Wednesday, April 30, 2008

आनंदयात्रिकाला सलाम आणि प्रबोधनकर्त्याला दंडवत


आज महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातल्या दोन महापुरुषांचा 'महाराष्ट्रभूषण' हा खिताब देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या दोन्ही व्यक्ती महाराष्ट्राला भूषणभूत आहेत हे सर्वांना माहीतच आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर नेहमी प्रसिध्दीच्या झोतात असल्यामुळे त्यांचे नांव सर्व मराठीभाषिकाच्या चांगल्या परिचयाचे आहे, तर डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्रसिध्दीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत गेली चौसष्ठ वर्षे अव्याहतपणे चालवले आहे. त्यांनी सुरू केलेल्या कार्याचा वटवृक्ष आता जगभर फोफावला असल्यामुळे ज्यांनी त्या कार्यात सहभाग घेतला आणि ज्या लोकांना त्यापासून लाभ मिळाला अशा लोकांची संख्या फार मोठी आहे, त्यांना नानासाहेबांविषयी अत्यंत आदर वाटत असणारच, आज अभिमानाने त्यांना आनंदाचे भरते आले असेल.

महिनाभरापूर्वी मंगेश पाडगांवकरांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांच्या कांही उत्तमोत्तम काव्यपंक्तीतून त्यांच्याबद्दल लिहिले होते. त्यात भर टाकण्यासारखे खूप कांही असले तरी त्याबद्दल आज लिहिण्यापेक्षा डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांची ओळख करून देतो. त्यांच्या मागे गेली चारशेहे वर्षे समाजप्रबोधनाच्या कार्याची वंशपरंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव 'शेंडे' असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या
आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी' अशी पदवी दिली. तेंव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आहेत आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले आहेत.

डॉ.नानासाहेबांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन निरूपणाचे सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले आहे. धर्माचरणाविषयी बोलतांना त्या अनुषंगाने अज्ञान, अंधश्रध्दा, भेदाभेद, व्यसनासक्ती, स्त्रियांवरील अत्याचार आदि दुष्ट प्रवृत्तींचे उच्चाटन करून समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण ते देत आले आहेत. या कामासाठी त्यांनी ६४ वर्षांपूर्वी श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती
स्थापन केली. त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहेत. नानासाहेबांचे वय आता ऐंशीच्या घरात असून त्यांचे पुत्र श्री. अप्पासाहेब यांनी या समाजप्रबोधनाच्या कार्याची धुरा स्वतःच्या शिरावर घेतली आहे. अर्थातच त्यांनी आपल्या वडिलांच्याच निष्ठेने आणि तळमळीने हे व्रत अंगिकारले आहे हे सांगायला नकोच.

'महाराष्ट्रभूषण' या सरकारी पदवीमुळे नानासाहेबाच्या महत्तेत विशेष लक्षणीय अशी वाढ होवो वा न होवो, त्यांचे कार्य त्या विषयी अनभिज्ञ असलेल्या लोकांच्या समोर येऊन त्यांना यातून स्फूर्ती मिळाली तरी समाजाला त्याचा लाभ नक्कीच मिळेल. पाडरांवकरांचे काव्य तर कायमच मनाला तजेला देण्याचे कार्य करत असते. या दोघां विभूतींना सादर प्रणिपात.

Tuesday, April 29, 2008

मधुमती पन्नास वर्षांची झाली


मधुमती हा माझा अत्यंत आवडता चित्रपट प्रकाशित होऊन नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाने त्या काळातले सिनेजगत पूर्णपणे जिंकले होते. १९५८ साली आलेल्या चित्रपटांची बहुतेक सगळी महत्वाची फिल्मफेअर एवार्ड्स मधुमतीने निर्विवादपणे पटकावली होती. त्याबद्दल कोणाला तक्रार करायला जागा नव्हती, कारण तो सिनेमा तसाच अफलातून बनला होता. कथानक, दिग्दर्शन, संगीत आणि मुख्य पात्रांचे अभिनय यातल्या कशाच्या तरी आधारावर सर्वसाधारणपणे कोणताही सिनेमा चालतो. मधुमतीमध्ये या सगळ्याच गोष्टी अत्युत्कृष्ट दर्जाच्या होत्या, त्यांशिवाय अर्थपूर्ण गीतांतली शब्दरचना, उपकथानके, विनोदनिर्मिती, आटोपशीरपणा वगैरे साऱ्या गोष्टी छान जमल्या होत्या आणि तांत्रिक बाजूसुध्दा भक्कम होत्या. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम एक अप्रतिम असा चित्रपट निर्माण
होण्यात झाला.

काळोखी रात्र, त्यात मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट अशा भयाण वातावरणात सिनेमा सुरू होतो. कथानायक आपल्या मित्राबरोबर आडरानातल्या रस्त्यावर मोटारीतून जात असतांना अचानकपणे त्या वादळात तो सांपडतो. रात्रभर मुक्कामासाठी विसावा शोधत ते दोघे एका जुन्यापुराण्या हवेलीत शिरतात. त्या ओसाड पडलेल्या वाड्यातल्या पुराणवस्तू नायकाला ओळखीच्यावाटायला लागतात. अशा रहस्यमय गूढ वातावरणाने सुरुवात होत असतांनाच त्यातून जन्मजन्मातरीच्या आठवणीचे
'असंभव' कथानक समोर येते. असे असले तरी सुरुवात आणि शेवटाचा थोडा भाग वगळता उरलेला सिनेमा मुख्यतः एका हळुवार प्रेमकथेच्या भोंवतीच फिरत राहतो.

ईशान्य भारतातल्या निसर्गरम्य दृष्याने नायकाच्या आठवणीचा फ्लॅशबॅक सुरू होतो. पक्ष्यांची किलबिल, मेंढरांचे आवाज, मेंढपाळाची लकेर वगैरे ध्वनींमधून वातावरणाची निर्मिती होत असतांनाच मुकेशच्या आवाजात "सुहाना सफर है ये मौसम हँसी" हे गोड आणि खटकेदार गाणे सुरू होते. त्यातल्या "हमें डर है हम खो न जाये कहीं" या ओळीत जी आशंका नायक व्यक्त करतो ती खरी ठरते. त्या क्षणापासून नायकाबरोबर प्रेक्षकसुध्दा त्या वातावरणात स्वतःला हरवून जातात.

नायक आपल्या चहाच्या मळ्यातल्या नोकरीवर रुजू होतो तेंव्हाच त्याला त्या मळ्याच्या सीमा दांखवून त्यापलीकडे शत्रुपक्षाची जागा आहे, तिथे पाय ठेवणे सुध्दा धोक्याचे आहे हे सांगितले जाते. पण रानातून फिरत असतांना त्याला पलीकडून एका अत्यंत आवाजातील गाण्याचे आर्त शब्द ऐकू येतात, "आ जा रे परदेसी, मै तो कबसे खडी इस पार, अँखियाँ थक गयी पंथ निहार". मधुमती येण्यापूर्वीच महल या चित्रपटातील "आयेगा आनेवाला" या गीताने अशा प्रकारच्या गूढ गाण्यांची परंपरा सुरू झाली होती आणि त्यानंतर आलेल्या बहुतेक रहस्यपटात असे एक हाँटिंग साँग दिले गेले. "कहीं दीप जले कहीं दिल, जरा देख ले आके परवाने", "नैना बरसे रिमझिम रिमझिम, पिया तोरे आवनकी आस", "तेरेबिन जिया उदास रे, ये कैसी मनहूस प्यास रे", "गुमनाम है कोई, बदनाम है कोई" वगैरे कित्येक गाणी अजरामर झाली आहेत. अगदी अलीकडे आलेल्या भूलभुलैया मध्ये अशाच प्रकारचे "तुमी जे शुमार" हे श्रेयाने गायिलेले अप्रतिम गाणे आहे. पण यातील कोणाचीही "आ जा रे परदेसी"ला तोड होऊ शकत नाही.

या गाण्याने मंतरलेल्या अवस्थेत नायक आपली सीमा पार करून 'उस पार' जातो. तिथे त्याची नायिकेशी भेट होते आणि छोट्या छोट्या प्रसंगांतून ती वाढत जाते. "जुल्मीसंग आँख लडी रे, सखी मैं का करूँ, जाने कैसी ये बात हुई रे" अशी गोड तक्रार लोकगीताच्या शैलीत नायिका आपल्या मैत्रिणींपुढे करते तर दोघेही प्रेमी "दिल तडप तडपके कह रहा है आ भी जा, तू हमसे आँख ना चुरा, तुझे कसम है आ भी जा" असे एकमेकांना सांगतात. 'कसमे वादे' वगैरे होऊन गेल्यावर मीलनाचा क्षण नजरेसमोर दिसायला
लागल्यावर "घडी घडी मोरा दिल धडके, हाय धडके, क्यूँ धडके, आज मिलनकी बेला आयी, फिर ये नजरियाँ क्यूँ फडके" या गाण्यात मीलनाची आतुरता व्यक्त करतांनाच मिळणा-या कांही अशुभ संकेतांमुळे आलेली मनाची व्याकुलता नायिका मांडते. या गाण्याची अशी गंमत आहे की याचीच चाल "आजारे परदेसी"या गाण्यात इंटरल्यूड म्हणून वापरली आहे, किंवा ती इंटरल्यूड इतकी आवडली की तिच्या चालीवर स्वतंत्र गाणे रचावेसे वाटले असेही म्हणता येईल.

या प्रेमकथेमध्ये सुध्दा नेहमीप्रमाणेच दोन मुख्य अडथळे आहेत. नायिकेचा अक्राळविक्राळ दिसणारा आडदांड बाप पहिल्यांदा त्यांच्या प्रेमात खो घालतो. अशा रासवट आणि रागीट बापांनाच नाजुक, सुंदर, कोमलांगी, मृदुभाषिणी कन्यका व्हाव्यात असा एक अजब अलिखित संकेत हिंदी चित्रपटांमध्ये पाळतात. श्रीमंत, बदफैली, व्यसनी, उध्दट, बलदंड असा खलनायक नायिकेच्या मागावर असतोच. या दोघांशीही प्रत्यक्ष लढून त्यांना नामोहरम करण्याएवढी शारीरिक कुवत नायकाच्या अंगात नसते आणि त्याने तसा प्रयत्न केल्याचे स्टंटसीनही दिग्दर्शकाने उगाच टाकलेले नाहीत. प्रथम नायिका आपल्या बापाची समजूत घालते आणि नंतर नायक आपल्या 'सच्चाई'ने त्याचे मन वळवतो. खलनायकाच्या कपटकारस्थानापुढे मात्र त्याची सपशेल हार होते. सिनेमा संपण्याला बराच वेळ शिल्लक असतांनाच नायिकेचा अंत झालेला पाहून प्रेक्षक अस्वस्थ होतो.

विरहाने व्याकुळ झालेला नायक "टूटे हुवे ख्वाबोंने हमको ये सिखाया है, दिलने जिसे पाया था आँखेंने गँवाया है" असा विलाप करत निरर्थक रीत्या इतस्ततः भटकत असतांनाच योगायोगाने अगदी नायिकेसारखाच चेहेरा मोहरा असलेली दुसरीच एक मुलगी त्याच्या समोर येते. एका सांस्कृतिक कार्यक्रमात तिने सादर केलेले "दैया रे दैया रे चढ गयो पापी बिछूवा" हे गाणे पाहिल्यानंतर त्याच्या मनात एक प्लॅन जन्म घेतो. मधुमती पूर्वी आणि नंतर येऊन गेलेल्या अनेक चित्रपटात मी अनेक प्रकारचे फोक डान्सेस पाहिले आहेत, पण आजही सामूहिक आदिवासी नृत्य म्हणताच माझ्या डोळ्यांसमोर दैया रे दैया शिवाय दुसरे कोणतेही गाणे उभे रहातच नाही.

जॉनी वॉकरने आपली हास्यमय भूमिका मस्त वठवली आहे. "जंगलमें मोर नाचा किसीने ना देखा, हम जो थोडीसी पीके जरा झूमे तो हाय रे सबने देखा" हे एक दारुड्याचे विनोदी गाणे त्याच्या पात्रावर चपखल बसवले आहे. "हम हालेदिल सुनायेंगे, सुनिये के न सुनिये" हा एक मुजरा देखील गोष्टीत कुठे तरी बसवला आहे.

डुप्लिकेट नायिकेला अचानकपणे समोर दाखवून खलनायकाची हबेलंडी उडवावी आणि त्याच्याकडून कबूली जबाब मिळवून त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळवून द्यावी असा बेत रचून नायक तसा प्रसंग घडवून आणतो आणि त्यात नाट्यमय घटना घडून रहस्यमय रीतीने गोष्टीवर अखेरचा पडदा पडतो. अशा प्रकाराने मिळवलेल्या कबूलीजबाबाच्या आधारावर कोणा अपराध्याला न्यायालयात शिक्षा होईल असे मात्र आज वाटत नाही. चारचौघांसमोर उघड उघडपणे गुन्हा करून त्याचा भरभक्कम पुरावा असतांनासुध्दा गुन्हेगाराच्या केसालाही धक्का पोचत नाही असेच अलीकडे येऊन गेलेल्या कित्येक सिनेमात पहायला मिळते. एवढा फरक गेल्या पन्नास वर्षात आपल्या समाजव्यवस्थेत पडला आहे.

दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला हे नायक नायिका म्हणून मधुमती येण्याआधीच प्रस्थापित झालेले कलाकार होते. मधुमती हे आणखी एक नांव त्यांच्या अविस्मरणीय भूमिका असलेल्या चित्रपटांच्या यादीत ठळक अक्षरात जोडले गेले. प्रत्येक भूमिकेत नवनव्या लकबी दाखवून त्यांची कंटीन्यूइटी दाखवायचे कसब प्राण हा गुणी नट कसे करू शकतो देव जाणे. मधुमतीतला त्याचा खलनायकी रोल लक्षात राहण्याइतक्या सफाईने त्याने वठवला आहे. निर्माता व दिग्दर्शक बिमल रॉय आणि संगीत दिग्दर्शक सलिल चौधरी हे दोघेही या सिनेमाने कलाविष्काराच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोचले. त्यांनी पुढे अनेक चित्रपट काढले पण मधुमतीचे स्थान अढळपदावर राहिले.

असा हा चित्रपट निघून पन्नास वर्षे होऊन गेली असली तरी अजून तो पुन्हा पहावासा वाटतो. सीडीचा शोधसुध्दा लागला नव्हता त्या काळातल्या या सिनेमाच्या सीडी आजही बाजारात मिळतात आणि खपतात. 'आजारे परदेसी' हे गाणे गेली पन्नास वर्षे माझ्या दहा आवडत्या गाण्यात आपली जागा राखून आहे. वेळोवेळी प्रसिध्द होणाऱ्या मोठ्या लोकांच्या टॉप टेनमध्येही मी हे गाणे अनेक वेळा पाहिले आहे. मधुमती हा सिनेमा हीच हिंदी सिनेसृष्टीतली ही एक अजरामर अशी कृती आहे.

Sunday, April 27, 2008

लीड्सच्या चिप्स - भाग २० - कुटुंबसंस्था

आपल्या भारतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. पिढ्यानपिढ्या एका मोठ्या कुटुंबातील माणसे एकत्र रहात असत. शेती तसेच व्यवसायांमधील त्यांची उत्पन्नाची साधनेही समाईक असत. दुष्काळ व पुरासारख्या नैसर्गिक आपत्ती आणि आक्रमणे, लढाया वगैरे बाह्य कारणामुळेच त्यातील कांही लोकांना गांव सोडून जावे लागत असे. क्वचित कधी अगदीच पटेनासे झाले तर भावंडे वाटणी करून वेगळी होत किंवा कोणी घर सोडून चालला जात असे, पण होईल तोवर एकत्रच रहायचा प्रयत्न होत असे. नोकरीसाठी शहरात येऊन स्थाईक झाल्यावर तिथे जागा अपु-या पडायला लागल्या तसेच उत्पन्नाची साधने वेगवेगळी झाल्याने लोक वेगळ्या चुली मांडू लागले. कुटुंबाची मर्यादा फक्त आई वडील व मुले एवढ्यापर्यंत संकुचित झाली. विभक्त कुटुंब पद्धत आल्यानंतरही बहुतेक अविवाहित मुले अजून आपल्या आईवडिलांच्या बरोबरच राहतात. मुलाचे लग्न होऊन त्याचा नवा संसार सुरू झाल्यानंतरसुद्धा त्याचे आई वडील त्याच्याबरोबर रहात असल्याचे अनेक घरात दिसते. त्यामुळे आजी आजोबा व नातवंडे एकत्र असल्याचे दृष्य नेहमी पहायला मिळते. काका, मामा, मावशी, आत्या तसेच चुलत, मावस, आते मामे भावंडे एकमेकांबरोबर संपर्कात असतात व लग्नासारख्या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहतात. अशा प्रकारे आपले नातेसंबंध बळकट असतात.

पाश्चिमात्य देशात मात्र कुटुंबसंस्था कदाचित आपल्याइतकी मजबूत कधी नसावीच. काका, मामा वगैरे सगळे अंकल आणि काकू, आत्या वगैरे ऑंटी. सख्खी सोडून इतर सगळी भावंडे कझिन्स असा त्यांचा उल्लेख होत असे. ते फारसे एकत्र कधी रहातच नसत. दुस-या महायुद्धानंतरच्या काळात समाजात जी प्रचंड उलथापालथ झाली, धर्माचा प्रभाव नाहीसा झाला, व्यक्तीस्वातंत्र्याला महत्व प्राप्त झाले, त्यात कुटुंबसंस्था चांगलीच ढासळली आहे. मुलाला घराण्याचे नांव मिळेल तसेच मुलगा घराण्याचे नांव उज्ज्वल करेल या जुन्या संकल्पना कालबाह्य झाल्या. मुलाच्या जन्माच्या वेळी त्याच्या आई व वडिलांनी लग्न करून एकत्र रहात असण्याची गरज उरली नाही. तो मोठा होऊन सज्ञान बनेपर्यंत ते एकत्र राहतीलच याची शाश्वती नाही. तोपर्यंत ते वेगवेगळे होऊन त्यांनी निरनिराळ्या जोडीदारांबरोबर संसार थाटलेले असण्याचीही शक्यता असते. मग मुलांनी त्यातल्या कुणाबरोबर रहायचे?

आईवडिलांपासून वेगळे रहायची संवय तर त्यांना अगदी बालपणापासून लावली जात असते. त्यांना कळायला लागण्यापूर्वीच त्यांच्यासाठी वेगळी खोली सुसज्ज करून ठेवलेली असते. त्यांचे उठणे, बसणे, खेळणे, अगदी झोपणेसुद्धा या स्वतंत्र खोलीमध्ये होत असते. सज्ञान झाल्यानंतर सहजगत्या नोकरी मिळते आणि ती न मिळाल्यास सरकारकडून पुरेसा बेकारभत्ता मिळतो. त्यामुळे शालेय शिक्षण संपता संपता मुले आपली रहाण्याची वेगळी सोय करून घेतात. मात्र व्यवस्थित स्वतंत्र घर थाटण्याइतपत सुस्थिती आल्यानंतरच ते लग्नाचा विचार करतात. मी असे ऐकले की आईवडीलसुद्धा मुलाला भेटायला येतात तेंव्हा त्याच्या घरी पाहुण्यांसाठी वेगळी खोली असेल तर ठीक आहे, ते तिथे राहतात. ती सोय नसेल तर सरळ हॉटेलात झोपायला जातात.

कांही वर्षापूर्वी मी लंडनला गेलो असतांना दिवसभर इकडे तिकडे भटकून झाल्यावर संध्याकाळी एका भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या चार बेडरूम असलेल्या प्रशस्त बंगल्यात त्यांना भेटायला गेलो होतो. दिवसा ते घरी भेटलेच नसते. ते जोडपे मुंबईला आमच्याकडे आलेले असतांना त्यांनी आपल्या बंगल्याचे तोंडभर वर्णन करून मला आपल्याकडे येण्याचा आग्रह केला होता म्हणून मी मुद्दाम वाकडी वाट करून त्यांच्याकडे गेलो होतो. मी सातासमुद्रापलीकडून आलेला असल्यामुळे मला निदान रात्रभर वस्तीला त्यांच्याकडे रहायला सांगणे त्यांना भाग होते. त्यांची टीनेजमधली तीन मुले अजून त्यांच्याकडेच रहात होती. त्यामुळे त्यांच्या सगळ्या बेडरूम्सची वाटणी झालेली होती. माझी झोपण्याची व्यवस्था दिवाणखान्यातल्या सोफ्यावर करण्यात आली. लंडनच्या संस्कृतीमध्ये वाढलेली तीन्ही मुले वेगवेगळ्या ठिकाणी, बहुधा पबमध्ये संध्याकाळ घालवून रात्री एक एक करून परतली व आपापल्या बेडरूममध्ये जाऊन झोपली. कां कोणास ठाऊक, पण ती बहुधा सर्कसमधल्या पिंज-यात ठेवलेल्या प्राण्याकडे पहावे तसे सोफ्यावर पहुडलेल्या माझ्याकडे जाता जाता पहात आहेत असे मला राहून राहून वाटत होते. यालाच बहुतेक कल्चर शॉक म्हणत असावेत. कारण आमच्या घरी जर दूरचे पाहुणे आले तर हॉलमध्येच सगळ्यांच्या पथा-या पसरून निवांतपणे गप्पा मारल्या जातात. यात कुटुंबातील सगळ्यांची भेट होते, आपुलकी निर्माण होते वगैरे. इथे तर साधी ओळख करून घेण्याची इच्छा कोणाला झाली नव्हती. दुस-या दिवशी सकाळी मुले उठण्य़ापूर्वीच माझे महत्वाचे काम असल्याचे निमित्त सांगून मी तेथून सटकलो आणि तडक हॉटेल गाठले.

लीड्सला एका ख्रिश्चन कुटुंबात एका छोट्याशा पार्टीला जायचा योग आला. तिथे भारतीय तसेच इंग्लिश असे दोन्ही वंशांचे पाहुणे आले होते. एक सत्तरीला आलेले इंग्लिश जोडपेही होते. त्यातील बाई कुटुंबव्यवस्थेला लागलेल्या उतरंडीबद्दल खूपच जिव्हाळ्याने बोलत होत्या. त्यांची मुले कुठकुठल्या दूरच्या देशात रहात असावीत, फार क्वचितच त्यांची भेट होत असे. त्यांनी लग्ने केली होती किंवा नव्हती याची कल्पना नाही. बोलता बोलता दुसरा एक इंग्रज बोलून गेला, "आजकालच्या आईवडिलांच्या मनात आपल्या वयात आलेल्या मुलांबद्दल फक्त एकच अपेक्षा असते. ती म्हणजे त्यांनी लग्न करावे, तेही मुलाने मुलीबरोबर आणि मुलीने मुलाबरोबर."

Saturday, April 26, 2008

एप्रिल फुले


एप्रिल महिन्याची सुरुवात 'एप्रिल फूल' ने होते. संभावितपणाचा आव आणून एकादी लोणकढी थाप मारायची, कोणाला तरी गंडवायचे आणि त्याला जो फसेल त्याची टर उडवायची. पण हे सगळे अगदी माफक प्रमाणात. त्यापासून कोणी दुखावले जाणार नाही, कोणाला नुकसान किंवा इजा पोचणार नाही, त्यात आपला लाभ तर नाहीच नाही एवढी काळजी घेत ती मस्करी करायची.

एवढा थोडा मजेचा भाग सोडला तर लहानपणची एप्रिल महिन्याची मुख्य आठवण म्हणजे वार्षिक परीक्षा. त्या काळात बॉलपेनचा शोध लागला नव्हता. फाउंटन पेन वापरण्यावर बंदी होती. पेनमुळे अक्षर बिघडते अशी समजूत होती. शिवाय त्या काळात महागडे वाटणारे पेन आणि त्याहून महागडी त्याची खास स्पिरिटमधली शाई यांची चैन गरीब मुलांना परवडण्यासारखी नव्हती. यामुळे शाळेतले रोजचे लिहिणे शिसपेनने करायचे आणि परीक्षेसाठी दौत टांक न्यायचा अशी रीत होती. एक पैशाला शाईची पुडी मिळायची आणि एक किंवा दोन पैशाला टांकाचे नवे निब. एका आण्यात अशी वार्षिक परीक्षेची तयारी करायची.

शाळेत मास्तरांनी शिकवतांना जेवढे कानावर पडले असेल, त्यातले जेवढे लक्षात राहिले असले तर असले. त्याच्या पलीकडे वर्षभर घरात फारसा अभ्यास असा केलेला नसायचा. वार्षिक परीक्षेच्या आधी मात्र मान मोडून सर्व विषयांची उजळणी करायची आणि ते ज्ञान परीक्षेच्या पेपरात भडाभडा ओकून मोकळे व्हायचे. शेवटचा पेपर लिहून परत येतायेताच कुठेतरी दौत फोडून टाकायची आणि टांक भिरकावून द्यायचा इतका त्यांचा वीट आलेला असे. पुढले सहा महिने तरी त्यांची गरज पडायची नाही.

वार्षिक परीक्षा संपली की मुलांच्यासाठी मे महिन्याची सुटी सुरू होऊन जाई. त्यामुळे हुंदडायला आणि खेळायला सारा दिवस मोकळा असायचा. मध्येच एक दिवस रिझल्टसाठी शाळेत जावे लागायचे पण मला तरी त्याचे बिलकुल टेन्शन नसायचे. 'हुशार' विद्यार्थ्यात गणना होत असल्यामुळे नापास व्हायचा प्रश्नच नव्हता. पहिल्या दुसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धाही नव्हती. तीन चार मुलांपैकी कधी कोणाला कधी कोणाला आलटून पालटून ते नंबर मिळायचे. त्यांना कसलेही बक्षिस नसायचे त्यामुळे ते मिळाल्याचा आनंदही नव्हता किंवा हुकल्याचे दुःखही नसायचे.

कांही झाडांना वर्षभर फुले लागतात तर कांही फुले फक्त त्यांच्या ठराविक मोसमांत येतात एवढे पाहून माहीत होते. बहुतेक झाडे पावसाळ्यात जोमाने वाढायची आणि प्रसन्नपणे फुलायची, त्यातली कांही दसरा दिवाळीकडे बहराला यायची. पण एप्रिल महिन्याचा फुलांबरोबर कसला संबंध नव्हता. आमच्याकडल्या कुठल्याच फूलझाडांना एप्रिलमध्ये बहर येत नव्हता. आंब्यालाही त्यापूर्वीच मोहोर येऊन गेलेला असायचा. मुंबईला आल्यावर निसर्गाशी असलेला प्रत्यक्ष संबंध तुटला होता. गुलाबाची आणि झंडूची फुले बाजारात इथे वर्षभर मिळतात. सणावारांच्या सुमारास त्यांची किंमत वाढते, पण त्याचा आर्थिक संबंध पुरवठ्याशी नसून मागणीशी आहे एवढे अर्थशास्त्र समजत होते.

इंग्लंडमध्ये थंडीच्या दिवसात बर्फाच्छादित निसर्ग पाहिला. त्या काळात झाडांना फूल येणे तर सोडा, त्यांची बहुतेक सगळी पाने सुध्दा गळून पडलेली असतात. ते पाहिल्यानंतर त्यांच्या स्प्रिंगमध्ये येणाऱ्या बहराचे महत्व जाणवले. मार्च महिन्यात बर्फ वितळायला सुरुवात होऊन त्याखाली दबलेली झाडे नव्या पल्लवीने ताजी तवानी होतात आणि मार्च अखेर ती प्रफुल्लित होतात. चेरीची झाडे फुलांनी झाकून जातात आणि रंगीबेरंगी दिसू लागतात.ट्यूलिपसारख्या फुलांची शोभा कांही औरच असते. ती पहाण्यासाठी हॉलंडमध्ये विस्तीर्ण बगीचे बनवले आहेत. त्यात वेगवेगळ्या जातींची ट्युलिप्सची झाडे लावून व वर्षभर खतपाणी घालून त्यांची काळजीपूर्वक निगा राखली जाते. मार्च एप्रिलमध्ये त्यांना अपूर्व असा बहर येतो आणि तो पाहण्यासाठी जगभरातून कोट्यवधी पर्यटक गर्दी करतात. मागच्या एप्रिल महिन्यात आम्हाला ही संधी मिळाली. त्या अनुभवाचे वर्णन मी माझ्या ग्रँड युरोप वरील ब्लॉगमध्ये केले होते.

आता अशा प्रकारच्या बागा देशोदेशी तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. युरोप सहलीत आम्हाला सर्वच देशात छोट्या छोट्या आकाराच्या ट्युलिपच्या बगीचांचे दर्शन घडत होते. त्याशिवाय कुठे रस्त्यांना दुभागणाऱ्या बेटात ट्यूलिपच्या फुलांची रांग दिसे तर कुठे हॉटेलच्या रिसेप्शन कौंटरकवर ती फुले सुंदर फुलदाणीत सजवून ठेवलेली दिसत. काश्मीरच्या सुप्रसिध्द मुगल गार्डन्समध्ये कांही भागात ट्यूलिपची फुले लावली असल्याचा वृत्तांत वर्तमानपत्रात वाचला होता. आता अमेरिकेत राहणाऱ्या भाचीने तिथल्या ट्यूलिप फेस्टिव्हलची छाया चित्रे पाठवली आहेत. कदाचित हॉलंडमधील बागांपेक्षाही तिथली शेते अवाढव्य आकाराची असावीत. नाही तरी अमेरिकन लोकांना आकाराच्या मोठेपणाचे भारी कौतुक आहे. क्षितिजांपर्यंत पसरतांना दिसणारी एकसारख्या रंगांच्या फुलांची रांग खरेच मुग्ध करून सोडते.

Friday, April 25, 2008

लीड्सच्या चिप्स - भाग १९ - वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता


पूर्व आणि पश्चिम हे कधीच एकमेकांना भेटणार नाहीत, इतक्या त्यांच्या संस्कृती भिन्न आहेत, असे किपलिंगसाहेब सांगून गेले, पण जगाच्या पूर्व आणि पश्चिम भागात राहणारी माणसे एकमेकांना भेटतच राहिली व त्यांच्या आचारविचारात बरीच देवाणघेवाण होत गेली. कांही बाबतीत मात्र त्यांच्या वागणुकीमधील ठळक फरक तसेच राहिले. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता ही त्यातलीच एक गोष्ट आहे. आंघोळ करण्याला आपल्याकडे फारच महत्व आहे. अनेक लोकांना सकाळी उठल्या उठल्याच आंघोळीचे वेध लागतात. आंघोळ केल्याशिवाय कसलेही अन्नग्रहण न करणारी माणसे आहेत. संध्याकाळी घरी परतल्यानंतर कांही लोक पुन्हा एकदा सचैल स्नान करून देहशुद्धी करून घेतात. देह घासून पुसून स्वच्छ करणे हा आंघोळीमागील सर्वात महत्वाचा उद्देश असतो. तसेच आंघोळ करून झाल्यावर धुतलेले स्वच्छ कपडे परिधान करणे आवश्यक असते. इंग्लंडमध्ये वेगळी परिस्थिती आहे. तिथल्या थंड हवेत अंगाला घाम येत नाही. रस्त्यामध्ये धूळ नसते, त्यामुळे ती उडून अंगाला चिकटत नाही. चेहरा सोडून सर्वांग कपड्याने झाकलेले असल्यामुळे ती शरीरापर्यंत पोचतही नाही. त्यामुळे शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करण्याची गरज भासत नाही. गरम पाण्याचा शॉवर घेऊन किंवा गरम पाण्याने भरलेल्या टबात आरामात बसून शरीराला ऊब आणणे हा आंघोळ करण्यामागील मुख्य उद्देश असतो. त्यामुळे सवड मिळेल त्याप्रमाणे आठवड्यातून एखाद्या दिवशी आंघोळीची चैन केली तरी पुरते. अंगावर घातलेले कपडे फारसे मळत नाहीत, त्यांना कुबट वास येत नाही व धुतलेले कपडे लवकर वाळत नाहीत या सगळ्या कारणामुळे तेही रोजच्या रोज बदलण्याची गरज वाटत नाही.
आपल्याकडे पूर्वापारपासून पायातील चपला दाराच्या बाहेर काढून ठेवण्याची पद्धत होती. त्यानंतर अंगणामध्ये पाय स्वच्छ धुवून घरात प्रवेश करायचा रिवाज होता. कालांतराने राहती घरे लहान होत गेली व दरवाजाच्या बाहेर ठेवलेल्या चपला चोरीला जाऊ लागल्या त्यामुळे त्या घरात आणून सर्वात बाहेरील दारापाशी ठेऊ लागले. टू बीएचके, थ्री बीएचके फ्लॅट्स आल्यानंतर कांही लोकांच्या घरी पायात बूट घालून दिवाणखान्यापर्यंत येणे क्षम्य मानले जाऊ लागले. पण त्यापुढे स्वयंपाकघरात मात्र अजूनही कोणी जात नाही.
इंग्लंडमध्ये हिंवाळ्यात पायाखालील जमीन बर्फाच्या लादीसारखी थंडगार झालेली असते, कधीकधी तर त्यावर बर्फाचा थरही साठलेला असतो. त्यामुळे "पादस्पर्शम् क्षमस्वमे" म्हणण्याला ती बधत नाही. तिच्यावर अनवाणी चालल्यास ती पायच काय सारे शरीर गोठवून बधीर करून टाकते. त्यामुळे चोवीस तास पायात मोजे चढवलेले तर असतातच, पण झोपणे सोडून इतर वेळी पायातील बूटसुद्धा फारसे काढले जात नाहीत.
आपल्याकडे सचैल स्नान करून शुचिर्भूत झाल्याखेरीज कोठलेही धार्मिक कृत्य सुरू करता येत नाही. तसेच ते करतांना कसलेही पादत्राण घातलेले चालत नाही. पायातील जोडे, चपला बाहेर काढून ठेवल्याशिवाय देवळात प्रवेश करता येत नाही. दक्षिण भारतातील कांही देवळात तर उघड्या अंगानेच जावे लागते. इंग्लंडमध्ये असला कसलाच विधीनिषेध नाही. तुम्ही पारोशा अंगाने व पायातील बूट न काढता चर्चच्या कोठल्याही भागात फिरू शकता व तिथे जाऊन प्रार्थना करू शकता. गंमत म्हणजे आपण शुभकार्य करतांना डोक्यावर पागोटे किंवा टोपी घालतो तर तिकडे चर्चमध्ये आंत गेल्यानंतर डोक्यावरील हॅट काढून हातात घेतात.
पूर्वीच्या काळी घराबाहेरील अन्न खाणेसुद्धा निषिद्ध होते. त्यामध्ये स्वच्छता सांभाळण्याचा हेतू असावा असा माझा अंदाज आहे. सगळे लोक प्रवासाला जातांना आपापले जेवणखाण घरी बनवून आपल्याबरोबर बांधून नेत असत. मध्यंतरीच्या काळात ही बंधने बरीच शिथिल झाली होती. आता संसर्गजन्य रोगांच्या भीतीने पछाडले गेल्यामुळे पुन्हा एकदा लोक घरी शिजवलेल्या सात्विक व निर्जंतुक खाण्याला प्राथमिकता देऊ लागले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ठेल्यावरील पदार्थ खाणे टाळू लागले आहेत. हवेत धूळ नसली तरीसुद्धा उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे इंग्लंडमध्ये पूर्वीच बंद झाले होते. पण रोज घरी स्वयंपाक करणेही कमीच. बेकरीमध्ये किंवा मोठ्या भटारखान्यात तयार केलेल्या असंख्य प्रकारच्या खाद्यवस्तू हवाबंद पॅकिंग करून विकायला ठेवलेल्या असतात. त्या घरी नेऊन मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये तापवायच्या आणि खायच्या ही सर्वमान्य पद्धत झाली आहे. त्यात पुन्हा हस्तस्पर्शविरहित यासारखे सोवळे प्रकार असतात. भाज्या सुद्धा प्लॅस्टिकच्या पिशव्यात बंद असतात. त्यात "हिरवी (ग्रीन)" म्हणजे रासायनिक खते व जंतुनाशके न वापरता पिकवलेली भाजी. पण जमीनीतून उगवलेली ताजी भाजी पाहिजे असेल तर स्वतःचेच किचन गार्डन हवे. सर्वसामान्य लोक असले फरक करीतच नाहीत. जे कांही स्वस्त व मस्त असेल ज्याची "डील" लावली असेल त्यावर उड्या मारतांना दिसतात.
व्यक्तिगत जीवनात आपल्याइतकी शरीराची "स्वच्छता" न सांभाळणारे इंग्रज लोक सार्वजनिक जागा मात्र कमालीच्या स्वच्छ ठेवतात. रस्त्यावर थुंकणे, नाक शिंकरणे अजीबात नाही, इतर विधींचा प्रश्नच येत नाही. भटकी कुत्री नसतात. गाई बैल गावाबाहेर गोठ्यात
असतात. गोपूजनासाठी एक गाय वाघसिंह ठेवायच्या पिंज-यात घालून बंदोबस्तात आणलेली मी पाहिली. रस्त्यामध्ये तसेच सर्व सार्वजनिक जागांवर आकर्षक कचराकुंडे ठेवलेली असतात. आपल्याकडील कचरा त्यात टाकायची संवय लोकांना लालगलेली आहे. घराघरातील कचरा ठराविक प्रकारच्या काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या थैलीत घालून तमजल्यावरील एका खोलीत किंवा जवळच्या सार्वजनिक कचराकुंडात नेऊन ठेवायचा. रोज कचरा वाहून नेणारी गाडी येऊन यंत्राच्या सहाय्याने तो उचलून घेऊन जाते. रस्त्यावर दिसणारी घाण म्हणजे मुख्यतः झाडांची गळून पडलेली पाने असतात. त्यामुळे बाहेर जाऊन आल्यावर लगेच पायातील बूट काढून टाकावेत असे वाटावे इतके ते किळसवाणे वाटत नाहीत.
एकदा मी कुत्र्याला सोबत घेऊन फिरणा-या एका ललनेचे लक्षपूर्वक निरीक्षण केले. ती मुलगीसुद्धा सर्व तयारीनिशी फिरायला आली होती. तिकडच्या कुत्र्यांच्या संवयी मात्र भारतातील कुत्र्यांच्यासारख्याच आहेत. कुत्र्याने आपले काम करताच तिने शांतपणे आपल्या पिशवीतून टॉयलेट पेपरचा रोल काढला, ती जागा स्वच्छ करून ते कागद जवळच्या कच-याच्या कुंडात टाकल्यानंतर ती पुढे गेली.
भारतातील कोणतीही मुलगी हे नुसते ऐकूनच ईईईईई करेल!

लीड्सच्या चिप्स - भाग १८ - थॅकरेज मेडिकल म्यूझियम


शत्रूचा संहार करण्यासाठी वापरात येणा-या विनाशकारी शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणारे रॉयल आर्मरीज वस्तुसंग्रहालय जसे लीड्स येथे आहे तसेच माणसाचा प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञानाची जी धडपड सुरू आहे तिचे सम्यक दर्शन घडवणारे थॅकरेज मेडिकल म्यूझियमसुद्धा त्याच गांवात आहे. इसवी सन १९९७ मध्ये उघडलेल्या या संग्रहालयाने दरवर्षी इंग्लंडमधील 'म्यूझियम ऑफ द ईअर' हा बहुमान आपल्याकडे ठेवला आहेच, त्याशिवाय 'म्यूझियम ऑफ द युरोप' हा सन्मानसुद्धा पटकावला आहे. वैद्यकीय शास्त्रात व संबंधित तंत्रज्ञानात गेल्या दोन अडीचशे वर्षात कशी प्रगति होत गेली याचा माहितीपूर्ण तसेच कधी मनोरंजक तर कधी चित्तथरारक वाटणारा आढावा या ठिकाणी घेतला आहे. मात्र रॉयल आर्मरीजमध्ये संपूर्ण जगातील शिकारी व युद्धाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तसे इथे नाही. इथला सगळा प्रपंच मुख्यतः लीड्सच्या आसपासचा परिसर, युरोपमधील काही भाग इतक्याच प्रदेशापुरता मर्यादित आहे. जर्मनीमध्ये विकसित झालेली होमिओपथीसुद्धा त्यात अंतर्भूत नाही. प्राचीन काळापासून चालत आलेल्या आयुर्वेद, युनानी किंवा चिनी वैद्यकाचा साधा उल्लेखसुद्धा नाही. वेगवेगळ्या काळात त्या भागात राहणा-या लोकांच्या अंधश्रद्धा, आरोग्यासंबंधी असणारे त्याचे अज्ञानमूलक गैरसमज वगैरे सुद्धा संपूर्ण जगाचे प्रातिनिधिक म्हणता येणार नाहीत. त्यातील कांही गोष्टी आपल्याला ओळखीच्या वाटतात, कांही चमत्कारिक वाटतात.
लीड्स येथील सेंट जेम्स या प्रमुख हॉस्पिटलच्या आवारातीलच एका वेगळ्या इमारतीत हे म्यूझियम आहे. बाहेरून त्याचा सुगावा लागत नाही. आपल्या जे.जे.हॉस्पिटलप्रमाणेच या हॉस्पिटलचे आवार अवाढव्य असून अनेक इमारतींमध्ये विखुरलेले आहे. त्यात नव्या जुन्या सगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्ज आहेत. रस्त्यावरील पाट्या व दिशादर्शक खुणा वाचत शोधतच तिथे जोऊन पोचलो. तिकीट काढून प्रवेश करतांक्षणी उजव्या हांताला एक दरवाजा लागतो. इथे लहान मुलांना प्रवेश निषिद्ध आहे. हृदय कमकुवत असलेल्या मोठया माणसांनीसुद्धा आंत जाण्याचा धोका पत्करू नये असे ठळक अक्षरात लिहिले आहे. त्यामुळे आपले हृदय धडधाकट आहे असे लहान मुलांना दाखवण्यासाठी त्यांना बाहेर थांबवून सज्ञान मंडळी आंत जातात.
तिथे एकच शो दर पांच मिनिटांनी पुन्हा पुन्हा दाखवतात. आधी सभागृहात अंधार गुडुप होताच आर्त संगीताच्या लकेरी सुरू होतात. अठराव्या शतकातील एक दृष्य पडद्यावर येते व खर्जातील घनगंभीर आवाजात कॉमेंटरी सुरू होते. त्यात सांगतात की हॅना डायसन नांवाच्या एका दहा अकरा वर्षाच्या मुलीला अपघातात झालेल्या व चिघळून सडू लागलेल्या जखमेचे विष तिच्या अंगात भिनू नये यासाठी तिच्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्या काळात भूल देणे नसतेच. भीतीनेच अर्धमेली झालेली ती पोर कण्हत असते. चारी बाजूंनी तिचे हातपाय करकचून आवळून धरतात. ती आणखीनच जोरात टाहो फोडते. कसायासारखा दिसणारा डॉक्टर हांतात सुरा पाजळत येतो आणि एका घावात तिचा पाय कापून वेगळा करतो. ती पोर जिवाच्या आकांताने किंचाळते आणि थंडगार पडते. एकदम भयाण नीरव शांतता पसरते. त्यानंतर कॉमेंटरीमध्ये सांगतात की या भयानक शस्त्रक्रियेनंतरसुद्धा तिच्या जगण्याची शक्यता कमीच असते. बरेचसे रुग्ण त्या धक्क्याने हृदयक्रिया बंद पडून दगावतात तर अनेक लोक त्यातून होणारा रक्तस्राव सहन करू शकत नाहीत. ज्यांच्या नशीबाची दोर बळकट असेल असे थोडेच लोक यातून वाचतात. पण इतर मार्गाने त्यांना वाचवणे अशक्य झालेले असते तेंव्हाच नाइलाजाने शस्त्रक्रिया केली जाई.
पुढे जाऊन आपण एका गुहेत प्रवेश करतो. त्यापूर्वीच वेगवेगळ्या कागदावर वेगवेगळ्या व्यक्तीची नांवे लिहून ठेवलेल्या चतकोर कागदांचे सातआठ गठ्ठे ठेवलेले दिसतात. समोर मोठ्या फलकांवर त्या व्यक्तींची थोडक्यात माहिती लिहिलेली असते ती पाहून आपण निवड करावी व आपल्याला वाटतील तितके कागद उचलून हातात धरावेत. ही सारी माणसे दोनशे वर्षापूर्वीच्या काळातील लीड्सची रहिवासी होती. कदाचित ती काल्पनिक असतील किंवा प्रत्यक्षात होऊन गेलेलीही असतील. त्यात कोणी बालक, कोणी वृद्ध, कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी ऐशोआरामात रहाणारे तर कोणी काबाडकष्ट करणारे असे होते. त्या सर्वांना वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या असतात एवढेच समान सूत्र. पुढे गेल्यावर त्या सर्वांचे प्रत्यक्ष दर्शन होते. त्या काळातील घरे, घरातील सामानसुमान, आजूबाजूचा परिसर कुठे स्वच्छ, कुठे गलिच्छ आणि त्यात बसलेली, उभी किंवा झोपलेली आजारी माणसे ही सगळी दृष्ये अप्रतिम कलात्मकतेने पण अत्यंत वास्तववादी वाटावीत अशी उभी केली आहेत. त्या काळातील घरामधील उजेड किंवा काळोख, नाकात घुसणारे सुवास किंवा उग्र दर्प, कानावर आघात करणारे विचित्र ध्वनि, गोंगाट वगैरे सगळे कृत्रिम रीतीने निर्माण करून ते दृष्य आपल्याला खरोखरच त्या भूतकाळात घेऊन जाते.
प्रत्येक रोग्यावर त्या काळानुसार कोणकोणते उपचार होण्याची शक्यता तेंव्हा होती याचे पर्याय त्या त्या ठिकाणी एकेका फलकावर मांडलेले होते. प्रत्येकासाठी त्या काळात लागणारा अंदाजे खर्च त्यापुढे लिहिला होता. एक दृष्य पाहून पुढे जाण्यापूर्वी रोगाचे गांभीर्य व रोग्याची आर्थिक क्षमता यांचा विचार करून त्यामधील आपल्याला जो बरा वाटेल तो निवडून आपण हातातील कागदावर तशी खूण करून ठेवायची. या प्रकारे आपणसुद्धा भावनिक रीत्या त्या गोष्टीत गुंततो. त्या रोग्यांना जडलेला रोग कशामुळे झाला असावा याबद्दल तत्कालिन लोकांची जी कल्पना असेल त्याप्रमाणेच उपचार ठरणार. बहुतेक लोकांना तो ईश्वरी कोप वाटायचा. कुणाला भूतबाधा, चेटूक, करणी वगैरेचा संशय यायचा तर कांही लोकांना अन्नातून विषबाधा झाली असेल किंवा एखादा विषारी पशु किंवा कीटक चावल्याची शंका यायची. रोगजंतु व विषाणूंचा शोध अजून लागला नव्हता. प्रारब्ध, पूर्वसंचित वगैरै गोष्टी हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही.
जसे रोगाचे निदान होईल त्यानुसारच उपचारसुद्धा होणार. त्यामुळे चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणे, साधुसंतांचा आशीर्वाद घेणे, चेटकिणीकडून करणीवरील उतारा मिळवणे, गळ्यात किंवा दंडावर तावीज बांधणे, अंगावर, कपड्यावर किंवा भिंतीवर एखादे चिन्ह काढणे, गाव सोडून दुसरीकडे जाऊन राहणे, खाण्यापिण्याचे पथ्य पाळणे, डॉक्टरकडे जाऊन त्यांची अत्यंत महागडी औषध घेणे वगैरे पर्याय असत. डॉक्टरांची औषधेसुद्धा विविध खनिज रसायने आणि प्राणीजन्य व वनस्पतीजन्य पदार्थांचे परंपरा व अनुभव यानुसार केलेले मिश्रण असायचे. पूर्वानुभव व अनुमान धपक्याने ते दिले जायचे. त्याने गुण आला तर आला, नाहीतर रोग्याचे नशीब. इतक्या तपासण्या करून, वैज्ञानिक दृष्टीने विचारपूर्वक निदान करून व कार्यकारणभाव जाणून घेऊन आजकाल औषधयोजना केली जाते तरीही हे विधान ओळखीचे वाटते. या परिस्थितीत अजूनही आमूलाग्र बदल झाला आहे असे वाटत नाही. महाराणी व्हिक्टोरियाच्या काळातील त्यांतील प्रत्येक रोग्याचे प्रत्यक्षात शेवटी काय झाले याची उत्कंठा म्यूझियमतून बाहेर पडण्यापूर्वी शमवली जाते.
गुहेतून बाहेर पडल्यावर आपण वस्तुसंग्रहालयाच्या मुख्य दालनात जातो. सुरुवातीला असे दिसते की लीड्समध्ये राहणा-या एका डॉक्टरने आरोग्य व स्वच्छता यातील परस्परसंबंध सर्वात आधी दाखवून दिला. 'लुळीपांगळी श्रीमंती आणि धट्टीकट्टी गरीबी' ही अतिशय चुकीची कल्पना आहे. उंदीर, माश्या, पिसवा यांचा सुळसुळाट असलेल्या, सांडपाण्याचा निचरा होत नसलेल्या गलिच्छ वस्त्यांमध्ये रोगराई फैलावण्याचे प्रमाण प्रचंड आहे. बंगल्यामध्ये राहणारे अमीर उमराव त्या मानाने निरोगी असतात. हे सगळे त्याने आकडेवारीनिशी मांडले व नगरपालिकेने यात लक्ष घालून नगराच्या दरिद्रनारायणांच्या भागातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे याचा पाठपुरावा केला. घाण आणि रोगराई यातील प्रत्यक्ष संबंध कशा प्रकारे जुळतो हे त्याला सांगता येत नव्हते, पण तो निश्चितपणे आहे असे त्याचे ठाम मत होते व ते प्रत्यक्ष पुराव्यानिशी त्याने दाखवून दिले.
त्यानंतर एडवर्ड जेन्नर व लुई पाश्चर प्रभृतींनी वेगवेगळे रोगजंतु सूक्ष्मदर्शक यंत्रातून आधी स्वतः पाहिले आणि जगाला दाखवले. तसेच ते मानवी शरीरात गेल्यामुळे संसर्गजन्य आजार होतात हे सिद्ध केले. हवेवाटे फुफ्फुसात, अन्नपाण्यावाटे जठरात व त्वचेवाटे किंवा तिला झालेल्या जखमांमधून रक्तप्रवाहात ते प्रवेश करतात आणि त्याच्या प्रादुर्भावामुळे शरीरात निरनिराळे रोग निर्माण होतात हे समजल्यावर त्यावर प्रतिबंधक उपाय शोधणे शक्य झाले. अनेक प्रकारची जंतुनाशक रसायने तसेच रोगप्रतिबंधक लशींचा शोध लागत गेला. दुस-या महायुद्धकाळात सापडलेल्या पेनिसिलीनने या दिशेने एक महत्वाचा टप्पा गाठला व प्रभावी रोगजंतुनाशकांचा एक नवा वर्ग निर्माण केला. श्वसन, अन्नपचन, रक्ताभिसरण आदि मानवी शरीराच्या मूलभूत क्रिया तसेच अस्थि, मांस, रक्त, मज्जा आदि शरीराच्या घटकांबद्दल जसजशी अधिकाधिक माहिती समजत गेली तसतसे रोगांचे स्वरूप समजत गेले व त्यावरील उपाययोजना करणे वाढत गेले हा सगळा इतिहास विविध चित्रे आणि प्रतिकऋतींच्या माध्यमातून सुरेख व मनोरंजक पद्धतीने मांडला आहे.
शल्यक्रिया आणि मुलाचा (किंवा मुलाची) जन्म या दोन विशिष्ट विषयासंबंधी माहिती देणारी खास दालने आहेत. या दोन्हीमध्ये गेल्या दोनशे वर्षात कसकसे बदल होत गेले, त्यात आधी आणि नंतर घेण्याची काळजी, क्रिया सुरू असतांना कसली मदत लागते, कोणत्या आधुनिक सुविधा आता उपलब्ध आहेत वगैरे कालानुक्रमे व सविस्तर दाखवले आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तान्ह्या बाळाचा मऊ स्पर्श, गरोदरपणामुळे शरीरावर पडणारा ताण वगैरेंची कृत्रिम प्रात्यक्षिके ठेवली आहेत. वाढत्या लहान मुलांचे संगोपन, त्यांना होऊ शकणारे आजार व त्यापासून दूर राहण्यासाठी बाळगायची सावधगिरी वगैरे एका दालनात दाखवल्या आहेत.
डॉक्टरी पेशासाठी लागणारी थर्मॉमीटर व स्टेथोस्कोपासारखी साधने, शल्यक्रियेसाठी लागणारी आयुधे, एक्सरे फोटोग्राफी, सोनोग्राफी आदि यांत्रिक साधनांचीही थोडक्यात ओळख करून दिली आहे. या वस्तुसंग्रहाच्या जोडीनेच या आवारात अशा सहाय्यक वस्तूंची तसेच वैद्यकशास्त्रावरील पुस्तकांची विक्री सुद्धा होते. तसेच या विषयावरील तज्ञांचे परिसंवाद वर्षभर सुरू असतात. अशा प्रकारच्या विविध उपक्रमांमुळे त्यावर होणारा खर्च भरून निघतो तसेच मानवजातीची एक प्रकारे सेवाच घडते. असे हे एक वैशिष्ट्यपूर्ण आगळे वेगळे वस्तुसंग्रहालय लीड्सच्या वास्तव्यात पहाण्याची संधी मिळाली.

Wednesday, April 23, 2008

श्रीरामाची उपासना

विश्वातील चराचरात भरून राहिलेल्या निर्गुण निराकार परमेश्वराची आराधना आणि उपासना करणे कठीण असते. यामुळे ती असंख्य दृष्य प्रतिमांच्या स्वरूपात केली जाते. विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय सांभाळणारी ब्रम्हा, विष्णू व महेश ही त्रिमूर्ती आणि आदिशक्ती ही ईश्वराची प्रमुख रूपे धरली तरी प्रसंगोपात्त इतर अनेक रूपांमध्ये देव प्रकट झाला किंवा त्याने अवतार घेतला याच्या सुरस कथा आपल्या धार्मिक वाङ्मयात आहेत. अंबरीषासाठी भगवान विष्णूचे जे दहा अवतार झाले त्यातील मत्स्य, कूर्म वगैरेंबद्दल कोणाला फारसे कांही माहीत नसते, किंवा त्यांची मंदिरे सहसा दिसत नाहीत, राम आणि कृष्ण हे दोन अवतार विशेष प्रसिध्द आणि लोकप्रिय आहेत. आपले जीवन रामाने किती व्यापून टाकले आहे हे आपण मागील भागात पाहिले होते. त्याच्या उपासनेबद्दल थोडे या भागात पाहू.

परंपरेने चालत आलेल्या समजुतीनुसार रामनामाचा जप केल्याने माणसाच्या सर्व पापांचे क्षालन होते, त्याचे दैन्य, दुःख वगैरे नाहीशी होतात आणि अंती तो भवसागर पार करतो अशी भाविकांची दृढ श्रध्दा असते. "रामनामाने शिळा उध्दरल्या." या कथेवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. आपला उध्दार होण्याच्या इच्छेने श्रध्दाळू लोक जमेल तेंव्हा जमेल तितके वेळा तोंडाने रामनाम घेतात. बरेच लोक "श्रीराम जयराम जयजयराम" या मंत्राचा नियमितपणे एकशे आठ किंवा हजार वेळा जप करतात. वेळी प्रसंगी लक्ष किंवा कोटी वेळा या नामाचा जप करण्याचे किंवा अखंड नामस्मरणाच्या सप्ताहासारख्या उत्सवाचे आयोजन केले जाते

' सेतुबंधन' , ' पुष्पक विमान' वगैरे सर्व पौराणिक संकल्पना शंभर टक्के सत्य होत्या असे मानणारा सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित लोकांचा एक नवा वर्ग मला भेटतो. या लोकांनी विज्ञानाचे शिक्षण घेतलेले असते पण आर्किमिडीज, न्यूटन वगैरे शास्त्रज्ञांनी मांडलेल्या सिध्दांतांपेक्षा या लोकांचा पुराणांतील कथांवर जास्त विश्वास असतो. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी एवढी प्रगती केलेली होती की त्यांना हे साध्य होते असे त्यांना ठामपणे वाटते. विज्ञानातील चार शब्दांचा उपयोग करून "रामनामाच्या उच्चारातून ज्या ध्वनिलहरी उठतात त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ती घरभर पसरून कानाकोप-यातल्या ऋण ऊर्जेला हुसकून लावते. याच लहरी शरीरातील रक्ताभिसरण वाढवतात, छातीचे ठोके नियमित करतात, रक्तदाबावर नियंत्रण ठेवतात. एकंदरीतच शरीर, मन आणि आत्मा यांचे शुध्दीकरण करतात." वगैरे अनेक 'शास्त्रीय' गुण हे लोक रामनामाला जोडतात. पण भक्तीमार्गाने जाऊन रामाचे नामस्मरण करतांना मी त्यांना फारसे पाहिले नाही.

दिवेलागणी झाल्यावर घरातली सारी मुले एकत्र बसून रामरक्षा म्हणत. त्यामुळे सगळ्या संकटांपासून संरक्षण मिळते, सर्व मनोकामवना पूर्ण होतात वगैरे सांगितले जात असले तरी तसा तेवढा प्रत्यक्ष अनुभव येत नव्हता. त्या वयात मनातल्या इच्छा पूर्ण होण्याची वाट पहायला धीर नसतो. आंबा खावा असे वाटले की अल्लाउद्दीनच्या दिव्यातल्या राक्षसाप्रमाणे कोणीतरी तो हांतात आणून द्यायला हवा तर त्याचा कांही उपयोग! पायापासून डोक्यापर्यंत एकेका अवयवाचे नांव घेऊन त्याचे संरक्षण राम करो अशी रोज प्रार्थना करीत असलो तरी ठेचकाळणे, खोक पडणे, ताप, खोकला, पोटदुखी वगैरे जे कांही व्हायचे ते होतच असे. त्या वयात पापक्षालन, मोक्ष, मुक्ती वगैरेंचे आकर्षण वाटायचेच नाही. तरीही एक मजेदार कारण पटत असे. त्या लहान गांवात कांही पडकी ओसाड घरे होती, अनेक जुनाट वृक्ष होते आणि रात्री काळोखाचे साम्राज्य असे. त्यात "हा खेळ सांवल्यांचा" चालत असे. वा-याच्या झुळुकीबरोबर पाने हालत आणि कुठला तरी नादही त्याबरोबर कधी वहात येत असेल. त्यामुळे अनेक प्रकारचे भास कोणाला तरी होत आणि त्याची वर्णने तिखटमीठ लावून पसरली जात. अमक्या झाडावर मुंजा आहे, दुसरीकडे हडळ आहे, कुठे बांगड्यांची किणकिण ऐकायला येते तर कुठे पैंडणांची छुमछुम अशा प्रकारच्या गोष्टी नेहमीच कानावर पडत असे. असल्या अगोचर शक्तींवर रामरक्षा हा रामबाण उपाय होता. त्यामुळे भक्तीभावाने नसली तरी भीतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी रामरक्षा म्हंटली जात असे.

आमच्या गांवात शंकराची अनेक देवालये होती. मारुती, गणपती, विठोबा, दत्त वगैरें देवांची एकाहून जास्त देवळे होती. घतातील वडील मंडळींपैकी कोणी ना कोणी दर सोमवारी शंकराच्या, गुरुवारी दत्ताच्या, शुक्रवारी अंबाबाईच्या आणि शनिवारी मारुतीच्या दर्शनाला नियमितपणे जात. एकादशीला विठ्ठल आणि संकष्टीला
गणपतीच्या देवळात जाणे ठरलेले असे. तिथे जाऊन कुणापुढे नारळ फोडणे, कुठे ओटी भरणे, कुठे तिथल्या दिव्यात तेल घालणे, कुठे अभिषेक करवणे वगैरे विधी अधून मधून होत असत. गांवात रामाचे मंदीरसुध्दा होते, पण त्याचे दर्शन घेण्याचा कुठला वार किंवा तिथी ठरलेली नव्हती. रामनवमीच्या सोहळ्याखेरीज
एरवी कधी रामाच्या देवळात गेल्याचे मला आठवत नाही. घरातल्या देवांच्या सिंहासनात इतर अनेक मूर्ती होत्या, रांगणारा बाळकृष्णसुध्दा होता, पण रामाची मूर्ती कांही नव्हती. नाही म्हणायला दिवाणखान्यात अनेक देव देवता, साधुसंत आणि पूर्वजांच्या फोटोबरोबर रविवर्म्याने काढलेले रामपंचायतनाचे फ्रेम केलेले चित्र होते. पण कधी त्याला हार घातलेला आठवत नाही. एकंदरीत आमच्या घरातल्या रोजच्या पूजाअर्चेच्या विधीमध्ये रामाचा समावेश नव्हता. माझ्या ओळखीत तरी मी तो कोणाकडे पाहिला नाही. आमच्या गांवातले राममंदीर आणि नाशिकचे काळा राम व गोरा राम वगळता इतर कुठल्या गांवातले राममंदीरसुध्दा मला पाहिल्याचे स्मरणात नाही. मुंबईला गिरगांवात मराठी लोकांचे आणि माटुंग्याला मद्रासी लोकांचे अशी रामाची मंदिरे आहेत असे नुसते ऐकले आहे.

उत्तर भारतात गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानसाचे खूप महत्व आहे. अनेक लोक त्याची पारायणे सारखी करत असतात. कांही लोकांना ते तोंडपाठ आहे. रामचरितमानसातल्या दोह्यांवर आधारलेले सवाल जवाब किंवा अंताक्षरीचे कार्यक्रमदेखील होतात इतके ते सर्वश्रुत आहे. महाराष्ट्रात इतके लोकप्रिय रामायणाचे पुस्तक नाही. आमच्या घरी रामविजय नांवाची एक पोथी होती ती माझ्या आईला अत्यंत प्रिय होती. एकादे कथाकादंबरीचे पुस्तक कुठेही, केंव्हाही बसून किंवा पडल्या पडल्या संवडीने वाचता येते, मधला कंटाळवाणा भाग वाटल्यास वगळता येतो किंवा ते पुस्तक वाचणेच अर्धवट सोडता येते. तसे पोथीच्या बाबतीत करता येत नाही. तिचे पारायण करायचे झाल्यास सचैल स्नान करून पाटावर बसून त्यातील अक्षर अन् अक्षर स्पष्ट उच्चार करीत वाचायचे असते. सुरू केलेला अध्याय मध्येच सोडता येत नाही आणि सुरू केलेले पारायण पूर्ण करून त्याची विधीवत यथासांग समाप्ती करावी लागते. लहान मुलांना हे सगळे शक्य नसल्याने मला ती पोथी वाचायची फारशी संधी मिळाली नाही. पण जेवढी श्रवणभक्ती करता येणे शक्य झाले त्यावरून त्या पोथीत रामाच्या चरित्राची गोष्ट अत्यंत रसाळ शब्दात
सांगितली आहे एवढे नक्की. रामनामाचा जप, रामरक्षा आणि या पोथीच्या पारायणाखेरीज रामाची अन्य कोणती उपासना आमच्या घरी होत नव्हती.

रामदासस्वामी पूर्णपणे रामभक्त होते. त्यांना जगात चोहीकडे श्रीरामाचे दर्शन होत होते. कंबरेवर हात ठेऊन उभ्या असलेल्या पंढरपूरच्या विठोबाला पाहून त्यांनी " इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा" असे विचारले होते. पण त्यांनीसुध्दा रामची मंदिरे उभी करण्याऐवजी हनुमंताची देवळे बांधून त्यातून जनतेचे
बलसंवर्धन करण्यासाठी प्रचार केला असे दिसते. आजही गांवागांवात जेवढी मारुतीची देवळे दिसतात तेवढी श्रीरामाची दिसत नाहीत.

Sunday, April 20, 2008

लीड्सच्या चिप्स - भाग १७ - रॉयल आर्मरीज म्यूझियम


लीड्स शहराच्या लोकवस्तीच्या मानाने तेथे जास्तच वस्तुसंग्रहालये आहेत. कदाचित बाहेरून येणा-या पर्यटकांना आकर्षित करणे हा त्यामागील एक उद्देश असेल असे ती प्रदर्शने पाहणा-या प्रेक्षकांना पाहिल्यावर वाटते. या सर्वात रॉयल आर्मरीज म्यूझियम अव्वल नंबरावर खचित येईल. आपल्या मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियमची भव्य वास्तु त्यापेक्षा आकाराने मोठी आहे. ग्वाल्हेर, बडोदा, म्हैसूर व जयपूरच्या राजेरजवाड्यांनी केलेले संग्रह विलक्षण आहेत, पुण्याच्या राजा केळकर वस्तुसंग्रहालयात वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक गोष्टी पहायला मिळतात, इंग्लंडमधील लंडनचे टॉवर म्यूझियम तसेच बर्मिंगहॅम व एडिंबरा येथील म्यूझियम्स वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत तसेच प्रेक्षणीय आहेतच. पण या सर्व म्यूझियम्समधील सारी शस्त्रास्त्रे एकत्र आणली तरीही लीड्सच्या 'रॉयल आर्मरीज'ची सर त्यांना येणार नाही. इतर ठिकाणी फक्त ऐतिहासिक काळातील वस्तु दिसतील पण या ठिकाणी आदिमानवाने वापरलेल्या अणकुचीदार दगडापासून इराकमधील युद्धात उपयोगात आणलेल्या अत्याधुनिक अस्त्रापर्यंत सगळ्यांचे अनेक रूपात दर्शन घडते.
लीड्स येथे आयर नदी व तिच्या समांतर वाहणारा कृत्रिम कालवा या दोन्हींच्या बेचक्यात या म्यूझियमची आधुनिक ढंगाची चार मजली इमारत उभी आहे. एका कोप-यावर कांचेचा पारदर्शक टॉवर आहे. कट्यार खंजीरापासून पिस्तुल बंदुकीपर्यंत हातात धरून चालवायची शेकडो हत्यारे त्यात वरपासून खालपर्यंत आंतल्या बाजूला चोहीकडे अत्यंत कलात्मक रीतीने टांगून ठेवली आहेत. पुन्हा त्यातील प्रत्येकाचा आकार वेगळा आहे. खालून वरून किंवा कोठल्याही मजल्याला जोडणा-या मार्गिकेतून पाहिल्यास त्याच्या भव्य देखाव्याने डोळे दिपून जातात.
प्रत्येकी दोन मुख्य मजले व दोन उपमजले अशी त्या चार मजल्यांची रचना आहे. चारही मजल्यावर अनेक हॉल आहेत. प्रत्येक हॉलच्या भिंतींच्या कडेकडेने मोठमोठ्या कपाटात प्रेक्षणीय वस्तु मांडून ठेवल्या आहेत. मुख्य मजल्यांच्या हॉल्सच्या मधोमध कुठे श्रुंगारलेला हत्ती, तर कुठे उमद्या घोड्यावर आरूढ झालेला स्वार अशा भव्य प्रतिकृती उभ्या करून त्या जागी त्यावरील उपमजल्यावर भरपूर मोकळी जागा ठेवली आहे. त्यामुळे तो देखावा अधिक भव्य दिसतोच, शिवाय वरील गॅलरीतूनसुद्धा तो वेगवेगळ्या कोनातून पाहता येतो. कांही ठिकाणी मुख्य मजल्यावरील हॉलच्या मध्यभागी छोटेसे रंगमंच उभारून समोर बसून पहायला खुर्च्या मांडून ठेवल्या आहेत. त्याच ठिकाणी वरील उपमजल्यांवर मध्यभागी ठेवलेल्या मोकळ्या जागेतूनही खालच्या रंगमंचावर चालणारे नाट्य पाहता येते. अशा प्रकारे सर्व जागेचा अत्यंत कल्पकतेने उपयोग करून घेतला आहे.
इथे फक्त शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन नाही. त्यांचा उपयोग होत असताना घडलेल्या घटना इथे तितक्याच प्रकर्षाने दाखवल्या आहेत. त्यामुळे त्याला जीवंतपणा आला आहे. त्याशिवाय ठिकठिकाणी छोटीशी, फक्त दहा पंधरा माणसे बसू शकतील एवढी लहान बंदिस्त सभागृहे आहेत. विशेष घटना दाखवणारी चलचित्रे त्यांमध्ये पडद्यावर एकापाठोपाठ एक दाखवीत असतात. आपण वाटेल तितका वेळ बसून ती पहात राहू शकतो. जागोजागी कॉम्प्यूटर मॉनिटर्स ठेवलेले आहेत. त्यांच्यासमोर बसून आपल्याला पाहिजे ती दृष्यशृंखला निवडून पहात बसता येते, तसेच महत्वाच्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती वाचता व पाहता येते. एका बाजूला 'शिकार' आणि दुस-या बाजूला 'युद्ध' अशा दोन मुख्य विभागात हे म्यूझियम विभागलेले आहे.
इंग्लंडमधील कांटेरी झुडुपातून कुत्र्यांच्या सहाय्याने केलेली रानडुकराची शिकार असो, दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीतील विशालकाय मगरींची किंवा भारतीय उपखंडातील घनदाट अरण्यातील हिंस्र पशूंची असो, त्यांची दृष्ये दाखवणारे त्रिमिति देखावे किंवा प्रचंड तैलचित्रे 'शिकार' या भागात पहायला मिळतात. त्यात पुन्हा वेगवेगळ्या कालखंडात वापरात आलेली तंत्रे, तत्कालिन शस्त्रे यांची माहिती दिलेली आहे. मानवी संस्कृतीच्या विकासाबरोबरच त्याच्या हातातील आयुधांचा कसकसा विकास होत गेला याचा मागोवाही घेता येईल. अनादि काळापासून माणसाची निसर्गाबरोबर झटापट चाललेलीच आहे, तिचे सम्यक दर्शन या भागात घडते.
जगभर वेगवेगळ्या खंडात झालेल्या सर्व मुख्य लढाया 'युद्ध' विभागात दाखवल्या आहेत. त्यात कांही देखाव्यांच्या स्वरूपात आहेत तर अन्य सर्व चित्रांच्या माध्यमातून प्रदर्शित केल्या आहेत. इतिहासाचा अभ्यास करणा-या लोकांसाठी तर ही पर्वणीच आहे. इंग्लंडच्या दृष्टीने महत्वाच्या सर्व युद्धघटनांची तारखेनिशी तपशीलवार माहिती विस्ताराने दिली आहे. भारत, चीन, जपान आदि पौर्वात्य राष्ट्रांमध्ये घडून गेलेल्या ऐतिहासिक घटना, तेथील युद्धशास्त्र, प्राचीन काळातील शस्त्रे, युद्धात घालण्याचे पोषाख यांचे दर्शन घडवणारे स्वतंत्र दालन आहे. याशिवाय आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व अमेरिका खंडातील आदिम रहिवाशांची बूमरँगसारखी वैशिष्ट्यपूर्ण हत्यारेसुद्धा संग्रहात ठेवून त्यांचा उपयोग कशा प्रकारे केला जात असे याची सुंदर सचित्र माहिती दिली आहे.
दर तासातासाला होणारे लाईव्ह शोज हे या जागेचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. म्यूझियममध्ये प्रवेश करतांनाच आपल्या हातात एक कागद दिला जातो, त्यात त्या दिवशी होणारे कार्यक्रम दिलेले असतात. त्याप्रमाणे ठरलेल्या वेळी नट नट्या त्या प्रसंगाला साजेसे असे कपडे घालून रंगमंचावर येतात व वीस पंचवीस मिनिटे त-हेत-हेचे नाट्य सादर करतात. यात प्रचंड विविधता असते. मी पाहिलेल्या एका प्रसंगात अंगात चिलखत घालून व डोक्यावर चिरेटोप चढवून ढाल व तलवारीचा वापर करून दोन योध्यांनी केलेले लुटुपुटीचे द्वंद्वयुद्ध दाखवले तर सैनिकांच्या सेवेसाठी युद्धावर गेलेल्या एका परिचारिकेने पाहिलेल्या जखमी वीरांची करुण कहाणी तिच्याच शब्दात एका स्वगताद्वारे दुस-या प्रसंगात ऐकवली. यातील एका सैनिकावर तेचे मन जडलेले असल्याने ते नाट्य अधिकच भावनाप्रधान झाले होते. तिस-या खेळात इतिहासकाळातील एका सुप्रसिद्ध सेनापतीने आपल्या जवानांना उद्देशून केलेले वीररस व देशभक्तीपूर्ण भाषण सादर केले होते. कधीकधी तर इमारतीसमोरील मोकळ्या जागी घोडेस्वारांची लढाईसुद्धा दाखवतात.
युरोप अमेरिकेत कुठल्याही प्रेक्षणीय स्थळी गेलात तर तेथून बाहेर पडण्याच्या वाटेवर दोन दालने नेहमी दिसतील. त्यापैकी एकात अल्पोपाहारगृह असते आणि दुसरे म्हणजे त्या जागेच्या ठळक खुणा दाखवणा-या सॉव्हेनीयर्सचे दुकान असते. तशी ती इथेही आहेतच. रॉयल आर्मरीजमध्ये आलेला प्रेक्षक दिवसभर इथेच गुंतून राहील याची त्याच्या व्यवस्थापकांना बहुधा खात्री असावी. कारण इथे दुस-या मजल्यावरसुद्धा एक प्रशस्त फास्टफूड सेंटर आहे. म्हणजे अर्धे प्रदर्शन पाहून झाल्यावर बाहेर न जाता खाण्य़ापिण्यासाठी मध्यंतर घेऊन, ताजे तवाने होऊन उरलेला अर्धा भाग निवांतपणे पहाण्याची सोय करून ठेवली आहे. नाना प्रकारची खेळण्यातली हत्यारे, मुखवटे आणि प्रदर्शनातील वस्तू व देखाव्यांची चित्रे काढलेल्या विविध वस्तु येथील स्मरणचिन्हांच्या दुकानात मिळतात. त्यात गालिचे, वॉल हँगिंग्ज, पिशव्या, रुमाल यासारखी कापडे तर असतातच, पण लहान मुलांसाठी पेन्सिल, रबर आणि फूटपट्ट्या, गळ्यात घालायच्या माळा वा कानात लटकवायची ईयररिंग्ज, कॉफी मग, फुलदाण्या वगैरे अगदी वाटेल त्या वस्तू असतात.
त्याशिवाय येथे आणखी एक नाविण्यपूर्ण अनुभव या ठिकाणी घेता येतो. बाहेर पडायच्या वाटेवरील दालनात दोन मोठमोठ्या बंदुका माउंट करून ठेवलेल्या आहेत व त्याला दुर्बिणी वगैरे व्यवस्थितपणे लावलेल्या आहेत. त्यांच्यासमोरील बंद केबिनमध्ये टार्गेट्स ठेवलेली असतात. त्यासाठी लागणारे शुल्क भरून कोणीही त्या लक्ष्यांवर नेम धरून या बंदुका चालवण्याची नेमबाजी करू शकतो व घरी जाता जाता कधी नव्हे तो बंदूक चालवण्याचा एक वेगळा अनुभव घेऊ शकतो. त्यासाठी परवाना वगैरे काढण्याची गरज नसते.
अशी ही एक वैशिष्ट्यपूर्ण जागा आहे. इथे शस्त्रास्त्रे नुसती दाखवायसाठी मांडून ठेवलेली नाहीत तर ती कुठे, कधी व कशी बनली, त्यांची वैशिष्ट्ये कोणती, ती कुणी कुणी कोठल्या प्रसंगी वापरली, त्याचा जगाच्या इतिहासावर कोणता ठसा उमटला अशा अनेक पैलूंचे एक समग्र दर्शन घडते, एवढेच नव्हे तर इथली शिल्पे, चित्रे, सिनेमे, नाट्यछटा, कॉंप्यूटर सिम्युलेशन्स वगैरे सारे पाहिल्यावर एक आगळाच सर्वंकश अनुभव घेऊन आपण बाहेर येतो.

श्रीराम जयराम

मला समजायला लागल्यापासून अगदी रोजच रामाचे नांव या ना त्या कारणाने कानावर पडतच आले आहे. पाहुण्यांचे स्वागत किंवा बोलण्याची सुरुवात "रामराम"ने होते. कधी कधी हा मनाविरुध्द केलेला 'जुलुमाचा रामराम' असतो. निरोप घेतांना पुन्हा "अमुचा रामराम घ्यावा " असे म्हणतात. कामाचा पसारा फार झाला तर त्याचा 'रामरगाडा' होतो आणि बरेच वेळा 'रामभरोसे' रहावे लागते. एकादी अनपेक्षित किंवा कल्पनातीत घटना पाहिली की इंग्रजाळलेले लोक 'ओ गॉड!' म्हणतात, तसे आमच्याकडे वेगळ्या पट्टीमध्ये 'राम राम' किंवा 'रामा रामा' म्हणतात. असंभव या मालिकेतले दीनानाथ शास्त्री सारखे "श्रीराम श्रीराम" म्हणत किती छान उसासे सोडत असतात! रोज सकाळी 'राम राम पाटील' नवनवे विषय घेऊन आपल्या भेटीला येतात. रामराव, रघू, रामप्रसाद, रामअवतार, रामनाथन, रामदुराई यासारखे रामाचे नांव धारण केलेले आपल्या ओळखीतले कोणी ना कोणी हटकून भेटतच असे. निवृत्तीनंतर माझा जनसंपर्क कमी झाला असला तरी टी.व्ही. पहाणे वाढले आहे. त्यामुळे प्रत्यक्षातली माणसे भेटली नाहीत तर पडद्यावरली पात्रे दिसतात.

रामाचा उल्लेख असलेली शेकडो लोकप्रिय मराठी आणि हिंदी गाणी आहेत. 'रामा रघूनंदना', 'रघुनंदन आले आले', 'उठी श्रीरामा पहाट झाली', 'विजयपताका श्रीरामाची', 'कौसल्येचा राम बाई', यासारखी मराठी आणि 'रामचंद्र कह गये सियासे', 'रामा रामा गजब हुई गवा री', 'रामजीकी निकली सवारी', 'राम करे ऐसा हो जाये', 'हरे कृष्ण हरे राम' यासारखी हिंदी गाणी यातले एकादे तरी गाणे अधून मधून कानावर पडते. त्याशिवाय 'रामका गुणगान करिये' आणि 'रामरंगी रंगले' वगैरे शास्त्रीय संगीतातली भजने आहेतच. लहानपणी भेंड्या खेळतांना 'र' हे अक्षर आले की फार चांगले वाटायचे, कारण रामाची अनेक गाणी तर आहेतच शिवाय रामाच्या श्लोकांनी भरलेला रामरक्षेचा मोठा रिझर्व्ह स्टॉक असल्यामुळे हरण्याची चिंता नसायची.

माझ्या लहानपणच्या बहुतेक मित्रांना रामरक्षा तोंडपाठ असायची. सगळ्या मुलांनी रोज संध्याकाळी शुभंकरोती झाल्यावर परवचे आणि रामरक्षा म्हणायची त्या काळी पध्दतच होती. त्यामुळे मला रामरक्षा वाचायला येण्यापूर्वीच ऐकून ऐकून पाठ झाली होती. त्यातल्या संस्कृत शब्दांचा अर्थ समजण्याचा प्रश्नच नव्हता. किंबहुना त्यांना कांही अर्थ असतो किंवा असायला हवा असा विचारही तेंव्हा मनाला शिवत नव्हता. पुष्कळ पुढल्या काळात संस्कृत आणि इतर भाषाविषयांचे शिक्षण घेतल्यानंतर त्यातला थोडा थोडा अर्थ समजू लागला आणि विविध अलंकार लक्षात येऊ लागले.

सुरुवातीचाच "ध्यायेदाजानुभावं धृतशरधनुष्यं बध्दपद्मासनस्थं।" हा श्लोक (समजला तर) साक्षात रामचंद्राची मूर्ती डोळ्यासमोर उभी करतो. आम्हाला मात्र त्यातली कमी अधिक होणारी लय तेवढी मजेदार वाटायची. या श्लोकातली जोडाक्षरे आणि विषेषतः धृतशरधनुष्यं, नवकमलमिलल्लोचनं असे शब्दप्रयोग न अडखळता म्हणता आले की बोलण्यातला बोबडेपणा संपला अशी स्पष्ट उच्चाराची एक तऱ्हेची परीक्षा होती. "शिरोमे राघवः पातु भालं दशऱथात्मजः। कौसल्येयो दृषौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती।" या श्लोकात डोके, कपाळ, कान, नाक, डोळे वगैरेंचे रक्षण करण्यासाठी रामाची जी वेगवेगळी नांवे घेतली आहेत त्यातून त्याचे कुल, आई वडील, बंधु, गुरू वगैरेंची माहिती होते. "स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः।" म्हणजे दिव्य अस्त्रांनी भरलेला भाता खांद्यावर बाळगणारा राम माझ्या खांद्याचे रक्षण करो आणि शिवधनुष्य भंग करणारा राम माझ्या बाहूंचे रक्षण करो या ओळी किती समर्पक आहेत? "सुग्रीवेश कटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभू" वगैरेमधून रामाच्या भक्तांचे उल्लेख येतात. रामरक्षेतील या श्लोकांमधून रामाच्या चरित्रातील वेगवेगळ्या गोष्टी तर समजतातच, शरीरशास्त्राचीसुध्दा थोडी तोंडओळख होते. शास्त्रविषय शिकवण्याची किती मजेदार रीत होती ना?

"रामो राजमणिःसदा विजयते रामम् रमेशम् भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।
रामान्नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोस्म्यहम्।
रामे चित्तलयःसदा भवतु मे भो राम मामुध्दर।।"

या श्लोकात प्रथमा ते सप्तमी या सात विभक्ती आणि संबोधन बरोबर क्रमाने येतात. त्यामुळे "रामः रामौ रामाः .. प्रथमा " पाठ करतांना विभक्तींचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी हा श्लोक सोयीचा होता. शार्दूलविक्रीडित या वृत्तात असल्यामुळे हल्ली हा श्लोक मंगलाष्टकांच्या स्वरूपात काना वर येतो. खाली दिलेल्या एका श्लोकात रामायणाचे सार दिले आहे.
आदौ राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगम् कांचनम् ।
वैदेहीहरणम् जटायुमरणम् सुग्रीवसंभाषणम् ।।
वालीनिर्दलनम् समुद्रतरणम् लंकापुरीदाहनम् ।
पश्चाद्रावणकुंभकर्णहननम् एतद् हि रामायणम् ।।

रामायणावर आधारलेल्या असंख्य उत्तमोत्तम कृती आहेत. गदिमांच्या गीतरामायणाचे वर्णन थोडक्यात करताच येणार नाही. त्यावर तर एक स्वतंत्र लेखमालाच लिहावी लागेल. तुलसीदासाच्या रामचरितमानसाचे पारायण नवरात्राचे नऊ दिवस चालते. त्याबरोबरच अभिनय करून रामलीलेमधून रामायणातले प्रसंग रंगमंचावर उभे करतात. खरे तर आपले जीवन रामाने इतके व्यापलेले आहे की जेंव्हा एकाद्या गोष्टीत अर्थ किंवा स्वारस्य नसेल तर "त्यात राम नाही" असे म्हणतात. एरवी सगळीकडे राम भरलेलाच असतो!

Saturday, April 19, 2008

लीड्सच्या चिप्स -भाग १६- लोह्डी आणि संक्रांत

भारतात असतांना नेहमीच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावरील देवळांच्या आत सुद्धा मी क्वचित कधी तरी डोकावीत असेन. मला त्याचे आकर्षण जरा कमीच वाटते. पण लीड्सला राहतांना मात्र कधी कधी मुद्दाम वाकडी वाट करून तिथल्या मंदिरात जावेसे वाटायचे. एक तर थोड्या काळासाठी आपल्या देशातल्या ओळखीच्या वातावरणात आल्याचा भास व्हायचा आणि दुसरे म्हणजे भारतीय वंशाच्या लोकांसाठी गांवात कुठे कुठे खास कार्यक्रम होणार आहेत ते तिथे हमखास कळायचे. १३ जानेवारीच्या संध्याकाळी 'लोह्डी दी रात' आणि 'मकर संक्रांत' यानिमित्त एक सार्वजनिक कार्यक्रम त्याच जागी करायचे ठरवले आहे असे एके दिवशी तेथे गेलो असतांना समजले. माझ्या वास्तव्यातला तो तिथला एकमेव सामुदायिक कार्यक्रम होता व त्यासाठी सर्वांना जाहीर निमंत्रण होते त्यामुळे एकदा जाऊन पहायचे असे ठरवले.
आमच्या लहानपणी संक्रांतीच्या आदले दिवशी 'भोगी' साजरी केली जायची. त्या दिवशीच्या जेवणात गरम गरम मुगाची खिचडी, त्यावर साजुक तुपाची धार, सोबतीला तळलेले पापड, तव्यावर भाजल्यानंतर आगीच्या फुफाट्यावर फुगवलेली बाजरीची भाकरी, अंधा-या रात्रीच्या आकाशात विखुरलेल्या तारकांसारखे काळसर रंगाच्या त्या भाकरीवर थापलेले तिळाचे पांढरे दाणे, त्यावर ताज्या लोण्याचा गोळा, मसाल्याने भरलेल्या लुसलुशीत कोवळ्या वांग्यांची भाजी असा ठराविक मेनू असायचा. हे सगळे पदार्थ अनेक वेळा जेवणात वेगवेगळे येत असले तरी कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून त्या दिवशी ते खास जेवण जेवण्यातली मजा और असायची. मुंबईला आल्यावर तिथल्या दिव्यांच्या झगमगाटात बहुतेक लुकलुकणा-या तारका लुप्त झाल्या आणि तीळ लावलेली ती बाजरीची भाकरीही स्मरणातून हद्दपार झाली. एखाद्या तामीळ किंवा तेलुगुभाषी मित्राने त्यांच्या पोंगल निमित्त त्याच नांवाचा खास पद्धतीचा भात खायला घातला तर त्यावरून आपल्या मुगाच्या खिचडीची आठवण यायची. रात्र पडल्यावर आसपास कोठेतरी एक शेकोटी पेटवली जायची आणि त्याच्या आजूबाजूला घोळका करून ढोलकच्या तालावर पंजाबी लोक नाचतांना दिसायचे. कधी कधी एखादा पंजाबी मित्र बोलावून तिकडे घेऊन गेला तर त्याच्याबरोबर जाऊन आपणही थोडे 'बल्ले बल्ले' करायचे. यामुळे 'लोह्डी' हा शब्द तसा ओळखीचा झाला होता. या परदेशात तो कसा मनवतात याबद्दल कुतुहल होते.
त्या संध्याकाळी हवामान फारच खराब होते. तपमान शून्याच्या खाली गेले होते, मध्येच बोचरा वारा सुटायचा नाहीतर हिमवर्षावाची हलकी भुरभुर सुरू व्हायची, त्यामुळे दिव्यांचा अंधुक उजेड आणखीनच धूसर व्हायचा. रस्ते निसरडे झालेले असल्यामुळे चालत जायची सोयच नव्हती. वाशीला घरातून बाहेर पडले की रिक्शा मिळते तसे तिकडे नाही. टॅक्सीला तिकडे 'कॅब' म्हणतात, ती सेवा चालवणा-या कंपनीला फोन करायचा, ते त्यांच्या वायरलेस नेटवर्कवर कोण कुठे आहे ते पाहून त्यातल्या त्यात जवळ असलेल्या कॅबला तिकडे पाठवतील. हे सगळे खर्चिक तर होतेच. शिवाय परत येतांना कुठून फोन करायचा हा प्रश्न होता. वातावरण जितके खराब असेल तशाच या सेवासुद्धा अधिकाधिक कठिण होत जातात. त्यामुळे देवळाकडे जायला मिळते की नाही याची शंका होती.
थोडी चौकशी करतां शेजारी राहणारे आदित्य आणि पल्लवी सुद्धा या प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता तिकडे जाण्याचे दिव्य करणार आहेत असे योगायोगाने समजले आणि त्यांच्या गाडीतून त्यांचेबरोबर जाण्यायेण्याची सोय झाली. तेथे जाऊन पोचेपर्यंत तेथील हॉलमध्ये बसूनच ढोलक वाजवून गाणी म्हणणे सुरू होते. तो हॉल माणसांनी असा गच्च भरलेला मी प्रथमच पहात होतो. भांगडा नाच खेळायला रिकामी जागाच उरली नव्हती. गर्दी होण्यापूर्वीच कोणी नाचून घेतले असेल तर असेल. लोह्डी आणि सुंदर मुंदरीची गाणी गाऊन झाल्यावर थोड्या वेळाने एक वयस्क गृहस्थ पुढे आले. त्यांनी सोप्या शब्दात लोह्डीच्या प्रथेशी संबंधित दुल्ला भट्टीची पंजाबी लोककथा सांगितली. या काळात शेतात नवीन पिके हाताशी आलेली असतात, वातावरण प्रफुल्ल असते, त्यामुळे लोकांना एकत्र येऊन हा सण धूमधडाक्याने साजरा करण्यात मोठा उत्साह असतो वगैरे सांगितले. भारतात जन्माला येऊन मोठेपणी तिकडे आलेल्या लोकांना 'देसमें निकला होगा चॉंद' वगैरे वाटले असेल. तिथेच जन्माला आलेली मुले आ वासून ऐकत होती.
लोह्डीसंबंधी सांस्कृतिक माहिती सांगून झाल्यावर थोडक्यात सूर्याच्या मकर राशीत होत असलेल्या संक्रमणाची माहिती दिली. संक्रांत जरी दुसरे दिवशी असली तरी वेळ वाचवण्याच्या दृष्टीने त्यासंबंधी करण्याची धार्मिक कृत्ये आताच उरकून टाकण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले. हल्ली अस्तंगत होत असलेल्या, आपल्याकडील जुन्या काळातील प्रथेप्रमाणेच या वर्षी संक्रांत कुठल्या आसनावर बसून अमुक दिशेने येते, तमुक दिशेला जाते, आणखी कुठल्या तरी दिशेला पहाते वगैरे तिचे 'फल' पंडितजींनी वाचून दाखवले. त्याचा कशा कशावर कशा कशा प्रकारे परिणाम होणार आहे याचे भाकितही वर्तवले. कुणालाच त्यातले कांहीसुद्धा समजले नाही आणि कुणाचे तिकडे लक्षही नव्हते. सगळेच लोक पुढील कार्यक्रमाची वाट पहात होते. त्यानंतर रोजच्यासारखी सर्व देवतांची महाआरती झाली. आता पुढील कार्यक्रम गोपूजेचा असल्याची घोषणा झाली आणि सगळेजण कुडकुडत्या थंडीत हळूहळू बाहेरच्या प्रांगणात आले.
मंदिरात शिरतांनाच एक विचित्र प्रकारचा ट्रेलर प्रवेशद्वाराजवळ उभा असलेला मी पाहिला होता. त्या जागी त्याचे काय प्रयोजन असावे ते मला कळले नव्हते पण आत जाण्याची घाई असल्याने तो लक्षपूर्वक पाहिलाही नव्हता. सर्कशीतल्या वाघ सिंहांना ज्यात कोंडून ठेवतात तसला एक पिंजरा त्यावर ठेवला होता आणि त्या पिंज-याच्या आत चक्क एक विलायती जातीची सपाट पाठ असलेली गोमाता बसली होती. गांवाबाहेरील जवळच्या कुठल्या तरी गोठ्यातून तिचे या पद्धतीने आगमन झाले होते. तिलाही एक वेगळ्या प्रकारचे दृष्य प्रथमच पहायला मिळत असणार. तिचा मालक का रखवालदार जो कोण तिच्या बरोबर आला होता तो गोरा माणूस जवळच सिगरेट फुंकीत उभा होता. त्याने पिंज-याला लावलेले कुलूप उघडून आंत शिरण्याचा मार्ग किलकिला केला.
भटजीबुवा आणि मुख्य यजमान जरा जपूनच आंत गेले. दोन चार मंत्र गुणगुणत त्यांनी हांत लांब करून गोमातेला हळद, कुंकू, अक्षता, फुले वगैरे हलकेच किंचितशी वाहून घेतली. गायीपुढे आधीपासूनच भरपूर चारा ठेवलेला असल्याने तो खाऊन ती शांतपणे रवंथ करीत होती. हे भक्तगण तिला नाही नाही ते कांही खायला घालणार नाहीत ना इकडे त्या मालकाचे बारीक लक्ष होते. यादरम्यान एक सुरेख भरतकाम केलेली झूल बाहेरच्या मंडळींमध्ये कोणीतरी फिरवत होता. सर्वांनी तिला हात लावून घेतला. अशा प्रमाणे प्रतीकात्मकरीत्या सर्वांच्यातर्फे ती झूल त्या गायीच्या पाठीवर पांघरण्यात आली. दिवा ओवाळून तिची थोडक्यात आरती केली. ती तर भलतीच 'गऊ' निघाली. अगदी शांतपणे पण कुतुहलाने आपले सारे कौतुक पहात होती. बाजूला उभ्या असलेल्या तिच्या मालकाच्या डोळ्यातसुद्धा नेमका तोच भाव दिसत होता. आपापल्या लहानग्यांना कडेवर घेऊन त्यांचे मातापिता "ती पहा गाय, ती तिची शिंगे, ते शेपूट, ती अशी मूऊऊऊ करते" वगैरे त्यांना दाखवून त्यांचे सामान्यज्ञानात भर घालीत होते. ती आपल्याला दूध कशी देते हे सांगणे कठीणच होते, पूजाविधीमध्ये त्याचा अंतर्भाव नव्हता आणि ती क्रिया तिकडे यंत्राद्वारे करतात. पिंज-याच्या गजांमधील फटीतून घाबरत घाबरत हांत घालून कांही लोकांनी गायीची पाठ, पोट, शेपूट वगैरे जिथे मिळेल तिथे हस्तस्पर्श करून घेतला. तेवढीच परंपरागत भारतीय संस्कृतीशी जवळीक! या गोपूजेचा लोह्डी किंवा संक्रांतीशी काय संबंध होता ते मात्र मला समजले नाही.
आता लगेच अग्नि पेटवणार असल्याची बातमी कुणीतरी आणली आणि सगळी गर्दी तिकडे धांवली. इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत लाकडांचा ढीग व्यवस्थितपणे रचला होता. ती जाळण्यासाठी प्रदूषणनियंत्रक अधिका-याची रीतसर परवानगी घेतलेली होती. ती जळाऊ लाकडे कुठून आणली होती कुणास ठाऊक! जशी गाय आणली होती तशीच तीही ग्रामीण भागातून आणली असणार. मंत्रपूर्वक अग्नि चेतवून झाल्यानंतर अर्थातच सगळी मंडळी जितक्या जवळ येऊ शकत होती तितकी आली. उबदार कपड्यांची अनेक आवरणे सर्वांनी नखशिखांत घातलेली असली तरी नाकाचे शेंडे गारव्याने बधीर झाले होते, नाकाडोळ्यातून पाणी वहात होते. यापूर्वी कधीही शेकोटीची ऊब इतकी सुखावह वाटली नव्हती.
सगळ्या लोकांनी शेकोटीभोवती प्रदक्षिणा घातल्या. बहुतेक लोकांनी येतांना पॉपकॉर्नची पाकिटे बरोबर आणली होती, कांही लोकांनी रेवडीचे छोटे गोळे किंवा गजखच्या वड्या आणल्या होत्या. त्या पाहून तोंडाला पाणी सुटत होते, पण कोणीच ते तोंडात टाकत नव्हते. सगळे कांही अग्निनारायणाला अर्पण करीत होते. त्याला नमस्कार करून प्रार्थना करीत होते. नवीन लग्न झालेल्या मुलीची पहिली मंगळागौर, संक्रांतीला हलव्याचा सण वगैरे आपल्याकडे कौतुकाने करतात. पण तो संपूर्णपणे महिलामंडळाचा कार्यक्रम असतो. पंजाबी लोकांत पहिली लोह्डी अशीच महत्वाची मानतात व त्यात नव्या जोडप्याने जोडीने भाग घ्यायचा असतो. इथेही दोन तीन नवी जोडपी आलेली होती. त्यांना भरपूर महत्व मिळाले.
जेवण तयार असल्याची बातमी येताच सगळ्यांनी तिकडे धाव घेतली. हा कार्यक्रम आटोपून आपापल्या सुरक्षित घरट्यात परतण्याची घाई प्रत्येकालाच होती. 'मक्केदी रोटी और सरसोंदा साग'चा बेत होता. आपल्याकडे कांही देवस्थानात पिठलंभाकरीचा प्रसाद असतो तसा. आमचा त्या कार्यक्रमात श्रद्धायुक्त सहभाग नव्हताच. आमचे वरणभात पोळीभाजीचे जेवण घरी आमची वाट पहात होते. यामुळे आम्ही तिथूनच निरोप घेतला.
देवळातल्या समूहात बहुतेक गर्दी पंजाबी लोकांचीच होती. थोडे गुजराथी लोक असावेत. नखशिखांत कपड्यावरून लोकांना ओळखणे कठीणच होते. इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषांमधील जे शब्द कानावर पडत होते त्यावरूनच त्यांची भाषा कळत होती. आमच्याशिवाय कोणीच मराठी भाषेतून बोलणारे तिथे भेटले नाहीत. आपली खरी मकरसंक्रांत दुसरे दिवशी होती. त्या दिवशीसुद्धा लोकांनी आपापल्या घरीच तिळगूळ खाल्ला असणार. निदान तेवढ्यापुरती आपली संस्कृती अद्याप टिकून आहे. या दिवशी गांवभर फिरून आप्तेष्टांना भेटणे शहरांमध्ये तरी बंदच झाले आहे. त्यामुळे या सणाचे सामूहिक स्वरूप राहिलेले नाही. ई-मेल किंवा फोनने "तिळगूळ घ्या गोड बोला" चा संदेश दिला की झाले. भारतात ही परिस्थिती आहे तर परदेशात कोण काय करणार आहेत? महिलामंडळी मात्र यानिमित्त एखादा सोयीस्कर दिवस पाहून, त्या दिवशी हळदीकुंकू वगैरे करून थोडी किरकोळ गोष्टींची 'लुटालूट' करतात आणि त्या निमित्ताने चांगले कपडे परिधान करून दागदागीने अंगावर चढवायची हौस भागवून घेतात. तसे तिकडेही लहान प्रमाणात करून घेतले असेल पण तोपर्यंत आम्ही आपल्या स्वदेशात परत येऊन गेलो होतो.

लीड्सच्या चिप्स -भाग १५- हिंदू मंदिर


या मालिकेच्या सातव्या भागामध्ये गणेशोत्सवासंबंधी लिहितांना मी लीड्सच्या मंदिराचा उल्लेख केला होता. त्याबद्दल अधिक माहिती थोड्या विस्ताराने या लेखात देत आहे. लीड्सच्या आठ लाख लोकवस्तीमधील सुमारे आठ हजार हिंदूधर्मीय आहेत, पण शीख किंवा मुसलमान जसे शहराच्या विशिष्ट भागात मोठ्या संख्येने एकत्र राहतात तशा हिंदूंच्या वेगळ्या वस्त्या नाहीत. ते सर्व भागात विरळपणे विखुरलेले आहेत. ब-याच वर्षापूर्वीपासून तेथे रहात असलेल्या सधन गुजराथी व पंजाबी कुटुंबामधील दानशूर लोकांनी एकत्र येऊन येथील हाईड पार्क भागातील अलेक्झांड्रा रोडवर एक हिंदू मंदिर बांधले आहे. या भागात मुस्लिम धर्मीयांची मोठी संख्या आहे. तेथून जवळच त्यांनी बांधलेली एक भव्य मशीद सुद्धा आहे, तसेच अबूबेकर व मामूनिया ही भारतीय उपखंडातील लोकांना आवश्यक अशा खास वस्तु पुरवणारी मोठी दुकाने ही आहेत. मंदिराच्या प्रशस्त हॉलमध्ये एका बाजूला एकाला लागून एक पण वेगवेगळ्या छोट्या छोट्या गाभा-यात वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. त्याच छताखाली समोर शंभर दीडशे माणसे बसू शकतील एवढे सभागृह आहे. बाजूला एक छोटेसे कार्यालय व प्रवेश करण्याची खोली आहे. त्यांच्या माथ्यावर परंपरागत शिखर आहे.
श्रीगणेशजी, कार्तिकेय, अंबामाता, राधा कृष्ण, राम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या अत्यंत सुबक संगमरवरी मूर्ती इथे आहेत, तसेच पार्वतीच्या प्रतिमेसह शिवलिंग आहे. आपण कार्तिकेयाला ब्रह्मचारी समजतो पण दक्षिण भारतीय त्याची दोन अर्धांगिनीसह पूजा करतात. तशा त्य़ा इथेही कार्तिकेयासोबत आहेत. भगवान महावीराची प्रतिमा ठेऊन जैन बांधवांच्या पूजेअर्चेची सोय केली आहे. त्याशिवाय दशावतार, रामायण, महाभारतातील प्रसंग वगैरे दाखवणारी अनेक चित्रे व भित्तीशिल्पे लावून सभागृह सुशोभित केले आहे. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग या सगळ्या प्रांतातून आलेल्या भारतीयांना येथे येऊन आपापल्या आराध्य दैवतांचे दर्शन घेऊन त्यांची प्रार्थना करता येते. रोज सकाळी साग्रसंगीत पूजा व संध्याकाळी आरती केली जाते. ती मुख्यतः संस्कृत व कांही प्रमाणात हिंदी गुजराती या भाषांमध्ये होते. मुद्दाम या कामासाठी एका पंडितजीची नेमणूक केली आहे. त्यानंतर खोबरे, शेंगादाणे, बदाम, काजू, बेदाणे, केळी वगैरे प्रसाद वाटला जातो. सकाळी दहा पंधरा तर संध्याकाळी वीस पंचवीस लोक नेमाने त्या वेळी दर्शनाला येतात. सणवार असेल तर अधिक लोक मुलाबाळांसह येतात.
याशिवाय अनेक रविवारी भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान वगैरे ठेवतात. त्यात भाग घेणारे बहुतेक लोक स्थानिक हिंदूच असतात. कधी कधी भारतातून आलेल्या पाहुण्यांना पाचारण करतात. त्याद्वारे भारतीय संस्कृतीची, विशेषतः सणवार व चालीरीती यांची ओळख करून देण्याचे प्रयत्न सुरू असतात. बाजूलाच एका स्वतंत्र दुमजली इमारतीत दोन लहानसे हॉल आहेत. वाढदिवस, अभिनंदन, स्नेहभोजन अशासारख्या छोट्या छोट्या कार्यक्रमासाठी भारतीय वंशाचे लोक त्याचा वापर करतात. मात्र मद्यप्राशन किंवा मांसभक्षण या ठिकाणी वर्ज्य आहे. थोडी मोकळी जागा आहे. त्या जागेत दिवाळीची आतिषबाजी, होलिका दहन, रंग उडवून खेळणे वगैरे पारंपरिक हिंदू सण समारंभ एकत्र येऊन साजरे करतात. आठ हजारांपैकी जेमतेम शंभर लोक येत असतील, पण ज्यांना इच्छा व हौस आहे त्यांना या परमुलुखातसुद्धा ती भारतीय पद्धतीनुसार भागवण्याची सोय तर आहे.

Thursday, April 17, 2008

बोलू ऐसे बोल (भाग ७)

आतापर्यंतची उदाहरणे पाहिल्यावर असे दिसते की व्यक्तिगत बोलणे असू दे किंवा व्यावसायिक, दोन्ही ठिकाणी कांही प्रमाणात तरी आपले संवाद आधीपासून ठरवून बोलले जातात. म्हणजे ते एक प्रकारचे नाटकच असते. भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्रात त्यांनी सांगितलेल्या नवरसापैकी शांत, करुण, हास्य, रौद्र, आश्चर्य वगैरे निदान चार पांच रस सुद्धा नेहमी त्यात येतांना दिसतात. "हे जग हीच एक रंगभूमी आहे, इथे पात्रे प्रवेश करतात, आपापल्या भूमिका वठवतात व इथून प्रयाण करतात." अशा अर्थाचे कांही तरी विलियम शेक्सपीअरने म्हंटले आहे असे म्हणतात. त्याने ते नक्की कधी, कुठे आणि कां म्हंटले आणि कुणी ते ऐकले ते कांही माहीत नाही. पण इतके लोक सांगतात त्या अर्थी म्हंटलंच असेल. आणि ते खरंच आहं. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या जागी आपण वेगवेगळ्या भूमिका वठवतच असतो. लहानपणी खोड्या करणारा मुलगा मोठेपणी शिस्तप्रिय बाप होतो, तसेच ऑफीसात दरारा निर्माण करणारा अधिकारी घरात अतिशय प्रेमळपणे वागतांना दिसतो. जगाच्या रंगभूमीवर आपण आपल्या भूमिका वठवत असतोच तर प्रत्यक्ष रंगमंचावर जाऊन नाटकात काम करण्यात आणखी वेगळे काय आहे? बाहेरच्या जगात आपले संवाद बहुधा आपणच ठरवतो, क्वचित कधी ते दुसरे देतात. इथे ते नाटककाराने लिहिलेले असतात. वेशभूषाकार, केशभूषाकार, रंगभूषाकार वगैरे मंडळी आपले जे सोंग रंगवतात ते आपण आपल्या परीने नाटकातील आपला भाग होईपर्यंत वठवायचे असते. आपण बाह्य रूपाने नाटकातील पात्र झालो असलो तरी आंत आपणच असतो. म्हणून तर श्रीराम लागू, दत्ता भट आणि यशवंत दत्त या तीघांनी साकारलेले नटसम्राट वेगवेगळे लक्षात राहतात.
सभामंचावर उभे राहून भाषण करणे ही त्या मानाने सोपी गोष्ट आहे कारण तिथे अंतर्बाह्य आपण आपणच असतो. त्यातसुद्धा भाषण, प्रवचन, व्याख्यान, कथाकथन, कवितावाचन, प्रबंधवाचन वगैरे अनेक उपप्रकार असतात. सभेचा प्रकार व विषय यांच्या अनुसार ते बदलतात, पण आपले बोल श्रोत्यांपर्यंत पोचवणे हाच त्या सर्वांचा मुख्य उद्देश असतो. आपल्या ज्ञानाचा प्रसार करणे, बरे वाईट अनुभव सांगणे, चांगली शिकवण देणे यापासून ते श्रोत्यांच्या मनावर आपली छाप पाडणे, त्यांना कांही क्रिया करण्यास उद्युक्त करणे यापर्यंत अनेक कारणासाठी हा सार्वजनिक जागी बोलण्याचा खटाटोप केला जातो. याशिवाय व्यक्ती किंवा संस्थांचे वाढदिवस, वार्षिक सभा, स्नेहसंमेलन, कुणाचे अभिनंदन, सत्कार, निरोप देणे, श्रद्धांजली वाहणे वगैरे विविध प्रकारच्या कार्यक्रमात प्रसंगानुरूप बोलायची वेळ येते. त्या वेळी समोर बसलेले लोक पाहून त्यांना किती समजावे (वा समजू नये) हे ठरवून त्याप्रमाणे शब्दयोजना करावी लागते. एखाद्या तांत्रिक विषयावरील परिसंवाद असेल तर समोर सगळी तज्ञ मंडळी बसलेली असतात. त्यांच्यावर आपली छाप पाडण्यासाठी किचकट समीकरणे व जटिल शास्त्रीय प्रयोग त्यांच्या समोर माडून ते करतांनाच आपली तांत्रिक गुपिते मात्र ती न सांगता सुरक्षितपणे सांभाळायची असतात. त्याच विषयावर आपल्याच सहका-यांना प्रशिक्षण देत असतांना तो विषय सर्व विद्यार्थ्यांना मुळापासून समजेल अशा सोप्या भाषेत नेहमीच्या आयुष्यातील उदाहरणे देऊन सोपा करून सांगायचा असतो.
अनेक लोकांना सभेतील व्यासपीठावर उभे रहायचीच भीती वाटते. पहायला गेलो तर त्या ठिकाणी त्यांना कसला धोका असतो? ते नक्की कशाला घाबरतात? याचा विचार केला तर आपण अमक्या नटासारखे दिसण्यात देखणे नाही, आपल्याला त्याच्यासारखे ऐटबाजपणे चालता येणार नाही, तमक्या फर्ड्या वक्त्यासारखे अस्खलितपणे बोलता येणार नाही, त्यामुळे आपली फजीती होईल असे बहुतेक लोकांना वाटत असते . अशा प्रकारच्या तुलना तर दैनंदिन आयुष्यात सुद्धा होतच असतात, त्याला आपण तोंड देतोच ना? मग रंगमंचावर तरी वेगळी अपेक्षा कशाला करावी? "राजहंसाचे चालणे। भूवरी जालिया शहाणे। म्हणून काय आणिक कवणे। चालावेचि ना।।" असा परखड सवाल संत ज्ञानेश्वरांनी आठशे वर्षापूर्वी केला होता. राजहंसाने डौलदारपणे चालावे, बदकाने आपल्या संथ गतीने आणि कावळ्याने उड्या मारीत. कोणीही कुणाला हंसणार नाही. त्याच्या विपरीत कांही केले तर मात्र लोक "कौवा चला हंसकी चाल" म्हणून नांवे ठेवतील.
सगळ्या हंसांना तरी आपल्या श्रेष्ठत्वाची माहिती कुठे असते? हँन्स अँडरसन याच्या 'अग्ली डकलिंग' या सुप्रसिद्ध गोष्टीत व तीवर आधारलेल्या 'एका तळ्यात होती' या गाण्याच्या सुरुवातीला एका तळ्यात राहणा-या बदकांच्या सुरेख पिलांच्या कळपात एक वेडे कुरूप पिल्लू असते. बदकांच्या इतर पिल्लांहून वेगळे दिसणारे ते भोळे पिल्लू त्यांच्यात मिसळू शकत नाही, कोणी त्याला आपल्याबरोबर खेळायला घेत नाही, त्याच्याकडे बोट दाखवून सगळे फिदी फिदी हंसत असतात यामुळे ते दुःखी कष्टी असते. न्यूनगंडाने ग्रस्त झालेले असते. पण एक दिवस पाण्यात पडलेल्या आपल्या प्रतिबिंबावर एक चोरटा कटाक्ष टाकतांना त्याला आपल्या वेगळेपणाची जाणीव होते. ते आपली मान डौलाने ताठ उभारून बघते व स्वतःच्या देखणेपणावर खूष होते, पंखांची फडफड करून त्यातील शक्ती आजमावते. त्याचा आत्मविश्वास जागा होतो आणि गोष्टीच्या शेवटी आभाळात उंचावरून उडणा-या राजहंसांच्या थव्याबरोबर ते दूरदेशी उडून जाते. ही एक रूपककथा आहे. प्रत्येक माणसाच्या अंतरंगात असे अनेक राजहंस लपलेले असतात. त्यांची त्यांना स्वतःला ओळख पटली की ते सुद्धा उंच उड्डाण करू शकतात. शांत, अबोल दिसणारी माणसे सुद्धा कधीकधी संधी मिळताच बरेच कांही मोलाचे बोल बोलून जातात.
बोलणे हा अथांग विषय आहे. त्याचे आणखी किती तरी पैलू आहेत. सगळ्याच प्रकारच्या बोलण्यांचा या ठिकाणी आढावा घेता येणार नाही. कांही ऐकलेले बोल, कांही अनुभवाचे बोल आणि कांही वाचनात आलेले किस्से या मालिकेत गुंफले आहेत.
(समाप्त)

Wednesday, April 16, 2008

उर्मिला कादंबरीच्या प्रकाशनाचा सोहळा

पूर्वार्ध

रामनवमीच्या दिवशी 'दोन प्रहरी, सूर्य शिरी थांबल्यावर' झालेल्या रामजन्माच्या उत्सवात भाग घेणे कांही या वर्षी मला जमले नाही, पण कै.डॉ.वसंतराव व-हाडपांडे यांनी लिहिलेल्या 'उर्मिला' या कादंबरीच्या प्रकाशनाचा, म्हणजेच जन्माचा, सोहळा संध्याकाळी पहायला मिळाला. 'वसंत व-हाडपांडे' हे नांव मराठी साहित्याच्या विश्वात सुपरिचित आहे. एक उत्कृष्ट कवि म्हणून तर ते ख्यातनाम आहेतच; त्याशिवाय कथा, कादंबरी, चरित्रकथा, प्रबंध, समीक्षण, बालवाङ्मय अशा विविध प्रकारचे त्यांचे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. पुरातन तसेच समकालीन साहित्यिकांच्या निवडक वाङ्मयाच्या संपादनाचे कामसुध्दा त्यांनी केले आहे. मराठी वाङ्मयकोशाच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे.

अकस्मात झालेल्या अपघाती निधनामुळे त्यांची साहित्यक्षेत्रातील यशस्वी घोडदौड अचानकपणे थांबून गेली. त्यांचे जितके साहित्य तोपर्यंत प्रकाशित झाले आहे त्यापेक्षाही जास्त साहित्यकृती अद्याप अप्रकाशित राहिलेल्या आहेत. डॉ.सौ. अंजली कुलकर्णी आणि डॉ.सौ.अनुराधा हरकरे या त्यांच्या कन्यका अथक प्रयत्न करून त्यांचे दर्जेदार साहित्य हर त-हेने जगापुढे आणण्याचे कार्य करीत आहेत. सुरेल चाली लावून लोकप्रिय गायक गायिकांच्या आवाजात गाऊन घेतलेला त्यांच्या निवडक कवितांचा पहिला आल्बम 'मस्त शारदीय रात' या नांवाने त्यांनी काढला. ती गाणी आता सर्व आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होत आहेत, इतकेच नव्हे तर कॉलर ट्यूनच्या रूपात मोबाईलवर उपलब्ध आहेत. अशा रीतीने ती घरोघरी पोचत आहेत. तो उपक्रम यशस्वी झाल्यानंतर उर्मिला या कादंबरीच्या प्रकाशनाचा सोहळाही त्यांनी परवा घडवून आणला.

अणुशक्तीनगरातल्या समाजकेन्द्राच्या सभागृहात हा कार्यक्रम ठेवला होता. प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक श्री.के.ज.पुरोहित - 'शांताराम', सुप्रसिध्द लेखिका डॉक्टर विजया वाड, महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक श्री.मुकेश माचकर, ग्रंथालीचे प्रमुख श्री.दिनकर गांगल, अभिनेता श्री. अविनाश नारकर आणि अभिनेत्री सौ. ऐश्वर्या नारकर हे दापत्य आणि नवतारका नृत्यांगना वेदांती भागवत ही मंडळी मंचावर होती. डॉक्टर रत्नाकर कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून समारंभाची सूत्रे सौ.अनुराधा हरकरे यांच्या स्वाधीन केली. डॉ.सौ. अनुराधा आणि डॉ.सौ.अंजली या भगिनींनी हृदयाला भिडणा-या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. १९९२ साली झालेल्या एका भीषण अपघातात त्यांचे वडील कै.डॉ.वसंतराव व-हाडपांडे, आई सौ.वसुमती आणि दोघेही डॉक्टर बंधु डॉ.राजीव व डॉ.संजय या सर्वांना एका फटक्यात काळाने ओढून नेले. काळजाला गोठवून टाकणा-या या घटनेने सर्वांनाच सुन्न करून टाकले होते. या दुःखातून पूर्णपणे बाहेर येणे केवळ अशक्य आहे. त्या आघातातून जरा सांवरल्यानंतर आपल्या बाबांच्या दर्जेदार साहित्यकृती रसिकांसमोर आणण्याचा ध्यास घेऊन अशा प्रकारे त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्याच्या कार्याची सुरुवात केली. यासाठी त्यांनी 'स्मृतिगंध प्रकाशन' ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या विद्यमाने त्यांनी आधी वसंतरावांच्या गीतांचा आल्बम काढला आणि परवाच्या समारंभात त्यांच्या एका अप्रकाशित कादंबरीचे प्रकाशन केले. कार्यक्रमाची ही पूर्वपीठिका ऐकतांना प्रेक्षकांचे डोळेही पाणावल्याशिवाय राहिले नाहीत.

श्री. के.ज.पुरोहित यांनी आपल्या जुन्या काळातल्या मित्राच्या या कादंबरीला प्रस्तावना लिहिली आहे. आपल्याला जे कांही सांगायचे होते ते या प्रस्तावनेत दिले आहे त्यामुळे या समारंभात आपण कांही बोलणार नाही असे त्यांनी आधी सांगितले होते, पण आयत्या वेळी चार शब्द बोलण्याची इच्छा व्यक्त करून त्यांनी कै.वसंत व-हाडपांडे यांच्या कांही आठवणी सांगितल्या. मराठी वाङ्मयकोशाच्या निर्मितीसाठी नागपूर केंद्राचे कार्य सांभाळण्यासाठी त्यांना एका तळमळीने काम करणा-या माणसाची गरज होती. सभेमध्ये उत्कृष्ट बोलणारे वक्ते खूप सापडतात पण प्रामाणिकपणे मान मोडून प्रत्यक्ष काम करणारी माणसे दुर्मिळ असतात. वसंतरावांची एकंदर वाटचाल पाहता हे काम ते उत्तम रीतीने सांभाळतील असा विश्वास त्यांना वाटला म्हणून हे काम त्यांना दिले गेले आणि त्याचे त्यांनी सोने केले. या कामात एकदा मोठा विलक्षण पेचप्रसंग निर्माण झाला होता. संकलित केलेल्या भागाचे मान्यवरांच्या पुढे सादरीकरण करायचे ठरले असतांना ते कागद ठेवलेल्या गोदामावर एका भुरट्या चोराने डाका घातला आणि तिथले सारे कागद चोरून रद्दीच्या भावात त्याची विल्हेवाट लावली. अशा वेळी चिडून किंवा खचून न जाता व-हाडपांड्यांनी अगदी कमी अवधीत ते सारे दस्तऐवज पुन्हा निर्माण करून दिले आणि वाङ्मयकोशाच्या कार्याला गति दिली.
. . .. . .. . . . . . . . . . . ... .(क्रमशः)
---------------------------------------------------------

उत्तरार्ध


'उर्मिला' ही कादंबरी उत्तम निर्मात्याच्या हातात पडली तर जुन्या 'मानिनी'सारख्या अप्रतिम चित्रपटाची निर्मिती होऊ शकेल असे एका लेखात ख्यातनाम समीक्षक डॉ.हेमंत इनामदार यांनी लिहिलेले आहे. त्या दृष्टीने पावले उचलण्याचा संयोजकांचा मानस आहे असे सांगून श्री. मुकेश माचकर यांना असलेल्या चित्रपटसमीक्षणाच्या दीर्घ अनुभवाचा लाभ मिळावा अशी प्रस्तावना त्यांच्या भाषणापूर्वी केली गेली. "साहित्य हा आपला प्रांत नाही आणि एरवी आपण अशी जुन्या शैलीतली कादंबरी कदाचित वाचलीसुध्दा नसती." असे सांगत माचकरांनी भाषणाची सुरुवात केली. " 'आजचे वृत्तपत्र आणि उद्याची रद्दी' अशा प्रकारचे केवळ तात्कालिक महत्वाच्या विषयांशी संबंधित असलेले साहित्य रोज पहायची आपल्याला संवय आहे. त्यामुळे आपण या समारंभापासून दूर राहणार होतो, पण या दोघी भगिनींकडे विलक्षण परस्वेशन पॉवर आहे, त्यांच्या आग्रहपूर्वक विनंतीला आपल्याला नकार देताच आला नाही, मात्र ही कादंबरी हांतात धरल्यानंतर ती वाचून पूर्ण करेपर्यंत सोडावीशी वाटली नाही." असे त्यांनी सांगितले. "यातल्या कथेवर आधारलेला चित्रपट तयार करतांना मात्र तो कसा तयार होत आहे यावर बारीक लक्ष ठेवा. शब्दांपलीकडलं सारं शब्दांवाचून सांगण्याची किमया ज्याच्याकडे आहे असा संवेदनशील दिग्दर्शकच या कथेला योग्य तो न्याय देऊ शकेल. चटकदार संवाद घालण्याच्या मोहापोटी तिचा विचका होणार नाही एवढे पहा." असा सल्लाही त्यांनी दिला.

ग्रंथालीचे श्री. दिनकर गांगल यांनी थोडक्यात आपल्या शुभेच्छा दिल्या. डॉ.विजया वाड यांनी या कादंबरीच्या कथेबद्दल वाचकांच्या मनातली उत्सुकता वाढेल अशा पध्दतीने तिच्याबद्दल थोडे विस्ताराने सांगितले. उर्मिला आणि विश्वास ही यातली दोन प्रमुख पात्रे आहेत. आईवडिलांच्या इच्छेखातर विश्वास उर्मिलेबरोबर विवाह करतो, पण त्याचे मन आधीच दुसरीकडे गुंतलेले असते. उर्मिला मात्र विश्वासच्या सोबतीने सुखी संसाराची रंगीत स्वप्ने घेऊन आलेली असते. असा हा प्रेमाचा त्रिकोण आहे. अपेक्षाभंगाने दुखावली गेलेली उर्मिला आक्रस्ताळेपणाने आकांडतांडव करत नाही किंवा आपलं नशीबच फुटकं असं म्हणून ढसाढसा किंवा मुळूमुळू रडतही बसत नाही. अत्यंत धीरगंभीर वृत्तीने ती शांतपणे आपल्या अस्तित्वाचा लढा देत राहते. आपल्या मार्गावर खंबीरपणे चालत राहण्याचा आत्मविश्वास तिच्याकडे असतो आणि तिला जे हवे असते ते अखेर तिला प्राप्त होते. अशी या कादंबरीची सुखांत गोष्ट आहे. यातली उर्मिलेची व्यक्तीरेखा आक्रमक नाही, पण दुबळीही नाही. आजच्या मालिकांच्या कथानकात संसारांची सारखी तोडफोड होतांना जशा प्रकारे दाखवली जात असते त्या पार्श्वभूमीवर उर्मिलेची भूमिका जास्तच सहनशील वाटेल, पण हेच तिचे वैशिष्ट्य़ आणि बलस्थानही आहे. त्रिकालाबाधित शाश्वत अशी मूल्ये कधीच जुनी होत नाहीत. त्यामुळे वीस पंचवीस वर्षांपूर्वी लिहिली गेलेली ही कादंबरी आजच्या आणि उद्याच्या वाचकांनाही आवडेल असा विश्वास त्यांनी प्रगट केला.

डॉक्टर विजयाताईंनी आपले काही मजेदार अनुभवही सांगितले. जेंव्हा त्यांना पहिल्यांदा दिवस राहिले तेंव्हा त्या ज्या कार्यालयात काम करीत होत्या तिथले सहकारी त्यांना नेहमी "आता तो लाडू, तो पेढा असे पदार्थ खा, ती जिलबी, ती चकली वगैरे खाऊ नका, म्हणजे मुलगाच होईल." असा सल्ला देत होते आणि त्यांनी तो पाळला सुध्दा. पण " तुम्हाला मुलगी झाली" असं जेंव्हा नर्सने सांगितलं तेंव्हा क्षणभरच " ते कसं शक्य आहे?" अशी त्यांची प्रतिक्रिया झाली, पण दुस-याच क्षणी त्या गोंडस बाळाला पाहताच त्यांच्यातल्या मातृत्वाची अनुपम भावना जागी झाली पूर्वीचे सगळे विचार अदृष्य होऊन गेले. त्यांच्या संसारात बहार आणणा-या या पहिल्या कलिकेचे नांव त्यांना प्राजक्ता असे ठेवले. तिच्या पाठीवर आलेली निशिगंधा झाली. तीच सुप्रसिध्द अभिनेत्री निशिगंधा वाड! "या दोन मुलींच्या पाठीवर मुलगा झाला तर त्याचं नांव झेंडू ठेवा म्हणजे तुमची फुलबाग पूर्ण होईल." असे कोणी तरी खट्याळपणाने सुचवले . त्यावर त्यांच्या पतीने उत्तग दिले, "आमची फुलबाग आता पूर्ण झाली आहे. तेंव्हा वाटल्यास मलाच तिने झेंडू, गुलाब, मोगरा असे कांही म्हणावे."
सौ.अंजली आणि सौ.अनुराधा या दोघी भगिनी आपला वैद्यकीय व्यवसाय, घरगृहस्थी, मुलांचे संगोपन, त्यांचे शिक्षण वगैरे सगळे उत्तम प्रकारे सांभाळून आपल्या वडिलांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी इतक्या धडपडत आहेत, त्यांच्या साहित्यकृती वेगवेगळ्या माध्यमांमधून जगापुढे येत रहाव्यात यासाठी त्यांचे इतके आटोकाट प्रयत्न चालले आहेत याची त्यांनी भरपूर प्रशंसा केली. त्यात त्यांना सहकार्य देणा-या त्यांच्या पतिराजांचेही कौतुक केले. "या मुलींना जेंव्हाही माहेरपणाची ओढ वाटेल तेंव्हा त्यांनी आपल्या घरी निःसंकोचपणे यावे." असे त्या म्हणाल्या. मुलींच्या प्रेमळ स्वभावाबद्दल बोलतांना "Sons are for a while, but daughters are for life! " असे एका प्रसिध्द इंग्रजी साहित्यिकाने लिहिले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या दिवशी रामनवमी असल्यामुळे मी सकाळपासूनच थोडे रामनामगुणगान ऐकत होतो. त्यामुळे या साहित्यिकाला श्रावणबाळाची किंवा प्रभू रामचंद्रांची कथा माहीत असती तर कदाचित तो म्हणाला नसता असा एक विचार माझ्या मनात चमकून गेला.

वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर ते सभागृहात येऊन बसले आणि पुढला कार्यक्रम सुरू झाला. वेदांती भागवत आणि श्री. तिवारी या युगुलाने डॉ.व-हाडपांडे यांच्या एका गीतावर सुंदर नृत्य सादर केले. त्यानंतर ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या दोघांनी कादंबरीतील अनुक्रमे उर्मिला आणि विश्वास यांचे स्वभाव, संस्कार आणि त्यांच्या मनात उठलेले तरंग दाखवणारे महत्वाचे भाग साभिनय वाचून दाखवले. कथेमध्ये थोडासा खलनायक वाटावा असा दिसणा-या विश्वासची कांहीशी लंगडी वाटणारी कां होईना पण एक जी कांही बाजू आहे, ती अविनाशने समर्थपणाने मांडली. उर्मिलेच्या पात्रातले गुंतागुतीचे भावाविष्कार ऐश्वर्याने छान रंगवले. 'या सुखांनो या' या मालिकेतली सरितावहिनींची जी सोज्ज्वळ प्रतिमा तिने प्रेक्षकांच्या काळजात कोरून ठेवली आहे तिच्याशी उर्मिलेची व्यक्तीरेखा सुसंगत अशीच आहे. ऐश्वर्याचे जे अभिनयकौशल्य आपण नाटकांतून आणि मालिकांमधून पाहतो त्यामुळे हे वाचन ती याहून अधिक प्रभावीपणे आणि सफाईने करू शकली असती असे मनात आले. माणसाची नेहमी स्वतःशीच स्पर्धा चाललेली असते किंवा तुलना होत असते असे म्हणतात ना?

मस्त शारदीय रात या आल्बममधल्या दुस-या एका गोड गीतावर वेदांती भागवतने केलेल्या नृत्याविष्काराने हा सोज्ज्वळ, सात्विक असा कार्यक्रम संपला. तत्पूर्वी श्री. प्रशांत हरकरे यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमानंतर चहापानाने त्याची सांगता झाली. एक हृद्य तसेच नेटका सुनियोजित असा कार्यक्रम पाहण्याची आणि त्या निमित्य़ाने कांही प्रसिध्द व्यक्तींचे विचार त्यांच्या खास शैलीमध्ये ऐकण्याची संधी मला मिळाली. त्यबद्दल व-हाडपांडे कुटुंबियांचे आभार मानायलाच हवेत.

Tuesday, April 15, 2008

बोलू ऐसे बोल - भाग ६

देशोदेशीच्या राज्यप्रमुखांच्या भेटी होत असतात तशाच अनेकदा त्या मंत्र्यांच्या व सचिवांच्या पातळीवरही होत असतात हे आपण नेहमी वर्तमानपत्रात वाचतो, टी.व्ही. वर पाहतो. त्यांचे शब्दशः संभाषण कधीच आपल्याला ऐकायला मिळत नाही पण जो वृत्तांत वाचायला मिळतो त्यावरून एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते. ती म्हणजे जरी सर्व बोलणी मनमोकळेपणाने खेळीमेळीच्या वातावरणात झाली वगैरे लिहिले असले तरी त्या व्यक्तींना दिलखुलासपणे बोलणे फारसे शक्य नसते. त्या व्यक्ती ज्या राष्ट्राचे किंवा राज्याचे प्रतिनिधित्व करीत असतात त्याच्या धोरणांशी सुसंगत असे, त्याचे हितसंबंध जपणारे बोलणेच करणे त्यांना भाग असते. त्या व्यक्तीच्या मनात जे काय विचार किंवा भावना असतील ते सगळे उघडपणे बोलण्याची मुभा त्याला नसतेच. त्या व्यक्तीचा बोलतांनाचा चेहेरा आपल्याला दिसतो पण तिच्या बोलण्यामागील विचार तिच्या राज्यसंस्थेचा असतो.
दोन व्यापारी संस्थांच्या पदाधिका-यांमधील चर्चासुद्धा सर्वसाधारणपणे तशाच स्वरूपाच्या होतात. इथेही ते लोक आपापल्या संस्थांचे प्रतिनिधित्व कसे करतात हे थोडे त्यांचे संभाषणावरून पाहू. मी एका कंपनीचा पदाधिकारी आहे आणि 'क' कंपनीच्या 'प' नावाच्या उच्च अधिका-या बरोबर माझी एक महत्वाची भेट ठरली आहे असे आपण कांही काळाकरता समजू. या भेटीमध्ये माझ्यातर्फे बोलायची तयारी मला करायची आहे.
सर्वप्रथम मी 'क' कंपनीची इत्थंभूत माहिती गोळा करीन. ती किती काळापासून कोठकोठल्या क्षेत्रात काम करते आहे, तिचेकडे असलेले मनुष्यबळ, आर्थिक सामर्थ्य, वार्षिक उलाढाल, विशेष प्राविण्य, देशविदेशातील तिचे सहभागी, आतापर्यंतचा प्रवास, भविष्यातील योजना वगैरेचा संक्षिप्त आढावा घेईन. त्यानंतर आपल्या कंपनीशी असलेले तिचे संबंध कसे आहेत ते पाहीन. कुठल्या क्षेत्रात ती आपले ग्राहक आहेत, कुठे आपण तिचे ग्राहक आहोत, कुठे आपली स्पर्धा आहे आणि कुठे कांहीच देणेघेणे नाही ते नीटपणे समजून घेईन. आतापर्यंतचा उभयतांना एकमेकांचा आलेला अनुभव जाणून घेईन, सध्या हातात असलेली कामे कुठपर्यंत आली आहेत याची तपशीलवार माहिती मिळवीन, नजिकच्या भविष्यात तसेच पुढेमागे कधीतरी आपले कसे संबंध जडण्याचा शक्यता आहे व त्याचा आपल्या संस्थेला किती फायदा मिळण्याची शक्यता आहे याचा अंदाज घेईन.
ही मूलभूत माहिती जमवत असतांनाच गेल्या महिन्या दोन महिन्यातील महत्वाच्या तसेच मनोरंजक घटनांची नोंद घेईन. त्यात उभय कंपन्यांच्या व्यवसायाशी निगडित अशा देशांतर्गत वा आंतरराष्ट्रीय घडामोडीपासून ते 'क' कंपनी व 'प' ही व्यक्ती यांच्या बद्दल जे कांही कानावर येईल त्याचे टिपण ठेवीन. 'प' या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, शिक्षण, पूर्वानुभव, त्याच्या आयुष्यातील बढती, बदली, विवाह यासारखी एखादी चांगली घटना वगैरे समजल्यास चांगलेच.
अशा प्रकारे माहिती जमवत असतांनाच तिचा कसा योग्य प्रकारे वापर करायचा यावर विचार चालूच असेल. 'प' च्या जीवनांत कांही महत्वाची चांगली घटना घडली असेल तर त्याचे बरोबर हस्तादोलन करतांनाच त्याचे हार्दिक अभिनंदन करायचे, वाटल्यास त्याची पाठ थोपटायची. गंभीर आजार, अपघात यासारखा कांही दुर्दैवी दुःखद प्रसंग येऊन गेला असल्यास माफक सहानुभूति व्यक्त करून आपल्याला शक्य असेल तेवढी मदत करायची इच्छा दाखवायची. व्यक्तिगत जीवनानंतर त्याच्या कंपनीच्या बाबतीतल्या घटनांबद्दल बोलायचे. मोठी कंपनी असेल तर हमखास कांही ना कांही बोलण्याजोगे असतेच. त्याबद्दल आपल्या सद्भावना प्रकट करायची हीच संधी असते. कोठल्या तरी क्षेत्रात तिने मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल अभिनंदन करण्याबरोबरच तिच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करायचे, एखाद्या ठिकाणी अपयश आले असेल तर त्याबद्दल हळहळ व्यक्त करून धीर द्यायचा, समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी सहकार्याचा हात पुढे करायचा, त्यांनी केलेल्या सहाय्याबद्दन कृतज्ञता व्यक्त करायची, त्यांच्या भावी योजना जाणून घेण्याची उत्सुकता दाखवायची, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा द्यायच्या आणि वाटलेच तर आपल्या अनुभवावरून शिकलेल्या दोन शहाणपणाच्या गोष्टी सांगत संभाव्य धोके दाखवायचे.
कसल्याच गोष्टीबद्दल कांहीच समजले नसले तरीही ती कंपनी आपल्या कंपनीपेक्षा खूप मोठी असेल तर "आमचे केवढे अहोभाग्य म्हणून आम्हाला ही संधी मिळते आहे." असे म्हणायचे आणि लहान असेल तर लहानपणाचे गुण गायचे. "आकारापेक्षा सुद्धा गुणवत्ता जास्त महत्वाची आहे नाही कां?" असे म्हणत त्याना आपल्या कंपनीच्या मोठेपणाची जाणीव करून दिली तरी चालेल. ती कंपनी आपल्या कंपनीच्या तुल्यबल असेल तर "एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" म्हणायचे. ती जुन्या काळापासून चालत आलेली असेल तर, "आपल्या दीर्घकालीन अनुभवाचा लाभ आम्हालाही मिळावा." अशी इच्छा प्रकट करायची आणि ती नवीन असेल तर, "नवे विचार, नव्या कल्पना, सळसळणारे चैतन्य " वगैरे आज काळाची गरज आहे असे सांगायचे.
निदान एखाद्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महत्वाच्या अगदी ताज्या घटनेचा उल्लेख करून त्याचे आपल्या व त्यांच्या व्यवसायावर काय परिणाम होणार आहेत, कोणत्या नव्या संधी उपलब्ध व्हायची शक्यता आहे, कोणती आव्हाने समोर उभी राहणार आहेत, देशाचे, जगाचे व मानवजातीचे भवितव्य वगैरेवर अघळ पघळ बोलायचे. हे करतांना आपल्या शक्तीस्थानांची मोघम कल्पना द्यायची, कमजोरींचा अवाक्षराने उल्लेख होऊ द्यायचा नाही. आपले पांडित्य, हुषारी, बहुश्रुतता वगैरेची एखादी चुणुक दाखवणे एक अस्पष्टशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी पुरेशी असते. त्याचे प्रदर्शन इथे करायच्या मोहात पडायचे नाही. आपण केलेल्या पूर्वतयारीचा तर थांगपत्ता लागू नये. सगळे कसे उत्स्फूर्त आणि सहज सुचल्यासारखे वाटले पाहिजे.
ही भेट घडवून आणण्यात आपण पुढाकार घेतला असेल तर असल्या प्रास्ताविकात जास्त घोळ न घालता शक्य तो लवकर मुख्य मुद्यावर यायचे आणि त्या कंपनीने ती ठरवली असेल तर गप्पांमध्ये इकडे तिकडे यथेच्छ भरकटत राहून अधिकाधिक माहिती गोळा करायची. कधीतरी कुठेतरी ती उपयोगाला येते. आपले उभयतांमधील सर्व व्यवहार सुरळीतपणे चालत असतील तर सहसा अशा भेटीची आवश्यकताच नसते. बहुधा त्यात कांही तरी गुंते झालेले असतातच. ते हळुवारपणे सोडवणे हा त्या भेटीचा मुख्य उद्देश असतो आणि ते करतांना आपल्या कंपनीचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल ते आपल्याला पहायचे असते. त्यामुळे त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल प्रशंसा करता करताच आपल्या अपेक्षा याहून अधिक असल्याचे सांगायचे आणि बिघडवलेल्या कामाबद्दल कानउघाडी करतांना आता यातून काय शिकायला हवे ते पाहू असे म्हणायचे. हातात घेतलेली कामे तत्परतेने कशी करता येतील याची चर्चा करतांना त्यांनी पूर्वी केलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त करायची.
या भेटीमध्ये त्यांच्या बाजूने कोणत्या मागण्या वा सूचना केल्या जाणार आहेत याची आगाऊ माहिती जमवणे किंवा त्याबद्दल अचूक अंदाज बांधणे अत्यंत महत्वाचे असते. त्याबद्दल आधीपासूनच आपल्या संस्थेतील संबंधित लोकांबरोबर चर्चा करून आपले धोरण निश्चित करायचे असते. ते करतांना त्यांच्या कोणत्या संभाव्य सूचना स्वीकारायच्या आणि कोणत्या मागण्या नाकारायच्या हे ही गुप्तपणे ठरवून ठेवायचे असते. सर्वात सोपी गोष्ट त्यांनी मागण्याआधीच "आम्ही आपण होऊनच असे ठरवले आहे." असे सांगून त्यांच्या बोलण्यातील हवा काढून घ्यायची. ते करतांना त्यात आपला केवढा मोठा त्याग आहे आणि त्यामुळे कोणाचे केवढे कल्याण होणार आहे ते रंगवून सांगायचे. दुसरी गोष्ट त्यांना सविस्तर सांगू द्यायची आणि "खरेच किती छान कल्पना आहे? आपल्याला तर बुवा सुचली नसती." असे म्हणत मानायची. तिस-या सूचनेबद्दल "खरे तर हे फार कठिण आहे हो, पण तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही मान्य करू" असे म्हणत भाव खायचा. सर्वात महत्वाच्या चौथ्या प्रकारच्या सूचनांवर मात्र आपल्या अटी घालायच्या, देवाणघेवाणीनेच त्या अंमलात आणणे शक्य होईल असे निक्षून सांगायचे व त्यावर घासाघीस करायची.
ज्या मागण्या मान्य करायच्याच नसतील त्यातली एखादी मागणी "तुमच्या कडून कधी अशी अपेक्षाच केली नव्हती हो." असे म्हणत मोडीत काढायची. दुस-या मागणीच्या अंमलबजावणीत केवढे प्रचंड धोके आहेत त्याचे विदारक दृष्य रंगवायचे. तिसरी मागणी "तशी छान कल्पना आहे, पण काय आहे की पूर्वीचा काही अनुभव नाही. उगाच कांही तरी नसता घोळ व्हायचा. त्यापेक्षा आहे तेच राहू द्यायला काय हरकत आहे?" असे म्हणत टोलवायची. आणि चौथ्या मागणीच्या बाबतीत, "तुमचे म्हणणे अगदी रास्त आहे, कोणालाही पटेल, पण काय करणार? आमचेही हांत बांधलेले असतात. इतके लोक आम्ही काय करतो हेच बघायला टपून बसलेले असतात. आपण अगदी शुद्ध हेतूने कांही केले तरी त्याचा ते विपर्यास करतात, त्यावर गोंधळ निर्माण होतात. त्यामुळे आम्हाला कांही गोष्टी मनात असून सुद्धा करता येत नाहीत बघा." वगैरे सांगत आपली असमर्थता दाखवायची.
आपले जवळ जवळ ९० टक्के संवाद आधीच ठरलेले असतात. त्यात कोणत्या वेळी कोणते दाखले द्यायचे, कोटेशन्स सांगायची, विनोद करायचे वगैरेंची यादी बनवलेली असते. इतकेच नव्हे तर विरुद्ध बाजूचेही ५० ते ६० टक्के संवाद अपेक्षित असतात. त्यातून आयत्या वेळी एखादा नवीन मुद्दा निघाला तर आपल्या
एखाद्या मठ्ठ, तोत-या किंवा बोलघेवड्या सहाय्यकाला त्यासंबंधी विचारायचे. मठ्ठ किंवा तोत-याला तो मुद्दा समजावून सांगता सांगता विरुद्ध बाजूच्या लोकांची दमछाक होईल आणि वाचाळ माणूस "त्याचं काय आहे, खरं सांगायचं झालं तर, अशा प्रकारे विचार केला तर आणि तशा बाजूने पहायला गेलं तर" वगैरेची लांबण लावत पुरेसा वेळ खाईल तोपर्यंत आपण ती सूचना कोणच्या प्रकारात बसते ते ठरवून घ्यायचे. आणि नाहीच जमले तर, "या विषयावर असा तडकाफडकी निर्णय घेतलेलं बरं दिसणार नाही. आमच्याकडे त्यातले तज्ञ आहेत त्यांचा सल्ला घ्यायला हवा, शिवाय आणखी कुणावर काय परिणाम होईल ते जरा तपासून पहायला हवं." वगैरे सांगत एक नवीन प्रकार निर्माण करायचा.
आपण अशा प्रकारे जय्यत तयारी केलेली असली तर समोरचा माणूस कितीही टिपटॉप कपडे घालून आलेला असला, फाड फाड इंग्रजी बोलत असला किंवा मुलायम अदबशीरपणे वागत असला तरी हरकत नसते. त्याच्या व्यक्तिमत्वाचा आपल्यावर प्रभाव पाडूच द्यायचा नाही. तो आत्मस्तुती करणारा असेल तर फारच उत्तम. त्याच्या आत्मप्रौढीला हवा देत रहायचे आणि तो भरकटत बाजूला गेला की आपल्याला हव्या त्या मुद्यावर खेचून आणायचे. त्यानेही आपल्यासारखीच पूर्वतयारी केली असेल तर मात्र मुलाखतीचा खेळ छान रंगतो. निदान दोन चार बाबतीत आपले व त्यांचे हितसंबंध जुळत असतात, त्यावर एकमत होऊ शकते. ते करून "ही चर्चा अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात झाली, अनेक गैरसमज दूर झाले, कांही गोष्टींवर एकमत झाले. नव्या वाटा निर्माण झाल्या. प्रगतीचा मार्ग मोकळा झाला." वगैरे विधाने करायला आपण मोकळे.
(क्रमशः)

Monday, April 14, 2008

बोलू ऐसे बोल (भाग५)

व्यक्तिगत आयुष्यामध्ये बोलण्याचे कांही नमूने आपण पहिल्या पांच भागात पाहिले. आता थोडेसे व्यावसायिक व सामुदायिक जीवनातील बोलणे पाहू. हल्ली अनेक वेळा आपल्या घरातील दूरध्वनीची किंवा खिशातील भ्रमणध्वनीची घंटी वेळी अवेळी किणकिणते. "आत्ता या वेळी कुणाला आपली आठवण झाली?" असे म्हणत चडफडत आपण तो कानाला लावतो आणि त्यातून अतिशय मुलायम स्वरात कोणीतरी बोलते, "मी अमक्या अमक्या बँकेतून सौदामिनी बोलते आहे आपण मिस्टर तमुकच ना?" मनात थोडेसे विरघळलेले असलो तरी आवाजात शक्य तेवढा तुटकपणा आणीत आपण म्हणतो."हो, पण आपलं काय काम आहे?""त्याचं असं आहे की आमच्या बँकेनं एक खास योजना आंखली आहे आणि त्यांनी काढलेल्या भाग्यवान विजेत्यांच्या यादीत तुमचं नांव निघालंय्. मग तुम्ही त्या योजनेत सहभागी होणार ना?" 'भाग्यवान' हा शब्द ऐकून आपल्या तोंडाला थोडं पाणी सुटलेलं असतं. आपला आवाज थोडा सौम्य करीत आपण विचारतो,"कसली नवीन योजना आहे?""आम्ही तुम्हाला एक नवीन क्रेडिट कार्ड द्यायचं ठरवलं आहे. ते वापरून आपण अमुक, तमुक, तमुक, तमुक, इतक्या गोष्टी सोयिस्कररीत्या करू शकाल. तुम्ही नुसतं हो म्हंटलंत की लगेच आमचा माणूस तुमच्याकडे एक कागद घेऊन येईल. तुम्हाला फक्त त्यावर एक सही करायची आहे. बाकी सगळं कांही तो भरेल. तुम्ही कुठं बरं राहता?"आपला आवाज पुन्हा ताठर होतो,"अहो मला क्रेडिट कार्डचे सगळे फायदे माहीत आहेत. मी कधीपासूनचा ती वापरतो आहे. आणखीन एका कार्डाची मला गरज नाही." "हो कां? कुठली कार्डे? पण बघा, आमचं कार्ड की नाही अगदी नवीन निघालंय्. या पूर्वी कुणीही कधीही दिल्या नसतील इतक्या सुविधा आम्ही देणार आहोत. शिवाय अगदी मोफत आपला विमा सुद्धा उतरवून देणार आहोत. एकदा वापरून तर बघा. पुन्हा तुम्ही कुठल्याही जुन्या कार्डाकडे कधी वळणार नाही.""मला नको आहे बाई तुझं कार्ड. एकदा सांगितलेलं समजत नाही का ?" आता आपण वैतागून एकेरीवर येऊन दम देतो.आपली मनःशांति यत्किंचितही ढळू न देता ती म्हणते,"कांही हरकत नाही. निदान तुम्हाला खर्चासाठी कांही पैसै हवेच असतील ना? आमची बँक तुम्हाला अगदी सवलतीच्या दराने कर्ज देईल. तुम्ही ते तुम्हाला पाहिजे तितक्या काळात हप्त्या हप्त्याने परत फेडू शकता. तुमच्या नांवाने एक लाख रुपयांचा चेक लिहून तयार ठेवला आहे. तुम्ही फक्त हो म्हंटलंत की लगेच ...." पुढची रेकॉर्ड आणखी एकदा ऐकवली जाते.""अहो मला खरच सध्या पैसे बैसे नको आहेत. ते लागतील तेंव्हा मी येईन तुमच्याच बँकेकडे येईन बरं. आणखी कांही?" आपण काकुळतीने म्हणतो.आपल्या आवाजातील मार्दव जराही कमी होऊ न देता ती शेवटचा प्रयत्न करते, "बरं बाई. पण ही स्कीम कांही तेंव्हापर्यंत चालणार आहे की नाही कुणास ठाऊक. त्यापेक्षा आताच कर्ज घेऊन ठेवलेत तर ते तुम्हाला कधीही उपयोगी पडेल. नाही कां?"
आपण वैतागून कांहीही उत्तर न देता रिसीव्हर खाली ठेवतो. आता या मुलीला खरंच आपल्याबद्दल कांही आपुलकी कुठे वाटत असते? तिचा आणि आपला कसलाही संबंध नसतो. तिचे खरे नांवसुद्धा आपल्याला कधी कळत नाही. इतकेच नव्हे तर तिचा त्या बँकेशीही कांही संबंध नसतो. ती एखाद्या कॉल सेंटरवर काम करीत असते आणि तिला मिळालेले दूरध्वनिक्रमांक फिरवून त्यावर प्रत्येकाशी तेच ते गळेपडूपणाचे बोलत असते. ही 'साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी' पण तिचा 'बोलविता धनि दुसराची'असतो. तिला फक्त तसे गोड बोलण्याबद्दलच पगार मिळत असतो. तिने दाखवलेल्या आमिषांना किंवा दिलेल्या आश्वासनांना काडीइतका अर्थ नसतो हे त्यावर विश्वास ठेवणा-यांना कालांतराने समजते.
यावरून एक खूप जुना किस्सा आठवला. एक नवा भाट एका राजाच्या दरबारात गेला. त्याने तोंड फाटेपर्यंत त्या राजाची स्तुतिसुमने भरभरून गाऊन त्याला प्रसन्न केले. राजाने त्याला सांगितले, "वा! आज आम्ही तुझ्यावर खूष झालो आहोत. उद्या तू कोषाध्यक्षाकडून हजार मोहरा घेऊन जा." सगळे दरबारी लोक त्यावर गालातल्या गालात हंसले. आपल्या कवित्वाच्या प्रभावावर तो भाट भलताच खूष झाला. दुस-या दिवशी मिळणार असलेल्या हजार मोहरांमधून आपण काय काय घ्यायचे याची शेख महंमदी स्वप्ने पहात त्याने ती रात्र कशीबशी घालवली. दुसरे दिवशी सकाळीच तो कोषाध्यक्षाकडे जाऊन पोचला. कोषाध्यक्षाने सरळ कानांवर हांत ठेवले. तो भाट कोषाध्यक्षाची तक्रार घेऊन चिडून आरडाओरड करीत पुन्हा राजदरबारात गेला. राजाने विचारले, "काय झाले?" त्याने तक्रारीच्या सुरात सांगितले, "महाराज, तुम्ही देऊ केलेले बक्षिस हा तुमचा माणूस मला देत नाही आहे." महाराज म्हणाले, "मी कधी तुला बक्षिस देऊ केले होते? नीट आठवून पहा. मी फक्त तुला एवढेच सांगितले होते की उद्या तू कोषाध्यक्षाकडून हजार मोहरा घेऊन जा. तू हजार शब्द उच्चारून मला खूष केलंस, मी दोन वाक्ये बोलून तुला खूष केलं. मी तर तुझं काव्य लगेच विसरूनसुद्धा गेलो होतो तरी तू रात्रभर खुषीत होतास ना! मग फिटान् फिट झाली तर. आता तू जाऊ शकतोस."
टेलीफोनवर आजकाल आणखी एका प्रकारचे मंजुळ स्वर वाढत्या संख्येने ऐकू येऊ लागले आहेत. कोठल्याही मोठ्या संस्थेच्या मुख्य कार्यालयाला फोन लावला की लगेच, "अमक्या अमक्या स्थानावर आपले स्वागत आहे." एवढेच गोड आवाजात उच्चारलेले शब्द ऐकू येतात आणि सतार वाजायला लागते. कांही काळाने "आपले कुणाकडे कशा प्रकारचे काम आहे?" एवढा एक प्रश्न ऐकू येतो आणि त्याचे उत्तर देताच पुन्हा सतार वाजायला लागते. नंतर तिसरा एक आवाज कानावर येतो आणि आपण वाट चुकून भलत्याच एक्स्टेंशनवर आला असल्याची माहिती देऊन फोन बंद करतो. कांही स्थळांवर तर आपल्याला सूचनामागून सूचना मिळत राहतात. "आपल्याला हिंदीमधून माहिती पाहिजे असेल तर क्रमांक १ चे बटन दाबा, इंग्रजीमधून हवे असेल तर २ चे बटन दाबा." "आपला फोन सपूर्णपणे डेड झाला असेल तर अमुक बटन दाबा, खरखर येत असेल तर तमुक" किंवा "आपल्याला गाडीचे आगमनाची माहिती हवी असेल तर गाडीचा क्रमांक टाईप करा, आरक्षणासंबंधी विचारणा असेल तर पिनकोडचे सारे आंकडे दाबा" वगैरे वगैरे. ही सगळी माहिती जय्यत तयार ठेऊन फोन करणारे धन्य ते लोक! "आजकाल किती सुधारणा झाली आहे?", "सगळी माहिती कशी पटापट मिळायला लागली आहे?" वगैरे त्यांनी केलेली भलावण ऐकून तर आपल्या मनात जास्तच न्यूनगंड निर्माण होतो. कारण आपल्याला सजीव माणसांबरोबर संभाषण करण्याची संवय असते. आपल्याला काय पाहिजे ते तो समजून घेईल व त्याप्रमाणे योग्य ते मार्गदर्शन करेल अशी अपेक्षा असते. कदाचित अधिक कार्यक्षम अशा पण निर्जीव यंत्राला आपली काडीइतकी पर्वा करण्याची गरज नसते. त्याला जसे प्रोग्रॅम केले असेल तसे ध्वनि ते एकामागून एक काढत जाते आणि बंद होते. मानवी आवाज ऐकू आला तरी ते कोणाचेही 'बोल' नसतातच. ते असतात फक्त विशिष्ट 'ध्वनि'.
ऑफीसांमधील टेलीफोन्सचे असे यांत्रिकीकरण होण्याच्या पूर्वीची एक गोष्ट आठवते. अजूनही भारतात संपूर्ण यांत्रिकीकरण झालेले नाही. बहुतेक ठिकाणी टेलीफोन ऑपरेटर हे एक खास पद असते. अनेक ठिकाणी त्याची रिसेप्शनिस्ट वा डिस्पॅच क्लार्क यांचेबरोबर सांगड घातलेली असते. पण ते पद अजून नामशेष झालेले नाही. मधुर वाणी आणि संभाषणचातुर्य हे गुण ते काम करण्यासाठी आवश्यक समजले जातात. मी पूर्वी एक लघुकथा वाचली होती. त्यातील कथानायिका रंगाने काळी सांवळी आणि बेढब अंगाची असते. टेलीफोन ऑपरेटरची नोकरी मिळवण्यासाठी ती अनेक ठिकाणी अर्ज करते. तिच्या पात्रतेनुसार तिला ठिकठिकाणी मुलाखतीसाठी बोलावणीसुद्धा येतात. पण प्रत्येक वेळी नोकरी मिळण्यात तिचे रूप आडवे येत असते. शेवटी एका जागी ती मुलाखतीसाठी वेळेवर पोचलेली असते, पण तेथे येत असलेल्या इतर सुस्वरूप उमेदवारांना पाहून ती बाहेरच थांबते व जवळच्या एका सार्वजनिक टेलीफोन बूथवरून मुलाखत घेणा-या प्रमुख व्यक्तीला फोन करून "कांही अपरिहार्य कारणाने आपल्याला यायला कदाचित थोडा उशीर होण्याची शक्यता आहे" असे आपल्या मंजुळ आवाजात व आर्जवी स्वरात सांगून याबद्दल त्यांची क्षमा मागते व तिला मुलाखतीसाठी सर्वात शेवटी बोलावण्याची विनंति करते. या वेळेस मात्र तिचा आवाज तिच्या आधी पोचलेला असल्यामुळे मुलाखत घेणा-याला तो पसंत पडलेला असतो व त्यामुळे तिला ती नोकरी मिळते.

Wednesday, April 09, 2008

नववर्षदिनाबद्दल आणखी कांही

या वर्षी मुंबईच्या लोकांनी सहा एप्रिलला गुढी पाडवा साजरा केला तर नागपूरच्या लोकांसाठी तो सात एप्रिलला आला म्हणे. मुंबईलासुध्दा दरवर्षाप्रमाणे सकाळी उजाडताच गुढी न उभारता ती सुमारे दहा वाजता उभी करायची असे सांगितले गेले होते. हा फरक कशामुळे होत असेल असा प्रश्न मनात डोकावतोच ना? मुसलमानांच्या ईदबद्दल तर नेहमीच अनिश्चितता असते. ईदच्या सुटीचा दिवस आयत्या वेळी बदलला तर ईद आणि शनिवार रविवारच्या सुट्यांना जोडून रजा घेऊन चार दिवस बाहेरगांवी गेलेल्या लोकांची बरीच पंचाईत होते. इंग्रजी कॅलेंडरचे मात्र बरे असते. ठरलेल्या दिवशी मध्यरात्री ठरलेल्या वेळी बाराच्या ठोक्याला न्यू ईयरची सुरुवात होते म्हणजे होतेच.
ती सुध्दा जगभर सर्व ठिकाणी एका वेळेला होत नाहीच! आम्ही मध्यरात्री मुंबईत " हॅपी न्यू ईयर" चा जल्लोष करत असतो तेंव्हा जपानमध्ये पहाट झालेली असते तर युरोपमध्ये रात्रीच्या पार्टीची तयारी चालली असते. अमेरिकेतले लोक अजून ऑफीसात बसून आदल्या दिवसाची कामेच उरकत असतात. पृथ्वीचा आकार गोल असल्यामुळे तिचा सगळा भाग एकदम सूर्यासमोर येत नाही, थोडा थोडा भाग सूर्याच्या उजेडात येऊन तिथे दिवस होतो आणि त्याच वेळेस पलीकडच्या बाजूचा थोडा थोडा भाग काळोखात जाऊन तिथे रात्र होते यामुळे असे होते. आपापल्या देशातल्या घड्याळात सुसूत्रता आणण्यासाठी एक स्टॅंडर्ड टाईम ठरवली जाते. अमेरिका आणि रशिया यासारख्या अवाढव्य पसरलेल्या देशात तर वेगवेगळे टाईम झोन ठरवावे लागतात. अखेर ज्या विभागात जी प्रमाणित वेळ असेल तिच्याप्रमाणे ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता नवे वर्ष सुरू होते. तो नेमका क्षण ठरवला गेला असला तरी त्या क्षणी बाहेर निसर्गात कांही म्हणजे कांही विशेष घडत नसते. निदान साध्या डोळ्यांनी दिसण्यासारखे कांही नसते. नासाचे शास्त्रज्ञ त्यातही कांही अतिसूक्ष्म निरीक्षणे करून आपली घड्याळे कांही मिलीसेकंदाने मागेपुढे करून घेतात एवढेच!
इस्लामी पध्दतीत अमावास्येला गायब झालेला चंद्र आभाळात प्रत्यक्ष डोळ्यांना दिसल्यानंतरच प्रत्येक पुढील महिन्याची सुरुवात होते. हा 'ईदका चॉंद' किंवा ही 'प्रतिपच्चंद्ररेखा' अगदी पुसट असते आणि त्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर लवकरच चंद्रही अस्तंगत होतो. त्यामुळे कुठे तो दिसतो किंवा कुठे दिसत नाही. त्याच वेळी पश्चिमेच्या क्षितिजावर काळे ढग जमले तर तो दिसणे कठीणच! याचप्रमाणे वर्षाचा शेवटचा महिना संपल्यानंतर जेंव्हा चंद्रदर्शन होईल तेंव्हाच त्यांच्या नव्या वर्षाची सुरुवात होणार. त्यामुळे त्याचा सस्पेन्स अखेरपर्यंत कायम असतो.
आपले पंचांग तर अत्यंत शास्त्रशुध्द पध्दतीने अतीशय काटेकोरपणे तयार केलेले दिसते, मग त्यात सगळीकडे एका वेळी एक तिथी कां येत नाही? या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले आहे. तिथी ठरवण्याच्या जटिल पध्दतीमुळेच ती वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या वेळी येते. दररोज रात्रीच्या बारा वाजता तारीख आणि वार बदलण्याच्या सोप्या सुटसुटीत पध्दतीची आपल्याला इतकी संवय झाली आहे की "आज इतके वाजेपर्यंतच चतुर्थी आहे, त्यानंतर पंचमी सुरू होते." असे कोणी पंचांग पाहून सांगितलेले आपण ऐकतो, त्याचा नीटसा अर्थ कळत नाही. कधी कोणत्या तिथीचा क्षय होतो आणि एकादशी तर बहुधा नेहमीच लागोपाठ दोन दिवस असते. ते सगळे कांही शास्त्रीपंडित जाणतात असे म्हणून आपण सोडून देतो. पण आपल्याला जरी ते ठरवता आले नाही तरी समजून घ्यायला तितकेसेकठीण नाही.
ज्या काळात पंचांग तयार करण्याचे शास्त्र निर्माण झाले तेंव्हा सूर्योदयापासून दिवस सुरू होत असे व त्याप्रमाणे वार बदलत असे. चंद्राच्या निरीक्षणावरून तिथी ठरवण्याची क्रिया बरीच गुंतागुंतीची आहे. आकाशात भ्रमण करत असलेला ( किंवा तसा दिसणारा) सूर्य आणि चंद्र हे दोघे अमावास्येला एकत्र असतात. त्यानंतर चंद्र सूर्यापासून दूर जातो आणि पौर्णिमेला तो सूर्याच्या समोर येतो. हे दोघेही क्षितिजापासून किती अंशाने वर किंवा खाली आहेत हे पाहून त्यातला फरक बारा अंशाने वाढला की शुक्लपक्षातली तिथी बदलते आणि त्या उलट तो बारा अंशाने कमी झाला की कृष्णपक्षातली तिथी बदलते. हे निरीक्षण त्या काळी कसे करत असतील कुणास ठाऊक? पण वर्षानुवर्षे केलेल्या सूक्ष्म निरीक्षणातून जी सूत्रे किंवा कोष्टके त्या काळात तयार केली गेली ती इतकी अचूक आहेत की तींवरून आजही पुढील काळातले पंचांग बनवले जाते. अमावास्येच्या सुमारास हे बारा अंशाचे अंतर लवकर कापले जाते आणि पौर्णिमेच्या सुमारास त्याला जरा अधिक वेळ लागतो असे दिसते. त्याचे शास्त्रीय कारण इथे देण्याची गरज नाही. पण हा बदलण्याचा क्षण दिवसा किंवा रात्री केंव्हाही येऊ शकतो. त्यामुळे आपल्या पंचांगातली तिथी रोज वेगवेगळ्या वेळी बदलत असते. सूर्योदयाच्या वेळेस जी तिथी असते ती सर्वसाधारणपणे त्या दिवसाची तिथी मानली जाते.
आपल्या देशातसुध्दा सगळ्या जागी एकाच वेळी सूर्य उगवत किंवा मावळत नाही. मुंबईच्या पूर्वेला असलेल्या कोलकात्याला नेहमीच तो मुंबईपेक्षा तासभर आधी उगवतो आणि तासभर आधी अस्तालाही जातो. बंगलोरच्या उत्तरेला असलेल्या दिल्लीला मात्र तो उन्हाळ्यात आधी उगवून उशीराने मावळतो आणि थंडीच्या दिवसात याच्या बरोबर उलट घडते, कारण दोन्ही ठिकाणचे दिवस आणि रात्र समान नसतात. अशा प्रकारे प्रत्येक गांवाच्या अक्षांश व रेखांशाप्रमाणे तिथल्या सूर्योदयाची तसेच चंद्रोदयाची वेळ निरनिराळी असते. त्यामुळे तिथी बदलण्याच्या वेळा देखील वेगळ्या येतात.
या वर्षी एक गंमतच झाली. ६ एप्रिलच्या सूर्योदयाच्या वेळी फाल्गुन अमावास्या चालू होती, ती सकाळच्या सुमारे साडेनऊ वाजता संपली आणि चैत्र शुक्ल प्रतिपदा सुरू झाली. पण ती देखील ७ एप्रिलच्या पहाटे सूर्योदय होण्याच्या आधीच संपून द्वितीया सुरू होते. म्हणजे या वेळेस प्रतिपदेचाच क्षय झाला! मग पाडवा कधी साजरा करायचा? अशा पेंचातून मार्ग काढण्याचा उपाय शास्त्रात दिला आहेच. त्याप्रमाणे ६ तारखेला अमावास्या संपल्यानंतर गुढी उभारायला मोकळीक दिली गेली. मुंबईच्या मानाने नागपूरला सूर्योदय लवकर होत असल्यामुळे ७ तारखेला त्या वेळेत प्रतिपदा संपत नव्हती, त्यामुळे ७ तारीखेलाच प्रतिपदा निश्चित होऊन त्या दिवशी गुढी पाडवा आला. खूप इंटरेस्टिंग आहे ना?