Monday, December 25, 2023

शास्त्रज्ञ की राक्षस ?

 

सकाळी सूर्य उगवतो आणि सगळीकडे उजेड पसरतो, तो दिवसभर आकाशात असतो, संध्याकाळी मावळतो, त्यानंतर रात्र होते आणि सगळीकडे अंधार पसरतो, पण त्यावेळी चंद्राचा थोडा उजेड असतो. रात्रीच्या काळ्या आकाशात चांदण्या लुकलुकतात, पण दिवसा त्या दिसत नाहीत. कधीकधी आभाळात काळे ढग येतात आणि सूर्याला झाकून टाकतात, त्यातून पावसाच्या धारा पडतात आणि जमीनीवर पडलेले पाणी नदी नाले ओढे वगैरेंमधून वहात वहात दुसरीकडे जाते. मातीतून झाडे उगवतात, त्यांना पाने फुले, फळे वगैरे लागतात.  जन्माला येतांना लहानसे असलेले बाळ हळूहळू मोठे होते आणि मोठा झालेला माणूस शेवटी म्हातारा होतो. निसर्गात अशासारखे असंख्य बदल होत असतात हे आदिमानवापासून सर्वांनी पाहिलेले असते. पण हे बदल का किंवा कशामुळे होतात याचा फारसा विचार सगळे लोक गंभीरपणे करत नाहीत. अदृष्य आणि सर्वशक्तीमान असा परमेश्वर हे सगळे चमत्कार घडवून आणत असतो असे काही शहाणे लोक सांगतात आणि ते बहुतेक सगळ्या लोकांना पटते. मात्र काही लोकांचे तेवढ्यावर समाधान होत नाही. या जगात कुठलीही गोष्ट का घडते याचा ते लोक सखोल विचार करतात आणि त्यामागे असलेल्या निसर्गाच्या नियमांचा शोध घेतात, त्याची अधिकाधिक माहिती मिळवत राहतात. त्यांना आपण शास्त्रज्ञ म्हणतो.  हे शास्त्रज्ञ लोक निसर्गाचे नियम आणि पदार्थांचे गुणधर्म यांचा अभ्यास करून थांबत नाहीत, तर पुढे जाऊन त्यांचा मानवाच्या फायद्यासाठी उपयोग करून घेण्याचे प्रयत्नही करत असतात.  या प्रयत्नामधूनच प्रगति होत  निरनिराळ्या प्रकारची यंत्रे आणि वस्तू निर्माण होत गेल्या आणि आपण आजच्या जगातल्या सुखसोयींचा अनुभव घेत आहोत. त्यामुळे  शास्त्रज्ञ हे जगाच्या कल्याणासाठी काम करणारे महान लोक असतात  अशी त्यांची एक प्रतिमा मनात असते.


पण जगाच्या सुरुवातीपासूनच माणसांबरोबर राक्षसही निर्माण होत गेले आहेत. ते दुसऱ्यांवर हल्ला करून त्याची मालमत्ता हडप करण्याच्या प्रयत्नात असतात. राक्षसी वृत्तीच्या काही लोकांना तर विध्वंस करण्यातच आनंद मिळतो.   त्यामुळे जसजसे निरनिराळे शोध लागत गेले आणि त्यामधून निरनिराळी औजारे व यंत्रे तयार होत गेली, त्यांच्या बरोबरच अधिकाधिक तीक्ष्ण हत्यारे आणि विध्वंसक स्फोटकेही तयार होत गेली. यामुळे विज्ञान हे विकासाचे साधन आहे की विनाशाचे? असा प्रश्न काही तत्वज्ञानी विचारवंत उपस्थित करत असतात. अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या काही प्रमुख शास्त्रज्ञांची उदाहरणे मी या लेखात घेतली आहेत. 

. . . .

ऑप्पनहायमर हा हॉलिवूडचा सिनेमा आला आणि सगळीकडे त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली.

"कोण हा  ऑप्पनहायमर?"

"अरे तो नाही का, त्यानं पहिला अॅटमबाँब बनवला?"

"म्हणजे जसा एकाद्या रामू हलवायानं सामोसा तळला किंवा राधाकाकूनं उकडीचा मोदक केला तसाच या पठ्ठ्यानं एकट्यानं अॅटमबाँब केला असेल का?"  

"असेल की! अरे सामोसा म्हणजे तरी काय असतो? एका कणकेच्या कवचाच्या आत मीठमिरची, बटाटा आणि मटारचा गोळा आणि मोदक म्हणजे त्यात गूळ आणि खोबरंच ना? यानंही एक स्पेशल भांडं घेतलं असेल आणि त्यात खूप सारे अॅटम खच्चून कोंबून ठेवले असतील."

सर्वसामान्य माणसाचे या विषयातले ज्ञान इतपतच असते. हा पहिला अॅटमबाँब तयार करण्यासाठी एक मोठ्ठे मॅनहॅटन प्रॉजेक्ट होते आणि त्यात हजारो माणसे गुंतली होती हे सहसा कुणाला माहीतही नसते. हे काम इतक्या गुप्तपणे चालले होते की यातल्या बहुतेक लोकांनासुद्धा आपण नेमके कशासाठी काम करतो आहोत याचा पत्ता नव्हताच. अर्थातच या प्रॉजेक्टचा मुख्य अधिकारी असलेल्या ऑप्पनहायमरला मात्र पूर्ण कल्पना होतीच, इतकेच नव्हे तर त्याने या गोष्टीचा ध्यास घेतला होता आणि दोन तीन वर्षे अविश्रांत काम करून ते उद्दिष्ट साध्य करून दाखवले होते. विश्वातला प्रत्येक अणू म्हणजे ऊर्जेचेच वेगळे रूप असते हे त्याआधीच आइन्स्टाइनने गणिते मांडून सिद्ध करून दाखवले होते, पण प्रत्यक्षात आपल्याला वाटेल त्या अणूला फोडून त्यातली ही सुप्त ऊर्जा बाहेर काढता येत नाही. कुठकुठल्या विशिष्ट पदार्थांच्या अणूंना कशा प्रकारे फोडून हे काम करता येते यावर जगभरातल्या सगळ्या प्रगत देशांमध्ये गुप्तपणे संशोधन चालले होते त्याचा धागा धरून हे काम चालले होते.



आल्बर्ट आइनस्टाइन या शास्त्रज्ञाला परंपरागत भौतिकशास्त्राचा अभ्यास करत असतांना काही क्रांतिकारक नवे विचार सुचले आणि त्याने ते सापेक्षता सिद्धांत  (theory of relativity) या नावाने मांडून विज्ञानाच्या क्षेत्रात इतिहास घडवला. त्या आधीची दोनशे वर्षे प्रयोगशाळांमध्ये निरनिराळे प्रयोग करून, त्यातली निरीक्षणे पाहून त्यांवरून निष्कर्ष काढून विज्ञानातले नवे सिद्धांत मांडले जात होते, पण आइनस्टाइनने मात्र घरी किंवा ऑफिसात बसून फक्त तर्कशुद्ध विचार आणि किचकट गणिते यांच्या आधारे कागदावर असे दाखवून दिले की विश्वातले सगळे वस्तुमान आणि ऊर्जा या एकच असतात. (mass–energy equivalence formula E = mc^2) त्याने या दोन्हीमधील संबंधाचे सूत्रही सांगितले. यावरून असे दिसून आले की अगदी कणभर पदार्थातही प्रचंड ऊर्जा दडलेली असते. आइनस्टाइनने  हे समीकरण प्रयोगातून सिद्ध करून दाखवले नाही, किंबहुना ते त्याला शक्य नव्हतेच, पण इतर शास्त्रज्ञ लोकांनी त्यावर विश्वास ठेवला आणि अशी ऊर्जा मिळवण्यासाठी जोरात संशोधन सुरू झाले.  अणुशक्ती हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे एक नवे दालन उघडले.  त्यातील संशोधनामुळेच अणूबाँब तयार करणे शक्य झाले. म्हणून त्यासाठी आइनस्टाइनलासुद्धा जबाबदार धरले जाते. याचे आणखी एक कारण आहे.  दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर आइनस्टाइनने जर्मनी सोडून अमेरिकेत आसरा घेतला होता. त्याला अशी माहिती मिळाली होती किंवा त्याचा असा विश्वास होता की हिटलरचे सरकार अॅटमबाँब तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते यशस्वी झाले तर त्याच्याकडे एक भयानक संहार करणारे अस्त्र असेल. त्या वेळी अमेरिकेत रहात असलेल्या काही शास्त्रज्ञांनी अमेरिकेच्या तत्कालिन प्रेसिडेंटला पत्र लिहून ही माहिती दिली आणि अमेरिकेनेही त्यासाठी प्रयत्न करून जर्मनीच्या आधी हे तंत्रज्ञान विकसित करावे अशी सूचना केली. त्या पत्रावर आइनस्टाइनसारख्या प्रमुख शास्त्रज्ञाने सही केली होती म्हणून प्रेसिडेंट रूझवेल्ट यांनी ते पत्र मनावर घेतले आणि मॅनहॅटन प्रॉजेक्टला मंजूरी दिली. आइनस्टाइन हा व्यक्तिशः अत्यंत मानवतावादी मानव होता तरीही अशा प्रकारे तो अप्रत्यक्षपणे या विध्वंसक कामाला कारणीभूत ठरला. 



भारतातल्या काही लोकांना ऑप्पनहायमरचे मोठे कौतुक वाटते. ते त्याची कार्यकुशलता किंवा त्याने केलेले संशोधन याचे कौतुक नसून ते एका वेगळ्याच कारणामुळे वाटते, ते म्हणजे या माणसाने संस्कृत भाषा आणि भगवद्गीता यांचा अभ्यास केला होता म्हणे. असेही सांगितले जाते की पहिल्या अॅटमबाँबची चाचणी पाहिल्यावर त्याला भगवद्गीतेतला एक श्लोक आठवला. पूर्वी मी असे वाचले होते की भगवंताने अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवले तेंव्हा त्याचे हजार सूर्यांएवढे तेज त्याचे मर्त्य डोळे पाहू शकत नव्हते म्हणून कृष्णाने त्याला दिव्यचक्षू दिले होते, तशा प्रकारचा भयानक उजेड त्या बाँबस्फोटातून निघाला होता. पण आता जी चर्चा चालली आहे त्यात असे वाचले की ऑप्पनहायमरला दुसराच एक श्लोक आठवला होता. त्यात कृष्णाने सांगितले होते, "मी काळ आहे". ज्यांना टीव्हीवरले महाभारत आठवत असेल त्यांना हरीश भीमाणीच्या खर्जातल्या आवाजातले "मैं समय हूँ ... " ची आठवण येईल, पण या ऑप्पनहायमरने स्वतःलाच म्हंटले, "मी सर्व जगाचा संहार करणारा काळ झालो आहे." तो कदाचित पुढे "हाहाहा!!!" करून राक्षसासारखे भेसूर हसलासुद्धा असेल. गीतेमध्ये सांगितलेल्या सत्वरजतमोगुणापैकी याने तामसी गुणच उचलला असावा.

ते काही का असेना, ऑप्पनहायमरला गीता आठवली एवढ्यासाठी इथले काही लोक आपल्या महान संस्कृतीच्या नावाने आपली पाठ थोपटून घेतात आणि 'त्या लोकांना' जेवढे समजते तेवढेही आपल्या लोकांना कळत नाही, हे लोक गीतेकडे पाठ फिरवून बसले आहेत, म्हणून आपला देश मागे राहिला आहे असेसुद्धा सांगतात.  मग एकजण विचारतो, "तुम्ही ती वॉट्सॅपवरली गोष्ट वाचली नाहीत का? त्यात एक महान शास्त्रज्ञ धोतर नेसून आणि उपरणे पांघरून समुद्रकिनारी गीता वाचत बसलेला असतो. तिथे आलेला शर्टपँटमधला एक तरुण त्याची टिंगल करत असतो. तेवढ्यात एक मोठी मोटारगाडी तिथे येते आणि तिच्यातून उतरून सैन्यातले दोन अधिकारी त्या माणसाला कडक सॅल्यूट ठोकून गाडीत यायला सांगतात. त्या गोंधळलेल्या तरुणाला तो शास्त्रज्ञ आपली ओळख देतो.  मग तो तरुण शास्त्रज्ञही गीतेचा अभ्यास करायला लागतो. नंतर भारतानेही अणुस्फोट करून दाखवलाच नाही का?"


आइन्स्टाइन आणि ऑप्पनहायमर हे दोघेही ज्यू होते. दुसरे महायुद्ध सुरू झाले त्या वेळी हिटलरच्या जर्मनीत दिसेल त्या ज्यूला पकडून मारून टाकले जात होते आणि त्याच्या बातम्या अमेरिकेत पोचत होत्याच. त्यांचा या दोघांच्या मनावर काय परिणाम होत असेल? तोपर्यंत अॅटमबाँब ही फक्त एक वैज्ञानिकांच्या मनातली कल्पना होती, पण ती शक्यतेच्या जवळ येतांना दिसत होती. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात जर्मनीची सरशी होत होती. अशा वेळी जर्मन शास्त्रज्ञांनी हा बाँब तयार केला तर मग तो सगळ्या जगावर आपली हुकूमत गाजवेल अशी भीती वाटणे शक्य होते. पण जर्मनीला कसे थांबवणार? म्हणून अमेरिकेने पुढाकार घेऊन आधीच हा बाँब तयार केला तर जर्मनीच्या विरुद्ध पक्षाची बाजू मजबूत होणार होती. सुरुवातीला अमेरिका दुसऱ्या महायुद्धात नव्हतीही. पण तिने युद्धात उतरल्यानंतर मॅनहॅटन प्रोजेक्टला भरपूर अर्थसहाय्य केले गेले आणि ऑप्पनहायमर त्यावर दिवसरात्र  जिद्दीने मेहनत घेत होता. जरी या प्रकल्पात इतर हजारो लोक होते, तरीही ऑप्पनहायमरलाच अॅटमबाँबचा जनक मानले जाते इतके मोठे योगदान त्याने केले होते.


प्रत्यक्षात पहिला बाँब तयार झाला तोपर्यंत जर्मनीने महायुद्धात शरणागती पत्करली होती. त्याच्या आधीच्या काळात जर्मनीने बाँब तयार करण्याइतकी मजल मारलेलीही नव्हतीच.  त्यामुळे ज्या उद्देशाने या कामाची सुरुवात आणि घाई केली होती तो मूळ उद्देश आता शिल्लक राहिला नव्हता. पण जपानने अजून लढाई सुरूच ठेवली होती.  तिकडे जास्त सैन्य पाठवून ती लढाई जिंकण्यापेक्षा जपानवर हा नव्याने निर्माण झालेला बाँब टाकून त्याला लगेच शरण यायला भाग पाडावे असे ठरले. या निर्णयात ऑप्पनहायमर सामील होता.  यात अपरिमित जीवहानी होणार होती आणि तीही सैन्याची नव्हे तर नागरिकांची होणार होती. पण महायुद्धाच्या काळात दोन्ही बाजूंनी नागरी वस्त्यांवर विमानहल्ले करून हे विनाशकारी काम चालवलेले होतेच. अॅटमबाँबने नेमकी किती हानी होणार आहे हे त्या वेळी माहीतही नव्हते आणि असा विध्वंसक बाँब तयार केला गेला आहे ही बातमीसुद्धा गुप्तच ठेवलेली होती. ६ ऑगस्ट १९४५ला अचानक हिरोशिमा या शहरावर पहिला अॅटमबाँब टाकला गेल्यानंतर जगाला त्याचे भयानक स्वरूप दिसले.



ऑप्पनहायमरच्याही आधीच्या पिढीमध्ये फ्रिझ हेबर नावाचा आणखी एक ज्यू शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने कोट्यावधी लोकांचे प्राण वाचवले तसेच लक्षावधी लोकांना ठार मारले असे सांगितले जाते. (Fritz Haber — The Genius Scientist Who Murdered Millions And Saved Billions.)  अठराव्या शतकात होऊन गेलेल्या माल्थस या शास्त्रज्ञाने असे भाकित केले होते की ज्या वेगाने लोकसंख्या वाढते तितक्या वेगाने अन्नाचे उत्पादन वाढू शकत नाही. त्यामुळे जर लोक मारामाऱ्या व लढायांमुळे किंवा रोगराईंमुळे मेले नाहीत आणि त्यांची संख्या कमी झाली नाही तर ते दुष्काळ पडून त्यात उपाशी तडफडून मरतील. कायमच अन्नाचा तुटवडा राहणार आहे आणि तो लोकसंख्येचे नियंत्रण करणार आहे. त्या काळापर्यंत युरोपमधली बहुतेक सगळी सुपीक जमीन लागवडीखाली आणली गेली होती आणि तिथल्या थंड हवामानात वर्षात अनेक पिके घेऊन अन्नाचे उत्पादन वाढवणे शक्यच नव्हते म्हणूनही त्याने असा निष्कर्ष काढला असेल.


यावर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न चालले होते. फ्रिझ हेबर या शास्त्रज्ञाने हवेमधील नायट्रोजन वायूपासून अमोनिया हे संयुग तयार करण्याची कृति शोधून काढली आणि बॉश कंपनीच्या सहाय्याने अमोनिया आणि त्यापासून रासायनिक खते तयार करण्याचे कारखाने काढले. या खतांमुळे अन्नधान्यांचे उत्पादन अनेक पटींनी वाढले आणि वाढत्या लोकसंख्येला खाण्यासाठी अधिक अन्नाचे उत्पादन सुरू झाले. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली तरी  त्यांची अन्नान्नदशा झाली नाही. याचे बरेचसे श्रेय हेबरकडे जाते, पण कुणीही त्याचा देवदूत म्हणून गौरव करत नाही. याचे कारण असे आहे की याच माणसाने रासायनिक युद्धाची सुरुवात करून दिली. त्यानेच तयार केलेल्या पद्धतीमधून पहिल्या महायुद्धाच्या काळात शत्रूसैनिकांवर विषारी वायूचा मारा करून झुरळे मारल्यासारखे हजारो सैनिकांचे जीव घेतले गेले. या राक्षसी कृत्यामुळे त्याची प्रचंड प्रमाणात निंदाही झाली.



त्याच्याही आधीच्या शतकात होऊन गेलेल्या आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने डायनॅमाइट तयार करण्याची प्रक्रिया शोधून काढली आणि त्याचे अनेक कारखाने काढले. या रसायनाचा उपयोग मुख्यतः खाणी किंवा बांधकाम यात खडक फोडण्यासाठी होता आणि आजही केला जातो, पण नोबेलने पुढे जाऊन तोफांसाठी उपयोगात आणायची अनेक स्फोटके तयार केली आणि त्यांचाही व्यापार करून अपार श्रीमंती मिळवली. जगभरातल्या युद्धांमध्ये त्यांचा वापर केला गेला आणि त्यात असंख्य लोक मारले गेले. नोबेल व्यावसायिक यशाच्या शिखरावर असतांना एक घटना घडली. त्याच्या भावाचा मृत्यू झाला असतांना एका वर्तमानपत्रवाल्याचा गैरसमज झाला आणि त्याने आल्फ्रेड नोबेलच्याच मृत्यूची बातमी छापून दिली. ती देतांना मर्चंट ऑफ डेथ किंवा मौतका सौदागर मेला असे छापले. ती बातमी वाचून नोबेलला धक्का बसला आणि आपली या नावाने कीर्ती शिल्लक राहील या विचाराने त्याला अस्वस्थ केले. त्याने आपल्या नावाने एक ट्रस्ट स्थापन करून आपली सगळी संपत्ती तिला दिली आणि त्या रकमेच्या व्याजातून जगातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ, साहित्यिक तसेच शांततेसाठी काम करणारे कार्यकर्ते शोधून काढून त्यांना आपल्या नावाने पुरस्कार द्यावा अशी योजना करून ठेवली.  आजही नोबेल प्राइझ हाच जगातला अत्युच्च सन्मान समजला जातो आणि नोबेलला आता कुणी राक्षस म्हणत नाही.