Saturday, August 23, 2008

ध्वज आणि त्यांचे बदलते स्वरूप (उत्तरार्ध)


गणेशाची किंवा श्रीकृष्याची मूर्ती, शंकराची पिंडी, शाळिग्राम, साधुसंतांच्या तसबिरी वगैरेंची आपण पूजा करतो, त्यांना नमस्कार करतो आणि त्यांची आराधना करतो. निराकार परमेश्वरावर विश्वास ठेवणारे या गोष्टींना मान्यता देत नाहीत. निर्जीव दगड किंवा धातूच्या आकारात किंवा कागदाच्या चिटो-यामध्ये ते लोक परमेश्वराला पाहू शकत नाहीत. पण मूर्तिपूजक असो वा मूर्तिभंजक असो सगळेच लोक झेंडा हे देशाचे, धर्माचे किंवा माणसांच्या विशिष्ट गटाचे प्रतीक आहे असे मात्र मानतात. 'प्रतीक' या संकल्पनेचे ध्वज हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.


राष्ट्रीय पशु, पक्षी, फूल वगैरे इतर अनेक प्रतीकांची नांवे सरकारी आदेशाने जाहीर केली जातात, शाळेतल्या मुलांना ती शिकवतात आणि त्यातली तल्लख बुद्धीची मुले ती लक्षात ठेऊन क्विझमध्ये मार्क मिळवतात. आम जनतेला मात्र त्यातल्या कोणत्याही प्रतीकावरून आपल्या देशाची आठवण येते असे दिसत नाही. नोटेवर आणि नाण्यावर छापलेली मुद्रा आणि सर्व महत्वाच्या प्रसंगी उभारलेला झेंडा ही प्रतीके तेवढी सर्वांना ठाऊक असतात. ध्वजाला मान दिला जातो, त्याच्या पुढे सारे नतमस्तक होतात, कोणी त्याची आरती करतात, कोणी त्याला राखी बांधतात, त्याचे रक्षण करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुतीसुद्धा दिल्याचा इतिहास आहे. इथे झेंडा म्हणजे एक कापडाचा तुकडा उरलेला नसतो. तो संपूर्ण राष्ट्राचे किंवा निदान एका विशाल जनसमूहाचे प्रतीक बनलेला असतो. लोकांच्या मनात तो कर्तव्यबुद्धी, इमानदारी, राष्ट्रभक्ती, अस्मिता यासारख्या उच्च कोटीच्या भावना जागृत करतो.


पूर्वापारपासून 'झेंडा' या प्रतीकात्मक संकल्पनेचा उपयोग होत आलेला आहे. एका राजाने किंवा माणसांच्या समूहाने दुस-याशी लढाई करून त्याला चारी मुंड्या चीत केले, पराजित लोक नष्ट झाले, पळून गेले किंवा शरण आले आणि विरोध शिल्लकच राहिला नाही असे झाल्यावर जेते लोक आपला झेंडा उंच फडकवून
आनंद व्यक्त करीत असत. दुरूनही तो दिसत असल्यामुळे आणि ओळखता येत असल्यामुळे आसमंतातील सर्वांना ते दिसत असे. कोणताही किल्ला काबीज केला की त्यावर तो जिंकणा-याचे निशाण फडकवण्याची पद्धत होती. त्या जागी कोणाची सत्ता चालते हे त्यावरून कळत असे. राघोबादादांनी मराठेशाहीचा झेंडा
अटकेपार फडकवला हे इतिहासात वाचतांना आपल्या अंगावर मूठभर मांस चढते. एखाद्या जागी दंगेधोपे चालले असतील तर तिथे सैन्य पाठवले जाते आणि तिथे गेल्यावर ते त्या भागाच्या हमरस्त्यावरून ध्वजसंचलन करते. "आता कोणाची हिंमत असेल तर पुढे या" असा इशारा त्यातून दिला जातो. या सगळ्या जागी झेंडा हे सत्तेचे प्रतीक आहे.


गिर्यारोहणासारखी आव्हानात्मक कामगिरी फत्ते झाल्यावर त्या जागी त्याची खूण झेंड्याच्या रूपाने ठेवतात. उत्तर व दक्षिण ध्रुवावर आणि एव्हरेस्ट शिखरावर जे साहसी वीर सर्वात आधी पोचले ते तेथे आपल्या देशाचा ध्वज रोवून परत आले. नील आर्मस्ट्रॉंगने तर चंद्रावर निशाण फ़डकवले. ऑलिंपिक किंवा कोठल्याही आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये विजयी वीरांना पदके दिली जात असतांना त्यांच्या देशांचा ध्वज उंचावला जातो. तो पाहून त्यांच्या मनातला आनंद द्विगुणित होतो. ऑलिंपिक क्रीडास्पर्धांचाच एक खास ध्वज आहे. स्पर्धा सुरू करतांना त्याचे समारंभपूर्वक आरोहण होते आणि कार्यक्रमाचे सूप वाजवतांना तो सन्मानाने खाली उतरवला जातो.


राष्ट्रध्वज ही आपल्या देशाची खूण असते व कधी कधी त्यावरून माणसाची ओळख करून दिली जाते. टेलीव्हिजनवर होत असलेल्या खेळांच्या प्रक्षेपणात त्यात खेळत असलेल्या खेळाडूच्या किंवा संघाच्या नांवासोबत अनेक वेळा त्याच्या देशाचा झेंडा दाखवतात. ऑलिंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा सुरू होण्यापूर्वी सर्व खेळाडूंचे सांघिक संचलन होते तेंव्हा प्रत्येक देशाच्या संघाचे नेतृत्व करणारा (किंवा करणारी) हातात त्या देशाचा झेंडा घेऊन चालत असतो. मागे एकदा मी जर्मनीतल्या एका कारखान्यात कांही कामासाठी गेलो होतो तेंव्हा मुख्य प्रवेशद्वारापाशी असलेल्या दोन खांबांवर भारत आणि जर्मनी या देशांचे ध्वज लावलेले पाहून मला किती आनंद झाला की ते शब्दात सांगता येणार नाही. समुद्रातून जाणारी गलबते आपल्या देशाचा ध्वज अभिमानाने शिडावर लावीत असत. त्यामुळे ते जहाज कोणत्या देशातले आहे हे दुरून पाहतांना न सांगताच समजत असे. एवढेच नव्हे तर चांचेगिरी करणारे पायरेट्सदेखील दोन हाडे आणि कवटीचे चित्र असलेला झेंडा फडकावत होते हे आपण कॉमिक्समध्ये पाहतो.


सत्ता किंवा विजय यातील धुंदीपासून अगदी दूर अशा वेगळ्या भावनादेखील ध्वजारोहणाद्वारे व्यक्त करतात. "विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला । वाळवंटी चंद्रभागेच्या कांठी डाव मांडिला ।" असे म्हणत वारकरी हरिनामाच्या कल्लोळात डुंबतात. विठ्ठलाच्या भक्तीची प्रेरणा घेऊन सारे हरिभक्त एका झेंड्याखाली जमा होतात. त्याच प्रकारे समविचाराचे लोक एक संघटना निर्माण करतात तेंव्हा अनेक वेळा तिचा एक ध्वज बनवला जातो. हातोडा आणि कोयता यांचे चित्र असलेल्या लाल बावट्याखाली सा-या दुनियेतील कामगारांना एकत्र आणण्याचे स्वप्न एके काळी जगभरातील साम्यवादी पहात होते. इतर राजकीय पक्षांच्या कार्यातसुद्धा त्यांच्या ध्वजाला केवढे महत्व आहे हे आपण रोजच पहातो.


युद्धविराम करण्यासाठी रणभूमीवर पांढरा ध्वज दाखवतात. ऐन लढाईच्या हमरीतुमरीतदेखील रेडक्रॉसचा झेंडा दाखवत मानवी सेवाभावाचे कार्य चालले होते. रेल्वे असो वा रस्ता असो, त्यावरून पुढे जाणे धोक्याचे असल्यामुळे थांबायचे असेल तर लाल झेंडा दाखवतात आणि सर्व कांही ठीक आहे हे पाहून पुढे जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला जातो. हल्ली या कामासाठी दिव्यांचा उपयोग केला जात असला तरी लाल किंवा हिरवा झेंडा दाखवणे हा शब्दप्रयोग शिल्लक आहे. ध्वजाचे महत्व सांगणा-या सगळ्याच गोष्टींचा उल्लेख एका लेखात करणे अशक्य आहे. त्याची महती अपरंपार आहे आणि त्याला अनेक पैलू आहेत. म्हणूनच "पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तीन्ही लोकी झेंडा । " अशी मनोकामना सगळे करतात.

No comments: