Thursday, August 21, 2008

मादाम कामा यांचा राष्ट्रध्वज


बरोबर एकशे एक वर्षांपूर्वी ऑगस्ट १९०७ मध्ये जर्मनीमधील स्टुटगार्ट या शहरात समाजवादी लोकांचे आंतरराष्ट्रीय संमेलन भरले होते. त्या काळात युरोपात रहात असलेल्या मादाम कामा या भारतीय विदुषीने त्या संमेलनात भाग घेतला व भर सभेत हिंदुस्थानचा झेंडा फडकवून सर्व उपस्थितांनी त्याच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले. या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाली याचा उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने मागच्या वर्षी महाराष्ट्रातील विविध गडांवर एकाच दिवशी हा ऐतिहासिक ध्वज फडकवून त्याला मानवंदना देण्याचा उपक्रम एका दु्र्गमित्र संस्थेतर्फे करण्यात आला. त्याचे वृत्त एका लोकप्रिय कार्यक्रमात ऐकायला मिळाले.


ते ऐकल्यावर मादाम कामा यांच्याविषयी माहिती मिळवण्याच्या उद्देशाने थोडे आंतर्जालावर उत्खनन केले. त्यात बरीच उद्बोधक माहिती मिळाली आणि त्या ऐतिहासिक ध्वजाची दोन वेगवेगळी चित्रे सापडली. दोन्ही चित्रे तिरंगी असून त्यात तीन आडवे पट्टे आहेत. एका चित्रात सर्वात वर भगव्या रंगाच्या पट्ट्यात पिवळसर छटेमध्ये आठ कमळांच्या आकृती आहेत. मधला पट्टा पिवळ्या रंगाचा असून त्यावर 'बंदेमातरं' असे लिहिलेले आहे. खालच्या हिरव्या रंगाच्या पट्ट्यावर पांढ-या रंगात सूर्य व चंद्रकोर रेखाटल्या आहेत. दुस-या चित्रात सर्वात वरच्या बाजूला हिरवा पट्टा आणि खालच्या बाजूला लालभडक पट्टा आहे. हिरव्या पट्ट्यावर कमळांची आणि लाल पट्ट्यावर चंद्रसूर्यांची चित्रे असली तरी त्यांचे आकार वेगवेगळे आहेत. मधल्या पिवळ्या रंगाच्या पट्ट्यावर छापील अक्षरांत 'वंदे मातरम्' असे लिहिले आहे. फक्त शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या राष्ट्रीय महत्वाच्या आणि स्वातंत्र्यसंग्रामासारख्या विषयाशी जोडल्या गेलेल्या या घटनेच्या तपशीलात इतके अंतर असावे हे पाहून सखेद आश्चर्य वाटले. यातील कोठल्या चित्रावर विश्वास ठेवायचा? त्यातील किमान एक चित्र तरी चुकीचे असणार. मग त्याच्यासोबत दिलेल्या मजकुराच्या विश्वासार्हतेचे काय?


मादाम कामा यांनी स्व.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मदतीने हा ध्वज बनवला असाही उल्लेख आहे. या दोन महान देशभक्तांनी जी रंगसंगती साधली असेल ती त्या काळातील परिस्थितीमध्ये उत्कृष्टच असणार यात मला शंका नाही. त्यात काय बरोबर आहे किंवा नाही हा मुद्दाच नाही. त्यांनी यापेक्षा वेगळे रंग वापरले असते तरीही तो झेंडा वंदनीयच ठरला असता. एका आंतरराष्ट्रीय मंचावर तो फडकवण्यात मादाम कामा यांनी औचित्य, चातुर्य आणि अतुलनीय धैर्य या सर्वांचा सुरेख संगम साधला होता. भारतात सुरू असलेल्या स्वातंत्र्यसंगामाला त्यातून एकदम जगभर प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे त्या झेंड्यावर कोणत्या रंगात कोणती चित्रे काढलेली होती यापेक्षा असा झेंडा तयार करून तो फडकवला गेला हे महत्वाचे आहे. तरीही त्याचे स्मरण करतांना त्यात अचूकपणा असावा असे मला वाटते कारण माझ्या माहितीप्रमाणे ही दोन्ही चित्रे प्रसारमाध्यमांवर दाखवली गेली आहेत आणि लक्षावधी लोकांनी ती पाहिली असणार.

No comments: