Wednesday, August 20, 2008

मॉम महाशय म्हणतात


प्रख्यात साहित्यिक व विचारवंत सॉमरसेट मॉम यांच्या अनेक पुस्तकांमधून विखुरलेले (किंवा त्यांच्या नांवावर खपवलेले) कांही मनोरंजक, मार्मिक आणि कांही धक्कादायक असे सुविचार वाचनात आले. त्यातील बारा अवतरणांचे स्वैर रूपांतर खाली दिले आहे.

१. दुर्दैवाने या जगात चांगल्या संवयी सोडून देणे अधिक सोपे असते आणि वाईट संवयी सोडून देणे मात्र कठीण कर्म.
२. ज्या देशातल्या लोकांना त्याच्या स्वातंत्र्यापेक्षा त्यांचा ऐषोआराम अधिक महत्वाचा वाटतो ते आपले स्वातंत्र्य तर हिरावून बसतातच, शिवाय त्यापाठोपाठ त्यांचा ऐषोआरामसुद्धा नाहीसा होतो.
३. ज्या देशातल्या लोकांना त्याच्या स्वातंत्र्यापेक्षा दुसरे कांहीही अधिक मौल्यवान वाटते, ते आपले स्वातंत्र्य तर हिरावून बसतातच, शिवाय त्यापाठोपाठ त्यांना मौल्यवान वाटणारी त्यांची संपत्तीसुद्धा त्यांच्या हातातून निसटून जाते.
४. लोक काम करतांना त्यात जितका मूर्खपणा करतात व बाष्कळ बडबड करतांना ते जितके सुखावतात हे पाहिल्यानंतर त्यांनी काम करण्यापेक्षा अधिक बडबड करणेच जगाच्या दृष्टीने बरे होईल असे वाटायला लागते.
५. कलाकाराची प्रत्येक निर्मिती हा त्याच्या आत्म्याने मारलेल्या धाडसी भरारीचा आविष्कार असला पाहिजे.
६. मानवजातीबद्दलचे माझे मत थोडक्यात असे आहे की त्यांचे हृदय व्यवस्थित जागेवर असते पण डोके तेवढेसे ठिकाणावर नसते.
७. खेड्यामधला रात्रीचा काळोखसुद्धा ओळखीचा आणि मैत्रीपूर्ण वाटतो तर शहरातला उजेडाचा भगभगाट अनैसर्गिक, विद्वेशपूर्ण आणि एखाद्या टपून बसलेल्या विकराल गिधाडासारखा दहशत बसवणारा वाटतो.
८. जीवनाची एक गंमत अशी आहे की जर तुम्ही सर्वोत्कृष्ट गोष्टीशिवाय इतर कशाचाही स्वीकार करणे नाकारलेत तर बहुधा तुम्हाला ती मिळते.
९. तरुण फार सुखी असतात अशी तारुण्य गमावलेल्या लोकांची गैरसमजूत असते.
१०. माणसांना नुसताच खूप संपत्तीचा हव्यास नसतो, तर स्वतःचा आत्मसन्मान राखणे, कुठलाही अडसर न येता काम करणे, उदारपणा, स्पष्टवक्तेपणा व स्वातंत्र्य सांभाळणे यासाठी पुरेल इतके द्रव्य हवे असते.
११. पीडा सहन करण्यामुळे चारित्र्य उज्ज्वल होते हे खरे नाही, सुखी राहण्यामुळे कधी कधी ते होत असेल, पण बहुतेक वेळा पीडित माणूस क्षुद्र मनोवृत्तीचा आणि सूडबुध्दी धारण करणारा बनतो.
१२. तुमचा वाचक जेवढा प्रत्यक्षात असेल त्यापेक्षा अधिक मूर्ख आहे असे समजणे धोक्याचे असते.

No comments: