Sunday, August 17, 2008

विठ्ठला तू वेडा कुंभार - भाग ४


अशा प्रकारे मनाला उदास तसेच अस्वस्थ करणारे वातावरण या गीतामधून निर्माण होते हे प्रपंच या चित्रपटाच्या कथानकाला पोषक असेच आहे आणि ते बनवण्याची कामगिरी ग.दि.माडगूळकरांनी कौशल्याने बजावली आहे. हे गाणे कशा प्रकारचे आहे त्याचा अंदाज त्याच्या ध्रुवपदावरूनच येतो, पण या सृजनशील कुंभाराला वेडा कां म्हंटले आहे याचे कुतूहलही निर्माण होते. पहिल्या कडव्यामध्ये 'उत्पत्ती'ची प्रक्रिया दाखवतांना त्यात विश्वकर्म्याच्या कौशल्याची तोंड भरून प्रशंसाच केलेली आहे. दुस-या कडव्यात 'स्थिती'मधील विविधतेचे गुणगान करता करता शेवटच्या ओळीत अंगाराचा उल्लेख करून चटका लावला आहे. शेवटच्या कडव्यात 'लय' किंवा संहार करणा-या रूपाचे दर्शन घडवतांना कवीने त्याला कांही परखड प्रश्न विचारले आहेत. अशा रीतीने जीवनचक्राच्या तीन अवस्था तीन कडव्यातून दाखवतांना त्यामधील भाव क्रमाक्रमाने बदलतांना दिसतात. अखेरीस चित्रपटाच्या कथानकाला साजेसे उदास आणि तंग वातावरण निर्माण होते.

माडगूळकरांची एकंदर कारकीर्द पाहिली तर त्यांची 'वारकरी संत' किंवा 'हरीभक्तीपरायण कीर्तनकार' अशा प्रकारची प्रतिमा कांही आपल्या डोळ्यासमोर उभी रहात नाही. तसेच या गाण्यामधील 'विठ्ठल' हा दोन्ही कर कटीवर ठेवून अठ्ठावीस युगे स्वस्थ उभा राहिलेला पांडुरंग त्यांना अभिप्रेत असेल असे वाटत नाही. आपल्या अनंत हस्तांनी अविरत कार्य करीत राहणा-या आणि त्यातून अगणित नवनवीन रचनांची निर्मिती करणा-या त्या महान विश्वकर्म्याचे दर्शन या गीतामध्ये त्यांनी घडवले आहे.

मला तर असे वाटते की हे गाणे एकंदरीतच सृजनशीलतेच्या संबंधात लिहिलेले असावे. यातील कुंभार आणि घट ही एक सृजनशील कलाकार आणि त्याची निर्मिती यांची प्रतीके आहेत. अशा प्रकारचे विधान उदाहरण देऊन सिद्ध करायला पाहिजे ना? प्रत्यक्ष गदिमांच्या गीताची चर्चा करतांना त्यासाठी दुसरे उदाहरण शोधण्याची काय गरज आहे? त्यांनी एका जागी म्हंटले आहे, "ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे । माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे ।।" तर त्या गदिमांनी परमेश्वराला उद्देशून जे गीत लिहिले आहे ते त्याचा अंश बाळगणा-या त्यांनाच कसे चपखल बसते याचा थोडा शोध आता घेऊ.
माडगूळकरांनी मुक्तछंदामध्ये कांही काव्यरचना केल्या असल्या तरी ते मुख्यतः गीतकार म्हणूनच ख्यातनाम आहेत. आणि गाणे म्हंटल्यावर त्याला वृत्त, छंद, चाल वगैरे आलेच. विविध ताल व छंद यामधील स्वरांच्या आवर्तनांच्या चक्रावर अक्षरांना आणि शब्दांना नेटकेपणे बसवून त्यांनी आपल्या विपुल गेय काव्याची निर्मिती केली. गीतांमधील विषयांची सुरेख मांडणी करून त्यांना सुडौल आकार दिले. त्यामधील आशयांना उपमा, उत्प्रेक्षा, रूपक आदि अलंकारांनी चांगले सजवले. ठेक्याच्या समेवर यमके जुळवली, आकर्षक अनुप्रास रचले, गीतांची गतिमानता राखली.

ही रचना करतांना त्यांनी कोठल्या माती, पाणी, उजेड , वारा या तत्वांचा उपयोग करून घेतला असेल? अर्थातच त्यांनी अमृताते पैजा जिंकणारी मराठी भाषा, त्यातील अर्थपूर्ण शब्द, चतुर वाक्प्रचार, विविध अलंकार या मातीच्या मिश्रणामधून आपली काव्यशिल्पे साकारली. त्यामध्ये भावनांचा ओलावा निर्माण करणारे पाणी मिसळले, त्यात डोळ्यामधून पाझरणारे अश्रूंचे बिंदू आले तसेच भावनातिरेकामुळे होणारे काळजाचे पाणीपाणीही आले. महत्प्रयासाने त्यांनी संपादन केलेल्या ज्ञानसंपदेच्या तेजाने त्यांना उजाळा दिला. अनेक प्रकाराच्या मतप्रवाहांचा वारा त्यामधून खेळवला. या सर्वांचा सुरेख संगम त्यांच्या काव्यरचनांमध्ये झालेला दिसतो. आपल्या अगणित रचनांमधून त्यांनी आभाळाएवढे एक वेगळे विश्व निर्माण केले.

गदिमांनी निर्माण केलेल्या असंख्य घटांच्या आगळेवेगळेपणाबद्दल तर काय सांगावे? त्यांनी किती त-हांचे विषय लीलया हाताळले आहेत? लहान मुलांसाठी आकर्षक आणि मजेदार बालगीते, यौवनावस्थेतील नाजुक भावनांनी युक्त प्रेमगीते आणि भावगीते, स्फूर्तीदायक समरगीते, भक्तीरसाने ओथंबलेली मधुर भक्तीगीते अशा अनेक प्रकारांची गाणी त्यांनी रचली. त्यातही परंपरागत पद्धतीची भजने, अभंग, लावण्या, पोवाडे आदि लिहिले तसेच आधुनिक काळानुसार नव्या चालींवर, अगदी पाश्चात्य ठेक्यावर गायची अनेक गाणी तितक्याच सहजपणे लिहिली. यांची उदाहरणे देण्यासाठी एक स्वतंत्र लेखमालिकाच लिहावी लागेल. या गीतांमधून शृंगार, करुण, शांत, रौद्र, वीर इत्यादी नवरसांनी भरलेले प्याले त्यांनी मराठी रसिकांना सादर केले.

त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक गाण्यात एक वेगळेपण जाणवते, वेगळ्या भावना, वेगळे विचार, वेगळी मांडणी यांचे दर्शन होते. त्यांनी बनवलेले हे घट म्हणजे हिरेमाणकादि रत्नांनी भरलेले रांजण आहेत असे म्हणायला हवे. तरीही त्या सगळ्या गाण्यांचे दैवयोग कांही सारखे दिसत नाहीत. कांही गीतांना तितकेच उत्तम संगीत दिग्दर्शक लाभले आणि त्यांनी लोकांच्या ओठावर रेंगाळतील अशा चाली दिल्या, ती गाणी थोर गायकांच्या गोड गळ्यातून उतरून जनतेपुढे आली, ज्या चित्रपटासाठी ती लिहिली ते खूप लोकप्रिय झाले, अशा सगळ्या गोष्टी जुळून येऊन ती गाणी अजरामर ठरली. दुसरी कांही तितकीच अर्थपूर्ण आणि सुंदर गाणी कांही कारणाने लोकांसमोर तितकीशी आली नाहीत किंवा फारसा वेळ न राहता लवकरच विस्मृतीच्या पडद्याआड गेली. गीतरामायणाने एका काळी लोकप्रियतेचे सारे उच्चांक मोडले होते आणि आजसुद्धा त्यातील गाणी निरनिराळ्या मंचावरून नेहमी ऐकू य़ेतात, पण गीतगोपालाला ते यश मिळाले नाही. माडगूळकरांची कांही गीते लोण्यासारख्या मुलायम कागदावर लिहून घेऊन लोकांनी आपल्या संग्रहात जपून ठेवली, तर कांही गाण्यांचे कागद बंबामध्ये स्वाहा झाले असतील. त्यांच्या मुखी अंगार पडले काय किंवा ते अंगाराच्या मुखात पडले काय, दोन्हीमध्ये त्यांचे होरपळणे सारखेच!
. . . . .(क्रमशः)

No comments: