Wednesday, December 30, 2015

मित्र, यार, दोस्त आणि फ्रेन्ड्स (उत्तरार्ध)

पूर्वीच्या काळात  काही लोक पेन फ्रेन्ड्शिप किंवा पत्रमैत्री करायचे. ते लोक आपल्या मनातले विचार, सुखदुःखे, कल्पना, आपली तत्वे, आपले बरे वाईट अनुभव वगैरे नाजुक गोष्टी स्वतःच्या जवळच्या लोकांशी बोलून व्यक्त करण्याऐवजी किंवा त्याशिवाय सवडीने कागदावर लिहून काढत आणि दूर देशी असणा-या मित्रांना किंवा मैत्रिणींना पत्राद्वारे पाठवून देत असत. तिकडूनसुद्धा त्या पत्राला असाच उत्साही प्रतिसाद मिळाला तर मग ती मैत्री दृढ होऊन वाढत जात असे. कधी कधी हे पत्रमित्र प्रत्यक्षात भेटलेलेही नसत किंबहुना ते त्यांना शक्यही होत नसावे, पण त्यांच्या संदेशांची देवाणघेवाण मात्र पत्रांद्वारे दीर्घकाळ चालत असे. अशा प्रकारच्या मैत्रीविषयी मी फक्त पुस्तकांमध्येच वाचलेले आहे, मला कधीच त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला नाही किंवा इतर कोणाचा पहायलादेखील मिळाला नाही.

माझे वडील रिटायर व्हायच्या पंधरा वीस वर्षांपूर्वी कधी तरी एका बदलीच्या गावी गेलेले असतांना त्या खेड्यात रहात असलेल्या एका गृहस्थांच्या संपर्कात आले होते असे मी ऐकले होते. माझ्या आठवणीत तरी त्या दोघांची कधीच गांठभेट झाली नव्हती, मी त्या गृहस्थांना कधीच पाहिलेले नाही किंवा ते खेडेही पाहिले नाही. पण माझे वडील रिटायर होऊन गेल्यानंतरसुद्धा काही वर्षे या जुन्या स्नेह्याची पत्रे नियमितपणे येत असत. त्यांचेकडून आलेली पत्रे माझ्या वडिलांना वाचून दाखवायचे काम मात्र माझ्याकडे यायचे. त्यांच्या पोस्टकार्डामध्ये फक्त तिकडची खुषाली कळवलेली असायची आणि इकडची चौकशी केलेली असायची. त्या पत्रलेखनाला फारसे वाङ्मयीन किंवा साहित्यिक मूल्य नसेलही, पण त्यामधून व्यक्त होत असलेली त्या दोघांमधली खूप जवळीक मात्र मलासुद्धा चांगली जाणवत असे. या मित्राबद्दलचे माझे कुतूहल वाढतच गेले आणि अखेरपर्यंत ते एक गूढ राहिले.

माझ्याकडे घरी असलेल्या पत्याच्या वहीतले बहुतेक सगळे पत्ते आमच्या नातेवाईकांचेच असायचे. टेलिफोन नसतांनाच्या काळात त्यांच्याशी पत्रव्यवहार होत असे. त्या वहीतली फारच कमी नांवे माझ्या मित्रांची असायची. तीसुद्धा जर मला कधी काळी त्यांच्या गावी किंवा घरी जायचे असले तर तेंव्हा उपयोगी पडावी म्हणून लिहून ठेवलेली होती. त्यातल्या कुणालाही मी पत्रे लिहून पोस्टाने पाठवली नाहीतच, त्यांच्याकडूनही कधी आली नाहीत. एकंदरीतच मी टपालखात्याला फारसे कष्ट दिले नाहीत.

अलीकडच्या काळात इंटरनेटचा प्रसार झाल्यानंतर मात्र हे चित्र पार पालटले. माझ्या ईमेल्सवरील काँटॅक्ट्सची संख्या वाढतच गेली आणि त्यात मात्र काही नातेवाईकही असले तरी त्यातली बहुतांश नावे मात्र माझ्या मित्रांचीच असायची. मी काही याहू किंवा गुगल ग्रुप जॉइन केल्यावर तर मला एकदम अनेक मित्र मिळाले. मनोगत, मिसळपाव, उपक्रम, ऐसी अक्षरे यासारख्या संकेतस्थळांवर माझे नाव नोंदवले होते. तिथे काही लिहिल्यास त्यावर लगेच अनेक शेरे किंवा प्रतिक्रिया येत, मी ब्लॉग लिहायला सुरू केल्यावर त्यावरही अनेक प्रतिसाद यायला लागले. या सर्वांमधून मला काही नवे मित्र मिळाले.  फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सअॅप ही तर खास सोशल नेटवर्कची साईट्स आहेत. माझे आधीपासून असलेले बरेचसे मित्र यात येत गेलेच, शिवाय कित्येक अनोळखी मित्रांची अनाहूत आमंत्रणे या नेटवर्क साईट्समधून येत असतात. मीच संपूर्ण खात्री पटल्याखेरीज कोणाला मित्र करून घेत नाही. तरी सुद्धा माझ्या या जालमित्रांची संख्या आता काही शेकड्यांमध्ये गेली आहे. तीन चार दशकांपूर्वी दूरावलेले, म्हणजे अक्षरशः हजारो किलोमीटर दूर अंतरावर गेलेले माझे काही जुने मित्र मला पुन्हा कधी भेटतील अशी मला आशाच वाटत नव्हती, पण या नव्या माध्यमांमधून मला ते पुन्हा एकदा सापडले आणि माझ्या संपर्कात आले, तेंव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.

मी प्रत्यक्षात कोणाच मित्राला हाताने पत्र लिहून पाठवले नसले तरी या आभासी जगातल्या मित्रांमध्ये मात्र रोजच भरपूर पत्रव्यवहार होत असतात. एकाच वेळी एका क्लिकमधून एकच संदेश अनेकांना पाठवता येतो, त्याला अवांतर मजकूर, चित्रे किंवा ध्वनि सहजपणे जोडता येतात आणि ते सगळे क्षणार्धात अनेक ठिकाणी जाऊन पोचतात, लगेच त्याची उत्तरे येऊ शकतात आणि आपण ते आणखी कोणाला पाठवू शकतो वगैरे त्याचे अचाट फायदे आहेत. आता तर हे सगळे हाताच्या मुठीत धरता येईल इतक्या लहानशा यंत्रामधून आणि आपण जिथे असू तिथूनच करता येणे शक्य झाले आहे. आपल्या आयुष्यात असे काही आपल्याला अनुभवायला मिळेल अशी मी कल्पनासुद्धा केली नव्हती. अर्थातच यामुळे मित्र या शब्दालाच नवा अर्थ, नवे परिमाण लाभले आहे.

या आभासी जगातल्या मित्रांमध्येसुद्धा विविध प्रकार असतात. त्यातले बरेचजण आधीपासूनच आपले खरे खुरे मित्र असतात पण दूर रहात असतात. त्यांच्याशी केंव्हाही लगेच संपर्क साधणे  आता नव्या माध्यमांमधून सहज शक्य झाले आहे. आपल्याला गरज पडली की ते लगेच धावून येऊ शकतात, तसेच आपणही वेळेवर त्यांच्या मदतीसाठी काही करू शकतो. याविरुद्ध काही जालमित्र  आपल्याला फक्त इंटरनेटवरच भेटतात. त्या वेळी ते लोक खूप जवळिकेने आपले मनोगत व्यक्त करतात, सल्ले देतात, विचार मांडतात, चर्चा करतात, वादही घालतात. दूर राहूनच त्यांच्याशी केलेल्या या संवादामधून आपल्या सामान्यज्ञानाच्या कक्षा विस्तारतात, आपल्याला उपयुक्त माहिती मिळतेच, वैचारिक समाधान मिळते, आपली बौद्धिक भूक प्रज्ज्वलित होते किंवा भागते, भावनात्मक आनंद मिळतो. विशेषतः निवृत्त आयुष्यात उपलब्ध झालेला माझा बराचसा रिकामा वेळ या मित्रांशी संवाद साधण्यात चांगला जातो किंवा सत्कारणी लागतो.

ब्लॉग्ज किंवा संकेतस्थळांवर भेटणारे काही मित्र तर या आभासी जगतात टोपणनावाने वावरत असतात. त्यांनी पांघरलेल्या बुरख्यामागील व्यक्ती पुरुष आहे की स्त्री, ती तरुण आहे की वृद्ध, ती कोणत्या सामाजिक किंवा शैक्षणिक स्तरातली आहे यातले काहीच आधी कळत नाही, पण तरीही त्यांच्या लेखनामधून ते मित्रत्वाने वागत असतात. अशा लोकांशी तात्विक चर्चा करणे किंवा वितंडवाद घालणे सोपे असते आणि त्यात मजाही येते, कारण तो अनामिक मित्र दुखावला जाण्याची काळजी करायची गरज नसते.  त्यांचा समावेश मित्रांमध्ये करता येईलच का नाही अशी शंका येते, पण या लोकांचीही संमेलने भरतात, त्याला हजेरी लावली की आपल्याला बुरख्यामागले चेहेरे पहायला मिळतात.  त्यातून काही लोकांशी खरी मैत्री जमते.

मैत्री, दोस्ती, यारी, फ्रेन्ड्शिप यांच्या असंख्य छटा असतात, त्यातल्या काही दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न या भागात केला आहे.  

Friday, December 18, 2015

मित्र, यार, दोस्त आणि फ्रेन्ड्स (पूर्वार्ध)श्रीकृष्ण आणि सुदामा ही बालमित्रांची जोडी प्रसिद्ध आहे. जिवलग मित्रांच्या जोडगोळीना नेहमी त्यांची उपमा दिली जाते. सगळ्या पौराणिक चित्रांमध्ये अगदी छोट्या बाळकृष्णाला देखील छान इवलासा पितांबर नेसवला जात असला तरी सुदामा, पेंद्या आदि त्याच्या सवंगड्यांना बहुधा लंगोटीच नेसवलेली दिसते. कदाचित यावरूनच 'लंगोटीयार' हा शब्द प्रचारात आला असावा. पुढच्या पिढीतल्या मुलांना लंगोटी हे वस्त्र पहायलाही मिळणार नाही. तेंव्हा वयाने कदाचित याच्याही मागे जाऊन 'डायपर फ्रेंड्स' असा नवा शब्दप्रयोग रूढ होईल.

मी शाळेत शिकायला जाण्याच्या आधीपासूनचे माझेही काही लंगोटीयार होतेच. आम्ही साधारणपणे एकाच काळात अर्धी चड्डी घालायला लागलो होतो आणि शालेय शिक्षण संपेपर्यंत बहुधा हाफ पँटच घालतही होतो. पुढे मी कॉलेजशिक्षणासाठी आमचे गांव सोडून पुण्यामुंबईकडे गेलो तसे माझे बालमित्रही चहू दिशांना पांगले गेले.  मी आधी दोन वर्षे मुंबईला सायन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन इंटरमीडिएटची परीक्षा पास केल्यानंतर पुण्याला इंजिनियरिंगला गेलो. यामुळे दोन वर्षांमध्ये मुंबईला मिळालेले मित्रही नंतर पारखे झाले आणि पुण्याला गेल्यानंतर तिथे नवीन मित्र जोडले. त्यानंतर पुन्हा आमची फाटाफूट होऊन मी नोकरीसाठी  मुंबईला आलो. कॉलेजमधले इतर मित्र कुठे कुठे गेले ते ही लगेच समजले नाही. या सगळ्या घटना  १९६० च्या दशकात घडल्या.

त्या काळात सेलफोन, इंटरनेट, ई मेल, फेसबुक, ट्विटर, वॉट्सअॅप यातले काहीच नव्हते. ट्रिंग ट्रिंग करणारा साधा टेलीफोनसुद्धा माझ्या बापुड्याच्या आवाक्याबाहेर होता. पोस्टाने पत्र पाठवणे हा कोणाशीही संपर्क साधण्याचा एकमेव मार्ग असायचा आणि त्यासाठी आधी कोणाचाही नवा पत्ता तरी कळायला हवा. शिवाय मी नव्या जागी गेल्यावर तिथले वेगळे वातावरण समजून घेऊन त्यात कसेबसे रुळण्याकडेच माझे सगळे लक्ष वेधलेले असायचे आणि त्या कामात रोजच विविध प्रकारच्या अडचणीही येत असत. त्यांना सामोरे जाऊन सोडवण्यातच माझा बहुतेक सगळा वेळ आणि शक्ती खर्च होत असे. माझ्या इतर मित्रांचीही गत यापेक्षा वेगळी असायचे कारण नव्हते. या सगळ्या कारणांमुळे माझे बालमित्र तसेच कॉलेजमधलेही बहुतेक मित्र यांच्याशी नंतर फारसा संपर्क राहिला नाही आणि ते हळूहळू दुरावत विस्मरणात चालले गेले. नंतरच्या काळात कधीतरी अचानकपणे एकाद्या जुन्या काळातल्या मित्राची कुठे तरी गाठ पडली की जुन्या आठवणी ताज्या होत, एकमेकांचे पत्ते घेतले जात पण प्रत्यक्ष पत्र लिहायला बसण्यापूर्वी ते चिठोरे हरवून जात असे. अशा प्रकारे तो मैत्रीचा दुवा सांभाळून ठेवणे कठीणच होत असे.

मैत्रीचे बंध एकदा का जुळले की ते कायमसाठी अगदी मजबूत असतात असे सांगितले जाते. यावर सिनेमा नाटकांमध्ये अनेक संवाद आणि गाणी असतात आणि ती तुफान लोकप्रियही होतात. पण निदान मला तरी याबाबतीत जरा वेगळे अनुभव आले. "यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी।" असे म्हणत खरोखरच कुणावर जीव ओवाळून टाकणारा मित्र माझ्या नशीबात नव्हता किंवा माझ्या पाहण्यातही कधीच आला नाही आणि आपल्या मनात दुस-या कुणाबद्दल स्वतःपेक्षाही जास्त प्रेमभावना बाळगावी असे मलाही कधी वाटले नाही. जीवनातले कुठलेही नाते, विशेषतः मैत्रीचे नाते टिकवून ठेवण्यासाठी सतत संपर्कात राहणे आवश्यक असते असा माझा अनुभव आहे.

मी नोकरीला लागल्यानंतर मला मिळालेले मित्र मात्र अनेक वर्षे माझ्या संपर्कात राहिले. त्यातले काही जण माझे कार्यालयातले सहकारी होते, काही जणांशी कामानिमित्य भेटणे व बोलणे होत असे तर काही जण आमच्या इमारतीत किंवा आसपास रहात होते. त्यातल्या ज्या लोकांशी माझे पटत होते किंवा आमच्या वेव्हलेंग्थ्स साधारणपणे जुळायच्या त्यांची गणना मित्रांमध्ये होत गेली. त्या लोकांशी माझ्या कामाव्यतिरिक्त काही अवांतर गप्पा गोष्टी होऊ लागल्या. त्यातले ही काही जण बदली होऊन किंवा नोकरी सोडून परगावी गेले, त्यांच्या जागी काही नवीन लोक आले असे होत गेले तरी नोकरीत असेपर्यंत माझा एकंदर मित्र परिवार ब-यापैकी वाढला होता. "समानशीलव्यसनेषु सख्यम्" असे म्हणतात, त्यातले समानशील सखे मला भेटले, पण मला स्वतःलाच कोणतेही व्यसन न लागल्यामुळे मित्र मिळवण्याचा दुसरा मार्ग मात्र मला उपलब्ध नव्हता.

कालांतराने मीच सेवानिवृत्त होऊन नव्या जागी रहायला गेल्यानंतर मात्र माझा मित्रपरिवार झपाट्याने कमी होत गेला कारण आता पूर्वीच्या मित्रांच्या भेटीगाठी होणे दुर्मिळ झाले आणि टेलीफोनवरचे संभाषणही हळूहळू कमी कमीच होत गेले. एक वय उलटून गेल्यानंतर नवे मित्र जोडायची इच्छा व उमेद कमी होत गेल्याने नव्या मित्रांची संख्या वाढणेही कठीणच होते.

.  . . . . . . . . . . . . .   (क्रमशः)
   

Wednesday, December 16, 2015

शस्त्रक्रियेनंतर (उत्तरार्ध)

(या लेखाचा पूर्वार्ध लिहून झाल्यानंतर माझ्यापुढे अनेक वैयक्तिक आणि तांत्रिक अडचणी आल्यामुळे उत्तरार्ध लिहायला उसंतच मिळाली नाही. आता आज त्याला मुहूर्त मिळाला. मध्यंतरीच्या काळात बरेचसे विस्मरणही झाले आहे. यामुळे आता ज्या गोष्टी ठळकपणे आठवतात त्या लिहून काढणार आहे.)

त्या पांढ-या शुभ्र आढ्याकडे पहात मी सुन्नपणे पडून राहिलो होतो, त्यामुळे मला वेळेचे भानच राहिलेले नव्हते. अंगातला ठणका वाढत चालला होता. असा बराच वेळ गेल्यानंतर पुन्हा शिल्पा माझ्याजवळ आली. या वेळी तिच्यासोबत आलेली एक नर्स हातात चहाचा कप घेऊन उभी होती.
शिल्पा म्हणाली, "सकाळपासून तुमच्या पोटात काही नाही, कपभर चहा घ्या म्हणजे थोडी तरतरी वाटेल."
खरे तर मला काहीही खाण्यापिण्याची मुळीसुद्धा इच्छा नव्हती. पोटातले वादळ अजून धिंगाणा घालत होतेच. तरीही शिल्पाच्या आग्रहाखातर मी घोटभर चहाचे एक दोन घोट कसेबसे घशाखाली ढकलले. पण आता पोटातल्या वादळाचे रूपांतर सुनामीमध्ये होऊन माझ्या पोटात जे काही असेल नसेल ते सगळे नाकातोंडामधून वेगाने बाहेर फेकले गेले. माझ्या अंगावरचे कपडे आणि चादर वगैरे पुसून आणि झटकून त्या दोघी परत गेल्या.

मी पलंगावर मुकाटपणे पडून राहिलो होतो. माझे दोन्ही हात बँडेजमध्ये करकचून बांधलेले होते. डाव्या हाताच्या मनगटाच्या जवळच ऑपरेशन केलेले असल्यामुळे बोटांची फक्त टोके बाहेर दिसत होती. उजव्या हाताच्या दंडाजवळ हाडाचे ऑपरेशन केले होते आणि कोप-याला आधीच मोठी जखम झालेली होती, तिचे अनेक टाके घातलेले होते. त्या हाताचे मनगट मात्र मोकळे होते. डाव्या हाताला प्लॅस्टरसकट उभे धरून एका दोरीने स्टँडला बांधून ठेवले होते आणि उजवा हात कोप-यामधून मुडपून स्लीव्हमध्ये घालून गळ्यात अडकवून ठेवला होता. यामुळे दोन्ही हात तर जागच्या जागी खिळलेले होतेच, खांद्यापाशी एक लहानसे भोक पाडून तिथे एक मोठे बँडेज बांधल्यासारखे वाटत होते. माझ्या कॉटच्या बाजूला ठेवलेल्या स्टँडला तीन चार प्लॅस्टिकच्या बाटल्या उलट्या टांगल्या होत्या त्यांचेपासून निघालेल्या रबराच्या पारदर्शक नळ्या माझ्या खांद्याला बांधलेल्या बँडेजशी जोडलेल्या होत्या. मला देण्यात येणारी औषधे तसेच जीवनावश्यक द्रव्ये यांचा पुरवठा त्या नळ्यांमधून माझ्या शरीराला मिळत होता. कॅथेटर लावून आणि डायपर बांधून माझ्या उत्सर्जनाची व्यवस्था केलेली होती. माझ्या पायालासुद्धा अपघातात जखमा झालेल्या होत्याच, आता अंगात त्राणही नव्हते. यामुळे मी उठून बसूही शकत नव्हतोच, फक्त पायांचे तळवे आणि बोटे हलवू शकत होतो आणि हाताची बोटे वळवण्याचा प्रयत्न करून शकत होतो. मी एवढ्या हालचाली मात्र सारख्या करत रहाव्यात असे कोणीतरी मला सांगून गेले.

आणखी बराच वेळ गेला तोपर्यंत पोटातले ढवळणे कमी झाले होते. बहुधा त्या नळ्यांमधून माझ्या शरीरात गेलेल्या औषधांचा परिणाम झाला असावा, पण मला अजूनही काही खावे असे वाटतच नव्हते. आता माझ्यासाठी भोजन आणले गेले. ती एक खिरीसारखी सरभरीत अशी पण बेचव खिचडी होती. अन्न हे पूर्णब्रह्म असे म्हणत मी ते अतिसात्विक अन्न खाण्याचा बराच प्रयत्न केला, पण बाउलमधले अर्धेसुद्धा खाऊ शकलो नाही. माझ्यासाठी हे जेवण घेऊन आलेली शिकाऊ नर्स मात्र अन्नाच्या नासाडीवर माझी शाळा घेत होती. कोणतेही अन्नपदार्थ तयार करण्यासाठी शेतात राबणा-या शेतक-यांपासून ते भटारखान्यातल्या आचा-यांपर्यंत किती लोकांनी केवढे परिश्रम घेतलेले असतात, त्यात देशाची आणि विश्वाची किती संसाधने खर्च झालेली असतात, आपण हे सगळे वाया घालवणे योग्य आहे का ? वगैरे वगैरे वगैरे. हेच संवाद या पूर्वी मी कित्येक लोकांना ऐकवले असतील, आज ते ऐकण्याची पाळी माझ्यावर आली होती.

हे सगळे चालले असतांना मी फोर्टिस हॉस्पिटलच्या सर्जिकल आय सी यू मध्ये होतो. सगळ्या बाजूंनी बंदिस्त असलेल्या त्या जागेत दिवस किंवा रात्र हेसुद्धा समजत नव्हते. पण बहुधा दुसरा दिवस उजाडून वर आला असावा हे सकाळचा नाश्ता आल्यानंतर कळले. दुपारच्या सुमाराला आमचे सर्जनसाहेब आले. त्यांनी थोडी पाहणी आणि तपासणी केली आणि माझी प्रगति व्यवस्थितपणे चालली असल्याचा अभिप्राय देऊन मला आता वॉर्डमध्ये हलवायला हरकत नसल्याचा निर्णय दिला. त्यानंतर कोणत्या खोलीत एकादी जागा रिकामी आहे याची शोधाशोध केली गेली. ऑपरेशन व्हायच्या आधी मला ज्या कॉटवर अॅडमिट करून ठेवले होते, तिथे आता एक नवा रुग्ण आला होता. दुस-या एका कॉटवरच्या पेशंटला डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर तिथले बेडशीट्स वगैरे बदलून मला तिथे हलवण्यात आले. ऑपरेशनसाठी जातांना मी व्हीलचेअरवर बसून गेलो होतो, परत येतांना मात्र स्ट्रेचरवरून आणणे आवश्यक होते.

या वेळी मी पूर्णपणे परस्वाधीन झालो होतो. दिवसभर आणि रात्री माझी सर्व प्रकारची सेवा शुश्रुषा करण्यासाठी दोन अटेंडंट्स ठेवलेले होतेच, शिवाय माझी दोन्ही मुले सारखी ये जा करत होती. पण हॉस्पिटलच्या नियमांप्रमाणे पेशंटच्या सोबत एका वेळी फक्त एकाच अटेंडंटने राहण्याची मुभा होती. यासाठी त्यांनी पास देऊन ठेवले होते आणि कडक सिक्यूरिटी व्यवस्था असल्यामुळे पास असल्याशिवाय कोणाला लिफ्टमध्ये पण जाऊ देत नव्हते. पासधारकाने खाली येऊन लॉबीत आलेल्या व्यक्तीला पास दिला तरच तो वर माझ्या खोलीत येऊ शकत होता. यात दहा पंधरा मिनिटांचा तरी वेळ जात होता.  पण माझ्या दिमतीला चोवीस तास कोणी ना कोणी हजर राहणेही आवश्यक होते आणि वेळोवेळी डॉक्टरांना भेटणे किंवा गरजेचे सामान आणून देणे वगैरेसाठी आणखी एकाद्या माणसाला अधून मधून यावे लागत होते. यासाठी माझ्या मुलाने एक सविस्तर पत्र लिहून डॉक्टरांची तात्पुरती परवानगी घेतली. त्यामुळे बरीच सोय झाली. रात्रीच्या वेळी मला पूर्णपणे अनोळखी अटेंडंटवर सोपवणे माझ्या मुलाला फारसे पटत नव्हते. त्याने स्वतःच रात्रपाळीला माझ्यापाशी थांबायचे ठरवले.

माझ्यावर ऑपरेशन्स केलेल्या जागांमधून एक एक नळी बाहेर काढून लहानशा डब्यांना जोडून ठेवली होती. याला ड्रेन म्हणत. या ड्रेन्समधून किती गाळ बाहेर पडत आहे याची रोज पाहणी केली जात होती. एक दोन दिवसातच त्यातली गळती थांबल्यावर त्या डब्या काढून टाकल्या गेल्या. आणखी एक दोन दिवसांनी कॅथेटर काढून टाकण्यात आले आणि पॉटची व्यवस्था केली गेली.  मला नळ्यांमधून देण्यात येणारी औषधे कमी कमी होत गेली. खांद्यावर जोडलेली सेंटरलाईन काढून उजव्या हाताच्या मनगटापाशी आयव्ही लावले गेले. गरज पडेल तेंव्हापुरताच त्याचा उपयोग होऊ लागला. अशा प्रकारे मला कॉटशी बांधून ठेवलेलले बंध सुटत गेले. माझी अवस्था बुटक्या लोकांनी बांधून टेवलेल्या गलिव्हरसारखी झाली होती, त्यातून मोकळे झाल्यावर केवढा तरी आनंद झाला.

मला हातावर जोर देणे शक्यच नव्हते आणि त्याशिवाय उठून बसताही येत नव्हते. हॉस्पिटलमधल्या कॉटचा मागचा भाग शक्य तितका वर करून आणि माझ्या पाठीला आधार देऊन बसवणे सुरू झाले. त्यानंतर खांद्याच्या खाली धरून उभे करता येऊ लागले.  मुख्य म्हणजे मी आता अटेंडंटच्या आधारे टॉयलेटला जाऊ शकत होतो. रूममध्ये येऊन दोन तीन दिवस झाल्यानंतर रोज एक फिजिओथेरॅपिस्ट येऊन भेटून जायची. आधी तिने एक लहानसे खेळणे हातात दिले आणि त्यातले गोळे फुंकर मारून उडवायची प्रॅक्टिस करवून घेतली. माझा श्वास पुरेसा नीट चालत आहे याची खात्री झाल्यानंतर पुढचे व्यायाम करायचे होते. उभा राहिल्यानंतर हाताला धरून मला माझ्या खोलीच्या खिडकीपाशी नेऊन बाहेरचे जग दाखवले. त्यानंतर कॉरीडॉरमध्ये दोन मिनिटे, पाच मिनिटे, दहा मिनिटे असे चालवत धीम्या गतीने पंधरा मिनिटांपर्यंत मजल नेली. त्यानंतर तेवढ्याच वेळात पण गती वाढवत नेऊन जास्त अंतर चालवून आणले. अशा प्रकारे हळूहळू माझ्या अंगातले त्राण वाढत गेले तसा माझा आत्मविश्वास वाढत गेला.

आमचे सर्जन डॉ.यादव दररोज एक फेरी मारून त्रोटक विचारपूस करतच होते. त्यांचा सहाय्यक जरा अधिक तपासणी करून जात असे. हॉस्पिटलचा मेडिकल विभाग इतर अनेक प्रकारच्या तपासण्या करत होता. दररोज दिवसातून ती चार वेळा ब्लड प्रेशर मोजणे ही एक कसरत असायची. दोन्ही हात बँडेजमध्ये असल्याने आणि एका पायाला जखम झाली असल्यामुळे उरलेल्या जागेत कसेबसे ते उपकरण लावून त्यातला आकडा पाहणे सगळ्या नर्सेसना जमत नसे. त्या अंदाजाने काही तरी लिहून ठेवायच्या. मग डॉक्टरांना शंका आली की पुन्हा ते तपासले जायचे हे रोजचेच होते. माझ्या आठवणीप्रमाणे मला थरमॉमीटर लावण्याची वेळ आलीच नाही, पण तपमानाची नोंद मात्र होत असावी.

प्रत्येक आहारापूर्वी रक्तातल्या शर्करेची तपासणी होत असे, पण एवढ्या मोठ्या नामवंत हॉस्पिटलमधले आमच्या वॉर्डमधले त्याचे उपकरण मात्र कधी कधी बेभरवशाचे निघत असे. माझ्या बोटाला सुई टोचून रक्ताचा थेंब बाहेर निघाल्यानंतर ते उपकरण चालत नसल्याचे सिस्टरच्या लक्षात येत असे. मग दुस-या वॉर्डमधून वेगळे ग्लुकोमीटर आणून टेस्ट करून त्यानुसार इन्सुलिनचे प्रमाण ठरवले जात असे. हे सगळे होईपर्यंत आणलेले खाद्यपदार्थ थंडगार होत असत. याबद्दल एक दोनदा  तक्रार करून झाल्यानंतर मी  त्यांना न जुमानता खाणे सुरू केले.  

दररोज अगदी नियमितपणे एक डायटीशियन येऊन मला भेटून जात असे. पण माझ्या फाइलींमध्ये डॉक्टर लोकांनी काय काय लिहून ठेवले होते कोण जाणे. तिच्याकडे माझ्यासाठी फारच कमी पर्याय उपलब्ध असायचे. कसल्याशा प्रकारचा खिचडा हे माझे मुख्य अन्न असायचे. यापूर्वी मला फक्त तांदूळ व मुगाच्या डाळीची खिचडी आणि उपासाची साबूदाण्याची खिचडी एवढेच प्रकार ठाऊक होते. इथे रोज निरनिराळी तृणधान्ये आणि कडधान्ये यांच्या कण्यांच्या मिश्रणांना शिजवून बाउलमध्ये भरून आणले जात असे. आज त्यात ज्वारी आहे की ओट्स की नागली आणि मुगाची डाळ आहे की मसूरीची की उडिदाची याचा सस्पेन्स थोडा चेंज म्हणून बरा वाटायचा. मात्र जेवणाशिवाय इतर वेळी मिळत असलेले निरनिराळ्या फळांचे काप आणि सूप्स मनापासून आवडत. सकाळी नाश्त्यामध्ये आधी नुसतेच ओट्स असत, दोन तीन दिवसांनंतर कधी बिनतेलाचा उत्तप्पा किंवा घावन मिळायला लागला. ब्रेड बटर सँडविच असे काही मिळू शकेल का असे विचारल्यावर त्या विदुषीने सांगितले की व्हीट ब्रेड मिळेल पण त्याला बटर किंवा जॅम लावता येणार नाही आणि सँडविचमध्ये टोमॅटो घालता येणार नाही की बरोबर खायला ऑमलेटही मिळणार नाही. यामुळे मी माझ्या या सगळ्या इच्छा पुढे घरी गेल्यानंतर पूर्ण करण्यासाठी राखून ठेवल्या.  चार पाच दिवस दोन्ही वेळच्या भोजनामध्ये फक्त खिचडा खाऊन झाल्यानंतर माझ्या ताटात एक चपाती अवतरली, त्यानंतर दुसरी, तिसरी यायला लागली. उकडलेल्या भाजीपाल्यांमध्ये थोडे तिखटमीठ पडायला लागले. चांगले रुचकर असे जेवण मिळायला लागेपर्यंत माझी घरी परतण्याची वेळ झाली होती. हॉस्पिटलच्या किचनमधल्या आचा-यांच्या हातालासुद्धा चंव असू शकते एवढे मात्र त्यातून समजले.

माझी पुरेशी प्रगती झाल्यानंतर इंजेक्शन्सची गरज संपून औषधाच्या फक्त गोळ्या आणि सायरप घ्यायचे राहिले, वेळोवेळी बीपी, शुगर वगैरे पहायची आणि रोजच्या रोज डॉक्टरने तपासण्याची गरज राहिली नाही, तेंव्हा मला डिस्चार्ज देण्यात आला. आता मी माझ्या कुटुंबासमवेत राहणार होतो, माझ्यासाठी माझ्या कुटुंबियांना करावी लागणारी दगदग वाचणार होती आणि हॉस्पिटलची बिले भरावी लाणार नव्हती. अजूनही माझे दोन्ही हात बांधलेले असल्यामुळे घरी गेल्यानंतरसुद्धा दोन तीन आठवडे तरी मी पूर्णपणे परस्वाधीनच राहिलो होतो. यामुळे घरी गेल्यानंतरसुद्धा दिवसा व रात्रीसाठी सेवकांची सोय करावी लागलीच.  त्यानंतर हळूहळू सुधारणा होत मी हाताच्या हालचाली करायला लागलो, आधी घरातल्या घरात आणि नंतर बिल्डिंगच्या सभोवती फे-या मारायला लागलो. मला साधारणपणे हिंडण्याफिरण्यायोग्य व्हायला आणखी तीन महिने लागले. तरीही दोन्ही हात पूर्णपणे पूर्ववत झाले नाहीतच. होण्यासारखी सुधारणा आता झाली आहे, उरलेली कदाचित हळूहळू होईल असे डॉक्टरांनी सांगितले आणि हे काम पूर्ण झाले असल्याचे जाहीर केले.