Thursday, August 21, 2008

एक धागा सुखाचा (उत्तरार्ध)


"एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे।" असे आपल्याला खरेच नेहमी वाटते कां? "तुम्ही कसे आहात?" किंवा "तुमचं कसं चाललंय्" असे आपण कुणालाही विचारतो तेंव्हा तो "ठीक आहे", "बरं चाललंय्" असे म्हणतो. तेंव्हा सरसकट सगळ्या लोकांनी "शंभर धागे दुःखाचे" असे म्हणणे कितपत बरोबर आहे? ते ठरवण्यापूर्वी इतर कांही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. "सुख कशाला म्हणायचे आणि दुःख म्हणजे नेमके काय?", "त्यांचे मोजमाप कसे करणार?", "त्याची बेरीज वजाबाकी करून हिशोब मांडता येईल कां?" अशा प्रश्नांची समर्पक उत्तरे त्यासाठी आवश्यक आहेत. पण जरी कोणाला कधी ती मिळाली तरी इतरांना ती
पटतील असे वाटत नाही.

सुखी माणसाचा सदरा शोधणा-या राजाची गोष्ट सर्वांना माहीत आहे. "सुखी माणसाचा सदरा अंगात घातलास तर तू सुद्धा सुखी होशील." असा सल्ला मिळाल्यानंतर तो राजा आपल्या सर्व राज्ययंत्रणेला तो सदरा शोधून आणण्याच्या कामाला लावतो. त्याचे शिपाई राज्यामधील प्रत्येक माणसाकडे जाऊन "जगी सर्वसुखी असा कोण आहे?" अशी विचारणा करीत सुटतात. पण प्रत्येक नागरिक तो कोठल्या ना कोठल्या दुःखाने ग्रस्त असल्याचे सांगतो. अखेरीस घनदाट जंगलात राहणारा एक माणूस सुखी असल्याचे त्यांना समजते, पण त्या दरिद्री माणसाने आयुष्यात कधी अंगात सदरा घातलेला नसतो. त्यामुळे राजाला देण्यासाठी त्याच्याकडे सदराच नसतो. या गोष्टीवरून त्या राजाने कोणता बोध घेतला आणि तो 'सुखिया जाला' की नाही ते माहीत नाही. पण त्या दोघांच्या सुखाबद्दलच्या कल्पनांमध्ये जमीन आसमानाएवढा फरक नक्कीच असणार. त्यामुळे केवळ त्या रानातल्या माणसासारखा उघडाबंब राहिल्याने तो राजा सुखी होऊ शकला असता कां? अलीकडच्या काळात सलमानखानने मात्र या प्रकारे सुखी व्हायचे ठरवलेले दिसते!

दुस-या एका 'सुखी' माणसाची गोष्ट एकदा माझ्या वाचनात आली होती. तो रशियामधला एक थोर विचारवंत होता. एकदा तिथल्या शिपायांनी नामसादृश्यामुळे एका अट्टल गुन्हेगाराऐवजी त्यालाच पकडून नेले आणि कोठडीत टाकून दिले. जुलमी झारची राजवट असो वा कम्युनिस्टांची, दोन्हीमध्ये 'अंधेरनगरी चौपट राजा, टके सेर भाजी टके सेर खाजा' हाच खाक्या होता. या बाबतीत त्यांच्यात विशेष फरक नव्हता. त्या कैद्याच्या कोठडीमध्ये जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. पण त्याला तिथे टाकून गेलेल्या पोलिसांची पाठ फिरताच तो माणूस लगेच कामाला लागला. जमीनीवर पसरलेला सगळा कचरा त्याने गोळा करून कशात तरी गुंडाळून व्यवस्थित कोप-यात ठेऊन दिला. कागदाचे कपटे, कापडाच्या चिंध्या वगैरे जे साधन हातात मिळेल, त्याने घासून भिंतीवरचे डाग काढले, खिडक्यांची तावदाने पुसली. खिडकीच्या बाहेर झुडुपांचे रान वाढले होते. त्यांवरच उमललेली चार रानफुले गजामधून बाहेर हात काढून तोडून घेतली आणि शोभेसाठी खोलीमध्ये मांडून ठेवली. संध्याकाळी निरीक्षण करायला आलेला तुरुंगाचा अधीक्षक त्या कोठडीचे पालटलेले रूप पाहून चकित झाला. कैद्याने स्मितहास्य करून आणि "गुड इव्हनिंग सर!" असे म्हणत त्याचे स्वागत केले.
त्याने कैद्याला विचारले, "तू कोण आहेस?"
आपले नांव सांगून "मी एक प्राध्यापक आहे आणि फुरसतीच्या वेळात पुस्तके लिहितो." ही माहिती दिली.
"मग तू या इथे काय करतो आहेस?"
"आपल्या शिपायांनी मला इथे आणून ठेवले आहे. आता इथून सुटका होईपर्यंत मला इथेच रहायचे आहे म्हणून मी आपल्या या नवीन घराची साफसफाई करीत होतो."
तेवढ्यात कैद्यांसाठी चहा आला. तोच कप अधिका-याला देत तो कैदी म्हणाला,"खरेच मी किती सुदैवी आहे? घरी आलेल्या पाहुण्याचा कांही पाहुणचार करता येणार नाही या गोष्टीची मला केवढी चुटपुट लागली होती. आता कृपया तुम्ही या चहाचा स्वीकार करावा अशी विनंती आहे."
जेलर पार गोंधळून गेला आणि म्हणाला, "अरे भल्या माणसा, तुला विनाकारण इथे आणले आहे असे तू म्हणतो आहेस, तुला इतके दुःख देऊनसुद्धा तू आनंदी कसा?"
"सर, भले कोणी मला दुःख देईल, पण मी ते घेऊन त्याला कुरवाळत बसायलाच पाहिजे कां? आपण आनंदात रहायचे की दुःख करत बसायचे हे स्वतःच ठरवावे असे मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो आणि पुस्तकात लिहितो. मलासुद्धा त्याप्रमाणे वागायला पाहिजे ना!"

महाकवी मंगेश पाडगांवकरांच्या काव्यवाचनाचा एक कार्यक्रम मी मागच्या महिन्यात पाहिला. त्यांच्या एका प्रसिद्ध कवितेची जन्मकथा त्यांनी सांगितली. एकदा ते एक इंग्रजी पुस्तक वाचत होते. त्या पुस्तकाचा लेखक आधी शाळामास्तर होता. परिस्थिती मनाजोगती नसल्यामुळे तो सतत चिडचिड करीत रहायचा. एकदा त्याच्या एका विद्यार्थिनीने वहीत लिहून आणलेली हकीकत वाचल्यानंतर त्याचा स्वभाव आमूलाग्र बदलला.
ती गोष्ट अशी होती. "आम्ही एक गाणारा पक्षी पाळला आहे. रोज संध्याकाळी आम्ही त्याला पिंज-याबाहेर काढून घरातल्या घरात उडू देतो. एके दिवशी तो उडता उडता कोठल्यातरी अडगळीत कडमडला आणि त्यात त्याचा एक पाय मोडला. माझ्या वडिलांनी त्याला हळूच उचलून पुन्हा पिंज-यात ठेवले. आम्ही यापेक्षा अधिक कांहीच करू शकत नव्हतो. तो पक्षी आता बहुतेक मरणार असेच आम्हाला वाटत होते. मला कांही त्या रात्री शांत झोप लागली नाही. मध्येच उठून मी त्या पक्ष्याला पहायला गेले. तो अजून जीवंत असलाच तरी मान टाकून निपचित पडलेला किंवा असह्य वेदनेने कळवळत असेल अशी माझी अपेक्षा होती. पण तो तर एक पाय लोंबकळत असलेल्या स्थितीमध्येसुद्धा चक्क नेहमीसारखे गोड गाणे गात होता."
ही गोष्ट वाचल्यानंतर पाडगांवकरांना शब्द सुचले, "सांगा, कसं जगायचं । कण्हतकुण्हत, कां गाणं म्हणंत, तुम्हीच ठरवा ।" तेंव्हा आपल्या आयुष्याच्या महावस्त्रातले धागे सुती असावेत कां रेशमाचे कां जरीचे हे ज्याने त्यानेच ठरवणे चांगले असते. त्यातील सुखकारक किंवा दुःखदायी घटना घडवून आणण्याचे काम तो अदृष्य विणकर करीत असेल. त्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता येणार नाही. पण त्यावर आपली जी प्रतिक्रिया आपण करतो तिच्यावर आपण काबू मिळवला, आपण नेहमी सकारात्मक दृष्टीकोन बाळगला तर कदाचित शंभर धागे सुखाचे वाटतील. "सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे" असे म्हणणा-या तुकोबांनीच त्यानंतर "मन करारे प्रसन्न, मन सिद्धीचे कारण" असा उपदेश केलेला आहे तो यासाठीच.

2 comments:

Anonymous said...

Va !!
Yogya veli blog vaachla. Nirash zalo hoto pan aata nahiye. Dhanyavaad.

Anand Ghare said...

झटकून टांक जीवा दुबळेपणा मनाचा ।
फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा ।।