Saturday, August 16, 2008

सात घोडचुका (उत्तरार्ध)


महात्मा गांधींनी सांगितलेल्या गोष्टी यापूर्वीही सांगितल्या गेल्या होत्या. संस्कृत सुभाषिते, संतांचे अभंग, दोहे वगैरेमध्ये तशा अर्थाचा उपदेश आढळेल, बायबलमध्येसुद्धा तत्सम संदेश दिसतील. सगळ्यांना त्या माहीत असूनसुद्धा लोक त्या चुका करतात या गोष्टीचे समर्थन करता येणार नाही पण त्याची कारणे शोधता येतील.

१. काम न करणा-याकडील संपत्ती : कमीत कमी कष्ट करून जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी मानव युगानुयुगे प्रयत्न करीत आला आहे. अग्नी आणि चक्राच्या शोधांपासून तो आजच्या नॅनोटेक्नॉलॉजीपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानातील बहुतेक प्रगती याच प्रयत्नांमधून होत गेली आहे हे सत्य नाकारता येणार नाही. शक्य तेवढे कष्ट वाचवणे हा मनुष्यस्वभाव आहे. यालाच 'कार्यक्षमता' असे गोंडस नांव दिले गेले आहे. अजीबात काम न करता भरपूर संपत्ती मिळवणे हे त्याचे एक टोक असेल. श्रीमंत माणसानेसुद्धा रिकामे बसू नये, पण सर्वसामान्य माणूस मुख्यतः आपल्या जीवनातील गरजा भागवण्यासाठी काम करतो हे देखील खरे आहे. ज्या माणसाला तशी आवश्यकता नसेल, दुस-या कोणाची चाकरी करणे पसंत नसेल, व्यवसाय सांभाळण्याची कुवत नसेल, साहित्य संगीत कला आदीची आवड नसेल त्याने काय काम करावे हा देखील एक प्रश्न आहे.

२. सदसद्विवेकबुद्धी न बाळगता सुखोपभोग : प्रत्येक आनंदाच्या क्षणी तो कशामुळे निर्माण झाला याचा विचार सहसा कोणी करीत नाही. दिवाळीतले फटाके उडवतांना ते बनवणारे शिवकाशी येथील
बालमजूरांचे चिमुकले हांतडोळ्यासमोर आले तर त्यातली मौज नाहीशी होईल आणि सुग्रास अन्नाचा आस्वाद घेतांना जगात कोठे तरी शेतमजूरांचे भूकबळी पडत असल्याची जाणीव झाली तर ते अन्न गोड लागणार नाही. सदसद्विवेकबुद्धीची टोचणी सतत लागून राहिली तर जीवनातील रस निघून जाईल. हांतून कळत नकळत घडून गेलेली एखादी चूक जन्मभर छळत राहील. तसे होऊ नये यासाठीच कदाचित विस्मरणाचे वरदान माणसाला मिळाले आहे. शिवाय ऐशोआराम करतांना त्यात डुंबून जाण्यात खरी मजा असते. "लुत्फ-ए-मय तुझसे क्या कहूँ ऐ जाहिल, हाय कंबख्त तूने पीही नही।" किंवा "होशवालोंको खबर क्या बेखुदी क्या चीज है।" या ओळी त्यामुळेच लोकांना आवडतात. जसा अंमली पदार्थांचा नशा चढतो तसाच कोठल्याही आवडत्या गोष्टीचा कैफ चढू शकतो, मग त्या ढोलकीवरच्या थापा असतील किंवा चमचमीत मेजवानी असेल. थोड्या क्षणापुरता कां होईना, पण सारासार विवेक आपल्याआप बाजूला सारला जातो.

३. चारित्र्याची जोड नसलेले ज्ञान : सर्वच प्राणीमात्रांना त्यांच्या ज्ञानेंद्रियांकडून सतत आजूबाजूला घडणा-या गोष्टींची माहिती प्राप्त होत असते आणि त्यांच्या बुद्धीमत्तेनुसार त्या संदेशांचे आकलन होत असते. माणसाची निरीक्षणशक्ती, ग्रहणशक्ती, आकलनशक्ती, विचारशक्ती आणि स्मरणशक्ती उच्च दर्जाची असल्यामुळे त्याचे सखोल ज्ञानात रूपांतर होते. आजच्या युगात टेलीव्हिजन व इंटरनेटसारखी माध्यमे मिळाल्यानंतर त्याला मिळू शकणा-या माहितीची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढली आहे. स्वतःपुरता विचार करणे हा एक स्वसंरक्षणाचा भाग असल्यामुळे तो निसर्गतःच सर्वांना प्राप्त होतो, पण इतरांचा विचार करणे, त्यांचा आदर करणे, विनय, संयम वगैरैसारख्या गोष्टी संस्कारातून मिळतात. हे संस्कारसुद्धा त्याला आजूबाजूच्या व्यक्तींकडून मिळत असले तरी कोणावर कशाचा जास्त प्रभाव पडेल ते सांगता येणार नाही. राम आणि रावण किंवा पांडव आणि कौरव या एकमेकांच्या समकालीन आणि समान स्तरावरील लोकांना ज्ञान आणि संस्कार यांच्या प्राप्तीच्या समान संधी उपलब्ध असतांना त्यांचे चारित्र्य वेगवेगळे कां झाले याचे काय स्पष्टीकरण देता येईल? संयम आणि विवेक या दोन गोष्टी कमी अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या चारित्र्यांमध्ये फरक पडला असे म्हणता येईल. या गोष्टींवर पूर्ण नियंत्रण ठेवणे शक्य असते कां?

४. नैतिकतेवाचून व्यापार : व्यापारउद्योगातील नीतीमत्तेबद्दल नेहमी दोन मुख्य तक्रारी असतात, त्यातील नफाखोरी आणि ग्राहकाची फसवणूक. निरनिराळ्या उत्पादकांकडून कोणताही माल विकत घ्यायचा आणि वेगवेगळ्या उपभोक्त्यांना तो विकायचा हे व्यापाराचे मुख्य स्वरूप असते. जो माल ज्या वेळी व ज्या ठिकाणी उपलब्ध असेल तेंव्हा तो घेऊन ठेवावा लागतो आणि जेंव्हा ग्राहकाला तो हवा असेल तेंव्हाच त्याला विकता येतो. दरम्यानच्या काळात तो सांभाळावा लागतो, त्याच्या वाहतुकीवर खर्च येतो आणि त्यात व्यापा-याने केलेली गुंतवणूक अडकलेली असते. हे महत्वाचे काम करण्यासाठी तो नफ्याच्या स्वरूपात मोबदला घेतो. व्यापारउदीम सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी त्यात फायदा होणे हे अत्यावश्यक असते. त्याने तो किती घ्यावा हे कसे ठरवणार? मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये ते बाजारभावानुसार ठरते. कोणत्याही धंद्यात भरपूर फायदा होतांना दिसताच त्यात नवीन विक्रेते शिरतात आणि मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला की किंमती कमी होतात. फायदा कमी होतांना दिसताच कांही विक्रेते दुसरीकडे वळतात आणि पुरवठा कमी झाल्यामुळे किंमती वाढतात. याच प्रमाणे कोठल्याही वस्तूची मागणीसुद्धा किंमतीच्या विरुद्ध दिशेने वरखाली होत असते. यामुळे नफाखोरीला आपोआप आळा बसत असतो. एकाद्या व्यापा-याने कल्पकतेने आपला खरेदीवरील खर्च इतरांपेक्षा कमी ठेवला तरीही त्याला बाजारभावाप्रमाणे इतरांइतकीच किंमत मिळाली तर त्याचा जास्त नफा होणारच. ही गोष्ट नैतिक म्हणायची की अनैतिक? ब-याच वेळा अवास्तव जाहिरातींमधून ग्राहकाची फसवणूक होते असे दिसते. पण ग्राहकाने आपल्याकडे वळावे असे कोठल्याही विक्रेत्याला वाटणारच. इतरांच्या स्पर्धेला तोंड देऊन आपले अस्तित्व टिकवून धरण्यासाठी तो आपले गुण अतीशयोक्त पद्धतीने मांडतो आणि दोष लपवून ठेवतो. यात नीती अनीतीच्या सीमारेषा पुसट वाटतात.

५. मानवताशून्य विज्ञान : विश्वामधील घटक आणि घटना यांचा अभ्यास करून त्यांच्याबद्दल माहिती गोळा करणे हा विज्ञानाचा भाग आहे आणि त्या माहितीचा आपल्याला हवा तसा उपयोग करून घेणे हा तंत्रज्ञानाचा. माहितीचे एक दालन उघडून ती आत्मसात करतांना समोर अनेक बंद दरवाजे दिसतात. वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ वगैरे लोक ते उघडून पलीकडच्या दालनात प्रवेश करतात. पुढच्या दालनात काय दिसणार आहे हे ब-याच वेळा त्यांना ठाऊक नसते. त्यामुळे त्यात मानवता किंवा पाशवीपणाचा प्रश्नच येत नाही. मिळालेल्या माहितीचा उपयोग कसा होतो ते तो उपयोग करणारा ठरवतो. त्यातसुद्धा बरीच संदिग्धता आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास अल्ट्रासॉनिक लहरींचा वापर करून माणसाच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांची तपासणी करणे हे रोगाच्या निदानासाठी विकसित केले गेले आणि त्या कारणासाठी त्याचा उपयोग करून आज कोट्यवधी रुग्णांना जीवनदान मिळत आहे. पण त्याच तंत्राच्या उपयोगाने गर्भजलपरीक्षण करून भ्रूणहत्या करण्याचे पाशवी कृत्यसुद्धा मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे. ते करून घेणा-या मातेला त्यापासून कसलाही आनंद मिळत नाही, पण असह्य वाटणारे संभाव्य दुःख टाळण्यासाठी ती ते करून घेते हाही एक वेगळा मुद्दा त्यात येतो. कायद्यानुसार कोठे ते क्षम्य असेल किंवा कोठे तो अक्षम्य गुन्हा असेल, पण आपण ज्या बालकाचे संगोपन करू शकणारच नाही अशी त्याच्या मात्यापित्यांची खात्री पटली असेल त्याला जन्माला येऊ न देणे याला मानवतेच्या दृष्टीकोनातून काय
म्हणायचे यावर एकमत होणार नाही. हे एक उदाहरण झाले. युद्धामध्ये संहारक अस्त्रांचा वापर करावा की नाही हा दुसरा होईल कारण युद्ध जिंकणे हे महत्वाचे आहे की ते कसे लढावे याला अधिक महत्व आहे यावर नेहमीच दुमत असते.

६. त्यागाविना भक्ती : भक्ती ही मनात निर्माण होणारी भावना आहे. लहानपणी मुलांच्या मनात आपले आईवडील व इतर गुरुजनांबद्दल जो आदरभाव असतो तो भक्तीच्या जवळपास असतो. त्यांचेच पाहून ती परमेश्वर, साधूसंत यांविषयी भक्तीभाव बाळगू लागतात. मोठे होता होता ती जेंव्हा स्वयंप्रज्ञ होतात तेंव्हा त्यांच्या अनुभवाप्रमाणे त्यात बदल होतात. कांही श्रध्दास्थाने नाहीशी होतात तर कांही नवीन निर्माण होतात. पण याचबरोबर फायद्यावर नजर ठेऊन, किंवा इतरांना दाखवण्यासाठी भक्तीचा आव आणणेसुद्धा सुरू होते. कोणी प्रसादाच्या आशेने पूजेत सहभागी होतात तर कोणी दक्षिणा मिळवण्यासाठी देवपूजा करतात. कोणी आपण अमक्या तमक्याचा फॅन आहे असे म्हणत मिरवतात, तर कोणी महानुभावाच्या पंथात सामील होऊन त्यातून स्वतः पुढे येऊ पहातात. अशा भक्तांना देव प्रसन्न होत नाही की त्यांच्या
गुरूकडून त्यांना विद्या प्राप्त होत नाही. पण ख-या भक्तीबरोबर समर्पणाची भावना असावी लागते ती कोठून आणणार? मनात कोठलाच उद्देश न बाळगता उपासना करणे साधारण माणसाला शक्य तरी आहे कां? देवाची उपासना करण्यासाठी त्यामधून रोजच्या जीवनात मनासारख्या गोष्टी घडण्यापासून ते स्वर्गलोक किंवा मोक्ष, मुक्ती यासारखी आकर्षणे लागतात.

७ तत्वांवर न आधारलेले राजकारण : आपमतलबी लोकांच्या स्वार्थी विचारानुसार राजकारणामधील धोरणे ठरता कामा नये, कारण त्याचे दूरगामी परिणाम सर्व जनतेला भोगावे लागतात हे अगदी आदर्श असले तरी तसे प्रत्यक्षात घडत नाही. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी ते व्यक्तीनिष्ठ करण्याऐवजी तत्वनिष्ठ करण्याचे प्रयत्न होतच असतात. पण कोणती तत्वे पाळायची यांत तरी एकवाक्यता कुठे असते? राजेशाही असावी की लोकशाही? लोकशाहीमध्ये सरसकट सगळ्यांना हक्क असावेत की फक्त योग्य व्यक्तींनाच
ते द्यावेत? भांडवलशाही अर्थव्यवस्था योग्य की समाजवाद की साम्यवाद? अशासारख्या अनेक प्रश्नांवर जगभर उहापोह होत गेला आहे. कधी कोणाला एक मत पटते तर कधी दुसरे. कधी एका प्रकारची राज्यव्यवस्था सुरळीतपणे चालते तर कधी ती क्रांतीकारक रीतीने उलथून टाकली जाते. म्हणजे सगळ्याच तत्वांमध्ये कांही चांगला भाग असतो तर कांही धोके असतात.

वरील विवेचन पाहिल्यावर असे वाटेल तर महात्माजींनी दाखवलेल्या सात घोडचुका टाळणे सहज शक्य तर नाहीच, पण त्यांबद्दल मनात शंका निर्माण होतात. पहिल्या परिच्छेदात लिहिल्याप्रमाणे या घोडचुका करणा-या लोकांचे मला समर्थन करावयाचे नाही. पण मला असे वाटते की 'विदाउट' हा नकारात्मक शब्द वापरून घोडचुका म्हणण्याऐवजी 'विथ' हा शब्द वापरून त्यांचीच मार्गदर्शक तत्वे बनवली तर त्यांचे यथाशक्ती पालन करणे कदाचित थोडे सोपे होईल.

1 comment:

HAREKRISHNAJI said...

किती योग्यच लिहीले आहेत