Thursday, August 21, 2008

मादाम कामा

मादाम कामा यांनी एकशे एक वर्षापूर्वी याच दिवशी 'स्वतंत्र' भारताचा ध्वज एका आंतरराष्ट्रीय मेळाव्यात फडकवला होता. त्यामुळे त्या काळातील वृत्तपत्रातून ही खळबळजनक बातमी जगभर पसरली. या साहसी कामगिरीसाठी त्यांचे नांव भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या इतिहासात ठळक अक्षरांनी लिहिले गेले आहेच. त्यांनी तर आपले पूर्ण आयुष्य देशसेवेला वाहून घेतले होते. कदाचित या गोष्टीला योग्य तितकी प्रसिद्धी मिळाली नसेल. त्यांनी जी इतर कामे केली त्यातली बरीचशी त्या काळात लपून छपून गुप्तपणे केलेली होती. त्यातली कांही अखेरपर्यंत गुलदस्त्यातच राहिली असण्याचीही शक्यता आहे. अशी कोणकोणती कामे त्यांनी केली ते थोडक्यात पाहू.

त्यांचा जन्म मुंबईतल्या एका प्रतिष्ठित आणि श्रीमंत पारशी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नांव भिकाजी सोराबजी पटेल असे होते. 'भिकाजी'हे मुलीचे नांव आपल्याला ऐकायला विचित्र वाटेल, पण त्या काळात म्हणजे १८६१ साली त्यांना ते नांव ठेवले गेले होते. त्यांच्या आयुष्यात कधीही भीक मागण्याचा प्रसंग त्यांच्यावर येण्याचा प्रश्नच नव्हता. गडगंज संपत्ती घरात असलेल्या इतर तत्कालीन मुलींप्रमाणे दागदागीने, पोषाख, बंगले, बगीचे, कुत्री, मांजरे वगैरे षौक करून ऐषोआरामात लोळत राहणे त्यांनाही शक्य होते. पण या अत्यंत बुद्धीमान व संवेदनाशील मुलीवर तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीचा खोलवर प्रभाव पडत होता आणि तिला देशभक्तीची ओढ आकर्षित करीत होती. इंग्रजांच्या राज्यात त्यांची अवकृपा ओढवून घेण्याचा धोका पत्करणे तिच्या वडिलांना शक्य नव्हते. तो टाळण्याच्या दृष्टीने त्यांनी रुस्तम कामा या उमद्या, देखण्या आणि श्रीमंत वकीलाबरोबर आपल्या मुलीचे लग्न लावून दिले.

संसाराला लागल्यावर भिकाजीचे लक्ष घरात गुंतून जाईल आणि त्या देशसेवेच्या 'धोकादायक' कार्यापासून दूर राहतील अशी सर्वांची अपेक्षा असणार. पण तसे झाले नाही. त्यात रुस्तम हा इंग्रजांचा कट्टर भोक्ता असल्यामुळे त्या पतिपत्नीमध्ये वारंवार खटके उडू लागले. त्यांचा चारचौघासारखा 'सुखी संसार' होऊ शकला नाही. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे." हे वाक्य लोकमान्य टिळकांनी अजून उच्चारलेले नव्हते. स्वातंत्र्याचा लढा असा सुरू व्हायचा होता. त्या काळात देशासाठी जी कांही सौम्य आंदोलने होत होती त्यात आणि समाजसेवेच्या कार्यात भाग घेणे पतीच्या विरोधाला न जुमानता भिकाजीने सुरूच ठेवले. त्यात मुंबईला प्लेगच्या साथीने पछाडले. तेंव्हा आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. रोग्यांची शुश्रुषा करणे, त्यांना धीर देणे वगैरे करतांनाच त्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. पण अखेर ज्याची भीती होती तेच झाले आणि भिकाजीलाच प्लेगचा संसर्ग झाला.

त्या आजारातून त्या जेमतेम बचावल्या ख-या, पण त्या रोगाने त्यांची प्रकृती अत्यंत खालावली. इथेच राहिल्या तर तब्येतीला न जुमानता त्या पुन्हा कामाला लागतील या भीतीने त्यांच्या परिवारातील लोकांनी त्यांना हवापालटासाठी युरोपमध्ये पाठवून दिले. तिथल्या हवेत त्यांची तब्येत सुधारली. त्या अवधीमध्ये त्यावेळी इंग्लंडमध्ये रहात असलेल्या दादाभाई नौरोजी यांच्या संपर्कात त्या आल्या. भारतीयांचे पितामह (ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया) समजले जाणारे दादाभाई त्या काळात इंग्लंडमध्येच राहून भारतवासीयांच्या हक्कासाठी सनदशीर मार्गाने लढा देत होते. भिकाजीं त्यांचे सचिव म्हणून काम करू लागल्या. चाळिशीला पोचलेल्या भिकाजी आता 'मॅडम कामा' झाल्या होत्या. त्या काळात उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा ते निमित्य सांगून भारतीय युवक इंग्लंडला जात असत. मॅडम कामा सतत त्यांच्या संपर्कात राहून त्यांना लागेल ती मदत करीत.

स्टुटगार्ट येथील संमेलनात भाग घेऊन भारताचा झेंडा फडकवल्यानंतर त्या अमेरिकेच्या दो-यावर गेल्या. एक उत्कृष्ट वक्त्या म्हणून त्यांची ख्याती झाली होती. अमेरिकेत ठिकठिकाणी भाषणे देऊन त्यांनी आपले स्वतंत्र विचार परखडपणे मांडले आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे या बाजूला तेथील जनमत वळवण्याचा प्रयत्न केला. तेथून त्या इंग्लंडला परत आल्या, पण आता ब्रिटिश सरकारची नजर त्यांच्याकडे वळलेली होती. इंग्लंडमध्ये राहून काम करणे दिवसेदिवस कठीण होत गेल्यानंतर त्यांनी फ्रान्समध्ये पॅरिसला स्थलांतर केले. तेथून त्या इतर क्रांतिकारकांच्याबरोबर संपर्कात राहिल्या. फक्त भारतीयच नव्हे तर आयर्लंडसारख्या इतर देशातील क्रांतिकारकांनासुद्धा त्या मदतीचा हात देत होत्या. रशीयात ज्यांनी राज्यक्रांती घडवून आणली ते लेनिन त्यांना भेटायला आले होते.

युरोपमधल्या वास्तव्यात त्यांनी 'वंदे मातरम्'नांवाचे देशभक्तीपर नियतकालिक काढायला सुरुवात केली आणि कांही काळ ते नेटाने चालवले. इंग्रजांनी त्याचेवर बंदी घातलीच होती. त्यामुळे पॅरिसमधूनसुद्धा ते उघडपणे प्रकाशित करता येत नव्हते. मादाम कामा यांनी कधी बर्लिन, कधी जिनीव्हा कधी हॉलंड अशा वेगवेगळ्या जागा बदलून ते गुप्तपणे छापून घेणे सुरू ठेवले. या छापलेल्या मॅगझिनच्या प्रती भारतात चोरट्या मार्गाने पाठवणे आणि तिथे पोचल्यावर त्यांचे देशभर वितरण करणे हे त्याहून जास्त कठीण होते. तरीही तत्कालीन क्रांतीकारक त्या दृष्टीने चिकाटीने प्रयत्न करीत राहिले. मादाम कामा त्यात आघाडीवर होत्या.

हे सगळेच काम छुप्या रीतीने होत असल्यामुळे प्रत्यक्षात किती प्रती योग्य जागी पोचल्या, किती मध्येच जप्त झाल्या, त्या वाचून किती युवकांना देशभक्तीची प्रेरणा मिळाली, त्यातून किती जणांनी सशस्त्र लढ्यात उडी घेतली आणि कांही हिंसक कृती करून दाखवली वगैरेचे संख्यात्मक मूल्यमापन करणे आज शक्य नाही. पण त्यामुळे "ब्रिटीश सरकार डळमळीत झाले, थरथर कांपू लागले" वगैरे म्हणणे जरा अतीशयोक्त होईल. कारण हजारोंच्या संख्येने भारतीय लोकच त्यांची नोकरी करण्यासाठी स्वखुषीने पुढे येत होते आणि मूठभर गो-यांच्या सहाय्याने ते आपला इथला अंमल व्यवस्थितपणे हांकत होते. क्रांतिकारकांनी टाकलेल्या ठिणग्या पडून देशात जागोजागी असंतोषाचे विस्फोट होतील आणि स्थानिक लोक ब्रिटीशांना मारून टाकतील किंवा पळवून लावतील अशी आशा प्रत्यक्षात फलद्रुप झाली नाही. थोडक्यात म्हणजे लेनिनला ज्याप्रमाणे रशीयातली झारची सत्ता उलथून टाकता आली तसे भारतात घडले नाही.

मादाम कामा यांच्या कार्याला लगेच अपेक्षेइतके यश त्या काळात मिळाले नसले तरी त्यामुळे त्यांनी घेतलेल्या कष्टांचे मोल कमी होत नाही. शंभर वर्षापूर्वीच्या काळात एक भारतीय स्त्री आपले सुखवस्तु कुटुंब व आपला देश सोडून परदेशात, किंबहुना शत्रूपक्षाच्या देशात जाऊन राहते. अत्यंत प्रतिकूल वातावरणात निर्भयपणे आपण ठरवलेले जीवितकार्य अखेरपर्यंत करत राहते. हे सगळे कल्पनातीत आहे.

No comments: