी आधी निरीच्छ होऊन सर्व संसाराचा त्याग करून संन्यास स्वीकारणे अवश्य आहे असे मला वाटते. 

त्या मानाने कर्मयोग हा कार्य करण्याचा मार्ग थोडा तरी समजण्यासारखा आहे. आपण काय करू नये यापासून त्याची सुरुवात होते. त्यानंतर आपण स्वार्थी इच्छांपासून प्रेरित झालेल्या कार्याचा त्याग करावा. त्यानंतर जागृत मनोवृत्तीने आपल्या जीवनातले कर्तव्य करण्याची इच्छा होते. त्यानंतर कदाचित ज्ञानमार्गाकडे जाता येईल.

भक्तियोग हा परमेश्वराच्या भक्तीचा आणि परमेश्वरावर प्रेम करण्याचा मार्ग आहे.  देवाबद्दल कथा श्रवण करणे, भक्तिगीतांचे गायन करणे, तीर्थयात्रा करणे, मंत्रजप करणे आणि देवळांत आणि स्वगृही देवपूजा करणे या कृती या मार्गाची साधने आहेत. सरतेशेवटी परमेश्वराला पूर्णपणे शरण जाणे आहे.  कुठलीही पूजा विधि केल्यानंतर अखेरीस "तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु।" असे म्हणून त्या सत्कर्माचे फळसुद्धा परमेश्वराला देऊन टाकले जाते. हा निष्काम कर्मयोगाचा प्रकार आहे. भगवद्गीतेमध्ये सत्व,रज,तम वगैरे गुण आणि प्रवृत्ती, वर्ण, आश्रम वगैरे सांगून त्यानुसार आपापला धर्म ओळखून तसे वागावे वगैरे सांगून झाल्यानंतर शेवटी अठराव्या अध्यायात "सर्वधर्मान् परित्यज्य मामेकम् शरणम् भज। अहं त्वाम् सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः॥" असे सांगून भगवंताने सांगता केली आहे. परमेश्वराला शरण गेल्यानंतर तो माणसाला त्याला सर्व पापांमधून मुक्त करतो असे आश्वासन दिले आहे. गंमत म्हणजे बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन आणि इस्लाम या सगळ्या धर्मांमध्ये अशाच प्रकारची वचने आहेत.

हा लेख लिहिण्यासाठी मी गूगलवर थोडीशी शोधाशोध करून काही माहिती मिळवून ती इथे दिली आहे. ती मला पूर्णपणे समजली किंवा पटली आहे असे माझे म्हणणे नाही.

(समाप्त)