Sunday, August 17, 2008

विठ्ठला तू वेडा कुंभार - भाग २


तूच घडविसी तूच मोडिसी । कुरवाळिसी तू तूच ताडिसी ।
नकळे यातुन काय जोडिसी । देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार ।।
विठ्ठल हा वेडा कुंभार इतर व्यावसायिक कुंभाराप्रमाणे आपली उपजीविका चालवण्यासाठी गाडगी मडकी तयार करून विकत नाही. आपला एक चाळा केल्याप्रमाणे तो वेगवेगळ्या आकारांची, रंगाढंगांची पात्रे बनवतो, त्यांना अंजारतो गोंजारतो, कधी एकादी टिचकी नाहीतर चापटी मारून पहातो आणि अखेर एक जोरात तडाखा मारून त्यांना उध्वस्त करून टाकतो. हा सगळा खेळ करून त्यात त्याला काय मिळतय् कोण जाणे! गीताच्या शेवटच्या कडव्यामध्ये त्या अद्भुत कुंभाराचा वेडेपणा दाखवता दाखवता अखेरच्या ओळीमध्ये कवी त्या रूपकातून बाहेर पडतात. दृष्टीसाठी डोळे देऊन समोर अंधारच दिला तर त्याचा काय फायदा? पण हे करणारा दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष परमेश्वरच असणार हे कोणाच्याही सहज ध्यानात येईल.

गदिमांनी हे अजरामर गीत प्रपंच या चित्रपटासाठी लिहिले आणि सुधीर फडके यांनी त्याला स्वरबद्ध करून स्वतःच ते गायिले आहे. या चित्रपटाचे कथानक खेड्यामधील कुंभारवाड्याच्या पार्श्वभूमीवर घडतांना दाखवले आहे. त्या वातावरणाला साजेशी अशी सोपी शब्दरचना गदिमांनी या गीतात केलेली आहे. त्याची भाषा अस्सल ग्रामीण म्हणता येणार नाही, पण संस्कृतप्रचुर क्लिष्ट शब्द कुठेही वापरलेले नाहीत किंवा उगाचच आपल्या अथांग पांडित्याचे प्रदर्शन केलेले नाही. सुधीर फडके यांनीही एक दोन वेळा ऐकताच सहज लक्षात राहील आणि गायला अवघड असली तरी गुणगुणायला सोपी अशी मधुर चाल या गीताला दिली आहे.

सुरुवातीच्याच चाकाssवरती या ओळीनंतर कोठेही मध्येच पॉज येऊन कोणताही शब्द तुटत नाही, कुठलाही शब्द अवास्तव ताणलेला नाही की घाईघाईत एकात एक गुंतवलेला नाही. अपवादासाठीसुद्धा कोठलाही निरर्थक फिलर गदिमांनी या गाण्यात घातलेला नाही. सुधीर फडक्यांची गायकीच अशी दमदार असते की प्रत्येक शब्दाचा अगदी खणखणीत उच्चार ते नेहमीच करतात. त्यामुळे तो स्वच्छ व स्पष्टपणे ऐकू येतोच, शिवाय गीताचे स्वर त्यातील भाव नेमकेपणे टिपतात. शब्द आणि स्वर यांचा असा अजोड मिलाप झाल्यामुळे हे गाणे चित्रपटातून बाहेर काढले तरी एक स्वतंत्र काव्य म्हणूनसुद्धा सर्व रसिकांना खचित आवडेल. यामधील आशय सर्वस्पर्शी आहे. तो चित्रपटाच्या कथानकापुरता मर्यादित नाही. आजच्या जगात मातीची भांडीच वापरात नाहीत त्यामुळे खेड्यातला कुंभार, त्याची गाडगी, मडकी आणि गाढव यांच्यात शहरात राहणा-या कुणाला इंटरेस्ट वाटेल? तरीसुद्धा हे गीत तुफान लोकप्रिय झाले याचे कारण माडगूळकरांनी मुळातच ते कुंभाराच्या रूपकामधून पण परमेश्वराला उद्देशून लिहिलेले आहे. तेंव्हा त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ आता पाहू.

विश्व निर्माण करणारा आपली कारागिरी अर्थातच साधे लाकडाचे चाक फिरवून त्यावर करणार नाही. तो तर कालचक्र फिरवीत असतो. सकाळ संध्याकाळ आणि दिवस रात्र ज्यामुळे होतात ती पृथ्वीची स्वतःभोवतीची गिरकी असो किंवा उन्हाळा, पावसाळा, हिंवाळा यांचे ऋतुचक्र चालवणारी पृथ्वीची सूर्याभोवती घातलेली प्रदक्षिणा असो, ही त्या जगन्नियंत्याच्या यंत्रामधील छोटी छोटी चक्रे आहेत. अशा अवाढव्य यंत्रामधून तो विश्वामधील असंख्य चराचर वस्तू सदोदित निर्माण करीत असतो तसेच नष्ट करीत असतो. त्याचे हे काम अनादीकालापासून सदोदित अव्याहतपणे चाललेले आहे आणि अनंत कालापर्यंत ते असेच चालत राहणार आहे.
माती, पाणी, उजेड, वारा आणि अवकाश म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतामधून सृष्टीमधील सारी निर्मिती होते अशी धारणा आहे. माती किंवा पृथ्वीमधून आपण अन्न घेतो, ते पाण्यात विरघळून द्रवरूप अवस्थेतच आपल्या शरीरात ग्रहण केले जाते आणि अभिसरणाद्वारे सगळ्या पेशींपर्यंत जाऊन पोचते. आपल्या शरीराच्या प्रत्येक क्रियेसाठी तेज किंवा ऊर्जा ही तर अतीशय आवश्यक असते. ती शरीरात निर्माण करण्यासाठी आपल्याला सतत प्राणवायूचा पुरवठा होत राहणे आवश्यक असते. अशा रीतीने माती, पाणी, उजेड वारा या पसा-यातून माणूस तयार होतो. अवकाश म्हणजे एक रिकामी पोकळी आहे. त्यामधून ऊर्जेखेरीज इतर फारसे कांही मिळत नाही हे माहीत झाले असल्यामुळे त्याचा उल्लेख केला नाही तरी आता चालण्यासारखे आहे. ज्या काळात पंचमहाभूतांची संकल्पना रूढ झाली तेंव्हा मात्र वातावरणाच्या पलीकडे आकाश नांवाचे एक खास प्रकारचे छप्पर आहे असेच समजले जात असे. असे कांही अस्तित्वात असल्यास त्यापासून कांही घटक तरी मानवाला मिळत असतील असे वाटणे साहजीक आहे. या मुख्य घटकांमधून परमेश्वर जी निर्मिती करतो ती किती विस्तृत आहे हे "आभाळचि मग ये आकारा" या शब्दांमधून व्यक्त केले आहे. आभाळासारखाच तिचा अंत किंवा पार लागणार नाही हे दाखवले आहे.


. . . . . . . . . .(क्रमशः)

No comments: