Monday, March 30, 2009

चार दिवस सासुरवाडीचे


दशमग्रह बनून सासरेबुवांच्या राशीला लागायचा विचारही कधी माझ्या मनात आला नाही. पाठीवरून मायेने फिरणारा त्यांचा प्रेमळ हात आता राहिला नाही. पण त्यांनी जन्मभर केलेल्या वास्तव्याने पुनीत झालेली माझ्या सासुरवाडीची वास्तू माझ्यासाठी तीर्थस्थानासारखीच आहे. आदरयुक्त प्रेमाचा निर्मळ झरा त्या जागी अखंड वाहतो आहे. त्यात डुंबून घेण्यासाठी तिकडे जायचे निमित्त मी अत्यंत उत्सुकतेने शोधत असतो.
असेच एकदा चार दिवस सासुरवाडीमध्ये जाऊन मजेत व आरामात घालवले. पहायला गेल्यास आजकाल इथे मुंबईतसुद्धा मी त्याशिवाय फारसे दुसरे कांही करीत नाही. तरीही घर म्हंटल्यावर दोन चार वस्तू इकडच्या तिकडे करणे, कधी तरी बाजारातून आणणे, निदान घंटी वाजल्यावर दरवाजा उघडणे किंवा टेलीफोन उचलणे असल्या किरकोळ हालचाली कराव्या लागतात. विविध प्रकारची बिले भरायची असतात. बॅंक, पोस्ट, रेशनिंग, इंशुरन्स, पेन्शन, इन्कम टॅक्स वगैरेची कांही ना कांही खुसपटे निघत असतात. स्वतःची नसतील तरी सोसायटीची कामे गळ्यात पडतात. हल्ली या ब्लॉगवर जमेल तितके लिहून काढायचा नसता उद्योग मागे लावून घेतला आहे. त्यासाठी थोडीफार तयारी करावी लागते व संगणक चालवावा लागतो. एवढेच करता करता दिवसामागून दिवस, आठवडे, महिने चालले जात आहेत.
सासुरवाडी घालवलेले चार दिवस मात्र अगदी शंभर टक्के आराम होता. इकडची काडी उचलून तिकडे करणे नाही की जिवाला कसली म्हणून चिंता नाही. तीन्ही त्रिकाळ चांगले चुंगले पदार्थ हादडायचे, इतर वेळी ग्रामीण भागातली शुद्ध हवा फुफ्फुसात भरून घ्यायची, सकाळ संध्याकाळी मोकळ्या हवेत व निसर्गरम्य परिसरात दूरवर फिरायला जायचे, दुपारी आणि रात्री मस्त ताणून द्यायचे असा रोजचा दिनक्रम होता. नात्यातली आणखीन दोन कुटुंबे सासुरवाडीच्याच आवारात राहतात. त्यांच्याकडेही जाऊन त्यांची भेट आणि पाहुणचार घेणे झाले. त्यांव्यतिरिक्त गांवात माझ्या ओळखीचे कोणी नव्हतेच. तेंव्हा इतर कोणाकडे जाऊन बसायचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पत्नी तिच्या माहेरच्या मंडळीत विरघळून गेली होती. दिवसातला सगळा वेळ मला स्वतःसाठीच मिळाला होता.
कोणी म्हणेल की हा इतका रिकामा वेळ कसा घालवलात? माझ्या सुदैवाने मला हा प्रश्न आतापर्यंत कधीच पडला नाही. जेंव्हा जेंव्हा मला मोकळा वेळ मिळाला तेंव्हा तो चांगल्या प्रकारे घालवण्याचे साधनही त्याबरोबर मिळत गेले. या वेळेस माझ्याकडून मीही थोडी पूर्वतयारी केली होती. मी शाळेत असतांनापासून महात्मा गांधीजींच्या 'सत्याचे प्रयोग' या आत्मकथेबद्दल ऐकून होतो. त्या लहान वयात हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न व्यर्थ होता कारण त्यातले कांहीही समजले नसते. मोठे झाल्यानंतर असले गंभीर पुस्तक सलगपणे वाचू शकण्यासाठी लागणारा निवांतपणा मिळत नव्हता, त्यामुळे राहून गेले. या वेळेस मात्र प्रवासाचा बेत ठरताच मी ते पुस्तक विकत घेऊन हॅंडबॅगमध्ये ठेऊन दिले. चार दिवसांच्या मुक्कामात त्यातले रोज थोडे थोडे करीत बरेचसे वाचून झाले.
'सुडोकू' नांवाचे आंकड्यांचे कोडे आणि त्यापेक्षाही त्यात आपले सुपीक डोके घालून तल्लीन होणारे लोक यांच्याबद्दल मला कधीपासून आदरयुक्त कुतूहल वाटत होते. शब्दकोडे सोडवण्यासाठी उभ्या व आडव्या रांगेतील शब्दांसाठी क्ल्यूज दिलेले असतात. त्यांच्या आधाराने कुठून तरी सुरुवात करून मिळालेल्या अक्षरांच्या आधारे पुढे जाता येते. सुडोकूमधले पंचवीस तीस आंकडे भरलेले खण आणि साठ पासष्ठ रिकामे खण पाहिल्यानंतर ते भरण्याची सुरुवात कोठून करायची तेच आधी समजत नव्हते. यासंबंधीचे कुतूहल शिगेला पोचल्यावर एका सुडोकूवेड्यालाच गांठून विचारणा केली. आधी दिलेल्या आंकड्यामध्येच याचे मर्म असते हे त्याच्याकडून समजल्यानंतर त्याचा शोध घेता येऊ लागला पण त्यावेळी त्याची गोडी कांही मनात निर्माण झाली नाही.
मध्यंतरी पुणे मुक्कामात मिळालेल्या अशाच निवांत फुरसतीच्या वेळेत माझी थोडी प्रगती होऊन कांही कोडी सुटू लागली होती. पण या कोड्यात अनेक वेळा सुरुवातीला केलेली चूक त्या वेळेस लक्षात येत नाही. तिच्या आधारानेच पुढले कित्येक आंकडे भरून झाल्यानंतर एकाद्या उभ्या ओळीतला शेवटचा आंकडा भरतांना तो आडव्या ओळीत आधीच बसलेला दिसतो. त्यानंतर मागल्या नेमक्या कोठल्या पायरीवर पाय घसरला ते शोधून काढणे अशक्य असते. या चार दिवसाच्या सासुरवाडीच्या मुक्कामात तिथे मिळणा-या हिंदी वर्तमानपत्रात रोज एक सोपे सुडोकू येत असे. नेलेले पुस्तक वाचणे व टीव्ही पहाणे या गोष्टी करीत असतांना मध्ये रुचिपालट म्हणून थोडा वेळ हे कोडे घेऊन बसत असे. लक्षपूर्वक हळूहळू आंकडे भरीत दिवसभरात ते सोडवून होऊ लागले. सोडवता येऊ लागल्यामुळे अंगात उत्साह संचारला आणि रद्दीमध्ये गेलेले जुने पेपर काढून त्यातली कोडी सोडवायला लागलो.
मी तिकडे गेलेल्या वेळी तिकडच्या शेतात गहू व हरभ-याची पिके तयार होती. त्यांची कापणी करून झाल्यावर त्या जागेवर लगेच नांगर फिरवून उन्हाळी मुगाची पेरणी करायची कामे जोरात सुरू होती. या निमित्ताने यांत्रिक शेतीबद्दल माहिती मिळाली तसेच कांही खास प्रकारची यंत्रे पहायला मिळाली. यंत्र हा माझ्या आवडीचा विषय असल्याने त्यावर एक वेगळा लेखच लिहिला.
त्या लहानशा गांवी सुध्दा आता दूरध्वनी, दूरदर्शन इत्यादि सुविधा घरोघर पोचल्या असल्या तरी मला इंटरनेटशी संपर्क साधता येणार नव्हता हे आधीच ठाऊक होते. मुंबईला परत येतो तो नेटवरील माझ्या एका पत्रमैत्रिणीकडून एक छानसे शुभेच्छापत्र आलेले होते. माझ्या पानभर लिहिलेल्या मजकुराने दाखवता येणार नाहीत इतके सुंदर भाव त्यातील एका चित व्यक्त झाले होते. तेच चित्र वर दिले आहे.

Friday, March 27, 2009

एक सकाळ अमेरिकेतली

सोळा आठवडे अमेरिकेत राहून मी मायदेशी परत आलो. साहजीकच मला अमेरिका कशी वाटली असे लोक विचारतात, त्याचे उत्तर काय द्यावे याचा विचार पडतो. तिकडे ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्यांना त्या चांगल्या आहेत असे कोणी म्हंटले की "तंकडचं सगळं लय भारी हाय हे आयकून आमाला आत्ता कंट्टाला आला हाये!" अशी प्रतिक्रिया एकाद्याकडून येते किंवा त्याचा बादरायण संबंध आपली संस्कृती, अस्मिता वगैरेशी जोडून राष्ट्राभिमान, देशभक्ती, धर्मनिष्ठा वगैरेवरले बौध्दिक दुसरा कोणी सुरू करतो. तिकडले जे आवडले नाही त्याला कोणी नांवे ठेवली की "याला त्यातलं कांही कळतंय् का ?" असा भाव तोंडावर आणून आणि 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' किंवा 'गाढवाला गुळाची चंव काय?' या म्हणीसकट त्या सांगणा-याची कुवत, समज, आवडनिवड वगैरेचा निकाल लावून वर आपली संकुचित मनोवृत्ती सोडून देऊन आणि
सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन त्याच्या कक्षा रुंदावण्याचा सल्ला वगैरे त्याला देणारा एकादा भेटतो. हे असेच चालायचे, त्यापेक्षा "घरोघर मातीच्या चुली" या चालीवर "तिकडं सुध्दा बहुतेक सगळं आपल्यासारखंच आहे हो." असे आधी सांगून जे फरक ठळकपणे जाणवले तेवढे एक एक करीत सांगायचे हे बेश वाटते.
"रोज उगवणारा नवा दिवस वेगळाच असतो." असे कोणीतरी म्हंटले आहे. नसेल म्हंटले, तर ते कदाचित मलाच सुचले असेल! पण तरीसुध्दा काल, परवा आणि आज यात बरेच साम्य असते. त्यामुळे एकाद्या सर्वसामान्य दिवशी आपण काय काय केले असेल याचा एक अंदाज आपल्याला असतो. अशाच एका साधारण सकाळी मी इथे राहतांना रोज काय करतो आणि अमेरिकेत असतांना काय करत होतो हे असे कितीसे वेगळे असणार आहे? मुंबईत जो सूर्य उगवतो तोच अल्फारेटालाही उगवतो आणि घरातली माणसे त्यांना लहानपणापासून लागलेल्या संवयी बदलण्याइतकी अमेरिकाळली नाहीत. उठल्यानंतर पांघरुणाची घडी करून ठेवणे, शौचमुखमार्जनादि विधी, चहापान, न्याहरी, दाढी, आंघोळ, कपडे बदलणे वगैरे सारे कांही अंगवळणी पडलेल्या संवयीनुसार सकाळी होत असे. बाहेर अमेरिका असेल, पण घराच्या चार भिंतीच्या आंत तर आमचेच राज्य होते. त्यातून जे कांही किरकोळ फरक जाणवले तेवढे या जागी सांगायचा विचार आहे.
"सकाळी सर्वात आधी कोंबड्याला जाग येते, तो आरवून जगाला उठवतो आणि त्यानंतर सूर्य उगवतो." असे शाळेतल्या पुस्तकात वाचले होते तसेच लहानपणी लहान गांवातच कधी कधी ऐकले आणि पाहिलेही होते. पण आमच्या गांवातले कांही व्रात्य कोंबडे मात्र चांगले दिवसा उजेडीसुध्दा ऐटीत आपली मान उंचावून "कुकूचकू" करीत अंवती भोवती "कॉक कॉक" करत घुटमळणा-या कोंबड्यांवर आपली छाप मारायचा चावटपणा करायचे. त्यामुळे त्यांच्या आरवण्यावर माझा विश्वास उरला नव्हता. एका वैतागलेल्या म्हातारीने आपल्या कोंबड्याला झाकून ठेऊन सूर्याला उगवू न देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता म्हणे. "पुण्यातील यच्चयावत म्हाता-यांनी एकजुटीने आपापल्या कोंबड्यांना टोपलीखाली झाकून ठेवल्यामुळे तिथले लोक आळशी होऊ लागले होते आणि त्यांना जागृत करण्यासाठी श्रीमंत पेशवे सरकारने शनिवारवाड्याच्या नगारखान्यात रोज पहाटे चौघडा बडवण्याची व्यवस्था केली होती." असे सोमाजी गोमाजी थापाडे यांच्या बखरीत नमूद केले आहे असे म्हणतात. "दुडुम दुडुम वाजतो नगारा दुडुम दुडुम वाजतो। साखरझोपेतून पुण्याला जागे करू पाहतो।।" या 'आठवणीतल्या गाण्या'त त्याचे छान वर्णनसुध्दा जुन्या काळातल्या कवीने केले आहे. मुंबईत आल्यानंतर इथे मात्र सकाळी उठायच्या वेळी कोंबड्याचे "कुकूचकू" किंवा नगा-याचे "दुडुम दुडुम" यातले कांहीच कानावर पडले नाही.
पण लोकांना सकाळ झाल्यानंतर निवांतपणे झोपून राहू न देण्यासाठी इतर प्रकारच्या ध्वनिसंयोजनांची उत्तम व्यवस्था मुंबईत आहे. माझ्या घराशेजारीच असलेल्या झाडावर रोज सकाळी भल्या पहाटे स्थानिक कावळ्यांची शाळा भरते आणि त्यातले विद्यार्थी आपापल्या वेगवेगळ्या भसाड्या सुरात बराच वेळ प्रार्थना म्हणत असतात. ते कधी श्वास घेण्यासाठी थांबले तर चिमणीपाखरांचा नाजुक चिवचिवाट आणि मधुर किलबिलसुध्दा ऐकू येतात. आमच्या गल्लीतली सगळी बेवारशी कुत्री बहुधा रोज सकाळी आमच्या गेटपाशी येऊन भुंकण्याची स्पर्धा सुरू करतात. पण त्यांना वेळेचे एवढे भान नसल्यामुळे ते रात्री अपरात्री केंव्हाही केकाटायला लागतात. या आवाजांनी झोपमोड झाली तरी कानावर पांघरूण लपेटून पडून राहता येते, पण दूधवाला किंवा पेपरवाला यांनी दारावर ठकठक केले की लगेच अंथरुणातून उठून दरवाजा उघडावा लागतो आणि आमच्या दिवसाची सुरुवात होते. कधी कधी त्यातले कोणी आल्याचा नुसता भास होतो आणि मी स्वतःच उठून ते येण्याची वाट पहात बसतो. त्यांनी दांडी मारली हे उमजल्यावर खाली उतरून दूध किंवा वर्तमानपत्र घेऊन येतो.
सायकलच्या कॅरियरवर वर्तमानपत्रांचा अजस्त्र गठ्ठा ठेऊन किंवा हँडलच्या दोन्ही बाजूंना दुधाच्या पाकिटांनी भरलेल्या अवजड पिशव्या अडकवून त्यांचा तोल सांभाळत सायकल चालवण्याची सर्कस करणारे कित्येक सायकलपटु रस्त्यावरून येताजातांना दिसतातच. शिवाय दुधाच्या पिशव्यांची चळत किंवा चार भाषांमधील वीस पंचवीस दैनिकांचे गठ्टे रस्त्यावरच समोर मांडून ठेऊन विकणारे विक्रेते चौकाचौकात बसलेले असतात. हे दृष्य पाहूनच ही सकाळची वेळ असल्याचे निश्चितपणे लगेच लक्षात येते.
अमेरिकेत यातले कांही म्हणजे कांहीसुध्दा नव्हते. तिथे कोंबड्यांची संख्या निदान माणसांएवढी तरी असावी असे तिथल्या हॉटेलातली मेनूकार्डे वाचल्यानंतर वाटते, पण "कुकूचकू"किंवा "कॉक्कडूडल्डू" करणारा जीवंत कोंबडा माझ्या वास्तव्यात माझ्या नजरेला कधीच पडला नाही. पूर्वी उघडपणे आचरणात येणारा वर्णद्वेष पाहून अमेरिकेतल्या मूळच्या कावळ्यांनी तेथून पळ काढला असावा आणि कांही गौरवर्णीय लोकांच्या मनात तो अजून असल्याच्या शंकेमुळे भारतातील कावळ्यांनी अमेरिकेच्या ग्रीन कार्डसाठी अद्याप अर्ज केले नसावेत. त्यामुळे तिकडच्या लोकांना कावळा हा पक्षी प्रत्यक्ष पाहून माहित नसावा. तिथल्या एका मराठी चिमुरडीला मी काऊचिऊची गोष्ट सांगितली. म्हणजे चिऊचं घर होतं मेणाचं आणि काऊचं घर होतं शेणाचं ... वगैरे वगैरे. तिला ती कितपत समजली कुणास ठाऊक! नंतर मी तिला सहज विचारले, "काऊ कसं ओरडतो तुला ठाऊक आहे?" तिने लगेच आपली मुंडी नंदीबैलासारखी हलवत उत्तर दिले "मूँऊँऊँऊँऊँ." तिकडची चित्रांची पुस्तके आणि बालचित्रवाणी पाहून तिला 'काऊ' म्हणजे गाय हेच माहीत होते. गोमातेला सुध्दा तिने प्रत्यक्षात कधी पाहिलेले नव्हतेच. झाडांवर बसणारे कावळेच अस्तित्वात नसल्यामुळे त्यांची शाळा कुठून भरणार?
रस्त्यातल्या भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खायला घालून पुण्यसंपादन करणारे पुण्यश्लोक तिकडे नसतात आणि शिळे झालेले अन्न उघड्या उकिरड्यावर टाकायची सोयसुध्दा तिकडे नाही. तिकडल्या पाळीव कुत्र्यांसाठी सुग्रास, रुचकर आणि पौष्टिक श्वानान्न (डॉगफूड) बनवून ते अतिशय आकर्षक अशा डब्यातून महाग दराने पुरवले जाते पण त्यातला एकादा कुत्रा साखळी तोडून रस्त्यावर आला तर त्याला मात्र खाण्यासाठी अन्नाचा कणसुध्दा मिळू शकणार नाही अशी परिस्थिती असल्यामुळे बेवारशी कुत्र्यांची समस्या तिकडे निर्माण झाली नाही. अनेक लोकांकडे त्यांची लाडावलेली कुत्री असतात, पण शेजा-यांना ऐकू जाणार नाही अशा बेताने ती हळू हळू भुंकत असावीत. अशा कारणांमुळे "सकाळ झाली" असे जाहीर करणारा कोणताच ध्वनि तिकडल्या वातावरणात भरलेला नसतो.
एका हातात गरमागरम चहाचा कप धरून तो घोट घोट पीत असतांना दुस-या हातातल्या वर्तमानपत्रातल्या ताज्या बातम्या वाचण्यात केवढे सुख असते याचा शोध त्या लोकांना लागला नसावा. बिचारे दिवसातून वेळ मिळेल तेंव्हा टीव्हीवरच्या बातम्या पाहतात आणि अधिक तपशील हवासा वाटल्यास त्यातच दिलेल्या जाहिरातीवरून इंटरनेटवरील स्थळ शोधून त्या ठिकाणी ती बातमी वाचतात. रोज सकाळी हिंडून घरोघरी ताज्या पेपरचा रतीब घालणारी पोरे तर तिथे नसतातच, नियतकालिकांची आणि रद्दीचीही वेगळी दुकाने सुध्दा नसतात. मोठ्या मॉल्सच्या किंवा विमानतळांच्या प्रवेशद्वारापाशीच वर्तमानपत्रे विकण्याचे एकाद दुसरे यंत्र ठेवलेले असते, त्यात नाणी किंवा नोटा सरकावून आपल्या आपणच तिथला पेपर उचलून घ्यायची सोय असते. ती देखील बहुधा वृत्तपत्रवेड्या परदेशी लोकांसाठीच केलेली असावी. तिथला स्थानिक रहिवासी तिथून पेपर उचलतांना मला तरी कधी दिसला नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर सकाळचे ताजे वृत्तपत्र तिकडे सहजासहजी मिळत नाही, घरबसल्या तर नाहीच नाही.
दुधाची परिस्थिती किंचित वेगळी असली तरी त्याच धर्तीची आहे. चहाकॉफीमध्ये तिकडे सहसा दूध घालत नाहीत आणि घातलेच तर ते अत्यल्प प्रमाणात. दुधापासून दही, ताक, लोणी, तूप आदि पदार्थ घरच्याघरी बनवता येतात असे तिकडे समजले जात नाही. ताक आणि तूप या गोष्टी त्यांच्या खाण्यात नसतातच. क्रीम, योघर्ट, बटर, चीज आदि दुग्धजन्य पदार्थ डेअरीमध्ये तयार होतात आणि पॅकबंद अवस्थेत दुकानात विकत मिळतात. त्यासाठी लागणारे दूध गायींच्या थनातून यंत्राद्वारे काढले जाऊन ते थेट तेथील संयंत्राच्या टाकीत जमा होते आणि प्रक्रिया करून झाल्यानंतर वेगवेगळ्या पदार्थांच्या रूपाने बाहेर येते. त्यामुळे धारोष्ण दुधाची चंव कशी असते ते तिकडे कुणाला माहीत असायची शक्यता कमीच आहे. आजकाल मुंबईतल्याही बहुतेक मुलांनाही त्याची कल्पना नसते. गोरेगांवच्या आसपास राहणा-यांना कदाचित असेल आणि कांही मुलांनी सुटीत बाहेरगांवी गेलेल्या वेळी ती घेतली असली तर असेल. अमेरिकेत मात्र निरसे दूध पहायलासुध्दा मिळणार नाही. ज्या थोड्या लोकांना दूध विकत घ्यायचे असते त्यांच्यासाठी दोन टक्के, चार टक्के अशा स्निग्धांशाच्या टक्केवारीने ओळखले जाणारे प्रक्रिया केलेले दूध एक गॅलन म्हणजे सुमारे चार लिटरच्या मोठ्या कॅनमध्ये मिळते. ते विकण्यासाठी रामा गवळी किंवा रामाश्रय यादव अशा लोकांची दुधदुभत्याची वेगळी दुकाने नसतात. वॉलमार्ट, कॉस्टको यासारख्या अस्ताव्यस्त पसरलेल्या स्टोअरमध्ये अवाढव्य आकाराच्या शीतकपाटात हे कॅन ठेवलेले असतात. आठवड्याच्या किंवा पंधरवड्याच्या खरेदीसाठी तिथे जाणारे लोक एका वेळी त्यातले दोन तीन कॅन उचलून आणतात आणि घरातल्या शीतकपाटात नेऊन ठेवतात. एक कॅन उघडल्यानंतरसुध्दा रोज लागेल तेवढेच दूध त्यातून काढून घेतात. एका कॅनवरील तारीख पाहून ताज्या कॅनमधून काढलेले आणि उघडून ठेवल्यानंतर दहा बारा दिवस घरात पडलेल्या जुन्या कॅनमधले दूध मी सहज कुतूहल म्हणून चाखून पाहिले. दोन्ही दुधे सारखीच बेचव लागली. त्यामुळे तिकडे असेपर्यंत मला दूध पिण्याची इच्छा कधी झाली नाही. पण या दुधावर कसली प्रक्रिया केलेली असते कोण जाणे कधीही ते तापवतांना नासून फुटले बिटले नाही. त्यामुळे ते केंव्हाही आणले
जाते आणि तापवले जाते. त्याचा प्रातःकालाशी संबंध राहिलेला नाही.
उतारवयाची चाहूल लागल्यापासून मी रोज सकाळी दोनतीन किलोमीटर पायपीट करून येतो. अमेरिकेत असतांनासुध्दा तो परिपाठ चालू ठेवला होता. आम्ही तिथे पोचलो त्या वेळी तिकडले हवामान फारच प्रसन्न होते. सर्व इमारतींच्या आजूबाजूला 'हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे।' पसरलेले होते, त्यावर अधून मधून फुललेली शेवंतीच्या फुलांसारखी दिसणारी पिवळी फुले 'त्या सुंदर मखमालीवरती' छान खुलून दिसायची, सा-या मोकळ्या जागा वृक्षलतापल्लवी यांनी भरून गेल्या होत्या, साधारणपणे हिरव्या पण वेगवेगळेपणा असलेल्या त्यांच्या रंगांवर लाल, पिवळ्या रंगांच्या विविध छटा उमटू लागल्या होत्या. त्या फारच मोहक दिसत होत्या. कांही झाडांना लिंबाएवढी मोठी काटेरी फळे हजारोंच्या संख्येने लगडली होती तर कांही झाडे गुंजेसारख्या लालबुंद बारीक फळांनी झांकून गेल्यासारखी दिसत होती. कसलाही दर्प, धूर आणि धूळ यांविरहित शुध्द हवा तनामनाला तजेला आणणारी होती. त्यामुळे फिरायला जाण्यात व्यायामाबरोबर निसर्गसौंदर्य पाहण्याचा आनंदही मिळत होता. पण ही परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. हवेतल्या गारव्याचा गारठा झाला आणि थंडीचा कडाका वाढत गेला. संपूर्ण झाडेच्या झाडेच लाल, पिवळ्या, सोनेरी, केशरी वगैरे रंगांत न्हाऊन निघाली, पण कांही दिवसांतच त्यांची सारीच्या सारी पाने गळून ती निष्पर्ण झाली आणि त्यांच्या फांद्यांचे भयाण वाटणारे सांगाडे तेवढे शिल्लक राहिले. थंड वारे अधिकाधिक बोचरे होऊ लागले. त्यात मधूनच कधी आकाशात ढग जमून त्यातून थेंब थेंब थंडगार पाणी गळायचे तर कधी पावसाच्या सरीवर सरी यायच्या. ऋतूमानातील बदलाबरोबर माझी फिरण्याची वेळ पुढे ढकलत नेली आणि अंगात घालायचे कपडे वाढत गेले. सुरुवातीला फक्त एक टीशर्ट चढवून कोवळे ऊन पडताच 'हेमंताचे दिवस मजेचे, रविकिरणांत नहाया'साठी मी बाहेर पडत होतो, तो अखेरच्या काळात फुलशर्ट, स्वेटर, जॅकेट, मफलर, कानटोपी वगैरे जामानिमा करून भर दुपारी फिरून येऊ लागलो. म्हणजे सकाळच्या वेळातून फिरून येणे हद्दपार झाले.
एवढ्या गोष्टी सोडल्या तर अमेरिकेतली सकाळसुध्दा सकाळच असायची आणि दिवसाची सुरुवात रोज तिनेच व्हायची.

Thursday, March 26, 2009

नव्या वर्षासाठी बहुभाषिक शुभेच्छा



नववर्ष सुखसमृद्धीचे जावो ......... मराठी
मंगलम् नूतनम् वर्षम् ........... संस्कृत
नववर्षकी शुभकामनाएं .......... हिंदी
पुत्ताण्डु नलवाषत्तुकल ........... तामीळ
नवें सालदी वदायी ............ पंजाबी
नव वर्षा आशंसकल ........... मल्याळी
नव्य वरियुक मुबारख .......... काश्मीरी
नतून बच्छरर हुमेश्या थाकिल ..... आसामी
होस वर्षद शुभाषयगळु .......... कानडी
नबवर्षर शुभेच्छा ............ ओरिया
नतून बर्षेर प्रीतिओ शुभेच्छा ...... बंगाली
नूतन संवत्सर शुभकांक्षलु ....... तेलुगु
नववर्षनी शुभकामना ......... गुजराथी
नया साल मुबारक .......... उर्दू
नये साल जूं वाधायूं हुजनिव ..... सिंधी

Wednesday, March 25, 2009

जॉर्जियाच्या माथ्यावर


जॉर्जिया राज्यात रॉकी माउंटनसारखा मोठा पर्वत नाही. वूल्फपेन रिज या नावाने ओळखल्या जाणा-या एका लहानशा पर्वताच्या शिखरावर ब्रासटाउन बाल्ड हे जॉर्जियामधील सर्वात उंच असे ठिकाण आहे. त्यामुळे त्याला जॉर्जियाचा माथा (टॉप ऑफ जॉर्जिया) असेही म्हणतात. म्हणजे महाराष्ट्रात जसे महाबळेश्वर आहे तसे म्हणा. पण ही तुलना इथेच संपते. महाबळेश्वर या सुप्रसिध्द थंड हवेच्या ठिकाणाचा एक पर्यटन केंद्र या दृष्टीने भरपूर विकास झालेला आहे. ब्रासटाउन बाल्ड इथे त्यातले कांही म्हणजे कांहीसुध्दा नाही. महाबळेश्वरला जाणे येणे, तिथे राहणे वगैरेची सोय करणा-या पंधरा वीस तरी ट्रॅव्हल एजन्सी आमच्या वाशीतच आहेत, मुंबईत त्या शेकड्यांनी असतील. ब्रासटाउन बाल्डची टूर काढणारी कोणती एजन्सी अॅटलांटात सापडली नाही. कुठेही परिभ्रमणाला जायचे म्हणजे स्वतः गाडी चालवत जायचे अशीच व्याख्या तिकडे आहे. घरोघरीच नव्हे तर माणसागणिक वेगळ्या गाड्या सगळ्यांच्याकडे असल्यामुळे कदाचित तसे असेल. त्यातूनही प्रवास करण्यासाठी जास्त आरामशीर गाडी पाहिजे असेल तर ती भाड्याने मिळते, पण तिच्याबरोबर तिचा चालक येत नाही. ती गाडी सुध्दा स्वतःच चालवावी लागते. ब्रासटाउन बाल्डला जायचा रस्ता दीड दोन तासाचा एवढाच होता आणि वळणावळणाने चढ चढायचा रस्ता असल्याने त्यासाठी मोठ्या आकाराची अनोळखी गाडी घेण्यापेक्षा आपला हात बसलेली स्वतःचीच गाडी बरी असा विचार करून अजयने आपली गाडी बाहेर काढली. वाटेत कुठेही गाडी बंद पडली तर तिकडे ते फारच त्रासाचे होते, यामुळे प्रत्येकजण आपली गाडी नेहमीच पूर्णपणे सुस्थितीत ठेवत असतो. तरीही दोन तीन दिवस आधी तिचे सर्व्हिसिंग करून घेतले. इंटरनेटवर माहिती काढून तिथपर्यंत जायचा नकाशा डाउनलोड करून घेतला, भरपूर खाद्यपेय सामुग्री गाडीत भरून घेतली आणि आम्ही निघालो.


ब्रासटाउन बाल्डचे शिखर महाबळेश्वर इतके उंच नसले तरी ते जवळ जवळ पावणेपांच हजार फूट इतके उंच आहे. शिखरावरून खाली पहातांना कांही ठिकाणी खालच्या बाजूला ढग दिसतात. अशा वनांना क्लाउड फॉरेस्ट असे म्हणतात. तिथे नेहमीच दमटपणा असतो. त्यामुळे झाडांची घनदाट अशी वाढ होते. पण एका बाजूला उघडे बोडके मोठमोठे दगडधोंडे भरले आहेत, कदाचित अती पावसाने तिथली माती वाहून गेली असेल. त्यामुळे त्या डोंगराचे नांव बाल्ड म्हणजे टकल्या असे पडले असावे. आपल्याकडे लिंगोबाचा डोंगूर (आबाळी गेलेला) जसा वनवासी ठाकर लोकांच्या मनात दबदबा निर्माण करून बसलेला असतो, त्याच प्रमाणे उत्तर जॉर्जियाच्या डोंगराळ भागात राहणा-या चेरोकी जमातीच्या लोकांना या शिखराचे अप्रूप आहे. त्यांच्याकडील पुराणकाळात एकदा जलप्रलय आला होता, तेंव्हा त्यांच्या एका देवतेने तिच्या भक्तांना खास नौकेत बसवून या डोंगराच्या शिखरावर नेऊन पोचवले आणि त्यांचे प्राण वाचवले अशी दंतकथा तिथे प्रचलित आहे.


युरोपियन लोकांनी अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर एकोणीसाव्या शतकात या भागात सोन्याच्या खाणी सापडल्या. त्यामुळे धनलाभाला हपापलेल्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी टोळधाडीसारख्या तिकडे आल्या आणि त्यांनी स्थानिक लोकांना निष्ठूरपणे पिटाळून लावले. हा किस्सा गोल्डरश या नांवाने इतिहासात कुप्रसिध्द आहे. सोन्याच्या शोधाची नवलाई संपल्यानंतर तिथल्या जंगलातली लाकूडतोड सुरू झाली. आता त्यावर नियंत्रण असले तरी निसर्गच नवनवी झाडी जोमाने वाढवत असल्यामुळे ती कायद्यानुसार चाललेली आहे. जपानमध्ये लाकडाची घरे असतात असे भूगोलात वाचले होते, पण मला अमेरिकेतसुध्दा बहुतेक बैठ्या घरांच्या भिंती, तिरकस छपरे आणि जमीनी लाकडापासूनच केलेल्यासारख्या दिसल्या. मजबूती आणण्यासाठी खांब आणि तुळया सिमेंट काँक्रीटच्या असाव्यात, पण पार्टीशन वॉल्स आणि फ्लोअरिंग लाकडाचेच दिसते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड लागतच असेल.


चारी दिशांना पसरलेले सृष्टीसौंदर्य पहाण्यासाठी या शिखरावर एक उंच मनोरा बांधण्याचा ध्यास आर्थर वूडी नांवाच्या गृहस्थाने घेतला. त्यासाठी सरकार दरबारी खेटे घालून त्या प्रकल्पाला मंजूरी मिळवली आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बांधकामाचे सामान डोंगरावर चढवून व शक्य तेवढी स्थानिक सामुग्री वापरून त्याचे बांधकाम करवून घेतले. वूडी टॉवर नांवाचा हा मनोरा आजही तिथे येणा-या पर्यटकांचे स्वागत करत उभा आहे.


सभोवतालच्या निसर्गाचे निरीक्षण करण्यासाठी या जागेचा उपयोग केला जातोच, पण अंतरिक्षाचा वेध घेण्यासाठीसुध्दा हे एक आदर्श ठिकाण झाले आहे. आज पुढारलेल्या देशांमध्ये सगळीकडे झालेल्या विजेच्या झगझगाटामुळे तिकडचे आकाश प्रकाशाने उजळून निघाले आहे. इतकेच काय मलासुध्दा माझ्या लहानपणी जितक्या चांदण्या रात्रीच्या वेळी आकाशात दिसायच्या आणि ओळखू यायच्या त्याच्यातल्या दहा टक्केसुध्दा आता मुंबईच्या आभाळात दिसत नाहीत. अमेरिकेत तर जास्तच झगझगाट आहे. त्यामुळे मनुष्यवस्तीपासून दूर निर्जन अशा जागी आणि परावर्तित प्रकाशाने धूसर झालेल्या वातावरणाच्या वरती असलेल्या या जागेवरून आकाशाचे निरीक्षण करणे जास्त सोयीचे आहे. त्यासाठी कायम स्वरूपाची प्रयोगशाळा त्या जागी बांधलेली नाही, पण अंतरिक्षात घडणा-या विशिष्ट घटनांचे निरीक्षण करण्यासाठी अवकाश वैज्ञानिकांची पथके हा डोंगर चढून इथे येतात आणि तात्पुरता मुक्काम करतात. हेली बॉप नांवाच्या धूमकेतूचे इथून काढलेले छायाचित्र खूप गाजले होते.


अल्फारेटाहून आम्ही कारने निघालो आणि जॉर्जिया महामार्गाने उत्तरेच्या दिशेने कांही अंतर कापल्यानंतर डॅलहोनेगा नांवाचे गांव येऊन गेल्यावर आम्ही वळणावळणाच्या पर्वतीय मार्गाला लागलो. दोन्ही बाजूला ओक, विलो, बीच, मेपल वगैरे ताडमाड उंच वृक्षांनी व्यापलेले घनदाट अरण्य होते. जमीनीवर उंच उंच गवत, घनदाट झुडुपे आणि त्यांवर चढलेल्या लता पल्लवी वगैरेंची गर्दी होती. त्यावर विविध आकारांची आणि रंगीबेरंगी रानफुले फुललेली होती. फॉल सीझन सुरू असल्यामुळे सारी झाडे लाल, पिवळा, केशरी, सोनेरी, जांभळा वगैरे अनेक रंगांच्या अगणित छटांमध्ये न्हालेली होती. कुठे एकसारख्या रंगाच्या दहा बारा वृक्षांचा विशाल गुच्छ दिसायचा तर कुठे गडद हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर उन्हात चमचमणारे एकादेच सुरेख सोनेरी झाड लक्ष वेधून घ्यायचे. हमरस्त्यावरून जात असतांना आपल्याला वाटेल तिथे रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून दोन चार क्षण त्या जागी थांबायला तिथे अनुमती नाही. जे काय सृष्टीसौंदर्य पहायचे असेल आणि त्याची छायाचित्रे काढायची असतील ते सगळे धांवत्या गाडीतूनच करावे लागते. या प्रवासात निसर्गाची इतकी अनुपम रूपे एका मागोमाग एक करून समोर येत होती की त्यातले कुठले रूप डोळे भरून तृप्त होईपर्यंत पाहून घ्यावे आणि कोणते फोटोच्या इवल्याशा चौकटीत बंदिस्त करून ठेवावे हेच समजत नव्हते आणि त्याचा विचार करायला वेळच नव्हता. एक सुंदर दृष्य दिसले की ते इतरांना पहा म्हणून सांगून गळ्यातला कॅमेरा तिकडे फिरवला तोंपर्यंत एकादे वळण येऊन ते दिसेनासे व्हायचे किंवा त्याहून सुंदर दुसरे दृष्य दुस-या बाजूला दिसायचे. असा लपंडावाचा खेळ चालला होता.


बराचसा घाट चढून झाल्यावर 'रिसेप्शन सेंटरकडे' असा बाण दाखवणारा फलक दिसला आणि आपण नियोजित स्थळाजवळ पोचलो असे वाटले, पण शिखर कुठे दिसत नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार एका ठराविक जागेपर्यंत गेल्य़ानंतर पुढे जाण्याची सोय तिथे होईल असे कळले होते. ते सगळे रिसेप्शन सेंटरमध्ये गेल्यावर कळेल म्हणून तिकडे गाडी वळवली. पण फाटा फुटलेल्या ठिकाणापासून पुढे जास्तच वळणे वळणे घेत आणि चढ असलेला रस्ता लागला आणि तो संपता संपत नव्हता. पांच सात मैल अंतर गेल्यावर एक प्रशस्त असे मैदान लागले. त्या जागी दोन तीनशे मोटारी उभ्या करून ठेवता येतील अशी सोय केलेली होती. पण जेमतेम सात आठ गाड्या तिथे उभ्या होत्या. बाजूला एक केबिन होती, पण त्यात कोणीच नव्हते. पार्किंग लॉटला जाण्याच्या वाटेवर एक स्वयंचलित यंत्र होते. त्यात आपणच नोटा सरकवायच्या आणि पावती घ्यायची. अमेरिकेत बहुतेक जागी अशीच व्यवस्था असते आणि सगळे मोटारवाले पैसे भरून पावती घेतात किंवा पार्किंग मीटर सुरू करतात. कोणी पहात नाही आहे म्हणून फुकट गाडी लावायचा प्रयत्न करत नाहीत.


आम्ही घरातून निघालो तेंव्हा निरभ्र आभाळ होते. घाटातून चढत जातांनाही चांगला सूर्यप्रकाश होता, पण पार्किंग लॉटमध्ये मोटार उभी करून बाहेर पडतो न पडतो तोच जोरात पाऊस सुरू झाला. बाहेर कडाक्याची थंडी तर होतीच. तपमान नक्कीच शून्याच्या खाली गेलेले होते. त्यात सोसाट्याचा वारा आणि पाऊस! यामुळे पुन्हा गाडीत जाऊन बसलो. पण फार काळ थांबावे लागले नाही. पाऊस कमी झाल्यावर कुडकुडत बाहेर पडलो आणि चौकशी केली. आम्ही योग्य जागीच पोचलो होतो. त्या जागी निघून शिखरापर्यंत जाण्यासाठी दोन पर्याय होते. सरकारी वाहनात बसून वर जायचे किंवा गिर्यारोहण करत पांचशे फूट चढत जायचे. सरकारी वाहनाची सोय फक्त उन्हाळ्यातच असते आणि खराब हवामानामुळे ती बंद झाली होती. मोटारीच्या बाहेर पडून पांच दहा मिनिटे आजूबाजूला फिरतांनाच आमच्या नाकाचे शेंडे आणि हाताची बोटे बधीर होत होती, त्यामुळे तिथून पुढे कुठे जायला आमची तर हिंमतच होत नव्हती. कांही उत्साही युवक युवती गिर्यारोहणाची साधन सामुग्री बरोबर घेऊन ट्रेकिंग करायला जात होती. एक परत आलेली तुकडी भेटली, ती अर्ध्या वाटेवरूनच परत फिरली होती. त्यामुळे आम्ही आपले मोटारीत बसून जेवण खाण केले आणि गाडीच्या आत बाहेर करीतच तास दोन तास वेळ घालवला.


या थोडक्या वेळात निसर्गाची सारखी बदलणारी विलक्षण रूपे पहायला मिळाली. क्षणात पावसाची एक मोठी सर यायची तर केंव्हा रिमझिम पाऊस पडायचा. मधेच भुरभूर हिमकणांचा वर्षाव व्हायचा. क्षणात दूरवरचे निळे डोंगर दिसायला लागायचे तर पाहता पाहता ते धुक्यात अदृष्य होऊन जायचे. एकदा तर धुके आमच्या इतक्या जवळ आले की आजूबाजूच्या मोटारी आणि समोरचा रस्ता दिसेनासा झाला आणि आता आपण परत कसे जाणार याची चिंता वाटायला लागली. पण सूर्याचा ढगांबरोबर लपंडाव चाललेलाच होता. थोड्या वेळाने पुन्हा ऊन आले आणि धुके निवळलेले पाहून आम्ही परतीचा रस्ता धरला. वूडी मनोरा कांही पहायला मिळाला नाही. पण आमचा पार्किंग लॉट अशा ठिकाणी होता की तिथूनसुध्दा एका बाजूला असलेला चढ सोडला तर निदान इतर तीन बाजूंना तरी दूरवर नजर जात होती. त्यामुळे मनो-यावरून जॉर्जियाचे जेवढे पहायला मिळाले असते त्यातले बरेचसे पाहून झाले. परतीच्या वाटेवर पुन्हा एकदा आजूबाजूची वनराई, झरे, तलाव, पशुपक्षी वगैरे पहात पहात घरी परतलो.

Monday, March 23, 2009

थोडी गंमत, थोडा विरंगुळा

कांही सुप्रसिध्द वाक्ये
जेंव्हा एक निर्णय घेण्याचा क्षण योतो त्या वेळी सर्वोत्कृष्ट निर्णय घेणे हे अर्थातच सर्वोत्तम, चुकीचा निर्णय घेणे हे दुस-या क्रमांकावर आणि कोणताही निर्णयच न घेणे हे सर्वात वाईट. सर्वोत्कृष्ट गोष्ट करणं जमत नसेल तरी हरकत नाही. कारण चुका झाल्या तरी आपण दुस-या क्रमांकावर तर आहोतच.

विशीत तुम्ही समाजवादाने भारावून गेला नाहीत तर तुम्हाला काळीज नाही आणि चाळीशीतही तुमचे विचार बदलले नाहीत तर त्याचा अर्थ तुम्हाला डोके नाही.

तुम्हाला बर्‍याच गोष्टींबद्दल काहीतरी माहित असते, पुढे काही थोडक्या गोष्टींबद्दल आणखी जास्तीची माहिती होते, अखेर तुम्हाला कशातलेही काहीही कळत नाही हे तुमच्या लक्षात येते.
जेव्हा तुम्ही विशीत असता, तेव्हा लोक काय म्हणतील याची तुम्हाला सतत भीती असते. चाळीशीत गेल्यानंतर लोक काय म्हणतील याबद्दल तुम्ही काळजी करणे सोडून दिलेले असते.
 साठीत गेल्यावर तुम्हाला कळते की लोक कधीच तुमच्याबद्दल विचारच करत नव्हते.

जेंव्हा तुम्हाला वाटते की तुम्हाला सर्व समजले, युनिव्हर्सिटी तुम्हाला बॅचलर्सची पदवी देते, जेंव्हा तुम्हाला कळते की आपल्याला काहीच माहीत नाही तेंव्हा युनिव्हर्सिटी तुम्हाला मास्टर्सची पदवी देते आणि जेंव्हा तुम्हाला समजते की कुणालाचा काही माहीती नाही, तेंव्हा युनिव्हर्सिटी तुम्हाला डॉक्टरेट बहाल करते
आणि म्हणते गप बसा - तेरी भी चूप और मेरी भी चूप!

एकाद्या कुशल आणि मेहनती कामगाराची कार्यक्षमता जेंव्हा कमी कमी होऊ लागते तेंव्हा त्याला पदोन्नती देऊन पर्यावेक्षकपदी नेमले जाते, जेंव्हा त्याला पर्यावेक्षकाच्या कामासाठी उभे राहण्याचा ताण सोसवेनासा होतो तेंव्हा त्याला कार्यालयात बसून करायचे व्यवस्थापकाचे काम दिले जाते आणि जेंव्हा त्याला तेसुध्दा नकोसे वाटू लागते तोपर्यंत तो मालक झालेला असतो आणि कारखान्याकडे फिरकेनासा होतो.. . . . अर्थातच इतर जागा त्या त्या पदानुरूप अकार्यक्षम माणसांनी भरल्या जातात.
-----------------------------------------------------------------

थोडी गंमत

************************************************
१.ओळखा पाहू : जे रोज वर चढते आणि खाली सुद्धा उतरते पण जागचे हलत नाही! .२.'तो' आणि 'ती' यातील फरक सांगा . .उत्तरे या लेखाच्या तळाशी पहा.
******************************************
शिळ्या कढीला ऊत
एका गांवात मोठा धरणीकंप येऊन गेला. पुढील कांही दिवसात आणखी कांही धक्के बसण्याची शक्यता वर्तवली गेल्यामुळे त्या गांवातील एका माणसाने आपल्या मुलाला सुरक्षिततेसाठी आपल्या भावाकडे रहायला पाठवले. दुस-याच दिवशी भावाची तार आली "मुलाला ताबडतोब घेऊन जा. वाटल्यास भूकंपाला इकडे पाठवले तरी चालेल."
************************************

मर्फीचा एक नियम
तुम्ही बसस्टॉपकडे जात असतांना एक बस येत असतांना दिसते. धांवत जाऊन त्यात उडी मारून चढू शकलात.
..
ती बस नक्कीच चुकीच्या नंबरची असते.
.
नंबर बरोबर असेल तर ती उलट दिशेला जाणारी असते.
.
नंबर बरोबर असेल, दिशासुद्धा बरोबर असेल ती तुम्हाला हवा असलेल्या थांब्यापर्यंत जाणारी नसते. तिचा प्रवास मध्येच कुठे तरी संपतो.
.
पुढे जाण्यासाठी दुसरी बस पकडणे ज्या थांब्यावर अशक्य असते अशाच नेमक्या जागी तो संपतो .
******************************************
कोड्यांची उत्तरे:
१. तपमान
२. तो लग्नानंतर बदलेल असे तिला वाटत असते ......... पण तसे होत नाही. ती लग्नानंतरसुद्धा पूर्वीसारखीच राहील असे तो समजत असतो..... तसेही होत नाही.
******************************************
एक चुटका
एका मोठ्या संस्थेमध्ये व्यवस्थापकीय प्रशिक्षणासाठी उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या. एका होतकरू उमेदवाराला अध्यक्षाने सांगितले, "जातांजातां जरा शिपायाला चहा पाठवायला सांगून जा." त्याने लगेच समोरच्या टेबलावरील घंटा वाजवली. त्यासरशी बाहेरचा शिपाई आंत आला. त्याला लगेच सर्वांसाठी गरम गरम चहा आणायला सांगितले, दूध व साखर वेगवेगळे आणण्याची सूचना दिली तसेच त्याबरोबर बिस्किटे, वेफर्स असे कांही खाद्यपदार्थ फर्मावले. अर्थातच त्याची निवड झाली. कामावर आल्यावर पहिल्याच दिवशी तासाभराने त्याला चहा पिण्याची तलफ आली. पण त्याच्या केबिनमध्ये घंटा ठेवलेलीच नव्हती. त्याने फोन उचलून अंदाजाने कॅंटीनचा समजून एक नंबर फिरवून ताबडतोब चहा पाठवून देण्याची आज्ञा केली. पलीकडून आवाज आला, "कोण बोलतंय्? मी या संस्थेचा प्रमुख बोलतोय्."
त्यानेही ऐटीत विचारले, "मी कोण बोलतोय् ते ठाऊक आहे?"
"नाही." उत्तर आले.
"ते एक बरं झालं." असे म्हणत त्याने फोन ठेऊन दिला.
--------------------------------------------------------------------------------------

पटकन उत्तर द्या

समजा तुम्ही एका शर्यतीमध्ये धावत आहात. नेहमीप्रमाणे आठ स्पर्धक यात भाग घेत आहेत. अगदी शेवटच्या क्षणी तुम्ही दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकाला मागे टाकले तर तुमचा कितवा नंबर येईल?

.

.

काय म्हणालात, पहिला?

.

.

उत्तर चुकले

.

.

बरोबर उत्तर

.

.

.

तुम्ही तिसऱ्या नंबरवरून दुसऱ्यावर गेलात.


आता असं बघा.
.

समजा तो तुमचा दिवस नव्हताच. सुवर्ण, रौप्य, कांस्य यांतले कुठलेही पदक हाती लागण्याची शक्यताच नव्हती. तरीही शेवटच्या क्षणाला आपला सारा जोर पणाला लावून तुम्ही सर्वात शेवटी असलेल्या खेळाडूच्या पाठीमागून पुढे गेलात तर तुमचा कितवा नंबर येईल?

.

शेवटून दुसरा, म्हणजे सातवा असंच ना?

.

.

नाही. हे उत्तर सुद्धा बरोबर नाही.

.

अहो,  तुम्ही एक तर  स्वतःच शेवटच्या स्थानावर होता किंवा आधीच त्याच्या पुढे होता. तेंव्हा त्याच्या पाठीमागून पुढे कसे जाणार? मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. कुठल्या अकलेच्या कांद्यानं विचारला? त्याला बरोबर उत्तर कसे मिळणार?

...

हे ही जाऊ द्या राव.  आपण आणखी थोडं बोलू. ही शर्यत आंतरराष्ट्रीय होती बरं कां. त्यात चिनी, जपानी, आफ़्रिकी वगैरे सगळ्या वंशाची माणसं होती. त्यांची नांवे खालीलप्रमाणे होती

कखा,  खागि,  गिघी,  घीङु ,  ङुचू ,  चूछे, छेजै

आठव्या खेळाडूचे नांव काय बरे असेल?

.

.

कोण म्हणालं  जैझो ?

.

.

.

तुमचं नांव जैझो आहे कां?

---------------------------------------------
तळटीप.. हे जुनेच विनोद आहेत हे मुद्दाम सांगायची तसदी घेतली नाही तरी चालेल.
---------

हा चमत्कार घडलाच नाही

श्री.आनंद यादव यांच्या लेखनातल्या कांही वादग्रस्त भागावरून उडालेल्या वादळात त्यांना मिळालेले मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदच गमवावे लागले. या सनसनाटी बातमीमुळे यंदाचे महाबळेश्वर येथे भरलेले साहित्यसंमेलन गाजले आणि विनाअध्यक्ष असे हे पहिले संमेलन ठरून नवा इतिहास घडला. मागच्या महिन्यात अमेरिकेत भरलेले मराठी वैश्विक साहित्य संमेलन सुध्दा पहिलेच असल्यामुळे गाजले आणि भविष्यकाळी कोणी अशा संमेलनांचा इतिहास लिहिला तर त्यात त्याचा उल्लेख होत राहील . कदाचित बातम्यांमधल्या या वेगळेपणामुळे असेल, पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी मराठी साहित्यसंमेलनाचे वृत्तांत वाचले असतील. तिथे काय घडले याहूनही काय घडले नाही यावरच अधिक भर दिला गेला होता.

शाळेतल्या वरच्या वर्गांत गेल्यावर त्या वर्गांना लावलेल्या मराठी भाषेच्या पुस्तकांमध्ये मराठी साहित्यातले निवडक उतारे शिकायला मिळायचे. प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला किंवा त्याच्या खाली त्याच्या लेखकाचा किंवा कवीचा संक्षिप्त परिचय दिलेला असायचा. त्यात त्यांच्या सुप्रसिध्द साहित्यकृती आणि त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांची माहिती असायची. परीक्षेत गुण मिळवण्यासाठी ती महत्वाची असल्यामुळे आम्ही इतिहासातील सनावलीप्रमाणे पाठ करत असू. "अमक्या अमक्या साली तमक्या शहरात झालेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते." हे वाक्य त्यात हमखास असायचे. त्या संमेलनात नेमके काय घडत असेल याची सुतराम कल्पना मला त्या काळी सुध्दा नसायची आणि अजूनही ती फारशी स्पष्ट नाही.

शाळा सुटल्यानंतर पुस्तके आणि मासिके यांचे थोडे फार वाचन होत राहिले असले तरी साहित्यिकांची चरित्रे वाचून ती लक्षात ठेवण्याची गरज उरली नव्हती. त्यातला संमेलनाचे अध्यक्षपद हा तर फारच गौण भाग असायचा. कामाचा आणि संसाराचा व्याप वाढल्यानंतर वाचनही कमी कमी होत गेले. 'नेमेचि येतो बघ पावसाळा' या उक्तीप्रमाणे दरवर्षी कुठे ना कुठे साहित्यसंमेलने भरायची. पण त्या नेमाने येणार्‍या पावसाळ्याबद्दल सृष्टीचे कौतुक वाटण्यापेक्षा आता छत्र्या, रेनकोट, पावसाळी पादत्राणे वगैरे आणावी लागणार आणि सर्दीखोकला व पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागणार याचीच या 'बाळा'ला जास्त तीव्रतेने जाणीव होत असे. घरात येणार्‍या इंग्रजी वर्तमानपत्राला या संमेलनाचे फारसे कौतुक असायचे नाही. त्यामुळे त्याच्या वृत्ताला त्यात महत्वाचे स्थान नसायचे. दूरदर्शनवर त्या संमेलनाचा सविस्तर वृत्तांत येत असे, पण साहित्याशीच संबंध न राहिल्यामुळे मुद्दाम लक्षात ठेऊन तो कार्यक्रम लावावा आणि टीव्हीसमोर बसून राहून लक्ष देऊन तो पहावा असे मात्र कधी वाटले नाही. चुकून दिसलाच तर पहातही असे. गेल्या वर्षीपर्यंत कुठे कुठे ही संमेलने झाली आणि त्यांचे अध्यक्ष कोण कोण झाले ते त्या त्या वेळी समजलेही असले तरी आता कांही माझ्या लक्षात राहिलेले नाही.

आमच्या घरातल्या कांही मंगलकार्यांच्या निमंत्रणपत्रिका आणि मंगलाष्टके वगळल्यास मराठी भाषेत माझे नांव कोठे छापले गेल्याचे मला स्मरत नाही. त्यामुळे एकाद्या साहित्यसंमेलनाचा सुगावा मला आधीपासून लागला असता आणि तिथे हजेरी लावण्याचा नुसता विचार जरी मनात आला असता, तरी तिथे कोण म्हणून मी आपले नांव नोंदवायचे?, त्यासाठी कोणती अर्हता लागते?, त्याचे प्रमाणपत्र कोणाकडून मिळवावे लागेल? त्यासाठी किती तिकीट असते?, ते दिवसागणिक असते की संपूर्ण संमेलनाचे एकत्र असते? असे अनेक प्रश्न मनात उठायचे. शिवाय ती जागा लातूर किंवा इंदूर सारखी दूर असली तर तिथे जाणेयेणे, राहणे, खाणे सगळे आलेच. आधीच तुटीच्या असलेल्या अंदाजपत्रकात या जादा खर्चाची तरतूद कशी करायची? त्यासाठी ऑफीसातून सुटी मागतांना कोणते कारण द्यायचे? वगैरे प्रश्न तर माझ्या आंवाक्याबाहेरचे होते. अगदी माझ्या घराजवळ ते अधिवेशन भरणार असते तरी ते भरवणारे लोक कांही आपणहून मला आमंत्रण द्यायला येणे शक्यच नव्हते. त्यामुळे वरील बहुतेक प्रश्न शिल्लक राहणारच होते.

या वर्षीचे अधिवेशन अमेरिकेत सॅन होजे नांवाच्या गांवात घ्यायचा निर्णय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री.कौतिकराव ठाले पाटील यांनी घेतला असे वर्तमानपत्रात वाचले तेंव्हा जन्मात पहिल्यांदाच ही दोन नांवे ऐकली. अमेरिकेतली न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, शिकागो, सॅन फ्रॅन्सिस्को, लॉस एंजेलिस आदि कांही प्रमुख शहरे ऐकून ठाऊक होती. अल्फारेटा, बाल्टिमोर, पिट्सबर्ग वगैरे कांही अनोळखी नांवे तिकडे जाऊन राहिलेल्या लोकांकडून ऐकली होती. त्या यादीत सॅन होजे हे नांव नव्हते. त्याचप्रमाणे कौतिकराव ठाले पाटील यांच्या नांवाने प्रसिध्द झालेली एकादी कथा, कादंबरी, नाटक वगैरे माझ्या अत्यल्प वाचनात तरी कधी आलेले नाही. इतर लोकांनीसुध्दा कदाचित हे नांव ऐकले नसावे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर गजहब सुरू केल्यामुळे ते नांव वर्तमानपत्रात पुनःपुन्हा छापून येत राहिले. पण पाटील महाशयांनी हा प्रश्न कमालीच्या कौशल्याने हाताळला. "इकडच्या लोकांना हवे असेल तर एक अधिवेशन महाराष्ट्रात घेऊ आणि तिकडच्यांना पाहिजे असेल तर एक तिकडे घेऊ. त्यात आहे काय आणि नाही काय?" असे म्हणत त्यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून टाकले. या दोन्ही जागांशी माझे कसलेही सोयरसुतक नव्हतेच.

आमच्या शेजारच्या ठमाकाकूंनी ही बातमी टीव्हीवर ऐकली आणि "अगंबाई, खरंच कां? बघा, मराठी माणसानं केवढी प्रगती केली? त्या राघोबादादाने अटकेपार झेंडा लावला होता, आता तर तो सातासमुद्राच्या पार जाणार!" वगैरे उद्गार काढले. पुढे जेंव्हा आमचेसुध्दा अमेरिकेला जायचे ठरले तेंव्हा साहजीकच त्यांनी विचारले, "म्हणजे तुम्ही पण ते अधिवेशन का काय भरतंय् तिकडे चालला आहात कां?" त्यांना उगाच नाराज कशाला करायचे म्हणून मी हो ला हो म्हणून टाकले. पण एक सूक्ष्म असा किडा माझ्याही डोक्यात जन्माला आला. आम्ही सप्टेंबरमध्ये तिकडे जाणार होतो म्हणजे मार्चपर्यंत राहण्याची परवानगी मिळणार होती. हे अधिवेशन फेब्रूवारीत भरणार होते आमि मी तिथे रिकामटेकडाच राहणार होतो. तेंव्हा फिरत फिरत संमेलनाकडे एकादी चक्कर मारून यायला हरकत नव्हती. या वेळी रजेचा प्रश्न नव्हता आणि अमेरिकेतले यजमान लोक बाकीची व्यवस्था करतीलच अशी आशा होती. साहित्यदिंडीचे निशाण उचलून धरायला, नाही तर लोड, सतरंज्या जमीनीवर अंथरायला आणि उचलायला त्यांनासुध्दा मनुष्यबळ लागणारच ना? तिकडे ते अत्यंत दुर्मिळ आहे असे ऐकले होते. शिवाय तिकडे श्रमाला मोल आहे, त्यामुळे असली शारीरिक कष्टाची कामे केली तरी तिथे आपल्याला कोण विचारणार आहे? त्यातून स्थानिक उत्साही कलाकार कमी पडले आणि आपल्याला संधी मिळालीच तर सेटेजवर जाऊन कुठलं गाणं म्हणायचं किंवा नक्कल करून दाखवायची याचा मनोमनी शोध सुरू केला.

प्रत्यक्ष अमेरिकेत जाऊन पोचल्यावर असे समजले की आम्ही अमेरिकेच्या पूर्व भागात रहात होतो आणि हे सॅन होजे त्याच्या पश्चिम किनार्‍यावर होते. रूडयार्ड किपलिंगने काढलेले "ईस्ट ईज ईस्ट अँड वेस्ट ईज वेस्ट, दे शॅल नेव्हर मीट." हे उद्गार अमेरिकेत गेलेल्या भारतीयांना लागू पडतात असेही तिकडे गेल्यावर समजले. एकमेकांना ओळखणारी मुंबईतली किती तरी मुले आता तिकडे दोन्ही बाजूंना आहेत. सदैव त्यांची फोनाफोनी, चॅटिंग, ईमेल, स्क्रॅप्स वगैरे चाललेले असते. पण प्रत्यक्षात भेट मात्र कधी ते एकाच वेळी भारतात आले तर इकडेच घडते. स्थानिक प्रवास, हॉटेलात राहणे वगैरे खर्च डॉलरमध्ये कमाई असणार्‍या लोकांनाच भारी पडतात तर रुपये मोजून विकत घेतलेल्या डॉलरमध्ये मी ते कुठून भागवणार? आता एकादा दैवी चमत्कार घडला तरच मला त्या साहित्यसंमेलनात जायला मिळणार होते. माझा जरी चमत्कारावर विश्वास नसला तरी काय झाले? तो कांही मला विचारून घडणार नव्हता. कुठे तरी कोणी तरी कसली तरी चावी फिरवेल आणि मला घरबसल्या तिकीटांसह सॅन होजेला येण्याचे आमंत्रण आणून देईल म्हणून वाट पहात राहिलो.

पण हा चमत्कार घडलाच नाही.

पुढे श्री.आनंद यादव यांचे अध्यक्षपदाचे आसन अगदी शेवटच्या क्षणी डळमळीत झाल्याचे कळले. आता आयत्या वेळी "कोणी अध्यक्ष होता कां अध्यक्ष?" म्हणून संमेलनातच विचारणार आहेत की काय असा प्रश्न मनात उठला. पूर्वी एकाद्या हत्तीच्या सोंडेत फुलांचा हार ठेऊन तो हत्ती ज्याच्या गळ्यात हार घालेल तो राजा असे ठरवत असत म्हणे. तसे झाले तर आपल्यालाही चान्स मिळावा म्हणून महाबळेश्वरला जावेसे वाटले. पण मुंबईत इतका जीवघेणा उकाडा वाढला आहे की महाबळेश्वरला जाणार्‍या सगळ्या गाड्या कधीच फुल्ल झाल्या आहेत असे कळले. आता नगाला नग म्हणून एका आनंदाच्या बदल्यात दुसरा आनंद लॉटरी काढून निवडला गेला तरच थोडी शक्यता होती.

पण .... हा चमत्कारसुध्दा घडलाच नाही.

Saturday, March 21, 2009

जोधा अकबर


नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर एवॉर्ड्स २००८ च्या सोहळ्यात जोधा अकबर या सिनेमाला अनेक महत्वाचे पुरस्कार दिले गेले. या निमित्याने त्या सिनेमाचा तो प्रदर्शित झाला होता तेंव्हा घेतलेला एक संक्षिप्त परामर्श सादर करत आहे.
लगान हा सिनेमा लोकप्रिय झाला त्याबरोबर आशुतोष गोवारीकर या नांवाला एक वलय प्राप्त झाले. अशक्यप्राय वाटणारी एक गोष्ट कथानायक कशी करून दाखवतो ते गोवारीकरांनी या चित्रपटात अत्यंत कौशल्याने प्रेक्षकांच्या गळी उतरवले याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यानंतर आलेला त्यांचा स्वदेस हा चित्रपटही असाच नाविन्यपूर्ण व अजब घटना दाखवणारा होता. तोही सुपरहिट झाला. त्यामुळे त्यानंतर आलेल्या जोधा अकबर या सिनेमाबद्दल तो प्रदर्शित होण्यापूर्वीच मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. त्या बहुतांशी पूर्ण झाल्या असेच म्हणता येईल.
हे तीन्ही चित्रपट वेगवेगळ्या कालखंडात घडलेल्या घटनांवर आधारलेले असले तरी त्यात कांही समान सूत्रे दिसतात. हे तीन्ही नायकप्रधान चित्रपट आहेत. त्यांत नायिकेला महत्वाचे स्थान असले तरी कथानायकच सतत आपले लक्ष वेधून घेतो. तीन्ही नायक देशप्रेमासाठी सर्वस्वाचा त्याग वगैरे करून त्याला आपले सारे तन मन धन त्याला अर्पण करणारे नसले तरी तीघांच्याही मनात देशाभिमानाची ज्योत प्रज्वलित झालेली स्पष्टपणे दाखवली आहे. तीघेही तत्कालीन रूढी सोडून जगावेगळे कांही करण्याचा ध्यास मनात धरतात, सुरुवातीला आलेल्या अपयशाने गांगरून न जाता खंबीरपणे आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करतात आणि अखेरीस यशस्वी होतात. "प्रयत्नांती परमेश्वर" किंवा "हिंमते मर्दा तो मददे खुदा" या उक्ती सार्थ ठरल्याचे पाहून प्रेक्षकही सुखावतात आणि टाळ्या वाजवून दाद देतात.
तीन्ही नायकप्रधान चित्रपटात नायकाच्या भूमिकेसाठी लोकप्रिय अभिनेत्यांचीच निवड केलेली होती. लगान आणि स्वदेस या पहिल्या दोन सिनेमात नवतारकांना नायिकेची भूमिका देऊन त्यांना तारांगणात आपले स्थान निर्माण करण्याची संधी दिली होती. पण जोधा अकबरचे एकंदर अंदाजपत्रक पाहून त्यातल्या नायिकेची भूमिकासुद्धा एका आघाडीच्या अभिनेत्रीला दिली असावी. इतर सहकलाकारांबाबत मात्र पूर्वीचेच धोरण पुढे चालू ठेवलेले दिसते. कुलभूषण खरबंदाखेरीज इतर कोणत्याही नटाचे नांव त्याची भूमिका पाहून निदान मला तरी आठवले नाही. कोणाकोणाला पाहून "हा सुद्धा लगानमधल्या क्रिकेटच्या टीममध्ये होता" असे अधूनमधून वाटले असेल, पण त्या नटाचे नांव तेंव्हाही कळले नव्हते आणि आताही नाही.
पडदा उघडताच अमिताभ बच्चनच्या भरदार आवाजात मुगल साम्राज्याच्या प्रारंभाचा इतिहास ऐकू येतो आणि त्याची दृष्ये पडद्यावर दिसतात. बाबराच्या भारतावरील चढाईपासून जलालुद्दीन मोहंमदाच्या जन्मापर्यंतचा भाग थोडक्यात सांगून भारतात जन्माला आलेला आणि हिंदोस्तॉँबद्दल मनःपूर्वक आस्था बाळगणारा तो पहिला मुगल सम्राट होता हे सांगितले जाते. पिता हुमायून जीव वाचवण्यासाठी इतस्ततः भटकत असतांना जलालुद्दीनचा जन्म राजपुतान्यातील एका राजपूताच्या घरी होतो म्हणे. अमीरकोट हे त्याचे जन्मस्थान आता पाकिस्तानात आहे एवढी चूकभूल द्यावी घ्यावी. पुढे हुमायुनाचा स्वामीभक्त नोकर बैरामखान मुगलांच्या विखुरलेल्या सेनेला पुन्हा एकत्र आणून त्यांनी गमावलेले राज्य परत मिळवण्याच्या दृष्टीने हालचाली करतो आणि आपला अंमल वाढवत नेतो वगैरे सांगितल्यानंतर अशाच एका युद्धाचा प्रसंग पडद्यावर येतो. त्यात नामोहरम झालेल्या राजाला ठार मारण्याची बैरामखानाची सूचना बालक जलालुद्दीन मान्य करीत नाही इथपासून अकबराच्या महानतेच्या दर्शनाला सुरुवात होते.
सर्रास कत्लेआम करून आपल्याला सारा मुल्क जिंकून घेता येणार नाही, त्यासाठी आपली प्रजा आणि इतर राजेरजवाडे यांचेबरोबर स्नेहपूर्वक संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे हे त्याला मनोमन पटलेले असते. त्या अनुसार तो आपले धोरण ठरवतो आणि अंमलात आणतो. त्याचे निकटवर्ती लोकच प्रतिगामी विचारांचे असल्याकारणामुळे त्याला विरोध करतात, प्रसंगी दगाफटकाही करतात, पण तो त्यांना पुरून उरतो आणि आपले स्वप्न साकार करतो. शहेनशहा जलालुद्दीनला त्याची प्रजाच प्रेमाने 'अकबर' म्हणजे 'सर्वश्रेष्ठ' हा खिताब देते असेही या चित्रपटात दाखवले आहे.
याच राजकीय धोरणाचा एक भाग म्हणून तो आमेरची राजकन्या जोधा हिला पाहिले नसतांना व तिची कसलीही माहिती काढल्याशिवाय तिच्याबरोबर लग्न करण्यास आपली अनुमती देतो. एवढेच नव्हे तर त्याने नकार द्यावा या उद्देशाने तिने घातलेल्या अटी जाहीररित्या मान्य करून हा विवाह घडवून आणतो. अनिच्छेने त्याच्याबरोबर आलेल्या जोधाला तो इतकी चांगली वागणूक देतो की तिच्या मनातला त्याच्याबद्दलचा तिरस्कार मावळतो. तसेच त्यालासुद्धा तिच्याबद्दल आकर्षण वाटू लागते आणि त्यांची विवाहोत्तर प्रेमकहाणी सुरू होते. अर्थातच त्याचा अंत सुखद होणार हे ठरलेलेच असते.
इतक्या सरळ सोप्या गोष्टीला आशुतोष गोवारीकरांनी आपल्या प्रतिभेने सुंदर रीतीने फुलवले आहे. त्यासाठी अनेक छोटे छोटे प्रसंग त्यात घातले आहेत. हळुवार प्रेमाचा प्रसंग असो वा घनघोर युद्धाचा असो, तो विलक्षण ताकदीने उभा केला आहे. हत्ती, घोडे, पायदळ, तोफखाना इत्यादींचे इतके प्रभावी चित्रण यापूर्वी कोणी केले नसेल. तसेच राजवाडे, त्यातील महाल वगैरेंची भव्यता पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. यातले कसब नितिन देसाई या दुस-या मराठी माणसाचे आहे. शहंशाह, बेगम, राजे, राण्या आणि इतर राजघराण्यातील व्यक्तींना दागदागीन्यांनी मढवून ठेवले आहे. तसेच त्यांचे भरजरी पोशाख पहाण्यासारखे आहेत. यातल्या कांही गोष्टी उद्या फॅशनमध्ये आल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही. हा चित्रपट पाहून 'ग्रँड' हाच शब्द मनात येतो.
इतिहासात जोधाबाई हे व्यक्तित्व होते की नाही याबद्दल कांही लोकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यावर वादविवादही सुरू आहेत. तसेच अकबर बादशहा हा खरोखरीच तेवढा महान नव्हता. हिंदू जनतेची दिशाभूल करण्यासाठी इंग्रजांनी त्याला महानपण चिकटवले असा आरोपही कांही लोक करतात. इतिहासकारांची एकंदर जिज्ञासू वृत्ती पाहता त्या सर्वांनी कट करून भारतातल्या लोकांना शिकवण्यासाठी मुद्दाम मुगलांचा वेगळा इतिहास लिहिला असेल असे मला वाटत नाही. तो माझा प्रांत नसल्यामुळे त्यावर आपले मत मांडायचा अधिकारही मला नाही. मुगलेआझम हा सिनेमा आल्यापासून पृथ्वीराज कपूर यांचा बादशहा अकबर आणि दुर्गा खोटे यांची महाराणी जोधाबाई ही प्रौढ वयातली पात्रेच माझ्या डोळ्यासमोर होती. ते तरुणपणी प्रेमी युगल असेल अशी कल्पनाच करवत नव्हती. हा पूर्वग्रह पुसून टाकण्यात हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यशस्वी झाले आहेत. ए.आर.रेहमान यांनी दिलेले सुरेल संगीत अत्यंत श्रवणीय आहे. त्यातली गाणी मुगले आझम मधल्या गाण्यांसारखी अजरामर होतील की नाही यात शंका आहे. सिनेमा पाहतांना मात्र ती कानाला गोड लागतात, त्याचप्रमाणे प्रसंगाला उठाव आणतात.
साडे तीन तास चालणारा हा सिनेमा कंटाळा आणत नाही की झोपवत नाही. प्रेक्षकांना आपल्या खुर्चीवर खिळवून ठेवतो. मी कांही कोणा बेगमेला प्रत्यक्षांत पाहिले नाही की कोणा महाराजाशी कधी माझा संबंध आला नाही. नाटक सिनेमे पाहूनच त्यांची जी कांही प्रतिमा मनात तयार झाली असेल त्याबरहुकूम सर्व पात्रे हुबेहूब आणि जीवंत वाटतात. तसेच दिल्ली, आग्रा, जयपूर, म्हैसूर वगैरे ठिकाणचे राजवाडे पाहून त्यांची जी भव्यता मनात साठवून ठेवली गेली आहे तसेच सेट नितीनने तयार केले आहेत. दीवानेआम पहातांना तो शहाजहान याने बांधला असे गाईडने सांगितल्याचे स्मरते. मग तो अकबराच्या काळात कसा आला असले तर्कदुष्ट प्रश्न विचारावेत असे मला वाटत नाही. तो किती छान दाखवला आहे हे जास्त महत्वाचे आहे. यातल्या घटना दिल्लीला घडतात की आग्र्याला याबद्दल थोडा संभ्रम निर्माण होतो. पण तेही एवढे महत्वाचे नाही. तेंव्हा इतिहास व भूगोलाचे ओझे मनावर न बाळगता एक काल्पनिक कथा म्हणून हा चित्रपट पाहिला तर ते नक्की आनंददायी ठरेल.

Friday, March 20, 2009

वसंताचे आगमन


"वसंत वनात जनात हांसे, सृष्टीदेवी जणु नाचे उल्हासे।
गातात संगीत पृथ्वीचे भाट, चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट।।"
असे कवि शांताराम आठवले यांनी आपल्या कुंकू या चित्रपटातल्या सुप्रसिद्ध गीतामध्ये लिहिले आहे. "हे पृथ्वीचे भाट कोण असतील ?" या प्रश्नाचा उलगडा गीतरामायणातील पहिल्याच गाण्यामधील या शब्दांनी होतो.
"ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल, वसंत वैभव गाती कोकिल।
बालस्वरांनी करुनी किलबिल, गायने ऋतुराजा भारिती।।"
महाकवि ग.दि.माडगूळकरांनी या गाण्यात श्रीरामाच्या चरित्राचे गायन करणार्‍या लवकुशांना ऋतुराज वसंताच्या वैभवाचे कूजन करणार्‍या कोकिलांची उपमा दिली आहे. याच गदिमांनी आपल्या दुसर्‍या एका गीतात एका नवयौवनेच्या मनातली मुग्ध घालमेल "आला वसंत देही मज ठाउकेच नाही" या शब्दात नेमकी टिपली आहे. तर कवि शांताराम आठवले यांनी आपल्या दुसर्‍या एका गीतात वसंताच्या आगमनाचे स्वागत असे केले आहे.
आला वसंत ऋतु आला, वसुंधरेला हंसवायाला,
सजवीत नटवीत तारुण्याला, आला आला आला ।।
शतरंगांची करीत उधळण, मधुगंधाची करीत शिंपण,
चैतन्याच्या गुंफित माला, रसिकराज पातला ।।
वृक्षलतांचे देह बहरले, फुलांफुलातुन अमृत भरले,
वनावनातुन गाऊ लागल्या, पंचमात कोकिळा ।।
व्याकुळ विरही युवयुवतींना, मधुरकाल हा प्रेममीलना,
मदनसखा हा शिकवी रसिका, शृंगाराची कला ।।
वसंत ऋतूच्या इतक्या सुंदर काव्यमय वर्णनानंतर त्याला गद्यातून कांही जोड द्यायची गरज कुठे आहे? आपल्या संस्कृतीप्रमाणे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर हे ऋतुचक्राचे सहा भाग आहेत. पण "नेमेचि येतो बघ पावसाळा हे पृथ्वीचे कौतुक जाण बाळा" ही उक्ती ढोबळमानानेच खरी ठरते. शाळेत
जसा एक तास संपल्याची घंटा वाजली की वेगळ्या विषयाचा दुसरा तास सुरू होतो तसा ठरलेला महिना आला की लगेच वातावरण बदलत नाही. चैत्र वैशाखाचा वसंत महिमा सांगितला असला तरी वैशाख महिन्यात ग्रीष्माच्या उन्हाचा वणवा पेटलेला असतो. तो वर्षा ऋतूमधील जलधारांनी शांत होत होत आश्विन महिन्यातले शरदाचे टिपुर चांदणे पडू लागते. त्यानंतर गुलाबी थंडी घेऊन "हेमंताचे दिवस मजेचे रविकिरणांत नहाया" येतात व त्याचे पर्यवसान शिशिराच्या कडक थंडीत होते. ती कमी होऊन फाल्गुन महिन्यातच ऋतुराज वसंताची चाहूल लागते व हा निसर्गातील सुखावह बदल धूमधडाक्याने रंगोत्सव करून साजरा केला जातो.

इंग्लंड आणि अमेरिकेत मात्र जीवघेणी थंडी आणि उबदार गरमी हेच दोन मुख्य ऋतु असतात. वर्षभर आभाळ ढगाळलेलेच असते व गरमीमध्ये साधा तर थंडीमध्ये हिमकणांचा पाऊस पडतो. त्यामुळे निरभ्र आभाळ असलेला 'रविकिरणांत नहायाचा' दिवस कधीही आला तर तो उत्साहाने ऊन खाऊन साजरा
होतो. त्यातल्या त्यात हिंवाळा संपला असल्याची जाणीव करून देणारा उत्साहवर्धक 'स्प्रिंग' आणि मनमुराद मौजमजा करण्याचा मोठे दिवस असलेला 'समर' हे दोन चांगले ऋतु आणि हवेतील गारवा वाढवीत झाडांना निष्पर्ण करणारा 'ऑटम' व सगळीकडे बर्फाचा पांढरा शुभ्र रंग पसरवणारा कडाक्याच्या
थंडीचा तसेच दीर्घकाल रात्रींचा 'विंटर' हे दोन कष्टमय ऋतु असे चार ऋतु तिकडे मानले जातात. त्यातला स्प्रिंग हा आपल्या वसंतासारखाच असतो. झाडांना नव्या पालव्या फुटतात, त्यावर कळ्या उगवून त्या उमलतात व फुलांना बहार येतो. त्यामुळे सगळीकडे प्रसन्न वातावरण होते.
असा हा आपल्या फाल्गुन, चैत्राच्या सुमारास येणारा वसंत किंवा त्यांचा स्प्रिंग तिकडे मार्च महिन्यात येतो. त्यातील २१ तारखेला म्हणजे उद्याच्या दिवशी सूर्य विषुववृत्तावरील प्रदेशांत माध्यान्हीला बरोबर डोक्यावर येतो व ध्रुव प्रदेश सोडल्यास जगभर त्या तारखेला बरोबर बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते. त्यानंतर उत्तर गोलार्धात तो डोक्यावर येऊ लागतो व रात्रीपेक्षा दिवस मोठा होत जातो. दक्षिण गोलार्धात नेमके याच्या उलट घडते व थंडी पडायला सुरुवात होते.
आपल्याकडे गुढी पाडवा, युगादी तसेच तामीळ लोकांचा नववर्षदिन हे सण साजरे होतात. याच्याच थोडेसे पुढे मागे आपली होळी तर पाश्चात्यांचा ईस्टर हे उत्सव येतात. चैत्रमहिन्यात नवरात्र बसवण्याची कांही भागात प्रथा आहे. आपल्याकडे चैत्रागौरी बसवतात व महिनाभर त्यांची उपासना करतात. त्यांत होणारे हळदीकुंकू व त्यानिमित्ताने आंब्याच्या डाळीचा प्रसाद ही त्या समारंभाची खास वैशिष्ट्ये.
अशा या आनंदाची बहार घेऊन येणार्‍या वसंत ऋतूचे स्वागत आणि त्याला मनःपूर्वक प्रणाम!

संत एकनाथांच्या गोष्टी


संत एकनाथांचा जन्म पैठण या प्राचीन काळापासून प्रसिध्द असलेल्या नगरीत झाला आणि त्यांचे बहुतेक सारे जीवन त्याच गांवात व्यतीत झाले. त्यांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामींचे शिष्यत्व पत्करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मशास्त्रांचा अभ्यास केला. पुरातन धर्मग्रंथांचे अध्ययन केल्यानंतर मानवता आणि बंधुभाव हेच धर्माचे सार असल्याचे त्यांना जाणवले. आपल्या विविध रचनांमधून त्यांनी हे खुबीने मांडले तर आहेच, पण "जे जे देखिले भूत, तयासी मानि़जे भगवंत" या तत्वाचे त्यानी स्वतःच्या आचरणात पालन केले. यासंबंधी एक अशी आख्यायिका आहे.

एकदा संत एकनाथ काशीहून गंगेच्या पाण्याने भरलेली कावड घेऊन रामेश्वराच्या यात्रेला निघाले होते. तत्कालिन प्रथेनुसार त्यातले गंगाजल रामेश्वरावर वाहिल्यानंतर त्यांच्यी तीर्थयात्रेची सांगता होणार होती. पण वाटेतच एका जागी त्यांना तहानेने आसुसलेले एक गाढव मरणोन्मुख अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसले. महत्प्रयासाने काशीहून जपून आणलेले गंगाजल त्यांनी सरळ त्या गाढवाच्या तोंडात ओतून त्याचे प्राण वाचवले. रामेश्वराला गंगाजलाने अभिषेक करून स्वतःसाठी पुण्य मिळवण्यापेक्षा त्या तृषार्त गाढवाचे प्राण वाचवणे हे जास्त महत्वाचे कार्य आहे असे त्यांना वाटले.

संत एकनाथांनी माणसांमाणसात भेदभाव केला नाही. एकदा एक माणूस नदीच्या पाण्यात वाहून जात असल्याचे पाहताच त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पूर आलेल्या नदीत उतरून त्या माणसाला ओढून बाहेर काढले, पण या चांगल्या कृत्याची प्रशंसा करण्याऐवजी त्यांनी एका अस्पृश्याला स्पर्श केल्यामुळे त्यांना विटाळ झाला असे म्हणून त्या काळातल्या तथाकथित पुढारलेल्या समाजाने त्यांना वाळीत टाकले. संत एकनाथांनी यासाठी प्रायश्चित्त घेऊन शुध्दीकरण करून घ्यावे असा दबाव त्यांच्यावर आणला, पण त्यांनी त्याला जुमानले नाही. यामुळे चिडून त्यांनी एकनाथांचा छळ सुरू केला. रोज सकाळी उठल्यावर आधी गोदावरीत स्नान करून देवपूजा करण्याचा त्यांचा नेम होता. त्यानुलार ते आंघोळ करून घरी परतत असतांना कांही समाजकंटकांनी त्यांच्या अंगावर घाण टाकली. ते शांतपणे परत नदीवर गेले आणि स्वच्छ स्नान करून देवाची स्तोत्रे म्हणत घराकडे फिरले. त्या दुष्ट लोकांनी पुन्हा त्यांच्या अंगावर घाण टाकली, एकनाथ पुन्हा स्नान करून परत आले असेच खूप वेळ चालत राहिले. अखेर ते लोक कंटाळून निघून गेले, पण एकनाथांनी त्यांच्याबरोबर भांडणही केले नाही की त्यांना शिव्याशापही दिले नाहीत. हा प्रकार समजल्यानंतर एकनाथांच्या चाहत्यांनी त्यांची विचारपूस करतांच त्यांनी त्या लोकांना सांगितले, "अहो, यांच्या कृत्यामुळे आज मला अनायासे उपवास घडला आणि माझा इतका वेळ परमेश्वराच्या नामस्मरणात गेला, त्यांचे माझ्यावर उपकारच आहेत, मी कशाला त्यांच्यावर राग धरू?"

संत एकनाथांवर घातलेल्या गेलेल्या सामाजिक बहिष्कारामुळे त्यांचा नोकर त्यांच्या घरी येईनासा झाला. तेंव्हा प्रत्यक्ष विठ्ठल श्रीखंड्या हे नांव घेऊन त्यांच्या घरी कामाला येऊन राहिले. एकनाथांना आपल्या स्वतःच्या सेवेसाठी नोकर नकोच होता, पण वयोमानामुळे रोजच्या रोज देवपूजेसाठी चंदनाचे खोड सहाणेवर उगाळून गंध तयार करणे त्यांना झेपत नव्हते, त्यामुळे एवढे काम त्यांनी श्रीखंड्याला करायला सांगितले. म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीवर चंदनाचे विलेपन करण्यासाठी स्वतः विठ्ठलच मुलाच्या रूपात एकनाथांच्या घरी राहिले होते.

संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे जीवंत समाधी घेतल्यानंतर त्या खोलीचा बंद दरवाजा उघडण्याचे धैर्य कोणीही कधीही केले नव्हते. आजसुध्दा कोणी ते करत नाही. पण त्या भूमीवर उगवलेल्या एका वृक्षाची मुळे खोलवर गेली आहेत आणि त्यांनी समाधिस्थ ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोंवती फास आवळला आहे असा दृष्टांत संत एकनाथांना झाला. ते त्वरित आळंदीला गेले. कोणाच्या विरोधाची पर्वा न करता त्यांनी ज्ञानेश्वर जिथे समाधिस्थ झाले होते त्या खोलीचे कवाड उघडले आणि ज्ञानेश्वरांच्या गळ्याभेंवती वाढलेल्या मुळ्या छाटून दूर केल्या अशी आख्यायिका आहे. माझ्या तर्काप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये घुसलेल्या चुका काढून टाकून तिचे शुध्द स्वरूप त्यांनी पुन्हा समाजापुढे आणले ही गोष्टच या रूपकातून व्यक्त होते. संस्कृत भाषेत लिहिलेल्या भगवद्गीतेवर भावार्थदीपिका लिहून संत ज्ञानेश्वरांनी ती मराठीत आणली होती. संत एकनाथांनी त्यातले तत्वज्ञान अधिक सोपे करून सामान्य लोकांमध्ये त्याचा प्रसार केला.

Monday, March 16, 2009

संत एकनाथ


"दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई।।"
"नणंदेचं कारटं किरकिर करतं, खरूज होई दे त्य़ाला ।सत्वर पाव गं मला, भवानी आई, रोडगा वाहिन तुला ।।"
"विंचू चावला, विंचू चावला, काय मी करू? कुणाला सांगू?"
"वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।"
वरील रचना एका संताने लिहिल्या असतील असे या ओळी वाचून कदाचित कोणाला वाटणार नाही. पण त्या एका महान संतानेच रचलेल्या आहेत, त्यांचे नांव संत एकनाथ! सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या एकनाथ महाराजांनी लोकांना आवडतील, त्यांच्या सहज लक्षात राहतील असे आकर्षक मुखडे रचून पुढे त्या कवनांमध्ये अध्यात्माचे दर्शन घडवले आहे. उदाहरणार्थ याच भारुडांच्या खालील ओळी पहा.
"एका जनार्दनी समरस झाले, पण तो रस येथे न्हाईमला दादला नको ग बाई !"
"कामक्रोध विंचू चावला । तम आंगासी आला ॥ ....ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा ।सत्वगुण लावा अंगारा । विंचु इंगळी उतरे झरझरा ॥सत्य उताऱ्या येऊन । अवघा सारिला तमोगुण ।किंचित राहिली फुणफुण । शांत केली जनार्दनीं ॥"
संत एकनाथांनी फक्त भारुडांचीच रचना केली नाही, त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा अपार आहे, पण त्यांनी रचलेली भारुडे इतकी अप्रतिम आहेत की चारशे वर्षांनंतर आजसुध्दा ती लोकांना भुरळ पाडतात आणि भारुड म्हंटल्यावर सर्वात आधी एकनाथांचेच नांव डोळ्यासमोर येते.
संत एकनाथांनी लिहिलेले "माझे माहेर पंढरी। आहे भीवरेच्या तीरी ।।", आणि "काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल। " हे अभंग पं.भीमसेन जोशी यांच्या अभंगवाणीमधले प्रमुख अभंग आहेत. श्री.राम फाटक यांनी त्यांना अप्रतिम चाली लावून संगीतबध्द केले आहे. नव्या पिढीतले संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके आणि गायक सुरेश वाडकर यांनी मिळून तयार केलेल्या ध्वनिफितीमध्ये "ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो", "गुरु परमात्मा परेशु", "रुपे सुंदर सावळा गे माये", " माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद", "येथोनी आनंदू रे आनंदू, कृपासागर तो गोविंदू रे" हे अत्यंत अर्थपूर्ण अभंग आहेत. अलीकडच्या काळात निघालेल्या उत्कृष्ट ध्वनिफितींमध्ये या ध्ननिफितीचा उल्लेख होतो. या अभंगातील शब्दरचना पाहताच सुंदर सोप्या शब्दात उपमा, रूपक आदि अलंकारांचा उपयोग करून त्यांनी भक्तीमार्गाचे सुगम तत्वज्ञान किती सुरेख मांडले आहे हे ध्यानात येईल.
संत एकनाथ हे संस्कृत भाषेचे आणि त्यातील धर्मशास्त्रांसंबंधित ग्रंथांचे प्रकांड पंडित होते, पण त्यांनी संत ज्ञानेश्वरांकडून प्रेरणा घेऊन ते ज्ञान मराठी भाषेत आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. अठरा हजार आठशे ओव्या रचून त्यांनी भागवत पुराणच मराठी भाषेत आणले. ते एकनाथी भागवत या नांवाने प्रसिध्द आहे. गोष्टीरूप असल्यामुळे तो खूप लोकप्रिय आहे आणि त्याची पारायणे नियमितपणे जागोजागी होत असतात. त्यांनी भावार्थ रामायणाच्या २५००० ओव्या रचल्या होत्या. तरीही ते काम अपूर्ण राहिल्यामुळे त्यांच्या शिष्याने ते पुरे केले. या खेरीज त्यांनी रुक्मिणी स्वयंवर, प्रल्हाद विजय, आनंदलहरी वगैरे अनेक रचना करून ठेवल्या आहेत.
सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या भावार्थ दीपिकेत, म्हणजे आज ज्ञानेश्वरी या नांवाने ओळखल्या जाणा-या ग्रंथात अनेक पाठभेद निर्माण झाले होते. एका पोथीवरून दुसरी पोथी लिहितांना त्यात चुका झाल्या होत्या आणि ज्ञानेश्वरांच्या नांवाने त्या पुढच्या पिढीला दिल्या जात होत्या. संत एकनाथांसारखा विद्वानच अधिकारवाणीने त्या दुरुस्त करू शकत होता. एकनाथांनी त्या ग्रंथांच्या प्रतींचे अतिशय काळजीपूर्वक वाचन करून एक निर्दोष प्रत तयार केली आणि तिला प्रमाणग्रंथ समजून यापुढे तिच्याच प्रती काढल्या जाव्यात यासाठी तिचा प्रचार केला. संत एकनाथांच्या प्रयत्नांमुळेच संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले गीताज्ञान पुढील काळातील जनतेपर्यंत शुध्द रूपात पोचायला मदत झाली.
संत एकनाथांच्या जीवनाबद्दल खूप कांही सांगण्यासारखे आहे ते पुढील भागात लिहीन. आज एकनाथषष्ठी या त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना शतशः साष्टांग दंडवत.

Sunday, March 15, 2009

दुर्मिळ अंक


३० जानेवारीला हुतात्मा दिवस असेही म्हणतात. महात्मा गांधीजींच्या पुण्यस्मरणासाठी हे नांव दिले गेले. मी दोन भागात हौतात्म्य हा लेख लिहिला होता तेंव्हा त्याचे स्मरण होणे साहजीकच आहे. त्यानंतर तीन चार दिवसांनीच योगायोगाने माझ्याकडच्या संग्रहातले एक जुने पान हाती लागले. ते लोकसत्ता दैनिकाने पांच वर्षांपूर्वी प्रसारित केले होते. ३० जानेवारी १९४८ रोजी घडलेल्या महात्म्यांच्या निधनाच्या भयंकर वृत्ताचे प्रकाशन दुसरे दिवशी म्हणजे ३१ जानेवारी १९४८ च्या लोकसत्तेच्या अंकात कसे दिले होते याचे छायाचित्र या पांच वर्षांपूर्वीच्या अंकात दिले होते. त्या काळात आधुनिक संदेशवहनाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे कुठल्याही माहितीचे ताबडतोब प्रसारण होणे अशक्यच असणार. त्यामुळे संध्याकाळी घडलेल्या दुःखद घटनेची माहिती लवकरात लवकर म्हंटले तरी रात्री छापून दुसरे दिवशी सकाळच्या वृत्तपत्रात देणे क्रमप्राप्त होते. या अंकाचा एक विशेष सांगायचा झाला तर तो मोफत वाटला गेला होता. त्या अंकाचा प्रचंड खप होणार हे निश्चित असूनसुध्दा तत्कालिन वृत्तपत्र व्यवसायाने अशा भीषण घटनेतून आर्थिक फायदा उठवण्याचा विचार केला नव्हता.


कै. ग.त्र्यं. माडखोलकर या सुप्रसिध्द साहित्यिक संपादकाने त्या घटनेच्याही दोन वर्षे आधी "जो जळेल तोच जाळील" या मथळ्याखाली महात्मा गांधींवर लिहिलेला अग्रलेख या पांच वर्षांपूर्वी प्रसारित केलेल्या लोकसत्तेच्या अंकातच १९४८ सालच्या जुन्या लोकसत्तेच्या अंकाच्या चित्राच्या सोबत छापलेला होता. जातीय दंगे थांबावेत, हिंदू आणि मुसलमानांत दिलजमाई व्हावी यासाठी प्रयत्न करतांना "या जातीविद्वेशाच्या ज्वाळा मी विझवीन तरी किंवा त्यात मी स्वतः भस्म होऊन जाईन." असे उद्गार महात्माजींनी काढले होते. त्या संदर्भात माडखोलकरांनी हा अग्रलेख लिहिला होता. यादवांमधील आपसातले युध्द टाळता न आल्याने भगवान श्रीकृष्णांनी एका क्षुद्र असा निमित्याने अवतारसमाप्ती केली, दधिची महर्षींनी योगबलाने आत्मनाश करून घेतला आणि वृत्रासुराला मारण्यासाठी वज्रनिर्मिती करायला आपल्या अस्थी इंद्राला दिल्या, दक्षकन्या सतीने आणि भीष्मावर चिडलेल्या अंबेने होमकुंडात उडी घेतली वगैरे पुराणातले दाखले देऊन या असाध्य वाटणा-या परिस्थितीत महात्माजींचे काय होईल अशी चिंता व्यक्त केली होती. त्यात जी भीती व्यक्त केली होती त्याप्रमाणे विद्वेषाचा वडवानळ शांत झाला नाहीच, दुर्दैवाने त्यात अखेर त्यांचीच प्राणज्योत मावळली.


ही दुर्मिळ माहिती (पांच वर्षांपूर्वी) पुरवल्याबद्दल मी लोकसत्ताचा आभारी आहे.

Friday, March 13, 2009

हौतात्म्य


प्रजासत्ताक दिनानिमित्य झी मराठी वाहिनीवरील सारेगमप लिटल् चँप्स कार्यक्रमात 'शूरा मी वंदिले' हा अप्रतिम असा भाग सादर केला गेला. पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी शूरवीरांच्या जीवनकार्याशी संबंधित अशी निवडक गाणी लहानग्या मुलांकडून छान बसवून घेतली होती. या भागातील प्रत्येक गाण्यासंबंधी महत्वाची माहिती स्वतः पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी मोजक्या वाक्यांत दिली. त्यांचे ते निवेदन निव्वळ अप्रतिम होते. संगीतक्षेत्रावरील त्यांचे प्रभुत्व माहीत होतेच, त्यांचा अगाध व्यासंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा त्यांनी केलेला सखोल अभ्यास, तसेच मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व हे सगळेच विस्मयकारक होते. अशा प्रकारचा कार्यक्रम क्वचितच पहायला मिळतो.

'सरणार कधी रण प्रभु तरी' या कविवर्य कुसुमाग्रजांच्या अजरामर कवितेचा समावेश या कार्यक्रमात केला होता. नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनाच्या अंतिम क्षणी त्यांनी परमेश्वराला उद्देशून काय म्हंटले असेल अशी कल्पना करून कुसुमाग्रजांनी ती भावना या कवितेत शब्दबध्द केली आहे. यासंबंधी माहिती देतांना पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी प्रेक्षकांना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नेले.

अफजलखानाच्या वधाने संतापलेल्या आदिलशाहीने त्याचा मुलगा फाजलखान आणि अनुभवी सरदार सिद्दी जौहर यांच्या अधिपत्याखाली प्रचंड फौजफाटा देऊन आक्रमण केले. त्या वेळी शिवाजी महाराजांचे वास्तव्य कोल्हापूरच्या जवळ पन्हाळ्यावर होते. आदीलशाही फौजेने त्या गडाला चारी बाजूंनी वेढा घातला आणि गडावरील लोकांचा कोंडमारा केला. नेहमीप्रमाणे घोड्यावर स्वार होऊन किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडणे म्हणजे आयते शत्रूच्या हातात सापडणे झाले असते. त्यामुळे संधीची वाट पाहून शत्रूच्या हातावर शिताफीने तुरी देऊन निसटून जाणेच त्या परिस्थितीमध्ये आवश्यक होते.

पावसाळ्यातील एका अंधारी रात्रीच्या काळोखात बरोबर निवडक साथीदारांना घेऊन शिवाजी महाराज गडाच्या एका गुप्त मार्गाने गुपचुपपणे गडाबाहेर निघाले आणि धो धो कोसळणा-या पावसात गुढघाभर चिखल तुडवीत कांट्याकुट्यांनी भरलेल्या घनदाट जंगलातून मार्ग काढीत विशाळगडाच्या दिशेने निघाले. नरवीर बाजीप्रभू देशपांडे त्यावेळी त्यांच्यासोबत होते. सर्व दक्षता बाळगूनसुध्दा दुष्मनाला त्याचा सुगावा लागला आणि मोठी फौज घेऊन त्याने महाराजांचा पाठलाग सुरू केला. घोडखिंडीच्या जवळ आल्यावेळी ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या लक्षात आली आणि त्यांनी येऊ घातलेल्या बिकट प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायचे ठरवले. पण बाजीप्रभूंनी वेगळा विचार करून महाराजांना सांगितले, "मी आपला सेवक असलो तरी आजचा दिवस धन्याने सेवकाचे ऐकले पाहिजे. तेंव्हा आपण त्वरेने विशाळगडाकडे कूच करावे. मी गनीमांना या खिंडीत रोखून धरतो. मात्र विशाळगडावर पोचताच आपण तोफेचे पाच बार काढून सुखरूपपणे पोचल्याचा संकेत तेवढा माझ्यासाठी द्यावा."

या प्रमाणे बाजीप्रभूंनी आपल्याला मागे सोडून शिवाजी महाराजांना पुढे जायला भाग पाडले आणि शत्रूचा मुकाबला करण्यास सज्ज होऊन ते खिंडीत दबा धरून थांबले. खिंडीमधून जाणारी वाट अरुंद असल्यामुळे शत्रूच्या मोठ्या फौजेतील सगळ्यांनाच त्यातून एकाच वेळी पुढे जाणे शक्य नव्हते. यामुळे जी तुकडी पुढे आली तिच्यावर बाजीप्रभूंनी हल्ला चढवला. त्यातले कांही गारद झाले, कांही परत फिरले असतील, पण कोणीही पुढे मात्र जाऊ शकला नाही. ते पाहून मागून येणा-या फौजेतले सैनिक थबकले. पुन्हा पुन्हा जमवाजमव करून वेगवेगळ्या शस्त्रांनिशी वेगवेगळे डावपेच रचून ते हल्ले करत राहिले आणि बाजीप्रभू आणि त्यांचे शूर साथीदार त्यांना निकराने झुंज देऊन ते हल्ले परतवत राहिले. अशा प्रकारे ही हातघाईची लढाई थोडा थोडका वेळ नव्हे तर तब्बल दहा तास चालली होती कारण निबिड अरण्यातून आणि चिखलातून अंधारात अंदाजाने वाट काढीत विशाळगडापर्यंत पोचल्यावर तो चढून वर जाऊन तोफांचे बार भरून ते उडवायला शिवाजी महाराजांना वेळ लागणारच होता. त्यातही त्यांचे हे येणे अचानक झाल्यामुळे त्यांना तेथे पोचण्यापूर्वी आपल्याच माणसांच्या विरोधालाही तोंड द्यावे लागले होते. एवढा वेळ चाललेल्या लढाईत बाजींचे साथीदार हताहत होऊन त्यांची संख्या कमी कमी होत होती, त्यांना अन्नपाण्याविना लढत राहणे भाग होते, उलट शत्रूकडून ताज्या दमाचे नवे लढवय्ये नव्या शस्त्रास्त्रांचा उपयोग करून वाढत्या संख्येने हल्ला करत होते. तरीसुध्दा तलवारीच्या युध्दात बाजीप्रभू कोणाला जुमानत नाहीत हे पाहून त्यांच्यावर भाले बरच्या फेकल्या गेल्या. त्यातले कांही घाव त्यांनी शिताफीने चुकवले तर कांहींनी त्यांना घायाळ केले. अंगाची चाळण झाली तरीही ते खंबीरपणे उभे राहून कोणालाही खिंडीतून पार जाऊ देत नव्हते. अखेरीस त्या काळात दुर्मिळ असलेली बंदूक घेऊन खास बंदूकधारी शिपाई आला. त्याने उंचवट्यावर उभा राहून नेम धरून बंदुकीच्या गोळ्या बाजीप्रभूंच्या दिशेने झाडल्या. त्या वर्मी बसून ते निरुपाय होऊन खाली कोसळले.

आता त्यांच्या अंगात लढण्याचे त्राण उरले नव्हते. शरीरीचे अंगांग विच्छिन्न झाले होते. त्यांना विकलांग अवस्थेत पाहून निर्दयी शत्रूसैनिक त्यांच्यावर प्रहार करतच होते. हे सगळे सहन करत शिवरायांच्या तोफांचे बार ऐकण्यासाठी त्यांचे पंचप्राण त्यांच्या कानात गोळा झाले होते. अशा विकल अवस्थेत त्यांनी परमेश्वराला काय आवाहन केले असेल याची कल्पना करून ते भाव 'सरणार कधी रण प्रभु तरी' या गाण्यात कुसुमाग्रजांनी विलक्षण प्रभावी शब्दात व्यक्त केले आहेत. "लवकर ते खुणेचे बार मला एकदाचे ऐकव आणि या कष्टमय अस्तित्वातून कायमचे मुक्त कर ना. तो क्षण तू लवकर कां आणत नाही आहेस?" असे ते प्रभूला विचारत आहेत. यथावकाश शिवाजी महाराज गडावर पोचल्याचे तोफांचे बार कानावर पडले आणि तत्क्षणी नरवीर बाजीप्रभूंनी समाधानाने प्राण सोडला. त्यांच्या या असामान्य पराक्रमाने ती जागा पावन झाली म्हणून ती पावनखिंड या नांवाने ओळखली जाऊ लागली आणि बाजीप्रभूंचे नांव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले.
------------------------------------------------------

हौतात्म्य (उत्तरार्ध)

नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा ऐकतांना त्यातले तीन देदिप्यमान असे पैलू मला जाणवले. त्यांनी केलेला अलौकिक त्याग हा पहिला. प्राणापेक्षा अधिक अनमोल असे कांहीही आपल्याकडे नसते, त्यामुळे प्राणार्पण हा सर्वश्रेष्ठ त्याग ठरतो. जे लोक दुःखातिरेक, संकटाचे भय, मानसिक धक्का अशा कारणाने आत्महत्या करतात त्यांच्या मनात समर्पणाची भावना नसते, ते त्यांचे मानसिक दौर्बल्य असते. सारेच सैनिक स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता रणांगणावर जातात तेंव्हा पराक्रम गाजवून विजयी होऊन परत येण्याची ऊर्मी त्यांच्या मनात असते आणि युध्दात ज्यांचा विजय होतो त्यांना विजयाचा उन्माद अनुभवायला मिळतो. कांही प्रसंगी पराभूत पक्षसुध्दा माघार, पलायन, तह, खंडणी, शरणागती, मांडलिकत्व वगैरेतल्या एकाद्या मार्गाने जिवानिशी आपली सुटका करून घेतो. त्यामुळे सैनिकांच्या मनात त्यागभावनेच्या जोडीला विजयलालसा तसेच भविष्यकाळाची स्वप्ने असू शकतात. पण बाजीप्रभू ज्या परिस्थितीतून जात होते त्यात या कशालाही वाव नव्हता. संतप्त झालेला बलाढ्य शत्रू त्यांच्यावर चालून येत होता. लढाईत त्याचा पराभव करणे केवळ अशक्य होते, तसेच तो कोणाचीही गय करणार नाही याची खात्री होती, बाजींना आपली जागा सोडून पळायचे तर नव्हतेच. त्यामुळे त्यांचा मृत्यू निश्चित होता.
अशा प्रकारे एका उदात्त ध्येयासाठी साक्षात मृत्यूला आपण होऊन कवटाळणे ही त्यागाची अगदी परिसीमा झाली यात संशय नाही.

या प्रसंगी बाजीप्रभूंनी दाखवलेले धैर्य, शौर्य, युध्दकौशल्य, समयसूचकता वगैरे सर्व गुण एकमेकांशी निगडित असल्यामुळे त्यांचा एकत्र विचार केल्यावर हा बाजींच्या गाथेचा हा दुसरा पैलू त्यानी केलेल्या असीम त्यागापेक्षाही कांकणभर अधिक चमकदार वाटतो. साधारण माणूस मरणाच्या भीतीनेच गांगरून गर्भगळित होतो, त्याच्या हांतापायातल्या संवेदना नाहीशा होतात. कितीही उसने अवसान आणले तरी अशा प्रसंगी तो आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी उभा राहू शकत नाही. बाजीप्रभू मात्र स्वतः मरणाच्या दाढेत असतांना आणि सभोवार मृत्यू थैमान घालतांना दिसत असतांनासुध्दा आपले मनोधैर्य टिकवून अत्यंत शांतपणे पण खंबीरपणे सर्व शक्ती पणाला लावून चिकाटीने प्रतिकार करत राहिलेच, अतुलनीय असे शौर्य गाजवून पुढे पाऊल टाकणा-या प्रत्येक गनीमाला नामोहरम करून लोळवत राहिले. त्यांच्या जागी दुसरा एकादा वीर असता आणि तो पराक्रमामध्ये अगदी किंचित जरी उणा पडला असता तर ताकतवान शत्रू कदाचित त्याच्यावर मात करून पुढे गेला असता. तसेच त्याने उतावीळ होऊन त्वेषाने शत्रूवर चाल केली असती तर त्यामुळे शत्रूसेनेची कदाचित जास्त हानी केली असती, पण उरलेले सैन्य खिंड पार करून पुढे जाऊ शकले असते. बाजीप्रभूंनी मात्र अनुकूल भौगोलिक स्थिती निवडून तिचा पुरेपूर वापर करून घेऊन शत्रूला खिंडीच्या पलीकडे थोपवून धरण्यात आपला अनुभव आणि युध्दकुशलता यांचा प्रत्यय आणून दिला.

पहिल्या दोन महत्वाच्या पैलूंमधून तिसरा महत्वाचा पैलू निर्माण झाला, तो म्हणजे त्यांनी आपले मर्यादित उद्दिष्ट निश्चित केले आणि त्याची मनोभावाने यशस्वीरीत्या पूर्तता केली. पावनखिंडीत झालेले युध्द जिंकणे त्यांना अशक्यच होते आणि अखेरीस त्यात त्यांचा पाडाव होऊन ते धारातीर्थी पडले असे असले तरी एकंदरीत त्यात त्यांचा विजय झाला असेच म्हणावे लागेल. शत्रूसैन्याला कांही काळापर्यंत खिंडीतून पलीकडे जाऊ द्यायचे नाही आणि त्या योगे शिवाजी महाराजांना सुखरूपपणे विशाळगडावर पोचण्यासाठी जेवढा अवधी लागणार होता तेवढा वेळ ती खिंड लढवून त्यांच्या प्राणांचे रक्षण करायचे एवढाच हेतू बाजीप्रभूंनी मनात धरला आणि तो साध्य केला. त्यामुळे पुढे शिवाजी महाराजांनी पराक्रम गाजवून हिंदवी स्वराज्याची उभारणी करून जगाच्या इतिहासाला वेगळे वळण लावले. या मोठ्या कार्याच्या उभारणीच्या पायामध्ये बाजीप्रभूंचा त्याग आणि पराक्रम याचा महत्वाचा वाटा आहे. इतिहास नेहमी विजयी वीरांच्या बाजूने असतो असे कांही लोक म्हणतात. प्राचीन काळात होऊन गेलेल्या एकाद्या अप्रसिध्द राहिलेल्या प्रसंगी कोणा अनामिक स्वामीभक्त सेवकाने अलौकिक असा त्याग आणि शौर्य एकादे वेळी कदाचित दाखवलेही असले तरी जर तो त्यात यशस्वी झाला नसला तर त्याची यशोगाथा लिहायलाही कोणी शिल्लक राहिला नसण्याची शक्यता आहे.

हुतात्मा हा शब्द संस्कृत भाषेतला असला तरी पौराणिक व ऐतिहासिक कथांमधील व्यक्तींच्या संदर्भात मी तो ऐकलेला नाही. तरीही "हुतात्म्यांनी केलेले बलिदान" हा शब्दप्रयोग वाचतांच नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचे उज्ज्वल उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर येते आणि आजच्या युगातील हुतात्म्यांचा त्याग, निष्ठा, कार्य आणि त्याची परिणती यांची बाजीप्रभूंचे बरोबर कळत नकळत तुलना होते. आपण स्वतः आणि आपले कुटुंबीय यांच्या कल्याणाचा विचार मनात न आणता आणि कोठल्याही वैयक्तिक लाभाची यत्किंचित अभिलाषा मनात न बाळगता ज्या देशभक्तांनी स्वातंत्र्याच्या समरांगणात उडी घेऊन आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांची नांवे प्रातःस्मरणीय ठरतात. देशाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी लढतांना ज्यांना वीरगती प्राप्त झाली त्या सैनिकांपुढे आदराने मान लवते. दहशतवादी, नक्षलवादी, फुटीरवादी आदी विध्वंसक प्रवृत्तींचे बरोबर लढतांना ज्यांना प्राण वेचावे लागले त्यांच्याबद्दल देखील मनात हीच आदराची भावना उठते. मात्र देशभक्तीच्या उदात्त भावनेखेरिज कांही ऐहिक उद्देशांचा विचार करून या लोकांनी जिवाला धोका असलेला आपला पेशा निवडलेला असतो हा त्यांच्यात आणि स्वातंत्र्यसैनिकात लहानसा फरक आहे. यामुळे त्यांच्या बलिदानाचे मोल कमी ठरत नाही, पण निदान अल्प प्रमाणात तरी त्यांच्या कुटुंबीयांची काळजी सरकार व समाजातर्फे घेतली जातेच.

यातला अपवादात्मक एकादा माणूस त्याचा स्वतःचा नाकर्तेपणा, गलथानपणा, संधिसाधू वृत्ती अशा गुणांमुळे गोत्यात आल्याचे समोर आले तर त्याच्या जागी दुसरा सक्षम अधिकारी असता तर वेगळे चित्र पहायला मिळाले असते असे वाटून जाते. देशांतर्गत हिंसाचारात अनपेक्षित रीत्या सांपडलेल्या माणसांच्याकडून त्यागाची, समर्पणाच्या भावनेची अपेक्षाच नसते. त्यांच्या दुर्दैवाच्या कहाण्या ऐकून वाईट वाटते, पण ते हौतात्म्य वाटत नाही. जे लोक गंमत बघायला म्हणून उत्सुकतेपोटी नको त्या जागी जातात आणि प्राणाला मुकतात, त्यांची खरे तर कींव येते. धर्म, जातपात, भाषा, प्रांत, मजूरांचे हक्क आदी
कारणे पुढे करून जे लोक स्वतःच हिंसाचार सुरू करतात आणि त्यांचा त्यात बळी पडला तर त्यांच्याबद्दल फारशी सहानुभूतीदेखील वाटत नाही.

अशा वेगवेगळ्या प्रकाराने अकाली मृत्यूमुखी पडलेल्या सगळ्या लोकांना सरसकट 'हुतात्मा' असे संबोधून त्यांचा गौरव व्हायला लागला तर हौतात्म्याच्या संकल्पनेचे अवमूल्यन होईल. तसे करण्यापूर्वी सुबुध्द माणसांनी थोडा विवेक बाळगावा आणि हुतात्मा ही संज्ञा विचारपूर्वक द्यावी, तसेच कोणीही कोणाच्याही
हौतात्म्याचे आपल्या लाभासाठी भांडवल करू नये असे मला वाटते.

Thursday, March 12, 2009

श्यामची आई


छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌ ।
छडी लागे छ्मछ्म, विद्या येई घमघम ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल ।
दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल ।
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण ।
पचापचा शिव्या देई खाता खाता पान ।
"मोऱ्या मूर्खा- !", "गोप्या गद्ध्या !", देती सर्वा दम ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

तोंडे फिरवा, पुसती गिरवा, बघु नका कोणी ।
हसू नका, रडू नका, बोलु नका कोणी ।
म्हणा सारे एकदम, ओनामा सिद्ध्म्‌ ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

हे गाणे माझ्या लहानपणी सगळ्या मुलांना अतीशय आवडत असे. माझ्या पुढच्या पिढीमधल्या मुलांनी ते क्वचितच ऐकले असेल, पण त्यानंतरच्या पिढीतल्या लिटल् मॉनिटर मुग्धा वैशंपायन हिने हे गाणे सारेगमप लिटल् चँप्सच्या स्पर्धेत सादर केले आणि सर्वांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतले. सारेगमपच्या महाअंतिम फेरीत तिनेच ते गायिले, मुग्धावर झालेल्या खास भागात या गाण्याचा समावेश होता आणि वाशीला झालेला या लिटल् चँप्सचा एक कौतुकसोहळा मी पाहिला त्यातसुध्दा तिने सादर केलेल्या या गाण्याला अमाप टाळ्या पडल्या. पंडरत्न या नांवाने निघालेल्या सीडीमध्ये हे गाणे घेतलेले असल्याने अनेक लोक ते ऐकत राहणार आहेत. विख्यात कवी आणि गीतकार वसंत बापट यांनी लिहिलेले हे मजेदार गाणे सुप्रसिध्द संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी १९५३ साली निघालेल्या श्यामची आई या चित्रपटासाठी स्वरबध्द केले आणि त्यावेळी बालवयात असलेले आताचे ज्येष्ठ संगीतज्ञ पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी ते गायिले होते. माझ्या आईच्या वयाच्या स्त्रिया एकत्र येऊन जेंव्हा गाणी वगैरे म्हणायच्या त्यात एक गाणे हमखास असायचे. त्याचे शब्द होते,

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन, द्रौपदिसी बंधु शोभे नारायण ।
हे गाणे त्या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आचार्य अत्रे यांनी स्वतः लिहिले होते आणि आशा भोसले यांनी गायिले होते. कवी यशवंत यांचे एक अजरामर असे मातृप्रेमाने ओथंबलेले गीत आशा भोसले यांच्याच आवाजात या चित्रपटात घातले होते. ते होते,
’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी , ती हाक येइ कानी । मज होय शोककारी ।।
या गाण्यातली "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" हा ओळ तर आता मराठी भाषेतली एक म्हण बनली आहे. श्यामची आई या चित्रपटाला स्व. वसंत देसाई यांनी इतके मधुर संगीत दिले असले तरी गाणी हा कांही या चित्रपटाचा आत्मा नव्हता. स्व.साने गुरूजींनी लिहिलेल्या याच नांवाच्या पुस्तकातल्या
कथेवर तो काढला होता आणि या पुस्तकाद्वारे साने गुरूजींनी दिलेल्या शिकवणीवर त्याहून जास्त महत्व होते.
ही शिकवण समर्थपणे मांडलेला आणि या सर्व अमर गाण्यांनी नटलेला'श्यामची आई' हा अजरामर चित्रपट प्रदर्शित होऊन आता छपन्न वर्ष पूर्ण झाली. शुक्रवार, ६ मार्च १९५३ रोजी मुंबईच्या कृष्णा टॉकीज (आताचे ड्रीमलॅन्ड) मध्ये या सिनेमाचा पहिला खेळ श्री. आचार्य अत्रे ह्यांच्या मातोश्री, श्री. व्ही.शांताराम ह्यांच्या मातोश्री, श्री. साने गुरुजींच्या मावशी व भगिनी, श्री. माधव वझे ह्यांच्या मातोश्री आणि श्री. माधव अलतेकर ह्यांच्या मातोश्री या पंचमातांच्या उपस्थितीत झाला.
'श्यामची आई' हा मराठी बालसाहित्यातला अनमोल संस्कारांचा ठेवा आहे. हा ठेवा घरोघरी नेऊन पोचवण्याचे महान कार्य ७६ वर्षाचे श्री. पुराणिक हे गेली १३ वर्षे सतत करत आहेत. रोज एक तरी पुस्तक विकले गेलेच पाहिजे नाहीतर त्या दिवशी एक जेवण करायचे नाही असा त्यांचा संकल्प आहे, पण गेल्या तीन वर्षात अशी वेळ फक्त तीन दिवशी आली. सरासरीने पाहता त्यांची रोज तीन पुस्तके विकली गेली आहेत. "दुस-याकडून आदर, विश्वास, सत्याची अपेक्षा करण्याआधी स्वत: ते आधी आचरणे म्हणजेच संस्कार. संस्कार ही काही अचानक माणसांत येणारी शक्ती नव्हे. संस्कार हे घडवावे लागतात, हळूहळू रूजवावू लागतात." असे ते सांगतात. पुस्तकातला आणि चित्रपटातली श्यामची आईसुध्दा रोज घडणा-या लहान सहान प्रसंगातून वेळोवेळी श्यामला समज देऊन किंवा समजावून सांगून आणि स्वतःच्या आचरणातून त्याच्या मनावर संस्कार करत असते.
ही सर्व सचित्र माहिती मराठीवर्ल्ड या संकेतस्थळावर भाग्यश्री केंगे यांनी दिली आहे. मी त्यांचा आभारी आहे.

दोन रूपे एका चित्रात


स्त्री ही क्षणभराची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते असे एक जुने सुवचन आहे. आज कदाचित परिस्थिती थोडी बदलत चालली आहे. पण या दोन्ही होण्याच्या आधीच ती कन्या, भगिनी, भाची, पुतणी वगैरे झालेली असते, कधी कधी तिला आत्या किंवा मावशीपदही मिळालेले असते. लग्नानंतर ती लगेच मामी आणि काकू बनते आणि कालांतराने आजी, पणजी वगैरे होण्यापर्यंत तिचा प्रवास चालत असतो. त्याबरोबर शेजारी, सहकारी, प्रतिस्पर्धी, शिक्षिका, गायिका, अभिनेत्री, खेळाडू वगैरेसारख्या असंख्य भूमिकांमधून तिचे विश्वरूपदर्शन आपल्याला घडत असते. एका कुशल चित्रकाराने त्यातली दोन रूपे एकत्र करून आपले कौशल्य दाखवले आहे. एक मुग्ध युवती आणि विचारात गढलेली वृध्द स्त्री अशी दोन्ही रूपे या एकाच चित्रात साठवली आहेत. मग तिला वाटल्यास पत्नी आणि माता म्हणा किंवा आई आणि आजी असे नांव द्या. त्यांच्या वयातील फरक दाखवण्यासाठी या कृष्णधवल चित्रात मी थोडी रंगसंगती केली आहे. एरवी अनेक लोकांना त्यातली एकच आकृती दिसते आणि दोन माणसांना त्या वेगवेगळ्या दिसल्या तर त्यावर वाद होतो.

हे चित्र मी पूर्वीसुध्दा अनेक वेळा पाहिलेले आहे. काल महिलादिनाच्या संदर्भात आणखी एका पुरुष लेखकाने लिहिलेल्या ब्लॉगवर ते टाकलेले दिसले.

Sunday, March 08, 2009

यंदाचा जागतिक महिला दिन


काल या वर्षाचा जागतिक महिला दिवस साजरा झाला. या निमित्याने दूरदर्शन सह्याद्री चॅनेलवर एक सुरेख कार्यक्रम पहायला मिळाला. दरवर्षी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे हिरकणी पुरस्कार दिले जातात. शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेल्या हिरकणी या मातेने आपल्या तान्ह्या बाळापासून ताटातूट होऊ नये यासाठी रायगडाच्या तटावरून खाली उडी मारली होती. तिच्या स्मरणार्थ तिच्या नांवाने दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिलांना हे पुरस्कार दिले जातात. या वर्षी हे पुरस्कार दि.२० फेब्रूवारी रोजी नऊ महिलांना एका खास समारंभात दिले गेले होते, त्या कार्यक्रमाची ध्वनिफीत जागतिक महिला दिनाच्या निमित्याने प्रक्षेपित केली गेली.

दहशतवादाविरुध्द जनजागृती करण्याबद्दल कविता करकरे, शवविच्छेदनाच्या क्षेत्रातील अग्रगण्य महिला डॉक्टर वसुधा आपटे, मतिमंद मुलांसाठी काम करणार्‍या कांचन सोनटक्के, प्रख्यात गायिका आणि अभिनेत्री फय्याज शेख, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका रेणू गावस्कर, आदिवासींच्या उत्थानासाठी काजळविहीर या खेड्यात काम करणार्‍या मंगला सिंग, उद्योजिका स्वाती पाटील, प्रसिध्द ज्येष्ठ नृत्यांगना माया जाधव आणि दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या वेळी दिवसरात्र त्या ठिकाणी राहून प्रत्यक्षदर्शी वृत्तांत देण्याचे काम करणार्‍या दूरदर्शन केंद्राच्या धडाडीच्या पत्रकार वर्षा अरोला या नऊ महिलांना सन २००८ चे हिरकणी पुरस्कार सह्याद्री वाहिनीतर्फे देण्यात आले.

कालच्या वर्तमानपत्रात जागतिक महिला दिनाचा उल्लेख होता, पण खास उल्लेख करण्यासारखे कांही विशेष माझ्याकडे येणार्‍या वर्तमानपत्रात दिसले नाही. लोकसत्तामध्ये प्रसिध्द कवी श्री. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली मी आंतून बोलते आहे ही कविता दिली आहे. जन्माला येण्यापूर्वीच खुडली जाण्याची भीती वाटत असलेल्या स्त्रीजीवाचे आक्रंदन त्यात आहे. तिने असा आक्रोश केला आहे ...
"सारा निसर्ग पिसारा, इवल्याशा, डोळ्यांत भरून घ्यायला मी उत्सुक आतुर अधीर!
मग माझ्या जन्मदात्यांचा मेंदू, का बधिर?
पुरुषाला स्त्री हवी, ही सुसंगती तरी माता पित्याला मुलगी नको, ही विसंगती!
कां, का?
जन्माला येण्यापूर्वी माझ्या नरडीला नख लावणारे हे माझे मारेकरी.. जल्लाद!
आईवडिलांच्या रूपांत सल्ला घेताहेत, विज्ञानाचा! .....
मी आतून बोलते, आईच्या कुसण्यातून! मला बाहेर येऊ द्या. मला बाहेर येऊ द्या!" ....

जागतिक महिलादिनाच्या दिवशी असे नकारात्मक विचार ( त्यात सत्याचा भाग असला तरी) मला तरी विसंगत वाटले.
या वर्षी मराठी ब्लॉगविश्वात मला स्त्रीदिनानिमित्य कुठल्याच महिला लेखिकेने कांही लिहिलेले सापडले नाही. बहुतेकजणींनी आपापल्या पानांवर पाककृती किंवा असेच कांहीसे लिहिले आहे. 'भविष्याच्या अंतरंगात' या एका पुरुषाने चालवलेल्या ब्लॉगवर '८ मार्च जागतिक महिला दिन' या मथळ्या खाली
"यानिमित्याने आपल्या कार्यक्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त केलेल्या सावित्रीबाई फुले , मदर टेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, मेधा पाटकर, किरण बेदी यांना प्रणाम." एवढेच लिहिले आहे तर 'मराठा इतिहासाची दैनंदिनी' या दुसर्‍या एका ब्लॉगवर "८ मार्च १६७० - पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर-वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला." अशी ऐतिहासिक माहिती दिली आहे.

एका लेखकाने एकाच वेळी दोन संकेतस्थळांवर या दिवसानिमित्य एक चर्चा सुरू केली. त्यावर आलेल्या बहुतेक प्रतिसादात स्त्री व पुरुष यांतील फरक आणि त्यांचे परस्पर संबंध यावरच भर दिला गेला. त्यात सुप्रसिध्द अमेरिकन लेखक ऑस्कर वाइल्ड याचा एक सुविचार वाचायला मिळाला. तो असा आहे.
" Between men and women there is no friendship possible. There is passion,
enmity, worship, love, but no friendship." -Oscar Wilde
" स्त्री व पुरुष यांमध्ये उत्कट प्रेम, द्वेष, भक्तीभाव, हाडवैर वगैरे इतर कसलीही भावना निर्माण होऊ शकेल, पण मैत्री होणे कदापि शक्य नाही."
वाइल्डमहाशयांना यातून काय सुचवायचे आहे ?

जागतिक महिला दिन

आठ तारखेला आपण जागतिक महिला दिन साजरा करतो. आता आपण म्हणजे कोण? स्वतःपासूनच सुरुवात करायची झाली तर आज मी आपली नेहमीचीच सारी कामे नेहमीसारखी केली, माझ्या पत्नीनेही तसेच केले. केर काढणे, लादी पुसणे, भांडी घासणे, स्वयंपाकपाणी वगैरे कामासाठी लावलेल्या कामवाल्या बाया येऊन आपापली कामे करून गेल्या. त्यांनी जागतिक महिला दिनाबद्दल कांही ऐकलेच नसावे, ते ही एका दृष्टीने बरेच झाले म्हणा, नाही तर त्या निमित्याने त्यांनी हक्काची सुटी मागून घेतली असती. तसे झाले असते तर बहुतेक मध्यमवर्गीय घरातल्या गृहिणींवर त्यांच्या जागतिक दिनाच्या दिवशी जास्तच कामाचा बोजा पडला असता. भारतातील नव्वद टक्के पुरुषांनी आपण होऊन घरातल्या कामाचा भार स्वतः उचलला नसता आणि उरलेल्या दहा टक्क्यापैकी नऊ टक्के लोकांच्या बायकांनी आपापल्या नवर्‍यांना घरकामाला हात लावू दिला नसता. त्यांना ते जमणारच नाही, ते त्यात नसता गोंधळ करून पसारा वाढवून ठेवतील याबद्दल त्या पत्नींची खात्री असते. अखेरच्या एक टक्का घरातल्या महिलांना आपले काम हेच आपले जीवनसर्वस्व वाटत असल्यामुळे इतके महत्वाचे काम एका अप्रशिक्षित पुरुषांवर सोपवणे त्यांना कल्पनेतसुध्दा शक्य नसते. थोडक्यात सांगायचे झाले तर या महिला दिनी महिलांना विश्रांती देऊन पुरुषांनी त्यांची सारी कामे केली असे दृष्य कांही मला तरी कुठे दिसले नाही.

माझ्या रोजच्या जीवनात नाही म्हणायला अगदी किंचितसा फरक पडला. वर्तमानपत्रे, टी.व्ही. आणि इंटरनेट या तीन्ही प्रसार माध्यमांमधून किंचित वेगळ्या प्रकारच्या गोष्टी वाचायला आणि पहायला मिळाल्या. माझ्या अंदाजाप्रमाणे अशा प्रकारच्या बातम्या, चर्चासत्रे किंवा लेख यांमध्ये महिलावर्गाला तितकासा रस नसतो. त्यामुळे त्यांच्यापैकी किती जणींनी ते कार्यक्रम लक्ष देऊन पाहिले असतील किंवा त्याचे वृत्तांत गंभीरपणे वाचले असतील ते सांगता येणार नाही. पण जेवढे माझ्या वाचनात आले, पहायला मिळाले त्यावरून कांही ठिकाणी सभा झाल्या, कुणाला पुरस्कार प्रदान केले गेले, कांही सन्माननीय कर्तबगार स्त्रियांनी आपापले अनुभव सांगितले, इतर स्त्रियांना स्फूर्ती दिली, मार्गदर्शन केले, वगैरे कार्यक्रम कांही ठिकाणी झाले.

पूर्वी एका महिलादिनाच्या दिवशी मराठी ब्लॉग विश्वामध्ये भ्रमण करतांना कांही चांगल्या व मनोरंजक कविता आणि लेख वाचायला मिळाले होते. माफीचा साक्षीदार या कवीने "स्त्री म्हणजे आईची वत्सलता, लेकीची अल्लडता, धरणीची पोषकता, सरितेची निर्मलता, वेलीची नाजुकता, कुसुमाची मोहकता, भक्तीची आर्जवता, शक्तीची व्यापकता, छायेची शीतलता, मायेची उत्कटता, लक्ष्मीची मंगलता व अंबेची सात्त्विकता" असे तिचे सुरेख गुणगान केले होते तर लगेच खोडसाळ या दुसर्‍या कवीने स्त्री म्हणजे "आईचा पाठीत धपाटा, लेकीचा खरेदी-सपाटा, छायेचे तासागणिक बदलणे, जायेचे तासन्‌तास बडबडणे, अश्रुंची बळजोरी, पुरुषांची कमजोरी" इत्यादि गंमती सांगत त्या कवितेचे मजेदार विडंबन केले होते.

बडबड्या स्नेहलने एक विचार प्रवर्तक लेख लिहून असा निष्कर्ष काढला होता की "चांगल्या कामाची दखल नेहमीच घेतली जाते. त्याचे कौतुक करताना लोक मग अशा अमूक दिवसाची वाट बघत नाहीत. महिला पुढे असतील, स्वतंत्र असतील तर समाजाची मान्यता मिळणारच आहे... त्यासाठी आजच्या दिवशी आम्हीच आमचा सत्कार करून घ्यायची गरज नाही. जे साध्य झालंय तो मॅचचा पहिला बॉल आहे, अजून पूर्ण ५० षटकं खेळायची आहेत. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन कसे चालेल?"

स्वप्ना यांनी जागतिक महिला दिनानिमित्त 'स्त्री भ्रुणहत्या' ह्या विषयावर कविता लिहून "इतकी दगडी झालीयेत का मनं ?" हा प्रश्न विचारून "तिला'जगू दिले'याचा आनंदही न होण्याइतकी..नक्कीच एवढी दगडी नाही झालीयेत मनं.." असे उत्तरही दिले होते. त्यांनीच जागतिक महिला दिनाच्या इतिहासाची संक्षिप्त माहिती देऊन "तू" या नांवाची एक स्फूर्तीदायक कविता लिहिली होती. त्यात अखेरीस एक सकारात्मक संदेश दिला आहे की,
"विधात्याची नवनिर्माणाची कलाकृति तू, एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा साजरा कर तू..
उठ चल,यशाच्या शिखरांची तुला साद॥ऐक तू, 'स्त्री' म्हणून जन्मलीयेस,'व्यक्ती' म्हणूनही जग तू॥"

बेधडक यांनी आपल्या (उपरोधिक) शैलीमध्ये सद्यःपरिस्थितीचे वाभाडे काढीत "देवा रे! पुढची हज्जार वर्षे तरी आम्हाला बायकांचा जन्म नको … आम्ही या पुरूषांच्या जन्मात अत्यंत सुखी आहोत." असे लिहिले होते. ते करतांना जागतिक महिला दिनी त्यांना बैलांच्या पोळ्याची आठवण झाली. तसेच "तुमचा नवरा तुमच्याबरोबर H4 व्हिसा घेऊन तुमच्याबरोबर अमेरिकेला यायला तयार होईल कां?, नोकरी सोडून मुलांची काळजी घ्यायला घरी राहील कां?, तुमच्यासाठी दोन भाकर्‍या थापेल कां?, तुमच्याबरोबर आदिवासींच्या पाड्यात जाऊन समाजसेवा करेल कां आणि घरजावई होऊन तुमच्या आईवडिलांच्यासोबत रहायला तयार होईल कां?" असे पांच प्रश्न विचारून "बघा! या प्रश्नांची उत्तरे तुमचे यजमान काय देणार ते! त्यांची विकेट उडली नाही तर जरूर सांगा! कारण असे प्रश्न ऐकल्यावर आम्ही आमच्या पत्नीला कधी आवाज चढवून, कधी प्रेमाने रूंजी घालून तर कधी न ऐकल्यासारख करून धुडकावून लावलं असतं." असे पुढे म्हंटले होते.

यामागील उपरोधिकता लक्षात घेऊनसुद्धा मला हे दोन्ही मुद्दे अप्रस्तुत वाटतात. "ढोर, गंवार, सूद्र, पसु, नारी ये हैं ताडनके अधिकारी " असे वाक्य संत तुलसीदासांनी रामचरितमानसातल्या एका पात्राच्या तोंडी घातले आहे. ते त्यांचे सरसकट स्त्रीजातीबद्दलचे व्यक्तीगत मत नाही हे त्यांनी इतर अनेक जागी स्त्रीत्वाचा जो गौरव केला आहे त्यावरून स्पष्ट होते. आजच्या जगात मात्र अत्यंत प्रतिगामी लोक अजून तसे म्हणतील. पोळ्याचा सण बैल कांही स्वतःहून साजरा करीत नाहीत, तो त्यांचे मालक साजरा करतात, पण जागतिक महिला दिन महिला स्वतः साजरा करतात हा महत्वाचा फरक त्या दोन्हीमध्ये आहे. तसेच आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये किती महिला वर दिलेले पांच प्रश्न आपल्या नवंर्‍याना विचारू शकतील याचीच आधी शंका आहे. ज्या घरांमधील महिला आधीच इतक्या सक्षम झाल्या असतील त्या प्रकारच्या घरांमधील अनेक नवरे तसे केल्याने कुटुंबाचा फायदा होत आहे असे त्यांना दिसल्यास, त्याचे होकारार्थी उत्तर सहज देतील असे मला वाटते. यातील एकेक प्रश्नाला होकारार्थी उत्तर देऊन सुखी संसार करीत असलेल्या वेगवेगळ्या लोकांची उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे तशा प्रकारच्या प्रश्नांना नकारार्थी उत्तर देऊन नवर्‍यापासून दूर राहणे पसंत करणार्‍या कित्येक स्त्रियासुद्धा समाजात दिसतात. त्यामुळे याचा जागतिक महिला दिवस पाळण्या न पाळण्याशी संबंध नाही.

स्त्री व पुरूषांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक जडणघडणीमध्ये निसर्गानेच फरक ठेवले आहेत. त्याशिवाय माणसा माणसातही फरक असतात. त्यामुळे कुणाला कोणते काम आवडते, जमते, झेपते तर दुसर्‍या कुणाला दुसरे एकादे काम आवडते, जमते, झेपते. त्या दोघांनी एकाच प्रकारच्या कामात एकसारखेच नैपुण्य किंवा स्वारस्य दाखवणे जरूरीचे नाही. त्याशिवाय "बळी तो कान पिळी" हाही एक निसर्गनियम आहे. त्यामुळेच सबळ निर्बळांवर जुलूम करू शकतात. पुरूषांकडून स्त्रियांवर होत असलेली जुलुम जबरदस्ती, अन्याय हा त्यातला फक्त एक भाग आहे. कांही पुरूष दुसर्‍या पुरूषांवरसुद्धा अनन्वित अत्याचार करतात तसेच कांही स्त्रिया दुसर्‍या स्त्रियांवर अन्याय करतांना, त्यांच्यावर वर्चस्व गाजवतांना सर्रास दिसतात. कवी यशवंत देव यांनी लिहिलेल्या एका प्रसिद्ध विडंबनगीताप्रमाणे "पत्नीची मुजोरी, तिची नित्य सेवा, मरण धाड देवा आता मरण धाड देवा" असा टाहो फोडणार्‍या गांजलेल्या नवर्‍यांच्यासुद्धा संघटना निघालेल्या आहेत. मला त्यातील कशाचेही समर्थन करावयाचे नाही, फक्त या कठोर वस्तुस्थितीची इथे जाणीव करून देत आहे. या गोष्टी अनादिकालापासून चालत आलेल्या आहेत व अनंत कालापर्यंत चालत राहणार आहेत. त्यावरील उपायांचा शोध व त्यापासून स्वतःचा बचाव करण्याचे प्रयत्नही असेच चालू असल्याने त्याच्या स्वरूपात कालानुसार बदल होत जातो एवढेच. यालाच जीवन असे नांव आहे.
आपण एखादा दिवस साजरा करतो तेंव्हा त्या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेतो एवढेच. सण साजरा केला की लगेच त्यासंबंधीचे सर्व प्रश्न सुटले असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे स्त्रियांना, पुरूषांना, मुलांना, समाजातील सगळ्याच घटकांना सन्मानाचे स्थान मिळावे, त्यांचे जीवन सुखी व्हावे यासाठी प्रयत्न चालूच ठेवावे लागणार आहेत. त्यातल्या कोणाच्या सन्मानार्थ एक दिवस साजरा करायचा असे ठरवले तर तसे करावे व त्यापासून जर थोडा फार फायदा होत असेल तर तो होऊ द्यावा असे माझे मत आहे.
आज साजरा जालेल्या या वर्षीच्या महिलादिनानिमित्य उद्याच्या भागात.

Friday, March 06, 2009

दू ऊऊऊ र दर्शन

मुंबई दूरदर्शनचे प्रक्षेपण सुरू होण्याच्या आधीपासून आम्ही, म्हणजे मी आणि माझी पत्नी अलका, इथे रहात आहोत आणि कलेच्या निमित्याने अलकाचा व विज्ञानाच्या संदर्भात माझा असा या दोन्ही क्षेत्रात आमचा थोडासा वावर आहे. त्यातल्या कोठल्या ना कोठल्या कार्यक्रमाचे चित्रीकरण चाललेले असतांना मधूनच प्रकाशाचा एखादा झोत क्षणभर आमच्यावर यायचा किंवा कॅमेर्‍याच्या अँगलमध्ये आमचा चेहेरा यायचा. कधी अचानकपणे ती फ्रेम आम्हाला आमच्या टी.व्ही.च्या पडद्यावर दिसायची किंवा "परवा तुम्हाला टीव्हीवर पाहिलं" असे कुणीतरी सांगायचे असे कित्येक वेळा होऊन गेले आहे. त्यामुळे टीव्हीवर झळकण्याचे मला फारसे अप्रूप वाटत नाही. एका प्रकल्पाच्या उभारणीवर माझी मुलाखतसुध्दा येऊन गेली. आयत्या वेळी विचारलेल्या सर्व खोचक प्रश्नांची समर्पक उत्तरे मुलाखतदात्याला कशी काय देता येतात या रहस्याचा त्या वेळी मला उलगडा झाला.

एकदा दूरदर्शनकेंद्रावर एका मराठी वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण होणार होते. नेमके त्याच वेळी आम्ही अगदी योगायोगाने तिथे जाऊन पोचलो. प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये बसायला जागासुद्धा नव्हती म्हणून आम्ही परतच जाणार होतो, तेवढ्यात तिथे बसलेल्या एका परिचिताचे लक्ष आमच्याकडे गेले. त्यांच्या ग्रुपमध्ये सातआठजण होते. त्यांनी थोडे सरकून घेऊन आणि मुलांना मांडीवर बसून आम्हाला जागा करून दिली. लवकरच गायक व वादकांनी गाणे सुरू केले आणि शूटिंगला सुरुवात झाली, पण सगळे प्रकाशझोत आमच्या डोळ्यावरच पडत होते आणि कॅमेरे प्रेक्षकांवरच रोखलेले होते. दोन तीन सहाय्यक हातवारे करून प्रेक्षकांना टाळ्या वाजवून ताल धरायला तसेच चेहर्‍यावर हावभाव आणायला प्रोत्साहन देत होते. पंधरावीस मिनिटे हा प्रकार चालल्यानंतर सगळे शांत झाले.

"आता प्रेक्षकांनी वाटल्यास बसावे नाहीतर जायलाही कांही हरकत नाही. त्यांच्या चित्रीकरणाचा भाग संपला आहे" असे सांगून टाकले गेले. मुख्य कार्यक्रमाचे टेक रीटेक करीत पूर्ण शूटिंग संपवायला चांगले सात आठ तास लागणार होते, तोंपर्यंत कदाचित मध्यरात्रसुध्दा होईल. तेवढा वेळ एका जागेवर ताटकळत बसून राहणे प्रेक्षकांना जमणार नाही आणि ते एका जागी थांबले नाहीत तर कार्यक्रमात सलगपणा राहणार नाही म्हणून अशी युक्ती योजिली गेली होती. जितका वेळ त्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम ऐकणे आम्हाला शक्य होते तितका वेळ तो ऐकला आणि आम्ही आमच्या घरी परत गेलो. पुढे त्या कार्यक्रमाचे प्रसारण कधी झाले तेही समजले नाही. त्यात आमचा चेहेरा दिसल्याचेही कोणी सांगितले नाही. प्रेक्षकांच्या गर्दीच्या या शॉटचा उपयोग कदाचित दुसर्‍याच एकाद्या कार्यक्रमासाठीसुद्धा करता आला असेल.

'मेरी आवाज सुनो'या स्टार टीव्हीवरील स्पर्धात्मक कार्यक्रमासाठी आमच्या चांगल्या परिचयातल्या चारुशीलाची निवड झाली होती. तिला मिळालेल्या पासावर तिच्या आईवडिलांसह आम्हालाही तिच्याबरोबर स्टूडिओत जायला मिळाले. तेथे प्रेक्षकात बसून टाळ्या वाजवून प्रोत्साहन देण्याचे काम तर केलेच, अँकर अन्नू कपूरने विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरेही मी सांगितली. जुन्या काळातील गाण्यांच्या चालीसुद्धा गुणगुणून दाखवल्या. त्यामुळे त्या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणात आम्हाला पंधरा वीस सेकंदांचे फूटेज मिळाले. ते पाहिल्याबद्दल तामीळनाड व कर्नाटकापासून राजस्थान, मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश या भागात राहणार्‍या माझ्या मित्रांनी वा नातेवाईकांनीसुद्धा फोन करून सांगितले. मुंबईतल्या लोकांच्या फोनचा तर आमच्यावर पाऊस पडला. हा सगळा त्या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेचा प्रभाव होता पण दोन दिवस आम्हाला आपणच 'स्टार' बनल्यासारखे वाटले होते. या रिअलिटी शोमध्ये मात्र त्यातील गाणी, प्रश्नोत्तरे, टाळ्या, शिट्या वगैरे सर्व खरेखुरेच होते. कार्यक्रम ठराविक वेळेत बसवण्यापुरती थोडी काटछाट त्यात करण्यात आली होती, पण आधीपासून ठरवून कांहीही शूट केलेले नव्हते.

ग्रँड युरोपच्या सहलीवरून आम्ही परत आलो तेंव्हा आमचे विमान मध्यरात्रीच्या सुमाराला विमानतळावर उतरले होते. त्यानंतर तिथले सोपस्कार पुरे करून घरी पोचून अंथरुणावर पडेपर्यंत अर्ध्याहून अधिक रात्र होऊन गेली होती. त्यामुळे सकाळी उन्हे अंगावर येईपर्यंत झोपूनच होतो. अचानक दूरध्नी खणखणला आणि "या वेळेला कुणाला आमची आठवण आली" असे चरफडत तो उचलला. अलकाच्या मैत्रिणीचा आहे हे समजल्यावर आनंदाने तिच्या स्वाधीन करून पुन्हा डोळे मिटून घेतले. अजून पुरती झोप झाली नव्हती आणि जेटलॅग ही अंगातून उतरला नव्हता. पलीकडून विचारणे झाले,"काय गं, तू मुंबईतच आहेस ना?"
"हो. आताच आलेय्. काय काम काढलं आहेस?"
"अगं, ईटीव्हीच्या शूटिंगला जायचा चान्स आहे."
"कसला प्रोग्रॅम आहे? मला ते अभिनय वगैरे करायला जमायचं नाही हं."
"नाही गं. तुझ्या आवडीचा गाण्याचाच कार्यक्रम आहे. श्रीनिवास खळ्यांच्या मुलाखतीवर आधारलेला प्रोग्रॅम आहे."
"पण त्यांची गाणी गायला फार अवघड असतात गं."
"अगं आपल्याला कुठे ती गायची आहेत? आपल्याला फक्त कार्यक्रमाला हजर राहून शोभा आणायची आहे. त्यासाठी त्यांना गाण्याची आवड असलेले प्रेक्षक पाहिजे आहेत म्हणे. मग तुम्ही दोघे येताय् ना?"
"अहो आपण जायचं का?" हा प्रश्न माझ्यासाठी होता.
मी फक्त अर्धेच संभाषण ऐकले असले तरी 'ता'वरून ताकभात एवढे ओळखून म्हंटले,"आता तर हो म्हणून दे. डीटेल्स समजल्यावर पाहू." तिने हो तर म्हणून दिले.

टूरवर असतांना पंधरा दिवस रोज प्रवास करून शरीराला थोडा शीण आलेला होता. घराची सफाई, कपडे धुणे यापासून वीज आणि टेलीफोनची बिले भरण्यापर्यंत न केलेल्या अनेक कामांचा मोठा ढीग साचला होता. परदेशातून मुद्दाम आणलेल्या भेटवस्तू ज्यांच्या त्यांना वाटायच्या होत्या. उन्हाळ्याची सुटी लागली असल्याने व लग्नसराई सुरू झालेली असल्याने त्या निमित्याने केंव्हाही अगांतुक पाहुणे घरी येऊन थडकण्याची शक्यता होती आणि आम्हालाही कांही समारंभांची आमंत्रणे आलेली होती. त्यामुळे खरे सांगायचे झाले तर मोकळा असा वेळ नव्हताच. पण टी.व्हीच्या पडद्यावर झळकायचे आकर्षण केवढे जबरदस्त असते!

दोन तीन दिवसांतच ते शूटिंग होणार दोते. त्याला 'जाणकार रसिक' म्हणून जायचे झाले तर त्यासाठी थोडी तरी तयारी करायलाच हवी. बहुतेक सारी लोकप्रिय मराठी गाणी माहीत असली तरी त्यातली श्रीनिवास खळ्यांनी स्वरबद्ध केलेली कोणती त्याची यादी बनवून त्यातली जी कॅसेट वा सीडीवर होती ती लक्षपूर्वक ऐकून घेतली. यादीचा कागद घडी करून खिशात ठेऊन घेतला. आधी ते चित्रीकरण सकाळीच होणार असल्याचे समजले होते. त्यामुळे भल्या पहाटे उठून जावे लागणार होते. पण ते दुपारी असल्याचे आदल्या दिवशी समजल्यावर ब्रंच घेऊन जायचे ठरले. अखेरीस ते संध्याकाळी व्हायचे ठरल्याने जेवणखाण करूनच गेलो. स्टूडिओवर पोचलो तेंव्हा आधी झालेले शूटिंग संपवून सुप्रसिध्द गाटक, गीतकार, संगीतकार वगैरे सबकुछ असलेले श्री.यशवंत देव परत जाण्यासाठी गाडीत बसलेले दिसले. त्यांना त्यांच्या निवासस्थानी पोचवून ती गाडी श्रीनिवास खळ्यांना आणायला जाणार असल्याचे ऐकले. त्यामुळे भरपूर वेळ शिल्लक होता. चांगली पोटपूजा करून तो सत्कारणी लावला, कारण एकदा स्टूडिओच्या आत गेल्यानंतर तिथे खाण्यापिण्याची कांही सोय होणे निदान आमच्यासाठी तरी कठीणच दिसत होते. परत आल्यावर बाहेरील खोलीतच बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत वाट पहात राहिलो. एक सहाय्यिका आली आणि तिने आत जाण्यापूर्वी आमचा 'रोल' आम्हाला समजावून सांगितला, तसेच त्याची दोघातीघांनी रंगीत तालीमही करवून घेतली.

सगळे चित्रीकरण व्यवस्थित पार पडले. तुषार दळवींनी सफाईने प्रश्न विचारले. खळेकाकांनी समर्पक व माहितीपूर्ण उत्तरे दिली. नव्या पिढीतल्या गुणी गायकांनी तसेच साथसंगत करणार्‍यानी उत्तम कामगिरी केली. तांत्रिक कारणांमुळे त्यात कांही रीटेक करावे लागले, पण तेवढे ते लागतातच असे कळले.
आम्हाला दिलेल्या जाणकार प्रेक्षकांच्या भूमिका आम्ही पार पाडल्या. त्यात चुका झाल्या असल्या तरी त्यामुळे त्या नैसर्गिक वठल्यासारख्या वाटल्या असाव्यात. अशा प्रकारे एक वेगळा अनुभव आणि अनोखा आनंद घेऊन मध्यरात्रीपर्यंत घरी परतलो.
त्यानंतर दिवस, आठवडे आणि महिने गेले तरी त्या कार्यक्रमाचे प्रसारण झालेच नाही. कदाचित त्यासाठी चांगला प्रायोजक मिळण्यासाठी वाट पहावी लागली असेल.त्यामुळे आम्ही त्याबद्दल ज्या लोकांना सांगितले होते त्यांनासुद्धा आमच्याबद्दल शंका वाटायला लागल्या होत्या. तो कार्यक्रम ईटीव्हीवर येणार असल्याचे एकदा अचानक समजले आणि घरातले सर्वचजण तो पाहण्यासाठी सज्ज होऊन टीव्हीसमोर येऊन बसले. सकाळी दहा वाजता बातम्यांचे प्रसारण झाले. ते संपल्यावर 'माझे जीवनगाणे'चा फलकही लागला पण त्यावर गजाननाचे वंदन सुरू झाले. त्याची प्रार्थना करून पुढे मुख्य कार्यक्रम सुरू होईल या आशेने पहात राहिलो, पण तो संपूर्ण भागच गणपतीला वाहिलेला निघाला. "चला, मालिका तर सुरू झाली, आता दर रविवारी पहात राहिलो तर कधी तरी त्यात आपणही दिसू." असे म्हणत निःश्वास सोडला.
रात्री नेहमीचे इतर वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहतांना मध्येच आलेल्या एका कमर्शियल ब्रेकमध्ये रिमोटवर सहज बोटे फिरवतांना ईटीव्हीचा चॅनल लागला आणि त्यावर चक्क खळेकाकांचे दर्शन घडले. तुषार दळवीसुद्धा त्यांच्याबरोबर बोलत होता. नक्कीच हा आम्ही ज्यात सहभाग घेतला तो कार्यक्रम होता. सुरुवात चुकली तरी कार्यक्रम पहायला तर मिळाला. टीव्हीवर स्वतःला पहायला मिळाले. आम्हा दोघांना टीव्हीवर पाहून चिमुकल्या ईशा आणि इरा तर बावचळूनच गेल्या होत्या. आता आम्ही तिथे दिसणार आहोत बघ हां असे सांगितल्यापासून त्यांनी आम्हाला घट्ट पकडून ठेवले होते. त्या दिवशी आम्ही पुण्यात असूनसुद्धा तेवढ्या रात्री चार फोनही आले. आमचे दू ऊऊऊ र दर्शन यशस्वीरीत्या पार पडले म्हणायचे. जसे ते ध्यानीमनी नसतांना अचानकपणे ठरले होते तसेच ते अनपेक्षितपणे पहायलाही मिळाले होते. त्यानंतर जेंव्हा जेंव्हा श्रीनिवास खळे टीव्हीवर दिसतात, तेंव्हा त्या चित्रणाची आठवण झाल्याखेरीज रहात नाही.