Saturday, August 09, 2008

कोण गुन्हेगार? भाग १

टेलीफोन खणाणला आणि सिटी हॉस्पिटलचे ट्रॉमा युनिट क्षणार्धात कामाला लागले. दोन वॉर्डबॉय ट्रॉलीवर स्ट्रेचर घेऊन गेटपाशी पोचले तोवर एक कार तेथे आली. त्यात असलेल्या अत्यवस्थ रुग्णाला उचलून लगेच ऑपरेशन टेबलवर नेले. डॉक्टर व नर्स त्या ठिकाणी जय्यत तयारीनिशी हजर होते. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण ते रुग्णाचे प्राण वाचवू शकले नाहीत.

त्या आवारात पोलिस इन्स्पेक्टर तैनात होते व त्यांनी चौकशीला सुरुवातही केलेली होती. शेजारच्याच उपनगरात रहाणारा डेव्हिड नांवाचा तरुण मरणप्राय अवस्थेतील रॉबर्टला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला मोठी जखम झालेली होती. त्यामधून खूप रक्तस्राव झाला होता.
पिस्तुलाची गोळी थेट मेंदूत जाऊन रुतली होती. तिनेच त्याचा प्राण घेतला होता. पण डेव्हिड म्हणाला की त्याला याबद्दल कांहीच माहिती नव्हती.

डेव्हिडला घेऊन पोलिस लगेच घटनास्थळी गेले. ईव्हान टॉवरच्या तळमजल्यावर त्याचे दुकान होते. त्या इमारतीच्या बाहेरील भिंतीचे रंगकाम सुरू होते. त्यासाठी स्कॅफोल्डिंग बांधले होते. तसेच कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खालच्या बाजूला नायलॉनच्या दो-यांचे भरभक्कम जाळे बांधलेले होते. बॉबी म्हणजे रॉबर्टला आपल्या डोळ्यादेखत या जाळ्यामध्येच वरून खाली पडतांना आपण पाहिल्याचे डेव्हिड सांगत होता. एका ठिकाणी जाळीचा थोडा भाग रक्ताळलेला होता तसेच त्या ठिकाणी खाली जमीनीवर रक्ताचे शिंतोडे उडलेले दिसत होते.

तिथली नोंद घेऊन लगेच इन्स्पेक्टर दहाव्या मजल्यावरील रॉबर्टच्या फ्लॅट नंबर १०१२ कडे गेले. त्याच्या खिशात मिळालेल्या चावीने दरवाचाचे कुलूप उघडल्याचा खट्ट आवाज आला पण दरवाजा कांही उघडला नाही. कारण त्याला आंतून खिटी लावलेली होती. याचा अर्थ घरात कोणी तरी, कदाचित एकाहून अधिक माणसे असावीत असा तर्क लावून पोलिसांनी जोरात घंटी वाजवली तसेच दरवाजा ठोठावला सुद्धा. पण आंतून कांहीच प्रतिसाद किंवा कसल्याही हालचालीचा आवाज आला नाही.

पोलिसांनी सावधगिरीचा पवित्रा घेत जोराने धक्का देऊन दार फोडून उघडले. पण आंत पहाता तेथे कोणीसुद्धा नव्हते. त्या लहानशा फ्लॅटमध्ये कुठे लपून बसण्यासारखी जागाही नव्हती. अगदी पलंगाखाली वाकून व माळ्यावर चढूनसुद्धा पाहून झाले पण तेथे कोणीच नव्हते. घरातील सामान फारसे अस्ताव्यस्त पडलेले नव्हते. एखाद्या सडाफटिंगाच्या घरात जसा असेल इतपतच पसारा होता. हॉलच्या दारासमोरच एक खिडकी उघडी होती. त्या खिडकीच्या बरोबर खालीच रॉबर्ट जाळ्यात पडला होता. खिडकीजवळ भिंतीला ला लागून एक खुर्ची ठेवलेली होती. एखाद्या सडपातळ माणसाला तीवर चढून खिडकीबाहेर जाता येणे शक्य दिसत होते. निश्चितपणे कोणीतरी त्या मार्गाने बाहेर गेला असणार असे सुचवणारे पावलांचे ताजे ठसे खुर्चीवर व खिडकीच्या चौकटीवर उमटलेले सापडले. पण घरात कुठेही झटापटीचे कसलेही चिन्ह तर नव्हतेच पण रक्ताचा एक थेंबसुद्धा दिसला नाही की कुठली जागा नुकतीच पुसून साफ केल्यासारखी दिसत नव्हती.

रॉबर्टच्या फ्लॅटच्या एका बाजूचा फ्लॅट महिनाभरापासून बंदच होता कारण तिथे रहाणारे लोक परगांवी गेले होते. दारवाजावरील सांचलेली धूळ व तिथे जमलेल्या कोळ्याच्या जाळ्यावरून तो ब-याच दिवसात उघडलेला नाही हे सिद्ध होत होते. दुस-या बाजूच्या फ्लॅटमध्ये डेव्हिड स्वतः रहात होता. त्याने आपला फ्लॅट उघडून दाखवला. तिथेही संशयास्पद असे कांहीच नव्हते.

डेव्हिडला घेऊनच इन्स्पेक्टर खालच्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ९१२ मध्ये आले. तिथे एक सेवानिवृत्त लश्करी अधिकारी मेजर स्मिथ त्यांच्या पत्नीसह रहात होते. ते वयाच्या सत्तरीला आलेले चांगले उंचे पुरे, किंचित स्थूल पण तंदुरुस्त गृहस्थ होते. थोडे कडक शिस्त पाळणारे पण स्वभावाने अत्यंत सुशील, शांत व नेहमी सगळ्यांना मदत करणारे होते. मिसेस स्मिथ थोड्या तोंडाने फटकळ वाटल्या तरी सरळमार्गी व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. उभयतांना त्या बिल्डिंगमध्ये मानाचे व आदराचे स्थान होते. ही सगळी माहिती त्यांच्याकडे जाता जाता डेव्हिडने पुरवली.

इन्स्पेक्टरने बेल वाजवताच मेजर स्मिथ यांनी दरवाजा उघडला. डेव्हिडला पहाताच ते म्हणाले, "अरे डेव्हिड, ये ना. आज नवीन कोणते पाहुणे आणले आहेस?"
"मी इन्स्पेक्टर वेन, क्राइम ब्रँच." स्वतःचा ओळख करून देतच त्याने लगेच सांगितले, " मी इथे रॉबर्टच्या खुनाच्या तपासासाठी आलेलो आहे."
"बॉबीचा खून! अरे देवा!" असे म्हणत मेजर मटकन खाली बसते. बेल वाजण्याचा आवाज ऐकतांच एका हांताने काठीचा आधार घेत व "आता या वेळी कोण तडमडलं ?" असे पुटपुटत मिसेस स्मिथ बेडरूममधून बाहेर येत होत्या. इन्स्पेक्टरचे बोलणे ऐकून त्या तर धाडकन दारातच खाली कोसळल्या. मेजरनी लगेच
उठून, पुढे होऊन व त्यांना हाताने उठवून छातीशी घट्ट धरले व हळूहळू त्यांच्या पाठीवर थोपटत त्यांना कोचावर बसवले.
हे हृदयद्रावक दृष्य पाहून इन्स्पेक्टरने विचारले, "मी थोड्या वेळाने येऊ कां?"
मेजरनी त्यांना हातानेच थांबवीत ते म्हणाले,"तुमची चौकशी ताबडतोब सुरू करा. उगाच उशीर करून अपराध्याला वेळ देता कामा नये. हो ना?"
(क्रमशः)

No comments: