Thursday, August 14, 2008

झोपु संकुलातला स्वातंत्र्यदिनोत्सव


झोपु (झोपडपट्टी पुनर्वसन) योजनेखाली बांधण्यात आलेल्या नव्या संकुलात अनेक प्रकारची घरे होती. झोपड्यांमध्ये राहणा-या मूळ रहिवाशांसाठी एकदीड खोल्यांचे गाळे बांधून उरलेल्या जागेत मध्यमवर्गीयांसाठी दोन किंवा तीन खोल्यांच्या सदनिका आणि श्रीमंत ग्राहकांसाठी आलीशान अपार्टमेंट्स असलेल्या गगनचुंबी इमारती उभ्या केल्या होत्या. संकुलातील सगळ्या लोकांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यदिनोत्सव साजरा करावा असे कांही उत्साही लोकांना वाटले. त्याचा कार्यक्रम ठरवण्यासाठी त्यांनी सगळ्या इमारतींमधील रहिवाशांच्या प्रतिनिधींची एक सभा घेतली.


लोकांनी एकत्र येऊन झेंडावंदन करायचे, थोडी देशभक्तीपर गाणी म्हणायची आणि मिठाई खाऊन तोंड गोड करायचे इतका साधा कार्यक्रम आयोजकांच्या मनात होता. पण त्यावरील चर्चा मारुतीच्या शेपटासारखी वाढत गेली. ध्वजारोहण कोणी करायचे हेच आधी ठरेना. कोणाला त्यासाठी स्वातंत्र्यसैनिक हवा होता, पण स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये प्रत्यक्ष भाग घेतलेला सैनिक साठ वर्षानंतर कुठून आणायचा? शासकीय प्रमाणपत्र धारण करणा-याचे प्रमाणपत्र कशावरून खरे मानायचे? गेल्या साठ वर्षात त्याने इतर कसले उद्योग केले असतील? सध्याच्या काळातला प्रसिद्ध माणूस बोलवायचा तर कोणत्या क्षेत्रातला? कोणाला राजकीय पुढारी हवा तर कोणाला सिनेमानट! राजकीय पुढारी पुन्हा कुठल्या पक्षातला आणि नट का नटी, नवी का जुनी? शिवाय कोणाला क्रिकेटपटू हवा तर कोणाला गायक नाहीतर वादक! "बाहेरच्या लोकांना कशाला बोलवायला पाहिजे? तो मान संकुलातल्या रहिवाशालाच मिळाला पाहिजे." असे कित्येकांचे म्हणणे होते. पुन्हा तो माणूस वयाने सर्वात ज्येष्ठ असायला हवा कां शिक्षणाने कां अधिकारपदाने हा वाद झाला. मतमोजणी करून ठरवायचे झाले तर मताधिकार कोणाला द्यायचा आणि कोणाच्या मताला किती किंमत द्यायची? कोणी म्हणाला "प्रत्येक रहिवाशाला एक मत असायला हवे", तर कोणाच्या मते प्रत्येक घराला एक मत. कोणाचे असे म्हणणे होते की जागेच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात मताला वजन दिले पाहिजे तर कोणाच्या मते जागेसाठी ज्याने त्याने मोजलेल्या किंमतीच्या प्रमाणात ते मिळाले पाहिजे.


देशभक्तीपर गाणी म्हणण्यावर सुद्धा वाद झाला. "ती राष्ट्रभाषेतीलच हवीत" असे एकजण म्हणाला तर दुस-याने मराठीचा आग्रह धरला. कांही लोकांना तामीळ, तेलगू, बंगाली आणि पंजाबीसुद्धा पाहिजे होती. कोणाला फक्त शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायची होती आणि त्यासाठी तबलापेटीची साथ हवीच, तर कोणाला डीजेला बोलावून ट्रॅक्सवर किंचाळायची हौस होती. त्यातसुद्धा पुन्हा "आधी आमचेच व्हायला हवे, वेळ उरला तर इतरांचे पाहू." असा आग्रह प्रत्येकाने धरला.


मिठाईमध्येसुद्धा कोणाला पेढा पाहिजे तर कोणाला बर्फी. कोणाला पावसाळ्यात कुठल्याही प्रकारचा खव्याचा पदार्थ खाणे धोकादायक वाटले तर कोणाला मधुमेह असल्यामुळे साखर खायला बंदी होती. खा-या पदार्थातसुद्धा कोणाला वेफर्स पाहिजेत तर कोणाला सामोसा किंवा बटाटा वडा. कोणी चिवड्याचे भोक्ते तर कोणी सुक्या मेव्याशिवाय इतर कशाला हात न लावणारे! "याने तोंड कसे गोड होणार?" असे कोणी म्हणाले तर "ते गोडच कशाला व्हायला पाहिजे?" असे दुस-या कोणी विचारले.


इकडे अशी वादावादी चाललेली असतांना दुसरीकडे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणा-या चारपांच युवकांचे वेगळेच बेत सुरू होते. त्यातल्या एकाने पुढे येऊन सांगितले, "तुम्हा सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी हव्यात ना? आता कॉँप्यूटरच्या सहाय्याने ते सुद्धा शक्य आहे. आम्ही एक प्रोग्रॅम बनवून तुम्हाला आपापली निवड करायची संधी देऊ. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही कॉँप्यूटरच्या स्क्रीनवर पाहू शकाल. झेंडा कोणी फडकवायला पाहिजे, पुरुषाने की स्त्रीने? त्यासाठी निवड करा आणि एक बटन दाबा. पुरुष असेल तर त्याने कोठला पोषाख घातला पाहिजे, सूटबूट कां धोतर कां कुर्ता पायजमा? करा निवड. स्त्रियांसाठी शेकडो ड्रेसेस असतात, पण आम्ही त्यातल्या त्यात पांच पर्याय देऊ. कपडे निवडून झाल्यावर त्या कपड्यात कोणती व्यक्ती हवी? नेते, अभिनेते, खंळाडू वगैरेंचे प्रत्येकी दहा चेहेरे आम्ही देऊ, त्यातला पाहिजे तो चेहेरा आपण निवडलेले कपडे परिधान करून पडद्यावर दिसेल आणि माऊसची कळ दाबली की ध्वजारोहण करेल."


"तुम्हाला वेगवेगळी गाणी पाहिजेत ना? आम्ही पन्नास निरनिराळ्या गाण्यांच्या एम् पी थ्री फाईल्स देऊ. त्यातले पाहिजे ते निवडा आणि त्यावर क्लिक करा. लगेच ते गाणे ऐकू येईल." दुस-याने पुस्ती जोडली. तिसरा म्हणाला, "तुम्हाला हवी ती मिठाईसुद्धा कॉंप्यूटरवरून सिलेक्ट करता येईल, पण ती घरपोच मिळण्यासाठी मात्र थोडा खर्च येईल."
संगणकतज्ञांच्या कल्पना सगळ्यांनाच पसंत पडल्या. फक्त दोन विसंवादी सूर निघाले. एकजण म्हणाला, "ज्यांच्या घरी कॉँप्यूटर नसेल त्यांनी काय करायचं?"

ज्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती त्यातील एकजण म्हणाला, "अहो, या निमित्ताने लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपापल्या घरात बसून ते कॉँप्यूटर पाहतील, नाही तर टीव्ही पाहतील. तो सार्वजनिक स्वातंत्र्यदिनोत्सव कसा होईल?"
या मुद्यांवर विचार करता कांही विधायक सूचना आल्या. हा उत्सव सार्वजनिक जागेवरच साजरा करायचा. ज्या लोकांकडे लॅपटॉप असेल आणि ज्यांना ऑफीसमधला लॅपटॉप एक दिवसासाठी घरी आणणे शक्य असेल त्यांनी आपला लॅपटॉप आणायचा. त्यांना एकत्र जोडून घ्यायचे काम संगणकतज्ञ करतील. असे पंचवीस तीस लॅपटॉप जमले तरी शंभर लोक ते पाहू शकतील. मिठाईऐवजी चॉकलेटे वाटायची, तीही फक्त लहान मुलांना. संकुलात कार्य करणारे एक मंडळ त्याची व्यवस्था करेल. अशा रीतीने स्वातंत्र्यदिनोत्सवाचा कार्यक्रम निश्चित झाला.


ठरल्याप्रमाणे पंधरा ऑगस्टला सकाळी बरेच लोक ठरलेल्या जागी जमले आणि उत्साहाने कामाला लागले. सगळे लॅपटॉप जोडून झाले. मुख्य कॉँप्यूटरवर प्रोग्रॅम लोड करून ठेवलेलाच होता. प्रत्येक लॅपटॉपवर वेगवेगळ्या लोकांच्या आपापल्या आवडीनुसार गाणी वाजू लागली. त्यांनी निवडलेले पाहुणे त्यांच्या आवडीच्या वेषात येऊन झेंडा फडकवण्यास सिद्ध झालेले प्रत्येक स्क्रीनवर दिसू लागले. पण एकाही स्क्रीनवरील ध्वज उंचावला जात नव्हता. माऊसची बटने दाबून लोक वैतागले, कारण ज्यासाठी ही सगळी तयारी केली होती ते झेंडावंदनच होत नव्हते. "कॉंप्यूटरचे काम असेच बेभरवशाचे! मोठे आले होते हायटेकवाले! झाली ना फजीती?" वगैरे ताशेरे सुरू झाले.


एक संगणकतज्ञ उभा राहून म्हणाला, "लोक हो, शांत व्हा. तुम्हाला ध्वजवंदन करायचे आहे ना? ते नक्की होईल. फक्त मी सांगतो तसे करावे लागेल. आपापल्या हातातील माऊसवर बोट टेकवून सज्ज रहा. मी एक दोन तीन म्हणेन. तीन म्हणताच सर्वांनी एकदम क्लिक करायला पाहिजे." त्याने सांगितल्याप्रमाणे एकसाथ क्लिक करताच सर्व लॅपटॉपच्या स्क्रीनवर तिरंगा झेंडा फडफडू लागला. इतर सर्व गाणी थांबून राष्ट्रगीत सुरू झाले. सगळे लोक उभे राहून एका सुरात गाऊ लागले, "जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता।"
----- या गोष्टीची मध्यवर्ती कल्पना श्री. गिरीश गोगटे यांची आहे. मी त्यांचा ऋणी आहे.

1 comment:

HAREKRISHNAJI said...

दुर्दैवाने या गोष्टी खर्ऱ्या होत चालल्या आहेत.

आपला ब्लॉग खुप वाचनीय असतो,